हिंदुसमाज संघटना आणि विघटना/विघटना

विकिस्रोत कडून






विघटना



सप्तशृंखला :
 कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी 'मध्ययुगीन भारत' या नावाने भारताचा, इ. स. ६०० ते इ. स. १२०० या कालविभागाचा, त्रिखंडात्मक इतिहास लिहिला आहे. त्यातील तिसऱ्या खंडाला त्यांनी 'हिंदु भारताचा अंत' असे नाव दिले आहे. त्यातील तिसऱ्या भागातील शेवटच्या शेवटच्या प्रकरणांची नांवे 'अजमीर व दिल्ली यांचा उच्छेद', 'कनोज व बनारस यांचा उच्छेद', 'उत्तर हिंदुस्थानातील इतर रजपूत राज्यांचा उच्छेद', अशी आहेत. इ. स. १२०० ही त्यांच्या कालखंडाची म्हणजे मध्ययुगाची मर्यादा होती. नाही तर पुढल्या खंडातील प्रकरणांची नावे 'यादवांचा उच्छेद', 'होयसळांचा उच्छेद', 'चोळांचा उच्छेद', व शेवटी 'दक्षिण भारताचा उच्छेद' अशी त्यांना द्यावी लागली असती.
 'हिंदु भारताचा अंत' याचा इतिहास लिहून झाल्यावर त्यांनी या अंताची, या उच्छेदाची पुढील प्रकरणांत कारणमीमांसा केली आहे. ती करताना कडक जातिबंधने, राष्ट्रभावनेचा अभाव, स्वराज्याविषयीची उदासीनता, अहिंसाप्रवणता, हिंदूंतील धार्मिक ऐक्याचा नाश, कलिवर्ज्य प्रकरण, पतितपरावर्तनाचा निषेध इत्यादी कारणे हिंदूंच्या अधःपाताची म्हणून त्यांनी दिलेली आहेत. (भाग ३ रा, पुस्तक ७ वे, प्रकरणे २५, २६; पुस्तक ८ वे, प्रकरण ४)
 हे सर्व विवेचन वाचीत असताना एक गोष्ट ध्यानात येते की यांतील प्रत्येक रूढी ही हिंदुसमाजाच्या विघटनेस कारण झालेली आहे. पूर्वीच्या काळी हिंदुसमाजातील भिन्न घटक एकमेकांशी संलग्न करण्याचे, सांधण्याचे, त्यांना एकरूप देऊन संघटित करण्याचे शास्त्रज्ञांचे धोरण होते व ते प्रभावी ठरले होते. आता एक वर्ण दुसऱ्या वर्णापासून, एक जात दुसऱ्या जातीपासून, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून तोडून काढण्याचे धर्मशास्त्रकारांनी धोरण आखले होते. त्या धोरणाचाच प्रभाव वाढून अखेरीस हिंदुराजसत्तांचा, धर्माचा व संस्कृतीचा उच्छेद होण्याची वेळ आली.
 तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या पुस्तकात 'पावित्र्याच्या अतिरेकी कल्पना', 'सामुदायिक ध्येयाचा अभाव' इ. या अवनतीची कारणे दिली आहेत. आणि शेवटी यामुळे हिंदुसमाजात 'स्वकीय- दूरीकरण प्रवृत्ती' बळावून त्याची अवनती झाली, असा निष्कर्ष काढला आहे. (पृ. १३१)
 आचार्य क्षितिमोहन सेन यांनी आपल्या 'भारतवर्ष में जातिभेद' या आपल्या पुस्तकात 'हमारा इतिहास इसी प्रकार अपनों को पराया बनानेका इतिहास है' असा एका वाक्यातच भारताच्या अधःपाताविषयी निर्णय दिला आहे. (पृ. ३१) आपल्यापेक्षा दुसऱ्याला हीनजातीय ठरवावे, शूद्र ठरवावे, पतित ठरवावें, अपवित्र लेखावे आणि तोडून दूर फेकावे, यातच लोक कृतार्थता मानू लागले होते. त्यातून विघटनेवाचून दुसरे काय होणार ?
 म. म. काणे यांनी आपल्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथाच्या पाचव्या खंडात हिंदूंच्या अधःपाताची अशीच कारणचिकित्सा केली आहे. ती करताना निवृत्तिवाद, इहविन्मुखता, राजकारणाविषयीची उदासीनता, सर्व समाजाला बांधील अशा सम आचारविचारांचा, धर्मबंधनांचा अभाव ही कारणे त्यांनी दिली आहेत. आमची अध्यात्मतत्त्वे पाहिली तर ती जगदैक्य, भूतैक्य प्रतिपादणारी; आणि प्रत्यक्षात मात्र अनंत प्रकारचे भेदभाव, अशी विपरीतता आमच्या बुद्धीला आली होती. हे विवेचन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या सप्तशृंखलांचा त्यांनी, अधःपाताची कारणे म्हणून, निर्देश केला आहे. (पृ. १६२०१६२३) स्पर्शबंदी (अस्पृश्यता), बेटीबंदी (जातिभेद), शुद्धिबंदी, व्यवसायबंदी, रोटीबंदी, वेदबंदी, व सिंधुबंदी या सावरकरांनी सांगितलेल्या सात श्रृंखला होत. यांतील प्रत्येक बंदीचे पर्यवसान समाजाची शकले करणे, त्याची विघटन करणे यातच झाले व अजूनही होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या शृंखलांना स्वदेशी श्रृंखला म्हटले आहे. मागल्या लेखात सांगितले आहे की, हिंदू शास्त्रीपंडितांनीच असले धर्मशास्त्र रचून आपला समाज धुळीस मिळविला. या शृंखला स्वदेशी आहेत या म्हणण्याचा हाच भावार्थ आहे. आमच्या आम्हीच या श्रृंखला घडवून त्यांनी हिंदु- समाजातील भिन्न घटकांना निरनिराळ्या खांबांशी जखडून ठेविले व एकमेकां- जवळ येणे अशक्य करून टाकले. त्यामुळे हा समाज समाज राहिलाच नाही. हिंदु मानवसमूहात व्यक्ती आहेत, जाती आहेत; पण त्या सर्व मिळून एक समाज होत नाही. खरे म्हणजे जाती याही इतरांच्या विद्वेषापुरत्याच आहेत. त्यांच्या अंतरात सर्व विलग, अबद्ध, असंघटित अशा व्यक्तीच आहेत. अशी या मानव- समूहाची दुर्दशा का झाली याची अनेक कारणे वर उल्लेखिलेल्या थोर पंडितांनी दिली आहेत. त्यांचाच आता प्रपंच करावयाचा आहे. हिंदुधर्मीयांनी इ. स. १० व्या शतकाच्या आगेमागे अत्यंत विपरीत असे तत्त्वज्ञान स्वीकारले, अत्यंत हानिकारक व घातक अशी धर्माची व समाजरचनेची तत्त्वे स्वीकारली म्हणून त्यांचा नाश झाला असे मागल्या लेखात सांगितले आहे. हे धर्मशास्त्र ज्यांनी रचले त्यांनी व त्यांच्या अर्वाचीन पुरस्कर्त्यांनी त्याचे समर्थनही केले आहे. त्या विपरीत धर्मशास्त्राचा इतिहास पाहताना त्याच्या समर्थकांनी मांडलेल्या. उपपत्तींचाही आपण परामर्श घेऊ.

विषमता :
 मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे की समता आणि विषमता यांचा पुरस्कार करणाऱ्या दोन परपस्परविरुद्ध विचारसरणी प्रारंभीच्या काळापासून प्रचलित होत्या. त्यातील समतेच्या प्रवाहाचा विचार त्या लेखात आपण केला. आता विषमतेच्या दुसऱ्या प्रवाहाचा मुळापासून मागोवा घेत त्याच्या मुखापर्यंत जाऊन त्याच्यामुळे हिंदुसमाज शतधा छिन्नभिन्न कसा झाला ते पाहावयाचे आहे.
 उपनिषदांमध्ये ब्राह्मणांनी क्षत्रियांपासून ब्रह्मविद्येचे पाठ घेतल्याचे अनेक उल्लेख आहेत. त्यांचा निर्देश मागे केलाच आहे. क्षत्रियांनी ही विद्या ब्राह्मणांना शिकविली हे खरे; पण ती देताना, हे प्रतिलोम आहे, विपरीत आहे, असे क्षत्रियांनी उद्गार काढल्याचे दिसते. ब्राह्मणाने क्षत्रियाकडे विद्येसाठी जावे, हे अजातशत्रु राजाला प्रतिलोम वाटत होते. याचा अर्थ असा की ब्राह्मण, क्षत्रिय हे जन्माने ठरत होते. कवष ऐलूषाची कथा अशीच आहे. यज्ञदीक्षा घेऊन तो ब्राह्मणांमध्ये बसला होता. हे ध्यानी येताच, 'तू दासीपुत्र आहेस, येथून चालता हो' असे म्हणून ब्राह्मणांनी त्याला एका वाळवंटात हाकून दिले. पण तेथे त्याने सरस्वतीची प्रार्थना केली. तेव्हा ती नदीरूपाने धावत आली. त्याची ती प्रार्थना म्हणजेच ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातले ३० वे सूक्त होय. (काणे, धर्मशास्त्र, खण्ड २ रा, पृ. ३६-६८ )
 या दोन्ही कथा उद्बोधक आहेत. वर्ण जन्माने ठरत होते असे त्या दर्शवितात. पण गुणकर्मानुसार मनुष्याला प्रतिष्ठा मिळत होती, पूर्वग्रह बाजूला सारून लोक गुणांना मान देत होते, असेही त्यावरून दिसते. गुणांची ही प्रतिष्ठा पुढेपुढे अमान्य होऊन जन्माची वाढत गेली. आणि त्यामुळेच समाज पराकाष्ठेचा विषम होऊन त्याची अनंत शकले झाली. अशा समाजामध्ये एकरूप समाजासारखी संघटना होणे अशक्य असते. आणि म्हणूनच त्याच्या ठायी सामर्थ्य निर्माण होत नाही. यापेक्षाही जास्त हानिकारक गोष्ट म्हणजे गुणकर्माला मान न देणाऱ्या समाजात व्यक्तिजीवनाची प्रतिष्ठा राहात नाही. आणि व्यक्तिजीवनाची प्रतिष्ठा हा तर उत्कर्षाचा मूळ पाया होय. प्रतिष्ठा नाही म्हणजे उत्कर्षाला संधी नाही. आणि ती नाही म्हणजे व्यक्ती समाजाच्या उत्कर्षापकर्षा- विषयी उदासीन होते. स्वतःच्या धर्माविषयीही ती उदासीन होते. अभ्युदय व निःश्रेयस प्राप्त करून देणारा तो धर्म. पण यांचा लाभ ज्या धर्मात होत नाही त्या धर्माविषयी लोकांना प्रेम का वाटावे ? त्यांची धर्मांतर करण्याची प्रवृत्ती झाली तर त्यांना दोष कसा देता येईल ? कुमारिल भट्टाने म्हटले आहे की, शुद्रांतूनच बहुसंख्य लोक बौद्ध झाले आहेत. हे जाणूनच त्या वेळी पुराणांनी शुद्रांना काहीसा धर्माधिकार दिला. पण पुढे तो पुन्हा काढून घेण्यात आला. आजच्या काळातही डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी हिंदुधर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला याचे कारण हेच आहे. या धर्मात राहून आपल उत्कर्ष होणार नाही ही त्यांची खात्री झाली म्हणूनच त्यांनी धर्मत्याग केला. पण हिंदुसमाज या आपत्तीविषयी उदासीनच आहे. गेली हजार वर्षे तो तसाच होता व अजूनही, काही अपवाद वजा जाता, बहुसंख्य हिंदु जनतेच्या वृत्तीत फारसा फरक पडला आहे असे दिसत नाही. प्राचीन काळी जिवंत, चैतन्यसंपन्न असलेल्या या समाजाला ही शववृत्ती, ही संज्ञाहीनता, ही बधिरता, ही जडता, ही निर्बुद्धता उत्तरकाळच्या धर्मशास्त्रामुळेच आलेली आहे. गुणांची प्रतिष्ठा जाऊन जन्मालाच सर्व महत्त्व कसे येत गेले ते धर्मशास्त्रातील वचनांच्या आधारे आता पाहू.

ब्राह्मणमाहात्म्य :
 तैत्तिरीय ब्राह्मण, महाभारत, मनुस्मृती, वसिष्ठधर्मसूत्र, विष्णुधर्मसूत्र, पराशरस्मृती अशा जुन्या धर्मग्रंथांतून ब्राह्मणांची पुढीलप्रमाणे अतिरेकी स्तुती केलेली आढळते. "ब्राह्मण हा अग्निवैश्वानर आहे, ब्राह्मण हे मूर्त देव होत, ब्राह्मण हेच विश्वाचा आधार होत, विश्वातील सर्व धन त्यांचे आहे, ब्राह्मण संतप्त झाला तर प्रतिविश्व निर्माण करील, दिक्पाल निर्माण करील व देवांनाही स्थानभ्रष्ट करील; व्रत, तप, यज्ञ यांत कोठे काही उणे पडले तर ते ब्राह्मणकृपेने भरून निघते, ब्राहाणाचा शब्द म्हणजे देवाचा शब्द, तो कधीच खोटा ठरत नाही, सर्व प्राणिमात्रांचा ब्राह्मण हा गुरू होय; ब्राहाण म्हणजे श्रेष्ठ तप, श्रेष्ठ ज्ञान, त्यांच्या अर्घ्यदानामुळेच आकाशात सूर्य प्रकाशतो, ब्राह्मणांनी यज्ञ केले नाहीत तर सूर्य उगवणेच शक्य नाही. पुरोहितांच्या मंत्रसामर्थ्यानेच राजांना जय मिळतो, कोणालाही देवपद देणे व देवपदावरून कोणालाही च्युत करणे हे ब्राह्मणांच्या हाती आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणेच राजांना राजपद मिळते वा असलेल्यांचे राजपद जाते." (म. म. काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खण्ड २ रा, पृ. १३५-३६) ज्ञानी, तपोनिष्ठ, वेदोनारायण अशा ब्राह्मणांची जरी अशी स्तुती केली तरी ती सार्थ ठरणार नाही, हास्यास्पदच ठरेल. मग सरसकट सर्व ब्राह्मणांना उद्देशून असली स्तोत्रे रचली तर काय होईल हे सांगावयास नकोच. दुर्दैवाने वरील ग्रंथांतील ही स्तुती गुणकर्माची नाही. जातीची आहे. काही ठिकाणी तसे स्पष्टपणे सांगितलेलेही आहे. 'ब्राहाण: संभावेनैव देवानां अपि दैवतम् ।' केवळ जन्मानेच ब्राह्मण देवांचे दैवत ठरतो, असे मनु म्हणतो. (११- ८४) याही पुढे जाऊन त्याने म्हटले आहे की, 'ब्राह्मण विद्वान असो अविद्वान असो. तो देवच आहे. (मनु ९- ३८४) इतर स्मृती व पुराणे यांत ब्राह्मणांची अशीच अहमहमिकेने प्रशंसा केलेली आढळते. 'जन्मनैव महाभागो ब्राह्मणो नाम जायते नमस्यः सर्व भूतानाम् ॥' अशा तऱ्हेची वचने सर्वत्र सापडतात.
 यातली विस्मयकारक गोष्ट अशी की, ज्या ग्रंथात तप, ज्ञान, चरित्र्य, मनोनिग्रह यांमुळे मनुष्य ब्राह्मण ठरतो, हे गुण नसतील तर तो जन्माने ब्राह्मण असला तरी शूद्र होतो व त्याला शूद्राप्रमाणेच वागवावे, असे निर्धाराने सांगितले आहे. त्याच ग्रंथांतून वरील वचनेही सापडतात. पण वर सांगितलेच आहे की मागल्या बहुतेक सर्व ग्रंथांत नित्य भर पडत गेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्रंथरूप जाऊन त्यांना कोशरूप आले आहे. तेव्हा त्यांत असली ध्रुवभिन्न वचने सापडली तर नवल नाही. जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते की, असली विवेकहीन, निर्बुद्ध, आंधळी भर घालण्यामुळे ग्रंथकाराला काही दृष्टिकोन असतो, त्याला काही व्यक्तिमत्त्व असते, त्याचे काही स्वतंत्र तत्त्वज्ञान असते, हा विचारच भारतातून पुढे पुढे नष्ट झाला. हिंदुसमाजाच्या प्रगतीला हे अपकृत्य अत्यंत घातक झालेले आहे. थोर ग्रंथकारांचे व्यक्तिमत्व ही राष्ट्राची मोठी शक्ती आहे. तीच या भर घालणाऱ्या लोकांनी नष्ट करून टाकली. असो.
 विषमतेचा दुसरा ओघ समतेबरोबरच कसा वाहात होता याची काही कल्पना वरील ब्राह्मणगौरवावरून येईल. ब्राह्मण केवळ जन्माने श्रेष्ठ मानावा हा विचार विषमतेचे विष समाजात निश्चितपणे रुजवितो. ब्राह्मणांची कर्तव्ये सांगताना, या सर्व शास्त्रकारांनी फार उदात्त कल्पना मांडलेल्या आहेत, यात शंका नाही. ब्राह्मणांनी अहोरात्र वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, धर्महीनांकडून दान घेऊ नये, राजापुढेही याचना करू नये, यजन- याजन, अध्ययन-अध्यापन, दान- प्रतिग्रह हीच त्याची कर्तव्ये, या कर्तव्यात थोडे दिवस जरी खंड पडला तरी ब्राह्मण्य लोपेल; अशा तऱ्हेची असंख्य वचने शास्त्रग्रंथांत सापडतात. आणि याप्रमाणे आचरण करणाऱ्या ब्राह्मणास अग्रमान द्यावा, असे सांगितले तर ते आक्षेपार्हही होणार नाही. पण ही लक्षणे ज्यांच्या ठायी दिसत नाहीत त्यांनाही पूज्य मानावे, असे म्हटले की समाजाचा अधःपात अटळ होतो.

गुण जन्मनिष्ठ असले तर :
 जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्यव्यवस्था ही केव्हा हितावह ठरेल ? जर त्या त्या वर्णाचे किंवा जातीचे लोक, नित्यनियमाने, शास्त्रकारांनी त्या वर्णाच्या म्हणून सांगितलेल्या गुणांनी संपन्न असतील तर. ब्राह्मण जातीत जन्मलेला प्रत्येक मनुष्य किंवा त्या जातीचे बहुसंख्य लोक तन, निग्रह, ज्ञान, चारित्र्य या गुणांनी, तसेच क्षत्रिय जातीतील लोक, शौर्य, धैर्य, प्रजापालनदक्षता, इत्यादी गुणांनी; असे सर्व वर्णीय लोक आपापल्या शास्त्रप्रणीत गुणांनी युक्त असतील तरच जन्मनिष्ठ व्यवस्थेला अर्थ आहे. पण असे कधीही घडत नाही. पूर्वी घडलेले नाही व पुढेही घडणार नाही. त्यामुळे ब्राह्मणांची कर्तव्ये अमुक, क्षत्रियांची तमुक, असे नुसते शास्त्र सांगण्याचा काहीही उपयोग नाही. कारण तसे नुसते शास्त्र सांगण्याने गुण निर्माण होत नसतात. ब्राह्मणांच्या अंगी जन्मतः श्रेष्ठ गुण नसतात व नुसत्या उपदेशाने ते निर्माण होत नाहीत हे प्राचीन शास्त्रकारांना चांगले समजलेले होते. प्राचीन काळीसुद्धा, ब्राह्मण शास्त्रविहित यजनयाजन इ. व्यवसायांपेक्षा अन्य निषिद्ध व्यवसाय करीत असत. अशा ब्राह्मणांना श्राद्धाला बोलावू नये असे सांगून, शास्त्रकारांनी त्यांची एक प्रचंड यादी दिली आहे. तीवरून हे स्पष्ट दिसते की, जन्मावर गुणसंपदा त्या काळीही अवलंबून नव्हती. अत्रिस्मृतीत ब्राह्मणांच्या दहा प्रकारांची एक यादी दिली आहे. तीत देवब्राह्मण, मुनिब्राह्मण हे श्रेष्ठ प्रकार सांगून झाल्यावर शूद्रब्राह्मण, निषादब्राह्मण, पशुब्राह्मण, म्लेच्छब्राह्मण, चांडाळब्राह्मण असेही ब्राह्मणांचे प्रकार सांगितले आहेत. आणि या प्रकारचे ब्राह्मण ठोंबे, शंख, गुंड, मवाली, आततायी, आचारहीन, चोर, दरोडेखोर होते असे सांगितले आहे. अपरार्क या शास्त्रकाराने, जन्माने ब्राह्मण असूनही जे ब्राह्मण नव्हेत अशांचे सहा प्रकार सांगितले आहेत. सरकारी नोकरी करणारा, क्रयविक्रय करणारा, अनेकांचे यजमानकृत्य करणारा, सबंध खेड्याची भिक्षुकी करणारा, वेळेवर संध्या न करणारा व खेड्यात किंवा शहरात नोकरी करणारा, हे ते सहा प्रकार होत. अनुशासपर्व (महाभारत) म्हणते की, 'काही ब्राह्मण चोर आहेत, काही डोंबारी, काही नाचे पोरे व काही डँबिस आहेत !'
 पण खेदाची गोष्ट अशी की, अशा ब्राह्मणांचाही मान राखावा, त्यांना पूजेसाठी बोलवावे, त्यांना दान द्यावे असा उपदेश शास्त्रकारांनी केलेला आहे. 'देवपूजेसाठी बोलाविताना ब्राह्मणाचे चारित्र्य वा त्याची विद्वत्ता पाहू नये,' (अनुशासन पर्व ९०.२) 'परीक्षा करूनच ब्राह्मण बोलवावा असे वेदवचन आहे हे खरे, पण परीक्षा न करणेच चांगले. परीक्षा न करता ब्राह्मण बोलाविले तर पितर व देव संतुष्ट होतात.' (अपरार्क- पृ. ४५५) ब्राह्मण सत्शील असो, दुःशील असो, सुसंस्कृत असो, हीन असो, त्याचा अपमान करू नये; कारण तो भस्माखालच्या अग्नीसारखा असतो.' (वृद्धगौतमस्मृती, अध्याय ३ रा) अशा तऱ्हेची विपुल वचने धर्मशास्त्रात सापडतात. (काणे, खंड २ रा, पृ. ११७, १३५, १३६) याचा अर्थ स्पष्ट आहे. चारित्र्य, तप, वेदाध्ययन, विद्वत्ता, ज्ञान, यांची किंमत या शास्त्रकारांच्या लेखी शून्य होय. असे शास्त्रकार जेथे झाले आणि अशांना जेथले लोक अनुसरले त्यांचे भवितव्य सांगण्यास श्रुतिस्मृतींची गरज नाही.

नरोटीचे महत्त्व :
 केवळ जातिब्राह्मणाला मान द्यावा ही जी प्रवृत्ती ती म्हणजे सर्व जीवनव्यापी अशा एका घातकी प्रवृत्तीचा एक भाग आहे. जडाला, भौतिक पिंडाला, बाह्य सांगाड्याला, नरोटीला महत्त्व द्यावे आणि आतील चैतन्याची उपेक्षा करावी, आत्म्याला गौण लेखावे, श्रीफलाची अवहेलना करावी ही ती प्रवृत्ती होय. संहिताकाळानंतर ब्राह्मण ग्रंथांची रचना झाली. त्यांनी यज्ञयागांतील बाह्य कर्मकांडाचे इतके अवडंबर माजविले की, त्यामुळे वेदांतील ऐश्वर्याकांक्षा, विजिगीषा, रसरशीत चैतन्यमय जीवन यांचा लोपच झाला. उपनिषदांनी यज्ञयागावर अत्यंत कठोर टीका केली, यज्ञसंस्थेची हेटाळणी केली ती यासाठीच. अर्थाला सोडून शब्दाचेच महत्त्व मानणे ही कर्मकांडाइतकीच दुसरी अनर्थावह प्रवृत्ती होय. मीमांसकांनी ही अधोगामी प्रवृत्ती अगदी पराकाष्ठेला नेली. पण तेवढ्यावर हे संपले नाही. तर पुढील काळात शब्दनिष्ठेने अखिल भारतीय जीवन व्यापून त्यातील जीवनरस शोषून घेतला. वेदांतील शब्दांना महत्त्व, भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील शब्दांना महत्त्व, गुरुमुखातील शब्दांना महत्त्व! गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यांतील शब्दांना महत्त्व म्हणून मग त्यांचा कीस काढून त्यांतील अर्थाला स्वमताकडे खेचून आणण्याची धडपड. अध्यात्म, काव्यशास्त्र, विद्याव्यासंग या सर्व क्षेत्रांत या शब्दनिष्ठेने चैतन्याचा नाश करून हिंदूंच्या बुद्धीला जडत्व आणले. जडाची उपासना केल्यावर दुसरे काय होणार ! तेच समाज- रचनाशास्त्रात झाले. चारित्र्य, तप, वेदाध्ययन, श्रद्धा, शौर्य, क्षात्रतेज, विजिगीषा यांचे म्हणजे चैतन्याचे महत्त्व जाऊन ब्राह्मण, क्षत्रिय यांच्या भौतिक पिंडाला मान मिळू लागला. या भौतिक पिंडात वरील थोर गुण सतत नियामाने राहात असते तर चातुर्वर्ण्यरचनेला कोणीच विरोध केला नसता. पण तसे ते राहत नाहीत, हे पूर्वीच्या शास्त्रकारांनीच लिहून ठेविले आहे. तरी या वर्णाना मान द्यावा असा त्यांचा आग्रह आहे. अर्वाचीन काळी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाल्यानंतरही राजवाडे, बाळशास्त्री हरदास यांसारखे पंडित चातुर्वर्ण्याचे समर्थन करतात हे मोठे दुर्दैव होय. जन्माने वर्ण ठरत असूनही, ब्राह्मणक्षत्रियांचा अनेक कालखंडात अधःपात झाला, असे याच पंडितांनी लिहिले आहे. तरी 'त्यागी, ज्ञानोपासक ब्राह्मणवर्ग निर्माण केला व तो सहस्रावधी वर्षे टिकवून दाखविला, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होय' असे त्यांचे मत आहेच.

सामाजिक न्यायाचा अभाव :
 ब्राह्मणांच्या भौतिक पिंडालाच महत्त्व दिल्यामुळे न्यायदानात पक्षपात करण्याची बुद्धी शास्त्रकारांना सहजच झाली. आणि त्यातून उद्भवणाऱ्या अन्यायाची, विषमतेची, अणुमात्र क्षिती न बाळगता शास्त्रकारांनी पक्षपाती शास्त्र, धर्म म्हणून लिहून ठेविले. राजा हा सर्व प्रजेचा शास्ता होय; पण ब्राह्मणांवर त्याची सत्ता चालणार नाही. ते शासनमुक्त आहेत. ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी त्याला फटक्याची शिक्षा द्यावयाची नाही, त्याला बेड्या घालावयाच्या नाहीत, त्याला हद्दपार करावयाचे नाही, त्याला दण्ड करावयाचा नाही, त्याची निर्भर्त्सनाही करावयाची नाही, असे गौतमधर्मसूत्राचे म्हणणे आहे. इतर शास्त्रकारांनी हे विधान फक्त विद्वान ब्राह्मणालाच लागू आहे, असे म्हटले आहे. पण कोणत्याही कारणाने ब्राह्मणाला देहदंड द्यावयाचा नाही, याविषयी कौटिल्याखेरीज सर्वांचे एकमत आहे. ब्राह्मणाने राजद्रोह केला, फितुरी केली तर त्याला नदीत बुडवावे, असे कौटिल्य सांगतो. इतरांनी घोर अपराधासाठी ब्राह्मणाचे मुंडन करून त्याच्या कपाळावर तप्त मुद्रा ठोकून त्याला हद्दपार करावे, असे म्हटले आहे. ब्राह्मणापासून कर घेऊ नये असे बहुतेक स्मृतींनी सांगितले आहे काहींच्या मते केवळ श्रोत्रीय ब्राह्मण करमुक्त असावे. पण काहींच्या मते सर्वच ब्राह्मण ! कारण त्यांचे पुण्य राजाला मिळते तो करच होय ! प्रत्येक गुन्ह्यासाठी प्रत्येक वर्णाला शास्त्रकारांनी भिन्नभिन्न शिक्षा सांगितल्या आहेत. शूद्राने वरिष्ठ- वर्णीय स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला लिंगच्छेदाची शिक्षा. पण ब्राह्मणाने ब्राह्मणस्त्रीवर बलात्कार केला तरी फक्त १००० दंड. शूद्राने ब्राह्मणाची निंदा केली तर त्याची जीभ कापावी, वैश्याने ब्राह्मणाची बदनामी केली तर १५० दंड, क्षत्रियाला १०० दंड. पण ब्राह्मणाने शूद्राची निंदा केली तर १२ दंड किंवा मुळीच दंड नाही.
 हा अन्याय आहे, पक्षपात आहे असे काही शास्त्रकारांना जाणवत होते. त्यामुळे त्यांनी हे केवळ श्रोत्रीय, विद्वान ब्राह्मणापुरतेच मर्यादित आहे, किंवा हे केवळ अर्थवादात्मक आहे, शास्त्रकारांच्या मनात तसे नाही, असे म्हणून या अन्यायाचे स्वरूप सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. काही शास्त्रकारांनी एक-दोन गुन्ह्यांच्या बाबतीत अगदी उलट धोरण सांगितले आहे. चोरीच्या गुन्ह्यांसाठी शूद्राला जितका दण्ड त्याच्या दुप्पट वैश्याला, त्याच्या दुप्पट क्षत्रियाला व त्याच्या दुप्पट ब्राह्मणाला दण्ड, गौतम आणि मनू यांनी सांगितला आहे. कारण गुन्ह्याचे खरे स्वरूप कळण्याची पात्रता त्याला असते, ती शूद्राला नसते. वास्तविक हीच दृष्टी सर्वत्र ठेवावयास हवी होती. तसा एक विचारप्रवाह होता, हे मागल्या लेखात सांगितलेच आहे. तशा निःपक्षपाती न्यायाच्या बळावरच अनेक शतके हा समाज टिकू शकला. पण या दुसऱ्या प्रवाहाचा जोर हळूहळू वाढत गेला. व समाज विघटित होऊ लागला असे म. म. काणे यांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. (धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, पृ. १७१- १७९) हे विवेचन करताना काणे यांनी युरोपात धर्मगुरूंच्या बाबतीत यापेक्षाही भयंकर पक्षपात होत असे, असे अनेक प्रमाणांनी दाखवून दिले आहे. तेथे असा विषम न्याय होता यात शंकाच नाही. पण पाश्चात्त्य युरोपातील एकेक राष्ट्राने व तेथील जागरूक जनतेने याविरुद्ध लढा केला व ती विषमता नष्ट केली. आणि ज्यांनी समतेच्या धर्माची स्थापना केली त्याच राष्ट्रांचा उत्कर्ष झाला अशी इतिहासाची साक्ष आहे, हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे. भारतात वरील विषम न्याय शास्त्रविहित होता तरी त्यावर मात करून समताधर्म इ. स. दहाव्या शतकापर्यंत विजयी होत होता, हे मागल्या लेखात दाखविलेच आहे. पुढे त्या धर्माचे रक्षण होईना. त्यामुळे सामाजिक न्याय ही कल्पनाच हिंदुसमाजातून नष्ट झाली. आणि या घोर पातकामुळे त्याचा नाश झाला.

सर्व समाज शूद्र
 जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचे म्हणजेच विषमतेचे पुरस्कर्ते जे शास्त्रकार त्यांनी ब्राह्मणांच्या भौतिक पिंडाला महत्त्व देऊन समाजाला कसे विकृत, अन्यायकारक व अधोगामी धर्मशास्त्र सांगितले ते आपण पाहिले. आता शूद्रांच्या बाबतीत तशाच जन्मजात उच्चनीचतेच्या तत्त्वाचा अवलंब करून वरच्यापेक्षाही शतपटीने आंधळे, मूढ आणि अविवेकी शास्त्र त्यांनी कसे रचले ते पाहावयाचे आहे.
 प्रथम शूद्र या वर्णात या शास्त्रकरांनी कोणाचा समावेश केला आहे ते पाहू. कारुकर्म करणारे, कारुनारू म्हणजे साधारणतः बलुतेदार व अलुतेदार हे सर्व (काही अपवाद वजा जाता) या वर्णात येतात. सुतार, लोहार, कुंभार, परीट, न्हावी, गुरव, कोळी, तेली, तांबोळी, साळी, माळी, ठाकर, घडशी, हे सर्व शास्त्रकारांच्या मते शूद्र होत. चांभार, महार, मांग, बुरुड यांचा समावेश अलुतेबलुतेदारांत होतो. तरी उत्तरकालीन स्मृतिकारांनी त्यांना अस्पृश्य ठरविले आहे. पूर्वी त्यांचा शुद्र वर्णातच समावेश होत असे. याशिवाय गुराखी, नट, रथकार, भिल्ल, यांनाही शूद्र मानलेले आहे. पण एवढ्यावर हे भागत नाही. मनुस्मृती, यमस्मृती, पराशरस्मृती, बृहत्पाराशर स्मृती, कूर्मपुराण, यांनी शेतकऱ्यांनाही शुद्र ठरविले आहे. आर्धिक, कृषीवल, अर्धसीरी, क्षेत्रकर्षक असा त्यांचा या ग्रंथांत निर्देश केलेला आहे. वेदव्यासस्मृतीमध्ये वणिक व कायस्थ यांचीही शुद्रांत गणना केलेली आहे. (स्पर्शास्पर्श विचार, पं. सातवळेकर, भाग ८ वा अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, पाठक, पृ. ४५-४८) प्रतिलोम संकरापासून झालेली सर्व प्रजा प्राचीन काळापासून शास्त्रकारांनी शूद्र ठरविली आहे हे प्रसिद्धच आहे. अनुलोमविवाह दीर्घकाळपर्यंत शास्त्रविहित होते; तरी पुढे पुढे मातृसावर्ण्य रूढ झाले, संतती मातेच्या वर्णाची ठरू लागली. व त्यामुळे शूद्र स्त्रियांना द्विजांपासून झालेली संततीही शूद्र ठरू लागली.
 वरील यादीत वणिक आणि शेतकरी हे दोघेही आलेले आहेत. 'कृषिगोरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।' असे शास्त्र असताना यांना शूद्र का गणले हे सांगणे कठीण आहे. खरा चमत्कार पुढेच आहे. इ. स. पूर्व ४ थ्या शतकानंतर भारतात क्षत्रियवर्णच नाही, राजसत्ता चालविणारे सर्व लोक शूद्रच आहेत, असा एक सिद्धांत शास्त्रकारांनी मांडून ठेवलेला आहे. महानंदी हा शैशुनाग वंशातला त्या काळचा राजा. महापद्मनंद हा त्याला एका शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा. पुराणे असे सांगतात की, त्याने सत्तारूढ झाल्यावर, सर्व क्षत्रियांचा, परशुरामाप्रमाणेच संहार केला. आणि तेव्हापासून भारतात क्षत्रियच नाही. जे राजे आहेत ते, आपणांस क्षत्रिय म्हणवीत असले तरी, वास्तविक शूद्रच होत. विष्णुपुराण, मत्स्यपुराण व भागवतपुराण यांत हा सिद्धान्त मांडलेला आहे. आणि त्याच्या आधारे रघुनंदन (१६ वे शतक) याने आपल्या 'शुद्धितत्त्व' या ग्रंथात, कमलाकर भट्ट (१७ वे शतक) याने 'शुद्रकमलाकरात' व नागेश भट्ट (१८ वे शतक) याने 'व्रात्यताप्रायश्चितनिर्णय' या ग्रंथात 'कलियुगात ब्राहाण व शूद्र हे दोनच वर्ण आहेत 'कलावद्यंतयोः स्थितिः' असा निर्णय दिलेला आहे. (काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, पृ. ३८०-८१)
 कारुनारू हे शूद्र आहेतच; वणिक व कृषीवल यांना शास्त्रकारांनी शुद्र ठरविले आहे. 'नंदान्तं क्षत्रियकुलम्' या वचनान्वये सर्व क्षत्रिय शूद्र झाले. यानंतर शास्त्रकारांची दृष्टी स्त्रियांकडे वळली. व त्यांनाही त्यांनी शुद्र ठरवून जन्माचे सार्थक करून घेतले. पूर्वी स्त्रियांना वेदपठनाचा अधिकार होता. पुढे तो नाकारण्यात आला. म्हणून मग त्या शूद्र ठरल्या. 'स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः' असा गीतेने स्त्रियांचा शूद्रांबरोबर केलेला उल्लेख प्रसिद्धच आहे. पण स्त्रिया, शूद्र, कुत्रे- असाही एकत्र उल्लेख अनेक शास्त्रकार करतात. (काणे, वरील ग्रंथ, पृ. ५७६ ते ५७८)
 आता राहिले फक्त ब्राह्मण. शास्त्रकारांनी त्यांना शूद्र ठरविले नाही हे खरे. पण त्यांना शूद्र ठरवून टाकण्याची व्यवस्था मनूने करून टाकली आहे. मनूचे असे शास्त्र आहे की, ज्या देशात शूद्र राजा आहे त्या देशात ब्राह्मणांनी राहू नये (मनु ४.६१). अर्थात या आज्ञेचा अवमान करून ब्राह्मण शूद्र-राज्यात राहिले तर ते पतित होणार हे उघडच आहे. आता भारतात तर अडीच हजार वर्षे क्षत्रियच नाहीत. तरी ब्राह्मण येथे राहातच आहेत. तेव्हा विष्णू, मत्स्य व भागवत या पुराणांचे कर्ते व रघुनंदन, कमलाकर व नागेश भट्ट हे सोवळे ब्राह्मण यांसकट सर्व ब्राह्मण शास्त्रान्वयेच शूद्र ठरतात. ज्या शास्त्रान्वये क्षत्रिय शूद्र ठरतात त्याच शास्त्राअन्वये ब्राह्मणही शूद्र ठरतात. आणि शिवाय सर्व स्त्रिया शूद्र ठरल्यामुळे मातृसावर्ण्याच्या नियमाप्रमाणे सर्व वर्णांच्या स्त्रियांची संतती, अर्थात ब्राह्मणही शुद्रच ठरतात !

लहरी शास्त्र :
 हे शास्त्रकार अर्थातच ब्राह्मणांना शूद्र मानावयास तयार होणार नाहीत. कारण ब्राह्मण हा अत्यंत हीन असला तरी तो पूज्य होय, असे त्यांचे मत आहे. क्षत्रिय हे सर्व शूद्र होत हे मत कोणत्याच स्मृतीला मान्य नाही. दहाव्या शतकाअखेरपर्यंतचे सर्व स्मृतींचे टीकाकारही, क्षत्रियांचे धर्म काय, ते विवरून सांगतात. तेव्हा कलियुगात क्षत्रियच नाहीत, हे मत त्यांना मान्य होते, असे दिसत नाही. (काणे- धर्मशास्त्र, खंड २ रा, पृ. ३८१) तरी बाकी राहिलेली यादी काही लहान नाही. जवळजवळ सर्व बहुजन समाज त्यात समाविष्ट होतो. त्यामुळे मनात असा प्रश्न येतो की, या सर्वांना शास्त्रकारांनी शूद्र का ठरविले ? काही अमंगळ उद्योग, पापकर्म, अभक्ष्यभक्षण, वेदत्याग, ही कारणे दिलेली आहेत. (शांतिपर्व १८९- १) आपापल्या कर्माने अनेक लोक शूद्र होतात असे वेदव्यास- स्मृतीत म्हटले आहे. वर्णसंकरामुळे संतती शूद्र होते असे तर अनेक शास्त्रकार सांगतात. पण शास्त्रकारांच्या निरनिराळ्या सर्व उपपत्ती पाहिल्यावर तर्कशुद्ध- प्रतीतिकारक असे कोणतेच कारण त्यांतून दिसत नाही. केवळ शास्त्रकारांची लहर एवढेच एक कारण दिसते. त्यांच्या हातात शिक्के होते ते त्यांनी आपल्या लहरीप्रमाणे वाटेल त्याच्या कपाळी उठविले व त्यांच्या जाती ठरविल्या. हे मत म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे, अर्धसत्य आहे, असे म. म. काणे म्हणतात (धर्मशास्त्र, खंड २ राः प्रकरण २ रे; पृ. ५१). पण त्यांनीच त्या प्रकरणात जी माहिती दिली आहे तीवरून, तेच संपूर्ण सत्य आहे, असे दिसून येईल.
 भिन्न वर्णांच्या संकरापासून झालेल्या संततीच्या, शास्त्रकारांनी, ज्या जाती ठरविल्या आहेत त्या पाहा. अंबष्ठ ही जात ब्राह्मण आणि वैश्या (वैश्य स्त्री) यांच्या संकरापासून झाली, असे मनुस्मृतीचे मत आहे, तर ती ब्राहाण आणि क्षत्रिया यांपासून झाली, असे वसिष्ठस्मृती म्हणते. आयोगव ही जात शूद्र व वैश्या यांपासून झाली (औशनस) व शुद्र आणि क्षत्रिया यांपासून झाली (अग्निपुराण) अशी भिन्न मते आहेत. उग्र ही जात क्षत्रिय-शूद्रा, क्षत्रिय-वैश्या, वैश्य-शूद्रा अशा संकरांतून जन्माला आली असे मनू, वसिष्ठ व सूत-संहिता यांचे अनुक्रमे मत आहे. निषाद, पुक्कस, मागध, वैदेहक, कैवर्त यांच्याबद्दल अशीच भिन्न मते आहेत. (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ- श्रीधरशास्त्री पाठक, पृ. १६६–१७६) ही मतभिन्नता पाहिली म्हणजे, त्या त्या जातीवर शिक्के मारताना, या शास्त्रकारांच्या मनात कोणताही युक्तिवाद नव्हता, केवळ त्यांच्या लहरीवर हे चालले होते, याबद्दल शंका राहात नाही.
 या शास्त्रकारांची स्तुती करताना त्यांनी सर्व वर्णाना व जातींना योग्य ते व्यवसाय लावून दिले, हे त्यांचे बुद्धिकौशल्य म्हणून सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात पाहाता त्यांनी कोठे बुद्धी वापरली असेल अशी शंकासुद्धा येत नाही. अंबष्ठ ही जात पाहा. हिच्या उत्पत्तीविषयी मतभेद आहेत हे वर सांगितलेच आहे. तसेच तिच्या व्यवसायाविषयीही आहेत. मनूने या जातीला वैद्यक हा व्यवसाय- 'लावून दिला' आहे. तर उशनाने तिला शेती, अ-नर्तन(?) किंवा ध्वज रक्षण हे धंदे सांगितले आहेत. आयोगव जातीला सुतारी हा धंदा मनूने सांगितला आहे. तर उशनाने तिला कोष्ट्याचा, शेतकऱ्याचा, तांबटाचा किंवा कापडाच्या व्यापाराचा धंदा लावून दिला आहे. एकच माणूस सुतारी, कापड- व्यापार, शेती या व्यवसायांना योग्य ठरतो याचा अर्थ काय ? या व्यवसायांना सारखेच गुण लागतात की काय ? आणि अमक्या वर्णाचा संकर झाला म्हणजे त्यातून जन्मलेल्या संततीच्या ठायी अमक्या व्यवसायाला योग्य असे गुण उपजतच येतात असे या शास्त्रकारांनी कशावरून ठरविले ? उग्र या जातीने घुशी, उंदीर पकडून उपजीविका करावी असे मनू म्हणतो तर उशना म्हणतो की तिने भालदार-चोपदार व्हावे किंवा गुन्हेगारांच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी. या सर्व उद्योगांना एकाच प्रकारचे कौशल्य लागते, असे या शास्त्रकारांचे मत असले तर तो मोठा विनोदच आहे. मूर्धावसिक्त ही ब्राह्मण व क्षत्रिया यांपासून झालेली जात. तिला राजपद मिळाले तर तिने राज्य करावे, नाही तर आयुर्वेद, ज्योतिष किंवा मंत्रविद्या यांवर उपजीविका करावी, अशे शास्त्रकार सांगतात. राज्यकारभार आणि आयुर्वेद यांना सारखेच गुण लागतात असे समजणाऱ्या शास्त्रकारांचे बुद्धिकौशल्य काय वर्णावे ! (शास्त्रकारांच्या वरील मतासाठी— काणे धर्मशास्त्र, खंड २ रा, पृ. ७१ ते ९१ पाहा) या सर्वांवरून हे स्पष्ट दिसते की जातींच्या कपाळावर शिक्के मारताना शास्त्रकारांनी ज्याप्रमाणे केवळ स्वतःच्या लहरीने निर्णय केले, त्याचप्रमाणे त्यांना व्यवसाय लावून देतानाही स्वतःची लहर हाच त्यांचा युक्तिवाद होता. आणि अशा या फुसक्या युक्तिवादाच्या आधारे शास्त्रकारांनी बहुसंख्य हिंदूंना शूद्रांना धर्मबाह्य ठरवावे, अज्ञानाच्या नरकात त्यांना कायमचे पिचत ठेवावे आणि हिंदूंतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या शास्त्रकारांच्या वचनाला मान देऊन त्यांना शतकानुशतक दुर्गति पंकात लोटून द्यावे यापेक्षा दुसरा आत्मघातकीपणा कोणता ?

हिंदुची सहिष्णुता
 शूद्राला या शास्त्रकारांनी धर्मबाह्य ठरविले आहे. त्याला वेदाधिकार नाही. त्याच्यादेखत इतरांनीसुद्धा वेद म्हणू नयेत, तो पशूसारखाच होय, शूद्र म्हणजे श्मशानच होय, अशी मते त्यांनी मांडली आहेत. त्यांचे धंदे ओंगळ होते म्हणून त्यांना असे हीन लेखीत, असे शास्त्रकारांनी म्हटले आहे. पण यात काही अर्थ नाही. काही जातीचे धंदे ओंगळ असतील; पण शेतकरी, माळी, सुतार, लोहार यांचे धंदे तर ओंगळ नव्हते ना ? मग त्यांना शूद्र लेखून त्यांना वेदपठण वर्ज्य का केले ? हिंदुधर्मीय लोक अत्यंत सहिष्णू अशी जगात कीर्ती आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांचा असा सिद्धान्त आहे की, येशू किंवा अल्ला यांना शरण गेलात तरच तुमचा उद्धार होईल. पण हिंदूंना तसे वाटत नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही देवतेची उपासना करावी, कोणताही धर्ममार्ग अनुसरावा व आपला उद्धार करून घ्यावा, अशी हिंदूंची उदारवृत्ती आहे. यामुळेच सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट इ. प्राचीन राजे स्वतः वैदिक धर्माचे अनुयायी होते तरी, त्यांनी बौद्ध, जैन यांना हिंदुधर्मियां- प्रमाणेच वागविले, त्यांच्या विहारांना, मठांना दाने दिली, जमिनी दिल्या, त्यांना धर्मस्वातंत्र्य दिले. हिंदू असे सहिष्णू आहेत हे खरेच आहे. पण ही सहिष्णुता ते परमधर्मियांना दाखवितात ! हिंदूंना नाही. तसे नसते तर त्यांनी शूद्रांना यज्ञधर्माचा अवलंब करण्याची, वेदपठनाची मनाई का केली असती ? ख्रिस्ती, मुस्लीम यांना आपापल्या श्रद्धेप्रमाणे बायबल- कुराणांचा अवलंब करून सद्गती मिळविता येते, हे जसे हिंदू शास्त्रकारांना मान्य आहे, त्याचप्रमाणे शुद्रांना, अस्पृश्यांना वेदमार्गाने सद्गती प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांना मान्य असावयास हरकत नव्हती. पण ते हिंदू होते व आहेत हाच त्यांचा अपराध आहे. सहिष्णू वृत्ती परक्यांच्या बाबतीत !. स्वकीयांशी वागताना तिचा संबंध येतो कोठे ?

वैज्ञानिक अवडंबर :
 शूद्रांना यज्ञाधिकार दिला असता, ब्राह्मणांनी त्यांना वेद शिकवून आपल्या थोर धर्माची दीक्षा त्यांना दिली असती, तर काय बिघडले असते ? अर्वाचीन ध्वनिशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायन यांच्या आधारे जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचे समर्थन बाळशास्त्री हरदास करीत असतात. ते म्हणतात, 'वेदमंत्रांच्या ठायी काही स्वयंभू शक्ती असते, ती विशिष्ट शब्दसंघातांतून निर्माण होते, त्या शब्द- संघातांचे योग्य उच्चार करण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याच कंठात असते, म्हणून. त्यांना श्रेष्ठपद निसर्गतःच मिळणे योग्य होय. आणि उच्च श्रेणीच्या ध्वनिशास्त्राला धरून केलेली त्रिवर्णात्मक समाजरचनाही योग्य होय.' बाळशास्त्री यांनी अशा तऱ्हेचे बरेच पांडित्यपूर्ण विवेचन, विज्ञानाची परिभाषा वापरून आपल्या 'वेदांतील राष्ट्रदर्शन' या ग्रंथात केले आहे. (पृ. १३७- १७९) पण भारतावर आलेल्या अनेक भयावह आपत्ती, त्याचप्रमाणे वेदकाळात, पुराणकाळात व ऐतिहासिक काळात या भूमीवर झालेली आक्रमणे व येथे घडलेले अनेक अनर्थ यांचे निवारण करण्यास ब्राह्मणांना वेदमंत्रांच्या पठनामुळे प्राप्त झालेली अलौकिक शक्ती उपयोगी पडली, असे जोपर्यंत सिद्ध होत नाही, ब्राह्मणांना व क्षत्रियांना मुत्सद्देगिरी, राजनीती, शस्त्रविद्या, बाहुबल यांचा इतर देशांतल्याप्रमाणेच या आपत्तींच्या निवारणासाठी आश्रय करावा लागला हे जोपर्यंत दिसत आहे, तोपर्यंत वैज्ञानिक भाषेतले हे सर्व अवडंबर व्यर्थच ठरणार. आणि व्यास, वसिष्ठ, अस्तिक, शौनक यांसारखे अनेक संकरज ब्राह्मण वेदमंत्रांचा योग्य उच्चार करू शकत होते हे जोपर्यंत असिद्ध होत नाही तोपर्यंत जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचे समर्थन हास्यास्पदच ठरणार !

संकर हितावह :
 शूद्रांच्या वेदाधिकाराप्रमाणेच पूर्वी होत असलेल्या अनुलोम-प्रतिलोम विवाहाविषयीही प्रश्न उद्भवतो. हे विवाह चालू ठेवले असते तर हिंदू समाजावर कोणते संकट कोसळले असते ? अलीकडे असा एक युक्तिवाद करण्यात येतो की, पूर्वी असे विवाह चालू होते पण त्यांचे वाईट परिणाम पाहूनच पुढील शास्त्रकारांनी ते निषिद्ध मानले. पण प्रश्न असा येतो की, असे कोणते वाईट परिणाम या शास्त्रकारांना दिसून आले ? त्यांच्या या शास्त्रनियमांचे समर्थन करणाऱ्या अर्वाचीन विद्वानांनी तरी, त्या मिश्रविवाहांमुळे कोणते वाईट परिणाम झाले, तें सांगि- तले आहे काय ? मुळीच नाही. हे अर्वाचीन पंडित तरी इतिहास पाहू शकत होते ना ? मग त्यांनी कोणत्या इतिहासाच्या आधारे या बेटीबंदीचे समर्थन केले ? इतिहासकाळातला अखिल भारताचा पहिला साम्राट चंद्रगुप्त मौर्य हा शूद्र होता. सम्राट अशोक हा त्याचा नातू अर्थातच शूद्र होता. दक्षिणेत प्रथमच साम्राज्य स्थापन करणारे सातवाहन घराणे शूद्र होते. ही मते पुराणांनीच मांडली आहेत. इतिहासपूर्व काळातील आविक्षित मरुत्त हा शंभर अश्वमेध करणारा महाराजा शूद्र होता. पुराणे ज्या काळात लिहिली जात होती त्या काळात गुप्तसाम्राज्य विस्तारत होते. गुप्त हे वैश्य होते. पण त्यांचा पहिला सम्राट चंद्रगुप्त याने लिच्छवी या क्षत्रिय घराण्यातील राजकन्येशी लग्न केले होते. म्हणजे हा प्रतिलोम विवाह होय. भारताचा नेपोलियन म्हणून ज्याची कीर्ती आहे तो सम्राट समुद्रगुप्त हा प्रतिलोम विवहाहातूनच जन्मला होता. या घराण्यात कदंब या ब्राह्मण राजघराण्यातील कन्याही दिल्या होत्या. म्हणजे आणखी प्रतिलोम. शास्त्रकारांच्या मते सर्व प्रतिलोमसंतती ही शूद्र होय. अर्वाचीन पंडित म्हणतात त्याप्रमाणे, चांगले वाईट परिणाम पाहून, शास्त्रकारांनी आपले शास्त्र लिहिले असते, तर असल्या विवाहाचा त्यांनी पुरस्कारच केला असता. पण देश काल बघून परिस्थिती अभ्यासून, प्रत्यक्ष अवलोकन करून बुद्धीच्या, तर्काच्या आश्रयाने निर्णय करण्याची ऐपतच या शास्त्रकारांच्या ठायी नव्हती. त्यांच्या कोणत्याही ग्रंथात तर्कनिष्ठ कारणे कोणत्याही प्रसंगी दिलेली नाहीत. असे केल्याने सर्व कुळ नरकात जाईल, पुढील जन्मी ते लोक कृमिकीटक होतील, अनंत जन्म या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल, अशीच कारणे ते देतात. पूर्वकाळी विदुर व धर्मव्याध हे दोघे शूद्र असून मोठे धर्मवेत्ते होते, म्हणून शूद्रांना धर्माधिकार आहे, असे कोणी म्हणेल. त्यावर या शास्त्रकारांचे उत्तर असे आहे, की पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले होते म्हणून सर्व शूद्रांना तसे होणार नाही. पण पुढील काळातील शूद्रांना पूर्वजन्मीची पुण्याई नव्हती हे या शास्त्रकारांनी कसे ठरविले ? पण असा प्रश्न विचारणे हेच चूक आहे. कोणत्याही सुसंगत युक्तिवादावर त्यांचे शास्त्र उभारलेलेच नाही. त्यांना तसे उभारण्याचे सामर्थ्यच नव्हते. ज्यांना तशी ऐपत होती त्यांनी अगदी रोख व्यवहार पाहून, प्रत्यक्ष अवलोकन करून, आपले धर्मशास्त्र रचले होते. त्यामुळे शूद्र राजा होण्यास हरकत नाही, शूद्राला मंत्रिपद देण्यास हरकत नाही, चारित्र्यावरून वर्ण ठरवावा, अशा तऱ्हेचे निर्णय त्यांनी दिले होते. त्यांच्या त्या धर्मशास्त्राचे सविस्तर विवेचन गेल्या लेखात केलेच आहे. येथे आपण त्याच्याविरुद्ध असलेल्या दुसऱ्या विचारप्रवाहाचा, अगदी भिन्न अशा तत्त्वप्रणालींचा, धर्मशास्त्राचा विचार करीत आहो. शूद्रांना धर्मबाह्य लेखून कायमचे पतित मानून एक बहुसंख्य मानवसमूह जीवनातून उठविण्याचे कार्य त्या धर्मशास्त्राने केले आहे. ते एवढेच करून थांबले नाही. हिंदुसमाजाच्या चिरफळ्या करण्याचे धोरण आणखी पुढे नेऊन, त्यांनी शूद्रांतून काही जाती तोडून काढून, त्यांना पूर्ण अस्पृश्य करून टाकले. आज भारतात ७-८ कोटी अस्पृश्य आहेत. यावरून केवढ्या मोठ्या मानवसमूहाची या धर्मशास्त्राने हत्या केली आहे हे ध्यानात येईल.

अस्पृश्यता अशास्त्रीय :
 पं. सातवळेकर, श्रीधरशास्त्री पाठक, म म. काणे या पंडितांचे असे निश्चित मत आहे की, पूर्वकाळी अजच्यासारखी अस्पृश्यता मुळीच नव्हती. काणे म्हणतात की, वेदवाङ्मयात चर्मकार, चांडाळ, पौल्कस ही नावे आहेत. पण या जाती अस्पृश्य आहेत, असा कोठेही निर्देश नाही. आरंभीच्या काही स्मृती चारच वर्ण मानतात. मनूच्या मते पाचवा वर्णच अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा की, त्या काळी आजच्या अस्पृश्यांची गणना शूद्र वर्णातच होत असे. आणि शूद्राच्या हातचे अन्न खाण्यास सुद्धा इ. सनाच्या ८ व्या ९ व्या शतकापर्यंत शास्त्रकारांची हरकत नव्हती. वरील तीनही पंडितांच्या मते, जन्मजात अस्पृश्यता हिंदुधर्मशास्त्रात फक्त एका चांडाळाच्या बाबतीत सांगितलेली आहे. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांचे अपत्य म्हणजे चांडाळ. तोच फक्त जन्माने अस्पृश्य. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, ही अस्पृश्यता फक्त त्या व्यक्तीपुरती आहे. चांडाळ म्हणून जी जात आहे ती यामुळे अस्पृश्य ठरत नाही. शूद्रब्राह्मणी या संकरातून झालेली अपत्ये यांना लावलेला चांडाळ शब्द पारिभाषिक आहे, तो जातीचा वाचक नाही. चांडाळ जाती ही शूद्र आहे. म्हणून ती स्पृश्यच आहे. वरील पारिभाषिक चांडाळ हे मात्र खरे जन्माजात अस्पृश्य. इतर काही अस्पृश्य शास्त्रात सांगितले आहेत ते जन्मजात नव्हेत. ते केवळ त्यांच्या हीन व्यवसायामुळे अस्पृश्य झालेले असतात. आणि तेही तेवढ्या वेळापुरतेच. त्यातून ते मोकळे झाले, स्वच्छ झाले की ते स्पृश्य होतात. पारिभाषिक चांडाळ सोडले तर इतरांच्या बाबतीत जी अस्पृश्यता मानली जाते ती, उत्तरकालीन रूढीमुळे आलेली आहे. तिला शास्त्राधार नाही. रूढिवादी लोकांनी आपल्या लहरीप्रमाणे हा कडकपणा अवलंबिलेला आहे. (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, भाग ४ था व ५ वा.) अस्पृश्यता पूर्वी नव्हती, अस्पृश्यांच्या दर्शनाने द्विज अपवित्र होतात, त्यांच्या सावलीनेही विटाळ होत असले मूर्ख दण्डक मनुयाज्ञवल्क्यांच्या स्वप्नांतही नव्हते. १० व्या शतकात झालेल्या मेधातिथीनेही असेच मत मांडले आहे. त्यानंतरच्या काळात सर्वच जातिबंधने कडक होऊ लागली. दूरीकरणाची, भेदाची प्रवृत्ती वाढत चालली आणि त्यानंतर अस्पृश्यता निर्माण झाली. (म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा, प्रकरण ४ थे) या बाबतीत काणे यांनी व्याघ्रपाद, बृहस्पती, अपरार्क, कुल्लूक यांचा निर्देश केला आहे. आपल्या टीकांमधून त्यांनी अस्पृश्यतेचे शास्त्र सांगितले आहे. पण पूर्वपरंपरेला ते मुळीच मान्य नव्हते.

समाजपराङ्मुख :
 या शास्त्रकारांचे हे शास्त्र पाहिले की, वस्तुस्थिती पाहून, परिस्थितीचा अभ्यास करून समाजाच्या उत्कर्षापकर्षाकडे सतत लक्ष ठेवून, धर्मनियम सांगावयाचे असतात, हे प्राचीन ऋषींचे थोर तत्त्व जाणण्यास हे शास्त्रकार असमर्थ होते, हे स्पष्ट दिसून येते; आणि हेच उत्तरकाळच्या हिंदुसमाजाचे मोठे दुखणे आहे. धर्मामुळे अर्थकामही प्राप्त करून घ्यावयाचे असतात, धर्म हा लोकांच्या प्रभवासाठी, अभ्युदयासाठी असतो, ही दृष्टीच पुढल्या काळी नष्ट झाली. आणि शास्त्रकारांनी धर्म अदृष्टफल करून टाकला. अमका शास्त्रनियम योग्य की अयोग्य हे तपासून पाहण्याचा निकष पारलौकिक कल्याण हा झाला. ते कल्याण किती झाले, झाले की नाही, अकल्याणच झाले की काय, हे पाहण्याचे काहीच साधन उपलब्ध नसल्यामुळे, स्मृतिकारांची लहर एवढेच धर्माला प्रमाण राहिले आणि हिंदु- समाजाचा अधःपात झाला. प्राचीनकाळी व्यवहार, परिस्थिती पाहून, अनुभव, बुद्धी, तर्क यांच्या आधारे शास्त्रनिर्णय करण्याची पद्धत होती, हे आपण विसरता कामा नये.

तस्मात् कौन्तेय विदुषा धर्माधर्मविनिश्चये
बुद्धिमास्थाय लोकेस्मिन् वर्तितव्यं कृतात्मना ॥

हे अर्जुना, म्हणून विद्वानाने या जगात बुद्धीचा अवलंब करून धर्माधर्माचा निश्चय करावा व त्याप्रमाणे वागावे. (शांति, १४१ -१०२)

केवलं शास्त्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णयः ।
युक्तिहीने विचारे तु धर्महानिः प्रजायते ॥

केवळ शास्त्राचा आश्रय करून धर्मनिर्णय करू नये. तर्कहीन विचार केला असता धर्महानी होते. (पाराशर माधवीये- बृहस्पतिः)

देशकालौ तु संप्रेक्ष्य बलाबलमथात्मनः ।
नादेशकाले किंचित् स्यात् देशकालौ प्रतीक्षताम्

(वनपर्व २८-३२)

परिस्थिती व आपले बलाबल पाहूनच कोणताही निर्णय करावा.
 अशा तऱ्हेची शेकडो वचने प्राचीन धर्मग्रंथांत सापडतात. महाभारत, रामायण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, नारदस्मृती असे काही व्यवहारवादी, वास्तवादी, बुद्धिवादी ग्रंथ त्या काळात होऊन गेले. साधारणपणे इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत झालेल्या स्मृतींतही, अनेक ठिकाणी अशी समाजाभिमुख दृष्टी असल्याचे, दिसून येते. पुढे या दृष्टीचा लोप झाला आणि मग रघुनंदन, कमलावर भट्ट यासारखे देशकाल न पाहणारे, समाजपराङ्मुख, विवेकहीन, मूढ शास्त्रकार निपजू लागले. आपल्या या शास्त्राने बहुजनसमाज व एक मोठा राज्यकर्ता वर्ग किती दुखावेल, त्यामुळे हिंदू समाज किती विघटित होईल, एक वर्ण दुसऱ्या वर्णापासून असा तोडून काढण्यात आपण केवढे घोर पातक करीत आहो, याचा विचारही या पंडितांच्या मनाला शिवला नाही. यावरून उत्तर काळचे हे शास्त्रकार किती वेजबाबदार होते व यांच्यामुळेच धर्महानी होऊन हिंदुसमाज शतधा कसा भग्न झाला याची कल्पना येईल.

आणखी पोटभेद :
 'धर्म अदृष्टफल झाला, धर्मशास्त्राचे नियम हितकारक की घातक हे ठरविण्याचे ऐहिक निकष अमान्य झाले, धर्माधर्माची फले परलोकात मिळतील, पुढल्या जन्मी मिळतील असे शास्त्रकार सांगू लागले की, समाजाचा अधःपात होतो. कारण कोणीही काहीही शास्त्र सांगावे ! इतिहास, अनुभव, तर्क, प्रत्यक्ष व्यवहार अशापैकी ते तपासून पाहण्यास काहीच साधन नाही; त्यामुळे भोळा समाज अदृष्टाच्या भीतीने ते मानू लागतो. सहाव्या सातव्या शतकानंतर स्मृतींनी मिश्र विवाह, आणि सर्व वर्णांचा एकत्र अन्नपानव्यवहार निषिद्ध ठरविला आणि समाजही ते मानू लागला व त्यामुळे हिंदू समाजाची विघटना होऊ लागली. आणि ही विघटनेची वृत्ती पुढे, शास्त्रकारांच्या मूढतेमुळे, बळावतच गेली. अनुलोम विवाह पूर्वी शास्त्रविहित होते आणि व्यवहारातही ते घडून येते होते. पण हळूहळू शास्त्रकार त्याचा निषेध करू लागले. आणि हिंदुसमाजाचे भिन्न वर्ण एकमेकांपासून दूर जाऊ लागले. पुढल्या काळात या समाजाच्या आणखी चिरफळ्या होऊ लागल्या. आतापर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चारच वर्ण होते. यांच्या संकरातून निर्माण झालेली संतती कधी पित्याच्या वर्णाची तर कधी मातेच्या वर्णाची ठरे. किंवा वर सांगितल्याप्रमाणे या संततीची शास्त्रकार वेगळीच जात मानीत. पण अजून या चार वर्णात पोटवर्ण किंवा पोटजाती झाल्या नव्हत्या. अखिल भारतातील ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य यांचा एकच वर्ण असे. त्यांच्यांत आणखी पोटभेद नव्हते. पण अकराव्या शतकापासून ब्राह्मणांत पंचगौड व पंचद्रविड हे भेद होऊ लागले आणि मग एका प्रांतातही कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, सहवासी, पळशे अशा पोटजाती निर्माण झाल्या. आणि याचप्रमाणे क्षत्रिय व वैश्य या वर्णाचीही शकले झाली. अर्थात पोटजातीबरोबर उच्चनीचतेचा दुरभिमान निर्माण होऊन समाज छिन्नभिन्न होऊ लागला. डॉ. आळतेकर म्हणतात, अत्रिसंहितेसारख्या स्मृती, या प्रांतातले ब्राह्मण हीन, त्या प्रांतातले श्रेष्ठ, असे सांगून या विघटक वृत्तीचे पोषणच करीत राहिल्या. त्याचा हळूहळू परिणाम होऊन पुढल्या काळात प्रांतभेद बळावले व समाज विदीर्ण झाला. (राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स, पृ. ३३५) कुलगुरू चिं. वि. वैद्य यांनी आपल्या मध्ययुगीन इतिहासाच्या प्रत्येक खंडात हेच मत मांडले आहे. त्यांच्या मते सातव्या शतकात हर्षाच्या काळी जातिनिर्बंध बरेच सैल होते. पुढच्या काळात ते कडक होत गेले. त्यामुळे अनुलोम विवाह हळूहळू बंद होत गेले. आणि नंतर ब्राह्मण क्षत्रिय- वैश्यांतही पोटभेद निर्माण होऊन समाज फुटू लागला. (भाग १ ला- पृ. ७८ ते ९६; भाग २ रा, पृ. ३१३-३२१, ३९१-९२; भाग ३, ५३२-५५०) 'आमच्या मते या सुमारास जातिबंधने अधिक दृढ झाली, हे हिंदूंच्या अधःपाताचे कारण आहे.' असे आपले स्पष्ट मत शेवटच्या भागात त्यांनी दिले आहे.
 आंतरवर्णीय विवाह बंद झाले, जातींच्या पोटजाती झाल्या. त्याचप्रमाणे सर्व वर्णाचा एकत्र अन्नपानव्यवहार, जो पूर्वी शास्त्रविहित होता तोही, या सुमारास बंद झाला व समाजाच्या भिन्न घटकांमधील द्वेष वाहू लागला. गौतम, आपस्तंब, बौद्धायन या धर्मसूत्रकारांना सहभोजन पूर्ण मान्य होते. पण आठव्या नवव्या शतकातील स्मृतिकार अंगिरस, व्यास, यम यांनी हे निषिद्ध ठरविले. शूद्राचे अन्न तर यांनी ब्राह्मणाला वर्ज्य ठरविलेच, पण क्षत्रिय वैश्यांचेही बव्हंशी वर्ज्य ठरवून जातीजातीत पाचरी ठोकण्याचे काम पुरे केले. (डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ३३८) इ. स. ८०० ते १००० या कालाविषयी लिहिताना कुलगुरू वैद्य म्हणतात, या कालातील विशेष लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्व वर्णांच्या लोकांचा होणारा एकत्र अन्नपानादी व्यवहार. अनुलोम विवाहाप्रमाणेच एकत्र भोजनाच्या प्रघाताने समाजात एकजीवपणा व जोम उत्पन्न होई यात शंका नाही. (भाग २रा, पृ. ३२९) पुढील काळात मात्र अन्नपानादिकांविषयी जास्त कडक निर्बंध घालण्यात येऊ लागले. ब्राह्मण आपल्याला जास्त शुचिर्भूत समजू लागले, क्षत्रियांकडून पाणी घेणे हेही त्यांना वर्ज्य झाले. यामुळे जातीजातीतला स्नेहभाव कमी होत गेला यात आश्चर्य नाही. (कित्ता, पृ. ३९१-९६) याच प्रकाराचे विचार म. म. काणे, पं. सातवळेकर, तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी व्यक्त केल्याचे मागे सांगितलेच आहे.
 आंतरवर्णीय विवाह व अन्नपानव्यवहार हे निषिद्ध ठरवून उत्तरकालीन शास्त्रकारांनी हिंदु समाजातील भिन्न घटकांना परस्परांपासून तोडून काढले. त्याचाच परिपाक होऊन एका वर्णात पोटजाती निर्माण होऊन आणखी शकले झाली. एवढ्याने हा समाज पुरेसा विघटित होणार नाही अशी चिंता वाटूनच की काय याच सुमारास भिन्न भिन्न देवतांच्या अभिमान्यांनी शैव, वैष्णव, शाक्त असे परस्पर व्यवच्छेदक पंथ स्थापून विघटनेचे कार्य पुरे केले. हिंदुधर्म सहिष्णू आहे अशी त्यांची पुरातन काळापासून कीर्ती आहे. पुराणात शिवविष्णू एकरूप आहेत, सर्व देवता एकाच परमेश्वराच्या मूर्ती आहेत असे अट्टाहासाने सांगितल्याचे वर आलेच आहे. वेद, गीता यांचे हेच संग्राहक धोरण होते हे प्रसिद्धच आहे. पण इसवी सनाच्या आठव्या नवव्या शतकापासून काही धर्मधुरीणांची बुद्धी फिरली आणि हिंदुधर्माचे उदार, संग्राहक रूप त्यांना पहावेनासे झाले. आणि त्यांनी पंथभेद माजविण्यास प्रारंभ केला. आपल्या सर्वच धर्भग्रंथांत उत्तरकालीन लोकांनी सारखी भर घातली आहे हे मागल्या लेखात सांगितलेच आहे. शैव, वैष्णव इत्यादी पंथांत विद्वेष माजविणारी, त्यांच्यात वैरभाव चेतविणारी वचने याच पद्धतीने कोणी तरी मागून घातल्याचे स्पष्ट दिसते. अर्थात हा प्रक्षेप कोणी व केव्हा केला हे सांगण्यास कोणतेच प्रमाण उपलब्ध नाही; पण पूर्वीच्या विचारांशी सर्वस्वी विसंगत असे हे प्रक्षेप आहेत त्यामुळे असे म्हणणे युक्त वाटते. किंवा एकाच वेळी दोन्ही विचारप्रवाह चालू होते, समाजपोषक विचारांचे पूर्वी प्राबल्य होते व उत्तरकाळी त्यांचा प्रभाव कमी होऊन घातक तत्त्वज्ञानाची सरशी झाली असे तरी मानले पाहिजे. विघातक विचार केव्हा सांगितले याला महत्त्व कमी. ते प्रभावी केव्हापासून झाले हे पाहण्याला महत्त्व जास्त.
 वराहपुराण, व मत्स्य, वायू, भागवत, पद्म ही पुराणे यांत शैवसिद्धांतांची निरर्ग लनिंदा केलेली आहे. जो वैष्णव नाही तो नास्तिक, लोकांनी विष्णूखेरीज अन्य देवतांची उपासना करू नये, त्यांना नमस्कार करू नये, त्यांच्या देवळांतसुद्धा जाऊ नये असा उपदेश बुद्धहारीतस्मृतीने केला आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य ही दर्शने व पाशुपतासारखी पंथतत्त्वे ही या पुराणांनी वेदबाह्य व तामस ठरवून त्यांच्या स्मरणानेसुद्धा मनुष्य पतित होतो असे सांगितले आहे. या पुराणकारांच्या पुढे एक अडचण होती. काही पुराणांत विष्णूच्या तोंडीच शिवाची स्तुती आहे. मग शैवमत निंद्य कसे ठरणार ? पण यावर त्यांनी एक क्लुप्ती लढविली. त्यांनी पुराणातच असे लिहून ठेविले की स्वतः विष्णूनेच शिवाला विनंती केली, की तुम्ही लोकांना वाममार्गाला नेण्यासाठी असे वेदबाह्य शास्त्र रचा. त्याप्रमाणे शिवाने केले. तेव्हा ही शैव शास्त्रे वेदबाह्यच होत. मत्स्य, वायू इत्यादी पुराणांत बौद्ध, जैन ही शास्त्रे विष्णूने स्वतःच लोकांना मोह पाडण्यासाठी सांगितली, असेही म्हटले आहे. (काणे, धर्मशास्त्र, ५ वाखंड, पृ. ९७४-७६) मनुष्याने एकदा बुद्धिवाद सोडला, ग्रंथाला प्रमाण मानून त्याचे बंधन मानण्याचा शास्त्रकारांनी दण्डक घातला म्हणजे मनुष्याचा किती अधःपात होतो हे यावरून दिसून येईन. इतर पंथांच्या निंदेची स्वतःची हौस भागविण्यासाठी या पुराणकारांनी शिव, विष्णू यांचेच बळी देऊन टाकले, आपले अधम विचार त्यांच्या तोंडी घालून दिले. अर्थात त्यामुळे या पुराणकारांना इष्ट तो अनर्थ लवकरच घडून आला. हे भिन्न पंथ परस्परांचे वैरी झाले व हिंदु- समाज आणखी भग्न झाला.
 रामानुज (इ. स. १०१६) हे वैष्णवपंथी होते. एका चोळराजाने त्यांचा अनन्वित छळ केला. कुलोत्तुंग या चोळ राजाने (इ. स. ११३३-५०) शैवमताभिमानामुळे गोविंदांची मूर्ती समुद्रात फेकून दिली. आणि शिव-विष्णू यांची एक मूर्ती असलेले देऊळ पाडून टाकले. तिरुक्कदाईयूर येथे ११६० साली धर्मधुरीणांची महासभा भरली होती. तिने शिवमंदिराच्या पुजाऱ्यांना एक ठराव करून बजावले की तुम्ही वैष्णवांत मिसळला तर तुमची मालमत्ता जत करण्यात येईल. याच्या आधीचा चोळ राजा राजराज (इ. स. ९८५-१०१४) व त्याची बहीण कुंदवई यांनी शिव, विष्णू, जिन यांची मंदिरे स्वतः बांधली होती. पण ती सहिष्णू वृत्ती आता नष्ट झाली. यानंतर वैरभाव नष्ट करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. पण एकदा दोन पंथातील स्नेहभाव संपला तो संपला आणि विघटना होऊन समाजाचा अधःपात झाला. (प्रा. नीळकंठशास्त्री, दि चोलाज्, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ४८८- ९०) बौद्धधर्म या सुमारास भारतातून लुप्त झाला होता. पण जैनधर्म पुष्कळच प्रभावी होता. पण इतके दिवस त्याच्याबद्दल सहिष्णू वृत्ती होती. ती आता नष्ट झाली व सनातन वैदिक धर्म, वीरशैव आणि जैन यांच्यांत नित्य संघर्ष होण्यास प्रारंभ होऊन भारतात आतापर्यंत असलेले धर्मैक्य नष्ट झाले. कुलगुरू चिं. वि. वैद्य यांनी याचे सविस्तर विवेचन केले आहे. ते म्हणतात, या कालविभागात (इ. स. १००० ते १२००, हिंदुधर्मात भिन्न भिन्न द्वेष करणारी मते प्रबळ झाली आणि मजबूत राष्ट्राचे जे एक मुख्य लक्षण धर्मैक्य ते नाश पावून हिंदुस्थान दुर्बल झाले. (मध्ययुगीन भारत, भाग ३ रा, पृ. ५८५-६२२)
 पण हिंदुसमाजाच्या एकरूपतेचा, धर्मैक्याचा खरा भंग झाला, तो मुस्लीम आक्रमणामुळे मुस्लीम आक्रमकांनी मृत्युदंड दाखवून हजारो, लाखो लोकांना- हिंदूंना- सक्तीने बाटविले. प्रारंभी या आपत्तीच्या बाबतीत धर्मधुरीण जागृत होते. इ. स. ७१२ साली महंमद कासीम याने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि नंतर हजारो हिंदूंना बाटविले. पण लगेच ८-१० वर्षांनी देवल ऋषींनी नवी स्मृती रचून यांच्या शुद्धीकरण्याची व्यवस्था केली आणि एका महान आपत्तीचे निवारण केले. पण पुढील मूढ शास्त्रकारांना हा सुविचार मानवला नाही. 'कलिवर्ज्य' नामक एक प्रकरण (शास्त्रग्रंथ) रचून त्यांनी पतितपरावर्तन निषिद्ध मानले. आणि एकदा बाटला तो कायमचा बाटला असे ठरून एक प्रचंड हिंदुसमूह मूळ धर्मापासून तुटून निघाला; एवढेच नव्हे तर या हिंदुसमाजाचा कायमचा हाडवैरी बनून त्याच्या उच्छेदाचे कंकण त्याने हाती बांधले. वास्तविक मनूच्या मते सक्तीचे धर्मांतर हे धर्मांतरच नव्हे. (सर्वान् बलकृतान् अर्थान् अकृतान् मनुरब्रवीत्- मनु. ८. १६८) खुषीने धर्मांतर केले असले आणि मग पश्चात्ताप झाला तरी अल्प प्रायश्चित्ताने शुद्धी होते असे याज्ञवल्क्य, कश्यप, विष्णू इत्यादी शास्त्रकारांनी सांगितले आहे. जे मूळचे अहिंदू त्यांनाही चातुर्वर्ण्यात समाविष्ट करून घ्यावे, असे महाभारत, हरिवंश यांत उपदेशिले आहे. पण पुढे पावित्र्याच्या कल्पना फारच उंचावल्या आणि हा विवेक सुटला. (हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- कोकजे, प्रकरण ७ वे.) आणि हिंदुधर्मातून गेलेला मनुष्य कायमचा पिढ्यान् पिढ्या शतकानुशतक मुस्लिमच कसा राहील याची चिंता हिंदू शास्त्रकार वाहू लागले.
 मुस्लीम झालेले कायम मुस्लीम कसे राहतील एवढीच चिंता करून हिंदू मानवसमूह थांबत नाही. हिंदू असलेल्यांना बाहेर लोटून मुसलमान कसे करता येईल याचीही चिंता हिंदुधर्मीय वाहतात. आचार्य क्षितिमोहन सेन यांनी याचे बंगालमधील एक उदाहरण दिले आहे. ते वाचून कोणाही हिंदूला उद्वेगच येईल. बंगालमधील टिपरा जिल्ह्यात माहीमाल मुसलमान नामक एक समाज आहे. ते लोक मूळचे हिंदू कैवर्त- कोळी होते. एकदा शेजारच्या गावी कॉलरा सुरू होऊन त्यात तेथील सर्व मुस्लीम लोक बळी पडले. फक्त एक लहान मुलगा वाचला. त्याला या कैवर्तातील एका गृहस्थाने आपल्या घरी वाढविले. काही वर्षांनी भोवतालच्या हिंदू समाजाने त्या मुलाचा दीर्घ संसर्ग घडल्यामुळे या सर्व कैवर्तावर बहिष्कार घातला. त्यांनी अनेक वेळा हिंदूंची करुणा भाकली, पण व्यर्थ. त्यामुळे ते लोक अगतिक होऊन शेवटी मुसलमान झाले. आता ते कडवे मुसलमान बनले आहेत. राजस्थानातील मलकाना रजपुतांची हकीगत अशीच आहे. देश, गोब्राह्मण यासाठी शौर्याने लढणारा हा समाज! एकदा यांच्या गावच्या तळ्यात मुस्लीमांनी गोमांस टाकले अशी अफवा उठली. हिंदू लोक अत्यंत 'पवित्र!' त्यांना हा भ्रष्टाकार कसा सहन होणार ? त्यांनी या सर्व रजपुतांना मुस्लीम धर्मांत लोटून आपल्या पावित्र्याचे रक्षण केले. (संस्कृतिसंगम- पृ. १०३) या पावित्र्य कल्पनेपायीच हिंदुसमाज छिन्नभिन्न झाला, असा सिद्धान्त तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी आपल्या 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या ग्रंथात मांडला आहे व अनेक प्रमाणे देऊन तो सिद्ध केला आहे. पावित्र्याच्या या कल्पनेने हिंदुसमाजाला जोपर्यंत झपाटले आहे तोपर्यंत त्याची संघटना होणे दुर्घट आहे.
 अशा या विकृत धर्मबुद्धीमुळे या हिंदुसमाजाला संघटनात्त्व असे राहिलेच नाही. राष्ट्रभावना पूर्वी उदित झाली होती हे मागे सांगितले आहे. पण कोणत्याहि समाजपोषक भावनेचा ग्रंथ, प्रवचने, कीर्तने यांनी सतत परिपोष करावा लागतो. तो तर पुढल्या काळात झाला नाहीच. उलट वर सांगितल्याप्रमाणे तिला सुरुंग लावण्यातच उत्तरकाळचे शास्त्रकार धन्यता मानीत होते. धर्म ही समाज- संघटक अशी दुसरी शक्ती होय. पण त्या दृष्टीने भारतात धर्माचा संपूर्ण लोपच झाला होता असे वरील विवेचनावरून दिसून येईल. सर्व समाजाला बद्ध करील असा एकच आचार, विचार, संस्कार हिंदुमानवसमूहात असताच कामा नये अशी शास्त्रकारांची प्रतिज्ञाच होती. एक आचारविचार हे कलियुगातील अधःपाताचे लक्षण म्हणून त्यांनी सांगितले आहे. एक आचारविचार नाही आणि एका वर्णाला आपल्याच धर्मांतील दुसऱ्या वर्णीयाची सावलीही खपत नाही, इतका बंधुभाव हिंदुधर्मात होता. अशा स्थितीत संघटना होणार कशी आणि टिकणार कशी ? त्यात आणखी या काळात निवृत्तिवादाची, मायावादाची, भर पडली. त्यामुळे हिंदूधर्म हा समाजधर्म असा राहिलाच नाही. तो संपूर्ण व्यक्तिधर्म झाला. आणि एक हिंदू दुसऱ्या हिंदूचा कोणी नाही अशी स्थिती निर्माण झाली. राजधर्म हा सर्व धर्मांत श्रेष्ठ असा महाभारतकारांचा सिद्धान्त आहे. तो आता दृष्टिआड झाला आणि वैयक्तिक स्वर्गमोक्ष, व्रते, उपासतापास, सोवळेओवळे हाच धर्मं झाला. सर्व समाजाला मिळून काही करावयाचे आहे, साधावयाचे आहे ही भावना या मानवसमूहातून नष्ट झाली.

कलिवर्ज्य :
 विषमता, भेदवृत्ती, दूरीभाव, विघटना यांजी बीजे जरी आपल्या धर्मशास्त्रात प्राचीन काळापासून होती तरी त्यांचा परिपोष इ. स. ९ व्या १० व्या शतकांतील धर्मशास्त्रामुळे विशेष झाला. आणि अकराव्या शतकात रचल्या गेलेल्या कलिवर्ज्य प्रकरणामुळे त्या विषारी रोपट्याचा पूर्ण विषवृक्ष झाला व तेथूनच विषमतेचे विष अंगी भिन्न हिंदुसमाजाचा झपाट्याने अधःपात होऊ लागला. कलिवर्ज्य प्रकरण हे उत्तरकाळाच्या विघातक धर्मशास्त्रांपैकी एक महत्त्वाचे प्रकरण असल्यामुळे त्याची थोडक्यात कल्पना देणे अवश्य आहे. त्यावाचून या विवेचनला सांगता येणार नाही.
 'कलिवर्ज्य' ही स्मृती नाही. अनेक पुराणे व स्मृती यांतील वचने एकत्र करून हे स्मृतिवजा तयार केलेले धर्मशास्त्र आहे. मागील धर्मशास्त्रकारांनी अनेक धर्मनियम सांगितले होते. यांतील कलिवर्ज्याच्या कर्त्याला जे नापसंत होते ते त्याने एकत्र केले व मागल्या थोर शास्त्रकारांनी हे नियम सांगितले असले, तरी ते कलियुगात लागू नाहीत, असे बेधडक सांगून टाकले. वास्तविक कलियुगकल्पनाच मागल्या शास्त्रकारांना मान्य नव्हती. त्यांच्या मनातही ती नव्हती. शिवाय, आमचे शास्त्र आम्ही आमक्या युगासाठी सांगितले आहे, असे त्यांनी कोठेही म्हटलेले नाही. सर्व हिंदुसमाज त्यांना त्रिकालदर्शी मानतो. तसे मानले नाही तर मनुयाज्ञवल्क्यांना आज प्रतिष्ठाच राहणार नाही. तरी या ग्रंथकाराने त्यांची अनेक शासने कलिवर्ज्यात घातली; आणि मागल्या स्मृतिकारांना त्रिकालदर्शी मानणाऱ्या हिंदुसमाजाने व त्या काळच्या शास्त्रकारांनी त्याचे हे कलिवर्ज्य स्वीकारले. हा कलिवर्ज्यकार इतका धीट की, पराशराने केवळ कलियुगासाठीच आपली स्मृती आहे, असे सांगितलेले असताना त्याचीही अनेक वचने त्याने कलिवर्ज्यात ढकलली आहेत. मागील शास्त्रकारांप्रमाणेच पराशरानेही शूद्रासमवेत केलेला अन्नव्यवहार विहित ठरविला आहे, विधवाविवाहास मान्यता दिली आहे. कलिवर्ज्याने ही दोन्ही शासने अविहित ठरविली. पतितांची शुद्धी प्राचीनांना मान्य होती. तीही त्याने कलिवर्ज्य ठरविली. आणि सर्वात अनर्थकारक म्हणजे त्याने केलेला व हिंदुसमाजाने मूढपणे मानलेला परदेशगमनाचा निषेध हा होय. या आधी दोन हजार वर्षे हिंदु लोक साम्राज्यासाठी, धर्मप्रसारासाठी व व्यापारासाठी सर्व जगभर संचार करीत असत. आता परदेशी गेल्यावर वाटेल त्या लोकांबरोबर अन्नपाणीव्यवहार होईल, मग जात बाटेल आणि मग बहिष्कार पडेल, या भीतीने समाजाला अत्यंत हितकर असा जो विश्वसंचार तो बंद पडला, आणि हिंदुसमाज कूपमंडूक बनला. त्याचे एक जिवंत ज्ञानसाधन नष्ट झाल्यामुळे तो आंधळा झाला आणि मग अज्ञानाने, भीतीने, अविवेकाने जो कोणी जे शास्त्र भकेल त्याला अनुसरू लागला. (कलिवर्ज्य विवेचनासाठी पाहा– हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- कोकजे, प्रकरण ८ वे; काणे- धर्मशास्त्र, खण्ड ३ रा. पृ ८८५ ते ९६८)

सर्व समाजच ग्रस्त :
 हिंदुसमाजाच्या विघटनेचा हा इतिहास पाहात असताना एक मोठा गंभीर प्रश्न मनात येतो. शास्त्रकारांनी वर वर्णिलेले मूढ, अधोगामी, विघटक शास्त्र सांगितले तरी सर्व समाजाने व त्याच्या इतर धुरीणांनी ते का मानले ? त्या काळात सर्व वर्णांचे राजे भारतात राज्य करीत होते. ह्युएनत्संगाने त्याच्या प्रवासकाळी (इ. स. ७ व्या शतकात) भारतात पाच राजे क्षत्रिय, तीन ब्राह्मण, दोन वैश्य व दोन शूद्र होते, असे लिहून ठेविले आहे. इतर ऐतिहासिक पुराव्यांनीही हे आता सिद्ध झाले आहे. तेव्हा ज्यांना या शास्त्रकारांनी, कारण नसताना केवळ लहरीखातर हीन लेखले त्यांनी या शास्त्राला का धिक्कारिले नाही ? सत्ता त्यांच्या हाती होती. शस्त्रबळ त्यांच्याजवळ होते. आणि प्राचीन काळातील उदार ऋषिमुनींच्या शास्त्राचेही बळ त्यांना आपल्या पाठीशी घेता आले असते. या काळात अनेक क्षत्रिय राजघराणी अत्यंत पराक्रमी होती. त्यांनी तरी या अधोगामी धर्मशास्त्राला किंवा अधर्मशास्त्राला विरोध करावयाचा. पण त्यांनी तसे तर केले नाहीच; उलट ब्राह्मणपूजक, चातुर्वर्ण्य- संरक्षक असे म्हणवून घेण्यातच भूषण मानले. याचा अर्थ असा की त्यांनाही शास्त्रप्रणीत जन्मनिष्ठ उच्चनीचता प्रिय होती, मान्य होती. मनूने ब्राह्मणांप्रमाणेच क्षत्रिय राजांचेही वर्णन केले आहे. इन्द्र, अग्नी, सूर्य, वायू इ. लोकपालांच्या अंशांनी विधात्याने राजाला घडविलेले असते. त्यामुळे त्याचे सामर्थ्य इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असते. त्याच्या अलौकिक तेजामुळे त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही. राजा स्वतः सूर्य आहे, इन्द्र आहे, ती एक महादेवता आहे, म्हणून राजाला तो लहान वयाचा असला तरी, मनुष्य मानून त्याचा कधीही अवमान करू नये, असे मनू म्हणतो. मनूचे हे मत सर्व क्षत्रियांनी स्वीकारलेले आहे. त्यांच्यातही वांशिक उच्चनीचतेच्या कल्पना अत्यंत प्रखर अशा होत्या. तेव्हा त्यांनी त्या अधोगामी शास्त्राला विरोध केला नाही यात नवल असे काहीच नाही. तीच गोष्ट वैश्य व शूद्र सत्ताधाऱ्यांची. भारतवर्षात अमुक एका राज्यात त्या काळी राजांनी अस्पृश्यता नष्ट केली, शूद्रांना वेदाधिकार दिले किंवा शास्त्रवचनांचा धिक्कार करून त्यांना इतरांच्या बरोबरीची प्रतिष्ठा दिली असे घडलेले नाही. या वर्णातले जे राजे झाले त्यांनी आपली प्रतिष्ठा आपल्यापुरतीच ठेविली. विषमतेच्या शास्त्रावर घाव घालून सर्व समाजाला त्याच्या शृंखलांतून मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचेसुद्धा कोठे आढळत नाही. सर्व समाजच जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या विषारी कल्पनांनी ग्रस्त झालेला होता असा याचा अर्थ होतो. यापरते दुर्दैव काय ?
 प्राचीन काळचे समाजधारणेचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान टाकून देऊन हिंदुसमाजाने या काळी दुसऱ्या कोणत्या तरी अधोगामी तत्त्वज्ञानाचा अवलंब केला असला पाहिजे असे तिसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी म्हटले होते. ते अधोगामी विघटनेचे तत्त्वज्ञान कोणते याचे येथवर विवेचन केले. हे विषमतेचे तत्त्वज्ञान आहे. आचार विषम, विचार विषम, धर्म विषम, न्याय विषम, सर्व समाजरचनाच विषम ! देशकालपरिस्थिती न पाहता, अंध अशा प्रामाण्यबुद्धीने विवेकहीन, मूढ अशा शास्त्रकारांनी हे तत्त्वज्ञान उपदेशिले आणि तितक्याच आंधळेपणाने व मूढबुद्धीने हिंदुसमाजधुरीणांनी ते स्वीकारले. यामुळे हा समाज छिन्नभिन्न झाला. येथे एकमेकांचा कोणी नाही अशी स्थिती झाली. सर्व समाज मिळून काही साधावयाचे आहे ही भावनाच या भूमीतून नष्ट झाली. 'या उत्तरकाळात हिंदुसमाजापुढे सर्वव्यापी, सर्वसंग्राहक असे ध्येयच राहिले नाही, त्यामुळे आम्हीच आमचे स्वातंत्र्य परकीयांच्या पदरात टाकले' असा सिद्धान्त मांडून तर्कतीर्थ कोकजेशास्त्री यांनी त्याचे फार उत्तम विवरण केले आहे. (हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- प्रकरण ११ वे.)
 इ. स. १००१ साली गझनीच्या महंमदाने भारतावर स्वारी केली व तेव्हापासूनच भारताच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागले आणि हळूहळू त्याचा खग्रास झाला. येवढे भीषण आक्रमण आल्यावरही हिंदूंनी त्याची कारणमीमांसाही केली नाही. ती ऐपतच त्याच्या बुद्धीला राहिली नव्हती. त्यामुळे विघटनेच्या विषवीजांचे तर त्यांनी निर्मूलन केले नाहीच, उलट निवृत्तिसाद, कर्मकांड, व्यक्तिनिष्ठ धर्म, पंथस्तोत्र इ. नवीन विषवीजांची त्यांत भरच घातली. यामुळे मूळच्या व्याधी जास्तच विकोपाला गेल्या. त्या खग्रासग्रहणातून अजूनही भारताचा मोक्ष झालेला नाहीं. पारतंत्र्याच्या या प्रदीर्घ घोर अंधःकारयुगाचे- त्यातील स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न, त्यातील यशापयश, त्यामागली संघटना, त्यामागचे तत्त्वज्ञान यांचे आता विवेचन करावयाचे आहे. पुढील प्रकणाचा तोच विषय आहे.

§