बळीचे राज्य येणार आहे!/आहुती सेनापतीची मंगल होवो तुला

विकिस्रोत कडून

आहुती सेनापतीची मंगल होवो तुला



 'शेतकरी संघटक'चा हा अंक प्रकाशित होईल तेव्हा ७४ वे वर्ष संपून मी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याला तीन दिवस होऊन जातील. कार्यकर्त्यांच्या हाती हा अंक पडेपर्यंत ७५ व्या वर्षातला माझा पहिला आठवडा पुरा होऊन गेला असेल.
 एका वयानंतर वाढदिवस हा काही आनंदाने साजरा करण्याचा प्रसंग राहत नाही. आयुष्याची गाडी बऱ्यापैकी उतरणीला लागल्यानंतर, उमेदीच्या वर्षांत काय घडले, काय झाले, काय केले, काय करायला हवे होते याचा विचार साहजिकच डोकावून जातो.
 पुढच्या आयुष्यात काही आशादायक काळाची अपेक्षा असेल तर अशा तऱ्हेच्या आत्मचिंतनाची फारशी आवश्यकता वाटत नाही; प्रगतीच्या वाटेवर आहोत तर पूर्वायुष्यात जे जे काही झाले ते योग्यच होते, निदान त्यात काही फारसे चूक नव्हते अशी समजूत बुद्धी आणि मन आपोआपच करून घेतात. हेच आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळाले तर आयुष्याच्या होडीला जी जी दिशा पाण्याच्या प्रवाहाने किंवा वाऱ्याने दिली ती आपल्या सुदैवाने अनुकूल अशीच झाली आणि वर्तमानकाळातील भाग्य आपल्या कर्तृत्वाइतकेच दैवयोगाने आणि नियतीने घडवून आणले अशी मनाची सहज समजूत होते.
 ७५ व्या वर्षाच्या सुरुवातीला माझी अशी स्थिती नाही हे उघड आहे. आजतरी मला, येणाऱ्या उष:कालाची अंधुकही छटा पूर्वक्षितिजावर दिसत नाही.
 शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या माणसांना लाथाडून देशभर फिरलो. त्यांचे शाप मला लागले का काय अशी शंकाही मनात येऊन जाते. रूढार्थाने माझ्यासारख्या नास्तिकाला ही भावना उचित नाही. मानसिक संतुलन पहिल्यासारखे खंबीर राहिलेले नाही, मन विचलित झाले आहे याचे हे लक्षण आहे हे मलाही मान्य आहे.
 शेतकऱ्यांना सन्मानाने आणि सुखाने इतर नागरिकांप्रमाणे जगता यावे या करिता 'शेतीमालाला रास्त भाव' या एककलमी कार्यक्रमासाठी मी सर्वशक्तीने प्रयत्न केला; जात, धर्म, पंथ, भाषा इत्यादी भेदाभेद दूर सारून केला. अगदी प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर, अनेक वेळा स्वजातीय आणि स्वधर्मीय यांच्यावर प्रहार करून अन्यायच केला. ज्या पुरुष जातीत जन्मलो त्यांच्याही विरुद्ध दंड थोपटले.
 हाती काय आले ?
 शेतकरी संघटनेचा एककलमी कार्यक्रम आणि त्याची आर्थिक मीमांसा देशभरच्या शेतीतज्ज्ञांना आणि अर्थशास्त्र्यांना मानावी लागली यात काही वाद नाही. पक्षापक्षांचे नेते आज २५ वर्षांपूर्वीची शेतकरी संघटनेचीच भाषणे आणि भाषा वापरतात हेही खरे. एवढेच नव्हे तर, खुल्या व्यापाराची मांडणी विजयी झाली आणि जागतिक व्यापार संस्था शेतीमालाच्या व्यापारातही शेतकरी संघटनेची भूमिका अंमलात आणू लागली. जैविक तंत्रज्ञानाचा विरोध करणाऱ्यांचा सपशेल पाडाव झाला. जैविक बियाण्याने कपाशीच्या शेतीचा चेहरामोहराच बदलून टाकला. आर्थिक स्वातंत्र्याबरोबर तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची पताका रोवली गेली.
 याउलट, ६० टक्क्यांवर असलेल्या शेतकरी समाजात शेतकरीपणाची अस्मिता रुजली नाही, त्या अस्मितेने मूळच धरले नाही. 'इंडिया विरुद्ध भारत' ही मांडणी न करणारा अर्थशास्त्री आजकाल दुर्मिळ झाला आहे; पण 'भारता'ची अस्मिता ही शेतकरी समाजात मूळ धरू शकली नाही. या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावून आर्थिक संरक्षणवाद्यांनी बऱ्यापैकी मजबूत बांधणी केली.
 शेतकऱ्यांच्या मालाला हमखास भाव मिळवून देण्याकरिता सर्व सरकारी यंत्रणेला बाजूला टाकून सुपर मार्केटचे जाळे तयार करावे हा धाडसी प्रयोग शेतकरी संघटनेला पेलवला नाही. सगळ्या देशभर आज अशी जाळी पसरत आहेत, यशस्वी होत आहेत. वायदे बाजारामुळे शेतकरी गणकयंत्र साक्षर व्हावेत आणि त्यांनी योग्य तो भाव मिळवून घ्यावा या प्रयोगालाही डाव्या पक्षांनी खीळ घातली. जागतिक मंदी व त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ आणि हवामानातील बदलामुळे भेडसावणारे दुष्काळाचे सावट यांमुळे शहरी पगारदार ग्राहकांना अनुकूल असणारी अर्थनीती पुन्हा एकदा 'आम आदमी' अर्थशास्त्राच्या नावाखाली राबवली जात आहे एवढेच नव्हे तर ती अत्यंत लोकप्रिय होत आहे. 'आम आदमी'वाद निवडणुका जिंकण्याचे हुकमी साधन झाले आहे.
 ज्या शेतकरी समाजाच्या हाती रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या अशी आंदोलनाची अनेक साधने देऊन लढण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला; त्या समाजातील शेतकऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत दररोज वीस ते तीसच्या संख्येने आत्महत्या केल्या.
 शेतकरी संघटनेच्या 'नैतिक दर्शना'त उद्योजकतेला मोठे स्थान आहे. १९९१ नंतरच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या काळात देशी उद्योजकांनी मोठी भरारी मारली. पण, तापमानवाढ, हवामानातील बदल यांमुळे सर्व उद्योजकतेवरच मोठे आक्षेप उठत आहेत. उद्योजकतेनेच घात केला, उद्योजकतेनेच पृथ्वी बुडायला आली अशा पर्यावरणवादी विचारालाही जागतिक मान्यता मिळते आहे.
 बायबलच्या 'जुन्या करारा'तील जगाच्या निर्मितीसंबंधी मांडलेल्या सिद्धांताच्या आधाराने पर्यावरणवादी प्रतिभा, संशोधन आणि धाडस या गुणांना महापाप मानू लागले आहेत.
 आर्थिक मंदी हटविण्याकरिता पुरुषार्थाला आवाहन करण्याऐवजी अंत्योदयाच्या करुणावादाला जोपासले जात आहे.
 जी काय थोडीफार वर्षे जगायला मिळेल त्या काळात गुणवत्ता आणि पुरुषार्थ सांगणारा विचार पुढे येण्याची काहीही शक्यता दिसत नाही.
 अलीकडे महाराष्ट्राच्या पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त एका मान्यवर वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एका प्रथितयश संपादकांनी १९८० सालाच्या काळाचा उल्लेख करताना त्यावेळी देशाचा पहिला शेतकरी पंतप्रधान शरद जोशीच होतील अशी सर्वदूर भावना असल्याची आठवण केली होती. १९८० सालापासून शेतकरी संघटनेच्या बांधणीमध्ये, कार्यक्रमांत किंवा विचारात अशा काय चुका झाल्या की आजची निराशाजनक परिस्थिती तयार व्हावी याचा ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ऊहापोह करण्याचे योजिले आहे.
 गेल्या ७४ वर्षांतील शेवटची ३२ वर्षे स्वित्झर्लंडहून परत आल्यानंतर हिंदुस्थानात गेली. त्यांतील जवळपास ३० वर्षे शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलन यांत गेली.
 माझा जन्म शेतकरी कुटुंबातला नाही. निदान पाच पिढ्यातरी माझ्या कुटुंबात कोणी शेती केली नाही. "शेतकऱ्यांविषयी करुणाभाव उपजून संयुक्त राष्ट्रसंघाची सुखासीन नोकरी सोडून हे हिंदुस्थानात आले." असे कोणी विधान केले तर ते मी तत्परतेने खोडून काढीत असे. "संयुक्त राष्ट्रसंघात परमोच्च पदापर्यंत बढती झाली असती तरी त्यापेक्षा संघटनेच्या कामात
  'दारिद्रयदुःखअपमानही प्राप्त झाले,
 कारागृही सतत वास करी जरी मी'
 तरी त्यात मला अधिक सार्थकता वाटेल" असे मी अनेकवेळा म्हटले आहे.
 "नेहरूप्रणीत समाजवादाच्या काळात सर्वच उद्योजकांवर अन्याय झाला; पण त्या सर्वांत भयानक जुलूम शेतकऱ्यांना सहन करावा लागला म्हणून मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायचे ठरवले." हेही मी वारंवार बोललो आहे.
 "शेतमजुरीचे दर शेतीमालाच्या भावापेक्षा अधिक गतीने वाढतात याची मला खात्री आहे; पण, शेतकऱ्यांनी शेतमजुरांना किमान दरानेही मजुरी देण्यात खळखळ केली तर मी शेतमजुरांच्या बाजूने शेतकऱ्यांविरुद्ध लढण्यास उभा राहीन," असे मी सुरुवातीपासून स्पष्ट केले आहे.
 थोडक्यात, मी जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाचे क्षेत्र निवडले; इतर बहुतेक नेत्यांप्रमाणे जन्माच्या अपघाताने किंवा परिस्थितीच्या रेट्याने डोक्यावर पडलेले कार्यक्षेत्र आपले म्हटले नाही याचाही मला अभिमान आहे.
 माझ्याविषयी लिहिताना कै. अरविंद वामन कुळकर्णी यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला आहे. माझ्या विचारात श्रेय म्हणून मी न्याय, सुख, शांती अशी भाववाचक नामे वापरीत नाही. हे कुळकर्णी यांनी आवर्जून मांडले होते. अशा गुणवाचक शब्दांपेक्षा संख्यावाचक श्रेये ठेवणे माझ्या प्रकृतीला अधिक भावणारे आहे. सर्व श्रेयांत 'स्वातंत्र्य' ही संकल्पना संख्यावाचक आहे. तिची व्याख्या करताना मी स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या आणि चढत्या कक्षांची संकल्पना मांडली आहे.
 प्रत्येक व्यक्तीच्या जाणिवांचीही मी संख्यात्मक व्याख्या केली आहे. त्या जाणिवांच्या आधारे ॲडम स्मिथच्या 'Invisible Hand' चे विश्लेषण करून बाजारपेठेचे अध्यात्म उकलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच आधारे नेतृत्वगुणाचे अध्यात्मही तपासून पाहिले आहे.
 ७५ वर्षांचे समालोचन करताना माझ्या या आनंदयात्रेचा आठव कमी होतो. कालखंडाच्या जवळपणामुळे शेतकरी आंदोलनाच्या यशापयशाच्या आधारेच मी माझ्या आयुष्याचे मूल्यमापन करू लागतो. शेतकरी आंदोलन माझ्या दृष्टीने एक संदर्भरेषा होती. शेतकरी संघटना सुरू करण्याआधी माझे जे विचारविश्व होते त्याला संघटनेमुळे प्रचंड व्यापकता आली, पुष्कळशा संकल्पना स्पष्ट झाल्या. हे संघटनेचे ऋण मान्य केलेच पाहिजे; पण शेतकरी आंदोलनाचे अपयश हे फार तर माझ्या आयुष्याच्या एका कालखंडातील प्रयोगाचे अपयश मानणे योग्य होईल. शेतकरी आंदोलनानंतरही माझी आनंदयात्रा चालूच राहणार आहे.
 स्वित्झर्लंड सोडून येथे येताना तेथील अनेक सहकाऱ्यांची मने दुखवावी लागली, तुडवावी लागली. यापुढच्या माझ्या मार्गक्रमणेत हाही दाहक अनुभव पुन्हा एकदा घ्यावा लागेल. ही नियती नाकारणे माझ्या हाती नाही आणि कोणाच्याच हाती नाही.

(शेतकरी संघटक, ३० ऑगस्ट २००९)