स्वरांत/वाढत्या सांजवेळे

विकिस्रोत कडून





वाढत्या सांजवेळे

 फूटपाथच्या पलीकडे वर्तुळाकार हिरवळ रंगीबेरंगी छत्र्यांच्या खाली बसून, लोक आरामात भेळपुरी खात आहेत. तिला मनस्वी इच्छा होते, भेळपुरी खावी. ती काही बोलायाच्या आत तो तिला म्हणतो,
 'खायची भेळपुरी?'
 ते दोघे लाल हिरव्या छत्रीखाली वसतात. संध्याकाळ दाटून आली आहे. भोवताली सळसळणारी गर्दी; लालहिरव्या दिव्यांच्या ठिपक्यांची उघडझाप; झगझगीत जरीनक्षीच्या फॉरिन नॉयलॉनमध्ये गुंडाळलेले चटकमटक चेहेरे; ... ... या साऱ्यांवर एक छाया दाटलेल्या संध्याकाळची. वायरच्या इवल्याशा बाजेवरती बसते. तोही तिच्या शेजारी ऐसपैस बसतो. ती आपोआप चोरून बसते; भेळेची खमंग चव ओठावर रेंगाळते नि मग तीही जरा सैल होते; चवीने भेळ खाऊ लागते.
 'हे काय सोन्याच्या बांगड्या नाही घातल्यास ? निदान मॅचिंग तरी घालायच्यास!'
 पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवणारा तिचा डावा हात अलगद हातात घेत तो म्हणतो. ती चमकून त्याच्याकडे बघते. तो घाईघाईने सांगतो;
 'हिने सांगितल्यात आणायला. तुझ्या पसंतीने घेऊ'
 तो मनोमन अस्वस्थ होतो. काहीसं अंतर राखून सावरून बसतो.
 तिला वाईट वाटतं. वाटतं ... उगाच संशय घेतला आपण. दूरच्या गावी इतक्या ओळखीचं माणूस अचानक भेटलं की जवळीक वाटणार ... त्याच्या कोमेजल्या मनावर फुंकर घालावी म्हणून ती नव्या उत्साहाने बोलू लागते. ... प्रश्न विचारू लागते. तिच्या किलबिलीनी तोही सुखावतो. सावरतो.
 'ही दिल्लीची चाट. एकदम मस्त. खा ही मिठ्ठी बघ तर... म्हणत तिच्या हातात पानांचा द्रोण तो कोंबतो. त्याची घाई पाहून तिलाही खुदकन् हसू येतं. टप्पोरकळी टचकन् फुटावी. तसं.
 समोर पाळणा फिरतोय. आणि त्या पाळण्यातून वरखाली गरगरणारी माणसंही. आईस्क्रीमचा कोन चोखत झिंग येईस्तो गरगरत राहायचं. तो तिला आग्रह करतो. ती वरवर नको म्हणते.
 'इतक्या दूर आल्यावर. लातुरातली धुळवट राप टाकून दे की ! ' तो चक्क तिचा दंड घट्ट धरतो आणि चक्राकडे धावू लागतो.
 दवबिंदू डंवरून यावेत तसा कपाळावर. घाम. रक्तारक्तातून विलक्षण थरथर. अवघा देह सतारीगत झणाणणारा. तिला वाटतं त्याला ओरडून सांगावं, ... ' सोड हात ... नको ओढूस ओखटया जाळ्यात. पण शब्द निःशब्द होतात. ती फिरतच राहते. चक्राच्या बरोबर
 चक्र फिरतंय. एकेका फेरीबरोवर गळून पडणारं एकेक ओझं ...
 ... दहा वर्ष कशी नि कुठे गेली कळलंच नाही. करकचून बांधल्यागत जीवन. लग्नानंतर मधुचंद्राला जाण्याचा हट्ट तिचाच. म्हणून तरी महाबळेश्वरला जाता आलं. नंतर माहेरी जाऊन निवांत होणंही कठीण. तो कोर्टकचेऱ्या आणि राजकारणात गुंतलेला. मुंबई-औरंगाबादच्या फेऱ्यात अडकलेला. घरी एकटं बसून कंटाळा येतो म्हणून ती एम. ए. ला बसली. आणि पहिली आली. मग राहूल. त्याच्या पाठोपाठ कुणाल. वर्षांनी लगेच यशोधरा. खरं तर यशू तिच्या मनाविरुद्ध आलेली. यशू चार महिन्यांची असताना कॉलेजात इतिहासाची जागा मोकळी झाली. मग सुरू झालं नोकरीचं रुटीन. फक्त रुटीन.
 पहाटे पाचला उठायचं. खाणं, चहा आटोपून कॉलेजला. पळायचं. बारा वाजता घरी आलं की जेवण. दुपारी वाचन, मग घरातली आवरसावर. शिवाय दिवसाचे दहा तास 'ट्रे सव्हिस'. त्याच्या राजकारणामुळे आणि वकिलीमुळे पाहुण्यांनी सदैव घर भरलेलं. संध्याकाळी जेवण. कधी मधी त्याच्या लहरींना दिलेली निर्जीव उत्तरं. तेही रुटीन.
 भाजी कोणती करायची ? तेल मोहरी संपली का? निमावन्सचं बाळंतपण कुठे करायचं ? असल्या पाणचट प्रश्नांशी झुंजण्यात सारी शक्ती संपायची. कधी कधी वाटायचं चिंच मिठात घोळवताना ; माठात भरताना कशी लालचुटुक आणि तकतकीत असते. पण दिवस मागे पडतात नि ती पार काळी मिचूट होऊन जाते. आपणही तशाच ओशट झालो आहोत.
 कॉलेजला असताना प्रत्येक पहाटेला गंध असायचा. नव्या उमलत्या बूच फुलांचा माथ्यावर आभाळ होतं स्वप्नांनी खंचलेलं. प्रा. ब्रोकरे प्लासीच्या लढाईचे परिणाम गंभीर चेहेऱ्यांनी सांगायचे तेव्हा, हिच्या वहीवर असायच्या कवितांच्या ओळी.
 पदरात घेऊन जुईच्या कळ्या
 स्वप्न पहाटेसम,
 थांबले आहे रे तुझ्या अंगणात ...
 कशी कुणास ठाऊक पण ती उमाकांतच्या प्रेमात पडली होती. त्याचा सावळा रंग, धरधरीत नाक, ताठर हनुवटी ... धारदार बोचक नजर, दाट कुरळे केस, दणगट बांधा. कधी अग्नी ज्वालेसारखी झळाळणारी, कधी पाकळीसारखी मऊ बनणारी त्याची शब्दकला. त्या शब्दांच्या वेगात ती वाहायली होती. साऱ्या स्वप्नांची ओंजळ त्याच्यावर उधळून मोकळी झाली होती.
 तो त्याच्या मार्गाने जातच होता. पण ती मात्र मुलं, संसार, परंपरा, रूढी या वेटोळयात अडकून मागे पडली होती. आपल्या मुलांपैकी एखादं कश्मीरच्या धुंद क्षणांची साक्ष देणारं असावं हे एक लग्नापूर्वीचं झुळझुळीत स्वप्न. पण तीनही मुलं चक्क लातूरचीच.
 यूथ सेमिनारचं बोलावणं आलं; नि तिला जाणवलं आपण तरुण आहोत. फक्त तीस वर्षाच्या.
 आरशासमोर उभी राहायल्यावर तिला त्यातली 'काकू' बोचली होती. एक शेपटा; मानेवरच्या वळ्या; अंगभार साचलेला धुळवट राप. तिनं ठरवून टाकलं होतं दिल्लीचं आमंत्रण स्वीकरायचं ... सारी ओझी दूर फेकून द्यायची.
 दिल्लीला निघण्याच्या आदली रात्र. तीन आठवडे ती दूर जाणार म्हणून केवढा व्याकूळ झाला होता उमाकान्त. संध्याकाळीच तीनही मुलांना घेऊन तिची आई सोलापूरला परतली होती. खूप दिवसांनी घरात उरले होते ती आणि तो.. फक्त दोघे मनमोकळया शृंगारातलं काठोकाठ सुख जाणवून, तो विलक्षण अस्वस्थ बनला होता. मनात कुठेतरी रुखरुखला होता.
 इंद्रा नको ना जाऊस दिल्लीला दहा वर्षे निसटून गेल्याची जीवघेणी हळहळ मनाला टोचतेय बघ. आपण इथेच मस्त मजेत राहू ... अं? ... we will enjoy Second honey moon अं? ... तिच्या कानांत तो गुणगुणला होता.
 आणि 'दिल्ली आयो तो ए; उठणो कोई' पलीकडची मारवाडीण आपल्या पोरीला उठवत होती. तिला त्यातलं 'दिल्ली आयो ' कळलं नि ती तट्टकन उठली. पहाटेचा गार गार वारा ... हिमालयावरून येणारा. निऑनच्या जांभळया उजेडात चमकणारे एकाकी रस्ते. क्षणभर पोटात गलबलून आलं. दूर फेकून द्यावं तसं वाटलं. आपल्या बावळटपणाचं नि वेडपणाचं तिचं तिलाच हसू आलं होतं.
 अंगावरचा कोट नि हातातली आटोपशीर बॅग सावरीत तिने प्लॅटफॉर्मवर चुटकन् उडी मारली होती.
 रिक्षा वेगाने धावत होती. पार्लमेंटहाऊस, राष्ट्रपतिभवन, साऊथ अवेन्यू, त्रीमूर्ती...रेशमासारखे मऊ मऊ रस्ते. पहाटेचा फिकाफिका उजेड; चौरस्त्याच्या मध्यावर दाटीवाटीने फुललेली फुलांची गर्दी, दुतर्फा हारीने उभी राहिलेली हिरवी झाडे ... साऱ्या वातावरणाला येणारा एक हलका टवटवीत बसंती गंध ! ! !
 तिच्या खोलीतली पार्टनर अजून गाढ झोपेत होती. दार उघडत मिटत्या नजरेने तिने सलामी दिली होती.
 "ओह! गुडमॉनिग. हॅव ए रेस्ट ॲण्ड रिलॅक्स.ओ के !!"
 शेवटच्या शब्दाला ती झोपलीही होती. इन्द्राला मनोमन जाणवलं होतं की आपण दिल्लीत आलो आहोत आणि तेही चाणक्यपुरी मधल्या एका बड्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेलमध्ये.
 काचेचा दरवाजा उघडून ती बाल्कनीत आली. समोर होते शांत रस्ते ... रस्त्यांच्या कडेकडेने झगमगणारे. निरनिराळ्या देशांच्या वकिलातींचे बोर्डस्. तनभर ... मनभर पसरली एक टवटवी ... न्ह्यायल्यावर पसरते तशी. तीन मुलं, घर, नवरा, काळजी सारं दूर दूर राहिलं होतं. आता दिल्ली, ताज, मथुरा, अभ्यास, सेमिनार यांत आकंठ बुडून जायाचं होतं.
 त्याच दिवशी सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन ती बंगालीबाबू बरोवर वाहेर पडली. समीर सेनही सेमिनारसाठीच आला. होता. दर महिन्याला त्याची दिल्लीला खेप असायची. दिल्ली दाखवायचे आश्वासन त्याने तिला दिलं होतं. मुक्तिसैन्यातल्या सैनिकांच्या मुलाखती घेण्यासाठी तो बांगला देशांत जाऊन आला होता. त्याची बडबड ऐकताना पार्लमेंट हाऊस कधी आले ते कळले नाही. कुण्या खासदाराला भेटण्यासाठी तो आत गेला आणि गोलखांबांची दाट किनार असलेल्या त्या वर्तुळाकार भव्य वास्तूंची भव्यता निरखीत ती हिरवळीवर बसून राहिली.
 'हॅलो, ... इंद्रा तू इथे कुठे ? '
 मोहन तिच्या जवळ उभा होता. तीही क्षणभर अवाक् झाली होती. दूर दिल्लीत पहिल्याच दिवशी इतकं जवळचं माणूस भेटेल असं वाटलंच नव्हतं.
 'यूथ लिडरशिप कँपसाठी आलेय मी. नि तू?'
 'ऑल इंडिया मेडिकल कॉन्फरन्स आहे सध्या इथे. . नाहीतरी निलंग्याचा कंटाळा आला की मी थेट दिल्ली गाठत असतो. मुंबईच्या गजगजाटापेक्षा दिल्लीत कसं गार वाटतं.'
 'एकटाच ?'
 'दिल्लीत यायचं ते निलंग्याची प्रत्येक निशाणी पुसून', फक्त मनमुक्त जगण्यासाठी. मग ते दुकटयांनी कशाला ? बरं काय काय पाहिलेस? ' विषय बदलत त्याने विचारले होते.
 'आज तर आलेय. एक बंगाली स्टुडंट गाठलाय दिल्ली दाखविण्यासाठी.'
 'तू म्हणशील तर येतो संध्याकाळी मी, कॅनॉटप्लेसला जाऊया.'
 'ये की ! नाही तरी इंग्लिशमधून बोलायचे म्हणजे प्राणसंकटच. येच.'
 'तू म्हणत असशील तर सिमला - आगऱ्यालाही जाऊ.. कंपनी हवी अशा ठिकाणी जायचं तर ! ' तो हसत म्हणाला होता.
 'झालं ! तीन पोरांना नि नवऱ्याला टाकून आलेय मी!' तिनेही उत्तर दिले होते.
 गडद जांभळ्या फुलांची लक्ष्मीविष्णू टेरीवायल नेसून संध्याकाळी ती त्याची वाट बघत टेरेसवर उभी होती. हल्लक फुल्ल बनून. टॅक्सीने एक वळण घेतले नि त्या सरशी ती त्याच्या अंगावर कलंडली होती. सेंटचा हुळहुळता दर्प. त्याक्षणी उमाकांतचे डोळे आठवले होते. भावुक आणि संथ. तिला वाटलं होतं का आठवावेत ते डोळे ... ती नजर? मोहन का परका होता ? दर महिन्याला त्याची लातूरला खेप असायची. औषधं घ्यायला आला की दोनदोन दिवस मुक्काम ठोकायचा. ती स्वैपाकात गुंतलेली असायची. चहाच्या घुटक्यागणिक गप्पा रंगायच्या. पुण्या-मुंबईची ट्रिप, नव्या साड्या; शिनॉन की कायसं सिल्क; त्याचा सुंदर पोत. महाराजा ... ' सखाराम बाइंडर...गुड्डी...आचार्य रजनीश सगळ्यांची हजेरी लागायची.. ती नेहमी म्हणायची,
 'मोहन भावजी तुम्ही असे रसिक नि तुमचं गाव धुळीन रापलेलं. करमतं काहो निलंग्यात? ' तिने एम्. ए. व्हावं. म्हणून किती आग्रह करायचा तो. उमाकांतला नेहेमी जामायचा.
 'उम्या लेका इंद्राला पार कोळशात आणि फोडणीत बुडवलंस तू. पुरे करा आता वाढता संसार. हवा लागू दे जरा तिला !'
 ... का कुणास ठाऊक. त्याचा होणारा स्पर्श तिला वेगळा वाटला होता. काहींसा आतुर ... उत्सुक. क्षणभर वाटलं होतं डोकं दुखण्याचं निमित्त सांगून केन्द्रावर परतावं. पण गाड्यागाड्या भिंगोऱ्या खेळताना भोवळ येतेय वाटले, तरी गरगरतच राहावेसे वाटते तशी ती त्याच्याबरोबर भारल्यागत पावलं टाकीत राहिली होती ...
 ...................
 'इन्द्रा डोळे उघड. चक्कर आली?'
 तिचं मस्तक त्याच्या खांद्यावर असतं. ती झडझडून जागी होते. बाजूला सरकते. त्याच्याकडे बघायचीही शरम वाटते. नकळत डोळे भरून येतात.
 'इन्द्रा इतकी कशी तू खुळी ? एवढी एम. ए. झालीस निव्वळ मोगलाई छाप आहेस. तू त्या सुलोचना वाणीचा साधनेतला लेख वाचलास? आपण इण्डियन सेक्सचा भलताच बाऊ करून घेतो. ... अरे वा ! दोराहाचा प्रिमियर आहे वाटतं आज ? आपण आता एम्योरिअममध्ये शॉपिंग करू. मग 'शुद्ध वेजिटेरियन' मध्ये श्रीखंड पुरीचे जेवण घेऊन माझ्या हॉटेलवर जाऊ. तिथून थेट थिएटरवर जाऊ. रिंग करून टाक तुझ्या केन्द्रावर. दोराहा, चेतना दस्तकच्या युगात वावरतेस. थोडी फ्री हो. कमॉन !' तिचा दंड धरून तो रस्ता पार करतो.  राजस्थान एम्पोरिअम. घुंगटात संकोचून बसलेल्या आदवशीर भावल्या; रंगीवेरंगी खडे, मणी; काचाच्या नक्षीच्या झगमगत्या चुड्या ! अरीवर्कनी चमचमणारी लाल चुनडी हातांत घेऊन तिथली तरुण विक्रेती अमेरिकन जोडप्याला सांगत असते,
 ... हा लाल रंग प्रीतीच्या बंधनाचा. विवाहाच्या वेळी हीच चुंदडी राजस्थानी वधू पेहेनते. पतिपत्नीचं नातं सदासदैव बांधून ठेवणारी, म्हणून हिचं नाव बंधन चुंदडी. बांधणी.
 गुलबक्षी रंगावर मोहनरंगी पिवळे बुंदके बांधलेली शिनॉन तो तिच्या अंगावर उलगडून टाकतो.
 'इन्द्रा तुला खुलतेय बघ'
 'न खुलायला काय झालं ? मला खरेदी मुळीच करायची नाही. फक्त यशूसाठी आरशांचा कुरता खरेदी करणारेय मी. माझ्या पर्सला परवडायची नाही साडी !'
 'तू कशाला चिंता करतेस? तू फक्त सिलेक्ट कर. बाकी माझ्यावर सोड.' असं म्हणत तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. आणि साडी वांधायला लावतो.
 तिच्या खांद्याला लगटून तो पायऱ्या उतरतो. वाढती संध्याकाळ. दाट होणारा, अस्वस्थ करणारा त्याचा स्पर्श. तुळशीत पुरलेली वेडी स्वप्नं जागी होतील अन् तुळशीचं पान नि पान जाळून जातील. १५० रुपयाची साडी, दहा रुपयाच्या चुड्या, सत्तर रुपायाचे नेपाळी खड्यांचे टॉप्स... एका झटक्यात उमाकांतने तरी एवढा खर्च केला असता का? एका तासात चारशे रुपयांची खरेदी शिवाय टॅक्सी, आइस्क्रीम, शुद्ध वेजिटेरिअन मधलं म्हागडं जेवण...जवळ जवळ पाचशे रुपयांचा खर्च. फक्त एका संध्याकाळी आणि त्यांच्या बदल्यात?
 हॉटेलवर चलण्याचा आग्रह, दोराहाच्या. सेकंड शोची तिकटे आणि मग ... कदाचित् ? तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो. रेशमी फासात अडकलेल्या असहाय हरणीसारखं मन तडफडायला लागतं.
 दृष्टीभर पसरलेली झगमगीत धुंद दिल्ली. वाढती संध्याकाळ. त्याचे लालस नि निर्धास्त डोळे; ऐसपैस वागणं. ती विलक्षण व्याकुळ होते. एकदम सावरते.
 'एवढ सामान घेतलंस. पण ठेवायला बॅग पण नाही'
 केरळा एम्पोरियममधून ते बास्केट खरेदी करतात. टॅक्सीत बसताना ती बास्केट काळजीपूर्वक दोघांच्या मध्ये ठेवते. तो वैतागतो नि ती बास्केट खाली आदळतो. ती खुदकन हंसते नि त्याला सांगते,
 'आत्ताशी ७॥ तर वाजताहेत. मला केंन्द्रावर जाऊ दे. ठीक ९ ला येते मी. रात्रीची परवानगीही काढून येईन.शिवाय मॅचिंग ब्लाउझही घेऊन येते. आहे माझ्याजवळ. ही बॅग राहूदे तुझ्या रूमवर ...' तिच्या लडिवाळ बोलण्याने सुखावतो.
 'ओ के ! ओके !! ' करीत उतरतो.
 केंन्द्रापुढच्या बागेतले नाजूक वळण घेऊन टॅक्सी पोर्चमध्ये उभी राहते. ड्राईव्हरच्या हातावर पाच रुपयाची नोट ठेवून मागे न पाहता ती धावतच पायऱ्या चढते आणि फोनकडे धावते.
 समोर सेमिनारचे सगळे प्रतिनिधी डायनिंगहॉलमध्ये डिनर घेताहेत. समीर तिथून तिला हात करतो. ती पण हसून हात हलवते. रिसेप्शनिस्ट गीताचे गोड हसणं ... ठाकूरदाने दाराशी ठोकलेला सलाम ... तिला आपल्या माणसात आल्यागत वाटतं.
 'हॅलो मोहन देशमुख ? हं मी इन्द्रा. कालच्या प्रवासाने डोकं एकदम चढले बघ. तेव्हा ... सॉरी हं. पुन्हा ? ... छे! छे! ! उद्यापासून सेमिनार सुरू. आता भेटू लातूरलाच...
 ती फोन खाली ठवते आणि गळ्यातलं मंगळसूत्र पदराबाहेर काढीत डौलानं डिनर हॉलच्या पायऱ्या चढू लागते.

* *