Jump to content

हिंदुसमाज संघटना आणि विघटना/दोन प्रवाह

विकिस्रोत कडून



दोन प्रवाह


 हिंदुसमाज समाज आहे काय, त्याला प्राचीन काळी तरी काही संघटनातत्त्व होते काय, या प्रश्नांचा विचार गेल्या दोन प्रकरणांत आपण केला. अखिल भारतात बसत असलेल्या शेकडो जमातींना एकरूपता आणून त्या प्रचंड मानवसमूहातून एक संघटित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न त्या काळच्या समाजधुरीणांनी- आर्यांनी- निश्चित केले होते आणि त्यांना त्यांत यशही तसेच स्पृहणीय आले होते असे त्यावरून आपल्याला दिसले. आणि याच प्रयत्नातून भारतात प्रथम यज्ञधर्मनिष्ठा व तीतून पुढे राष्ट्रनिष्ठा विकसित होऊन हा समाज अत्यंत बलशाली झाला, अमोघ पराक्रम करू शकला असेही आपल्याला दिसून आले. राष्ट्रनिष्ठा या संघटनतत्त्वाच्या सामर्थ्यामुळेच इ. स. पू. ३२३ पासून पुढील एक हजार वर्षांत ग्रीक, शक, कुशाण, हूण इ. सुसंस्कृत वा रानटी जमातींची जी ९।१० आक्रमणे भारतावर आली, ज्या आक्रमणांमुळे युरोपीय संस्कृती नष्ट होण्याची वेळ आली होती, त्यांना तोंड देऊन त्यांचे निर्दाळण करण्यास भारत समर्थ झाला, असा त्यांतून निघणारा निष्कर्षही आपण ध्यानी घेतला. हा निष्कर्ष सर्वमान्य होईल अशी आशा वाटते.

आरब आक्रमणे

 भारताच्या ठायी असे सुसंघटित सामर्थ्य असल्यामुळेच इ. सनाच्या आठव्या शतकापासून येऊ लागलेल्या आरबांच्या आक्रमणांनाही त्याला यशस्वीपणे तोंड देऊन त्यांचा निःपात करता आला. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात स्कंदगुप्त व यशोवर्मा यांनी हूणांचा निःपात केल्यानंतर पुढील पाचशे वर्षांत भारतावर शककुशाणहूणांच्या आक्रमणाइतके भयंकर आक्रमण झाले नाही, असे काही इतिहासपंडितांचे मत आहे. पण ते तितकेसे यथार्थ वाटत नाही. आठव्या शतकाच्या प्रारंभापासून सुरू झालेली आरबांची आक्रमणे काही कमी भयानक नव्हती. या काळात आरबांनी दक्षिण युरोप जवळजवळ सर्व जिंकला होता. इजिप्त, इराण तार्तरी हे प्रदेश तर त्यांनी पहिल्या धडाक्याला लोळविले. इजिप्त, इराण,मधली प्राचीन साम्राज्ये त्यांनी धुळीस मिळविली. त्यांच्यापुढे उभे राहणे, फ्रान्समधील चार्लस मार्टलचा अपवाद वजा करता, कोणालाच शक्य झाले नाही. हिंदुस्थानात प्रथम महंमद कासीमने सिंध जिंकला तेव्हा तीच परिस्थिती निर्माण झाली होती. पण हळूहळू राजस्थानातले राजपूत आरबांशी मुकाबला करण्यास सिद्ध झाले व बाप्या रावळ, कालभोज यांनी त्या जगज्जेत्यांना चांगलाच धडा शिकविला. खलिफा अलमामून याच्या कारकीर्दीत आरबांनी राजस्थानवर चोवीस वेळा स्वाऱ्या केल्या. पण तितक्याही वेळा मेवाडचा राजा दुसरा खुम्माण याने त्यांना खडे चारले. यापूर्वी आरबांनी दक्षिणेत उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण गुजराथच्या चालुक्यांनी आपल्या खड्गाचा तेथेही अडसर घातला. यामुळे आरबांचा दक्षिण भारतात शिरकाव झाला नाही आणि भारतात मुस्लीमांचे राज्य स्थापन झाले नाही. रजपूत आणि चालुक्य यांच्या या पराक्रमाला विशेष अर्थ आहे. शक, हूण यांना स्वतःचा निराळा असा धर्म नव्हता, स्वत्व नव्हते. पण मुस्लीमांचे तसे नव्हते. अत्यंत कडव्या व आक्रमक अशा धर्माचे ते उपासक होते. शिवाय आरबांची संस्कृती ही उच्च दर्जाची होती. पण त्यांनाही भारतीयांनी रणात पराभूत केले. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य टिकवून स्वधर्म व स्वसंस्कृती यांचे संरक्षण करण्यास हिंदू अजूनही समर्थ होते. हे सिद्ध झाले.

चित्र पालटू लागले

 दहाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून- इ. स. १००१ पासून- मात्र हे चित्र पालटू लागले. इ. स. ९८० मध्येच जयपाळाचा पराभव करून सुबुक्तगीनाने पंजाब घेतला. पुढे ठरलेली खंडणी जयपाळाने न दिल्यामुळे सबुक्तगीनाने पुन्हा स्वारी केली. त्या वेळीही जयपाळाचा पराभव झाला. आणि पंजाब प्रांत हिंदूंच्या हातातून कायमचा जाऊन भारताच्या आणि हिंदूंच्या इतिहासातील प्रदीर्घ तमोयुगास प्रारंभ झाला. एक दोन लढायांतील पराभवांवरून काहीच निष्कर्ष काढता येत नाही. तेव्हा जयपाळाचा दोनदा पराभव होऊन हे पराभवकांड येथेच थांबले असते तर युग पालटले, असे म्हणता आले नसते. पण सुबुक्तगीनाचा मुलगा गझनीचा महमूद याने १००१ मध्ये भारतावर स्वाऱ्या करण्यास प्रारंभ करून १०२४ पर्यंत एकंदर सतरा स्वाऱ्या केल्या. पण हिंदूंना त्याचा एकदाही पराभव करता आला नाही. पुढील तीनशे वर्षांत मुस्लीम आक्रमणे अव्याहत होत होती. बाराव्या शतकाच्या अखेर भारतात घोरीवंशाचे राज्यच स्थापन झाले. आणि पुढील शतकात बंगाल बिहार, आसाम, गुजराथ, माळवा हे सर्व प्रांत मुस्लीमांनी जिंकून घेतले. अजून दक्षिणेत मुस्लीमांचा प्रवेश झाला नव्हता. पण चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणापथात प्रवेश करून मुस्लीमांनी पंधरा-वीस वर्षातच यादव, होयसळ, पांड्य, चोल इ. राज्ये बुडविली व अखिल भारत आक्रांत केला.
 इ. स. हजारपूर्वीचे भारताचे वैभव, त्याचे क्षात्रतेज, त्याचे शौर्यधैर्य, त्याचे स्वातंत्र्य व त्याचे दिग्विजय आणि त्यानंतरचे त्याचे दैन्य, दौर्बल्य, पारतंत्र्य, गुलामगिरी, प्रतिकारशून्यता, मानहानी स्वत्वशून्यता- अशी ही दोन चित्रे समोर आली असता इ. स. १००० च्या सुमारास कोठल्या तरी धार्मिक, सामाजिक वा राजकीय अशा दुर्धर रोगाने भारतीय समाज ग्रस्त झालेला असला पाहिजे याविषयी शंका रहात नाही. जे जीवनाचे तत्त्वज्ञान, जी धर्माची, समाजरचनेची, राजशासनाची मूलतत्त्वे पूर्वी भारताने अवलंबिली होती त्यांचा त्याने त्याग केला असला पाहिजे किंवा त्यांना अत्यंत विकृत रूप आले असले पाहिजे; त्यावाचून एवढ्या समर्थ, बलशाली समाजाचा असा दारुण अधःपात होणार नाही, हे सहज ध्यानात येते. तेव्हा आज विश्वहिंदु परिषदेसारख्या संस्था स्थापून हिंदूंच्या पुनरुज्जीवनाचा विचार करावयाचा असेल तर ज्या रोगानं या समाजाला ग्रासले आहे त्याची चिकित्सा प्रथम केली पाहिजे, आपल्या अवनतीची मीमांसा आधी केली पाहिजे, याविषयी दुमत होईल असे वाटत नाही. या तिसऱ्या व पुढील चवथ्या लेखात हीच मीमांसा करावयाची आहे.

व्याधींची चिकित्सा :

 या मीमांसेसाठी आपल्या मागल्या इतिहासाकडे पाहू लागताच त्यावरुन असे ध्यानात येते की इ. स. १००० आधीच्या शे-दोनशे वर्षांत हिंदुसमाज एकाच नव्हे तर अनेक रोगांनी ग्रस्त झालेला होता व त्याचे सामर्थ्य हे रोग दीर्घ काल पोखरून टाकीत होते. या रोगांची चिकित्सा करताना आणखी एक गोष्ट लक्षात येते ती ही की, या सर्व अनर्थाला आपले आपणच जबाबदार आहो. 'मनुष्य हा आपला आपण बंधू किंवा रिपु असतो', हे गीतावचन हिंदुसमाजाच्या बाबतीत तितकेच खरे आहे. इतिहासावरून निश्चित होणारे हे अपश्रेय माथी घेण्यास आपण तयार झालो तरच भविष्यकाळाविषयी आशा धरता येईल. हे सर्व दैवयोगाने झाले, कलियुगामुळे झाले, नियतीच याला जबाबदार आहे अशी ज्यांची धारणा आहे, त्यांनी या चिकित्सेच्या फंदात न पडावे हे बरे. कारण मानवाच्या हाती जे नाही त्याची चिकित्सा करून करावयाचे काय ? नियतीमुळे अधःपात झाला असला तर नियतीमुळेच, झाला तर, उत्कर्ष होईल, किंवा तिच्या मनात नसले तर होणार नाही. तेथे मानवाच्या प्रयत्नांचा संबंध येतो कोठे ? पण अशा रीतीने नियतीवर आपल्या अवनतीचे खापर फोडणे हे न्याय्यही नाही. मागील काळच्या वैभवाचे श्रेय जर आपण आपल्याकडे घेतो, आपली धर्मतत्त्वे, आपले असामान्य समाजशास्त्र, आपली स्पृहणीय नीतिमत्ता, आपले चारित्र्य, सर्व विषयांत अप्रतिहत प्रवेश करणारी आपली बुद्धिमत्ता यामुळेच आपल्याला त्या प्राचीन काळी अतुल वैभव प्राप्त झाले, असे आपण म्हणतो तर पुढे जी अवनती झाली त्या वेळी आपल्या या सर्व गुणांचा लोप झाला असला पाहिजे, आपण त्या थोर तत्त्वांपासून च्युत झालो असलो पाहिजे, आपले थोर चारित्र्य नष्ट झाले असले पाहिजे, हे मान्य करून ते अपश्रेयही आपल्या माथी घेण्याची समंजसता आपण दाखविली पाहिजे. ही वक्तव्यता, हे उत्तरदायित्व आपल्या शिरी घेणे यातच न्याय आहे व यातच उज्ज्वल भविष्याचे बीज आहे. तेव्हा अशा अनाग्रही सत्यशोधनाच्या बुद्धीने आपण आपल्या समाजाला जडलेल्या व्याधींची चिकित्सा करण्यास प्रारंभ करू.

विकृत धर्मतत्त्वे :

 वर म्हटले आहे की मागच्या उत्कर्षाच्या काळी जे जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अवलंबिले होते, ज्या धर्माचा आपण आश्रय केला होता त्याचा या पुढल्या काळात आपण त्याग केला असला पाहिजे, म्हणूनच ही अवकळा आली. हेच खरे आहे. धर्म, समाजव्यवस्था, अर्थव्यवहार यांची जी मूलतत्त्वे प्राचीन काळी आपण शिरोधार्य मानली होती त्यांचे मूळ स्वरूप या वेळी अगदी लोपून त्यांना अत्यंत विकृत, अत्यंत विपरीत असे रूप इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आगेमागे प्राप्त झाले होते. आणि या धर्मलोपामुळेच हिंदुसमाज हतप्रभ होऊन गेला होता.
 समता, सहकार्य, स्वातंत्र्य, प्रवृत्तिवाद, बुद्धिनिष्ठा या थोर तत्त्वांवर प्राचीनांची श्रद्धा होती. ती पुढे पुढे नष्ट झाली आणि विषमता, दूरीभाव, निवृत्तिवाद, शब्दप्रामाण्य यांचे उत्तरोत्तर प्राबल्य होत गेले. वेदकाळापासून इ. स. १००० वर्षांपर्यंत भारताचा इतिहास पाहता एक गोष्ट ध्यानात येते की, वरील दोन्ही परस्पर विरुद्ध विचारांचे प्रवाह भारतात प्रारंभापासून चालू होते. पण प्रारंभीच्या काळात समता, बुद्धिवाद यांनी संपन्न असलेल्या, समाजसंघटनेला पोषक अशा प्रवाहाचा जोर विशेष होता. त्यामुळेच हिंदुसमाज समाजरूप पावला व त्याचा उत्कर्ष झाला. पण हळूहळू दुसऱ्या प्रवाहाचा जोर वाढू लागला व विषमता, निवृत्तिवाद या प्रतिगामी तत्त्वज्ञानाने अखेर पहिल्या समतेच्या, संघटनेच्या धर्मावर मात केली व हिंदुसमाजाला अधःपातास नेले. 'धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।' हे वचन अगदी खरे ठरले. आपण समता, स्वातंत्र्य, बुद्धिवाद या धर्माचे रक्षण केले नाही. तो धर्म हत झाला. त्यामुळे त्यानेच आपल्याला विनाशाला नेले.
 या दोन विचारप्रवाहांच्या काठाने चालत जाऊन त्यांचे अवलोकन आपल्याला आता करावयाचे आहे. या लेखात आपण समतेच्या, संघटनेच्या धर्माचे स्वरूप पाहू आणि नंतर पुढील लेखात विषमता, विघटना या विनाशक विचारसरणींचा अभ्यास करू. पण तुलना चांगली मनात भरावी यासाठी प्रथम दोन्ही तत्त्वज्ञानांचे स्थूलमानाने आलोचन करून मग तपशिलात शिरू. 'समासेन तु वक्ष्यामि विस्तरेण च वै पुनः।' ही व्यासांची पद्धती केव्हाही श्रेयस्कर होय.

विघटनेचे प्रयत्न :
 कोणताही समाज आचार, विचार, आकांक्षा, सुखदुःखे, पूर्वपरंपरा या दृष्टींनी जितका अधिक एकरूप असतो तितका तो जास्त संघटित व म्हणूनच बलशाली होतो. 'साम्याद् हि सख्यं भवति, वैषम्यान्नोपपद्यते। हे व्यासवचन अगदी खरे आहे. हे जाणूनच प्राचीन आर्यांनी समतेच्या तत्त्वावर हिंदु- समाजाची उभारणी करण्याचा निर्धार केला होता. पण पुढील समाजाशास्त्रवेत्त्यांना त्याचा विसर पडला; नव्हे, त्यांनी जाणूनबुजून त्याचा त्याग केला. आणि अहोरात्र विघटनेचेच प्रयत्न केले. 'विघटनेचे प्रयत्न' हे शब्द जरा चमत्कारिक लागतील. पण ते यथार्थ आहेत. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता ही त्यांची त्रयीविद्या होती. आणि तिचा पुरस्कार करताना हा हिंदुसमाज जितका भिन्नरूप होईल, विषम होईल, तितका करण्याचा त्यांनी निर्धार केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र व अस्पृश्य आणि यांच्या संकरांतून निर्माण झालेल्या अनंत आंतरप्रभव जाती यांनी परस्परांत विवाह करू नये आणि एकमेकांचे व्यवसाय त्यांनी करू नयेत असे दण्डक तर त्यांनी घातलेच, पण एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून या भिन्न घटकांनी परस्परांचे अन्न घेऊ नये, पाणी घेऊ नये, त्यांनी परस्परांना स्पर्शही करू नये अशी बंधने धर्म म्हणून त्यांनी लावून दिली. हिंदुधर्म हा सनातन वैदिकधर्म असे आपण म्हणतो. वेद हिंदूंना अत्यंत पूज्य आहेत असे मानले जाते. पण हिंदूंना म्हणजे कोणाला ? शूद्र व अस्पृश्य हा या मानवसमूहातील बहुसंख्य वर्ग. त्यांना वेदपठनाचा तर राहोच पण श्रवणाचासुद्धा अधिकार नव्हता. म्हणजे विद्या, पूज्यग्रंथ यांच्याही बाबतीत हा समाज भिन्नरुपच राहिला पाहिजे, असा त्या धर्मशास्त्रज्ञांचा कटाक्ष होता. क्षणभर विवाह, व्यवसाय, वेदपठन हे सोडून देऊ. सर्व वर्णांना व जातींना समआचार लावून देऊन त्यांच्यात साम्य, समबंध, समरसता निर्माण करण्याचे तरी त्या धर्मशास्त्रज्ञांनी प्रयत्न केले काय ? नाही. याही बाबतीत त्यांचे विघटनेचेच धोरण होते. कोणत्याही दोन वर्णांमध्ये एकही सम आचार नसलाच पाहिजे असे त्यांचे धोरण होते. त्रैवर्णिकांना वेदाधिकार होता. पण त्यातही ब्राह्मणाचा सावित्रीमंत्र निराळा, क्षत्रियाचा निराळा, वैश्याचा निराळा. त्यांची उपनयनाची वयोमर्यादाही निराळी ! अलीकडे चातुर्वर्ण्याचे काही शास्त्रीय समर्थन करण्याची रीत निघाली आहे. या भिन्नवयोमर्यादांचे बाळशास्त्री हरदास यांनी कसे समर्थन केले आहे पहा. ब्राह्मणांचा सावित्रीमंत्र ८ अक्षरांचा असे, क्षत्रियांचा ११ अक्षरांचा व वैश्यांचा १२ अक्षरांचा. तीन-चार अक्षरे जास्त झाल्यामुळे ते मंत्र पाठ करण्यास एकदोन वर्षांनी वय जास्त असणे अवश्यच आहे ! ब्राह्मणाचे उपनयन आठव्या वर्षी व्हावयाचे. क्षत्रियाच्या मंत्रात तीन अक्षरे जास्त. तेव्हा तो पाठ करण्यास त्याला तीन वर्षे जास्त लागणारच. म्हणून त्याचे उपनयन अकराव्या वर्षी, आणि ४ अक्षरे जास्त म्हणून वैश्याचे बाराव्या वर्षी !
 आचारभेद करता करता शास्त्रीपंडित कोणत्या थराला गेले ते पहा. शौचाहून आल्यावर ढुंगण किती वेळा धुवावे यातही भिन्नतत्त्व असावे असा त्यांचा कटाक्ष होता. ब्राह्मणाने आठ वेळा, क्षत्रियाने सहा वेळा, वैयाने चार वेळा व शुद्राने दोन वेळा ! यातही समानता आली तरी चातुर्वर्ण्य लोपेल अशी त्यांना भीती होती.

हिंदु- एक मानवसमूह
 ज्या मानवसमूहात इतका परस्परभेद आहे, आणि तो भेद असलाच पाहिजे असे जेथे शास्त्र आहे त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? वर्णावर्णामध्ये, जातीजातींमध्ये जेथे इतका दूरीभाव आहे की एका वर्णाला दुसऱ्याची सावलीही चालत नाही, त्याच्या शब्दाचे श्रवण चालत नाही, एकाच रस्त्याने दोघांनी जाणे जेथे निषिद्ध, त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? काही जमातींनी जन्मोजन्मी दुसऱ्यांच्या दास्यातच राहिले पाहिजे, पशुवत् जिणेच जगले पाहिजे, असे ज्यांचे धर्मशास्त्र आहे त्या मानवसमूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? ज्या समूहात समाजधुरीण हीनजातीय लोकांच्या सुखदुःखाची, त्यांच्या योगक्षेमाची, ते जगतात की मरतात याची अणुमात्रही चिंता वाहत नाहीत, त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ? समूहातले भिन्न घटक- भिन्न व्यक्ती व जातीजमाती— जितके परस्परांच्या जास्त जवळ येतील, त्यांच्यात स्नेहभाव जितका जास्त निर्माण होईल, काही समबंधनांनी ते जितके जास्त बद्ध होतील तितका तो समूह जास्त संघटित होतो व त्याला 'समाज' ही पदवी प्राप्त होते. पण ज्या समूहातील धुरीण सोळे-ओळे, पावित्र्य- पातित्य, रक्तशुद्धी– रक्तसंकर इ. विचारांनी प्रत्येक घटक दुसऱ्यापासून तोडून काढण्यातच धन्यता मानतात आणि असे धर्मशास्त्र स्थापित करण्यात कृतार्थता मानतात त्या समूहाला समाज म्हणणे कसे शक्य आहे ?
 उत्तरकालीन हिंदुसमाजाला समाज म्हणणे सर्वथा अशक्य आहे. कारण हा समूह समाज होताच कामा नये, असे त्याचे धर्मशास्त्र आहे !

समतेची उपासना :

 सुदैवाने प्राचीन काळापासून असे धर्मशास्त्र नव्हते. समाज एकरूप करावा, सम करावा आणि त्यायोगे संघटित करावा असे प्राचीन हिंदुधुरीणांचे धोरण होते. मुखाने, लेखाने ते अहोरात्र साम्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष करीत होते. 'समानी व आकृतिः समाना हृदयानि वः।' हा वेदमंत्र पहा. 'तुमचा अभिप्राय एकसारखा, तुमची अंतःकरणे एकसारखी व तुमचे मन एकसारखे असो; जेणेकरून तुमचे सुसाह्य म्हणजे संघशक्तीची बळकटी होईल.' (ऋग्वेद १०, १९१.)

संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्व संजानाना उपासते । (कित्ता)

 'एके ठिकाणी जमा, संवाद करा, तुमची मने एक करा, व ज्याप्रमाणे पूर्वीचे विद्वान आपल्या नियत कर्तव्यासाठी एकत्र जमत त्याप्रमाणे तुम्हीही जमत जा.' या मंत्रामध्ये कोणत्याही विशिष्ट जातीचा विशेष रीतीने उल्लेख न करता सर्वांना सामान्य रीतीने आज्ञा केलेली आहे.

समानो मंत्रः समितिः समानी, समानं मनः सहचित्तप्रेषाम् ।

(कित्ता)

 'सर्वांचे मंत्र समान, सर्वांची सभा समान, सर्वांचे मन समान आणि सर्वांचे चित्तही समान असो.' सर्वांचा मंत्र एक व सर्वांची सभाही एक हे ध्यानात ठेवण्याजोगे आहे.
 वरील आज्ञा कोणत्याही विशिष्ट जातीला उद्देशून केलेल्या नाहीत. सर्व समाजाला आहेत. पण तशी शंका कोणाला येईल तर त्यांचे समाधान पुढील वचनांवरून होईल.

विश्वस्य केतुर्भुवनस्य गर्भ आरोदसी अपृणाज्जायमानः ।
वीडुं चित् अद्रिमभिनत् परायन् जना यदग्निं अयजन्त पंच |

ऋ. १०।४५।६॥ यजु. अ. १२॥

 "जो अग्नि विश्वाचा ध्वज आहे, भुवनाचा गर्भ आहे, जो द्युलोक व पृथ्वी यांना व्यापून आहे, जो मेघ व पर्वत यांना भेदून टाकतो, त्या अग्नीचे (वा परमेश्वराचे) पाचही प्रकारचे लोक यजन करतात.'

यज्ञियासः पंचजना मम होत्रं जुषध्वम् ।
पंचजना मम होत्रं जुषन्ताम् । ऋ. १०।५३

 'यजन करणारे पंचजन माझ्या होत्राचे- यज्ञाचे- सेवन करोत.'
 पंचजन म्हणजे सर्व समाज, सर्व जनता, मनुष्यमात्र. (श्रीमत् शंकराचार्य व श्रीसायणाचार्य यांनी असा अर्थ दिला आहे) तेव्हा सर्व- भेदनिरपेक्ष सर्वांनी यजन करावे अशी ही वेदाज्ञा आहे. 'विश' हा शब्द जनता, बहुजनसमाज याच अर्थाने मागे वापरीत. कोठे कोठे ब्राहाण व क्षत्रिय यांच्या खेरीज इतर समाज असाही अर्थ आहे. तरी 'त्वामने मानुषीरीळते विशः ।ऋ. ५।८।३॥ अग्निं होतारं ईळते यज्ञेषु मानुषो विशः ।ऋ. ६।१४।२॥ अशा ॠग्-मंत्रांतून 'विश तुझे स्तवन करतात' असा उल्लेख करून मंत्रकर्त्यांनी आपले व्यापक, उदार, समतेचे तत्त्व स्पष्ट केले आहे.
 वेदकाळी उच्चनीच, श्रेष्ठकनिष्ठ अशी भावना नव्हती. समता, बंधुता व स्वातंत्र्य, याच तत्त्वांचे मंत्रकर्ते ऋषी उपासक होते हे अनेक मंत्रांवरून दिसून येते. समतेचे मंत्र आपण पाहिले. आता बंधुतचे पाहू.

अज्येष्ठासो अकनिष्ठास एते । सं भ्रातरो वावृधुः सौभगाय

॥ ऋ. ५।६०।५॥


ते अज्येष्ठा अकनिष्ठास उद्भिदो । अमध्यमासो महसा विवावृधुः ॥

ऋ. ५।५९।६॥

'कोणी ज्येष्ठ नव्हेत, कनिष्ठ नव्हेत व मध्यनही नव्हेत, ते सर्व परस्परांचे बंधू आहेत व उत्तम भाग्यासाठी सर्व वाढत आहेत.'
 वेदकाळी समाजाची उभारणी समतेच्या व बंधुतेच्या तत्त्वांवर झाली होती, जन्मनिष्ठ उच्चनीचता ते ऋषी मानीत नसत हे या मंत्रांवरून दिसून येईल. पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 'स्पशास्पर्श विचार' या ग्रंथात वरील वेदवचने देऊन ऋषींची ही तत्त्वे स्पष्ट केली आहेत. (वरील अवतरणे तेथूनच घेतलेली आहेत. प्रकरण ४ थे पहा.) प्रकरणाचा समारोप करताना पं. सातवळेकर म्हणतात, 'समाजामध्ये उच्चनीच भेद कल्पिणे व ते जन्मसिद्ध असून कोणत्याही कारणाने नष्ट होऊ शकत नाहीत असे मानणे, हे वैदिक धर्माच्या अगदी विरुद्ध आहे या शंका नाही.'
 सुदैवाने वेदांच्या उत्तरकाळीही (इ. स. पू. १००० ते इ. स. १०००) दीर्घकाळपर्यंत या संघटनापोषक धर्माचा विजयच होत गेला. त्यामुळेच हिंदुसमाज संघटित व समर्थ होऊ शकला. पण हळूहळू विघटनेच्या, विषमतेच्या विचारप्रवाहाचा जोर वाढत जाऊन शेवटी त्याने पहिल्या विचारप्रवाहावर मात केली आणि त्याच्या पुरस्कर्त्या धर्मशास्त्रज्ञांनी हिंदुसमाज धुळीस मिळविला.
 या दोन प्रवाहांच्या संघटनविघटनकार्याचा इतिहास आता पहावयाचा आहे. वेदकाळी व नंतरही दीड-दोन हजार वर्षे वर सांगितलेली समतेची तत्वे केवळ ग्रंथापुरती सांगितलेली नसून प्रत्यक्षात अवतरलेली होती हे सिद्ध करण्यास आता विपुल प्रमाणे उपलब्ध झालेली आहेत. त्यांच्या आधारे इ. स. १००० पर्यंतच्या हिंदुसमाजाचे स्वरूप या लेखात प्रथम पाहू. आणि नंतर याच काळात सुप्त असलेली भेदभावाची, विषमतेची, विघटनेची बीजे विकसित होऊन त्यांचा घातक परिणाम कसा झाला त्याचा पुढील लेखात विचार करू.
 [यानंतरचे विवेचन पुढील ग्रंथकारांच्या आधारे केलेले आहे. म. म. पांडुरंग वामन काणे- 'धर्मशास्त्राचा इतिहास:' म. म. श्रीधरशास्त्री पाठक- 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थः' पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर- 'स्पर्शास्पर्श;' आचार्य क्षितिमोहन सेन- (१) 'भारतवर्ष में जातिभेद', (२) 'संस्कृति -संगम' : डॉ. काशीप्रसाद जयस्वाल- (१) 'मनु आणि याज्ञवल्क्य'; (२) 'हिंदू पॉलिटी': कुलगुरु चिं. वि वैद्य- 'मध्ययुगीन भारत,' भाग १, २, ३. या थोर पंडितांनी मूळ ग्रंथांतली शेकडो अवतरणे दिली आहेत. या लेखांत मी त्यांच्या ग्रंथांतले पृष्ठांक दिलेले आहेत. त्यांनी उद्धृत केलेल्या वचनांचा मूळ पत्ता दरवेळी विस्तारभयास्तव दिलेला नाही. तो जिज्ञासूंनी मुळातून पहावा.]

गुणनिष्ठ वर्ण :
 वेदकाळी चातुर्वर्ण्यव्यवस्था होती किंवा नाही याविषयी पंडितांमध्ये मतभेद आहेत. पण तो प्रश्न वादग्रस्त म्हणून सोडला तरी त्याकाळी वर्णभेद असलेच तर ते जन्मनिष्ठ नव्हते व त्यासंबंधीची बंधने उत्तरकाळातल्याप्रमाणे कडक तर मुळीच नव्हती याबद्दल फारसा वाद नाही. म. म. काणे यांच्या मते त्या प्रारंभीच्या काळी वर्ण नसून वर्ग होते. त्यांचे हे म्हणणे प्रमाणसिद्ध आहे हे पुढील उदाहरणांवरून कळून येईल. त्या काळी क्षत्रिय कुळांत अनेक ब्रह्मर्षी निर्माण होत व ब्राह्मण कुळांत अनेक राजपुरुष उत्पन्न होत. वीतहव्य हा राजा क्षत्रिय होता. भृगुऋषींच्या कृपेने तो ब्रह्मर्षी झाला. त्याचा पुत्र गृत्समद हा वेदांतल्या काही सूक्तांचा कर्ता आहे. सुतेजा, प्रमती हे त्याच्याच कुळातले ब्राह्मण होत. शौनक हा प्रसिद्ध ऋषी त्याच्याच कुळातला होय. या शौनकाने चातुर्वर्ण्य निर्माण केले असे विष्णुपुराण म्हणते. म्हणजे त्याच्या आधी ते नव्हते एवढे निश्चित करते. शौनकाचा पिता शुनक याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या सर्व वर्णांचे पुत्र होते, असे हरिवंशपुराण म्हणते. नहुष हा क्षत्रिय राजा. त्याचा पुत्र यति हा योगबलाने ब्रह्मर्षी झाला. बळीराजाचे अंग, वंग, कलिंग इ. पाच पुत्र क्षत्रिय होते. त्यांची संतती बालेय ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहे (हरिवंश). भगवान ऋषभदेव यांना शंभर पुत्र होते. त्यांतील ज्येष्ठ पुत्र भारताचा अधिपती (क्षत्रिय) झाला. त्याच्याहून कनिष्ठ ८१ पुत्र महाश्रोत्रीय (ब्राह्मण) झाले (भागवत- पुराण). पुरुवंशात कोणी क्षत्रिय झाले, कोणी ब्राह्मण झाले. मुद्गल राजाच्या कुळातील संतती मौद्गल्य ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वामित्र तपोबलाने क्षत्रियाचा ब्राह्मण झाला हे प्रसिद्धच आहे. पण एवढेच नाही. तो ब्राह्मणांचा गोत्रकर्ताही झाला. त्याचे अनेक पुत्र तपस्वी व ब्रह्मवंशविवर्धन झाले. सुप्रसिद्ध गायत्रीमंत्राचा कर्ता विश्वामित्रच होय. मांधाता, पुरुकुत्स, अजमीढ, कक्षीव, विष्णुवृद्ध हे सर्व ब्रह्मर्षी क्षत्रियकुलोत्पन्न होते (वायुपुराण) नाभाग व वृष्टि या क्षत्रियांचे पुत्र वैश्य झाले. ('भारतवर्ष में जातिभेद'- क्षिति मोहन सेन पृ. २६ ते ४०. चिं. वि. वैद्य; 'मध्ययुगीन भारत'- भाग २, पृ. ६९-७२)
 वरील इतिहास ध्यानात घेऊनच 'प्रारंभी एकच वर्ण होता व त्यातून गुणकर्मभेदाने पुढे चार वर्ण निर्माण झाले, असे रामायण, महाभारत, भागवत, ब्रहापुराण, लिंगपुराण इत्यादी प्राचीन ग्रंथांत वारंवार सांगितलेले आढळते. (श्रीधरशास्त्री पाठक- 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ' पृ. ३०; पंडित सातवळेकर- 'स्पर्शस्पर्श' पृ. १३; आचार्य सेन- 'भारतवर्ष में जातिभेद' पृ. ९.) यामुळेच गुणांवरून मनुष्याचा वर्ण ठरतो, जन्मावरून नव्हे. ही विचारधारा त्या काळी प्रबल होती असे दिसते. महाभारतामध्ये आदि, वन, अनुशासन, शांति या पर्वात हा विचार पुनः पुन्हा आवर्जून सांगितलेला आहे. मनुष्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कशामुळे होतो? असे भारद्वाजाने भृगूला विचारले. त्या वेळी भृगू म्हणाला, "वेदाध्ययन, सदाचार, सत्यपरायणता या गुणांनी ब्राह्मणत्व येते. प्रजापालन, क्षात्रतेज इ. गुणांनी मनुष्य क्षत्रिय होतो. कृषिगोरक्ष्य, धनार्जन यामुळे मनुष्य वैश्य होतो. आणि जो वेदांचा त्याग करतो, नित्य अमंगळ असतो, ज्याला भक्ष्याभक्ष्यविचार नाही, तो शूद्र होतो." गुणांची अशी परीक्षा होण्यासाठी सर्वांना समसंधी मिळणे अवश्य आहे. नाही तर कोणाची प्रवृत्ती कशी, हे कळण्यास मार्गच राहणार नाही. म्हणून या सर्व वर्णांना- म्हणजेच सर्व समाजाला- यज्ञाचा व वेदाचा अधिकार आहे, असे भृगूने स्पष्टपणे सांगितले आहे. आणि शेवटी 'सत्य, तप, विद्या ही लक्षणे शूद्राच्या ठायी असतील तर तो शूद्र ब्राह्मण होय, आणि ब्राह्मणाच्या ठायी नसतील तर तो ब्राह्मण शूद्र होय असा निर्वाळा दिला आहे.' (शांतिपर्व) पितामह भीष्मांनी तर, 'जो ब्राह्मण वरील सात्त्विक गुणांनी संपन्न नसेल त्याला दास मानून वेठीला धरावे व दासाचे भोजन त्याला द्यावे', असे आपले मत दिले आहे. अनुशासनपर्वात शंकर पार्वतीला सांगतात की 'हीन कुलात जन्मलेला शूद्र जर आगनसंपन्न असेल तर त्याला संस्कृत ब्राह्मण मानावे.'
 तांड्यब्राह्मणात पुढील कथा आहे. कण्व या ब्राह्मणकुळात वत्स व मेधातिथी असे दोन पुत्र- भाऊ- होते. त्यांतील वत्साची आई शुद्र होती. तेव्हा मेधातिथी त्याला म्हणाला की, 'तू यामुळे ब्राह्मण नाहीस. शूद्र आहेस.' तेव्हा वत्साने एकदम अग्निदिव्य केले. अम्मीने त्याला दग्ध केले नाहीच. उलट तो मेधातिथीपेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण (ब्रह्मीयान्) ठरला. हीन- कुळजन्म हा स्त्रियांनाही त्याकाळी बाधक ठरत नसे. 'स्त्रीरत्नं दुष्कुलाद् अपि' हे मनुवचन प्रसिद्ध आहे. तसे सांगून मनूने अक्षमाला व शारंगी यांची उदाहरणे दिली आहेत (मनु. ९.२३ व २४). या दोघी अधमयोनिजा होत्या. पण वसिष्ठ व मंदपाल या ऋषींनी त्यांचे पाणिग्रहण केले व त्या भारतीयांना पूज्य ठरल्या. अक्षमाला हीच अरुंधती होय. विवाहसमयी आजही वधूवरांनी तिला वंदन करावयाचे असते. (श्रीधरशास्त्री पाठक- अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, पृ. ५६) ब्रह्मपुराणातही ती ती विशिष्ट कर्मे करून शुद्र, वैश्य, क्षत्रिय यांना कोणताही वर्ण प्राप्त करून देता येतो; शुद्र ब्राह्मण होऊ शकेल, वैश्य क्षत्रिय होऊ शकेल, असे प्रतिपादिले आहे. (२२३-१४,३२). 'शूद्र आगमसंपन्न असेल तर तो संस्कृत ब्राह्मण होतो', हा महाभारतातला विचार येथेही पुन्हा आलेला आहे. आणि वर असे सांगितले आहे की 'अशा आगनसंपन्न शूद्राची ब्राह्मणानेही सेवा करावी' हे मत स्वयं ब्रह्मा सांगतो (आचार्य सेन– भारतवर्ष में जातिभेद- पृ. ४० ).

समसंधीचे तत्त्व
 शुद्र आगमसंपन्न झाला तर त्याला ब्राह्मण मानावे असे अर्थी ज्या त्या काळचे धर्मवेत्ते म्हणतात त्याअर्थी शूद्राला आगमसंपन्न होण्याची संधी तेव्हा होती हे निर्विवाद आहे. संधिसमानत्वाचे तत्त्व हे समाजाच्या उत्कर्षाला अत्यंत अवश्य असते. उत्तरकालीन धर्मशास्त्रज्ञांनी हेच नष्ट केल्यामुळे हिंदुसमाजाला अवकळा आली. प्राचीन काळी हे तत्त्व केवळ बोलण्यापुरते किंवा ग्रंथापुरते नव्हते, हे अनेक उदाहरणांवरून, विशेषतः विवाहबाह्य संततीतून जे थोर पुरुष झाले त्यांच्या चरित्रांवरून स्पष्ट दिसते. व्यास हा धीवरीचा (कोळणीचा) पुत्र, पराशर श्वपाकीचा (चांडाळीचा) आणि वसिष्ठ हा वेश्येचा पुत्र होता. ऐतरेय ब्राह्मणाचा कर्ता महीदास इतरा नामक शूद्र स्त्रीपासून झाला होता. दीर्घतमा ऋषीची माता उशिज ही शूद्र दासी होती (आचार्य सेन- भारतवर्ष में जातिभेद' पृ. १२, १४, २४). कवष ऐलूष व सत्यकाम जाबाली यांच्या कथा प्रसिद्धच आहेत. विवाहबाह्य संबंधातून उत्पन्न झालेले हे सर्व पुरुष हीन गणले गेले असते, त्यांना उत्कर्षांची संधी मिळाली नसती तर भारतीय संस्कृती किती दरिद्री राहिली असती याचा विचार मनात आला की पुढील काळातील धर्मशास्त्रज्ञांच्या हेकटपणाचा उद्वेग येतो. पूर्वकाळच्या ऋषींची अशी कोती दृष्टी नव्हती, हे आपले भाग्यच होय. काठकसंहितेत म्हटले आहे की, 'ज्ञान व तपस्या या गुणांमुळे मनुष्य ब्राह्मण ठरतो. मग त्याच्या मातापित्यांची चौकशी कशाला करता? वेद ब्राह्मणाचा पिता व तोच त्याचा पितामह होय' (कित्ता पृ. ४१)

वर्णसंकर
 ब्राह्मण्य, क्षत्रियत्व, वैश्यत्व व शूद्रत्व- म्हणजेच मनुष्याचा वर्ण असा त्याच्या गुणकर्मांवर अवलंबून असल्यामुळे आंतरवर्णीय विवाहांवर त्या काळी कसलेच बंधन नव्हते हे उघड आहे. कोणत्याही कुळात कोणत्याही वर्णाचा पुरुष वा स्त्री निर्माण होत असे याचा हाच अर्थ आहे. पण या संबंधात तर्क करीत बसण्याचे कारण नाही. महाभारतात तसे स्पष्ट सांगितलेले आहे. वनपर्वात नहुष व युधिष्ठिर यांचा संवाद आहे. त्यांत नहुषाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिर म्हणाला, 'हे नागेन्द्रा, सध्या सर्व वर्णाचा संकर झालेला असल्यामुळे, अमक्याची अमुक जाती आहे, असे ठरविणे कठिण आहे. सर्व लोक सर्व वर्णांच्या स्त्रियांच्या ठायी अपत्ये उत्पन्न करतात. तेव्हा ब्राह्मण कोणास म्हणावे या तुझ्या प्रश्नाला, ज्याच्या ठायी वृत्त, शील, सदाचार ही आढळतील त्यालाच ब्राह्मण म्हणावे, असे मी उत्तर दिले.'
 आंतरजातीय विवाह सर्रास चालू होते याला दुसरे एक बलवत्तर प्रमाण आहे. धर्मसूत्रकार व स्मृतिकार यांनी अशा विवाहांतून निर्माण झालेल्या प्रजेच्या जाती कोणत्या याची विपुल चर्चा केली आहे. आंतरजातीय विवाहाचे म्हणजेच वर्णसंकराचे दोन प्रकार मानले जात. श्रेष्ठ वर्णाचा पुरुष व कनिष्ठ वर्णाची स्त्री यांचा विवाह तो अनुलोम व याउलट तो प्रतिलोम प्रारंभीचे सूत्रकार व स्मृतिकार यांपैकी बऱ्याच शास्त्रकारांनी अनुलोम विवाह विहित मानलेला होता. तेव्हा तो सर्रास घडत असल्यास नवल नाही. पण प्रतिलोम विवाहही विपुल होत असत. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, 'चारही वर्णांचा परस्परसंबंध होऊ शकत असल्यामुळे केवळ अनुलोम विवाह घडून आले असे नसून मनुष्यस्वभावानुपार प्रतिलोम विवाहही घडत गेले. याज्ञवल्क्याने सूत, वैदेहिक, चांडाल, मागध, क्षत्ता, आयोगव, रथकार अशी भिन्न भिन्न वर्णांच्या संयोगाने झालेल्या प्रतिलोम संततीच्या जातींची नावे दिली आहेत. त्यांच्या मते ही सर्व असत् संतती होय. इतरही अनेक स्मृतिकारांनी अशाच याद्या दिल्या आहेत. (अस्पृध्यतेचा शास्त्रार्थ- पृ. ५६ ते ५९). प्रतिलोम संतती सर्व शूद्र मानली जात असे. अनुलोम संततीही काही शास्त्रकारांच्या मते शुद्र ठरे. आणि या वर्णांची संख्या सारखी वाढत होती हे तर स्पष्टच आहे. तेव्हा अनुलोम व प्रतिलोम असे दोन्ही मिश्र विवाह मागल्याकाळी विपुल घडत यात शंका नाही. प्रारंभी हे निषिद्ध मानलेले नव्हते. आयोगव ही जाति प्रतिलोम; म्हणून शूद्र होय. पण ऐतरेय ब्राह्मणातील प्रसिद्ध मंत्रातील आविक्षित मरुत्त हा राजा, ज्याचे वर्णन धैर्यशील यज्ञशील जितेंद्रिय, सूर्यासारखा तेजस्वी, पृथ्वीसारखा क्षमाशील, बृहस्पतीसारखा बुद्धिमान असे केले आहे, ज्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते, ज्याच्या यज्ञांत स्वतः बृहस्पतीने याजन केले होते, (महाभारत- आश्वमेधिक पर्व अ. ४) ज्याच्या सभेत विश्वेदेव सभासद होते, तो मरुत्त राजा आयोगव होता. (डॉ. देवदत्त भांडारकर, इंडियन कल्चर,- ऑक्टो. १९३४; पृ. २७७.) महाभारत रचयिता लोमहर्षण हा सूत म्हणजेच असाच शूद्र होता हे मागे सांगितलेच आहे.
 म. म. पां. वा. काणे यांनी आपल्या ग्रंथात आंतरजातीय विवाहांची माहिती दिली आहे तीवरून हेच दिसते. बौधायन, आपस्तंब, गौतम इ. धर्मसूत्रकार व मनु, याज्ञवल्क्य इ. स्मृतिकार यांची ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यातील अनुलोम विवाहाला पूर्ण संमती होती. काहींनी या द्विजांनी शूद्र स्त्रीशी विवाह करण्यासही संमती दिलेली आहे. पण इतरांनी या विवाहाचा कडक निषेध केला आहे. आणि ज्यांनी संमती दिली आहे त्यांनीसुद्धा खळखळ करूनच दिली आहे. पण यावरून त्रैवर्णिकांत मिश्रविवाह होत होते यात कसलीच शंका नाही. हे सांगून काणे यांनी तशा विवाहांची ऐतिहासिक काळातली उदाहरणे दिली आहेत. गुप्तवंशातील चंद्रगुप्त २ रा (वैश्य) याची राजकन्या वाकाटक नृपती रुद्रसेन २ रा (ब्राह्मण) याची पट्टराणी होती. कदंबराजा ककुस्थवर्मा (ब्राह्मण) याने आपल्या कन्यांचे विवाह गुप्त (वैश्य) व इतर अनेक क्षत्रिय घराण्यांतील राजपुत्रांशी लावून दिले होते. हे प्रतिलोम विवाह होते. वाकाटक नृपती देवसेन याचा मंत्री हस्तिंभोज याच्या एका ब्राह्मण पूर्वजाने ब्राह्मण व क्षत्रिय स्त्रिया केल्या होत्या. प्रसिद्ध संस्कृत कवी राजशेखर याची स्त्री अवन्तीसुंदरी ही चव्हाण कुलातील क्षत्रियकन्या होती. विजयनगरचा राजा बुक्क १ ला याने आपली कन्या विरूपादेवी वोडेय या ब्राह्मणाला दिलेली होती. प्रतिहार राजकुलाचा संस्थापक हरिश्चंद्र हा ब्राह्मण असून त्याची स्त्री क्षत्रिय होती. गुहिल कुळाचा संस्थापक गुहदत्त हा ब्राह्मण होता. त्याचा एक वंशज भर्तृपट्ट याने एका राष्ट्रकूट राजकन्येशी लग्न केले होते. सेनापती पुष्यमित्र शुंग याचा पुत्र अग्निमित्र याने मालविका या क्षत्रिय राजकन्येकशी विवाह केला होता. 'कादंबरी'चा लेखक प्रसिद्ध कवी बाण यांची सावत्र आई शूद्र होती. तिचे दोन मुलगे चंद्रसेन व मातृसेन हे बाणाचे भाऊ होते. स्वतः बाणानेच आपल्या हर्षचरितात हे सांगितले आहे. सम्राट हर्षवर्धन (वैश्य) याने आपली कन्या वलभीचा क्षत्रिय राजा ध्रुव भट याला दिली होती. त्याची बहीण राज्यश्री ही कनोजचा गृहवर्मा याची पट्टराणी होती. वर उल्लेखिलेला भर्तृपट्ट अल्लट याने हूण राजकन्या हरियादेवी हिचे पाणिग्रहण केले होते. कलचूरी घराण्यातील यशकर्ण हा, कर्णदेव व हूण राजकन्या अव्वलदेवी, यांचा पुत्र होता. (काणे- धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, भाग १ ला- पृ. ४४७ ते ४५१. शिवाय पहा— बाँबे लॉ-रिपोर्टर १९३६ ऑगस्ट १५. म. म. काणे यांचा लेख- 'भारतवर्षांतील मिश्रविवाह' स्मृती व शिलालेख यांच्या आधारे. कुलगुरु चिं. वि. वैद्य. मध्ययुगीन भारत, भाग १ ला, पृष्ठ ७८) अशा रीतीने आंतरजातीय विवाह इ. सनाच्या ९ व्या १० व्या शतकापर्यंत चालू होते. नंतर ते बंद झाले असे म. म. काणे व कुलगुरू वैद्य या दोघांनीही आपले मत दिले आहे. 'दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या मालेतील 'दी क्लासिकल एज' या खण्डाच्या प्रस्तावनेत डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी म्हटले आहे की, 'या कालखंडात (इ. स. ३२० ते इ. स. ७४०) अनुलोम विवाह ही गोष्ट नित्याचीच होती व प्रतिलोम विवाहही अगदी दुर्मिळ होते असे नाही.' याच खण्डातील 'सोशल कंडिशनस्' या प्रकरणात डॉ. यू. एन्. घोषल यांनी या मुनशींच्या मताला साधार, सप्रमाण पुष्टी दिली आहे.

व्यवसायसंकर :
 विवाहाप्रमाणेच व्यवसायबंधनेही मागल्याकाळी स्मृतींतल्याप्रमाणे कडक नव्हती. म. म. काणे यांनी म्हटल्याप्रमाणे त्या प्राचीनकाळी हिंदुसमाजात वर्णभेद नसून वर्गभेद होता हेच खरे. वेदातील अनेक सूक्ते क्षत्रियांनी रचलेली आहेत. ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पहिले दहा मंत्र मधुच्छंद याने रचलेले आहेत. स्वतः विश्वामित्राची सूक्ते ऋग्वेदात आहेतच. गायत्री मंत्राचा द्रष्टा तोच होता हे पूर्वी सांगितलेच आहे. चंद्रवंशीय राजा पुरूरवा हाही अनेक मंत्रांचा द्रष्टा होता. शंतनूचा भाऊ देवापी हा तर मंत्रकर्ता असून तो पौरोहित्यही करीत असे. (आचार्य सेन, पृ. ३२) ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ९४ वे सूक्त नागवंशीय कद्रूचा पुत्र अर्बुद याने रचले आहे. तैत्तिरीय संहितेत म्हटल्याप्रमाणे त्याच मंडलातील १८९ व्या सूक्ताची ऋषी सर्पराज्ञी ही होती. ७६ व्या सूक्ताचा कर्ता नागजातीय इरावतपुत्र जरत्कर्ण हा होता. पहिल्या लेखात सांगितलेच आहे की आर्य हा वंशवाचक शब्द नव्हता. यज्ञनिष्ठा, वेदसंस्कृती, संस्कृत वाणी ही आर्यत्वाची लक्षणे होती. त्यांचा स्वीकार करणारे कोणत्याही वंशातले असले तरी ते आर्यच ठरत, हे या सूक्तकार नागांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. दम हा सूर्यवंशातला विख्यात राजा. त्याने आपल्या पित्याच्या श्राद्धासाठी राक्षसकुलातील ब्राह्मण बोलाविले होते. आणि सूर्यवंशातील राजे हा आचार नेहमीच पाळीत असत (वायुपुराण). (आचार्य सेन– संस्कृतिसंगम, पृ. २६, ३४). या उदाहरणांवरून तो सिद्धान्त जास्तच दृढ होतो. नागकुलांतील ऋषी सूक्ते रचीत. राक्षसकुलांतील ब्राह्मण श्राद्धाला योग्य ठरत.

ब्रह्मवेत्ते क्षत्रिय :
 क्षत्रिय जसे मंत्रद्रष्टे होते तसेच ते औपनिषदिक ब्रह्मविद्येचे ज्ञाते व उपदेष्टेही होते. अनेक ब्राह्मणांनी क्षत्रिय राजांकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्याच्या कथा उपनिषदांत आहेत. गार्ग्यनामक ब्राह्मणास काशीचा राजा अजातशत्रु याने ब्रह्मविद्या शिकविली. (बृहदारण्यक, २-१०-१). जीवलपुत्र प्रवाहण या राजाने गौतमनामक ब्राह्मणाला ब्रह्मज्ञान सांगितले. (बृहदारण्यक, ६-२-१) याच प्रवाहणाकडून शलावतपुत्र शिलक व दाल्भ्य गोत्री चैकितायन हे ब्राह्मण ब्रह्मविद्या शिकले (छांदोग्य, १–८–१). केकयपुत्र अश्वपती राजाकडे प्राचीनशाल, सत्ययज्ञ इ. पाच ब्राह्मण शिष्य म्हणून आले व त्याच्यापासून त्यांनी ब्रह्मज्ञान हस्तगत केले (छांदोग्य, ५-११). जनक राजा ब्रह्मवेत्ता होता हे प्रसिद्धच आहे. तेव्हा वेदमंत्रांचे दर्शन व ब्रह्माचे ज्ञान हे ब्राह्मणांनाच होत असे असे नाही. क्षत्रियही त्या क्षेत्रात तितकेच श्रेष्ठ होते. यज्ञांत पौरोहित्य करण्याचा म्हणजे याजनाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे अशी आज समजूत आहे. तीही चुकीची आहे. क्षत्रिय देवापीने याजन केल्याचे उदाहरण वर दिलेच आहे. ऐतरेय ब्राह्मणातील श्यार्पण्य शायकायनाचे उदाहरण असेच आहे. ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्याचा अधिकार तर त्याकाळी सर्वांनाच- शुद्रांनासुद्धा होता, हे यजुर्वेदातील 'ही कल्याणकारक वाणी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चारण या सर्वांसाठी उच्चारली,' या मंत्रावरून स्पष्ट होते. 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र या सर्वामध्ये तू तेज निहित कर' या तैत्तिरीय संहितेतील मंत्रावरून हेच दिसते. (पं. सातवळेकर, पृ. ४४, ४६). हे उतारे देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'ही समानता पाहण्यासारखी व विचार करण्यासारखी आहे.'

शूद्रांची प्रतिष्ठा
 इ. स. पूर्व ४००० ते इ. स. पूर्व १००० हा वेदकाळ असे मानले जाते. या काळाच्या अखेरीस वर्ण बहुतेक जन्मनिष्ठ झाले असे पंडितांचे मत आहे. तरी त्यानंतरही विवाहविषयक व व्यवसायविषयक बंधने फारशी कडक नव्हती. शुद्र जातीलाही उत्कर्षाला या काळात कसा वाव मिळत असे हे पाहिले असता त्या काळच्या समानसंधित्वाच्या धोरणाची कल्पना येईल. राजाचे मंत्री किती असावे व ते कोणत्या वर्णांचे असावे याविषयी भीष्मांनी पुढीलप्रमाणे अभिप्राय दिला आहे. 'राजाचे चार ब्राह्मण मंत्री, आठ क्षत्रिय मंत्री, एकवीस वैश्य मंत्री, तीन शुद्र मंत्री व एक सूत मंत्री- (सूत हा प्रतिलोम विवाहजन्य होता) असे मंत्री नेमावे.' (शांति.- ८५-८) ब्राह्मणांपेक्षा शुद्र मंत्र्यांची संख्या एकानेच कमी आहे हे ध्यानात ठेविले पाहिजे. 'तीन वर्णांची सेवा हाच शुद्राचा धर्म होय.' असे त्या वेळी शास्त्र होते. महाभारतातही तसे शास्त्र अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. मागल्या त्या काळात परस्परविरुद्ध असे दोन विचारप्रवाह चालू होते असे वर अनेकदा सांगितले आहे याचा अर्थ यावरून स्पष्ट होईल. मागल्या काळातील रामायण, महाभारत, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यांसारख्या ग्रंथांत वरचेवर भर पडत गेली आहे, हे प्रसिद्धच आहे. ज्याला जे वाटेल ते त्याने लिहावे व वरच्यासारख्या ग्रंथांत त्याचा प्रक्षेप करावा असा प्रकार कित्येक शतके चालू होता. ऋग्वेदात मागून भर पडली नाही अशी समजूत आहे. पण त्यातील दहावे मंडल मागून रचलेले आहे, असे अर्वाचीन पंडितांचे मत आहे. अशा प्रकारामुळे या ग्रंथांचे ग्रंथ हे रूप जाऊन त्यांना कोश हे रूप प्राप्त झालेले आहे. त्यामुळे त्यांत अत्यंत परस्परविरुद्ध अशी मते ठायी ठायी आढळतात. आणि भर घालणाऱ्यांनी संदर्भाचासुद्धा विचार कित्येक वेळा केला नसल्याने एकाच व्यक्तीच्या तोंडी व लागोपाठ दोन वाक्यांतही अशी मते आढळतात. यामुळे कोणते मत कोणाचे हे निश्चयाने सांगता येत नाही. पण तरीही भिन्न भिन्न विचारसरणी कोणत्या होत्या, भिन्न तत्त्वज्ञाने कशी उदय पावत होती हे मात्र निश्चित कळते. असो.
 शुद्रांना मंत्रिपदापर्यंत प्रवेश असल्यामुळे, 'द्विजसेवा हाच त्यांचा धर्म,' या शास्त्राचा किती मुलाहिजा राखला जात असेल याची कल्पना सहज येईल. आणि शूद्राला राजपदही दुष्प्राप्य नव्हते हे पाहिल्यावर तर त्याविषयी शंकाच राहाणार नाही. 'शुद्र राजा होऊ शकेल की नाही?' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म म्हणतात, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शुद्र असला तरी, त्याचा तो सन्मान करणे सर्वथैव योग्यच आहे.' (शांति. ७८- ३८). भीष्मांनी सांगितलेले हे मत केवळ ग्रांथिक नाही. पुराणांच्या मताअन्वये भारतवर्षांत पहिले विशाल साम्राज्य स्थापन करणार चंद्रगुप्त मौर्य हा शूद्र होता. त्याचा पुत्र बिंदुसार व नातू सम्राट अशोक हे अर्थातच शूद्र होते. दक्षिणेतील पैठणच्या सातवाहनांचे घराणे, पुराणांच्या मते, शुद्रच होते. यांचे साम्राज्य तर साडेचारशे वर्षे चालू होते. यावरून असे दिसते की, शास्त्र काहीही सांगत असले तरी प्रत्यक्षात लोकांना यात काही विपरीत वाटत नव्हते. त्यांचा या सम्राट घराण्यांना पूर्ण पाठिंबा होता.
 शक, यवन, दरद, पल्हव, निषाद, किरात, कांबोज, शबर, पुलिंद, या जमाती भारतातील आदिवासी जमाती होत असे आजचे इतिहासवेत्ते म्हणतात. शक, यवन, दरद, पल्हव हे मूळचे क्षत्रिय पण संस्कारलोपामुळे व ब्राह्मणांच्या अदर्शनाने शुद्र झालेले लोक असे मनूने म्हटले आहे. पण इतर अनेक शास्त्रकारांनी यांना संकरज म्हणून शूद्र ठरविले आहे. महाभारतात यांना नरकगामी चांडाळतुल्य लोक असे म्हटले आहे. पण महाभारतातच अनेक ठिकाणी, या लढाऊ जमाती असून जरासंध, भगदत्त, दुर्योधन यांच्या सैन्यांत ते शौर्याने लढले, असे त्यांचे वर्णन केले आहे. केवळ जन्मावरून काही जमातींवर शिक्के मारून ठेवणे व त्यांना श्रेष्ठ व्यवसाय करण्यास बंदी करणे किती अशास्त्रीय आहे हे यावरून दिसून येईल. नवव्या-दहाव्या शतकानंतर असली बंधने फारच कडक झाली व त्यांमुळेच हिंदुसमाजाचा नाश झाला.
 'नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो' इ. यजुर्वेदातील (अ. १६ । २७) मंत्र देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'सुतार, लोहार, रथकार, कुंभार, निषाद, भिल्ल, हे सर्व कारागीर शूद्र. यांना नमन करावे असे वेदांमध्ये सांगितलेले आहे. हे मंत्र द्विजांच्या तोंडचे आहेत. त्या दृष्टीने त्यांची महती विशेष आहे. कालाच्या ओघामध्ये विचारांना चालना न मिळाल्यामुळे या नमस्कारार्ह जाती पुढे हीन व कायमच्या बहिष्कृत झाल्या. क्षुद्र विषमता शेवटी कोणत्या थरास जाऊन पोचते व ती समाजाला कशी बाधक होते, हे पहावयाचे असल्यास हिंदुसमाजातील ही स्पर्शास्पर्शाची चाल पहावी.' (स्पर्शास्पर्श- पृ. १०७, १०८.)
 'शूद्रांमधील अस्पृश्यत्व' या प्रकारणात पं. सातवळेकरांनी प्राचीन काळातील समतेचा व सध्याच्या विषमतेचा अनेक प्रकारे ऊहापोह केला आहे. त्यांतच मनुस्मृती, कूर्मपुराण, यमस्मृती, पराशरस्मृती, बृहत्पराशरस्मृती, यांतील अनेक आधार देऊन अन्नपाण्याच्या स्पर्शास्पर्शासंबंधी सध्या ज्या अतिरेकी कल्पना रूढ झाल्या आहेत त्या मागच्या काळात मुळीच नव्हत्या, असे दाखवून दिले आहे. गोपाल, दास, नापित, कुंभार इ. अनेक शुद्र गणलेल्या जातींच्या हातचे अन्न खाण्यास, पाणी घेण्यास वरील शास्त्रकरांची मुळीच हरकत नाही. अनेक स्मृतिकारांनी सरसकट शुद्र असा शब्द वापरून ते भोज्यान्न आहेत असे मत दिले आहे. कोणी काही अल्पस्वल्प अशी बंधने घातली आहेत. पण उलट आपत्काळी कोणाच्याही हातचे अन्न खाण्यास हरकत नाही, असेही काही स्मृतिकारांनी सांगितले आहे. एवढी एक गोष्ट जरी वरिष्ठ हिंदूंनी ध्यानात ठेवली असती तरी हिंदुसमाज आजच्यासारखा शतधा दुभंगला नसता; सर्व वर्णांचे व जातींचे लोक एकमेकांत मिसळत राहिले असते आणि सहवासाने त्यांच्यातील सामरस्य दृढ होऊन त्यांचे सामर्थ्य वर्धिष्णु होत राहिले असते.
 शूद्रांना ब्रह्मचर्य, संन्यास या आश्रमांचा व गायत्रीमंत्राचाही अधिकार पूर्वी होता, हेही पंडित सातवळेकरांनी याच प्रकरणात, अनेक स्मृतिवचने देऊन, सिद्ध केले आहे. अन्नपाण्याच्या स्पर्शास्पर्शाविषयीच्या त्यांच्या मताला म. म काणे (धर्मशास्त्राचा इतिहास- खंड २ रा, भाग १ ला, पृ. १६१-६२), कुलगुरु चिं. वि. वैद्य (मध्ययुगीन भारत, भाग २ रा, पृ. ३२९-३०) यांनी पुष्टी दिली आहे.

गणराज्यांतील समता :
 समता हे समाजाच्या उत्कर्षाला, दृढतेला, संघटित वृत्तीला अत्यंत पोषक असे तत्त्व आहे. आणि चातुर्वर्ण्य म्हणजे मूर्तिमंत विषमता. अस्पृश्यता ही तर या व्यवस्थेतील क्रूर अशा विषमतेची परिसीमा होय; म्हणूनच हिंदु- समाजातील विघटनेच्या विषबीजांचा विचार करताना हिंदूंनी शिरोधार्य मानलेल्या समाजरचनेच्या या तत्त्वांचा आपण तपशिलाने विचार करीत आहोत. त्यात असे दिसून येत आहे की प्राचीन काळी धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्वच क्षेत्रांत जास्तीत जास्त समता स्थापिण्याचे प्राचीन समाजधुरीणांनी पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. उत्तर काळात, साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या सुमारास समतेच्या या तत्त्वांचा पराभव झाला आणि त्यानंतर एक- दोन शतकांतच हिंदू समाजाचाही पराभव झाला हे दारुण सत्य आजच्या हिंदूंना प्रतीत व्हावे यासाठीच, समता व उत्कर्ष आणि विषमता व विनाश यांमध्ये निश्चित कार्यकारणभाव आहे, हे ऐतिहासिक प्रमाणांनी सिद्ध करण्याचा या लेखात प्रयत्न केलेला आहे. भारताचा इ. स. १००० पर्यंतचा इतिहास अत्यंत वैभवाचा, उत्कर्षांचा, समृद्धीचा, व पूर्णस्वातंत्र्याचा होता हे आतापर्यंत अनेक वेळा दाखविलेच आहे. तोच काळ समतेचा, एकरूपतेचा, सहकार्याचा व संघटनेचा होता हे या लेखात आपण पहात आहोत. त्यासंबंधीचाच आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा आता द्यावयाचा आहे. तो म्हणजे भारतातील गणराज्यांचा किंवा लोकशाहीचा इतिहास हा होय.
 भारतामध्ये प्राचीन काळी फार मोठ्या प्रमाणात गणराज्ये किंवा प्राजके (रिपब्लिकस्) स्थापन झाली होती व त्यांचा कारभार दीर्घकालपर्यंत यशस्वीपणे चालला होता याविषयी आता दुमत राहिलेले नाही. डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांची 'हिंदू पॉलिटी' हा ग्रंथ या विषयात बव्हंशी प्रमाण मानला जातो. काही तपशिलात त्यांच्या प्रतिपादनाविषयी अनेकांनी मतभेद व्यक्त केले आहेत. पण गणराज्यांच्या स्वरूपाविषयीची त्यांनी काढलेली सामान्य रूपरेखा बहुमान्य झाली आहे. येथे आपल्याला तपशिलात शिरण्याचे कारण नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, न्यायदानातील पक्षपात यामुळे जी विषमता समाजात रूढावत होती तिला गणराज्यांमुळे कसा पायबंद बसला होता व हिंदुसमाजात काही प्रदेशांत तरी बऱ्याच अंशी समता कशी नांदत होती येवढेच आपणांस पहावयाचे आहे. अगदी प्रारंभीच्या काळापासून समता व विषमता- संघटना व विघटना- यांचे प्रवाह चालू होते. पण इ. स. १००० पर्यंत समतेच्या प्रवाहाचा जोर बराच असल्यामुळे हिंदुसमाज संघटित राहू शकला व स्वातंत्र्य, साम्राज्य, स्वधर्म, स्वसंस्कृती यांचे रक्षण करू शकला, हे या लेखाचे विचारसूत्र वर अनेकवेळा सांगितलेच आहे. त्यातील समतेच्या, संघटनेच्या प्रवाहातील एक अनुकूल धारा या दृष्टीने गणराज्यांचा विचार येथे करावयाचा आहे.
 डॉ. जयस्वाल यांच्या मते इ. स. पूर्व १००० ते इ. स. ५५० हा गणराज्यांचा कालखंड होय. याच कालात नंद, मौर्य, शुंग, सातवाहन, कुशाण, गुप्त इ. घराण्यांची साम्राज्ये भारतात होऊन गेली. आणि या कालखंडात भारताचे खरे वैभव साम्राज्यातच दिसत होते. पण याच काळात उत्तर भारतात जी गणराज्ये नांदत होती त्यांचा इतिहास भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अगदी उपेक्षणीय आहे असे नाही.
 मागील लेखात भारतीयांच्या राष्ट्रनिष्ठेचे ग्रीक ग्रंथकारांच्या आधाराने वर्णन केले आहे. त्याच आरियन, कर्टिस, डियोडोरस, प्लुटार्क, या ग्रंथकारांच्या आधाराने आपल्या 'हिंदु पॉलिटी' या ग्रंथात, डॉ. जयस्वाल यांनी भारतातील प्राजकांचे वर्णन केले आहे. त्यातील समता, स्वातंत्र्य, नागरिकांची प्रतिष्ठा या दृष्टीने अवश्य तेवढेच उतारे पुढे देतो. (पृष्ठांक हिंदूपॉलिटी या ग्रंथातले आहेत.) डियोडोरस म्हणतो, 'सौभूती गणराज्यात अतिशय हितावह असे कायद्याचे राज्य आहे. आणि त्यातील शासनपद्धती प्रशंसनीय अशीच आहे. भारतातील इतर प्रदेशांपेक्षा येथे नागरिकांना प्रतिष्ठा जास्त आहे. सौभूती आणि कठ राज्यात स्त्रीपुरुष आपापले विवाह स्वतःच ठरवितात. त्यात हुंड्याचा वा श्रेष्ठकनिष्ठ कुलाचा प्रश्न येत नाही. रूपाला मात्र फार महत्त्व असते. व्यासनदीजवळील गणराज्यातील लोक कृषिप्रिय, व शूर असून तेथे महाजनसत्ता (ॲरिस्टॉक्रसी) होती. हे महाजन न्यायाने व संयमाने सत्ता चालवीत. (अरियन) क्षुद्रक व मालव गण यांचा पराभव शिकंदराने केला असे ग्रीक लेखक म्हणतात. पण जयस्वालांच्या मते हे खरे नाही. कारण पुढील काळातील पतंजलीने, या दोन गणराज्यांनी केलेले संयुक्त प्राजक अस्तित्वात होते, असे सांगून त्यांतील क्षुद्रकांचा विजय झाला, असे म्हटले आहे. आणि शिकंदरांशी वाटाघाटी करण्यास त्यांचे जे १०० प्रतिनिधी आले होते त्यांच्या वर्णनावरून, ते जित लोक होते, असे दिसत नाही. शिकंदराने इतर कोणाचे केले नाही असे त्यांचे स्वागत केले. प्रत्येकास त्याने बसावयास सुवर्णासन दिले होते व शामियान्यात जरीचे व मखमलीचे पडदे सोडले होते. आपल्या स्वातंत्र्याचा या प्रतिनिधींना अभिमान वाटत होता आणि, 'आम्ही शतकानुशतक हे स्वातंत्र्य अभंग राखिले आहे,' असे अभिमानाने ते सांगत होते. (कर्टिस) अंबष्ठ गणराज्याबद्दल कर्टिसने म्हटले आहे की, 'शौर्यधैर्यात व लष्करी बळात या राज्यातील लोक भारतातील इतर प्रदेशांपेक्षा अणुमात्र कमी नव्हते. आणि त्याचे शासन लोकायत्त होते.' पंजाबातील गणराज्यांविषयी डियोरस म्हणतो, 'अनेक पिढ्यानंतर अनियंत्रित राजसत्ता या लोकांनी नष्ट केली व लोकायत्त शासने स्थापन केली. त्यानंतर इतरत्रही अनेक नगरांनी लोकशासनाचाच अवलंब केला.' (पृ. ६०, ६१, ६४, ६७, ७५)
 या वर्णनावरून भारताच्या गणराज्यांतील समानतेची कल्पना येईल. सर्व नागरिक जेथे स्वयंशासनाचे अभिमानी असतात, प्रत्येकाला जेथे मताधिकार असतो, स्त्री-पुरुषांना जेथे विवाहस्वातंत्र्य असते तेथे चातुर्वर्ण्यातील विषमता कितपत नांदू शकेल हे सांगावयास नको. या गणराज्यांमध्ये सर्व जनता शस्त्रधारी असून त्यांची लोकसेना (नेशन इन् आर्मस्) स्वातंत्र्यरक्षणासाठी सदैव सिद्ध असे. त्यामुळेच ही गणराज्ये समर्थ व बलाढ्य होती. सर्व जनता हीच सेना असलेल्या राज्यात जन्मनिष्ठ विषमता नांदणे फार कठिण आहे. आणि तशी ती नांदत नव्हती, तेथे समता होती, हे महाभारतकरांनीच सांगितले आहे. भीष्म म्हणतात, की या गणराज्यात 'जात्या च सदृशाः सर्वे कुलेन सदृशाः तथा ।' जातीने व कुलाने सर्व लोक सम होते. (शांतिपर्व अ. १०७, ३०)
 गणराज्यांत समता होती, शास्त्रविहित विषमता नव्हती याचे आणखी एक प्रमाण जुन्या ग्रंथांत मिळते. मनु आणि आपस्तंब हे चातुर्वर्ण्याचे अभिमानी शास्त्रकार होते. त्यांची गणराज्यांतील लोकांवर वक्रदृष्टी होती. आपस्तंबाने गणराज्यांकडून दान घेण्यास ब्राह्मणांना मनाई केलेली आहे. आणि मनूने मल्ल लिच्छवी या गणराज्यांतील लोकांना व्रात्य (भ्रष्ट आर्य) ठरविले आहे. (डॉ. जयस्वाल- मनु आणि याज्ञवल्क्य, पृ. ४०) या शास्त्रकारांनी उपदेशिलेली विषमता त्या गणराज्यांत नव्हती, तेथे त्यांच्या मताप्रमाणे सब गोलंकार होता, याचा हा अप्रत्यक्ष पुरावा म्हणून तरी मानता येईल असे वाटते.
 वर सांगितलेच आहे की त्या काळात भारताचे सर्व वैभव साम्राज्यसत्तांनीच वाढविले होते. त्यामानाने गणराज्यांची महती थोडी, हे खरे. पण भारतात त्याकाळी व्यक्तीची प्रतिष्ठा, समता, स्वातंत्र्य या तत्त्वांचे प्रवाह, अल्पप्रमाणात का होईना, पण दीर्घकाल वहात होते, एवढे यावरून निश्चित दिसते.

समता हेच सामर्थ्य :
 आता राजसत्ता, साम्राज्यसत्ता यांचा वरील दृष्टीने विचार करून राजकीय क्षेत्रातल्या समतेचा विचार संपवू या सत्तांचे वर्णन करताना डॉ. जयस्वाल म्हणतात की येथले राजेसुद्धा अनियंत्रित असे कधीच नव्हते. प्रारंभीच्या काळात तर सभा, समिती या लोकायत्त संस्थांचे त्यांच्यावर प्रत्यक्षच नियंत्रण असे इतकेच नव्हे तर त्याच संस्था राजाची निवड करीत. पुढील काळात राजपद आनुवंशिक झाले पण तरीही लोक अर्वाचीन काळाप्रमाणे राजशासनाविषयी उदासीन नव्हते. त्याविषयी ते फार दक्ष असत. आणि हेच, जयस्वालांच्या मते, भारताच्या शासनाचे त्या काळात मुख्य बळ होते. राजशासनरूप वृक्षाची मुळे त्याकाळी लोकजीवनात खूप खोलवर गेलेली असत. भीष्मांनी गणराज्यांतील समतेविषयी जशी ग्वाही दिलेली आहे तशी राजसत्तांकित प्रदेशांतील समतेविषयी कोणी दिलेली नाही हे खरे. पण आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, लोक जागृत व दक्ष असल्यानंतर चातुर्वर्ण्य रूढावले असले तरी त्यांतील विषमतेचे विष मारले जाणारच. शूद्र हा मंत्रिपदाला ज्या समाजांत जाऊ शकतो तेथे, शास्त्रांनी काहीही सांगितले तरी, विषमता किती राहील हे दिसतच आहे. लोकजीवनात शासनाची मुळे जाऊन तेथून मिळणाऱ्या जीवनरसावरच तो वृक्ष जगत असताना विषमतेला पायबंद पडणारच. तसा तो या काळात निश्चित पडला होता. म्हणून तो समाज आजच्यापेक्षा अधिक एकरूप, सम, समरस, समसुखदुःखी, समानहृदय होऊ शकला. व त्यामुळेच तो जयिष्णु वर्धिष्णु, समृद्ध व सामर्थ्यसंपन्न असा झाला होता.
 समता, बंधुता, सहकार्य या तत्त्वांचे समाजसंघटनेच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे यावरून ध्यानात येईल. 'राष्ट्रनिष्ठा' या तत्त्वाने प्राचीन काळचा हिंदुसमाज संघटित झाला होता असे गेल्या प्रकरणात दाखविले आहे. राष्ट्रनिष्ठेत समता, बंधुता ही तत्त्वे गृहीतच धरलेली असतात. ती तत्त्वे त्या काळच्या समाजाने कशी अवलंबिली होती व त्यांचा व सामर्थ्यांचा किती दृढसंबंध आहे हे येथवर विवरून सांगितले. आता याच काळात विषमता, भेदभाव, विद्वेष यांची विषवीजे कशी प्रतिपादिली जात होती, आणि त्यांचेच पुढे विषवृक्ष होऊन हिंदुसमाजाचा त्यांमुळे कसा विनाश झाला हे पुढील लेखात पहावयाचे आहे.

§