बळीचे राज्य येणार आहे!/प्रशिक्षणाचा खरा अर्थ

विकिस्रोत कडून


प्रशिक्षणाचा खरा अर्थ



 शाळेत आपण गेलो की कुणीतरी शिक्षक आपल्यासमोर येतो. पुस्तकांत काहीतरी लिहिलेलं असतं, एकामागून एक धडे शिक्षक शिकवत राहतात आणि परीक्षेला यातलं काही तरी उत्तर द्यायला लागेल हे समोर ठेवून ती उत्तरे कशी द्यावी याची तयारी व्हावी या दृष्टीने थोडीशी पोपटपंची करायला आपण शिकतो. काही ठराविक प्रकारच्या प्रश्नांना ठराविक प्रकारची उत्तरे दिली म्हणजे परीक्षेत आपण पास होऊन जाऊ, मग नंतर त्या विषयाचा आपला काही संबंध राहिला नाही तरी चालेल; एकदाचा शिक्का मिळाला की आपण कर्तव्यातून मोकळे झालो अशा कल्पनेतून आपण शाळा-कॉलेजातून जात असतो.
 कृषि अर्थ प्रबोधिनीतील या प्रशिक्षणवर्गाची कल्पना थोडी वेगळी आहे. कशी वेगळी आहे हे समजून घेण्याकरिता शेतकरी संघटनेच्या गेल्या दहा वर्षांतील यशाचं, अपयश पुष्कळ आहे पण त्यातलं जे यश आहे त्याचं कारण काय हे समजावून घेतलं तर या प्रशिक्षणवर्गाची आणि वर्गातील कामाच्या पद्धतीची सहज कल्पना येईल. शेतकरी संघटनेची आंदोलनं काही पुढे गेली, काही मागे गेली. कांद्याला भाव वाढवून मिळाला, उसाला मिळाला, दुधाला मिळाला, कपाशीला मिळाला. रक्कम काढायला गेलो तर खूप मोठी रक्कम होईल. अगदी कर्जमुक्तीच्या वेळचा आकडा घेतला तरी हिंदुस्थानामध्ये चार हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती ही शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून निघाली याबद्दल कुणाला शंका नाही. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने शेतकऱ्यांचा रुपया-पैशांत किती फायदा झाला असे विचारले तर हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला हेच त्याचे उत्तर येईल. पण माझ्या दृष्टीने तो फारसा महत्त्वाचा नाही.
 शेतकरी संघटनेने घडवून आणलेली सगळ्यात अद्भुत गोष्ट कोणती? दहा वर्षापूर्वी शेतकऱ्याला सूट नको, सबसिडी नको, भीक नको, लाचारी नको फक्त त्याच्या घामाचे दाम पाहिजे असा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेतकरी संघटनेने मांडला. त्यावेळी सगळे पुढारी, सगळे नेते, सगळे अर्थशास्त्री कुचेष्टा करत होते, हसत होते. 'शेतीमालाच्या भावाचा एककलमी कार्यक्रम'हा चेष्टेचा विषय झाला होता. 'हे वैद्यबुवा प्रत्येक रोगावर जुलाबाचे औषध देऊन राहिलेत" अशी या विचाराची अवहेलनाही झाली. आज दहा वर्षांनंतर या विचाराला राजमान्यता मिळाली, एवढंच नव्हे, विद्वन्मान्यता मिळाली एवढंच नव्हे तर सर्व देशभर शेतकरीमान्यता मिळाली. सर्वसामान्य लोकांची या विचाराला मान्यता मिळाली. एखाद्या शेतकऱ्याला कुणी पुढारी भेटला आणि म्हणाला की तुझ्या मुलाला मी नोकरी लावून देतो तर तो शेतकरी अजूनही त्या पुढाऱ्याच्या मागे धावेल, नाही असं नाही; पण शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठंतरी एक मोठा बदल घडून आला आहे. आज पुढाऱ्याच्या मागे धावताना त्याच्या मनात येत राहील की हे बाकीचं काही खरं नाही; जोपर्यंत आपली शेती तोट्याची आहे तोपर्यंत काही जमायचं नाही ; शेती फायद्याची झाली तर कोणताही प्रश्न उरणार नाही. हा फरक कशाने पडला?
 दहा वर्षांमध्ये देशभरचा म्हणा किंवा महाराष्ट्रभरचा म्हणा, एक मोठा प्रशिक्षणवर्ग शेतकरी संघटनेने चालविला. आंदोलनं जी झाली त्या आंदोलनांचा हेतू हाच होता. वर्गात बसून नुसतं शिकवलं तर या कानातनं येऊन त्या कानातनं निघून जातं. पण त्याबरोबरच काही प्रात्यक्षिक असलं, प्रयोग असला म्हणजे तो धडा नीट ठसतो. चांकणच्या कांद्याच्या आंदोलनाने शेतकऱ्यांवरील अन्यायाचं एक उदाहरण शेतकऱ्यांच्या समोर आलं. त्या आंदोलनाचा काहीएक परिणाम झाला. कपाशीच्या, शेवटच्या आंदोलनाच्या निमित्ताने ठरलं की गेल्या वर्षीची मिळत असलेली कपाशीची किंमतसुध्दा यंदा मिळत नाही म्हणजे काय ? शेतकऱ्यांना अन्यायाची जाणीव झाली. शासन हे काही मायबाप नाही, जिथं शक्य असेल तिथं शेतऱ्यांच्या माना कापायला कमी करत नाही आणि त्याविरुध्द शेतकरी उभा राहू शकतो असं कापूस आंदोलनानं शेतकऱ्यांना शिकवलं. असं एक सगळ्या महाराष्ट्रभर चाललेलं प्रशिक्षणवर्गाचं एक मोठं, दहा वर्षांचं सत्र.
 पण आपल्या हातामध्ये तशी साधनं काही नव्हती. पुस्तकंसुध्दा, आपल्या काही सहकाऱ्यांनी आग्रह धरला म्हणून एवढी तरी बाहेर आली. साप्ताहिक- पाक्षिक चाललं पण तेही काही नियमानं चाललं असं नाही. काही काळ साप्ताहिक 'वारकरी' चालला, मग त्यानंतर पाक्षिक 'शेतकरी संघटक' चालू झाला, पुढे काही काळ साप्ताहिक 'ग्यानबा' चालला. आता पुन्हा 'शेतकरी संघटक'; पण या साहित्यामुळेच काही बदल घडून आला किंवा हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असं म्हणणं कठीण आहे. मग हा प्रचार घडला कसा?
 एका बाजूला काँग्रेस (आय्)ची सत्ता, काँग्रेस (आय्)नं सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सहकारी संस्थांचं जाळं विणलेलं. प्रत्येक जिल्हामध्ये, प्रत्येक तालुक्यात एखादा सहकारमहर्षि, सहकारश्रेष्ठी. कुणी काका, कुणी अण्णा, कुणी तात्या, कुणी मामा. हे सर्व साहेब सर्व शेतकऱ्यांना अगदी पंजामध्ये पकडून बसलेले आणि तरीदेखील एवढ्या ताकदीच्या विरुद्ध जाऊन शेतकरी संघटना हा विचारातला बदल कसा काय घडवून आणू शकली ? खरं तर हा चमत्कारच वाटावा. पण याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे; पण हे उत्तर खरं आणि शेवटचं आहे असं मलाही वाटत नाही.
 मला असं वाटतं की शेतकरी संघटनेने लोकांसमोर जाऊन त्यांच्यापुढे एक आरसा ठेवला. जो काही विचार सांगितला तो ऐकल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असं काहीतरी वाटायला लागलं की, अरे आता कुठं काही तरी जमलं, इतके दिवस जे काही विस्कळीत चित्र वाटत होतं ते या आरशात पाहिल्यानंतर त्याचे तुकडे एकमेकांना जमतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं मिळतात असं त्या शेतकऱ्यांना प्रामाणिकपणानं वाटायला लागलं म्हणून शेतकरी संघटनेचा विचार पसरला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्मल्यापासून किंवा समजायला लागल्यापासून एक अनुभवाचं मोठं गाठोडं तयार झालेलं असतं; पण ते वेगवेगळे अनुभव वेगवेगळे तुकडे असल्यासारखे आहेत. आजच्या अर्थव्यवस्थेत आणि शिक्षणपद्धतीत या तुकड्यांना एकत्र करील असा विचार नाही. या शिबिरातील एका कार्यकर्त्याने शेतकरी म्हणून अनुभव घेतला, उसाच्या शेतीचा. त्याच्यानंतर व्यापारी म्हणून अनुभव घेतला. उसाला भाव मिळाला नाही आणि व्यापारी झाल्यानंतर तिथेसुध्दा थकबाकी वाढतच राहिली. कारण आजूबाजूचे काय कापूस, ऊस पिकविणारे शेतकरी असतील त्यांचीसुद्धा थकबाकी देण्याची पात्रता नाही किंवा ताकद नाही. असे सगळे वेगवेगळ्या अनुभवांचे तुकडे एकत्र असलेले गाठोंडे घेऊन प्रत्येकजण चाललेला. त्या सगळ्यांचा अर्थ लावण्याची ताकद काही आपल्यात फारशी नसते किंवा अर्थांच्या बाबतीत दिशाभूल झालेली असते. शेतकरी संघटनेने आपला विचार सांगितला आणि ऐकता ऐकता शेतकऱ्यांच्या मनात यायला लागलं की अरे, हे खरं आहे, कारण माझा अनुभव असा आहे, माझी जी प्रचीती होती त्या प्रचीतीचा सिद्धांत फक्त कळतो आहे, शब्द संघटनेचे आहेत; पण अनुभव माझा आहे. ही जाणीव जेव्हा सगळ्या शेतकऱ्यांमध्ये झाली तेव्हा ते महाराष्ट्रभर चालवलेलं एक खुलं विद्यापीठ, खुल्या आकाशाखालचं विद्यापीठ होतं. हजारो सभा झाल्या; पण ते एका आर्थाने शिक्षणच होते.
 अनुभवांच्या अनाकलनीय तुकड्यांच्या गाठोड्याला जाणिवेने एकसंध चित्राच्या स्वरूपात पाहाण्याइतपत बदल महाराष्ट्रामध्ये घडून आला; पण सगळ्या सभांमध्ये काय कितपत सांगितलं जातं? कोणत्याही एका गावी काही ठराविक वेळ दिला जात नाही. इतरही बंधनं असतात. स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटतं की इतकी सभा जमली आहे तर आपणही थोडं बोलावं. मग जो काही सभेचा तासदीडतास वेळ असेल त्यातील अर्धा-पाऊण तास मला किंवा सभेसाठी गेलेल्या प्रमुख कार्यकर्त्यास मिळतो. मग सर्वसाधारण लोकांना ज्यात स्वारस्य आहे, अगदी नव्याने शेतकरी संघटनेशी ओळख करून घेत आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा समजतील असेच विषय फक्त त्या सभेत घेता येतात. बहुतेक लोकांच्या गाठोड्यांतील अनुभवांच्या तुकड्यांची संगती लागते एकमेकांशी; पण तुमच्यासारख्या काही लोकांच्या बहुतेक तुकड्यांची संगती लागली तरी काही तुकडे तसेच राहून जातात. बाकी सर्व समजलं भाषणातून ; पण अमुक अमुक गोष्टींचा यातून खुलासा होत नाही. शिल्लक राहिलेले हे प्रश्न कसे सोडवायचे?
 हे सोडवण्याकरिता, खरं म्हणजे, कृषि अर्थ प्रबोधिनीतील या प्रशिक्षणवर्गांची योजना आहे. इथं काही शिकायचं आहे आणि मग इथून जाऊन, इथं डोक्यावर घेतलेलं ज्ञानाचं गाठोडं तिथं जाऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओतायचं आहे असा काही प्रकार नाही. किंबहुना, इथून तुम्ही गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या प्रचाराचं काम केलंच पाहिजे असासुद्धा मुळीच आग्रह नाही; पण माझी खात्री आहे की, जो मनुष्य इथं मन उघडं ठेवून नीटपणे विचार व विचारपद्धती समजावून घेईल त्याला असा काही एक भुंगा इथं लागणार आहे की तो घरी गेल्यानंतर त्याला स्वस्थ बसूच देणार नाही. एखादी गोष्ट पटली नाही तर पटली नाही असे स्पष्टपणे सांगायला काही हरकत नाही; पण निदान तो विचार समजून घेताना जे जे काही सांगितलं जात आहे त्याचा आपल्या अनुभवाशी काही संबंध आहे का एवढं फक्त प्रामाणिकपणे तपासून घ्यायचं आहे.
 आणि ही लहानसहान नव्हे, फार मोठी गोष्ट आहे. मी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिलं आहे, "शेतकरी विद्यार्थी संघटना काढायची म्हणजे कुठं जाऊन मिरवणुका काढायची गरज नाही, कुठं जाऊन दगड फेकायची गरज नाही. तुम्ही आंदोलनात यावं अशीही माझी इच्छा नाही. कारण तुम्हाला मी आंदोलनात ओढलं तर उद्याचं बियाणं मी आजच खाण्याकरिता वापरून टाकलं असं होईल. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. उद्या शेतकरी समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या या काळामध्ये तुम्ही विद्याच करणं आवश्यक आहे. पण ही विद्या करताना, जी करता ती विद्याच आहे किंवा नाही हे तपासून पाहा. नाहीतर अविद्या ही तुम्हाला विद्या म्हणून शिकविली जाईल आणि एका अर्थाने तुम्ही हनुमानासारखे आहात. 'भूमिकन्या' सीतेच्या शोधात रावणाच्या लंकेत आला आहात आणि रावणाचं सगळं एवढं मोठं वैभव, सोन्याची लंका. रामाकडे काय असणार - फाटकी वल्कलं नेसून जंगलात कंदमुळं खाणारा तो. तुम्हाला आईबापांनी खेडगावातनं शहरात पाठवलं, या झगझगत्या, सगळे ऐश्वर्य असलेल्या जगामध्ये पाठवलं आणि जर का तुम्ही रावणाच्या या सोन्याच्या लंकेच्या मोहात पडलात तर सीतेला तुम्ही तसंच सोडून रावणाच्याच दरबारात दाखल होण्याची शक्यता आहे आणि मग रामायण कधी घडायचंच नाही. कदाचित, तुम्हाला रावणाच्या दरबारात, जेव्हा पुढे कधी राम येईल तोपर्यंत सुखाची नोकरी मिळेल. पण तेवढ्या काळात सीतेची काही मुक्ती होणे शक्य नाही."
 मग काय विचार करा म्हणून मी विद्यार्थंना सांगितलं? "ही जी माणसं आजूबाजूला तुला दिसतात, चांगल्यापैकी घरात राहतात, घरात दिवे आहेत, खिडक्यांना पडदे लावलेले आहेत, आईबाप-मुलं एकमेकांशी बोलतात, खेळतात, फिरायला जातात. ते काही फार श्रीमंत आहेत असं नाही; पण कुटुंब म्हणून जे काही आयुष्य असतं ते जगतात. तुम्ही निदान स्वतःला असा प्रश्न विचारा की, माझ्या आई-बापांनी असं कोणतं पाप केलं आहे की त्यांना असं कधी जगता आलं नाही, एक दिवससुद्धा? हा प्रश्न जर तुम्ही विचारला नाही स्वतःला तर तुम्ही विद्यार्थी नाही आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला दिलं गेलं नाही तर तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजात शिकविली जाणारी विद्या ही मुळी विद्याच नाही."
 ज्याने आसपासच्या परिस्थितीचा अर्थ लागत नाही ती विद्या कसली? इथं तुम्ही जे आला आहात तेसुद्धा पुस्तकं, काही वाक्यं पाठ करण्याकरिता नाही. एखाद्या भुकेलेल्याला जर दयाबुद्धीने काही पैसे दिले तर तो कदाचित त्या दिवसाची भाकरी खाईल; पण त्याला जर का कुऱ्हाड दिली तर तो कामाला लागेल आणि रोज भाकरी खाईल अशी गोष्ट आमच्या लहानपणी सांगितली जाई. इथे तुम्हाला, शेतकऱ्यांच्या पुढे जाऊन मांडण्याकरिता अशी काही तयार गाठोडी, तयार शिदोरी दिली जाणार नाही. विचार कसा करावा इथपासून तुमच्या मनाची खात्री पटवून घेणं हा खरं तर इथल्या प्रशिक्षणवर्गाचा हेतू आहे आणि एकदा हे विचाराचं हत्यार तुम्हाला गवसलं की मग आपापल्या गावी गेल्यानंतर, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात गेल्यानंतर नवीन काही प्रश्न निर्माण झाला तर, "आम्हाला काही याचं उत्तर शिबिरात सांगितलं नव्हतं." असं म्हणायची वेळ येणार नाही. पाठांतरावर भिस्त असणारा एखादा ढ विद्यार्थी कसं म्हणतो? परीक्षेचा पेपर फुटला आहे; पण याचं उत्तर काय द्यायचं ते आपल्याला मास्तरांनी सांगितलेलं नाही; पण जो अभ्यासू असतो तो म्हणतो गुरुजींनी हाच प्रश्न नेमका नाही सांगितला; पण त्या अमुक एका प्रश्नाच्या उत्तरात जी रीत गुरुजींनी सांगितली ती या प्रश्नाच्या परिस्थितीत वापरली म्हणजे उत्तर येतं.
 या स्वरूपाचं, एक फार आनंद देणारं उदाहरण घडल्याचं मला आठवतं. १९८४ सालच्या महाराष्ट्र प्रचारयात्रेतील घटना आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका गावी प्रचारयात्रा थांबली होती. काहीतरी कुरमुरे वगैरे वाटण्याचं काम चालू होतं. दोन कार्यकर्ते एकमेकांत चर्चा करत होते. विषय होता, नुकतेच बिहारमध्ये एका हरिजन शेतमजूर बाईवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा. एक कार्यकर्ता म्हणत होता, "तिथे शेतकऱ्याने त्या बाईवर बलात्कार केला. मग तुम्ही कसं म्हणता की शेतकरी विरुद्ध शेतमजूर असा संघर्ष नाही?" त्यावर दुसऱ्या कार्यकर्त्याने अत्यंत शांतपणे सांगितलं की, "त्या हरिजन शेतमजूर स्त्रीवर बलात्कार झाला याचं एकमेव कारण आहे की शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही." त्याने जो काही तर्क मांडला, जो काही निष्कर्ष काढला तो तर आहेच पण हे सारं त्यानं ज्या आत्मविश्वासानं सांगितलं हे पाहता त्यामागे एक मोठा अर्थ आहे की, सगळ्या समाजातल्या सगळ्या छेदाछेदांचं कारण काय? सगळ्या समाजाला जी काही साचलेल्या डबक्याची अवस्था प्राप्त झाली आहे त्या डबक्यातले किडे एकमेकांशी जी काही मारामारी करताहेत त्यामागचं जे काही तात्पुरतं कारण आहे त्याचं काय महत्त्व आहे ? मुळामध्ये डबकं झालंय मग त्यातले किडे किड्यासारखेच वागायला लागतात. हे त्यानं मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं.
 अपेक्षा अशी आहे की इथून जाताना तुम्ही हातामध्ये एखादं नवीन हत्यार घेऊन जाल आणि हे हत्यार माझ्याकडे आहे, विचारांचे, तोपर्यंत कोणीही समोर येवो- तो स्थानिक कॉलेजमधला मान्यवर अर्थशास्त्रज्ञ असो का एखादा पुढारी असो, कारखान्याचा अध्यक्ष असो का सोसायटीचा कुणी असो त्याचा सामना मी करू शकतो हा आत्मविश्वास कमावून जाल. माझ्या हातातलं हत्यार हे जगातल्या सर्व ताकदीपेक्षा श्रेष्ठ आहे असा तुम्हाला अभिमान वाटेल. एक भला मोठा पहेलवान व दुसरा ताकदीने अगदी किरकोळ मनुष्य आहे; पण त्या किरकोळ माणसाच्या हातात जर हत्यार असलं तर तो भल्यामोठ्या पहिलवानाचासुद्धा सामना करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही इथून घेऊन जावं अशी अपेक्षा आहे त्या हत्याराच्या साहाय्याने बाकीची साधनं, संपन्नता असलेली माणसं तुमच्यापुढे फिकी पडावी.
 हे हत्यार हस्तगत करता करताच ते चालवायचं कसं याचा सरावही इथेच करायचा आहे. मनात आलेला कोणताही प्रश्न विचारायला मागेपुढे पाहू नका. इथं काही कुणी शिकवणार नाही. जसं तुम्ही तुमच्या अनुभवाचा अर्थ लावता आहात तसंच इथले प्रशिक्षकसुद्धा काही शिकून थांबलेले नाहीत. एक मोठा फरक लक्षात घ्या. शाळा-कॉलेजमधला शिक्षक साधारणपणे आवश्यक पदव्या घेतल्या, डी.एड्.- बी.एड्. झालं की, शिक्षण त्याचं साधारणपणे थांबतं. आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो आहोत तो विषयच मुळी थांबणारा नाही. हा विषय सतत वाढणारा, सतत बदलणारा आहे. आकाशातल्या ताऱ्यांचा अभ्यास जसा, १५ दिवस केला, वर्षभर केला, ...आणि म्हटलं की मला सगळं समजलं, तर ते काही खरं होत नाही. हजारो वर्षांनी ताऱ्यांची पुन्हा तीच स्थिती कधी येत असेल तर असेल. त्यांच्या सगळ्या हालचालीविषयी माहिती जर पाहिजे असेल तर सतत पाहाणे, सतत विचार करणे, सतत अभ्यास करणे याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की १९८० मध्ये ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेने कामाला सुरुवात केली तिच्यात आणि आजच्या परिस्थितीत म्हटलं तर काहीच अंतर नाही आणि म्हटलं तर महद्अंतर आहे. म्हटलं तर खूपच घडून गेलं आहे आणि म्हटलं तर परिस्थिती पुष्कळशी तीच आहे; पण काय बदललेलं आहे आणि काय बदललेलं नाही याचा जर विचार आपण केला नाही आणि ८० मध्ये जी वाक्यं म्हणत होतो ती त्याच पद्धतीने, त्याच ठेक्यात, त्याच जोशामध्ये आणि त्याच आवेशाने म्हणत राहिलो तर सत्यनारायणाची पूजा सांगणारा ब्राह्मण आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. कारण निरर्थक बोलणारे सतत तेच तेच बोलत असतात, कितीही काळ गेला तरी; पण मी आज जे बोलतो आहे ते आजच्या परिस्थितीला लागू आहे ही जाणीव आणि हा आत्मविश्वास असला म्हणजे मग त्याला खऱ्या अर्थाने विषय समजला असे म्हणता येईल.

(२१ ऑगस्ट १९९०)