स्वरांत/सांगण्यासारखं काहीच उरलं नाही

विकिस्रोत कडून




सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये..

 मिलू, बेटा डॅडींनी स्टेटस्-हून आणलेली जर्सी घातली नाहीस तू एकदाही. आणि तुझा बर्थ-डे जवळ आलाय. कुणाकुणाला बोलावायचं नि काय काय करायचं तेही सांग ना! "
 मिलिंद घुम्म.
 ममी विणण्यात गर्क. टाक्यावरची नजर ढिली न करता ती विचारतच राहते.
 'नारळाच्या करंज्या, मटरपॅटिस नि अंबा आईस्क्रीम करू या का नि राघूच्या मैत्रिणी आणि तुझे मित्र बोलवूया. कामाच्या रगाड्यातसुद्धा तुझे डॅडी तुझा वाढदिवस विसरले नाहीत. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस आहे ना !' तो आता मोठा होणार. अठरा वर्षाचा, नि मी म्हणे लक्षच देत नाही त्याच्याकडे ! होय रे बिट्टू ? '
 ममी दोन वर्षांच्या पोराशी बोलावं तशी लाडलाडं बोलते. ती तशी बोलायला लागली की जाम बोअर होतं. निव्वळ सिनेमातल्या ममीसारखी वाटायला लागते.
 ह्यॅ ! वाढदिवस कसला साजरा करतेस ? वाढदिवस, पाटर्या, फुलांचे हार, ते खोटंखोटं हसणं. आय हेट ऑल दीज थिंग्ज. सॉरी माँ. टेल डॅडी.'
 ममी हातातला टाका तसाच सोडून मिलूकडे बघत राहते.
 गेल्या वर्षांपासून मिलू बदलत चाललाय. विलक्षण वदलत चाललाय.
 मिलू ... नुक्ता जन्मलेला साडेआठ पौंडी गोळा. कोवळया पिंपळपानासारखा. गुलाबी, लुसलुशीत.
 मिलू... नायकाच्या हातातली कोंबडीची तंगडी मागणारा, रडूनरडून थिएटरभर गोंधळ माजवणारा.
 मिलू ... ममीला 'माँच' म्हणणार म्हणून हट्ट धरणारा नि डॅडींच्या हातून मार खाणारा मिलू.
 कितीतरी रंगीबेरंगी चित्रे ममीच्या नजरेसमोरून तरळून जातात.
 दिवस किती भरारा जातात, मिलूच्या खेपेचे सगळेसगळे क्षण जसेच्या तसे आठवताहेत. जणू कालपरवाच जन्मलाय मिलिंद गेल्या वर्षी दोन वर्षांत किती बदललाय मिलू. हट्ट नाही. हसणं नाही, डोळे नेहमी कुठंतरी हरवलेले, जणू खूप दूरदूरच्या प्रवासाला निघालेत. ती थर्रकन शहारते. मिलिंदकडे एक नजर टाकून उठून आत जाते.
 ममीचा अस्फुट अुसासा त्याला जाणवला. गेलं वर्षभर या घरात मनच रमत नाही. गाडी ... एवढा मोठा बंगला ... समोरची हिरवळ ... सदा चुस्त तुस्त दिसणारे डॅडी, डॅडी - भोवती नि मिलूराधाभोवती भिरभिरणारी ममी. या सगळ्या गर्दीत आपण एकटे आहोत. सुटेसुटे आहोत ही जाणीव कापीतच राहते.
 " मनोर .. मनोर ... " डॅडी थेट ममीपाशी.
 पूर्वी डॅडी ममीला 'रमी' म्हणायचे. या बंगल्यात आल्यापासून हे नवंच नाव काढलय. 'मनोर' बंगल्याचे नाव तेच. कदाचित नाव आधी नि मग बंगला बांधला असेल. पण साधारणपणे दोनही एकाच वेळच्या गोष्टी.
 तर डॅडी थेट ममीजवळ.
 "यू मस्ट कम् मनोर."
 "मला काही अिंटरेस्ट येत नाही हो त्या ओल्या पार्टीत."
 " बट अदर्स आर अिंटरेस्टेड अिन् यू."
 "छी : ... !! "
 "छी : काय ! रिअली मना. वाटतच नाही तू चाळीशी ओलांडली आहेस हे. आमचा संन्याल तर हिरवा चाफा म्हणतो तुला. यू मस्ट-"
 'प्लीज. अरविंद. आग्रह नको करू.'
 'मिलिंदला आवडत नसावं हे सारं. अलीकडे किती घुमा झालाय. अरू तुम्हीही लक्ष द्यायला हवं त्याच्याकडे. एकोणीसावं लागणार परवा त्याला.'
 ममीचा घुसमटता आवाज.
 'स्टेटसला गेलो केवढे कपडे आणले. जपानहून आणलेली खेळणी तर घरभर साक्षी आहेत नि मी त्याच्याकडे लक्षच देत नाही? औरच आहेस. तुझ्याच मनाच्या खुळ्या कल्पना. वाढतं वय आहे. या वयात पोरं थोडी घुसमटतातच.'
 'गेट रेडी.'
 'हॅलो मिलिंद. ममीकडून उद्या अठराशेचा चेक घे. बाय व्हाट एव्हर यू लाअीक. १८ वर्षांचा तरुण होणार माझा बच्चा. मिस्टर आम्हाला म्हातारं व्हा म्हणू नका हं....'
 तो काही बोलायच्या आत पाठीवर थाप मारून डॅडी निघून गेलेले.
 'मिलू नॉट फीलिंग वेल ? ' ममी कपाळावर हात ठेवीत जवळ येऊन विचारते.
 'नथिंग ममी. उगाच काळजी करते बुवा तू. आता काय कुक्कुलं बाळ आहे मी? ' तिचा हात अलगद दूर करीत तो म्हणतो. खरं तर त्या क्षणी ममीचा हात घट्ट धरून ठेवावासा वाटतो. ममीचा हात खूप लुसलुशीत आहे. पुरणाच्या पोळीसारखा नि मंदसर उष्णसा.
 'जरा बाहेर जाऊन येतो ग.' असं म्हणत तो पायात चप्पल सरकवतो नि बाहेर येतो.
 रूपालीत कडक कॉफी घेतली की डोक्याचा ठणका थांबेलसं वाटतं. तो रूपालीत शिरतो. तिथं बघावं तेव्हा पोरीपोरांचा थवा लवथवलेला असतो.
 'ए काल पियूला आम्ही जाम पिळलं किनई रेखा ?'
 'साला ती अनिता देख, अरे देख यार जल्दी. दिल थंडा हो जाएगा. काय चालतेय ! मरलिन मन्रो स्वर्गातही जळत असेल रे ... हाऽऽय!'
 'ए तो 'स्मार्टी' बघ नि किती मस्त दिसतोय नाही ?
 बेलस् ... रंगीबेरंगी चेक्स...झुलत्या रिंग्ज...सिगरेटच्या धुरांची कडवट वलयं नि लाडेलाडे किनरे आवाज.
 तो वैतागून उठतो नि डेक्कनवर जाऊन उभा राहतो.
 'हॅलो मिलिंद. कुठं? ' गिरीधरने पाठीवर थाप मारीत विचारले.
 'कुठं नाही यार. घरात बोअर झालो म्हणून रस्त्यावर आलो. साला रस्त्यावरही बोअरच.'
 ' येणार मिटिंगला ? आजकाल फिरकला नाहीस तू विजयचं तू भलतंच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. साला त्याच्या बोलण्याचं सोड रे. पण काय तुफान डेडिकेशन आहे! आपण तर मरतो त्याच्यावर. नंतर खूप वाईट वाटलं त्याला.
 ... ... ... ... ...
 बड्या ऑफिसरचं पोर म्हटलं की जाम संशयी बनतो तो. त्याला कारणही तशीच आहेत.
 छोडो ... ...
 'चलणार?' गिरिधरबरोबर तो चालू लागतो.
 आज विजय त्याच्याकडे पाहून छानसं हसतोय. खूप रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं. विजय खूप वाळलाय. हाताची बोटंसुद्धा कशी राठराठ झाली आहेत नि पायांचे पंजेही भेगाळले आहेत. त्याचा देखणा चेहरा काहीसा रापलाय. पण डोळे आणखीनच तेज झालेत. पाहिलं की खस्कन् खुपसते नजर.
 'काय मिलिंद, सुट्टीत शिविराला येणार ? अरे, बघ तर खरे येऊन. नाचणीची भाकरी नि उडदाचं वरण खावं लागेल. मात्र तेही छान लागतं. ' विजय विचारतो.
 आज अरुणाही आलीय.
 ती दोन महिने जाऊन राहणार आहे म्हणे डोंगरकड्याला.
 'काय तुफान नाचतात बाया. टोपले नि सूप असं क्लास नाचवतात ! रात्रभर नाचत होतो आम्ही ढोलाच्या तालावर. अरुणा, विजा नि दिलीपसुद्धा नाचले. रिअली सोमावलहून आल्यापासून मन घरात रमतच नाही. दहादहा कोसावरून चालत येणाऱ्या त्या भिल्ल बाया ... मोर्चात मार खाणाऱ्या बारा तेरा वर्षाच्या पोरी ... येशी नि राशी. दारूचे माठ शोधून फोडणारा आमचा जथ्या.
 केवढा प्रचंड विश्वास वाटतो त्यांना संघटनेबद्दलं.
 'ममी. जाम वैतागते माझ्यावर. पण मला अलीकडे सुंदर साड्या नेसाव्यात, कुणालातरी झुलवावं, भुलवावं असं वाटतच नाही.'
 - संध्या अरुणाला सांगत असते.
 मिलिंद अरुणासंध्याशी गप्पा मारत उभा राहतो. पण त्याचे कान मात्र आहेत गिरिधर नि विजाच्या बोलण्याकडे.
 '... अरे, ही बड्यांची पोरं केवळ फॅशन म्हणून येतात आपल्याकडे. हाही एक प्रतिष्ठा मिळविण्याचा मार्ग म्हणून. रिअली आय हेट देम. त्यांचा पैसा नाकारायचा नाही, पण पैशासाठी त्यांना फार महत्त्वही द्यायचं नाही. अरे, ही पोरं उद्या बापाविरुद्ध राहणार आहेत उभी ? अरे, ही धमक त्यांच्यात नाही.
 लेट हिम कम ... पण फार विश्वास टाकून, फार कौतुक करू नकोस.
 विजाचं बोलणं त्याला अस्फुट अैकू येत असतं. विजाच्या मघाच्या हसण्याचाही त्याला वीट येतो. तो जायला निघतो.
 घरीही जावंसं वाटत नाही. मनावर ढगळ बुरशीचा दाट थर चढलाय. वाटतं, जगणं म्हणजे एक तुफान ... भंकस ... नं टाळता येणारी.
 दगडी अंधार गळ्यापर्यंत दाटतोय. श्वास घुसमटताहेत. अंधार फोडून आवेगानं बाहेर येण्यासाठी त्यांचं मन तडफडतं. तो मानेला ताण देऊन कडकड हाडं मोडतो नि छाती भरून श्वास घेत झपझप चालू लागतो.
 समोर टेलिफोन बूथ. तो आत शिरतो.
 'हॅलो, मी मिलिंद अरविंद सोनाळकर. पेपर अँड पल्पच्या जनरल मॅनेजरचा मुलगा. माझ्या वडिलांचे आठ बँकांत अकाउंटस् आहेत. नि तीन बँकांत लॉकर्स. दहा दिवसापूर्वी बाबा गोव्याहून आले. येताना खूपशी बिस्किटं आणलीत. ती आता या क्षणी ममीच्या रूममधल्या तळघराच्या चोरकप्प्यात मिळतील. माझ्या बाबांना वडिलार्जित ईस्टेट काहीही नव्हती.'
 तो बाहेर येऊन कपाळावरचा घाम पुसून टाकतो.
 नटराज समोरच्या फूटपाथवरच्या फ्रूटज्यूस सेंटरमधून ऑरेंज ज्यूस घेऊन कट्टयावर येऊन बसतो. आरामात ज्यूस पीत.
 ऑरेंज ज्यूस ... मग पाईनॲपल ... मग हापूस - स्पेशल. नंतर मिक्स ...
 घड्याळात नऊ वाजलेत. म्हणजे घरी नक्की रेडचा गोंधळ सुरू असणार. भेदरलेली ममी. पपांचा लाजिरवाणा चेहरा. आपल्याच पोरानं सारं सांगितलं हे कळल्यावर आतून पेटलेले. पण वरवर मिळमिळीत, गिळगिळीत चेहऱ्याने बसलेले पपा....
 कुजकट हसणारे शेजारी. बंगलेवाल्या बाया नि आतून धास्तावलेले पण स्वतःच्या सचोटीच्या स्टोऱ्या पोराबाळांना ऐकवणारे त्यांचे नवरे ...
 त्याला वाटतं, विजाला नाहीतर गिरिधरला बरोबर घेऊनच घरी जावं. तो ऑफिसच्या दिशेनं वळतोही. पुन्हा वाटतं, उद्या पेपरमध्येच वाचू दे.
 'बापाविरुद्ध जाण्याची आहे यांच्यात धमक ? ' विजाचे शब्द आठवतात. तो मनाशीच खुशीत हसतो नि घराकडे वळतो.
 सगळीकडे सामसूम.
 बहुधा सगळं पार पडलेलं दिसतंय.
 तो फाटक उघडतो. समोरून एक माणूस नि डॅडी हसत पायऱ्या उतरत बाहेर येतात. बरोबर ममीही.
 'हे आले आमचे चिरंजीव.'
 'अहो आपल्या गोजिरवाण्या पोरांना मुद्दाम टारजेट बनवून बिघडवलं जातं नि मग त्यांच्याकडून ही कृत्यं करवून घेतली जातात.'
 'यू डोन्ट ब्लेम हिम!'
 त्याचं मन जपा. अरे, कोवळं वय हे !
 मी मुद्दामच कानावर घालायला आलो. ओ. के. मी त्या पोरांना काहीही करून अडकवतोच. यू डोन्ट बॉदर.
 ... काही हलवाहलवी करायची तर करून टाका. नंतर त्रास नको.' तो कडक सुटातला गोरा माणूस निघून जातो.
 'मिलिंद बेटा, किती उशीर. कुठं भटकत होतास? किती - वरीड होते मी ! ' मिलिंदचा हात धरून ममी त्याला आत नेतेय.
 'मनोर. डोन्ट डिस्टर्ब हिम. लेट हिम हॅव रेस्ट. उद्या ना, मी काश्मीरची रिझर्व्हेशन्स करतो.'
 'सुजाता नोटबुक्स' चा नानालाल केव्हाचा मागं लागलाय ट्रीपसाठी.'
 'त्याला काही सांगू नकोस. बोलू नकोस.' डॅडी ममीला बजावताहेत.
 मिलिंद मुकाट्यानं ममी मागं जातोय.
 काही बोलण्यासारखं नि सांगण्यासारखं उरलंच नाहीये.

* *