श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ एप्रिल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

२४ एप्रिल

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.


मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो. अत्यंत दारिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे आले कुठून ? मला दुःख होते ते माझे कुठे तरी चुकते म्हणून ! मी चुकलो का बरोबर, ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही. कारण तो देव जाणतच नाही; 'सर्व काही मी करतो, आणि देव नाहीच, ' म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हां संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही.

आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ति न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही.

जिथे तुम्ही राहता तिथे सद्‌गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.

माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. पण 'ते जात नाहीत, जात नाहीत' असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोपापच कमी होत जातील. मात्र, मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके जपले पाहिजे.PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg