Jump to content

साहित्यातील जीवनभाष्य/संस्कृति दर्शन

विकिस्रोत कडून




१ संस्कृति दर्शन



 विषयप्रवेश रसपरिपोष, स्वभावलेखन, मनोविश्लेषण, वास्तववाद, ध्येयवाद ध्वनी, अलंकार, ही साहित्याची भूषणे मानली जातात. साहित्याला या गुणांनीच थोरवी प्राप्त होते. जीवनभाष्य हे साहित्याचे असेच एक महनीय भूषण आहे, हे अलीकडे सर्वमान्य झाले आहे. मॅथ्यू अर्नोल्ड या इंग्लिश साहित्यशास्त्रज्ञाने तर 'साहित्य म्हणजे जीवनभाष्य' अशी साहित्याची व्याख्याच केली आहे. इतर पाश्चात्य शास्त्रज्ञ व्याख्या म्हणून तिला मान्यता देत नसले तरी जीवनभाष्यामुळे साहित्याला महनीयता प्राप्त होते याविषयी त्यांच्यात दुमत नाही. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी साहित्याच्या गुणांत जीवनभाष्याचा समावेश केला नसला तरी, साहित्याचे ते एक मोठे कार्य आहे, हे त्यांना मान्य होते. 'अज्ञान-अंधकारात लोक चाचपडत असतात. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानांजन घालून त्यांना दृष्टी देणे हे महाभारताचे उद्दिष्ट आहे' असे व्यासांनी म्हटले आहे. याचा भावार्थ हाच आहे. लोकांना जीवनाची, संसाराची उत्तम कल्पना आणून देणे म्हणजेच दृष्टी देणे होय. आणि प्रत्यक्ष महाभारत पाहता त्यात जीवनभाष्य ठायी ठायी दृष्टीस पडते. यावरूनही व्यासांचा भावार्थ हाच असावा असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
 साहित्याचा असा हा जो अनन्यसाधारण गुण, हे जे त्याचे महनीय भूषण त्याचा या प्रबंधात विचार करावयाचा आहे.
 त्यासाठी प्रथम 'जीवनभाष्य' याचा नेमका अर्थ काय, त्याची विवक्षा काय, हे पाहणे अवश्य आहे. जगामध्ये भिन्न देशांत, भिन्न समाजात, भिन्न काळी नैकविध संस्कृती उदयास येतात, नांदतात व लय पावतात. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजात समाजरचनेची काही तत्त्वे असतात, काही उद्दिष्टे असतात व त्यांच्या सिध्दीसाठी काही रूढी पडलेल्या असतात. समाजाप्रमाणेच व्यक्तीलाही कार्योद्युक्त करणाऱ्या काही प्रेरणा असतात. तिचे वागणे त्या अन्वयेच होत असते. या सर्वांचे कलात्मक दर्शन व मूल्यमापन म्हणजेच साहित्यातील जीवनभाष्य होय.
 विवक्षा रामायण व महाभारत हे ग्रंथ पहाता त्यांतील समाजांच्या संस्कृती काही अंशी भिन्न होत्या, त्यांतील नेत्यांची ध्येये, त्यांची मूल्ये, त्यांनी स्वीकारलेले तत्त्वज्ञान बरेचसे भिन्न होते, असे दिसून येते. महाकवी वाल्मीकी व वेदव्यास यांनी आपापल्या काळच्या समाजांचे या दृष्टीने उत्तम दर्शन घडविले आहे. रोम येथे जीझस खाइस्टच्या पूर्वी जी संस्कृती नांदत होती तिचा ख्रिस्ती धर्माच्या उद्यानंतर हळूहळू लोप झाला आणि खिस्ती संस्कृती युरोपात विकसित होऊ लागली. युरोपातही पुढे जर्मनी, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, इटली यांना पृथगात्मता येऊन त्यांच्या संस्कृतीला भिन्न रूपे प्राप्त होऊ लागली. सतराव्या अठराव्या शतकात या देशांतील जीवनमूल्यांत महदंतर दिसून येत होते, हे इतिहास सांगतच आहे. अर्वाचीन काळात पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृतींचा संबंध आल्यापासून त्यांच्यांत किती भेद आहे हे सर्व जगाला आज कळून आले आहे. पौर्वात्यांची संस्कृती पाश्चात्यांहून वेगळी आहे असे म्हणताना पूर्वेकडच्या सर्व देशांची संस्कृती एक आहे, सम आहे असा भाव मनात असतो. आणि तुलनात्मक दृष्टीने पाहताना त्याला अर्थही आहे. पण पौर्वात्य देशांचा स्वतंत्रपणे विचार करू लागताच चीन, जपान, ब्रह्मदेश, भारत, आरबराष्ट्रे इ. देशांच्या संस्कृती परस्पराहून अतिशय भिन्न आहेत असे दिसून येईल. इतकेच नव्हे तर केवळ भारताचा विचार आपण केला तर भारतातील जे शीख, रजपूत, मराठे इ. समाज त्यांचीही जीवनमूल्ये, त्यांची तत्त्वज्ञाने हीही परस्पराहून अनेक दृष्टीनी भिन्न आहेत, असे आढळेल. संस्कृती संस्कृतींमधला हा जो भेद त्यांचे दर्शन घडवून त्यांविषयी कलात्मक विवेचन करून त्या भेदांची काही मीमांसा करणे हे साहित्यिकांचे, नाटककार, कादंबरीकार, कवी यांचे कार्य आहे. जीवनभाष्य ते हेच होय.
 प्रत्येक कवी, कादंबरीकार किंवा नाटककार एवढा व्यापक विषय घेईल असे नाही. तरी जो काही मर्यादित असा त्याचा विषय असेल, समाजाचे जे मर्यादित दर्शन त्याला घडवावयाचे असेल त्यात, सर्व सामाजिक संस्कृतीचे वर्णन-विवेचन जरी आले नाही तरी, त्या समाजाच्या हालचालीमागले सामाजिक तत्वज्ञान, त्यातील रूढी यांचे काही प्रमाणात विवरण केल्यावाचून त्या समाजाचे सम्यक दर्शन झाले, असे होणार नाही. धर्म, राष्ट्र, वंश, कुल यांचे कमी अधिक तीव्र अभिमान यांनी पुष्कळ वेळा समाज कार्योद्युक्त होत असतो. शद्वप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, समता, विषमता या तत्त्वांनी त्याला प्रेरणा मिळून त्याचे भवितव्य ठरत असते; लोकसत्ता, दण्डसत्ता, व्यक्तिवाद, समाजवाद, जातिभेद, अस्पृश्यता, गुलामगिरी अशा काही रूढी त्यात दृढमूल झालेल्या असतात व त्या समाजजीवनाचे नियमन करीत असतात. आपल्या ललित कृतीतील कथेच्या ओघात या सामाजिक तत्त्वांची व रुढींची दखल घेणे व त्यांचा आणि कथेतील घडामोडींचा अन्वय लावून दाखविणे हे साहित्यिकाचे एक प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. हा अन्वय हेच जीवनभाष्य होय.
 ललित लेखक दर वेळी सर्वागीण किंवा मर्यादित असे समाजदर्शन घडविण्याचे उद्दिष्ट ठेवतोच असे नाही. आणि तसे उद्दिष्ट त्याच्यापुढे असले तरी ते दर्शन तो व्यक्तीच्या स्वभावरेखांच्या द्वारांच घडवीत असतो. ते घडविताना त्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रेरणा, त्यांची जीवनमूल्ये व त्यांचे वर्तन यांची मीमांसा साहित्यिकाला करावीच लागते. ध्येयवाद, उपयुक्ततावाद, स्त्रीप्रेम, अपत्यप्रेम, महत्त्वाकांक्षा, न्यायबुध्दी, धनमद, सत्तामद, प्रवृत्ती, निवृती, विवेक, अविवेक, लोभ, त्याग, स्वार्थ, परार्थ, इ. अनंत मूल्ये व्यक्तीला प्रेरित करीत असतात. ललित लेखक व्यक्तिदर्शन घडवितो त्यावेळी या प्रेरणांची गुंतागुंत तो उकलून दाखवितो. तसे केल्यानेच व्यक्तीचे खरे दर्शन घडते व तिच्या जीवनाचे रहस्य उलगडते.
 वैयक्तिक दृष्टिकोण ललित लेखक हे जे जीवनभाष्य करतो ते केवळ स्वतःच्या दृष्टिकोणातून करीत असतो. शास्त्रातील जीवनभाष्याप्रमाणे सर्वागीण, साधार, सप्रमाण भाष्य तो करीत नाही. ते त्याच्या कक्षेत येतच नाही. आणि वैयक्तिक दृष्टिकोणातून केलेल्या भाष्यामुळेच साहित्याला साहित्यत्व येते, गोडी येते. आत्माविष्कार हा एक साहित्याचा फार मोठा गुण अलिकडे मानण्यात येतो. तो आत्माविष्कार या जीवनभाष्यातून होत असतो. कवीच्या स्वतःच्या जीवनातील प्रसंगांचा, घडामोडींचा, त्याच्या आप्तेष्टांशी असलेल्या संबंधांचा आविष्कार म्हणजे आत्माविष्कार, असा एक अत्यंत भ्रांत व असमंजस अर्थ अनेक लोक करतात. पण तो अगदी त्याज्य होय. वर जी समाजजीवनातील व व्यक्तिजीवनातील समता, विषमता, प्रवृत्ती, निवृत्ती, ध्येयवाद, उपयुक्ततावाद, स्त्रीप्रेम, अपत्यप्रेम, जातिभेद, अस्पृश्यता, इ. तत्त्वे सांगितली, रुढी सांगितल्या त्यांविषयी लेखकाची काही मते निश्चित झालेली असतात. त्याचे काही विचार असतात. त्याच्या भावना, त्याची बुद्धि, त्याच्या अंतःप्रेरणा या सर्वांचे त्याच्यावर परिणाम झालेले असतात. या सर्वांचा एक परिपाक होऊन कवीचा दृष्टिकोण तयार झालेला असतो. त्याचे जीवनविषयक तत्वज्ञान बनलेले असते. आणि त्याच्या साहित्यात त्याचा पावलोपावली आविष्कार होतो. हा आविष्कार करताना कळत वा नकळत, बहुधा नकळतच, तो जीवनभाष्य किंवा संसृतिटीका करीत असतो. साहित्यातील संसृतिटीका अशी वैयक्तिक स्वरुपाची असते. आणि ती तशीच असणे युक्त आहे.
 संसाराचा अर्थ जॉन ड्यूई हा जसा मोठा तत्त्ववेत्ता व शिक्षण शास्त्रज्ञ आहे तसाच तो साहित्यशास्त्रज्ञही आहे. कलासमीक्षकही आहे. आपल्या 'आर्ट ॲज् एक्सपीरियन्स' या ग्रंथात त्याने आत्माविष्कार म्हणजे जीवनभाष्य होय हा विचार स्पष्ट करून मांडला आहे. 'दि ॲक्ट ऑफ एक्सप्रेशन' या प्रकरणात तो म्हणतो की, 'मनातील विकार, भावना यांचे केवळ प्रकटीकरण म्हणजे कलेतील आत्माविष्कार नव्हे. मनातील भावना, अनुभूती, विकार यांचा चिंतनपूर्वक केलेला आविष्कार म्हणजे आत्माविष्कार होय. भावदर्शन हे आत्माविष्काराला अवश्य असते हे खरे. पण मनात उसळलेले भाव सुरचित, सुश्लिष्ट झाले, पूर्वीच्या अनुभूतींशी, मूल्यांशी त्यांचा समन्वय होऊन मग ते आविष्कृत झाले तरच तो आत्माविष्कार होतो. केवळ अनुभूती, केवळ मनातल्या भावभावना, विकार विचार हा कलेचा कच्चा माल होय. ती चित्र तयार होण्यापूर्वीची माती होय. ते चित्र नव्हे. ते केवळ ध्वनी होत, आलाप नव्हेत, संगीत नव्हे. कलाकाराच्या अंतरात्म्याच्या मुशीत हा कच्चा माल जाऊन संस्कारित होऊन, सुश्लिष्ट होऊन मग प्रगट झाला, त्याचे निर्गुण, निराकार रूप जाऊन तो सगुण साकार झाला म्हणजे तो कलाकाराचा आत्माविष्कार ठरतो. हा क्षणिक स्फूर्तीने घडत नाही. ते कालावधीचे काम आहे. प्रत्यक्ष सर्वसमर्थ परमेश्वराला सुद्धा निराकार, रुपहीन, अशा मूळ प्रकृतीतून विश्व निर्माण करण्यास सात दिवस लागले ! कलाकाराच्या मनात अनेक अनुभूती, अनेक संस्कार, साठवणाप्रमाणे भरलेले असतात. त्यांची संगती लावून त्यांचा अर्थ लावणे व तो प्रगट करणे हे त्याचे कार्य होय. विज्ञानही संसाराचा अर्थ लावीत असते. पण विज्ञान त्या अर्थाचे केवळ निवेदन करते. कला त्याचा आविष्कार करते.'
 आत्माविष्कार काव्याचा विषय आणि आशय यांत जॉन ट्यूई भेद करतो. 'स्कायलार्क', 'नाइटिंगेल' हे शेले, कीटस् यांच्या काव्याचे विषय आहेत. पण दोघांचे विषय तेच असले तरी त्यांवर त्यांनी रचलेल्या कवनांचे आशय अगदी भिन्न आहेत. त्या आशयांतून त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन, त्यांनी संसाराचा, जीवनाचा बसविलेला अर्थ व्यक्त होतो. किंबहुना या त्यांच्या मनांतील अर्थामुळेच तो तो विषय पाहाताच त्यांच्या मनात आशय निश्चित झाला आणि मग त्यांनी आपली कलाकृती निर्माण केली. तो अर्थ त्यांनी मागून बसविला, असे नाही. केवळ विषय पाहून नाइटिंगेल व स्कायलार्क यांना पाहून कवी काव्य लिहीत नाही. तसे केल्यास त्याची कलाकृती कृत्रिम होईल. कलाकाराच्या अंतरात अनंत भाववृत्ती, अनेक अनुभूती यांचे रसायन नेहमीच असते. सामान्य माणसापेक्षा हे कवीचे, कलाकाराच्या मनातले, रसायन अधिक संपन्न असते. हे रसायन म्हणजेच त्याचे भांडवल होय. समोर विषय दिसताच हे रसायन हेलावते आणि मग आपली जीवनमूल्ये, आपल्या अनुभूतीचे सार कवी त्या विषयाशी एकजीव करून त्या विषयाला एक नवाच अर्थ व महत्त्व प्राप्त करून देतो. आणि अशा रीतीने प्रत्येक कलाकृती अत्यंत अर्थगर्भ झालेली आपल्याला दिसते. जॉन ड्यूईच्या या विवेचनावरून आत्माविष्कार म्हणजे कलाकाराने, कवीने आपल्या दृष्टीकोनातून केलेले जीवनभाष्य होय, हे स्पष्ट होईल.
 एकसूत्रता कशामुळे? एच्.डब्ल्यू. गॅरॉड हा ऑक्सफर्ड विद्यापीठातील काव्य या विषयाचा प्राध्यापक. 'दि प्रोफेशन ऑफ पोएट्री' नामक आपल्या ग्रंथात त्याने ॲरिस्टॉटलच्या 'काव्य म्हणजे जीवनाची प्रतिकृती- प्रतिबिंध' या व्याख्येची चर्चा करून 'इमिटेशन' या त्यांच्या शब्दाची विवक्षा 'जीवनभाष्य' अशी आहे, असे प्रतिपादिले आहे. तो म्हणतो, 'साहित्य हे केवळ जीवनाचे प्रतिबिंब असेल तर त्याची किंमत शून्य. पण ते तसे प्रतिबिंब नाही. जीवनातील घटना, प्रसंग हे असंगत, अबद्ध, सूत्रहीन असे असतात. त्यांतील घटना विशिष्ट हेतूने निवडून, असंबद्ध प्रसंग टाकून देऊन, निवडलेल्या घटनांची सुसंबद्ध आकृती निर्माण करणे, हे काव्यांचे कार्य होय. आणि गॅरॉडच्या मते, व्यक्ती, घटना, प्रसंग यांतील परस्पर संबंध उलगडून दाखविणे याचेच नाव जीवनभाष्य. याच संदर्भात गॅरॉड पुढे म्हणतो की, कवी हा जगाच्या मूलकारणांचा द्रष्टा होय. विश्व हे स्वतःचे ज्ञान नसल्यामुळे बावरलेले, गोंधळलेले असते. निसर्ग या संसाराचा अर्थ सांगत नाही. मानवाला तो जाणण्याची उत्कट इच्छा असते. तेव्हा त्यावर भाष्य करून तो अर्थ विशद करून सांगणे हे कार्य कवी करतो.' (पृ. ८-१०) ऑरिस्टॉटलाच्या काव्यातील एकतेचा, युनिटीचा, अर्थही गॅरॉडने जीवनभाष्य असाच केला आहे. 'काव्यात पूर्णाचे, सामग्र्याचे, साकल्याचे दर्शन घडवावयाचे असते. पूर्णाचा एक भाग, अवयवीचा एक अवयव, हा काव्यात वर्णिला असला तरी त्याचा पूर्णाशी संबंध दाखविणे अपरिहार्य असते. निसर्गात असे संबंध नसतात. काव्य हे यामुळेच निसर्गाहून भिन्न आहे. ते अवयव व अवयवी, अंश व पूर्ण यांचे संबंध स्पष्ट करते. आता हे संबंध कसे जुळविलेले असतात, कोणत्या धाग्याने जोडलेले असतात, असा प्रश्न येतो. कवीची विचारसरणी, त्याचा दृष्टिकोन हा तो धागा होय. लोकांना एकतेची अपेक्षा असते याचा अर्थ असा की त्यांना अर्थ कळण्याची अपेक्षा असते. आणि काव्याचे अंतिम उद्दिष्ट हेच असते. संसार हा काव्याचा विषय नव्हे; संसाराचा अर्थ हा, तत्त्वज्ञानाप्रमाणेच, काव्याचा विषय असतो. नाटकामध्ये व्यक्ती आणि त्यांच्या कृती व विकारभावना हा विषय नसून त्यांचा अर्थ, त्यांची संगती हा विषय असतो. हे जग, हा प्रपंच, हा संसार, त्यातील मानव, त्यातील निसर्ग हे सर्व जसे असते तसेच कवीने आपल्या पुढे उभे केले तर त्यात कोणालाच रस वाटणार नाही. त्याने त्याची अशी रचना केली पाहिजे की, ते सर्व सार्थ व्हावे. या विश्वाच्या पसाऱ्यात अमकी वस्तू, अमकी व्यक्ती, तिची अमकी भावना कोठे कशी बसते ते दाखविले तरच काव्य तयार होते. एरवी, ती मूळ वस्तू झाली; विश्वाची मूळ प्रकृती झाली. ते काव्य नव्हे.' (पृ. १७-१९,२७)
 साहित्याची व्याख्या मॅथ्यू अर्नोल्ड हा 'साहित्य म्हणजे जीवनाचे भाष्य' अशी व्याख्या करतो, हे प्रारंभी सांगितलेच आहे. या साहित्यातील जीवनभाष्याचे त्याला इतके महत्व वाटते की, यापुढे हळू हळू विज्ञान व धर्म यांची जागा काव्य घेईल, असे तो म्हणतो. (एसेज इन क्रिटिसिझम, सेकंड सेरीज, आवृत्ती १९१३, पृ. ३) जीवनभाष्य ही काव्याच्या अभिजाततेची तो कसोटी मानतो. आणि त्या दृष्टीने चाँसर व बर्नस हे मोठ्या दर्जाचे कवी असले तरी अभिजात या पदवीला येत नाहीत, असे त्याला वाटते. वर सांगितलेच आहे की सामान्यतः कवीचा जीवनविषयक दृष्टिकोन काव्यात व्यक्त होत असतो. आणि त्यात कळत नकळत जीवनभाष्य येतेच. पण केवळ असे भाष्य आहे यामुळे काव्य अभिजात होत नाही. ते भाष्य अतिशय गहन गंभीर, प्रतीतिकारक, सार्थ व अमोघ असे असले पाहिजे आणि काव्य सौंदर्याची हानी न करता ते केलेले असले पाहिजे. काव्यातील सत्य व सौंदर्य यांचे काही निश्चित नियम आहेत. ते संभाळून जो कवी जीवनाच्या अथांग सागरात खोलवर जाऊन तेथली रत्नमाणके वर काढील त्यालाच अभिजात ही पदवी मिळेल. विदग्ध साहित्याचा अर्नोल्डच्या मते हा निकष आहे. या पुस्तकातील पहिल्या निबंधात त्याने केवळ काव्याचा विचार केला आहे. पण पुढे बायरनवरील निबंधात 'साहित्य गद्य उम्सो पद्म असो, जीवनभाष्य- क्रिटिसिझम ऑफ लाईफ- हेच त्याचे अंतिम उदिष्ट व साध्य असते,' असा त्याने खुलासा केला आहे. (पृ. १८६)
 मॅथ्यू अर्नोल्डच्या या पुस्तकात एक मोठी उणीव आहे. जीवनभाष्य हा श्रेष्ठ साहित्याचा निकष होय असे पुनः पुन्हा सांगूनही या आपल्या सिद्धांताचे जितके साकल्याने विवेचन करणे अवश्य होते तितके त्याने केलेले नाही. आरंभीच्या निबंधात काव्याची तात्त्विक चर्चा करून पुढे वर्डसवर्थ, बायरन, शेले, टॉलस्टॉय अशा थोर साहित्यिकांच्या साहित्याचे त्याने विवेचन केले आहे. पण आपल्या जीवनभाष्याच्या सिद्धांताअन्वये त्या साहित्याचे परीक्षण हा करील, अशी जी प्रारंभीच्या निबंधावरून अपेक्षा होते तिचा अगदी भंग होतो. हा सिद्धांत तो विसरला असावा, असे वाटण्याइतका अशा विवेचनाचा अभाव त्यात जाणवतो. 'हा संसार म्हणजे एक स्वप्न आहे, आणि मानवी जीवनाचा अंत चिरनिद्रेत होतो.' हे शेक्सपीयरचे सुप्रसिद्ध वचन आणि 'मनुष्याने रागद्वेषातीत असावे, आणि दीर्घ की अल्प आयुष्य याचा विचार परमेश्वरावर सोपवून मिळालेले जीवन उत्तम व्यतीत करावे.' हे मिल्टनचे वचन अशी दोन वचने त्याने उहाहरणे म्हणून दिली आहेत. पण यांतील तत्त्वांना साहित्यात या महाकवींनी मूर्त रूप कसे दिले आहे, हे मुळीच दाखविले नाही. कवीने. मानव, निसर्ग व मानवी जीवन या संबंधीच्या आपल्या कल्पना, आपली तत्त्वे, काव्यात जीवनाला लावून दाखविली पाहिजेत, असे तो म्हणतो. होमरने तसे केले यात त्याच्या थोरवीचे रहस्य आहे, असे तो सांगतो. मानवाने जीवनाची वाटचाल कशी करावी, हे दाखविणे, अंधारात चाचपडणाऱ्यांना मार्ग दाखविणे, हे साहित्याचे कार्य आहे, त्याच्या विदग्धतेचा निकष आहे, असे वारंवार तो प्रतिपादितो. पण थोर साहित्यिकांनी हे कसे केले आहे, हे विपुल उदाहरणांच्या साह्याने विशद करावे हे त्याला सुचत नाही, याचे आश्चर्य वाटते.
 जॉन ड्यूई याने आपल्या 'आर्ट ॲज एक्सपीरियन्स' या वर निर्देशिलेल्या ग्रंथात अर्नोल्डवर हाच आक्षेप घेतला आहे. काव्य हे जीवनभाष्य कोणत्या पद्धतीने करते, हे अर्नोल्ड सांगत नाही, असे तो म्हणतो. काव्याने प्रत्यक्ष बोध न करता जीवन मूर्त करून तो केला पाहिजे असे सर्वच साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात. अर्नोल्डचे असेच मत असावे असे वाटते. 'काव्य सौंदर्याची हानी न करता कवीने भाष्य केले पाहिजे,' असे तो दर ठिकाणी आवर्जून सांगतो. पण आपले म्हणणे उदाहरणांनी स्पष्ट करीत नाही. आपला सिद्धान्त त्या महाकवींच्या काव्याला लावून दाखवीत नाही. त्यामुळे त्याच्या त्या सिद्धान्ताविषयी गैरसमज झाला आहे असे वाटते.
 येथे जाता जाता एक खुलासा करून ठेवणे अवश्य आहे. अर्नोल्डच्या मनात 'क्रिटिसिझम ऑफ लाइफ' म्हणजे नेमके काय आहे, हे स्पष्ट नाही, असे अनेकांनी म्हटले आहे. आणि आपापल्या परी त्याच्या त्या वाक्याचा भिन्न भिन्न अर्थ लावला आहे. ॲरिस्टॉटलच्या इमिटेशन, युनिटी, कॅथार्सिस या शब्दांबद्दल असाच दीर्घवाद आहे. क्रोचे, जॉन ड्यूई, यांच्या विचाराविषयी असेच वादंग माजलेले आढळते. आणि इतर क्षेत्रांतल्या प्रमाणे 'नैको ऋषिः यस्य वचः प्रमाणम् ।' अशीच येथेही स्थिती आहे. हे ध्यानी घेऊन मी अर्नोल्ड, गॅरॉड, ड्यूई यांच्या मतांसंबंधी काही इंग्रजीच्या पंडितांशी चर्चा केली आणि त्यांचे अर्थ मनाशी निश्चित केले. पण तरीही हे वादंग संपणार नाही; म्हणून 'जीवनभाष्य' याची माझी विवक्षा काय हे प्रारंभी व पुढेही ठायी ठायी स्पष्ट केले आहे. ती विवक्षा मनात धरूनच वाचकांनी हा प्रबंध वाचावा. मी जे वरील साहित्यशास्त्रज्ञांचे आधार दिले आहेत ते यथायोग्य आहेत की नाहीत हा प्रश्न गौण मानावा. कारण त्यांच्या वचनांच्या अर्थाविषयी एकमत कधी होऊ शकेल, असे वाटत नाही.
 इतक्या प्रस्तावनेनंतर आता विषयाच्या विवेचनाला प्रत्यक्ष प्रारंभ करावयाचा. अर्नोल्डने किंवा इतर पंडितांनी जे केले नाही तेच या प्रबंधात करावयाचे आहे. तोच त्याचा विषय आहे. विवेचनाच्या सोयीसाठी, महाभारत व रामायण यांतील भिन्न संस्कृती, रोमन व ख्रिश्चन संस्कृती, इंग्लिश व फ्रेंच संस्कृती, राजपुती व मराठी संस्कृती या भिन्न संस्कृतीचे दर्शन हा एक भाग; भांडवलदार, जमीनदार, शेतकरी इ. भिन्न वर्गांची संस्कृती हा दुसरा भाग; दलितजीवन, स्त्रीजीवन, मूल्यसंघर्ष, अंतरंग दर्शन हे आणखी भाग असे विषयाचे विभाग केले आहेत. त्यांतील एकेक विभाग घेऊन पाश्चात्य पौर्वात्य देशांतील अभिजात साहित्याच्या आधारे जीवनभाष्य हा साहित्याचा महनीय गुण कसा आहे, काव्याचा तो मौलीभूत अलंकार का मानतात. ते आता दाखवावयाचे आहे.
भिन्न संस्कृतींचे दर्शन

 १ रामायण व महाभारत भिन्न संस्कृतींवर भाष्य करून कवी त्यांतील भेद स्पष्ट करून दाखवितात, असे वर म्हटले आहे. साहित्यातील उदाहरणे घेऊन आता ते विशद करू. रामायण व महाभारत या दोन महाकाव्यात ज्या घटनांचे वर्णन आहे त्यांच्या कालात बरेच अंतर असले पाहिजे. समाजात शासनसंस्थेचा हळूहळू विकास होत जातो. त्यातल्या विकासाच्या एका पायरीवर रामायणकालीन समाज होता व त्याच्या बऱ्याच वरच्या पायरीवर महाभारतकालीन समाज होता, असे दिसते. समाजात प्रारंभीच्या अवस्थेत रक्ताच्या नात्याने निगडित असलेले एक कुटुंब, एक कुल हा प्राथमिक घटक असतो, काही कालाने अशी अनेक कुले मिळून एक जमात तयार होते आणि मग अशा अनेक जमाती मिळून मोठा समाज किंवा राष्ट्र सिद्ध होते. या प्रत्येक अवस्थेत त्याला कोणीतरी शास्ता हा अवश्यच असतो, आणि त्या शास्त्याचा शद्व निर्णायक मानला पाहिजे, असा तेथे दण्डक असतो. संघटनेच्या शाश्वतीच्या दृष्टीने असा कोणाचा तरी निर्णय अंतिम मानणे हे अवश्यच असते. आणि मग तशा तशा निष्ठा समाजात जोपासल्या जातात व त्यांनाच धर्म असे म्हणतात. राजा हा प्रमादातीत आहे, त्याचा शद्व हा चूक असूच शकत नाही, असा इंग्लंडमध्ये दण्डक आहे. याचे हेच मर्म आहे. राजाच्या जागी अन्य देशांत अध्यक्ष असेल, किंवा सर्वोच्य न्यायालय असेल. पण व्यवहार दृष्टीने व समाजसंघटनेच्या शाश्वतीच्या दृष्टीने वाद करतांना कोठे तरी थांबणे अपरिहार्यच असते.
 श्रीरामचंद्रांच्या काळी कुल हाच अजून प्रधान घटक होता. समाजाला जमातीचे रूप प्राप्त होत होते, पण अजून त्याचे कुल- प्राधान्य पूर्णपणे गेले नव्हते. त्यामुळे कुलाचा शास्ता जो पिता त्याचा शब्द अंतिम मानणे हा त्यावेळी धर्म होता. रामचंद्रांचे सर्व वर्तन या एका सूत्राने बद्ध होते, असे रामायणावरून म्हणजे वाल्मीकि-रामायणावरून दिसते. दशरथाने त्यांना वनवासात जाण्याची आज्ञा केली व त्यांनी ती शिरसावंद्य मानिली. त्यावेळी लक्ष्मणाने त्यांना तीव्र विरोध केला. तो म्हणाला, 'रामचंद्रा, आपले पिताजी एका स्त्रीच्या मोहाने भुलले आहेत. त्यांना म्हातारचळ लागला आहे. तुला वनवासात पाठवावे, असे कोणतेच पातक तुझ्या हातून घडलेले मला दिसत नाही. तेव्हा त्या बाईलबुध्दी, मूढ पित्याची आज्ञा तू मानू नकोस. कैकेयीच्या चिथावणीने तो आपला शत्रू झाला आहे. तेव्हा अशा पित्याला कैद करण्यास किंवा त्याचा वध करण्यासही काही हरकत नाही. विवेकभ्रष्ट झालेल्या व कार्याकार्य विवेक नसलेल्या गुरूलासुद्धा शासन करणे अवश्य असते. तेव्हा तूं त्याची आज्ञा न मानता प्रथम राज्य ताब्यांत घे. मी तुझ्यामागे काळासारखा उभा राहीन. मग कोण आडवा येतो ते पाहूं,' लक्ष्मणाच्या या विचाराला कौसल्येनेही अप्रत्यक्षपणे संमती दिली. ती म्हणाली, 'पुत्रा, लक्ष्मणाचे भाषण तू ऐकलेच आहेस. तुला उचित वाटलें तर त्याप्रमाणे तू कर.' यावर रामचंद्रांनी उत्तर केले, की, 'माते, पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास मी असमर्थ आहे. पूर्वीच्या अनेक थोर पुरुषांनी पित्याची आज्ञा पाळूनच कल्याण साधले आहे, भूलोकामध्ये तेच उचित आहे. लक्ष्मणा, तुझे वचन कुबुद्धिदर्शक आहे. तू धर्माचा विचार कर व ही अनार्य बुद्धी सोडून दे.'
 यानंतर कौसल्येने व लक्ष्मणाने रामचंद्रांचे मन वळविण्याचा परोपरीने प्रयत्न केला. कौसल्या म्हणाली, 'पित्याची आज्ञा पाळणे जसे तुझे कर्तव्य आहे तसेच माझी आज्ञा पाळणे हेही तुझे कर्तव्य आहे.' लक्ष्मण म्हणाला, 'तुझी ही फाजिल धर्मनिष्ठा निंद्य आहे.' पण रामचंद्रांनी त्यांतले काही मानले नाही. त्यांचे उत्तर एकच, 'मी धर्माचा अतिक्रम करणार नाही. दशरथ हे पिताजी आहेत. राजे आहेत. गुरु आहेत व वृद्ध आहेत. त्यांनी क्रोधामुळे, हर्नामुळे किंवा विषयवासनेमुळे कसेही सांगितलेले असो, ते मानणे हाच धर्म होय. यास्तव त्यांची आज्ञा अगदी तंतोतंत शेवटास नेल्यावाचून माझ्याने राहवणार नाही. माते, लक्ष्मणा, पिताजी सत्यनिष्ठ, सत्यवन्तनी व सत्यपराक्रम असे आहेत. त्यांची आज्ञा ही उत्कृष्ट धर्मवचन आहे, हे ध्यानात ठेवून अत्यंत त्वरेने वनवासाच्या सामग्रीची तयारी करा.' लक्ष्मणाने यानंतरही अनेक प्रकारे विरोध करून पाहिला पण शेवटी रामचंद्रांनी त्याला सांगितले, 'हे सौम्या, मातापित्यांच्या वचनांवरच मी निश्चल आहे व हाच सन्मार्ग आहे, हे तू ध्यानात घे.' (रामायण- · अयोध्या, सर्ग २१ ते २४ ) रामचंद्रांनी हे सर्व पितृभक्तीने केले, असा सर्वत्र समज रूढ आहे. पण ते तितकेसे खरे नाही. त्यांनी ते पित्राज्ञेने केले हे खरे आहे. पिताजी सत्यनिष्ठ, सत्यपराक्रम आहेत, असे अयोध्येत असताना ते लक्ष्मणाला म्हणाले. पण वनवासात गेल्यावर, रात्री पालापाचोळ्याच्या अंथरुणावर पडल्यावर त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, 'लक्ष्मणा, हे संकट आणि राजाच्या बुध्दीला पडलेला भ्रम यांचा विचार केला म्हणजे अर्थ व धर्म यापेक्षा कामच प्रबल आहे, असे मला वाटते. अरे, पिताजींनी माझा त्याग केला तसा कोणी अज्ञानी पुरुषसुद्धा स्त्रीकरता आपल्या आज्ञाधारक पुत्राचा त्याग करणार नाही. ती कैकेयी, भरत परत आल्यावर महाराजांचा प्राण सुद्धा घेईल. धर्म व अर्थ सोडून जो कामाचेच अवलंबन करतो त्याला या दशरथराजाप्रमाणे सत्वर विपत्ती प्राप्त होते.' (अयोध्या ५३, ९-१३) आपल्या मागे कैकेयी कौसल्येला व सुमित्रेला छळील, विषसुद्धा घालील अशी रामचंद्रांना भीती वाटत होती. म्हणून पहिल्याच दिवशी लक्ष्मणाला, 'तू परत जा व आपल्या मातांचे रक्षण कर,' असे ते सांगू लागले. कौसल्येच्या दुःखाला आपण कारणीभूत झालो, म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागले; कोणत्याही स्त्रीस माझ्यासारखा पुत्र न होवो, असे म्हणू लागले. असे असून मग ते वनवासाला का गेले ? ते म्हणतात, 'हे निष्पाप लक्ष्मणा, मी अधर्माला भीत आहे. अरे मी क्रुद्ध झालो तर अयोध्याच काय, पण सर्व पृथ्वीसुद्धा जिंकून टाकीन. पण अशा प्रसंगी वीर्याचा उपयोग नाही, मला अधर्माची भीती वाटते. म्हणून मी स्वतःला अभिषेक करून घेत नाही,' (५३, १८-२६) रामचंद्रांच्या या वचनावरून हे स्पष्ट होते की, पिताजी काममूढ आहेत. अनीतीने, अधर्माने ती आज्ञा देत आहेत, हे त्यांना मान्य होते. तरी ती आज्ञा पाळली पाहिजे, असा त्यांचा बुध्दिनिश्चय होता. भावनेच्या भरात, पितृप्रेमाने घेतलेला तो निर्णय नव्हता. कुलाचा, जमातीचा जो नायक त्याची आज्ञा दुर्लंघ्य मानली पाहिजे, प्रमादातीत धरली पाहिजे, नाहीतर समाजात शासन असे कसलेच राहणार नाही व त्यामुळे अराजक माजून लोक उत्सन्न होतील, असे त्यांचे मत होते. ते ज्याला धर्म म्हणतात तो हाच होय. आणि त्या धर्माचे उल्लंघन करण्यास मी असमर्थ आहे, असे ते म्हणत होते, ते या अर्थाने होय.
 रावण वधानंतर सीता सन्मुख आली असताना रामचंद्रांनी तिला उद्देशून जे कठोर भाषण केले त्यावरूनही कुलनिष्ठा हीच त्यांची कार्याकार्यनिर्णयाची कसोटी होती, हे स्पष्ट दिसते. ते सीतेला म्हणाले, "मी पराक्रम केला तो तुझ्यासाठी नाही. प्रख्यात असा जो माझा सूर्यवंश त्यावरचा कलंक धुवून काढण्यासाठी मी हा खटाटोप केला. आणि थोर कुलाचे नाव सांगणाऱ्या मला तुझा स्वीकार करणे शक्य नाही.' (युद्ध - ११५)
 धर्माचा निकष- लोकहित महाभारतात श्रीकृष्णांची कार्याकार्याची, धर्माची कसोटी अगदी भिन्न आहे, हे वर वर महाभारत चाळले तरी दिसून येईल. त्यांच्याकाळी समाजाचे जमातरूप जाऊन त्याला मोठे बृहद्रूप प्राप्त झाले होते. तेव्हा सर्व समाजाचा उत्कर्षापकर्ष हा त्यांचा धर्माधर्माचा निकष होता. श्रीकृष्णांनी धर्माची, सत्याची व्याख्या नेहमी याच धोरणाने केलेली आहे. 'गांडीव धनुष्याचा अवमान करील त्याचा मी वध करीन,' अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. एकदा लढाईतील जखमांनी चिडलेल्या अवस्थेत धर्मराजानेच तसा अवमान केला. त्यावेळी अर्जुनाने तलवार उपसली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की, 'अरे समाजाच्या प्रभवासाठी, उत्कर्षासाठी धर्मशास्त्र रचलेले असते. ज्याने उत्कर्ष होतो तोच धर्म होय. तुझ्या प्रतिज्ञांपालनाने काय होईल याचा तू विचार कर.' आणि याच संदर्भात त्यांनी धर्म व अधर्म यांचे सूक्ष्म विवेचन करून धर्म कोणता, सत्य काय याचा निर्णय लोकहित, लोकयात्रा या निकषाने करावयाचा असतो, हे अर्जुनाला समजावून दिले.
 श्रीकृष्णांच्या चरित्रात कंसवध, शिशुपालवध यासारखे अनेक गंभीर प्रसंग उद्भवले. द्रोण, कर्ण यांचा वध, अश्वत्थामा व अर्जुन यामध्ये झालेली ब्रह्मास्त्रांची लढाई यांसारखे प्रसंग पांडवांच्या चरित्रात आले. त्या सर्व प्रसंगी कार्याकार्याचा निर्णय श्रीकृष्णांना करावयाचा होता. तो त्यांनी या एकाच निकषाने केलेला दिसतो. समाजहित, लोकहित, भूतप्रभव ! यावाचुन धर्माचा दुसरा निकष श्रीकृष्ण जाणीत नाहीत. लोकहित, लोकयात्रा याऐवजी कधी त्यांनी चातुर्वर्ण्याचे संरक्षण, ज्ञातीचे, क्षत्रिय जातीचे वा राजमंडळाचे संरक्षण असे शब्द वापरले आहेत. पण त्यांच्या मनातला भावार्थ तेथेही समाजहित हाच दिसतो. कंसाला मारल्यानंतर उग्रसेनाने, 'या राज्याचा आता तुम्हीच स्वीकार करा अशी त्यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी उत्तर केले, 'मी कंसाचा वध केला, हे खरे नाही. तो स्वतःच्या पापाचरणामुळे मृत्यू पावला आहे. तेव्हा त्याचें राज्य मला घ्यावयाचे नाही. मी कंसाला मारला असेल तर तो लोकहितार्थ मारला आहे. राजे पूर्वीप्रमाणे आपणच आहात.' जरासंघाला ठार करणे का अवश्य आहे हे सांगताना 'त्यांनी 'लोकहित ' हेच कारण दिले आहे. जरासंधाने ८४ क्षत्रिय राजे पराभूत करून बंदीत ठेविले होते. असे १०० बंदी झाले की तो त्यांना शंकरापुढे बळी देणार होता. यामुळे अनेक क्षत्रिय राजकुलांचा नाश झाला असता व भारतातले राजमंडळच विनाशाच्या मार्गाला लागले असते. तेव्हा हा ज्ञातिक्षय थांबविण्यासाठी श्रीकृष्णांना त्याचा वध करणे प्राप्त झाले. युधिष्ठिराला हे समजांवून सांगताना व पुढे जरासंधाशी बोलताना हेच कारण श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
 महाभारतात श्रीकृष्णांप्रमाणेच नारद, व्यास, भीष्म यासारख्या धर्मवेत्त्यांनीही आणि इतरांनीही अनेक वेळा कर्माकर्म चिकित्सा केलेली आहे. पण धर्म हे समाजकल्याण निरपेक्ष असे काही तत्त्व आहे असे महाभारतात कोणी केव्हाही मानीत नाही. सत्य, अहिंसा, प्रतिज्ञापालन असे कोणतेही तत्त्व निरपेक्षपणे पाळावे असे कोणीही प्रतिपादन करीत नाही. प्रत्येक वेळी या तत्त्वपालनाने समाजहित साधले की नाही याची चिकित्सा करूनच निर्णय करावा, असे सर्वांनी मत दिले आहे. रामचंद्रांनी पित्राज्ञा पालनाचे तत्त्व या निकषावर घासून पहाण्यास नकार दिला होता. आपल्या या आज्ञापालनामुळे अनर्थ होईल, हे त्यांना दिसत होते. त्यांनी स्वतःच तसे म्हटले आहे. पण तरीही 'या धर्माचे मी उल्लंघन करू शकत नाही,' असेच ते म्हणाले. महाभारतात मात्र असे कोणताही तत्त्ववेत्ता म्हणत नाही. युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना एकदा भीष्म म्हणाले, 'राजा, सत्यभाषण करणे हेच उत्तम होय. कारण सत्याहून दुसरे श्रेष्ठ असे काही नाही. पण राजा, हे ध्यानात ठेव की, पुष्कळवेळा सत्यामुळे अनेकांचा घात होतो. मग या वेळी निर्णय कसा करावा ? अरे लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. त्यामुळे लोकांना उत्कर्षकारक तेच सत्य होय असा सिद्धान्त आहे.' धर्मव्याधाने ब्राह्मणाला उपदेश करतांना हाच विचार सांगितला आहे. 'यद् भूतहितं अत्यंतं तत् सत्यं इति धारणा ।' प्राण्यांना अत्यंत हितकारक असेल तेच सत्य असा निश्चय आहे.
 पित्राज्ञापालन, कुलप्रतिष्ठा हे निकष महाभारतात कोणी कधी सांगत नाहीत. ऐन युद्धाच्या घाईत अर्जुनाने धर्माधर्मवाद निर्माण केला तेव्हा श्रीकृष्णांनी, 'लोकसंग्रहासाठी तू युद्ध केले पाहिजेस' असे सांगितले. लोकप्रभव, समाजोन्नती हा निकष तेथेही त्यांनी दृष्टिआड केला नाही. हे महाभारतकाळच्या बदललेल्या समाजरचनेचे व संस्कृतीचे निदर्शक आहे.
 दर वेळेला चिकित्सा करूनच धर्माधर्म निश्चय करावयाचा अशी सर्वत्र प्रवृत्ती असल्यामुळे महाभारतात चर्चा, वादविवाद, संवाद, पूर्वपक्ष उत्तरपक्ष यांना भरती आलेली दिसते. रामायणात चर्चा नाहीत. तेथला श्रेष्ठ पुरुष क्षणार्धात आपल्या मताने निर्णय करतो व इतरांना तो निर्णय म्हणूनच सांगतो. त्यांच्याशी तो विचार-विनिमय कधीच करीत नाही. विचारांची देवाण घेवाण ही भाषाच रामायणाला मंजूर नाही. कारण तेथे धर्मतत्त्वे आधीच निश्चित झालेली आहेत.
 सीता त्यागासारखा गहन प्रश्न. श्रीरामचंद्रांना सीता निष्पाप आह हे स्वतःला पटलेले; पण लोकापवाद निर्माण झाला तेव्हा तिचा त्याग करावयाचा असा त्यांनी स्वमतानेच निर्णय घेतला आणि आपल्या तिन्ही भावांना बोलावून तो सांगून टाकला. आणि लगेच सर्वांना बजावले की, 'याविषयी माझ्याशी कोणी चर्चा केलेली मला. खपणार नाही. या माझ्या निर्णयाला जो विरोध करील त्याला मी शत्रू समजेन. लक्ष्मणा, उद्या सकाळी सीतेला घेऊन जा आणि वाल्मीकींच्या आश्रमात तिला सोडून परत ये.'
 वनवासगमनाचा निश्चय असो, वालिवधाचा निश्चय असो, कोणताही निश्चय असो, रामायणात तो एकट्याने करावयाचा असतो. वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज यांना जेव्हा दुसऱ्यांना काही उपदेश करावा असे वाटते तेव्हा ते फक्त उपदेश करतात. चर्चा करीत नाहीत. विश्वामित्राने दशरथाचे आधी वचन घेऊन मग त्याला राम लक्ष्मणांना माझ्या यज्ञाच्या रक्षणार्थ पाठव, असे सांगितले. दशरथाला ते मान्य होईना. तेव्हा वसिष्ठांनी 'वचन दिल्यानंतर ते मोडणे हा अधर्म होय, शिवाय राम समर्थ आहे, त्याला कोणी काही करू शकणार नाही, तेव्हां तू त्यांना पाठव' असा उपदेश केला व एक शब्दही वर न बोलता दशरथाने तो मान्य केला. तो चर्चा करीत बसला नाही ! वसिष्ठांनी चर्चेला कधीच अवसर दिला नसता ! रामायणात चर्चा नाही. असलीच तर अगदी अपवादाला.
 उलट महाभारतात चर्चेवाचून पान हलावयाचे नाही. भरतशत्रुघ्न लक्ष्मणांप्रमाणे भीमार्जुनही धर्मराजाचे धाकटे भाऊच होते. ते त्याच्या आज्ञेतही असत. पण चर्चा करुन ते त्याला हैराण करीत आणि कित्येक वेळा त्याला आपला निश्चय सोडण्यास भाग पाडीत ही चर्चा करताना ते विनीत भाषा वापरीत असेही नाही. युध्द संपल्यानंतर युधिष्ठिराला राज्याभिषेक करण्याचे ठरले. पण बांधववधाचे पातक हातून झाले असल्यामुळे आपण राज्यत्याग करून वनात जाणार, असे तो म्हणू लागला. तेव्हा भीम, अर्जुन आणि द्रौपदीही त्याच्यावर इतकी तुटून पडली की काही सोय नाही. 'धर्मराज, हे तुम्ही आधीच का नाही सांगितले ? मग तेव्हापासूनच आपण भिक्षा मागत राहिलो असतो,' असे भीम म्हणाला. तो आणखीही म्हणाला की, 'वेदांची अर्थशून्य घोकंपट्टी करणाऱ्या वैदिक ब्राह्मणासारखी तुझी बुद्धी नष्ट झाली आहे.' द्रौपदीनेही पतीला उपदेश केला की 'अहिंसा, मृदुता हा क्षत्रियांचा धर्म नाही. सज्जनांचे पालन आणि दुष्टांचे निर्दाळण हा तुमचा धर्म आहे.'
 तत्त्वापुढे महाभारतात ज्येष्ठ बंधूंची तर प्रतिष्ठा नाहीच पण गुरूचीही नाही. परशुराम भीष्मांना 'तू अंबेचे पाणिग्रहण कर' अशी अधिकाराने आज्ञा करू लागले तेव्हां भीष्मांनी प्रथम विनीतपणे, शिष्याच्या नम्रतेने, सांगून पाहिले. पण ते अधिक उणी भाषा करू लागताच भीष्म म्हणाले की, 'कार्याकार्य ज्याला समजत नाही त्या गुरुचाही त्याग करावा असे शास्त्र आहे !'
 समता प्रत्येक धर्मतत्त्वाविषयी, जीवनतत्त्वाविषयी महाभारतात वाद आहेत, वाग्युद्धे आहेत, चर्चा आहेत, कडवट उत्तरप्रत्युत्तरे आहेत. युद्ध करावे की करू नये; प्रतिज्ञेचे महत्त्व किती, शत्रूला कपटाने मारणे युक्त की अयुक्त, ब्राम्हणांनी क्षत्रियांची कामे करावी की न करावी, वर्ण हा गुणावरून ठरतो की जन्मावरून, आपल्या स्त्रीला पणाला लावण्याचा अधिकार पतीला आहे की नाही, देव श्रेष्ठ की उद्योग श्रेष्ठ- अशा अनंत प्रश्नांची महाभारतातले लोक चर्चा करतात. मांड्या मोडून मृत्युपंथाला लागलेला दुर्योधनही श्रीकृष्णांशी, 'तू मला अधर्माने मारलेस, तू जन्मापासून असाच कपटी आहेस ' इ. वाद घालतांना दिसतो. श्रीकृष्णांनी काही उत्तर दिल्यानंतर तो त्या स्थितीत प्रत्युत्तरही करतो.
 महाभारताचे वातावरण असे कर्माकर्मचिकित्सेचे, वादविवादाचे व समतेचे आहे. व्यास, भीष्म, नारद, श्रीकृष्ण यांसारखे श्रेष्ठ धर्मवेत्तेही तेथे नुसत्या आज्ञा करीत नाहीत; चर्चा करतात, वाद घालतात. त्या अर्थी पुत्र, बंधु, शिष्य, पत्नी यांची प्रतिष्ठा त्यांना मान्य होती, यात शंका नाही. समभूमिकेवर आल्यावाचून चर्चा होऊच शकणार नाही. आक्षेप, उत्तर, प्रत्युत्तर, खंडन, मंडन याला समतेवाचून अवसर राहणार नाही. तो अवसर महाभारतात विपुल होता. यावरून त्या संस्कृतीत समतेचे तत्त्व मान्य होते, असे दिसते. रामायणात तसे दिसत नाही. तेथे सर्वत्र आज्ञापालन आहे !
 रामायणातील अग्निशिखा पण ते आज्ञा देणे व ते आज्ञा पाळणे हे इतक्या उच्च भूमिकेवरून, श्रेष्ठ पातळीवरून रामायणात होते की खाली मान घालून आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात अनादर तर निर्माण होत नाहीच, उल्ट असलेला आदर दुणावतो. व्यक्ती या दृष्टीने पाहता रामायणातल्या व्यक्ती महाभारतातल्या व्यक्तीपेक्षा फार श्रेष्ठ वाटतात. त्यांचा निर्धार, त्यांचा निग्रह, त्यांचा त्याग इतका असामान्य आहे की, त्यांच्या जवळ जाण्याची आपल्या सारख्या सामान्य माणसांना भीतीच वाटावी. आयते चालून आलेले राज्य सोडून भरत नंदिग्रामी जाऊन चौदा वर्षे देह जाळीत बसला होता! गृह व तरुण पत्नी यांचा त्याग करून लक्ष्मण चौदा वर्षे ज्येष्ठ बंधूबरोबर हाल अपेष्टा सहन करीत होता. आणि तो व्रतस्थ राहिला होता ! महाभारतात व्रतस्थ राहण्याची भाषाच नाही. अरण्यात हिंडताना किंवा तीर्थयात्रा करताना भीम, अर्जुन हे सहज दोन-चार बायका गोळा करून आणतात. राम किंवा लक्ष्मण यांना तसे करता आले नसते काय ? हिडिंबा भीमाकडे आली तेव्हा त्याने तिच्याशी विलास केले आणि शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली तेव्हा त्याने तिचे नाककान कापले ! हे एकदोन प्रसंगांचे नाही. रामायण व महाभारत या काव्यात या दोन भिन्न वृत्ती नियमाने दिसतात. म्हणूनच हा संस्कृतीतला फरक आहे, असे वाटते. राम, कक्ष्मण, भरत, सीता, हनुमान ही माणसे अग्निशिखेसारखी नित्य प्रखर तेजाने दीप्त झालेली आहेत. महाभारतात अशी एकही व्यक्ती नाही. भीष्म तसे केव्हा केव्हा वाटतात. पण 'अर्थस्य पुरुषो दासः' हे मान्य करून त्यांनी लाचारी पतकरलेली पाहिली की रामायणाचे आगळेपण निश्चित जाणवते. महाभारतातली माणसे शूर आहेत, पराक्रमी आहेत, ध्येयनिष्ठ आहेत; पण त्यांचे रागलोभ, मोहमत्सर, आपणा सामान्य माणसासारखेच आहेत. ती माणसे स्खलनक्षम आहेत. रामायणातल्या माणसांचे तेज दाहक वाटते तसे यांचे वाटत नाही.
 श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण या दोन महापुरुषांच्या काळच्या भिन्न संस्कृतं चे, भिन्न धर्माचे, नीतीअनीतीच्या, कार्याकार्याच्या भिन्न निकषांचे दर्शन घडविण्यास त्यांच्याच तोलाचे दोन महाकवी भारतात जन्मले हा मोठा भाग्ययोग होय. साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे धर्माधर्म, नीतिअनीती, हे काही मूळ मानवी प्रपंचात, त्या घटनांच्या मूळ अंगांत, कधीच समाविष्ट झालेले नसते. ते कवीच्या दृष्टीला दिसत असते. तो त्या दृष्टीने सर्व घटनांची संगती लावून काव्य रचतो. आणि त्याच्या दृष्टीतून आपण पाहू लागलो की, आपल्या दृष्टीलाही ज्ञानांजनाचा लाभ होऊन आपल्या नेत्रांचे उन्मीलन होते, त्या त्या काळच्या संस्कृतीचे आपल्याला सम्यक आकलन होते. महाकवी वाल्मीकी व व्यास यांनी हेच कार्य केले आहे.
 रोमन व खिश्चन संस्कृती हेन्रिक सायंकेविक्झ हा पोलंडचा नोबेल प्राइज -विजेता विख्यात कादंबरीकार. 'को व्हॅडिस,' ही त्याची कादंबरी. या कादंबरीत नीरोच्या काळची अत्यंत अधोगामी झालेली, धर्मनीतिशून्य रोमन संस्कृती आणि त्याच काळची उदयोन्मुख खिश्चन संस्कृती यांचे अत्यंत मनोज्ञ असे दर्शन घडविलेले आहे. पेट्रोनियस हा एक चतुरस्र बुध्दीचा, अत्यंत रसिक पण तितकाच व्यवहारकुशल, समयज्ञ असा प्रौढ वयाचा रोमन सरदार आणि मार्कस व्हिनिशियस हा त्याचा शौर्य, धैर्य संपन्न, पराक्रमी असा भाचा दुसरा रोमन सरदार. यांच्या सहजसंवादातून पहिल्या एकदोन प्रकरणातच लेखकाने या दोन संकृतींचे ध्रुवभिन्न रूप ओझरते दाखविले आहे. लिजियन ही एक वन्य जमात होती. तिला रोमनानी जिंकले व तिच्या राजाची राणी व कन्या लिजिया यांना ओलीस म्हणून आणले. ऑलस प्लॉटियस हा दुसरा एक रोमन सरदार होता. पांपोनिया ग्रॅसियाना ही त्याची पत्नी लिजिया या राजकन्येला त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. मार्कस व्हिनिशियस याला रस्त्यात एकदा अपघात झाला. प्लॉटियसचे घर जवळच होते. म्हणून तेथे त्याला नेण्यात आले. बरा होइपर्यंत पंधरा दिवस तो तेथेच होता. तेथे लिजिया त्याच्या वारंवार दृष्टीस पडत होती. तिचे असामान्य रूपलावण्य पाहून तो तिच्यासाठी वेडा झाला होता. मामा आणि भाचा, पेट्रोनियस व व्हिनिशियस यांच्या संवादाचा हाच विषय होता. व्हिनिशियस म्हणाला, मामा, मी एका स्त्रीच्या प्रेमाने घायाळ झालो आहे ! वेडा झालो आहे.'
 'असं' सांग, सांग. सगळं सांग मला. त्या प्लॉटियसच्या घरी होतास तेव्हाची गोष्ट ? म्हणजे, त्याची बायको पॉपोनिया, तिच्यावर मन गेलं आहे काय तुझं ? मग कठिणच आहे. कारण दुर्दैवाची गोष्ट अशी की ती मोठी पतीव्रता आहे !'
 स्त्रियांचे पातिव्रत्य ही रोमन लोकांच्या लेखी दुर्दैवाची गोष्ट होती !'
 पण व्हिनिशियसच्या प्रेमाचा विषय पॉपोनिया नव्हती. तो म्हणाला, 'मामा, पांपोनिया! नव्हे. तिच्या घरी राहणारी ती राजकन्या लिजिया. पण ते प्लॉटियसचे घर जरा विचित्र आहे. तो पूर्व देशातला खिस्टस का कोण आहेना, त्याच्यावर प्लॉटियसची व पांपोनियाची भक्ती आहे. त्यामुळे त्या घरात सगळी माणसे-कोंबड्या देखील-सच्छील आहेत आणि अशा घरात ती माझी लिजिया वाढल्यामुळे तीही त्या पांपोनिया सारखीच शीलवती झाली आहे.! मामा, त्यांच्या घरात गुलाम आहेत पण त्यांना बेड्या 'घातलेल्या नसतात!'
 यानंतर पेट्रोनियस व व्हिनिशयस प्लॉटियसच्या घरी गेले. तेथे लिजिया आणि पांपोनिया यांना पाहून पेट्रोनियसही थोडा विस्मित झाला. स्त्रियांचे शील, सद्गुण याची तो चेष्टा करी, पण पांपोनियाला पाहताच तिच्या सात्विक, शांत मुद्रेमुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागला. कोणत्याही मोठया घराण्यातील स्त्रीचा असा प्रभाव त्याच्यावर पडला नव्हता. त्याने तिला तसे बोलूनही दाखविले, परत येताना तो व्हिनिशीयसला म्हणाला, 'तुझी निवड उत्तम आहे. लिजिया मूर्तिमंत उषा आहे. अप्सरा आहे.'
 'पण ती मला कशी मिळणार ?'
 'त्यात काय आहे ? आपण तिला विकत घेऊ ?'
 'नाही, ती गुलाम नाही. प्लॉटियस आणि पांपोनिया तिला मुलगीच मानतात. तेव्हा तिला विकत घेता येणार नाही. पण हरकत नाही. मी तिला मागणी घालीन. पत्नी म्हणून तिला आणीन !'
 'असा वेडेपणा करू नको. जित वन्य जमातीतील कन्यांशी रोमन सरदार लग्न करीत नसतात. इतका खाली जाऊ नको. आपण काही मार्ग काढू.'
 पेट्रोनियसने सीझरचा हुकूम मिळवून लिजियाला प्लॉटियसच्या घरून राजवाड्यात नेऊन ठेविले. तेथून शिबिकेत बसवून व्हिनिशियसचे लोक तिला त्याच्या घरी नेत असताना खिश्चन लोकांनी तिला सोडवून त्यांच्या वस्तीत नेऊन ठेविले. व्हिनिशियस तेथून एका रोमन मल्लाच्या साहाय्याने तिला पळवून नेत असताना उरसस नावाच्या तिच्या भीमसेनी नोकराने त्या मल्लाला ठार केले. व्हिनिशीयसही त्यावेळी मरावयाचा, पण लिजियाने उरससला मना करून त्याचे प्राण वाचविले. जबर जखमी होऊन तो बेशुद्ध झाला होता; तेव्हा आपल्या घरात ठेवून तिने व तेथील खिश्चनांनी त्याची शुश्रूषा करून त्याला बरे केले. या वेळी जवळ जवळ महिनाभर व्हिनिशियस त्या खिश्चनांच्या घरी होता. त्याकाळात लिजिया, इतर खिश्चन लोक व त्यांचा धर्मगुरु पीटर यांच्या सेवाभाव, क्षमावृत्ती, ऋजुता इ. गुणांचा त्याच्या मनावर फार प्रभाव पडला.
 तो प्रथम शुद्धीवर आला तेव्हा आपल्याला ठार न मारता हे लोक आपली सेवा शुश्रूषा करीत आहेत, लिजिया तर अहोरात्र उशाशी बसली आहे, हे पाहून तो विस्मित झाला. आणि सर्वजण त्याचा अपराध विसरून त्याला आराम पडावा म्हणून प्रार्थना करीत आहेत, हे पाहून तर त्याची मती कुंठित झाली. त्याच्या रोमन संस्कृतीत हे बसतच नव्हते. शौर्य धैर्याने लढावे, सुरेख स्त्रियांना पळवून सुखविलास करावे आणि त्या प्रयत्नांत मारावे किवा मरावे; कोणी आघात केल्यास दुप्पट सूड घ्यावा, अशी त्याची रोमन वृत्ती होती. त्यामुळे खिश्चनांच्या ह्या क्षमासौजन्याचा त्याला विस्मय तर वाटलाच पण तिरस्कारही वाटला. या सर्व शेळ्यामेंढ्या असून त्या केव्हातरी लांडग्यांच्या भक्ष्यस्थानी पडणे अटळ आहे, असे त्याचे मत झाले.
 परिवर्तन पण हळूहळू त्याचे मतपरिवर्तन होऊ लागले. लिजिया शुश्रूषेसाठी जवळ आली की तिचा हात आपल्या हाती घ्यावा असे त्याला वाटे. पण तिच्या शांत मुद्रेवरचे सात्विक तेज पाहून, हे बरोबर नाही, असे त्याचे मन त्याला सांगे. स्त्रीच्या संबंधी असा विवेक पूर्वी त्याच्या मनाला कधी शिवलासुध्दा नव्हता. त्या त्याला केवळ भोगदासी वाटत. प्रथम लिजियाकडे तो त्याच दृष्टीने पाहत होता. पण आता त्याच्या मनात प्रेमाचा उद्भव झाला. तिला बळाने पळवून नेण्यात आपण मोठा प्रमाद केला, असे त्याला आता वाटू लागले व त्याने तिच्याजवळ तसे कबूलही केले. पण ख्रिश्चन धर्माविषयी मात्र अजून त्याला तिटकाराच वाटत होता. प्रारंभीचे त्यांच्याविषयीचे त्याचे भयंकर समज आता दूर झाले होते, हे खरे. ते विहिरीतून विष कालवितात, दिसेल त्या बालकाला ठार मारतात, व्यभिचार तर त्यांच्यांत नित्याचाच आहे, असे त्याला, पेट्रोनियसला व सर्वच रोमनांना वाटत असे. ते त्यांचे गैरसमज पांपोनिया व लिजियाला पाहून मागेच नाहीसे झाले होते. आता त्याला तिरस्करणीय वाटत होते ते त्यांचे तत्त्वज्ञान या नव्या वर्माने सर्व उच्चनीच भाव नष्ट होईल, श्रेष्ठ कनिष्ठता टोपेल आणि मग रोमच्या सत्तेचे, साम्राज्याचे काय होइल? सर्वांना सम लेखावयाचे? छे छे, हा अनर्थच आहे. जित आणि जेते, गरीब आणि श्रीमंत, धनी आणि गुलाम सर्व सम झाले तर कायदा लुप्त होईल, सर्वत्र अराजक माजेल, आणि जगावर प्रलय ओढवेल!
 घरी परत आल्यावर पेट्रोनियसशी त्याची या विषयावर खूप चर्चा झाली. पेट्रोनियस अतिशय विद्वान, मोठा रसिक व कुशाग्र बुध्दीचा माणूस होता. तो म्हणे, 'सुख हेच मानवाचे ध्येय आहे. प्रेम, सौंदर्य व सामर्थ्य हेच खरे वैभव, आणि ते दळे ख्रिश्चन लोक यांनाच निंद्य मानतात. दुष्कृत्याची फेड सत्कृत्यांनी करावी असे ते म्हणतात. मग सत्कृत्याची फेड कशाने करावयाची?'
 पेट्रोनियसला प्रेम म्हणजे काय ते समजत होते. त्याची अभिरुचीही त्याला होती. युनीस नावाची त्याची ग्रीक दासी होती. तिच्यावर त्याचे फार प्रेम होते. पण तिला मांडीवर घेऊन तिचे शरीर उघडे करुन, व्हिनिशियसला दाखवून तो म्हणे 'पहा, असे सौंदर्य तू कोठे पाहिले आहेस?' यावेळी लिजियाची आठवण होऊन व्हिनिशियसला वाटले तिला आपण अशीच जवळ घ्यावी. पण हा विचार मनात येताच त्याला धक्का बसला. छे छे! लिजिया अशी नाही. आणि ती या स्त्रियांसारखी वागली तर आपल्याला ते आवडणार नाही. आपल्या मनात केवढे परिवर्तन झाले आहे ते आता त्याच्या ध्यानात आले आणि तो पेट्रोनियसला एकदम म्हणाल 'मामा,' आपल्या दोघांत जमीन अस्मान अंतर पडले आहे, आपण एकमेकाला समजावून घेऊ शकणार नाही !'
 "म्हणजे तू ख्रिश्चन होण्याचा विचार करीत आहेस तर !!
 'तसं मनात येतं, पण माझी सर्व मूळ प्रकृती अजून त्याविरुद्ध खवळून उठते'
 पण लिजियाच्या त्याच्या वरचेवर भेटी होत, खिश्चनांशी चर्चा होई, त्यामुळे ही त्याची मूळ प्रकृतीही हळूहळू बदलू लागली. त्याने घरातल्या सर्व गुलामांना मुक्त केले. व त्यांच्याशी तो जास्त दयाबुद्धीने वागू लागला. मनोनिग्रह, संयम यांची सर्व रोमनाप्रमाणे तो पूर्वी चेष्टा करीत असे. आता त्यात एक निराळे सामर्थ्य आहे त्याच्या ध्यानी आले. आणि शेवटी पूर्ण परिवर्तन होऊन त्याने खिश्चन व्हावयाचे ठरविले.
 भावनांचा प्रभाव व्हिनिशियस या रोमन सरदाराचे मतपरिवर्तन दाखविताना सायंकेव्हिग्ज याने मानवी जीवनाविषयीचा एक फार महत्त्वाचा सिध्दान्त सांगितला आहे. व्यक्तीचे मतपरिवर्तन होते ते विचाराने, बुद्धीने, तर्कवशतेने, प्रमाणांनी पुराव्यांनी, सिध्दान्तांनी सहसा होत नाही. विकार, भावना यांनी ते होत असते. व्हिनिशियसला प्रारंभी ख्रिस्ती धर्माचा अत्यंत तिरस्कार वाटे. पुढे त्याचे हे मत हळूहळू बदलले. याला लिजियावरील त्याचे प्रेम हेच सर्वस्वी कारण होते. आरंभी त्याच्या मनात केवळ वासनांच होती. पण तिची शांत सात्त्विक मुद्रा पाहून त्याच्या अंतरात बदल होऊ लागला व हे तिचे सात्त्विक तेज हा ख्रिस्ती धर्माचा प्रभाव असावा असे त्याला वाटू लागले. तरीही दीर्घकाळपर्यंत 'खाइस्ट हा तुझा देव आहे म्हणून मी त्याला मानतो,' असेच तो म्हणत असे. त्याने गुलामांना मुक्त केले, तो त्यांच्याशी दयाबुध्दीने वागू लागला. ते यामुळे लिजियाला आनंद होईल म्हणून. हे चालू असताना तो पीटरपॉल यांशी ख्रिस्तीधर्मतत्त्वांची चर्चा करीत असे. आणि पुढे पुढे ती तत्त्वे श्रेष्ठ आहेत हे त्याला मान्यही होऊ लागले. पण त्याच्या मनाची भूमिका लिजियावरील प्रेमामुळे अनुकूल झालेली होती म्हणूनच त्याला ती तत्त्वे पटू लागली. आणि त्या तत्त्वांच्या इतके जवळ आल्यानंतरही तिची प्राप्ती झाली नसती तर त्याने खिश्चन धर्माचा स्वीकार केला नसता. माणसांचे परिवर्तन प्रामुख्याने भावनांनी होत असते हेच खरे. त्यातही प्रेम या भावनेचे सामर्थ्य या दृष्टीने विशेषच आहे. पेट्रोनियस हा खिस्ती झाला नाही. पण त्याच्यातही बरेच परिवर्तन झाले होते. तेही युनीसवरील प्रेमामुळे! त्याने स्वमुखानेच हे दोनतीनदा सांगितले आहे. व्हिनिशियस व पेट्रोनियस यांच्या जीवनातले हे सर्वच प्रसंग लेखकाने असे अर्थगर्भ करून टाकले आहेत.
 युनिटीचा अर्थ को व्हॅडीस या कादंबरीतील हे विविध प्रसंग पाहिले म्हणजे गॅरॉड याने ॲरिस्टॉटलच्या 'युनिटी' या तत्त्वाचा जो अर्थ केला आहे तो कसा यथायोग्य आहे, हे आपल्या ध्यानात येते. ते अनेक प्रसंग, त्या घटना, त्या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे विकार, त्यांची भाषणे हे सर्व कोणत्या एका सूत्रांने गुंफिले गेले असेल तर ते म्हणजे लेखकाचे ख्रिस्ती धर्माच्या उदयासंबंधीचे तत्वज्ञान हे होय. भोगवृत्ती, व्यभिचार, क्रौर्य, मदांधता, निग्रह, संयम यांचा अभाव, चारित्र्यहीनता, जुलूम, विषमता, अन्याय यांनी रोमन साम्राज्य हादरून डळमळू लागले होते. अशावेळी त्याग, सेवा, सात्विकता, दया, क्षमा, प्रेम, औदार्य या गुणांनी संपन्न असा खिस्ती धर्म लोकांना आकृष्ट करू लागला, हा विचार लेखकाला सांगावयाचा आहे. त्यासाठी अस्तोन्मुख व उदयोन्मुख अशा या दोन संस्कृतीची चित्रे एका शेजारी एक अशी उभी करून त्याने वाचकांना त्यांचे मूल्यमापन करावयास संधी दिली आहे. या मूल्यमापनातून निघणारा जो तात्त्विक सिद्धान्त त्याने या सर्व घटनाप्रसंगांना एकसंध केले आहे. या काळाचा इतिहास वाचताना लेखकाला हा सिध्दान्त स्फुरला, हे तत्त्व ध्यानात आले आणि मग त्याच्या पूर्तीकरणासाठी अवश्य ते प्रसंग, अवश्य त्या व्यक्ती, त्यांचे विचार विकार हे मूळद्रव्य घेऊन त्याचे एक रसायन करून त्याने त्या मुशीत ते ओतले व ही सुंदर कलाकृती निर्माण केली. सहज पाहणाराला ती एक रम्य कथा दिसते. तिच्यामागले सूत्र दिसत नाही. आणि त्यातच कवीच्या कलेचे यश आहे. पुष्पहारामध्ये पाहणाराला फक्त फुले दिसावी. त्यांचा सुगंध यावा पण दर फुलाला, पानाला, कळीला वेढणारा, भेदून जाणारा दोरा दिसू नये, असे होण्यातच पुष्पहाराची शोभा आहे. जीवनभाष्य हे काव्यसौंदर्याचे सर्व नियम पाळून केले पाहिजे असे जे मॅथ्यू अर्नाल्डने म्हटले आहे त्याचा हाच अर्थ आहे. सायंकेविग्जने ते सर्व नियम बरोबर पाळले आहेत. तो स्वतः कोठेच प्रगट होत नाही, उपदेश करीत नाही, विवेचन करीत नाही. कादंबरीतल्या व्यक्तीच्या मुखाने तो बोलत आहे असा कोठे संशयही येऊ देत नाही. पीटर पॉल, पेट्रोनियस, व्हिनिशियस, नीरो, या व्यक्तींची तो कथा सांगतो. त्यांच्या विकारविचारांचे, त्यांच्या कृत्यांचे, आचारांचे, घरादारांचे वर्णन करतो. पण त्यांतूनच दर पावलाला या दोन संस्कृतीचे भिन्न रूप दर वेळी आपल्याला प्रतीत होत असते. रोमन साम्राज्याचा अधःपात व ख्रिस्तीधर्माचा उदय या जगाच्या इतिहासातल्या अत्यंत मोठ्या व महत्त्वाच्या घटना आहेत. त्या तत्कालीन व्यक्तींच्या विकारविचारांतून मूर्त करून सायंकेविग्ज याने त्यांवर जे भाष्य केले आहे त्याला साहित्यक्षेत्रात खरोखर तोड नाही.
 इंग्लिश आणि फ्रेंच 'ए टेल ऑफ टू सिटीज' या कादंवरीला डिकन्सने एक लहानशी प्रस्तावना जोडली आहे. 'फ्रेंच राज्यक्रान्ती या महाभयंकर घटनेचा अर्थ आकळण्यास वाचकांना थोडे साह्य या कथेमुळे होईल, अशी मला आशा आहे,' असे तीत त्याने म्हटले आहे. प्रसिद्ध पंडित कार्लाईल याने फ्रेंच राज्यक्रान्तीचा इतिहास लिहिला आहे. त्यातील तत्त्वज्ञानात या कादंबरीमुळे भर पडेल असे मात्र नाही असे डिकन्स म्हणतो. पण टीकाकारांच्या मते या कादंबरीमुळे त्या क्रान्तीचे चित्र जसे स्पष्ट उभे रहाते तसे कोणत्याही इतिहासाने उभे राहणार नाही. याचे कारण असे की, डिकन्सने त्या घटनेची पुनर्निर्मितीच केली आहे. त्यामुळे फ्रेंच फ्रान्ती डोळ्यां समोर घडत असल्याचा भास होतो. साहित्याचे हेच वैशिष्ठय आहे. इतिहासाला हे पुननिर्मितीचे सामर्थ्य नाही, अर्थात ही पुनर्निर्मिती साहित्यिकाच्या मनःकोषातून होत असल्यामुळे मूळ घटनेचा त्याला जो अर्थ प्रतीत झाला त्याच्या अनुरोधाने तो ही सृष्टी निर्मीत असतो, तिची रचना करीत असतो. क्रान्तीच्या वर्णनातील तपशील- घडामोडी संबंधीचा, व्यक्तीसंबंधीचा सर्व तपशील आपण अत्यंत विश्वसनीय साधनांवरून पडताळून पाहिलेला आहे, असे डिकन्स सांगतो. आणि जबाबदार साहित्यिक हे करीतच असतो. पण ते घटनांसंबंधी, मूळ वस्तूसंबंधी होय. त्या वस्तूचा जो अर्थ तो लावतो तो सर्वस्वी त्याचा असतो. तो त्या घटनेची जी मीमांसा करतो ती त्याची असते. आणि यातच साहित्याचे साहित्यत्व आहे.
 लंडन व पॅरिस 'दोन नगरींची कथा' असे डिकन्सच्या या कादंबरीचे नाव आहे. पण कादंबरी वाचताना असे ध्यानात येते की, ही दोन संस्कृतींची कथा आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीची कथा सांगावी असा डिकन्सचा मूळ हेतू. आणि कथेचा प्रधान विषय तोच आहे. पण ती कथा सांगताना फ्रेंच व इंग्लिश या दोन संस्कृतींची कथा डिकन्सने निवेदिली आहे. पॅरिस व लंडन या दोन नगरी म्हणजे या दोन संस्कृतींची प्रतीके आहेत. आणि त्या दृष्टीने पाहता 'दोन नगरींची कथा' हे नाव अगदी अन्वर्धक आहे. या कथेत जे फ्रेंच लोक दिसतात ते कसे आहेत? क्रान्तीच्या समंधाने ते झपाटलेले आहेत. न्याय, विवेक, सारासार विचार, यांची त्यांनी रजा घेतलेली आहे. क्रान्तीपूर्वी कमालीची विषमता, अन्याय, जुलूम, अत्याचार, उन्मत्तता, मदांधता, स्वार्थ, यांचे राज्य होते. ते नष्ट करण्यासाठी हे लोक बद्धपरिकर झाले होते. त्या ठायी समता, बंधुता, स्वातंत्र्य यांची स्थापना करावी असे त्यांचे उद्दिष्ट होते. पण अन्याय, विषमता यांवर घाव घालता घालता तेच विष त्यांच्या डोक्यात इतके चढले की ते लोक अगदी पिसाट होऊन गेले आणि जी विषमता, जो अन्याय, जे अत्याचार नष्ट करण्यासाठी ते निघाले होते त्यांपेक्षा भयानक अत्याचार व अन्याय ते करू लागले. क्रौर्य, रक्तपात, कत्तली, हत्याकांड हीच त्यांची प्रकृती होऊन बसली. पूर्वी माणसांचे अन्यायाने खून होत, पण राजे, सरदार ते खून स्वार्थासाठी करीत. आणि ते लपविण्याचा प्रयत्न करीत. आता समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचा घोष करणारे हे क्रान्तिकारक कत्तल, हत्यांकाड यांतच आनंद मानू लागले. दुसऱ्या काही स्वार्थासाठी हत्या हे कत्तलीचे रूप गेले आणि कत्तलीच्या आनंदासाठी कत्तल, असे तिला रूप आले. माणसे अशी शुद्ध पिशाच्चे झाली होती. त्यांची माथी भडकली होती. डोळे फिरले होते. आणि न्याय, विवेक, सौजन्य, साधुत्व यांचीच त्यांनी होळी चालविली होती. ही फ्रेंच संस्कृती! या उलट इंग्लिश संस्कृती पहा. ते लोक विवेकी होते. त्या युद्धकाळातही त्यांनी आपले माथे जागी ठेवले होते. त्या वेळी अमेरिकेशी इंग्रजांचे युद्ध चालू होते. तरीही न्यायबुद्धी, विवेक, समतोल, सारासार यांना त्यांनी हद्दपार केले नव्हते.
 चार्लस डानें याच्यावर इंग्लंडमध्ये खटला झाला होता. पुढे क्रान्तीच्या काळात तो फ्रांसमध्ये गेल्यावर तेथेही त्याच्यावर खटला झाला. या दोन प्रसंगीच्या न्यायसमेची चित्रणे करून डिकन्सने त्या दोन नगरीची संस्कृती कशी कमालीची भिन्न होती, ते अत्यंत स्पष्ट केले आहे. त्याच्या ललितकलेचे सर्व वैभव या दोन चित्रांवरून दिसून येते. चार्लस डानें हा मूळचा फ्रेंच फ्रान्समधला एक अत्यंत जुलमी, क्रूर, मदांध सरदार एव्हरमांड यांचा हा पुतण्या. पण तेथील सरदारांचे भयानक अत्याचार, जुलूम यांना विटून सर्व जिंदगीवर पाणी सोडून, मायभूमीही टाकून आणि मूळच्या नावाचाही त्याग करून चार्लस इंग्लंडला आला. व तेथेच स्थायिक झाला. इंग्लंडला येताना बोटीवर त्याची डॉक्टर मॅनेट व त्यांची मुलगी लूसी यांच्याशी गाठ पडली व ओळख झाली. डॉ. मॅनेट हे फ्रेंच असून वीस वर्षापूर्वी एक मोठे भिषग्वर म्हणून त्यांची फ्रान्समध्ये कीर्ती होती. सरदार एव्हरमांड बंधूंनी एका स्त्रीवर बलात्कार करून तिला मारून टाकली होती. तो अन्याय पंचविण्यास डॉ. मॅनेट त्यांना मदत करीनात. उलट ते त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू लागले म्हणून एव्हरमाडनी त्यांना बॅस्टिलच्या तुरुंगांत डांबून टाकले. त्यांची पत्नी या धक्क्याने मृत्यू पावली. त्यावेळी त्यांचे इंग्लिश मित्र लॉरी यांनी त्यांची दोन वर्षाची मुलगी लूसी हिला इंग्लंडला नेले व तेथेच तिचे संगोपन केले. १७७५ साली डॉ. मॅनेट यांचा मित्र डेफार्ज याने त्यांना काही युक्तीने सोडवून आपल्या घरी आणले. पण वीस वर्षे अंधारकोठडीत काढल्याने ते जवळजवळ वेडे झाले होते. लूसी आता मोठी झाली होती. तिला सर्व हकीकत समजली होती. म्हणून लॉरी यांच्याबरोबर पॅरिसला येऊन ती वडिलांना घेऊन इंग्लंडला परत चालली होती. त्याच वेळी तिची व चार्लसची ओळख होऊन पुढे काही वर्षांनी तिचे प्रेमात रूपांतर झाले.
 दोन न्यायालये १७८० च्या सुमारास या चार्लसवर एक आरोप ठेवण्यात आला. अमेरिकेशी त्यावेळी इंग्लंडचे युध्द चालू होते. अशा वेळी अमेरिकेला जाणाऱ्या सैन्यासंबंधीची माहिती चार्लसने फ्रान्स या शत्रूराष्ट्राला पुरविली असा त्याच्यावर आरोप होता. वास्तविक हा राजद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप होता. युध्दाचा काळ होता. अशावेळी माथी भडकून जाऊन वाटेल तो अत्याचार करण्यास लोक प्रवृत्त व्हावयाचे. आणि तसे झाले असते तर चार्लस त्यांच्या हातून जिवंत सुटणे कठिण होते. पण तसे काही झाले नाही. लोक भडकल्याचे, खवळल्याचे, विवेकशून्य झाल्याचे पुसटसुध्दा लक्षण कोठे दिसले नाही. कायद्याच्या काटेकोर कलमा अन्वये न्यायालयात सर्व काम चालले. आरोपीला वकील देण्याची, स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, संशयाचा फायदा मिळून राजद्रोहासारख्या भयंकर आरोपाखाली असलेला हा चार्लस, त्या युध्दकाळातही, निर्दोष ठरून मुक्त झाला त्याचा वकील स्ट्रायव्हर यांचा मदतनीस सिडने कार्टन याचा व चार्लसचा चेहरा. अगदी सारखा होता. दोहोंत विलक्षण साम्य होते. तेव्हा दोघांकडे बोट दाखवून स्ट्रायव्हरने फिर्यादीचा साक्षीदार बग्साड याला, नेमका गुन्हेगार कोण, असे विचारताच तो गोंधळला. नेमके सांगू शके ना. यामुळे पंचांनी चार्लसला निर्दोषी ठरविले व न्यायाधिशाने ते मान्य करून त्याला मुक्त केले. खटला ऐकण्यास गर्दी खूप जमली होती. पण न्यायासनाचा निकाल धुडकावून लावून कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती लोकांनी दाखविली नाही. कायद्याचा निकाल सर्वांनी शांतपणे मान्य केला. न्यायालयाच्या आवारातच चार्लसच्या मित्रांनी, आप्तांनी त्याचे मृत्यूच्या दाढेतून सुटल्याबद्दल अभिनंदन केले- त्यांना भीती वाटली नाही.
 या उलट फ्रान्समधल्या खटल्याची तऱ्हा. तेथे क्रान्तीची धुमाळी पेटली होती. लोकराज्य स्थापन झाले होते. या मधल्या अवधीत डॉ. मॅनेट यांच्या मुलीशी लूसीशी- चार्लसचे लग्न होऊन त्याला एक मुलगीही झाली होती. फ्रान्समध्ये पिसाट झालेल्या क्रान्तिकारकांनी राजाला फाशी दिला होता. सरदारांचा निःपात केला होता. पण नंतर स्थिर राज्य स्थापावयाचे सोडून त्यांनी भीषण हत्याकांड चालविले होते. जे बलदंड होते, गुंड होते, सैतान होते ते व त्यांच्या संसर्गाने सर्व लोक केवळ संशयावरून वाटेल त्याला धरीत, चौकशी सारखे काही करीत व त्याची कत्तल करीत. लहान नाही मोठा नाही, स्त्री नाही पुरुष नाही, बाल नाही वृद्ध नाही. सर्वत्र समता! इंग्लंडमध्ये संशयाचा फायदा मिळून आरोपी मुक्त होई. फ्रान्समध्ये संशयावरून त्याचा शिरच्छेद होई. अशी स्थिती असताना चार्लसच्या लहानपणच्या एका नोकराचे त्याला पत्र आले. तो त्या पिशाच्यांच्या हाती सापडला होता. आणि 'तुम्ही येऊन माझ्या बाजूने रदबदली केलीत तर माझा जीव वाचेल, तेव्हा तुम्ही ताबडतोब पॅरीसला या,' असे त्याने पत्रात विनविले होते. फ्रान्समध्ये यावेळी जाण्यात धोका होता. पण चार्लसला वाटले की, आपण एव्हरमाड जिंदगीचा त्याग केला आहे, अत्याचारात कधी भाग घेतला नाही, जनतेशी सहानुभूतीच दाखवली आहे. तेव्हा आपल्याला धोका नाही. पण फ्रान्समध्ये पाऊल टाकताच त्याला एव्हरमांड म्हणून क्रान्तिकारकांनी पकडले व तुरुंगात डांबून टाकले. ती दुष्ट वार्ता कळताच डॉ. मॅनेट मुलीला व नातीला घेऊन जावयाला सोडविण्याची खटपट करण्यास पॅरिसला आले. अन्यायाने जुन्या राजवटीने त्यांना १५|२० वर्षे तुरुंगात ठेविले होते. आता ती राजवट नष्ट झाली होती. म्हणून क्रान्तिकारकात त्यांना मान होता, मोठी प्रतिष्ठा होती. जनतेलाही त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे आपण चार्लसला निश्चित सोडवू असे त्यांना वाटत होते. पण वर्ष सवा वर्ष त्याच्यावरचा खटला चालूच झाला नाही. आणि त्यानंतर तो चालला, तो कसा ?
 डिकन्स म्हणतो, ती न्याय सत्ता नव्हती, अन्यायसत्ता होती, तेथे कामाला पध्दत वा शिस्त नव्हती. कायदा, नियम, संकेत सर्व गुंडाळून ठेवून राक्षसी सूडबुध्दी, तेथे थैमान घालीत होती. पंच हे लांडगे असून त्यांच्यापुढे या हरणाला उभे केले होते, सर्वत्र गलका होता. कोणी ओरडत होते. अनेक लोक एकदम उभे राहून बोलत होते. न्यायाधिशांनी घंटा वाजविली तर ते चक्क म्हणत, घंटेला विचारतो कोण?
 अशा या न्यायपीठापुढे सव्वा वर्षांने चार्लसला उभे करण्यात आले. तेथे न्याय मिळेल अशी कोणाला आशा नव्हती. पण डॉ. मॅनेट यांची साक्ष झाली आणि सर्व पारडे फिरले. ते जुन्या राजवटीचे बळी होते. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांनी लोकांना आवाहनही चांगले केले. त्याचा परिणाम होऊन चार्लस मुक्त झाला. पण तो मुक्त झाला तो कायद्याने किंवा पुराव्याने नव्हे ! त्याचे निर्दोषत्व सिद्ध झाले म्हणून नव्हे. कारण आधी त्याचा गुन्हा सिद्धच झाला नव्हता. तो मुक्त झाला तो डॉ. मॅनेट यांच्यामुळे आणि यातच गोम होती. तो मुक्त होताच लोकांत आनंद, हर्ष यांचा उन्माद संचारला. शेकडो लोकांनी त्याला न्यायसभेतच घेरलं, मिठ्या मारल्या, पाठीवर धन्यवाद दिले. ते इतके की तो गुदमरून जाण्याची वेळ आली. मग त्यांनी एका खुर्चीवर बसवून त्याला मिरवीत त्याच्या घरी नेले. वाटेने ते ओरडत होते. किंकाळत होते, नाचत होते, टोप्या उडवीत होते. डॉ. मॅनेटना त्याचीही भीती वाटत होती. सर्वत्र अतिरेक, तारतम्य शून्यता, पिसाटपणा ! परत जाताना त्याच खुर्चीवर लोकांनी एका मुलीला बसविले व स्वातंत्र्यदेवता म्हणून तिचा जयजयकार करीत ते त्या बेहोषीतच परत गेले. ही बेहोषी आनंदाची होती, हर्षाची होती. पण तरीही ती भयप्रद होती.
 आणि तसा प्रत्ययही आला. सुटका झाल्याचा चार्लसचा आनंद क्षणिक ठरला. दोन तासातच त्याला पुन्हा पकडण्यात आले. डॉ. मॅनेट यांनी तुरुंगात असताना पंचवीस तीस वर्षांपूर्वी एरव्हमॉड बंधूंनी आपला कसा छळ केला, कसा घोर अन्याय केला ते लिहून ठेविले होते. आणि शेवटी एव्हरमांड बंधू, त्यांचे पुत्रपौत्र, वंशज यांना परमेश्वराने व लोकांनी या पापकृत्याचा जाब विचारावा, असा तळतळाट व्यक्त केला होता. डेफार्ज हा डॉ. मॅनेट यांचा जुना मित्र. त्यालाच तुरुंगात ते पत्र सापडले होते. त्याची बायको मॅडम डेफार्ज ही मूर्तिमंत कृत्या होती. तिच्याच बहिणीवर एव्हरमांडने अत्याचार केला होता. त्यामुळे ती सूडासाठी जळत होती. ही सूडबुद्धी ठीक होती. पण आता ते एव्हरमांड बंधू मारले गेले होते. त्यांची जिंदगी खालसा झाली होती. चार्लसने प्रथमपासूनच त्या जिंदगीशी संबंध तोडला होता. आणि आता तो डॉ. मॅनेट यांचा- तिच्या प्रमाणेच एव्हरमांडच्या हिंस्त्र वासनेला बळी पडलेल्या एका गृहस्थाचा- जावई झाला होता. त्याची बायको जन्माने फ्रान्सची नागरिक होती. पण याचे मॅडम डेफार्जला काही नव्हते. ती आंधळी झाली होती. इंग्लंडमध्ये अशा चार्लस नामक गृहस्थाला अटक करण्याचेसुद्धा कोणाच्या मनात आले नसते. तसे कोणी म्हटले असते तर त्याचे हसे झाले असते. पण हा फ्रान्स देश होता. चार्लस हा एव्हरमांडचा पुतण्या होता एवढे पुरेसे होते. आणि डॉ. मॅनेट यांनीच त्यांच्यावर आरोप केला होता ! मग आणखी काय पाहिजे? न्यायाधिशानेच जाहीर केले की डॉ. मॅनेट हे आपल्या प्रजासत्ताकाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. तेव्हा त्या सरदार वंशाची पाळेमुळे खणून काढण्यात त्यांना अभिमानच वाटेल आणि आपल्या कन्येला विधवा करून नातीला पोरकी करून. टाकण्यात त्याना अपरिमित आनंद होईल यात शंका नाही !
 चारपाच तासांपूर्वी आनंदाने पिसाट झालेले फ्रेंच नागरिक आता संतापाने पिसाट झाले. त्यांनी एकमुखाने चार्लसला मृत्यूची शिक्षा फर्मावली. चोवीस तासात ती अमलात यावयाची होती.
 लंडनमध्ये चार्लसवर राजद्रोहाचा, राष्ट्रद्रोहाचा आरोप आला होता. तेथे तो परकी मनुष्य होता. आरोप युद्धकाळात आला होता. तरी केवळ संशयाचा फायदा मिळून तो सुटला. पॅरिसमध्ये त्याच्यावर आरोप काय ? तर तो एक जुलमी, अत्याचारी सरदाराचा वारस होता. वास्तविक तो वारसाही त्याने राजीखुशीने सोडून दिला होता. तो फ्रान्सचा नागरिक होता. दुसऱ्या एका गरीब नागरिकाला वाचविण्याच्या हेतूने तो परत आला होता. ज्यांनी त्याच्यावर म्हणजे त्याच्या पूर्वजांवर पंचवीस तीस वर्षांपूर्वी, म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी आरोप केला होता ते डॉ. मॅनेट यांनीच त्याच्या निर्दोषत्वाची ग्वाही दिली होती ! तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता यांनी त्याचा बळी घेतला. व्यक्तीला तिच्या अपराधासाठीच फक्त जबाबदार धरावे. आप्त, नातेवाईक यांच्या अपराधासाठी धरू नये, ही संस्कृतीची पहिली पायरी होय. हेच खरे स्वातंत्र्य ! कायद्याचे राज्य हीच खरी समता. पण त्या स्वातंत्र्यसमतेच्या घोषकांनी ही संस्कृती उच्छेदून चार्लसचा बळी घेतला. आणि एवढ्यावरच भागले नव्हते. चार्लसची बायको व त्याची मुलगी याही एव्हरमोडवंशज असल्यामुळे त्यांचाही बळी घेतला पाहिजे, असे मॅडम डेफार्ज व तिचे मित्र यांनी ठरविले होते. चार्लस तुरुंगात होता तेव्हा लूसीने बाहेर उभी राहून तुरुंगाच्या कोठडीकडे पाहून अश्रू ढाळले होते. हात वर केला होता. हा भयंकर अपराध होता. आणि शिवाय लूसी व तिची मुलगी या दोघी सुंदर होत्या. गिलोटिनची सुरी त्यांच्या मानेत शिरली की ते दृश्य मोठे छान दिसेल, हाही एक मुद्दा होताच !
 पण त्या पिशाचांची ती घोर वासना अतृतच राहिली. लूसी व तिची कन्या चार्लससह आधीच निसटून गेल्या होत्या.
 बेबंद कारभार चार्लसची मुक्तता कशी झाली ? तोही त्या उन्मत्त, विवेकहीन, धुंद, बेहोष क्रान्तीच्या धुमाळीतलाच एक प्रकार. सिडने कार्टन हा चार्लसचा इंग्लंडमधील वकील स्ट्रायव्हर याचा मदतनीस थेट त्याच्यासारखाच दिसत होता, हे वर सांगितलेच आहे. हा माणूस चंगी, भंगी, दारूड्या, फटींग, निर्गल असा प्रथम होता. प्रारंभी जीवनात आलेल्या काही अपयशामुळे निराश होऊन तो अगदी वाहवला होता. त्याने सर्व आयुष्य वाया घालविले होते. पण डॉ. मॅनेट यांची कन्या लूसी हिला पाहून त्याच्या मनात प्रेमोद्भव झाला होता. ते सफल होणे शक्य नाही हे ब्याच्या ध्यानात येत होते. पण त्याने त्याला फार उदात्त रूप दिले होते. अगदी गुप्तपणे तिच्यावरचे प्रेम मनाच्या कोषात ठेवून तो वागत होता. त्याच्या मनात रेया प्रेमाला इतके उज्ज्वल, इतके सात्विक रूप आले होते की, तिच्या केवळ दर्शनाने त्याला आनंद वाटें. आणि वेळ आली तर तिच्यासाठी प्राणार्पणही करावयाचे असे ठरविण्याइतकी अथांगता, गहनता, निरपेक्षता त्याला आली होती. आता तो समय प्राप्त झाला होता. लूसीवर प्रसंग आला होता. फ्रान्समध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. सर्वत्र उन्मत्त, अनिर्बंध, वेबंद, धुंद वातावरण होते. सिडने कार्टनने तुरुंगाच्या कोठडीत प्रवेश मिळविला, गुंगीचे औषध देऊन चार्लसला बेशुद्ध केले आणि मित्रांच्या साह्याने त्याला डॉ. मॅनेटकडे पोचविले व रूपसाम्याचा फायदा घेऊन आपण तेथे बसला. क्रान्तीला काय, नगाला नग हवा होता. तिने चार्लस समजूनच त्याला गिलोटिनवर बळी दिले! आणि कार्टन सुखाने बळी गेला. प्रेमासाठी !
 दोन रेखा भक्ती, प्रेम, सूडबुद्धी, खुनशीवृत्ती, असूया, वात्सल्य, या भावना मनुष्याला कशा प्रेरित करतात, त्याला अत्यंत उदात्त वा अत्यंत नीच अशा कृत्यांना कशा प्रवृत्त करतात हे दर्शविणें हाही जीवनभाष्याचाच एक भाग आहे. सिडने कार्टन व मॅडम डेफार्ज यांच्या रेखा काढून डिकन्सने प्रेम आणि सूडबुद्धी या प्रेरणांचे सामर्थ्य काय ते या कादंबरीत दाखविले आहे. सिडने कार्टन याच्या उदात्त प्रेमानें, त्याला प्रतिसाद मिळाला नाही तरी, आपल्या प्रेयसीच्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी आणि पर्यायाने तिला सुखी करण्यासाठी आत्मबलिदान करण्यास त्याला प्रवृत्त केले. तर मॅडम डेफार्ज हिच्या सूडबुद्धीने तिचा सारासार विवेक नष्ट करून तिची बुद्धी इतकी विकृत करून टाकली की, खरा जुलमी, अत्याचारी सरदार एव्हरमांड जगातून नाहीसा झाल्यावर, आणि त्याच्या पुतण्यालाही देहदंडाची शिक्षा झाल्यावरही तिचा आत्मा शांत झाला नाही. त्याची निष्पाप पत्नी व त्याचे निरागस बालक यांचाही बळी घेतला पाहिजे, त्या एव्हरमांडच्या पापांसाठी त्यांनाही जबाबदार धरून त्यांनाही गिलोटिनखाली लोटले पाहिजे अशी घोर वासना तिच्या चित्तात होती. आणि ते दृश्य मोठे सुंदर होईल असे वाटण्याइतकी हृदयशून्य ती झाली होती. त्या सूडबुद्धीने तिला उलट्या काळजाची डाकीणच बनविले होते. ही डेफार्ज म्हणजे क्रान्तीचे एक प्रतीक होते.
 तत्त्वज्ञानाची निशा मानवी जीवनात आणखी एक सत्य डिकन्सने या कादंबरीत मूर्त केले आहे. स्वार्थ, हिंसा; अनाचार, काम, मोह, लोभादी वासना या मुळातच हानिकारक असतात. पण त्यांना तत्वज्ञानाचे, म्हणजे जुन्या भाषेत धर्माचे रूप लोकांनी चढविले की त्या शतपट भयानक होतात. जुनी राजवट नष्ट होऊन माणसांच्या पशुवासना फ्रेंच क्रान्तीत उसळून आल्या. एरवी त्या वासनांना लोकांनी वासनाच म्हटले असते व त्यांचा धिक्कार केला असता. पण आता स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसाठी हिंसा, अत्याचार, लूट, अवश्य आहेत, असे तत्त्वज्ञान या अत्याचारी लोकांनी रचले व मग त्यांच्या अत्याचारांना सीमा राहिली नाही. अशा वेळी माणसे पशुहूनही खाली जातात. एखादे दिवशी गिलोटिनवर बळी कमी गेले तर क्रान्तिकारकांना वाईट वाटत असे. कर्तव्यात आपण चुकलो अशी रुखरुख त्यांना लागे. तत्त्वज्ञानाची, धर्माची निशा ही मद्याच्या निशेपेक्षा शतपटीने जास्त घातक असते, हे डिकन्सने या कादंबरीत उत्तम रोतीने दाखविले आहे.
 क्रान्तीला मूर्तरूप आणि ते सर्व कलात्मक पद्धतीने अमूर्त तत्त्वांना मूर्तरूप देऊन, सार्वजनिक समस्या कौटुंबिक जीवनात गुंतवून, अखिल समाजाचे जीवन ज्यांच्या चरित्रांतून दिसेल अशा व्यक्तिरेखा निर्माण करून आणि सर्वत्र त्यांच्या सुखदुःखाच्या, रागद्वेषाच्या कथेचा धागा अनुस्यूत ठेवून मुळात ही दोन नगरींची कथा असली तरी, ती कथा वर्णावी व क्रान्तीचे रूप दाखवावे असा आपला स्पष्ट हेतू लेखकाने व्यक्त केला असला तरी, वाचकांना प्रत्यक्षात ती एव्हरमांड, मॅनेट, व डेफार्ज या घराण्यात, त्या कुटुंबीयांची कथा दिसते. ई. एम्. फॉर्स्टर या कादंबरी विषयी लिहिताना म्हणतात की, 'काही साध्या, सामान्य व्यक्तांच्या कौटुंबिक जीवनात एवढ्या प्रचंड, भयानक राष्ट्रीय घटनेचे धागे अशा रीतीने गुंफले आहेत की, एक दुसऱ्याचा अविभाज्य घटक आहे असे वाटावे. अशा तऱ्हेची दुसरी कादंबरी माझ्या वाचनात नाही.'
 फ्रेंच क्रान्तीचे इतिहास अनेकांनी लिहिले आहेत. पण न्याय, कायदा, विवेक, तारतम्य, समतोल या गुणांनी संपन्न इंग्लिश मन आणि अविवेक, निरर्गलता, उन्माद, विकारवशता यांनी पिसाट बनलेले फ्रेंच मन यांचे इतके भेदक दर्शन कोणी क्वचितच घडविले असेल.
 रजपूत आणि मराठा हरिभाऊ आपटे यांनी आपल्या उषःकाल या कादंबरीत रजपूत मन आणि मराठा मन यांच्यातील भेद असाच विशद करून दाखविला आहे. प्रत्येक समाजाची काही मूल्ये ठरलेली असतात. त्या मूल्यातील भेदामुळेचं समाज परस्पराहून भिन्न होतात. त्यामुळेच त्यांचे भवितव्य बदलते. या मूल्यांचे रूप स्पष्ट करून त्यांचा तरतमभाव दाखविणे व त्यांवर आपला अभिप्राय, त्याविषयीचा आपला दृष्टिकोण आविष्कृत करणे हेच कवीचे कार्य असते. जीवनभाष्य ते हेच: 'उषःकाल' कादंबरीत हरिभाऊंनी रजपूत व मराठे यांच्या संस्कृतीतील भिन्न मूल्यांना याच हेतूने सरूप केले आहे.
 विवेकहीन शक्ती भारतावरील मुस्लीम आक्रमणाला प्रथम रजपुतांनी तोंड दिले. आणि पुढे अनेक शतके त्या आसुरी सत्तेशी मोठ्या शौर्याने व धैर्याने लढा दिला. पण त्या सत्तेची पाळेमुळे खणून तिचे निर्दाळण करण्यात त्याना यश आले नाहीच तर उलट अखेरीस सर्व राजस्थानच नामोहरम होऊन त्याला मुस्लीमांचे मांडलीकत्व पतकरावे लागले आणि त्यांना आपल्या कुलकन्या देऊन सूर्यचंद्रवंशाच्या कीर्तीला कलंक लावून घेण्याचे त्यांच्या नशिबी आले ! याचे कारण काय ? रजपुतांच्या ठायी शौर्य होते, शक्ती होती. पण तिला युक्तीची जोड नव्हती. ते अत्यंत साहसी होते. पण त्या साहसामागे विवेक नव्हता. त्यांनी त्यांच्या स्त्रीपुरुषांनी सहस्त्रसंख्येने मृत्यूला कवटाळले पण ते विजयासाठी केलेले आत्मबलिदान नसून निराशेने केलेला तो आत्मघात होता. स्त्रीच्या पावित्र्यासंबंधी रजपुतांच्या मनात अगदी अतिरेकी कल्पना होत्या. पण प्रत्यक्षात काय झाले? प्रत्येक रजपूत कुलकलंकित झाले. अशा रीतीने विवेक, सावधता, वास्तवदृष्टी यांच्या अभावी रजपुतांचे सर्व शौर्य, धैर्य, सर्व त्याग, सर्व पराक्रम वाया गेला आणि ते स्वातंत्र्य व पावित्र्य दोन्ही गमावून बसले.
 शिवछत्रपतींच्या पूर्वी मराठ्यांनी या रजपूत संस्कृतीचाच वारसा चालविला होता. म्हणून मुस्लीम आक्रमणापुढे त्यांनाही शरणागती पतकरावी लागली होती. पण छत्रपतींनी ही सर्व अविवेकी संस्कृती पालटून टाकली आणि सावधता, विवेक, युक्ती, वास्तवता यांची राजकारणाला जोड दिली. म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांना यश आले. बहुतेक इतिहासकारांनी मान्य केलेला हा सिद्धान्त हरिभाऊंनी उषःकालात साकार, सगुण केला आहे.
 सावधता सुल्तानगडचे किल्लेदार रंगराव अप्पा यांचा मुलगा नानासाहेब हा राजपूत संस्कृतीचा वारस आहे. अविवेकी साहस, वेसावध शौर्य यांचा हा मूर्तिमंत पुतळा आहे. मारुतीच्या आसनाखाली त्याला एका गुहेचे, तळघराचे द्वार दिसताच त्याने बेशक आत उडी झोकून दिली. यात त्याचा निघडेपणा दिसून आला. पण तशीच विवेकशून्यताही दिसली. रंगराव अप्पांना व त्याच्या पत्नीला मोंगलांनी धरून नेले त्या प्रसंगी त्याची हीच वृत्ती प्रगट झाली. 'याच पावली जाऊन ज्यांना व तिला सोडविणे अगर त्यापायी आपला प्राण देणे हे माझे मुख्य कर्तव्य होय' असे तो म्हणाला त्यावेळी श्रीधरस्वामींनी त्याला जे उत्तर दिले ते मराठ्यांनी जे परिवर्तन घडवून आणले त्याचे उत्तम निदर्शक आहे. ते म्हणाले 'अरे, असला वेडेपणाचा विचार करू नको. झाली ही विटंबना केवळ तुझी नाही. ती आपली सगळ्यांची, सगळ्या मराठ्यांची आहे. जो तुझा मानापमान तोच आमचा, हे तू पक्के समज.' एकाचा अपमान तोच सर्वांचा हे तत्त्व रजपुतांच्या इतिहासात प्रत्यक्षात कधीच आले नाही. 'रूपनगरची राजकन्या' ही हरिभाऊंची कादंबरी पहा, एका रजपुत कुळाचा अपमान झाला तर सर्वानी संघटित होऊन उठावे. रजपुत तेवढा मेळवावा' हे राजस्थानात घडत नाही. त्याची खंत सर्वाना वाटते. पण संघटनेची पथ्ये पाळण्यास ते तयार नाहीत. रजपुतांचे सर्व शौर्य वैयक्तिक होते. त्यांचा वैयक्तिक संताप होता. सामूहिक संताप ही संस्कृतीच भारतातून नष्ट झाली होती. महाराष्ट्राच्या उषःकाली ती निर्माण झाली. श्रीधरस्वामी हे समर्थांचे शिष्य त्यांच्या सर्व क्रान्तितत्त्वांचे प्रतिनिधी म्हणून ते या कादंबरीत उभे आहेत.
 श्रीधरस्वामींना विजापूरचा सरदार सर्जेखान याने पकडून नेले व पुरंदराव तळघरात तुरुंगात टाकले. त्यावेळी 'मी एकटा जाऊन त्यांना सोडवून आणतो' असे नानासाहेब म्हणू लागला. तेव्हा शिवाजीराजे त्यांना म्हणाले, 'पुरंदर किल्लयाची तुम्हांला माहिती नाही आणि तुम्ही ही कसली प्रतिज्ञा करता? प्रस्तुत गोष्ट केवळ मर्दुमकीने होणारी नव्हे. येथे डावपेच केले पाहिजेत. तुम्हाला हे साधणार नाही.' 'आंधळ्या वैयक्तिक शौर्याने काही साधत नसते,' हाच महाराजांच्या मनातील आशय होता. विजापूरला जाण्याच्या प्रसंगी महाराजांनी पुन्हा त्याला हाचं उपदेश केला होता. ही कामे दंगामस्तीने होणारी नव्हेत. शत्रूच्या डोळ्यांत धूळ फेकून ती साधली पाहिजेत. सिद्धी होणार यात शंका नाही. पण आई जगदंबेने सांगितल्याप्रमाणे सावधपणा मात्र ठेवला पाहिजे.' पण नानासाहेबाला हे उमगलेच नाही. विजापूरला भुताटकीच्या घरात असताना, अहमदाच्या चिठीवर विश्वास ठेवून तो कसलीही सावधगिरी न घेता मध्यरात्री बाहेर एकटा गेला आणि त्याच्या जाळ्यात सापडला. औरंगजेबाने हरएक प्रसंगी रजपूत सरदारांना दग्याने मारले होते. पण हे ध्यानी ठेवून रजपूत कधी सावधपणे वागलेच नाहीत. नानासाहेब त्याच परंपरेतला होता. मराठ्यांनी प्रत्येक ठिकाणी चाणक्यनीतीचा अवलंब करून तोडीस तोड केली म्हणून त्यांना यशःप्राप्ती झाली. या त्यांच्या राजनीतीला 'शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे, शक्तियुक्ती मिळे जेथे, तेथे श्रीमंत नांदती'– या तत्त्वाला मूर्तरूप देण्यासाठीच हरिभाऊंनी ही कादंबरी लिहिली असे दिसते.
 शक्तियुक्ती मिळे तेथे विजापूरचा एक सरदार सयदुल्लाखान याने रामदेवरावांना फसवून त्यांची स्त्री रंभावती हिला बादशहाच्या जनानखान्यात घातले होते. त्या कृत्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा रामदेवरावांनी केली होती. विजारपूचा दुसरा एक सरदार रणदुल्लाखान याची बहीण मेहेरजान ही एकदा सुलतानगडावर रंगराव अप्पा यांचेकडे येऊन राहिली होती. तिलाही तेथून पळवून नेऊन बादशहाच्या जनानखान्यात घालावी असा सयदुल्ला याचा नीच डाव होता. गडाखाली यासाठी त्याने दोनतीनशे लोक आणून ठेविले होते. रामदेवरावांनी ही सर्व वार्ता महाराजांना दिली. तेव्हा त्याला खालच्या खालीच दाबून टाकून त्याचा परवलीचा शब्द वापरून, त्याचेच लोक आपण आहोत, असे भासवून महाराजांनी किल्ल्यावर प्रवेश मिळविला व तेथील शिवंदीचा पराभव करून गड ताब्यात घेतला व सयदुल्लाचा डाव हाणून पाडला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ उभारली. शक्ति-युक्तीची मिळणी ती ही होय.
 स्त्रीची परीक्षा रजपुतांच्या आंधळ्या, आत्मघातकी व परधार्जिण्या राजनीतीचे स्वरूप, तिच्यामागे विवेक उभा करून, मराठ्यांनी ज्याप्रमाणे पालटून टाकले त्याचप्रमाणे स्त्रीच्या पावित्र्याविषयीच्या रजपुतांच्या अतिरेकी कल्पनाही पालटून त्यांना विवेकनिष्ठ रूप दिले. स्त्रीच्या शीलाविषयी नुसती शंका आली तरी राजपूत दृष्टीला ती भ्रष्ट वाटे. आणि तिला देहान्ताखेरीज दुसरा मार्ग नाही अशी त्यांची स्त्रीविषयक दृष्टी तारतम्यशून्य होती. सरदार रामदेवराव यांच्या पत्नीला सयदुल्लाखानाने बादशहाच्या जनानखान्यात घातले होते. तिला फसवून त्याने हा डाव साधला होता. पण तेथे गेल्यावर शील रक्षणासाठी तिने प्राणत्याग करावयास हवा होता; तो न करता ती त्या विलासात राहिली याचा रामदेवरावांना अत्यंत संताप आला होता. म्हणून काजीच्या वेषात त्यांनी वाड्यात प्रवेश मिळवून तिला स्वतःच ठार मारण्याचा विचार केला. वास्तविक रंभावती ही सुखाने जिवंत राहिली नव्हती. 'तू जिवाचे बरेवाईट केलेस तर रामदेवरावांना आम्ही ठार मारू' अशी बादशहाने तिला धमकी दिली होती. व रामवदेरावांनी सयदुल्लाखानाला ठार मारल्याचे, आपल्या विटंबनेचा सूड उगविल्याचे कानांनी ऐकावे अशी तिची इच्छा होती. त्यामुळे पतीला ओळखताच ती म्हणाली, तुमच्या हातून मरण येण्याचे भाग्य मला मिळेल, असे स्वप्नातही मला वाटले नव्हते. पण तुम्ही आला आहात. तर आता आधी मला ठार मारून या नरकातून मुक्त करा.' ती असे म्हणाल्यामुळे रामदेवरावाचे मन डळमळले. पुढे सयदुल्लाखानाला त्याने ठार मारले व पुन्हा तो वाडयात आला. व 'मृत्यूला आता तयार हो, घे जहराचा घोट,' असे तिला म्हणाला. तिने सहजच विचारले, 'त्याला तुम्ही ठार मारलेत ना ?' त्यावर छद्मीपणाने हसून रामदेवराव म्हणाले, 'हो हो. का ? तुला वाईट वाटते का काय ?'
 या प्रश्नाने रंभावतीच्या मनाला अत्यंत वेदना झाल्या. जहराची कुपी तोंडाशी नेत ती म्हणाली, 'हो वाईट वाटते. पण ते अशासाठी की माझी परीक्षा तुम्हाला मुळीच झाली नाही. आता या घुटक्याने तरी होवो.'
 भारतातल्या स्त्रियांची आज हजारो वर्षाची ही तक्रार आहे. पतीसाठी त्या वनवास पतकरतात, सरणावर उड्या घेतात, मृत्यूला कवटाळतात. पण त्यांच्या मनाची परीक्षा त्यांच्या पुरुषांना होत नाही. सीतेवर रामचंद्रांनी गलिच्छ आरोप केले तेव्हा ती म्हणाली, 'माझं मन माझ्या स्वाधीन होतं ते तुम्हांला अर्पण केलं. पण मी अबला, माझं शरीर पराधीन, तिथे मी काय करणार?'
 नानासाहेबाची पत्नी, चंद्राबाई हिची हीच प्रार्थना होती की, आपली परीक्षा आपल्या पुरुषांना व्हावी. सुलतानगडावर बादशहाच्या हुकमाने सयदुल्लाखान येणार व गडकऱ्यांना- आपल्या श्वशुरांना कैद करून नेणार ही बातमी कळताच तिला आपले भवितव्य कळून चुकले. म्हणून तो येण्याच्या आतच पुरुषी वेष घेऊन एका मोलकरणीला बरोबर बेऊन ती गुप्तपणे माहेरी जाण्यास निघाली. पण दुर्दैवाने वाटेत ती रणदुल्लाखानाच्या हाती सापडली. सयदुल्लाखानाऐवजी गडकऱ्यांना कैद करून नेण्यास तो आला होता. तो मोठा भला गृहस्थ होता. रंगराव अप्पांचा मित्र होता. त्याने ही स्त्री आहे हे ओळखले होते. तरी तिला रंगरावांच्या स्वाधीन न करता, त्याने विजापुरास नेले. तेथे काही दिवसांनी त्याला पश्चात्ताप होऊन, तिच्या केसालाही धक्का न लावता, त्याने तिला सोडून दिले, त्याच वेळी विजापुराहून नानासाहेब परत येत होता. तिला वाटले, बरे झाले, धन्यांची सोबत झाली. पण परगृहवास घडलेली पत्नी अजून जिवंत राहिली याचा त्यांना संताप आला होता. 'आमच्या कुळाला तू कलंक लावलास, एकदा बाट लागल्यानंतरही मला तोंड दाखवायला येतेस, त्यापेक्षा नरकात का नाही गेलीस?' अशी त्याने तिची निर्भर्त्सना केली. 'तसे काही असत तर मी जिवंत राहिलेच नसते' असे ती म्हणाली. पण त्याने ते ऐकले नाही. त्याचे एकच म्हणणे, 'रजपुतांचं खरं रक्त तुझ्या अंगी असेल तर आत्ताच्या आत्ता पलीकडच्या रानात जाऊन तोंड काळं कर!' पुढे गडावर गेल्यावर मेहेरजानने त्याला सांगून पाहिले. चंद्राबाई रणदुल्लाखानाकडे असताना ती मेहेरजानजवळच होती. 'तुमची पत्नी, निष्कलंक आहे याचा निर्वाळा मी देते,' असे तिने अनेक प्रकारे सांगितले, तेव्हा त्याचा संशय फिटला. पण मन अगदी साफ झाले नाही. शेवटी सुलतानगड महाराजांनी घेतल्यावर किल्ल्यावर समर्थांची स्वारी आली. तेव्हा नानासाहेब दर्शनास गेला. तेव्हा समर्थांनी आशीर्वाद देताना म्हटले, 'केली मात उत्तमच. पण साध्वीविषयी भलतेच तर्कवितर्क मनात आणू नयेत. त्यापासून कधीही कल्याण नाही.' या उद्गारांमुळे नानासाहेब चकित झाले आणि 'समर्थांची आज्ञा वंद्य आहे,' असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले.
 स्त्रीपांवित्र्याच्या अतिरेकी, अविवेकी कल्पनांचा पगडा, रजपूत वारशामुळे मराठ्यांच्या मनावर होता. तो समर्थांनी अशा रीतीने नष्ट करून टाकला व स्त्रीला थोडी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असा हरिभाऊंचा आशय.
 जनता शक्ती मराठ्यांनी रजपुतांच्या शौर्याच्या कल्पना बदलल्या, त्यांची युद्धनीती त्याज्य ठरवून व्यावहारिक, वास्तव रणनीतीचा अवलंब केला आणि स्त्रीच्या पावित्र्याविषयीचा दृष्टीकोण पालटून त्याला उदार रूप दिले. यात सांस्कृतिक क्रान्ती आहेच. पण यापेक्षाही एक मोठी क्रान्ती मराठ्यांनी केली होती. तिचे रूप हरिभाऊंनी कसे स्पष्ट केले आहे ते पाहू. 'सामान्य जनांचा असंतोष हेच सर्व राज्य क्रान्त्याचे आदिकारण होय' असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. 'मराठा तेवढा मेळवावा' या समर्थांच्या संदेशाचे हेच सार आहे. शिवछत्रपतींचे हेच तत्त्वज्ञान होते. श्रीधर स्वामींच्याबरोबर चर्चा करताना ते म्हणत, 'आपल्या कार्याला सरदार लोकांचे साह्य फारसे होणार नाही. त्यांपैकी काही तरुण मिळाले तर मिळतील. पण बहुधा गरीब गुरीब लोकांवर आपण भिस्त ठेवली पाहिजे. सरदारांत आपसात तंटेबखेडे असून एकावर प्रसंग आली तर इतरांना त्यांचे काही वाटत नाही. आपली व आपल्याकुलाची दरबारी बडेजावी कशी होईल, इकडेच त्यांचे लक्ष असते. यामुळे कोणी कोणास मदत करील व सगळे मिळूनं मराठी राज्याची स्थापना करतील हा संभव दिसत नाही. तेव्हा आपण या जुन्या सरदारांचा नाद सोडून सामान्य जनातून नवे सरदार निर्माण केले पाहिजेत.' हे सर्व महाराजांनी कसे घडविले, सर्व महाराष्ट्रात सामान्य जनशक्ती त्यांनी कशी जागृत केली, याचे वर्णन अनेक ठिकाणी हरीभाऊंनी केले आहे, सावळ्या हे या जनशक्तीचे उत्तम प्रतीक आहे. सुभान्याला तो एकदा म्हणालाच होता, 'हे बघ सुभानदादा, हा पोऱ्या असा तसा नाही राहयचा. एक दिवस सरदार होणार, सरदार !' जिव्या, यम्या हे याच वर्गातले लोक. हे कोकणातले हेटकरी होते. पण त्यांच्या अंगचे गुण पाहंताच त्यांना महाराजांनी वर उचलले. येसाजी, तानाजी हे नवे सरदार शेतकरी वर्गातून महाराजांनी निर्माण केले हे इतिहासच सांगतो आहे.
 सरदारवर्ग स्वराज्याच्या कार्यापासून कसा अलिप्त होता ते रंगराव अप्पा व रामदेवराव यांच्या व्यक्तिरेखांच्याद्वारे हरिभाऊंनी उत्तम रीतीने दाखविले होते. 'रंगराव अप्पांची दीर्घ काळची सेवा ध्यानात न घेता, बादशहाने त्यांना कैद करून त्यांचा अपमान केला; तेव्हा निराश होऊन त्यांनी ठरविले काय तर काशीला निघून जावयाचे. तो त्यांचा धर्म ! त्यांचा स्वराज्याशी काही संबंध नव्हता. नानासाहेब शिवाजीराजांकडे गेला म्हणून आपला कारटा मेला असे ते म्हणत. राजांनी सुलतानगड काबीज केल्यावर त्यांचा मान राखला आणि आपल्या पक्षाला मिळण्याची त्यांना विनंती केली. पण त्यांच्या लेखी ते पाप होते, तो स्वामिद्रोह होता! रामदेवरावांना तसे वाटत नव्हते. सयदुल्लाखानाने पत्नीला बादशहाच्या जनानखान्यात घातले म्हणून ते सूडभावनेने नुसते जळत होते. राजांनी सुलतानगड घेतला त्यावेळी त्यांना सर्व वार्ता त्यांनीच पुरविली होती. डावपेच कसे लढवावे हे त्यांनीच सांगितले होते. पण यावेळी शिवबाराजांच्या मनांतला हेतू काय होता हे माहीत असूनही ते त्यांना येऊन मिळाले नाहीत. त्यांनी पुरविलेल्या माहितीचा राजांनी हवा तर उपयोग करून घ्यावा, रामदेवरावांना त्यांच्या कार्याचे सोयरसुतक काही नाही. मग त्याचे कार्य काय ? तर सयदुल्लाखानाला ठार मारणे, सूड उगविणे. वास्तविक सुलतानगड घेण्याने ते साध्य होतच होते. पण स्वराज्यापासून रामदेवराव अलिप्त होते. 'आपली विटंबना म्हणजे सर्व मराठ्यांची विटंबना, आपल्या पत्नीप्रमाणेच सर्व महाराष्ट्राच्या कुलस्त्रिया बळी पडत आहेत, त्यांचे रक्षण करणे हा आपला धर्म होय, हे त्यांच्या मनातही आले नाही. ती जाणीव महाराष्ट्रात निर्माण करणे हीच क्रान्ती होय. हीच नवी मराठी संस्कृती होय.
 राजस्थानात अशी क्रान्ती कोणी केलीच नाही. उदेपूर, जयपूर, बुंदी, कोटा, अजमीर, जोधपूर येथले सर्व राजे आपापल्या उच्च वंशाच्या अभिमानात बेहोष होते. प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानीत होता आणि सर्व मोगलांपुढे नमत होते. 'रूपनगरची राजकन्या' या कादंबरीत या रजपूत मनोवृत्तीचे हरिभाऊंनी उत्तम चित्रण केले आहे. या राजकन्येला औरंगजेबाने मागणी घातली होती. त्याप्रसंगी राजसिंहाने थोडे संघटित सामर्थ्य निर्माण करताच औरंगजेबाचा रजपुतांना सहज पराभव करता आला. पण यावरून अखिल राजस्थानची शक्ती एकवटावी, रजपूत तेवढा मेळवावा, असे कोणा राजा महाराजाच्या मनात आले नाही. 'रूपनगरची राजकन्या' या कादंबरीत सामान्य जनतेचा कोठे चुकूनसुद्धा संबंध येत नाही. आणि 'उषःकाल' मध्ये पानोपानी त्या महाशक्तीला मूर्त रूप देऊन शिवछत्रपतींनी तिच्या साह्याने स्वराज्याचा उषःकाल कसा क्षितिजावर आणला त्याचे वर्णन आपल्याला आढळते.