Jump to content

हिंदुसमाज संघटना आणि विघटना

विकिस्रोत कडून






हिंदुसमाज :
संघटना आणि विघटना


लेखक
डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे


कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे २












सर्व हक्क सुरक्षित
किंमत : सहा रुपये
पहिली आवृत्ती : १९६७
प्रकाशक : अ. अं. कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, टिळक रोड, पुणे २
मुद्रक : चिं. स. लाटकर, कल्पना मुद्रणालय, ४६११४ सदाशिव, पुणे २




घरप्रपंचाप्रमाणेच
माझ्या लेखनप्रपंचातील
यशाचे श्रेय
सौ. द्वारकाबाईस—











प्रस्तावना

 भारताचा अर्वाचीन इतिहास, म्हणजे इ. स. १००० पासूनचा इतिहास, हा भारतीयांना मोठा लाजिरवाणा आणि दुःखास्पद आहे. हा इतिहास म्हणजे हिंदूंच्या पराभवाचा व पारतंत्र्याचा इतिहास आहे. विजयनगर, मराठे, असे काही अपवाद त्यात आहेत; पण ते अपवाद म्हणावे लागतात यावरूनच त्यांचे मूळ स्वरूप सष्ट होते. आणि हे अपवादही राजकीय क्षेत्रातले आहेत. इतर क्षेत्रांतला पराभव फारच लज्जास्पद आहे. साधारण तेराव्या शतकापासून एकुणिसाव्या शतकापर्यंत पाचसहाशे वर्षांच्या काळात या भूमीच्या कुशीत या अन्य क्षेत्रांत कोणी व्यास, वाल्मीकी, यास्क, पाणिनी, वराहमिहिर, आर्यभट्ट, कालिदास, शूद्रक, बुद्ध, महावीर, शंकराचार्य यांसारखा थोर पुरुष निपजलाच नाही; पण पुढे पाश्चात्यविद्या या भूमीत प्रसृत झाल्यानंतर मात्र राममोहन राय, रानडे, टिळक, सावरकर, जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद, रवीन्द्रनाथ, शरदबाबू, महात्माजी, पंडितजी यांच्या रूपाने ती महापुरुषपरंपरा पुन्हा येथे अवतरू लागली.
 याची कारणमीमांसा करून ती ग्रंथरूपाने मांडावी असे फार दिवस मनात् होते. 'महाराष्ट्रसंस्कृती' हा जो ग्रंथ सध्या मी लिहीत आहे त्याच्यासाठी प्राचीन इतिहासाचे वाचन चालू असताना ती कारणमीमांसा मनात तयार होत होती. त्याच वेळी विश्वहिंदुपरिषदेचे सरचिटणीस श्री. दादासाहेब आपटे यांनी परिषदेच्या उद्दिष्टांच्या अनुरोधाने मी काही लिहावे अशी सूचना केली. हा विषय मनात होताच. तेव्हा त्यावर एक लेख लिहावा असे ठरवून १९६५ च्या मे महिन्यात मी त्याचा आराखडा करू लागलो. त्याच वेळी कमीत कमी चार तरी लेख होतील असे ध्यानात आले. प्रत्यक्षात चारांचे आठ प्रदीर्घ लेख होऊन आज त्याला अडीचशे पानांच्या प्रबंधाचे रूप आले आहे. हे सर्व लेख जुलै १९६५ ते सप्टेंबर १९६६ या वर्ष सवा वर्षाच्या काळात 'वसंत' मासिकात प्रसिद्ध झालेले आहेत. तेच आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहेत.
 हिंदूंच्या दीर्घकालीन पारतंत्र्यास आणि त्यांच्या सर्वांगीण अधःपातास या अर्वाचीन काळात येथल्या शास्त्री- पंडितांनी सनातन हिंदुधर्माला जे हीन व विकृत रूप दिले होते तेच प्रामुख्याने कारणीभूत आहे, असा या प्रबंधाचा मुख्य सिद्धान्त आहे. प्राचीन काळापासून धार्मिक विचारांचे दोन प्रवाह या भूमीत चालू आहेत. त्यांतील एक प्रवाह समाजाला उपकारक, त्याच्या कर्तृत्वाला पोषक आणि सर्व प्रकारे तेज, प्रज्ञा, बुद्धी, पराक्रम यांना संवर्धक असा असून दुसरा सर्व दृष्टींनी समाजविघातक, अपकारक व अधोगामी असा आहे. बुद्धिप्रामाण्य, परिवर्तनीयता, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठ चातुर्वर्ण्य, राजधर्माचे श्रेष्ठत्व, समसंधी, समाजनिष्ठा, सहकार्य, पतितशुद्धी ही पहिल्या धर्माची तत्त्वे असून शब्दप्रामाण्य, अदृष्टप्रधानता, समन्वयपद्धती, अपरिवर्तनीयता, निवृत्ती, विषमता, जन्मनिष्ठ जातिभेद, कलियुगकल्पना, वैयक्तिकता, समाजविमुखता, रूढ़िवाद ही जे उत्तरकालीन निबंधकार शास्त्री पंडित त्यांच्या धर्माची तत्त्वे आहेत. इ. स. च्या दहाव्या शतकापर्यंत पहिल्या प्रवाहाचा, त्या विचारसरणीचा जनमनावर प्रभाव होता म्हणून त्या वेळेपर्यंतचा भारताचा इतिहास हा अत्यंत तेजस्वी व अभिमानास्पद असा झाला. दहाव्या शतकाच्या सुमारास त्या प्राचीन सनातन धर्माला अवकळा आली. त्या काळचे व नंतरचे धर्मशास्त्रकार हे अगदी मूढ़, अविवेकी व दृष्टिशून्य असे होते. त्यांनी जे धर्मशास्त्र सांगितले त्यामुळेच ही अवकळा आली आणि त्यामुळेच या भूमीलाही अवकळा आली.
 अनेक संशोधक, इतिहासवेत्ते व धर्मशास्त्रवेत्ते यांच्या आधारे हा विषय या प्रबंधाच्या पहिल्या चार प्रकरणांत मांडला आहे. पुढल्या चार प्रकरणांत आपल्या अर्वाचीन इतिहासाची मीमांसा याच दृष्टीने केली आहे. सर्व प्रकारे धर्म अधोगामी झाला असताना विजयनगरचे सम्राट व मराठे यांना हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण कसे करता आले असा प्रश्न उद्भवतो. त्यांनी काही अंशी तरी धर्मक्रान्ती केली, प्राचीन धर्मातील काही उत्कर्षकारक तत्त्वांचा अवलंब केला म्हणून त्यांना यश आले, असे त्या प्रश्नाचे उत्तर आहे. रजपूत व शीख यांच्या इतिहासाचा हाच सारार्थ आहे. या चार पराक्रमी लोकांच्या इतिहासाचा हा निष्कर्ष पाच ते सात या प्रकरणांत मांडला आहे. शेवटच्या आठव्या प्रकरणात गेल्या शंभरसवाशे वर्षांतील भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा याच दृष्टिकोणातून विचार केला आहे. या काळात या भूमीत अपूर्व अशी धर्मक्रान्ती झाली आणि बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठा, समसंधी या प्राचीन धर्मतत्त्वांचा येथल्या धुरीणांनी अवलंब केला. यामुळेच भारतीय समाजाला स्वातंत्र्यलढा जिंकण्याइतके सामर्थ्यं प्राप्त झाले, हे अनेक इतिहास पंडितांच्या आधारे या प्रकरणात सिद्ध केले आहे. हेच उन्नतिकारक तत्त्वज्ञान स्वातंत्र्योत्तरकाळात प्रभावी होऊन आपली लोकसत्ता दृढ व बलाढ्य होईल अशी साहजिकच सर्वांची अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेचा भंग झाला आणि पुन्हा आपली लोकशाही, आपले स्वातंत्र्य, आपली संस्कृती, आपली अस्मिता यांचे रक्षण करण्यास आपण अजूनही असमर्थच आहो, असे घोर दृष्य दिसू लागले. असे का झाले याची चर्चा या आठव्या प्रकरणाच्या उत्तरार्धात करून ही भयानक आपत्ती टाळण्यासाठी भारतातील तरुणांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या मार्गांनी गेले पाहिजे याचे विवेचन शेवटी केले आहे. पाश्चात्त्य मिशनऱ्यांच्या पद्धतीने भारतीय बहुजनात मिसळून राहून प्रथम शास्त्रीपंडितांच्या विकृत धर्माचे संस्कार जनतेच्या मनावरून पुसून टाकले पाहिजेत व राममोहन राय, रानडे, टिळक, आगरकर, दयानंद, विवेकानंद, सावरकर, महात्माजी यांनी प्रारंभिलेली सर्वागीण क्रान्ती पूर्ण केली पाहिजे, हा एकच उन्नतीचा उपाय आहे, हा एकच मार्ग आहे. आजचा विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीमुळे संतप्त झाला आहे आणि तो जाळपोळ, विध्वंस या मार्गाने जात आहे. त्याने हे ध्यानात ठेवावे की टिळक, आगरकर, महात्माजी असेच संतप्त झाले होते; पण त्यांनी आपला संताप लोकजागृतीच्या रूपाने व्यक्त केला आणि त्यांत ब्रिटिशांच्या साम्राज्याची आहुती दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी त्या थोर पुरुषांच्या मार्गाने जाऊन अपुरी सामाजिक, धार्मिक क्रान्ती पुरी करून पुन्हा लोकशक्ती निर्माण केली पाहिजे. येथे लोकसत्ता आली; पण तिची जबाबदारी घेण्यास समर्थ असे 'लोक'च येथे नाहीत. येथील जनता अजून सतराव्या अठराव्या शतकातच आहे. तिला जागृत, संघटित करून विसाव्या शतकात आणणे ही जबाबदारी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे यासाठी लक्ष तरुणांची एक संघटना उभारणे अवश्य आहे. आजच्या संतप्त विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठा जागृत ठेवून अशी संघटना उभारली तर भारताचे भवितव्य उजळण्याचे सामर्थ्य त्यांना सहज प्राप्त होईल.
 हा प्रबंध तयार करताना मला अनेकांचे साह्य झाले आहे. माझे मित्र श्री. गं. म. साठे व प्रा. चं. शं. बरवे यांच्याकडे प्रकरण तयार झाल्यावर ते वाचण्याचे व त्यावर चर्चा करण्याचे काम होते. प्रत्येक प्रकरण त्यांच्या दृष्टिकोणातून पाहून झाल्यानंतरच मी 'वसंत' कडे धाडीत असे. त्यांच्या या परिश्रमामुळे मला माझे लेखन दुरून पाहता आले. 'वसन्त' चे संपादक श्री. दत्तप्रसन्न काटदरे यांचा मी कायमचाच ऋणी आहे. लेखाची लांबीरुंदी, त्यातील विचारसरणी, त्याची सौम्य वा तिखट भाषा यांवर त्यांनी कधीही, कसलीही बंधने घातली नाहीत. या प्रबंधातील शेवटची दोन-तीन प्रकरणे तर नेहमीच्या लेखमर्यादेच्या दृष्टीने दुप्पट-तिप्पट लांबीची झाली आहेत; पण ती सर्व जशीच्या तशी त्यांनी छापली. त्यांचे विभाग करण्याचे त्यांनी मनातही आणले नाही. आणि हे सहकार्य आज दोन तपे ते देत आहेत. त्यांच्या ऋणाचा केवळ निर्देश करणे एवढेच मला शक्य आहे. विश्वहिंदुपरिषदेचे सरचिटणीस श्री. दादासाहेब आपटे यांचे या प्रबंधातील विचारांच्या प्रसाराला मोठेच साह्य झाले आहे. पहिल्या प्रकरणापासून त्यांनी कानडी, गुजराथी, हिंदी इ. भाषांत त्याची भाषांतरे करून ती प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली होती. बंगलोरचे 'विक्रम' साप्ताहिक व अहमदाबादचे 'साधना' साप्ताहिक यांत ही भाषांतरे येत असत. पुण्याच्या 'तरुण भारता'ने मराठीतून ही प्रकरणे सारांशरूपाने त्या त्या वेळी प्रसिद्ध केली. सध्या 'राष्ट्रधर्म' लखनौ हे मासिक व 'पांचजन्य' लखनौ हे साप्ताहिक यांत हिंदीमधून हा प्रबंध क्रमशः प्रसिद्ध होत आहे. या सर्व नियतकालिकांचे संपादक व प्रकाशक यांचा मी फार आभारी आहे.
 वेदकालापासून आजपर्यंतच्या हिंदुसमाजाच्या संघटन-विघटन तत्त्वांचा इतिहास लिहावयाचा तर त्यासाठी किती ग्रंथ लागतील याची सहज कल्पना येईल. प्रत्येक लेखकाला ग्रंथोपलब्धीची नेहमीच चिंता वाटत असते; पण मी या चिंतंतून सर्वथा मुक्त होतो. आमच्या स. प. कॉलेजच्या ग्रंथालयात मला मुक्तद्वारच आहे. तेथले ग्रंथालय प्रमुख डॉ. कावळे व ग्रंथपाल श्री. मेहेंदळे यांनी ग्रंथांची उणीव मला कधीच पडू दिली नाही. इतर ग्रंथालयांतून आणून किंवा विकत घेऊन त्यांनी सर्व प्रकारची पुस्तके मला पुरविली व अजूनही ते तशीच पुरवितात. पुणे विद्यापीठाचे ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी तर माझा विषय सतत मनात वागवून त्या दृष्टीने उपयुक्त अशा ग्रंथांचे व लेखांचे एक टाचणच करून ठेविले होते आणि हे साहित्य घरी पोचविण्याचीही व्यवस्था केली होती. माझे मित्र 'भारतीय संस्कृतिकोश' चे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी आपले ग्रंथालयही मला नित्य खुले ठेविलेले आहे. 'केसरी-मराठा' ग्रंथालयाचे श्री. शंकरराव बरवे यांनीही वेळोवेळी तेथले ग्रंथ मला उपलब्ध करून दिले आहेत. इंग्लंड, फ्रान्स येथील ग्रंथपालांच्या हकीकती मधून मधून वाचण्यात येतात. हा प्रबंध लिहिताना मला त्यांची आठवण होत असे.
 माझे सर्व लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची कायमची जबाबदारी श्री. अनंतराव कुलकर्णी यांनी घेतलेलीच आहे. त्यामुळे त्यासंबंधी विवंचना करण्यात माझी शक्ती मुळींच खर्च होत नाही. मी माझा हा भाग्ययोग समजतो. कारण माझा सर्व वेळ मला त्यामुळे लेखनाला देता येतो.
 कल्पना मुद्रणालयाचे मालक श्री. चिं. स. लाटकर यांना नुकतेच उत्कृष्ट छपाईबद्दल महाराष्ट्र राज्यसरकारचे पारितोषिक मिळाले आहे. ते कसे सार्थ आहे हे या ग्रंथाच्या छपाईवरून कळून येईलच. अशा सुंदर छपाईसाठी श्री. लाटकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

जानेवारी १९६७
पु. ग. सहस्रबुद्धे