हिंदुसमाज संघटना आणि विघटना/हिंदुसमाज-संघटनातत्त्व

विकिस्रोत कडून



हिंदुसमाज - संघटनातत्त्व


 हिंदुसमाज समाज आहे काय, या प्रश्नाचा विचार मागल्या प्रकरणात आपण केला. एवढ्या खंडप्राय देशात परस्परांपासून अत्यंत भिन्न अशा जमातींनी घडलेल्या त्या लोकसमुदायाला दळणवळणाची साधने उपलब्ध नसताना, त्या मागल्या काळी भारतीय आर्यांनी असुर, द्रविड, नाग, इ. जमातींतील श्रेष्ठ, प्रज्ञावंत, कर्त्या पुरुषांनी- एकरूपता प्राप्त करून दिली हे त्यांचे कर्तृत्व अगदी असामान्य असे होय, असे पंडितांचे मत असल्याचे आपण पाहिले. पण त्याचबरोबर आर्याच्या त्या सर्वसंग्राहक धोरणामुळे या समाजाला एकरूपता आली असली तरी त्याला दार्ढ्य आले नाही, संघटित सामर्थ्य निर्माण करण्यास हा समाज असमर्थ झाला हा त्या धोरणावर येणारा आक्षेपही आपण ऐकला. या आक्षेपाचाच आता विचार करावयाचा आहे. म्हणजे हिंदु-समाज समाज असला तरी तो संघटित आहे काय, तो कधी संघटनक्षम होऊ शकेल काय, पूर्वी तो तसा कधी होता काय असा आपला दुसरा प्रश्न आहे.
 कोणताही समाज संघटित व्हावयाचा तर त्याला काही संघटनातत्त्व असले पाहिजे. धर्म, राष्ट्र, वंश ही संघटनातत्त्वे आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात भिन्नभिन्न लोकांनी आश्रयिलेली आहेत. वर्ग हे नवीन संघटनातत्त्व मार्क्सने प्रतिपादिले होते. पण ते फोल ठरले. त्या तत्त्वाचा कधीच कोणी- मार्क्सवादी समुदायांनीसुद्धा – अवलंब केला नाही. पूर्वकाळी धर्म व वंश या तत्त्वांचा प्रभाव फार असे. तेव्हा प्रायः त्याचाच अवलंब बहुतेक समाज करीत. युरोपात राष्ट्र हे तत्त्व गेल्या चारपाच शतकांत उदयास आले आहे. आज बहुतेक देश राष्ट्र म्हणून संघटित होत आहेत. एकभूमी, एक परंपरा व बहुधा एक भाषा हे राष्ट्रधर्माचे समबंध म्हणून मान्यता पावलेले आहेत. प्राचीन भारतीयांनी धर्म, वंश व राष्ट्र यांपैकी कोठल्या एखाद्या तत्त्वाचा अवलंब करून येथला समाज संघटित केला होता काय, हे आता पहावयाचे आहे.

आपपरभाव :

 समाज एखाद्या तत्त्वावर संघटित होतो म्हणजे काय, याचा अर्थ आपण मनाशी निश्चित करून ठेविला पाहिजे. वरीलपैकी कोणतेही तत्त्व अवलंबिले तरी त्या तत्त्वावर अचल निष्ठा समाजातील बहुसंख्य लोकांची असली पाहिजे. धर्मतत्त्वाचा आश्रय केला तर माझ्या धर्माचे ते माझे स्वकीय व इतर सर्व परकीय असा भाव त्यातून लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. संघटनेच्या सामर्थ्याचा उपयोग प्रामुख्याने समाजसंरक्षणासाठी, त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, व्हावयाचा असतो. आणि तेथेच समाजातील नागरिकांच्या निष्ठेची खरी कसोटी लागत असते. एरवी स्वधर्मीय ते स्वकीय व परधर्मी ते परकीय ही भावना इतक्या तीव्रपणे प्रतीत न झाली तरी समाजाला फारसा धोका नसतो. पण मरणमारणाच्या संग्रामात ही भावना, ही निष्ठा व्यक्तींच्या मनातून अणुमात्र जरी विचलित झाली तरी समाजावर संकट ओढवते. मी स्वकीयांविरुद्ध- स्वधर्मीय, स्वराष्ट्रीय वा स्ववंशीय यांच्या विरुद्ध- कधीही लढणार नाही; निदान परकीयांच्या बाजूने स्वकीयांविरुद्ध रणात उतरणार नाही इतकी तरी कमीत कमी निष्ठा कोणत्या तरी तत्त्वावर असल्यावाचून समाज संघटित होत नाही. त्याला सामर्थ्यं प्राप्त होत नाही. प्राचीन काळी हिंदूंनी कोणत्या तरी निष्ठेची जोपासना करून, म्हणजे आपपरभाव निश्चित करून संघटित सामर्थ्य निर्माण केले होते काय ? समाजाच्या मनात सतत आपपरभाव निश्चित असल्यावाचून आणि तन्निष्ठ जे रागद्वेष ते तीव्र, उत्कट व धारदार झाल्यावाचून समाज संघटनक्षम होऊ शकत नाही आणि त्याला सामर्थ्य लाभत नाही. हिंदूंना हे सामर्थ्य कधी लाभले होते काय ?
 प्राचीन भारतीयांनी वंशतत्त्वाचा संघटनेसाठी अवलंब केला नव्हता हे आपण मागल्या प्रकरणात पाहिलेच आहे. आर्य हे नाव वंशवाचक आहे व भारतातील मूळचे द्रविड, असुर, नाग इ. लोक आर्यांहून भिन्न वंशाचे होते, इत्यादी युरोपीय पंडितांची मते अगदी निराधार आहेत, हे ज्ञानकोशकारांनी निर्णायकपणे दाखवून दिले आहे. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी आपल्या 'वेदांतील राष्ट्रदर्शन' या ग्रंथात या प्रश्नाचा सांगोपांग विचार करून तोच निर्णय दिला आहे. तेव्हा याविषयी आता शंकेला जागा नाही. मग आर्यांनी संघटनेसाठी कोणत्या तत्त्वाचा आश्रय केला होता ? त्यांचे आपपरभाव कोणत्या तत्त्वावर ठरत होते ?
 वेदग्रंथ उघडून सहज जरी चाळून पाहिले तरी 'हे इंद्रा, आमच्या शत्रूंचा तू नाश कर, हे अग्ने आमच्या शत्रूच्या नगरांचा विध्वंस कर, देवांनो, शत्रूपासून आमचे रक्षण करा, त्यांच्यावर वज्र फेका, हे पूषन्, आमच्यावर चालून येणाऱ्या शत्रूंचे निर्दाळण कर, देवांनो, आमच्या स्तोत्रांचा, प्रार्थनांचा स्वीकार करा व आमचे शत्रू नष्ट करा.' अशा तऱ्हेच्या प्रार्थना शेकडो सूक्तांत केलेल्या दिसून येतात. या सूक्तांतून शत्रूंविषयीचा जळता द्वेष पावलोपावली प्रगट झालेला दिसून येतो. आता युरोपीय पंडित म्हणतात त्याप्रमाणे हे शत्रू म्हणजे एतद्देशीय मूळच्या कृष्णवर्णीय, कुरूप, रानटी जमाती जर नव्हत तर मग आर्याचे हे शत्रू कोण होते ?

यज्ञविरोधक :

 यज्ञसंस्था, अग्निउपासना, वैदिक संस्कृती व संस्कृत भाषा यांचे द्वेष्टे, यांचे विध्वंसक, यांचे शत्रू ते आर्यांचे शत्रू होते. दस्यु, दास असा त्यांचा सतत निर्देश केलेला आढळतो. पण यज्ञविरोध हे त्यांचे मुख्य लक्षण आहे. ऋग्वेदातील पुढील ऋचा पहा. "अयाजक, हिंसाप्रचुर अशा वाणीने बडबड करणारे पणी, यज्ञकर्माविषयी श्रद्धा नसलेले, स्तोत्रे गाऊन अग्नीची कीर्ती न वाढविणारे, यज्ञकर्म न करता वृथाच कालक्षेप करणारे असे जे पणीनामक दस्यू त्यांना अग्निदेव पूर्णपणे हाकून लावतो. इतकेच नाही तर सर्व देवांत अग्नि हा प्रमुख होत्साता अयाजक अशा दुसऱ्या कित्येक लोकांनाही रसातळी दडपून टाकतो." (ऋग्वेद ७.६.२) अनेक ठिकाणी दस्यूंचे वर्णन कर्महीन, (यज्ञहीन) कर्मरहित, अग्नीला हविर्भाग न देणारे, त्याचप्रमाणे मृध्रवाच, असे केलेले असून आर्याचे वर्णन यज्ञकर्ते, अग्निपूजक, अग्निहोत्र धारण करणारे असे केलेले आहे. अनेक ऋचा देऊन ज्ञानकोशकारांनी आर्य व अनार्य (दस्यू) यांतील भेद यजनविषयक आहे, वांशिक नाही, असा निर्णय दिला आहे. (बुद्धपूर्व जग- प्रकरण ३ रे.) याचा अर्थ असा की, आर्यांनी धर्म हे संघटनातत्त्व निश्चित केले होते. 'यज्ञ' हा त्यांचा धर्म होता. ते त्यांचे दैवत होते. त्या देवतेचे व तिच्या पूजनातून निर्माण झालेल्या संस्कृतीचे उपासक ते स्वजन आणि तिचे विरोधक ते परकीय, ते शत्रू असा आपपरभाव आर्यांच्या मनात निश्चित झालेला होता. रामायणात विश्वामित्राने रामाचे साह्य मागितले ते यज्ञरक्षणासाठी. त्याचा विध्वंस राक्षस करीत होते म्हणून तें शत्रू होते, असेच वर्णन आहे.

भूमिनिष्ठेचा उदय :

 'यज्ञ' हे आर्यांचे दैवत होते, वेदमंत्रांनी त्याची पूजा करणे हा त्यांचा धर्म होता आणि वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, आर्षमहाकाव्ये या संस्कृतग्रंथांतून जोपासली गेलेली ती त्यांची संस्कृती होती. त्यामुळे त्यांचे आपपरभाव या यज्ञधर्मप्रधानसंस्कृतीवर प्रारंभी अवलंबून होते. पण पुढे हळूहळू आर्यांची यज्ञनिष्ठा भूमीचा आश्रय करू लागली. तिने यज्ञाचा आश्रय सोडला असा अर्थ नव्हे. उलट यज्ञीय भूमी, यज्ञपुनीत भूमी, ती आर्यभूमी असाच त्यांचा भाव होता. पण यज्ञाच्या जोडीला भूमिनिष्ठा हळूहळू त्यांच्या मनात दृढावू लागली हे मात्र निश्चित. या भूमिनिष्ठेतूनच राष्ट्रनिष्ठेचा- त्या थोर संघटनतत्त्वाचा- उद्भव होतो. आर्य प्रथम वायव्यप्रांत व पंजाब या प्रदेशांत रहात होते. पुढील काळात ते पूर्वेला सरकू लागले. तेव्हा कुरुपांचाल, कोसल विदेह ही भूमी ते पवित्र मानू लागले. आणि जसजसा त्यांच्या वसाहतीचा विस्तार होऊ लागला तसतसे आर्यावर्त कोणत्या भूमीला म्हणावे याविषयी त्यांच्यात वाद व चर्चा होऊ लागल्या. वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, धर्मसूत्रे, पुराणे यांत ही चर्चा विपुल प्रमाणात चाललेली दिसून येते. त्याबरोबर हेही दिसून येते की, आर्यावर्ताच्या कक्षा वाढत आहेत. कृष्णमृग जेथपर्यंत विचरतो तेथपर्यंत आर्यावर्ताच्या सीमा, असे जुन्या ग्रंथांत अनेकदा सांगितलेले आहे. कृष्णमृग हा अग्नीचा अवतार मानीत. त्यावरून हा अर्थ स्पष्ट दिसतो की आर्यांची यज्ञसंस्कृती जेवढ्या प्रदेशात पसरली तेवढ्या भूमीला ते आर्यावर्त म्हणू लागले. मनूच्या मते विंध्य पर्वताच्या उत्तरेचा आणि हिमालय व पूर्व- पश्चिम समुद्र यांनी सीमित केलेला सर्व भूभाग (म्हणजे उत्तर भारत) हा आर्यावर्त होय. या भागात राहणारे ते आर्य व बाहेरचे ते म्लेंच्छ असे तो म्हणतो. यावरून आता आपपरभाव भूमीवर ठरू लागले असे दिसून येईल. मात्र अजून यज्ञसंस्कृतीचे, त्या कल्पनांचे वर्चस्व कमी झालेले नाही हे स्पष्ट आहे. म्लेंच्छ या शब्दाचा मूळ अर्थ अशुद्ध बोलणारे, असा आहे हेही येथे ध्यानात ठेवले पाहिजे. यानंतर पाणिनि- उत्तरकाळी आर्यांचा दक्षिणेतही प्रवेश झाला व काही शतकांतच त्यांनी कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रदेशाचे आर्यीकरण करून टाकले. तेव्हा आर्यावर्ताला आता शास्त्रकार भारतवर्ष म्हणू लागले. आणि हिमालय व पश्चिम, दक्षिण व पूर्व समुद्र या सीमांतील देश तो भारतवर्ष अशा त्याच्या मर्यादा सांगू लागले. शबर स्वामी (इ. स. ५ वे शतक) आपल्या जैमिनीभाष्यात सांगतात की, हिमालयापासून कुमारीपर्यंत भाषा व संस्कृती यांचे संपूर्ण ऐक्य आहे. चाणक्याने आपल्या दूरदृष्टीने हे आधीच पाहिले होते. (इ. पू. ४ थे शतक) चक्रवर्तिक्षेत्राची मर्यादा त्याने 'हिमवत् समुद्रान्तरम्' अशी सांगितली आहे. धर्माने, संस्कृतीने जो समाज एकरूप केला तो राजसत्तेने एक झाला पाहिजे हा त्याचा आग्रह यात स्पष्ट दिसतो. श्रीकृष्णांनी असाच प्रयत्न केला होता हे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे. सर्व भारत हा आर्य झाल्याचे व ही सर्व भूमी पवित्र ठरल्याचे आणखी एक द्योतक म्हणजे गंगा यमुनांच्या बरोबरीने गोदावरी, कावेरी या नद्या पवित्र ठरल्या, दक्षिणेतल्या नगरी व पर्वतही तीर्थक्षेत्राच्या यादीत समाविष्ट झाले आणि भरतभूमीचा 'समुद्ररशनादेवी' असा निर्देश शास्त्रकार करू लागले. (धर्म- शास्त्राचा इतिहास, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ११ ते १८. म. म. पां. वा. काणे व संस्कृतिसंगम- पृ. २४३. द. के. केळकर.)

राष्ट्राभिमान :

 यज्ञभक्तीचे पर्यवसान हळूहळू त्या यज्ञाने पावन झालेल्या भूमिभक्तीत कसे झाले ते आपण पाहिले. पण येवढ्याने राष्ट्रनिष्ठा पूर्णतेस जात राही. या भूमीविषयी जाज्वल्य अभिमान, येथल्या परंपरांविषयी तशीच उत्कट आत्मीयता आणि त्यांच्या संरक्षणासाठी आत्मबलिदान करण्याची सिद्धता एवढा भावार्थ राष्ट्रनिष्ठेत सामावलेला असतो. त्या अभावी ती राष्ट्रनिष्ठा वंध्याच राहते. तिच्यातून सामर्थ्य निर्माण होत नाही. वेदवाङ्मयात राष्ट्रनिष्ठेतील हा सर्व भावार्थ दृग्गोचर होतो ही भारताला अत्यंत भूषणावह अशी गोष्ट आहे. अथर्ववेदाच्या पृथ्वीसूक्तात या सर्व भावनांचा सुक्तकाराने उत्तम आविष्कार केला आहे. सूक्तकार म्हणतो-

यत् ते भूमे विखनामि क्षिप्रं तदपि रोहतु ।
मा ते मर्म विमृग्वरि मा ते हृदयमर्पिपम् ॥ ३५ ॥

 हे भूमि ! मी जी जागा खणतो ती शीघ्र प्राणतत्त्वाने भरून जावो. माझ्या हातून तुझ्या मर्मावर आघात न होवो. वा तुझ्या हृदयाला माझ्या हातून व्यथा न होवो.

इन्द्रो यां चक्र आत्मनेऽअनमित्रां शचीपतिः ।
सा नो भूमिः विसृजतां माता पुत्राय मे पयः ॥ १० ॥

 शचीपति इंद्राने जिला शत्रुरहित केली ती ही भूमाता आपला पुत्र असलेल्या मला दूध-पोषक द्रव्य- देवो.
 भूमीला माता म्हणून संबोधिल्यानंतर तिचे अन्नधन, गोधन, विपुलोदक नद्या, हिरण्य, रत्नमाणके, नानावीर्या औषधी, हे जे वैभव त्याचे कवीने मोठे बहारीचे वर्णन केले आहे.
 कवीने या भूमीच्या उज्ज्वल परंपरेवरील आपली भक्ती अशीच मोठ्या तेजस्वी शब्दांत प्रगट केली आहे. तो म्हणतो, 'ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी आपले अद्भुत पराक्रम केले, ज्या ठिकाणी देवांनी असुरांचा विध्वंस केला, ती ही आमची जन्मभूमी आम्हांला ऐश्वर्य व तेज देवो. हे शत्रुमर्दिनी भूमाते ! जे आमचा द्वेष करतात, जे सेना घेऊन आमच्यावर आक्रमण करतात व आमचा नाश करण्यासाठी टपून बसलेले असतात त्यांचा तू नाश कर. याच भूमीवर आमच्या सामर्थ्यसंपन्न ऋषींनी यज्ञ, तपस्या व मंत्रोच्चार केलेला आहे.'
 कवीने व्यक्त केलेला हा अभिमान केवळ वाचिक नाही. भूमीसाठी वाटेल ते कष्ट करण्यास व प्रसंगी आत्मबलिदान करण्यासही तो सिद्ध आहे.

अहमस्मि सहमान उत्तरो नाम भूम्याम् ।
अभीषाड् अस्मि विश्वाषाड् आशामाशां विषासहिः ॥ ५४ ॥

 मी आपल्या मातृभूमीसाठी व तिच्या दुःखविमोचनासाठी सर्व प्रकारचे कष्ट भोगावयास सिद्ध आहे. मी सर्व दिशांना विशेषप्रकारे विजय मिळवीन व शत्रूंचा नाश करीन.

यद् वदामि मधुमत् तद् वदामि यदीक्षे तद् वनन्ति मा ।
त्विषीमानस्मि जूतिमान् अवान्यान् हन्मि दोधतः ॥ ५८ ॥

 माझ्या मातृभूमीच्या हिताचेच मी बोलेन व जे करावयाचे ते तिच्या साह्यासाठीच करीन. मी ज्योतिःपूर्ण, तेजस्वी व बुद्धिसंपन्न होऊन या भूमातेचे शोषण करणाऱ्या शत्रूंचा विनाश करीन.
 अशी ग्वाही देऊन सूक्ताच्या शेवटी कवीने मातृभूमीसाठी करावयाच्या अंतिम त्यागाचीही सिद्धता व्यक्त केली आहे.

दीर्घं न आयुः प्रतिबुध्यमाना
वयं तुभ्यं वलिहृतः स्याम ॥ ६२ ॥

 आम्हांस दीर्घ आयुष्य प्राप्त होवो. आम्ही उत्तम ज्ञानी व्हावे आणि मातृभूमीसाठी आम्ही आमचे बलिदान करावे.
 (अथर्ववेद- भाग २ रा, संपादक- पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, कांड १२, सूक्त १ ले. मंत्र ३५, १०, २, ३, ४, ५, ६, १४, ३९, ५४, ५८, ६२. अथर्ववेदाच्या या भागाला पंडित सातवळेकरांनी 'मातृभूमि आणि स्वराज्यशासन' असेच नाव दिले आहे.)
 पुराणांनी याच उत्कटतेने भारतवर्षाबद्दलचा अभिमान प्रगट केला आहे. विष्णुपुराण म्हणते, 'सहस्र जन्मांनंतर भारतवर्षात जन्म मिळतो. आणि येथे जन्मलेल्यांनाच स्वर्ग व मोक्ष प्राप्त होऊ शकतो.' वायुपुराणाने अशीच भारतभक्ती व्यक्तविली आहे. (विष्णु- २, ३, २. वायु ४५, ७७.) ब्रह्मपुराणाचा २७ वा अध्याय 'भारतवर्षानुकीर्तनम्' याच नावाने प्रसिद्ध आहे. 'जे नरश्रेष्ठ भारतवर्षात जन्माला येतात ते धन्य होत. देवांना या भूमीत जन्म मिळावा अशी फार इच्छा असते. या भरतभूमीच्या सर्व गुणांचे वर्णन करणे कोणाला शक्य आहे ?' असा या भूमीचा पुराणकाराने गौरव केला आहे. (ब्रह्मपुराण- आनंदाश्रमप्रत. अ. २७)
 वरील वचने अत्यंत स्फूर्तिदायक आहेत व भारताच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी त्या जुन्या काळी राष्ट्रधर्माविषयीचे हे विचार सांगितले हे आपल्याला अत्यंत भूषणावह आहे, हे खरे. पण हे सर्व ग्रंथगत आहे. पुराणात आहे. प्रत्यक्षात या राष्ट्रनिष्ठेने भारून जाऊन, आपपरभाव निश्चित करून, मातृभूमीसाठी परकीय आक्रमकांशी प्राणपणाने हिंदुलोक संघटित होऊन लढले, या निष्ठेपायी त्यांनी सर्वस्वाचा होम करून घेतला आणि या दिव्य निष्ठेने प्रेरित होऊन भारताच्या लोकसमुदायातून एक प्रबल समर्थ व संपन्न असे राष्ट्र त्यांनी निर्माण केले, असे कधी घडले आहे काय, ऐतिहासिक कालात घडले काय, असा प्रश्न आहे. तसे झाले असेल तरच वरच्या ग्रांथिक विचारांचे महत्त्व. नाही तर आज भारतात काय कमी आहे? राष्ट्रनिष्ठा, भारतनिष्ठा, मातृभूमीची भक्ती, सर्वस्वाचा त्याग यांविषयी लेखन व उपदेश भारतात टनावारी चालू आहे. पण असा एक तरी पक्ष भारतात आहे काय की ज्याला राष्ट्रनिष्ठ म्हणता येईल? भारतीय जीवनाचे एक क्षेत्र तरी असे आहे काय की जेथे या निष्ठेने कार्यकर्ते प्रेरित झालेले आहेत? राजकारणात तर राष्ट्रनिष्ठा औषधाला तरी सापडेल की नाही याची शंका आहे. तेव्हा केवळ ग्रांथिक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे, याला फारसे महत्त्व नाही. ते तत्त्वज्ञान लोकांच्या जीवनात, प्रत्यक्षात किती आचरले जाते यावर सर्व अवलंबून आहे. म्हणून हे पहावयास हवे की, भारतात प्राचीन काळी ही निष्ठा प्रत्यक्षात किती अवतरली होती? तिच्यामुळे या भूमीत संघटित सामर्थ्य किती निर्माण झाले होते ?

शिकंदराच्या काळी :

 वर सांगितलेच आहे की कोणतेही संघटनातत्त्व समाजात किती प्रभावी आहे याची खरी कसोटी परकीय आक्रमणाच्या वेळी लागते. सोन्याची विशुद्धी किंवा श्यामिका (हीण) यांची खरी परीक्षा अग्नीत होते. त्याचप्रमाणे लोकांच्या निष्ठेची खरी परीक्षा रणकुंडात होत असते. भारताच्या प्रारंभकाळीच भारताच्या राष्ट्रनिष्ठेची कसोटी लागली आणि तीत या सुवर्णभूमीतले हे सुवर्ण अगदी बावन्नकशी ठरले असा इतिहासवेत्त्यांनी आज एकमुखाने निर्वाळा दिला आहे. शिकंदराने भारतावर जे भीषण आक्रमण केले ते रणकुंड, आणि त्यातून भारताचे पहिले सम्राट महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी निर्माण केलेले अखिल भारताचे पहिले साम्राज्य हे शुद्ध सुवर्ण होय. हिंदुलोक फार प्रचंड असे संघटित सामर्थ्य निर्माण करू शकतात, हे इतिहासकाळात त्या वेळी प्रथम सिद्ध झाले.
 पारसीक राष्ट्राचे- इराणचे व ग्रीकांचे पिढीजात वैर. पण ग्रीकांची लहान लहान गणराज्ये त्या एकछत्री पारसीक साम्राज्यशक्तीपुढे फारशी टिकाव धरू शकत नसत. शिकंदरचा पिता फिलिप याने ग्रीकांचे एकराज्य निर्माण केले, व ते संघटित सामर्थ्य पाठीशी घेऊन शिकंदर विश्वविजयासाठी बाहेर पडला. पहिल्या धडाक्यालाच त्याने दरायसच्या पारसीक साम्राज्याचा विध्वंस केला व इराणचा सम्राट, म्हणून स्वतःच्या नावाची द्वाही फिरविली. वाटेत त्याने बाबिलोनी साम्राज्य असेच धुळीस मिळविले होते. त्यामुळे गंगेच्या काठचे मगध साम्राज्य असेच निर्दाळून हिंदुस्थानचा सम्राट म्हणून मिरवण्याची त्याला स्वप्ने पडू लागली. म्हणून त्याच जोसात तो तसाच वादळी वेगाने पुढे निघाला व भारतावर कोसळला. बाबिलोन, इराण येथे जशी कोपराने खणण्याजोगी मऊ भुसभुशीत जमीन सापडली तशीच येथे सापडेल असे त्याला वाटले होते. पण येथे त्याला पावलोपावली काळ्या, लोखंडी फत्तराची ठेच लागू लागली. आणि अखेरीस या फत्तरावर त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन, गंगाकाठच्या मगधसाम्राज्याचे दुरून दर्शन घेण्याचे भाग्यही न मिळता, त्याला रक्तबंबाळ अवस्थेत परत जावे लागले. विश्वविजेत्या त्या सेनानीचा हा दारुण मुखभंग कशामुळे झाला?

भारतांतील जिवंत राष्ट्रधर्मामुळे !

 भारताच्या सीमेवर त्या वेळी सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर सौभूती, कठ, मालव, क्षुद्रक, अग्रश्रेणी, पट्टनप्रस्थ अशी अनेक गणराज्ये (प्राजके- रिपब्लिकस्) व तक्षशिलेसारखी काही राजके सत्तारूढ होती. या राज्यांचे परिघ, लहान होते. त्यांचा जीव लहान होता. त्यामुळे शिकंदराच्या अफाट सेनासागराचा प्रतिकार करण्यात ती यशस्वी झाली नाहीत. शिकंदराला प्रत्येक वेळी जयच मिळाला. पण तो सुखासुखी मिळाला नाही. या गणराज्यांनी त्याला इतका कडवा प्रतिकार केला की, प्रत्येक तसून् तसू भूमी शिकंदराला लढूनच घ्यावी लागली. दर ठिकाणी तुंबळ रणकंदन करावे लागले. ते इतके की व्यास नदीपाशी येऊन पोचेपर्यंत त्याचे ते अफाट सैन्य हैराण होऊन गेले. आणि पलीकडे यौधेयगणांची कडवी सेना आपल्या स्वागतासाठी उभी आहे हे कळताच त्याने हाय खाल्ली. आणि तसेच पुढे जाण्याचा शिकंदराने आग्रह धरला तेव्हा सैन्यात बेदिली माजण्याची चिन्हे दिसू लागली. प्लुटार्क म्हणतो 'पौरवाशी [पोरसशी] झालेल्या लढाईतच मॅसिडोनियन सेना मनाने खचून गेली होती. त्यात तिने ऐकले की, पुढे एकेक राजा ८० हजार, दोन लक्ष अशी सेना घेऊन संग्रामास सिद्ध झालेला आहे. त्यामुळे शिकंदर पुढे जाऊ लागला तर त्याला निश्चयाने विरोध करावयाचा असे शिपायांनी ठरविले.' या प्रसंगाची अत्यंत करुण वर्णने ग्रीक व रोमन इतिहासकारांनी केलेली आहेत. शिकंदर गंगा ओलांडून मगधावर चालून जाण्याचा आपला आग्रह सोडीत नाही असे दिसू लागताच सैनिकांच्या काळजात धडकी भरली. व हजारो सैनिक रडू लागले. त्याच्या तंबूच्या दाराशी रडत, भेकत उभे राहून आम्हांला परत पाठवा म्हणून याचना करू लागले. या रडण्याचे व हताश होण्याचे एक कारण म्हणजे अनेक वर्षे बायकामुलांचा, घराचा झालेला वियोग हे होय, हे खरे. घरदार सोडून त्या सेनेला आठ वर्षे झाली होती. आणि मगधावर जावयाचे म्हणजे आणखी इतकीच वर्षे जाण्याचा संभव होता. पण बाबिलोन, इराण येथे विजय मिळाले तसे भारतात मिळाले असते तर, मगधच काय पण आसामपर्यंतसुद्धा आणि तेथून दक्षिणेत सातवाहनांच्या प्रतिष्ठानापर्यंतसुद्धा जाण्यास शिकंदराची सेना तयार झाली असती. पण पोलादी तट फोडूनच प्रत्येक पाऊल टाकावे लागणार हे दिसत असल्यामुळे मॅसिडोनियन सेना हताश होऊन रडू लागली यात शंका नाही. (दि क्लासिकल अकाउंटस् ऑफ इंडिया- संपादक- आर. सी. मजुमदार, पृष्ठ १३३, १९०, १९८. या पुस्तकात आरियन, कर्टिस, डियोडोरस, जस्टिन, प्लुटार्क इ. प्राचीन ग्रीक व रोमन इतिहासकारांच्या ग्रंथांतून हिंदुस्थान- विषयक उतारे निवडून संपादकांनी एकत्र करून छापले आहेत. शिकंदराच्या स्वारीविषयी व येथल्या गणराज्यांनी त्याला जो प्रतिकार केला त्याविषयी जी माहिती येथे दिली आहे ती या प्राचीन ग्रीक-रोमन इतिहासकारांच्या आधारे दिली आहे.

कडवे रागद्वेष :

 शिकंद्राच्या अत्यंत प्रबळ अशा मॅसिडोनियन सेनेची अशी दुर्दशा कशाने झाली ते आता पाहावयाचे आहे. या काळापर्यंत भारतीय समाज एकरूप होऊन गेला होता आणि भारतवर्षाच्या सीमाही निश्चित झाल्या होत्या. आर्यांनी प्रस्थापिलेल्या यज्ञधर्माचे रूप आता पुष्कळच पालटले होते. पण तो वैदिक धर्म याच नावाने रूढ होता. व त्याचा आणि त्याने पवित्र झालेल्या भरतभूमीचा कडवा अभिमान लोकांच्या चित्तात दृढमूल झाला होता. त्यामुळे शिकंदर हा पर आहे, तो आक्रमक आहे, आपला धर्म व आपली भूमी यांचा तो शत्रू आहे याविषयी त्या सीमेवरील राज्यांतील नागरिकांच्या मनात अणुमात्र शंका नव्हती. स्वभूमीचे प्रेम व आक्रमकांचा द्वेष या राष्ट्रनिष्ठेच्या दोन बाजू आहेत. असे उत्कट रागद्वेष भारतीयांच्या मनात त्या वेळी होते म्हणूनच त्यांनी अत्यंत प्रखर असा प्रतिकार केला. वरवर पाहता त्यांना यश आले नाही. त्यांची राज्ये धुळीस मिळाली. त्यांच्या घोर कत्तली झाल्या. त्यांच्या स्त्रियांना जोहार करावे लागले. पण असे आत्म-बलिदान त्यांनी केले म्हणूनच शिकंदरला व्यास नदीपासून परत फिरावे लागले. नाही तर तो थेट पाटलीपुत्राला गेला असता व तेथल्या सिंहासनावर बसून भारताचा सम्राट म्हणून त्याने आपल्या नावाची द्वाही फिरविली असती. भरतभूमीच्या कपाळचा हा कलंक टळला, तिचे मुखमंडल पहिल्याप्रमाणेच मंगल चिन्हांनी मंडित राहिले, हे त्या सीमाभागातील लोकांनी केलेल्या बलिदानामुळेच होय. हे यश लहान आहे काय ?
 शिकंदर आणि भारतीय यांचा हा जो भीषण रणसंग्राम झाला, त्यात भारतीय राष्ट्रनिष्ठेनेच प्रेरित झाले होते, हे अनेक घटनांवरून निश्चित दिसते. मासागा येथे सात हजार लोकांची एक जमात शिकंदराच्या हाती सापडली. त्यांची कत्तल करण्याऐवजी शिकंदराने त्यांना सांगितले की, तुम्ही माझ्या सैन्यात सामील होत असाल तर, तुम्हांस जीवदान देऊन मी लष्करात ठेवून घेईन. त्या लोकांनी ते तात्पुरते मान्य केले व आम्हांस एकमत बनविण्यास एक रात्र द्यावी, व येथून नऊ मैलांवरील एका टेकडीवर रात्रभर जाऊ द्यावे, अशी विनंती केली. शिकंदराने ती मान्य केली. पण रात्री त्या पठारावर गेल्यावर 'परकीय आक्रमकाच्या पक्षाने भारतीयांशी लढण्याचे पाप आपण करावयाचे नाही' असा त्यांनी निश्चय केला. आणि रातोरात निघून जाण्याचे ठरविले. पण याचा शिकंदराला सुगावा लागताच त्याने त्यांच्यावर अचानक छापा घातला. तरीही शरण न जाता त्या शूर शिपायांनी अखेरपर्यंत लढा देऊन धारातीर्थी मरण पत्करले. त्यांच्यातील स्त्रियाही हाती शस्त्र घेऊन लढल्या व त्यांनीही मृत्यूला कवटाळले. डियोडोरस म्हणतो, 'अपमानित जिण्यापेक्षा हे मानाचे मरणच त्यांना श्रेयस्कर वाटले.' (क्लासिकल अकाउंटस्. आरियन, पृ. १३, डियोडोरस, पृ. १६३)
 मालव आणि क्षुद्रक अशी दोन गणराज्ये सिंधूच्या तीरावर होती. त्यांचे पिढीजात वैर होते. पण शिकंदराशी सामना द्यावयाचे ठरताच त्यांनी ते वैरही विसरावयाचे ठरविले. आणि ऐक्यबंध दृढ करून टाकण्यासाठी दोन्ही गणराज्यांनी आपापसात कन्यादाने करून १०००० विवाह घडवून आणले. पण त्यांची सैन्ये एक होण्याच्या आधीच शिकंदराने त्यांच्यावर छापा घातला व सहस्रावधी लोकांची कत्तल केली. पण याच संग्रामात एका नगरीच्या तटावरून शिकंदराने आत उडी मारली त्या वेळी एका हिंदी वीराने एक विषदिग्ध बाण त्याला मारला. त्यामुळे शिंकंदर रक्ताच्या थोराळ्यात कोसळला. या अपघातातून तो मरता मरता वाचला. काही दिवस तर तो मेला अशीच अफवा उठली होती. त्यामुळे त्याच्या साम्राज्यात बंडाळ्याही झाल्या. (उक्तग्रंथ- डियोडोरस, पृ. १७६)

राष्ट्रनिष्ठेचे तत्त्वज्ञान :

 भारतीयांच्या ठायी दिसून आलेली ही राष्ट्रनिष्ठा ही सहजगत्या झालेली गोष्ट नव्हती. या भूमीत त्या निष्ठेचे तत्त्वज्ञान बुद्धिपूर्वक, प्रयत्नपूर्वक रुजविण्यात आले होते. हे कार्य करणाऱ्या लोकांनाच ग्रीक ग्रंथकारांनी फिलॉसफरस्, जिमनोसोफिस्टस्, ब्राह्मण या नावांनी संबोधिलेले आहे. प्लुटार्क म्हणतो, 'लष्कराइतकाच या फिलॉसफरस्-नीही शिकंदराचा पिच्छा पुरविला. जे राजे त्याला शरण गेले त्यांची ते अत्यंत निर्भर्त्सना करीत आणि स्वतंत्र राज्यांना त्याच्याविरुद्ध उठण्याचा उपदेश करीत. त्यामुळे शिकंदराने अशा कित्येक उपदेशकांना फाशी दिले.' [उक्तग्रंथ, पृ. १९५] ग्युसिकॅनस या राजाला एकदा शिकंदराने नमविले होते, पण त्याने मागून परत उठावणी केली. त्याला शिकंदरने पुन्हा पकडले तेव्हा त्याला असे कळले की या उठावणीमागे अनेक ब्राह्मण आहेत. तेव्हा शिकंदराने त्याला व त्याच्याबरोबर त्या ब्राह्मणांनाही देहदंडाची शिक्षा दिली. [उक्तग्रंथ, पृ. ७७, ७८] एक्रेप्रसंगी तर एका ब्राह्मणाने निर्भयपणे शिकंदराच्या तोंडावर उत्तर दिल्याचे प्लुटार्कने नमूद करून ठेविले आहे. 'तू सवास याला माझ्याविरुद्ध बंड करण्याची चिथावणी का दिलीस?' असे त्याने विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने शांतपणे उत्तर दिले, 'त्याने मानाने जगावे व मरावेही मानानेच, असे मला वाटले म्हणून.' [पृ. २०१]
 सिंधूच्या दोन्ही तीरांवर असलेली ही प्राजके (गणराज्ये) व राजके वैदिक धर्माची अभिमानी होती. कठगण हा तर 'कठोपनिषद' व 'काठक- संहिता' यांमुळे भारतात अमर झाला आहे. हे सर्व कृष्णयजुर्वेदी असून त्यांचे काठकधर्मसूत्र विष्णुस्मृतीचा मूलाधार म्हणून प्रसिद्ध आहे. क्षुद्रक- गणाचे लोकही तत्त्वज्ञानातील पांडित्यासाठी शिकंदराच्या वेळी प्रसिद्ध होते. [हिंदू पॉलिटी- डॉ. जयस्वाल, पृ. ७७] क्षुद्रक व मालवगणातील ब्राह्मण हे तत्त्वज्ञानाप्रमाणेच रणपांडित्यातही प्रसिद्ध होते. शिकंदराशी झालेल्या लढाईत ५००० ब्राह्मणांनी धारातीर्थी देह ठेविले. कर्टिस म्हणतो की, 'हे लोक कडवे असल्यामुळे शिकंदाराला कैदी असे फारच थोडे मिळाले. बहुतेकांनी मरण पतकरिले.' झेलम व चिनाब यांच्या संगमावरील, ग्रीक इतिहासकारांनी उल्लेखिलेले 'सिबोई' म्हणजे ऋग्वेदातील 'शिव' जमातीचे लोक होत. [काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी- खंड २ रा. पृ. १२५, १२७] या धर्माभिमानामुळेच त्यांची भारतवर्षावरील, मातृभूमीवरील निष्ठा अविचलित राहिली होती.
 भारतीयांच्या चित्तात राष्ट्रधर्म असा जागृत असल्यामुळे शिकंदराची पाठ फिरताच त्याने जिंकलेल्या प्रदेशांत सर्वत्र उठावणी होऊ लागली. दमारॅक्सस या भारतीय अधीपतीने शिकंदर तक्षशिलेला असतानाच कंदाहार प्रांतात बंडाची चेतवणी दिली होती. नंतर त्याचा परत प्रवास सुरू झाला तेव्हा अश्वकायन गणांनी त्याने नेमलेला सत्रप- राज्यपाल- निकॅनॉर याचा शिरच्छेद केला. फिलिप या दुसऱ्या सत्रपाचाही असाच शिरच्छेद झाला. शिकंदराच्या सत्तेला हे सरळ आव्हानच होते. पण ते स्वीकारण्याचे सामर्थ्य त्याला नव्हते. त्याने दुसऱ्या एका भारतीय सत्रपाला याचा बंदोबस्त करण्यास आज्ञा दिली व तो पुढे निघून गेला. हे, तो जिवंत असताना ! मग त्याच्या मृत्यूनंतर काय झाले असेल याची सहज कल्पना येईल. भारतीयांच्या मनात या परकी सत्तेविषयी केव्हाच प्रेम नव्हते. कडवा द्वेष होता. त्यामुळे शिकंदराच्या मृत्यूची वार्ता पसरताच ग्रीकांचे सुभेदार, त्यांचे ध्वज, त्यांच्या वसाहती, जे जे म्हणून ग्रीक चिन्ह मागे उरले होते ते त्यांनी समूळ नष्ट करून टाकले व पारतंत्र्याचा कलंक धुऊन काढला. आणि थोड्याच दिवसात एक वावटळ यावी व जावी तसा प्रकार होऊन शिकंदराचे आक्रमण भारतात नामशेषही राहिले नाही. [ए कॉंप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १ ले, लेखक डॉ. आर. के. मुकर्जी.]

पहिले स्वातंत्र्ययुद्ध :

 पण शिकंदराच्या मृत्यूनंतर दुसरी जी महान घटना भारतात घडून आली तिला हिंदूंच्या संघटित सामर्थ्याच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य याचा उदय ही होय. इतिहासकाळात या महापुरुषानेच भारताला प्रथम राष्ट्र पदवी प्राप्त करून दिली. शिकंदराची स्वारी आली त्या वेळी तक्षशिलेच्या विद्यापीठात आर्य चाणक्य याच्या हाताखाली तो शिक्षण घेत होता. चाणक्याने परकी सत्तेविषयीचा द्वेष त्याच्या रोमरोमात भिनवून दिला होता. 'परकी सत्ताधाऱ्याला या प्रदेशाबद्दल ममत्व नसते, त्याने तो देश पाशवी बळाने जिंकलेला असतो, म्हणून तो प्रजेला पिळून काढतो व संपत्ती धुऊन नेतो,' हे अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील वर्णन प्रसिद्धच आहे. [अधिकरण ८ वे. प्रकरण २ रे.] अशा तेजस्वी शिक्षणाने चंद्रगुप्ताचे मन राष्ट्रनिष्ठेने भारून गेले होते. शिकंदर परत फिरताच उध्वस्त झालेल्या गणराज्यांतून, त्याने अखिल आर्यावर्ताचे एकराज्य घडविण्याच्या कल्पनेचा प्रचार करण्यास प्रारंभ केला. आणि जी गणराज्ये प्राणपणाने शिकंदराशी लढली त्यांना स्वातंत्र्याचे, एकराज्याचे व समाजसंघटनेचे हे आवाहन अत्यंत मानवले व त्यांतील सर्व सेना चंद्रगुप्ताच्या ध्वजाखाली गोळा झाल्या. हे भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, आणि त्याचा नेता चंद्रगुप्त हाच होता, हे रोमन इतिहासकार जस्टिन यानेही लिहून ठेविले आहे. राष्ट्रनिष्ठेला अवश्य ते आपपरभाव, ते रागद्वेष त्या गणराज्यांतील नागरिकांच्या मनात किती निश्चित झाले होते हे यावरून दिसून येते. भारतवर्ष ही त्यांची मायभूमी होती म्हणून शिकंदर त्यांना पर होता, शत्रु होता. म्हणूनच त्याच्या आक्रमणाचा त्यांनी प्रखर प्रतिकार केला. तशी निष्ठा त्यांच्या मनात नसती तर त्यांनी शिकंदरच्या मॅसिडोनियन सैन्याचे मुक्तिसेना म्हणून कम्युनिस्टांच्या पद्धतीप्रमाणे स्वागत केले असते. पण त्यांनी स्वागत केले ते चंद्रगुप्ताचे. आणि ते स्वातंत्र्य सेनेचे नेताजी म्हणून. कारण तो त्यांना स्वकीय होता. स्वातंत्र्ययुद्ध हा दिव्य अग्नी आहे. त्यात माणसांचे क्षुद्र अहंकार वितळून जातात. शिकंदराशी सामना करण्याचे ठरताच मालव व क्षुद्रक यांनी आपली भिन्न गणराज्ये एक करण्याचे ठरविले हे वर सांगितलेच आहे. आता सर्व गणराज्यांनी भारतराष्ट्रात आपले अहंकार वितळवून चंद्रगुप्ताच्या सेनासागरात विलीन व्हावयाचे ठरविले. चंद्रगुप्ताच्या सेनेत प्रामुख्याने भरती, शिकंदराशी जी गणराज्ये लढली, त्यांच्याच सैनिकांची होती, असे मॅकक्रिंडल म्हणतो ते अगदी खरे आहे. पण चंद्रगुप्त तेवढ्यावरच थांबला नाही. त्याचे स्वप्न फार भव्य होते. त्याच्या आकांक्षांना गगन ठेंगणे होते. त्यामुळे त्याने व चाणक्याने सर्व राजसत्ताक प्रदेशांतही दौरा काढला व प्रचंड सेना उभारली. (उक्तग्रंथ, डॉ. मुकर्जी. पृ. ३. तळटीप.) पुढील तीन-चार वर्षात सर्व विंध्योत्तर भारतात महाराज चंद्रगुप्त साम्राज्य स्थापू शकले ते याच संघटनेच्या बळावर नंतर दहा-पंधरा वर्षांनी ग्रीक सेनापती सेल्यूकस निकेटर शिकंदराप्रमाणेच भारतावर चालून आला तेव्हा त्यांनी त्याला धूळ चारिली ती याच संघटित सामर्थ्याच्या पुण्याईने आणि पुढे थोड्याच वर्षांत अखिल भारतावर महाराजांनी मौर्य साम्राज्य प्रस्थापित केले आणि सांकृतिकदृष्ट्या एकरूप असलेल्या भारतवर्षाचे भारतराष्ट्रात रूपांतर केले तेही लोकांच्या मनांत दृढमूल असलेल्या याच भारतनिष्ठेच्या दिव्य शक्तीने.
 परकीय आक्रमकांचा, सर्वस्वाचा होम करून, प्राणपणाने प्रतिकार करण्याची ही भारतीयांची परंपरा पुढे सुमारे एक हजार वर्षे तरी चालू होती. मागे सांगितलेच आहे की इ. स. हजारपर्यंतचा भारताचा इतिहास हा वैभवाचा आहे, कर्तृत्वाचा आहे, ते सुवर्णयुग होय, याविषयी बहुतेक इतिहासवेत्त्यांचे एक मत आहे. त्याच्या सामर्थ्याला आणि म्हणूनच वैभवाला ओहोटी लागली ती इ. स. १००० नंतर. तेथून पुढे येथल्या समाजाची विघटना सुरू झाली हे त्याचे कारण होय. पण त्या विघटनेची कारणमीमांसा आपल्याला पुढील प्रकरणात करावयाची आहे. सध्या आपण हिंदूंच्या संघटित सामर्थ्याचा इतिहास पहात आहोत. हे सामर्थ्य इ. स. १००० पर्यंत टिकून होते. त्याचेच थोडे धावते अवलोकन करून हे प्रकरण संपवावयाचे आहे.

हिंदूंचे संघटित सामर्थ्य :

 सम्राट चंद्रगुप्त यांनी सेल्युकस निकेटर यांचे ग्रीक आक्रमण निर्दाळून टाकल्यानंतर व आपले साम्राज्य इराणच्या सीमेला नेऊन भिडविल्यानंतर पुढील सव्वाशे वर्षांत ग्रीकांची भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची छाती झाली नाही. पण अशोकानंतरचे मौर्य राजे अगदी कर्तृत्वहीन होते. त्यामुळे आक्रमकांची लोभी दृष्टी पुन्हा भारताकडे वळू लागली. आणि डेमिट्रियस या ग्रीक राजाने भारतावर स्वारी केली. या वेळी आणखी एक दुर्दैव भारतावर ओढवले होते. ते म्हणजे बुद्धधर्माची अहिंसा हे होय. शिकंदराच्या स्वारीच्या वेळी बौद्धधर्म मगधाच्या परिसरापलीकडे फारसा पसरला नव्हता. पंजाबात तर त्याचे नावही कोणाला माहीत नव्हते. पण त्यानंतर, सम्राट अशोकाने राजसत्तेच्या बळावर भारतात बौद्धधर्माचा, धम्मविजयाचा, अहिंसेचा प्रसार केला. त्यामुळे भारताची प्रथम प्रतिकारवृत्ती, नंतर प्रतिकार शक्ती, आणि शेवटी प्रतिकार यंत्रणा ढिली झाली. वर आपण पाहिलेच की, शिकंदराला विजय मिळविताना प्रत्येक अंगुळ भूमीसाठी लढावे लागले. पण आता ! डेमिट्रियस बॅक्ट्रियातून जो निघाला तो थेट अयोध्येला भिडला. मध्ये वाटेत त्याला कोणी आडवे गेलेच नाही. शिकंदराला व्यास नदीवरून निराशेने परतावे लागले, आणि डेमिट्रियस थेट अयोध्येपर्यंत यात्रेला यावा तसा आला याचा अर्थ काय ? याचा एकच अर्थ की शस्त्रबळाची निंदा, अहिंसेचे प्रेम, ऐहिक ऐश्वर्याचा तिटकारा हे त्रिविध रोग त्या वेळी मगधसाम्राज्याला जडले होते. सुदैव एवढेच की आजच्याप्रमाणे अखिल भारत त्या वेळी या रोगांनी पीडित झाला नव्हता. कलिंगाचा महाप्रतापी राजा खारवेल याने डेमिट्रियसशी मुकाबला करून त्याला सीमापार केले. त्यानंतर चार वर्षांनी मिनँडर हा ग्रीक पुन्हा स्वारी करून आला होता. या वेळी मगधसम्राट बृहद्रथ याच्या नाकर्तेपणाची सर्वांनाच चीड आली होती. त्याच्या प्रतिकारशून्य शांततेमुळे लोक संतप्त झाले होते. ही संधी साधून त्याचा सेनानी पुष्यमित्र याने त्याचा शिरच्छेद केला आणि स्वतः सम्राटपदावर येऊन त्याने मिनँडरवर चालून जाऊन त्याच्या सेनेचा निःपात केला व भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखले. या दोन्ही आक्रमणांच्या वेळी भारताच्या सीमा हिंदुकुशपर्यंत आहेत याची खारवेल, पुष्यमित्र या दोघांनाही जाणीव होती. शत्रूचा तेथपर्यंत पाठलाग करून त्याला सीमेच्या बाहेर काढल्यानंतरच ते थांबले. ही घटना इ. पू. १८४ या वर्षी घडली. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'यानंतर जवळजवळ १७०० वर्षांत भारतावर पाश्चात्त्यांचे आक्रमण झाले नाही.' (अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. २१०)

शस्त्रबळ आणि धर्मबळ :

 पुष्यमित्राच्या शुंग वंशाने सुमारे शंभर वर्षे राज्य केले. आणि त्यानंतर पुढील चारशे वर्षात उत्तरभारतात दुर्दैवाने पराक्रमी असा सम्राट झाला नाही. आणि याच काळात ग्रीकांच्यापेक्षा शतपटीने भीषण अशी शककुशाणांची महाभयंकर आक्रमणे भारतावर कोसळत होती. हे शककुशाण म्हणजे केवळ हिंस्त्र श्वापदांच्या टोळ्या होत्या. कत्तल, आग, लूट, विध्वंस हाच त्यांचा आनंद होता. त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर कास्पियन समुद्रापासून चीनपर्यंत सर्व देशांना त्राही भगवान करून सोडले होते. फरक एवढाच की भारताने शस्त्रबळाने व धर्मबळाने त्यांना आपल्या अंतरात विलीन करून या रानटांचे नावही भारतात उरू दिले नाही.
 उत्तरेस मोठा पराक्रमी सम्राट झाला नाही हे खरे, पण त्या वेळी दक्षिणेने ही जबाबदारी शिरावर घेतली. पैठणच्या सातवाहनांवर शकांची धाड कोसळली होती. पन्नास एक वर्षे त्यांची नाशिक, जुन्नरपर्यंत सत्ताही प्रस्थापित झाली होती. पण या वेळी सातवाहन कुलातील गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व त्याने शकांशी तुंबळ संग्राम करून त्यांचा राजा नहपान यास ठार मारले व शकांना नर्मदापार केले. याच वेळी उत्तरेत यौधेय व मालव या गणराज्यांनी शकांना असाच प्रखर प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या आक्रमणाचा कणाच मोडला. पण याच वेळी शकांपेक्षाही भयंकर अशा कुशाणांचे आक्रमण भारतावर आले. त्यांचा मोठा राजा कनिष्क याने तर उत्तरपश्चिम भारतावर साम्राज्यच प्रस्थापित केले. या वेळी मात्र कुशाणांना तीव्र प्रतिकार झाला नाही. अखिल भारताचे सामर्थ्य संघटित करील असा महापुरुष या वेळी कोणीच जन्माला आला नाही. त्यामुळे कुशाणसत्तेचे निर्मूलन लगोलग झाले नाही. आणि त्यांच्या आश्रयाने शकही उत्तरेत दीर्घकाळपर्यंत टिकून राहिले.
 पण शककुशाणांचे शस्त्रबळाने राजकीयदृष्ट्या निर्मूलन झाले नाही तरी त्यांच्या शककुशाणत्वाचे निर्मूलन मात्र निश्चित झाले. कारण या दोन्ही जमातींनी संपूर्ण भारतीय धर्माचा स्वीकार केला. नहपानाचा जावई उषवदात व पुढील शकराजा रुद्रदामन यांनी संपूर्णपणे हिंदुधर्माचा स्वीकार केला. ते ब्राह्राणांना दाने देऊ लागले, लक्षभोजन घालू लागले. त्यांनी भारतीय नावे स्वीकारली आणि संस्कृत भाषेचा अभिमान धरून आपले शिलालेख संस्कृतातच कोरविले. कुशाणांचा राजा कनिष्क हा बौद्ध झाला व अशोकाप्रमाणेच त्याने बौद्धधर्माचा प्रसार भारतात व बाहेरही केला. त्याने अखिल बौद्धपरिषदही भरविली. त्या वेळीच बौद्धांच्या महायान पंथाची स्थापना झाली. कनिष्क संस्कृत भाषेचाही अभिमानी होता. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानाचे ग्रंथ संस्कृतात लिहविले. आश्चर्याची गोष्ट अशी की, कनिष्क हा बुद्धाबरोबर रुद्राचीही उपासना करीत असे ! त्याचा नातू याने तर वासुदेव हे आर्य नाव धारण करून वैदिकधर्माचाच स्वीकार केला. त्याच्या नाण्यावर शिव आणि नंदी यांच्या प्रतिमा आहेत. तेव्हा शककुशाणांची आक्रमणे परक्यांची खरी, पण कालांतराने तेच भारतीय झाले, येथला धर्म व संस्कृती त्यांनी स्वीकारली व आपले परकीयत्वच बव्हंशी नष्ट करून टाकले. तरीही त्यांच्या आणि भारतीयांच्या मनात, ते सत्ताधारी असेपर्यंत, काही अंशी ती जाणीव शिल्लक होती. पुढे चौथ्या शतकात समुद्रगुप्ताने कुशाणांचा समूळ उच्छेद केला आणि त्याच्यामागून त्याचा पुत्र चंद्रगुप्त (२ रा) विक्रमादित्य याने शकांचे निर्मूलन केले. त्यानंतर ती जाणीव समूळ नष्ट होऊन शककुशाण भारतीय संस्कृतीत पूर्ण विलीन झाले. या वेळी भारतीय लोक संघटित सामर्थ्य निर्माण करू शकतात हे पुन्हा एकदा गुप्तवंशाने सिद्ध केले. पण येवढ्यावर हे भागले नाही. त्यांच्या कारकीर्दीतच शककुशाणांच्या इतकेच हिंस्र असे जे हूण त्यांच्या आक्रमणाचे प्रलयंकर धक्के भारताला बसू लागले. आणि भारताच्या संघटनसामर्थ्याची, त्याच्या संघटनतत्त्वाची व भारतीयांच्या राष्ट्रनिष्ठेची पुन्हा एकदा रणकुंडात परीक्षा होण्याची वेळ आली.

भारत व इतर जग :

 हूणांच्या स्वाऱ्या म्हणजे जगावरचेच संकट होते. मध्य आशियातून निघून या टोळधाडी प्रथम चीनवर तुटून पडल्या. जाळपोळ, लूट, कत्तली करून त्यांनी चीनचा मुलूख वैराण करून टाकला, शस्त्रबळाने त्यांचा प्रतिकार करणे चीनला अशक्य झाले; म्हणून आपल्या सीमेवरती त्याने ती प्रसिद्ध चिनी भिंत बांधली. यानंतर हूणांची एक काळलाट युरोपवर पसरली. या हिंस्र रानटांनी रशिया पायदळी तुडवून डॅन्यूबपर्यंत मजल मारली व शेकडो मैलांचे प्रदेश बेचिराख करून टाकले. अटिल्ला हा त्यांचा पुढारी म्हणजे संहारासुरच होता. रोमन साम्राज्यही त्याने हादरून कोसळून टाकले. मुंडक्यांच्या राशी करून त्यावर बसण्यात त्याला आनंद वाटत असे. इ. स. ४५३ मध्ये याचा मृत्यू झाल्यावर हूणांचे हे तुफान भारताकडे वळले. पण चीन, रशिया व मध्य युरोप यांच्यापेक्षा भारतात त्याला निराळा अनुभव आला. गुप्तवंशातील कुमारगुप्ताचा मुलगा स्कंदगुप्त नुकताच गादीवर आला होता. त्याने या क्रूर हिंस्र काळलाटेचे आव्हान स्वीकारले व पाटलीपुत्राहून निघून तो वायव्य सरहद्दीवर जाऊन हिमालयीन पहाडासारखाच तेथे उभा राहिला. अनेक वेळा हूणांच्या तुफानी काळलाटा त्याच्यावर आदळल्या पण दरवेळी त्या फुटून गेल्या व सम्राट स्कंदगुप्त अभंग राहिला. दरवेळी धडक देताच आपलाच कपाळमोक्ष होतो हे कालांतराने हूणांच्या जड डोक्यात शिरले. मध्य आशिया, चीन, रशिया, मध्य युरोप या प्रदेशांत मुसंडी मारून वराहवेगाने सहज प्रवेश करणाऱ्या या श्वापदांच्या टोळ्यांना भारताच्या भूमीवर आपले खूरही या वेळी ठेवता आले नाहीत. पुढे स्कंदगुप्ताच्या वृद्धापकाळात भारतावर पुन्हा ही टोळधाड आली. या वेळीही स्कंदगुप्त पुन्हा त्यांच्यावर चालून गेला. पण त्याला शिबिरातच मृत्यू आला. त्यामुळे हूणांना रान मोकळे मिळाले. आणि मग जवळ जवळ पन्नास- साठ वर्षे पश्चिमोत्तर भारतात मृत्यूचे तांडवनृत्यच चालू होते. तोरमाण व मिहिरगुल या हूणांच्या नायकांनी पुराणकाळच्या दैत्यदानवांनाही फिके ठरविले. पृथ्वीचा अंत जवळ आला असेच त्या प्रदेशात भासू लागले. मगधाचे राजे अत्यंत कर्तृत्वहीन होते. त्यामुळे सर्वत्र घोर निराशा पसरली होती. पण अजूनही भारतात राष्ट्रनिष्ठा जागृत होती. तिच्या बळावरच माळव्याचा राजा यशोधर्मा याने अनेक हिंदुराजांची संघटना उभारली आणि मिहिरगुलाला रणांगणात गाठून त्याचा संपूर्ण पराभव करून भारताला प्राणांतिक संकटातून सोडविले.

संभूय समुत्थान :

 यशोधर्म्याच्या या विजयाला अनेक दृष्टींनी महत्त्व आहे. तो काही सम्राट नव्हता. तरी अनेक राजसत्तांची तो संघटना करू शकला. समानसंकट दिसताच आपसातील क्षुद्र भेदभाव, मत्सर, अहंकार यांना विवेकाने जिंकण्याचे सामर्थ्य लोकांत असणे हे त्यांच्या जिवंतपणाचे, स्वत्वाचे, स्वाभिमानाचे, जागृत निष्ठेचे लक्षणच होय. त्याची प्रतीती या वेळी आली. यशोवर्म्याच्या ध्वजाखाली मगधाचा वलादित्यही आला होता. तो नामधारी का होईना पण सम्राट होता. तरी तो या राजसंघटनेत सामील झाला हा त्याच्या विवेकाचा प्रभाव होय. संघटनविद्या म्हणजेच जगण्याची विद्या अजून भारत विसरला नव्हता असे यावरून निश्रयाने म्हणता येते.
 दुसरी एक महत्त्वाची गोष्ट. तोरमाण, सिहिरगुल हे शिवोपासक होते. म्हणजे भारतीय वैदिक धर्मानुयायी राजांना ते स्वधर्मीय होते, पण यशोधर्मा व त्याचे सहकारी राजे यांनी हा विचार राष्ट्ररक्षणाच्या आड येऊ दिला नाही. त्याला त्यांनी शत्रूच लेखिले. उलट बौद्धांची वृत्ती पहा. पुष्यमित्र शुंग याच्या वेळी आक्रमण करून आलेला मिनँडर हा ग्रीकराजा बौद्ध झाला होता. वास्तविक तरीही भारताचा तो शत्रूच होता. पण बौद्धांनी हे ओळखले नाही. व त्यांनी त्याचा पक्ष घेतला. पुष्यमित्राने त्यांच्यावर शस्त्र धरले ते याच कारणाने. [प्रो. जगन्नाथ- काँप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया; खंड दुसरा. पृ. ९९. डॉ. जयस्वाल यांचाही आधार या विधानासाठी प्रो. जगन्नाथ यांनी दिला आहे.] एरवी पुष्यमित्र हा हिंदु वैदिक परंपरेप्रमाणे धर्मसहिष्णूच होता. पण राष्ट्रद्रोही अन्यपंथीयांनाच नव्हे तर अन्यधर्मीयांनाही राष्ट्रनिष्ठ स्वकीयांपेक्षा जास्त सहिष्णुतेने व प्रेमाने वागविण्याची सध्याची परंपरा त्याकाळी भारतात नसल्यामुळे त्याने बौद्धांना कठोर दंड केला. वैदिक धर्मीयांनी वेदकाळापासून राष्ट्रनिष्ठा हे संघटनातत्त्व स्वीकारले होते. गुप्तकाळातही त्यांची ती निष्ठा जिवंत होती हे मिहिरगुलाचा त्यांनी जो निःपात केला त्यावरून स्पष्ट दिसून येते.

सुवर्णयुग :

 या निष्ठेमुळेच इ. स. पू. ३२७ पासून इ. स. ५२८ या आठशे-नऊशे वर्षांच्या काळात ग्रीकांची आक्रमणे, शककुशाणांची आक्रमणे आणि हूणांच्या टोळधाडी यांना तोंड देऊन त्यांचे भारताला निर्दाळण करता आले आणि आपला धर्म, संस्कृती व स्वत्व यांचे रक्षण करण्यात तो यशस्वी झाला. इ. स. ५२८ नंतर म्हणजे मिहिरगुलाचा पराभव झाल्यानंतर ५०० वर्षे भारताला शांततेची लाभली. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे या दीर्घकाळात भारत परकीयांच्या आक्रमणापासून अगदी मुक्त होता. मध्यंतरी महंमद कासीम याने सिंधवर स्वारी केली होती, पण ते आक्रमण, त्याच्या मते, अगदी एका प्रांतापुरते परिच्छिन्न असून त्याचा भारतावर तसा काहीच परिणाम झाला नाही. इ. स. ६०० ते १००० हा काळ भारताच्या इतिहासात मोठ्या उत्कर्षाचा झाला असे इतिहासवेत्त्यांचे मत आहे. कुलगुरु चिं. वि. वैद्य या काळाला विशेषतः ८०० ते १००० या काळाला भारताचे सुवर्णयुग मानतात. दीर्घकाल एका तत्त्वावर दृढ निष्ठा ठेवून भारतीयांनी जे संघटनसामर्थ्य जोपासले त्याचेच हे अमृतमधुर फळ त्यांना मिळाले, हे उघड आहे.
 त्या प्राचीन काळात हिंदूंनी संघटित सामर्थ्याची अशी जोपासना केली ही जगाच्या इतिहासातली असामान्य गोष्ट आहे. या काळात युरोपवर शककुशाण- हूण, गॉथ या रानटांच्या अशाच टोळधाडी कोसळल्या होत्या. पण त्यांपासून युरोपियांना, ग्रीकरोमनांनाही स्वतःचे, स्वतःच्या संस्कृतीचे रक्षण करता आले नाही. या रानटांनी त्यांची राज्ये, साम्राज्ये धुळीस मिळविली. कारण कोठल्याच संघटनतत्त्वाचा त्यांनी त्या काळात अवलंब केला नव्हता. आर्यांनी ऐश्वर्याची ही राजविद्या चांगली अभ्यासली होती. आणि हजारो वर्षे तिची दृढ उपासना चालू ठेविली होती. व्हिन्सेंट स्मिथने, या आक्रमकांशी भारताने जो मुकाबला केला त्याचा इतिहास देताना, भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारे चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, पुष्यमित्र, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त, यशोधर्मा हे राजे वैदिकधर्माचे कट्टे अभिमानी होते, असे पुन्हा पुन्हा आवर्जून सांगितले आहे. एके ठिकाणी तो म्हणतो, "शक, पल्हव, यवन या ज्या परकी जमाती पश्चिम भारतात येऊन स्थिरावल्या होत्या त्यांना वैदिक धर्मीय राजा विलिवयांकुर [गौतमीपुत्र सातकर्णी] याने कायमचे शत्रुस्थानी लेखले होते. नहपानाच्या सत्तेचा समूळ निःपात करून त्याने त्या शत्रूंनी जिंकलेले प्रदेश परत घेतले. अखिल हिंदूंना आणि विशेषतः सनातन ब्राह्मणीधर्माच्या हिंदूंना भारतबाह्य परकीयांचा जो द्वेष वाटत असे त्यातूनच विलिवयांकुर राजाला शक-यवनांच्या पारिपत्यांची प्रेरणा मिळाली होती." हा उतारा देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात :
 क्वचित, भारतावरील या इतिहासकार स्मिथच्या इंग्लिश साम्राज्याचेही कट्टर शत्रू हिंदू हेच होते या त्याच्या स्वानुभवाचे शल्यही त्याच्या वरील वाक्यात व्यक्तविले गेले असावे.

[समग्र सावरकरवाङ्मय. खंड ४ था. पृ. ६७७]

 प्राचीन काळी, भारतात द्रविड, असुर, नाग, राक्षस, निषाद, यवन, किरात, कैवर्त, कांबोज, दरद, खस, शक, कुशान, पणी, आंध्र, पुलिंद, मूतिब, पुंड्र, भरत, यादव, भोज अशा अनेक जमाती चिरवसती करून राहिल्या होत्या. त्यांना एकरूप देण्यात, त्यांतून एक समाज निर्माण करण्यात आर्य यशस्वी झाले, एवढेच नव्हे तर त्या समाजात दार्ढ्य निर्माण करून, त्याला संघटित करून त्याच्या ठायी बल, सामर्थ्य व दुर्जय अशी प्राणशक्ती निर्माण करण्यातही त्यांना अपूर्व यश आले, याविषयी वरील इतिहासदर्शनानंतर कोणाला शंका राहील असे वाटत नाही. ग्रीक, शक, कुशाण, हूण यांनी पुनः पुन्हा केलेल्या आक्रमणांचा निःपात करून भारताचे स्वत्त्व नष्ट करू पहाणाऱ्या त्या जमातींना आपल्या अभ्यंतरात पूर्णपणे विलीन करून त्यांनाच भारतीय बनवून टाकण्याइतके शस्त्रबळ व धर्मबळ त्यांच्या ठायी होते. त्याचप्रमाणे धर्म, तत्त्वज्ञान, विद्या, कला यांची जोपासना करण्यासाठी आणि गोधन, कृषिधन, सुवर्णधन यांनी ही भूमी संपन्न करण्यासाठी मोठमोठी साम्राज्ये स्थापन करण्यास अवश्य ते बुद्धिबल व अवश्य ते संघटनकौशल्यही त्यांनी परिणत केले होते. मौर्यांचे साम्राज्य, सातवाहनांचे साम्राज्य, गुप्तसाम्राज्य, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट यांची साम्राज्ये, श्रीहर्षाचे साम्राज्य, ही साम्राज्ये त्यांच्या या गुणसंपदेची साक्ष देतील.
 हिंदुसमाज संघटनक्षम आहे काय, संघटित सामर्थ्य त्याने पूर्वी कधी निर्माण केले होते काय, असा आपला प्रश्न होता. पाश्चात्य- पौर्वात्य पंडितांच्या आधारे व इ. स. १००० पर्यंतच्या भारताच्या इतिहासाच्या साक्षीने, त्या प्रश्नाला आपल्याला आता निःशंकपणे उत्तर देता येईल की, होय. समाज संघटनेचे शास्त्र, चिरंजीव होण्याची ही राजविद्या हिंदुसमाजाने, जगातल्या इतर कोणत्याही समाजापेक्षा, त्या काळात जास्त अभ्यासिली होती, जास्त आत्मसात केली होती.

§