संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण/ माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन

विकिस्रोत कडून

अधिक संपन्न व्हावी अशी त्या काळी जी अपेक्षा व्यक्त केली, त्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ लोटला असला तरी आपली मराठी किती प्रमाणात ज्ञानभाषा झाली आहे, याचे आपण साऱ्यांनी गांभीर्याने आत्मपरिक्षण केले पाहिजे. महाराजांचे हे भाषण प्रमाण मानून आपण साऱ्यांनी या दिशेने अधिक भरीव प्रयत्न केले पाहिजेत, हे नक्की!
 बडोद्याशी संबंधित संमेलनाध्यक्षपद भूषवलेले सयाजीराव गायकवाड आणि न. चिं. केळकरांच्या पंक्तीला बसण्याची माझी पात्रता नाही हे मी जाणतो. हे दोनच नाहीत तर अनेक दिग्गजांनी भूषवलेल्या संमेलनाध्यक्ष पदावर माझी निवड करून माझा जो बहुमान मराठी रसिकजनांनी केला आहे, त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. तसेच माझ्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. त्या जाणिवेतून आता मी माझे साहित्यचिंतन व भविष्यकाळात करावयाची कामे यावर माझे विचार नम्रतेने आपणासारख्या रसिक जाणकार श्रोत्यांपुढे मांडणार आहे.


दोन
माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन


 मित्रहो, मूलत: मी एक सर्जनशील ललित लेखक आहे. कथा व कादंबरी हे माझं अभिव्यक्तीचे मुख्य माध्यम आहे. त्यामुळे माझं साहित्यविषयक चिंतन आपणापुढे मांडताना मी माझ्या लेखनाच्या प्रेरणा काय आहेत आणि मला काय व्यक्त करायचे होते व आहे ते प्रथम प्रस्तुत करतो.
 आत्माविष्कार ही कलावंतांच्या कलेची पहिली व अखेरची प्रेरणा असते; पण कलावंत हा समाजाचा जबाबदार घटक असतो आणि आपल्या काळाचं 'प्रॉडक्ट किंवा अपत्य असतो. त्यामुळे त्याची कलाप्रेरणा केवळ मनाचा आविष्कार नसते, तर समाजातील माणसांच्या सुखदुःखाची, संघर्ष लढ्याची हकिकत प्रत्यक्षअप्रत्यक्ष कृतीद्वारे किंवा सहानुभूतीने जाणून घेऊन ती व्यक्त करणे व माणसाच्या जगण्याला बळ देणे, त्याला प्रसंगी पेटवणं तर कधी रिझवणं अशा पद्धतीने आपल्या प्राप्त व विकसित झालेल्या प्रतिभारंगात मिसळून व्यक्त होते. मी स्वत:ला सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ सदैव माणसाच्या दु:खवेदनेशी जोडलेली गेलीय असं वाटतं. खरं तर टॉलस्टॉयनं म्हटल्याप्रमाणे सुखाच्या-आनंदाच्या कहाण्या फार तर एक दोन होतील; पण दु:ख, वेदना आणि संघर्षाच्या शेकडो कथा होऊ शकतात. मला तर प्रत्येक माणसाचं दु:ख, संघर्ष हा माझ्या लेखनाचा कच्चा माल वाटतो. अशा माणसाचं अंतरंग प्रतिभा, स्वानुभव, चिंतन आणि मनन करून जाणणं व शब्दाच्या माध्यमातून प्रकट करीत दु:ख-वेदनेशी संघर्ष करणा-या त्याच्या विजिगीषु वृत्तीला बळ देणं, ही माझ्या लेखकाची सर्वात प्रबळ प्रेरणा आहे, असं मी मानतो.
 आज एकविसाव्या शतकातलं जग स्फोटक बनलं आहे. गरिबी, मूल्यांचा हास, दहशतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल का, व त्याचा जगण्याचा विश्वास अंशमानाने का होईना वाढवता येईल का, हा माझा सततचा प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं, तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक, बेकारी आणि आत्महत्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे. तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचं मी सातत्यानं भान बाळगत आलो. तसेच हॅव नॉट' म्हणजेच 'नाही रे' वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे ही पण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे. तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र, त्यासाठी कोणताही एक 'इझम' वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे, असे मी मानत नाही. माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे.
 मी स्वत:ला आजच्या काळाचा म्हणजेच समकालीन लेखक मानतो. जेव्हा टीकाकार मला समकालीन लेखक म्हणतात, ती माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लिमेंट आहे, असे मी मानतो. हे माझ्यासाठी सहजतेनं घडत गेलं असं वाटतं. मराठी वाचकांना पुराण-इतिहासात रमायला आवडतं. राजकीय नेते हे जाणून मतपेटीसाठी 'पुनरुज्जीवनवादाला उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या काळचे व त्या काळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे 'पोलिटिकली करेक्ट' लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाची प्रकार म्हणजे 'नॉस्टॅल्जिक' होत गेलेल्या लेखनाचा. मला वाटतं की, मराठी माणूस अजूनही भूतकाळात जास्त रमतो; पण माझी स्मरणरंजनाची व इतिहास-पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसेच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही. ख-या अर्थाने वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस वे एक लेखक आहे. इथं कदाचित एक धोका माझ्यासारखा समकालीन लेखकाबाबत उद्भवतो. तो हो की उद्या हे साहित्य शिळे तर होणार नाहीं? माझं उत्तर साफ आहे, कालिदास, शेक्सपिअर, प्रेमचंद व मंटोसारखे कालजयी लेख़क पण किती वाचले जातात? त्यामुळे भविष्यकाळातील वाचकाची मी बिलकूल चिंता करीत नाही. आज जो माझ्या भवतालचा समाज आहे, माणसं आहेत, त्यांच्यात मी गुंतलेला असतो. लेखक म्हणून तसेच कलावंत म्हणून, त्यांच्या खासगी जीवनावविषयी मला निकोप कुतूहल लेखक म्हणून आहे. ते जाणून च समजून घेत मी आजच्या माणसासाठी लिहीत असतो.
 पण याचा अर्थ असा नाही की, समकालीन लेखन हे क्षणजीवी असतं, मौलिक नसतं. कारण मानवी भाव-भावना, माणसाचे षडरिपू विकार हे सार्वत्रिक व कालातीत म्हणून एक अर्थाने सनातन आहेत. म्हणून आजचं समकालीन लेखन हे क्षणजीवी असेल असं समजायचं कारण नाही. ते उद्या पण समकालीन वाटू शकेल, जर परिस्थिती व मानवी भावना-संस्कृतीत बदल झाला नाही तर, आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, माणूस हा मर्त्य आहे आणि मला जीवनाचे क्षणभंगुरत्व व मर्त्यपणा मान्य आहे. हा न्याय माझ्या लेखनालाही लागत असेल, तर मला वाईट वाटायचं कारण नाही.
 मला आज या सर्वांत महत्त्वाच्या विचारपीठ व साहित्य मंचावरून अभिमानाने सांगू द्या की, मी ‘प्रेमचंद' परंपरेचा पाईक आहे. एकनिष्ठ वारकरी आहे. प्रेमचंद हे भारताचे सर्वांत मोठे लेखक होते व आहेत. ते ज्या साहित्य विचारांचे प्रतिनिधित्व करतात, ती साहित्य विचारधारा म्हणजे प्रगतिशील लेखक चळवळीची विचारधारा होय! तिचे तत्त्वज्ञान काय आहे, हे सांगण्यापूर्वी १९३६ साली लखनौ येथे ‘अखिल भारतीय प्रगतिशील साहित्य चळवळी'चे जे पहिले अधिवेशन भरले होते, त्याच्या अध्यक्षपदावरून प्रेमचंदांनी 'साहित्य का उद्देश' या बाबत जे विचार व्यक्त केले ते आजही ताजे व प्रासंगिक आहेत. ते म्हणाले होते,
 ‘जर लेखकाला उन्हात कष्ट करून दुपारी झाडाखाली विसावलेल्या शेतकरी व मजुरांच्या रापलेल्या व काळवंडलेल्या चेहऱ्याच्या सुरकुत्यांमधलं सौंदर्य आणि राबराब राबणाच्या कष्टकरी स्त्रीच्या राठ पडलेल्या हातामधील सौंदर्य जाणवत नसेल तर तुम्ही लेखक म्हणून घ्यायला पात्र नाहीत.'
 कदाचित प्रेमचंदांचे परखड विचार रूपवादी, कलावादी लेखक कवींना मान्य होणार नाहीत, तेव्हाही मान्य नव्हते; पण साहित्याचा तो एक महत्त्वाचा विचार आहे आणि त्याचे महत्त्व आज ऐंशी वर्षांनी पण कायम आहे, असं प्रेमचंदांच्या परंपरेचा स्वत:ला पाईक म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या मला वाटतं. त्यांनी त्या भाषणात असे प्रतिपादन केलं होतं की, साहित्यामध्ये वैयक्तिक अनुभवापेक्षा समाजाचे अनुभव, त्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे. कारण लेखक हा केवळ व्यक्ती नसतो, तर तो समाजाचा घटक असतो. त्याचे अवघे अस्तित्वच मुळी समाजावर अवलंबून असते. समाजाविना प्रत्येक माणूस एकेकटा शून्य आहे. त्यामुळे सुशिक्षित व भाषाप्रभू असलेल्यांची समाजाप्रती काही एक जबाबदारी असते. ज्याप्रमाणे कामगारांच्या श्रमावर व शोषणावर जगणा-या भांडवलदाराचा आपण निषेध करतो, त्याचप्रमाणे सुस्थितीमधील लेखक जर केवळ स्वत:च्या वैयक्तिक सुख-दु:खात रममाण होत लिहीत राहिले, तर अशा ‘बौद्धिक भांडवलदार' बनलेल्यांचा पण आपण निषेध केला पाहिजे....' प्रेमचंदांनी त्या काळच्या जागतिक लेखक संघाचा दाखला देत म्हटलं की, माणसांची सुख-दु:ख, त्यांचे आर्थिक प्रश्न, ऐतिहासिक वादविवाद, जीवनविषयक तत्त्वज्ञान आदी सर्व काही पाश्चात्त्य साहित्यात ताकदीने मांडले जाते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना उथळ व वरवरचं लिहिणा-या भारतीय लेखकांची लाज वाटते. त्यांचा भारतीय लेखकांना संदेश होता की, त्यांनी आपली सांस्कृतिक पातळी उंचावली पाहिजे. जर आपण आपली लेखन कला व साहित्य सेवा देशातील हजारो गरिबांच्या सेवेत झिजवली, तरच आपण आपलं लेखकाचे कर्तव्य पूर्ण केलं असं म्हणता येईल.
 प्रेमचंदांचं हे सूत्र पुढे नेत विचार करायचा म्हणलं तर, साहित्य ही केवळ फावल्या वेळाची केवळ करमणूकक नाही, तर बुद्धी, भावना आणि प्रतिभेच्या त्रिवेणी संगमातून घडवलेलं जीवनदर्शन असतं. ते वास्तवतेचं फोटोग्राफीप्रमाणे केवळ शब्दांनी केलेलं डॉक्युमेंटेशन नसतं तर, ते लेखकाच्या प्रतिभारूपी सप्तरंगातून रेखाटलेलं अंतरंग व्यक्त करणारं पेंटिंग-चित्र असतं. साहित्य हे समाजातून माणसाचं दुःख, शोषण, व्यथा-वेदना आणि समाज व्यवस्थेतलं त्याचं पिचलं जाणं आणि धर्म-राजकारण-सत्तेसोबतचा संघर्ष आदी जीवनद्रव्यं घेतो आणि आपल्या प्रतिभेनं त्याची पुनर्रचना करून समाजापुढे आरशासारखा ठेवतो. थोडक्यात साहित्य हे एका अर्थाने समाजाचं जीवनसत्व असतं आणि जो समाज हे सत्व जागरूकतेनं व नीरक्षीर विवेकी न्याय लावून टिपतो आणि मनात रूजवून घेत विचार करतो व प्रश्न विचारू लागतो, तो समाज निरोगी व प्रगतिशील राहतो. जेव्हा समाज आणि साहित्याची नाळ तुटते, तेव्हा असा समाज हा शबल, हतबल व एका अर्थानं करूप हात जातो. ही त्या समाजाच्या अध:पतनाची सुरुवात असते. कारण तो साहित्यातून संवेदनशीलता घेत नसल्यामुळे मूक-बधिर झालेला असतो. पण हीच वेळ असते व हाच काळ असतो, जेव्हा लेखकांनी-कलावंतांनी अधिक जबाबदारीनं लेखन करून समाजाचा आवाज बनावा, त्याचं आत्मभान जागृत करावं आणि त्याला दिलासा धावा की, त्याचे दु:ख, त्याचं शोषण एक ना एक दिवस संपणार आहे. म्हणजेच व्यापक अर्थाने साहित्य सामान्य माणसाची जीवनावरची श्रद्धा डळमळू न देता जिवंत ठेवतो.
 लंडनमध्ये १९३५ मध्ये मुल्कराज आनंद, एम. डी. तसीर, ज्योर्तिमय घोष, प्रमोद सेनगुप्ता आणि सज्जाद जहिर यांनी सामंतवाद, वसाहतवाद व साम्राज्यवादाविरुद्ध लेखक-कलावंतांनी ठाम भूमिका घेऊन लेखन करावं व समाजाच्या दबलेल्या-पिचलेल्या कामगार-शेतकरी व पददलितांच्या आणि दुय्यमत्वाचे जीणं व्यवस्थेमुळे जगावं लागणा-या स्त्रीच्या दु:ख-वेदनेला शब्द देऊन त्यांना आत्मबळ व आत्मभान द्यावे यासाठी एक साहित्य चळवळ उभारावी असं ठरवलं आणि ‘प्रोग्रेसिव्ह रायटर्स मुव्हमेंट' - प्रगतिशील लेखक चळवळीचा जाहिरनामा बनवला. तो सज्जाद जहिरनं मुन्शी प्रेमचंदांना भारतात आल्यावर दाखवला. त्यांना या जाहिरनाम्यातील लेखकाच्या उत्तरदायित्वाची भूमिका एवढी पटली की, त्यांनी तो हिंदीत अनुवाद करून आपल्या लोकप्रिय मासिक 'हंस' मध्ये छापला. त्यामुळे तत्कालीन भारतातील सर्व लेखक-कवींचं लक्ष वेधलं गेलं. या चळवळीचं प्रमुख तत्त्वज्ञान होतं, मानवी समता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं! 'प्रगतीवाद' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. १९ व्या शतकात इंग्लंडमध्ये वंचित, पीडित माणसांचे जीवनमान सुधारणं आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीनं सामाजिक सुधारणा घडवून आणणं म्हणजे प्रगतीवाद अशी विचारधारा प्रस्थापित झाली होती. मानवी विकासाच्या साच्या कक्षा ही प्रगतीवादी विचारधारा आपल्या कक्षेत घेते आणि शोषितांच्या दु:खांना वाचा फोडीत त्यांचा आवाज बुलंद करते व शोषकाविरुद्ध एल्गार पुकारते. साहित्याचे हे महत्त्वाचे काम आहे, असं या जाहिरनाम्यात म्हणलं होतं. त्याचीच अभिव्यक्ती प्रेमचंदांच्या वर उद्धृत केलेल्या भाषणात झालेली दिसते. आजही प्रेमचंदांनी मांडलेली विचारधारा भारतीय साहित्यात - खास करून हिंदी साहित्यातला एक प्रखर स्वर आहे.
 प्रगतीवादी लेखक चळवळीवर तत्कालीन सोव्हिएट युनियनच्या कलेबाबतच्या डाव्या मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होतो हे नि:संशय. वंचित, पीडितांचा व शोषितांचा साहित्यानं आबाज बनला पाहिजे, हे प्रगतिशील लेखक चळवळीच्या साहित्य विचाराचं सार आहे. निखाईल बुखारीन या समाजवादी साहित्य सिद्धान्तकानं असं म्हटलं आहे की, 'काव्यनिर्मिती (व एकूणच साहित्य निर्मिती) ही एकप्रकारे विचारधारेचे प्रगटीकरण असते. काव्य व साहित्य हा सामाजिक विकासातला एक महत्त्वपूर्ण घटक असतो. कारण सबंध जग हे सामाजिक विकासाचं प्रॉडक्ट असतं.' तर जॉर्ज ऑमसनच्या मते 'कलावंत हा श्रमकन्याचा प्रेषित असतो.' कला ही मानवजातीची गुलाम नाही की मालक, तर ती आहे मार्गदर्शक. अर्थातच कला ही कलावंताचा विवेक, अंत:करण व आवाज असते; पण त्याच बरोबर ती मानवजातीच्या सामुदायिक स्वर पण असते. कलेच्या उच्चतम अविष्काराने ती माणसांचे रूढी-परंपरांनी बनलेले भ्रम ध्वस्त करते आणि उदात्त ध्येय-कल्पनांचं भरण-पोषण करते. हाच कलेचा व कलावंत धर्म असला पाहिजे. विशेषत: त्यांचा, ज्यांना आपल्या बांधवांना गुलामी, रूढी व मागासलेपणातून दर करायचं आहे.
 या प्रगतिशील लेखक चळवळीच्या कला विचारांचा भारतीय साहित्यावर खोल प्रभाव पडलेला आहे. आजचं हिंदी काव्य व कथात्म साहित्य त्यांचे अनुसरण करताना दिसतं. त्यात विचारासोबत आत्मनिष्ठ कलात्मकता असते, त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक सूक्ष्म व प्रभावी पड़तो.
 मागच्या वर्षी दिवंगत झालेले हिंदीचे एक श्रेष्ठ कवी चंद्रकांत देवतालेंनी एका मुलाखतीत असं म्हणलं आहे की, ‘कवीनं सदैव आपल्या लोकांसोबत राहिलं पाहिजे. करोडो लोकांच्या दु:खात कवीनं आपल्या कवितेच्या माध्यमातून सामील व्हावं. कवी कुठेही असू दे, भले त्याचं लोक कमी वाचत असतील, पण ते त्याचं कवी असण्याचे भागधेय आहे, नियती आहे, जी त्याला लोकांच्या दु:खात सहभागी व्हायला, त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवायला मजबूर करते. कवीची भूमिका आजच्या परिस्थितीत मला विचाराल तर कवितेच्या बाहेर (म्हणजेच समाजात) अधिक असली पाहिजे. ही भूमिका त्याची शक्ती असते, जिच्या आधारे तो आपलं मस्तक झुकवणार नाही, हिमतीनं उभा राहीन व स्पष्टपणे (व्यवस्थेला - शोषणाला) 'नाही-नाही' म्हणेल.' (स्वैर भावानुवाद)
 अभिजनवादी व शुद्ध कलावादी साहित्यकारांनी प्रगतिशील लेखक चळवळीच्या विचारधारेला डावी विचारसरणी मानले व प्रचारकी साहित्याला प्रतिष्ठा देते, म्हणून विरोध केला; पण प्रश्न येथे विचारधारेपेक्षाही माणसांच्या दु:ख व शोषणचा आहे आणि असतो. मूलत: लेखक हा मानवी दु:खाचीच कहाणी सांगत असतो. कारण त्याचं नातं हे दु:खाशी व वेदनेशी असतं. स्वातंत्र्य, समता आणि बधुता हे भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान आहे, ते साहित्याचे पण असलं पाहिजे. कारण माणूस महत्त्वाचा, त्याचं जगणं; ते ही सन्मानानं जगणं महत्त्वाचं आहे; पण देश कोणताही असो, तेथील व्यवस्था मग ती धर्माची असो, विचारसरणीची असो, शासन-प्रशासनाची असो किंवा अर्थकारण संस्कृतीची असो, ती मूठभर माणसांच्या हाती सत्ता केंद्रित करत जाते, हा सार्वत्रिक इतिहास आहे. त्यामुळे बहुसंख्य सामान्य माणसांना ही व्यवस्था पुरेसा न्याय देत नाही, उलटपक्षी त्याचं शोषण करते व त्यांना मानवी प्रतिष्ठा व सन्मानाचं जगणं नाकारते.... हेच मानवी दु:ख, वेदना आणि दबलेपणाचं - पिचलेपणाचं मूळ आहे. त्याला आवाज देणे, ते शब्दबद्ध करणे, हेच तर साहित्याचे सामाजिक प्रयोजन आहे. असेच विचार नोबेल पारितोषिक स्वीकारताना विल्यम फॉकनॉर यांनी काढले होते, ते खालीलप्रमाणे आहेत.
 "मी मानवजातीचा शेवट जवळ आलाय हे मान्य करायला तयार नाही. कारण मानवजात ही अमर आहे. तसेच माणूस द:ख आणि वेदना सहन करीत आणि त्यावर मात करीत जगतो व वाटचाल करतो. याचे कारण त्याला मन आहे, आत्मा आहे. त्याच्यात अपार सहनशक्ती आहे. त्याच्यात करुणा व त्यागाची भावना आहे. त्यामुळे लेखक-कवींचे माझ्या मते हे कर्तव्य आहे, नव्हे त्यांच्या वाङ्मयीन धर्म ठरतो की, त्यांनी माणसाला दु:ख सहन करण्यासाठी, त्याचं मन कणखर करण्यासाठी मदत करावी. त्याला हे पुन्हा पुन्हा सांगावं, पटवून द्यावं की, त्याच्यात विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत जगण्याचं अपार धैर्य आहे. त्याच्यात आत्मसन्मान, आशा, स्वाभिमान आणि करुणा - सहवेदनेचं अपार भांडार आहे. हे त्याला पुन्हा आत्मप्रयत्ययास आणून देण्यासाठी लेखकानं आपलं लेखन केलं पाहिजे." (स्वैर अनुवाद)
 या प्रगतिशील लेखक चळवळीच्या विचारधारेनं प्रस्थापित केलेल्या साहित्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचं अवलोकन केलं, तर दोन साहित्य विचार प्रकर्षाने जाणवतात. एक विचार हा रामायण परंपरेतून विकसित झालेला आहे, तर दुसरा महाभारत परंपरेतून पुढे आलेला आहे. रामायण परंपरा म्हणजे आदर्शवादी जीवनाचे चित्रण करणारी साहित्य परंपरा. 'जे जे उत्तम, उदात्त, सुंदर व महन्मंगल व जे मानवी संस्कृतीचं आदर्श स्वप्न - युटोपिया आहे त्याचं दर्शन घडवणारं साहित्य म्हणजे रामायण परंपरेचं साहित्य, महाभारताची साहित्य परंपरा म्हणजे मानवी विकार, लालसा, सत्ता-संपत्ती-स्त्रीचा लोभ, क्रौर्य, हिंसा आणि पशुत्व वृत्तीच्या माणसांचं चित्रण परखड वास्तववादी पद्धतीनं करणारी परंपरा. पण संस्कृत व एकूणच अभिजात भारतीय साहित्य पाहिलं तर महाभारतीय परंपरेचा स्वीकार अठराव्या शतकापर्यंत फारसा दृढ झालेला दिसत नाही. 'रस' आणि 'सौंदर्य' युक्त रंजन हाच प्राचीन साहित्याचा मुख्य प्रवाह राहिलेला दिसून येतो. इंग्रजी अंमलात जागतिक दर्जाच्या साहित्य दर्शनानं भारतीय साहित्यकारांना नवं भान आलं आणि कादंबरी हा बाङ्मयप्रकार रूढ झाला. कथात्म साहित्याला नवे धुमारे फुटले. ब्रिटन व इतर युरोपिय सत्तांचा साम्राज्यवाद - वसाहतवाद आणि तिस-या जगाची होणारी लूट तसेच शेतक-यासोबत नवविकसित भांडवलशाहीमुळे कामगारांचे होणारं शोषण याचा संवेदनशील कलावंतावर परिणाम झाला नसता तर नवल म्हटलं पाहिजे. त्यातून साहित्याला नवे सामाजिक वळण मिळत गेले.
 पण साहित्याचा एक अभ्यासक म्हणून माझ्या मते, भारतीय प्राचीन साहित्यातील कलानिर्मितीच्या प्रेरणा म्हणून रामायण वे महाभारतीय परंपरा या परस्पर विरोधी नाहीत तर पूरक आहेत. कारण माणूस प्राण्यापासून विकसित झाला असला तरी त्याला बुद्धी, वाणी, शब्द, हास्य आणि करुणेचे वरदान प्राप्त झाले असल्यामुळे साहित्य व इतर कलांचा मानवी इतिहासाच्या वाटचालीत उदय व विकास झाला, त्यातून आपल्यातली पशुवृत्ती आणि आदिम पाशवी प्रेरणा नियंत्रित करीत परस्परांशी प्रेम करीत माणूस बनावं, सामाजिक प्राणी बनावं अशी मानवी संस्कृती विकसित झाली. तिला भुकेबरोबर कला - सौंदर्य जसं लागायचं, तसंच सहवेदना - करुणा आणि प्रेम - आस्था यापण सामूहिक जीवन जगताना लागायच्या. त्यातून संस्कारित - विकसित होत माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती बनायला सुरुवात झाली, मग त्याची मन प्रेरणा अधिकचे काही मागू लागली. त्यातून अवघ्या मानवजातीला कवेत घेणारा एक आदर्श प्रेम-आनंदमय समाज म्हणजेच युटोपियाचं त्याला स्वप्न पडू लागले आणि मानवी संस्कृतीची वाटचाल देवत्वाकडे म्हणजे विश्वकल्याण व शांततामय सहअस्तित्वाच्या आदर्श संस्कृतीकडे सुरू झाली..... ती मानवी अस्तित्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहणार आहे. ही आदर्श संस्कृती कदाचित कधीच अस्तित्वात शंभर टक्के येऊ शकणार नाही, पण ते मानवी ध्येय बनलं आहे. आपण ते ध्येय स्वीकारलं आहे. म्हणजेच मानवी षविकाराच्या महाभारतीय परंपरेकडून आदर्श रामायणी परंपरेकडे वाटचाल म्हणजे मानवी संस्कृतीची प्रगतीपर वाटचाल होय, तेच मानवी जीवन आणि संस्कृतीचे ध्येय आहे आणि साहित्याचं पण तेच प्रयोजन आहे. मानवी विकार परखडपणे दाखवीत इष्ट काय - अनिष्ट काय हे सूचित करीत साहित्यानं विश्वकल्याण आणि शांततामये सहअस्तित्वाचा उद्घोष करणे म्हणजेच महाभारत व रामायण परंपरेचा संगम साधत साहित्यनिर्मिती करणे होय. तेच लेखकाचं ध्येय व लक्ष असलं पाहिजे.
 थोडक्यात, लेखन हा फावल्या वेळेचा किंवा अर्थकारणाचा व्यवसाय नाही तर ते एक गंभीर निर्मितीचे काम आहे. मारियो वर्गास योसो या लेखकाच्या शब्दांत सांगायचं झालं तर, 'लेखन व्यवसाय हा छंद नाही की क्रीड़ा किंवा फुरसतीचा सुखद चाळा नाही. लेखन हे सर्वंकष व इतर सर्व बाबीं सोडून लेखकासाठीचा करायची तातडीचा प्राधान्यक्रम असतो, ती स्वखुशीनं पत्करलेली सुदैवी गुलामी असते. ही लेखनकामाठीची गुलामी लेखक खुशीनं को बरे करत असेल? उत्तर एकच आहे, त्यानं स्वत:ला सामान्य गरीब माणसाच्या दु:ख-वेदनेशी नाळ जोडून घेतलेली असते म्हणून !
 गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची ‘जिथं माणसाची मान ताठ असेल, मस्तक उन्नत असेल, ज्ञान मुक्त असेल आणि समाज दुभंगणाच्या भिंती नसतील' ही कविता आपण साच्याना माहीत आहेच. त्यात महाश्वेता देवीनं माझ्या स्वप्नातला भारत' या विषयी दिलेल्या एका व्याख्यानात टागोरांच्या अपेक्षांच्या यादीत आपल्याही काही अपेक्षा जोडीत यादी परिपूर्ण केली आहे. जेथे कर्ज प्रथा बंद झाली असेल, गरिबी संपलेली असेल, भूक हा शब्द उच्चारला पण जाणार नाही.....' असा भारत, असे जग असणं, भविष्यात केव्हा तरी साकार होणं, यासाठी तत्त्वज्ञानी, विचारवंत वे राज्यकत्र्यासोबत लेखक, कलावंतांनीही आपली लेखणी झिजवायला काय हरकत आहे? नव्हे ते त्यांचं नैतिक कर्तव्य आहे, त्यांच्या साहित्याचे श्रेयस व प्रेयसपण तेच आहे.....