साहित्यातील जीवनभाष्य/दलित जीवन

विकिस्रोत कडून




३ द लि त जी व न



 त्यांची दैवी संपदा दलितांचे जीवन हा जगातल्या मोठमोठया साहित्यिकांनी निवडलेला विषय आहे. आणि अशा थोर लेखकांनी दलितांविषयी लिहिलेल्या कादंबऱ्या, नाटके, लघुकथा वाचताना एक मोठी विस्मयकारक गोष्ट ध्यानात येते. जगात सर्वत्र थोर मनाची लक्षणे सारखीज दिसतात. सौ. हॅरियट स्टोव्हे यांनी अमेरिकेतील निग्रो गुलामांच्या जीवनावर 'अंकल टॉमस् केबिन' कादंबरी लिहीली आहे. दारिद्र्य जुलूम, फसवणूक यांमुळे पतित, गुन्हेगार बनलेल्या अभागी जीवाची कथा व्हिक्टर ह्यूगो याने 'ला मिझरेबल्स्' या कादंबरीत वर्णिली आहे. अस्पृश्य, आदिवासी व गुन्हेगार ठरविलेल्या जमाती यांच्यावर प्रा. श्री. म. माटे यांनी 'उपेक्षितांचे अतरंग' या नावाने लिहिलेल्या कथा प्रसिद्धच आहेत. या सर्व अभिजात लेखकांनी या दलिताचे वर्णन करताना एक मुखाने एक सिद्धान्त सांगितलेला दिसतो. ते गुलाम, ते गुन्हेगार, ते अस्पृश्य, यांचे अंतरंग समाजात उच्चपदी राहाणाऱ्या, वरच्या थरावर चढलेल्या श्रेष्ठ वर्गात गणलेल्या लोकांच्या अंतरंगाइतकेच गुणसंपन्न आहे. ध्येयनिष्ठा, त्याग, सत्यप्रेम, माया, वात्सल्य, पातिव्रत्य, दया, क्षमा ही दैवी संपदा बीजरूपाने त्यांच्याही चित्तात वरच्या वर्गासारखीच आहे. दारिद्र्य, अज्ञान, गुलामगिरी यांमुळे त्या बीजांना विकसण्यास अवसर मिळत नाही. तो मिळाला तर त्यांच्यातूनही या संपदेने संपन्न असे थोर महात्मे निर्माण होऊ शकतात. आणि मिळाला नसतानाही, बाह्यतः जरी हे लोक आसुरी संपत्तीचे वारस असे दिसत असले तरी त्यांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण केले, सहानुभूतीने, आपलेपणाने त्यांच्या अंतरंगात डोकावले तर दैवी संपदेची गंगोत्री तेथे निश्चित दिसून येते. ते अंतरंग या थोर कवींनी जगाला दाखवून दिले ही त्यांची फार मोठी सेवा होय. साहित्याची कृतार्थता कशात जर दिसून येत असेल तर ती त्याच्या या ललितकृतीत दिसून येते. साहित्याच्या क्षेत्रात जीवनभाष्याचा महिमा काय आहे ते त्यांच्या या अक्षर साहित्यावरून स्पष्ट होते.
 १ निग्रो गुलाम वात्सल्य, अपत्य प्रेम हा मातेचा अमोल गुण. आपल्या बाळासाठी सर्वस्वाचा त्याग करणे हे त्यांचे प्रधान लक्षण. 'अंकल टॉमस् केबिन' या कादंबरीत स्टोव्हे यांनी निग्रो स्त्रीच्या ठायीसुद्धा या गुणाचा परम उत्कर्ष असू शकतो हे आपल्याला दाखविले आहे. एलिझा ही निग्रो तरुण स्त्रीच्या, जॉर्ज या एका गुलामाची बायको. श्री. शेल्बी यांच्याकडे ती गुलाम म्हणून कामाला होती. हे शेल्बी मोठे कनवाळू गृहस्थ होते. ते गुलामांना मायेने वागवीत असत. पण दैववशात ते कर्जबाजारी झाले व कर्जाच्या फेडीत गुलामांना विकण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला. अंकल टॉम हा त्यांचाच गुलाम. सावकार हॅले याला त्याला विकण्याचे त्यांनी ठरविले. पण हॅले तेवढ्यावर कबूल होईना एलिझाचा मुलगा भरीला द्या, अशी मागणी त्याने केली. शेल्बीना नाइलाजाने ती कबूल करावी लागली. एलिझाला ते कळले मात्र. रात्र पडताच मुलाला घेऊन ती पळाली. अमेरिकेत त्यावेळी या गुन्ह्याला मृत्यूचीच शिक्षा होती. पण तरी एलिझाने ते साहस केले. वाघासारखे शिकारी कुत्रे घेऊन हॅले तिचा पाठलाग करीत होता. समोर नदीला तुफान आले होते. पण बाळाला हृदयाशी धरून त्या मातेने त्या अस्मान लाटांत उडी फेकली. आणि ती सुखरुप परतीराला पोचली. तिला हे बळ कोठून आले ? जगातल्या सर्व मातांना येते तेथूनच ! स्टोव्हे म्हणतात, 'हृदयाशी बिलगलेल्या त्या बालकाच्या स्पर्शाने, त्याच्या निरागस मुद्रेने तिच्या अंगात विजेचा संचार झाला. मनाची या जड शरीरावर चालणारी शक्ती मोठी अद्भूत आहे. ती काही क्षणी त्याला पोलादी बळ देते आणि मग दीनदुबळे हे समर्थ होतात.'
 सीनेटर बर्ड नदी ओलांडून एलिझा पलीकडल्या ओहिओ स्टेटे मध्ये शिरली आणि तेथले सीनेटर बर्ड यांच्या घरी आश्रयाला गेली. या सीनेटर बर्डनी त्याच दिवशी सीनेटमध्ये स्वतः ठराव मांडून एक कायदा पास करुन घेतला होता. मालका पासून पळून गेलेल्या निग्रो गुलामांना जो आश्रय देईल, मदत करील त्याला या कायद्याने मोठी शिक्षा ठेवली होती. सौ. बर्ड या फार मायाळू होत्या. असला कायद केल्याबद्दल त्या पतीवर फार रागावल्या होत्या. हे ख्रिश्चन धर्माविरुद्ध आहे, माणुसकी विरुद्ध आहे, असे त्या सांगत होत्या. सीनेटर बर्ड त्यांना युक्तिवाद सांगत होते. पण त्या म्हणाल्या काही सांगू नका, मी फक्त बायबल जाणते. भुकेल्यांना अन्न द्यावे, उघड्याना वस्त्र द्यावे, अनाथाला आश्रय द्यावा एवढेच मला माहीत आहे. तुमचा कायदा मूर्तिमंत पाप आहे' सीनेटर बर्ड जरा त्रासूनच गेले होते. इतक्यात एलिझा मुलाला घेऊन त्यांच्या घरी आश्रयाला आली. अर्थात सौ. बर्ड यांनी तिला आश्रय दिला, तिची सेवा शुश्रूषा मुलीप्रमाणे केली, तिला जेवू घातले आणि तू येथे निश्चिंत रहा, असे आश्वासन दिले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की सीनेटर बर्ड यानीही तेच केले. एलिझाला पाहून त्यांचे त्यांचे मन इतके विरघळले की, स्वतः त्याच दिवशी केलेला कायदा त्यांनी मना आड केला. आणि बायको पेक्षाही तिची जास्त काळजी करून तिच्या पतींला तेथे आणून त्या दोघांनाही कॅनडात पळून जाण्यास सर्वतोपरी साह्य केले. या प्रकरणाला लेखिकेने 'सीनेटरही शेवटी मनुष्यच असतो' असे नाव दिले आहे.
 निग्रो असूनही !  क्वेकर पंथीय लोकांनी एलिझा व जॉर्ज यांना प्रळून जाण्यास साह्य केले. वाटेत त्यांच्या मालकांचे लोक त्यांना पकडण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी आले होते. त्यांच्याशी जॉर्जने चांगला लढा दिला. आणि गोळ्या घालून त्यांना पळवून लावले. या प्रसंगी पुन्हा लेखिकेला दलितांचे अंतरंग दाखवावयाचे आहे. बायका मुलांच्या रक्षणासाठी निग्रो माणूसही प्राणावर उदार होतो, शौर्याने लढतो. इतराप्रमाणेच हेही गुण त्याच्याठायी आहेत. पण अमेरिकन गोरे लोक हे लक्षात घेत नाहीत. स्टोव्हे म्हणतात, आस्ट्रियन साम्राज्यशाहीच्या मगर मिठीतून सुटून आणि वाटेत आडविणाऱ्या त्यांच्या पोलिसांशी शौर्याने लढून हंगेरियन तरुण अमेरिकेत आले की आपण त्यांचे स्वागत करतो, त्यांच्या शौर्याची, धैर्याची वाहवा करतो. आणि तसेच शौर्य एखाद्या निग्रोने दाखविले तर? अमेरिकन गोरे लोक अर्थातच त्याला कुत्र्याच्या मोतीने मारणार ! पण त्याला पकडण्यास गेलेल्या लोकांपैकी आघाडीचे दोन लोक जॉर्जच्या गोळ्यांनी खाली कोसळले तेव्हा एकदोन गोरे लोकही विस्मित झाले. ते म्हणाले, 'अरे, हा निग्रो...! तरी अगदी निधडा आणि बेडर आहे, आश्चर्यच आहे!'
 निग्रोंच्या जीवनावर लेखिकेला हेच भाष्य करावयाचे आहे. अंकल टॉम ही व्यक्तिरेखा तिने त्यासाठीच निर्मिली आहे. पुष्कळ वेळा शेल्बी त्याच्याजवळ पैसे देऊन त्याला कामासाठी एकट्यालाच पाठवीत. त्यावेळी इतर निग्रो त्याला पळून जाण्याचा सल्ला देत. पण तो म्हणे धन्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी विश्वासघात करणार नाही. आणि हे व्रत त्याने केव्हाच सोडले नाही. त्याला शेल्बीनी विकल्याचे एलिझाकडून कळले होते. त्याची बायको त्याला पळून जाण्याचा आग्रह करीत होती. पण तो गेला नाही. 'धन्यांना मी संकटात टाकणार नाही. त्यांच्या शब्दाला बाध येऊ देणार नाही!'
 स्वर्गात भेद नाही  शेल्बीनी अंकल टॉमला विकल्यावर सेंट क्लेअर नावाच्या एका गोऱ्या जमीनदाराने त्याला घेतले. हा गृहस्थ शेल्वीपेक्षाही उदार होता. पण, त्याची बायको फार वाईट होती. ती खरी गोऱ्यावृत्तीची होती. माहेरुन सांसरी येताना तिने तेथली निग्रो मोलकरीण बरोबर आली होती. वास्तविक तिचे तेथे लग्न झाले होते, तिला मुले झाली होती. पण अमेरिकन कायदा निग्रोंना मनुष्य मानीत नसे. अर्थातच निग्रो स्त्रीला पती असतो, निग्रो पुरूषाला पत्नी असते, हे कायद्याला मान्य नव्हते. सौ. क्लेअर मोलकरणीला म्हणाल्या, 'तुला वाईट वाटायला काय झाले? मी तुला तिकडे दुसरा नवरा पाहून देईन? तेथे तुला मुले होतील. तेव्हा इथे राहण्याचा हट्ट धरू नको. आणि मुलांनाही बरोबर घेऊ नको. त्यांना आपण इथेच विकून टाकू. तू एकटीने माझ्याबरोबर आले पाहिजे' अशा घरी अंकल टॉम आला होता. पण मालक उदार होते. आणि मुख्य म्हणजे त्यांची मुलगी इव्हा हिला त्याचा लळा लागला होता. ही नऊ दहा वर्षाची मुलगी म्हणजे स्वर्ग वैकुठातील या लोकी चुकून आलेली देव कन्या होती. निग्रोंच्या दुःखाने ती इतकी दुःखी होई की, 'स्वर्गात काळा गोरा, निग्रो अमेरिकन असा भेद नाही. देवाच्या पायी सर्व सारखे' असे वडिलांनी सांगितल्यापासून देवाकडे जाण्याचा तिने ध्यास घेतला. आणि खरोखरीच वर्षभरात ती मनातले निग्रोंविषयींचे गाऱ्हाणे त्या दयामृत घनाला सांगायला निघून गेली !
 हेतु प्रधान कथा 'अंकल टॉम' ही कादंबरी उघड उघड हेतुप्रधान आहे. निग्रो लोकांवर होणारा अन्याय व त्याचे दुःख हाच तिचा विषय असून सध्याच्या निर्दय हृदयशून्य व अन्याय्य पद्धतीने त्यांच्या गुणांचा विकास कसा होऊ शकत नाही हेच दाखवून समाजाच्या मनात आफ्रिकनांच्याविषयी सहानुभूती जागृत करणे हा या लेखनामागे हेतू आहे, असे लेखिकेने स्वतःच सांगितले आहे. या कादंबरीच्या अमेरिकेत १८५१-५२ या एका वर्षातच दीड लाख प्रती खपल्या. पुढील दोन तीन वर्षात इंग्लंडमध्ये दहा लाख प्रती गेल्या. नंतर तिची सर्व भाषांत भाषांतरे होऊन बायबलच्या खालोखाल ती खपू लागली. या अद्भुत यशाचे श्रेय मला वाटते, ईव्हा क्लेअर या बालिकेच्या रेखेला द्यावे लागेल. हे चित्र इतके हृदयस्पर्शी झाले आहे की, गुलामगिरी ही एक राक्षसी असुरी रूढी आहे हे कोणत्याही सहृदय माणसाला ते पाहताना वाटलेच पाहिजे, हेतुप्रधान कादंबरी लिहावी तर अशी ! प्रचार करावा तर असा !
 मी मरेन पण... ईव्हाच्या दुःखाने सेंट क्लेअर लवकरच वारले व मग अंकल टॉमला लेग्री या दक्षिणेकडल्या मळेवाल्याने विकत घेतले. तो अत्यंत क्रूर, निर्दय व हिडिस होता. कातडी फाटेपर्यंत गुलामांना फटके देणे हा त्याचा नित्यक्रम होता. एक दिवस एका मुलीला फटके मारण्याचे काम त्याने अंकल टॉमला सांगितले. मानवी जीवनातली दुःखद गोष्ट अशी की, बहुतेक वेळा दलित हेच दलिताना छळण्यात आनंद मानतात. अनेक निग्रो गुलामांना असल्या कामात आनंद वाटे. पण टॉम निराळा होता. बायबलवर व त्यांतील धर्मतत्त्वावर त्याची अचल निष्ठा होती. त्याने मुलीला फटके मारण्याचे काम आपल्याला सांगू नये, असे लेग्रीला विनविले. एका निग्रोने नकार द्यावा याचा लेग्रीला इतका संताप आला की त्याने आसुडाचा एक भयंकर प्रहार टॉमच्या तोंडावर मारला.
 'पुन्हा नाही म्हणशील ? बोल पुन्हा......'
 'होय धनी ! मी मरे मरेस्तवर वाटेल ते काम करीन. पण हे काम करणार नाही. हा अधर्म आहे. मी तो कधीही करणार नाही.'
 'तू ! तू मला धर्माधर्म शिकवतोस.' तुम्हा पशूंना धर्माधर्म कळतो होय.? यांचा भी बंदोबस्त करतो.' अगदी पिसाळून लेग्री बोलू लागला व फटक्यांनी टॉमची चामडी लोळवू लागला. 'बोल, १२०० डॉलर मी कशाला दिले ? तुझा धर्म ऐकण्यासाठी ? तू, तुझे शरीर, तुझा आत्मा सर्व मी विकत घेतले आहे की नाही ?'
 'नाही नाही, धनी. तुम्ही माझे शरीर विकत घेतले आहे. आत्म्याचा धनी परमेश्वर आहे. तो तुम्हांला कधीच विकत घेता येणार नाही. तेव्हा मी मरेन, पण असले काम करणार नाही.'
 काही दिवसांनी कॅसी व एमिलाईन या दोन स्त्रिया लेग्रीच्या मळ्यावरून पळून गेल्या. त्यांचा ठाव ठिकाणा अंकल टॉमला माहीत होता. पण लेग्रीने त्याला विचारले तेव्हा त्याने सांगण्याचे नाकारले तो म्हणाला मला ते माहीत आहे. तरी मी सांगणार नाही. त्यापेक्षा मी मृत्यू पत्करीन'
 आता लेग्रीचे पिशाच्चात रूपांतर झाले. तो जीव खाऊन अंकल टॉमला फटके मारू लागला. त्याची कातडी लोंबू लागली. तरीही, 'देवा, या लेग्रीवर दया करा, त्याला धर्म समजत नाही, त्याच्यावर दया करी' अशी प्रार्थना करीत करीतच टॉमने प्राण सोडले.
 देवाची इच्छा अंकल टॉम याला ही शक्ती कोठून आली? तत्वासाठी मरण पतकरावे हे नैतिक धैर्य म्हणजे मानवी गुणांच्या परमविकासाचे लक्षण होय. हे बळ, हे अलौकिक धैर्य टॉम याला त्याच्या धर्मनिष्ठेमुळे प्राप्त झाले होते. बायबल तो नित्यनियमाने पठण करीत असे आणि त्या धर्माचे आचरण करण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत असे. पशूंना धर्माधर्म काही असणे शक्य नाही, असे लेग्रीला व बहुसंख्य गोऱ्यांना वाटत असे. निग्रोंना आपण पशूंप्रमाणे वागवतो, त्यापेक्षाही हीन गणून त्यांचा सैतानी छळ करता, हे सर्व गोऱ्यांना दिसतच होते. हे वाईट आहे असे त्यांना वाटत असते तर त्यांना मनस्ताप होऊन हळूहळू त्यांना ते बंद करावे लागले असते. पण मानव अशा वेळी अशा नीच कृत्यानाही तत्त्वज्ञानाचे रूप देतो. सौ. स्टोव्हे यानी मानवाच्या या प्रवृत्तीचे उत्तम विश्लेषण केले आहे. निग्रोंच्या छळाविषयी एका ठिकाणी काही माणसे शिळोप्याचा वाद करीत होती. एका बाईने गोऱ्या लोकांच्या क्रौर्यावर टीका केली तेव्हा दुसरी म्हणाली, 'निग्रो हे गुलामगिरीतच जास्त सुखी असतात. ते स्वतंत्र झाले तर अनर्थ होईल.' 'ते कसेही असो. पण आईबाप, मुले, पतिपत्नी यांची ताटातूट करणे हे अगदी योग्य नाही.' 'ते खरे, पण आपल्याला जशा भावना असतात तशा त्यांना नसतात. आपल्यावरून तुम्ही त्यांचा हिशेब करू नका.' पलीकडे एक भटजी बसले होते. ते म्हणाले 'ही परमेश्वराची इच्छा आहे. सर्व आफ्रिकन गुलामच असले पाहिजेत अशी देववाणीच आहे.' असे म्हणून त्यांनी बायबलमधले एक वचनही सांगितले. 'बरोबर आहे' दुसऱ्याने त्यांना साथ दिली. 'देवाने त्याच जन्माला त्यांना घातले आहे. तेव्हा आपण त्याच्या इच्छेविरुद्ध बोलणे हे पाप होय.'
 सत्य व कल्पित अशा तऱ्हेच्या तत्वज्ञानावाचून, या श्रद्धेवाचून माणूस दीर्घकाळ पर्यंत कोणचीही रुढी, कोणताही आचार, कोणतीही समाजव्यवस्था दीर्घकाळ टिकवून धरू शकणार नाही. सौ. स्टोव्हे यांनी मानवी जीवनाचे हे मर्म जाणले होते. हे अंकल टॉमच्या या कथेत ठायी ठायी दिसून येते आणि यासाठीच अमेरिकनांनी निग्रो विषयी बनविलेले तत्वज्ञान ढासळून टाकण्याचा त्यांनी पानोपानी प्रयत्न केला आहे. निग्रोंच्याही अंगी देवी संपदा असू शकते ही स्टोव्हे यांची श्रद्धा पुढील इतिहासाने खरी असल्याचे दाखविले आहे. निग्रोसाठी इस्केजी विद्यापीठाची स्थापना करणारे बुकर टी वॉशिंग्टन प्रसिद्धच आहेत. त्याच संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून अध्यापन करणारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जगविख्यात शास्त्रज्ञ होते. अमेरिकेच्या आजच्या शास्त्रीय शेतीचा पाया त्यांनीच घातला आहे. एम्. ए. झाल्यावर आयोवा विद्यापीठात त्यांना प्राध्यापकाची जागा मिळाली होती. तेथे त्यांना पैसा, प्रतिष्ठा, कीर्ती सर्व अमाप प्रमाणांत मिळाले असते. पण बुकर टी वॉशिंग्टन यांचे निमंत्रण येताच हे सर्व सोडून ते तिकडे गेले व जन्मभर तेथेच राहिले. १८६२ साली गुडांनी त्यांच्या आईला पळवून नेऊन विकले होते. तेव्हा ते सहा महिन्याचे होते. तरी त्यांनी गोऱ्या अमेरिकनाविषयी द्वेष बुद्धी बाळगली नाही. कारण मोझेस कार्व्हर यांच्या पत्नी सौ. कार्व्हर या गोऱ्या स्त्रीनेच त्यांचा तेव्हापासून प्रतिपाल केला होता. आपल्या शास्त्रीय शोधाच्या सनदा (पेटंटस्) त्यांनी घेतल्या असल्या तरी कोट्यवधी डॉलर्स त्यांना मिळाले असते. पण एकही सनद त्यांनी घेतली नाही. आपली प्रतिभा त्यांनी मानवसेवेला अर्पण केली होती. दैवी संपदा याहून निराळी असते काय? मार्टिन लूथर किंग हे महात्माजींचे शिष्य म्हणून प्रसिद्ध होते. अन्यायाच्या प्रतिकाराचा लढा शांतता, अहिंसा या तत्वांवरच ते करीत निम्रो उपेक्षितांचे हे अंतरंग जगाच्या निदर्शनास आणून देणारी लेखिका ही फार श्रेष्ठ जीवनभाष्यकार होय यात शंका नाही.
 संभाव्य संपदेचा नाश विख्यात फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो याने आपल्याला .'मिझरेबल्स' या कादंबरीत दलितांविषयी हेच तत्त्वविचार मांडले आहेत. परिस्थितीमुळे काही लोक गुन्हा करतात, भ्रष्ट होतात, पतित होतात. त्यांची मूळ प्रवृत्ती तशी नसते. त्यांच्या अंतरात सत्प्रवृत्तीच असते, पण परिस्थितीपुढे ते असहाय होतात. अशा वेळी समाजाने क्षमाशीलवृत्तीने त्यांच्याकड़े पाहून त्यांना सावरून घेतले, पुन्हा ते पापप्रवृत्त होणार नाहीत अशी काळजी वाहिली, तर ते लोक सन्मार्गाला निश्चित लागतील. इतकेच नव्हे तर थोर संतसाधूंच्या, महात्म्यांच्या पंक्तीला जाऊन बसण्या इतकी दैवी संपदाही त्यांच्या ठायी जोपासली जाईल. पण समाज असे करीत नाही. माणूस च्युत झाला की, समाज त्याला कायमचा बहिष्कृत करतो. त्याने गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतरही त्याला जवळ करीत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा गुन्हे करूनच त्या माणसाला पोट भरावे लागते आणि मग तो कायमचा गुन्हेगार होऊन समाजाचा शत्रू होतो, समाजाच्या या प्रवृत्तीवर ह्यूगोने ला मिझरेबल्स या कादंबरीत टीका केली आहे. अमेरिकन लेखक इगरसॉल याने आपल्या 'क्राइम अगेन्स्ट दि क्रिमिनल्स' या लेखात हाच विचार मांडला आहे. अल्पशा पापासाठी अतिकठोर शिक्षा करणे हा समाजाचा गुन्हा आहे, असे तो म्हणतो. कारण यामुळे समाजातील संभाव्य दैवी संपदेचा नाश होतो. आणि त्याचे अनर्थ समाजालाच भोगावे लागतात. इंगरसॉल याने या विषयाची तात्त्विक चर्चा प्रबंध रुपाने केली आहे. व्हिक्टर ह्यूगो याने याच विषयाला मूर्तरूप देऊन त्याचे विवरण ललित पद्धतीने कादंबरीत केले आहे.
 मानवातून राक्षस जीन व्हॅजीन हा गरीब मनुष्य. स्वतःचा संसार त्याला नव्हता. तो बहिणीकडे रहात असे. तिला सात आठ मुले होती. त्यांचे वडील गेले होते. दिवसभर काबाड कष्ट करून जीन व्हॅलजीन त्या चिमण्यांमुखी कसा तरी घास घालीत असे. पण एकदा दुष्काळ पडला. तेव्हा तेही शक्य होईना. पोरे उपाशी मरू लागली. तेव्हा एका दुकानाचे दार फोडून व्हॅलजीन याने दोन पाव चोरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तो पकडला गेला. त्याला शिक्षा झाली. किती? पांच वर्षे ! दोन आण्याच्या चोरीसाठी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा त्याने तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पुन्हा पाच वर्षे शिक्षा. याच तऱ्हेने एकंदर एकीणीस वर्षे शिक्षा भोगल्यानंतर व्हॅलजीन सुटून तुरुंगाबाहेर पडला. तुरुंगात गेला तेव्हा तो एक साधा लांकूडतोड्या होता. एकोणीस वर्षांनी तो बाहेर आला तेव्हा तो कोण होता? मानव जातीचा शत्रू, डाकू, राक्षस ! हे कसे घडले ? ह्यूगोनें पायरी पायरीने हे रूपांतर कसे होत गेले याचे एके ठिकाणी मोठे उद्बोधक वर्णन केले आहे. अन्याय, जुलूम, छळ असह्य यातना यांनी मनुष्याच्या मनात समाजाच्या कायद्याबद्दल द्वेष निर्माण होतो, वेळीच काही दैवी कृपाप्रसादाने त्याला आळा पडला नाही तर पुढे पुढे हा माणूस समाजाचा आणि मग मानवजातीचा द्वेष करू लागतो. आणि पुढे एकंदर सृष्टीचा तो शत्रू बनतो आणि मग काही तरी विध्वंस करावा जाळावे, पोळाके खून करावा अशी त्याची प्रकृतीच बनते. जीन व्हॅलजीन याचे हेच झाले. दिवस जाऊ लागले, वर्षे जाऊ लागली तसतसा तो आत्महीन बनत चालला, त्याच्या चित्तातले कोमल भाव वाळू लागले. त्याचे मन कडवट, कठोर, भावशून्य झाले. एकोणीस वर्षात त्याने एकदाही कोणासाठी अश्रू सांडला नव्हता !
 राक्षसातून महात्मा असा हा जीन व्हॅलजीन आयुष्याच्या अंती त्याचा जावई मारियस याला कसा दिसला? दयामृत घन सांक्षात ख्राइस्ट ! भव्य, उदात्त, उदारांचा राणा बाह्यतः कठोर, विरुप, कळाहीन दिसणाऱ्या त्या पुरुषाच्या अंतरंगांत बॅरन पॉट मर्सीच्या मुलाला- मारियसला- कशाचे दर्शन घडले ? सौम्य, शीतल अशा दयेच्या मूर्तीचे. तेथे स्वार्थ नव्हता, अहंकार नव्हता. लोक विलक्षण असे नयनसुभग असे एक तेज त्याला तेथे दिसू लागले त्याचे डोळे दिपून गेले, हे कसे घडले?
 एकोणीस वर्षाच्या तुरुंगवासाने एका साध्या माणसातून एक अट्टल बदमाष दरवडेखोर, उलट्या काळजाचा राक्षस निर्माण झाला. पण पुढे या राक्षसाचे एक कृपामूर्तीत रूपांतर झाले. एकोणीस वर्षात एकही अश्रू न ढाळणारा हा माणूस दीन दलितांच्या कणवेने रोज अश्रू सांडू लागला. त्यांचे अश्रू पुसू लागला. परमेश्वराच्या या जगात न्याय नाही, सत्य नाही. सर्व मानवजात दुष्ट आहे. हृदयशून्य आहे. हीच, ज्याची भावना झाली होती तो माणूस मृत्युसमयी, 'परमेश्वर सर्व साक्षी आह, न्यायी आहे, दयेचा सागर आहे, मला तो दिसत आहे. मी खरोखर धन्य झालो. अत्यंत सुखाने, समाधाने मी देह ठेवीत आहे!' असे उद्गार काढण्याइतका कशाने, बदलला? निरपेक्ष दया, प्रेम, संतसहवास, दैवी, संपदेचे दर्शन! व्हिक्टर ह्यूगोला हेच सांगावयाचे आहे. ला मिझरेबलस् ही कादंबरी म्हणजे याच तत्त्वाचे उपनिषद आहे.
 अनिकेत जीन व्हॅलजीन तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याची सर्व राक्षसीवृत्ती; त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होती. शरीराने तो धिप्पाड, अडदांड व अर्बुज असा होता आणि एकोणीस वर्षांच्या क्रूर अन्यायाने निर्माण झालेल्या त्याच्या मनातील, सर्व हिंस्त्र, नृशंस प्रवृत्ती त्याच्या डोळ्यांतून नुसत्या उसळत होत्या. त्यामुळे त्याला, कुठेच थारा मिळेना. आपल्या घरात, मुलाबाळांत हा राक्षस नको, असे कुटुंब- वत्सलांना वाटे. खानावळवाल्यांना वाटे याला आत घेतला तर आपल्याकडे कोणी येणार नाही. धंदा बुडेल. त्याच्याकडे पाहताच सर्वांना भीती वाटे. त्यामुळे पैसे देऊनही त्याला कोणी जेवण घालायला तयार होईना. समाजाने त्याला एकोणीस वर्षापूर्वी एकदा बहिष्कृत केले होते. तो बहिष्कार कायमचा होता. गुन्हेगारांचे पुनर्वसन समाजाला मान्यच नव्हते. अंधार पडत चालला. थंडी वाढत चालली. व्हॅलजीन तीन दिवसांचा उपाशी होता. तीन दिवसात तो छत्तीस मैल चालून आला, होता. त्याच्या पोटात आग पेटली होती. पण पैसे देऊनही त्याला अन्न मिळत नव्हते? डोके टेकायला जागा मिळत नव्हती ! शेवटी तो एका तुरुंगाच्या दाराशी गेला, व पहारेकऱ्याला आपल्याला आत घ्यावे म्हणून विनवू लागला. पहारेकरी म्हणाला, 'तू गुन्हा केला आहेस काय ? त्यावाचून तुला येथे प्रवेश मिळणार नाही.' जीन व्हॅलजीनने गुन्हा केला नव्हता. जो केला होता त्याची शिक्षा त्याने भोगली होती. आता नवा गुन्हा केल्यावाचून तुरुंगात त्याला प्रवेश मिळणार नव्हता ! पण अजून नवा गुन्हा त्याने केला नव्हता. त्याच्या हातून घडला नव्हता. निराश होऊन उघड्यावर एका दगडावर डोके टेकून तो पडला. त्याच्या मनात सैतानी विचार घोळू लागले. पण एका बाईने त्याला सांगितले 'ते तिथे बिशप मिरियल यांचे घर आहे तेथे जा. तेथे तुला आसरा मिळेल.' बुडत्याला काडीचा आधार! जीन बॉलजीनने त्या घराचे दार ठोठावले.
 दयेचा स्पर्श 'या, आत या !' आतून स्वागताची साद आली. दार उघडून व्हॅलजीन आत गेला. आपल्याला पाहिल्यावर हे स्वागत थंडावेल, असे त्याला वाटले होते. पण तसे झाले नाही. बिशप मिरियलने त्याच सौजन्याने पुन्हा त्याचे स्वागत केले. आणि एक पान जास्त मांडण्यास बहिणीला सांगितले. व्हॅलजीन विस्मित झाला. त्याचा विश्वास बसेना. म्हणून त्याने बिशपांना पुन्हा पुन्हा सांगितले, 'मी गुन्हेगार आहे. नुकताच तुरुंगातून सुटून आलो आहे. तुम्हीं विचार करा. माझ्या जवळ पैसे आहेत. जेवणाचे मी पैसे देईन. पण विचार करून होकार द्या.
 'आपण बसा, जरा विसावा घ्या. जेवण तयार आहे. मग रात्री इथेच झोपा बिछाना आत्ता तयार होईल.' असे म्हणून बिशप मिरियल यांनी बहिणीला चांदीची ताटे, भांडी मांडायला चांदीची निरांजनेही लावायला सांगितले. जेवण झाल्यावर अंथरुणावर अंग टाकताच व्हॅलजीनला गाढ झोप लागली. असे जेवण, असे अंथरुण त्याला एकोणीस वर्षांत मिळाले नव्हते. सौजन्याचे दोन शब्दही त्याला या काळात दुर्मिळच होते. त्यामुळे त्याचा कडवटपणा, मानवजाती विषयीचा द्वेष जरा मवाळला होता. पण दोन वाजता जागा झाल्यावर त्याच्या डोळ्यांपुढे ती चांदीची भांडी नाचू लागली. आणि एकोणीस वर्षाची त्याच्या चित्तातली आग भडकून उठली. मनाला आलेली मवाळी सर्व नाहीशी झाली. तो उठलाच भांडी घेताना बिशप आड येणारच. म्हणून शेजारच्या खिडकींचा एक लोखंडी गज त्याने हिसक्या सरशी बाहेर काढला व बिशपांच्या खोलीत जाऊन त्याने भांड्यांचे कपाट उघडले. बिशप शांतपणे झोपले होते. बालांची निरागसता त्यांच्या मुद्रेवर होती. तेव्हा घाव घालण्याची गरज नाही. असे ठरवून व्हॅलजीनने ती भांडी पिशवीत घातली व तो पसार झाला.
 सकाळी चोरी झाल्याचे बिशपांच्या बहिणीच्या ध्यानात आले त्याविषयीच न्याहारीच्या वेळी बोलणे चालले होते. एवढ्यात व्हॅलजीनला घेऊन पोलीस आलेच. आणि तुमची चांदीची भांडी याने चोरली आहेत असे मिरियल यांना ते सांगू लागले.
 'छे छेः ! हा काही तरी घोटाळा आहे', व्हॅलजीनकडे पहात मिरियल म्हणाले. 'मी ती भांडी यांना भेट म्हणून दिली आहेत. आणि काय हो, ती चांदीची निरांजनेही मी दिली होती. ती तुम्ही का नाही नेली ? ही घ्या. ती तुमचीच आहेत. जमादार साहेब सोडा त्यांना ते चोर नाहीत. माझे पाहुणे आहेत.'
 जीन व्हॅलजीन थक्क झाला. आता पुन्हा दहा वर्षे तुरुंगवास आला, असां हिशेब त्याने केला होता. पण घडले ते त्याच्या स्वप्नाच्या पलीकडचे होते. मूढ होऊन तो उभा राहिला होता. बिशप मीरियल यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. 'भल्या गृहस्था आता ध्यानात ठेव की, तुझे पूर्वायुष्य संपले. आता तुझा मार्ग बदलला आहे वाम मार्गाने न जाता सन्मार्गाने जाण्याचे तू मला अभिवचन दिले आहेस. जा माझा तुला आशिर्वाद आहे.'
 अश्रु  बाहेर पडल्यावर दिवसभर व्हॅलजीन भ्रमिष्टासारखा हिंडतच राहिला. त्याचे मन हादरून गेले होते. आपल्याला तुरुंगात घातले असते तर बरे झाले असते, असेही एकदा त्याला वाटले. एकोणिस वर्षात काळजाचा झालेला दगड मऊ होतो आहे असे त्याला वाटू लागले. आणि तो अस्वस्थ झाला. अंधार पडल्यावर थकून जाऊन एका दगडावर तो स्वस्थ वसला. त्याचे मन मात्र भ्रमत होते. एवढ्यात जर्हिस नावाचा दहा एक वर्षाचा मुलगा खेळत खेळत तेथे आला. एक रूपया वर उडवून तो झेलण्याचा खेळ तो खेळत होता. पण एकदां तो रूपया खाली पडला व घरंगळीत व्हॅलीनच्या पायाखाली गेला. त्याला त्याची दादही नव्हती तो भ्रांतीतच होता. जर्हिसने त्याला खूप विनविले, पण व्हॅलेनिनला त्याचे भान झाले नाही. नसती कटकट आहे, असे वाटून तो मुलाच्या अंगावर खेकसला. तो बिचारा घाबरून पळून गेला. थोड्या वेळाने व्हॅलजिन उठला. तेव्हा तो रुपया दिसला आणि सर्व प्रकार त्याच्या ध्यानात आला. यापूर्वी त्याला त्याचे काहीच वाटले नसते. त्या मुलाची मान मुरगळून सुद्धा त्याने त्याचे पैसे काढून घेतले असते. आदल्याच रात्री भांडी चोरताना बिशपांना ठार करण्याचा त्याचा विचार होताच. पण आता त्याच्या मनात जमीन अस्मान परिवर्तन झाले होते. बिशपांच्या प्रेमामुळे, त्यांच्या औदार्यामुळे त्यांच्या निरपेक्ष दयेमुळे, त्याच्या मनातील आसुरी संपत्ती धुवून गेली होती व देवी संपत्तीचा तेथे उद्भव झाला होता. आपण हे एक भयानक दुष्ट कृत्य केले, असे त्याला वाटू लागले. जर्हिसची बालमूर्ती त्याच्या डोळ्यापुढे उभी राहिली. माणि त्याच्या जीवनाचा कंदच हालून गेला. 'बाळ जर्हिस, येरे, कुठे असशील तिथून ये तुझा रुपाया घेऊन जा. अरे मी किती नीच आहे ! बदमाष आहे ! एका लहानग्याचा. रुपया मी हिरावून घेतला. धिक्कार असो मला !' असे म्हणून व्हॅलजीन ढसढसा रंडू लागला. एकोणीस वर्षांत त्याच्या डोळ्याला कधी टिपूस आले नव्हते. त्याने कधी कोणासाठी अश्रू ढाळलेच नव्हते. ज्याच्यासाठी अश्रू ढाळाने असे कोणी त्याला भेटलेच नव्हते. आज मात्र बाळ जर्हिस आणि बिशप मीरियल यांच्या मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढून हलेनात आणि त्याचे अश्रूही थांबेनात. बिशपांच्या घराच्या दिशेला वळून त्याने गुडघे टेकले व तो प्रार्थना करू लागला. त्यांचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. 'तुझे पूर्वायुष्य संपले. सन्मार्गाने जाण्याचे तू मला अभिवचन दिले आहेस.' वास्तविक त्याने तसे वचन केव्हाच दिले नव्हते. पण आता मात्र त्याच्या अंतरात्म्याने ते दिले.
 नेटलचा उपयोग तशाच स्थितीत प्रवास करीत व्हॅलजीन एम्. या गावी येऊन पोचला. त्याच वेळी तेथे एका घराला आग लागली होती. मोठ्या धाडसाने तीत उडी टाकून त्याने दोन मुलाना वाचविले यामुळे त्या गावात त्याचे स्वागत झाले च तेथे राहू लागला. एम्. गावी कृत्रिम मणी तयार करण्याचा धंदा चाले. व्हॅलजिन त्यात शिरला आणि त्या मण्यासाठी एक निराळे द्रव्य तो वापरून पाहू लागला. त्यामुळे मणी जास्त सुंदर व फार स्वस्त पडू लागले व धंद्याला एकदम बरकत आली. व थोड्याच दिवसात व्हॅलजीनला विपुल पैसा मिळाला. एम्. गावी राहू लागल्यापासून त्याने फादर मडलीन हे नाव धारण केले होतें आणि पैसा मिळू लागताच रंजले गांजले यांना तो आपुले म्हणू लागला, थोड्याच दिवसात एक उदार महात्मा म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसली. सरकारने ही गावचे महापौरपद देऊन, त्याचा गौरव केला. आता गावच्या सेवेचे व्रतच त्याने घेतले. स्वखर्चाने त्याने शाळा बांधली. इस्पितळ उघडले. मोफत दवाखाना चालविला. फादर मंडलीन याची राहणी अगदी साधी होती. ते लोकात फारसे मिसळत नसत. वाचन व चिंतन यातंच सर्व वेळ घालवीत. एक दिवस ते एका शेताच्या बाजूने चालले असता शेतकरी शेतातून नेटल नावाचे गवत तण म्हणून उपटून टाकीत होते. बांधावर त्याचे ढीग पडले होते. फादर मंडलीन तेथे गेले व ते नेटल हातात घेऊन शेतकऱ्यांना म्हणाले, 'अरे हे टाकून देऊ नका. त्यांचे उपयोग आहेत. याच्या पाल्याची भाजी होते. ते वाळल्यावर त्याचे दोर होतात. त्याचा कुटा जनावरांना होतो. त्यांचे बी फार पौष्टिक आहे. थोडी काळजी घेतली की नेटलचा अतिशय उपयोग होईल. नाहीतर मात्र ते इतर पिकांना मारून टाकील. आणि हे माणसासारखेच आहे जगात निरूपयोगी किंवा वाईट वनस्पती नाही. तसाच दुष्ट किंवा नीच मनुष्य नसतो. सर्व योजकावर अवलंबून आहे. तो वाईट असला की, सर्व वाइट. तो चांगला असला की सर्व चांगले !
 व्हिक्टर ह्यूगोचे हे मानवी जीवनावरचे भाष्य आहे. माणसे मुळात नीच, पापी नसतात. परिस्थितीने ती तशी होतात. त्याचे योजक जे समाजधुरीण ते याला जबाबदार आहेत. त्या हीन, भ्रष्ट पतित लोकांना त्यांचे पूर्वायुष्य विसरून समाजाने संधि दिली तर त्यांच्यातूनच थोर महात्मे निर्माण होणे शक्य आहे. स्वतः फादर मॅडलीन हेच त्यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. बिशप सीरियलनी हे नेटल- हे तण फेकून दिले असते तर जीन व्हॅलजीन पुढील आयुष्यात अट्टल दरोडेखोर झाला असता. पण दैवी कृपेचा त्याला स्पर्श झाला व तो महात्मा झाला. स्वतः तो सत्पुरुष झाला इतकेच नव्हे तर नेटलचा सिद्धान्त ध्यानात ठेवून पतित मानवांकडे तो अशाच दृष्टीने पाहू लागला. मानव मुळात पतित नसतो. आज तो तसा दिसला तरी त्याला दयेच्या हातानी वर उचलले तर तो सत्वगुण संपन्न होऊन गहु, तांदूळ यांच्या प्रमाणेच हे नेटल ही समाजाचे पोषण करील.
 व्हिक्टर ह्यूगो फादर मॅडलीन ही व्यक्तिरेखा चित्रण येथवर हे दाखवून दिले. आत फँतीन ही दुसरी मूर्ती- दुसरे नेटल- तो आपल्याला दाखवीत आहे.
 पतिता फँतीन ही कोण होती? समाजाच्या अगदी खालच्या थरात हीन, दीन, दरिद्री अशा वर्गात जन्मलेली एक बेवारशी मुलगी आपले आई बाप कोण, हे तिला माहीत नव्हते. अशा या मुलीची कथा सांगावयाची? तीत स्वारस्य काय? तेच तर हयूगोला सांगावयाचे आहे. दैन्य दारिद्रयात, अनीतीत जन्मलेली ही बेवारशी मुलगी जन्मतःच पतित होती. तरी तिच्याही ठायी, एकनिष्ठा होती. मातेचे वात्सल्य होते. जबाबदारीची जाणीव होती. तिची मुलगी कॉसेट हिला जीन व्हॅलजीनने स्वतःच्या मुलीसारखी वाढविली. आणि मृत्युसमयी तिला व जावई मॉरियस याला दोन शेवटचे शब्द सांगताना तो म्हणाला, 'कॉसेट, तुझ्या आईचे नाव तुला आता सांगतो. तिचे नाव फँतीन होते. ते लक्षात ठेव, आणि हे बघ, तिचे जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा तेव्हा मस्तक नम्र करून तिला अभिवादन करीत जा ! तिची तुझ्यावर अपार माया होती. आणि तुझ्यासाठी तिने असह्य यातना सोसल्या होत्या. तू जितकी सुखात आहेस तितकीच ती कायम दुःखात होती. तिला नित्य आठवत जा.'
 पतितांच्या अंतरात ज्या शब्दात मॉरियस जीन व्हॅलजीनचा गौरव करीत होता त्याच शब्दात व्हॅलजीन फँतीनचा गौरव करीत होता. व्हॅलजीन व फँतीन दोघेही पतित होते. पण दोघांच्याही अंतरंगात दैवी संपदा होती. अशी असू शकते हेच कादंबरीकाराला दाखवावयाचे आहे. त्याच हेतूने त्याने कादंबरी रचली. समाजाला पतितांचे, उपेक्षितांचे हे अंतरंग दिसत नाही. मानवी जीवन ज्याला कळते त्याला त्यातली ही संपदा दिसते. आणि ती लोकांना दाखवावी या हेतूने तो साहित्य निर्माण करतो. तोच खरा ग्रंथकार, खरा द्रष्टा, खरा मानवी जीवनाचा भाष्यकार !
 स्त्रीजन्माची कहाणी  फँतीनची कथा म्हणजे स्त्रीजन्माची नित्याचीच कहाणी आहे. थोमोलिस नावाच्या तरुणावर तिने प्रेम केले. तिला गर्भ राहिला आणि मगं तो निघून गेला. कॉसेट ५/६ वर्षाची झाल्यावर फँतीन तिला घेऊन एम्. गावी निघाली. वाटेत माँट फरमील या गावी थेनार्डीयर या खानावळवाल्याकडे तिने कॉसेटला ठेवली. महिना सात फ्रँक तिच्यासाठी पाठवायचे कबूल केले व ती एम्. गावी येऊन फादर मॅडलीन यांच्या मण्याच्या कारखान्यात ती नोकरीला लागली. पण लवकरच तिच्या त्या मुलीची कथा लोकांना समजली व कारखान्यातील व्यवस्थापक बाईने काढून टाकले. फादर मॅडलीन यांना यातले काहीच माहीत नव्हते. नोकरी नाही, मुलीसाठी थेनार्डीयरकडे पैसे पाठविलेच पाहिजेत. आता काय करणार ? फँतीनवर देह विक्रय करण्याची पाळी आली. हळूहळू ती रस्त्यावर आली. तिचे रूप गेले. ती भीक मागू लागली. कारण कॉसेटसाठी पैसे पाठविलेच पाहिजेत ! शिवाय थेनार्डीयर आता निरनिराळ्या सबबी सांगून जास्त जास्त पैसे मागू लागला. हा खानावळवाला म्हणजे शुद्धः सैतान होता. कॉसेट चे तो हाल करीत असे. आणि फँतीन करून जास्त पैसे काढीत असे. ती बिचारी पोरीच्या मायेने वाटेल ते कष्ट करून पैसे पाठवीत असे. एक दिवस रस्त्यावरून अशीच हिंडत असताना एका सरदार पुत्राने चेष्टा म्हणून तिच्या पाठीवर कपड्याच्या आत बर्फ टाकले. यातना असह्य झाल्यामुळे फँतीन त्याच्यावर धावली व नखाने तिने त्याचे थोबाड ओरबाडले. आता हा केवढा गुन्हा झाला ! एका बाजारबसवीने सरदार पुत्रावर हात टाकायचा ! पोलिस इन्स्पेक्टर जॅव्हर्ट रस्त्याने चालला होता. तिला लगेच अटक करून तो तिला तुरुंगात पाठवू लागला. पण तेवढ्यात महापौर मॅडलीन तेथे आले. त्यांनी सर्व पाहिले होते. या बाईचा मुळीच अपराध नाही हे त्यांना माहीत होते. त्यांनी तिला सोडून देण्याचा हुकूम केला. आणि तिला आपल्या इस्पितळात नेले. तेथे त्यांना तिची सर्व हकीकत समजली. त्यांनी पाचशे फ्रँक पाठवून थेनार्डीयरकडून कॉसेटला आणविण्याची लगेच व्यवस्था केली. आणि दोघींना घरी संभाळावयाचे असे त्यानी ठरविले. फँतीन पतित स्त्री होती. देह विक्रय करीत होती. आणि काँसेट अशाच संबंधातून झालेली तिचीच मुलगी. आई बेवारशी तशीच तिची कन्या ! पण माणूस मुळात चांगला वाईट काहीच नसतो. परिस्थितीने तो तसा होतो हा तर त्यांचा सिद्धान्त होता. नेटल ही वनस्पती अडाणी माणसांना विषारी तण वाटत असेल. जाणत्यांना तिचे अमृतवेलीत रुपांतर करणे शक्य होते. फँतीन व कॉसेट या वनस्पतींचे तेच करावयाचे त्यांनी ठरवले, पण माणसाने एक योजावे तर दैवाच्या मनात दुसरेच असते.
  एक दिवस बातमी आली की, जीन व्हॅलजीन नावाच्या फरारी असलेल्या डाकूला पोलिसांनी पकडले आहे. जर्व्हिस नावाच्या एका लहान मुलाचा रुपया त्याने लुबाडून घेतल्याबद्दल त्याच्यावर खटला भरला आहे. तो उद्या आरास या गांवीं चालेल व बहुधा आता व्हॅलजीनला फाशीचीच शिक्षा होईल !
 विवेक देवता पूर्वायुष्य पुसून टाकण्याचा फादर मॅडलीन यांनी किती प्रयत्न केला होता ! पण तो समंध त्यांना सोडीत नव्हता. आपल्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी निरपराध माणूस पोलीसांनी पकडला आहे. हे त्यांच्या ध्यानात आले. क्षणभर त्यांना वाटले आता आपण गप्प बसावे. तो फाशी गेला तर आपण काय करणार ? आपण तर ही फसवणूक केली नाही ना ! आपण आता शेकडो दीन जीवांना आश्रय देत आहो. आपण गेलो तर ते कोठे जातील ? तेव्हा शांत बसावे हेच बरे ! पण ते अशक्य होते. आता त्यांचा आत्मा मृदु झाला होता. आपल्या नावावर दुसऱ्या एका निरपराध इसमाला फाशी जाताना पहाणे त्यांना शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी आरासच्या न्यायालयात जाऊन त्यांनी आपणच जीन व्हॅलजीन असल्याचें जाहीर केले. त्यांच्यावर प्रथम कोणी विश्वास ठेवींना. पण अनेक पुरावे, शरीरावरच्या खुणा इ. दाखवून त्यांनी ते सिद्ध केले व ते तेथून तत्काळ निघाले. फँतीनची व तिची कन्या कॉसेट यांची व्यवस्था त्यांना करावयाची होती. पोलीस केव्हा येतील याचा नेम नव्हता. पॅरीसच्या बँकेत जाऊन त्यांनी तेथे ठेवलेले ६७ लाख फ्रँक काढून घेतले व ते जंगलात नेऊन पुरून ठेवले. व ते लगबगीने गावी परत आले. तोपर्यंत वार्ता सर्वत्र पसरलीच होती. पोलीस इन्स्पेक्टर जॅव्हर्ट तत्परतेने एम्. गावी त्यांना पकडण्यास आला होता. फँतीनला मॅडलीनना पकडले एवढेच कळले. तिला धक्का बसला व कॉसेट कॉसेट करीत तिने प्राण सोडला.
 जीन व्हॅलजीन याला तुरुंगात डांबण्यात आले. पण तेथून तो पळाला. पण पुन्हा पकडला गेला. एकदा जहाजावर असताना एका बुडणाऱ्या माणसाला वाचविण्यासाठी त्याने समुद्रात उडी मारली पण तो पुन्हा वर आलाच नाही. जीन व्हॅलजीन बुडून मेला असा त्याच्या नावापुढे शेरा पडला. व्हॅलजीन लांबवर जाऊन पाण्याबाहेर निघाला आणि थेट माँटफरमील येथे गेला व थेनार्डीयरने सांगितली ती रक्कम देऊन कॉसेटला घेऊन तो पॅरिसला गेला व तेथे आडवस्तीत एक जागा घेऊन तेथे तिच्यासह राहू लागला. त्या आठ वर्षाच्या लाघवी पोरीने या वृद्ध, श्रांत गृहस्थाचे सर्व जीवन व्यापून टाकले. प्रेम, माया, स्नेह या वस्तूंची व त्याची साठ वर्षात कधी भेट झाली नव्हती. आता त्या पोरीने त्याला ते दर्शन घडविले, वात्सल्य त्याच्या चित्तातून ओसंडून वाहू लागले, आपण एका नव्या विश्वात वावरत आहो असे त्याला भासू लागले.
 पतिव्रता हळूहळू कॉसेट मोठी झाली, तिने तारुण्यात पदार्पण केले. याच वेळी बॅरन पाँटमर्सी यांचा मुलगा मॉरियस हा पॅरिसमध्ये राहून वकिली करू लागला होता. त्याची कॉसेटशी बागेत रोज गाठ पडू लागली व ती दोघे एकमेकांकडे आकृष्ट झाली. जीन व्हॅलजीन यामुळे अस्वस्थ झाला. ही आपली ठेव हा तरुण हिरावून नेणार याचे त्याला वैषम्य वाटू लागले. पण एकदा त्यांची एकमेकांना लिहिलेली पत्रे त्याच्या हाती पडली. त्यांची मने त्याला कळून आली आणि कॉसेटच्या सुखासाठीच आता तो जगत असल्यामुळे त्याने हा योग घडवून आणावयाचा असे ठरविले. तेवढयात पॅरिसमध्ये सरकार विरुद्ध बंडाळी माजली व मॉरियस बंडवाल्याचा म्होरक्या आहे, असे व्हॅलजीनला कळले. तेव्हा लगबगीने तो तिकडे गेला. तोपर्यंत मॉरियसला गोळी लागून तो पडला होता. तेव्हा पोलिसांना चुकवून मॉरियसला घेऊन व्हॅलॅजीन एका ड्रेनेजच्या विवरात शिरला व दुसरीकडच्या दाराने बाहेर पडून त्याने त्याला त्याचे आजोबा जिले नार्मंड यांचे घरी पोचविले. तेथे तो चार महिने अंथरुणावरच होता. कॉसेट तेथे जाऊन मोठ्या भक्तीने त्याची सेवा शुश्रूषा करीत असे. त्यामुळे तो बरा झाल्यावर आजोबांनी त्यांच्या लग्नाला आशीर्वाद दिला. एका बेवारशी स्त्रीची व्यभिचाराने जन्मलेली कन्या एका सरदार घराण्यात सून म्हणून आली. आणि निष्ठने, पतिप्रेमाने, विनयाने, तिने सर्वांचे आशीर्वाद मिळविले. पण तिचे पूर्ववृत्त त्या लोकांना माहीत असते तर ! त्यांनी तिला घरातसुद्धा घेतली नसती. मग त्या पोरीला रस्त्यावर यावे लागले असते. पण जीन व्हॅलजीन यांनी तिला आश्रय दिला. तिचे पूर्ववृत्त पुसून टाकले. त्यामुळे तिच्या अंगच्या गुणविकासाला संधी मिळाली. व ही पायदळी पडणारी कलिका पतिव्रता होऊन प्रभुपदाला योग्य झाली.
 ३ उपेक्षितांचे अंतरंग दलितांच्या विषयी या प्रकरणाच्या प्रारंभी जो सिद्धान्त सांगितला आहे तो प्रा. माटे यांनी 'कशाचा संसार?' नावाची तबा व मंजुळा या महार जातीच्या जोडप्याची जी कथा लिहिली आहे तीत स्वतःच स्पष्ट करून सांगितली आहे. "वाणीचा आदबशीर, मनाने सरळ, आणि दिलाचा उदार असा हा गृहस्थ केवळ जन्माच्या मुद्यावर बाजूला पडला होता. त्याच्या त्या मळकट पैरणीच्या आड स्वच्छ अंतःकरणाची भलाई नांदत होती आणि डोक्यास गुंडाळलेल्या त्याच्या भोंगळ मुंडाशाखाली समंजस बुद्धीची ऋजुता वागत होती. खरोखर आपली मैत्रीची कल्पना किती संकुचित असते ! आपल्याच रीतीभाती, आपलीच विद्या आपलेच राग लोभ यांपलीकडे आपल्याला जाताच येत नाही. ही सर्व मागे टाकून आपल्याच आकांक्षा इतर कोठे सापडतात की काय हे आपण पाहिले आहे काय ? आपल्याच वासना व ईर्षा इतर कोठे आपण शोधल्या आहेत काय ? आपलीच ध्येये आपल्या बाह्य परिवेषाच्या पलीकडे आपल्याला आढळतील, असे आपण कधी उमगतो काय ? आणि एकच माणुसकी आपल्याप्रमाणे इतरत्र कोठे सापडेल, असे. तरी आपल्याला वाटते काय ?"
 देवा, चांडाळा !  आपल्याला असे वाटले पाहिजे हेच माटे यांनी उपेक्षिताच्या अंतरंगाच्या अनेक कथा लिहून त्यांतून दाखवून दिले आहे. तबा आणि त्याची बायको मंजुळा या दोघांना दोन निरनिराळ्या ठिकाणी कामाला जावे लागत असे. पहाटे उठून दोघे घराबाहेर पडत. थोड्या वेळांतच त्यांच्या वाटा निराळ्या होत. आणि त्या अंधाऱ्या वेळी बायकोला एकटीला निर्मनुष्य रस्त्याने जावे लागते म्हणून तबाच्या जिवाची कालवाकालव होई. तबा म्हणतो, 'तरणीताठी बायको, बकाल वस्तीतून जावं लागतं; माणसांचा काय नेम सांगावा?' त्यामुळे ती दोघे एकमेकाला दिसेनाशी होईपर्यंत तीन तीनदा वळून एकमेकांकडे पहात. अन् अगदी दिसेनाशी झाल्यावर मग खिन्न मनाने पुढे जात. आणि मग तबाची काळजी वाढत जाई. सकाळी, अंधाराचे बाहेर पडायचे आणि रात्री साडेसात वाजता घरी यायचे अन मग नवरा- बायकोची गाठ पडायची. तबाची तक्रार अशी की, कधी खुशालीनं एके ठिकाणी बसायला सापडत नाही की गोडीनं बोलायला सापडत नाही. माटे म्हणतात, 'प्रेमी माणूस आपल्याला नाही म्हणून पुष्कळ लोक खिन्न असतात. पण प्रेमी माणूस असून प्रेम करावयास मिळत नाही. अशी सहस्रावधी लोकांची स्थिती असते!' तबाची अशी स्थिती होती. आणि त्याच्या जिवाला लागण्यासारखी आणखी एक गोष्ट होती. तो माटे यांना म्हणाला, 'तुमच्या पायाच्यान् सांगतो, परमेसरानं एवढा राग का केल माझ्यावर? सांचीपारनं घराला परत फिरलो मंजी सडकन तुमच्याकडची बाया मानसं अन् बापडं फिरायला निगालेली दिसत्यात, ती खुशीनं गोष्टी करत्यात, हवा खात्यात, हसत्यात. तवा माझ्या मनात येतं की आमचं जिनं बघा काय मातीच्य मोलाचं ! देवा, चांडाळा असे का केलस ?'
 हिंदुसमाजाने ज्यांना चांडाळ ठरवून टाकले आहे त्यांच्यातल्याच एकाने देवालाच चांडाळ ठरविले. आणि त्याच्या अंतरंगात वरिष्ट वर्गातल्या लोकांप्रमाणेच सर्व मृदु, नाजुक, ऋजु भाव आहे, त्याच निष्ठा आहेत, त्याच आकांक्षा आहेत हे पाहिल्यावर त्याचा हा संताप अयोग्य आहे असे म्हणावेसे वाटत नाही.
 वाङ्मयाचा विषय माटे म्हणतात, 'आपल्या वाङ्मयातून, कथांतून राजे- महाराजे श्रीमंत लोक, सुशिक्षित पांढरपेशे यांच्या जीवितातील प्रसंगांची कथानके आणि त्यांच्या सद्गुणांचे वर्णन ही वाचावयास सापडतात. संरक्षणासाठी सर्व साधने चालत आलेल्या विशिष्ट संस्कारांनी मिळालेले स्थैर्य, सांपत्तिक खुशाली इत्यादींनी जपून धरलेल्या समाजात नांदणाऱ्या सद्गुणांची सुद्धा आपण आपल्या वाङ्मयात केवढी बडेजाव करतो? पण वर दिलेल्या गोष्टी ज्यांना लाभलेल्या नाहीत ती गरीब माणसे नेकीने वागून, परस्परांवर निष्ठा ठेवून, केवढे थोर सद्गुण दाखवितात हे "पाहिले म्हणजे माझे चित्त भरून येते. आणि त्यांच्या त्या निष्ठा वाङ्मयात स्थिर होण्याला जास्त लायक आहेत असे वाटते.'
 संस्कृतीची लक्षणे 'कृष्णाकाठचा रामवंशी' सत्या रामोशी आणि 'तारळ खोऱ्यातील पिऱ्या' यांच्या कथा तबाच्या कथेपेक्षा जास्त उद्बोधक आहेत. तबा हा प्रामाणिकपणे मोलमजुरी करून पोट भरणारा मनुष्य त्याचे जीवन गुन्हेगारीचे नाही. कायद्याच्या दृष्टीने तो एक सभ्य नागरिक आहे. त्याच्या अंतरंगात काही संस्कृति लक्षणे दिसली तर ते कौतुकास्पद आहे, हे खरे. पण सत्या व पिऱ्या यांच्या ठायी ती दिसली तर ते जास्त कौतुकास्पद, जास्त विस्मयावह आहे. कारण ते दोघे गुन्हेगार म्हणून शिक्का पडलेल्या जमातीतले आहेत आणि दरोडेखोरी हाच त्यांचा धंदा आहे. खून करणे, मुंडया मुरगळणे, हा त्यांचा रोजचा उद्योग आहे. अशा मानवजातीशी वैर धरणाऱ्या लोकांच्या ठायी काय संस्कृती असणार? असे आपल्याला वाटते. हाच गैरसमज माटे यांना दूर करावयाचा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, 'रामवंशी पुढारी सत्या हा लौकिक दृष्टया दरोडेखोर असला तरी त्याची भूमिका कित्येक वृत्तांत मोठी उदात्त अशी दिसून येईल. रामापर्यंत आपली पीठिका नेण्याची त्याची उत्सुकता हिंदुसमाजाच्या दृष्टीने फार उत्तेजक वाटते. आपण चोर नाही ही त्याची गर्जना आणि मागल्याकाळात आपण समाजात आवश्यक व उपयोगी माणसे होतो ही समाजास त्याने करून दिलेली आठवण सर्वानीच ध्यानात ठेवावयास हवी.'
 तू माजी भन इंदापूरकरांच्या वाड्यावर सत्याने दरोडा घातला तेव्हा घरधनीण सावित्री बाई पुढे झाली व 'सत्याजी, आम्हांला मारू नका, आमच्याजवळ आहे ते सगळं तुमच्या हवाली करते, पण पोराबाळांना मारू नका,' असे तिने सत्याला विनविले. सत्या तर पाहतच राहिला. बाईमाणूस अन् एवढे धैर्य ! त्याने तिचे म्हणणे मान्य केले. मग तिने सगळ्यांना आग्रहाने जेऊ घातले व शेवटी सर्वांना दूधभात वाढला. आणि जेवणे झाल्यावर घरातले दागिन्यांचे डबे सत्यापुढे आणून ठेवले. वास्तविक सत्या त्या लुटीसाठीच आला होता. पण सावित्रीबाईचें धैर्य व दिलदारी पाहून त्याचे अंतरंग जागे झाले. परिस्थितीमुळे तेथल्या संस्कृत भावनांवर चढलेली रानटीपणाची कवचे क्षणभर गळून पडली आणि तो म्हणाला, 'सावित्रीबाई, तू खरी सावित्री. आमाला दूधभात घातला. तू माजी भन हाइस. हे दागिन हव हाइती कुनाला ? देव तुज कल्यान करू. मी तुझा भाऊ आहे. वेळ वकत पडला तर हाका मार मला.'
 संस्कृती म्हणजे याहून निराळे काय असते ? हिरेमाणके सोने या पेक्षां माणुसकी श्रेष्ठ मानणे यालाच संस्कृती म्हणतात. एवढे धन टाकून देण्यांत सत्याने जो मनोनिग्रह दाखविला त्यालाच संस्कृती म्हणतात. दूधभात एका स्त्रीने घातला. तेव्हा कृतज्ञता बुद्धी जागी होऊन तिला सत्याने बहीण मानले, तिला व तिच्या घरातल्या तरण्याताठ्या लेकी सुनांना पळवून नेणे त्याला सहज शक्य असताना तिला बहीण मानले, यालाच संस्कृती म्हणतात. शाळेत शिरून सत्याने पोरांना पेढे वाटले, ममतेने तो पोरांशी व मास्तरांशी बोलला, कोणा पोरीला शाबासकी दिली कोणाला कुरवाळले तेव्हा, एक घटकाभर तरी या उग्र, अडदांड, राक्षसी मुद्रेच्या माणसाच्या मनात औदार्य, वात्सल्य, प्रेम यांची वस्ती असू शकते हे दिसून आले.
 यल्लाप्पाची मुलगी रक्मी ही सत्याची रखेली. तिनेच त्याला दगा करून पकडून दिले. असे करण्यात तिला आपण बेइमानी झालो, असे वाटले नाही. का ? 'न फसवाया मी काय त्याची बायकू हाया काय ? मी तर त्याची कडू रकेली.' यल्लप्पा कडू होता. त्याचे घराणे अस्सल नव्हते. नाहीतर तात्या म्हणाला त्याप्रमाणे रक्मी नायकाची- सत्याची- बाइल झाली असती. पण ती कडू म्हणून बाइल झाली नाही. सत्याने तिला रखेली म्हणूनच वागविली. आणि या अपमानाचा तिनेही सूड घेतला. न्यायालयात सत्यावर चोरीचा आरोप शाबित झाला. पण तो गर्जना करून म्हणाला, 'आम्ही चोर न्हाई. आम्ही परबू रामचंद्राच चाकर हाओ. रामाच चाकर म्हनुनशान आम्ही रामवंशी जालु. आमाला तुमावानी बोलता येत न्हाई. पन काळ कंदी फिरल, अन आमाला बर दिस येत्याल.' असा हा सत्या फाशी गेला. माटे म्हणतात इमानी शूर व निष्ठावंत लोकांचा सत्या पुढारी होता.
 ध्येयाकांक्षा वरिष्ठ, सुशिक्षित समाजाच्या चित्तामध्ये ज्या ध्येयाकांक्षा असतात, असू शकतात त्याच निष्ठा मांगासारख्या हीन गणलेल्या जमातींच्या चित्तातही असू शकतात, हे तारळ खोऱ्यातील पिऱ्या मांगाच्या गोष्टीवरून दिसते. ते लोक दिसायला राकट, ओबडथोबड खडबडीत, असे दिसतात. या वरच्या खडकाच्या खाली डोकावले तर तेथे निर्मळ, जिवंत पाण्याचा झरा निश्चित दिसतो. 'आमाला तुमावानी बोलता येत नाही' हे मात्र खरे आहे. म्हणून माटे यांनी ते कसे बोलतान वे सांगून त्याचा अर्थ आपण समजावून घ्यावा अशी विनंती केली आहे.
 पालीच्या खंडुबाच्या जत्रेत मांग लोकांचा भरणाच फार असतो. तो त्यांचा देव आहे. आणि मांग कुठेही कसाही फिरत असला तरी जत्रेच्या दिवशी नियमाने तेथे यावयाचा हे ठरलेले आहे. त्यामुळेच अनेक दिवस फरारी असलेले मांग गुन्हेगार तेथे त्या दिवशी सापडतील अशी पोलिसांची खात्री असते व जत्रेला तेही मोठ्या सरंजामनिशी हजर असतात. पिऱ्या मांगाने जत्रेला जाण्याची गोष्ट त्याची बायको चंद्री हिच्याजवळ काढली तेव्हा हा धोका तिला दिसल्यामुळे ती धन्याला म्हणाली, 'तुमी जत्रेला न्हाइ जावाव. सरकारी मानसं मुरदाड. तिकडं हिंडत्यात. जीव जगला तर धादा दर्शन घडल. तवा तुमी पालीच्या जत्रेचा नाद सोडा.' पण पिऱ्याला हे बोलणे मानवले नाही. तो म्हणाला, 'चंद्राबाई तू अशी कशी बोलतीयास. आग, वर्सातन एकदा दरसान घडतया; त्यवडबी सोडल तर चोरी दरूड्या पलीकडं काय रायलं !
 चोरी दरूड्यापलीकडे, पोटाच्या व्यवसायापलीकडे काही असणे यातच भूषण आहे. यातच जीवनाचे सार्थक आहे, अशी पिऱ्याची, एका मांगाची, एका खुनी दरोडेखोराची श्रद्धा आहे. वरिष्ठ समाजात जीवनाचे हेच भूषण मानतात. तेथे याला ध्येयवाद म्हणतात, श्रेष्ठ मूल्ये म्हणतात, त्याग, आत्मार्पण, हौतात्म्य म्हणतात. ती भाषा पिऱ्याला येत नाही. म्हणून त्याच्या अंतरंगातला तो आशय माटे यांनी त्याच्या रांगड्या भाषेत सांगितला आहे. पिऱ्या म्हणतो, 'चंद्राबाई, ह्ये बग ह्यो पिऱ्या गुराचं मुडदं फाडायला अन चराटं वळायला जन्माला न्हाइ आला. असं. म्येलेलं आन खानारा न्हव ह्यो पिऱ्या. तू का घाबरतियास ? खंडुबा आपल्या पाठीवर हाये. जत्रला जायाचं मात्र सोडू नग.'
 या गोष्टीच्या प्रारंभीच माटे यांनी हिंदुसमाजाचे वर्णन केले आहे. या समाजाला सरोवराची उपमा देऊन ते म्हणतात, 'हे समाजसरोवर काळसर, गढूळ आहे. त्या पाण्याला कसलाही प्रसाद राहिलेला नाही.पण पाहणाराची दृष्टी प्रासादिक असली तर नाना प्रकारचे जलचर वावरताना त्याला येथे दिसतात. जाता जाता दृष्टी तळाशी गेली म्हणजे भली दांडगी पण जड कासवे तळाशी बसलेली दिसतात. एखाद्या वेळी एखादे कासव खडबडून उठते आणि पाण्यात उफराटा तीर मारून पृष्ठाकडे बिनदिक्कत झेपावते. त्याला पाहून सगळे पाणी व सगळे जीव गलबलतात. पिऱ्यामांग ह्या धाडशी प्राण्यापैकीच एक होता' याच पिऱ्याच्या वर्णनाला उद्देशून प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे की, तारळ खोऱ्यातील पिऱ्याचे सामाजिक उत्थान कोणत्या रूपाचे आहे ते येथे सांगितले आहे.
 जाब विचारणार ! 'एका अस्पृश्याच्या डायरीतील पाने' या कथेतील पिऱ्याच्या निवेदनातून अस्पृश्यांच्या अंतरंगाचे दर्शन तर होतेच, पण त्याचबरोबर हिंदु समाजाच्या अंतरंगाचे दर्शनही होते. अत्यंत थोर संस्कृतीचा हजारो वर्षांचा वारसा सांगणारा हा समाज अस्पृश्यांना कसा दिसतो, ते या डायरीवरून कळून येते. साहेबांचा मुक्काम गावात होता. पहाटे पासून दिवस डोईवर येईपर्यंत पिऱ्या सारखा राबत होता. मग घरी आला तो कळले की, दोन्ही पोरे शिद्या अन् तानी पाण्याला गेल्याती. तो तसाच पाणवठ्याकडे गेला. तानी पाण्यासाठी विनवण्या करीत होती. तिला कोणी पाणी वाढत नव्हते. तेवढ्यात महंमदभाईची बहीण पाण्याला आली. तिने तिला पाणी वाढले. रक्मीचा घडा भरून पाणी इकडे तिकडे वाहवले. ब्राह्मणिणी, कुणबिणी किंचाळून म्हणाल्या, 'अग ए ! तुझं विटाळाचं पाणी इकडं येतंय ना!' पिऱ्या थट्टेने म्हणाला, 'आमचा इंटाळ झाला ! अन त्या बेगमसाहेबानं हेळात शिरून चुळा थुंकल्या त्याचं काय ?'
 महमदभाई हा एक शिपाई. त्याच्यावर साहेब काही कारणाने रागावले होते. कोणीसे म्हणाले 'आता महमदभाईला लांब नेऊन घालत्याल. त्यावर तानी कांय म्हणते ! 'अन् भाई जायाचं मंजी बेगमबी जायाची का ? आये, मंग आपल्याला पानी कोन वाडील ग?' हिंदू बाया वाढणार नाहीत हे नक्की !
 रात्री गावात कीर्तन होते. मामलेदार, फडणीस ही बडी मंडळी लोडाला टेकून बसली होती. इतक्यात फौजदार आले. ते मुसलमान होते. मंडपात येण्यास ते बिचकू लागले. पण मामलेदार म्हणाले, 'या, या, हरकत नाही. आज हरिवोवांचा उत्सव आहे. हरिवोवा सगळ्यांचेच होते !' अर्थातच फौजदार मामलेदारांच्या शेजारी बसले. थोड्या वेळाने पोरांना घेऊन पिऱ्या आला. पोरे म्हणत होती, 'बाबा, मंडपात चला ना!' लोक त्याला दरडावीत होते, 'पिऱ्या, लेका बाजूला हो त्यांना लागशील ना !'
 हरिबोवा सर्वांना सारखे लेखीत. आज त्यांचा उत्सव होता. बोवांनी, एकनाथांनी गाढवाला पाणी पाजल्याची कथा सांगितली. ती सांगताना ते संतांच्या भूतदयेचे सारखे वर्णन करीत होते. "त्यांना गाढवाचा आत्मा माणसाच्या आत्म्याहून निराळा वाटत नव्हता. सर्व चराचरात परमात्मा भरला आहे. भूतमात्राचे ठायी त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. 'भूतदया गाईपशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वनामाजी ॥' असे तुकाराम महाराज म्हणतात."
 घराकडे जाताना तानी म्हणाली, 'बाबा, त्या गाढवाच्या पोराला बामनानं कांवडीचं पानी पाजलं, अन आपल्याला गावच्या हेळावर कावं भरू देत न्हाइती ?" त्यावर पिऱ्या उद्गारला, 'तुला काय सांगू ? आपला शिद्या मोठा झाला की गावकऱ्याना विचारील जाब याचा!'
 उपेक्षितांचे अंतरंग हे असे आहे. प्रेम, माया, वात्सल्य या भावना वरिष्ठ थरातल्याप्रमाणेच त्यांनाही आहेत. उच्चकुळीचा अभिमान त्यांनाही वाटतो. उच्च ध्येयाच्या आकांक्षा त्यांच्याही अंतःकरणात वावरत असतात. माणुसकी हे सर्वांत श्रेष्ठ मूल्य हा विचार ते आचरूनही दाखवितात. वरिष्ठ वर्णातील संताच्या वचनांची वटवट कशी पोकळ आहे हे त्यांनाही जाणवते. आणि अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, या समाजाला जाब विचारला पाहिजे ही उर्मी त्या अंतरंगातही उसळते.
 जमातीची हत्या अर्थात परिस्थिती भयानक असताना, अत्यंत प्रतिकूल असताना, उत्कर्षाची कसलीही संधी नसताना दलित समाजांत प्रत्यक्षात अशी उदाहरणे तुरळक सापडणार हे उघडच आहे. भीषण परिस्थितीवर मात करून वर येण्याइतकी गुणसंपदा फारच थोड्या लोकांच्या ठायी असणार. थोर साहित्यिक अंकल टॉम, जीन वॉलजीन, सत्या, पिऱ्या अशांची उदाहरणे देऊन कथा रचतात तेव्हा त्यांना हेच सांगावयाचे असते. या दलित समाजाच्या ठायी वरिष्ठ समाजासारखीच गुणसंपदा असते पण परिस्थिती, वर्णद्वेष, कायदा, अस्पृश्यता त्यांच्या त्या गुणांना अवसर मिळू देत नाही, म्हणून परिस्थितीने त्याच्या हातीपायी घातलेल्या शृंखला समाजाने तोडून टाकल्या पाहिजेत, हाच त्या सर्वांचा आशय असतो. या परिस्थितीमुळे मानवी गुणांची आणि एकंदर त्या जमातीची हत्या होत असते. अस्पृश्यतेच्या रूढीमुळे त्या जमातींची कशी हत्या हिंदुसमाजानें केली आहे हे सगाजी बुवाच्या कथेतून माटे यांनी अत्यंत भेदक शब्दांत स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, 'शंभरावर जगलेल्या या माणसाच्या प्रदीर्घ आयुष्यावरून जीवन वाहत होते, परंतु त्याच्या जीवनात कोणताही फरक पडला नाही. कारण ? कारण एकच ! त्याला स्वतःचे भवितव्य घडविण्याचा अधिकार समाजाने नाकारला होता. तो अस्पृश्य होता. वास्तविक त्याला मन होते, बुद्धी होती, भावना होती, आकांक्षा होती. त्याला ईर्षा आणि असूयाही असली पाहिजे. त्याला हास्य होते व प्रपंचाची हौसही असली पाहिजे. पण या सर्वांचे केवळ अणुरेणु त्यांच्या पिंडांत होते. त्याने पुस्तके वाचली असती, लिहिली असती, सभेत उभे राहून गर्जनाही केल्या असत्या. शेताच्या बांधावर उभे राहून सरकारी करवसुलीसाठी आलेल्या कामगारांना ढेकूळ भिरकावून मारले असते. पण सगाजीचे यांतले काहीच झाले नाही. कारण त्याला मानवकोटीच्या पहिल्या रस्त्यावर पाऊल टाकायलासुद्धा संधी नव्हती. तो अस्पृश्य होता. एक उभा मानवप्राणी शंभर वर्षे जगला आणि जगाकडे लांबून पहात पहात शेवटी थिजलेल्या डोळ्यांचे विरलेले जीर्ण पडदे त्याने कायमचे लावून घेतले.'
 हेतु प्रधानता महार, मांग, रामोशी या उपेक्षितांच्या अंतरंगाचे वर्णन करताना माटे यांनी हे अमरसाहित्य निर्माण केले आहे. त्यांच्या कथा हेतुप्रधान आहेत असा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात येतो. आणि मराठीतल्या पहिल्या श्रेणीतल्या दोनचार कथाकारांचा उल्लेख करताना त्यांचा उल्लेख सहसा कोणी करीत नाहीत. कारण त्यांच्या कथा हेतुप्रधान आहेत. आमच्या टीकाकारांची वाङ्मयाभिरूची किती हीन पातळीला गेली आहे, याची यावरून कल्पना येईल. जिवंत अनुभवातून माटे यांनी या कथा लिहिल्या आहेत. विशाल सहानुभूती हे थोर साहित्यिकाचे लक्षण म्हणून सांगतात. या कथांत सह-अनुभूतीचे विशालत्य जेवढे दिसते तेवढे अन्यत्र सापडणे दुर्मिळच आहे. त्या अनुभूतीचा प्रत्यय प्रत्येक शब्दागणिक वाचकांना येत असतो. असे असूनही हेतु प्रधानता हा दोष जाणवून त्या कथा जर कोणाला कमी प्रतीच्या वाटत असल्या तर 'अरसिकेषु कवित्व निवेदन' हे विधीने माटे यांच्या शिरसि लिहिले होते, असे म्हणावे लागेल. अंकल टॉम, लेमिझरेबल्स, वॉर अँड पीस, महाभारत, रामायण, हे सर्व अक्षर साहित्य हेतुप्रधानच होते. आणि साहित्य तसेच असावे, असे त्या साहित्यिकांचे मत होते. माटे यांचे मत तसेच होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी तरूण लेखकांना याच प्रकारचे साहित्य तुम्ही लिहावे, असे आवाहन केले आहे. ते म्हणतात, 'आमच्या सर्व विचारवंतांचा मोहरा स्वकीयांकडे वळला पाहिजे, या समाजाच्या सर्व थरातून आपले मन सहानुभूतीने खेळत ठेवणे; हा व्यापार जर आपण चालू ठेविला तर अगदी जिवंत अशी वाङ्मये वाटेल तितकी निर्माण होतील. आपला समाज अज्ञ आहे, बिभिस्त आहे, क्वचित ओंगळ आहे; पण एवढ्याने त्याला आपण दूर लोटता कामा नये. त्याचे मनोगत ममत्वाने ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. हा सर्व समाज या विवंचनेत आहे की आपल्या दुःखाला आणि काळज्यांना कोणी वाचा फोडील काय ? मी स्वतः ललित वाङ्मयात जो अल्पसा प्रवेश केला आहे तो याच बुद्धीने !'
 हे शेवटचे वाक्य माटे यांच्याच बाबतीत खरे आहे असे नाही. व्यास, वाल्मीकी हरिभाऊ, स्टोवे, व्हिक्टर ह्यूगो टॉलस्टॉय, या सारख्या सर्व थोर साहित्यिकांचे तेच लक्षण आहे. ते वाङ्मयात याच हेतूने प्रवेश करतात. त्याचे साहित्य अमर झाले आहे ते याच कारणाने.
 स्त्रीची प्रतिष्ठा स्त्री जीवन हा बहुतेक सर्व ललित लेखकांचा अत्यंत प्रिय असा विषय आहे. मानवी संसारात स्त्रीने अर्ध्याहून अधिक क्षेत्र व्यापलेले असल्यामुळे कोणतीही कादंबरी असो, नाटक असो, लेखक त्या कृतीत आपला स्त्रीजीवन विषयक दृष्टिकोन व्यक्त करीतच असतो. त्यातूनही गेल्या शतकात जगातल्या प्रत्येक देशात सामाजिक क्रांतीच्या घोषणा होत असल्यामुळे व ती तत्त्वे प्रसृत होत असल्यामुळे स्त्रीच्या प्रतिष्ठेविषयीचा सर्व समाजाचाच दृष्टिकोन बदलत आहे. साहित्यात त्याचे पडसाद उमटणे अपरिहार्यच होते. ते पडसाद काय आहेत ते पाहता असे दिसते की, स्त्रीपुरुषात असलेली विषमता आणि आजपर्यंतच्या समाजाचे स्त्रीला दिलेले हीन स्थान हा घोर असा अन्याय आहे, असेच मत बहुतेक सर्व ललित लेखकांनी मांडलेले आहे. इब्सेनचे 'डॉलस हाऊस' हे नाटक, हरिभाऊच्या 'पण लक्षात कोण घेतो,' 'मी' या कादंबऱ्या, हार्डीची 'टेस' ही कादंबरी, तांब्याच्या 'निःशब्द आत्मयज्ञ,' 'हिंदुविधवेचे मन' इ. कविता, फडके यांची 'उद्धार' माडखोलकरांची 'भंगलेले देऊळ' या कादंबऱ्या या ललितकृतीत हेच मत निरनिराळ्या पद्धतीनी या लेखकांनी मांडलेले आहे. त्यांच्या ललितकृतींचा परिचय करून घेऊन त्यांनी मानवी जीवनातल्या या गहन गंभीर विषयासंबंधी काय भाष्य केले आहे ते आता पहावयाचे आहे.
 १ बाहुली 'डॉलस हाऊस' हे इब्सेनचे जगविख्यात नाटक आहे. त्या नावातच इब्सेनचा भावार्थ दिसून येतो. स्त्री ही एक बाहुली आहे, पुरुषाचे ते एक खेळणे आहे, मनोविनोदन आहे अशा दृष्टीने पुरुष तिच्याकडे पहातो, त्याच्या मते तिचे तेच स्थान आहे, हे या नावातून इब्सेनने ध्वनित केले आहे. आणि हाच ध्वन्यर्थ सर्व नाटकात विशद केला आहे.
 नोरा ही या नाटकाची नायिका- टोरवॉल्ड हेल्मर याची पत्नी- ही अगदी भोळी भाबडी, घर, संसार, मुलेबाळे यात पूर्ण रमून गेलेली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तेच आपले कार्य, असे मानणारी, पतीच्या अर्ध्यावचनात राहणारी, आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे, असावे, असे चुकून सुद्धा जिच्या मनात येत नाही अशी, घराबाहेरच्या जगाचे वास्तव रूप न जाणणारी अशी एक जुन्या काळची पतिव्रता स्त्री आहे. आणि तिच्या संसारावर विचित्र संकट आले नसते तर याच निरागस मनोवृत्तीने शेवटपर्यंत संसार करून तिने आपला आयु:क्रम संपविला असता. पण एका एकी टोरवॉल्ड हेल्मर आजारी झाला. त्यांला अगदी घातक असा रोग बडला. आणि इटलीसारख्या दक्षिणेकडच्या प्रदेशात वर्षभर राहून हवापालट केल्यावाचून टोरवॉल्ड बरा होणार नाही, असे डॉक्टरानी सांगितले. टोरवॉल्डची प्राप्ती बेताची होती. हा खर्च त्याला झेपण्याजोगा नव्हता. शिवाय काही घातक रोग झाला आहे, हे त्याला कळू द्यावयाचे नव्हते. म्हणून ही सर्व जबाबदारी नोरावर पडली. तिने वडिलांच्याकडून पैसे आणले असते. पण तेही शेवटच्या दुखण्याने अंथरुणावर पडून होते. नवऱ्याला काही असाध्य व्याधी जडली आहे, हे त्यांना त्या स्थितीत सांगणे, नोराला योग्य वाटले नाही. म्हणून तिने कॉगस्टॅंड नावाच्या गावातल्याच एका गृहस्थाकडून अडीचशे पौंड कर्ज काढले, त्यावेळी केवळ स्त्रीच्या सहीवर कर्ज मिळत नसे. कोणी तरी पुरुषाची सही लागत असे. त्यामुळे नोरा मोठचा पेचात सापडली. पती व पिता यावाचून तिला कोणीच सही दिली नसती. त्यांना तर यातले काही सांगावयाचे नव्हते. म्हणून मग तिने स्वतःच वडिलाची सही कर्जखतांवर केली, पैसे घेतले व पतीला घेऊन ती वर्षभर इटलीत राहिली. तेथे टोरवॉल्ड खडखडीत बरा झाला व परत येऊन आपल्या कामाला लागला.
 अर्थार्जन निषिद्ध आता ते कर्ज नोराला फेडावयाचे होते. त्यावेळी स्त्रीने अर्थार्जन करणे हे अगदीच निषिद्ध होते. म्हणून पतीच्या नकळत नोरा काही काम मिळवू लागली. मधूनच त्याच्याकडून काही निराळ्याच कारणासाठी पैसे मागून घेऊ लागली. आणि अशारीतीने ती कर्ज फेड करू लागली. या लपवा- छपवीमुळे नोराला फार कष्ट, फार यातना सोसाव्या लागल्या. पण पतीसाठी व मुलांसाठी तिने त्या सर्व सोसल्या. अशी आठ वर्षे गेली. कर्ज बरेचसे फिटले. त्याच सुमाराला टोरवॉल्डला एका बँकेत मॅनेजरची जागा मिळाली. त्यामुळे हेल्मर घरांत मोठा आनंद झाला. नोराला मोठी सार्थकता वाटली. तीन मुलं होती. कर्ज फिटत आले होते. आणि पतीला मोठी नोकरी मिळाली होती. पण त्या नोकरीतुनच सर्व नाश ओढवावयाचा होता. मानवी जीवन असे विचित्र आहे. जी घटना आनंदाची, धन्यतेची असे त्याला वाटते तीच पुष्कळ वेळा घातक ठरते. नोराच्या बाबतीत तरी तसे झाले.
 क्रॉगस्टँड त्याच बँकेत नोकरीला होता. पण त्याचे वर्तन निर्मळ नव्हते. त्याने अनेक उचापती केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या नोकऱ्या गेल्या होत्या. वॉल्ड हेल्मर याला हे सर्व माहित होते. म्हणून सूत्रे हाती घेताच त्याला काढून टाकावयाचे, असे त्याने ठरविले. याच सुमारास लिंडा नावाची नोराची जुनी मैत्रिण तिच्याकडे आली होती. ती विधवा होती. आणि कसलाच आधार नसल्यामुळे तिला नोकरी हवी होती. नोराने पतीला तसे सांगताच त्याने तें एकदम मान्य केले. कारण कॉंगस्टॅडची जागा रिकामी होतच होती. नियतीचा खेळ असा की, आपल्या मैत्रिणीची शिफारसं स्वतः नोरानेच केलेली असताना तिलाच आता कॉगस्टॅडला काढू नका. लिंडाला नोकरी न दिली तरी चालेल असे पतीला विनविण्याची पाळी आली. आणि तेही, खरे कारण न सांगता !