Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ एप्रिल

विकिस्रोत कडून

२५ एप्रिल

संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात.

आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वार्‍यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते, तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी, आपल्या हृदयातले सामान, म्हणजे विषय, खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की, एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो; म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे; ती म्हणजे भगवंत होय.

राजाने आपल्या नावाचा शिक्का केला, आणि जो अती प्रामाणिक होता त्याच्या जवळ दिला; त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे, संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही; पण फरक आहे तो हा की, संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसर्‍याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो; पण वागताना मात्र उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करू या की आपल्याला नंतर तसे बोलता येईल.

गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा, मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणार्‍या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा, त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागतो, त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.