हिंदुसमाज संघटना आणि विघटना/हिंदुसमाज समाज आहे काय ?

विकिस्रोत कडून







हिंदुसमाज समाज आहे काय ?


विश्वहिंदुपरिषद
 जानेवारी १९६६ मध्ये गंगा-यमुनांच्या संगमावर प्रयागक्षेत्री विश्वहिंदुपरिषद् भरली होती. जगातल्याच नव्हे तर भारतातल्या हिंदूंची अशी परिषद् प्राचीन अर्वाचीन काळी केव्हाही भरली नव्हती. त्या दृष्टीने पाहता हिंदूंच्या जीवनातील ही अत्यंत महत्त्वाची घटना होय असे म्हणावे लागेल. येथे हिंदू हा शब्द वैदिक, बौद्ध, जैन, शीख, लिंगायत या सर्व पंथांचा समावेश करणारा समाज या अर्थी योजिलेला आहे. बौद्धपंथीयांच्या काही परिषदा- संगीतिका- दोन-एक हजार वर्षांपूर्वी भरलेल्या आहेत. हिंदूंच्या विद्वत्परिषदाही मागे भरत व अजूनही भरतात. पण अखिल हिंदूंची अशी ही पहिलीच परिषद आहे. तेव्हा तिचे काही अनन्यसामान्य महत्त्व आहे हे कोणाच्याही ध्यानी येईल.
 या परिषदेची वार्ता कानी येताच अशी परिषद पूर्वी केव्हाच का भरली नव्हती असा प्रश्न कोणाही विचारी माणसाच्या मनात उभा राहील. माझ्याही मनात तसाच तो उभा राहिला. 'कोणाही हिंदू- नेत्याच्या मनात तशी परिषद् भरविण्याची कल्पना आली नाही म्हणून'- असे त्या प्रश्नाचे साधे उत्तर देता येईल. पण असे का झाले, अखिल हिंदूंना एकत्र आणावे, त्यांची संघटना करावी, त्यांच्यांत सामरस्य निर्माण करावे, त्यांच्या समस्या सामुदायिकरीत्या सोडवाव्या असे हजारो वर्षांच्या या दीर्घ कालावधीत केव्हाच कोणाच्या मनात कसे आले नाही, हा प्रश्न मनाला त्रस्त करून टाकतो आणि त्याचे चिंतन करताना अनेक प्रश्न, अनेक आशंका, अनेक समस्या यांचे मोहोळच्या मोहोळ घोंघावत येऊन बुद्धीला घेरून टाकते. अखिल हिंदूंना एकत्र येऊन करण्याजोगे काही कार्यच नव्हते की काय ? सर्व हिंदूंना समान असे उद्दिष्टच या दीर्घकालात नव्हते काय ? सर्वांच्या सामुदायिक शक्तीने साधावे असे ध्येय हिंदूंच्या डोळ्यांपुढे कधी कोणी उभेच केले नाही काय ? हिंदुसमाजावर व भारतावर इतिहासपूर्वकाळापासून सतत परकीयांची आक्रमणे होत आहेत. गेली हजारो वर्षे तर या आक्रमणांमुळे हिंदुत्व, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा नष्टच होते की काय अशी भीती विचारवंतांच्या चित्तात घर करून राहिली आहे. असे असताना अखिल हिंदुपरिषदेची आवश्यकता हिंदु नेत्यांच्या मनाला का जाणवली नाही किंवा जाणवली असूनही सर्व हिंदु- त्यांतील वर निर्देशिलेले पंथ व त्यांतील सर्व वर्ण, जाती, उपजाती, सवर्णसमाज, अस्पृश्यसमाज- यांना समान व्यासपीठावर येणे शक्य नाही असे वाटल्यामुळे त्यांनी ती अव्यवहार्य म्हणून सोडून दिली असेल काय ? असे अनेक प्रश्न आम्हांला जाब द्या म्हणून समोर उभे राहतात. आणखी एक प्रश्न तर मनाला दंशच करून जातो. सर्व हिंदूंना समान व्यासपीठावर आणणे शक्य नाही असे मागल्या नेत्यांना वाटले असेल की, तसे आणणे निषिद्ध होय, निंद्य होय, ते धर्मविरुद्ध होय असा सिद्धान्त मनाशी असल्यामुळे त्यांनी त्या विचाराला थाराच दिला नसेल- हा तो प्रश्न होय.
 विश्वहिंदुपरिषदेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या या नैकविध प्रश्नांचा सर्व हिंदूंनी सम्यक् विचार करणे अवश्य आहे. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली तर या परिषदेच्या भावी कार्याची दिशा आपल्याला ठरविता येईल, हिंदु समाजाला जडलेल्या व्याधींचा विचार करून काही निदान करता येईल व काही उपाययोजनेचे चिंतन करणे शक्य होईल; त्या दृष्टीने येथे काही प्रयत्न केला आहे.
 या दृष्टीने चिंतन करू लागताच मनापुढे पहिला प्रश्न येतो तो हा की- हिंदुसमाज हा समाज आहे काय ?
 आजच नव्हे तर आज शंभर-दीडशे वर्षे तरी हा प्रश्न पुनः पुन्हा हिंदु विचारवंतांच्या मनाला त्रस्त करीत आहे. कोणत्याही लोकसमूहाला समाज किंवा राष्ट्र या पदवीला जावयाचे असेल तर काही किमान अपेक्षा तरी त्याने पुऱ्या करणे अवश्य असते. अनेक सांस्कृतिक बंधनांनी, अनेक निष्ठांच्या चिवट धाग्यांनी, अनेक श्रद्धांच्या सूत्रांनी तो समूह दृढबद्ध असला पाहिजे. अनेक आचार, परंपरा, दैवते, श्रद्धास्थाने, पुण्यपुरुष, अनेक मानबिंदू, पुण्यग्रंथ ही आपणा सर्वांची एक आहेत, सर्वांना सारखीच वंद्य आहेत, ही जाणीव त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीच्या ठायी जागृत असली पाहिजे. या जाणिवेमुळेच या समूहातील सर्व घटकांची सुखदुःखे एक होतात, रागद्वेष समान होतात, सर्वांचे अभिमान सुसंवादी होतात- म्हणजेच तो समूह एकरूप होतो. सर्वांचे पूर्वपरंपरांचे अभिमान एककेन्द्र असले, वर्तमान सुखदुःखे अभिन्न असली आणि भविष्यकालच्या आकांक्षा आणि ध्येये समरूप असली म्हणजे तो लोकसमूह समाज या पदवीला पात्र होतो. समूहाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या दृष्टीने याची फार आवश्यकता असते. सर्वांचे रागद्वेष, सुखदुःखे व अभिमानस्थाने अभिन्न असली तरच समूहातील कोणाही एकावर आघात झाला तर तो स्वतःवरच झाला असे समजून सर्व समाज खवळून उठतो. आणि असा सामूहिक संताप ज्या समूहात उद्भवू शकतो तोच स्वसंरक्षण करू शकतो. अन्यथा तो दुबळा होऊन परक्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. आत्मरक्षणाला, स्वातंत्र्य संरक्षणाला जो समूह समर्थ नाही त्याला समाज किंवा राष्ट्र म्हणणे शक्य नाही.
 समआचारविचार, समप्रतिष्ठा, अभिन्न श्रद्धास्थाने, एकरूप ध्येयाकांक्षा या निकषांवर घासून पाहता हिंदुलोकसमूह हा समाज ठरेल काय ? कोठल्याही श्रद्धास्थानाचा, मानबिंदूचा अवमान झाला तर अखिल समाज संतप्त होऊन खवळून उठला पाहिजे, प्राणान्त प्रतिकाराला सज्ज झाला पाहिजे हे लक्षण हिंदुसमाजात दिसते काय ? आज दिसत नसले तर पूर्वी कधी दिसत होते काय ? आणि या लक्षणांनी संपन्न होऊन आत्मरक्षणाचे सामर्थ्य हिंदूंनी कधी प्राप्त करून घेतले होते काय ?
 वर सांगितलेच आहे की गेली शंभर-दीडशे वर्षे तरी हिंदू विचारवंतांच्या मनाला हा प्रश्न त्रस्त करीत आहे. ज्ञानकोशकारांनी १९२० साली आपली चिंता पुढीलप्रमाणे व्यक्त केली आहे : 'भारतीय संस्कृतीची अंगे चोहोकडे पसरली, तिने अनेक लोकांवर छाप टाकली, आणि बऱ्याच लोकसमुदायास स्थूल एकरूपता आणली. पण ९०० वर्षांचा इतिहास पाहता विद्येविषयी होत असलेल्या दुर्लक्षामुळे, स्पर्धा करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा नाश करू पाहणाऱ्या इतर संस्कृतींशी भारतातील विद्वानवर्ग अपरिचित असल्यामुळे, वाढत चाललेल्या ज्ञानक्षेत्राशी असंबद्ध राहिल्याने, जगाशी स्पर्धा करण्यास योग्य असे समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि इतर काही कारणांनी या संस्कृतीचा दिवसेंदिवस नाश होत आहे. एकेकाळी या संस्कृतीचा पगडा बॅक्ट्रियापासून कांबोडियापर्यंत आणि खरोष्ट्रापासून फिलिपाईनपर्यंत इतका दृढ झाला होता की, हा सर्व प्रदेश म्हणजे भारतवर्षच होऊ पहात होता...... तीच संस्कृती आज नामशेष होऊ पहात आहे. आणि आपण जागरूक झाल्यास तिचे भवितव्य काय आहे या सर्व गोष्टी आपणास विचारार्ह आहेत.' (ज्ञानकोश, प्रस्तावनाखंड, विभाग १ ला, पृ. ४४)
 डॉ. केतकरांच्याप्रमाणेच हिंदुसंस्कृतीविषयीची ही चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. आणि साधारणतः गेली ९०० वर्षे या समाजाला दौर्बल्य आले आहे, प्रतिकारक्षम असे समाजयंत्र बनविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या दीर्घ काळात या समाजाला आत्मरक्षण करण्यात, आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यात अपयश आले आहे याविषयीही बहुतेक पंडितांचे एकमत आहे.- (चिं. वि. वैद्य-मध्ययुगीन भारत, खंड ३ रा, प्रस्तावना. द. के. केळकर- संस्कृतिसंगम, पृ. ३०४)
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या १८ वर्षांचा इतिहास पाहता हिंदुसमाजाचे दौर्बल्य अगदीच उघडे होऊन वरील चिंता मनाचा जास्तच दाह करीत आहे. चीनने गिळलेला भाग आपण परत घेऊ शकलो नाही. पाकिस्तानसारखे अत्यंत क्षुद्र राष्ट्रही दिवसातून दहा वेळा आपल्या सरहद्दींचा भंग निर्भयपणे करते, आपल्या भूप्रदेशावर आक्रमण करून त्याचे लचके तोडते; आणि भारताचे नेते त्याच्या प्रतिकाराची तीव्र भाषासुद्धा बोलू धजत नाहीत. नागाप्रश्न, काश्मीरप्रश्न, आसाम, सीमाप्रश्न यांनी भारताच्या संरक्षणसामर्थ्याची सत्त्वपरीक्षाच चालविली आहे. आसामात आठ लक्ष पाकिस्तानी घुसले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचेही सामर्थ्य भारताजवळ नाही. डॉ. केतकरांनी म्हटल्याप्रमाणे एकेकाळी बॅक्ट्रिया ते कांबोडिया व खरोष्ट्र ते फिलिपाइन इतका भूखंड भारतवर्ष होऊ पाहात होता. उलट आता, गेली कित्येक शतके जो भूखंड भारतवर्षं म्हणून मान्य होता, त्यांतील भूप्रदेशही तोडले जात आहेत. सिंध गेला, बलुचिस्तान गेला, वायव्य प्रांत गेला, पंजाब निम्मा गेला, पूर्व बंगाल गेला, लडाख चीनने घेतला. काश्मीर, आसाम त्याच मार्गावर आहेत आणि आता कच्छला सुरुंग लागले आहेत. आणि या सर्व बाबतीत आपण वाटाघाटीचे दरवाजे कायम मोकळे ठेवलेले आहेत ! लवकरच हे प्रदेश वादग्रस्त ठरतील. म्हणजे आपणच तसे जाहीरपणे घोषित करू, म्हणजे ते गेले तर फारसे दुःख होणार नाही !
 जे प्रांत अजून भारताच्या सत्तेखाली आहेत त्यांतही हिंदूंच्या देवतांचा, स्त्रियांचा व शिवछत्रपतींसारख्या पुण्यपुरुषांचा कोणीही केव्हाही अपमान करू शकतो. आणि अशा वेळी शांततेचा भंग होऊ नये म्हणून हिंदूंनाच अटक करण्यात येते. हे सर्व पाहून मनात प्रश्न येतो की, हिंदुसमाज हा समाज आहे काय ? या लोकसमुदायाला समाज म्हणून घेण्याचा काही हक्क आहे काय ?
 प्रारंभकालापासून हिंदूंच्या इतिहासाचे विहंगमावलोकन करून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा या प्रकरणात प्रयत्न करावयाचा आहे. हिंदुसमाज हा समाज आहे काय, आज नसल्यास पूर्वी होता काय, असल्यास कधी होता, तो कोणाच्या प्रयत्नाने झाला होता, त्याच्यात दृढता, दुर्भेद्यता किती होती, ती पुढे केव्हा व कशामुळे नष्ट झाली, आज ही संस्कृती नामशेष होऊ पहात आहे असे विचारवंतांना वाटते त्याची कारणे काय, आणि हिंदूंचे व त्यांच्या संस्कृतीचे भवितव्य काय आहे इत्यादी समस्या आपल्यापुढे आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासाच्या प्रकाशात त्यांची चिकित्सा आपल्याला करावयाची आहे.

आर्य कोण ?
 आर्य लोक हिंदुस्थानात बाहेरून आले की ते मूळचे येथलेच होते हा प्रश्न वादग्रस्त आहे. पण त्यात आपल्याला शिरण्याचे कारण नाही. ते येथले असोत वा बाहेरून आलेले असोत, आपल्याला त्यांच्या संस्कृतीच्या उदयकाळाची स्थिती पहावयाची आहे. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी एक पराक्रमी, प्रज्ञासंपन्न, विजिगीषु व सुसंस्कृत समाज म्हणून जेव्हा आर्य लोक भारतात उदयास येऊ लागले त्या वेळी भारतात शेकडो जमाती लहान लहान पुंज करून राहिलेल्या होत्या. द्रविड, असुर, राक्षस, वानर, दैत्य, दानव, नाग, निषाद, किरात, कैवर्त, दास, दस्यू, पुलिंद, शक, आंध्र, यवन, पणी, कांबोज, पारद, पल्हव, खस इ. अनेक नावे आपल्याला प्राचीन संस्कृत वाङ्मयात सापडतात. येथे एका गोष्टीचा खुलासा करणे अवश्य वाटते. आतापर्यंत पंडितांनी, विशेषतः पाश्चात्त्य पंडितांनी, भारतातील प्राचीन जमातींविषयी जे संशोधन केले त्याअन्वये आर्य हा शब्द वंशवाचक समजला जात असे. त्याचप्रमाणे येथल्या मूळच्या सर्व जनाती अनार्य, दास, दस्यू, अशा मानल्या जात असत. गोरे आर्य यांनी या काळ्या अनार्यांना जिंकले व मग त्यांच्या संकरातून चारवर्णी लोक निर्माण झाले असा रूढ समज आहे. पण ही सर्व मते आता अगदी निराधार ठरली आहेत. आर्य शब्द वंश, वर्ण या अर्थी वेदांत एकदाही येत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यांना जिंकले ते सर्व काळे, कुरूप, रानटी होते असेही नाही. नवे मत असे आहे की आर्य हा शब्द श्रेष्ठत्व, प्रभुत्व, सुसंस्कृतत्व याचा वाचक आहे. (ज्ञानकोश- प्रस्तावना खंड, विभाग ३ रा, प्रकरण तिसरे) या मताच्या आधाराने त्या वेळच्या समाजघडणीचे पुढीलप्रमाणे वर्णन करता येईल.
 त्या प्राचीनकाळी यज्ञरूपाने अग्नीची पूजा करणारा एक थोर पराक्रमी प्रज्ञावंत व बुद्धिमान असा वर्ग येथल्याच जमातीतून उदयास आला किंवा बाहेरून येथे आला. पण यजनशीलता व तत्संबद्ध अशी वैदिक संस्कृती हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण होते. भिन्न वंश किंवा शुभ्रवर्ण हे नव्हते. आणि यज्ञसंस्था व वेदविद्या यामुळे हा वर्ग आपल्याला श्रेष्ठ व आर्य म्हणवू लागला. या वर्गात सुर होते तसेच असुरही होते. (असुर शब्दाचा एक अर्थ श्रेष्ठ देव, प्रभु असाही होता. पुढे याचे स्पष्टीकरण केले आहे.) आणि द्रविड, दैत्य, नाग या ज्या जमाती त्यांतलेही लोक लवकरच या संस्कृतीत समाविष्ट झाले. आर्यांनी याला विरोध केला नाही, एवढेच नव्हे तर तसा समावेश करून घेऊन सर्व विश्व आर्य करावयाचे- कृण्वंतो विश्वमार्यम्- ही त्यांची प्रतिज्ञाच होती. ही नुसती प्रतिज्ञाच पाहिली तरी आर्य शब्द वंशवाचक किंवा वर्णवाचक नव्हता हे ध्यानात येईल. कारण वंश किंवा वर्ण हा बदलणे शक्य नसते. सर्वांना वेदनिष्ठ यज्ञप्रधान संस्कृतीत समाविष्ट करावयाचे हाच त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे. जाती, वंश, वर्ण, जितजेतेभाव हा त्या प्रतिज्ञा करणाऱ्यांच्या स्वप्नातही नव्हता हे अगदी स्पष्ट आहे. अशा या आर्य लोकांचे व भारतातल्या इतर जमातींचे प्रारंभी घनघोर संग्राम झाले हे खरे आहे. पण आर्याआर्यातही त्यांच्या भरत, तुर्वसु, तृत्सु, द्रुह्यू या जमातींतही संग्राम झालेले आहेत. तेवढ्यावरुन काहीच ठरत नाही. आर्य हा स्वतंत्र वंश होता हे तर मुळीच सिद्ध होत नाही.
 प्राचीन काळच्या आर्य शब्दाच्या व्याख्या पहा.

कर्तव्यमाचरन् कार्यमकर्तव्यमनाचरन् ।
तिष्ठति प्रकृताचारे स वा आर्य इति स्मृतः ॥

विहित कर्तव्य जो आचरतो, निषिद्ध, निंच आचरण करीत नाही व रूढ शिष्टाचार जो पाळतो त्याला आर्य म्हणावे. ' असा या वचनाचा भावार्थ आहे. ' आर्यत्व हे चारित्र्यावर अवलंबून आहे, धन किंवा विद्या यांवर नाही, असा महाभारतात स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे.
 वृत्तेन हि भव्यत्यार्यो न धनेन न विद्यया । उद्योग - ९०, ५३. तेव्हा आर्य शब्द संस्कृतिवाचक, गुणवाचक आहे, तो वंशवाचक वा वर्णवाचक नाही यात संदेह नाही.
 असे हे आर्य, ज्यांच्यात द्रविड, असुर, नाग, यांचाही निश्चयाने समावेश होतो, त्यांनी आपले वर्चस्व भारतात प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला तेव्हा अर्थातच अनार्य- (यज्ञवेदविरोधी) अशा ज्या जमाती त्यांच्याशी त्यांचा दीर्घकाळपर्यंत संघर्ष झाला. पण अखेरीस या आर्यांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन सप्तसिंधु, पंजाब या प्रांतातून ते हळूहळू चहू दिशांना पसरू लागले व आपली यज्ञसंस्था प्रस्थापून वसाहती करू लागले. आणि कालांतराने आपले सामर्थ्य दुर्जय आहे असा आत्मप्रत्यय येताच त्यांच्यापुढे पहिली समस्या उभी राहिली ती म्हणजे या अखिल भारतीय लोकसमुदायाला एकरूपता कशी आणावी ही. ही सोडविण्यासाठी त्यांनी अनेकविध उपायांची योजना केली आणि वेद, ब्राहाणे, आरण्यके, पुराणे, रामायण, महाभारत हे प्राचीन वाङ्मय पाहता असे दिसते की या कामात त्यांना कल्पनातीत यश आले आहे.

एकवंशीयत्व :
 वर निर्देशिलेल्या प्राचीन वाङ्मयातील वंशोत्पत्तीच्या व इतर वंशविषयक कथा पाहिल्या तर आर्याच्या आर्यीकरणाच्या इतिहासाचा बराच उलगडा होईल. कश्यप हा अत्यंत थोर ब्राह्मण होता. तो मरीचीचा पुत्र व ब्रह्म्याचा पौत्र होय. दिती व अदिती या त्याच्या दोन स्त्रिया. एकीची प्रजा ही दैत्य व दुसरीची ती आदित्य! या कश्यपाने प्रजापतीच्या बारा कन्यांशी विवाह केला होता आणि त्यांपासून त्याला प्रजा झाली ती कोणती ? नाग, सर्प, गरुड, राक्षस, अप्सरा! या कथेचा स्पष्ट अर्थ असा की या नावाच्या सर्व जमाती एक तर मुळातच एक रक्ताच्या होत्या किंवा आर्यांनी या कथा निर्माण करून आपण सर्व एकवंशीय आहो अशी भावना सर्वांच्या ठायी बुद्धिपुरस्सर निर्माण केली होती. सुर आणि असुर यांच्यातील भेद असाच मनोरंजक आहे. आज असुर याचा अर्थ राक्षस, दैत्य, अत्यंत क्रूर, हिंस्र, रानटी लोक असा होतो. वेदांत या शब्दाचा हा अर्थ आहे. पण दुसराही याच्याबरोबर उलट, असाही अर्थ आहे. असुर म्हणजे परमात्मा, देवाधिदेव, असा अर्थ वेदांत सापडतो. इंद्र, वरुण, अग्नी यांनाही वेदांत असुर म्हटले आहे. शाल्व हे दैत्य होते असे महाभारतात वर्णन आहे. पण याच शाल्व घराण्यातला द्युमत्सेन-पुत्र सत्यवान हा सावित्रीचा पती होता. सत्यवान या दानवाचे, सूर्याप्रमाणे तेजस्वी, बृहस्पतीसारख्या बुद्धिमान इंद्रासारखा सामर्थ्यवान व पृथ्वीसारखा क्षमाशील, असे नारदांनी वर्णन केले आहे. आणि या दानवाला वरणारी शिबिकुलातली सावित्री तर भारतवर्षात आदर्श पतित्रता मानलेली आहे. तीही दैत्य कुलातली होती. (महाभारत, आदि० अ. ६७, श्लोक ८, १७- अश्वपति व द्युमत्सेन हे याच शिवी व शाल्व कुळातले होते की नाही याविषयी वाद होणे शक्य आहे. पण ही दोन कुळे मूळची दैत्य होती असे या श्लोकांत स्पष्ट म्हटले आहे.)
 आस्तीक हा जरत्कारू या तपःसामर्थ्यवान, महातेजस्वी अशा ब्राह्मणाचा नुलगा. त्याचेही वर्णन तपस्वी, वेदवेदांगामध्ये पारंगत, महात्मा, असे महाभारतात केलेले आहे. पण तो एका नागकन्येचा पुत्र होता. वासुकी या नागराजाची भगिनी जरत्कारू हिच्याशी या ब्राह्मण जरत्कारुने विवाह केला होता. तिचाच हा पुत्र होय. नागकुलोपन्न असूनही आस्तीक हा त्या काळापासून आजपर्यंत श्रेष्ठ आर्य गणला गेलेला आहे. तेव्हा सत्यवान व सावित्री यांना ते दैत्य असूनही आर्यांनी आदर्श पतिपत्नी मानले असले तर नवल नाही. कारण आर्यत्व हे गुणांवर, चारित्र्यावर अवलंबून होते, वंशावर नव्हते. आणि तसे पाहता देव आणि दैत्य यांचा वंश एकच होता. प्रल्हाद हाही दैत्यच होता. पण 'प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम्' असे म्हणून गीतेत त्याला श्रेष्ठ पदवी, आर्यत्व दिलेच आहे. सौति हा रोमहर्षणाचा पुत्र. हा रोमहर्षण सूत जातीचा होता. उत्तरकाळाचे चातुर्वण्याचे शास्त्र असे की ब्राह्मण स्त्री व क्षत्रिय पुरुष यांची संतती ती सूत किंवा क्षत्रिय स्त्री व वैश्य पुरुष यांची ही संतती. कसेही म्हटले तरी हा प्रतिलोम विवाह होय. अर्थात त्यांची संतती शुद्र ठरते. अशा या शूद्र सौतीनेच पुराणज्ञान सांगितले आणि शौनकासारख्या तपोनिष्ठ ब्राह्मणाने ते श्रवण केले ! पुढील काळात हे पुष्कळांना रुचले नाही. व त्यांनी रोमहर्षण सूत हा निराळा होता असे सांगितले आहे. पण प्राचीनांना आर्यत्व गुणांवर अवलंबून आहे असे वाटत असल्यामुळे यात आक्षेपार्ह असे काहीच वाटले नाही.
 म्लेंच्छ व यवन या अगदी परकीय, भारतबाह्य व हीन जमाती मानल्या जातात. पण त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे ? ययातीचे यदु, तुर्वसु, द्रुह्यु, अनु व पुरु असे पाच पुत्र. यांतील तुर्वसूचे पुत्र ते यवन व अनूचे ते म्लेच्छ असे महाभारत सांगते.

यदोस्तु यादवा जाताः तुर्वसोर्यवनाः स्मृताः ।
द्रुह्योः सुताःतु वै भोजा अनोस्तु म्लेंछजातयः ॥

 याचा अर्थ असा की अत्यंत श्रेष्ठ आर्य असे जे यादव, पौरव, भोज त्यांचे म्लेंच्छ, यवन हे अगदी रक्तसंबंधाने भाईबंद होते. (आदि. ८५-३५)
 आंध्र, पुंड्र, शबर, पुलिंद व मूतिब या सर्व अनार्य जमाती. पण त्यांची उत्पत्ती कशी झाली होती ? हे सर्व विश्वामित्राचे पुत्र होते. ऐतरेय ब्राह्मण म्हणते की, 'शुनःशेपाला भाऊ मानण्याचे त्यांनी नाकारले म्हणून संतप्त होऊन विश्वामित्राने त्यांना शाप दिला व ते अनार्य झाले.' म्हणजे अत्यंत हीन गणलेली ही संतती ऋग् मंत्रांची रचना करणाऱ्या विश्वामित्राची प्रजा होती. (ऐतरेय ब्राह्मण ८-१८.)

शक-हूणांचे आर्यीकरण :

 ऐतिहासिक कालात (इसवी सनाच्या पहिल्या ३-४ शतकांत) शक, यवन (ग्रीक), कुशान, हूण, या भारतावर आक्रमण करून येणाऱ्या जमातींचे आर्यकरण कसे झाले हे पाहिले तर वेदकाळात काय व कसे घडले असेल याची चांगली कल्पना येईल, शक, कुशान, हूण, या जमाती अत्यंत हिंस्र, क्रूर व रानटी अशा होत्या. त्या सर्व मध्य आशियातून टोळधाडीसारख्या भारतात आल्या होत्या. पण एक-दोन पिढ्यांतच त्या सुसंस्कृत झाल्या आणि वैदिक, बौद्ध हे भारतातले धर्म स्वीकारून ब्राह्मणांना भूमिदान करणे, लक्षब्राह्मण- भोजन घालणे, त्यांचे विवाह करून देणे, परमभागवत म्हणवून घेणे इ. भारतीय आचार त्यांनी स्वीकारले व कालांतराने येथल्या समाजांशी ते लोक एकरूप होऊन गेले. शिलालेख, नाणी, जयस्तंभ अशा अस्सल पुराव्यांनी हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. वर निर्देशिलेल्या ज्या अनेक कथा, त्यांच्याकडे या दृष्टीने पाहिले तर वैदिक काळात आर्यांनी सर्वं भारतीय समाजाला एकरूप करण्याचे जे प्रयत्न केले त्यांचेच स्वरूप त्या कथांतून स्पष्ट होते असे ध्यानात येईल. कनिष्काचा नातू कुशाण राजा वासुदेव हा परमभागवत म्हणून प्रसिद्ध आहे. हा इतिहास आहे. त्यावरून अशाच पद्धतीने प्राचीन आर्यांनी कश्यप, विश्वामित्र, वसिष्ठ, यदु, पुरु यांच्याशी येथील जमातींचे संबंध जोडून त्यांना वैदिकांच्या यज्ञप्रधान संस्कृतीत समाविष्ट करून घेतले, असा मागला इतिहास दिसू लागतो.
 भृगु, आंगिरस, मरीची, अत्रि, वसिष्ठ, पौलस्त्य, पुलह व ऋतु ही ब्राह्मणांची आठ कुळे श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांतील पौलस्त्यापासून राक्षस, वानर, किन्नर व यक्ष या जमाती निर्माण झाल्या व पुलहापासून किंपुरुष, पिशाच्च, भूत, सिंह व वाघ अशी प्रजा निर्माण झाली. यावरून भारतातील सर्व जमाती या प्रत्यक्षात एकवंशीय असल्या पाहिजेत किंवा आर्येतर जमातींना ऐतिहासिक काळातील शककुशानांप्रमाणे आर्य संस्कृतीत समाविष्ट करताना आर्यांनी त्यांचा संबंध ब्राह्मण क्षत्रिय कुलांशी जोडून दिला असला पाहिजे, असे दिसते. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते. आणि ययाती या आर्य क्षत्रिय राजाने त्यांची कन्या देवयानी हिच्याशी विवाह केला. त्याचप्रमाणे असुरराजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशीही (मनाने) विवाह केला. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय व अमुर हे एकवंशीय तरी असले पाहिजेत किंवा वर्णसंकर करण्यात त्यांना कसलाही अधर्म वाटत नसला पाहिजे. देवयानी ही ब्राह्मणकन्या. ययाती हा क्षत्रिय. म्हणजे हा प्रतिलोम विवाह. पुढील काळातल्या धर्मशास्त्राप्रमाणे यांची प्रजा शूद्र होय. पण त्यांचा मुलगा यदु हा प्रसिद्ध यादव कुलाचा मूळपुरुष मानला जातो. श्रीकृष्ण त्यांच्याच कुळात झालेला आहे. महाभारतात सांगितले आहे की, देवयानीचा पत्नी म्हणून स्वीकार करताना हा वर्णसंकर होत आहे, हे महापातक आहे, असे ययातीला वाटले. पण शुक्राचार्यांनी त्याला सांगितले की, 'हे पातक खरे, पण मी तुला त्यापासून मुक्त करतो.' आणि त्याप्रमाणे ययाती मुक्त झालाही. पुढील काळी अत्यंत भयावह मानलेल्या वर्णसंकर या पातकाची त्या मागल्या काळी इतकीच प्रतिष्ठा होती. श्रेष्ठ ब्राह्मणांना केवळ आशीर्वाद देऊन लोकांना त्या पातकातून मुक्त करता येत असे. शर्मिष्ठा ही तर असुरकन्या. तिचा तर ययातीशी शास्त्रोक्त विवाहही झालेला नव्हता. तिने फक्त मनाने त्याला वरिले होते. अर्थातच त्यांचीही संतती शूद्र होय. पण त्यांचा पुत्र पुरु हा तर पौरवकुलाचा संस्थापक व अत्यंत श्रेष्ठ असा राजा ठरला. तेव्हा अखिल भारतीय समाजाला एकरूप देताना, आर्य करून सोडताना वैदिक मंत्रांचे संस्कार करणे, भिन्नभिन्न जमातींना थोर कुळांशी निगडित करून टाकणे व प्रत्यक्ष विवाहसंबंध घडविणे, वर्णसंकर घडवून आणणे, असे तीन मार्ग आर्यांनी अनुसरले होते असे दिसते.

आर्य मिशनरी :

 सर्व समाज वैदिक संस्कृतीच्या कक्षेत आणून या अखिल भारतीय लोकसमुदायाला राष्ट्रपदवीला नेण्यासाठी आर्यांनी अक्षरशः हाडाची काडे केली. आज ख्रिस्ती मिशनरी, दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथील जंगलांत, तेथील रानटी जमातींत आपल्या धर्माच्या प्रसारार्थ, सर्व जगाच्या ख्रिस्ती- करणार्थ घरदार सोडून देऊन, जाऊन राहतात. जीवाचा धोका पत्करतात, संसाराचा उन्हाळा करून घेतात आणि प्रसंगी जाणूनबुजून आत्मबलिदान करतात. प्राचीनकाळी भारतात आर्यानी हेच केले. अगस्य ऋषीचे उदाहरण यासाठीच प्रसिद्ध आहे. अगस्त्य हा मूळचा काशीचा. पण धर्मप्रसाराची आकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना. विंध्यपर्वताच्या दक्षिणेस अजून आर्याचा प्रवेश झाला नव्हता. तेथल्या जमाती यज्ञसंस्थेच्या कक्षेत आल्या नव्हत्या. तेव्हा 'कृण्वंतो विश्वमार्यम्' ही प्रतिज्ञा आठवून अगस्त्य विंध्य ओलांडून दक्षिणेतल्या त्या घन, निबिड, महारण्यात प्रवेश करता झाला. आणि त्याने थेट रामेश्वरापर्यंत आश्रम स्थापन करून आर्यसंस्कृतीचा ध्वज ठायी ठायी उभा केला. हे कार्य त्याने किंवा त्याच्या कुलातील पुढील पुरुषांनी केले असेल. पण श्रीरामचंद्र दक्षिणेत आले त्याच्यापूर्वी अनेक पिढ्या हे कार्य झाले होते यात शंका नाही. रामायणात त्याचे अगदी सविस्तर वर्णन आलेले आहे. श्रीरामचंद्र वनवासाला येण्यापूर्वीच दण्डकारण्यात शेकडो, हजारो, अक्षरशः हजारो ब्राह्मण येऊन आश्रम करून राहिले होते. व वेदाध्ययन करून, यज्ञकुंडे स्थापून अग्निपूजा करीत होते. तेथील राक्षसांना हे असह्य झाल्यामुळे ते आश्रमांवर नित्य धाड घालून त्या आश्रमांचा व ब्राह्मणांचा नाश करीत असत. अत्रि, शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य इ. ऋषींचे आश्रम तेथे होते. तेथे श्रीरामचंद्र गेल्यावर राक्षसांनी हजारो ब्राह्मणांना मारून टाकल्याच्या भीषण कथा ऋषींनी त्यांना सांगितल्या व आपले राक्षसांपासून रक्षण करण्याची त्यांना प्रार्थना केली. ते दक्षिणेत येऊन राहिले होते तरी रामचंद्रालाच आपला राजा मानीत होते. म्हणजे आर्यराज्याच्या विस्ताराची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती. राक्षसांनी एवढा विध्वंस केला, ब्राह्मणांचे हत्याकांड केले तरी त्यांनी आपली यज्ञ, वेद व वैदिक संस्कृती यांवरील निष्ठा लवमात्र ढळू दिली नव्हती. उलट हरप्रयत्नाने राक्षसांनाही ते वेदमंत्राची व यज्ञाची दीक्षा देत. रावण हा स्वतः यज्ञकर्ता व वेदवेत्ता होता. हनुमान लंकेत गेला त्या वेळी त्याला राक्षसांच्या घरांतून वेदमंत्रांचे घोष ऐकू आले. वालीला मारल्यानंतर सुग्रीवाला रामचंद्रांनी अभिषेक करविला तो ब्राह्मणांच्या हस्ते व वेदमंत्रांचा घोष करूनच करविला. रावणवधानंतर विभीषणाला त्यांनी अभिषेक केला तोही समंत्रकच केला. तेव्हा विश्व आर्य करून टाकणे या ध्येयासाठीच ब्राह्मणांचे व क्षत्रियांचे प्रयत्न चालले होते हे उघड आहे.

संस्कृत- अखिल भारतीय भाषा :

 पण यापेक्षा अगदी निर्णायक पुरावा म्हणजे संस्कृत भाषेचा. आर्य ऋषी व राजे जेथे जेथे गेले तेथे तेथे वेद, यज्ञसंस्था व संस्कृत भाषा ही त्रयी नेण्यास ते विसरले नाहीत. वानर, राक्षस, नाग, दैत्य या सर्वांना यज्ञदीक्षेबरोबरच ते संस्कृत भाषेचेही पाठ देत असत. रामायणात याचा एक उत्कृष्ट पुरावा आहे. श्रीरामचंद्र व लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतावर गेले तेव्हा सुग्रीवाने हनुमानाला त्यांच्याकडे पाठविले. तेव्हा हनुमान त्यांच्याशी अस्खलित व सुश्राव्य अशा संस्कृतात बोलू लागला. रामचंद्रांना ते भाषण ऐकून पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले. ते लक्ष्मणाला म्हणाले-

नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेद धारिणः ।
नासामवेदविदुषः शक्यमेवं प्रभाषितुम् ॥
नूनं व्याकरणं कृत्स्नं अनेन बहुधा श्रुतम् ।
बहु व्याहरतानेन न किंचिदपश द्वितम्

- (किष्किंधा ३, ३०)

 'ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केलेला नाही, ज्याने यजुर्वेद धारण केलेला नाही, आणि जो सामवेद जाणत नाही, त्याला असे भाषण करता येणे शक्य नाही. खरोखर याने व्याकरणाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. कारण इतके दीर्घ भाषण करूनही याने एकही शब्द अशुद्ध उच्चारला नाही.'
 यावरून श्रीरामचंद्रांच्या आधीच दक्षिणेत संस्कृत भाषेचा प्रसार झाला होता हे उघड आहे. अखिल भारताची एकभूमी, त्याचे एकराष्ट्र घडविण्यात संस्कृत भाषेचे फारच मोठे साह्य झाले असले पाहिजे यात शंका नाही. पुढे पुराणकाली आसेतुहिमाचल प्रत्येक प्रदेशात पंडितवर्गाची हीच भाषा होती याला तर ऐतिहासिक प्रमाणेच आहेत. बहुजनांच्या अनेक प्राकृत भाषा त्या काळीही असल्या पाहिजेत. महाभारतात तसे वर्णनच आहे.

नानाचर्मराभिच्छन्ना । नानाभाषाश्च भारत
कुशला देशभाषासु । जल्पन्तोऽन्योन्यमीश्वराः ॥

कौरव-पांडव युद्धकाळी भारतातील सर्व प्रदेशातून राजे व सैनिक आले होते. त्यांचे हे वर्णन आहे. ते अनेक भाषी होते, आपापल्या देशभाषांत कुशल होते आणि त्यांतूनच बोलत होते. पण असे असूनही वरिष्ठवर्गाची, आर्यांची अखिल भारतातली विचारविनिमयाची, ग्रंथरचनेची भाषा संस्कृतच होती. भारतात असा एकही प्रदेश नाही की जेथले शास्त्रीपंडित संस्कृत जाणीत नाहीत. इंग्रजी राज्यात सर्व भारतात इंग्रजी भाषा पसरली म्हणूनच दक्षिणेतले टिळक, रानडे, गोखले, सत्यमूर्ती, सुब्रह्मण्यम् यांचे उत्तरेतील लजपतराय, विपिनचंद्र, मालवीय यांशी सामरस्य होऊन अखिल भारताचे एकराष्ट्र घडविणे सुलभ झाले. हेच कार्य पूर्वी संस्कृत भाषेने केले आहे. आणि त्याचे सर्व श्रेय अखिल भारतात वेद व संस्कृत वाणी व यज्ञसंस्था यांचा प्रसार करणाऱ्या अगस्त्यप्रभृती ऋषींना व त्यांचे रक्षण करणाऱ्या श्रीराम-कृष्णांना आहे.

श्रीकृष्णांचे कार्य

 अखिल भारताचे एकराष्ट्र करण्याच्या दृष्टीने श्रीकृष्णांचे कार्य फार मोठे आहे. वेद, यज्ञसंस्था, संस्कृतवाणी व एकंदर आर्यसंस्कृती यांनी एकरूप झालेल्या समाजाला एकाच सार्वभौमसत्तेखाली आणून ती ऐक्यबंधने दृढ करून टाकण्याचे महाकार्यं त्यांनी केले. युधिष्ठिराने सार्वभौमसत्ता प्रस्थापित करावी अशी श्रीकृष्णांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठीच प्रथम त्यांनी त्याच्याकडून राजसूय यज्ञ करविला आणि भारतीय युद्धानंतर अश्वमेध करवून पांडवांची सत्ता आसेतुहिमाचल प्रस्थापित केली. युधिष्ठिर हा अत्यंत नालायक निघाल्यामुळे कृष्णाचे मनोरथ ज्या प्रमाणात सिद्धीस जावयास हवे होते त्या प्रमाणात गेले नाहीत. युधिष्ठिराच्या अंगी कणखरपणा नव्हता, दृढनिश्चय नव्हता, तडफ नव्हती. मोठमोठी धर्मतत्त्वे बोलत राहण्याची फक्त त्याला सवय होती. पण त्यांचा अहर्निश जप करूनही द्यूत खेळू नये, राज्य व बायको पणाला लावू नये, प्रजापालन हा श्रेष्ठ धर्म होय हे काही त्याला उमगले नाही. इतका त्या व्यसनाच्या तो आहारी गेला होता. त्यामुळे भारतीय युद्ध त्याने ओढवून घेतले व श्रीकृष्णांचे मनोरथ धुळीस मिळविले. तरी त्या संहारानंतरही जमेल त्या रीतीने त्यांनी सार्वभौमसत्ता पांडवांकडून प्रस्थापित केलीच. अखिल समाज एकजीव करून टाकण्यास तिचे फारच साह्य झाले.
 श्रीकृष्ण यादवकुळातले होते. आणि या कुलाने आर्यसंस्कृतिप्रसाराच्या कामी फारच मोठे कार्य केले असे इतिहासवेत्त्यांचे मत आहे. भारतीय इतिहास समितीच्या 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दी इंडियन पीपल' या ग्रंथाच्या 'दि वेदिक एज' या पहिल्या खंडात डॉ. ए. डी. पुसाळकर म्हणतात, 'भारताचा नैर्ऋत्य भाग व रजपुताना, गुजराथ, माळवा व दक्षिणापथ या प्रांतांवर आपली अधिसत्ता प्रस्थापित करून तेथे आर्यसंस्कृतीचा ध्वज उभारण्याचे जे कार्य यादवांनी केले त्याचा विशेष उल्लेख करणे अवश्य आहे. हे प्रदेश यादवांच्यामुळेच आर्यसंस्कृतीच्या कक्षेत आले. यादव हे पुरुरवा- यदु याचे वंशज म्हणवितात. पण त्यांनी अनार्यांशी विपुल प्रमाणात विवाहसंबंध केले हे विशेष आहे. यामुळे परकीयांचे आर्यीकरण फार सुलभ झाले. यादवांचा वीर श्रीकृष्ण शिरोमणी हा अतिशय उदारमतवादी होता. त्याच्या तत्त्वोपदेशामुळे तथाकथित शुद्रसमाजात आर्यांच्या संस्कृतीचा प्रसार वेगाने झाला. यादवांच्या या उदार (म्हणजेच इतरांच्या दृष्टीने ढिल्या) धोरणामुळेच त्यांच्या काही शाखांना महाभारत व पुराणे यात असुर म्हणून संबोधिले आहे.
 ते कसेही असले तरी श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण हे खरे आर्यवीर होत, 'कृण्वतो विश्वमार्यम्' या चळवळीचे ते आद्य आधारस्तंभ होत यात शंकाच नाही. त्यांची परमेश्वराच्या अवतारात गणना होते ती यासाठीच.' (दि वेदिक एज, पृ. ३१५).

यज्ञकर्ते असुर :

 श्रीकृष्णांनी स्वतः जांबुवती या आर्येतर जमातीतल्या राजाच्या कन्येशी विवाह केला होता. नरकासुराने पळवून नेलेल्या सहस्रावधी स्त्रिया मुक्त करून त्यांच्याशीही त्यांनी विवाह केला हे प्रसिद्धच आहे. त्यांचा नातू अनिरुद्ध याने बाणासुराच्या कन्येचे पाणिग्रहण केले होते. बाणासुर, जरासंध, शिशुपाल हे सर्व असुर म्हणून प्रसिद्ध आहेत. पण ते सर्व यज्ञकर्ते व ब्राह्मणी- संस्कृतीचे अभिमानी होते. श्रीकृष्ण जरासंधाच्या गिरिव्रज नामक नगरीला गेले तेव्हा प्रथम ते त्याच्या राजवाड्याच्या यज्ञशाळेतच गेले. नगरीतून जाताना त्यांना वेदमंत्रांचे घोष ऐकू येत होते. श्रीकृष्ण आले तेव्हा राजधानीत अशुभ चिन्हे होऊ लागली. ती तेथील वेदपारंगत ब्राह्मणांना प्रथम दिसून आली व त्यांनीच ती राजाच्या निदर्शनास आणिली. यावरून प्रारंभी सांगितलेल्या राक्षस, वानर, दैत्य, इ. जमातींत या काळापर्यंत वैदिक संस्कृतीचे व यज्ञसंस्थेचे मूळ चांगले खोलवर गेले होते असे दिसून येईल. आर्यसंकृतीच्या कक्षेत येऊनही काही जमातींनी रामकृष्णादी आर्यांशी वैरभाव धरला होता हे खरे पण तशी वैरे आर्याआर्यांतही होती. अखिल भारताचे आर्यीकरण करण्याच्या दृष्टीने असुरराजांची ही यज्ञभक्ती व वेदनिष्ठा लक्षणीय आहे.
 भारतवर्षामधील शेकडो जमातींना एका सूत्रात गुंफून त्यांच्यातून एकजीव समाज निर्माण करण्यासाठी वेदकालीन कर्त्या पुरुषांनी कोणते प्रयत्न केले याचा विचार येथवर केला. प्रथमतः त्यांनी हा सर्व समाज एकवंशीय आहे असा विचार मांडला. काही जमातींशी प्रत्यक्षच वैवाहिक संबंध जोडले. जेथे ते जमले नाही, तेथे अनेक ब्राह्मण व क्षत्रिय श्रेष्ठ पुरुषांच्या कुळांशी या जमातींचे सांस्कृतिक संबंध जोडून दिले. हे श्रेष्ठ पुरुष त्यांचे धर्मपिते वा गुरु वा नेत झाले. अनेक क्षत्रिय राजघराण्यांनी ज्याप्रमाणे आपले संबंध चंद्रसूयांशी जोडले त्याचप्रमाणे आर्यनेत्यांनी या जमातींचे धागे या पुरुषांशी जोडून दिले. हे करीत असतानाच त्यांनी यज्ञसंस्था व वेदग्रंथ यांच्याबद्दलच्या निष्ठा त्या जमातींत निर्माण केल्या. आणि सर्वाहून विशेष प्रभावी साधन म्हणजे संस्कृत भाषा ! आसेतुहिमाचल शास्त्रीपंडितांमध्ये या भाषेचा त्यांनी प्रसार करून सांस्कृतिक, धार्मिक व भावनात्मक ऐक्याचे अत्यंत चिवट असे बंध निर्माण केले. यामुळे अखिल भारत ही एक भूमी आहे आणि येथला सर्व लोक- समुदाय हा एक समाज आहे ही गोष्ट भारती युद्धाच्या पूर्वीच त्यांनी सिद्ध करून टाकली होती. त्यामुळे या युद्धात क्षत्रियांचा फार भयंकर संहार झाला तरी या भूमीची खंडे झाली नाहीत, फाळणी होण्याचे महादुर्दैव तिच्या कपाळी आले नाही आणि यदाकदाचित तसा संभव निर्माण झाला असलाच तर श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला अश्वमेध करण्याची प्रेरणा देऊन भारतात एक सार्वभौम सत्ता स्थापन करून मुळातच तो नष्ट करून टाकला. वेदकाळातील नेत्यांच्या प्रयत्नांचे हे स्वरूप पाहिल्यावर आता पुढल्या पुराणकाळाचा विचार करावयाचा आहे.

इतिहासपुराणे :

 

वेदकाळानंतर पुराणकाळ येतो असे वर म्हटले आहे. त्याचे थोडे स्पष्टीकरण करणे अवश्य आहे. वेदकाळ साधारणपणे इ. पू. ४००० ते इ. पू. १००० असा धरला जातो. रामायण- महाभारत यांना इतिहास म्हणतात. त्यांत वर्णिलेल्या घडामोडी वर सांगितलेल्या वेदकाळात घडल्या हे खरे. पण ते ग्रंथ अर्वाचीन आहेत. त्यांचा काळ इ. पू. ३०० ते २०० असा मानतात. त्यानंतर पुराणे रचली गेली. ही अठरा पुराणे साधारणपणे इ. स. ३०० ते ८०० या काळात रचली असे मत रूढ आहे. याविषयी फार मतभेद आहेत. पण आपल्या विवेचनाच्या दृष्टीने ते अप्रस्तुत आहेत. पुराणांचा काळ वर सांगितला तो आजच्या स्थितीत जी पुराणे दिसतात त्यांचा काळ होय. मूळ पुराणरचना वेदकाळीच झाली किंवा पुराणे वेदांपूर्वीही अस्तित्वात होती हे मत आता बहुमान्य झाले आहे. पण येथे जे विवेचन करावयाचे आहे ते सध्याच्या स्वरूपात जे इतिहास व जी पुराणे दिसतात त्यांच्या आधारे करावयाचे आहे. त्यांतील कथा अतिप्राचीन काळी, वेदसमकाळी किंवा तत्पूर्वीही, घडल्या असणे पूर्ण संभवनीय आहे. पण इतिहासपुराणांचा काळ म्हणताना इ. पू. ३०० ते इ. स. ८०० हा काळ येथे अभिप्रेत आहे. आणि पुष्कळ ठिकाणी इतिहास- पुराणे असा निर्देश न करता केवळ पुराणे असे म्हटले आहे तरी तेथे दोन्ही अभिप्रेत आहेत. अशा या इतिहासपुराणांनी वेदब्राह्मण या ग्रंथांप्रमाणेच भारतीय समाज एकरूप करण्याचा जो फार मोठा प्रयत्न केला त्याचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.
 वेदोत्तर व पुराणपूर्वकाळात भारतात फार मोठ्या घडामोडी झाल्या व समाजाचे स्वरूप अगदी पालटून गेले. उपनिषदांनी ब्रह्मविद्या निर्माण करून वैदिक यज्ञयागाचा व कर्मकांडाचा अगदी कटू असा निषेध केला. प्रत्यक्ष वेदांविषयी त्यांनी अनादर दाखविला नाही. ठायी ठायी पूज्य बुद्धीच प्रगट केली. पण वेदांवर उभारलेल्या कर्मकांडरूप धर्माचा मात्र फार अधिक्षेप केला. त्यामुळे एकंदर यज्ञधर्माची प्रतिष्ठा खूपच कमी झाली. पुन्हा वेदकर्त्या ऋषींच्या ठायी असलेली पहिली उदार दृष्टी आता राहिली नव्हती. भारतातल्या सर्व जमातींना या श्रेष्ठ धर्मात सामावून व्यावयाचे आहे, त्यांचे आर्यीकरण करावयाचे आहे हा पहिल्या ऋषींचा ध्येयवाद नव्या शास्त्रकारांच्या ठायी नव्हता. त्यामुळे बहुजनसमाज त्यांच्यापासून दूर जाऊ लागला. तुटून निघू लागला. याच वेळी आणि कदाचित याचमुळे बौद्ध व जैन धर्माचा उदय झाला. व त्यांनी आपल्या धर्नाला उदार रूप देऊन ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत सर्वाना तो सुलभ करून दिला व पाली व अर्धमागधी या बहुजनांच्या प्राकृत भाषांत त्याचे प्रतिपादन करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बहुजनांचा ओढा त्या धर्मांकडे होऊन वैदिक धर्माचा लोक त्याग करू लागले. त्यांतही बिंबिसारादि राजांचा त्या धर्माकडे कल होऊन बौद्धांना जास्तच उत्तेजन मिळाले. या सर्वामुळे वैदिक धर्मावर फार मोठी आपत्ती कोसळून भारतीय समाज विघटित होऊ लागला. समाजाची धर्मनिष्ठा विचलित होऊन त्याची ऐक्यभावना भंगण्याचा कठिण समय प्राप्त झाला. या घोर संकटातून भारतीय समाजाला वाचविण्यासाठी इतिहास- पुराणांचा अवतार झाला आहे.

नवी श्रद्धास्थाने :

 वेद, यज्ञ व इंद्रादि देवता या श्रद्धास्थानांवरून समाजाची निष्ठा ढळली आहे हे पाहताच पुराणांनी त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न न करता नवी श्रद्धास्थाने निर्माण केली. ती म्हणजे शिव, विष्णु, ब्रह्मा, राम आणि कृष्ण ही होत. इतिहासपुराणांचे प्रामुख्याने हे कार्य आहे. समाजाची श्रद्धास्थाने जेवढी एकरूप तेवढा समाज एकरूप होतो हे तत्त्व जाणूनच पुराणांनी या देवतांविषयी दीर्घकथाकाव्ये व आख्याने लिहून अखिल भारतात त्यांचा अत्यंत कसोशीने प्रसार केला. त्याला यश किती आले हे आपण पाहतोच आहो. अखिल भारतात असा एक प्रदेश नाही की जेथे शिवाची पूजा केली जात नाही. असा एक समाज नाही की जो रामकृष्णांची भक्ती करीत नाही. विष्णु या शब्दाचा मूळ अर्थ व्यापणारा असा आहे. अखिल भारताला व्यापून या देवतने तो शब्द सार्थ केला आहे. गणेश, ब्रह्मा याही देवतांची पुराणे लिहून त्यांनाही पुराणांनी भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करून दिले. अशा रीतीने अग्नि, इंद्र, मित्र, वरुण, पवमान इ. वैदिक देवतांच्या स्थानी ब्रह्माविष्णुमहेशादि देवता स्थापन करून पुराणांनी अखिल भारताला पुन्हा एका नव्या रज्जूने बद्ध केले व सुरू झालेल्या विघटनेला आळा घातला.
 पण याहीपेक्षा पुराणांनी मोठे कार्य केले ते म्हणजे या सर्व देवतांच्या ऐक्याची प्रस्थापना. एका समाजात किंवा संस्थेत दोन परस्परविरोधी, प्रतिस्पर्धी नेते निर्माण झाले की तो समाज किंवा ती संस्था भंग पावते हा आपला नित्याचा अनुभव आहे. लोकसमुदायाच्या बाबतीत हे शतपटीने खरे आहे. त्यामुळेच सर्व देवतांचे अद्वैत प्रस्थापित करण्याचा पुराणांनी अट्टाहासाने प्रयत्न केलेला दिसतो.
 एका विष्णु या देवतेचा इतिहास पहिला तरी पुराणांच्या या प्रयत्नाचे स्वरूप ध्यानी येईल. हिंदूंचे मत्स्यकूर्मवराहादि दशावतार प्रसिद्ध आहेत. ते सर्व विष्णूचेच अवतार आहेत हे हिंदुधर्मग्रंथांनी इतक्या आग्रहाने व इतक्या ठिकाणी प्रतिपादले आहे की त्याविषयी आता हिंदुमात्राच्या मनात अविचल अशी श्रद्धा दृढमूल होऊन गेलेली आहे. वास्तविक या मूळच्या भिन्न जमातींच्या भिन्न काळच्या देवता असल्या पाहिजेत. पण त्यांचे मूळ रूप पुराणांनी इतके पुसून टाकले आहे की त्यांच्या भिन्नपणाची शंकासुद्धा आता कोणाच्या मनात उरलेली नाही. या विष्णूलाच शतपथ ब्राह्मणात यज्ञ म्हटले आहे. व वेदांत सूर्य म्हटले आहे. त्याला मान्यता देऊन पुराणांनी यज्ञाचे सर्व पावित्र्य व वैभव विष्णूमध्ये समाविष्ट करून घेऊन जुन्या परंपरेचा धागा अतूट राखला आहे. नारायण, वासुदेव या मुळात स्वतंत्र देवता होत्या व त्यांचे स्वतंत्र पंथही होते. कृष्ण या नावाविषयी तर फारच वाद आहेत. पूर्व काळी या नावाचे अनेक पुरुष होऊन गेले. पण पुराणांनी नारायण, वासुदेव, कृष्ण, गोविंद यांचे व विष्णूचे रूप पूर्ण अभिन्न करून टाकले. गीताकार श्रीकृष्ण व गोकुळातला गोपालकृष्ण हे दोघे अनेकांच्या मते अगदी भिन्न होत. पण पुराणांनी ते मानले नाही. गोकुळातला कृष्ण हा आभीर जमातीचा एक वंद्य असा नायक असण्याचा पूर्ण संभव आहे. पण पुराणांनी या सर्वांना एका विष्णुरूपात विलीन करून भारतीय जनतेच्या मनात एक सर्वव्यापी अमर असे श्रद्धास्थान निर्माण करून ठेवले. लोकसंग्रहाचा हा प्रयत्न अगदी असामान्य असा आहे.
 स्वतः श्रीकृष्णांनी लोकसंग्रहाचा असाच एक फार मोठा प्रयत्न गीतेच्या दहाव्या अध्यायात केला आहे असे पंडितांचे मत आहे. 'गीतातत्त्वविमर्श' या आपल्या ग्रंथात 'मम तेजोऽशसंभवम्' या पहिल्याच प्रकरणात प्रा. माटे यांनी त्याचे फार चांगले विवेचन केले आहे. त्याचा सारार्थ पुढे देतो.

संग्राहक धोरण :

 जयिष्णु आर्य लोक या भूमीत सर्वत्र पसरू लागताच हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेल्या द्वीपाचे एकराष्ट्र करावयाचे हा त्यांचा निश्चय झाला. त्यांनी येथली सर्व भूमी आक्रमिली पण केवळ आक्रमण करून ते स्वस्थ बसले असते तर कालांतराने त्यांची शक्ती लुळी पडली असती. पण 'आपणा सर्वांना येथे रहावयाचे आहे व या सर्वांचा एक समाज बनवावयाचा आहे' या विचाराने त्यांनी आक्रमक वृत्ती सोडून देऊन देवघेवीचे धोरण आखले. आणि त्याअन्वये धर्माचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप ठरविताना त्यांनी त्याचे लक्षण व्यवच्छेदकता हे न ठरविता संग्रहक्षमता हे ठरविले. म्हणजे परमेश्वरविषयक तत्त्वज्ञानात 'माझे खरे व तुझे खोटे व ते तुझे नष्ट केले पाहिजे' ही भूमिका न पत्करता त्यांनी सर्वसंग्रहाची वृत्ती अवलंबिली. गीतेच्या दहाव्या अध्यायात 'जे जे श्रीमदूर्जित आहे त्यात माझेच तेज आहे' हा जो विचार श्रीकृष्णांनी सांगितला तो या दृष्टीनेच सांगितला आहे.
 आर्यांचे जसे इन्द्रचंद्रादि देव होते तसेच येथल्या मूळच्या अर्धसंस्कृत, असंस्कृत व रानटी लोकांचेही नाग, वाघ, सिंह, गरुड, मगर, पिंपळ इ. देव होते. ही दैवते तशीच पृथकपणे राहू दिली असती तर येथे देशभर पसरलेले सहस्रो मानवपुंज एकत्र सांधून त्यांचा एक समाज घडविण्याचे आर्यांचे भव्य स्वप्न साकार झाले नसते. या दैवतांवर प्रारंभीच आघात करणे हेही शक्य नव्हते. त्याने अकारण वैराग्नी निर्माण झाला असता. म्हणून श्रीकृष्णांनी सांगून टाकले की, 'या सर्व माझ्याच विभूती आहेत.' ते म्हणाले, 'रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्षराक्षसांमध्ये वित्तेश मी आहे, सर्पांचा वासुकी मीच, नागांचा अनंत मीच, दैत्यांचा प्रल्हाद मीच, अश्व, मकर, कामधेनू, मृगेन्द्र, वैनतेय, जाह्नवी सर्व मीच आहे.' यांमध्ये, राक्षस, यक्ष, दैत्य यांचा व मगर, गरुड, सिंह, यांची पूजा करणाऱ्या अर्धरानटी लोकांचाही श्रीकृष्णांनी समावेश करून त्यांना आर्यांच्या पदवीला नेऊन ठेविले आहे. आर्यांच्या या उदार, सहिष्णु व सर्वसंग्राहक धोरणामुळेच सर्व हिंदुसमाज एकत्र बांधला गेला.

शिव आणि रुद्र :

 शिव या दैवताची कथा अशीच आहे. रुद्र ही वेदातली देवता. आणि महादेव ही पंडिताच्या मते, अनार्यांची देवता होय. भूत, पिशाच्च हे त्याचे गण, त्याची स्मशानातली राहणी, कातड्याची वस्त्रे, चिताभस्माचे लेपन यांवरून तो विचार खरा वाटतो. पण आपल्या सर्वांना एकजीव व्हावयाचे आहे, हा आर्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता. आणि दैवते, श्रद्धास्थाने, ध्येये एकरूप झाल्यावाचून समाज एक होत नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणून महादेव व रुद्र यांना त्यांनी अभिन्न करून टाकले. गीतेतील विभूतियोगासारखाच यजुर्वेदातील रुद्राध्याय आहे. सर्व चराचरामध्ये रुद्रच भरून राहिला आहे, पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती यांचा तो पती आहे, सूर्य तोच आहे, विष्णु तोच आहे, असे त्याचे वर्णन आहे. असा हा रुद्र शिवाशी एकरूप झाल्यामुळे शिव ही देवता सर्वश्रेष्ठ व सर्ववंद्य ठरली. एकराष्ट्र करण्याचा आर्यांचा निश्चय किती दृढ होता हे यावरून ध्यानात येईल. शिव ही अनार्य देवता. पण तरीही तिचा यांनी स्वीकार केला इतकेच नव्हे तर आपल्या मूळच्या सर्व देवतांपेक्षा तिला श्रेष्ठ असे स्थान दिले. आणि याहीपुढे जाऊन आर्यांची परमपूज्य जी देवता म्हणजे विष्णु तिचे व शिवाचे अद्वैत प्रस्थापिले. 'शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः।' ही उक्ती प्रसिद्धच आहे. शिव व विष्णु यांत भेद करील तो नरकाला जाईल असे पुराणात वारंवार प्रतिपादिलेले आहे. आणि या प्रतिपादनाला पूर्ण दृढता यावी म्हणून हरिहर ही एकच मूर्तीही त्यांनी कल्पिली. ब्रह्माविष्णुमहेश यांचा समावेश केलेली दत्तात्रयमूर्ती आणि शिव, विष्णु, सूर्य, देवी व गजानन यांचे शंकराचार्यांनी केलेले पंचायतन यांच्या मागे हे एकीकरणाचे धोरण असल्याचे स्पष्ट दिसते. विष्णुसहस्रनाम व शिवसहस्रनाम यांची रचना याच हेतूने झालेली आहे, हे तर उघडच आहे. सर्व दैवते, चराचरातील सर्व तेजाचे अंश एकेका देवतेत या सहस्रनामानी समाविष्ट केलेले आहेत आणि अंती या दोन्ही देवतांचे अद्वैत साधले आहे.
 बदरीनाथ, जगन्नाथ, रामेश्वर व द्वारका या चार धामांच्या यात्रा; गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु, कावेरी या सात अखिल भारतातल्या पवित्र नद्यांची स्नाने; बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन; अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती या पुण्यनगरींच्या यात्रा यांचा पुराणांनी जो आग्रहाने उपदेश केला आहे व त्यांपासून मिळणाऱ्या थोर पुण्याचे जागोजाग जे वर्णन केले आहे ते अखिल भारतीय समाजाला एकरूप देण्याच्या हेतूनेच होय यात शंका नाही. या सर्वसंग्राहकतेमुळेच वैदिक आर्यांनी मनापुढे ठेवलेले राष्ट्र निर्मितीचे ध्येय सफल झाले असे बहुतेक सर्व पंडितांचे मत आहे.

संस्कृत आणि प्राकृत :

 शेवटी एकीकरणाच्या प्रक्रियेतील संस्कृत भाषेने केलेल्या कार्याचे महत्त्व पाहून हा विचार संपवू. वैदिककाळातच आसेतुहिमाचल संस्कृत भाषा वरिष्ठ वर्गात, शास्त्रीपंडितांत रूढ झाली होती हे वर सांगितलेच आहे. पुराणकाळातली तिची कामगिरी याहीपेक्षा महत्त्वाची आहे. नेहमी असे सांगितले जाते की बौद्ध व जैन धर्मांनी संस्कृत भाषा सोडून देऊन पाली, अर्धमागधी या प्राकृत भाषांचा आश्रय केला म्हणून बहुजन समाजाला त्यांचा धर्मोपदेश सुलभ झाला व त्या धर्मपंथांकडे तो समाज आकर्षिला गेला. पण या विधानाला कितपत अर्थ आहे ते तपासून पाहिले पाहिजे. कारण असे की जोपर्यंत बहुजनसमाज साक्षर नाही तोपर्यंत त्याला संस्कृतात लिहिले काय किंवा प्राकृतात लिहिले काय, सारखेच आहे. धर्मज्ञानाचे त्याचे मुख्य साधन म्हणजे श्रवण आणि धर्मगुरु त्याच्या भाषेत जर धर्मप्रवचन करीत असतील तर मूळ ग्रंथ कोणत्या भाषेत आहे याची चिंता करण्याचे त्याला कारण नाही. पुराणांनी नेमके हेच केले. व्यासांनी, किंवा सौताने पुराणे लिहिली ती संस्कृतात, पण पुराण सांगणारी एक स्वतंत्र संस्था निर्माण करून हे संस्कृतातले धर्मज्ञान सर्व समाजात प्रस्त करण्याची त्यांनी व्यवस्था करून टाकली. यामुळे दुहेरी कार्य साधले. पुराणे हे धर्मग्रंथ संस्कृतात रचल्यामुळे त्यांना अखिल भारतीय मान्यता मिळाली. अन्यथा प्रत्येक प्रांताची पुराणे निराळी होऊन भारतवर्षाच्या एकतेचा भंग झाला असता. शिव-विष्णु, राम कृष्ण, गंगा-यमुना, काशीरामेश्वर, एकादशी-शिवरात्र यांचे जे महत्त्व आज पंजाबमध्ये आहे तेच बंगालमध्ये आहे, तेच गुजराथेत व केरळमध्ये आहे. रामायण- महाभारत, हे ग्रंथ संस्कृतात नसते तर आज प्रत्येक भारतीयाचा रामकृष्ण या नावांनी जो श्वासोच्छ्वास चालतो तो चालला नसता. आणि सर्व भारत हा एक देश आहे ही भावना टिकून राहिली नसती.
 तुलनेने याचा विचार केला तर तो जास्त उद्बोधक होईल. पाली, अर्धमागधी या भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचे वर्चस्व आज भारतीय समाजावर किती आहे व संस्कृतात लिहिलेल्या ग्रंथाचे किती आहे याची तुलना प्रत्येकाने करून पहावी. बुद्धमहावीर यांच्या अवतारकार्यानंतर भारतात त्यांच्या मतांचा प्रसार किती झाला ? शिकंदराची स्वारी भारतावर झाली तेव्हा पश्चिम आणि वायव्य या बाजूच्या प्रांतांत बुद्धाचे नावही माहीत नव्हते. तरी या वेळी त्या धर्माच्या उद्याला तीनशे वर्षे होऊन गेली होती. मग बहुजनांच्या भाषेत ग्रंथ लिहून त्या पंथांना काय मिळाले? त्यांनी त्या भाषांचा आश्रय केला तरी भारतावर वर्चस्व महाभारत, रामायण, भागवत यांचेच निरपवाद, अखंड कायम राहिले. त्याचे कारण म्हणजे पुराणप्रवचनकीर्तन या हिंदूंच्या संस्था. हिंदूंनी मूळ ग्रंथ संस्कृतात ठेविले आणि त्याचे श्रवण नाना भाषांमध्ये करविण्याची सोय बहुजनांसाठी केली. त्यामुळे अखिल भारताचे सामरस्यही साधले आणि सर्व थरांत धर्मप्रसार करण्याचे उद्दिष्टही साधले.

पाणिनीचे दृढबंधन :

 संस्कृत भाषेवर येणाऱ्या आणखी एका आक्षेपाचा विचार येथे केला पाहिजे. इ. पू. सातव्या शतकात पाणिनीने संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिले आणि तिला नियमबद्ध करून टाकली. त्या वेळी ती भाषा केवळ ग्रांथिक स्वरूपातच होती असे म्हणतात. काही पंडित तर असे म्हणतात की तिला पाणिनीने नियमबद्ध केले म्हणूनच ती मृत झाली. इंग्रजी, फ्रेंच इ. भाषांची व्याकरणे रचल्याला आता शतके उलटून गेली आहेत. तरी त्यांना मृतकळा आलेली नाही, उलट त्या विकासच पावत आहेत. मराठी, हिंदी याही व्याकरणबद्ध झाल्याला शतक होऊन गेले. तरी त्यांच्यावर वार्धक्य आल्याची चिन्हे दिसत नाहीत. तेव्हा हा विचार अगदी हास्यास्पद म्हणून सोडून दिला पाहिजे. पण पाणिनीने संस्कृत भाषेला नियमबद्ध केले हे खरेच आहे. पण त्यामुळे हित झाले की अहित ? पाणिनीच्या उत्तर काळात दोन हजार वर्षे दळणवळणाची साधने नसताना अखिल भारतीय शास्त्रीपंडित एकमेकांशी संवाद करू शकले व अखिल भारतातील धर्मकल्पनांमध्ये सुसंवाद राखू शकले ते पाणिनीच्याच आश्रयाने हे आपण विसरता कामा नये. संस्कृत भाषेची ही अखिल भारतीय बैठक लाभल्यामुळेच तत्कालीन भारतीय विद्यापीठांत भारतातील सर्व प्रदेशांतील विद्यार्थ्यांना विद्याध्ययन करता आले. पंडितांना धर्मचर्चा करिता आली आणि इतिहासपुराणांना रामकृष्णांची चरित्रे आदर्श म्हणून उभी करून समाजाला स्फूर्ती देता आली व परंपरांचा अभिमान टिकविता आला. प्रा. द. के. केळकर यांनी आपल्या 'संस्कृतिसंगम' या ग्रंथात याविषयी अत्यंत उद्बोधक असे विवेचन केले आहे. त्याचा भावार्थ असा : संस्कृत भाषा हे भिन्नभिन्न प्रांतीयांच्या विचारविनिमयाचे व म्हणूनच सर्वांना एकसूत्रात गोवणारे प्रभावी साधन होऊन बसले. हे साधन शाश्वत व टिकाऊ बनवावयाचे तर ते शिस्तीच्या नियमांनी बांधून वज्रलेप करणे अवश्य होते. पाणिनीने ते कार्य केले व सर्व प्रांतीच्या विद्वानांनी ते मान्य केले. संस्कृत भाषेचा विकास हा त्या त्या प्रांतावर सोपविला असता तर दोनचार शतकांतच एकाची संस्कृत भाषा दुसऱ्याला दुर्बोध झाली असती. म्हणून अखिल भारतीय भाषेच्या स्वैरविकासाला नियंत्रण घालणे हे सांस्कृतिक ऐक्यवर्धनाच्या दृष्टीने अगत्याचे होते. यामुळे संस्कृत भाषा बंदिस्त झाली खरी पण म्हणूनच ती अमर झाली. शंकराचार्यांना ही बैठक लाभली म्हणूनच बत्तीस वर्षांच्या अल्पावधीत त्यांना भारतावर आपल्या तत्त्वज्ञानाची मुद्रा ठोकणे शक्य झाले. कालिदास, शुद्रक, भवभूती यांना अखिल भारताचे कवी होण्याचा मान मिळाला तो पाणिनी मुळेच. आयुर्वेदामधील चरक हा पंजाबचा, सुश्रुत हा बनारसचा, वाग्भट हा सिंधमधला आणि वृंद हा महाराष्ट्राचा. पण सर्वांची एक आयुर्वेदविद्या झाली व ती भारतमान्य झाली ती देववाणीमुळेच. मनुयाज्ञवल्क्यनारदादि स्मृतिकारही सर्व आर्यावर्तात मान्यता पावले ते या गीर्वाण भारतीच्याच आश्रयाने. याचा अर्थ असा की अखिल भारताचे सांस्कृतिक ऐक्य टिकून राहिले त्याचे बव्हंशी श्रेय पाणिनीच्या नियमबद्ध संस्कृत भाषेलाच दिले पाहिजे.

व्यापकता व सामर्थ्य :

 पृथ्वीवर निरनिराळे भूप्रदेश निसर्गाने निर्माण केले आहेत. त्यांचे देश किंवा राष्ट्र यात रूपांतर कोण करते ? ते मानव समाजांचे कार्य आहे. जर्मनीच्या ज्या सीमा आहेत त्या काही निसर्गाने निर्माण केल्या नाहीत. तेथले लोक स्वतःला एक समाज, एक राष्ट्र मानतात, तेथल्या परंपरांचा अभिमान धरतात म्हणून जर्मनी हे राष्ट्र झाले. अखिल युरोप हा ख्रिस्तधर्मीय आहे. पण हे सर्व लोक आपल्याला एक समाज मानीत नाहीत म्हणून सर्व युरोप हे राष्ट्र झाले नाही. हिंदुस्थान जवळ जवळ युरोपासारखेच एक खंड आहे. प्राचीन भारतीयांच्या एकीकरणाच्या प्रयत्नाला यश आले नसते तर येथे आज युरोप- सारखीच अनेक राष्ट्रे दिसली असती. ती तशी दिसत नाहीत, अखिल भारत एक देश, एक राष्ट्र आहे ही जाणीव सर्व हिंदवासीयांच्या मनात दृढ आहे, याचे श्रेय त्या प्राचीन आर्यांना म्हणजे द्रविड, असुर, नाग, दैत्य, यांनी जो एक श्रेष्ठ वर्ग घडविला त्याला आहे. हे यश फार मोठे आहे. अफगाणिस्तान- पासून मोरोक्कोपर्यंत मुस्लीमांचे साम्राज्य कित्येक शतके टिकून होते. पण या सर्वं भूप्रदेशाचा एक देश स्वप्नातही अस्तित्वात आला नाही. युरोपचे वैर सांगितलेच आहे. इंडोनेशिया, दक्षिण अमेरिका यांचे असेच आहे. आरब एकवंशीय व एकधर्मीय असूनही सर्व आरब भूविभागाचे त्यांना एक राष्ट्र करता आले नाही. या बाबतीत प्राचीन काळी चीनला व अर्वाचीन काळी अमेरिकेलाच फक्त यश आले आहे. भारतीय आर्यांचे यश किती दुर्मिळ कोटीतले आहे हे यावरून ध्यानात येईल.
 प्राचीन आर्यांना हे अलौकिक यश आले यामुळे त्यांचे समाजशास्त्र जगातील सर्व समाजशास्त्रांपेक्षा श्रेष्ठ होय असे पंडितांचे मत आहे. पण या समाजशास्त्राचा असा गौरव करणाऱ्यांनीच त्यांतील एक महान् वैगुण्यही दाखवून दिले आहे. डॉ. केतकर म्हणतात, 'व्यापकतेच्या दृष्टीने जे समाजशास्त्र अत्यंत बलवान ठरले तेच समाजशास्त्र दार्ढ्याच्या दृष्टीने अगदी दुर्बल ठरले आहे, हे देखील त्याबरोबरच कबूल केले पाहिजे. अत्यंत भिन्न समाज एक छत्राखाली आणल्यामुळे, आणि ते देखील सक्तीने न आणता खुशीने आणले गेल्यामुळे हिंदुसमाज हा एक भिन्नस्वरूपी लोकांचा समुच्चय बनला आहे व संघटित कार्य करण्यास असमर्थ झाला आहे, अशी भीती पुष्कळांना बाटू लागली आहे.' (प्राचीन महाराष्ट्र शातवाहनपर्व, पृ. २८४. ज्ञानकोश प्रस्तावनाखंड, विभाग १ ला, पृ. ३८१) प्रारंभीच 'हिंदुसमाज समाज आहे काय ?' हा प्रश्न विचारला आहे त्यात हीच भीती व्यक्त झालेली आहे. एका हिंदूवर आघात झाला तर सर्व हिंदू खवळून उठतात असे कधी घडतच नाही, असे दिसते. निदान गेली हजार वर्षे तरी इतिहास कंठरवाने हेच सांगत आहे. मग प्रश्न असा येतो की त्यापूर्वी काय होते ? पूर्वीपासूनच संघटित कार्य करण्यास हा समाज वा हा लोकसमुदाय असमर्थ होता काय ? संभूयसमुत्थान असे त्याला कधी जमलेच नाही काय ? जमले असले तर त्या वेळी त्याला कोणी संघटित केले होते ? त्यांना यश कशामुळे आले ? या प्रश्नांचा विचार आता केला पाहिजे. तो पुढील प्रकरणात करू. तत्पूर्वी या प्रकरणात आर्यांच्या राष्ट्रघडणीच्या प्रयत्नांचे जे वर्णन केले आहे त्यांतून जे काही महत्त्वाचे सिद्धांत हाताशी लागतात ते पाहू :
 (१) येथे सर्वांना रहावयाचे आहे हे आर्यनेत्यांनी निश्चितपणे ठरविले होते. (२) त्यासाठी सर्व भारतीय समाज एकरूप झाला पाहिजे असा त्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता. (३) या ध्येयाच्या आड वर्ण, वंश, संस्कृतअसंस्कृतपणा हे काही येऊ द्यावयाचे नाही या तत्त्वाचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. (४) यामुळेच सहिष्णुता व संग्राहकता ही महाव्रते त्यांनी अंगीकारिली व प्रत्येकाच्या धर्मभावनांचा, दैवतांचा व आचारांचा आदर केला.
 विश्वहिंदुपरिषदेला ही तत्त्वें दीपस्तंभासारखी मार्गदर्शक होतील यात शंका नाही.