स्वरांत/पहाट नाते

विकिस्रोत कडून





पहाटनाते

 तो तिच्या ताटात आग्रहाचा फुलका टाकतो, आणि वेटरला कोफ्ताकरी तिच्या वाटीत वाढायला लावतो.
 "अजि बस ! मै मोटी हो जाऊँगी, तो मेरे पतिराज और रूठ जाअेंगे ... "
 "छे ... छे. खाताना फक्त खाण्याची मजा लुटायची. नुस्तं तृप्त व्हायचं, मन भरेस्तो खा. आणि तुला तुझा हा बांधाच छान शोभतो. कोण म्हणतं तुला जाडी ?"
 असं म्हणत अेक टम्म फुगलेला रसगुल्ला तो तिच्या वाटीत टाकतो. ती चवीने खात रहाते.
 ... कुणीतरी नितांत प्रेमानं आपल्याला वाढावं; आपण नको नको म्हणत खाव. केवढं सुख असतं त्यात! ते सुख तिच्या चेहेऱ्यावर उमटलेलं. त्यावर अनोख्या संकोचाची लवथवती लहर ...
 त्याला तिच्या चेहेऱ्यावरची तृप्ती जाणवते. तो विचारतो
 "खुश हो?"
 "आमी तो बहोत खुश आछीन ... ॲम आय करेक्ट ?"
 तो खळाळून हसतो नि म्हणतो,
 "हां हां. तू तर चार दिवसात बंगालीण वनलीस."
 'जनपथ' मधून बाहेर पडताना मन कसं फुलारून येतं. न कळत ती रबिन् ला लगटून चालू लागते. संध्याकाळची निहार वेळ. पावलात कोवळं वारं भरलेलं. ती दोघं राष्ट्रपतीभवनापाशी येतात. राष्ट्रपतीभवनासमोरच्या हिरवळीवर कारंजाचे तुषार झिरमिरताहेत आणि रंगीबेरंगी उजेडाचे कवडसेही. दिवसभराच्या उन्हाने कोळपून गेलेली हिरवळ कशी ताजीतवानी झालीय. हवेतून झिरपणारा गार गंध ... हलक्या गुलाबी रंगाच्या फुलांचे गच्च ताटवे ...; समोर सरळ रेषेत जाणारा रुंद रस्ता ; ... निऑनच्या उजेडात चकमकणारा. दूरवरच्या कमानीवर तेजाळणारी वीरस्मृती ज्योत.
 " यहाँ थोडी देर ठेहेरेंगे ? ..." तो विचारतो.
 "माझ्या नं अगदी हेच मनात आलं होतं. कसं ओळखलंत" ती विचारते.
 तो मोकळं मोकळं हसतो आणि आदबीने आपला रुमाल तिच्यासाठी अंथरतो. मग बराच वेळ मुकी स्तब्धता.
 तिला वाटतं, ही अनोखी शाम... हे दिवस संपूच नयेत. वठलेल्या पारिजातावर खूप खूप दिवसांनी बहर यावा तशी ती; अगदी आतून फुलीफुलून येणारी.
 वर्दळ शांत झालेली आहे. तिला वाटतं, या ओल्याशार हिरवाळीवर खुशाल अंग झोकून द्यावं आणि डोळे भिजेस्तो गावं...
 'मीरा आपने आश्वासन दिया था मराठी गाना गानेका याद है ना? गाओना' त्याचा आग्रह.
 'मराठी समझ सकोगे?' ती मिष्किलपणे विचारते.
 'आरी, तू बंगालन बन गयी, मुझे भी तो मराठी समझनेकी कोशिश करनी पडेगी... गाओ. चलो. एक...दो...'
 तीन म्हणायच्या आत सूर उमटतात.
 'रिमझिम पडती श्रावणधारा
    धरतीच्या कलशात
 प्रियाविण उदास वाटे रात...
 आरस्पानी धारा अुंचावरून सांडावी तसा आवाज. नितळ आणि आर्त. कारंजाचे थेंब आणि गारवा अंगागाला झोंबतो. तसेच सूरही. त्याला वाटलं नव्हतं इतकी सुंदर ती गाते. कधीतरी ती थांबते. आपले मिटलेले डोळे तसेच मिटून तो फर्मावतो;
 'और एक! प्लीज...मीरा, और एक...'
 'हिंदी म्हणूऽ' ती विचारते.
 'कुछभी गाओ! गाओ ना!' बस तुम गाओं और मैं सुनता रहूं!
 'ओऽ सजनाऽ..
 बरखाँ बहार आयी ...'
 मन मागेमागे धावतं. महाबळेश्वरची पहिली रात्र. अनंतनं गाणं म्हणण्याचा आग्रह केला होता. त्याचं मांडीवर मस्तक. ती खूपशी भेदरलेली आणि संकोचलेली. थरथरत्या, अस्पष्ट आवाजात तिने गाणे म्हटले होते; ओऽ सजना... त्या सुरांनी ती दर्वळून गेली होती. चार दिवसांपूर्वी तिला अनोळखी असणारा अनंत तिचा 'सजन' बनला होता. गाणं संपण्यापूर्वीच अपार भारून तिने त्याच्या बाहूत स्वतःला झोकून दिले होते. मग नंतरची प्रत्येक रात्र हलक्या सुरांनी रंगायची. मग नितीनचा जन्म. मग केव्हातरी, हळू हळू अंधूक होत जाणारे सूर पार विरून गेले होते. उरले होते रुटीन. वयाच्या आठव्या वर्षापासून सोळा वर्ष आपण नुस्त्या गात नि गातच होतो ते ती पार विसरून गेली होती...
 गातागाताच तिचे डोळे भरून येतात; स्वर दाटून येतात. ती मधेच थांबते.
 रबिन दचकून डोळे उघडतो. ओंजळीत तोंड लपवून ती हुंदके देत असते. उरातला उमाळा श्वासाश्वासात मावत नाही. सारा देह गदगदून जातो. क्षणभर त्यालाही सुचेनासे होते.
 'मीरा....मीरा...'
 त्याचा मऊ आवाज. तिला आणखीनच भरून येतं. तिचा माथा हळूवारपणे वर उचलीत, तिच्या खांद्यावर थोपटीत तो हळुवारपणे म्हणतो,
 'मीरा, किसीकी याद आयीऽ... पगली. तू तर चार दिवसांनी पोचशील तुझ्या घरी.'
 आपण त्याच्यासमोर रडलो या जाणीवेने ती मनोमन शरमिंदी होते.
 'सॉरी रबिन्. मी वेड्यासारखीच वागले. असं रडायला नको होतं.... फार वर्षांनी गायले आज...'
 तो स्तब्धच राहातो.
 ते यूथ होस्टेलपाशी येतात तेव्हा नउ वाजून गेलेले असतात. बाहेरच्या अर्धवर्तुळाकार हिरवळीत आंध्राचा सुब्बाराव लोळत असतो. तो हात करतो रबिन् तिकडे वळतो. ती थेट खोलीत येते.
 ...हळूहळू अनंतने संसाराबाहेरचे विश्व उभे केले होते. त्याचे मित्र...मैत्रिणी...नॉनव्हेज पार्ट्या. कंपनीच्या कामासाठी भारतभर भटकावे लागायचं. करमत नाही म्हणून ती औरंगाबादच्या यूथ होस्टेलचे काम बघायची. वेरूळची लेणी बघण्यासाठी देशविदेशीचे तरुण येत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय यूथ ऑर्गनायझेशन्सचे तरुण येत. त्यांच्या राहण्याची...प्रवासाची व्यवस्था करण्यात ती गुंतून जाई. दिवसातले संध्याकाळचे २ | ३ तास तेवढेच कटत.
 तिला वाटायचं आपण केलेल्या पदार्थाचं अनंतनं कौतुक करावं... घर नेटकं ठेवून आपण यूथ होस्टेलचं काम बघतो त्याचा अभिमान बाळगावा. पण तसं घडायचंच नाही. हिने ईडली केली तर हा म्हणायचा,
 'माझ्या नावावर आपल्या जिभेचे चोजले पुरवू नका वाईसाहेब. आपला घेर आरशात बघा एकदा. ती मिसेस दर्याणी बघ. तीन पोरांची आई झाली तरी कसा फॉर्म मेंटेन केलाय. अंगभर कपडे घातले तरी पुरुष घायाळ होतो. तू एका पोरात बरणी होणारेस...'
 मग सगळा उत्साह मावळून जायचा.
 '... मिसेस शहा हेअर स्टाईल खूप सुंदर करते...मिस कुंदा देशमुखचे डोळे इतके काळेभोर नि फुलपाखरी आहेत. ...तिची सुईसारखी धारदार नजर अशी टोचते की कलिजा खल्लास होतो...आज पार्टीच्या वेळी आमच्या वॉसची वायको साडी इतकी झ्याक नेसली होती. तुझं ते काळं नीटेड नॉयलॉन आहे ना जांभळ्या फुलांचंऽ तसलीच. साडीसुद्धा नेसता यायला हवी. बहुतेक बायका साडी गुंडाळतात ... ' हे असलं नेहमी ऐकावं लागे.
 यूथ होस्टेल, घर आणि नितीन यांच्यात ती स्वतःला गुंतवून घेई. सुंदर दिसावं... तरतरीत हसावं... मुलायम साडी रेखून नेसावी...गजरा माळावा...त्याची वाट पहावी...तनमन फुलारून त्याच्याजवळ जावं, असं वाटायचंच नाही. पतीपत्नीच्या शृंगारातला उरलेला व्यवहार तिला विलक्षण किळसवाणा वाटायचा. मग पुरुषाच्या स्पर्शाशिवाय आपण जगू शकतो असा विश्वास ती गोंजारीत बसायची. अनंतला दूर ठेवायची.
 '... एखाद्या स्त्रीला सुंदर म्हटलं म्हणून स्वतःच्या पत्नीवरचं प्रेम कमी होत असतं होय? तू उगाच धुमसतेस. अजूनही घरच्या ओढीनं आणि तुझ्या ओढीनं मी इथे थांबलो आहे. जेव्हा ही ओढ तुटून जाईल तेव्हा तुला सांगून दुसरीच्या दारात जाईन. चोरून नाही. तू मला हवी आहेस...'
 कधी कधी अनंत उद्वेगाने सांगत राही. पण तरीही तिच्या मनातला पीळ सुटला नव्हता.
 'पाठीचे टायर्स उघडे टाकून हिंडू नकोस बुवा' असलं तो बोलतच राही. एकत्र हिंडावंफिरावं असं कधी वाटायचंच नाही.
 ती संसार करायची. कोरडेपणानं! बंगला, सोफा, गाडी, फ्रीज...तशीच तीही. कधी कधी वाटायचं कुठे हरवली आपली उमेद? शेंदराचे जाड राप दिवसेन् दिवस साठत जावेत आणि मूर्तीची सारी गोंडस वळणे लिंपून जावीत तशी ती. हरवलेली!
 ...शेजारी कलकत्त्याची मिसेस् रॉय आपल्या मुलासाठी नि नवऱ्यासाठी घेतलेल्या वस्तू मद्रासच्या मिनीला दाखवते आहे. मिनीही लाजत लाजत तिच्या 'फॅन' साठी घेतलेला नाईट गाऊन दाखवते. मीरा दार उघडून बाहेर येते. आवेगाने तीनही जिने उतरून लॉनवर येते. हॉस्टेलच्या सगळ्या खिडक्या अंधारल्या आहेत. एखादीच जागी.
 ...उद्या परतायचं. नितीनसाठी काही तरी घ्यायला हवं. अनंतसाठीही.
 रबिन् तिच्या समोर केव्हा येऊन बसतो ते कळत नाही.
 'मीरा... त्याच्या ओलसर हाकेने ती विलक्षण व्याकुळ होते.
 रबिन्. रबिन् मला पत्र पाठवाल?' बोलताना दोन थेंब पापणीच्या जाळीत अडकतात.
 गेले पंधरा दिवस. किती सुहाने!
 आली त्या दिवशी दिल्लीतल्या रुख्याफिक्या थाटाला बिचकून ती एकटीच बाहेरच्या लॉनवर बसली होती. हरवून.
 'क्या मैं यहां बैठ सकता हूं?'
 तिने वर पाहिले तर एक बंगालीबाबू उभा.
 शुभ्र धोतराचा सोगा झब्ब्याच्या खिशात कोंबत ओठांचा चंबू करीत बोलणारा. सावळासा रंग, बोचक नजर आणि धारदार नाक. रॉबिन् चौधुरी. तो कलकत्त्याच्या यूथ होस्टेलचा सेक्रेटरी होता. सेमिनारसाठी आलेला. ती काही बोलण्यापूर्वीच तो खाली बसला होता, ऐसपैस. नि तसाच गप्पाही मारल्या होत्या ऐसपैस.
 टिळक, टागोर. ॲना तर्खडकर, पगला घोडा नि एवं इंद्रजीत, नक्सलाईट, बांगला देशचें युद्ध...कितीतरी विषय गप्पात रंगून गेले होते. हरवलेला सूर अचानक गवसावा तशी तीही बडबडली होती. मुक्तपणे.
 बंगाली रंगभूमी इतकीच मराठी रंगभूमीही स्वयंभू, समृद्ध आणि प्रायोगिक आहे हे तिने भांडून पटवून दिले होते. मतकरींची प्रेमकहाणी...सुलतान...गार्बो...वेकेट कितीतरी जणांच्या साक्षी काढल्या होत्या.
 संध्याकाळचा कार्यक्रम मग आपोआपच ठरला. चाणक्यपुरीतल्या, वृक्षांनी झाकल्या वाटांनी पायतळीची पानंफुलं चुरत दूरदूर भटकायचं. निरनिराळ्या अेम्बसींच्या दारांशी घुटमळायचं आणि अंधार होअिस्तो, नि इवल्याइवल्या कारंजाच्या काठांशी पाण्यात पाय सोडून बडबडत चिवचिवत-राहायचं.
 'शंकर'ची 'चौरंगी' वाचल्यावर ती कशी अस्वस्थ झाली होती; पण 'अेपार बांगला, ओपार बांगलांतल्या त्याच्या 'बंगाली' शिष्टपणाचा कसा राग आला हे ती त्याला चिडवत सांगायची. मग तो धमाल भांडायचा. वाँगला देशात त्याचे आजोळ. तिथल्या नद्यांचे...भाताचे वर्णन करताना त्याचा चेहेरा फुलून जायचा. रॉबिन्द्रनाथ आणि बर्मनदा जणू त्याच्या घराअंगणातलेच असायचे.
 किती विषय नि किती शब्द. त्याने कधी तिच्या घरादाराविषयी विचारले नाही. तिलाही कधी त्याला हे विचारण्याची आठवण झाली नाही.
 प्रत्येक दिवस कसा तरतरीत! दिवसभर सेमिनार. त्यातल्या चर्चा. नंतरची संध्याकाळ अशी अनोखी. खळाळत्या मेघानेसारखी! सहा वाजता ती नकळत त्याची वाट पाहात पायऱ्यांवर उभी राही. आणि ती रेंगाळताना दिसली की तोही तिथे येई आणि म्हणे.
 'चलने काऽ'
 ...दोन दिवसांनी पुन्हा सुरू होईल रुटीन. धुमसणं... वैताग...बेचव प्रेम. ओंजळीत जपून ठेवलेले क्षण निसटून जावेत तशी ती व्याकुळते...
 'रबिन पाठवशील ना मला पत्र'
 ... कातर आवाजात ती त्याला विचारते.
 लहान मुलाची खोटीखोटी समजूत घालताना हसतात तसं तो हसतो आणि एकदम काहीसा गंभीर होतो.
 '...तुझ्या निरागस, कोवळ्या स्नेहानं मनावरची सारी जळमटं निघून गेली आहेत. मन कसं निर्मळ झालंय. तुझ्या सहवासात वाहून जाताना, प्रेयसी, पत्नी, बहीण या साऱ्या व्यवहारी नात्यापलीकडचा, आगळा स्नेहतंतू तुझ्यामाझ्यात निर्माण झाल्याची, विलक्षण आत जाणीव मला क्षणोक्षणी व्हायची. त्याची झिंग...धुंदी काही अनोखी होती मीरा. तुला नाही असं जाणवत? जीवनातला राप; उबग सारं पार गळून गेलं आहे. तनभर, मनभर पसरली आहे कार्तिकातल्या सुस्नात पहाटेसारखी नखशिखान्त टवटवी. ती टवटवी घेऊन उरलेला संसार नितान्त तृप्तीने करणार आहे मी. पत्र, मग जोडावी लागणारी 'भाभी' 'भैय्या'ची व्यवहारी नाती... छी! छी! या साऱ्यामुळे या नात्यांची बकुळनक्षी विस्कटून जाईल...
 ही ओळख आता इथेच बुझवून टाकायची. मनाच्या खोलखोल तळाशी हा स्वप्न-गंध जपून ठेवायचा.
 ... ही उदासी...मनातला धूर दूर फेकून द्यायचा. नव्या उमेदीनं जीवनात झोकून द्यायचं हं.
 '... मीरा, बी अ गुड गर्ल.'
 तिच्या खांद्याला अपार स्नेहानं थोपटीत राबिन् तिला उठायला लावतो. ती त्याच्याकडे बघते अन् खुदकन हसते. रंगीबेरंगी चिटाच्या घेरदार झग्यासारखी. आणि नाचऱ्या पावलांनी खोलीत येते.
 ...मिनीचं सामान तिच्या बॅगमध्ये मावत नाहीये. सासरी जाणाऱ्या पोरीची ट्रंक आई भरून देते तशी मिसेस् रॉय मिनीचं सामान भरतेय. मिसेस रॉयच्या गळ्यात हात टाकत मीरा सांगते,
 'रॉय तुला यायला हवं हं उद्या माझ्याबरोबर! माझी खरेदी तुझ्याच चॉईसने करणार आहे मी. मला तुझी कायमची आठवण राहील म्हणजे.
 '...कुणास ठाऊक पुन्हा कधी भेट...' ती उत्साहाने बोलत राहाते खरी पण तरीही शेवटचे शब्द तिच्या घशात दाटून येतात.

* *