श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ एप्रिल

विकिस्रोत कडून

२३ एप्रिल

संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत.

संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, नाइलाज म्हणून ते ग्रंथ लिहीत असतात. तुम्हाला असे वाटते का, की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले ? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, आणि ते साक्षात्‌ भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात्‌ मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील ? तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहितो ! त्याचप्रमाणे, संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ, यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदान्त सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात.

ग्रंथ वाचीत असताना, ध्येय जर परमार्थप्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते; गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबर्‍या ! मग गणितात पास कसे होणार ? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण-मनन करावे.

आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे; आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील, तर कधी तो दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी तो मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.