साहित्यातील जीवनभाष्य/भिन्न वर्गांचे जीवन
Appearance
२ भि न्न व र्गां चे जी व न
भिन्न संस्कृतींचे तौलनिक दर्शन घडवून थोर साहित्यिक त्यांचे मर्म कसे उकलून दाखवितात ते आपण पाहिले. आता मानवी जीवनाच्या दुसऱ्या एका अंगाकडे वळू. समाजात आर्थिक स्थिती, सामाजिक विषमता, धर्मपंथादि भेद यांमुळे समाजाचे मिन्न वर्ग झालेले असतात. या वर्गांच्या जीवनाचे दर्शन घडवून साहित्यिकांनी त्यावर भाष्य कसे केले आहे ते आता पहावयाचे आहे. भांडवलदार, जमीनदार, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, यांचे जीवन, स्त्रीजीवन, दलितजीवन, उपेक्षितांचे जीवन, अस्पृश्य, आदिवासी, गुलाम यांचे जीवन हा साहित्याचा फार मोठा विषय आहे. आणि अनेक थोर साहित्यिकांनी आजपर्यंत यांतील कोठले ना कोठले जीवन निवडून त्याचे आपल्या ललित कृतीत विवरण केले आहे. जगातल्या नामवंत कवींनी या विविध वर्गीच्या जीवनाचे सम्यक् दर्शन कसे घडविले आहे ते आता पहावयाचे आहे.
१ भांडवलदार हेन्रिक इब्सेन यांचे नाव आता जगातल्या प्रत्येक सुशिक्षित मनुष्याला माहीत झालेले आहे. त्याने आपल्या 'पिलर्स ऑफ सोसायटी' या नाटकात भांडवलदार वर्गाचे- त्याचा धनलोभ, त्याची भोगलालसा, त्यांची कारस्थाने त्यांचा पाताळयंत्री कारभार जनतेला फसविण्याचे व तिची पिळणूक करण्याचे त्यांचे कसब, त्यांची उलट्या काळजाची वृत्ती- या सर्वांचे अत्यंत भेदक असे चित्रण केले आहे. कारस्टन बर्निंक हा नॉर्वेमधला जहाजाचा कारखानदार समुद्रकिनाऱ्याला वाहतुक करणारी त्याची कंपनी होती. त्या किनाऱ्याच्या टापूत रेल्वेमार्ग तयार करणे गावाच्या फार फायद्याचे होते. पण त्यामुळे बोट वाहतुक कंपनीचा धंदा बसला असता. म्हणून बर्निकने आपल्या इतर संचालकांच्या साह्याने ती योजना हाणून पाडली. आणि वर्षभराने रेल्वे दुसऱ्याच एका टापूतून न्यावयाचे ठरवून तसा ठराव पास करून घेतला. आणि लगेच तातडीने संकल्पित रेल्वे मार्गाच्या भोव तालची जमीन त्या संचालकानी खरेदी करून टाकली. का ? अर्थात पुढे तिची किंमत लक्षावधी रुपये होणार होती म्हणून. आज त्यांना ती कवडीमोलाने मिळाली. हे सर्व करून हा सर्व खटाटोप आपण समाजहितासाठी करीत आहो, असा देखावा बर्निक करीत असे. आणि भोळ्या गावकऱ्यांना ते खरे वाटत असे. त्याला गावात फार मोठी प्रतिष्ठा होती. नीती, चारित्र्य यांचा तो आदर्श मानला जात असे. लोक त्याला समाजाचा आधारस्तंभ- पिलर ऑफ दि सोसायटी- मानीत.
गेल्या पंधरावीस वर्षात अशी अनेक 'लोकहिताची' कृत्ये करून बर्निक मान, प्रतिष्ठा व आधारस्तंभ ही पदवी मिळविली होती. वीस वर्षापूर्वी लंडन- पॅरिस येथून शिकून तो गावी परत आला. तेव्हा लोना हेसलवर त्याचे प्रेम होते. त्यांच्या विवाहाच्या आणाभाकाही झाल्या होत्या. पण लोना गरीब होती. आणि तिची दूरची एक बहीण कुमारी टॉनेसेन ही श्रीमंत होती. तेव्हा लोनाला दिलेले वचन मोडून त्याने टॉनेसेनशी लग्न केले. त्यानंतर थोडे दिवसांनी गावात एक नाटक कंपनी आली होती. तिच्या मालकाची पत्नी सुरेख होती. बर्निकने तिला वश केले. पण त्या प्रकरणाची वाच्यता होईल अशी भीती निर्माण होताच त्याने एक अभिनव युक्ती योजली. जोहान टॉनेसेन हा त्याचा मेहुणा व बालमित्र. तो नशीब काढण्यासाठी अमेरिकेस चालला होता. त्याला विनवून ते लफडे स्वतःच्या गळ्यात घेण्यासाठी बर्निकने त्यांचे मन वळविले. त्यानेही ते उदार मनाने मान्य केले. आणि बर्निकवरचा अपवाद नष्ट करून तो अमेरिकेला गेला. लोना ही त्याची बहीणही त्याच्यावरच्या मायेमुळे त्याच्याबरोबर गेली. त्यानंतर कारखान्याल जरा तोटा झाला, सावकार तगादा करू लागले तेव्हा जोहानने तिजोरीतून फार मोठी रक्कम लांबविली अशी वदंता उठवून बर्निंकने आपला बचाव केला.
पंधरा वर्षांनी जोहान व लोना परत आली तेव्हाच रेल्वेचे हे प्रकरण चालू होते. ते गेल्यावर गावात वर्निकने त्यांची इतकी बदनामी केली होती की, आता सभ्य घरात त्यांचा नामोच्चार करणेही पाप मानले जात होते. हळूहळू लोना व जोहान यांच्या हे ध्यानात आले तेव्हा त्यांनी सत्य प्रकाराला वाचा फोडण्याचे ठरविले. तेव्हा बर्निकने त्यांच्याशी मोठा कुशल युक्तिवाद केला. तो म्हणाला, आज या गावाच्या नीतीच्या व धर्माचा मी आधारस्तंभ आहे. सत्य ते सांगून मला तुम्ही बदनाम केलेत तर गावाला मोठा धक्का बसेल व त्यांचा नीतिधर्मही बिघडेल. सत्य तुम्हीं तसेच लपवून ठेविलेत तर तुमचीच फक्त अपकीर्ती होईल. पण सर्व समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीला असे बळी जाण्यास हरकत नाही !
उच्च तत्त्वांची विकृती जमीं बेंथाम, मिल यांची बहुसंख्यांचे सुख- पुष्कळांचे पुष्कळ सुख- ही नीतिनिर्णयांची कसोटी होती. तिची विकृती केली तर काय होईल याचे हे मोठे सुंदर चित्र इब्सेनने रंगविले आहे. वर्निकच्या घरात त्याच्या भागीदाराच्या घरात सर्वत्र नीती, समाजसेवा, उदात्त चारित्र्य यांचे पाढे पढविले जात असत. प्रत्येक कृत्य समाज कल्याणाच्या हेतूनेच केले जात होते. आणि गावातही त्यांना नीतिधर्माचे आधार म्हणूनच मान होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या प्रत्येक कृत्याच्या पायाशी असत्य, फसवणूक, स्वार्थ, लोभ, हीन कारस्थाने हेच होते. जोहान व लोना ज्या बोटीने अमेरिकेहून आले त्या बोटीचे नाव 'इंडियन गर्ल' असे होते. तिची फार मोडतोड झाली होती. बर्निकच्या कारखान्यात ती दुरुस्तीला आली होती. वास्तविक तिच्या दुरुस्तीला महिना सहज लागला असता. पण दोनतीन दिवसात ती कशीतरी दुरुस्त करून मोठा लाभ उठवावयाचा असे बर्निकने ठरविले. त्याच वेळी त्याच जहाजावरून आपण परत जाणार, असे जोहानने जाहीर केले. तेव्हा तर कच्ची दुरुस्ती करून आपल्या या हितशत्रूला जलसमाधी देण्याचे वर्निकने निश्चित केले. पण आयत्या वेळी एक विपरीत घटना घडली. वर्निकचा ओलाफ हा बारा तेरा वर्षांचा मुलगा अत्यंत हूड व व्रात्य असा होता. 'इंडियन गर्ल' अमेरिकेला निघाली तेव्हा मामाबरोवर अमेरिकेला जावयाचे ठरवून तो त्या बोटीवर गेला. पण जोहान आयत्या वेळी बेत बदलून दुसऱ्या जहाजाने गेला होता. वर्निकला दोन्ही वार्ता कळल्या तेव्हा त्याची कंबरच खचली. शत्रूसाठी फेकलेल्या जाळ्यात त्याचा मुलगाच सापडला होता. सुदैवाने ओलाफच्या आईला आधीच त्याचा सुगावा लागून तिने त्याला बोटीवरून परत आणला होता.
सगुण रूप कार्ल मार्क्सने भांडवलशाहीचे सर्व अंतरंग आपल्या ग्रंथात तपशिलाने वर्णिलेले आहे. पण ते शास्त्रीय वर्णन आहे. इब्सेनने त्यालाच ललितरूप देऊन हे साहित्यसुवर्ण निर्माण केले आहे. इब्सेनने स्वतःच म्हटले आहे की, 'भोवतालची परिस्थिती व समाजातील रूढ तत्त्वे या पार्श्वभूमीवर मानव व्यक्ती, त्यांच्या भावभावना आणि त्यांचे भवितव्य यांचे चित्र काढावे, असा माझ्या मनातला हेतू होता.' या उद्दिष्टाला अनुसरूनच मार्क्सच्या तात्त्विक विचाराला त्याने सगुण साकार रूप दिले.
२ धर्मसत्ता इब्सेनने ज्याप्रमाणे भांडवलदार वर्ग, भांडवली सत्ता यांचे रूपदर्शन केले आहे त्याचप्रमाणे एमिल झोला या फ्रेंच कादंबरीकाराने दुसऱ्या एका अशाच प्रभावी पण भ्रष्ट सत्तेचे दर्शन घडविले आहे. ती सत्ता म्हणजे धर्मसत्ता होय. ही सत्ता भांडवली सत्तेपेक्षा शतपट जास्त क्रूर व घातक असते. कारण माणसांच्या हीन भावना ती चेतवू शकते, आणि हे सर्व त्याग, ध्येयवाद, उदात्तता, परमेश्वर, भक्ती, मोक्ष यांच्या नावाखाली ! झोलाच्या मते रोमन कॅथॉलिक धर्माची सत्ता अशी होती. फ्रान्समध्ये १८७० साली प्रजासत्ताक स्थापन झाले. त्याच्या आधी शंभर वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्य, न्याय, बुद्धिप्रामाण्य यांच्या प्रस्थापनेसाठी तेथे क्रान्ती झाली होती. पण नवतत्त्वांच्या या प्रचंड लाटा ओसरताच रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंनी मोठ्या कौशल्याने, मुत्सद्देगिरीने लोकमतावर आपले वर्चस्व पूर्ववत् स्थापन केले होते. प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर लोकशिक्षण हे धर्मगुरूंच्या हातून काढून घेऊन निधर्मी, इहवादी संस्थांच्या हाती द्यावयाचे, असे सरकारने ठरविले होते. तसा कायदाही झाला होता. पण त्याची बजावणी कसोशीने झाली नव्हती. या ढिलाईचा फायदा घेऊन रोमन कॅथॉलिक धर्मरूंनी विशेषतः जेसुइट पंथीयांनी सर्व शिक्षण क्षेत्र व्यापले. अंधश्रद्धा शब्दप्रामाण्य, कर्मकांड, व्रतवैकल्ये हेच जेसुइटांच्या धर्माचे स्वरूप होते. आणि विज्ञानयुगात हे सर्व टिकवून धरण्यासाठी असत्य, अन्याय, अनीती यांचा आश्रय करण्यास ते कचरत नसत. (परक्या मिशनऱ्यांनी भारतात चालविलेली कारस्थाने डोळयांपुढे आणावी म्हणजे कॅथॉलिक धर्माचे स्वरूप नीट आकळेल.) एवढेच नव्हे तर धर्मरक्षणासाठी ते करणे अवश्य आहे असे त्यांचे मत होते.
जेसुइटांचा धर्म रोमन कॅथॉलिक पंथ ही अत्यंत संघटित, समर्थ व बलाढ्य अशी संस्था असून रोमचा पोप तिचे सर्व सूत्रचालन करीत असतो. गेल्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समधील धर्मगुरूंच्या सर्व कारस्थानांचा तोच सूत्रधार होता. रूसो, व्हाल्टेअर यांनी घडविलेल्या क्रान्तीनंतरही फ्रेंच समाज फारसा बदललेला नव्हता. तो पूर्वीसारखाच अंधश्रद्ध, भोळसट, भावनावश व चलचित्त असाच होता. या मनोवृत्तीचा फायदा घेऊन मार्टिन लूथरच्या काळाप्रमाणेच पापमुक्ततेचे पास, मोक्षदायक पत्रके विकण्याची प्रथा जेसुइट धर्मगुरूंनी पुन्हा सुरू केली व त्यांतून अमाप पैसा उकळला. देवदेवतांचे उत्सव करणे, त्यांतून चमत्कार, जादूटोणा निर्माण करणे च त्यांच्या साह्याने भाविक लोकांकडून बडवे, पंडे यांच्याप्रमाणे पैसा काढणे हाच त्यांचा धंदा होता. आणि तो चालावा म्हणून सर्व शिक्षण क्षेत्र विशेषतः प्राथमिक शिक्षण आपल्या ताब्यात घेऊन बालमनावर अंधश्रद्धेचे, शब्दप्रामाण्याचे, कर्मकांडात्मक जडधर्माचे दृढ संस्कार करण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले होते आणि त्यात ते यशस्वीही झाले होते.
एमिल झोला अशा या क्रूर, धर्महीन, सत्यहीन, भ्रष्ट रोमन कॅथॉलिक धर्मसत्तेचे स्वरूप एमिल झोला याने 'ट्रूथ' या आपल्या सुविख्यात कादंबरीत चित्रिले आहे. या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करणारा लेखक अर्नेस्ट व्हिजेटेली याने प्रस्तावनेत म्हटले आहे की, 'अठराव्या शतकाच्या अखेरीस रूसोने जसे 'नॉव्हेली हिलॉइस', 'काँट्रक्ट सोशल' व 'एमिली' हे ग्रंथ लिहून जगाला वळण लावले त्याचप्रमाणे एकुणिसाव्या शतकाच्या अखेरीस एमिल झोला याने 'फेकंडाइट' 'ट्रॅव्हेल' व 'व्हेरिटी' हे ग्रंथ लिहून पुन्हा एकदा जगात परिवर्तन घडवून आणले, त्यातला व्हेरिटी हा ग्रंथ म्हणजेच 'ट्रूथ' ही कादंबरी होय.
अनैसर्गिक गुन्हे त्यावेळी फ्रान्समध्ये दोन प्रकारच्या प्राथमिक शाळा होत्या. लोकसत्तावादी, बुद्धिवादी लोकांनी चालविलेल्या निधर्मी पंथाच्या आणि कॅथॉलिक जेसुइट पंथाच्या शाळा हे ते प्रकार होत. या शालेय विश्वाच्या पार्श्वभूमीवरच ही कादंबरी लिहून या दोन पंथांतील संघर्षाचे चित्रण झोलाने केले आहे. मेलिबॉइस या साधारणपणे दोन हजार वस्तीच्या गावी. या दोन्ही शाळा असून त्यातील निधर्मी पंथाच्या शाळेत घडलेल्या एका भीषण प्रसंगापासून या कादंबरीतील कथेला प्रारंभ होतो. या शाळेत सायमन नावाचा एक ज्यूधर्मी शिक्षक होता. त्याचा पुतण्या झेफेरिन हा त्या शाळेत विद्यार्थी होता. त्याने कॅथॉलिक धर्म स्वीकारला होता. तो शाळेच्या वसतीगृहातच रहात असे. ऑगस्ट महिन्यात एका सकाळी तो आपल्या खोलीत मृत स्थितीत पडलेला आढळला. त्याचा खून झाला होता. कॅथॉलिक शाळेतील ब्रदर गॉर्जियास याने हा खून केला होता. आदल्या रात्री साडे दहाच्या सुमारास गॉर्जियास तिकडून येत असताना त्याला झेफेरिनची खोली उघडी दिसली. आंत दिवा होता. त्याच्या प्रकाशात त्या सुकुमार लहान बालकाचे रूप लावण्य पाहून गॉर्जियासच्या वासना भडकल्या. हे जेसुइटपंथी लोक निसर्गविरुद्ध अविवाहित जीवन जगतात. त्यांच्या पंथाची तशी शपथच असते. त्यामुळे त्यांच्या हातून असे अनैसर्गिक गुन्हे नेहमी घडतात. फ्रान्समधील 'कीपर ऑफ दि सीलस, ' या अधिकाऱ्याच्या अहवालात त्यांची नोंद आढळते. पण बहुतेक वेळा हे किळसवाणे गुन्हे कॅथॉलिक चर्च दडपून टाकते. ब्रदर गॉर्जियास याच्या बाबतीत हेच घडले.
गॉर्जियासच्या अत्याचारामुळे झेफेरिन ओरडू लागला तेव्हा त्याने खिशातला रुमाल काढून त्याच्या तोंडात बोळा घातला आणि तरी त्यांच्या किंकाळ्या थांबेनात तेव्हा त्याने मुलाचे नरडे दाबून त्याचा निकाल लावला व तो पळून गेला. पण झेफेरिनच्या तोंडात बोळा कोंबताना त्याच्या खिशात त्याच्या शाळेच्या कित्त्याच्या वहीचा एक कागद होता तोही त्यात कोंबला गेला. कागदाच्या एका कोपऱ्यात कॅथॉलिक शाळेचा शिक्का होता. व त्याखाली गॉर्जियासची आद्याक्षरेही होती. पण कागद कोंबला गेला आहे हे त्याच्या ध्यानात न आल्याने तो तसाच पळून गेला.
सायमन ज्यू होता फादर फिलिबिन व ब्रदर फुलजन्स हे कॅथॉलिक धर्मगुरु व कॅथॉलिक शाळेचे चालक सकाळी त्या बाजूने चालले असता त्यांना ही वार्ता कळली. ते लगेच झेफेरिनच्या खोलीत गेले. त्याच्या तोंडातील बोळा बाहेर काढताच फादर फिलिबिन याला तो कित्त्याचा कागद दिसला. त्याच्या कोपऱ्यातील कॅथॉलिक शाळेचा शिक्का व गॉर्जियासची सही पाहताच त्याच्या सर्व प्रकार ध्यानी आला. तेव्हा मोठ्या चलाखीने, दहापांच लोक भोवती होते, त्यांची नजर चुकवून त्याने तो कोपरा फाडून खिशात घातला व सहीची अक्षरे बोळून टाकली. त्यानंतर पोलीस आले. रीतसर चौकशी सुरू झाली. सायमन वरच्या मजल्यावर रहात होता. त्याची बायको राशेल हिची व त्याची साक्ष झाली. आपण रात्री बाहेर गेलो होतो, बारा वाजता परत आलो, आपल्याला यातले काही माहीत नव्हते, आता सकाळी कळले, असे त्याने सांगितले. सायमन अतिशय भला मनुष्य होता. उत्तम शिक्षक म्हणून त्याची कीर्ती होती. चौकशीची हकीकत नजीकच्या जिल्ह्याच्या गावी निघणारे पत्र 'ला पेटिट बोमंटाइस' यात दुसऱ्या दिवशी आली तेव्हा त्यात त्याचा गौरव करण्यात आला होता. त्याच्या पुतण्याचा खून झाला, या आपत्तीत आम्ही त्याच्या दुःखात सहभागी आहो, असे संपादकांनी लिहिले होते. त्यावेळी त्याच्याविषयी संशय घ्यावा असे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. पण सायमन ज्यू होता आणि कॅथॉलिक धर्मगुरु ज्या निधर्मी शाळांचा भयंकर द्वेष करीत अशा एका शाळेत शिक्षक होता, हे पुरेसे नव्हते काय ?
पिसाट फ्रेंच ! अगदी पुरेसे होते. फ्रेंच लोकांची सदाचंचल, पिसाटमनोवृत्ती, त्याच वेळी ज्यूद्वेषाची पसरत चाललेली- मुद्दाम पसरविण्यात आलेली लाट- आणि कॅथॉलिक जेसुइट पंथीय धर्मगुरुंची पाताळयंत्री कारस्थानी वृत्ती या त्रिवेणी संगमात सायमन ज्यू असणे हे अगदी पुरेसे होते. कॅथॉलिक धर्मगुरूंनी हे जाणले की, ब्रदर गॉर्जियासचा गुन्हा उघडकीस आला तर पंथाला व त्याच्या शाळांना मोठा हादरा बसेल. म्हणून त्याला पाठिशी घालून सायमनच्या ज्यूपणाचा फायदा घेऊन त्याला बळी द्यावयाचे त्यांनी ठरविले. त्यांनी हळूहळू कुजबूज सुरु केली, बोमंटाइस या वर्तमान पत्राला वश करून घेतले आणि थोडक्या अवधीत सायमन आणि ज्यू यांच्याविरुद्ध एवढा प्रक्षोभ माजविला की, सगळा फ्रेंच समाज भडकून गेला. सर्वत्र 'ज्यू मुर्दाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या. ज्यूंना लहान मुलांची काळिजे लागतात, म्हणून ते नेहमीच असे खून करतात, त्यांनी एक मंडळ स्थापून कोट्यावधी रुपये जमविले आहेत व ते फ्रान्सचा सर्वनाश करणार आहेत, अशा वदंता सर्वत्र पसरल्या आणि मेलिवॉइस, बोमंट या गावच्या आसमंतातील फ्रेंच जनता पिसाट होऊन संतापाने थरथरू लागली. अशा स्थितीत सत्य माहीत असले तरी ते सांगण्याची हिंमत कोण करणार ?
पण अशा स्थितीतही सत्याच्या बाजूने ठामपणे उभा राहील, त्याच्या समर्थनार्थ सर्वस्व अर्पण्यास जो तयार असेल, आणि दीर्घ प्रयत्नाने अविश्रांत श्रम करून, अनेक प्रमाणे उभी करून, लोकमताची पर्वा न करता जो सत्याची प्रस्थापना करील तोच खरा शूर, तोच खरा राष्ट्राचा, फ्रान्सचा हितकर्ता होय हाच संदेश 'ट्रूथ' या कादंबरीत झोला याला द्यावयाचा आहे. आणि मार्क फ्रॉमेंट ही व्यक्तिरेखा निर्मून तिच्या चरित्राच्या द्वारे त्याने तो दिला आहे.
धीर पुरुष मार्क फ्रॉमेंट हा एक प्राथमिक शाळा शिक्षक. प्राथमिक शाळेतील शिक्षणावर, तेथे बालबालिकांच्या मनावर जे संस्कार केले जातात त्यांवर देशाचे भवितव्य अवलंबून असते, असे झोलाचे मत आहे. यासाठीच रोमन कॅथॉलिक पंथाच्या भ्रष्ट, अधोगामी, सत्यहीन, अंध अशा धर्माच्या विरुद्ध झगडण्यासाठी त्याने एक प्राथमिक शिक्षक उभा केला आहे. सत्याचे, न्यायबुद्धीचे, बुद्धिवादाचे संस्कार हे त्याच्या हातातले शस्त्र आहे. त्या शस्त्राने जेसुइटांच्या व पोपच्या प्रचंड शक्तीशी त्याला लढा करावयाचा आहे.
मार्क हा मेलिबॉइस येथून पाच-सहा मैलांवर असलेल्या जॉनव्हिल या गावच्या शाळेतील शिक्षक. सायमनचा बालमित्र. झेफेरिनचा खून झाला त्या दिवशी तो मेलिबॉइस गावी होता. त्याची बायको जिनिव्ही हिचे तेथे माहेर होते; तिची आई श्रीमती बथेंस व आजी श्रीमती देपार्क या दोघी विधवा मेलिबॉइसला रहात असत. मॅडम देपार्क ही अत्यंत धर्मांध, अतिशय हेकट, कर्मठ व दुराग्रही स्त्री होती. मार्क फ्रॉमेंट हा पहिल्यापासूनच सुधारक (फ्रीथिंकर) म्हणून प्रसिद्ध होता. त्यांमुळे जिनिव्हीचे त्याच्याशी लग्न व्हावे याला तिचा विरोध होता. पण जिनिव्हीने तो मानला नाही, म्हणून त्यांच्यावर तिचा कायमचा राग होता. मोकळ्या मनाने मार्कचे तिने कधीच स्वागत केले नाही. त्यामुळे मार्कला तेथे जाणे आवडत नसे. पण जिनिव्हीचा आजीकडे ओढा होता. तिची आई तेथेच होती. म्हणून नाखुषीने का होईना पण तो तेथे जात असे. या वेळी सुटीत बायको जिनिव्ही व मुलगी लूसी यांच्यासह तो तेथे आला होता.
बिंदूत सिंधू आपला बालमित्र सायमन याच्या हातून आपल्या पुतण्याचा खून करण्याचे पाप घडेल हे मार्कला स्वप्नातसुद्धा खरे वाटले नाही. त्याने त्याची भेट घेतली, इतर अनेकांची भेट घेतली आणि सायमनला या संकटातून वाचविण्याचा त्याने निर्धार केला. या प्रयत्नात असताना त्याला जे अनुभव आले त्यांतूनच धर्मसत्ता म्हणजे काय, लोकशाहीचा अर्थ काय, न्यायालयांचे स्वरूप काय, सत्य, न्याय, यांचे कोणाला किती प्रेम असते, अंधश्रद्धा, रूढी, जुनाट पूर्वग्रह, यांचा जनमनावर केवढा जबरदस्त पगडा असतो, याची सम्यक् कल्पना झोलाने दिली आहे. मेलिबॉइस, जॉनव्हिल, बोमंट यांच्या परिसरातच मुख्य कथा घडत असते, पण तेवढ्या लहानशा विश्वातून सर्व फ्रान्सचे दर्शन आपल्याला घडते. आणि सूक्ष्मपणे पाहिले तर त्यातूनच अखिल विश्वातल्या मानवी मनाचेही अंतरंग समजते. बिंदूत सिंधू दाखविणे हीच साहित्यकला.
ॲलेकझेंद्रा व एदोर्दा या दोन स्त्रिया. एकीचा मुलगा सेबस्टिन, हा सायमनच्या निधर्मी शाळेत जाई. दुसरीचा मुलगा व्हिक्टर कॅथॉलिक शाळेत जाई. मार्कला झेफेरीनच्या तोंडात कोंबलेल्या कित्त्याच्या कागदाचा शोध ध्यावयाचा होता. तो या दोघींच्या घरी गेला. प्रथम सेबास्टिन म्हणाला, 'होय, व्हिक्टरच्या हातात त्यांच प्रकारचा कित्ता भी पाहिला होता.' व्हिक्टरही प्रथम होय म्हणाला. गडबड ऐकून दोघी स्त्रिया बाहेर आल्या. मार्कने त्यांना कागदाचे महत्त्व सांगितले. आमच्या शाळेत असले कित्ते वापरीतच नाहीत असे कॅथॉलिक ब्रदर फुलजन्स याने सांगितले होते. तसे वापरतात व त्यांतलाच एक कित्त्याचा कागद झेफेरिनच्या तोंडात सांपडला हे मार्कला सिद्ध करावयाचे होते. हे सर्व ऐकताच त्या बायका घाबरल्या. त्यांनी मुलांना डोळ्यांनी दटावले, मग दोघाही मुलांनी आम्हांला काही माहीत नाही, म्हणून सांगितले. इतर विद्यार्थ्याच्या घरी मार्क गेला. त्यांच्या आई-बापांनी मुलांना उत्तरे देण्यास मनाई केली. कोणी म्हणाला, 'अहो, आम्ही गरीब माणसे, या जंजाळात सापडलो तर कुठवर निस्तरीत बसायचं ?'
राजकारण मॅजिस्ट्रेट डाइक्स हा गुन्ह्याची सर्व चौकशी करीत होता. तो भला गृहस्थ होता. सायमनवरचा आरोप उभा राहू शकत नाही, असे त्याच्या लक्षात आले होते. धर्मगुरूंचाच, फादर फिलिबिन, ब्रदर फुलजन्स, ब्रदर गॉर्जियास यांचाच त्यात हात असावा अशी शंका त्याला आली होती. पण त्याची बायको महत्त्वाकांक्षी होती, जहांबाज होती. तिने नवऱ्याला बजावले, 'ही संधी आहे. सायमनला गुंतविलात तर बढती मिळेल. नाहीतर जन्मभर या बोमंट गावीच रहाल, आणि दरिद्री रहाल. मला ते पटायचे नाही. जन्मभर इथे रहायला मी मुळीच तयार नाही. आपला विचार पहा.' बिचारा डाइक्स. बायकोचे उग्र रूप पाहून घाबरून गेला. त्याने पुरावा उभा केला.
निवडणूक निष्ठा लेमॉराइस हा बोमंट गावचा मेयर. लोकसत्ताकाचा अभिमानी. जेसुइटांविषयी त्याला तिटकारा. मार्कविषयी आदर. मार्क त्याच्याकडे जाताच त्याने त्याचे भरघोस स्वागत केले. सायमन निर्दोषी आहे, असे आपले मतही दिले. पण सायमन पक्षाला तो उघडपणे पाठिंबा देऊ शकत नव्हता. कारण निवडणुका जवळ आल्या होत्या. तो म्हणाला, 'मार्क मी तुमच्या बाजूचा आहे. पण काही इलाज नाही. निवडणुका अगदी अंगावर आल्या आहेत. लोकमताचे वारे ध्यानात घेतलेच पाहिजेत. केवळ माझ्याच जागेचा प्रश्न असता तर मी विवेक देवतेचा आदेश मानून खुषीने ती सोडली असती. पण प्रश्न प्रजासत्ताकाचा आहे ! त्यातून मी आता वृद्ध झालो आहे. आता ध्यानात येते की, राजकारणात विवेक देवतेप्रमाणे नेहमी चालता येत नाही. निवडणुका समोर नसत्या तर मी तुम्हांला निश्चित साह्य केले असते. तुम्ही मार्सिलीकडे जा. तो तरुण आहे. निर्भय आहे. तो तुम्हांला निश्चित साह्य करील.' मार्सलीने मार्कला फार गौरवाने वागविले अभिवचनही दिले, पण एकंदर त्याच्या बोलण्याचा मार्कला भावार्थ असा दिसला की, रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत बाध येईल असे तो काही करणार नाही. दारास हा मेलिबॉइस गावचा मेयर, तोही रिपब्लिकन पक्षाचा. कॅथॉलिकांचा कडवा द्वेष्टा. पण म्युनिसिपालिटीत त्याच्या बाजूला दोनच मतांचे आधिक्य होते. या वावटळीत ती कमी झाली तर मेयरपदही जाईल. मग काय उपयोग ! तसे नसते तर, त्याच्या पक्षाचे भरघोस बहुमत असते तर ! सत्य, न्याय, स्वातंत्र्य यांच्या बाजूने तो शौर्याने लढला असता !
न्यायदेवता? सायमनवर खुनाचा खटला भरण्यात आला. डेल्बॉस हा एक उत्तम निष्णात वकील सायमनला मिळाला होता. त्याने त्याची बाजू उत्तम मांडली. पण सर्व व्यर्थ गेले. धर्मगुरूंनी सायमनच्या सहीचे बनावट पत्र तयार केले. व खाजगी रीतीने ते न्या. मू. ग्रॅगान यांना दिले. त्यांनी ते ज्यूरीचे सरपंच जॅकिन यांना व ज्यूरीला खाजगी रीतीनेच दाखविले. हे सर्व बेकायदेशीर होते. पण ज्यूधर्मी लोकांविरुद्ध पेटलेल्या आगीत आपला बळी पडेल ही सर्वांना भीती होती. म्हणून सर्व पापे करण्यास ते तयार झाले. ज्यूरीने दोषी म्हणून निकाल दिला. सायमनला जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
सत्याग्रहाचे फळ मार्क फार निराश झाला. तो म्हणाला, 'अरेरे, माझा देश मी चांगला जाणतो असे मला वाटले होते. पण सत्य, न्याय, यांची येथे विटंबनाच चालली आहे.' मनात निराशा, बाहेरही तेच सायमनच्या मुक्ततेसाठी त्याने हळूहळू प्रयत्न चालविलेच होते. त्यामुळे धर्मगुरूंनी त्याला जीवन असह्य करून टाकले होते. रस्त्याने लोक त्याची चेष्टा करीत. त्याची नोकरीही गेली असती. पण वरचे काही अधिकारी त्याचे चाहते होते. त्यांनी त्याला थोडी बढतीच दिली. जॉनव्हिल गावाहून त्यांनी त्याची मेलिबॉइस गावी बदली केली. पण ही बढती त्याला सुखाची झाली नाही. ती सायमनचीच शाळा होती. लोकमत आता तिच्या विरुद्ध होते. तेथे प्रथम मुलेही त्याच्याशी उर्मटपणे वागू लागली. शाळेचे तपासनीसही त्याच्या चुका टिपण्याच्या मागे लागले. त्यामुळे त्याला फार त्रास होऊ लागला. पण मेलिबॉइसला आल्यावर त्याच्यावर खरे संकट आले ते निराळेच. त्याची बायको जिनिव्ही हिचे त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम होते. मार्क करतील तेच बरोबर हीच तिची श्रद्धा होती. यामुळे मार्कला तिचा फार मोठा आधार वाटे. पण मेलिबॉइसला आल्यानंतर ती वरचेवर माहेरी आजीकडे मॅदाम देपार्ककडे जाई. तेथे मार्क, त्याचा सुधारक पंथ, सायमनपक्ष, एकंदर ज्यू लोक यांच्याविषयी तिच्या मनात भयंकर विष कालविले जाई. लहानपणापासून ती त्याच संस्कारात वाढली होती. तिचे शिक्षण, कॅथॉलिक शाळेतच झाले होते. पण मार्कवरील प्रेमामुळे तिचे परिवर्तन झाले होते. पण वरचेवर आजीच्या जुनाट अंध, कर्मठ, दुराग्रही विचाराचे आघात तिच्यावर झाले. तर ही आपल्याला दुरावेल अशी भीती मार्कला वाटू लागली. जिनिव्हीलाही तशी भीती वाटत होती. आजीकडे जाताना मार्कने बरोबर यावे असे ती म्हणत असे. पण नेहमीच ते जमत नसे. आणि आजी तर त्याला पाण्यात पहात असे. त्यामुळे तो जाण्याचे टाळी. शेवटी त्याची भीती खरी ठरली. ज्यूद्वेष जिनिव्हीच्या अंगी संचरला. 'तुम्ही त्या सायमनचा पक्ष सोडून द्या' असे ती त्याला सांगू लागली. व त्याने नकार दिला तेव्हा 'तुमचे माझ्यावर प्रेमच नाही,' असे ती म्हणू लागली. आणि हाच दुरावा वाढत जाऊन ती एक दिवस मार्कला सोडून माहेरी निघून गेली. मार्कचा संसार उध्वस्त झाला. सत्य, न्याय, समता, सहिष्णुता यांच्या समर्थनाचे हे फळ. त्याला मिळाले !
मत परिवर्तनाचे रहस्य पण मेलिबॉइसच्या शाळेत त्याने आपले काम धीराने व नेटाने चालविले होते. तो उत्तम शिक्षक होता. सत्य, बुद्धिनिष्ठा, धैर्य यांचे संस्कार मुलांच्या मनावर करण्यानेच आज उद्या समाजमनाचे परिवर्तन होईल अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे अध्यापन हा त्याचा धर्म होता. वर्गात शिकविण्याच्या ओघात तो सत्याची महती पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे. हळूहळू वाणीच्या प्रभावामुळे, तळमळीमुळे मुलांची त्याच्यावर भक्ती बसू लागली. आणि त्यातूनच एक प्रसंग असा उद्भवला की सायमनच्या निरपराधित्वाचा पुरावा मिळणे शक्य आहे, असे त्याला वाटू लागले. एक दिवस सत्याची महती इतक्या परिणामकारक रीतीने त्याने वर्गात सांगितली की, ज्याने कित्याच्या कागदाविषयी खोटे सांगितले होते तो मुलगा सेवास्टियन वर्गात रडू लागला. व तास संपल्यानंतर त्याने आपला अपराध कबूल केला. आणि घरी जाऊन आईला तसे सांगितले. ती पुन्हा घाबरली. व लगेच मार्ककडे येऊन तिने सांगितले की, तो कागद माझ्याकडे होता, पण मी तो फाडून टाकला. मार्कची अत्यंत निराशा झाली. या तुमच्या कृत्यांमुळे एक निरपराधी मनुष्य नरकयातनात पिचत पडला आहे, त्याची बायकामुले तडफडत आहेत असे तो तिला म्हणाला. पुढे काही दिवसांनी तिचा सुलगा सेबास्टियन आजारी पडला व लवकर बरा होईना. तेव्हा तिच्या मनात डांचू लागले. त्या आपल्या पापामुळे सेवास्टियन बरा होत नाही, देवाने आपल्याला ही शिक्षा दिली आहे, असे तिच्या मनाने घेतले व मार्कला घरी बोलावून प्रांजळपणे आपण खोटे बोलल्याचे त्याला सांगून तिने कपाटात लपवून ठेवलेला कागद याच्या स्वाधीन केला. झेफेरिनच्या तोंडात सापडला तसाच तो कागद होता. त्यावर कॅथॉलिक शाळेचा शिक्का होता व ब्रदर गर्जियास याची स्वाक्षरी होती. असले कित्ते आमच्या शाळेत नसतातच असे धर्मगुरूंनी सांगितले होते. धर्मरक्षणासाठी त्यांनी हे केले होते. आता धर्म त्यांच्यावर उलटला होता. कागद लपविणे हा अधर्म आचरला म्हणूनच मुलगा आजारी पडला, असे ॲलेकझेंद्राबाईला वाटले आणि त्यामुळेच तिने अपराध कबूल करून तो मार्कला दिला. आणि खरोखरीच दुसऱ्या दिवसापासून मुलाला आराम पडला. माणसांचे मतपरिवर्तन असेच होत असते. विवेक, बुद्धिवाद, जनहित, धर्मतत्त्वे यांनी ते होत नाही. स्वतःचे सुखदुःख, हिताहित, प्रियजनांची माया, वात्सल्य, प्रेम हीच कारणे बहुधा सर्वत्र प्रभावी असतात. हे मूर्त करून दाखविणे याचेच नाव साहित्यातील जीवनभाष्य.
धर्मासाठी काळी कृत्ये कित्त्याचा कागद मार्कला सापडला आहे, तो कॅथॉलिक शाळेतलाच आहे, झेफेरिनच्या तोंडात सापडलेल्या किल्यासारखाच तो आहे, त्यावर ब्रदर गॉर्जियासची सही आहे, शाळेचा शिक्काही उजव्या कोपऱ्यात आहे, हे जाहीर होताच धर्मगुरु पक्ष घाबरला. ब्रदर गॉर्जियास तर फरारीच झाला. व फादर फिलिबिन, ब्रदर फुलजन्स यांवर वाटेल ते आरोप करू लागला. तेही आता खाजगीत त्याच्या विरुद्ध बोलू लागल्याचे सायमनचा वकील डेल्वास याच्या कानी आले. तेव्हा त्याला एक आशा वाटली. सत्य प्रगट झाल्यावर, न जाणो, आपले कॅथॉलिक भाई आपल्या विरुद्ध उलटतील ही त्या सर्वांना भीति वाटत होती, हे त्याच्या ध्यानी आले. त्यामुळे पुढे मागे गॉर्जियास फारच उलटला तर त्याच्याविरुद्ध पुरावा असावा म्हणून कदाचित फादर फिलिविन याने तो चलाखीने कापून घेतलेला कित्त्याचा तुकडा जपून ठेवला असेल असे त्याला वाटले. याच सुमारास सायमनवरील खटल्याच्या वेळचे सरपंच जॅकिन यांचा फादर क्रॅबट व फादर फिलिविन यांच्याशी खटका उडाल्याचे त्याला कळले. न्या. ग्रॅगान यांनी खाजगीरीत्या ज्यूरीला सायमनचे पत्र दाखविले होते. न्यायालयात ते पुढे आणले नव्हते. हे बेकायदेशीर आहे, हे जॅकिनला त्यावेळी माहीत नव्हते. पुढे ते कळल्यावर तो संतापला व त्या जेसुइटांवर उखडला. त्यांनी त्याला परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. चर्चसाठी कोणतीही काळी कृत्ये करण्यास हरकत नाही, त्यांनी देव रागवत तर नाहीच उलट त्या धर्मकृत्यामुळे प्रसन्न होतो. असा उपदेश त्यांनी केला. पण जॉकन म्हणाला, 'देव असा असणे अशक्य आहे. देव दीनांचा वाली असतो. तो असत्य, अन्याय, गुन्हेगारी कधीच सहन करणार नाही.' स्वतःचा प्रमाद असा ध्यानी आल्यामुळे जॅकिन हा न्या. ग्रॅगान यांनी बेकायदा खाजगीरीत्या पत्र दाखविले असा लेखी जबाब देण्यास सिद्ध झाला. या सर्व पुराव्याच्या आधारे डेल्बॉस यांनी फेरतपासणीचा अर्ज करून पॅरिसला जाऊन फिलिबिनच्या घराची झडती घेण्याचा हुकूम मिळविला. त्याचा अदमास खरा ठरला. फादर फिलिविनच्या घरी खोल दडविलेला तो कित्याच्या कागदाचा कोपरा सापडला. सायमनला परत आणण्यात आले. खटला पुन्हा चालविण्याचे फर्मान निघाले.
असत्याची कैफियत कॅथॉलिक धगुर्मरूचा गुन्हा आता उघडकीस आला होता. पण त्यांचे औद्धत्य असे की, आम्ही हे धर्मरक्षणासाठी केले. तेच करणे. बरोबर आहे असे ते सांगू लागले. फादर फिलिबिन म्हणाला, मी कित्याचा तुकडा काढून लपवला हे खरे पण ज्यूंनी फ्रान्सचा नाश करण्याचा घाट घातला होता. त्यांना शिक्षा करण्यासाठी मी हे केले. फ्रान्सच्या रक्षणासाठी मी हे केले. मला ते भूषणास्पदच वाटते. न्या. ग्रॅगान यांनी ज्यूरीला बेकायदारीतीने पत्र दाखविले हे मान्य केले. पण त्यांनीही असेच समर्थन केले. ला पेटिट बोमंटाइस हे पत्रही त्याच सुरात लिहू लागले. आणि आश्चर्य असे की लोकांनाही ते पटू लागले. त्यांचा ज्यूविरुद्धचा संताप गेल्या दहा वर्षात जरा ओसरला होता. पण पुन्हा त्याला कढ येऊ लागले. त्यात खटला चालू असताना कॅथॉलिकांनी पुन्हा पूर्वीचीच युक्ती केली. काही बनावट पत्रे खाजगीरीतीने ज्यूरीला दाखविण्याची व्यवस्था केली. आणि या सर्वांचा परिणाम होऊन ज्यूरीने पुन्हा सायमनला दोषी ठरविले. न्या. गायबरो यांनी दहा वर्षे एकलकोंडीची त्याला शिक्षा दिली. पण यावेळी ज्यूरीने क्षमेची शिफारस केली होती. तिचा फायदा घेऊन सायमनपक्षाने अर्ज केला आणि तो मंजूर होऊन सायमनला माफी मिळून त्याची सुटका झाली. पण यामुळे आपणच सत्य ठरतो अशा आविर्भावाने कॅथॉलिकपक्ष जास्तच चेकाळून गेला.
अंतिम विजय पण कॅथॉलिकांची गुन्हेगारी जाहीर झाल्यामुळे मार्कच्या खाजगी जीवनात एक सुखाचा क्षण आला. जिनिव्हीला सायमन निर्दोषी आहे हे पटले. तिच्या आजीचा हेकट दुराग्रह तसाच कायम होता. पण तिची आई मॅडम बर्थेस ही आता आसन्नमरण झाली होती. आज अनेक वर्षे ती आपल्या आईच्या म्हणजे मॅडम देपार्कच्या धाकात होती. म्हणून ती काही बोलत नसे. पण आता तिने धीर केला. तिने जिनिव्हीला जवळ बोलावून 'तू आपल्या घरी परत जा, येथे तू सुखी होणार नाहीस,' असे सांगितले. ते ऐकून देपार्क पिसाट झाली व अद्वातद्वा बोलू लागली. पण तिचे आता कोणी मानीना. जिनिव्हीचे मत पालटले होते. तिचे मन तिला खात होतेच. त्यात आईची शेवटची इच्छा तशीच दिसली. आईने मरणापूर्वी तिच्याकडून वचनच घेतले. त्यामुळे ती मेल्यानंतर जिनिव्ही मुलांना घेऊन मार्ककडे परत गेली.
यामुळे मार्कला पुन्हा उत्साह आला. सायमनचा भाऊ डेव्हीड, त्याचा वकील डेल्बास हा आता मेयर म्हणून निवडून आला होता. या सर्वांनी पुन्हा सायमनला पूर्ण निर्दोष ठरवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ब्रदर गॉर्जियास आता जाहीरपणे दूरान्वयाने का होईना आपण गुन्हा केल्याचे कबूल करीत होता. जेसुइट अधिकाऱ्यांविरुद्ध तो चांगलाच भडकला होता. ते त्याला आता आश्रय व पैसा देत नव्हते. त्यामुळे माझ्याइतकेच तेही गुन्हेगार आहेत असे तो सांगू लागला. अर्थात अजूनही नाक त्याचेच वर होते. तो म्हणे की, 'मी गुन्हा केला तरी धर्मगुरुंपुढे तो मान्य केला आहे व क्षमा याचना केली आहे. तेव्हा मी आता गुन्हेगार नाही. मी कोणाचे काही लागत नाही.' कॅथॉलिकांनी ज्यूरीला खाजगी रीतीने पत्र दाखविल्याचा गुन्हाही आता सिद्ध झाला होता. या सर्वांचा परिणाम होऊन सायमन पूर्ण निर्दोषी आहे असे न्यायालयात सिद्ध होऊन त्याच्यावरचा कलंक कायमचा गेला.
सत्य आणि कल्पित ट्रूथ कादंबरी वाचताना फ्रान्समधल्या न्यायदेवतेच्या विटंबनेची कथा, रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंची गुन्हेगारी, फ्रेंच लोकांची पिसाट वृत्ती यांची एमिल झोला याने केलेली वर्णने जरा अतिरंजित आहेत, असे केव्हा केव्हा वाटते. पण त्याच सुमारास म्हणजे गेल्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समध्ये जे 'ड्रायफस प्रकरण' प्रत्यक्ष इतिहासात घडले त्यावरून ध्यानात येते की, ती सत्यकथा या कादंबरीपेक्षा दसपट भयानक आहे. निकोलस हलास याने 'कॅप्टन ड्रायफस' हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. त्याला 'फ्रेंच जनतेतील वेताळसंचार' असे दुसरे नाव त्याने दिले आहे (ए स्टोरी ऑफ मास हिस्टेरिया). त्यावरून त्याचा अभिप्राय ध्यानात येईल. या ड्रायफस प्रकरणावरूनच झोलाने ही कादंबरी लिहिली आहे. कॅप्टन ड्रायफस हा ज्यू असून तो फ्रेंच लष्करात मोठा अधिकारी होता. जर्मन वकिलातीला फ्रेंच लष्कराच्या गुप्त बातम्या दिल्या, असा त्याच्यावर आरोप आला. ते अपकृत्य मेजर ईस्टर हेझी याचे होते. पण तपास करताना डी आद्याक्षर असलेला कोणी माणूस यात असावा, अशी लष्करी अधिकाऱ्यांना शंका आली. ड्रायफस तसा होता. आणि तो ज्यू होता, एवढे पुरेसे होते. ही वार्ता आगीसारखी पसरली. आणि मग ज्यू द्वेषाने जो संचार फ्रेंच जनतेत झाला त्यात न्याय, सत्य, स्वातंत्र्य, लोकशाही सर्व जळून खाक झाले. ड्रायफसला जन्मठेप शिक्षा झाली. काही वर्षानी फेरतपासणी झाल्यावर पुन्हा ज्यूरीने दोषी म्हणूनच निर्णय दिला. पण त्यावेळी त्याला माफी मिळाली. त्याच्या मित्रांनी पुन्हा खटपट केली. त्यात एमिल झोला हाच प्रमुख होता. 'आय ॲक्यूज' हा त्याचा लेख फ्रान्समध्ये अमर झाला आहे. त्याच्या प्रयत्नाला यश येऊन ड्रायफस पूर्ण निर्दोषी ठरला. आणि सैन्यात त्याला पहिल्यापेक्षा वरचे पदही मिळाले.
फ्रेंच राष्ट्रीय जीवनातली हीच कथा मूळ द्रव्य म्हणून झोलाने कादंबरीसाठी घेतली. रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंच्या अंध, हेकट, शब्दप्रामाण्यवादी, कर्मकांडात्मक धर्मामुळे आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात शिरून फ्रेंच बालकांच्या मनावर ते त्याचे संस्कार करीत असल्यामुळे फ्रान्सची ही नवी पिढी अधोगामी होत आहे. सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, सहिष्णुता, लोकशाही या मूल्यांची रोमन कॅथॉलिक राखरांगोळी करीत आहेत, हे झोलाला सांगावयाचे होते. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण हे बुद्धिवादी, सत्यनिष्ठ, सुधारक, अशा शिक्षकांच्या हाती दिले तरच फ्रान्सची उन्नती होईल हा विचार त्याला मांडावयाचा होता. सत्य, न्याय यांनी जग जिंकले पाहिजे, लष्करी बळाने नव्हे, हे झोलाचे जीवनाचे तत्त्वज्ञान होते. आणि ते त्याने अनेक कादंबऱ्यांतून मांडले आहे.
एखाद्या व्यक्तीचे जीवनाचे तत्त्वज्ञान, असे म्हणताना तत्त्वज्ञान हा शब्द शास्त्रीय अर्थाने वापरलेला नसतो. तिच्या सर्वसाधारण श्रद्धा, तिची मूल्ये असा तेव्हा भावार्थ असतो. विल्यम जेम्स हा सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता म्हणतो, 'आपल्याला आपले जीवन तत्त्वज्ञान महत्त्वाचे वाटते. पण ते पारिभाषिक शास्त्रीय अर्थाने नव्हे. जीवनाचा आपल्याला वाटणारा अर्थ, इतकीच तेव्हा विवक्षा असते. तो अर्थ आपण अभ्यास करून निश्चित केलेला नसतो. मनातल्या मनात त्याची रूपरेखा ठरलेली असते इतकेच. बाह्य जगाचे आपल्यावर होणाऱ्या संस्काराकडे पाहण्याची आपली दृष्टी इतकाच त्याचा अर्थ.'
जीवनभाष्य-प्रधान लक्षण टी. एम्. ग्रीन याने 'दि आर्टस् अँड दि आर्ट ऑफ क्रिटिसिझम' या आपल्या ग्रंथात शेवटी साहित्याच्या व कलेच्या श्रेष्ठतेच्या निकषाची चर्चा केली आहे. गहन, मार्मिक, अत्यंत उद्बोधक असे जीवनभाष्य हेच श्रेष्ठ साहित्याचे प्रधान लक्षण, असे तो म्हणतो. प्रथम त्याने वाल्टर पेटर- या साहित्य शास्त्रज्ञाचे याविषयीचे मत दिले आहे. रम्य काव्य (साहित्य) आणि श्रेष्ठ काव्य यात पेटर फरक मानतो. त्याच्या मते काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील रचना सौंदर्यावर अवलंबून नसून त्याच्या विषयावर अवलंबून असते. काव्याच्या विषयाची व्यापकता, गाढता, त्यातील उदात्त हेतू, त्यातील मूलगामी क्रान्तिप्रेरणा, त्यातील विशाल आशावाद यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरते. डांटेचे 'डिव्हाइन कॉमेडी', मिल्टनचे 'पॅराडाइज लॉस्ट' ही महाकाव्ये, व्हिक्टर ह्यूगो याची 'ला मिझरेबलस्' ही कादंबरी, इंग्लिश बायबल या गुणांनीच श्रेष्ठ साहित्य ठरतात.' पेटरच्या या मताचा अनुवाद करून ग्रीनने 'विषय' या गुणांचे आणखी स्पष्टीकरण केले आहे. तो म्हणतो, 'केवळ विषयावर कलेचे श्रेष्ठत्व अवलंबून नाही. त्यातील जीवन भाष्यावर अवलंबून आहे. त्या गुणाला महत्त्व आहे.' अर्थात पेटरने विषय शब्द वापरला तेव्हा त्याच्या मनात हाच भावार्थ होता. आणि तशा अर्थाने विषयालाच अनन्यसाधारण महत्व आहे हे ग्रीनला मान्य आहे. कारण विषय जेव्हा गहनगंभीर, व्यापक आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात तेव्हाच साहित्यिकाला मूलगामी असे जीवनभाष्य करता येते. हे सांगून शेवटी तो म्हणतो, 'सर्व जगाला वंद्य झालेल्या कलाकृतीत निरपवादपणे मानवाला जिव्हारी लागलेल्या धार्मिक व सामाजिक अनुभूतींचा अर्थ विशद केलेला आढळतो, आणि अंतिम मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घटना व वस्तू यांवर भाष्य असते हा काही केवळ योगायोग नव्हे. त्या भाष्यामुळेच त्या कृती वंद्य झालेल्या असतात. चित्र, शिल्प, संगीत, साहित्य कोणतीही कला घ्या. श्रेष्ठ कलाकार एकाच गुणाने श्रेष्ठ ठरलेला दिसतो. त्याने निवडलेल्या विषयाचे महत्त्व व त्या विषयावर त्याने केलेले प्रभावी भाष्य. पाश्चिमात्य संस्कृतीतील सुप्रसिद्ध चित्रे, शिल्पे, गीते घ्या. किंवा महाकाव्ये, शोकांतिका, कादंबऱ्या घ्या त्या सर्वांवरून हेच दिसून येईल. कलाकाराचा व्यापक दृष्टिकोण व त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान हाच कलेचा आत्मा असतो.'
याच संदर्भात 'जीवनविषयक तत्त्वज्ञान' याचा भावार्थ ग्रीनने विल्यम जेम्सच्या आधारे स्पष्ट केला आहे. (दि आर्टस् अँड आर्ट ऑफ क्रिटिसिझम- प्रकरण २४, पृ. ४६१–६६.)
एमिल झोला याच्या ट्रूथ या कादंबरीचे श्रेष्ठत्व कशात आहे हे वरील विवरणा- वरून कळून येईल, धर्म, राजकारण, लोकसत्ता, शिक्षण, विवाह, स्त्रीपुरुष-नीती, न्यायदान, सत्य, ध्येयवाद, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांचे, तत्त्वांचे अर्थ, म्हणजे त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्याने या कादंबरीत आविष्कृत केले आहे. आणि मानवी व्यक्ती, त्यांच्या भावना, रागद्वेष, त्यांचे वात्सल्य, प्रेम, स्वार्थ, लोभ, त्याग, दया, क्षमा या माध्यमातून केले आहे. कला सौंदर्याचे सर्व गुण त्यात आहेतच, शिवाय उद्बोधन, जीवनदर्शन, क्रान्तिप्रवणता, अमर आशावाद, उदात्त ध्येयवाद, हेही आहे. श्रेष्ठ, अभिजात, अमर कलाकृती कोणती ? "जिच्यामुळे आपल्या भावना हेलावतात, चित्त गद्गदते आणि जिच्यात व्यापक, अंतर्भेदी दिव्य तत्त्वज्ञान, आढळून येते ती." ही ग्रीनची व्याख्या झोलाने सार्थ केली आहे यात शंका नाही.
भारतातील शेतकरी मुनशी प्रेमचंद यांनी गोदान या आपल्या कादंबरीत भारतातील शेतकऱ्याच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. भारतातील शेतकरी. हा कायमचा दरिद्री, दीनवाणा, कायमचा कर्जात बुडालेला, अज्ञानपंकात पिढयान्-पिढ्या रुतलेला, लाचार आणि सुखहीन वैराण जीवन जगणारा असा आहे, हे प्रसिद्धच आहे. गोदान ही त्याच्या जीवनाची कथा आहे. त्याच्या जीवनाचा धागान् धागा मुनशींनी या कादंबरीत उकलून दाखविला आहे. किसान जीवनाचे इतके वास्तव इतके हृदयभेदक आणि इतके उद्बोधक असे चित्र जगाच्या वाङ्मयात दुसरीकडे सापडेल असे वाटत नाही.
उत्तरप्रदेशातील लखनौ या नगरीजवळच्या बेलारी या खेड्यातला होरी हा एक शेतकरी. धानियां ही त्याची बायको आणि गोवर, सोना व रूपा ही त्याची तीन मुले. भारतात कुठेही गेलो तरी शेतकऱ्याचे हेच कुटुंब आपल्याला आढळेल इतकी होरीची कथा प्रातिनिधिक आहे. होरीला जमीन अगदी थोडी म्हणजे तीन-चार बिघेच आहे. आणि तिच्यातून जे पीक येते ते चार-पाच माणसांच्या कुटुंबाला भाकर- तुकडयालाही पुरत नाही. त्यामुळे नित्यखर्चासाठीसुद्धा होरीला कर्ज काढावे लागते. मग सण उत्सव आले, मुलींची लग्ने निघाली की कर्जाचा बोजा वाढत जातो, यात नवल नाही. त्यात भारतातला पाऊस हा सदा लहरी, सदा चंचल. कधी अवर्षण, कधी अतिवर्षण. यांमुळे सोळा आणे पीक क्वचितच हाती येते. मग सारा थकतो, खंड थकतो आणि होरी आणखी कर्जात बुडतो. त्याला कर्ज आहे ते चार-पाचशे रुपयेच आहे. पण त्याच्या संसाराच्या हिशेबावरून हे स्पष्ट दिसते की, ते होरी या जन्मी कधीही फेडू शकणार नाही. कर्जबाजारीपणा आणि शेतकरी हे भारतात पर्यायी शब्दच झाले आहेत.
सावकार पंडित दातादिन, ठाकुर झेंगुरी व मंगरू हे गावातले मुख्य सावकार आहेत. पटेश्वरी हा तलाठी आणि नोखेरान हा जमीनदाराचा बेलीफ हेही सावकारी करतात. कायद्याचा दंड त्यांच्या हाती असल्यामुळे त्यांची सावकारी बिनघोर आहे. हे झाले मुख्य सावकार वस्तुस्थिती अशी आहे की दोन पैसे बाळगून असलेला गावातला अमुक एक मनुष्य होरीचा सावकार नाही असे होतच नाही. नित्य असे काही घडत असते की, त्याला दहा-वीस, पंचवीस-पन्नास रुपये कर्ज काढावे लागते. जुने कर्ज फिटलेले नसते, त्याचे व्याजही दिलेले नसते, त्यामुळे नवा सावकार पहावा लागतो आणि होरीच्या गळ्याभोवती आणखी एक फास आवळला जातो. हे सर्व सावकार कर्जरोखा लिहून घेण्याच्या बाबतीत दक्ष असतात; पण होरीने हप्ता दिला किंवा व्याज दिले तर त्याची पावती ते कधीही देत नाहीत. त्यामुळे आपल्याला कर्ज किती आहे, व्याज किती थकले आहे याची होरीला काही कल्पना नसते. त्याचे आणि पंडित दातादिन किंवा ठाकुर झेंगुरी यांचे हिशेब कधीच जमत नाहीत. व्याज रुपयाला बारा आणे म्हणजे शेकडा ७५ असा दर आहे. आणि कर्ज देतानाच काही व्याज सावकार कापून घेतो. अर्थात त्याची नोंद कोठेही नसते.
बेलारी गावच्या उत्सवात एकदा खेडुतांनी सावकारी व्यवहाराची नक्कल उठविली होती. तीवरून या व्यवहाराची उत्तम कल्पना येईल. ठाकुर झेंगुरीने दहा रुपये कर्जाऊ देण्याचे कबूल केले आणि शेतकऱ्याच्या हातात पाच ठेवले. शेतकरी म्हणाला 'महाराज, पाचच रुपये दिले तुम्ही.' 'पाच कुठले, दहा आहेत ते,' ठाकुर गरजले. 'घरी जाऊन नीट मोज.' 'अरे एक रुपया कर्ज दिल्याबद्दल नजराणा नको ?' 'होय महाराज.' 'एक रुपया कागद लिहिण्यासाठी, एक रुपया कागदाचा, एक रुपया व्याज, आणि एक रुपया माझी फी. पाच झाले ना ?'
'होय महाराज !'
'शिवाय पाच रुपये रोख, म्हणजे दहा दिले की नाही ?'
यावर शेतकऱ्याने ते पाच रुपये ठाकुराच्या अंगावर फेकून म्हटले, 'हेही तुमच्याजवळच असू द्या. माझा हिशेब असा; एक रुपया नव्या तरुण बायकोला नजराणा, एक थोरल्या बायकोला, एक रुपया मोठ्या बायकोला विड्याला, एक धाकटीला विड्याला. हे झाले चार आणि एक रुपया तुमच्या मर्तिकाला !'
निसर्गाचे अपत्य अशा या सावकारीत शेतकरी किती टिकणार ! प्रेमचंद म्हणतात, सावकारांचे तगादे, त्यांनी केलेल्या फिर्यादी, दिलेल्या शिव्या यांनी शेतकरी अगदी निलाजरा, कोडगा, निबर झालेला असतो. घरात अन्नान्न दशा झालेली असते, त्यांतच पाऊस डोळे वटारतों, सावकार धरणे धरतो, जमीनदार जप्ती आणतो. त्यामुळे शेतकरी लाचार झालेला असतो. अशा स्थितीत अप्रामाणिकपणा, असत्य, खोटी आश्वासने यांवाचून त्याला गत्यंतरच नसते. दोन महिन्यांनी पैसे नक्की देतो, असे तो म्हणतो तेव्हा तो जाणूनबुजून खोटे बोलत असतो. पण त्याच्या हिशेबी यात पाप नसतेच. शेतकरी जीवनाचे हे नित्याचेच लक्षण आहे. पण त्याचे दुसरेही एक लक्षण आहे. तो निसर्गाचा पुत्र आहे. निसर्ग जसा क्रूर, कंजुष, फसवा असतो तसाच उदार, दयाळ, व निःस्वार्थीही असतो. वृक्षाची फळे स्वतःसाठी नसतात, लोकांसाठी असतात. जमीन भुकेल्यामुखी घास घालते. मेघराजा तप्त भूमीला शांत, करतो. शेतकरी तसाच असतो. तो स्वार्थी कसा असेल ?
जया अंगी मोठेपण, तयां यातना कठीण । असे तुकोबांनी म्हटले आहे. होरीच्या जीवनात हे वरचेवर दिसून येते. हे वाचताना आपल्याला विस्मय वाटेल. इतक्या हीन-दीन जीवनात, इतक्या क्षुद्र संसारात, इतक्या खालच्या पातळीवर मोठेपण ते काय असणार, असा आपल्याला प्रश्न पडतो. प्रश्न खरा आहे. चारशे रुपयांचे, कर्ज कधीही न फेडू शकणारा, पाच-दहा रुपयांसाठी सावकाराच्या पायाशी लाचार होणारा, घरात नित्य अन्नान्न दशा असणारा, असा हा होरी. याच्या जीवनात, मोठेपण संभवते तरी कसे ?
गोमाता एक गाय घेणे ही होरीच्या जीवनाची उच्चतम आकांक्षा आहे. घरात गाय नाही म्हणजे घराला प्रतिष्ठा नाही. गाईवाचून शेतकऱ्याच्या जीवनाला सफलता नाही. म्हणून शेजारच्या गावचा गवळी भोला याच्याकडून होरीने ऐशी रूपयाला गाय आणली. अर्थात पैसे दोन वर्षांनी द्यावयाचे होते. रोख पैसा शेतकऱ्याच्या जीवनात कधीच नसतो. गाय घरात आली. धानिया, सोना, रूपा सगळ्या हरखून गेल्या. त्यांना अस्मान ठेंगणे झाले. पण शेतकरी कुटुंबातील भाऊबंदकी उतास आली. आणि तिने गायीची शोकांतिका करून टाकली. हिरा आणि शोभा हे होरीचे भाऊ. आपापली वाटणी घेऊन ते पूर्वीच वेगळे झाले होते. पण त्यांनी हाडवैर जपून ठेविले होते. होरीने गाय घेतली त्याअर्थी वाटणीच्या वेळी आपल्याला फसवून त्याने जास्त पैसा दडवून ठेवला असला पाहिजे, असे त्यानी ठरवून टाकले आणि त्याबद्दल होरीला प्रायश्चित म्हणून हिराने एका रात्री गाईला विष घातले.
जीवनदर्शन होरीच्या गाईला हिराने विष घालून मारले या एका प्रसंगाने प्रेमचंदांनी शेतकऱ्याच्या दरिद्री, करंट्या जीवनातील सर्व धागेदोरे उकलून दाखविले आहेत. होरी, त्याचे भाऊबंद, त्याचे सावकार, चौकशी करण्यास आलेला पोलीस, गावचा तलाठी व एकंदर गावकरी यांच्या अंतरंगाचे दर्शन या प्रसंगाने उत्तम घडते. चौकशीसाठी इन्स्पेक्टर साहेब आले व त्यांनी होरीला बोलावून तुझा कोणावर संशय आहे, असे विचारले. होरीने आदल्या रात्री आपण स्वतः हिराला हे पापकर्म करताना पाहिले असे बायकोला सांगितले होते पण याविषयी एक अक्षर कोठे बोलू नकोस असे बजाविले होते. कारण हीरा त्याचा भाऊ होता. व त्याचे पाप उघडकीस आले असते तर सर्व कुटुंबाची अब्रू गेली असती. त्या अत्यंत हीनदीन दरिद्री अशा शेतकऱ्याच्या मनांत कुळाच्या प्रतिष्ठेचे काही आगळेच विचार होते. पण कुलप्रतिष्ठेचे हे तत्त्वज्ञान धानियाला मान्य नव्हते. तिने सगळ्या गावात ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापून जाऊन होरीने तिला अतिशय मारहाण केली. सर्व गावकऱ्यांदेखत बायकोला लाथा देण्यात कुलाची प्रतिष्ठा जाते असे त्याला वाटत नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी मध्ये पडून दोघांना बाजूला केले. तेवढ्यात इन्स्पेक्टर- साहेब आले. होरीने आपला कोणावरही संशय नाही असे सांगितले. तेव्हा धानिया पुढे झाली व हीरानेच हे कर्म केले असे तिने साहेबांना सांगितले, आता हीराला बोलवायचे, पण तो नाहीसा झाला होता. तेव्हा त्याच्या घराची झडती मी घेतो, असे इन्स्पेक्टर साहेबांनी जाहीर केले. पुन्हा कुळाच्या प्रतिष्ठेला धक्का ! काय घोर आपत्ती ही ! होरीच्या भावाच्या घराची झडती ! होरीला हे कसे सहन व्हावे ! त्यात सर्व घराची अब्रू धुळीस मिळणार ! हा भयंकर प्रसंग होता. त्यातून होरीला सोडविण्यास पंडित दातादिन पुढे झाले. 'हात ओला केल्यावाचून तो ऐकणार नाही, तू काही तरी ती सोय कर' असे ते होरीला सांगू लागले. खेडेगावात पोलीस धावून जातात ते याच हिशेबाने त्यांना गुन्हा शोधण्याची तळमळ नसते. त्यांना प्रकरण मिटवायाचे असते. या प्रकरणी त्याची भूक पन्नास रुपयांची होती !
जळवा तलाठी पटेश्वरी याने साहेबाना काकुळतीने होरीच्या बाजूने सांगितले की, हा फार गरीब मनुष्य आहे. त्याने पन्नास रुपये कर्ज काढले तर पन्नास वर्षातसुद्धा त्याला ते फिटणार नाही. यावर साहेब निराश झाले व म्हणाले, 'मग अशा गरीब माणसाचा छळ करण्यात काहीच अर्थ नाही.' पण यामुळे पटेश्वरी दचकला. साहेब एकदम इतके खाली येतील असे त्याला वाटले नव्हते. तो म्हणाला, 'साहेब, असा त्याला अगदी मोकळा सोडू नका. आमचा काही विचार करा ना. आम्हांला दोन पैसे मिळाले तर अशाच प्रसंगी मिळायचे.' 'ठीक आहे, मग त्याला तीस रुपये सांगा. वीस मला द्या, बाकीचे तुम्ही अन् पाटील वाटून घ्या !'
होरीजवळ तीस दमड्याही नव्हत्या. पण त्याच्यावर दया करण्यास सावकार तयार होतेच. ठाकुर झेंगुरी यांनी त्याला झाकल्या हाताने तीस रुपये दिले. घरात खायला अन्नही नसताना कर्ज काढूनही कुळाची अब्रू वाचविण्याची होरीची तयारी होती. पण धानियाची नव्हती. ती वाघिणीसारखी पुढे झाली व होरीच्या हातावर तिने फटका मारला. रुपये सगळे खाली पडले. व लाचेचा व्यवहार उघडा झाला. साहेबांचा चेहरा अगदीच पडला. पण त्यामुळे ते पिसाळून गेले. त्यानी तलाठ्याला व पाटलाला सांगितले की, अरे मला गोत्यात आणण्याचा तुम्ही हा कटच केला होता असे दिसते. तेंव्हा मी आता तुमच्या घराची झडती घेतो. नाहीतर बऱ्या बोलाने पन्नास रुपये काढा. ध्यानात ठेवा, एकेकाला मी पाच पाच वर्षे तुरुंगात बसवीन. होरी सुटून गेला व तलाठी, पाटील, सावकार फासात सापडले. त्यांना निमूटपणे पन्नास रुपये भरावे लागले !
इन्स्पेक्टर गेल्यावर पंडित दातादिन गरजले, 'माझा शाप त्याला भोवला नाही तर नाव बदलून देईन.' साठी म्हणाला, 'काळा पैसा कधी कुणाला पचायचा नाही.' ठाकुर झेंगुरी म्हणाला, 'देवा, तुझ्या घरी न्याय नाही. पापर्म्यांना तू कसे शासन करीत नाहीस?'
अर्थातच यांच्यापैकी कोणीही पापकर्मा नव्हता?
माणुसकी गोबर हा होरीचा मुलगा. त्याचे या कादंबरीतले चरित्र ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगे आहे. भोला हा गवळी. त्याची मुलगी झुनिया तिचे व गोवरचे प्रेम जमले. त्यांचा संबंध आला व तिला दिवस राहिले. दोघांची जात भिन्न; लग्न होणे शक्य नव्हते. तेव्हा गोबर घाबरून पळून गेला. आणि रात्री झुनिया होरीच्या दाराशी येऊन उभी राहिली. प्रथम धानिया व होरी संतापले. या चेटकिणीनेच आपल्या मुलाला भूल पाडली, असे धानिया म्हणू लागली. ही नसती आफत आहे, असे होरीला वाटले. पण शेवटी दोघांचेही मन द्रवले व त्यांनी तिला आश्रय दिला. तिच्या पोटात त्या दोघांचा नातू होता. यामुळे त्यांचे मन कळवळले. पण हा केवढा अनाचार होता ! वर्णसंकर, कलियुग ते हेच. एखाद्या दीन अबलेवर दया दाखवणे ! हिंदुधर्माला हे मंजूर नाही. गावकीने बहिष्कार पुकारला आणि होरीने दोनशे रुपये दंड दिला पाहिजे, असे फर्माविले. पुन्हा घराण्याच्या अब्रूचा प्रश्न आला. आणि त्याचबरोबर माणुसकीचाही झुनियाला त्याने हाकलून दिले असते तर भागले असते पण काळीज इतके उलटे त्याला करवेना. या वर्षी पीक चांगले आले होते. कणगी उपसून त्याने दोनशे रुपयांची भरपाई केली.
ब्राह्मण माहात्म्य गोवर लखनौला गेला व तेथे गिरणीत नोकरी करू लागला. त्याच्या गावी दिवसभर कष्ट करून त्याला चारसहा आणे मिळत. आता त्याला दोन रुपये रोज मिळू लागला. आणि मुख्य म्हणजे आता तो शहाणा झाला. कामगार संघटना, पुढाऱ्यांची व्याख्याने, संघ, मोर्चे यांतून कामगारांचे हक्क, भांडवलदारांनी चालविलेली पिळणूक, जमीनदारांचे जुलम, अन्याय, सर्व त्याला कळू लागले. तो चलाख झाला, हुषार झाला. व शेदोनशे रुपये घेऊन घरी आला. त्यांच्या चेहऱ्यावरची ऐट, त्याचा पोशाख, त्याची भाषा हे सर्व पाहून गावकरी जरा दबूनच गेले. दातादिन कर्जाचे पैसे मागण्यासाठी होरीकडे आला असताना होरी त्याचे पाय धरू लागला. पण गोवर एकदम पुढे झाला. तो म्हणाला, 'दादा, तुम्ही बाजूला व्हा. मी पाहतो काय ते.' पंडित दातादिनांना त्याने सांगितले, 'तुमचा हिशेब काय तो नीट सांगा, मी आता तुमचे पैसे देतो.' तीस रुपयाचे नऊ वर्षात दोनशे रुपये झाले होते. व ते ऐकून गोवर चवताळून उठताच पंडित दातादिन याला म्हणाला, 'हिशेबाने साठ रुपये होतात. फार तर सत्तर. तितके घ्या व पावती द्या. नाहीतर कोर्टात जा.' पण दातादिन कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने खरोखरच ब्रह्मास्त्र उपसले. तो होरीला म्हणाला, 'होरी, मी ब्राह्मण आहे. मला तुझे सत्तरही नको आणि मी कोर्टातही जात नाही. माझा पैसा बुडवलास तर काय होईल ते ध्यानात घे. ब्राह्मणाचा पैसा अंगावर उठेल.' हे ऐकून गोबरला काही वाटले नाही. त्याचा ब्राह्मणाच्या शापावर विश्वास नव्हता. 'हे सावकार आपला रक्तशोष करतात, त्यांना तो अधिकार नाही. आपण सर्व सारखे आहो. उच्चनीच कोणी नाही.' असे तो सारखा म्हणत असे. तो हे सर्व लखनौला शिकला होता. पण होरीची गोष्ट निराळी होती. ब्राह्मणाचे कर्ज बुडविणे ही कल्पना त्याला सहनच होत नव्हती. मारवाडी, तलाठी, ठाकुर यांची गोष्ट निराळी. पण ब्राह्मण ! त्याचा शाप ! तो चटकन उठला व दातादिनाच्या पाया पडून म्हणाला, 'महाराज रागावू नका. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुमची पैन पै परत फेडीन' नंतर मुलाकडं वळून म्हणाला 'बाबा रे, आपला धर्म आपण सोडू नये. ते ब्राह्मण आहेत. मी जिवंत असेपर्यंत त्यांना दुखविणे मला शक्य नाही.' यावर बापलेकाचे जंगी भांडण झाले आणि गोबर तणतणत निघून गेला.
प्रतीकारशक्ती भारतीय शेतकऱ्याचे हे यथार्थ चित्र आहे. तो सर्वापुढे लाचार आहे. प्रतीकार करणे हे त्याच्या रक्तातच नाही. तो सर्वांचा दास आहे. गुलाम आहे. सावकाराचा तो गुलाम आहे, तलाठ्याचा आहे, ब्राह्मणाचा आहे, जमीनदाराचा तर निश्चितच आहे. आणि याचे कारण ? या सर्वां आधी तो अज्ञानाचा दास आहे. म्हणून रूढींचा आहे आणि म्हणूनच या सर्वांचा आहे. गोवर शहरात जाऊन थोडा शहाणा होताच त्याच्या मनाच्या या बेड्या ढिल्या झाल्या. त्याबरोबर त्यांच्या अंगी काहीशी प्रतीकारशक्ती आली ! त्यामुळे सावकार, तलाठी, बेलीफ. त्याला वचकू लागले.
सनातन धर्म ! होरीच्या तोंडी सारखा 'धर्म' हा शब्द येतो. नशीब, कर्म, पूर्वजन्म, पुढचा जन्म यांवर त्याची श्रद्धा आहे. त्याची ही धर्मभावना हेच ब्राह्मणांचे व इतरांचे बळ आहे. हा धर्म, त्याचे ते शास्त्र ब्राह्मणांनीच सांगितलेले आहे. पण ते स्वतः आणि सर्व श्रीमंत व बलिष्ट लोक त्यातून मुक्त असतात. पंडित दातादिन याचा मुलगा मातादिन याने चांभारिण बाई ठेवली होती. स्वतः दातादिन वाटेल खोटेनाटे करतो. पण ते दोघे रोज गंगेत स्नान करतात, गंध लावतात, जप करतात. त्याना पाप लागणे शक्यच नव्हते. पटेश्वरी तलाठी कुळांना पावत्या देत नाही. आणि सारा पुन्हा पुन्हा वसूल करतो. पण तो दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो. त्याला पाप लागणे शक्य नव्हते. भोला म्हातारा झाला होता. त्याने नवी तरणी बायको केली. तिला पाहून वेलीफ नोखेराम यांनी दोघांनाही आश्रय दिला. आणि मग त्याच्या आधारे भोलाला बायको पायदळी तुडवू लागली. नोखेरामचा हा अनाचार जगजाहीर होता. पण तो ब्राह्मण होता. गंध, भस्म, जानने या कवचातून पाप आत शिरणे शक्यच नव्हते. ! धर्म छळ करणार तो फक्त गरीबांचा. ब्राह्मणांना छळणे त्याला शक्य नव्हते. कारण त्यांनीच तो निर्मिला होता. मातादिन याने चांभारीण ठेविली होती. पण त्याचा बाप दातादिन म्हणे, यात काय बिघडले ? हीन स्त्रियांशी ब्राह्मणांनी लग्ने केल्याची अनेक उदाहरणे महाभारतात आहेत ! मग मातादिन त्या सेलियाशी- चांभार मुलीशी लग्न करील काय ? छे छे! ! धर्म दर युगात पालटत असतो ! त्या काळी लोक जास्त पुण्यवान होते. त्यांना जे पचले ते आता कलियुगात आम्हाला पचणार नाही.
मातादिनने सेलियाशी संबंध ठेवला. तिला दिवस गेले, तेव्हा तिच्या गोताचे चांभार खवळून उठले. पाच पंचवीस लोक जमा करून ते दातादिनकडे आले. म्हणाले, 'सेलियाला तुम्ही ब्राह्मण म्हणून घरात घ्या नाहीतर मातादिनाला आम्ही चांभार करू, आणि खरोखरच त्यांनी मातादिनाला जबरीने धरून त्याच्या तोंडात एक हाडूक खुपसले. आणि ते पळून गेले. दातादिनावर हा भयंकर प्रसंग होता. पण तो ब्राह्मण होता. त्याने काशीला जाऊन पाचशे रुपये खर्चून मुलाला मुक्त करून घेतले. पण पुढे मातादिनाला उपरती झाली. प्रेमचंदांना त्याच्यामार्फत स्वतःची धर्म कल्पना सांगावयाची होती. होरीच्या परसात एका खोपटात सेलिया रहात होती. तेथे मातादिन गेला व तिला म्हणाला, 'हे घर हेच माझे देऊळ आहे, मी येथेच रहाणार आहे. सर्व शहाणे लोक म्हणतील की, हाच खरा धर्म आहे !'
होरीला हे धाडस नव्हते. तो मनाचा उदार होता. गोवरची बायको परजातीची होती. तरी त्याने तिला स्वीकारली, पण त्यासाठी गावकीचा दंड बसला तो त्याने दिला. सेलियाला आपल्या परसात त्याने राहू दिले. यात त्याचे औदार्यच दिसते. पण रूढ धर्माची चौकट मोडण्याचे धैर्य त्याला नव्हते. त्या धर्मावर त्याची श्रद्धा होती व ती खरी होती. यामुळेच त्याच्या जीवनातून कथा निर्माण होऊ शकली. होरीने त्याची गाय मारली होती. त्याच्या घराची त्याने झडती होऊ दिली असती तर ? गोबरच्या आधारावर त्याने दातादिनाचे पैसे नाकारले असते तर ? या पायी त्याची जमीन गेली. तो मजूर झाला. त्याची मुलगी रूपा हिचे त्याने चाळीस वर्षाच्या बिजवराशी लग्न लावून दिले. त्यावेळी त्याला हुंडा देता आला नाही. त्या जावयानेच याला मदत केली. पण होरीच्या मते मुलीचा पैसा घेणे हा अधर्म होता. त्याची रुखरूख त्याला होती. मुलीचा हुंडा दिला पाहिजे. ती धर्माज्ञा होती. या जाणिवेनेच, अशक्त असतानाही, तो कंत्राटदाराच्या कामावर जाऊ लागला. आणि एक दिवस ऊष्माघात होऊन त्यातच त्याला मृत्यू आला ! होरीच्या जीवनात थोडी, अल्प, अगदी क्षुद्र अशी पण काही मूल्ये होती. ती सोडण्यास त्याची तयारी नव्हती. म्हणूनच त्याचा संसार उध्वस्त झाला. पण ज्यांना काही मूल्ये आहेत त्यांच्याच जीवनाची कथा कादंबरी होऊ शकते. प्रेमचंदांचे मानवी जीवनाचे हे तत्वज्ञान आहे.
कादंबरीच्या अखेरीस प्रेमचंदांनी होरीच्या- भारतीय शेतकऱ्याच्या- जीवनाचा सारार्थ सांगितला आहे. तीस वर्षाच्या अखंड श्रमानंतर त्याच्या पदरी काय पडले ! आज होरी पूर्ण पराभूत आहे, पूर्ण नागवलेला आहे, भविष्याची कसलीही आशा त्याच्या चित्तात नाही. ऊन, पाऊस, थंडी यात तो सतत काबाडकष्ट करीत राहिला. पण आता त्याच्या अंगात शक्ती राहिलेली नाही. मुलीचा पैसा घेतला, मुलीला विकली हा सल त्याच्या मनात कायम आहे. त्याचा मुलगा गोबर त्याला म्हणतो, 'दादा, यात पाप ते काय ? तुम्ही काय करणार ? पीक येते ते महिनाभर सुद्धा पुरत नाही. अब्रू, प्रतिष्ठा यांचा गरिबांशी संबंध काय ? त्यातही तुम्ही सचोटी पाळलित, प्रामाणिक राहिलात. हे दैन्य दारिद्र्य त्याचेच फळ आहे. आपण जिवापाड कष्ट करतो. पण आपली मुलेबाळे उपाशी मरतात आणि दुसरे लोक मात्र आपल्या श्रमावर गवर होतात.
जमीनदार शेतकऱ्याच्या जीवनाच्या वर्णनात जमीनदारांच्या जीवनाचे वर्णन अपरिहार्यपणे येते. हा जमीनदार हाच त्याच्या दुःखाचे प्रधान कारण आहे. बेलीफ, तलाठी, पोलीस हे सर्व त्याचे हस्तक असतात. यांच्यातर्फेच तो गरीब शेतकऱ्याला पिळून पैसा उभारीत असतो. एकेका जमीनदाराजवळ हजारो एकर जमीन असते. आणि सारा, खंड, नजराणा, वर्गणी या रूपांनी तो लाखो रुपये मिळवीत असतो. पण इतका पैसा मिळूनही त्याच्या जीवनाचे चित्र कसे आहे ? आपल्याला विस्मय वाटेल पण प्रेमचंदांनी अशा काही कौशल्याने ही दोन चित्रे एकमेकाजवळ रेखाटली आहेत की, त्या दोहोत कमालीचे साम्य दिसावे.
दोन ध्रुवांतील साम्य प्रत्येक शेतकरी कर्जात बुडालेला असतो तसाच प्रत्येक जमीनदार कर्जाखाली वाकलेला असतो. होरीचे जमीनदार रायसाहेब अमरपालसिंग यांना सहा लाख रुपये कर्ज होते. त्यांच्या अनेक जमीमदार मित्रांच्या सर्वच्या सर्व मिळकती सावकाराकडे गहाण पडलेल्या असतात; पण त्यांचे खर्च मात्र कमी झालेले नसतात. कारण प्रतिष्ठा ! होरीला जशी कुळाच्या अब्रूची काळजी तशीच त्यांना मुलीच्या लग्नात लाख रुपये खर्च केलाच पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतील. मुलाला नुसती शिंक आली तरी हकीम, वैद्य, सर्जन सर्व आले पाहिजेत. देवीला अभिषेक झाले पाहिजेत, ज्योतिषांचा ताफा बोलाविला पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील, हे दरिद्री आहेत. घरात हक्काची पत्नी असली तरी अनेक उपस्त्रिया त्यांनी संभाळल्या पाहिजेत. नाहीतर कुलाची प्रतिष्ठा राहणार नाही. लखनौला एक दिल्लीला एक व नैनितालला एक असे तीन प्रचंड वाडे त्यांनी ठेवलेच पाहिजेत. नाहीतर हॉटेलात उतरावे लागेल. यापेक्षा नामुष्की ती काय ?
हे सर्व चालावयाचे तर ब्रिटिश अधिकाऱ्यापुढे लांगूल चालन केले पाहिजेत. त्यांना खाने दिले पाहिजेत. त्यांच्या शिकारीची व्यवस्था केली पाहिजे, आणि प्रत्येक पावलाला त्यांची खुशामत केली पाहिजे. त्यांच्या कपाळावर एक आठी जरी पडली तरी सर्व खलास ! या भीतीने जमीनदारांचे काळीज धडधडत असते. या सर्वांसाठी अफाट पैसा लागतो. तो कर्ज काढून मिळवावा लागतो. आणि त्यासाठी नवीन उदयास आलेला जो वरचा मध्यमवर्ग- कारखान्याचे डायरेक्टर, बँकर- विमा कंपन्यांचे चालक- त्याची सारखी पायधरणी करावी लागते. बँक मॅनेजर खन्ना, एखाद्या कुळाला बोलावे तसे रायसाहेबांना बोलतो. आणि दोन लाख रुपये कर्जाऊ मिळाले नाहीत तर तुमच्या दाराशी डोके फोडून मी जीव देईन, असे त्राग्याने रायसाहेब म्हणतात. कारण ? राजा सूर्यप्रताप निवडणुकीस उभे रहाणार आहेत. त्यांना पाडून मला ही निवडणूक जिंकलीच पाहिजे. नाहीतर विष खाण्याखेरीज अन्य मार्ग नाही ! कारण हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ! सर्व जिंदगी विकावी लागली तरी चालेल पण सूर्य प्रतापाचा पराभव केलाच पाहिजे. नाहीतर जग काय म्हणेल ?
आणि निवडणुकीसाठी, कर्ज फेडीसाठी, मुलीच्या लग्नासाठी, गव्हर्नराच्या फंडाला दहा हजार रुपये वर्गणी देण्यासाठी पैसा कोठून आणावयाचा ? होरी सारख्या कुळांनी पिळून ! रायसाहेब हे त्यांतल्या त्यात जरा कनवाळू, उदार जमीनदार. पण त्यांची रीत काय आहे ? वेठ बिगारीने ते लोकांना सक्तीने कामाला लावतात. चपराशी सांगत आला की, वेठीने धरलेली कुळे भाकरी मागत आहेत. रायसाहेब संतापाने लाल झाले. 'त्या बदमाषांना धडा शिकविलाच पाहिजे. मागे कधीच या मजुरांना भाकरी दिलेली नव्हती. मग आता ती मागण्याचा त्यांना काय अधिकार आहे ! एक आणा रोज देतो तो देऊ. वर दमडी मिळणार नाही. काम करीत नाहीत म्हणजे काय? त्यांचा बाप काम करील?'
राय साहेब आपल्या वडिलांची गोष्ट अभिमानाने सांगत. वडील फार उदार होते. दुष्काळात सारा, खंड ते खुषीने माफ करीत. कुळांना धान्यही वाटीत. पण कुळे त्यांना देव मानून त्यांची दया भाकीत तोपर्यंत. पण जर का त्यांनी हक्काने काही मागितले तर त्यांच्यासारखा वाईट कोणी नाही !
जुने जग दया, उपकार, करुणा यांचे होते. नवे जग हक्क, मागणी, अधिकार यांचे आहे. यांचे दर्शन घडवून तत्कालीन जीवनावर प्रेमचंदांनी उत्तम भाष्य केले आहे.
रायसाहेब अमरपाल सिंग यांनी एक मोठा खटला जिंकला. त्यामुळे त्यांना एक अवाढव्य, जिंदगी मिळाली. ते निवडून आले इतकेच नव्हे तर होम मिनिस्टर झाले. लठ्ठ पगार! त्यांचे आजपर्यंतचे वैरी राजा सूर्य प्रताप यांनी आपली मुलगी त्यांच्या मुलाला- रूद्रपाला देऊ केली. यापेक्षा जगात भाग्य तरी काय असते ? काही वर्षापूर्वी त्याच्या अंगात राष्ट्र भावनेचे भूत संचरले होते. त्यांनी तुरुंगवास भोगला होता. किती मूर्खपणा होता तो ! त्याच मार्गाने हे वैभव आज मिळाले असते काय ? वेळीच शहाणपणा सुचला इंग्रजांना शरण गेलो ते किती चांगले झाले ! केवढे वैभव केवढी प्रतिष्ठा केवढा मान मिळाला !
पण या सर्वाचे फलित काय ! त्यांच्या कुळांना काही यातून लाभ झाला काय ?
मुलगा रुद्रपाल याने राज सूर्यपाल यांच्या मुलीशी लग्न करण्याचे नाकारले. रायसिंगांनी सूर्यपालांना शब्द दिला होता. पण मुलगा ऐकेना. डॉ. मालतीबाई यांची बहीण सरोज हिच्याशी आपण आधीच लग्न केल्याचे त्याने सांगितले. केवढी अप्रतिष्ठा केवढी बेअब्रू ! रुद्रपालाने आता बापावर फिर्याद करून निम्मी इस्टेट कोर्टाकडून मिळविली व सरोजला घेऊन तो इंग्लंडला निघून गेला दुसरा धक्का आता राजा सूर्य पालांना तोंड दाखवावे कसे ! होम मिनिस्टर झाल्यामुळे मसूरी, नैनिताल, सिमला येथे बंगले बांधावे लागले. त्यात फार पैसा गेला. सूर्यपालांच्या मुलीबरोबर २|४ लाख हुंडा सहज येईल या हिशेबाने तितका खर्च आधीच केला होता. पण मुलाने तोंडघशी पाडले. आता काय करावे ? पैसा कोठून आणावा? मुलगी मीनाक्षी जावई दिग्विजय सिंग ! त्याला अफू, गांजा, दारु सर्व व्यसने होती. घरात वाटेल त्या बाया तो आणून ठेवीत असे. मीनाक्षीला आता ते असह्य झाले. जावई पिस्तुल खिशात ठेवून फिरत असे. मुलीने पोलिसांचे संरक्षण मागितले. हा खर्च कसा कोठून करावयाचा, पैसा कोठून आणावयाचा ? कर्ज, कर्ज ! होरीपेक्षाही रायसाहेब कर्जात बुडाले. पण होरीजवळ जो उपाय नव्हता तो रायसाहेबांच्या जवळ होता.
कुळांना पिळणे ! ती कायधेनू असताना काळजी कशाची? निवडणुकी साठी कुळांवर माणशी दोन रूपये, मुलीच्या लग्नासाठी चार रुपये; सरकारी अधिकारी आले, गव्हर्नर आले; त्यांची सरबराई तर केलीच पाहिजे ! कुळावर माणशी पाच रुपये कर. नित्याचे नजराणे, भेटी, हे निराळेच.
शेतकरी व जमीनदार यांची चित्रे ही अशी आहेत. गरिबी, दारिद्र्य, अन्नान्नदशा यांच्या इतकीच श्रीमंती, वैभव, समृद्धी ही जीवनाला मारक आहे. शेतकरी कष्ट करून पिचून जातो. जमीनदार निरुद्योगाने सडून जातो.!