Jump to content

संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण/प्रास्ताविक

विकिस्रोत कडून



९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
बड़ोदे

लक्ष्मीकांत देशमुख
यांचे
अध्यक्षीय भाषण
एक
प्रास्ताविक

 उपस्थित मान्यवर आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या व शतकाची भव्य परंपरा असणाऱ्या शारदोत्सवरूपी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंढरीच्या वारीत निष्ठेने सामील होणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याप्रमाणे या साहित्य पंढरीत शारदेच्या - सरस्वतीच्या ओढीने उपस्थित असणाऱ्या रसिक मित्रांनो !
ठळक मजकूर  सर्वप्रथम मी बडोद्याचे - वडोदराचे भाग्यविधाते व थोर कर्ते समाजसुधारक तिसरे सयाजीराव महाराज गायकवाड यांना अत्यंत विनम्रपणे अभिवादन करतो. काही वर्षांपूर्वी मी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात प्रशासकीय नोकरीनिमित्त जिल्हाधिकारी म्हणून साडे-तीन वर्षे होतो. त्या महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या कर्त्या समाजसुधारकांचा आशीर्वाद घेऊन या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बडोद्याला येताना माझ्या मनात ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या सयाजीराव गायकवाड महाराजांबाबत कृतज्ञतेची भावना आहे. आज आपला महानतम असा भारत देश एकविसाव्या शतकात एक जागतिक सत्ता म्हणून वेगाने वाटचाल करीत असताना त्याची भरभक्कम पायाभरणी ज्या महापुरुषांनी केली, त्यात सयाजी
महाराजांचे नाव आणि कार्यकर्तृत्व अग्रभागी शोभून दिसणारे आहे. त्यांचे सर्वांत मोठे व भारताला आधुनिक करणारे योगदान कोणते असेल तर ते म्हणजे त्यांनी ज्ञानप्रबोधनाचा भक्कम पाया घातला हे होय! पारतंत्र्यांच्या काळात अनेक थोर व्यक्तींनी सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले, पण कोणत्याही देशाच्या सर्वंकष उन्नतीचा मार्ग हा सामाजिक व राजकीय उत्थापनापेक्षा ज्ञानाच्या उत्थापनाद्वारे प्रशस्त राजमार्ग होत जात असतो, हे कृतीतून सांगणा-या गायकवाड महाराजांचे उठून दिसणारे द्रष्टेपण आहे. त्यांनी आपल्या संस्थानात १८७५ साली स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करून काही वर्षांतच अस्पृश्य व आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा व वसतीगृह देण्याचा जगातला पहिला हुकूम जारी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी १८९२ साली भारतात प्रथमच प्राथमिक शिक्षण सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे केले. त्यांनी माणसाचे ऐहिक जीवन प्रगत व समाधानी व्हावे म्हणून सर्वंकष स्वरूपाच्या सामाजिक सुधारणा केल्या, त्यामुळे महात्मा गांधींनी बडोदा - एक आदर्श संस्थान' असा लेख लिहून महाराजांविषयी गौरवोद्गार काढले आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीरावांनी केलेल्या सुधारणा व बनवलेले कायदे हे तत्कालीन प्रबोधन युगानंतरच्या काळातील अमेरिका व युरोपपेक्षा अधिक प्रागतिक होते, असे लिहून ठेवले आहे.
 रयतेच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी महाराजांनी बडोदा संस्थानात सार्वजनिक ग्रंथालयाची चळवळ सुरू केली व गावोगावी ग्रंथालये उघडली. त्यामागे लोकांच्या मनात वाचनाची आवड व ग्रंथप्रेम रुजावे, त्यांनी विचारी, विवेकी व सुसंस्कृत व्हावे हा त्यांचा उदात्त व काळाच्या पुढे असणारा द्रष्टा विचार होता. आपण सारे ज्ञान व साहित्याचे उपासक आहोत, त्यामुळे आपण ख-या अर्थाने महाराजांनी सुरू केलेल्या ज्ञानयात्रेचे वारकरी आहोत, असेच मला महाराजांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत म्हणावेसे वाटते.
 महाराजांच्या सर्वच कार्याचा आढावा मी घेणार नाही किंवा उपलब्ध मर्यादित वेळेत शक्यही नाही. पण त्यांनी १८९१ मध्ये ग्रामपंचायतीचा कायदा करून सत्तेचे विकेंद्रीकरण करत बड़ोदा संस्थानाला भारताच्या 'लोकशाहीची प्रयोगशाळा' अशी ओळख दिली. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी लोकशाही आवश्यक असते, व त्याची आधुनिक भारतात सयाजीरावांनी सुरुवात केली. लोकशाही व साहित्याचा अन्योन्य संबंध असतो, म्हणून मी या सुधारणेची आवर्जून नोंद घेतो. कारण पुढे माझ्या भाषणात त्याचा संदर्भ येणार आहे, तेव्हा अधिकचे भाष्य मी करीन.
 अहिंसा व सत्याग्रहाच्या अनोख्या आयुधांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्व संस्थाने विलीन करत एकसंघ भारताची उभारणी करणारे सरदार वल्लभभाई पटेलांची पण भूमी म्हणून मला-तुम्हा-आम्हां सर्वांना ही गुजराथची भूमी प्रिय आहे. 'वैष्णव जन तो तेणे कहीये जो पीड पराई जाने रे' असं म्हणणा-या संत नरसी भगताची पण ही भूमी आहे. महाराष्ट्र व गुजराथ १९६० पर्यंत एक द्वैभाषिक राज्याचे भाग होते, त्यामुळे मराठी व गुजराथी हे बांधव व भगिनी आहेत. महाराष्ट्र हा साखर उद्योगात तर गुजराथ दूध उत्पादनात अग्रेसर आहे, म्हणून महाराष्ट्र व गुजराथचे संबंध दुधात विरघळलेल्या साखरेसारखे मधुर आहेत, म्हणून मी या भूमीला वंदन करतो.
 बडोदा नगरीला साहित्यनिर्मितीची जी समृद्ध परंपरा आहे, तिच्या पाऊलखुणा कै. श्री. गणपतराव गायकवाड महाराजांच्या काळापासून पाहता येतात. त्यांच्या कारकिर्दीत मुद्रणकलेला सुरुवात झाली व त्यांनी ग्रंथनिर्मितीला मोठेच उत्तेजन दिले. ललितानंदांचे सौंदर्य लहरी', अनंतसुत विठ्ठलकृत 'दत्तप्रबोध', विनायक महादेव नातूंचे 'गणेश प्रताप', होनाजी बाळा व सगनभाऊ यांनी बडोद्यात ('वीरक्षेत्री लावण्या' या पुस्तकात त्या समाविष्ट आहेत.) केलेल्या लावण्या या १८ व्या शतकातील काव्यनिर्मितीपासून आपल्याला तिचा उगम पाहता येतो. श्री. सयाजीराव गायकवाड महाराज (तिसरे) यांच्यामुळे बडोदा राज्यात मराठी साहित्यनिर्मितीला नवे चैतन्य मिळाले. 'महाराष्ट्र शब्दकोशा'ला साहाय्य, बहुभाषाकोशा'ची योजना, ‘श्री सयाजी शासन कल्पतरू' हा अष्टभाषी राज्यव्यवहारकोश', 'व्यायामकोशांची निर्मिती' बहुभाषिक, बहुसांस्कृतिक माणसाला संस्कृतिसंवादासाठी असणारी भाषांतराची आवश्यकता व त्यासाठी भाषांतरविषयक अनेक योजनांची आखणी, कम्पॅरेटिव्ह रिलिजनचे 'तुलनात्मक धर्मविचार' हे मूलशंकर माणिकलाल याज्ञिकांनी केलेले भाषांतर (गुजराथी), 'दीघानिकाय'चे मराठी भाषांतर यासारख्या अनेक उपक्रमातून भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक घटकांच्या सूक्ष्म अनुबंधाची तरलस्पर्शी जाणीव व त्या विषयीची सजगता प्रगट होते. येथे अजून एक संदर्भ आवश्यक आहे तो म्हणजे, स्वत: सयाजी महाराजांनी From 'Caisar to 'Sultan' या एडवर्ड गिब्बनच्या पुस्तकावरचा टीकाग्रंथ १९०६ मध्ये लिहिला. ज्याचा मराठी अनुवाद कैसर'कडून 'सुलतान'कडे' या नावाने राजाराम रामकृष्ण भागवतांनी केला. महाराजांचे दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'नोट्स ऑन फेमिन टूर' होय. त्याचबरोबर शंकर मोरो रानडे यांच्या परिश्रमातून निर्माण झालेली ‘सहविचारिणी सभा' (इ.स. १८८०) व ‘सहविचार' हे नियतकालिक ग्रंथसंपादक आणि प्रसारक मंडळी' यांनी प्रसिद्ध केलेले विविध विषयावरील बावीस ग्रंथ या वाङ्मय निर्मितीच्या श्रेष्ठ कार्याची नोंद घ्यावी अशी आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासलेखनात मराठी रियासतींच्या लेखनाचे स्वतंत्र दालन उघडण्याचा सन्मान गो. स. सरदेसाई यांना बहाल करताना, त्यांच्या लेखनाचा आरंभ बडोद्यातून झाला, हे अभिमानाने सांगता येते. त्याचबरोबर सुप्रसिद्ध इतिहासकार विनायक सदाशिव बाकसकर यांचेही कार्य या विषयात महत्त्वाचे आहे. तसेच आधुनिक मराठी वाङ्मयेतिहास लेखनाचे उगमस्थानीचे ग्रंथ म्हणून ग. रं. दंडवतेंचे 'बडोद्याचे मराठी साहित्य' (१९२५), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मय' (१९२९), ‘महाराष्ट्र नाट्यकला आणि नाट्यवाङ्मय' (१९३१) या ग्रंथांची नावे घ्यावी लागतात. वाङ्मयेतिहास लेखनातील हे सातत्य वि. पां. नेने यांचे ‘अर्वाचीन मराठी साहित्य' (१९३५), वि. पां. दांडेकरांचे 'मराठी साहित्याची रूपरेषा' (१९५२), सुषमा करोगलांच्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता' यासारख्या ग्रंथातून समोर येते. 'ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (१९२१) हा मंगेश कमलाकर नाडकर्णीनी इंग्रजीतून लिहिलेला मराठी वाङ्मयेतिहासही पहिला म्हणून महत्त्वाचा आहे. मराठी छंद:शास्त्रात ज्यांचे प्रभुत्व निर्विवाद मान्य केले जाते, त्या प्रा. ना. ग. जोशी यांचे मोठे योगदान आहे. नाट्य, काव्य, विनोद या तिन्ही क्षेत्रात निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वतातील सिद्धहस्त लेखक नवसारीचे राम गणेश गडकरी, केशवसुतांना समकालीन असलेले प्रतिभासंपन्न अभिजातवादी कविश्रेष्ठ राजकवी चंद्रशेखर, मराठी साहित्यात शुद्ध निखळ विनोदनिर्मितीचा अनुपम ठेवा निर्माण करणारे प्राकृत आणि अर्धमागधी भाषातज्ज्ञ चिं. वि. जोशी हे बडोदे संस्थानाने मराठी साहित्याला दिलेली अमोल मौक्तिके आहेत. या वाङ्मयीन वातावरणात कवी दत्त, माधव ज्युलियन, वि. पां. दांडेकर, भाषातज्ज्ञ ना. गो. कालेलकर, वा. वि. जोशी, दा. ना. आपटे, नानासाहेब शिंदे, स. वि. देशपांडे, अपर्णाबाई देशपांडे, पत्रकार भालेकर आणि वि. न. कीर्तने यांच्या साहित्यनिर्मितीला, विचारचिंतनाला बहर आलेला दिसतो. यशवंतांनी मिळालेली ‘राजकवी' ही सन्मानपदवी या संदर्भात महत्त्वाची घटना. बडोद्यातील एका तपाहून अधिकच्या वास्तव्यात बहरत गेलेली श्री. अरविंदांची साहित्य संपदा व ‘सावित्री' या महाकाव्यास केलेला प्रारंभ, ‘अभिरुची'सारख्या नियतकालिकातून पु. आ. चित्रे व विमल चित्रे यांनी नवयुगाच्या संवेदनेचा वेध घेतला. त्यात मढेकरांसारखे कवी, समीक्षक, बडोद्यातील दिनेश माहुलांसारखे जागतिक कीर्तीच्या अभ्यासकांचे लेखन तसेच माधव आचवलांचे कलारसग्रहणात्मक, समीक्षात्मक व ललितपर लेखन प्रमुख होते. दिलीप चित्रे, विनोबा भावे, वि. द. घाटे इत्यादी प्रतिभावंतांच्या मानसविश्वात या नगरीचे असलेले स्थान या सर्वांतून श्री. सयाजी महाराजांनी नांगरलेल्या भूमीत ‘सांगे कोंभाची लवलव / मातीचे मार्दव' असे रूप दिसते. या साहित्य परंपरेचा ओघ अधेमधे क्वचित क्षीण, लुप्तप्राय झालेला दिसत असला तरी, त्यातील सातत्य कायम आहे. मराठी नव्वदोत्तर कवीतील सचिन केतकर हा महत्त्वाचा कवी मराठी काव्यप्रवाहाला नवे परिमाण देऊ पाहात तिची काव्यशास्त्रीय तात्त्विक भूमिका मांडतो आहे. भाषा, मौखिक परंपरा, साहित्य या क्षेत्रात कार्य करणारे डॉ. गणेश देवी यांचे कार्यही आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान प्राप्त करणारे ठरले आहे.
 आज सुरू होणारे ९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे बडोद्यामधील चौथे संमेलन आहे. १८७८ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन सुरू केले, त्यानंतर १९४७ पर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळात सत्तर वर्षांत ३१ साहित्य संमेलने झाली, त्यातील तीन संमेलने बड़ोदा येथे संपन्न झाली. १९०९ साली कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली, १९२१ मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली तर १९३४ मध्ये नारायण गोविंद चाफेकरांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले. याचाच अर्थ बडोद्याची वाङ्मयीन परंपरा पुण्याखालोखाल समृद्ध होती असा लावला तर अनुचित होणार नाही. साहित्य संमेलनांच्या काही अध्यक्षांनी नवे वाङ्मयीन सिद्धान्त मांडले आहेत. त्याची सुरुवात बडोद्याला १९२१ साली न. चिं. केळकरांच्या वाङ्मयाबाबत सविकल्प समाधीचा' अजरामर सिद्धान्ताने झाली, ती आजही वाङ्मयीन आस्वादासाठी महत्त्वाची आहे. केळकरांनी ‘खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय' अशी व्याख्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मांडली. त्याबाबत स्पष्टीकरण देताना, त्यांनी जे विवेचन केले आहे, ते त्यांच्याच शब्दांत उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. मुख्य म्हणजे प्रत्येक रसिक वाचकांना वाचनानंद घेताना तो प्रत्ययास आल्याविना राहत नाही. केळकर खरी सविकल्प समाधी उत्पन्न करते ते वाङ्मय, हो सिद्धान्त अशा त-हेने उलगडून दाखवतात.
 "निर्विकल्प समाधीत बाहेरच्या जगाची किंबहुना आपल्या देहाचीही काही एक जाणीव शिल्लक उरत नाही व उरताही कामा नये; पण वाङ्मय सेवनाने निर्माण होणा-या समाधीत स्वत:च्या मनोभूमिकेची जाणीव तर उरतेच, पण वर दर्शविलेल्या इतर भूमिकाही तीत समाविष्ट होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, तेच वाङ्मय अधिक उत्कृष्ट की ज्यांच्या सेवनाने अधिकांत अधिक कल्पना मनात एकदम उठतील व अधिकाधिक भूमिकांचा मानस अनुभव घडेल. या दृष्टीने पाहता सुंदर कल्पनाकल्लोळ ही वाङ्मयप्रेमी मनुष्याला इष्टापत्तीच होय."
 आज अनेकजण दरवर्षी भरणा-या शतकी परंपरा असलेल्या साहित्य संमेलनाला उरूस' वा 'जत्रा' म्हणत टीका करतात, त्यालाही १९२१ सालीच केळकरांनी खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे, तेही आज सर्व उपस्थित रसिकांना त्यांच्याच शब्दात सांगत या टीकाकारांना मी उत्तर देऊ इच्छितो.
 ‘वाङ्मयग्रंथकार हे तर स्वयंभूच असतात. एका ग्रंथकाराने म्हटले आहे की, 'Literary men have neither ancestors nor posterity: they alone compose their whole race.' वाङ्मय ग्रंथकारांना कुलपरंपरा किंवा वतन नसले तरी नि:स्वार्थी बुद्धीने परोपकारच त्यांच्या हातून घडत असतो. त्यांनी वाङ्मयाची उपासना नित्य चालू ठेवली पाहिजे. साहित्य संमेलन हे या उपासनेतले एक वार्षिक व्रत आहे. या व्रतानुष्ठानात एक वेळाही खंड न पडू देण्याची आपला निश्चय असल्यास तो तडीस जाणे कठीण नाही.'
 आपण सारे साहित्य रसिक याचे पालन करीत स्वतंत्र भारतात खंड न पडू देता वार्षिक संमेलने भरवत केळकरांच्या अपेक्षांची व त्यांच्या माध्यमातून मायमराठीच्या उपासनेची पूर्तता करीत आहोत, अशीच माझी भावना आहे.
 १९३२ मध्ये कोल्हापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खुद्ध सयाजीराव गायकवाड महाराज होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘वाङ्मय म्हणजे मनुष्याच्या मुखातून बाहेर पडलेली जी बाचा तिचा संग्रह' अशी वाङ्मयाची एक सर्वमान्य होणारी व्याख्या केली होती. त्यांना ज्ञानाधिष्ठीत विवेकी व सुसंस्कृत समाज घडवायचा असल्यामुळे त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘भावनात्मक' (म्हणजे ललित) वाङ्मयापेक्षा ‘बौद्धिक' (ललितेतर- ज्ञानमाहितीपर साहित्य) वाङ्मयाला त्यांनी अधिक प्रोत्साहन दिले, त्या काळी समाजाला प्रथम साक्षर, मग वाचक आणि तद्नंतर ज्ञानसंपन्न करण्यासाठी ललितेतर साहित्यास प्राथमिकता असणे यथायोग्यच होते. लोकशिक्षणासाठी काय प्रयत्न आपण केले हे सांगताना महाराज आपल्या भाषणात म्हणतात,
 “आता स्वत: आम्ही वाङ्मयाचा कार्यासाठी काय काय झीज सोसली हे सांगणे आत्मप्रशंसेसारखे दिसेल. परंतु आमचे अनुकरण करू इच्छिणा-यांस मार्ग दाखवावा व आमचे चुकत असल्यास योग्य तो सल्ला आपण द्यावा या हेतूने दोन शब्द सांगण्याची परवानगी घेतो. सक्तीचे प्राथमिक शिक्षण व दिलेले शिक्षण विसरून जाऊ नये म्हणून ग्रामपुस्तकालयाची स्थापना हे प्रथम यत्न झाले. राष्ट्रकथामाला, ज्ञानमंजुषा, महाराष्ट्र ग्रंथमाला वगैरे पुस्तकमाला काढण्यात सुमारे अडीच लक्ष रुपये (त्या काळाचे - म्हणजे आजचे किती याचा अंदाज करावा) खर्च झाल्यावर सन १९१२ साली दोन लक्ष रुपयांचा निधी वेगळा ठेवून त्याच्या व्याजात ग्रंथप्रकाशनाची व्यवस्था झाली. त्याचप्रमाणे जुने अभिजात ग्रंथ कसरीच्या भक्षस्थानी पडून नष्ट होऊ नयेत म्हणून प्राच्य ग्रंथमाला, तसचे सयाजीराव छात्रवृत्त्या, नाटक मंडळ यांच्या नेमणुका, राजकवीची नेमणूक, गुजराथी व मराठी पुस्तकांचे उल्लेखालय (रफरन्स लायब्ररी), कॉलेजमध्ये अध्यापकवृत्ती वगैरे अनेक मार्गांनी लोकभाषा गुजराथीप्रमाणेच मराठी भाषेच्या व वाङ्मयाच्या अभ्यासाची साधने आम्ही निर्माण केली आहेत.'
 श्रोते हो, महाराजांच्या भाषणाच्या या उताच्याकडे आपण अधिक लक्ष दिल्यास हे लक्षात येईल की, आज महाराष्ट्रात व देशातही ग्रंथालयाच्या संदर्भात यापेक्षा अधिक वेगळे व नवे उपक्रम होताना दिसत नाहीत. महाराजांनी त्या काळी मराठी भाषा व वाङ्मयासाठी जे काम केले ते आज आपले सरकार किती व कसे करीत आहे, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर उत्तर फारसे समाधानकारक मिळणार नाही हे उघड आहे. यातच महाराजांचे थोरपण दिसून येते आणि आजच्या आपल्या सरकारचे अपयश व आपले मराठी भाषिक म्हणून होणारे दुर्लक्ष दिसून येते. असो. पण या गुजराथच्या भूमीवर मला गुजराथ सरकार व जनतेला हे सांगू द्या, की महाराजांचे संस्थान हे मराठी असले तरी त्यांनी मराठी बरोबर गुजराथी भाषा व वाङ्मयाच्या वाढीसाठी त्या काळी तरतमभाव न बाळगता काम केले. त्यांच्यामुळे निर्माण झालेला मराठी-गुजराथी भाषाबंध आपण या पुढेही तसाच जपला पाहिजे व अधिक दृढ केला पाहिजे.
 या भाषणाच्या शेवटी महाराजांनी मराठी वाङ्मय परिषद व साहित्यकारांना काही मौलिक सूचना केल्या, त्या अशा होत्या.

“१)  लोकांस सुविचार व सद्भावनापोषक असे वाङ्मय हवे आहे. ज्ञानाने व अंत:करणाने आपले लोक सुधारलेल्या देशातल्या सारखे संपन्न होतील. आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहतील; राष्ट्रैक्याच्या व बंधुत्वाच्या कल्पनांचे बीजारोपण लोकांत होईल आणि अशा रीतीने एक राष्ट्ररचनेस प्रारंभ करीत अशाच प्रकारचे वाङ्मय निर्माण करण्याकडे लेखकांनी लक्ष द्यावे व ते प्रकाशित करण्याचे काम साहित्य परिषदेने हाती घ्यावे.

२) पाश्चात्त्य लेखक व विचारवंतांचे तसेच अर्थशास्त्र, नीती, राजकारण, विद्युतशास्त्र यांसारखी शाखे, स्थापत्य, चित्र वगैरे कला यांवरील अभिज्ञ ग्रंथकारांच्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे करविणे हे स्वभाषाअभिमानी व राष्ट्राभिमानी विद्वानांचे कर्तव्य आहे.

३) पाश्चात्त्य संदर्भ ग्रंथांवर 'देशीकार लेणे' चढविणे किंवा त्यांच्या धर्तीवर स्वतंत्र ग्रंथ प्रसिद्ध करणे जरूरी आहे.

४) लेखकांनी संस्कृतप्रचुर अवघड भाषेत न लिहिता खेडवळांनाही समजेल अशा सरळ भाषेत लिहिण्याचा परिपाठ ठेवावा.

५) ज्या पुस्तकांनी विचारात क्रांती घडवून आणली असेल, त्यांची भाषांतरे स्वभाषेत व्हावीत. स्वतंत्र लेखन करण्यासारखी प्रतिभा नसेल, त्यांनी चांगली भाषांतरे करण्याकडे लक्ष द्यावे."

 श्रोते हो, महाराजांनी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, आपल्या सर्व संस्था तर्काच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि राष्ट्रैक्य व बंधुतेच्या कल्पनांचे बीजारोपण व्हावे, संदर्भ ग्रंथ विपुल निर्माण व्हावेत व उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर होऊन मराठी