बळीचे राज्य येणार आहे!/भारत दशकातील चतुरंग शेती

विकिस्रोत कडून

VZ

भारत दशकातील चतुरंग शेती



 शेतकरी संघटनेचा शेगावचा जाहीरनामा घोषित झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे की इतके दिवस शेतकरी संघटनेने ज्या गोष्टींची चेष्टा केली, उपहास केला; ज्या गोष्टींतून शेतकऱ्यांचं भलं होणार नाही असं लोकांना ठासून सागितलं त्याच गोष्टी शेतकरी संघटना आता शेतकऱ्यांना उलटून सांगायला लागली आहे की काय?
 चतुरंग शेती म्हणजे शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा सहज आविष्कार.
 पूर्वी जर कुणी येऊन सांगायला लागलं की शेतीला पाणी मिळायला पाहिजे; खतं किती वापरा, औषधं किती वापरा तर आम्ही त्याची चेष्टा करत होतो आणि म्हणत होतो की 'आबा पाटला' च्या सांगण्याप्रमाणे आम्ही खुरपण्या खूप वेळा केल्या आणि म्हशी गाई ठेवून बघितल्या, कारली लावली, तोंडली लावली; पण डोक्यावर कर्ज चढण्यापलीकडे काही झालं नाही. लोकांना आग्रहाने आम्ही सांगत होतो की शेती करण्याची कोणतीही पद्धत किफायतशीर नाही; कारण 'शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे' आणि आज आपण शेती कशी करावी, कोणती खतं वापरावीत असलं काही उलट बोलायला लागलो का काय?
 आम्ही असं म्हणत होतो की साखर कारखाना निघाला, सूतगिरणी निघाली, कृषिउत्पन बाजार समिती निघाली, व्यापाराची व्यवस्था झाली, बँकेची व्यवस्था झाली, पतपुरवठ्याची व्यवस्था झाली, कारखान्याची व्यवस्था झाली तरी परिणाम एकच झाला; शेतकऱ्याच्या अंगावर जेवढी काही सालटी होती तेवढीसुद्धा निघून गेली आणि आज आम्ही शेतकऱ्यांना व्यापार करा किंवा प्रक्रिया करा असं नेमकं उलट सांगायला लागलो आहो की काय ?
 एका काळी मी असं म्हटलं होतं की पाण्याचं वाटप कसं व्हावं याबद्दल माझी काही व्यक्तिगत मतं आहेत; पण त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. गावागावांमध्ये वैद्यकीय व्यवस्था कशी व्हावी यासंबंधीही मी काही बोलू इच्छित नाही. असं का? त्यावेळी मी असं म्हटलं होतं की. "एखाद्या जन्मांधाला जर डोळे आले तर जग कसं दिसेल याचं चित्र त्याला कधी सांगता येणार नाही; ज्याने आयुष्यात कधी प्रकाश पहिलाच नाही तो मनुष्य त्याला दृष्टी आली आणि प्रकाश दिसू लागला तर जग कसं दिसू लागेल याचं वर्णन काय करणार? आणि आपण त्याच्यासमोर जगाचं कितीही वर्णन केलं तर त्याला त्यात काय समजणार? तसंच पिढ्यानपिढ्या शेती तोट्यात चालवणारा शेतकरी हा माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र जर मिळालं तर कसं काय जगेल याचे आराखडे आता बनवायला लागू नका. शेतकऱ्याला लुटणाऱ्या माणसांनी विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये शेती कशी करावी याचे आराखडे बनविण्याचे काही कारण नाही. ज्यावेळी शेतकरी माणूस बनेल आणि स्वतंत्र बनेल. तेव्हा तुमच्या कल्पनेमध्येसुद्धा येणार नाही असे अप्रतिम मार्ग - शेती करण्याचे, प्रक्रिया करण्याचे, व्यापार करण्याचे, निर्यात करण्याचे तो - दाखवून देईल.'
 काही लोकांना खूप आनंद वाटायला लागला आहे. ते म्हणू लागले की शेतकरी संघटना आता रुळावर आली आहे. इतके दिवस जे आम्ही म्हणत होतो तेच आता शेतकरी संघटना म्हणू लागली आहे. असं म्हणण्यात त्यांना खूप आनंद होऊ लागला आहे. अनेक थोर-थोर नेत्यांची मला पत्रं येऊन राहिलीत की शेतकरी संघटनेने आता विचार अधिक व्यापक करायला सुरुवात केली या गोष्टींनी त्यांना फार आनंद झाला आहे. म्हणजे 'आम्ही फार शहाणे होतो,तुम्ही इतके दिवस मूर्खासारखे चालला होता, आमच्या रस्त्याला आलात बरं झालं.' असंच जणू त्यांना म्हणायचं आहे!
 शेतकरी संघटनेच्या शेगावच्या जाहीरनाम्याचे दिलेल्या भारत दशकातील चतुरंग शेतीच्या कार्यक्रमाबाबत अशी काही गैरसमजूत निदान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची होऊ नये आणि झाली असल्यास ती दुरुस्त व्हावी.
 एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. रात्र संपते आणि दिवस उगवतो. काळीकुट्ट अंधारी रात्र नेमकी संपली कधी आणि पहाटेची सुरुवात झाली कधी याची जर कुणाला रेषा निश्चित करायला सांगितली तर ते करणे अशक्य आहे. जगामधील सगळे महत्त्वाचे बदल हे असे अलगद पावलांनी येऊन जातात, कधी येऊन जातात ते समजतसुद्धा नाही. मोठा आवाज करून, धूमधडाक्याने एखादा बदल घडला तर समजा हा बदल फालतू आहे. इंदिरा गांधींच्या जागी राजीव गांधी आले, वर्तमानपत्रात खूप आवाज झाला, याचा अर्थ काही हा खरा मोठा बदल नाही. एखाद्या देशात क्रांती झाली म्हणजे काय? लोकांना लुटणारं एक सरकार जाऊन लोकांना लुटणारं दुसरं सरकार आलं म्हणजे फार मोठी क्रांती झाली की काय ? गोरा इंग्रज गेला, लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा लागला, नवीन पंतप्रधान सफेद अचकनीतले गुलाब लावणारे झाले, गोऱ्या इंग्रजाच्या जागी काळा इंग्रज आला ही काही क्रांती झाली नाही; पण वर्तमानपत्रात ज्याचा आवाज होतो तो मोठा बदल झाला असं आजकाल सगळ्यांना वाटतं. एखाद्या राज्याचा एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा मुख्यमंत्री झाला तरी वर्तमानपत्रांची भाषाच अशी बदलते की जणू काही सारं जगच बदललं! खरं म्हटलं तर काही सुद्धा फरक पडलेला नसतो.
 फार महत्त्वाचे बदल असे अलगद येऊन जातात की त्याचा आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही. असा बदल शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे.
 'शेगावच्या जाहीरनाम्या' मधील पहिला मुद्दा हा आहे. ज्या ज्या साधनांनी शेतकऱ्यांना बाधून ठेवलेलं होतं ती साधनं आता सरकारच्या हाती सध्या तरी नाहीत; उद्या परत आली तर बघू निदान, ज्या प्रमाणात त्यांच्याकडं ती साधनं होती त्या प्रमाणात तरी नाहीत. अशा परिस्थितीत पुढचे पाऊल कसे टाकायचे हा खरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
 एक जुन्या नाटकातला प्रसंग आहे. पंतोजी एका श्रीमंत व्यापाऱ्याला गद्य म्हणजे काय हे शिकवायचा प्रयत्न करतात, 'कविता म्हणजे पद्य, कविता नाही ते गद्य.' गद्याचा अर्थ शिकता शिकता तो व्यापारी काय म्हणतो? 'अरे, गद्य म्हणजे आपण नेहमी बोलतो तेच ना?' तसाच हा शेगावचा चतुरंग शेतीचा कार्यक्रम म्हणजे काय आहे? शेतकऱ्याच्या पायात जन्मल्यापासून ज्या बेड्या पडलेल्या असतात त्या तशा न्मल्यापासून नसत्या तर तो जन्मतः जसं वागायला लागला असता त्याची ही रूपरेषा आहे; यात नवीन काही नाही.
 जर का, शेतकऱ्यांना आजपर्यंत या गुलामगिरीचा अनुभव कधी घ्यावा लागला नसता तर त्यांनी काय केलं असतं? शेती कशी केली असती? व्यापार कसा केला असता? प्रक्रिया कशा केल्या असत्या ? निर्यात कशी केली असती? हे आपोआपच जमलं असतं. फक्त आपण जन्मांध जे जन्मलो, आता दृष्टी आल्यानंतर जाणवणाऱ्या या प्रकाशाशी कसं काय वागायचं हे समजत नाही म्हणून ही चतुरंग यादी करावी लागली.
 पण हा कार्यक्रम म्हणजे आता परिस्थिती १९९१ मध्ये बदलल्यानंतर, शेती कशी करावी हे सांगणारे 'आबा पाटील' साखरेची प्रक्रिया कशी करावी हे सांगणारे 'विखे पाटील', निर्यात करणारे आणि कोणी, व्यापार करणारे आणि कोणी यांच्या मार्गाने आम्ही आता जायला लागलो आहोत ही कल्पना सपशेल चूक आहे. उलट, शेती, प्रक्रिया, व्यापार आणि निर्यात या चारही क्षेत्रांमध्ये आजपर्यंत बुजुर्गानी जे जे मांडलं ते उधळून फेकून देण्याकरिता शेगावचा हा चतुरंग कार्यक्रम आहे. आतापर्यत, शेती कशी करावी याच्याबद्दलच्या ज्यांनी ज्यांनी कल्पना तोडल्या त्या सगळ्यांनाच चुकीचं ठरवणारा असा कार्यक्रम आहे. कारण, आता जन्मांधाला दृष्टी आली आहे. दृष्टी आल्यानंतर तो जुन्या पंडितांनी सांगितलेलं काहीही मानायला तयार नाही.
 सुरुवातीच्या वेदना ही स्वातंत्र्याची किंमत आहे
 या मधल्या काळामध्ये संघटनेने काय काम केलं ? चीनमधल्या स्त्रियांविषयी एक हकीकत आहे. चीनमध्ये एकेकाळी अशी कल्पना होती की खानदानी स्त्री कोणती? तर जिला कधीही पलंगावरून उतरून चालावं लागत नाही ती खरी खानदानी असं समजलं जायचं. हरियाणामधला शेतकरी भल्यामोठ्या साफ्याचा फेटा घालतो. एवढ्या मोठ्या साफ्याचा फेटा घालणं म्हणजे किती कठीण ? त्याला स्टार्च लावून तो फेट्याचा साफा ताठ ठेवावा लागतो. तोच जर मजुराचा फेटा असेल तर तो कसातरी गुंडाळला तरी चालतो. कारण त्या मजुराला आपल्या फेट्यावर मालाचं ओझ घेऊन जावं लागतं. शेतकऱ्याच्या साफ्याच्या फेट्याचा तुरा ताठ आहे याचा अर्थ काय? मला काम करावं लागतं नाही असा मनुष्य आहे मी! तशी चीनमधल्या खानदानी महिलांची ऐट काय? यांना पलंगावरून उतरायला न लागल्यामुळे यांचे पाय अगदी बारीक राहतात. मग ते पाय बारीक राहावे याकरिता मोठे प्रयत्न! जन्मल्याबरोबर मुलीचे पाय पट्ट्याने बांधून टाकीत. मग ते पाय साहजिकच लहान राहत आणि तसे राहावे म्हणून कायम पट्ट्यात राहत. पाय लहान राहत पण लहानपणापासून बांधलेले राहिल्यामुळे पुढे त्या मुलींना जन्मभर त्या पायांवर उभे राहणंसुद्धा शक्य होत नसे. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही क्रूर अमानुष पद्धत बंद केली. जन्मतः ज्यांच्या पायाच्या पट्ट्या जेव्हा सोडल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या मुलींनी कळवळून विनंती केली की आता आमच्या पायांतून पुन्हा रक्त खेळू लागलं आहे याच्या वेदना आम्हाला सहन होत नाहीत, कृपा करून पट्ट्या सोडू नका, आमची पिढी अशीच जाऊ द्या .
 आपल्यावर थोडीशी अशीच वेळ येणार आहे. जन्मतः पायाला पट्ट्या बांधलेल्या आमच्या पायातून रक्त खेळायची आम्हाला सवय नाही आणि या पट्ट्या काढतात म्हटल्यावर एकदा त्या पायातून रक्त धावायला लागल्यानंतर त्याच्या वेदना आम्हाला सहन होऊ शकणार आहेत किंवा नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 इतके दिवस त्या मानाने बरे होतो. शेती आपण करत होतो, सरळसोट. नांगराला बैल जुंपलेले तसे शेतीला शेतकरी जुंपलेला. नांगर दिलेल्या तासाने घेऊन जाण्याचं काम बैलाचं आणि कुणबी जन्मलो म्हणून कुणब्यासारखं शेती करत राहायचं काम आमचं शेतकऱ्याचं! दुःख होत होतं, चांगलं जगता येत नव्हतं, माणूस म्हणून जगता येत नव्हतं, आमची घरची बायापोरं जनावरासारखी जगत, वाढत होती. कुटुंब म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हतं, मग त्यामुळं जे काय समाधान कमी पडत असेल ते गावातल्या वादावादीमध्ये, गावातल्या भांडणांमध्ये एकमेकांची डोकी फोडून विनाकारण गुर्मीमध्ये फिरून थोडं फार मिळवत होतो. पण आता पुढं ठाकलेलं आयुष्य किती आहे! पूर्वीच्या काळी कमी पडलं तर माझ्यासारखा एखादा पुढारी आला आणि सांगू लागला, 'शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे, चला' की गाडीला भोंगे बांधले आणि 'चलो शेगाव' म्हणत चालले!
 स्वातंत्र्य उपभोगणे इतकं सोप नाही. उलट, गुलामीची एकदा सवय पडली म्हणजे फार सोयीची असते. तुम्हाला काय कुणी गुलाबांच्या वाटेवरून चालायला बाहेर नाही काढलेलं? तुम्हाला माणूस म्हणून जगायचा फक्त अधिकार दिला आहे. शेतकरी संघटनेच्या प्रतिज्ञेने इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने तुम्हाला जगता येईल असं म्हटलं. माणूस म्हणून जगायचा हा मार्ग तुम्हाला न कळता खुला झालेला आहे. सुख मिळविण्याच्या प्रयत्नांना आता कुणी अटकाव करणार नाही. १९४२ सालच्या लढाईने कधी वाटलं होतं की आता स्वातंत्र्य मिळेल ? झालंच काय ४२ सालच्या आंदोलनात ? खरे आकडे पाहिले तर पाचपंचवीस माणसं गेली. ब्रिटिश सत्तेला त्यामुळे ढिम्मसुद्धा धक्का लागला नव्हता; पण दुसऱ्या महायुद्धाच्या ज्वाला सगळीकडे पसरल्या आणि त्यामध्ये इंग्लंड असा काही पोळून निघाला की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा मार्ग आपल्याला नकळत मोकळा झाला. तसं दहा वर्ष आपण टक्कर दिली तरी शेतकऱ्याचा स्वातंत्र्याचा मार्ग इतक्यात खुला होईल असं वाटत नव्हतं; पण जागतिक परिस्थिती अशी बदलली की आपल्या शत्रूच्या हातातील शस्त्रं गळून पडली आहेत, तात्पुरती तरी गळून पडली आहेत. याच्यापुढे जायचा मार्ग तुम्हाला शोधून काढायचा आहे.
 सीताशेती म्हणजे बुद्धीवर आधारित प्रयोग
 शेती कशी करावी? सीताशेती म्हणजे आहे तरी काय? सीताशेती, माजघर शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती- या चतुरंग शेतीमध्ये आजपर्यंतच्या दुढ्ढाचार्यानी मांडलेल्या प्रत्येक कल्पनेचा निषेध आहे, अधिक्षेप आहे. कुणी आम्हाला सांगितलं वरखतं वापरा, युरिया वापरा, अमुक डोस वापरा, तमुक डोस वापरा! आता आम्ही म्हणतो आहोत की शेतीमालाची किमत सरकार पाडू शकत नाही ठरवू शकत नाही आणि देऊही शकत नाही; आम्हीच आमच्या पायावर उभं राहायचं आहे; सरकार संपलं आहे तेव्हा आता आम्ही गुलामीत जन्मलो नसतो तर शेती जशी केली असती तशी शेती करायची ठरवणार आहोत.
 सीताशेती म्हणजे नैसर्गिक शेती नाही. सीताशेती म्हणजे जैविक शेती नाही. फक्त गाईचंच शेण वापरायचं, गोमूत्रच वापरायचं असली अजागळ कल्पना मांडणारी ही सीताशेती नाही. खऱ्या अर्थाने शेती ही विज्ञानावर, बुद्धीवर आणि व्यापारावर आधारित करण्याचा पहिला प्रयोग जगामध्ये आज इथं सीताशेतीच्या रूपाने चालू होत आहे. आम्हाला शक्य नव्हतं म्हणून आम्ही शेणखत वापरलं. मग विज्ञान आलं आणि कुणी सांगायला लागलं युरिया वापरा, कुणी सांगायला लागलं फॉस्फेटचे डोस द्या, कुणी म्हटलं एन्डोसल्फान मारा, तेरा फवारे मारा, चौदा फवारे मारा. कुणी आणि कुणी तरी सांगितलं म्हणून आम्ही तसं केलं.
 आता परिस्थिती बदलली आहे. जन्मांधाला डोळे आले आणि आम्ही आता सरळ प्रश्न विचारायला लागलो आहोत की जर का आम्हाला ही शेती करायची असेल आणि जर का आम्हाला भाव बांधून देणारं कुणी राहिलं नसेल आणि भाव पाडणारंही कुणी राहिलं नसेल तर माणूस म्हणून आम्ही शेती कशी काय करायची आहे? पहिली गोष्ट, सगळा वाह्यात खर्च बंद . शक्यतो, बाहेरून काही आणायचंच नाही. सीताशेतीचा पहिला पाया शून्य शेती. बाहेरून काही न आणता काही करता येतं की नाही? अगदीच काही लागणार असेल तर बघू. पण अशीच शेती करणं आपल्याला भाग पडणार आहे. सध्याची जी हरितक्रांतीची शेती आहे त्याला पर्याय शोधावाच लागणार आहे. पर्यायाला पर्याय नाही. तुम्ही जर असं म्हटलं की ही 'युरिया'ची शेती चालवत राहाल, 'एन्डोसल्फान' ची चालवत राहाल तर ते शक्य नाही. याचं पहिलं कारण असं की येत्या दहा वर्षांत जगामध्ये तुम्हाला पुरेल इतका 'युरिया' पुरवेल इतकं पेट्रोल शिल्लक राहणार नाही आणि तुम्ही 'एन्डोसल्फान' मारून भाजी पिकवली तर ती खाणारांना कॅन्सर होतो हे सिद्ध होत आहे. त्यामुळे ही भाजीसुद्धा पुढे कुणी खाणार नाही. दुसरा मार्ग आपल्याला शोधायलाच लागणार आहे. तो शोधायचा कसा? त्याचे आचरट मार्ग सांगणारे पुष्कळ निघताहेत. कालच एका ठिकाणी गेलो होतो. त्यांच्याकडे पीक चागलं निघतं असा त्यांचा दावा आहे आणि 'अमक्या अमक्याचं असं म्हणणं आहे की गोमूत्राचा वापर केला तर चांगलं पीक निघतं' असं ते भक्तिभावानं सांगतात. मी विचारलं, "गोमूत्राच्या ऐवजी म्हशीचं वापरलं तर चालेल की नाही हो? पण त्यांचं अंतःकरण गलबललं. त्यांना सांगायचं होतं की, "आमच्या पूर्वजांनी गाईला पवित्र मानलं. त्याचा यामागं आधार काही तरी आहे" म्हणजे, शेतकऱ्यांची काय ओढाताण चालली आहे? आम्ही एका बाजूला युरियासारखा पेट्रोलियम पदार्थ वापरा महणून सांगणाऱ्या दलालांच्या हातून सुटू पाहतो आहोत तर तेवढ्यात आम्हाला हे जुने गायत्रीमंत्र शिकवणारे पंडित आपल्यात ओढून घ्यायला पाहत आहेत आणि सीताशेतीचा खरा अर्थ असा आहे की या जुन्या आणि नव्या दलालांपासून, दोघांपासूनही वाचून बुद्धीवर शेती करायला शेतकरी तयार झाला आहे. हे काम मी माझ्या बुद्धीप्रमाणे कुणावर सोपविलं आहे? शेतकऱ्यांना तर आपली शेती करायचीच आहे. दररोजची शेती चालवायची आहे, पोट भरायचं आहे. सीताशेतीचा निष्कर्ष कळेपर्यंत शेती आपल्याला बंद नाही ठेवता येणार. ते काम आपल्याला चालूच ठेवायचं आहे. मग हे काम ज्यांना आजपर्यंत आपण सर्वात निर्बुद्ध समजलो, 'त्यांना काय अक्कल, तुमची अक्कल चुलीपुढं' असं म्हणून हिणवलं त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी स्त्रियांनी प्रामुख्याने पार पाडावं अशी मी योजना केली. आणि सुरुवात त्यांनीच केली आहे. पहिली शेती काही पुरुषांनी नाही केली. पहिली शेती स्त्रियांनी केली नुसत्या काटक्या घेऊन. त्या जमिनीमध्ये नांगर घालणे म्हणजे भूमातेला जखमी करणे असं समजत असत आणि शेती करीत असत. स्त्रियांना बाजूला करून पुरुषांनी शेती हातात घेतली कारण बैलाला वेसण घालणे आणि बैलाने नांगर ओढून घेणे ही ताकद शेतकरी पुरुषाकडे आली. शेतीवर पहिला पराभव स्त्रियांचा झाला आणि बैलवाले पुरुष पुढे आले आणि या बैलवाल्या पुरुषांचा पराभव घोडेवाल्या पुरुषांनी घोडेस्वार बनून, हातात तलवार घेऊन केला. आता हे युग संपलं आहे आणि आपण पुन्हा शून्याकडे जात आहोत. जेथून सुरुवात व्हायला हवी होती तिथे जातो आहोत. सीताशेती सीताशेती म्हणजे नैसर्गिक शेती नाही, सीताशेती म्हणजे जैविक शेती नाही. आम्ही जो मार्ग काढू तो जुनाट पद्धतीचा असेल असे नाही. कदाचित आज शास्त्रज्ञांना अवगत नसलेली, कॉम्प्युटर नव्हे तर सुपरकॉम्प्युटर वापरणारी शेती आम्ही करू; पण ती आमच्या बुद्धीने आणि आमच्या प्रयोगांनी आम्ही ठरविणार आहोत.
 याच्याकरिता प्रयोगशाळा कुठून आणायच्या? विज्ञानशाळा कुठून आणायच्या? आपल्याकडे विद्यापीठे नाहीत, दहा दहा हजार रुपयांचा फुकट पगार खाऊन बसणारी प्राध्यापक आणि वैज्ञानिक मंडळीही नाहीत. हा प्रयोग आपल्या शेतावर. आपल्या घरामध्ये. आपल्या परसदारामध्ये, दहा बाय दहाच्या लहानशा जमिनीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी स्त्रिया करतील. अशी सीताशेतीची कल्पना आहे.
 हा मुद्दा यासाठी मांडला की कुणाही माणसाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना येऊ नये की अरे, फलाणा फलाणा मनुष्य किती दिवस सांगतो आहे की नैसर्गिक शेती करा. फलाणा फलाणा मनुष्य किती दिवस सांगतो आहे की गोमूत्राची आणि गाईच्या शेणाची शेती करा आणि शेतकरी संघटनाही आता तेच सांगायला लागली. असं वाह्यात समाधान या मंडळींना कणभरसुद्धा आणि क्षणभरसुद्धा मिळण्याचं कारण नाही.
 'माजघर शेती' म्हणजे कारखानदारी नाही
 'माजघर शेती' म्हणजे प्रक्रियेची शेती. या बाबतीतही असाच प्रकार आहे. ही मंडळी फार शहाणी होती म्हणून त्यांनी सारखेचे कारखाने काढले, ही मंडळी फार शहाणी होती म्हणून त्यांनी सुताच्या गिरण्या काढल्या आणि आम्हाला इतके दिवस अक्कल नव्हती म्हणून आम्ही रस्त्यावर जात होतो आणि आता यांचा शहाणपणा पटला म्हणून आम्ही पुन्हा साखरेच्या कारखान्यांकडे व सुताच्या गिरण्यांकडे जातो आहोत असं नाही. 'माजघर शेती' ही कल्पना शेतीच्या प्रक्रियांसंबंधी आजपर्यत मांडल्या गेलेल्या सगळ्याच कल्पनांचा उच्छेद करणारी आहे. त्यातली एकही कल्पना मान्य न करणारी आहे. यावर अनेक प्रकारच्या टीकाटिप्पण्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या प्रक्रियाकल्पनांचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे.
 डॉ. कुरियन यांनी गेले वर्षभर खूप प्रचार चालवला आहे की दुधावर प्रक्रिया करणे- त्याचं आईस्क्रीम बनवणे, श्रीखंड बनवणे - अशा तऱ्हेची परवानगी नेस्लेसारखा आंतरराष्ट्रीय कंपन्याना देऊ नये. कारण काय ? त्यांनी असं म्हटलं की, खरा मलिदा, खरी साय, खरं लोणी तर आईस्क्रीम आणि श्रीखंडात आहे, दूध विकण्यात नाही. 'ऑपरेशन फ्लड'वर किंवा आणंदच्या डेअरीवर मुंबईला दूध पुरवण्याची जबाबदारी आहे; त्यांनी दूध पुरवायचं आणि नेस्लेसारख्या कंपन्यानी आईस्क्रीम बनवायचं, हे चुकीचं आहे, अन्याय्य आहे अशी डॉ. कुरियन आरोळी ठोकतात. इकडे सूरतची सुमूल डेअरी हिंदुस्थानामध्ये दुधाला सगळ्यात जास्त भाव देते. म्हशीच्या ६ टक्के स्निग्धांशाच्या दुधाला दर लिटरला ७ रुपये भाव देणारी ही हिंदुस्थानातली एकमेव डेअरी आहे. या सुमूल डेअरीच्या अध्यक्षांना विचारलं की, "तुम्ही इतका भाव कसा काय देऊ शकता?" ते म्हणतात, "आम्ही इतका भाव देऊ शकतो याचं कारण आम्ही आईस्क्रीमबिस्क्रीम बनवण्याच्या फंदात पडत नाही, लोकांना दूध पाजतो आणि त्याच्यातच सगळ्यात जास्त फायदा आहे." हे गूढ काय आहे? एका बाजूला डॉ. कुरियन म्हणतात की प्रक्रिया केल्याने फायदा जास्त मिळतो आणि सुमूलचे अध्यक्ष सांगतात प्रक्रियेच्या फंदात न पडल्यानेच फायदा होतो. याचा खरा अर्थ असा आहे की डॉ. कुरियन काय, महाराष्ट्रातले तात्यासाहेब कोरे काय आणि गावोगावाचे दूध सम्राट काय- या सगळ्यांची दुधावर प्रक्रिया करण्याची कल्पना काय आहे ? सदस्यांकडून शेअर भांडवल गोळा करणे, त्या शेअर भांडवलाच्या आधाराने सरकारकडून आणखी पैसे मिळविणे, ते पैसे नेऊन एखाद्या कंपनीसमोर ठेवणे. त्यांच्याकडे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तयार झालेली किंवा त्या पद्धतीची जी काही यंत्रसामग्री असेल ती यंत्रसामग्री विकत घेणे. त्याच्याकरिता कोट्यवधी रुपये देणे आणि ती कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री येऊन पडली की त्याला एक मॅनेजिंग डायरेक्टर, इंजिनिअर्सची फलटण लागते. त्यांचे पगार ठराविक असतात, कामगारांना पगार द्यावा लागतो, मध्यभागी कारखान्याची एक इमारत बांधावी लागते. त्यात संचालकांचं एक चांगलं ऑफिस ठेवावं लागतं, त्याभोवती गुलाबाच्या चांगल्या बागा फुलवाव्या लागतात, नारळही वाढवावे लागतात आणि इतका सगळा खर्च झाला म्हणजे ऊस पिकवणाऱ्या आणि दूध तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती धत्तुरासुद्धा येत नाही. प्रक्रियेची ही कल्पना शेतकरी संघटनेच्या या प्रयोगामध्ये त्याज्य ठरवलेली आहे. हिंदुस्थानात अशा प्रकारची यंत्रसामग्री पुरविणारी 'अल्फा लाव्हल' या नावाची सर्वात मोठी कंपनी आहे. सोयीसाठी या प्रक्रिया कल्पनेला आपण 'अल्फा लाव्हल' प्रक्रिया म्हणूया. आमच्या या प्रयोगात 'अल्फा लाव्हल' प्रक्रिया आम्ही नाकारतो आहोत.
 दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण कोणत्या तऱ्हेची प्रक्रिया करणार आहोत? 'अल्फा लाव्हाल'ची नाही. हे सगळे कारखानदार बोलून चालून राजकारणात पडलेले. उघडच मलिदा खायला निघालेले. साखर कारखाना काढायला निघालेल्या कोणाही माणसाला विचारलं की 'कायरे, तू लोकांचं भलं करणार का?' तर तो तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणेल, तुमचा मित्र असेल तर, 'काही तरी काय विचारता? कारखाना काय लोकांचा फायदा करून देण्याकरिता काढायचा असतो काय?'
 दुसराही एक प्रकार लक्षात घ्यायला हवा. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलूखमैदान तोफ म्हणून गाजलेले श्री. माधवराव खंडेराव मोरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पिंपळगावला प्रक्रियाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि द्राक्षापासून शॅम्पेन काढून परदेशात पाठविण्याची योजना राबविली. यंत्रसामग्री ही पुन्हा 'अल्फा लाव्हल'ची आणि शॅम्पेन परदेशात विकायची म्हणजे सी- थर्टी साखर काढून पोत्यांमधून विकण्याइतक सोपं नाही! त्याची बाटलीही परदेशातली, त्याचं लेबलही परदेशातलं, त्याचं बूचही परदेशातलं आणावं लागतं. आता माधवरावही म्हणू लागले की त्यांनासुद्धा लोकांना द्राक्षाचा भाव किलोला दहा रुपयाच्या वर देता आला नाही.
 म्हणजे मोठं यंत्र कुठून तरी घ्यायचं, ते एकाजागी उभं करायचं. तिथं काही संचालक मंडळी नेमायची आणि त्यातून प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल ही कल्पना अत्यंत चुकीची, अत्यंत खोटी आहे. मग नेस्लेसारख्या आंतराष्ट्रीय कंपन्या प्रक्रिया करून फायदा काढतात हे डॉ. कुरियनचं म्हणणं चूक आहे का ? नाही. या कंपन्याना फायदा होतो हे खरं आहे पण त्याचं मुख्य कारण प्रक्रियेसाठी त्या वापरत असलेली यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान त्यांनी स्वतःच विकसित केलेलं असतं हे आहे.
 एक तिसरं उदाहरण घेऊ. मुंबईला नुकतंच एक शेतीमालावरील प्रक्रियांसंबंधी प्रदर्शन झालं. दिल्लीला १५ जानेवारीपासून एक त्याहून मोठं प्रदर्शन आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या हिंदुस्थानातील कंपन्या आहेत त्यांचा माल तिथं ठेवला जाईल. या प्रदर्शनांत काय माल ठेवतात? युरोपातला मनुष्य ज्या तऱ्हेचा जॅम खातो त्या तऱ्हेचा जॅम, तो ज्या तऱ्हेचा फळांचा रस आवडीने पितो त्या तऱ्हेचा रस बाटल्यांमध्ये भरलेला. युरोपीय लोकांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये जे काही पदार्थ बसतात ते पदार्थ आम्ही हिंदुस्थानामध्ये त्यांनी तयार केलेली यंत्र आणून किंवा त्या पद्धतीची यंत्रे करून ते पदार्थ त्यांना विकायचा प्रयत्न करतो हे शक्य नाही. त्यांच्यापेक्षा चांगलं जॅम तुम्ही बनविणे शक्य नाही. त्यांनी दिलेली यंत्रसामुग्री आणून तुम्ही 'शॅम्पेन' ची फॅक्टरी बनवलीत अगदी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणून बनवलीत, तरी तिकडे त्यापेक्षा अधिक आधुनिक यंत्रसामग्री तयार होत राहणार. मग तुमची फॅक्टरी जुनी होऊन जाणार. मग प्रश्न येतो की जगामध्ये सर्वात आधी अत्याधुनिक तंत्रज्ञान तुम्ही तयार कराल अशी ताकद आहे का? मुळीच नाही. उलट त्यांनी आणलेलं आणखी नवीन तंत्रज्ञान समजायचीसुद्धा ताकद नाही अशा पात्रतेचे आम्ही. म्हणजे आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत दिवसेंदिवस अधिक अडाणी होत जातो आहोत. प्रक्रियाशेती म्हणजे 'माजघर शेती'मध्ये याला वाव नाही.
 पदार्थ कसा तयार करायचा ? शॅम्पेन चांगली म्हणजे कशी असते? बटाट्याचा साधा एक चिप्, एक वेफर तयार करायचा तर तो चांगला कसा फुलतो चांगला कसा रंगतो, चवीने चांगला कसा होतो, याची जाणीव तयार करणाराला कशी झाली पाहिजे? हिंदुस्थानात एकच उदाहरण देण्यासारखं आहे. मोटारच्या गॅरेजमधला मिस्त्री या दृष्टीने आदरास अत्यंत पात्र असा माणूस आहे. त्याच्याकडे मूळचा पार्ट नसला तरी चालेल, 'उल्हासनगर'चा पार्ट नसला तरी चालेल; कोणतीही एखादी लोखंडाची नळी घेऊन एखादी पट्टी घेऊन, बांधून तुमची गाडी पाचपंधरा किलोमीटरपर्यंत चालेल एवढी तरी व्यवस्था तो करू शकतो. याचं कारण, मोटारीच्या इंजिनची आणि त्याची दोस्ती झालेली असते. ही दोस्ती बटाट्याचा वेफर बनवणाऱ्या गृहिणीची आणि त्या वेफरची होऊ शकते. 'अल्फा लाव्हाल'चं यंत्र आणून साखर तयार केली किंवा आईस्क्रीम तयार केलं किंवा शॅम्पेन तयार केली तर कारखानदाराची आणि त्या मालाची अशी दोस्ती होऊ शकत नाही आणि ही जिथं दोस्ती होत नाही तिथं प्रक्रियाही यशस्वी होऊ शकत नाही. माजघर शेती म्हणून प्रक्रिया करताना आम्ही काय विकणार आहोत ? जॅम बनवून नाही विकणार. तुम्ही फ्रेंच मनुष्य 'क्रेप' तयार करतो म्हणून त्याचे क्रेप तयार करून त्याला विकायला जाल तर तो म्हणेल याला काही जमलं नाही फारसं. ते शक्यही होणार नाही. आपल्याकडेही काही पदार्थ आहेत. ते पदार्थ तयार केल्यानंतर त्यांची खुमारी जर आपण इतर देशांतील लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो तर आपला माल आपण फार मोठ्या प्रमाणावर विकू शकतो. परवा फ्रान्समधले एक प्राध्यापक आले होते. त्यांना आम्ही बाजरीचे छोटे रोटले करून खाऊ घातले. ते म्हणाले, "अशा तऱ्हेचे रोटले, गरम गरम, जर जर्मनी आणि फ्रान्समध्ये मिळायची व्यवस्था झाली तर कोट्यवधी रुपयांचे बाजरीचे रोटले तिकडे विकता येतील." तुम्ही त्यांचा 'ब्रेड त्यांना विकायचा प्रयत्न करू नका. तुमचा माल तुम्ही तयार करायला हवा. मग हे कुठे जमेल? हे तात्यासाहेब कोऱ्यांच्या कुवतीतलं नाही; हे डॉ. कुरियनच्या या कुवतीतलं नाही. हे तुमच्या आमच्या घरच्या 'सीतामायां'च्या कुवतीतलं काम आहे म्हणून माजघरातली शेती असं त्याचं नावं आहे.
 आणखी एक उदाहरण पाहण्यासारखं आहे. पुण्यामध्ये एका शहाण्या माणसानं पोळ्या तयार करण्याचा मोठा कारखाना काढला होता. रोज दोन लाख पोळ्या बनवायच्या. त्या त्यानं प्लास्टिकच्या पिशवीत घातल्या दुकानात मांडल्या. गिऱ्हाईकीच्या हाती जाऊन, पिशवी उघडून खाईपर्यत तीन दिवसांच्या त्या पोळ्या वातड झाल्या आणि तो कारखाना बंद पडला. याच्या उलट डोंबिवलीला एका विधवा बाईनं डोंबिवली स्टेशनच्या बाहेर एक छोटीशी जागा घेऊन डब्यात ताज्या पोळ्या आणि ताजी भाजी घेऊन स्वतः उभी राहिली. लोकल गाडी पकडायला जे पुरुष जात, त्यांच्यापैकी ज्यांना कुणाला घरून काही कारणानं डबा आणता आला नसेल त्यानं तिथं यायचं आणि त्या बाईकडून दोन-तीन चपात्या आणि भाजी-चटणी-लोणचं घ्यायचं आणि पैसे द्यायचे. दररोज सकाळी ताजी भाजी. ताजी चपाती मिळू शकते हे पाहिल्यानंतर स्टेशनवर त्या जागी, त्या विधवा बाईने चालू केलेल्या कामाच्या तिथे चाळीस माणसं केवळ डबे भरण्यासाठी नोकरीला लागले आहेत. चुकीचं केंद्रीकरण केलं म्हणजे त्याचा पुण्याचा चपात्याचा कारखाना होतो. आपण उत्पादन करताना चुकीचं केंद्रीकरण केलं तर तसंच खड्डयात जाऊ. समजा आपल्याकडच्या एखाद्या गृहिणीला साबुदाणा वडे चांगले बनवता येतात. तर तिनं असं ठरवलं की भरपूर साबूदाणा वडे तयार करायचे, पिशव्यात भरायचे आणि चंदीगढला न्यायचे तर ते नाही जमणार; पण तिच्या साबूदाणा वड्याचा एक फार्म्युला आपण करू शकतो. बारकाईने सूचना देऊन - त्यात साबूदाणा किती असला पाहिजे, बटाटे किती असले पाहिजेत, दाणे किती असले पाहिजेत, मीठ किती प्रमाणात -त्याचप्रमाणे वडे बनविण्याच्या शक्यता वेगवेगळ्या ठिकाणी तयार केल्या आणि वेगळ्या ठिकाणी ताजा माल पोहोचविण्याची व्यवस्था केली तर ती योजना बरोबर होईल.
 याचा अर्थ काय? आम्ही काही 'तात्यासाहेब कोरे' किवा 'डॉ. कुरियन' च्या मार्गाने जायला निघालो नाही. उलट, या आणि त्यांच्यासारख्या अनेक सम्राटांनी दाखविलेल्या प्रक्रियेच्या सगळ्या मार्गांचा उच्छेद करण्याकरिता हा स्वतंत्र झालेला शेतकरी येतो आहे.


 व्यापाराचे वेगळे मार्ग
 बाजारपेठ तयार करावी लागेल, व्यापार करावा लागेल. त्याचे वेगवेगळे मार्ग काढावे लागतील आणि तुम्ही नाही काढलं तरीसुद्धा हे कुणीतरी काढणार आहे. या विषयावर निर्णय बैठकीत होत नाहीत. निणर्य घेणारे आपोआप निर्णय घेणार आहेत.
 प्रक्रियांकरिता जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढणे हेच आता स्वतंत्र झालेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने संयुक्तिक ठरते. सहकारी संस्था नको, नावालासुद्धा सहकारी नको. त्या नावाचे सरकारकडून भांडवल उभारण्यात मदत होते असली तरीसुद्धा ती आम्हाला नको. माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आम्ही मिळवला तो भांडवलनिर्मिती मधला थोडासा फायदा सरकारकडून मिळवण्यापोटी विकण्याकरिता नाही. त्याचा जो काही तोटा आहे तो आम्ही सहन करू. शेवटी व्यापारी फायदा काढतात त्यांना तर काही सहकारी भांडवल निर्मितीमधली मदत मिळत नाही ना? तरी ते फायद्याने व्यापार करतात ना? आणि सरकारी संस्थांना भांडवलनिर्मितीतील मदत मिळूनसुद्धा सगळ्या सहकारी संस्था तोट्यातच चालल्यात ना? मग कशाकरता त्या फासात आपला गळा अडकवायचा ? प्रक्रियेकरता जिल्हावार 'प्रायव्हेट लिमिटेड' कंपन्या काढता येतील. व्यापाराकरिताही तशा कंपन्या काढता येतील. सुरुवातीला दहा दहा हजार रुपये देणारी पन्नास माणसे जरी प्रत्येक जिल्ह्यात उभी राहिली तरी काम सुरू होऊ शकेल. त्याच्या पुढचं भांडवल त्यात जो फायदा होईल त्यातून उभं करता येईल आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या या 'प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची' मिळून एक मोठी 'पब्लिक लिमिटेड कंपनी'सुद्धा तयार करता येईल.
 शेतकरी संघटनेच्या आर्थिक कार्यक्रमावर शेतकऱ्याचा प्रचंड विश्वास आहे. ते तुम्हाला मतं देत नसतील, मतं देण्याचा त्यांचा हिशोब वेगळा आहे; पण तुम्ही जर सांगितलं की शेतकऱ्यांनी त्यांना जे काही खरेदी करायला लागत असेल- मीठमिरची कापडचोड- ते शेतकऱ्यांच्या दुकानांतूनच खरेदी करावं आणि त्यांना जो माल विकायला तो शेतकरी संघटनेच्या माजघर शेती, व्यापार शेती, निर्यात शेती या मार्गातून विकला तर त्यांना फायदा मिळणार आहे आणि हे जर एकदा शेतकऱ्यांना स्पष्ट झालं तर शेतकऱ्यांच्या सद्भावना तुमच्याइतक्या दुसऱ्या कुणाच्याही पाठीशी असणार नाहीत. याचा फायदा घ्यायचा किंवा नाही हे आता स्वतंत्र झालेल्या शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे.


 बदलाची संधी प्रथमच आली
 याचा अर्थ असा नाही की आता शेतकरी संघटना जिल्ह्या-जिल्ह्यात 'पब्लिक लिमिटेड कंपन्या' उघडणार. असा गैरसमज कुणाचा होऊ नये. शेतकरी संघटना ही कधीही व्यापारी संघटना होणार नाही. शेतकरी संघटना ही आंदोलक संघटनाच आहे. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो आहोत की तुम्ही स्वतंत्र झाला आहात. आता जन्मतः स्वतंत्र असतात तर जे केलं असतं तेच करायला लागा आणि जर आमच्या असं लक्षात आल की या स्वातंत्र्यावर पुन्हा कुणी गिधाड घाला घालीत आहेत मग ती जातीयवादी असोत का बिगर जातीयवादी असोत त्या नाठाळांच्या माथी काठी घालणं हेच शेतकरी संघटनेचा जो पाईक, जो आधार तो शेतकरी आता निव्वळ रुमणं घेऊन, बैलासारखी जुवाच्याखाली मान घालून जर चालत राहिला तर त्याची लढाई आता जिंकली जाऊ शकत नाही. आता तुमच्या पायाच्या पट्ट्या काढणं अपरिहार्य आहे तुम्हाला पायावर उभे राहाणं अपरिहार्य आहे. तुमच्या पायात रक्त खेळू लागल्यानंतर असह्य वेदना होणार आहेत. पण माणूस म्हणून जगण्याची या वेदना ही किंमत आहे.
 शेगावच्या जाहीरनाम्यातील चतुरंग शेतीच्या कार्यक्रमाचा सविस्तर अर्थ असा आहे. स्वतंत्र झालेला शेतकरी आता आपल्या प्रश्नांची उकल कशी करील हे आज कोणालाही नक्की सांगणे कठीण आहे; पण ती तो कशी करू शकेल यासाठी सीताशेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती या चार प्रयोगशाळा आहेत. आपल्याला धडपडत चालावं लागणार आहे. काही वेळा आपण पडू, काही वेळा चुका करू. कदाचित खोट खाऊन घरी बसण्याचीसुद्धा वेळ येईल. दिवाळखोर तर तसे आपण गुलामगिरीतही झालो होतो. दिवाळखोरच व्हायचं नशिबी असेल तर स्वातंत्र्यातील दिवाळखोरीचा अनुभव घ्यायला तुम्हाला मिळणार आहे एवढाच खरा शेगावच्या जाहीरनाम्याचा अर्थ आहे.
 आपल्याला शेतकऱ्यांचं आपल्या मनातलं चित्र पालटणं आवश्यक आहे. जर का शेतकऱ्यांची दुश्मनी करणारं सरकार नसतं तर आपण आज ज्या प्रकारचे शेतकरी झालो आहोत, कुणबाऊ शेतकरी, तसे राहिला नसतो. इथं कुणबाऊ हा जातिवाचक शब्द म्हणून वापरला नाही तर मराठी शब्दकोशातील त्याचा अर्थ माझ्या मनात आहे. आपण सीताशेती करणारे, व्यापार करणारे, निर्यात करणारे शेतकरी एरवीही बनलो असतो. हजार दोन हजार वर्षे आणखी कोणाच्यातरी जोखडाखाली मान घालून आम्ही फुकट घालविणार नाही, स्वतंत्र रस्ता शोधून आमच्या त्या स्वतंत्र रस्त्याने जाणार आहोत हा खरा शेगावच्या जाहीरनाम्याचा अर्थ आहे.
 (वर्धा येथे १५,१६,१७ डिसेंबर १९९१ रोजी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रभरच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. शरद जोशींनी केलेले भाषण)

(शेतकरी संघटक, २१ डिसेंबर १९९१)