शब्द सोन्याचा पिंपळ

विकिस्रोत कडून




शब्द सोन्याचा पिंपळ
डॉ. सुनीलकुमार लवटे




शब्द सोन्याचा पिंपळ
(साहित्यविषयक लेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in

दुसरी आवृत्ती २०१८


© डॉ. सुनीलकुमार लवटे


प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

'मूल्य ₹२७५'२७५/-





जया दडकर
वसंत आबाजी डहाके
या साहित्य साधकांना...
साहित्य : माणूस घडणीचं विधायक साधन

 ‘शब्द सोन्याचा पिंपळ' हा माझा साहित्यविषयक लेखसंग्रह होय. तो सन २०१३ मध्ये रावा प्रकाशनाने प्रकाशित केला होता. लगेच दुस-या वर्षी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशन राहुल कुलकर्णी यांनी काढली होती. तेव्हा या संग्रहात सन १९८५ ते २०११ पर्यंतचे २५ लेख समाविष्ट होते. आज २०१७ मध्ये हे पुस्तक त्यात लेखांची भर घालून विकसित करण्यात आले आहे. ते सन २०११ नंतर लिहिलेले आहे. ही सुधारित आवृत्ती ‘अक्षर दालन'चे अमेय जोशी प्रकाशात आणत आहेत. या दोन्ही प्रकाशकांचे आभार.
 या साच्या लेखनाचा आवाका हा समग्र साहित्यव्यवहार होय. साहित्याच्या अगोदर भाषा निर्माण झाली. भाषेचा प्रारंभ वर्णापासून मानला जातो. वर्ण दोन प्रकारचे असतात - स्वर आणि व्यंजन. स्वर अगोदर निर्माण झाले. त्याचं कारणही सरळ आहे. प्रारंभी माणसाकडे भाषा नव्हती. तो सारा व्यवहार हावभावांनी करायचा. त्याला सूक्ष्म जोड देण्यासाठी तो स्वर वापरू लागला. माणसाचा जीवन व्यवहार व व्यापार वाढला तेव्हा स्वरांपलीकडे जाऊन काही व्यक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्या आवश्यकतेतून वस्तूचे आकार, रंग, ध्वनी, स्वरूप यातून प्रतीक निर्माण झाली, ती मनुष्य गुंफेत राहात असतानाच्या काळात पुढे चित्ररूप घेती झाली. भाषा लेखनाची आद्य रूपं म्हणजे गुंफांतील चित्र वा कोरीव लेख, चित्रलिपी असा जो शब्द आहे, त्यातच आपल्या लेखनाचं बीज आहे. स्वर आणि व्यंजनांच्या एकीकरणातून अक्षरं, शब्द बनले. शब्दसमूहांचं वाक्य बनलं. वाक्यांचे परिच्छेद झाले. परिच्छेद समूहातून खंड, अध्याय, प्रकरणांची निर्मिती झाली. त्यांच्या संग्रहांच्या पोथ्या, पुस्तकं, ग्रंथ झाले. असा आपल्या लेखनाचा रंजक विकास, इतिहास आणि प्रवास आहे.
 भाषेचे मूलभूत अंग म्हणून बनलेले स्वर, व्यंजन वा वर्ण निरर्थक नाहीत. आपल्या प्रत्येक स्वर व व्यंजनांची निर्मिती व्यावहारिक आवश्यकतेतून झाली असल्याने प्रत्येक वर्गाला अर्थ आहे. ‘ख’ म्हणजे आकाश. भूगोलात ‘ख’ स्वस्तिक असतो. 'ग' म्हणजे गमन करणे. यांच्या संयोगाने बनलेला शब्द ख + ग = खग. त्याचा अर्थ पक्षी. आकाशात विहरणारा तो पक्षी. असा सर्व शब्द, अक्षरांचा शोध व्युत्पत्तीशास्त्रात घेतला जातो. तसंच लेखनाचंही. पूर्वीचं ‘अ’ अक्षर संक्षिप्त होत होत त्याचं आजचं रूप तयार झालं आहे. लिपीशास्त्रात ‘अ’ स्वर पूर्वी कसा लिहिला जायचा, मध्य काळात कसा लिहीत व आजचं रूप कसं झालं याची साद्यंत माहिती वाचावयास मिळते. म्हणून साहित्य, भाषा, शैली, व्याकरण, छंद, अलंकार, विरामचिन्हे, ताल, संगीत सारं मिळून आपलं जीवन बनतं. म्हणून साहित्य समग्र असतं.
 या पुस्तकात शब्द, वाचन, पुस्तक, साहित्य, समीक्षा, लेखक, ग्रंथालय, विचार अशा अंगांचे वैविध्यपूर्ण लेख आहेत. काही ललित लेखही आहेत. उदाहरणार्थ ‘झंप्री' ते काही मनात योजून लिहिले गेले नाहीत. निमित्तानं केलं गेलेलं हे लेखन आहे. पण आज एकत्रपणे पाहताना माझ्या लक्षात आलं आहे की, अजाणतेपणी या सर्वांतून साहित्याचा एक समग्र धांडोळा घेतला गेला आहे. शब्द किती व्यापक ते धन आहे, शस्त्र आहे, शक्ती आहे, विचार आहे, अर्थ आहे... काय नाही शब्दात? म्हणून तर तो जपून वापरायचा. शब्दांचं वजन, अर्थछटा, उच्चार, लय, लकब या सा-यांचं भान ज्या साहित्यिकास असतं तो लेखक, कवी म्हणजे शब्दांचा किमयागार! अल्प शब्दांत महान नि गहन अर्थ, आशय, व्यक्त-अव्यक्त सारं प्रतिबिंबित करायची किमया कवीत असते. आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, विंदा, कुसुमाग्रज या सा-यांची बलस्थानं, ओळख वेगळी का? तर त्यांनी शब्दांचे वेगवेगळे खेळ मांडले. या पुस्तकात ‘अजून मोहविते मधुशाला' शीर्षक लेख आहे. 'मधुशाला' हे हिंदीतलं प्रेमकाव्य, हरिवंशराय बच्चन यांनी ते लिहिलं. सन १९८५ ला या काव्याला पन्नास वर्ष झाली. त्याचं सौंदर्य मराठी वाचकांना कळावं म्हणून लिहिलेला हा लेख. बच्चन पूर्वी ‘मधुशाला' गाऊन सादर करायचे. सुरेभ भटांनी पण एकेकाळी आपल्या गझल अशा गाऊन सादर केल्या आहेत. बच्चन यांच्या सादरीकरणाने हिंदी वाचक, श्रोत्यांचा, कवितेवर प्रेम करणा-यांचा एक नवा वर्ग हिंदी साहित्यात तयार झाला. पूर्वी उर्दू मुशायरे व्हायचे. मग हिंदी कवी संमेलनं होऊ लागली. अशा लेखनातून साहित्य स्मृती, इतिहास जपला, जोपासला जातो अशी माझी धारणा आहे. शब्द सोन्याचा पिंपळ होतो तो असा!
 वाचन काय आहे? छंद, व्यसन, व्यासंग, परिपाठ, सत्संग, सहवास, नाद, वेड, विचार, क्रिया, हितगुज, संवाद, आत्मलाप काय आहे? नुसत्या या शब्दांतूनही तुम्हास वाचनाच्या व्यापकतेचं भान आल्याशिवाय राहणार नाही. वाचन समाधी असते. साधन असते. शिळोप्याचं साधन असतं. तो विरंगुळा असतो. एकांत सोबत असते वाचन. व्हॉल्ट व्हिटमन म्हणाला होता, 'Who touches the book, touches the heart' जो पुस्तकास स्पर्श करील, त्यात हृदयाला हात घालण्याची क्षमता येईल. वाचकच हृदयस्पर्शी संवाद करू शकतो. प्रसंगी अखंडित वाचित जावे' असं कवी म्हणतो तेव्हा त्याला वचन ही नित्य नि निरंतर क्रिया (कर्मकांड नव्हे!) वाटत असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. यावर यातील अनेक लेखांमध्ये विस्तारानं लिहिलं गेलं आहे.
 जे वाचनाचं, ते लेखनाचं. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे' शीर्षक लेख वाचाल तर ते स्पष्ट होईल. एकदा का तुम्ही लिह लागलात की, मग तुम्हाला लिहिल्याशिवाय चैनच पडणार नाही. माझे लेखन सुरू झालं ते तारुण्यातील हुरहर, जिज्ञासा, भय इत्यादी अस्वस्थतेतून. मी एकाच काळात कविता लिहिल्या व मनाचं काहूर गद्यातही लिहिलं. लेखन अनेक प्रकारचे होत जातं. कारण आपलं जीवन व्यामिश्र असतं. या संग्रहातले नुसते सर्व लेख पाहिले तरी त्यांचे विषयवैविध्य तुमच्या लक्षात येईल. लेखक गायकासारखा असतो. गायक एक गाणं अनेक चालीत, रागात सादर करतो तसा लेखक आपलं म्हणणं, सांगणं, विचार, कल्पना अनेक परीनं, रूपानं व्यक्त करतो. कहाणी किती रूपांनी व्यक्त होते - कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, आत्मकथा, चरित्र, काव्य, महाकाव्य. या संग्रहात अनेक चर्चित साहित्यिक व त्यांच्या साहित्य कृतींबद्दल लिहिलं गेलं आहे. आर्मेनियन (सिरियन) कवी खलील जिब्रानचं महाकाव्य ‘प्रोफेट', मराठीतील पहिलं स्त्री आत्मकथन ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या साहित्य रचनेला २०१० साली शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांपूर्वीचं समाजजीवन या आत्मकथेत प्रतिबिंबित आहे. शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती वाचताना अंगावर काटे उभे राहतात. लेखक आपला अनुभव इतरांना वाटण्यासाठी, देण्यासाठी लिहितो त्याचं हे उदाहरण. एखादी साहित्यकृती तुम्हाला इतकी प्रभावित करते, वेड लावते की ती वारंवार तुम्ही वाचता. वारंवार आरशात पाहण्यासारखं असतं हे. आपण आरशात प्रत्येकवेळी वेगळे दिसतो, असतो, बोलतो. तसं पुस्तकंही प्रत्येक वेळी नवा अर्थ, आशय, दृष्टी, विचार देत राहतात, असा माझा अनुभव आहे. 'ज्वाला आणि फुले', ‘प्रोफेट’, ‘कुरल' ही अशी पुस्तके होत की जी मला रोज नवं देत राहतात.
 काही लेखक तुमचं जीवन बदलतात. कबीर, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, यशपाल, खलील जिब्रान यांनी माझं जीवन बदललं. त्यांच्याबद्दल मी वेळोवेळी भरभरून (प्रसंगी भारावूनही!) लिहिलं, आणि काही केलं आहे. साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांचे स्मृती संग्रहालय उभारणं, हे मी माझ्या आयुष्यातलं पुढच्या पिढ्यांसाठी केलेलं उतराईचं काम, कृतज्ञता कार्य, ऋणमुक्ती मानतो! एक लेखक जरी तुम्ही आयुष्यभर समग्र समजून घेतला तरी तुमचं जीवन बदलून जातं. वि. स. खांडेकर, साने गुरुजी यांच्या विचार शाळेत मी शिकलो. वि. स. खांडेकर, साने गुरुजी मी समग्र वाचले. वि. स. खांडेकर तर मी किती परीने अनुभवले. त्यांनी मला शिकवलं. मी त्यांची भाषणं ऐकली. मी त्यांच्याशी बोललो, त्याचं साहित्य, संपादन, संशोधन, समीक्षा, अनुवाद, संकलन काय नाही केलं? त्यांच्या स्मृती संग्रहालयाची शिवाजी विद्यापीठातील उभारणी आणि त्यांच्या समग्र अप्रकाशित, असंकलित साहित्याचे संपादन म्हणजे त्या लेखकाप्रती पूर्ण भाव व्यक्त करणं ठरलं... माझ्यापुरतं तरी! यातील काही लेख त्याची प्रचिती देतील. तोच अनुभव साने गुरुजी स्मृती संग्रहालयाच्या साधन संशोधन व संकलनाचा. त्यातील निरीक्षणं या संग्रहातील दोन लेखात 'दैनंदिनी' व 'बारनिशी' मध्ये वाचण्यास मिळतील. यातून ते लेखक, त्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार, जीवनमूल्ये तुम्हास समजतील. मी छंद म्हणून कधीच लिहिलं नाही. प्रत्येक लेखनामागे ध्येय, उद्देश, मूल्यं होतं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की, मी साहित्यिक नाही. कारण मला कल्पनेनं, प्रतिभेनं लिहिता येत नाही. ललित लिहिणं माझा पिंड नाही. जीवनास आकार, उकार, विचार, दृष्टी देणारं लिहिणं म्हणजे साहित्य अशी माझी धारणा आहे. मी कविता, कथा, नाटिका लिहिल्यात. अगदी लावणीही लिहिली. पण ती माझी प्रकृती नव्हे हे निश्चित. तसा मी केवळ लेखक आहे.
 यात काही वैचारिक, ऐतिहासिक, समीक्षात्मक लेख आहेत. त्याबद्दल लिहिलंच पाहिजे. कबीर, नारायण सुर्वे हे माझ्या कुळातले किंवा मी त्यांच्या कुळातला. त्यांच्याप्रमाणे मला वंचित आयुष्य लाभलं. त्यांच्या काव्यात वंचितांच्या वेदना जशा आहेत, तशीच पुरोगामी वृत्तीपण. मराठी साहित्याच्या इतिहासात वंचितांच्या व्यथा, वेदनांबद्दल भरपूर लिहिलं गेलं तरी साहित्याच्या इतिहास व समीक्षेत म्हणावी तशी दखल घेतली न गेल्याने 'वंचित साहित्य : उद्गम आणि विकास' हा लेख यात आवर्जून समाविष्ट केला आहे. तो वाचल्यास त्यामागील भूमिका स्पष्ट होईल.
 विचाराच्या अंगांनी राजस्थानी साहित्य, सार्वजनिक ग्रंथालये व गांधी विचार विषयक लेखांचे महत्त्व आहे. विचाराशिवाय साहित्याची कल्पनाच करता येणार नाही. साहित्य रंजक हवे तसं प्रबोधकही! आधुनिक काळ हा बहुभाषी समाजाचा आहे. जागतिकीकरणाने माणसाचं बहुभाषी होणं अनिवार्य केलं आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर केवळ आपणास मराठी भाषा व साहित्य माहीत असणं पुरेसं नाही. भारतातील विविध भाषांतील साहित्याची जाण असल्याशिवाय आपण भारतीय होणार नाही. अन्यथा आपली ओळख एक महाराष्ट्रीय इतकीच राहील. 'लोकल' तसंच 'ग्लोबल' होणं ही काळाची गरज आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य लेखातून भारत परिचयाचा छोटा प्रयत्न केला गेला आहे. 'सार्वजनिक ग्रंथालये' मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शतकोत्तर हिरक महोत्सवी, अमृत महोत्सवी, रौप्य महोत्सवी ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. त्यातून या संस्थेचं महत्त्व काळानेच अधोरेखित केलं आहे. पोथ्यांनी सुरू झालेलं ग्रंथालयं आता आभासी (व्हर्म्युअल) जगाचा वेध घेत लेखन, वाचनाचा ‘ई' अवतार धारण करीत आहेत. 'ऑनलाईन रिडिंग' आता सर्रास होतं आहे. पाहणं, ऐकणंही वाचनाचाच एक प्रकार होण्याच्या आजच्या माहिती व संपर्क युगात ग्रंथालयाचा होणारा कायापालट आपण समजून घेतला पाहिजे.
 या पुस्तकातला लेख ‘सामाजिक धर्मबुद्धी व गांधी विचार' न वाचता हे पुस्तक तुम्हास मिटता येणार नाही. महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, कार्यकर्ते होत. जीवनात संस्कृती आणि विकृती यांचा संघर्ष सुरूच असतो. त्यातून वाट काढत माणसाची जी मूल्याधिष्ठित प्रकृती, वृत्ती, कृती निश्चित होते ती सामाजिक धर्मबुद्धीमुळेच. धर्म हा व्यक्तिगत श्रद्धा व आचरणाचा विषय होय. त्याचं सामाजिक वा सार्वजनिक प्रदर्शन, आचरण करणे म्हणजे सहअस्तित्व करणाच्या अन्य धर्मियांच्या भावनांना एक प्रकारचं आव्हान असतं. म्हणून त्यापलीकडे जाऊन सर्वांना भेदरहित वृत्तीनं, समतेचा व्यवहार सामाजिक धर्मबुद्धी शिकवत असतो. ती आपण अंगिकारली तर भारतीय समाजातील जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश, लिंग इत्यादींवर आधारित भेद व विषमता नष्ट होऊन भारत एकसंध व एकात्म देश होईल. एकविसाव्या शतकातील महात्मा गांधींच्या विचारांची प्रस्तुतता समजावणारा हा लेख म्हणजे साहित्य आणि विचारांचं अद्वैत अधोरेखित करणारा आचारधर्म म्हणून पाहता येईल. ‘शब्द सोन्याचा पिंपळ' तेव्हाच होईल, जेव्हा भाषा आणि साहित्य हे माणूस घडणीची विधायक साधनं बनतील.
 सुधारित आवृत्तीतील नव्या आठ लेखात विषय वैविध्य व समकालीनता आहे. त्याचा परिचय एका लेखात आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात इंटरनेटच्या माध्यमातून मराठी समृद्ध होत आहे. तिची ओळख करून देण्यात आली आहे. आज माध्यम व मौखिक मराठीवर इंग्रजीचे आक्रमण वाढत आहे. ती इंग्रजीच्या गर्तेत घुसमटत आहे. मराठीत वापर मराठी भाषेस केवळ प्रदूषित करत नसून तो मराठीचा -हास करतो आहे. याबद्दल जागृतीच्या दृष्टीने लिहिलेला लेख वाचकांना अंतर्मुख करेल. भाषा कौशल्याची क्षेत्र नव्या काळात वाढली असून मराठी विकास व वापराची नवी क्षेत्रे व संधी विकसित झाल्याचे भान वाचकांस नवीन लेखांमधून होईल. वाचन व्यवहारांच्या बदलत्या व्यवहार व साधनांचे भान नवे लेख देतील. नवी पिढी वाचत नसल्याने साहित्यिकांची, शिक्षकांची तब्दतच पालकांचीही जबाबदारी वाढत आहे, याचे भान हे पुस्तक देईल असा मला विश्वास वाटतो.

  
दि. ११ जुलै, २०१७
- डॉ. सुनीलकुमार लवटे
 
अनुक्रम

१. शब्द सोन्याचा पिंपळ/१३
२. शब्द माहात्म्य/१७
३. वाचनाने जग बदलते/१९
४. दिसामाजी काहीतरी लिहावे/२२
५.पुस्तकांचे महत्त्व/२४
६. एकतरी पुस्तक प्रत्येक घरी/२७
७.लेखक माझ्या मनी, अंगणी/३०
८. अजून मोहविते मधुशाला/३३
९. कार्यमग्नता श्वास बनविणारे : ‘द प्रोफेट'/४०
१०. सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी : ‘गोदान'/४२
११. जहाल वेदनांची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'/४७
१२. अस्वस्थ करणारं स्त्रीजीवन : ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'/६३
१३. संत कबीर व अंधश्रद्धा निर्मूलन/७१
१४. कारंथीय नाट्यमीमांसा/७७
१५. वि. स. खांडेकरांच्या रूपककथा/८३
१६. खांडेकरांचा पत्रसंवाद/८६
१७. वि. स. खांडेकर : समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत/९७
१८. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : एक दृष्टिक्षेप/१०१
१९. साने गुरुजींच्या दैनंदिनी : चाळता चाळता.../१०८
२०. साप्ताहिक साधना : पहिली जावक बारनिशी : काही निरीक्षणे/११४
२१. सुर्वे काव्य : वंचितांचा टाहो/११९
२२. मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास/१२५
२३. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य/१३३
२४. सार्वजनिक ग्रंथालये : काल, आज आणि उद्या/१४१
२५. सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार/१४८
२६. मराठी साहित्याची लोभस इंग्रजी प्रतिबिंबे/१५३
२७. इंटरनेटवरील समृद्ध मराठी/१६१
२८. इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेतील मराठी/१६७


२९. मराठी भाषाकौशल्याची किमया/१७४
३०. जागर वाचनाचा/१७९
३१. संगणकीय तंत्रज्ञान व बदलता वाचन व्यवहार/१८४
३२. चला मुलांसाठी नवा डाव मांडू या/१८७
३३. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान/१९०
३४. झंप्री/१९६
३५. जगणं : ... अगोदर असोशी... नंतर नकोशी/२०१

शब्द सोन्याचा पिंपळ



 करिअरच्या आजच्या काळात शब्दसाधना फळाला येते आहे. तुमची शब्दांवर पकड असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. अलीकडे जो उठतो तो करिअरच्या नावाखाली इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, मॅनेजर अशा पारंपरिक व्यवसायांमागे धावतो. 'महाजनेन येन गतः स पंथः' अशा सरधोपट पद्धतीने करिअरची निवड केली जाते आहे. पण जीवनाची अशी काही क्षेत्रे आहेत की आज तिथे तुम्ही म्हणाल ती पूर्व' होण्याची शक्यता असते. विशेषतः आर्टस् साईडला जाऊन पदवीधर होणा-या असंख्य मुला-मुलींना शब्दांच्या सामर्थ्यावर जग जिंकता येते, पदवीधर होणा-या असंख्य मुला-मुलींना शब्दांच्या सामथ्र्यावर जग जिंकता येते, हे खरंच वाटत नाही. पण आज भाषेच्या जोरावर तुम्ही पत्रकार, लेखक, कवी, संपादक, अनुवादक तर होऊ शकताच; शिवाय आज जाहिरातीचा मजकूर तयार करणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, रेडिओ अनाउन्सर, व्हिडिओ जॉकी, वाहिन्यांचे वृत्तसंपादक, इंग्रजी कार्यक्रमांचे देशी भाषेत रूपांतर, डबिंग, होर्डिंग्जची रचना, फलक लेखन अशी नवी क्षेत्रे रोज उदयास येत आहेत. ट्रान्स्क्रिप्शन करणे, भाषणे लिहून देणे, शब्दांकन करणे, दुभाषी होणे, संवाद करणे आदी कला न राहता ती आता करिअरची नवी क्षेत्रे बनली आहेत.

 आजचं युग जाहिरातींचं मानलं जातं. जाहिरात क्षेत्र हे शब्दांचे साम्राज्य आहे. जाहिरात अनेक अंगांनी आज फुलते आहे. जाहिरात पूर्वी चित्रकलेचं क्षेत्र होतं. आज ती एक समूह रचना झाली आहे. प्रभावी जाहिरातीप्रमाणे आज चित्रकार, पत्रकार, लेखक, प्रचारक, मानसशास्त्रज्ञ, उद्घोषक, फोटोग्राफर, संपादक, समीक्षक असे वेगवेगळे घटक भागीदारी करताना दिसत आहेत. होर्डिंग्जच्या वा टीव्हीवरच्या जाहिरातीत चित्र वा दृश्याइतकेच

महत्त्व, घोषणा, मजकूर, संवादास आले आहे. अगदी अलीकडे मोबाईलचं ‘टॉकटाईम वॉर' झालं. त्यात रिलायन्सने ‘थ्री इन फ्री', आयडियाने 'मी तुझ्यासाठी वेळ थांबवून ठेवलाय' व अन्य एका कंपनीने 'दिलखुलास बोला' म्हणत जे युद्ध खेळलं त्याचे खरे शिल्पकार त्या जाहिरातीचे कॉपीरायटर होते. तुम्हाला जाहिरातीचा मजकूर तयार करण्याची कला अवगत व्हायची, तर ‘बूंद में समुंदर' असं आशयघन पण संक्षेपानं, साक्षेपी लिहिता यायला हवं किंवा प्रचलित म्हणी, सुभाषितं, काव्याच्या ओळी, भाषणाचा मथळा, चपखलपणे वापरण्याचं कौशल्य तुमच्यात हवं.

 अलीकडे ‘स्टार वन'ने जो लाफ्टर चैलेंजचा शो केला, ती सारी शब्दांची कसरत नि अभिनयाची सर्कस नव्हती का? शब्दांवर मांड (नि कमांडही!) जर तुम्हाला मारता करता आली तर तुम्ही ‘स्क्रीन'चे सेलिब्रेटी होऊ शकता, हे राजू श्रीवास्तवने सिद्ध केलंय. सुनील पालच्या कॅसेट्स धुमधडाक्यात विकल्या जातात, ते त्यांतील व्यंग सामथ्र्यामुळे. 'कौन बनेगा करोडपती'ची सारी मदार प्रश्न तयार करणाच्या कुशल संपादकाची किमया होय. तो पडद्यामागचा खरा सूत्रधार. त्याची कमाई प्राप्तिकर खात्यानं नोंद घेण्याइतकी (खरं, छापा टाकण्याइतकी!) होती, हे किती जणांना माहीत आहे?

 सूत्रसंचालन हे एक नवं करिअर झालं आहे. अमीन सयानीचा ‘बिनाका गीतमाला' कार्यक्रम, हरीश भिमानीचं पाश्र्वनिवेदन, ओम पुरीचं चित्रपट संवादन (डबिंग), नि अलीकडे महाराष्ट्रात सुधीर गाडगीळांचं सूत्रसंचालन हे सारे हजार, लाखांचे शब्दखेळ होत. शब्दाची जादुई करामत नि कसरत करायची कला तुमच्यात हवी.

 वैद्यकीय व्यवसायात आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः युरोपीय देशांसाठी तेथील डॉक्टरना मेडिकल रिपोर्ट त्वरित हवे असतात. अमेरिकेत तेव्हा रात्र असते, तेव्हा आपणाकडे दिवस असतो. याचा फायदा घेऊन तेथील डॉक्टर आपल्या पेशंटचे रिपोर्ट तयार करण्यासाठी इंटरनेटवर इकडे धाडतात. ते संक्षिप्त असतात, सांकेतिकही. ते सविस्तर तयार करण्यासाठी तुम्हाला रूपांतरण, तांत्रिक शब्द, अहवाल लेखन पद्धती यांचे प्रशिक्षण व ज्ञान असेल तर त्यांची कमाईपण हजारांच्या घरात असते. कारण त्याचा पगार तुम्हाला इथं बसून डॉलरमध्ये मिळतो. त्यासाठी शब्दज्ञान, शब्दार्थ, उच्चारण कौशल्य, अनुलेखन (ऐकून शुद्ध लिहिणे) ही कौशल्ये विकसित केली की

झालं. शब्दांच्या सामर्थ्याच्या या साम्राज्यात विशेष म्हणजे तुमचे शिक्षण गौण ठरते.

 हल्ली टीव्हीच्या सर्व वृत्त व कार्यक्रम वाहिन्या भस्मासुर झाल्यात. त्यांना कितीही खायला घाला, त्या भुकेल्या असतात. म्हणून ई टीव्ही प्रा. शिवाजीराव भुकेले यांना रोज अर्धा तास असे सलग नव्वद दिवस ‘तुकाराम या एकाच विषयावर बोलायला लावते व लाखो रुपये देते. ही सारी शब्दांचीच कमाई ना? प्रा. आप्पासाहेब खोत ई टीव्हीवर कथाकथनाचा कार्यक्रम काय करतात नि रात्रीत त्यांची सीडी बाजारात येते. पाचशे रुपये कथाकथनाचा दर एका रात्रीत पाच हजार होतो. शब्द सोन्याचा पिंपळ होतो आहे. तुम्ही फक्त शब्द साधक व्हायचं!

 तुमच्या लेखणीनं लालित्य, लय, लवचिकता आदींबरोबर नेमके पण मुद्देसूद मांडता येत असेल तर शब्दांकन करणं हे नवं दालन तुमची वाट पाहतंय. एक व्यापारी उद्योगपती, राजकारणी आहे. त्याच्या जीवनाचा उत्तरार्ध सुरू झालाय. त्यांना आत्मकथन, अनुभव कथन करायचं असतं. जिवंतपणी आपलं चरित्र प्रकाशित व्हावं, अशी त्यांची इच्छा ‘शेवटची इच्छा असते. ते आपलं जीवन सांगतात, लिहितात. आपण ते ‘ट्रान्सक्रिएट' (पुनर्लेखन) करायचं. दर तुमच्या वकुबाप्रमाणे शब्दांवर, पानांवर कधीकधी लंपसम मिळतात. तीच गोष्ट अनुवादाची. दोन भाषांवर तुमचा समान अधिकार असला की झालं. तुमचं नशीब फळफळलं समजायचं. लेखक, प्रकाशक, संपादक आज चांगल्या अनुवादकांच्या शोधात असतात. मागेल ती रक्कम देण्याची त्यांची तयारी असते.

 शब्द सोन्याचा पिंपळ व्हायचा तर तुमचं वाचन नित्य हवं. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे' असं व्रत घ्यायला हवं. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' व्हायची तर नित्य शब्दध्यास हवा. शब्दसाधनेसाठी वाचनाबरोबरच श्रवणभक्ती हवी. नित्य नवं ऐकत ते रिचवत गेलं पाहिजे. ऐकणं ही पण साधनाच. श्रवण साधना तुमच्यात विचारगर्भता, संगीत, लालित्य, नादमधुरता निर्माण करते. त्यातून येतो मग लेखन रियाज, ‘दिसामाजी काही एक लिहावे' असा कायदा एकदा का तुम्ही केला की, मग तुम्हाला प्रत्येक कोरा कागद लिहिण्याचे आव्हान देत राहतो.

 पारंपरिक करिअरपेक्षा नवं करिअर तुम्हाला खुणावतंय, असं सांगत असताना मला लगेच हिंदी कवी दुष्यंत कुमारनी एकदा म्हटल्याचं आठवलं. ते म्हणाले होते...

  दोस्तो! अब मंच पर सुविधा नहीं है,

  आजकल नेपथ्य में ही संभावना है।

 यातील गर्भितार्थ तुम्ही शोधाल तर तुमच्या लक्षात येईल की, पारंपरिक करिअरमध्ये सॅच्युरेशन आलंय. तुम्ही नवी क्षितिजं शोधली पाहिजेत. शब्दांचं हे नवं आकाश तुम्हाला खुणावतंय! उचला पेन नि लिहायला लागा. कदाचित तुमची एक ओळ करोडो रुपयांची लॉटरी ठरेल. शब्दांच्या उन्हात अर्थाच्या सावल्या शोधत राहाल तर तुम्हास आशयांचे लक्ष लक्ष तारे हाती येतील व तुम्ही शब्दसम्राट व्हाल. भाषा तुमची दासी होईल. 'गीतरामायण'चे कवी ग. दि. माडगुळकर यांना एकदा विचारलं होतं, 'तुम्ही गीतात चपखल शब्द कसे वापरता?' तेव्हा ते म्हणाले होते, 'मी जेव्हा गीत लिहीत असतो, तेव्हा शब्द माझ्यापुढे मला घ्या, मला घ्या म्हणत उच्छाद मांडत असतात!' असा शब्दांचा उच्छाद तुम्ही मिळवाल, तर तुमचा शब्द सोन्याचा पिंपळ झाल्याशिवाय राहणार नाही.

▄ ▄

शब्द माहात्म्य

 माणसाचा विकास ज्या अनेक गोष्टींमुळे झाला त्यात भाषा, साहित्य, संगीत इत्यादींचा समावेश आहे. माणसाच्या विविध उद्गारांनी भाषा बनली. भाषेला शब्दरूप आलं आणि साहित्य बनलं. काव्ये रचली गेली. कारण त्यात संगीत होतं. या सर्व प्रक्रियेत शब्दांचे माहात्म्य आहे. शब्द माहात्म्य ही माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. हा आपल्याला लाभलेला अमोल ठेवा आहे. शब्दांची महती गाताना तुकारामांनी म्हटलं आहे.

 आम्हा घरी शब्दांचीच रत्ने।

 शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।

 शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।

 शब्दे वाटू धन जन लोका।।

 तुका म्हणे, पाहा शब्द हाचि देव।

 शब्देचि गौरव पूजा करू।।१।।

 शब्द हा देव आहे, ते धन आहे. त्याची पूजा करायला हवी. म्हणून तर आपण साहित्यास अमोल ठेवा मानत आलो आहे.

 पण बदलत्या काळात शब्द संपत्तीची हेटाळणी होते आहे. साहित्य एके काळी आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होते. पण आज आकाशवाणी, दूरदर्शनसारखी प्रभावी माध्यमे उभी ठाकली आहेत. त्यांच्या क्षणिक मोहात आपण शब्दशक्तीची पूजा विसरायला लागलो आहोत. या संदर्भात जपानी साहित्याचा आदर्श समोर ठेवायला हवा. जपान हा गणकयंत्रांचा देश. त्यांची गणकयंत्रे कविताही करतात. पण तरीही जपानमधील लोकांचे साहित्यप्रेम, साहित्यलेखन कमी नाही झाले. सर्व गोष्टी यंत्रांनी करण्याची सवय लागलेला जपानी मनुष्य आजही वाचतो, लिहितो आहे. शब्दांची

कास सोडली तर विकास खंटला, हे मर्म त्यांनी ओळखले आहे. आपल्याकडे शब्दसंपदेची पूजा पाहायची तर बंगाल पाहा. बंगालीतील प्रत्येक पुस्तकाची आवृत्ती ही लाखाच्या घरात असते. बंगालमध्ये दरवर्षी पुस्तक जत्रा भरते. या पुस्तक जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बंगाली मनुष्य जेव्हा आपल्या मुलीला स्थळे पाहायला जातो, तेव्हा प्रथम त्या घरात पुस्तकं आहेत का हे पाहतो. घरात पुस्तक नाही म्हणून स्थळ नाकारलं जातं. लोक आपल्या मासिक पगारातील काही रक्कम पुस्तकांसाठी खर्च करतात. रेशनच्या पाळीसारख्या पुस्तक दुकानांपुढे रांगा लागल्याचं वैभवशाली दृश्य आपणास बंगालमध्येच पाहायला मिळतं.

 शब्दांना धन मानून त्यांची जोपासना करणं, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. आपले भौतिक जीवन कितीही समृद्ध झाले तरी भाषा, साहित्य, संगीताशिवाय ते ख-या अर्थाने समृद्ध होणार नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. शब्द हे जीवन आहे, जीवनाचा खरा गौरव शब्दांच्या जोपासनेनेच होणार आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून तर तुकारामांनी शब्दास देव मानले आहे. शब्दसक्तीच्या जोरावरच आपण ब्रह्मांड जिंकले आहे. गगनास गवसणी घालण्याचे सारे उपाय आपणास शब्दसक्तीमुळेच प्राप्त झाले आहे अशा या शब्दशक्तीची जोपासना हे आपले जीवित कार्य व्हायला हवे.

▄ ▄

वाचनाने जग बदलते




 माणूस नेहमी अस्वस्थ असतो. त्याला प्रत्येक क्षणी काहीतरी सांगायचं, बोलायचं, समजवायचं असतं. या अस्वस्थतेतूनच तो बोलू, लिह, विचारू लागला. पहिल्यांदा तो हे सारं हावभावाने करायचा. त्याच्याकडे भाषा नव्हती. मग ती काळाच्या ओघात आली. आधी त्यानं अक्षरं निर्माण केली. ती होती चित्रं, चिन्हं! पुढे त्याला विस्ताराने काही सांगावं वाटू लागलं. मग तो अनेक अक्षरांनी सांगू लागला. ‘ख’ म्हणजे आकाश. 'ग' म्हणजे गमन. म्हणून झाला खग. खग म्हणजे पक्षी. शब्द असे बनले तरी त्याचे समाधान होईना. मग तो वाक्यात बोलू लागला... शब्द जमवले. त्याची वाक्यं झाली. ती सुरुवातीस काव्यमय होती... म्हणून आपलं सारं प्राचीन साहित्य काव्यमय... रामायण, महाराभारत, भगवद्गीता हे सर्व असंच काव्यमय दिसतं.

 वाचन, लेखन, गणन या माणूस विकासाच्या प्रारंभिक खुणा. त्यातही वाचनाने माणसास अन्य प्राण्यांपासून अलग केले. सर्कशीतले प्राणी... नाचतात, खेळतात, चित्रं काढतात पण वाचू नाही शकत. ‘वाचतो तो माणूस' ही माणसाची खरी व्याख्या, खरी ओळख! लिहिलेले अंक, अक्षरे ओळखणं... त्यांची संगती लावणं... विचार करणं, समजून घेणं म्हणजे वाचणं. घोकणं आणि वाचणं यात फरक आहे. एकदा का तुम्ही पुस्तकं वाचू लागला की, मग तुमचं जग बदलू लागतं. तुम्हाला चांगलं-वाईट समजतं. पुस्तकं वाचतो तो निसर्ग वाचू शकतो... तो चित्रं वाचू शकतो. चित्रं पाहायची नसतात, वाचायची असतात हे किती जणांना माहीत आहे?

जी माणसं चित्रं वाचू शकतात ती मग वाचू लागतात. ज्यांना माणसाची पारख करता येते तो शहाणा. शहाणपण येतं ते वाचनाने.

 वाचन आपला श्वास व्हायला हवा. श्वास घेतल्याशिवाय आपणास जगता येत नाही. वाचनाशिवाय आपलं जग, जीवन, जगणं बदलणं अशक्य. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे'चा संस्कारच तुम्हाला ज्ञानसंपन्न करतो. एकदा का वाचनाचा छंद जडला तर मग तुम्हाला सारं व्यर्थ, तुच्छ वाटू लागेल. रेडिओ, टी.व्ही., सिनेमापेक्षा पुस्तकं कितीतरी पटीनं आपणास समृद्ध करत असतात.

 वाचनाने वेळ जातो. आपलं मनोरंजन होतं. नवे ज्ञान होते. नवा दृष्टिकोन येतो. आपण जन्मतः एकाकी, एकांगी असतो. वाचन आपणास बहुश्रुत, सामाजिक बनवतं. वाचनाने चिंता दूर होऊन माणूस चिंतन करू लागतो. तो विचारी होतो. वाचनामुळे विविध ज्ञान-विज्ञानाचा परिचय होतो. विविध भाषा, संस्कृती, देश, माणसं समजतात. वाचन माणसास सहनशील बनवतं. माणसाची कल्पनाशक्ती विस्तारते ती वाचनामुळेच. स्वतःचा शोध ज्यांना घ्यायचा आहे, ज्यांना स्वतःला जाणून घ्यायचं आहे त्यांना वाचनाशिवाय पर्याय नाही.

 वाचनाचं वेड म्हणजे जगण्याचं वेड. माझे एक साहित्यिक मित्र होते. त्यांची मुलगी मोठी झाली. लग्न ठरवायला, दाखवायला म्हणून ते मुलीला नवच्या मुलाच्या घरी घेऊन गेले. लग्न ठरवणं म्हणजे युद्धाची चर्चा. तह, शह, कट, काटशह सारं असतं. त्याला भरपूर वेळ लागतो. दोन्हीकडची मंडळी चर्चेचे गु-हाळ चालवत राहिली. परक्या घरात गेलेल्या मुलीचा वेळ जाता जाईना. तिनं त्या घरी वाचायला काही आहे का विचारलं? त्या घरी वाचायला काही नव्हतं. त्या मुलीनं तिच्या बाबांना बोलावलं आणि निघून सांगितलं, “ज्या घरात मी एक तासही घालवू शकत नाही, तिथं मला आयुष्य काढायला लावू नका.' हे सारं शहाणपण येतं वाचनातून.

 ‘डोळ्यात वाच माझ्या, गीत भावनांचे' म्हणणारा कवी खरा भावसाक्षर होता. माणसास केवळ साक्षर होऊन चालणार नाही. तो भावसाक्षर हवा. भावसाक्षरता येते वाचनातून. ‘वाचता येणं म्हणजे तुमचं वाचन समृद्ध असणं. सत्यनारायणाची पूजा सांगणाच्या भटजीप्रमाणं वाचणं म्हणजे वाचन नव्हे. ते फक्त उच्चारणं असतं. उच्चार व वाचनातला फरक नित्य वाचनातून

येतो. वाचन म्हणजे शब्दार्थाचा संबंध जीवनास जोडणं. वाचन ही क्रिया नाही, ती कला आहे. जीवन ही एक संधी असते. लक्ष लक्ष फे-यांतून येणारी! माणसाचं जीवन पाशवी बनायचं नसेल तर पुस्तकं, चित्रं, माणसं, निसर्ग सारं वाचायला हवं. वाचनाने जग बदलते... अधिक सुंदर होते... सार्थक होते. त्यासाठी ग्रंथोत्सव! ग्रंथ येती घरा... तोचि दिवाळी-दसरा!

▄ ▄

दिसामाजी काहीतरी लिहावे



 काही पुस्तकं तुमचं जीवन बदलून टाकतात. ज्यांनी 'दासबोध' वाचला असेल त्यांना हे पटेल. त्यातला देव, मोक्ष, आत्मज्ञान मला पटत नाही. पण या ग्रंथात माणसाचं चरित्र नि चारित्र्य घडविण्याची विलक्षण तळमळ आढळते. 'मूर्ख लक्षण दशक' वाचा. तुम्ही उत्तम लक्षणी व्हाल. पढतमूर्ख व्हायचे नसेल तर दासबोध वाचायलाच हवा. ‘मध्यस्त लिहिण्याची करणी शिकवणारा हा ग्रंथ एकदा तरी वाचायलाच हवा. असेच एक पुस्तक आहे खलील जिब्रानचे. ‘प्रोफेट'. हे ‘जीवनदर्शन' नावाने मराठीत उपलब्ध आहे. जीवनाचा सर्वांगी विचार जे पुस्तक समजावते. तसेच हे पुस्तक आहे ‘कुरल'. तमिळ भाषेतील तिरुवल्लूवर कवीनं लिहिलंय ते. मराठीत साने गुरुजींनी त्याचे भावविभोर भाषांतर केले आहे. ही नि अशी पुस्तके असतात जीवनऊर्जेचे अखंड स्रोत! ती तुम्हाला वाचायला, लिहायला शिकवतात तशी जगायलाही!
 जगायचं कशासाठी हे 'बायबल' जितकं चांगलं शिकवतं, तितकं अन्य धर्मग्रंथ नाही. कुराण' म्हणजे कर्मठपणा असं मानण्यात काय अर्थ आहे? मनुष्य दुराचारी होऊ नये म्हणून कुराणातील आयते जी तळमळ व्यक्त करतात ती घ्यावी. बाकी सोडून टाकावं. साहित्य वाचत असताना कबीरानं सांगितलेली सत्शील वृत्ती मला नेहमीच मार्गदर्शक वाटते. कबीरांनी आपल्या काव्यात सत्शील माणसास ‘साधू' म्हटलं आहे. साधू सुपासारखा असतो. कचरा, खडे तो फुकून, फेकून देतो आणि जीवनोपयोगी आपल्याकडे ठेवतो.

 महात्मा गांधींनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली सर्वांत महत्त्वाची म्हणजे, ‘झोपण्यापूर्वी क्षणभर घालवलेल्या दिवसाचा विचार

करा. 'एका छोट्या गोष्टीत जीवन बदलण्याची विलक्षण शक्ती सामावलेली आहे, हे गांधी वाचल्यावर समजतं. वाचायला मिळालं तर लिहायला हवं. लिहायचं तर दुसन्यांनी का? मीच का नाही ? लिहिता येणाच्या प्रत्येकाला एक गोष्ट नक्की करता येणं शक्य आहे. झोपण्यापूर्वी संक्षिप्त का असेना “दैनंदिनी' लिहिणं. हेच ते ‘दिसामाजी काहीतरी लिहावे.'

 जी माणसं रोज दैनंदिनी लिहिण्याचा क्रम पाळतात ती मोठी होतात. काळ गतिशील असतो. आजचं महत्त्व उद्या नसतं. स्मरण तर क्षणिकच असतं! स्मरण अमर व्हायचं, त्याचा इतिहास व्हायचा, वर्तमान बंदिस्त करायचा तर दैनंदिनीसारखं दुसरं साधन नाही. अॅना फ्रँकची डायरी वाचा. युद्ध किती क्रूर असतं ते समजतं. नियमित दैनंदिनी लेखन हे माणसास अंतर्मुख करते. असं लेखन माणसास निर्दोषत्वाकडे नेतं.

 पत्र लिहिणं आजच्या संपर्क साधन विकासामुळे दुर्मीळ होत चाललंय. ते संवादाचं, स्वतःला व्यक्त करण्याचं, विचारांची देवाणघेवाण करण्याचं मोठं साधन होतं. त्यात माणसाचं मन मोकळं व्हायचं. क्लेश दूर व्हायचं. पत्रलेखन बंद झाल्यापासून घरं रुग्णालयं बनू लागलीत. मनोविकार वाढू लागलेत. असंवादाची घरोघरची स्थिती पाहता एकत्र असूनसुद्धा एकांत जीवन घरोघरी जगलं जातं. त्यात एसएमएस, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुटच्या अल्पाक्षरी संवादानं माणसास हाय, हॅलो इथपर्यंत औपचारिक करून टाकलं आहे. एकाच घरातील दोन माणसं प्रत्यक्ष न बोलता मोबाईल संवाद करतात.

 या असंवादित समाजजीवनास छेद द्यायचा तर माणसानं दिसामाजी... रोज काहीतरी लिहायला हवं. नित्य लेखन गायकाच्या रियाजासारखं असतं. ते तुम्हाला मोकळं करतं. रोज लिहिणारे लेखक विश्वविख्यात होतात. सॉमरेट मॉम म्हणे रोज लिहायचा. नियमित अभ्यासिकेत असायचा. काहीच सुचलं नाही तर सह्या करत बसायचा. त्याच्या सह्यांच्या चिटोच्यांनी पण संग्राहक उत्तराधिका-यांना लक्षावधी डॉलर्स मिळवून दिले. हिंदीतील यशपालही असंच नियमित लेखन करीत. जगत असताना रोज नवे प्रश्न डोके वर काढत असतात. नियमित लेखन स्वविकास, स्वमार्गदर्शनाचं प्रभावी साधन असतं. जे लेखक झालेत ते लिहिण्याचा चाळा करीत राहिले म्हणून नित्य तोच प्रवास कौशल्याकडे अग्रेसर होत राहतो. तुम्हाला लेखक व्हायचं तर वाचायला हवं. वाचायचं तर ग्रंथ खरेदी करायला हवेत. ग्रंथोत्सव, ग्रंथप्रदर्शने त्यासाठीच असतात.

पुस्तकांचे महत्त्व



 मानवी जीवनात पुस्तकांचे महत्त्व वादातीत आहे. एकविसाव्या शतकाकडे झेपावणाच्या जगात ते वेगळे सांगायची आवश्यकता नाही हे खरे आहे. पण झपाट्याने समृद्ध होत चाललेल्या जगात व्यक्तिगत जीवनात पुस्तकांची उपेक्षा आणि अवहेलना होते आहे, हे आपण निखळपणे मान्य करायला हवे. पुस्तके महागडी असतात अशी तक्रार करणा-या मंडळींच्या घरी मी जेव्हा सोफा, टी.व्ही., फ्रीज, टेलिफोन इत्यादी सुविधा पाहतो तेव्हा मला ‘महागाई' शब्दाचे कोडेच उमजेनासे होते. पाच-पंचवीस हजारांच्या वस्तू लीलया खरीदणाच्या मंडळींना पंचवीस रुपयांचे पुस्तक महाग वाटते हे एक न उलगडणारे कोडे आहे. माझ्या आसपास राहणा-या शेजारी, मित्र, सहका-यांच्या घरी चाळायला एखादे पुस्तक मिळाले नाही की गुदमरल्यासारखे होते. पुस्तके आपला श्वास आहेत, हे अजून आपण लक्षात घेतलेले नाही.

 पुस्तक हा मूळचा संस्कृत शब्द आहे. संस्कृत भाषेत ‘पुस्त' शब्दाचा अर्थ ‘घडण' असा होतो. घडण करणारे ते पुस्तक. मानवी जीवनाची घडण केली ती पुस्तकांनीच. आपल्या जीवनातील सर्वांगीण व सुसंवादी विकासाचे सर्व श्रेय आहे ते या पुस्तकांनाच. असे असून आपण त्यांची उपेक्षा करतो आहोत, हे बरे नव्हे. मानवाच्या सर्वंकष भावभावना, कल्पना, विचार, अनुभव, ज्ञान पुस्तकात अक्षरबद्ध केले जात असते. आज आपण पुस्तके ज्या सहजतेने हाताळतो, पुस्तके ज्या सहजतेने आपणाला उपलब्ध होतात त्यामागे हजारो वर्षांचे प्रयत्न आहेत. आपले विचार नि अनुभव जतन करण्याच्या कल्पनेतून पुस्तकांचा जन्म झाला. ही घटना लक्षात घेता पुस्तके ही चालू पिढीने उद्याच्या पिढीसाठी केलेली मौलिक गुंतवणूक असते, हे आपण ध्यानात ठेवायला हवे. आपल्या मुलाबाळांसाठी नि नातवांसाठी

जमीन-जुमला, सोनं-नाणं इत्यादींची गुंतवणूक करणाच्या प्रत्येकाने हा विचार करायला हवा की, मी माझ्या भावी पिढीच्या भौतिक समृद्धीबरोबर मानसिक, बौद्धिक नि आध्यात्मिक गुंतवणूक करणार आहे की नाही ? भौतिक गुंतवणूक भावी पिढीस आळशी व विकृत बनवत असते. भावी पिढी समृद्ध करण्याच्या ध्यासानेच आपल्या पूर्वजांनी ज्ञानाचा हा अनमोल ठेवा आपणास दिला आहे.

 पूर्वी गुरूमुख हे ज्ञान प्रसाराचे एकमेव साधन होते. ऋषीमुनी, गुरूपदेशाच्या रूपाने आपले अनुभव आणि विचार शिष्यांपुढे ठेवत. शिष्य ते मुखोद्गत करीत व पुढील पिढीस सांगत. पुढे लेखनाची कला व साधने विकसित झाली. आज उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. दगड, विटा, बांबूच्या चिरफाळ्या, झाडांच्या साली, पाने, पपायरसचे पापुद्रे, धातूचे पत्रे, कातडी ही आपली लेखन सामग्री होती. छिन्नी, दाभण, बोरू, पक्ष्यांची पिसे, टाक इत्यादी लेखन साहित्यांचा लिखाणासाठी वापर होत असे. काजळ वा अन्य पदार्थांचा शाई म्हणून वापर व्हायचा. लेखनकला, लिपी, लेखन सामग्री, लेखनसाधने इत्यादींचा हळूहळू विकास झाला. मुद्रणकला मानवाने हस्तगत केली व मग पुस्तक तयार झाले. पुस्तकांचा विकास हा एक प्रकारे मानवी संस्कृतीचाच विकास होय. अशा अनेक दिव्यातून साकारलेले पुस्तक आज आपणाला लीलया उपलब्ध होते, म्हणून आपणाला त्याची किंमत राहिली नाही.

 पुस्तकांचा संग्रह केवळ ग्रंथालयात असतो, अशी भाबडी समजूत आहे. आपल्या देशातील अनेक ग्रंथालये ही व्यक्तींच्या व्यक्तिगत संग्रहातून साकारली आहेत. यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, बॅ. तेजबहादूर सपू, बॅ. जयकर, डॉ.भांडारकर, सूचिकार दाते, अ. का. प्रियोळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या घरी इतकी ग्रंथसंपदा होती की, त्याच्या जपणुकीच्या ध्यासातून एक एक ग्रंथालय उभे राहिले. पुस्तकांचे वेड माणसाला शहाणे करते असे म्हणतात. हे या व्यक्तींकडे पाहिले की खरे वाटायला लागते. ‘ज्ञान हा तिसरा डोळा आहे,', 'चर्मचक्षूपेक्षा प्रज्ञाचक्षु श्रेष्ठ असतात', 'ग्रंथ हे मानवाचे आद्य गुरू होत' अशी सुभाषिते सांगणाच्या शिक्षक/प्राध्यापकांच्या घरीसुद्धा जेव्हा पुस्तके आढळत नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या शिक्षकत्वाबद्दल प्रामाणिक शंका वाटायला लागते. शिक्षकांची व्यक्तिगत ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी विद्यापीठाची एक साहाय्य योजना असते. तिचा वापर अपवादात्मक अध्यापकच करतात हे पाहिले की मन विषण्ण होते. पैशाच्या

बँकेचा ध्यास लागलेल्या शिक्षित नि सुजाण मंडळींनी एकविसाव्या शतकाचे देणे म्हणून बुक बँकेचा ध्यास आता घ्यायला हवा. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे' या श्लोकातील सातत्य टिकविण्यासाठी, आपलं घर नि जीवन ख-या अर्थाने समृद्ध करण्यासाठी पुस्तके विकत घेऊन वाचायची आपण सवय लावायला हवी. ग्रंथ जत्रा, ग्रंथ मोहळ, लक्ष वाचक संघ, लेखक तुमच्या घरात यांसारख्या योजनांद्वारे ज्ञानगंगा आज आपल्या अंगणी वाहते आहे, तिच्यात हात धुऊन घ्यायची तत्परता आपण नको का दाखवायला?

▄ ▄

एकतरी पुस्तक प्रत्येक घरी



 माणूस आनंदला की हसतो. रुसला की मौन होतो. निराश झाला की स्वतःशी बोलू लागतो; पण एकटेपण त्याला खाऊ लागलं की तो पुस्तक हाती घेतो. अशा एकाकी मनाच्या स्थितीतूनच साहित्य जन्माला येतं. त्यामुळे एकाकीपणाचा नि पुस्तकाचा जवळचा संबंध असतो. घर, माणसं, वस्तू जशा स्वतःच्या हव्यात, तशी पुस्तकंही! मागून, ग्रंथालयातून आणलेलं पुस्तक पाहुण्यासारखं असतं. पाहुणा अल्पकाळासाठी येतो व जातो. मागून आणलेलं पुस्तक परत द्यावं लागतं.

 स्वतःचं पुस्तक मित्रासारखं असतं. ते जिवलगासारखं जीवनाच्या सर्व क्षणी तुमची सोबत करतं. ते हवं तेव्हा वाचता येतं. स्वतःच्या पुस्तकास तुम्ही हवं तसं हाताळू शकता. खुणा करणं, अधोरेखित करणं, प्रश्नचिन्ह करणं म्हणजे पुस्तकाशी संवाद करणं, वागणं असतं. त्याला छान कव्हर घालून आपण आयुष्यभर जपू शकतो. वारंवार पुस्तक वाचणं म्हणजे माणसाचं स्मरणरंजन! त्यातून एखादी गोष्ट आपणास सूक्ष्मपणे नि विस्ताराने समजते. त्यातून आपलं शहाणपण वाढतं.

शिक्षित होणं नि शहाणं होणं यात फरक आहे. शिकल्याने आपणास अंक, अक्षरांची माहिती होते.  शहाणपणानं माणसं आणि जीवन उमगतं. पुस्तकामुळे हे शक्य होते. आज माणूस संग्रही होत चालला आहे. त्याचा संग्रह असतो यंत्र, वस्तू, पैसे, संपत्ती, सुविधा यांचा. पण तरी तो सुखी होत नाही. सुखी करतं ते पुस्तक!

 म्हणून पुस्तक वाचण्याचा छंद लहानपणीच जपायला हवा. जे पालक मुलांचे लाड चॉकलेट देऊन करतात, त्यांची मुलं शेफारतात. पण जे मुलांच्या हाती पुस्तकं देतात, ती मुलं शहाणी होतात. मुलांच्या हातात

बंदूक द्यायचं का पुस्तक! हे आपणच ठरवायला हवं. एकदा का पुस्तकांवर तुमचा जीव जडला की मग तो आयुष्यभर सरत नाही. रोज त्यात भर पडत जाते. पुस्तके घरी, दारी सर्वत्र हवी. पुस्तकांना कपाट, दार, कुलूप, किल्ली यांचा जाच असता कामा नये. पुस्तकं फुलपाखराप्रमाणे हवीत. मुक्त, स्वच्छंद, सुंदर, रंगीत, सचित्र व संगीतमयही! आज पुस्तकं बोलतात, गातात हे किती जणांना माहीत आहे? टॉकिंग बुक्स, सिंगिंग बुक्स मिळतात बरं!

 पुस्तकं जमवतो तो श्रीमंत. मला माहीत असलेला पुस्तक श्रीमंत एक रद्दी विकणारा माणूस आहे. नेताजी कदम त्याचं नाव. आयुष्यभर तो नुसता वाचतच आलाय. मी त्याला कधी पुस्तकाशिवाय पाहिलेलं नाही. पुस्तकंच त्याचे नातलग! पुस्तकच त्याचा श्वास! पुस्तकच त्याचं सर्वस्व! त्याच्याकडे स्वतःची हजारो पुस्तकं आहेत. ती पण निवडक. आपण वाचतो पण निवडता येत नाहीत. निवडावं नेताजीनेच. त्याचं नावच नेताजी... तोच पुस्तकांचा नेता! साहित्य, शास्त्र, संगीत, औषधं, भाषा, शेती, भविष्य विषय कोणताही असू दे, नेताजीला त्यातलं 'चोख' काय आहे हे माहीत आहे. त्याचा मुलगा आणि त्याचे नोकरसुद्धा चांगले वाचक आहेत. नोकर तर पुस्तक वाचायला मिळतात या मोबदल्यावरच नेताजींकडे आयुष्य काढत आहेत. जे शिक्षकांनी जपायचं, जोपासायचं ते नेताजी करतोय. नेताजी आता वृद्ध झालाय. शिवाय अपंगही! शेळके पुलाच्या कडेला बसून तो एकाच चिंतेने प्राण एकवटून जगतो आहे... कोणीतरी येईल... मी आयुष्यभर जपलेलं विकत घेईल... जपेल... त्याला आपली ही सांभाळलेली पोर सुस्थळी घालवण्याचा घोर लागून आहे... हातात पुस्तक घेऊन तो प्रेषिताची वाट पाहतोय. गरज आहे शहाण्या सांताक्लॉजची! कुठे आहे तो? कोण आहे तो?
 अशा जाणिवेतून काही शहाणी माणसं एकत्र येऊन दोन वर्षांपासून कोल्हापुरात ग्रंथोत्सव भरवत आहेत. त्यांचे घोषवाक्यच आहे मुळी 'एकतरी पुस्तक प्रत्येक घरी. तुम्ही शहाणेसुरते असाल तर तुमच्या घरात पुस्तक हवंच. वर्तमानपत्र सूर्याबरोबर येतं नि जातं. साप्ताहिक रविवारी पाणी भरतं. मासिक महिनाअखेरीस शोधून सापडत नाही. पुस्तक मात्र आयुष्याची साथ-संगत करतं. शहाणी माणसं वाचनाचं साधन कोणतंही असो, जपतात. रद्दीत नाही घालत. वि. स. खांडेकर रोजचं वर्तमानपत्रही अधोरेखित करत वाचत, जपत. आयुष्यभरात एकदाही त्यांनी चिटोरसुद्धा रद्दीत घातलं नाही.

जीवन त्यांना कळले हो... त्यांना पुस्तकाचे महत्त्व उमगले! तुमच्याकडे मोबाईल, मोटारसायकल, फ्रीज, टी.व्ही., शिलाई मशीन, वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर भले नसू दे, त्यामुळे तुम्ही श्रीमंत होणार नाही. खरी श्रीमंती ती पुस्तकांची. 'एकतरी पुस्तक प्रत्येक घरी'चा संस्कार आपण आजच घेऊ या. ग्रंथोत्सवात जाऊ. पुस्तक घेऊ, साहित्यकार, कवी, कलावंतांना भेटू, बोलू ऐकू, श्रीमंती वाढवू, संस्कार, शहाणपणासाठी... एकतरी पुस्तक घरी आणू.

▄ ▄

लेखक माझ्या मनी, अंगणी



 लिहितो तो लेखक. केवळ साहित्य लिहिणारा लेखक असत नाही. गायक, संगीतकार, छायाचित्रकार, शिल्पकार, वास्तुशिल्पी, शेतकरी, मजूर, रस्ता झाडणाराही लेखक असतो. लेखकाची ही व्यापकता तुमची मनी, अंगणी रुजवतो तो लेखक. रूढ अर्थाने साहित्यिकच लेखक खरा. तो कथा, कादंबरी, नाटक, काव्य, व्यक्तिचित्र, चारित्र्य, निबंध सारं रेखाटतो. म्हणजे जीवन अनेक शैलींनी, पद्धतींनी समजावतो. तसाच तो गायक, गाणं तो कानात, मनात गुणगुणत ठेवतो. संगीतकारही तसाच, स्वरांची तार अन् हृदयाचे ठोके यात तो ताल निर्माण करतो. म्हणून मग तोल जाता जाता आपण वाचतो. चित्रकार नवं जग दाखवतो. वास्तवाच्या पलीकडचं जग दाखवणारा... चितारणारा चित्रकार खरा! जीवनाचा अविस्मरणीय क्षण टिपणारा छायाचित्रकारही लेखकच ना?

 साहित्यात भाव, रस, गती, संगीत, शास्त्र, सौंदर्य, भाषा, आकार, रंग, लय, ताल सारं असतं म्हणून साहित्य श्रेष्ठ, लेखक निरीक्षक, कल्पक, सजग असतो! तो केवळ असलेलं शब्दबद्ध करत नाही तर तो येणाारंही कल्पितो अन लिहितो. म्हणून तो सूर्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतो. जो न देखे रवी, सो देखे कवी' म्हटलं जातं ते यामुळेच. लेखक चित्रण करतो. विचार, दृष्टी, संस्कार देतो. तो हसवतो, रडवतो, मनोरंजन करतो तसा तो अंतर्मुखही करतो. तो सतत काळाच्या पुढे विचार करत असल्याने वर्तमानाबरोबरच भविष्याचंही त्याला पक्कं भान असतं. पुष्पक विमानाची कल्पना करणाच्या कवीच्या प्रतिभेनंच रॉबर्ट बंधूना विमानाच्या शोधाची दिशा नि दृष्टी दिली, हे आपणास विसरून चालणार नाही. भारत हा अठरापगड जाती, धर्म, भाषांचा देश आहे. तो एकात्म व्हायचा तर ‘आंतरभारती'चं स्वप्नं हवं

म्हणणारे साने गुरुजी आणि ‘विश्वभारती'ची कल्पना करणारे रवींद्रनाथ टागोर श्रेष्ठ ठरतात ते त्याच्या भविष्यलक्ष्यी प्रतिभेमुळेच. जात चोरावी लागण्याचं वास्तव चितारणारे बाबूराव बागूल मनस्वी वाटतात ते अनुभव चित्रित करणाच्या विलक्षण सामथ्र्यामुळे. बहिणाबाई आपली माय वाटते ती जीवनाची ओवी सहज सुंदर गाते म्हणून!

 'गीतारहस्य', ‘स्मृतिचित्र', 'श्यामची आई', 'रणांगण', 'विशाखा', ‘ययाती', 'मढेकरांची कविता', 'व्यक्ती आणि वल्ली', 'कोसला', ‘काजळमाया' ही मराठीतील शतक श्रेष्ठ पुस्तके, अनुक्रमे त्यांचे लेखक - लोकमान्य टिळक, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, विश्राम बेडेकर, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, बा. सी. मर्ढेकर, पु. ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी हे होत. त्यांचे लेख व पुस्तके आपणास माहीत हवीत. ती आपल्या घरी हवीत, तशीच ‘बलुतं', 'उपरा' ही हवीत. 'स्त्री पर्व' घरी हवे तसे माझे विद्यापीठही. 'एकच प्याला' हवे तसे 'नटसम्राट' ही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ‘भारतीय घटना' घरी नसेल तर तुम्ही भारतीय कसे? हा सारा संस्कार लेखक व साहित्य रुजवतो.

 लेखकाचं महत्त्व ज्या समाजात, तो समाज प्रगल्भ, मी असं ऐकून आहे की, पोर्तुगाल हा स्पेनजवळ असणारा एक छोटा देश आहे. या देशाला एका कवीनं नोबेल मिळवून दिले. तिथल्या जनतेला त्याचा कोण अभिमान? त्याच्या घरासमोरून जाताना लोक आपली वाहने म्हणे सावकाश चालवतात... त्याला त्रास नको... समाधिभंग नको. तिथले सर्व जण त्याची काळजी घेत होते. नोबेल मिळाल्यावर... का तर तो दुसरं नोबेल मिळवू शकेल म्हणून! लेखक एका देशाच्या मनी, अंगणी असण्याचं आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकचं उदाहरण. तिथले कुसुमाग्रज सर्व नाशिककरांचे ‘तात्या' होते. ज्या दिवशी त्यांना ज्ञानपीठ मिळालं, त्या दिवशी त्यांच्याकडे जाणा-या कुणाचेही पैसे रिक्षावाल्यानी घेतले नाहीत. सर्वच रिक्षावाले शिक्षित नसले तरी शहाणे होते, कारण तात्यांनी त्यांना माणुसकी शिकवली होती.

 लेखक मनी, अंगणी असला की दोन जर्मनी एक होऊ शकतात, युरोप एक होऊ शकतो. हा इतिहास पाहता जग एक होऊ शकेल ते लेखकांमुळेच. त्यासाठी पुस्तकं घरी हवीत. नित्य वाचन हवं. व्याख्यानं वारंवार ऐकायला हवीत. लेखकांशी बोलावं, भेटावं, चर्चा करावी. सभा-समारंभात लेखकाची सही घेण्याच्या छोट्या छंदामुळे माझ्यात लेखनाचा अंकुर फुटला. आपण



कोणीतरी आहोत अशी अस्मिता, अभिमान साहित्य जागवतं. ते तुम्हाला ओळख करून देतं नि जग ओळखायला शिकवतं. साहित्यिक सन्मान, पुरस्कार, संमेलनांची महाराष्ट्र संस्कृतीत असलेली समृद्ध परंपरा आपल्या प्रगल्भतेचीच खूण होय. ती ग्रंथमहोत्सवांद्वारे जाऊन जपू... जोपासू.

▄ ▄


अजून मोहविते मधुशाला



 ‘साहित्यकार के लिए पत्नी के अलावा एक प्रेयसी का होना जरूरी है।' या हिंदीतील प्रख्यात कथाकार नि तत्त्वचिंतक जैनेंद्रकुमार यांच्या विधानाने एके काळी हिंदी साहित्य जगतात वादाचे मोहोळ उठवून दिले होते. त्यामुळे आज जीवनाच्या उतारावर असतानाही मुलाखतकार जेव्हा जेव्हा जैनेंद्रकुमारांची मुलाखत घेतात तेव्हा हटकून प्रेयसीबद्दल छेडत असतात. जैनेंद्रकुमारांच्या प्रेयसीची यादी जाहीर झाली नसली तरी कवी हरिवंशराय बच्चन यांनी मात्र आपल्या क्या भूलें क्या याद करु' या आत्मकथनात आपल्या पत्नी नि प्रेयसीबद्दल प्रांजळपणे लिहिले आहे. जैनेंद्र प्रतिभेला प्रेयसी मानतात. प्रत्येक कवीमनात अशी प्रेरक प्रतिभा, प्रेयसी दडलेली असते. ती कवीला सतत बेचैन करत राहते नि मग या बेचैनीतून जन्माला येते एक मधुर काव्य, ‘मधुशाला' हे बच्चन यांच्या अशा बेचैनीतून निर्माण झालेले एक लोकविलक्षण काव्य आहे. ज्याला तारुण्यात बच्चन यांच्या ‘मधुशाला', ‘मधुबाला', 'मधुकलश' या काव्यसंग्रहांनी वेड लावले नाही असा तरुण (नि तरुणीही) सापडणे मुश्कील. याला मी अपवाद कसा असणार? ‘मधुशाले'बद्दल माझ्या मनात आपलेपणा असण्याचे आणखी एक कारण आहे. ज्या प्रेरक ‘प्रकाशो'कडे पाहत बच्चन यांनी ‘मधुशाला' लिहिली त्या सुश्री प्रभावती पाल (हिंदी कथाकार यश पालच्या पत्नी) यांच्योबरोबर अनेक दिवस, राहायचे, बोलायचे नि बच्चन यांच्या हस्ताक्षरातील दुर्मीळ ‘मधुशाला' पाहायचे भाग्य मला मिळाले. मधुशाला प्रकाशित झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण होताहेत. गेल्या पन्नास वर्षात ‘मधुशाले'च्या अक्षरशः लक्षावधी प्रती खपल्या. सतत पन्नास वर्षे काव्यरसिकांच्या हृदयसिंहासनी अढळपद मिळविणाच्या या काव्याबद्दल

वाटणारी गोडी प्रत्येक पाठागणिक वाढत जाते. 'मधुशाले'त एके ठिकाणी निराशेच्या भरात बच्चन लिहन गेले की -

 जब न रहूँगा मैं, तब मेरी

 याद करेगी मधुशाला ।।

 पण बच्चन एक भाग्यवान कवी आहेत. आपल्या काव्यवृत्तीला पन्नास वर्षे होताना ते हयात आहेत व याचि देही, याचि डोळा आपल्या 'मधुशालेला लोक सतत वाढत्या संख्येने याद करत असल्याचे ते पाहताहेत. अशा या सुवर्णमहोत्सवी मधुपर्वाप्रीत्यर्थ प्रत्येक काव्य, रसिक मनाला म्हणत असेल, ‘बच्चनजी, तुम जियो हजारो साल, हर साल के दिन हो पचार हजार!'

 सन १९३० च्या दरम्यान भारताच्या राजनैतिक व आर्थिक क्षितिजावर घोर निराशेचे सावट पसरले होते. सर्वत्र उदासी भरलेली. अशा काळात ‘मधुशाले'ला आपल्या मादक, मोहक, मदिरा मस्तीने काव्यरसिकांना भारावून टाकले. 'मधुशाला' हा अवघ्या १३५ रुबायांचा संग्रह. हा रुबाया लिहिण्याची प्रेरणा त्यांना फिट्ज़ेरल्डच्या ‘रुबाइयात-ए-उमर खयाम' पासून मिळाली. ‘रुबाई' म्हणजे चौपदी. चार ओळींचे कडवे. फारसी भाषेतील तो एक बहुप्रचलित छंद आहे. इराणच्या कवीने रुबाया लिहिल्या नाहीत असे क्वचितच घडले असेल. उमर खैयाम हा रुबायांचा सम्राट. त्याच्या रुबाया ऑक्सफर्डमधील ग्रंथालयातून प्राध्यापक कोबेल यांनी शोधून काढल्या. त्या पुढे फिट्ज़ेरल्डच्या हाती लागल्या आणि त्या रुबायांचे रुबल, रुपये झाले. फिट्जेरल्डनी त्यांचा इंग्रजी अनुवाद केला आणि पाहता पाहता या रुबायांनी विश्वसंचार केला. बच्चनजी आणि उमर खैयाम यांची गाठ पडली ती फिट्जेराल्डच्या रुबाइयात-ए-उमर खैयाम'मुळे. बच्चन यांनी या रुबायांचा हिंदी अनुवाद केला. “खैयाम की मधुशाला' नावाने तो प्रसिद्ध आहे. या रुबाया अनुवादित करताना बच्चन यांचे सारे भावविश्व रुबायांनी व्यापून टाकले. त्यांच्या जगल्या, भोगल्या जाणिवा रुबायांचे रुपेरी रूप घेऊन आल्या. पुढे याच रुबायांनी हिंदी मधुशालेला सजवलं, मढवलं.

 उमर खैयामची ‘मधुशाला' व बच्चनची ‘मधुशाला' वरपांगी एक असली तरी दोहोंमध्ये एक मौलिक भेद आहे. उमरची ‘मधुशाला' हे हालावादी काव्य आहे. ‘हाला' म्हणजे मदिरा. मदिरेत मस्ती, मदहोशी असते. पिणारा मदिरेच्या नशेत जीवनातील सर्व दुःख, क्षणभर का असेना, विसरतो. साहित्यात या क्षणवादी जीवन चिंतनाला हाला, मदिरालय (मधुशाला), प्याला, सुराही, साकी इत्यादी प्रतीकांद्वारे व्यक्त करण्याची

पद्धत सूफी कवींनी प्रचलित केली. ते कवी या प्रतीकांच्याद्वारे ईश्वरीय भक्तीने रसरसलेले असायचे. उमरची रुबाई या पठडीतील. बच्चन यांनी या काव्यातील वरपांगी मधुरता घेतली आणि रुबाया रचल्या नि म्हणूनच बच्चन यांच्या मधुशालेला लौकिक काव्याची संज्ञा प्रदान करण्यात आली आणि ती खरीच आहे. आपल्या काव्यातील लौकिक प्रतीकांचे स्पष्टीकरण करत असताना बच्चन यांनी एका रुबाईत म्हटले आहे...

 ‘भावुकता अंगुर लता से ।

 खींच कल्पना की हाला,

 कवि साकी बनकर आया है।

 भरकर कविता का प्याला,

 कभी न कणभर खाली होगा,

 लाख पिएँ, दो लाख पिएँ।।

 पाठकगण है पीनेवाले

 पुस्तक मेरी मधुशाल!'

 उमर खैयाम व आपल्या मधुशालेतील फरक स्वतः बच्चन यांनी मान्य केला आहे. ते आपल्या मधुशालेला उमर खैयामचे अनुकरण मानायला तयार नाहीत. त्यांनी ‘नये पुराने झरोखे'मध्ये अशी कबुली दिली आहे की, “मेरी भावनाएँ उमर खैयाम से एकाकार हो जाती तो शायद मैं ‘मधुशाला' न लिखता!"

 बच्चन यांच्या मधुशालेची आपली अशी अवीट गोडी, आपला असा वेगळा तोंडावळा व आपला असा वेगळा नाद-स्वाद आहे - ‘जो खाये सो पछताए, न खाये सो भी!' 'मधुशाला' हे एक विशुद्ध प्रेमकाव्य आहे. ऐन पंचविशीत लिहिलेल्या या काव्यात प्रेम-प्रणय, विरह, आशा, निराशा इत्यादींची सुंदर गुंफण झालेली आहे. प्रेम करताना किंवा होत असताना आपल्याला सारे जग प्रेम-प्रणयाने धुंद झाल्याचा आभास होत असतो. निसर्गातील झाडे, पराग, सुगंध, कोकीळ, वसंत सारेच कसे प्रेमधुंद वाटायला लागतात याचे सुंदर वर्णन करताना बच्चन म्हणतात -

 ‘प्रति रसाल तरु साकी - सा है,

 प्रति मंजरिका हैं प्याला,

 छलक रही है जिसके बाहर

 मादक सौरभ की हाला,

 छक जिसको मतवाली कोयल

 कुक रही जाली-जाली

 हर मधुऋतु में, अमराई में,

 जग उठती है मधुशाला!

 प्रेम हा हृदयी ओथंबलेला मृदु भाव आहे. प्रियकर-प्रेयसी प्रेम-प्रणयात एक-दुस-याची ‘मधुशाला' बनत असतात. त्या वेळी प्रत्येक प्रेमी रोमांचित होत असतो. या वेळी मन विलक्षण द्विधा नि द्वंद्वाच्या स्थितीत असते. किंकर्तव्यमूढ प्रेमिकाला मग कोणता तरी एक मार्ग, एक प्रेमी निवडावा लागतो. ही निवड करताना मोठा सैरसपाटा करावा लागतो. निष्ठा असेल तर मग गवसणीचे गूढ नाहीसे होते नि मग अमूर्त अभिलाषा पाहता पाहता मूर्त होतात-

 मदिरा पीने की अभिलाषाही

 बन जाए जब हाला,

 अक्षरों की आतुरता में ही

 जब आभासित हो प्यासा बने,

 ध्यान ही करते-करते

 जब साकी साकार, सखे,

 रहे न हाला, प्यासा, साकी,

 तुझे मिलेगी मधुशाला!

 स्वतःच्या जीवनातील घोर निराशेच्या काळात लिहिल्या गेलेल्या मधुशालेतील हा आशावाद कवीच्या जीवननिष्ठेबद्दल बरेच काही सांगून जातो.

 प्रेम-प्रणयातील भावलीलांचे सुंदर रेखाटन हे मधुशालेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल. प्रेम हा होकार-नकारांचा लाडिक लपंडाव असतो. त्यात नकार, नखरा, नेत्रपल्लवी, नाजूक नजाकत भरलेली असते. नकारात दडलेला होकार ज्याला ओळखता येणार नाही तो प्रेम परीक्षेत पास कसा होणार? अशा अदांचे वर्णन करत ते नवशिक्या प्रेमिकाला समजावतात-

 हाथों में आने से पहले

 नाज दिखाएगा प्याला,

 अधरों पर जाने से पहले

 अदा दिखाएगी हाला,

 बहुतेरे इन्कार करेगा

 साकी आने से पहले,

 पथिक, न घबरा जाना

 मान करेगी मधुशाला।

 स्त्रीस्वभावाचे, तिच्या मानभावी मनोधारणेचे चित्रांकन बच्चनसारखा प्रेमपारखी कवीच करू जाणे!

 बच्चन यांच्या मधुशालेत विविध भावभावनांच्या इंद्रधनुष्याच्या छटा आहेत, हे खरे असले, तरी या काव्याची निर्मिती मात्र जिव्हारीच्या वेदनेतून नि जिव्हाळ्यातून झाली आहे. 'चम्पा' ही मित्रपत्नी, बच्चन यांच्या आयुष्यात आलेली ती पहिली स्त्री. पतीवियोगाच्या वेदनेत तडपत बच्चन यांचेशी अजाणतेपणी एकाकार झालेल्या या प्रेरक प्रतिभेने अकाली एकटे जाणे पसंत केले. आपल्या पतीसारखेच विरहाकुल बच्चन पुढे ‘प्रकाशो'च्या प्रेरक संपर्कात आले आणि त्यांच्या पूर्वस्मृतींना जाग आली. ‘प्रकाशो'च्या प्रेरक संपर्कात चम्पाच्या स्मृतींनी रुबायांचे रूप घेतले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...

 दर्द नशा है इस मदिरा का

 विगत - स्मृतियाँ साकी है;

अशा या कवितेला दग्ध हृदयाची कविता म्हणणेच उचित ठरेल. विदग्ध मनःस्थितीत आकारलेली ही कविता प्रेम-प्रणयाने बहरली असली तरी तिच्यात जीवनाचे महान तत्त्वज्ञान भरलेले आहे. मधुशालेच्या माध्यमातून बच्चन समानता, धर्मनिरपेक्षता, जीवन-मरण, उदारता, स्वातंत्र्यता, प्रगतिशीलता, साम्यवाद, कर्तव्यपरायणता, न्याय यांसारख्या कितीतरी जीवननिष्ठांबद्दल सांगून जातात. प्रेमात सर्व जीवनमूल्ये संवर्धित व वर्धिष्णू करण्याची शक्ती असते. प्रेमात धर्म, जाती, वर्ण आदींचा दुरावा राहात नाही. प्रेमातील एकात्म शक्तीचा प्रत्यय देताना ते म्हणतात

 बैर बढाते मस्जिद- मंदिर

 मेल कराती, मधुशाला।।

त्यांच्याच भाषेत सांगायचे तर प्रेमात शंभर सुधारकांचे सामर्थ्य सामावलेले असते. जाती, वर्णांनी मानवामानवांत फरक करणाच्या समाजव्यवस्थेला हळुवार चपराक देत ते म्हणतात

 व्यर्थ बने जाते हो ‘हरिजन',

 तुम तो ‘मधुजन' ही अच्छे;

 मानवाला ‘मधुजन' मानण्यातील महानता नि मांगल्या मननीय नव्हे का? मानव जीवनातील भाग्य, क्षणभंगुरता, मानापमान इत्यादींची ही सुंदर

चित्रे मधुशालेत जागोजागी सापडतात-

 लिखी भाग्य में जो तेरे बस

 वही मिलेगी मधुशाला।।

 म्हणत बच्चन भाग्यवादाचे समर्थन करतात, तर मानवाच्या नश्वर जीवनाची मीमांसा करताना लिहितात

 क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर दुर्बल

 मानव मिट्टी का प्याला!

 किती नि काय सांगावे मधुशालेबद्दल! शेवटी एवढेच म्हणता येईल

 जितनी दिल की गहराई हो

 उतना गहरा है प्याला,

 जितनी दिल की मादकता हो

 उतनीही मादक है हाला,

 जितनी उर की भावुकता हो

 उतनी सुंदर साकी है;  जितना ही जो रसिक है

 उतनी रसमय मधुशाला।

 कविता करायचे वय असताना सर्वप्रथम ही ‘मधुशाला' मला भेटली. तेव्हापासून आजपावेतो तिच्या प्रेमातून सुटका नाही. प्रत्येक वेळी तिचा आस्वाद घेताना तिच्यातील नवनवी सौंदर्यस्थळे दिसतात. तिच्यातील भावभावनांचे नवनवे धुमारे अनुभवणे माझ्यातील कवी मनाला जडलेला अतूट असा छंद आहे. मधुशालेबरोबरच ‘मधुबाला' व 'मधुकलश' या काव्यकृतींनी हिंदी साहित्यात एक नवी काव्यधारा रूढ केली. या अवघ्या तीन काव्यकृतींनी हिंदीसारख्या गुण नि परिमाणांच्या दृष्टीने समृद्ध असणाच्या साहित्यात ‘हालावादी' काव्यपरंपरा रूढ केली. पं. नरेंद्र शर्मा, रामेश्वर शुक्ल, ‘अंचल'सारख्या भावुक कवींनी या वादाला खतपाणी घातले. मधुशालेद्वारे हिंदी साहित्यात निर्माण झालेला ‘हालावाद' भरतीसारखा उफाळला नि ओहोटीगत ओसरला, हे जरी खरे असले तरी ‘मधुशाला', ‘मधुबाला' नि ‘मधुकलश' या काव्यकृतींचे महत्त्व अक्षय नि अढळ राहील यात शंका नाही. बच्चन यांच्या या मधुकाव्याची समीक्षकांनी ‘भोगवादी काव्य' म्हणून केलेली हेटाळणी, आदर्शवादाच्या आग्रही भूमिकेतून झालेली आहे. पण हे करत असताना ‘भोग' हा योगाइतकाच महत्त्वाचा जीवनांश आहे, या त्रिकालाबाधित सत्याकडे केलेली सोईस्कर डोळेझाक, मात्र न पटणारी

आहे. बच्चन यांनी आपल्या या काव्यकृतीत जीवनाच्या एका मधुर भावविश्वाचे चित्रण केले आहे. त्याची ‘वासनाकांड' म्हणून भलावण करणे कितपत न्याय्य आहे? बच्चन जर भोगवादी, विकारग्रस्त कवी असले असते तर...

 ‘वासना जब तीव्रतम थी

 बन गया था संयमी मैं

 हो रही मेरी क्षुधा ही

 सर्वदा आहार मेरा!'

 सारख्या विवेकशील काव्यपंक्ती त्यांनी लिहिल्या असत्या का, याचा विचार तटस्थपणे व्हायला हवा. 'मधुशाले’ला पन्नास वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने का असेना, बच्चन यांच्या या मधुकाव्याचे पुनर्मूल्यांकन व्हायला हवे.

▄ ▄

कार्यमग्नता श्वास बनविणारे : ‘द प्रोफेट


 पुस्तकं माणसांना प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात, पण खलील जिब्रानचे ‘द प्रोफेट' (The Prophet) हे पुस्तक वाचल्यापासून मी कधी थांबलो नाही. एका कार्यातून दुसरे कार्य उभे राहिले आणि ऊर्जा मिळत गेली. जेव्हा जेव्हा मी नव्याच्या शोधात असतो, तेव्हा हे पुस्तक मला नवी ऊर्मी प्रदान करते. आर्मेनियन तत्त्वज्ञ, कवी खलील जिब्रानने आपल्या साहित्यातून जीवनविषयक प्रगल्भ दृष्टिकोन मांडला आहे. 'द प्रोफेट' या महाकाव्यात जिब्रानने जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला अहो. संवादशैलीत असणाच्या या काव्यातून आपण कुणाशी तरी हितगूज करीत असल्याचा आनंद मिळतो. आपले जीवन हे प्रश्नांकित असते. दैनंदिन जीवनात आपल्याला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. अनेकदा आपण भांबावून जातो, निराश होतो, पण द्वंद्वाच्या प्रत्येक क्षणी जिब्रानच्या ‘द प्रोफेट'ने मला केवळ धीरच दिला, नवी दृष्टी दिली नव्हे तर प्रत्येक वेळी जीवनाचा नवा अर्थ समजावला. ‘द प्रोफेट'चा मराठी अर्थ 'देवदूत' असा होतो, पण या पुस्तकाला मी देवदूत न मानता मार्गदर्शकच मानतो. हे पुस्तक मी वाचतो तेव्हा मला नवे विचार, नवी स्वप्नं, नवी जीवनदृष्टी मिळते. एखादं सुरेख गाणं गुणगुणावं तसं हे पुस्तक आयुष्यभर संवाद साधत राहतं. माणूस स्वप्नांवर आणि आत्मबलावर जगतो. स्वप्नं जीवनाचं रोज नवं अवकाश दाखवितात आणि आत्मबलाच्या जोरावर अवकाशाची पोकळी भरत नव्या स्वप्नांकडे झेपावण्याची प्रेरणा मिळते. जिब्रानच्या ‘द प्रोफेट'चा मराठी अनुवाद श्रीपाद जोशी (जीवन दर्शन) आणि त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी केला आहे. जिब्रान जसा कवी होता, तसा तो चित्रकारही होता. या पुस्तकात त्याने स्वतः चित्रं काढली आहेत. या चित्रांत कदाचित सौंदर्य नसेल पण कवितेसारखीच ती

आशयगर्भ आहेत. जागतिक वाचकांच्या सर्वेक्षणात हे पुस्तक नेहमीच अव्वल स्थानावर राहिले आहे.

 असेच एक दुसरे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लूवर यांचा ‘कुरल' हा काव्यसंग्रह. या पुस्तकाचा साने गुरुजींनी मराठीत सुरेख अनुवाद केला आहे. हे पुस्तकही मानवी जीवनाचे समग्र दर्शन घडविते. हे पुस्तक वाचल्यानंतर मला जिब्रानच्या ‘प्रोफेट'ची अनुभूती मिळते. ही दोन्ही पुस्तके मला जुळ्या भावाप्रमाणे वाटतात. 'द प्रोफेट' मधील ‘बालके या कवितेत मुले आणि आई-वडील यांच्यातील संबध अत्यंत सुंदर रितीने व्यक्त केला आहे. जिब्रान म्हणतो, “तुम्ही मुलांना प्रेम द्या, पण आपले विचार देऊ नका. कारण आपले स्वतःचे विचार ती मुले घेऊन आली आहेत. तुमचे बालक हे तुमचे नाही. तुम्ही धनुष्य आहात आणि तुमचे बालक बाण आहे. तुम्ही बाणाला गती देऊ शकता, पण लक्षात असू द्या, बाणाला स्वतःची दिशा असते.'

▄ ▄

सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी : ‘गोदान'



 मराठी व हिंदी साहित्य विकासात अंतर असले, तरी एका बाबतीत मात्र साम्य आढळते. ते म्हणजे, कादंबरीतील ग्रामीण चित्रण. दोन्ही भाषांतील साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण १९२० नंतर सुरू झाले. याच सुमारास महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला'चा संदेश दिलेला होता. खरा भारत पाहायचा तर भारतीय खेडे पाहायला हवे, असे गांधीजी आग्रहाने सांगत. त्यांचे राजकीय गुरू असलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेतून देशसेवेसाठी स्वदेशी आलेल्या गांधींना प्रथम सर्व देश पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यातून भारताचे खरे चित्र, खरा चेहरा गांधीजींच्या लक्षात आला होता. १९२० च्या दरम्यान लेखन करणारे मराठी हिंदी कादंबरीकार महात्मागांधींच्या विचार व कार्याने प्रभावित झालेले होते. मराठीत श्री. म. माटेंच्या लेखनाने ग्रामीण चित्रणाचा प्रारंभ मानला जातो. ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, वि. वा. हडप, सोपानदेव चौधरी, कवी यशवंत, गिरीश ही मंडळी मराठीतील प्रारंभिक ग्रामीण जीवन चित्रमय करणारे साहित्यकार म्हणून सांगता येतील. वि. स. खांडेकरांनी शहरी नि मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करणारे लेख लिहिले असले तरी त्यांचा प्रेरणास्रोत कोकणातील शिरोड्यासारखं खेडंच होतं, हे विसरून कसं चालेल?

 तीच गोष्ट हिंदी साहित्याची. 'प्रेमचंद युग' नावानं ओळखलं जाणारं समग्र हिंदी साहित्य हे गांधी विचारांचे अपत्य होय. प्रेमचंदांच्या 'सेवासदन' (१९१८) ते 'गोदान' (१९३६) सारख्या कादंब-यांच्या प्रकाशन कालखंडात लिहिणारे चतुरेन शास्त्री, ऋषणचरण जैन, जैनेंद्रकुमार, प्रसाद, यशपाल, अज्ञेय, इलाचंद्र जोशी, भगवतीप्रसाद वाजपेयी, सुदर्शन यांसारखे कादंबरीकार व त्यांच्या प्रारंभिक रचनांवर हा प्रभाव लक्षात येण्याइतका स्पष्ट आहे.

‘गोदान' ही प्रेमचंदांची पूर्णत्वाच्या कसोटीवरील शेवटची कादंबरी. ती आधुनिक हिंदी कादंबरीतील शीर्षस्थ नि श्रेष्ठ कलात्मक कृती म्हणून ओळखली जाते, ती तिच्यातील व्यापक ग्रामीण चित्रणाच्या आधारावरच. या कादंबरीचा नायक होरी साध्या भारतीय शेतक-यांचं प्रातिनिधिक चित्र नि वास्तव घेऊन आपणापुढे येतो.  'गोदान' कादंबरी भारतीय ग्रामीण जीवनाचं महाकाव्यच. होरी या कादंबरीचा नायक आहे. चाळिशीतील प्रौढ, कर्जग्रस्त, अंधश्रद्ध शेतमजूर असलेला होरी प्रत्येक भारतीय शेतक-याप्रमाणे स्वप्नं घेऊन जगतो. आपल्या मालकीच्या जमिनीचा तुकडा असावा, छोटं घर असावं, घराच्या अंगणात गाय असावी, घर मुला-बाळांनी भरलेलं असावं, जीवन कर्जमुक्त व्हावं, अशी स्वप्नं घेऊन जगणाच्या होरीला आपलं म्हातारपण कसं निभावेल याची सतत चिंता असायची. धनिया ही त्याची धर्मपत्नी. तिला तीन अपत्यं झालेली. मुलगा गोबर नि सोना व रूपा या मुली. होरीचं कुटुंब एकत्र होतं. शोभा व हिरा हे त्याचे भाऊ एकत्र राहायचे. पुढे त्यांनी आपापल्या चुली वेगळ्या केल्या. खेडी तुटत चालली. कुटुंब विभक्त होत निघाली याची कथा सांगणारी ही कादंबरी. होरी हा रायसाहब या जमीनदाराचा रयत. तो दातादीन ब्राह्मणाचा अंधभक्त. रायसाहब त्याचे अन्नदाता. दुलारी साहुआइन, झिंगुरी सिंह, पटेश्वर, नोखेरायसारख्या सावकार, तलाठींच्या अन्याय, अत्याचार, शोषणातून होरीचं जग हरघडी संघर्ष करत असतं. स्वतःचं घर घडवत तो आपल्या मुलाबाळांचं, भावाचं घर, त्यांचे संसार सांभाळत अकाली म्हातारा होतो. आपण साठी तरी गाठू शकू की नाही, याची त्याला शाश्वती नसते. भावाप्रमाणे मुलगाही विभक्त होतो. कसायला घेतलेल्या शेतीचे तुकडे होत होत होरी तुकड्याला महाग होतो. ब्राह्मणाला गाय दान (गोदान) देऊन जिवंतपणी मोक्षाची स्वप्नं पाहणारा होरी गाईच्या अकाली मृत्यूने हबकून जातो.

 'गोदान'ची कथा खेड्याबरोबरच नागरी भारतही आपल्यापुढे उभा करते. जमीनदार, वकिलांचं खेड्याच्या श्रमावर शहरात विलासी जगणं चित्रित करणारी ही कादंबरी शहरी मध्यमवर्गाचा स्वप्नवाद, ध्येयवाद चित्रित करते. मेहता व मालतीची कथा याचं उदाहरण. शहरात राहून खेड्याची सेवा करण्यातील शहरवासीयांची विसंगती प्रेमचंदांनी 'गोदान'मध्ये मार्मिकपणे चित्रित केली आहे.

 पुढे होरी रोजचा संघर्ष, अन्याय, अत्याचार, शोषणापुढे हवालदिल

होतो व एक दिवस शेतात मजुरी करत असतानाच उष्माघाताने मृत्युमुखी पडतो. अशी समग्र भारताचे वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.

 तिचं श्रेष्ठत्व कशात दडलंय असं विचाराल तर हे सांगायला हवं की, ही कादंबरी विसाव्या शतकातील प्रारंभीचा भारत आपल्यापुढे उभा करते. ती अनेक अंगांनी हिंदीतील श्रेष्ठ कादंबरी ठरते. १९३२ ला प्रेमचंदांनी ही कादंबरी लिहायला घेतली. १९३६ ला तिचं प्रकाशन झालं. प्रेमचंदांनी ‘सेवासदन' (१९१८) नी आपल्या हिंदी कादंबरी लेखनास ख-या अर्थाने सुरुवात केली. गोदान' (१९३६) पर्यंत त्यांनी 'प्रेमाश्रम', 'निर्मला', ‘रंगभूमी’, ‘कायाकल्प', ‘गबन', 'कर्मभूमी', शिवाय 'वरदान', 'प्रतिज्ञा', ‘मंगळसूत्र' (अपूर्ण) कादंब-या लिहिल्या. तत्पूर्वी त्यांनी उर्दूमध्येही कादंबरी लेखन केलं होतं. पूर्व कादंब-यांच्या तुलनेत ‘गोदान' ही तशी उजवी रचना म्हणावी लागेल- शिल्प, शैली, विचार, भाष सर्वच दृष्टीने. प्रेमचंदांचे समकालीन कादंबरीकार जैनेंद्रकुमार यांनी प्रेमचंदांवर एक सुरेख पुस्तक लिहिलंय. प्रेमचंद : एक कृति व्यक्तित्व' असं त्याचं नाव आहे. या पुस्तकाची हिंदीत व्हावी तितकी चर्चा झाली नाही. त्यात कादंबरीकार प्रेमचंद कसे श्रेष्ठ होते, हे जैनेंद्रकुमारांनी स्पष्ट केलंय. त्यात शेवटचं प्रकरण मोठं मनोज्ञ आहे - ‘प्रेमचंद का 'गोदान' यदि मैं लिखता...' या प्रकरणाच्या पहिल्याच वाक्यात जैनेंद्र म्हणतात, “अगर मैं 'गोदान' लिखता? लेकिन निश्चय है, मैं नहीं लिख सकता था, लिखने की सोच नहीं सकता था' यातच प्रेमचंदांचं, ‘गोदान'चं श्रेष्ठत्व सामावलेलं आहे, असं मला वाटतं. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, ‘गोदान'सारखी कादंबरी लिहायची तर अधिक समज असणं गरजेचं. त्यातील पात्रं केवळ प्रेमचंदच पेलू जाणे. प्रेमचंद तर भाषेचे जादूगारच. वाक्प्रचारयुक्त भाषा, भाषेचा खेळ त्यांनाच जमतो. वर्णनशैली अशी की शब्द मला घ्या, मला घ्या म्हणत पुढे येत असावेत...' ही सारी एका अर्थाने ‘गोदान'चीच वैशिष्ट्ये होत. तीच या कादंबरीस कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ नि शीर्षस्थ ठरवतात.

 'गोदान'मध्ये ग्रामीण व शहरी भारताची दोन स्वतंत्र चित्रं एकमेकांत विलक्षण कौशल्याने गुंफून प्रेमचंदांनी भारताचं एक समग्र चित्र वाचकांपुढे ठेवण्याचा कलात्मक प्रयत्न केला आहे. हे चित्र एका अर्थाने ‘भारत' विरुद्ध इंडिया' असेच आहे. दोन समांतर कथा एकजीव करण्याचं प्रेमचंदांचं कौशल्य थक्क करणारं आहे. काहींचे याबाबत मतभेद आहेत खरे. हिंदीच्या पूर्वीच्या कादंब-यांत घटना अधिक असायच्या. त्या पात्रांना झाकायच्या,

दाबायच्या. पात्रांना कथेत गौण स्थान राहायचं. 'गोदान'मुळे हिंदी कादंबरी पात्रकेंद्री झाली. होरी, धनिया, गोबर ही पात्र अजरामर झाली ती गोदानच्या पात्रप्रधान कथा वैशिष्ट्यामुळेच. 'गोदान' कादंबरीची जवळजवळ सर्वच पात्रं आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे व कधी कधी त्यांच्या प्रश्नांमुळे वाचकांच्या हृदयाला भिडतात. ठोकळेबाज पात्राऐवजी व्यक्तिनिष्ठ पात्र रुजवायची परंपरा प्रेमचंदांनी 'गोदान' कादंबरीच्या माध्यमातून सुरू केली व ती रुळून गेली. 'गोदान'ने हिंदीत चरित्र चित्रणाची एक नवी वाट मळली. 'गोदान'मध्ये छोटे संवाद जसे आहेत तसेच भाषणबाजी करणारेसुद्धा आहेत; परंतु 'गोदान'मधील छोटे संवाद अधिक भावतात, भिडतात. वातावरणनिर्मिती ही ‘गोदान' चा सर्वांत मोठा गुण. शहर नि खेडे दोन्ही प्रेमचंदांनी कादंबरीत जिवंत चित्रित केलंय. खेड्यातील लोकमर्यादा, परंपरा, अंधश्रद्धा, राहणीमान, लोकधारणा, नातीगोती, परस्पर सौहार्दता चित्रित कराव्यात प्रेमचंदांनीच. ‘गोदान' म्हणजे मोठ्या कॅनव्हासवर रंगवलेलं गांधींच्या स्वप्नपूर्व भारताचं हबेहब चित्र, विसाव्या शतकाच्या प्रारंभीचं भारतीय सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक चित्र ज्यांना समजून घ्यायचंय, त्यांनी ‘गोदान'ची पारायण करायलाच हवीत. गोदान'पूर्व हिंदी कादंबरी कल्पना, उपदेश, इतिहास, अवतारवादात अडकलेली होती. तिला वास्तवाचं भान ‘गोदान'नं दिलं. आदर्शाकडे समाज नेण्याचा गांधींचा स्वप्नाळू ध्येयवाद प्रेमचंदांनी जोपासला. भारतीय शेतकरी अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, शोषण, परंपरेतून मुक्त करण्याचा ध्यास ‘गोदान'च्या पानोपानी आढळतो. प्रेमचंदांनी ‘गोदान'च्या माध्यमातून संस्कृतप्रचुर हिंदीस उर्दूप्रचुर बनवलं. पूर्व हिंदी कादंबरीची भाषा अलंकारांच्या चक्रव्यूहात अडकली होती. तिला सहजतेचा साज गोदान'मुळे उमजलं. वाक्प्रचारयुक्त भाषा जीवनस्पर्शी होते. त्यामुळे भाषेत वर्षाचं संचित साठतं याचा प्रत्यय प्रेमचंदांनी 'गोदान'च्या भाषेमुळे आणून दिला. एका नव्या संपृक्त शैलीचा शिलान्यास ‘गोदान'ने केला. या कादंबरीचं शीर्षक तर अधिक कलात्मक नि सार्थ म्हणावं लागेल. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या भारतीय अशिक्षित, अंधश्रद्ध, धर्मपरायण, पारंपरिक शेतक-याचं सर्वांत मोठं स्वप्न असायचं, ब्राह्मणाला गायीचं दान (गोदान) देऊन पुण्यप्राप्ती करायची. मोक्षाची शाश्वती मिळवायची. पुनर्जन्मी पुन्हा अधिक संपन्न अशा मनुष्यजीवन लाभाची लालसा यात भरलेली असायची. इतक्या छोट्या शीर्षकात प्रेमचंदांनी भरलेला व्यापक आशय हिंदीतच सांगायचा झाला तर गागर में सागर'च.

 'गोदान' केवळ कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ रचना नव्हे. विचारगर्भ कादंबरी म्हणूनही तिचं सामाजिक नि साहित्यिक मूल्य आहे. या कादंबरीद्वारे प्रेमचंदांनी कर्जमुक्त शेतक-याचं स्वप्न पुढे ठेवलं नि रामराज्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्याचं सुराज्य करायचं तर उद्याचा भारत सावकारी पाशातून मुक्त व्हायला हवा. जमीनदारांच्या कचाट्यातून मुक्त झाल्याशिवाय शेतकरी आणि त्याचे कुटुंबिय सुखाचे दोन घास खाऊ शकणार नाही याची जाण ‘गोदान'ने निर्माण केली. शिक्षण प्रसाराशिवाय खेड्यातील जनता देवा-ब्राह्मणांच्या दुष्टचक्रातून मुक्त होऊ शकणार नाही, हे प्रेमचंदांनी 'गोदान'च्या माध्यमातून प्रभावीपणे बिंबवलं. जीवनाचं उघडं-नागडं वास्तव रंगवणं, हे प्रेमचंदांना मान्य नव्हतं. जोवर आपण नवदिशा दिग्दर्शन करणार नाही, तोवर केवळ नग्न यथार्थ काय कामाचा, अशी ते पृच्छा करत. गोदान'च्या माध्यमातून त्यांनी नवभारताचे भविष्य रंगवले, सुचवले. भांडवलदारी व्यवस्थेचा निःपातच समाजातील तळागाळातील जनतेच्या सामाजिक न्यायाचा मार्ग असल्याचं भान ‘गोदान' कादंबरी प्रभावीपणे देते. साम्यवाद नि गांधीवादाचा समन्वय करणारा प्रगतीवाद, प्रगतीमार्ग ‘गोदान'च्या माध्यमातून प्रेमचंदांनी स्पष्ट केला. ‘इन्कलाब' सर्व प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही, हे प्रेमचंदांनी पूर्णपणे ओळखलं होतं. म्हणून त्यांनी ‘गोदान'मधून समन्वयवादी वृत्तीचं समर्थन केलं. मध्यमवर्गीयांना त्यांनी नवबदलाचे, परिवर्तनाचे अग्रणी चित्रित करून ‘गोदान'मधून समाजबदल गतिशील केला. मानवतेचे उपासक असलेले प्रेमचंद गोदानद्वारे भूतदयाही रुजवताना दिसतात. प्रेमचंद भाववादी लेखक होत. निव्वळ बुद्धिवादाने वाद होतात. संवाद व्हायचा तर बुद्धिवादास भाववादाची जोड मिळायला हवी, हे 'गोदान' कादंबरी मार्मिकपणे समजावते. अहिंसा, शांती, समन्वय, हृदयपरिवर्तनासारखी महात्मा गांधींची विचार चतुःसूत्री हे 'गोदान'चं पाथेय होय. प्रेमचंदांनी गोदान ही कादंबरी हिंदीत कलात्मक, सामाजिक, वैचारिक दिशांतर सुचविणारी कादंबरी म्हणून शीर्षस्थ मानावी लागते. स्त्रीजीवनाबद्दल आस्था, दलितांबद्दल कणव, दःखितांबद्दल सहानुभूती जागवणारी 'गोदान' कादंबरी समाजाच्या वंचित नि उपेक्षितांचं अधिराज्य, स्वराज्य निर्माण करू इच्छिते म्हणूनही पथदर्शक,

▄ ▄

जहाल वेदनांची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'



 ज्यांचे कार्य हेच एक जिवंत महाकाव्य होतं, अशा बाबा आमटे यांनी समाजकार्याइतकंच साहित्य क्षेत्रात मोठे योगदान दिलं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असावं. बाबा आमटे यांचं जीवन, कार्य, वक्तृत्व सारं काव्यभारीत होतं. विचार व आचारांची सुसंगती हे त्यांच्या महात्म्याचं खरं रहस्य. त्यांनी जे लिहिलं ते सारं विचारप्रवण, कृतीकेंद्री नि म्हणून वाचकास अंतर्मुख करणारं ठरलं. गद्य नि पद्य अशा दोन्ही शैलीत लिहिलेलं त्यांचं समग्र साहित्य - कृती, विचार नि कलात्मकतेचं संयुक्त रूप होतं. माती जागवील त्याला मत', रेतीचे बंध', ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी' (श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ), ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे त्यांचं गद्य लेखन म्हणून सांगता येईल. पैकी 'माती जागवील त्याला मत' हा सन १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी लिहिलेला ‘मतदाराचा जाहीरनामा' होय. तर ‘सार्वजनिक संस्थांचे संचालन स्वयंसेवी संस्थांच्या अनागोंदी कारभारावर क्ष किरण म्हणावं लागेल. 'वर्कर्स युनिव्हर्सिटी' आहे त्यांची दीर्घ मुलाखत. वि. स. खांडेकरांनी त्याचं वर्णन ‘ज्वलंत व्यक्तिमत्त्वाचा काव्यात्मक आविष्कार' असं केलं आहे. एका कृतिशील कार्यकत्र्याचं प्रकट चिंतन म्हणून सर्व काळात मार्गदर्शक ठरावा असा दस्तऐवज होय. पण साहित्यिक, चिंतक, कलाकार, कार्यकर्ता म्हणून बाबा आमटे ज्यांना समजून घ्यायचे आहेत, त्यांना त्यांचा काव्यसंग्रह ‘ज्वाला आणि फुले' वाचायलाच हवा.

 माझ्या वाचन विकासात साने गुरुजी, वि. स. खांडेकर, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, प्रेमचंद, यशपाल असे अनेक भाषिक साहित्यिक भेटले, भिडले. प्रत्येक साहित्यिकाची एखादी उल्लेखनीय रचना तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय बनून जाते. ती साहित्यकृती तुमच्या आयुष्यात

अढळपद मिळवते. त्याची अनेक कारणे असतात. ती गाजलेली असते, ती तुम्हास आवडते, ती तुम्हास अस्वस्थ करते, ती तुम्हास प्रेरणा देते, जीवनदृष्टी देते, ती तुम्हास अंतर्मुख करते, संकटात ती मार्गदर्शक होते, एकांतात मित्र होते, प्रत्येक वाचनात ती कॅलिडोस्कोपसारखं नवं काहीतरी दाखवते, देते. अशी एक ना अनेक कारणं असतात, ही अशी जीवश्च-कंठश्च साहित्यकृती प्रिय, अविस्मरणीय होण्याची. बाबा आमटेंची ‘ज्वाला आणि फुले' कविता संग्रह माझ्या आयुष्याचा असा ठेवा होय.

 ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला भेटत राहिली. ती मला सर्वांत प्रथम भेटली ती बहुधा सन १९६३६४ मध्ये. मी इयत्ता आठवीत होतो. प्राथमिक शिक्षण संपवून मी वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती ध्येयवादी शाळा म्हणून स्थापन करण्यात आली होती. त्या वेळी तिचा तसा लौकिकही होता. त्या शाळेत नवी असली तरी पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांची रेलचेल होती. 'माणूस', 'मनोहर', ‘साधना', 'अमृत', 'बहुश्रुत माला' सारखी नियतकालिकं नियमित येत असत. शाळेत वाचनास प्रोत्साहन असायचं. वर्गात अभ्यासक्रमाबरोबर अवांतर (पाठ्यपूरक) शिकवण्यावर भर असायचा- हे वाचा, हे ऐका, हे पाहिलं का? (चित्र, सिनेमा, शिल्प, देश-प्रदेश, निसर्ग असं बरंच काही) त्या वेळी 'साधना' साप्ताहिकही नियमित येत होतं. ते वाचायचं वय नव्हतं पण चाळायचो. त्याची अनेक कारणं होती. आमची शाळा साने गुरुजींचं स्वप्न म्हणून सुरू झालेली. 'साधना'चे संस्थापक असं त्यावर छापलेलं असे (आजही अधेमधे छापलेलं असतं). त्यावर तीन मेणबत्त्याचं बोधचिन्ह असायचं (आज ते गायबच!) तेच चिन्ह आमच्या फळ्यांवर, कार्यक्रमात असायचं. कार्यक्रमात तीन मेणबत्त्या असायच्याच. तर त्या वेळी साप्ताहिक ‘साधना'मध्ये ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता छापून येत. त्यानुस्त्या पाहायचो. वाचल्या तर डोक्यावरून जायच्या. पण वर्गात बाबा आमटेचा घोष असायचा. त्यामुळे या कविता पाहायचो. शालान्त शिक्षण पूर्ण केलं नि बहुधा त्याच सुट्टीत माझ्या इतर मित्रांबरोबर मी ‘सोमनाथ श्रम शिबिरात गेलो नि बाबा आमटे भेटले, ते चांगले पंधरा दिवस. त्या भेटीने माझा कायाकल्प झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आपल्या पलीकडे पाहण्याचा, करण्याचा विचार, संस्कार घेऊनच मी परतलो. पुढे गारगोटीच्या मौनी विद्यापीठात असताना कोयना भूकंप निवारण कार्यात सहभागी झालो.

त्यातून विधायक वृत्तीचा विकास झाला असं आज लक्षात येतं. या साच्या संस्कारांनी मी शिक्षक व्हायचं ठरवलं. शिक्षकाच्या पहिल्या पगारात माझे मित्र घड्याळ, कपडे घेत होते. माझ्या चांगलं लक्षात आहे की मी ठरवून ज्वाला आणि फुले' घेतलं. कारण पदवीधर झाल्यावर, समज आल्यावर वाचलेलं नि मला प्रगल्भ करणारं ते पहिलं पुस्तक होतं.

 ‘ज्वाला आणि फुले' आपलं वाटण्याचं आणखी एक कारण होतं. त्याला वि. स. खांडेकरांची विचारोत्तेजक प्रस्तावना होती. एव्हाना मी त्यांच्या कथा, कादंब-या वाचू लागलो होतो. त्यांच्या लेखनाचं गारूड तयार होण्याचा तो काळ! त्या प्रस्तावनेचं बाबा आमटे आणि त्यांची कविता कळण्यास मोठी मदत झाली होती असं आजही आठवतं. मी घेतलेलं ते पुस्तक ‘ज्वाला आणि फुले'ची दुसरी आवृत्ती होती. त्यात खाडेकरांच्या एक नाही तर चांगल्या दोन प्रस्तावना होत्या. खांडेकरांच्या प्रस्तावना म्हणजे हितगुज असतं. तो असतो एक जिवाभावाचा संवाद... ‘हे हृदयिचे ते हृदयी घालण्याची विलक्षण ताकद घेऊन येणा-या या प्रस्तावना नमना आधी घडाभर तेल' कधीच वाटल्या नाहीत... या प्रस्तावना तर उघडिले स्वर्गाचिये द्वार' अशाच!

 ‘ज्वाला आणि फुले' मधील कवितांचं एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे एका कृतीशील कार्यकत्र्यांचं प्रगट चिंतन होय. त्याचं शब्दांकन रमेश गुप्ता यांनी केलं आहे. बाबा आमटेंच्या दीर्घ सान्निध्यामुळे त्यांना हे शक्य झालं असावं. माझ्या वाचनातील शब्दांकनाचा हा पहिला व शेवटचाच असा प्रयोग. “ज्वाला आणि फुले' मधील कवितांचे वर्णन वि. स. खांडेकरांनी ‘लोक विलक्षण आत्म्याचे ऊर्जस्वल शब्दविलसित' असं केलं आहे, ते यथोचितच म्हणावं लागेल. या संग्रहात चोवीस कविता आहेत. खरं तर चोवीस प्रकारच्या या कविता, प्रत्येक कविता नवा विचार, व्यक्ती, चरित्र, संस्कार, मूल्य, दृष्टी घेऊन येते. काव्यात्मकता, नाटकीयता, मिथक, प्रतीक, गद्यशैली, समाजचिंतन अशी कितीतरी वैशिष्ट्ये घेऊन येते ती! या कविता लिहिल्या नाहीत... त्या झाल्यात. सहकाच्यांशी केलेल्या संवादाची ती इतिःश्री होय. बावनकशी अनुभवातून उमटलेली ही कविता विचार व शब्दशक्ती दोन्ही अंगांनी ज्वालामुखी ठरावी अशी. या कवितेस काव्य समीक्षेची शास्त्रीय परिमाणे भले लागू पडत नसतील, पण ती वाचक प्रमाणित होतात खरी! ही समीक्षा जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला इतिहास, पुराणाचा दाखला देत ती वर्तमानाची चिकित्सा करत भविष्यवेध घेते. असं

त्रिकालाबाधित आकलन घेऊन येणारी ‘ज्वाला आणि फुले' कविता... तिच्यात फुलांचं लालित्य जसं आहे तसंच ज्वालेतील प्रखरताही! तो कवीचा अंतर्यामी उद्गार असल्याने त्यात अनुभवजन्य तत्त्वज्ञान आपसूक असतं.

 ‘शतकाचे शुक्र' ही संग्रहातील पहिली कविता. ती वाचत असताना लक्षात येतं की, कवी बाबा आमटे आपल्या काव्य लेखनाची भूमिका, प्रस्तावनाच मांडत आहेत. एखादा कवी, आपल्या कवितेची भूमिका सांगतो तीही काव्यातून असं मी पहिल्यांदाच (अन् शेवटचंही!) पाहिलं. या कवितेत तुम्हास कवीच्या काव्याचे शुक्रतंतू (जंतू नव्हे!) दिसतात. माणूस शतकांचे संस्कार देऊन जन्मतो तशी त्याची कविताही! या कवीच्या कवितांचे स्वरूप प्रेरणा गीतांसारखं आहे. त्या तुम्हास वाचताना जागोजागी थांबवतात... विचार करायला भाग पाडतात अन् पुढे मग तुम्ही कालौघात, आनुषंगिक कृतीही करता. ती असते या कवितेची फलश्रुती. बाबा आमटेंची कविता एकाच वेळी चित्र, शिल्प, गीत बनून येते. ती गुणगुणत येत नाही, कारण तो गद्यमय आविष्कार असतो. पण ती कविता तुमची मती गुंग करून सोडते. पिंगा घालते... पिच्छा करते... मानेवर बसते. ही असते त्या कवीच्या प्रतिभेची ताकद. ही शब्दांच्या पकडीतून... खरं तर मगरमिठीतून येते. आशयघन शब्दांचा वापर, हे बाबा आमटेंच्या कवितेचं बलस्थान म्हणून सांगता येईल. शीलाक्षय, अभावपूजक, श्रमतंत्र, कथाकथित, गिधाड झेप, क्षाळणे, हरणटप्पेसारखे शब्द या कवितांतून आपणास पहिल्यांदा भेटतात. ते नुसते शब्द असत नाहीत तर आशयघनतेतून त्या प्रत्येक शब्दकळेला मिथकाचं रूप येऊन जातं. असं लिहिता येत नाही... ते लिहिलं जातं. म्हणून बाबा आमटेंची कविता तुम्हाला सरळ बसून, सावरून वाचावी लागते. ‘शतकांचे शुक्र' द्वंद्वगीत आहे. गीत-संगीत, विचार-आचार, दृष्टांत-मिथक, व्यक्ती-चरित्र, चरित्र-चारित्र्य, अक्षर-आकृती, शब्द-अर्थ अशा द्वंद्वांचं अद्वैत होणारी ही कविता. त्यांचा एक एक शब्द हा अर्थाचा शब्द होऊन उठतो.' या कवितेत ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल'प्रमाणे ‘या ज्वालामय क्षणात शतकांचे शुक्र साठलेले आहेत, उद्याच्या गर्भधारणेसाठी'. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले' मधील कविता हा काही वांझ शब्दांचा विस्तार, बाजार नाही. असेल तर तो आपल्या बांधिलकीचा पंचनामा नि स्वतःच स्वतःची घेतलेली झाडाझडती. कवी स्वतःला या कवितेत उसवून, तपासून घेतो. वाचक या कविता वाचताना

आपोआप स्वतःस त्या ओळींवर... तिच्या कसोटीवर पारखू लागतो. हे असतं कवी नि वाचकांचं एक होणं, हे जिथं घडतं तिथंच कवितेचं भिडणं होतं. तेच कवितेचं यश होऊन जातं.

 ज्वाला आणि फुले' मधील कविता म्हणजे बाबा आमटेंच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या पंचशीलाचं खुलं समर्थन. त्यामुळे बाबा आमटे अध्यात्माऐवजी विज्ञान श्रेष्ठ मानतात. आचार्य विनोबांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करूनही त्यांचं सूक्ष्मात जाणं, अतींद्रिय होणं बाबांना पटत नाही.

 ‘जग उड्डाण घेत असता

 अजूनही तुझी प्रज्ञा स्थितच का?'

 असा प्रश्न करून स्पष्ट बजावतात

 ‘स्थितप्रज्ञ नको आहेत आज

 आकाशगामी प्रज्ञामती हवे आहेत आता

 ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेतील हा संवाद म्हणजे बाबा आमटेंच्या विचार स्पष्टतेचा दाखला. कवीचं तत्त्वज्ञान यातून स्पष्ट होतं. धर्म, अध्यात्मासारख्या गोष्टी अफूची गोळी असते तशी व्रतबद्धतेची शृंखलाही असते ती. ती माणसास आत्मवंचक बनवते. त्यामुळे माणूस अभागी, अभावपूजक होतो. माणसापुढे आदर्श असले पाहिजेत, ब्रह्मांड कवेत घेऊ पाहणा-या व्हेलेंटिना तेरेश्कोव्हा, कॉनरॅड हिल्टन यांचे उदाहरण देऊन माणूस विज्ञाननिष्ठ जोवर होणार नाही तोवर तो ‘आनंद पक्षी' होणार नाही, हे बाबा आमटे या कवितेत निःशंकपणे समजावतात. ही कविता नव्या मनूचं आवाहन होय. या आवाहनाला आकाशभेदी कर्तृत्वाचा अर्थ आहे. गाभा-यात करंजीच्या तेलाचे दिवे जाळून युगे गेली... माणसाच्या आत्म्याचे घर उजळले नाही मग विश्वाचे घर कसे उजळणार? असा प्रश्न करणारी ही कविता मुळातून वाचणे यासारखा दुसरा अनुभव नाही.

 उत्तरवाहिनी’ रचना म्हणजे गंगा विवरण! वरील कवितेच्या पार्श्वभूमीवर ‘ज्वाला आणि फुले'तील ही कविता गंगेपेक्षा श्रमगंगा कशी श्रेष्ठ ते सांगते. या कवितेत उद्याच्या श्रमयुगाचे स्पंदन आहे. यात श्रमतंत्राचा विस्तार आहे. विध्वंसाजागी विधायक बीजे पेरणारी श्रमगंगा व श्रमवीर हवे आहेत आज असे सांगणारी ही कविता वाढत्या लोकसंख्येवर श्रमानेच विजय मिळवता येईल, गंगाप्राशनाने नाही, हे पटवून देते. 'वीज वैराणातून फुलवावयाचे आहेत सौभाग्याचे द्राक्षमळे' म्हणत बाबा आमटे सांगतात - ‘गोगलगाईच्या

गतीन साथीला आलेले दैन्य पळवायचे असेल तर अणुयुगातील नवतंत्रांचे हरणटप्पे हवे आहेत. त्यासाठी ते आनंदवनातील कुष्ठपीडितांचे सामर्थ्य दाखवून माणसास कृतिप्रवण करतात.
 पुढे जाऊन मग ते 'वधस्तंभाच्या छायेत' मध्ये कुष्ठपीडितांच्या पुनर्वसन कार्यामागची आपली भूमिका समजावतात. बाबा आमटेंच्या लेखी अजंठावेरूळमधील पाषाणांच्या भग्न मूर्तीतील सौंदर्यापेक्षा हाताची बोटे, तळवे झडल्याने निर्माण होणारे कारुण्य अधिक महत्त्वाचे असते. 'मरण भोगुनि हसत राहती ते मृत्युंजय' म्हणून त्यांना कुष्ठपीडित धडधाकट माणसापेक्षा जास्त आश्वासक, पराक्रमी भगीरथ वाटतात. मी माझ्या ऐन उमेदीत बाबा आमटेंकडे सोमनाथच्या जंगलात बोटं झडलेली दोन माणसं दोन तळव्यात प्रहार पकडून काळ्याकभिन्न पत्थराला पाझर फोडत विहीर खोदताना पाहिली आहेत... त्या दिवसापासून मी स्वतःला स्वस्थ बसू दिलेले नाही. माणसास अस्वस्थ आत्मा बनविणारी ही कविता सामाजिक वधस्तंभावरील फाशीपासून तुम्हाला वाचवते. बाबा आमटेंच्या कविता शिळोप्याचे वाचन म्हणून वाचता येत नाही. कारण संघर्षातील येणा-या निराशेतही त्यांचं चालत राहणं... ‘एकला चलो रे'चं कृतिशील तत्त्वज्ञान असतं.

 ‘ज्वाला आणि फुले'मध्ये एकलव्य, विश्वामित्र, प्रॉमिथियससारखी मिथक बनून येणारी चरित्रं भेटतात तसेच महात्मा गांधी, आचार्य विनोबा, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रूपाने समाज पुरुषही! जोडीला रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, नित्शे भेटतात. अन् त्यांच्याबरोबर येणारे वाद, विवाद, विचारधारा, तत्त्वज्ञानही! बाबा आमटेंचा ‘एकलव्य' हा केवळ कवितेचा नायक म्हणून येत नाही. तो असतो युगाचा प्रतिनिधी. ज्ञान नाकारल्या गेलेल्या शंभूकाचा तो सहोदर असतो तसा पाच हजार वर्षं शिक्षण नाकारलं गेलेल्या दलित, वंचित वर्गाचाही तो प्रतिनिधी बनून येतो. जन्मजात प्रतिष्ठेची कल्पना झुगारत ‘मदा यतुं पौरुषम'ची तो मोहर उठवतो. जन्मवान श्रेष्ठ की ‘कर्मवान असा प्रश्न विचारतो. स्पर्धेचं आव्हान स्वीकारतो नि प्रत्येक स्पर्धा जिंकतच राहतो. घटपटांची उतरंड नाकारतो. ‘पाप्याचं पोर' म्हणवून घेणं ठोकरतो. ज्याची स्पर्धा न्यूटन, आर्किमिडजशी... त्याला जिंकणार कोण? असं स्फुल्लिंग चेतवणारी ही कविता नकारघंटा न होता एक क्रांतिगीत बनून जाते.

 ही कविता एका अर्थाने बाबा आमटे यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान

बनून पुढे येते. बाबा आमटे यांचा पिंड पोसला तो महात्मा गांधी, साने गुरुजी, गौतम बुद्धाच्या करुणेवर. पण ही करुणा अश्रू घेऊन जन्मत नाही. हा कवी अश्रूच्या सागर आटवायला निघालेला आधुनिक अगस्ती होय. त्याला या गोष्टीचं मोठं दुःख आहे की या तिघांच्या जीवन दर्शनाचा पराभव त्यांच्याच अनुयायांनी केला. बाबा आमट्यांना विचारशरण अनुयायी नकोत. त्यांना श्वेत, प्रतिबद्ध कार्यप्रवण कार्यकर्ते जे स्वकर्तृत्वावर जग जिंकतील... ‘एकलव्य' त्या कांक्षेचं गर्वगीत होय. बाबा आमटे आपलं जीवन एकलव्याप्रमाणे असणारी ‘एकान्त साधना' मानतात. संगराचं निबीड अरण्य त्यांच्या पाचवीलाच पुजलं होतं. इतक्या टोकाच्या विधायक कार्याला स्थानिक विरोधाचं ग्रहण ठरलेलं होतं. ते पचवत ते विधायकता जारी ठेवतात, म्हणतात... ‘निबिडातून नवी वाट घडवण्याचे जीवनाचे आव्हान मी स्वीकारले आहे.'

 बाबा आमटे यांना ‘विश्वामित्र' आपला अंतर्यामी आवाज वाटतो. विश्वामित्र होतं 'भुकेचं झाड.' त्याला संतोष नव्हता. त्यानं एकामागून एक कांक्षा सिद्ध केल्या... त्यात पतन... पराभवही त्याला पत्कारावा लागला. त्याचं बाबा आमटे गौरवीकरण करतात नि म्हणतात ‘विश्वामित्रांच्या महापतनालाही असते मेनकेचे लावण्य' हे पतनाला येणारं सौंदर्यसृष्टीच्या निर्मितीच्या ध्यासातून आलेलं असतं हे आपण विसरतो. ज्याची स्पर्धा स्वतःशी त्याला जिंकणार कोण? अशी अपराजेय सामाजिक महत्त्वाकांक्षा घेऊन तुम्ही काय करू पाहाल तर परिवर्तनाचा एक तुकडा, तुमच्या हाती येईल. कारण इथं बदल हे गनिमी विरोधाला हुलकावण्या देऊनच मिळवावे लागतात, हे आपलं समाज वास्तव बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले' मधील अशा व्यक्तिरेखांतून आपणास समजावतात.'

 ‘ज्वाला आणि फुले' वाचत असताना बाबा आमटेंच्या वाचन, व्यासंगाचा परीघ किती व्यापक होता हे सतत प्रत्ययास येत राहातं. पुरोहित ते पोप, धनुष्य ते स्कायस्कॅपर, मनू ते कॉनरॅड, सावित्री ते तेरिश्कोव्हा, वरोरा ते वॉर्सा, गांधी ते नित्शे, झांजीबार ते बॅस्टिल, भारतीय ते मे फ्लाय संस्कृती असं चतुरस्र वाचन त्यांचं ! भारतीय समाज, संस्कृतीच्या प्रश्नांवर मांड ठोकून उभारलेला हा सामाजिक दर्यावर्दी. त्याची आकांक्षा मात्र ब्रह्मांड कवेत घ्यायची! बाबा आमटे कधी कूपमंडूक विचार करूच शकले नाहीत. त्यामुळे कुटुंबनियोजनात स्त्रियांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्यांना विरोध करणारं पोपचं वक्तव्य येताच त्यांना ग्रीक मायथॉलॉजीतील प्रॉमिथिअस

आठवतो. त्यानं मानव कल्याणार्थ स्वर्गातून अग्नी चोरून आणला होता. शिक्षा म्हणून त्याचा देह अग्यारीवर गिधाडांना खाण्यासाठी टाकला जातो. दिवसभर गिधाडे लचके तोडत राहायचे. रात्रीत तो पूर्ववत राहायचा. मनुष्य कल्याणार्थ देहत्याग करणारा प्रॉमिथिअस कुठे नि माणसास अपत्यांच्याच गतीने दारिद्रयाशी सडत ठेवणारे पोप कुठे। ‘पोप, प्रॉमिथिअस व गोळी कविता बाबा आमट्यांच्या आधुनिक, पुरोगामी विचारांचं संचित म्हणून सांगता येईल. लैंगिक संबंधांचा 'खेळ' ज्यांनी खेळलाच नाही त्यांनी त्या खेळाचा ‘अंपायर' होणं किती हास्यास्पद? -

 जो खेळ तुम्ही जीवनात खेळलाच नाही

 त्याचे नियम कसे तयार करता तुम्ही?

 आणि ज्याचे नोटेशन तुम्हाला ठाऊक नाही

 ते संगीत आम्हाला का ऐकवता बरे ?

 रिक्षा ओढून थकलेल्या ‘अर्धमानवाच्या जीवनात लैंगिक सुखाची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही त्यांच्या वंशी जाल. शरीर, मनाच्या अनिवार ऊर्मी ‘वार' लक्षात ठेवीत नाही नि ‘पिरियड' ही पाळत नाही हे चार्टर्ड प्लेनमधून फिरणा-याला कसे समजणार? यांसारखे प्रश्न वा 'Sex is mighty' (Not food) सारखं जीवन वास्तव हेच माणसाचं जगणं असतं. नैतिकतेच्या भ्रामक चौकटी कालबाह्य असल्याचे सांगत बाबा आमटे नैतिकतेची नवी व्याख्याच करतात-

 ‘आपले भोग व त्याग

 यात निवडीचे हे स्वातंत्र्य

 समतोल ढळू न देता साधणे

 हीच खरी नैतिकता आहे.'

 याचा प्रतिवाद कोण नि कसा करेल? ज्यानं अनवाणी, अर्धपोटी आयुष्य जगलं त्याची वकिली करणारा हा युक्तिवाद बाबा आमटे मुळात व्यवसायाने वकील असल्यानेच करू शकतात, हे विसरता येणार नाही. ‘प्रकृती, विकृती फार काळ टिकू देत नाही' हा निसर्गनियम सांगायलाही हा कवी विसरत नाही.

 ‘पंखांना क्षितिज नसते' कवितेत विनोबांशी केलेला युक्तिवाद असाच बिनतोड होता. अध्यात्मातून तुम्ही विज्ञान सांगितलं, आता विज्ञानातून अध्यात्म निर्माण करा,' असं केलेलं आवाहन म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नसतात हेच सांगणं ना? बाबा आमटे आपल्या

‘एकलव्य'ला एकाकी महामानव म्हणून चित्रित करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, अरे, सॉक्रेटिस, कोपर्निकस, डार्विन, ज्ञानेश्वर, तुकाराम, गांधी, साने गुरुजी सारेच एकाकी महामानव होते. अत्युच्च मनस्वीता पेलणं हे महामानवांचं त्यांनी रेखांकित केलेलं लक्षण, ठरवलेली कसोटी... त्यावर वरील सर्वांना पारखणं शक्य आहे. अशाच परंपरेत ‘गांधी : एक युगमुद्रा' ही कविता ठेवावी लागेल. महात्मा गांधींच्या किती युगमुद्रा बाबा आमटे ‘ज्वाला आणि फुले'मध्ये अधोरेखित करतात. महात्मा गांधींच्या युगाचा चेहरा, हिमनग, कलाकार, जहाज, हिकमती माणूस, नंगा फकीर, संतमानव, काळावर उठलेली तप्त मुद्रा असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व! महात्मा गांधींच्या सर्व जीवन, कार्य, विचार, व्यवहारात एक 'Vergin line of Action होती असं आपण कवितेत वाचतो तेव्हा बाबा आमटेंच्या प्रतिभेच्या विजेनं चकित व्हायला होतं. महात्मा गांधींवर वि. स. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दी वर्षात विपुल लिहिलं. त्याचे संकलन, संपादन करून मी ‘दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी' असं पुस्तक सिद्ध केलं, तेव्हाही माझ्या हे लक्षात आलं होतं की, महात्मा गांधी आपल्या प्रत्येक विचार, व्यवहारात ‘विवेकाची लक्ष्मणरेषा' ठरवत नि पाळत. गांधींचं मोठेपण या 'Vergin line of Action' मध्येच होतं, हे वाचकास पटतं.

 ‘त्याने प्रथम मिठाच्या पुडीला हात घातला

 आणि मग एक साम्राज्य

 मिठाच्या सातासमुद्रापलीकडे फेकून दिले.

 त्याने सुतावरून सुरुवात केली

 आणि अखेर स्वराज्याचा स्वर्ग गाठून दाखवला.

 याच साध्या सुताने त्याने एक पिढीच्या पिढी आणि

 एक देशच्या देश बांधून दाखवला.'

 म्हणून बाबा आमटे आपलं आकलन स्पष्ट करतात तेव्हा महात्मा गांधी हे त्यांच्या विचार, वृत्तीचे अधिष्ठान कसं होतं, ते सिद्ध होतं.

 तीच गोष्ट लाल बहादुर शास्त्रींची. “जय हे, सामान्य महामानव' मध्ये बाबा आमटेंनी शास्त्रीजींची गायलेली थेरवी त्यांच्या प्रती वाहिलेली श्रद्धासुमने होत. लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या कविता अशीच श्रद्धा-सुमने होत. ‘गांधी : एक युगमुद्रा' ही याच पठडीतील. एडवर्ड वॉक या पाश्चात्य विचारवंताने एके ठिकाणी लिहिलंय, ‘पहाड, सागर आणि जीव ओतून

आपले काम करणारा कोणताही माणूस या जगातल्या तीन थोर गोष्टी होत. त्यांच्या शक्तीगर्भतेला परिमाण नाही.' बाबा आमटे लालबहादूर शास्त्रींना या कसोटीवर ‘सामान्य महामानव' म्हणजे सामान्य असून महामानव वाटतात. एका शास्त्रीचं शास्ता (शासक) होणं, हवं तेव्हा त्याचं शस्त्रधारी नि शांतिदूत होणं, लौकिक उंची कमी असून अलौकिकतेनं प्रतिष्ठेचं शिखर सर करणं, अन्नान्न दशा झालेल्या देशाला दिश देणं... किती मोठा माणूस हा - सामान्य तरी असामान्य!

 ‘मी जवाहरलाल' या संग्रहातलं एक मनस्वी काव्य! ही कविता म्हणजे नेहरूंच्या भ्रमभंगाचं शोकगीत. या मातीला दिलेलं अभिवचन आपण पूर्ण करू न शकल्याचं शल्य नेहरुंनी आपल्या अस्थी, राख गंगेत न टाकता शेतात टाकण्याची इच्छा व्यक्त करून व्यक्त केली होती. ‘हिंदी-चिनी भाई भाई'च्या सहअस्तित्वाचा चीन आक्रमणाने झालेला अंत, देशांतर्गत उद्भवलेली विविध शीतयुद्धे या सर्वांत हा गुलाब होरपळला... कवितेतील प्रत्येक ओळ म्हणजे अनिवार शोकतप्त भावनांची स्वरलिपी! ‘संतांचे मृत्यूपत्र' काव्य तुकडोजी महाराजांच्या मृत्यूपत्राला समर्पित काव्य! तुकडोजींची ‘ग्रामगीता' कवीला ‘टेस्टामेंट'पेक्षा कमी वाटत नाही. तुकडोजी महाराजांचे महत्त्व कवीला वाटतं कारण त्यांनी सामान्य माणसास समाजसक्रिय केलं. सामान्य माणूस समाजाची 'Front Line of Action' होणं हे त्यांच्या भक्ती संगठन कौशल्याचं फलित वाटतं. देहदान, नेत्रदान, हृदयदान इतकंच नव्हे तर शाबूत असेल ते समाजास देण्याची शपथ साच्या समाजाकडून वदवून घेणारा हा संत स्वतःच रोगग्रस्त होऊन विकल, जर्जर होतो तरी झटण्याचं समाज जहाज सोडत नाही याचं कवीला कोण अप्रूप? अशा सर्वातून ते वाचकास थोरांची थोरवी सांगत सामान्यांना असामान्य बनविण्यासाठी आपली प्रतिभा खर्च करतात.

 ज्वाला आणि फुले'च्या कितीतरी कविता सामाजिक प्रश्न, कृतिप्रवणता, श्रम माहात्म्य, शेतकरी, श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ, सोमनाथ श्रम संस्कार छावणी, घामाचे महत्त्व विशद करणा-या आहेत. या संदर्भात जिथे आत्म्याचेही अन्न विकेल', '... या सीमांना मरण नाही!' ‘वसुंधरेचा पुत्र', ‘श्रम-सरितेच्या तीरावर' सारख्या कविता लक्षात येतात. पण बाबा आमटे ‘आदिमानव उठला आहे' मध्ये ते अण्वस्त्राचा प्रश्न हाताळतात. सागाड्यांचं शहर' हे काव्य औद्योगिकरणातील भयावह स्थिती चित्रित करतं. एक खिंड मी लढवीन'मध्ये ते तमाम ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतरही

समाजकार्यासाठी प्रवृत्त राहण्याचे आवाहन करतात. असं विषय वैविध्य घेऊन येणारं ‘ज्वाला आणि फुले' सामाजिक प्रश्नांच्या ज्वालांची दाहकता दाखवतात. जहाल कवितांतूनही समाज मांगल्याची भावना बाबा आमटे तसूभरही कमी होऊ देत नाही हे विशेष! या रचनांतून ‘सडलेल्या पंखांना उडण्याचा ध्यास लावायची त्यांची तळमळ प्रत्येक ओळीत प्रतिबिंबित आहे. ‘झुंजत राहा, ढासळू नका'चा संदेश देणारं हे काव्य-

 फुलांचे व मधमाश्यांचे नाते आहे

 ते रक्ताचे व जळवांचे नाते नाही

 म्हणत मनुष्यसंबंधाचं महत्त्व सार्वकालिक असल्याचं ते बिंबवतात. ‘आनंदवन' हे बाबा आमटेंचे कार्यकर्तृत्व! त्याची महती त्यांच्याच शब्दात सांगायची तर-

 'येथे नांदतात श्रमर्षी, या भूमीला शरण नाही

 येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही

 येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही

 येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही'

 वाचत असताना आपल्या निष्क्रियतेची शरम आल्यावाचून राहात नाही. श्रम, जिद्द, अभाव, उपेक्षा यांचं वरदान ज्यांना लाभतं तेच काही करू शकतात. यातनाहीनांना पुरुषार्थ करता येत नाही. अधिक करायचं तर (आधी) अधिक, सोसावं लागतं' सारखी या कवितांमधील सुभाषितं केवळ शब्दांची फेक नसते, तर संघर्ष भोगण्यातून उडालेल्या त्या ठिणग्या असतात. त्या वाचकांत क्रियाशीलतेचा वन्ही पेटवतात... त्याला प्रज्वलित, प्रभावित करतात म्हणून ज्वाला आणि फुले' वाचलेला माणूस कधी स्वस्थ झोपू शकत नसतो.

 “ज्वाला आणि फुले' काव्य वरील तपशिलांमुळे तर महत्त्वाचे खरेच. पण त्यापलीकडे जाऊन या काव्याची काही बलस्थाने आहेत ती वाचताना लक्षात येते की, ही कविता ज्या प्रदेशात फुलली त्या मातीला मिळालेल्या निसर्ग उपेक्षेमुळे व (राजकीय दुर्लक्षामुळेही असेल कदाचित!) इथले सारे कवी असामान्य कलंदर, कलाकार, बाबा आमटेंच्या निमित्ताने मला आठवले ग्रेस, सुरेश भट नि आता वसंत आबाजी डहाके हेसुद्धा. या सा-यांच्या कवितेतलं कला, विचार, बंडाचे निशाण आपण नाही खांद्यावर घेऊ शकत. विदर्भाचा अनुशेष आर्थिक, राजकीय, सामाजिक असू शकेल. प्रतिभेच्या प्रांतात सरशी त्यांचीच. त्या मातीतच रोखठोक प्रश्न करायचं धारिष्ट्य

असावं. त्याचंही एक थेट सौंदर्य आहे. ते मला अधिक लोभस वाटतं ते पश्चिमेकडील (युरोपातील नव्हे महाराष्ट्रातील) आमच्या लेचेपेचेपणामुळे. जीवनाबद्दलची कलासक्त विजिगीषू वृत्ती ही या ज्वालांतही आहे नि फुलांतही. विचारस्पष्टता व पारदर्शिता तशीच आकर्षणारी मिथक म्हणजे इतिहास नि दृष्टांत नसतो तर वर्तमानास चेतवण्याचे प्रचंड सामर्थ्य असते, हे ज्यांना आजमावून पाहायचं आहे त्यांनी या कविता एकदा समजून घ्यायलाच हव्यात. पण त्यासाठी एक पूर्वअट आहे. तुम्ही स्वतःला जगापासून स्वीच ऑफ करून घेतलं पाहिजे. त्याशिवाय ज्वाला आणि फुले' ऑनलाईन होतच नाही. या कवितेत पारंपरिक प्रतीकं फार कमी आढळतात. इथं तुम्हाला विज्ञानपंखी मनुष्य, निर्मितीचे वेद, ज्वालेचा आनंदपक्षी, श्रम युगाचे निःश्वास (कळ्यांचे नाही!), दिक्कालाचे जख्खड, अजाण थरथर असं सारं कल्पनातीत भेटत राहातं अन् तुम्ही शहारत राहाता. कारण या कवितेतलं सारं अनुभवविश्व, भावविश्व, प्रश्न तुमच्या सुरक्षित कप्पेबंद वातानुकूलित समाज परीघाबाहेरचे! हे अनवाणी जग, इथं अर्धमेली माणसं जगतात, त्याचं जीवन तुम्हाला उसवतं. ज्यांना जागतिकीकरणातील आपल्या स्वस्थ जीवनातलं वैयर्थ समजून घ्यायचा आहे त्यांना यातलं सांगाड्यांचं शहर' डोळ्याखालून घालायलाच हवं. लंच आणि डिनर डिप्लोमसीमध्ये एक भुकेचं झाडही असतं, याचं भान देणारी ही कविता तुम्हाला स्वतःकडे नि समाजाकडे पाहण्याची एक विधायक दृष्टी देते. त्यापेक्षा सोशल नेटवर्किंगमध्ये मग्न असलेल्यांना ही कविता सोशल शेअरिंगचा वस्तुपाठ, संस्कार देते. ते मला अधिक महत्त्वाचं नि कालसंगत वाटते.

 या कवितेचं सौंदर्य, लक्स, डिलक्स अजिबात नाही. या कवितेला काव्यशास्त्राचं कोणतंच माप बसवता येणार नाही की मोजपट्टीही लावता येणार नाही. 'वसुंधरेचा पुत्र असलेल्या शेतक-याचं दुःख मोजणारं तापमापक कोणत्या सौंदर्यशास्त्रात सापडणार? पाटणकर, पाध्ये, कुलकर्णी यांची सौंदर्य प्रतिमाने शरद जोशी नि राजू शेट्टींच्या आंदोलकांनी केव्हाच उखडून टाकली आहेत. साहित्याला आता सौंदर्यशास्त्रापेक्षा समाजशास्त्र, मानसशास्त्र, हवामानशास्त्रांनी निर्माण केलेल्या नव्या सामाजिक पर्यावरणाची गरज आहे, हे जोवर आपण समजून घेणार नाही तोवर ‘ज्वाला आणि फुले'चं सौंदर्य नाही आपणास समजणार! सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा आमटे म्हणाले होते, ‘मन का कुष्ठ शरीर के कुष्ठ से भयंकर होता है।' साहित्याची स्थिती या वाक्यावर तपासली की

काय हाती येतं? आपलं समग्र काव्य नि काव्यशास्त्र बदलू मागणाच्या या कवितेचं महत्त्व मला अशासाठी वाटतं की, ही कविता नवी रचना करू मागते आहे. ही कविता गद्यातही काव्यानुभूती देते. नवी शब्दकळा घेऊन येते. ती वैश्विक भाष्य करते. या अंगांनी पण तिचं अभिजात रूप (classicness) मूल्यांकित करता येईल. गांधीवाद, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद, फॅसिझम या सर्वांपलीकडे असलेला विशुद्ध मानवतावाद घेऊन येणारी ही कविता म्हणून मला वैश्विक वाटते. दुःख, दैन्य, उपेक्षेला जात, धर्म, देश, प्रांत, भाषा नसते, असतो फक्त चेहरा. या संग्रहात ‘क्रांतीची पावले शीर्षकाची सुंदर कविता आहे. ती क्रांती करणारे अनेक देश व इझम (वाद/ विचार) चित्रित करते व शेवटी इस्रायलचा किबुत्झ समजावते अन् म्हणते क्रांती सीतेसारखी आहे. तिचे चार चेहरे असतात - अत्याचाराचा, समतेचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा. पण त्यापलीकडे एक चेहरा असतो निर्मितीचा. या नव्या चेह-याची गरज सांगणारी ही कविता 'Hands to make, not to break'चं तत्त्वज्ञान सांगते अन् म्हणते 'वनवासी रामाची साथ करणारी क्रांतीची पावले म्हणून सीतेसारखी असतात... मौन, सक्रिय, समिर्पित, एकनिष्ठ आणि तरी अप्रसिद्ध! माध्यमांच्या झगमगाटात ‘मरणं' हा इव्हेंट होतो नि ‘जगणं' रकान्यात जातं याचं भान देणारी ही कविता.

 दुस-या महायुद्धानंतरही, त्याच्या भीषण परिणामानंतरही आपण अण्वस्त्रांचे कारखाने उभारत राहिल्याचं शल्य संवेदनशील कवी म्हणून व सजग सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाबा आमटेंना होतं. दुस-या महायुद्धानंतरचं जग पंचखंडी न राहता ते द्विखंडी झालं. एक श्वेत खंड तर दुसरा अश्वेत... कृष्ण... काळा खंड. म्हणजे सारं अविकसित, विकसनशील जग विशेषतः आफ्रिका, आशिया, प्रगत राष्ट्रे शस्त्र शक्तीवर निःशस्त्र, गरीब देशांना गुलाम बनवू पाहातात याचं शल्य बाबा आमटे यांनी 'आदिमानव उठला आहे' कवितेत फार प्रभावीपणे मांडले आहे. ते वाचत असताना बाबा आमटेंचं आंतरराष्ट्रीय प्रश्न व राजकारणाचा व्यासंग, आकलन लक्षात येतं. तीच गोष्ट ‘ग्रस्त स्वातंत्र्यास सलामी'मध्ये प्रत्ययास येते. झेकोस्लोव्हाकियावर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर व्यथित, विकल होऊन लिहिलेली ही कविता, साम्राज्यवादाचा पराभव करण्यासाठी जन्मलेल्या कम्युनिस्ट राजवटींनी आक्रमक होणं बाबा आमटेंसारख्या पंचशील पुरस्कारणाच्या कवीला पटणारं, मानवणारं नव्हतं. त्याचा प्रखर शब्दांत विरोध करताना ते म्हणतात-

 साम्यवादाच्या वेदीवर हंगेरीचा बळी घेऊन

 हा नरभक्षक संतुष्ट होईल असे वाटले होते

 पण नवसंस्कृतीच्या गप्पा मारणारा हा जुनाच

 नरभक्षक अजून माणसाळलेला नाही.

 पण रणगाड्यांनी स्वातंत्र्य कधी गाडले जाते काय?

 प्रश्न विचारत ते ‘जग मिटल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही' असे स्पष्ट शब्दांत ठणकावतातही.

 अतिमानव आणि आदिमानव हा वर्तमानाचा खरा संघर्ष आहे, असं बाबा आमटेंना वाटतं. अतिमानवाचे परत फिरणे' कवितेत ते जगातल्या सर्व विचारधारांची चिकित्सा करतात. देववाद, दैववाद, बुद्धिवाद, अस्तित्ववाद सा-यांपेक्षा त्यांना मानवतावादच श्रेष्ठ वाटतो. यातूनही या कवीची वैचारिक बैठक स्पष्ट होते. सुख, सामर्थ्य, सत्ता, सौंदर्य सान्यांचं मानवी जीवनात महत्त्व असतं हे खरं आहे, पण जग संघर्षमुक्त करायचं असेल तर सुताराचं पोरच ते करू शकेल. कारण त्याचं साधेपण हेच त्याचं सामर्थ्य असतं, असं समजावत ते अहिंसेची शिकवण श्रेष्ठ ठरवतात.

 ज्वाला आणि फुले' हे पुस्तक मला एकविसाव्या शतकातील वाचकांनी कोळून प्यायलं पाहिजे, हे अशासाठी वाटतं की, यातील जे काव्य, संगीत, प्रश्न, विचार आहेत ते या काळाला नवं बळ नि दिशा देणारे वाटतात.

 एकोणिसाव्या शतकात आदिमानव गुलाम होता

 विसावे शतक हे त्याच्या मुक्तीचे शतक आहे

 आणि एकविसाव्या शतकात तो जगाला तारणार आहे

 यातला 'तो' म्हणजे ईश्वर नव्हे. एकविसाव्या शतकाचा तारणहार हलधर, शेतकरी, कुष्ठपीडित, दलित, वंचित, उपेक्षित स्त्रियाच आहेत कारण त्यांचे जीवन श्रमसरितेच्या काठावर एक नवी श्रमसंस्कृती, एक नवं श्रमशास्त्र, एक नवं श्रमतंत्र उभारत आहे. ते त-हेत-हेचे सामाजिक कंस काढते होतील, कारण त्यांना हे जग ‘कंसमुक्त' हवे आहे-

 ‘संप्रदायांचे कंस आणि वादांचे कंस

 वर्णीचे कंस आणि वर्गाचे कंस

 राष्ट्रांचे कंस आणि संस्कृतीचे कंस

 माणूस माणूस अलग करणारे छोटे मोठे कंस'

 दाखवत बाबा आमटे म्हणतात तीच कंसमुक्ती आज हवी आहे. बाबा आमटे द्वापर, त्रेता, कलियुगानंतर स्वतःचं कलियुग ‘माझे कलियुग

कवितेत निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतात तेव्हा इतिहास नाकारत एका नव्या भविष्यास लक्ष्य करतात आणि म्हणतात -

 शिवधनुष्याचा महिमा गाणारे

 ते उचलू शकत नाही

 आणि इतिहासात रेंगाळणारे

 इतिहास घडवू शकत नाही

 यातून हा नवा विश्वामित्र नवी सृष्टी निर्माण करू पाहतो, हे स्पष्ट होतं. या नवसृष्टीत ‘मे फ्लाय संस्कृती'स थारा नाही. लक्तर संस्कृतीस तिथं मज्जाव असेल. सत्त्व व रक्तशोषणास तिथं बंदी असेल. विशाल ड्रेनेज (पतनाचे) तिथे वाहणार नाही. लोखंडी हृदयांची तिथे वस्ती नसेल. डांबरी नसा तिथं असणार नाहीत. विकृतीचे बेशरम आवाहन तिथे असणार नाही (जाहिराती). गुडघ्यात मुंडी खुपसून जगण्याचं अरिष्ट निर्माण करणारं कंपल्शन तिथं नसेल. संज्ञाशून्य संस्कृती म्हणजे मे फ्लाय संस्कृती -

 ‘‘मे फ्लाय' ही एका उडणाच्या किड्याची जात आहे.

 त्यांना तोंडही नसते आणि पोटही नसते!

 फक्त विलासी इंद्रिये त्यांना असतात

 रतिक्रीडा हेच त्यांच्या अस्तित्वाचे महाकारण.

 तोंड आणि पोट यांच्यासाठी

 या मे फ्लाय संस्कृतीलाही

 आपल्या हातांनी काही करावे लागत नाही.

 हे वाचताना हा कवी क्रांतदर्शी, भविष्यवेधी होता याची खात्री पटते. कारण शब्द लिहिले गेले तेव्हा जागतिकीकरण' जन्मले नव्हते. ज्या कवी, द्रष्ट्यास काळाची पावले ओळखता येतात तोच भविष्यलक्ष्यी ना? ‘ज्वाला आणि फुले' वाचायचं यासाठी की, ते आपणास जगाकडे पाहण्याची दृष्टी, विचारधारा, संस्कार देतं ती सम्यक असते नि पुरोगामी. ती मानव कल्याणाची असल्याने मूलतःच वैश्विक असते, कारण तिथं छोट्या आडोश्यांना थारा असत नाही.

 हे पुस्तक माझ्या ख-या कमाईची पहिली खरेदी होती. ती लेवून मी जगत आल्याला चाळीस वर्षं उलटली. साठी उलटली तरी बुद्धी पालटली नाही. मूल्य संघर्षांच्या माझ्या जीवनात उद्ध्वस्त करणारे क्षण, प्रसंग आले नाहीत असे नाही. चांगलं काम करताना, जगताना विरोध अटळ असतोच. तो विरोध हीच तुमच्या चांगलेपणाची दाद, पावती असते, असं आता

माझ्या लक्षात येऊ लागलं आहे. मी अनेकदा धनुष्य खाली ठेवलं पण टाकलं नाही; कारण जीवनात चांगल्याचं समर्थन करणारा मोठा समाज आहे. तो नसेल संघटित, व्यक्त होणारा, मुठी आवळणारा पण त्याच्या मौनातून, निष्क्रियतेतून मला बळ मिळत गेलं. कारण ते रेषेपलीकडील विरोधाच्या जमेत नव्हते. ज्यांना कुणाला असं जगणं शरण करायचं आहे त्यांच्यासाठी ज्वाला आणि फुले' न्यू टेस्टमेंट, नवगीता, आधुनिक बायबल, पुरोगामी कुराण आहे. माझ्यासाठी हरणाच्या क्षणांना मृत्युंजयी करणारं हे प्रेरणागीत ठरत गेलं. तुम्हासही त्याचं वरदान लाभेल तर नव्या जगात “ज्वाला' असणार नाहीत, असतील तर फुलेच ‘फुले'!

▄ ▄

अस्वस्थ करणारं स्त्रीजीवन : ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'


 श्रीमती रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' ही मराठीतील पहिली स्त्री-आत्मकथा मानली जाते. ती सन १९१० साली लिहिली गेली. त्या अर्थाने २०१० हे मराठी स्त्री आत्मकथेचे शताब्दी वर्ष होय. या आत्मकथेस गोपाळ कृष्ण गोखले यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत गोखले यांनी ‘पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा त-हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते' म्हणून केलेली भलावण लक्षात घेता, या आत्मकथनपर ग्रंथाचे भारतीय साहित्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होते.

 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या रमाबाई या दुस-या पत्नी होत. न्यायमूर्तीचे पहिले लग्न त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी झाले. ते एकतीस वर्षांचे असताना, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. न्यायमूर्ती पुरोगामी विचारांचे असल्याने, त्यांना दुसरा विवाह करावसाचा नव्हता; पण वडिलांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी दुसरा विवाह केला. अल्पवयीन कुमारिकेशी विवाह केला, म्हणून त्या वेळी ते टीकेचे लक्ष्यही बनले होते.

 या पुस्तकास रूढ अर्थाने स्त्री-आत्मकथन म्हणता येणार नाही. कारण यात रमाबाईंनी स्वतःबद्दल फारसे लिहिलेले नाही. या पुस्तकाचा नायक न्यायमूर्ती रानडे आहेत. नायिकेने त्याची कथा सांगितली आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही की, यातून ना न्यायमूर्ती रानडे यांचे संपूर्ण चरित्र वा जीवन स्पष्ट होते, ना रमाबाई रानडे यांचे. या उभयतांच्या जीवन प्रवासाची ही आंशिक कौटुंबिक कहाणी आहे. ती रमाबाईंनी आठवणींच्या स्वरूपात स्पष्ट केली आहे. त्या आठवणी

सर्वच सांगितल्या आहेत, असे नव्हे. शीर्षकानुसार त्यातील 'काही'च आहेत. त्यामुळे या पुस्तकाची स्वतःची मर्यादा आहे व अपुरेपणही. असे असले तरी शंभर वर्षांपूर्वीचे समाजजीवन, स्त्री-पुरुष संबंध व त्यांचा दर्जा, कुटुंबपद्धती, विवाह-रीती, सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना, सरंजाम, वाहतुकव्यवस्था, प्रशासन-पद्धती, स्त्री-शिक्षण, न्याय-व्यवस्था, भाषा, लेखनपद्धती अशा कितीतरी अंगांनी हे पुस्तक ‘शतकपूर्व समाज-चित्र' जिवंत करते. रमाबाई लग्नानंतर शिकल्या. सारे शिक्षण घरातच झाले. न्यायमूर्ती रानड्यांच्या सुधारक वृत्तीतून रमाबाईंचे जीवन कसे घडले, ते या पुस्तकातून समजते. त्या अर्थाने हे पुस्तक शतकपूर्व समाजजीवनाचा चालताबोलता इतिहास म्हटले, तर वावगे ठरू नये.

 महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक जीवनाचे गुरू म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोखल्यांकडे पाहतो. पण स्वतः गोखले न्यायमूर्ती रानडे यांना आपले गुरू मानत. आपल्या गुरुपत्नीची विनंती आज्ञा' मानून गोखले यांनी या आत्मपर ग्रंथास प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी न्यायमूर्ती रानडेंची ओळख महाराष्ट्रातील नानाविध चळवळींचे आद्य प्रवर्तक' व ‘अवतार पुरुष' म्हणून केली आहे. श्रीमती रानडे यांचे जीवन न्यायमूर्तीनी घडविले. पतिनिधनानंतर कृतज्ञतेपोटी त्यांनी या आठवणी संगतवार लिहिल्या असल्या, तरी त्यांना समग्र म्हणता येणार नाही. पतिवियोगानंतर अंतःकरणाचे सांत्वन करण्याच्या भावाने हे लेखन झाले आहे. श्रीमती रमाबाई रानडे यांचे जीवन व कार्य पाहाता, त्या केवळ गृहिणी नव्हत्या. पती निधनानंतर त्यांनी स्वतःस स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले होते. पंडिता रमाबाईंचा आदर्श त्यांच्यापुढे होता. लेडी डफरीन फंड, सेवासदन, शासकीय पाठ्यपुस्तक मंडळ, आर्य महिला समाज इत्यादींच्या माध्यमातून सदर पुस्तक लिहिण्यापूर्वी दशकभर तरी रमाबाई सक्रिय होत्या. पण त्याबद्दल त्यांनी या पुस्तकात अवाक्षर काढलेले नाही. न्यायमूर्ती रानडे यांनी तीन दशके महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व केले. प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, दुष्काळ निवारण, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यात न्यायमूर्ती रानडे यांचा सिंहाचा वाटा. पण श्रीमती रमाबाई रानडे यांनी पतीच्या या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल मौन पत्करणेच पसंत केले. माझ्या दृष्टीने आत्मश्लाघा, आत्मप्रशंसा टाळण्याचाच तत्कालीन संस्कार यातून स्पष्ट होतो.

 वरील अंगानेही सदरचे पुस्तक आत्मकथेपेक्षा (Autobiography) आठवणीद्वारे (Reminiscences) आपले व पतीचे वैवाहिक जीवन, कौटुंबिक सौख्य चित्रित करण्याच्या दृष्टीनेच केलेले लेखन असावे असे वाटते. 'सावली'चे रूपांतर ‘स्वयंप्रकाशात होण्याची किमया या आयुष्यकहाणीतून समजते. शंभर वर्षांपूर्वीची स्त्री ही स्त्री-पुरुष समानतेचा विचार करू शकत नसली, तरी पुरुषांबरोबरीने आपण पुढे गेले पाहिजे, हा ध्यास खचितच तिच्या मनी होता. इंग्रजी समाज व साहित्यातून ही इच्छा तिच्या मनात रुजत होती. सोवळ्यातली स्त्री ‘ओवळी' होण्याची धडपड, प्रयत्न या कथेच्या ठायी ठायी आढळतात. त्यामुळे आज वाचतानाही त्या यातनांची जाणीव झाल्यावाचून राहात नाही व हेच लेखिकेच्या लेखनशैलीचे यश होय.

 श्रीमती रमाबाई रानडे यांनी या पुस्तकात प्रारंभापासून शेवटपर्यंत कुठेही महादेव गोविंद रानडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सर्वत्र त्यांचा उल्लेख ‘स्वतः' असा आहे. नावाचा उच्चार न करण्यातून पतीबद्दलचा व्यक्त होणारा आदर हा त्या वेळच्या स्त्रीमनाची ओळख करून देतो. हा चरित्र प्रपंच त्यांनी मन पवित्र करण्याच्या (मन हलके करण्याच्या) उद्देशाने केल्याचे पुस्तकाच्या प्रारंभीच्या तुकारामांच्या अभंगावरून स्पष्ट होते. पतीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची ही कहाणी या कहाणीस आपली साथसंगत कशी होती, हे रमाबाई कथन करतात. पति-जन्म, शिक्षण, संस्कार इत्यादी ऐकीव माहिती आधारे त्या स्पष्ट करतात.

 ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'तून होणारे समाजदर्शन मोठे विलक्षणच. त्या वेळी मुलींना लग्न ठरल्याखेरीज नुसत्या पाहण्यासाठी पाठवण्याची चाल नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांची धाकटी बहीण दुर्गा एकवीस वर्षांची होती. तिच्या लग्नाऐवजी वडील आपल्या पुनर्विवाहाबद्दल आग्रही असल्याचं वैषम्य त्यांच्या मनात होतं. व्रतस्थ (अविवाहित) राहण्याचा नियम स्त्री-पुरुष दोघांनाही समान असावा, असे सुधारक रानडे यांना वाटायचे. रंगरूपापेक्षा कुलिनतेवर जास्त लक्ष ठेवले तर तो संबंध अधिक सुखाचा होईल' हे रानड्यांचे म्हणणे आजही अनुकरणीय वाटते. आपण काय म्हणून मुलगी देण्याचा विचार केला आहे?' असा खडा सवाल सास-यास करणारे रानडे सुनावतात की, 'आपण जुन्या घराण्यातील जहागीरदार आहात. मी सुधारक असून पुनर्विवाहाच्या पक्षाचा आहे. तसेच, मी शरीराने धट्टाकट्टा दिसलो, तरी डोळ्यांनी, कानांनी अधू आहे. शिवाय मला विलायतेतून

जाऊन यावयाचे आहे. तेथून आल्यावर मी प्रायश्चित्त घेणार नाही. तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करून काय ते ठरवावे. यातून रानडे यांची स्पष्टवादिता दिसते व लग्नाबद्दलची एक प्रकारची नाराजीही.

 सन १८७३ ला न्यायमूर्ती रानडे यांचा हा दुसरा विवाह झाला. तो ‘यादी पे शादी' असा. वरात नाही, की व-हाड. लग्नास वडिलांशिवाय मुलीकडचे कोणी नव्हते. लग्नाला रजा घेतली नव्हती. हे वाचून आजही या सुधारकत्र्याचं अप्रूप वाटत राहतं. काळाच्या पुढे जाणारे म्हणून तर ते सुधारक ना! लग्नात त्यांनी लौकिक विधी किंवा उपचार करून घेतले नाही, फक्त वेदोक्त विधी. लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूस दोन तास शिकवून आपल्यातील सुधारकास त्यांनी सिद्ध केले. न्यायमूर्ती रानडे यांची स्त्रीशिक्षणाची ही तळमळ, बांधिलकी केवळ लोकविलक्षण.

 रमाबाई रानड्यांच्या बालपणी माहेरी पारंपरिक वातावरण होते. आठ वर्षांच्या वरील मुलींनी व माहेरवाशिणींनी वडिलांच्यासमोर ओटीवर (ओसरीवर) जायचे नाही. मुलींनी खेळ-गाणी म्हणायची नाही. लिहिण्यावाचण्याचे नाव नव्हते. विधवा शिकली की पापी होते असा समज. त्यामुळे विवाहापर्यंत रमाबाई निरक्षरच होत्या. त्यांच्या ‘आईस वीस अपत्ये झाली. पैकी सातजणेच काय ती वाचली' (पृ.२१) वाक्य आज वाचताना तत्कालीन स्त्रियांच्या नरकयातनांची जाणीव झाल्यावाचून राहात नाही. 'बायकांचा देव व गुरू सर्व काही पती आहे' असा गुरूमंत्र’ ‘वडीलच देत. (पृ.२२) यातूनही तत्कालीन स्त्री-पुरुष मानसिकता स्पष्ट होते. रमाबाईंना आपली आई ‘मैत्रीण' वाटायची. हे वाचून आज आश्चर्य वाटते अशासाठी की, त्या काळाच्या कशा पुढे होत्या. रमाबाईंची आई मुलांचा गोतावळा घेऊन अंगणात गोष्टी सांगत बसायच्या. आत्याबाई त्यांच्या कथाकथनाची चेष्टा करायच्या. म्हणायच्या, ‘एवढाल्या कथा त्यांना काय सांगत बसतेस? मोठ्या माणसांच्यासुद्धा त्या लक्षात राहावयाला कठीण पडतात. तेव्हा आई आत्याबाईंना समजावायची, ‘मला त्या कुत्र्या-मांजराच्या गोष्टी येत नाहीत. मी तरी काय करू? ...' पण मला वाटते की, 'चांगले बी आपले पेरीत असावे. जशी जमीन मिळेल, तसे ते मूळ धरील.' हे या ग्रंथातील लोकशिक्षण आजही तितकेच प्रस्तुत व महत्त्वाचे वाटते. पूर्वीचे लोक ‘शिक्षित नसले, तरी ‘शहाणे' खचितच होते, ही या ग्रंथाची देणगी. ती आपण सर्वांनी जपली, जोपासली पाहिजे.

 न्यायमूर्ती रानडे यांचा एक निःस्पृह न्यायाधीश म्हणून लौकिक होता. त्यांचे कोल्हापुरात बरेच वर्षे वास्तव्य होते. इथे त्यांचे परिचितही बरेच होते. तिथेच ते न्यायाधीश म्हणून काम करू लागल्यानंतर एका परिचिताचा मामला त्यांच्यासमोर होता. ते गृहस्थ घरी भेटण्यास आले. त्यांच्या वडिलांकडून त्यांनी न्यायमूर्ती रानडेंवर प्रभाव टाकला. वडिलांनीही भीड म्हणून शब्द टाकला. पण आपल्या वडिलांनाही ‘मी येथे कामावर आलो आहे. सर्व कोल्हापूर आपले आहे, जो तो येऊन आपल्या कामाबद्दल भीड घालील, असा प्रकार न झाला तर बरे' म्हणून सुनावणारे न्यायाधीश आज किती? असा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.

 न्यायमूर्ती रानडे यांनी रमाबाई शिकाव्यात म्हणून हरत-हेचे प्रयत्न केले. स्वतः तर शिकवत राहिलेच, पण वेळ मिळत नाही म्हणून शिक्षिका नेमली. स्वयंपाकात आपली पत्नी तरबेज व्हावी म्हणून सूपशास्त्राचे पुस्तक आणून दिले. बायकोने रोज वर्तमानपत्र वाचावे, म्हणून तिच्याकडून रोज बातम्या ऐकण्याचा रिवाज ठेवला. स्वारी दौ-यावर असायची. प्रत्येक गावी न्यायाधीश म्हणून समारंभाची निमंत्रणे असत. न्यायमूर्ती रानडे आवर्जून आपल्या बायकोस पाहुण्या म्हणून पाठवत. भाषणाची तालीम घेत. पंडिता रमाबाईंसारखं बायकोनं काम करावं, म्हणून त्यांच्या सभेस स्वतः घेऊन गेले. बायकोला गणित, हिशेबशास्त्र यावे, म्हणून घरच्या खर्चाची जबाबदारी सोपवली. पगार सुपूर्द केला. खर्चाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, पण ते करताना पत्नीस हे सांगण्यास विसरले नाहीत की, ‘काटकसर व टापटीप शिकल्याने मनुष्याचे धोरण व चौकसपणा वाढतो.' हे सांगत असताना न्यायमूर्तीना त्या काळातही घसघशीत ८00 रुपये पगार होता. हे पाहिले म्हणजे संपत्तीची आजची उधळपट्टी व ओंगळ प्रदर्शन अस्वस्थ करते. त्या काळात ते खिशात एक छदामही बाळगत नव्हते. कपाटाला कुलूप नव्हते की जानव्याला किल्ली नव्हती हे विशेष.

 रमाबाई सभा, समारंभात बोलू लागल्या. समारंभ घडवू लागल्या, पण त्यांनी स्त्री मर्यादा कधी ओलांडली नाही. एका समारंभात व्यासपीठावरील पाहुण्यांना फुले, तुरे घालण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. त्यांनी पाहुण्यांना फुले, तुरे दिले, पण हार घातला नाही. यात सभ्यता, मर्यादा दिसून येते. ती आज पुरुषांनी पाळण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे अनेक प्रसंगात लक्षात येते. रमाबाई सभा, समारंभात जात. घरच्या बायकांचे टोमणे त्यांना खावे लागत. 'तुम्ही सभेला जाऊन आला आहात, लुगडे बदलले आहे,

तरीसुद्धा आमच्या घरात स्वयंपाकात पान वाढावयास घ्यायचे नाही. चटण्याकोशिंबिरीला किंवा तिखट-मीठालादेखील शिवायचे नाही. पुरुषांच्या (नव-याच्या) मांडीला मांडी लावून बसावे म्हणजे छान दिसेल!' असं सारं सहन करत त्या शिकल्या, सवरल्या नि सावरल्याही!

 न्यायालयीन सेवेत असताना असिस्टंट स्पेशल जज्ज म्हणून त्यांची नाशिक, धुळे आदी ठिकाणी नियुक्ती होत राहिली. या पदासाठी फिरती स्वारी घेऊन दौरा काढावा लागे. त्याचा मोठा सरंजाम असे. त्याचे मनोज्ञ वर्णन पुस्तकात अनेक ठिकाणी सापडते. त्यातून त्या वेळची प्रशासन पद्धती, सरंजामी, मानमरातब, लवाजमा इत्यादींवर प्रकाश पडतो. रमाबाईंची लेखनशैली सूक्ष्म निरीक्षणातून चित्र जिवंत करण्याची आहे, हे कळते. स्वारी (दौरा) च्या वर्णनात त्या एके ठिकाणी लिहितात, “आदले दिवशी मुक्काम नेमला असेल तेथे सकाळी आठ-नऊ वाजता जाऊन उतरायचे. घोड्याच्या गाडीत आम्ही उभयता, एक शिपाई व कोचमन आणि त्या गाडीत सामान म्हटलं म्हणजे गादी, तक्क्या, दोन दफ्तरे, दऊत, फराळाचा डबा व पाण्याची सुरई इतके नेहमी बरोबर असे. मुक्कामाच्या जागी उतरल्याबरोबर, शिपायाचे काम म्हटले म्हणजे जवळपास झाडांची गर्द छाया असेल, तेथे गादी, तक्क्या , दऊत, दफ्तर मांडून ठेवायचे व ‘बसायची जागा तयार आहे' अशी येऊन वर्दी द्यायची. तोपर्यंत स्वतः (न्यायमूर्ती) गाडीतून उतरल्याबरोबर मुखमार्जनादी प्रातर्विधी करून उतरलेले ठिकाण आजूबाजूने मोकळे व कोरडे आहे, पिण्याचे पाणी वाहते व स्वच्छ आहे, असे स्वतः पाहून मग इकडे येऊन कामाला सुरुवात होई. बैलगाड्या आधीच थोडा वेळ आलेल्या असत किंवा त्यांची मुक्कामावर गाठ पडे. मी गाडीतून उतरल्याबरोबर बैलगाडीतील भांड्यांचे व साहित्याचे पेटारे काढवून जेथे स्वयंपाक करावयाचा असेल ती जागा बाईकडून झाडून घेऊन व सडा घालवून स्वच्छ करवी. मग भांडी व साहित्य काढून मोकळी झाल्यावर सांजा व तोंडी लावणे करून जिकडे बसणे झाले असेल तिकडे घेऊन जाई." (पृ - ८७, ८८)' ... या वेळी आमचेबरोबर पाच-सात शिपाई, पाच-सात कारकून, शिरस्तेदार, दोघे स्वयंपाकी, एक घरकामाचा ब्राह्मण, एक माझी बाई, गडी, हमाल, गाडीवाले मिळून पस्तीस-चाळीस माणसे होती. शिवाय सात बैलगाड्या, दोन तंबू, एक घोड्याची गाडी इतके खटले (लवाजमा) असे.' (पृ - ८७) अशी स्वारी पाहून लोक विचारत, कोणत्या राजाची स्वारी आहे? काळाचं भान देण्याचे विलक्षण सामर्थ्य रमाबाईंच्या

लेखणीत आहे. या चित्र शैलीमुळे हे आत्मकथन आपणास त्या काळात केव्हा घेऊन जातं, कळत नाही.

 स्त्री आत्मकथनाचा शतकभराचा प्रवास पाहता स्त्री शिक्षण, स्त्रीचे व्यक्तिमत्त्व, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य, स्त्रीची विकासातील भूमिका, स्त्रियांसंबंधीच्या मानसिकतेतील बदल अशा अनेक अंगांनी मराठी, हिंदी, इंग्रजी स्त्री आत्मकथनातून प्रतिबिंबित होणारं स्त्री जीवन आशेचे किरण देणारं असलं, तरी ते उमेद वाढवणारं खचितच नाही. स्वातंत्र्य, अस्तित्व, वा अस्मितांसारखी मूल्ये कधी कुणी देऊन मिळत नसतात. ती सततच्या संघर्षातूनच हाती येतात, हा जगाचा इतिहास पाहता स्त्रीस अजून किती चालावं लागणार? या विचारांनी मन विषण्ण होतं. अलीकडेच चंद सतरें और’ आणि ‘सतरें और सतरें' या हिंदीतील विख्यात नाटककार मोहन राकेश यांची पत्नी (तिसरी पत्नी ही लक्षात घेण्यासारखी की ठेवण्यासारखी गोष्ट!) अनिता राकेश यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा मराठी अनुवाद ‘मी अनिता राकेश सांगतेय' या नावाने प्रकाशित झाला असून तो मी नुकताच वाचला. प्रा. रजनी भागवत यांनी तो विलक्षण स्त्री मानसिकतेनं चपखलपणे केला आहे. तो वाचताना किंवा ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय', ‘नाच गं घुमा', ‘भोगले जे दुःख त्याला वाचत असताना प्रश्न पुन्हा फेर धरून उभे राहतात. गेल्या शंभर वर्षांतील स्त्री जीवनाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आलेख वरचढ असला, तरी तो फसवा आहे. स्त्रीला विचार, आचार, निर्णयस्वातंत्र्य जोवर मिळणार नाही, तोवर तिचा विकास हा तकलुपी, वरवरचा, फसवाच राहणार. स्त्री-पुरुष समतेच्या विचाराचा मार्ग हा समानलक्षी बदलाच्या पुरुषी मानसिकतेतून जोवर प्रशस्त होणार नाही, तोवर खरी स्त्री-समानता अवतरणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

 प्रश्न आरक्षणातून सुटत नसतात. आरक्षण ही तात्पुरती व्यवस्था असते. सामाजिक न्यायाचा तो खुश्कीचा मार्ग आहे. पण खरी समानता आपणास आत्मभानातून व आत्मनिर्भरतेतूनच मिळवावी लागते. समानता व स्वातंत्र्य मूल्ये याचना, दया, सहानुभूतीतून मिळतील, तर ती अंतिमतः तुम्हास नव्या गुलामगिरीकडे नेतील. स्वभान, संघर्षातून येणारं स्वामित्व हेच खरं स्वातंत्र्य, याची जाणीव ज्या दिवशी होईल, तो स्त्रियांचा खरा स्वातंत्र्यदिन असेल. त्यासाठी स्त्री विकासाचा भविष्यलक्ष्यी आराखडा स्त्रीस स्वप्रज्ञेने तयार करावा लागेल. रमाबाई रानडेंपासून ते आशा अपराधांपर्यंतची मराठी

स्त्री आत्मकथनं, हिंदीतील अनिता राकेश, अमृता प्रीतम यांची आत्मकथनं आणि जागतिक वाङ्मयातील ‘ब्रिक लेन’, ‘माय फ्युडल लॉर्ड’, ‘ब्लासफेमी' सारखी पुस्तकं असो, सारी वाचताना वरील प्रश्न नि विचार घोंघावत राहतात. आजवरच्या स्त्री आत्मकथनात घुसमट जरूर आहे. गरज आहे हुंकाराची. अमृता प्रीतम, महाश्वेता देवी, तस्लीमा नसरीन यांच्या लेखनातील आत्मस्वर जोवर स्त्री लेखनाचा परवलीचा हंकार होणार नाही, तोवर खरं स्त्रीजीवन हे आढळात येणं कठीण. त्यासाठी समाजजीवन, स्त्री-पुरुष संवाद, सहवास, सहअस्तित्व, समभाव, समानत्व इत्यादी अंगांनी विकसित होण्याची गरज आहे. स्त्रीस 'माणूस' समजण्याची, तसे वागण्याची व तसा विकास घडवणारी समाजव्यवस्था, शिक्षण पद्धती, मानसिक व्यवहार दिनक्रम, परिपाठ म्हणून येईल, तो सुदिन होय. हे लिहीत असताना दुष्यंतकुमारच्या या ओळी उगीचच आठवत राहतात-

 पक गई हैं आदतें, बातों से सर होंगी नहीं,

 कोई हंगामा करो, ऐसे गुजर होगी नहीं।।

 (साये में धूप)

▄ ▄

संत कबीर व अंधश्रद्धा निर्मूलन




 पंधरावं शतक हे विदेशी आक्रमकांचं शतक मानलं जातं. मुस्लीम शासकांनी भारतात आपले पाय रोवले होते. धर्मप्रसारासाठी तलवारीचा धाक ही नित्याची गोष्ट झालेली. देशी हिंदू शासक आपल्या परीने विदेशी आक्रमकांशी लढत राहिले खरे, पण त्यांना फारसं यश आलं नाही. त्याची अनेक कारणं होती. एक तर देश विभाजित मनोवृत्तीचा बळी ठरलेला. ब्रह्मवादी, कर्मकांडी, शैव, शाक्त, स्मार्त, जैन, बुद्ध, अष्टदर्शनी अशा विभिन्न चिंतनाचे मतप्रवाह एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाल्यासारखी स्थिती होती. धर्म, जात, पंथ रक्षणाच्या प्रवृत्तीला दुराग्रहाची झालर येऊ लागलेली. सिद्ध, नाथपंथी, हठयोगी यांच्या रूपाने कर्मकांड म्हणजे धर्माचरण असे समीकरण होऊ लागलेले. अशात मध्यममार्गी धर्म चळवळ ही काळाची गरज झाली होती. दक्षिणेत अलवार तर उत्तरेत स्वामी रामानंदांनी या दृष्टीने पारंपरिक धर्मसंबंधी विचार व आचाराला छेद देणाच्या नव्या भक्तिमार्गाचा पुरस्कार करून आंदोलन सुरू केलं. या संतांच्या हयातीत त्यांना फारसं यश आलं नसलं, तरी धर्मसंबंधी नवविचार रुजविण्याचं क्रांतिकारी कार्य त्यांनी केलं. या आंदोलनाला परिणामकारक करण्याचं ऐतिहासिक कार्य संत कबीरांनी केलं. संत कबीरांनी नवा आचारधर्म रुजवला.

 संत कबीर ईश्वरभक्त होते तसे कवी, सुधारक व युगकर्तेही होते. त्यांनी आपल्या काळातील स्थिती हेरून जे त्याज्य आहे त्यावर हल्ला करण्याचं साहस दाखवलं. सामान्य जनता अंधश्रद्ध होती. तिच्या धर्मभोळेपणाचा अवास्तव फायदा घेणारे केवळ हिंद ब्राह्मण, पंडितच होते असे नाही तर मुस्लीम धर्मातील मुल्ला, मौलवी, मुजावरही होते. संत कबीरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून जातिगत, धर्मगत, वंशगत,

संस्कारगत, विश्वासगत, रूढीगत, शास्त्रगत, परंपरागत जे जे कालबाह्य, विषम, अंधश्रद्धेस खतपाणी घालणारं होतं त्यावर निकराने हल्ला करून ‘धर्म म्हणजे आचार, विचार शुद्धी' हा नवा विचार मांडला. ईश्वर दगडात नसून प्राणीमात्रांत आहे. ईश्वर प्राप्तीसाठी कर्मकांडापेक्षा सदाचाराची गरज त्यांनी पटवून दिली.

 पंधरावं शतक हे सामान्यजनांच्या दृष्टीने अंधानुकरणाचं शतक होतं. ‘बाबा वाक्यं प्रमाणं' ही आचरण रीत होऊन बसलेली. ‘काला अक्षर भैंस बराबर' असलेल्या निरक्षर, अज्ञानी, जनतेचे डोळे, डोके नि धड म्हणजे त्या वेळचा ब्राह्मण, वैश्य नि क्षत्रिय समाज, सवर्ण समाज. शूद्र त्यांचे वर्चस्व जन्मजातच मानायचे. “जन्मा येणे दैवा हाती' अशी मनःस्थिती धारण केलेल्या या समाजात माणसाचं श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व हे जन्मावरच ठरायचं. कबीरांनी जन्मजात श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व ठरविणा-या व्यवस्थेसच सुरुंग लावला. ते विचारत -

 जो तू ब्राह्मन बाह्मन जाया,

 आन बार स्वै क्यों नहीं आया?

 शूद्रांचा जन्म जसा होतो तसाच ब्राह्मणांचाही. मग ब्राह्मण उच्च नि शूद्र कनिष्ठ कसे! संत कबीरांचं वाक्य हे अत्यंत तर्कसंगत विवेचन असतं. त्यांच्या तर्कास तोड नसते. अकारण हल्ला करण्याची त्यांची वृत्ती नाही. पण डोळे झाकून एखादी गोष्ट प्रमाण मानणं त्यांना कधी रुचलं नाही, पटलं नाही-

 हमारे कैसे लहू, तुम्हारे कैसे दूध।।

 तुम कैसे ब्राह्मण पाण्डे, हम कैसे सूद (शूद्र)।।।

 या प्रश्नांना त्या काळातही कुणी उत्तर दिलं नाही. जात, जन्म इत्यादीवर आधारित अंधश्रद्धेवर, विषमतेवर प्रहार करून कबीरांनी समतेचा, मनुष्य समानतेचा विचार, आचार रुजवला.

 समग्र ब्राह्मण वर्ग हा सामान्य जनतेवर शास्त्राच्या आधारे वर्चस्व निर्माण करून आपली निरंकुश सत्ता टिकवू पाहात होता. संत कबीरांनी धर्मग्रंथ, पोथ्या, पंचांग हे सर्व थोतांड असून परस्पर सौहार्दपूर्ण आचारधर्म हाच खरा धर्म असल्याचं समजाविलं. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' म्हणणाच्या आधुनिक संत साने गुरुजींची शिकवण ही कबीरांच्या नवविचारांवर, नवशिक्षणावर आधारलेली होती, हे खालील दोहा वाचला की लक्षात यायला वेळ लागत नाही-

 पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय।

 ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।।

 म्हणणाच्या कबीरांना शिक्षणाचा खरा अर्थ उमगला होता. अडीच अक्षरं असलेला 'प्रेम' शब्द जो शिकतो, आचरणात आणतो तो शहाणा, तो पंडित ‘पुस्तकी पांडित्य म्हणजे शिक्षण' अशी अंधश्रद्धा धारण केलेल्या समाजास त्यांनी आपल्या नवविचारांनी छेदून अभिनव मूल्यसंकल्पना रुजवली.

 धर्म, परलोक, मोक्ष या सर्वांच्या मुळाशी ईश्वर कल्पना घर करून असते. मनुष्य समाजातील अंधश्रद्धेचा उगम ईश्वरीय संकल्पनेतूनच होत असतो. श्रद्धा माणसास भावुक बनवते तर अंधश्रद्धा निष्क्रिय, हे कबीरांनी पुरतं ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी दगडाच्या मूर्तीत देव नसून तो मनुष्याच्या हृदयात सामावलेला असल्याचं समजावलं होतं. ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव सिद्ध होत नाही, त्यावर विश्वास न ठेवण्याची एक वैज्ञानिक विचारपद्धती कबीरांनी रुजवली. वीतभर दगडाच्या पूजेने ब्रह्मांड व्यापणारा परमेश्वर मिळत असेल तर मी पर्वताचीच पूजा करीन म्हणणारे संत कबीर तर्काच्या निकषावर बुद्धीप्रामाण्यवादीच वाटतात-

 पाहन (पाषाण) पूजै हरि मिलै, तो मैं पूजू पहार (पहाड़)।

 ताते यह चक्की भलि, पीस खाय संसार??

 कबीरांचे काव्य विचार केवळ अंधश्रद्धेवर व्यंग प्रहार करणारे, कोरडे ओढणारे आसूड नसून त्यामागे व्यवहाराची एक दृढ बैठक आहे. उपयोजित आचारधर्म त्यांच्या विचारांचं सूत्र होतं. म्हणून वीतभर दगडाच्या मूर्तीपेक्षा ते पीठ देणाच्या जात्याची पूजा करणे पसंत करतात. जे बोधगम्य नाही ते नाकारायचं धाडस कबीरच करू जाणे. ईश्वरापेक्षाही आपल्या गुरूला झुकतं माप देण्यात कबीरांची ही व्यवहारी दृष्टीच स्पष्ट होते.

 मंदिर, मशिदीत ईश्वर असतो या अंधश्रद्धेपेक्षा जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी कबीरांनी आपला परमेश्वर हा निर्गुण, निराकार, अनिर्वचनीय असल्याचं सांगितलं होतं. तत्कालीन सर्व धर्मश्रद्धा, कर्मकांड हे ईश्वर, मंदिर, मठ, मशिदीच्या भोवती फिरत असायचे. ईश्वर, मंदिरमशिदीत नसतो. तो माणसाच्या डोळ्यांत, हृदयात सामावलेला असतो, हे सांगण्यामागे प्रस्थापित अंधश्रद्धेला तडा देण्याचीच कबीरांची दृष्टी होती. हृदयात वसलेला परमेश्वर बाहेर शोधणे केवळ मूर्खपणाचे म्हणणारे कबीर आपली वैचारिक स्पष्टताच सिद्ध करतात-

 ज्यू नैनू में पुतली, त्यू खलिक घट माँहि।

 मूरिख लोग न जाणहि, बाहरि ढूंढण जाहि।।

 ‘अमृत घट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी,' अशी पृच्छा करणारा भा. रा. तांब्यांसारखा कवीही प्रेम, ईश्वर, मनुष्यता, नातीगोती सारी मनाची गुंफण असल्याचं सांगतात, त्यामागे कबीरांचाच विचार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कबीर, प्रत्येक सजीव-निर्जीवात ईश्वर सामावल्याचं सांगून तो अंतरीच विराजमान असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगाची जीवघेणी धडपड ही आत्मनाशासच कारण ठरणारी असते, हे सांगत श्रद्धा डोळसच असली पाहिजे, हे कबीर निक्षून सांगतात. म्हणतात-

 कस्तुरी कुंडली बसै, मृग हँडै बन माहि।

 ऐसे घटि-घटि राम है, दुनिया देखे नाहि।।

 ते खरंही आहे.

 पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये, तीर्थाटन, बांग देणे, माला जपणे, दाढी वाढवणे, मुंडन करणे, बळी देणे यांसारख्या अघोरी कर्मकांडांचा कबीरांनी केलेला विरोध हा अंधश्रद्धांचा समूळ उच्चाटनाचा कृतयज्ञच होता असं म्हटलं तर ते वावगंही ठरू नये, शिवाय अतिशयोक्तही. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मामधील कर्मकांडांवर त्यांनी समान हल्ला चढवला.

 कंकड पत्थर जोड़ के, मसजित लई बनाय।।

 तापर मुल्ला बांग दे, क्या बहिरा हुआ खुदाय।।।

 आरडून ओरडून धर्मश्रद्धांचं प्रदर्शन करणा-यांना कबीरांनी केलेला प्रश्न की 'खुदा काय बहिरा आहे?' त्यामागे धर्मप्रदर्शनाला विरोध करण्याचीच भावना स्पष्ट दिसते.

 पूजा-अर्चा करताना सोवळे-ओवळे, स्नान, तिलक, छापा आदी ब्राह्माचारही अंधश्रद्धेचाच भाग असल्याने कबीरांना ते अमान्य होतं. बाह्याचारांच्या अंधानुकरणापेक्षा अंतर्विवेक जागा ठेवणं, तो जोपासणं कबीरांना अधिक महत्त्वाचं वाटायचं. विवेक ही माणसात नीर-क्षीर न्याय जागवणारी क्षमता होय. तिचा विकासच माणसास अंधश्रद्धेतून मुक्ती देईन, मोक्ष देईल असं कबीरांना वाटायचं, म्हणून ते एकदा वैष्णवांना विचारते झाले होते की-

 वैष्णव भया तो का भया, उपजा नहीं विवेक।

 छापा, तिलक बनाय कै, दग्ध्या (जल गये) लोग अनेक।।

 अंधश्रद्धेत आजवर कित्येक दग्ध झाल्याची कबीरांची व्यथा समाजास अंधश्रद्धा मुक्त करू इच्छित होती.

 याच भावनेतून कबीरांनी पूजन, अर्चन, तीर्थाटन आदी कर्मकांडास विरोध केला. समाजातील अंधश्रद्धेचं निर्मूलन ख-या अर्थाने थांबायचं असेल, तर 'भातुकलीचे बाळखेळ थांबायलाच हवेत यावर कबीरांचं एकमत होतं. ते आपल्या मतावर दृढ होते. ईश्वर हा बोधगम्य नाही- दिसत नाही, आकार नाही मग पूजन-अर्चनास अर्थच काय? ज्या साच्या व्यवहाराची इमारत संशय, आशंकांवर उभी आहे ते नाकारायला हवं, ठोकरलंच पाहिजे याबाबत कबीरांचं दुमत नव्हतं म्हणून तर ते म्हणाले होते की-

 पूजा-सा वह नेम वृत, गुडिया-का-सा खेल।

 जब लग प्रिय दरसै नहि, तब लग संशय मेल।।

 निःसंशय समाज निर्मिती ही कबीरांच्या साच्या धडपडीमागचं ध्येय होतं. कबीर अंधश्रद्धमुक्त माणसांचं स्वराज्य निर्मू इच्छित होते. याच विचारांनी कबीरांनी मालाजपासारख्या कर्मकांडाचाही विरोध केला होता. बाह्याचाराच्या प्रदर्शनापेक्षा अंतर्भुद्धीस कबीर अधिक महत्त्व द्यायचे. रामनाम जपातील ‘र' कार, ‘म'कारापेक्षा कबीर मनःशुद्धीस श्रेष्ठ मानायचे. 'मन चंगा तो कठौती में गंगा' सारख्या विचारांवर त्यांची अटळ श्रद्धा होती. प्रकट नामस्मरणापेक्षा अंतर्भुद्धी महत्त्वाची कशी ते समजावत ते म्हणाले होते-

 कर में तो माला फिरे, जिभ फिरे मुख माहि।  मनुआ तो चहुदिसी फिरे, यह तो सुमीरन नाहि।।

 ‘देह देवळात चित्त खेटरात' अशी अंतर्बाह्य विसंगत धर्मपद्धती केवळ अंधश्रद्धेची परिणती होय यावर कबीर ठाम होते. धर्माच्या नावावर निष्पाप प्राण्यांचा बळी देण्यामागील धर्मपंडितांचा स्वार्थ कबीर ओळखून होते. म्हणून त्यांनी अशा बळी प्रथेचा प्राणपणाने विरोध केला. 'साई के सब जीव है, कीरी कुंजर दोय' अशी धारणा असलेले कबीर पशु-पक्षी, कीटक या सर्वांठायी ईश्वर मानणारे संत होते. धर्माच्या नावावर पशुहत्या जोपासणाच्या मनुष्यास त्यांनी बेभरवशाचा प्राणी मानलं होतं त्यामुळेच-

 बकरी पाती खात है, ताकी काढी खाल।।

 जो नर बकरी खात है, तिनके कौन हवाल।।

 गवत खाऊन जगणाच्या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार- त्या पाश्र्वभूमीवर निष्पाप प्राण्याचा धर्माच्या नावावर बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार कबीर कसे मान्य करतील?

 अशा प्रकारे अनेक धर्माचारांचा कबीर विरोध करतात कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरण प्रवृत्ती ‘मुंड मुंडाये हरि मिले, तो सब कोई लेय मुंडाय' म्हणणारे कबीर कर्मकांडातील वैयर्थच समजावितात. केवळ केशवपनाने मोक्ष मिळायचा तर माणसाआधी तो बकरीला मिळायला हवा. दाढी वाढवून मोक्ष मिळायचा तर तो आधी बोकडालाच मिळेल, अशी खात्री देणारे कबीर माणसाच्या ‘तन जोगी' वृत्तीवर प्रहार करून 'मन जोगी' होण्याचं समर्थन करतात-

 तन को जोगी सब करै, मन को बिरला कोई।

 सब बिधि सहजै पाइए, जे मन जोगी होइ।।

 सर्व प्रकारच्या विसंगत व्यवहारावर कबीरांचा प्रत्येक आघात म्हणजे नवधर्माचे अनुकरणीय आदर्शच रुजविण्यासाठी केलेली धडपड होय. कर्म, धर्मसंबंधी हिंसा, गुलामी यांना अशासाठी अमान्य होती की, त्याला तर्काचा काही आधार नसायचा. एकादशी दुप्पट खाशी'सारखी लोकोक्ती समाजात रूढ होती ती विसंगत व्यवहारामुळे. रोजा पाळायचा नि गोमांस भक्षण करायचे यासारखे विसंगत, दुटप्पी वर्तन ते कोणते?

 दिन को रोजा रखत है, रात हनत है गाय।

 यह खून, वह बंदगी, कह क्यों खुसी खुदाय।।।

 संत कबीर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जनक होते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संत कबीर हे पुरोगमी विचाराचे समर्थक संत होते. तर्कास आधार असायला हवा. आधार बोधगम्य हवा. प्रत्येक विचार, आचार हा कार्य, कारण कसोटीवर पारखून घेता आला पाहिजे. जे सारयुक्त आहे तेच स्वीकारायचं. जे फेकण्याच्या योग्यतेचं ते फेकायलाच हवं असं ते बजावायचे. ‘सार सार को कहि रहे, थोथा देई उड़ाय' म्हणताना कबीर त्यासच साधू मानत तो सारग्रही असतो. कबीर स्वतः असे सारग्रही संत होते. कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन, बाह्याचार त्यांना अमान्य होता. आज मंदिर-मशिदीच्या वादावरून राजकारण करणा-यांना कबीराचं काव्य अंजन ठरेल. पण गांधारीसारखी पट्टी बांधून ज्यांनी स्वार्थ हाच धर्म मानला आहे, अशा संकीर्ण जनांना बाबरी, बॉम्ब, बॉम्बे, गोध्रा अशा कितीतरी व्हाया प्रवासात आपण परत एकदा अंधश्रद्धेसच खतपाणी घालतो, हे कसं लक्षात येत नाही याचं आश्चर्य वाटतं. एकविसाच्या शतकातही कबीरांचे अंधश्रद्धा निर्मूलनपूरक विचार प्रस्तुत, सार्थकी वाटतात ते त्यातील मनुष्य कल्याणकारी वृत्तीमुळेच.

▄ ▄

कारंथीय नाट्यमीमांसा



 ‘साप्ताहिक सकाळ' च्या दिवाळी -२000 च्या अंकात भारतातील श्रेष्ठ रंगकर्मी बी. व्ही. कारंथ यांची एक दीर्घ मुलाखत प्रकाशित झाली आहे. सुविख्यात नाट्यदिग्दर्शक व समीक्षक श्री. माधव वझेनी ती घेतली आहे. मुलाखतीचे स्वरूप कारंथांच्या जीवन व कार्याचा आढावा असं आहे. या मुलाखतीत कारंथांनी नाटक, संगीत, अभिनय, रंगमंच इत्यादी संबंधाने जे विचार व्यक्त केले आहेत ते वर्तमान नाटकाशी निगडित असलेल्या सर्वांचा विचार करायला लावणारे आहेत. नाटकाचा भूत, वर्तमान व भविष्य असा त्रिविध वेध घेणारी ही मुलाखत आहे. वर्तमान नाटकापुढे ठाकलेलं वैश्विकीकरणाचं आव्हान पण यातून सुटलेलं नाही. म्हणून नाटकाविषयी जिव्हाळा असणाच्या सर्वांनी कारंथांच्या विचारांची नोंद घेऊन नाटकाच्या विकास, उत्कर्षासंबंधी क्रियात्मक पावले उचलायला हवीत, असे वाटते.

 रंगकर्मी घडायला लागतो. नाटकाच्या सर्वांगाची त्याला माहिती हवी. जसं त्याला नाटक जगता यायला हवं, तसं नाटक हे त्याचं जीवनही व्हायला हवं. रंगकर्मी म्हणून कारंथ असे वाढले व घडले. त्यामुळे नाटकासंबंधीच्या त्यांच्या विचारांना अनुभव व समृद्धीची झालर आहे. नाटक हा त्यांचा आचारधर्म होय. भजन व किर्तनात ते वाढले. गळा लागत गेला. भारतातील सर्व भाषिक नाटके संगीतावर वाढली. त्यामुळे ती लोकाभिमुख झाली नि लोकाश्रयीही. पूर्वीचं नाटक लोकनाटक व लोकसंगीत असा दहेरी बाज घेऊन येणारं असायचं. ते प्रेक्षणीय होतं. गतीने बदलणारी दृश्यं असायची. नाटक खेळ होता. रंगकर्मीना पारख होती. परीक्षा नसायच्या. उमेदवारीच उभारी द्यायची. खेळ रोज नसायचे. तालमी मात्र नित्याच्या.

आठवड्याला एक रुपया बिदागी मिळायची. कंपनीतील सगळ्यांना सगळं आलं पाहिजे असा दंडक होता. सर्वांना गाणं, बजावणं, अभिनय, नेपथ्य, सान्याची जाण यायची.

 नाटकातलं संगीत ‘सेक्युलर' होतं. कर्नाटकी, हिंदुस्थानी, लोकसंगीत, कव्वाली, गझल सगळे प्रकार नाटकात मोकळेपणाने वापरले जात. अगदी पाश्चात्य संगीताचंही वावडं नसायचं. भारतात कथात्मक संगीत विपुल आहे. त्यांचा शोध घेऊन वापरायची दृष्टी हवी.

 नाटक कंपन्या ‘सार्वभौम' होत्या. एकेका प्रांतात, भाषेत त्याचं एकाधिकार राज्य असायचं. आपल्या कंपनीत, नाटकात नवं-नवं आणण्याची हौस नि इर्षा असायची. १८८४ च्या काळात नाटक कंपन्यांकडे ऑर्गन, पियानो, व्हायोलीन, पेटी, क्लेरोनेट, बासरी, टूगल असा संच असायचा. गुंडाळत खाली वर करणारे पडदे असायचे. अस्सल दागिने वापरायचे. नाटकात मंडळींना खरेखुरेपणाचा सोस असायचा. एवढं सारं करूनही ही मंडळी म्हणायची ‘आम्ही करतो ती ‘कारागिरी' ‘कलागिरी' नाही. लोक मात्र म्हणायचे नाटक मंडळी 'नाटक' नाही ‘सिनेमा' दाखवतात. नाटक मंडळीत नाटक अनुवंशिक असायचं. तीन-तीन पिढ्या नाटकातच असायच्या. नाटक पाहणं स्वस्त असायचं.

 लोक न येणा-या भाषेतीलही नाटकं पाहायचे. नाटक पाहणं याला महत्त्व होतं. शब्द न का कळेनात, नाटक मात्र कळायचं. आता नाटकं अनुवादित होतात. भावांतरित होत नाहीत. त्यामुळे ती भावतसुद्धा नाहीत. रंगकर्मीबद्दल नाट्यरसिकांत आदरयुक्त भीती असायची.

 सकाळ झाली, डोळे उघडले की गायकास केव्हा एकदा गळा मोकळा करू असं व्हायचं. गुरूची शिकवण असायची, गायन असं करा की, वाटावं तुम्ही बोलता आहात, बोलाल तर असे बोला की वाटावं तुम्ही गात आहात.

 कारंथांनी नाट्यदिग्दर्शक म्हणून उमेदवारी सुरू केली ती मुलांची नाटकं बसवण्याने. प्रयोग हा त्यांचा पिंड. दोन-तीन मिनिटांचे चुटके, चुटकुले घेऊन नाटकं बसवली. दोन-तीन मिनिटांचे चुटके, चुटकुले घेऊन नाटकं बसवली. एकांकिकेच्या धर्तीवर त्यांनी आपल्या छोट्या नाटकांचं नामकरण केलं होतं ‘चुटकुलांकी'. नाटक बसवताना - विशेषतः मुलांची नाटकं, कार्यक्रम बसवताना निवड नसावी. नाटक ही एक समृद्ध कृती होय. तीत सगळ्यांना भाग घेता यायला हवा. तेव्हाच नाटक सर्वांचं होणार ना!

 कारंथांनी नाटकं लिहिली नाहीत. बसवली, खेळली, देशात नि परदेशातही, तशीच ती विविध भाषांतही. आपल्या अनुभवातून त्यांना वाटतं की, समर्थ रंगकर्मी घडायचा, तर त्यास नाटक, रंगभूमीचं सैद्धांतिक ज्ञान हवंच. आधुनिक नाटकात संगीताची झालेली फारकत त्यांना मान्य नाही, मधल्या काळात नाटकात दृश्यासच असाधारण महत्त्व आलं होतं. कारंथांनी नाटकास संगीताचा पूर्वसंस्कार बहाल केला.

 कारंथ आपल्यावरील आद्य रंगाचार्यांचा प्रभाव मान्य करतात. त्यामुळे त्यांची नाटकं, 'Art is not Logic, it's magic' ची प्रचिती देतात. त्यांच्या दृष्टीने रंगमंच सजीव, जिवंत (Living) असतो. रंगभूमीला भूतकाळ असत नाही. असतो तो फक्त वर्तमानकाळ. 'इथं आणि आता' असा रंगभूमीचा अनुभव असतो.

 नाटक कळायचं तर नाटककार, रंगकर्मी, दिग्दर्शक कळायला हवेत. आद्यरंगाचार्य, गुब्बी वीरण्णा, मुनीअप्पा, अल्काझी, शेक्सपिअर सारे कळायला हवेत, कोळून प्यायला हवेत. ‘ए डॉल्स हाऊस', 'अँटिगनी', ‘राजा ईडिपस' सारं माहीत हवं. त्यातून रंगभूमीला प्रतिष्ठा मिळते. नाट्यप्रयोगाची संरचना असायला हवी. त्याचे नियोजन असावं. अभिनय उत्कृष्टच असायला हवा. नाटक नुसतं वाचून चालणार नाही. त्याचे प्रात्यक्षिक पाहायला, अनुभवायला हवं. अभिनयाचा ‘स्तानिस्लाव्हस्कीचा सिद्धांत माहीत हवा. तरच नाटकातील भव्यदिव्य हाती येतं. मग सारी सृष्टीच नाटकमय वाटायला लागते. दर्शनी पडदा ‘यवनिका' होतो. आकाश ‘गगनिका' होते. सारा भूगोल रंगमंच, 'रंगपंचांग' होतो. वरिष्ठ रंगकर्मीच्या मनात नाट्यांबद्दल दुष्टपणा नसायचा. असेलच तरे तो कौतुकाचा भाग नि तोही ते कौतुकाने व्यक्त करायचे. नाट्यांबद्दल त्याच्या मनात आस्था असायची.

 प्रत्येक रंगकर्मीस आपला प्रेक्षक शोधता यायला हवा. अनुदान, शिष्यवृत्तीतून नाटक साकारत नसतं, ते साकारतं ते फक्त नाट्यवृत्तीतून आणि नाटक ‘प्राण' व्हायच्या प्रक्रियेतून. नाटकाच्या दृष्टीने भाषा महत्त्वाची असते. रंगभूमी, नाटक भाषेशिवाय असणारच नाही. कोणतीही रंगभूमी सर्वांत अधिक स्थानिक असते. रंगभूमी राष्ट्रीय नसते आणि आंतरराष्ट्रीयही नसते. त्या त्या प्रांताची त्या त्या गावातली .(आता कलेतली ‘स्कूल' ही कल्पना लक्षात यावी.) राष्ट्रीयीकरण, वैश्विकीकरण यांच्या आजच्या वातावरणात बोलीभाषा संपणार आणि रंगभूमी हीच एक अशी जागा आहे, जिथं भाषा जिवंत राहील. त्यामुळे आपापल्या जागी काम करत राहणं

महत्त्वाचं. तिथून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं. झाडाचं मूळ दुस-या मातीत जगतं पण तरारत नाही हे ध्यानी घ्यावं.

 नाटकांचे महोत्सव होतात. व्हायला पण हवेत. परप्रांतात, भाषिकांत आपापल्या गावी 'आपलं' झालेलं नाटक कसं घेतलं जातं, निराळ्या प्रेक्षकांना कोणता अनुभव येतो ते पाहणं महत्त्वाचं असतं. उत्तम ते कळायला, वाढायला, रुजायला यातून मदत होते. नवे रंगकर्मी, नवे प्रयोग, नवी रंगरचना, नव्या वेशभूषांची जाण अशा महोत्सवातून होते. महोत्सव जाणकारांच्या जागराची जागा असते. तिथं सर्वसाधारण प्रेक्षक अपेक्षित नाहीत. सर्वसाधारण प्रेक्षक आपल्या जागी, प्रांतीच मिळणार. म्हणून तर नाटक स्थानिक असतं. गावचं, प्रांताचं.

 नाटकातून ऊर्जा निर्माण होत असते. ही ऊर्जा असते ती भाषेची. ती बोलण्या-ऐकण्यातून निर्माण होते. भाषेचं म्हणून एक स्थान रंगभूमीत असलं पाहिजे. नाहीतर बोलीभाषा नामशेष होईल. रंगभूमी ही भाषेची प्रयोगशाळा असते. तिथं भाषेचं सारं गर्भित फुलतं, प्रसवतं.

 नाटकाच्या दृष्टीने खुले रंगमंच चांगले. चौकोनी रंगमंच म्हणजे चौकट नाटकास, नटास चौकटीत बांधू नये. नट हाच रंगभूमीची शोभा असायला हवा. नट फैलावत जायला हवा. नाटक असतो व्यक्तिमत्त्वाचा, व्यक्तीचा विस्तार. रंगकर्मी नाटकाचा ‘निमित्त पुरुष' असतो. तसाच तो राहायला हवा. तो 'कारण पुरुष' होता कामा नये. मग त्याच्यातलं 'नाटक' संपतं! मनात येईल तसं नाटक करत राहायला हवं. नाटकाचा विकास अशातूनच संभवतो. भावस्थिती, मनःस्थितीचे अनेकविध प्रयोग होत राहिले पाहिजेत.

 नाटक एक 'उत्सव' असतो. एकाकीपण दूर करणारा. नाटकात 'सामुहिक पर्व' निर्माण करण्याची शक्ती असते. जगातलं वैभव त्यातून अनुभवायला येतं. उत्सव, मेळे, मिरवणुकांत दारिद्रय नसतं. असतं फक्त वैभव!

 कोणत्याही नाटकाचा प्रयोग 'थोर' असत नाही. कारण हवा बदलते. रंगभूमी ही आत्ताची असते, वर्तमानाची. या काळाची, या क्षणाची, कोणत्याही क्षणाचं, घटकेचं महत्त्व कितीसं टिकून राहणार! नाटक झाल्याक्षणी 'ते' नाटक संपतं. परत नवं नाटक. ते शोधायला हवं, शोधत राहायला हवं! कुमार गंधर्व गायचे. वर्षभरात दहा ते बारा कार्यक्रम व्हायचे. मैफल सुरू करताना म्हणायचे, ‘काल' या गंधर्वानं गाणं म्हटलं होतं तो संपला. गेला! आज गाणार आहे तो ‘नवा गंधर्व' आहे! नाटकाचंही असंच असतं.

 संगीत दिग्दर्शकाला शास्त्रीय संगीत माहीत असायला हवं असं नाही.

त्याला माहीत असायला पाहिजे फक्त व्याकरण, सारेगमपधनिसा, मंद्र, मध्य, तार... बस्स! व्याकरण म्हणजे निव्वळ व्याकरण नाही, रागदारीतील ‘स्वरकारी' पण. रंगभूमीवर संगीतास स्वतंत्र अस्तित्व नसतं. ते उपयोजित असतं. लोकसंगीतातही ते तसंच आहे. शास्त्रीय संगीतात शब्द कुठेही जोडता येतात. रंगभूमीमध्ये तसं नसतं. तिथे अर्थ महत्त्वाचा असतो. रंगभूमीवर कुणी ओरडलं तरी त्याला अर्थ असतो. हावभाव व आवाजाच्या टोनमधून भाषा प्रगट होते. तेच रंगभूमीचं संगीत असतं. रंगभूमीवरचं संगीत असतंच मुळी संप्रेषणासाठी, संवादासाठी (कम्युनिकेशन). ब्रेख्तनं म्हटलं आहे, रंगमंचावर संगीताची ‘इडियम' असते. ती काही सांगीतिक रचना नसते. नाटक आपल्या वाटेनं जातं. त्याचा जितका संबंध लोकसंगीताशी आहे तितका शास्त्रीय संगीताशी नाही. रंगभूमीवर स्वरांचा विस्तार जादापणानेच असतो. त्याशिवाय थिएटर असणारच नाही. हजारो लोक नाटक बघत उभे किंवा बसलेले असतात. यातला प्रत्येक घटक ‘नाट्य' अधोरेखित करत असतो. नाटक केवळ खोलीतल्या मैफिलीपुरतं नसतं, नसावंही. नव्या नाटकातून रंगभूमीने आपलं संगीत निर्माण करावं. लोकसंगीत, शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळं असं रंगभूमीचं संगीत'. वाद्येदेखील रंगभूमीनं आपली निर्माण करावीत. ध्वनींचे नवे आकृतीबंध शोधून काढावेत. रंगभूमीवर संवादी, विसंवादी असा भेद असत नाही. संगीत म्हटलं, की 'नोस्टेल्जिया' पाहिजेच, नाहीतर वाढच खुटणार!

 नटाला तालाची जाणीव हवी. नृत्यही यायला हवं. नटाचं निरीक्षण हवं. प्रसंगातून नि प्रसंगातलं नाट्य त्याला शोधायला आलं पाहिजे. नाट्यप्रशिक्षणाला फारसा अर्थ नसतो. मुळात नटात नाट्य ही वृत्ती, प्रेम, लगन म्हणून असायला हवी. दुसरी कोणतीही अट असूच शकत नाही. संगीत शिकायचं तर आवाज कसा आहे हे पाहिलं जातं. नाटकाचं तसं नाही. तो 'माणूस' हवा बस्स! प्रेक्षकही माणूस असतो. नटानं जे करायचं ते ‘आदमियत की खुशीसे और कलात्मक ढंग से' केलं की झालं. उपजत ज्ञान, उपजत वृत्ती, आपली बुद्धिमत्ता सान्यांचा उपयोग केला तरी पुरेसा. रंगभूमीवर कोणी गुरू असत नाही की शिष्य. फिट्झ बेनविट्झच्याच शब्दात सांगायचं तर ‘नट अनौरस असतो. किती आणि कुठल्या कुठल्या बापाकडून तो काय काय मिळवत असतो.

 अभिनय कलेचे ठोस असे सिद्धांत नाहीत. अभिनय शिकवायचा नसतो. तो शिकायचा असतो. नाटकातील व्यक्तिरेखेचा अभ्यास करून

नटाने पैलू शोधायचे. प्रयोगाच्या दृष्टीने विचार करायचा. मग अभिनय येतो. प्रेक्षकांना आपलंसं करणं यासाठी नाट्यप्रयोग असतो. ते सारं यातूनच साधतं. रंगभूमीवर बौद्धिक गुलामी कामाची नसते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मुळात सारी रंगभूमी एक माध्यम म्हणून जरी तिचा सर्वंकष (Total) विचार केला तरी शिकवण्याची गोष्ट नाही, हे स्पष्ट होईल. ‘सात्त्विक अभिनय' आता इतिहासजमा झाला. रंगभूमीशी प्रत्येकानं आपल्याला जागृत ठेवायला हवं. प्रत्येकानं प्रत्येक क्षण शिकत राहायला हवं. 'रंगसाधना' ‘स्वयंशिक्षणाचं' दुसरं नाव होय. नाटकवाला स्वभावानं साधा, सरळ हवा. तो अप्रामाणिक, कपटी असता कामा नये. आपण आपल्याला खुलं ठेवायलाही हवं. कुणी काही सांगो, विवेक जागा ठेवून काय घ्यायचं, काय नाही, ठरवावं. सारी रंगभूमी खरोखर विनशीलतेच्या पायावरच उभी आहे.

 प्रशिक्षण, पाठ्यक्रम व शिबिरं यात फरक असतो. शिबिरं व्हायला हवीत. त्यातून एक 'रंग बिरादरी' तयार होते. शिबिराची निष्पत्ती नाट्यप्रयोगात व्हायला हवी. प्रयोगाशिवाय प्रेक्षकांशी नातं जुळून येत नाही. असं नातं जुळून येणं, आयुष्यभर पुरणारा अनुभव असतो.

 नाटकाच्या आशयाचं आधुनिक संवेदनेशी नातं असावं. जी नाटके ते ठेवतात, ती तरतात. कमजोर मरतात. 'नौटंकी' संपली. पण 'यक्षगान', ‘जत्रा' जिवंत आहेत. रंगभूमीमध्ये पुनरुद्धारही नसतो. नवनिर्मिती जरूर असते. पुनर्स्ष्टी असते. गरज, मागणीनुसार रंगभूमी आर्थिक दृष्टीने अनुत्पादक आहे. नाटक करून काही पोट भरता येत नाही. खेळ आहे तो आनंदासाठी केलेला. रंगभूमी 'संस्कार' आहे. तो होत असतो, करायचा नसतो. नाटक अमर आहे. मरेल असं वाटत नाही. पूर्वी नाटकात 'आकाशवाणी' व्हायची. आज ‘आकाश भाषण' (Telephonic Talk) आहे. ती रूपांतरित होईल. जोपर्यंत माणूस आहे, तोवर रंगभूमी राहणार. ती नवोन्मेष घेऊन येत राहणार. चित्रपट आले, तेव्हा वाटलं होतं, नाटक संपलं. पण असं झालं नाही. आज दूरदर्शनचं आव्हान उभं ठाकलंय! पण तरी रंगभूमी तरारतेच आहे ना? मुळात ती माणसाची संवेदना, सहजप्रवृत्ती आहे. नाटकातील मानसिक वर्णाश्रम दूर व्हायला हवा. सारेच रंगकर्मी-रंगयात्री, दिग्दर्शक ब्राह्मण, नट क्षत्रिय, पडद्यामागचे शूद्र असं काही नसावं. रंगयात्रा ही लोकयात्रा, लोकोत्सव, लोककला व्हायला हवी.

▄ ▄

वि. स. खांडेकरांच्या रूपककथा



 वि. स. खांडेकर हे मराठीतील चतुरस्र साहित्यिक होत. त्यांनी मराठीत कथा, कादंबरी, लघुनिबंध, नाटक, विनोद, काव्य, पटकथा, समीक्षा, व्यक्तिचित्रे - असं सर्व प्रकारचं लेखन केलं. पण मराठी साहित्य खांडेकरांचं ऋणी राहील ते त्यांच्या रूपककथा लेखनामुळे. रूपककथा ही खांडेकरांनी मराठी साहित्याला दिलेली अनमोल देणगी होय.

 रूपककथा आपणास जगातील सर्व भाषांत कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. रूपककथेची सुरुवात मात्र भारतातच झाली. रूपककथेचं पहिलं बीज आपणास ऋग्वेदाच्या उषा-सूक्तात आढळतं. दृष्टांतातूनही सांगितलेलं मर्म, हे रूपककथेचं वैशिष्ट्य असतं. अशा कथा उपनिषद व महाभारतातही दिसून येतात. विश्व साहित्यात विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, ख्रिश्चन जेलर्ट, टॉलस्टॉय, ट्राहर्न, ब्लॅकसारख्या कथाकारांनी रूपककथा रूढ केली. भारतीय साहितयातील आधुनिक काळात रवींद्रनाथ ठाकुरांप्रमाणे वि. स. खांडेकरांनी पिपुल रूपककथा लिहिल्या आहेत.

 खांडेकरांच्या रूपककथा कशा सुरू झाल्या हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी पहिली रूपककथा हेतुतः लिहिली नाही. सन १९३० चा तो काळ होता. भारतात धार्मिक दंगे सुरू होते. त्या दंग्यांनी दुःखी झालेल्या खांडेकरांनी ‘स्वप्नातले स्वप्न' नावाची एक सामाजिक कथा लिहिली. ती 'यशवंत' मासिकाच्या सन १९३२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर अंकात प्रकाशित झाली. ती कथा ते लिहीत गेले आणि त्या कथेच्या उत्तरार्धाने प्रतीकांचं रूप धारण केलं. हा उत्तरार्ध म्हणजेच 'चकोर आणि चातक' ही खांडेकरांची पहिली रूपककथा, काही समीक्षक ‘सागरा, अगस्ती आला' कथेस पहिली रूपककथा

मानतात. मी संपादित केलेल्या 'स्वप्न आणि सत्य' या कथासंग्रहात ‘स्वप्नातले स्वप्न' ही मूळ कथा वाचता येईल.

 वि. स. खांडेकर मृत्यूपर्यंत रूपककथा लिहीत राहिले. योगायोगाने त्यांच्या अंतिम रूपककथेचं नाव ही 'मृत्यू'च आहे. आपल्या जीवनकालात खांडेकरांनी सुमारे दोनशे रूपककथा लिहिल्या. 'कलिका’, ‘मृगजळातील कळ्या', 'वनदेवता' आणि मी संपादित केलेल्या 'क्षितिजस्पर्श' मध्ये त्या संग्रहित आहेत. निसर्गातील मानवेतर प्रतीकांच्या माध्यमातून मोजक्या पात्रांद्वारे मानवी जीवन संबंधातील एखाद्या बाबींचा ठसा रूपककथा आपल्या मनावर उमटविते. या कथेत एक ध्वनित अर्थ असतो. कल्पकतेवर ती उभारलेली असते. व्यक्तिगतता हा तिचा आधार असतो. चमत्कृतीपूर्ण शेवट हे रूपककथेचं आगळे वैशिष्ट्य असतं. रूपक अलंकारासारखी ही कथा. म्हणून तिला ‘रूपककथा' म्हणतात. ही कथा नीतिकथा, प्रतीककथा, दृष्टांतकथा, काव्यकथा, गद्यकाव्य म्हणूनही ओळखली जाते.

 वि. स. खांडेकर हे मराठी रूपककथेचे जनक म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना मराठीचा विष्णू शर्मा म्हणून ओळखलं जातं. प्रारंभी त्यांनी खलील जिब्रानच्या रूपककथांचे अनुवाद केले. रवींद्रनाथांच्या अनेक रूपककथांची रूपांतरेही केलीत. मग ते मौलिक रूपककथा लिहू लागले. १९३0 ते १९४0 या दशकातील रूपककथा ‘कलिका' संग्रहात आहेत. या कथा आकाराने छोट्या आहेत. दोन मिनिटात वाचून होणा-या पण दोन वर्षं अस्वस्थ करणा-या या कथा. खांडेकरांच्या रूपककथा परिणामकारक असतात. त्यांचा शेवट मार्मिक असतो. त्या जितक्या रंजक तितक्याच विचारोत्तेजक असतात. ‘छोटा दगड’, ‘तीन कलावंत', ‘स्वप्ने' यांसारख्या या संग्रहातील कथा वाचनीय आहेत. या कथांवर इसाप, विष्णू शर्मा, खलील जिब्रान, रवींद्रनाथ ठाकुर यांच्या कथांचा प्रभाव दिसून येतो.

 ‘मृगजळातील कळ्या' मधील ‘फुले आणि दगड’, ‘दोन पतंग', ‘क्षितिज', 'निसर्ग आणि माणूस', कथा तृणांकुरांप्रमाणे आकर्षक व कलात्मक आहेत. 'वनदेवता' रूपककथासंग्रहात १९५०-६० च्या रचना संकलित आहेत. 'शांती', 'वनदेवता', ‘अनाथ' यांसारख्या श्रेष्ठ कथा अविस्मरणीय आहेत. 'क्षितिजस्पर्श' मधील ‘मृत्यू', 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी', ‘वृद्ध प्राजक्त', 'पाऊस' या कथांमध्ये 'चकोर आणि चातक' चं सौंदर्य भरलेलं आहे.

 खांडेकरांच्या रूपककथांत आत्यंतिक जीवनवाद भरलेला दिसून येतो. ते ‘जीवनासाठी कला' मताचे समर्थक होते. त्याचे प्रत्यंतर रूपककथांतही येते. या कथा अल्पाक्षरी असल्या तरी जीवनाचं त्यांचं भाष्य मोठं गहिरं असतं. एका अर्थाने रूपककथा ही भाष्यकथाच असते. तिच्यात वाचकांशी हळुवार साद घालण्याची शक्ती असते. खांडेकरांनी अनेक गुजगोष्टी लिहिल्या. त्यामुळे वाचकांशी संवाद साधण्याचं मोठं कसब त्यांच्या लेखणीत आढळतं. खांडेकरांच्या रूपककथांत माणसाच्या विसंगतीवर, वर्मावर बोट ठेवण्याची अचूकता दिसून येते. त्यात प्रहाराची आक्रमकता नसते. संवादातील गोडवा व गांभीर्य यांचा सुंदर मिलाफ खांडेकरांच्या रूपककथांत दिसून येतो. शोभादर्शकाप्रमाणे शत-शत बिंबे निर्माण करण्याची कला साधलेल्या खांडेकरांच्या रूपककथा म्हणजे चमत्कृत नृत्य असतं. ती माणसाच्या दांभिकपणाचा बुरखा फाडते तशी माणसाची संवेदनाही रेखांकित करते. तिच्यात एक आश्वासक वृत्ती असते. ती नवे किरण दाखवते. खांडेकरांच्या रूपककथा केवळ मृगजळातील कळ्या असत नाहीत. त्या जीवनाला फुलविणा-या कलिका असतात. जीवनाच्या सोनेरी सावल्या दाखवत त्या जीवनाच्या वेचलेल्या फुलांचे सर्वंकष सौंदर्य घेऊन येतात. वानगीदाखल एक-दोन रूपककथा वाचल्या, ऐकल्याशिवाय त्यांची नजाकत, नाजूकपणा आपल्या लक्षात येणार नाही.

▄ ▄

खांडेकरांचा पत्रसंवाद



 वि. स. खांडेकरांचा नि माझा परिचय सन १९६३ पासूनचा. त्यावेळी त्यांनी आंतरभारती विद्यालय कोल्हापुरात सुरू केलं. त्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक. ते शाळेत येत, व्याख्याने देत, प्रसंगी शिकवतही! नंतर मी त्याच शाळेत शिक्षक झालो नि त्यांचा माझा तिथल्या चळवळीच्या अनुषंगाने संबंध आला. नंतर कधीमधी त्यांची पत्रं लिहायला गेल्याचंही आठवतं! त्यांच्या मृत्यूशी झुंजीच्या काळात मिरजेला केलेल्या फे-याही आठवतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटीलही आपले शेवटचे क्षण मोजत होते... त्यांच्या कॉटच्या शेजारच्या खुर्चीवरील विठोबा-रखुमाईची तसबीरही मी पंढरपूरचा असल्याने अजून लक्षात आहे. (लक्षात असल्याचं आणखी एक कारण, त्यांचं कम्युनिस्ट असून भक्त असणं!) खांडेकर निवर्तले तेव्हा ती बातमी सर्वदूर पसरण्यापूर्वी मी शशिकांत महाडेश्वरांच्या निरोपामुळे त्यांच्या घरी दत्त होतो. अंत्ययात्रेतील महानगरपालिकेच्या सजवलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अंत्येष्टीचा माठ, त्यात चंदन, फुलं, कापूर, पान, सुपारी इ. साहित्य मांडीवर घेऊन बसलो होतो... ही जबाबदारी माझ्यावर प्राचार्य अमरसिंह राणेंनी सोपवली होती. (बहुधा आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून!) जणू मी त्यांच्या जीवनाचा अमृतकुंभच जपत जागवत होतो. पुढे मी एम. ए., पीएच.डी. झालो. मंदाताईंच्या स्नेहामुळे मला त्यांच्या कथा, कादंबरी, रूपककथांचे हिंदी अनुवाद करता आले. नंतर त्यांच्याच प्रेम व विश्वासामुळे मी भाऊंचं अप्रकाशित, असंपादित, असंग्रहित साहित्य मराठी वाचकांना देऊ शकलो... सतरा पुस्तकं झाली. आणखी आठ होतील इतकं साहित्य वि. स. खांडेकरांच्या शोधयात्रेत हाती आलंय... काही मंदाताईंकडून, काही समकालीनांकडून तर काही प्रकाशक,

संपादक, वाचक, स्नेही, नातलग, आप्तेष्ट, संस्था, संघटना, वाचनालयं, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, शासन प्रकाशन विभाग, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, आकाशवाणी, दूरदर्शन, साहित्यिक. ज्यांनी दिलं नाही ते आळशी वाटावे असा सुखद अनुभव। छायाचित्रे, ध्वनिफिती, सीडी, पत्रे, जुने अंक, पुस्तके संदर्भ, फाईल्स, एका लेखकाचा समग्र अभ्यास करून एक संग्रहालय करता येईल असं पूर्वी वाटायचं... शिवाजी विद्यापीठ, खांडेकर कुटुंबीय व अन्य वरील सर्व स्रोतांच्या मदतीतून ते उभारल्यानंतरही रोज माझ्या व्यक्तिगत संदर्भ संग्रहात, साधनात भरच पडते आहे. आता वाटतंय की, वि. स. खांडेकर संशोधन विद्यापीठ उभारता येईल असं त्यांचं भारतीय, वैश्विक रूप आहे... हे कुणाला अतिशयोक्तीचे वाटेल तर तो त्या व्यक्तीच्या मर्यादेचा, कोतेपणाचाच भाग मानता येईल.

 हे सारं आठवायचं कारणही तसं आहे. परवा ‘गमभन' प्रकाशनाचं पत्र आलं. त्यांचे प्रकाशन दरवर्षी मराठी साहित्यकारांची चित्रं असलेलं कॅलेंडर प्रकाशित करतं... आगामी वर्षाच्या कॅलेंडरसाठी वि. स. खांडेकरांवर मी लिहावं अशी त्यांची इच्छा होती... अट होती हजार शब्दांची... अगणित शब्दांचा माणूस हजार शब्दांत सामावणं अशक्य वाटत होतं. एका प्रकाशनासाठी त्यांचं छोटेखानी चरित्र, दुस-या एका प्रकाशनासाठी स्मारक ग्रंथ तयार करत असताना मी अनुभवलं आहे की, वि. स. खांडेकरांचा लोकसंग्रह प्रचंड होता... पत्रव्यवहार अफाट, लेखन अखंड (मध्ये दुस-या महायुद्धाच्या सावट वर्षात प्रकाशन खंड असला तरी लेखन खंड नव्हता!) वक्तृत्व अटकेपार... मी त्यांच्या पटकथांचं संपादन हातावेगळं केलं नि व्यक्तिचित्रे, पत्रे, भाषणे वाचतो आहे. व्यक्तिचित्रं खांडेकरांनी लिहिलेली व खांडेकरांची इतरांनी चितारलेली... पत्रं खांडेकरांनी लिहिलेली व खांडेकरांना इतरांनी लिहिलेली. लेख, समीक्षा खांडेकरांनी लिहिलेल्या व खांडेकरांच्या साहित्यावर इतरांनी लिहिलेले लेख समीक्षा,

 वि. स. खांडेकरांचा पत्रव्यवहार, वि. स. खांडेकरांचे साहित्यिक ऋणानुबंध, संशोधन, पीएच.डी. होऊ शकेल... पण वेळ कुणाला आहे? (सुदैवानं मी नुकताच निवृत्त झाल्यानं मला मात्र नक्की!) वि. स. खांडेकरांचं मोठेपण समजून घेताना मला शेक्सपिअरचं मोठेपण लक्षात येत राहतं... सर विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते की, 'आम्ही एकवेळ आमचं

साम्राज्य बहाल करू पण शेक्सपिअर नाही देणार. वि. स. खांडेकरांचं जीवन व कार्य मला शेक्सपियरपेक्षा तसूभरही कमी नाही वाटत.

 वि. स. खांडेकरांचं मोठेपण त्यांना इतरेजनांनी लिहिलेल्या त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रव्यवहारातून प्रकर्षाने जाणवतं. वाचक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक, स्नेही, राजकारणी (अपवाद) सर्वांची पत्रं त्यांना येत. सा-यांना उत्तरं पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्राला उत्तर पाठवल्याची नोंद ते आलेल्या पत्रावर करीत. त्यावर पाठवलेल्या उत्तराचे मुद्दे टिपून ठेवत. समकालीन साहित्यिक वि. स. खांडेकरांना आपल्या नवप्रकाशित रचना पाठवत. अभिप्राय विचारत. परीक्षणं लिहिण्याची विनंती करीत. मासिकांचे संपादक वि. स. खांडेकरांचे लेखन गृहीत धरूनच विशेषांकाची योजना करीत.
 कथाकार य. गो. जोशी साहित्यिक होते तसे संपादक व प्रकाशकही. त्यांना एक लघुकथा संग्रह संपादित करून प्रकाशित करायचा होता, पण मानधन द्यायची परिस्थिती नव्हती. त्यांनी इतर लेखकांबरोबर वि. स. खांडेकरांना पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, 'माझ्या मनात येत्या दिवाळीत एक लघुकथा संग्रह प्रसिद्ध करावयाचा आहे आणि तो म्हणजे प्रत्येक लघुकथा लेखकाची एक एक त्याची आवडती गोष्ट. अशा चोवीस गोष्टी, म्हणजे चोवीस लेखक... आपणही एक गोष्ट पाठवा. सदर संग्रहाकरिता मी ‘विनामोबदला' गोष्टी मागणार आहे. याचा अर्थ कोणाला काही द्यायचे नाही असा नसून चोवीस लेखकांशी संबंध येणार असल्यामुळे जबाबदारी अंगावर न घेता, मोबदला कबूल न करता पुस्तक विक्री होताच मला शक्य व इष्ट वाटेल तो मी देणार आहे. लेखकाचे श्रम व अपेक्षा मी जाणतो. पण माझ्या परिस्थितीनुरूप मला सावधपणाने वागायला हवे.' वि. स. खांडेकरांनी त्यांना गोष्ट पाठवली होती हे वेगळे सांगायला नको. यातून वि. स. खांडेकर व य. गो. जोशी यांच्यातील जवळीक व जिव्हाद्यळा असा व्यकत होतो तसाच य. गो. जोशी यांची स्थिती, प्रकाशन व्यवसायाची सन १९३४ ची ओढग्रस्तताही स्पष्ट होते.

 सन १९३६ ची गोष्ट. शिरोड्यातील ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकाची नोकरी सोडून खांडेकर हे मास्टर विनायकांच्या 'हंस' पिक्चर्समध्ये कथालेखक म्हणून दाखल झाले होते. 'छाया' या पहिल्या पटकथेचं लेखन सुरू होतं. त्यात वि. स. खांडेकरांना एका प्रसंगात कवी भा. रा. तांबे ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ आणि ‘माझे कोडे' या

कवितेची काही कडवी वापरायची होती. भाऊंनी त्यांना तसं विनंती पत्र लिहिलं. उत्तरात भा. रा. तांब्यांनी लिहिलं होतं, ‘मी या कार्डाने माझी पूर्ण संमती कळवीत आहे. मला वाटते एवढ्याशा गोष्टीसाठी संमती ती कशाला हवी? आपला मजवर एवढाही अधिकार नाही का?' यातून एकाची नम्रता तर दुस-याची उदारता स्पष्ट होते. हंस, प्रफुल्ल, नवयुग, रघुवीर चित्र निकेतन, फेमस फिल्म यासारख्या चित्रपट संस्था व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध कागदपत्रे, पत्रव्यवहार यातून वि. स. खांडेकरांचे मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, आचार्य अत्रे, अमृतलाल नागर, बा. भ. बोरकर प्रभृतींशी व त्यांचे खांडेकरांशी असलेले दृढ संबंध, घनिष्टता स्पष्ट होते.

 त्यावेळी अधिकांश लेखक कार्डावर लिहीत. स्वहस्ताक्षरात अधिकांश लिहीत. पण प्रा. ना. सी. फडके यांचा रुबाब व शिस्त और होती. सहसा छापील लेटरहेडवर लिहीत. पत्रे इंग्रजी असत. स्वाक्षरी इंग्रजी. लेटरपॅडही इंग्रजीत छापलेले असे. प्रा. ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांच्या विचारांत, दृष्टीमध्ये फरक, मतभेद असले तरी व्यक्तिगत जीवनात, पत्रव्यवहारात सख्य होतं. सन १९३७ च्या दरम्यान वि. स. खांडेकर ‘ज्योत्स्ना ' मासिकाचे संपादन करीत. (खरं तर वा. रा. ढवळे ते करीत व वि. स. खांडेकर त्यात नियमित लिहीत.) ऑक्टोबर १९३७ च्या अंकात त्यांनी प्रा. ना. सी. फडके यांच्या साहित्य आणि संसार' बद्दल परीक्षण लिहिलं होतं. ना. सी. फडके यांनी ते वाचून लिहिलं होतं. "I read your review of my book with great interest. Your conteintion that I have acted like an expert lawyer and brought only supporting evidence in the court would apply to anyone making out his case, wouldn't it? What do you do when maintaining the opposite view? Apart from this however your review is very appreiciative and I must sincerely thank you for it." या पत्रातून दोन समकालीनांचे मतभेद एकमेकांचा अनादर न करता ज्या भाषा-संस्कार व सभ्यतेने व्यक्त होतात त्यातून दोघांची ऋजुता स्पष्ट होते. त्यातील प्रा. फडके यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व जसं व्यक्त होतं तसा करारीपणाही. या पत्राच्या शेवटी प्रा. फडके यांनी वि. स. खांडेकरांना दिलेलं चहाचं आमंत्रण केवळ खानदानी सौजन्य व्यक्त करणारं!

 प्रा. ना. सी. फडके, प्रा. माधवराव पटवर्धन (कवी माधव ज्युलियन), प्रा. व्ही. के. गोकाक १९३६-३८ च्या दरम्यान कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकवत. प्रा. फडके तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, प्रा. पटवर्धन फारसी (पर्शियन) तर प्रा. गोकाक इंग्रजी शिकवत. या तिघांचा आणि वि. स. खांडेकरांचा घनिष्ठ संबंध होता. प्रा. गोकाक काही काळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये होते. तेव्हा सांगलीचा समावेश सातारा जिल्ह्यात होता. त्या काळात (१९३८) ते नुकतेच विदेशात दोन वर्षे राहून परतले होते. वि. स. खांडेकरांनी प्रा. गोकाकना नवप्रकाशित ‘दोन ध्रुव कादंबरी व ज्योत्स्ना' मासिकाचा अंक माईणकरांच्या हाती पाठवला होता. कादंबरी वाचून प्रा. गोकाकांसारख्या कवी, समीक्षक, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलं होतं, "I had a mind to write to you and tell you how very much I liked the novel which strove to depict the class struggle in India and the stories that were full of wisdom. But that was not possible then. I took this opportunity to pay an ungrudging tribute to your genius." पुढे योगायोग असा की वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिक दिलं जावं म्हणून आग्रही असणा-यांत प्रा. व्ही. के. गोकाक हे एक होते. त्या वेळी भारतीय ज्ञानपीठाचं मोठं कौतुक झालं. नि प्रा. गोकाकना त्याच वर्षी निवड समितीचा अध्यक्ष बनवलं गेलं. त्यांचे असेच संबंध माधव ज्युलियनांशीही होते. ते आपल्या रचना प्रकाशनापूर्वी वि. स. खांडेकरांना दाखवीत असत. त्यांच्या 'विरहतरंग'च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशनपूर्व संस्करण वि. स. खांडेकरांनी केलं आहे.

 वि. स. खांडेकरांचा नि ग. त्र्यं. माडखोलकरांचा ऋणानुबंध ते न. चि. तथा तात्यासाहेब केळकर यांचे लेखनिक असल्यापासूनचा. वि. स. खांडेकरांची त्यांची मैत्री मतभेदपूर्ण लिखाणातून झाली होती. त्याचं असं झालं की, सन १९१९ च्या जुलैच्या 'नवयुग' मासिकात ग. त्र्यं. माडखोलकरांचा 'केशवसुतांचा संप्रदाय' शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला. त्या माडखोलकरांनी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांची ‘दसरा' कविता म्हणजे केशवसुतांच्या 'तुतारी'चे अधम अनुकरण असल्याचं लिहिलं होतं. खांडेकराच्या ते वाचनात आलं. त्यांना ते पटलं नाही. खांडेकरांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून हा हन्त हन्त' शीर्षक लेख लिहिला. तो नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना विलक्षण आवडला. हे ग. त्र्यं. माडखोलकरांनीच खांडेकरांना कळवलं. पुढे एकदा गडक-यांनी खांडेकरांची ओळख

'कोल्हटकरांच्या गादीचा वारस' म्हणून करून दिली होती. खांडेकरांचे नि माडखोलकरांचे ऋणानुबंध केवळ साहित्यिक नव्हते तर घरगुतीही होते, हे माडखोलकर - खांडेकरांचा अभ्यास करणा-यांच्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. उभयता एकमेकांना जिव्हाळ्यानं लिहीत. एकदा माडखोलकरांनी वि. स. खांडेकरांची खुशाली जाणून घेताना पृष्छा केली होती की, “आपला सर्व गृहस्थिती मला कळावी अशी माझी इच्छा आहे. ‘संविभक्तं हि दुःख' ही उक्ती आपण जाणताच व मला वाटते मी आपला ‘स्निग्धजन' खचित आहे आणि त्यामुळेच हे धाडस केले. " हा काळ १९२१ चा. पुढे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. ते दैनिक ज्ञानप्रकाश, दै. तरुण भारत (नागपूर)चे संपादक झाले. दैनिक केसरीत ते टिळकांच्या मृत्यूनंतर जायचं घाटत होतं. तो मोठा इतिहास आहे. हा स्नेह इतका की दोघं समकालीन जीवन (१९९७ ते १९७६) जगले. (दोघांनाही मराठी साहित्यात ‘भाऊसाहेब' नावानंच संबोधलं जायचं हा आणखी एक योगायोग!) माडखोलकर दोन वर्षांनी लहान इतकाच फरक. १९७२ ला वि. स. खांडेकरांची मुळात अधू दृष्टी पूर्णपणे गेली. ही वार्ता सन १९७२ च्या दिवाळीत माडखोलकरांच्या कानी पडली. बंधुतुल्य माडखोलकर विकल झाले. त्यांनी खांडेकरांना धीर देत लिहिलं होतं, “मोझार्टला (जर्मन संगीतकार) बहिरेपण आणि मिल्टनला (इंग्रजी कवी) आंधळेपण उतारवयात आल्यावरही एकाने आपले संगीतरचनेचे आणि दुस-याने काव्यरचनेचे आपले व्रत अखंड चालू ठेवले होते, हे आपणास माहीत आहेच. मी हा उपदेश म्हणून लिहीत नाही. तो माझा अधिकारही नाही. पण आपला विवेक आणि धीर ही दोन्ही इतकी मोठी आहेत की, त्यांच्या जोरावर आपण शेवटपर्यंत कार्यरत राहाल अशी मला खात्री वाटते." अन् ते खरंही ठरलं. शेवटच्या दिवाळी अंकापर्यंत (१९७५) ते लिहीत राहिले होते.

 वि. स. खांडेकर सर्व नवोदित लेखकांचं आशास्थान अन् स्थिर लेखकांचे प्रेरणा केंद्र होतं. नवं वाचायचं. त्याला अभिप्राय कळवायचा. नवोदितांची संपादक, प्रकाशकांकडे शिफारस करायची. संपादक, प्रकाशकांही ऐकलं तर पदरमोड करून अशांचं लेखन प्रकाशित करायचं हा उमदेपणा खांडेकरच करू जाणे. त्यामुळे नवलेखक, कवी, नाटककारांची नित्य उठबस, भेटणं, पत्रं नित्याची गोष्ट होती. या नवोदितांना वि. स. खांडेकर कल्पतरूपेक्षा कमी नसायचे. हे कवी समीक्षक शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. ते इंदूरला राहात. वय विशीतलं. मराठी भाषा पण राहणं

मध्यप्रदेशात. मातृभाषेची विलक्षण ओढ. हिंदी, मराठीत दोन्हीत लिहीत. पण मराठीत कथा, कविता लिहूनही प्रकाशित होत नाही, हे पाहून त्यांनी एकदा खांडेकरांना लिहिलं, “नाही तर महाराष्ट्राच्या थंडगार उपेक्षेशी परत एकदा टक्कर देण्याची ताकद कुठं माझ्यात होती? मी माझ्या या दोन कृती (वाळवंटातील कळ्या आणि याचक या त्या कथा) घेऊन परत एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून महाराष्ट्रासमोर यायचा प्रयत्न करीत आहे. आपण जर त्याचे चीज करून ‘ज्योत्स्नेत स्थान दिलेत तरच मी मराठीत पुढे लिहीन. तसे न झाल्यास मला परत हिंदीच्या तोंडाकडे पाहावे लागेल. " पण तशी वेळ मुक्तिबोधांवरच का कुसुमाग्रज, चिं. त्र्यं. खानोलकर, रणजित देसाई प्रभृती साहित्यिकांवर आली नाही. याचे श्रेय खांडेकरांच्या साहाय्यकारी स्वभावासच द्यावे लागेल.

 अनेक साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ते वि. स. खांडेकरांच्या पासंगामुळे. ही परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिसून येते. कुणाचे सूचक, कुणाचे अनुमोदक, कुणाचे प्रसारक, कुणाचे समर्थक तर कधी तटस्थ अशा अनेक भूमिका खांडेकरांनी पार पाडल्या, हे या संमेलनांच्या इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते. तीच गोष्ट नाट्यसंमेलनांची. पण एका अर्थाने वि. स. खांडेकरांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं. त्यांनी पिढ्या घडवण्याचं कार्य केलं. 'देवाचे देवाला आणि सीझरचे सीझरला' या म्हणीनुसार विवेकानं व्यवहार केला. मतभेदाचे प्रसंग आले तरी सभ्यता सोडली नाही, पण आपल्या मतप्रदर्शनात कचखाऊपणाही दाखवला नाही. आचार्य अत्रे यांच्याशी 'ललित' मधील झटापट असो की लघुनिबंधाचे जनक कोण? याची डॉ. आनंद यादव यांनी छेडलेली चर्चा असो, साच्यात ज्याचं माप त्याच्या पदरात टाकण्याचा त्यांचा विवेक महाराष्ट्र सारस्वत विसरू शकणार नाही. वि. स. खांडेकर हे करू शकले, कारण त्यांच्यातला समाजशिक्षक नेहमी जागा असायचा.

 चित्रकार धनंजय कीर यांची सन १९६३ च्या दरम्यान दृष्टी अधू झाली नि त्यांचे लेखन मंदावलं. (खरं तर संपलं!) खायची भ्रांत होती. हे वृत्तपत्रात आलं तसं वि. स. खांडेकर अस्वस्थ झाले. त्यांनी कीर याना पत्रांवर पत्रं लिहिली. त्यांचे एक उत्तर नाही, म्हणून त्यांचे स्नेही रमेश शिंदे यांना वि. स. खांडेकरांनी शोधून काढलं. त्यांच्याकरवी प्रयत्न केले, पण कीर काही बधले नाहीत. समदुःखी असल्याने (दृष्टिमांद्य) खांडेकरांची अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती. कीर यांच्या बाजूनं नकाराचं, उपेक्षेचं

कारणही सबळ होते. यशवंतराव चव्हाण त्या वेळी मुख्यमंत्री होते. आचार्य अत्रेंंनी त्यांच्या हे कानावर घातलेलं. निवेदन द्या म्हटल्यावर ते दिल्याचं अत्रे सांगत... पण काही घडलं नव्हतं... परत हात दाखवून अवलक्षण कशाला असं धनंजय कीर यांना वाटायचं... खांडेकरांची तगमग, तळमळ पाहून एकदा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली (याच वेळी पटवर्धन बुवा, अनंतराव गद्रे प्रभृतींची अशीच परवड चाललेली.) "मी डोळ्याने अपंग, अधू झालो हे खरे, परंतु सरकारकडे मी याचना करावयास जाणार नाही. माझ्या मनास ते मानवत नाही. अर्ज करणे म्हणजेच याचना करणे. मी जे कार्य केले त्याविषयी सरकारला काही गुणग्राहकता वाटत असेल तर सरकारने त्याची दखल घ्यावी... माझे कार्य मी कोणत्या स्वार्थी हेतूने केले नाही... ‘भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे' हे अगदी सत्य आहे. डोळे उघडे आहेत, तोपर्यंत मी घेतलेले कार्य तडीस नेऊन स्वाभिमानाने जगण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन." नंतर वि. स. खांडेकरांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्वतः घरी जाऊन त्यांना अर्थसहाय्य दिले होते... कीर बहुधा त्या वेळी रत्नागिरी मुक्कामी आपल्या आप्तांकडे होते असे आठवते.

 विदुषी इरावतीबाई कर्वे, समाजसेविका नि स्त्री जीवनाची नवी क्षितिजे'च्या लेखिका सौ. कमलाबाई टिळक, मालतीबाई किर्लोस्कर, कथाकार सुशीला पगारिया- अनेकजणी भाऊंना लिहीत. भाऊही उत्तरं पाठवत. विद्यार्थिनी वाचकांची पत्रे, संवाद, भेटणं ही असायचं. भाऊ वडिलकीच्या नात्याने सर्वांना लिहीत, बोलत, भेटत. त्यांच्या साहित्यातील स्त्री पात्रे, त्यांच्या अष्टनायिका मानसकन्याच होत्या. स्त्रीजीवन सुधारावं, त्यांनी शिकावं, नुसतं शिक्षित न होता सुशिक्षित व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यांची अपूर्ण कादंबरी ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली' हिंदीत पूर्ण करताना आणि तशीच अपूर्ण कादंबरी ‘नवी स्त्री' मराठीत संपादित करताना वि. स. खांडेकरांचा जो पुरोगामी दृष्टिकोन प्रत्ययास आला त्यातून ते ‘वंचितांचे वाली' म्हणून समोर येतात. हीच गोष्ट दलितांविषयी. ‘ध्वज फडकत ठेवू या' मध्येही प्रत्ययास येते.

 कथाकार जी. ए. कुलकर्णी, व्यवहाराने सार्वजनिक नव्हते, पण त्यांचा पत्रव्यवहार चोखंदळांशी नित्य असायचा, हे त्यांच्या प्रकाशित पत्रसंग्रहांवरून (जी. ए. ची निवडक पत्रे खंड १, २, ३, ४) स्पष्ट होते. जी. स. स्वतःहून फार कमी लोकांना लिहीत. त्यात आत्मश्लाघा अपवादानेच दिसून येते;

पण याला अपवाद होता वि. स. खांडेकरांचा. जी. ए.च्या ‘काजळमाया' कथांसग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभल्यावर त्यांनी स्वतःहून त्याबद्दल जर कुणाला लिहिलं असेल तर ते होते वि. स. खांडेकर. जी. एं.नी जयवंत दळवी यांना एकदा केवळ खांडेकरांवर पत्र लिहिलं होतं. जी. एं.च्या पत्रांच्या तिस-या खंडात ते समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यातूनही जी. ए.च्या मनात असलेली वि. स. खांडेकरांविषयीची 'श्रद्धा' स्पष्ट होते. खांडेकरांच्या साहित्याबद्दल, जी. एं.चे मतभेद होते पण 'माणूस' म्हणून त्याचे आतडे पायात घुटमळायचेच.

 जी. ए.सारखंच प्रा. नरहर कुरुंदकरांचं. समीक्षक म्हणून धाक असलेला व आपल्या प्रखर विचारांनी महाराष्ट्रास अंतर्मुख करणारा हा वक्ता वि. स. खांडेकरांपुढे मात्र नतमस्तक असायचा. वासुदेवशास्त्री खरे यांनी स्थापन केलेल्या मिरजेच्या वाचनालयाची व्याख्यानमाला बरीच जुनी आहे. वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचे असल्याने खरे शास्त्री, नाटककार देवल प्रभृतींचा प्रभाव खांडेकरांवर होता. त्या व्याख्यानमालेस प्रा. कुरुंदकरांनी जावं म्हणून त्यांना खांडेकरांनी आग्रह केला होता. तो स्वीकारणारं एक छोटं पत्र प्रा. कुरुंदकरांनी वि. स. खांडेकरांना लिहिलं होतं. त्यात खुशालीची विचारपूस होती. शेवटी लिहिलं होतं, “दीर्घकाळ विविध प्रकारची राष्ट्राची सेवा करून झाल्यानंतर आपण आता अवभृत स्नानास मोकळे झालेले आहात. इतकाच साच्या घटनांचा मी अर्थ लावतो. या वातावरणात आपले आत्मवृत्त पूर्ण झाले तर मग बाहेरचा अंधारही आतल्या प्रकाशासमोर नमला असे मग म्हणावे लागेल."

 वि. स. खांडेकर संपादक, प्रकाशकांना वारंवार लिहीत. संपादकांना सल्ला देत. संपादक तो शिरोधार्य मानत. किर्लोस्कर मासिकाने स्त्री, दलितादी वंचितांची तळी उचलायचं धोरण जाहीर केलं होतं ते खांडेकरांच्या प्रेम नि प्रभावामुळेच. खांडेकरांचा नि किर्लोस्कर कुटुंबाचा संबंध जुना. ‘किर्लोस्कर पूर्वी त्याचं रूप ‘किर्लोस्कर खबर' होतं. प्रामुख्यानं ते जाहिरात पत्रक होतं. त्यातही खांडेकर लिहायचे. किर्लोस्कर'नी आपल्या मासिकात व्यंगचित्र प्रकाशनास प्रारंभ केला तेव्हा वि. स. खांडेकरांनी व्यंगचित्राचे अनेक विषय ‘किर्लोस्कर'ला सुचविले होते. खांडेकरांच्या अनेक लेखांना ‘किर्लोस्कर'ने व्यंगचित्रांनी सजवल्याचं दिसून येतं. खांडेकर अत्यल्प मानधन घेऊन 'किर्लोस्कर'साठी लिहीत राहिले ते कौटुंब्कि संबंधांमुळेच.

 वि. स. खांडेकर आणि समकालीन वाचक, साहित्यिक, संपादक,

चित्रपट सृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ असा विपुल पत्रव्यवहार अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. तो एकत्र करून त्याची वर्गवारी विषय, आशय, शैली, पत्रपद्धती, पत्रस्वरूप, मायने, प्रशस्ती, हस्ताक्षर इ. अंगाने करून त्यातून वि. स. खांडेकरांचा पुनर्णोध शक्य आहे. या व्यापातून दिसणारे खांडेकर म्हणजे माणूसपणाचं मोहोळ होय. लोकाभिमुख होणं ही खांडेकरांची उपतज वृत्ती होती. तो त्यांचा स्वभाव होता. प्रारंभी मित्रांनी गोष्टी सांगणं, नंतर लेखन, भाषण, पत्र लिहिणं, आल्या-गेल्यांशी बोलत राहणं यातून ते स्पष्ट होतं. संपर्कात आलेल्या प्रत्येकास खांडेकर आपले वाटत. याचं रहस्य त्यांच्या संवाद शैली व कौशल्यात आहे. लहान-मोठा असा भेद त्यांनी संवादात कधी केला नाही. प्रत्येकास आपल्या मनातलं सांगून निश्चित होण्याचे ठिकाण होते खांडेकर! त्यांचं हे रूप चर्चच्या त्या पाद्रयाप्रमाणे असायचं. जो तो येऊन आपला कबुलीजबाब देऊन मोकळा व्हायचा. हे केवळ वयाचं मोठेपण नव्हतं. त्यात प्रतिभेचा चमत्कार, विचार वैभव, भाषासौंदर्य व सर्वांत महत्त्वाचे आत्मीयता होती.

 आत्मीय खांडेकर कुणाच्या श्रद्धेचा तर कुणाच्या असूयेचा भाग ठरले. पण खांडेकरांनी त्याचा विचार न करता आपलं मैत्र जपलं. हे मैत्र बाबा आमटे, बाबा मोहोड, विनोबांशी होतं; तसंच डॉ. श्रीराम लागू, वसंत कानेटकर, रणजित देसाई यांच्यासाठीही होतं. नाटक आणि खांडेकर, सिनेमा आणि खांडेकर, समाजसेवक आणि खांडेकर असेही पत्रव्यवहाराच्या अभ्यासाचे विषय होऊ शकतील. वा. रा. ढवळे, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, ग. पां. परचुरे, द. ना. मोघे, अनंत हरी गद्रे, नामदेवराव व्हटकर यांच्यासारखे प्रकाशक असोत वा किर्लोस्कर, मित्र, विरकुड, यदुनाथ थत्ते यांच्यासारखे संपादक असोत, सर्वांशी वि. स. खांडेकरांचा पत्र संवाद असायचा. वाचकांशी संवाद हे खांडेकरांचे आगळे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. चिमुरड्या वाचकासही ते लिहीत. त्यात मराठी, गुजराती, बंगाली भाषिकांचा समावेश असायचा. कोण सहमत तर कोण असहमत. असहमतांशीही सख्यपूर्ण संवादात खांडेकरांचं मोठेपण सामावलेलं दिसतं. खांडेकर कुणास सविस्तर तर कुणास त्रोटक लिहीत, पण आलेल्या प्रत्येक पत्रास उत्तर धाडायचा त्यांचा प्रयत्न असायचा. स्वतःहून लिहिण्याचीही त्यांना सवय होती. विशेषतः नवोदितांना त्यांचे लेखन वाचून प्रशस्ती कळवायची सवय केवळ अनुकरणीय होती. वि. स. खांडेकरांनी मराठी माणसाच्या मनात जे आदराचं सीन निर्माण केलं होतं, ते केवळ साहित्यातून नाही तर पत्र, मैत्री,

पत्रसंवाद हेही त्याचं मोठं कारण होतं असं अभ्यास करताना लक्षात येतं. सन १९२० ते १९७६ असा ५६ वर्षांचा खांडेकरांचा पत्रप्रपंच म्हणजे त्या काळची माणसे व मने यांचं विशुद्ध प्रतिबिंबच.

 त्यात एकविसाव्या शतकातील वाचकांनी स्वतः न्याहाळायला हवं. आजच्या असंवाद स्थितीची कोंडी कदाचित त्यातून फुटेल आणि नव्या युगाचा नवा संवाद सुरू होईल, माध्यम कदाचित वेगळे असू शकेल.

▄ ▄

वि. स. खांडेकर : समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत



 मराठीस भारतीय ज्ञानपीठाचा पहिला सन्मान मिळवून देणाच्या वि. स. खांडेकरांचे २ सप्टेंबर १९७६ ला मिरज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनास यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अर्थाने आगामी वर्ष (२००१-२००२) हे खांडेकरांचे ‘रजत स्मृती वर्ष' १९९८९९ मध्ये देशभर त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. हा अपवाद वगळता गेल्या पंचवीस वर्षांत मराठी वाचकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी खांडेकरांना विस्मृतीच्या गर्तेत ढकलल्याचे जाणवले. प्रेमचंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने (१९८०-८१) उत्तर प्रदेश' या हिंदी नियतकालिकात डॉ. प्रभाकर माचवे यांचा एक तुलनात्मक लेख वाचल्यानंतर मला जाणवले की, प्रेमचंदांपेक्षा कितीतरी विपुल नि वैविध्यपूर्ण लेखन करणारे खांडेकर मूल्यांकनाच्या- समग्र मूल्यांकनाच्या पातळीवर उपेक्षितच राहिले. एके दिवशी माझ्या हाती जया दंडकरांची ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची अचानक लागली आणि लक्षात आले की, खांडेकरांच्या बाबतीत मराठी वाचकांची, अभ्यासकांची, संशोधकांची स्थिती दिव्याखाली अंधार अशीच आहे. खांडेकरांबद्दल आपली आजवरची धारणा, मतमतांतरे, मूल्यांकन हे प्रकाशित व संकलित रूपात समोर आलेल्या त्यांच्या साहित्याच्या आधारावर आहे. खांडेकरांच्या जीवनाचे व साहित्याचे असे अनेक पैलू आहेत की, ज्यांना मराठी अभ्यासकांनी, संशोधकांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही.

 ‘कथासम्राट' म्हणून खांडेकर मराठी वाचकांना परिचित आहेत. सुमारे साडेतीनशे कथा आपल्या तीस मौलिक संग्रहांतून मराठी वाचकांना देणाच्या खांडेकरांची पहिली कथा ‘घर कोणाचे ?' अद्याप असंकलित आहे. खांडेकरांच्या कथा नि घर यांचे अतूट नाते आहे. पहिल्या कथेप्रमाणेच

त्यांच्या अंतिम कथेचे नावही 'घर'च. त्यांच्या अनेक कथांत घर येते. त्याचा 'संबंध' त्यांच्या व्यक्तिगत घटनांशी आहे. त्याचा अभ्यास व्हावयास हवा. त्यांच्या पन्नासावर कथा अद्याप असंकलित आहेत. त्यांत 'चकोर आणि चातक' या रूपककथेचा मूळ मसुदा असलेली स्वप्नातले स्वप्न कथाही असंकलित आहे. ही मूळ कथा वाचल्यावर लक्षात येईल की, खांडेकरांच्या कलात्मक नि काव्यात्मक रूपककथांमागे सामाजिक संदर्भ असायचे. 'चकोर आणि चातक' कथेच्या निर्मितीमागे १९३०-३२ च्या दरम्यानचे हिंदू-मुसलमान दंगे कारणीभूत होते, हे किती जण जाणतात?
 ‘सागरा, अगस्ती आला' या कथेने खांडेकरांनी १९३१ मध्ये रूपककथा लेखनास प्रारंभ केला. मृत्यूपर्यंत ते रूपककथा लिहीत राहिले. १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अखेरच्या रूपककथेचे नाव योगायोगाने ‘मृत्यूच होते. खांडेकर रूपककथांना छोटा हस्तिदंती ताजमहाल मानत. ताजमहालातील कलात्मकता व त्याच्या निर्मितीमागील भावकाव्य यांचा सुरेश संगम म्हणजे रूपककथा. आजवरच्या प्रकाशित चार रूपककथासंग्रहांतून त्यांनी सुमारे दीडशे छोटे-छोटे ताजमहाल मराठी वाचकांना दाखविले. अद्याप त्यांचे असे पन्नास एक ताजमहाल विखुरलेले आहेत. ते जमवून, जोडून आपल्यासमोर येतील, तर मराठी रूपककथेच्या शहेनशहाचे एक आगळे वैभव अनुभवता येईल. खांडेकरांनी अजाणतेपणी रूपककथालेखनास प्रारंभ केला खरा; पण जाणतेपणी जाणीवपूर्वक त्यांनी हा कथाप्रकार जोपासला, फुलवला. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, रवींद्रनाथ ठागोर, स्टीफन झ्वाइग, चेकॉफ, ख्रिश्चन जेलर्ट, ला फॉन्टेन, सोलोगब, चॉसर स्पेंसर, जॉन बन्यनसारख्या जगप्रसिद्ध रूपककथाकारांच्या मुशीत तयार झालेले खांडेकरांचे हे कथाशिल्प वैश्विक कथेचे क्षितिज स्पर्शिण्याची ताकद व ईर्षा घेऊन येते. याचे खरे मूल्यांकन कोणी केले आहे?

 कथात्मक साहित्याइतकेच खांडेकर गंभीरपणे वैचारिक, साहित्यिक लेख लिहीत. त्यांचे किती तरी लघुनिबंध, वैचारिक लेख, साहित्यिक निबंध अहिल्येच्या शिळेप्रमाणे उपेक्षित नि अस्पर्श आहेत. ते ‘अभ्यासकरामा'ची प्रतीक्षा करीत आहेत. अशा निबंधांची-लेखांची संख्या सव्वाशेच्या घरात आहे. महात्मा गांधी, विनोबांसारख्या विभूतींवरील त्यांचे लेख म्हणजे प्रगल्भ विचारधनच. खांडेकर श्रेष्ठ लेखक होते तसे ज्येष्ठ समीक्षक नि प्रस्तावनाकार खांडेकर म्हणून त्यांचे मूल्यांकन व्हावयास हवे. खांडेकरांनी स्वतःच्या शंभर पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांतून साहित्यकार खांडेकर

कसे दिसतात, भावतात, उमगतात हे अभ्यासणे विलोभनीय ठरावे. कविवर्य कुसुमाग्रजांनी, त्यांच्या निवडक प्रस्तावनांचा संपादित केलेला एक संग्रह ‘विचारधारा' प्रकाशित झाला आहे. त्याला कुसुमाग्रजांनी लिहिलेली प्रस्तावना वाचताना हे प्रकर्षाने लक्षात येते. खांडेकरांनी स्वतःच्या साहित्याबद्दल लिहिलेले लेख मराठी सारस्वताचा अमूल्य ठेवा होय. लेखक जेव्हा स्वतःच्या साहित्याबद्दल लिहितो, तेव्हा त्यास दस्तुरखुद्द बळ येते. त्यातून अनेक शंकांचे समाधान जसे होते, तसे साहित्यकृतीच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलही विस्ताराने उकल होण्यास मदत होते. अशा लेखांच्या संकलनातून आजवरच्या खांडेकरांच्या साहित्य मूल्यांकनास नवा छेद, नवे परिमाण लाभण्याची शक्यता आहे.

 ‘ते दिवस, ती माणसे' सारख्या पुस्तकामुळे खांडेकर शब्दचित्रकार होते, हे लक्षात येते. व्यक्तिचित्रणात खांडेकरांची शब्दकळा अशी फुलो-यात येते की, कोणती वेचावी नि कोणती नाही असे होऊन जाते. 'ते दिवस, ती माणसे' मधील व्यक्तिरेखांना नाही म्हटला तरी व्यक्तिगत गडगा (कुंपण) आहे. खांडेकरांनी सुमारे पन्नासएक व्यक्तिचित्रात्मक लेख वेगवेगळ्या निमित्ताने लिहिले आहेत की, ज्यामुळे खांडेकरांचा मनुष्यसंग्रह लक्षात येतो. तद्वतच माणसांकडे पाहण्याची त्यांची निकोप, अनुकरणीय वृत्ती प्रत्ययास येते. शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, राजनीतिक, साहित्यिक क्षेत्रांतील व्यक्तींवर लिहिलेले त्यांचे गौरवलेख मराठीतील कसबी शब्दचित्रकार सिद्ध करतील. यांचा संकलित स्वरूपात अभ्यास झाल्यास महाराष्ट्रातील समाज, साहित्य, विकासावरही प्रकाश पडू शकेल.

 खांडेकरांचे लेखन विनोदी शैलीने सुरू झाले, हे फार कमी लोक जाणत असावेत. त्यांचे प्रारंभिक लेखन कोटीबाज होते. गडक-यांच्या प्रभावाची ती परिणती होती. प्रारंभीच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी'च्या धर्तीवर क्रमशः अठरा अध्यायांत चक्क 'गाढवाची गीता' लिहिली होती. ती १९२४-२५ मध्ये ‘वैनतेय' साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. नाट्यछटेच्या शैलीत लिहिलेली ही आगळी गीता खांडेकरांचे एक नवे रूप दाखविते. ‘श्रीमत्कलिपुराण'च्या तीन अध्यायांतून खांडेकरांची विनोदी वृत्ती समजायला मदत होते. 'गाढवापुढे गीता’, ‘गाजराची पुंगी', ‘समुद्रमंथनातील रत्न' असे कितीतरी विनोदी लेखांचे भांडार ‘खुल जा सिमसिम' म्हणणाच्या अल्लाउद्दीनच्या प्रतीक्षेत आहेत. 'ययाति' सारखे शिवधनुष्य पेलणारा हा शब्दकार गंभीर तसेच गमतीदार लेखन करण्यातही तितकाच पारंगत होता.

हे अनुभवले की, या साहित्यकाराच्या लीलाकारी व्यक्तिमत्त्वाचा अचंबा वाटल्यावाचून राहात नाही.

 वरील मौलिक साहित्याव्यतिरिक्त खांडेकरांची व्याख्याने, मुलाखती, स्तंभलेखन, पत्रकारिता, संपादन, अग्रलेख, पटकथा, चित्रपट गीते, खांडेकरांवर लिहिलेले मान्यवरांचे लेख, खांडेकर साहित्यावरील समीक्षात्मक लेख, प्रबंध अशा दस्तऐवजांचा अक्षरशः डोंगर माझ्या डोळ्यांपुढे आहे. त्याला उचलावयास आधुनिक हनुमान जन्मावयास हवा. यातून उभे राहणारे खांडेकरांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व आजवरच्या त्यांच्या चिरपरिचित व्यक्तिमत्त्वास छेद देऊन नवे रूप सादर करील, असा विश्वास वाटतो.

 असंकलित खांडेकर संकलित करून वाचून, संपादित स्वरूपात मराठी वाचकांपुढे सादर करण्याचा संकल्प खांडेकरांच्या जन्मशताब्दी वर्षात मी मनातल्या मनात केला होता. महाराष्ट्रभर फिरून मी छापील तीन हजार पाने होतील इतका अद्याप असंकलित राहिलेला मजकूर जमा केला, वाचला. त्यातून मला समजलेले खांडेकर तुम्हाला चिरपरिचित असलेल्या खांडेकरांपेक्षा खचितच वेगळे आहेत. तुम्ही आजवर एक अष्टमांश हिमनगच पाहात आला आहात. मी थोडी खोल डुबकी मारली. मला उर्वरित सात अष्टमांश दडलेला, डुबलेला हिमनगही दिसला. त्याचे ते अद्याप अदृश्य रूप तुम्हाला एकदा दाखवायचे आहे ते दाखविता आले, तर न वाचलेले, न अभ्यासलेले, न दिसलेले खांडेकर तुम्हालाही गवसतील. त्यातून खांडेकरांची ‘पूर्ण तुला' साकारेल. खांडेकरांचे समग्र मूल्यांकन शक्य होईल. अनेक वर्षांपासून मूल्यांकनाच्या प्रतीक्षेतील खांडेकर भरून पावतील, असा विश्वास आहे. तसे झाल्यास मराठी सारस्वतातील ती ‘सुवर्णतुला' ठरेल.

▄ ▄

वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : एक दृष्टिक्षेप


 जो माणूस इंग्लंडला जाऊन येतो त्याला विचारलं जातं की तुम्ही ‘शेक्सपियरचं जन्मस्थळ' पाहिलं का? एखादा रशियास जाऊन आला तर त्याला आवर्जून विचारलं जातं की, तुम्ही यासना पोल्यानाचं ‘टॉलस्टॉय तपोवन' पाहिलंत का? आपल्याकडे जो माणूस कोलकत्त्याला जाऊन येतो तो रवींद्रनाथ टागोरांचं ‘शांतीनिकेतन' हटकून पाहतोच पाहतो. तसं आता तुम्ही कोल्हापूरला जाऊन याल तर लोक विचारतील, “तुम्ही शिवाजी विद्यापीठातील ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय' पाहिलंत का?" कोल्हापूरच्या सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशावर लवकरच हे संग्रहालय आपली अनिवार्य मोहर उठवेल. अशा शिक्कामोर्तबाला आता ते सज्ज झालंय!

 वि. स. खांडेकरांचं कोल्हापूरशी जसं अद्वैत होतं तसं ते शिवाजी विद्यापीठाशीही होतं. खांडेकर १९३८ मध्ये कोल्हापूरला चित्रपट कथालेखनासाठी आले. मास्टर विनायकांनी आपल्या हंस पिक्चर्ससाठी त्यांना कोल्हापुरात आणलं. रोज फिरायला जायचा खांडेकरांचा शिरस्ता असायचा. शिरोड्यात असताना हा ‘साहित्य अगस्ती' रोज सुरुची बाग, समुद्रकिनारे पालथे घालायचा. तोच क्रम कोल्हापुरात आले तरी त्यांनी चालू ठेवला. जीवनाच्या उत्तरायणात त्यांचा मुक्काम कोल्हापुरातील राजारामपुरी या तत्कालीन नव्या उपनगरात होता. तेव्हा ते रोज टेंबलाई टेकडी, सागरमाळ, काटकर माळ येथे फिरायला जात. या भटकंतीत त्यांना बा. भ. बोरकर, विजया राजाध्यक्ष, ग. दि. माडगूळकर, रणजित देसाई, रा. वा. शेवडे (गुरुजी) प्रभृती साहित्यिकारांची संगत लाभायची.

 शिवाजी विद्यापीठास जागा निवडायचा प्रश्न आला तेव्हा यशवंतराव

चव्हाण प्राचार्य सी. रा. तावडे, डॉ. आप्पासाहेब पवार प्रभृतींनी ज्या माळाची निवड केली त्या मागे तो भाऊंच्या वि. स. खांडेकरांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचाही एक भाग होता. आज जिथं कुलगुरूंचा बंगला विसावलाय ती टेकडी हे वि. स. खांडेकरांचं फिरायला गेल्यावर बसायचं ठिकाण. तेथून सारं कोल्हापूर नजरेत भरायचं.

 वि. स. खांडेकरांचे नि शिवाजी विद्यापीठाचे ऋणानुबंध तसे जुनेच. काळाच्या ओघात ते दृढमूल होत गेले. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या रूपानं आता या संबंधांना अमरत्व प्राप्त होईल. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन राज्यपालांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर ज्या सन्माननीय सदस्यांची नियुक्ती केली होती त्यात वि. स. खांडेकरांचा समावेश होता. वि. स. खांडेकर शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात होते. साहित्य अकादमीनं वि. स. खांडेकरांना आपलं महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केलं. (१९७0) समर्पण समारंभास प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीला जाणं खांडेकरांना शक्य नव्हतं. समारंभ कोल्हापूरला करायचा ठरल्यानंतर शिवाजी विद्यापीठानं त्याचं यजमानपद स्वेच्छेने स्वीकारलं.

 सन १९७६ ला वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. मराठीला हा सन्मान मिळवून देणारे पहिले साहित्यिक म्हणून शिवाजी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवी बहाल करून गौरविलं. पुढे शिवाजी विद्यापीठाने सन १९९८-९९ साली वि. स. खांडेकरांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी केली. जन्मशताब्दी वर्षात त्यांचं स्मृति तिकीट प्रकाशित व्हावं म्हणून पुढाकार घेतला नि त्यात यश आलं. नाशिकयेथे कविवर्य कुसुमाग्रह, नाटककार वसंत कानेटकर व खांडेकरांचे अनुवादक मो. ग. तपस्वी यांच्या हस्ते तर कोल्हापूरला कुलगुरू द. ना. धनागरे यांच्या हस्ते तिकीट प्रकाशित झाले. सन २००१ ला वि. स. खांडेकर रजत स्मृती महोत्सव झाला. शिवाजी विद्यापीठाने ‘वि. स. खांडेकर भाषाभवन नामकरण करून भाषाभवन सक्रिय केलं. या भवनाची उभारणी करताना तिथं वि. स. खांडेकर संग्रहालय व्हावं, अशी कुलगुरू द. ना. धनागरे यांची कल्पना होती. उत्तराधिकारी कुलगुरू डॉ. मु. ग. ताकवले यांनी याचा पाठपुरावा केला. प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी तरतूद व साधन संग्रहास प्रारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला, तरी प्रत्यक्ष संग्रहालयाची उभारणी व निर्मिती वर्तमान कुलगुरू डॉ. माणिकराव साळुखे यांच्या खांडेकर श्रद्धेमुळेच

झाली. वि. स. खांडेकरांची ज्येष्ठ कन्या श्रीमती मंदाकिनी खांडेकर यांनी संग्रहालयास वि. स. खांडेकरांचे सन्मान देऊ केले आहेत. ‘पद्मभूषण सन्मानपत्र', 'अश्रू' हस्तलिखित इत्यादी वस्तू प्रत्यक्षात प्रदानही केल्यात.

 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संकल्पना, संशोधन व संग्रहांचं श्रेय जरी मला दिलं जात असलं, तरी हे सामुहिक प्रयत्नातून साकारलंय हे मला नम्रपणे नोंदवावंसं वाटतं. रचना व देखरेख वास्तुशिल्पी विजय गजबर यांनी केली. संग्रहालयाचा प्रकल्प अहवाल व मांडणी संग्रहालय तज्ज्ञ प. ना. पोतदारांची. संकल्पचित्र साकारलंय तरुण शिल्पकार संजीव संकपाळांनी. अर्धपुतळ्याची पुनर्निर्मिती प्रभाकर डोंगरसानेंची. संग्रहालय निर्मितीचं श्रेय मनोहर सुतारांचं. साधन संग्रहात जया दडकर, शशिकांत किणीकर, अशोक शेवडे, आकाशवाणी पुणे, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, शिरोडकर कुटुंबीय, ट्यूटोरियल हायस्कूल, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, आर. आर. शेठ आणि कंपनी, अहमदाबाद, सदानंद कदम, जीवन किर्लोस्कर संग्रह, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर, मुंबई, पुणे-कोल्हापूर महानगरपालिका, मुकुंदराव किर्लोस्कर, दै. पुढारी, वि. वि. चिपळूणकर, प्रा. ग. प्र. प्रधान, दत्ता धर्माधिकारी प्रभृतींचं मोलाचे सहकार्य लाभलं. शिवाजी विद्यापीठाने इमारतीशिवाय दहा लक्ष रुपयांचा निधी दिला.

 महाराष्ट्रात यापूर्वी मालगुंड (जि. रत्नागिरी) इथं केशवसुत स्मारक साकारलंय तर अलीकडे नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानने तात्यासाहेबांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय हे देशातलं साहित्यकाराचं श्रेष्ठ स्मृती संग्रहालय असल्याचा निर्वाळा सुविख्यात साहित्यकार व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी नुकताच दिला. हा निर्वाळा निखळ नि निरपेक्ष असल्याचा प्रत्यय आपणास संग्रहालय पाहताना येतो.

 संग्रहालयाच्या प्रथमदर्शनी ‘अक्षरवृक्ष' कोरण्यात आला असून त्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला वि. स. खांडेकरांचा सुबक अर्धपुतळा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. मग आपण येतो संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी. प्रवेशद्वाराची कल्पना मोठी विलोभनीय आहे! हे प्रवेशद्वार म्हणजे पुस्तकांचं फडताळ, (शेल्फ) कपाट आहे.

 ‘उःशाप', 'ययाति', ‘हृदयाची हाक' सारख्या कादंब-यांच्या, पुस्तकांच्या विशाल प्रतिकृतींनी साकारलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही कडेला लावलेल्या आरशांमुळे आपण शेकडो पुस्तकांच्या दालनात प्रवेश करतो आहोत, अशा

अनुभवाने, भासाने प्रेक्षक रोमांचित होतो. मग आपल्यासमोर येतं ते वि. स. खांडेकरांच्या समग्र जीवन व साहित्याचे संकल्पचित्र. अत्यंत आखीव, रेखीव असलेलं हे संकल्पचित्र त्याच्या तांबड्या मातीच्या रंगांनी आपणास कोकणात नेतं. मग हळूहळू उलगडू लागतो वि. स. खांडेकरांचा जीवनपट. मोरपंखी वंशवृक्ष. गणेश आत्माराम खांडेकर' दत्तकाने ‘विष्णू सखाराम खांडेकर' कसे झाले ते समजावितो. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ चा. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आजच्यासारखी जन्मदाखल्याची सोय नव्हती. तो काळ जन्मकुंडलीचा होता. वि. स. खांडेकरांची पुरातन जन्मकुंडली आपणास एकोणिसाव्या शतकात घेऊन जाते. मग आपणाला भेटतं ते खांडेकरांचं आजोळ. सांगलीच्या माईणकर आजोबांच्या घरी वि. स. खांडेकरांचा जन्म झाला. ते घर आता बिल्डरच्या घशात गेलंय. आपल्या इतिहास, संस्कृतीच्या अनास्थेने किती स्मृती गडप झाल्या. जन्मघराशेजारील खांडेकरांचे पूर्वज त्यांच्या वेशभूषेमुळे आपणास जुना-पुराणा उबारा देतात.

 वि. स. खांडेकरांचं आरंभिक शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झालं. मॅट्रिकला ते बेळगाव केंद्रातून संयुक्त महाराष्ट्रात आठवे आले होते. त्या वेळच्या मॅट्रिकच्या विद्याथ्र्यांच्या सूचीत ‘गणेश आत्माराम खांडेकर' क्र. ४0३, ‘सांगली'सारखा मजकूर मूळ स्वरूपात पाहणं एक वेगळी अनुभूती - रोमांचित करणारी, प्रेरक, उत्साहवर्धक खरी!

 वि. स. खांडेकर नाणेलीतील (ता. सावंतवाडी) सखारामभट खांडेकरांना दत्तक गेले होते. १९१६ साली दत्तक वडिलांचं मोडीतील हस्ताक्षर, त्यांचं सावकारी पेटुल (पेटी) इथं मूळ स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पुढे दत्तक वडिलांशी त्यांचा अबोला झाला. ते पुण्यात फर्गुसन कॉलेजात शिकत होते. दत्तकघरची श्रीमंती असूनही रोज भासणाच्या पैशाच्या चणचणीने त्यांचे मन विफल व्हायचं. नाही म्हणायला नाटककार राम गणेश गडक-यांचा सहवास, किर्लोस्कर थिएटरमधील नाटके, पुण्यातील शिक्षक, विद्यार्थीमित्र यांच्या सहवासाने त्यांचं पुण्यातील वर्षभराचं वास्तव्य सुसह्य झालं. अन् त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून स्वावलंबी व्हायचं ठरवलं ते केवळ नाइलाज म्हणून. 'केशवसुतांची कविता' पुस्तक सोबतीला घेऊन ते शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथील समुद्र, निसर्ग, माणसं, जीवन संघर्षाने त्यांच्यातील साहित्यिक फुलला. हे सारं चित्र क्रमबद्ध पद्धतीनं जिवंत होतं ते तेथील अनेक साधनांच्या मांडणीतून.

 संग्रहालय पाहात आपण जसजसे पुढे जातो तसे हे संग्रहालय आपणास खांडेकरमय केव्हा करून टाकते ते कळतसुद्धा नाही. सन १९२५ ला वि. स. खांडेकर शिरोड्याच्या तत्कालीन ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यांनी शाळेची इमारत बांधली. पगारापोटी मासिक ५0 रुपये मिळत असताना सन १९२५ साली वि. स. खांडेकरांनी शाळेला दिलेली रु. १000/- ची देणगी त्यांच्याच हस्ताक्षरातील जमाखर्चात वाचणं प्रेक्षकांना - विशेषतः आज गलेलठ्ठ पगार घेणा-या शिक्षक, प्राध्यापकांना, निश्चित अंतर्मुख करतं. हे संग्रहालय केवळ स्मृती संग्रहालय राहिलं नसून ते महाराष्ट्राचं भविष्यातील ‘संस्कारतीर्थ' होईल, हे जाणवल्यावाचून राहात नाही. शिरोड्याचा ऐतिहासिक पिठाचा सत्याग्रह खांडेकरांनी पत्रकार म्हणून टिपला होता. त्या वेळी ते वैनतेयचे नुसते संपादक नव्हते तर बातमीदारही होते, हे ‘वैनतेय' साप्ताहिकातील खांडेकर लिखित विविध मजकूर वाचताना लक्षात येते. हे संग्रहालय केवळ प्रेक्षणीय नाही तर वाचनीय आहे. अभ्यास, संशोधनाच्या कितीतरी पाऊलखुणा इथं आहेत. पाऊलखुणांवरून आठवलं, इथं तुम्हास खांडेकरांची पहिली साहित्यिक सप्तपदी' वाचावयास मिळते ती मूळ प्रकाशित रूपात. खांडेकर प्रारंभी 'कुमार', 'आदर्श', 'एक शिक्षक, ‘परिचित' अशा अनेक टोपणनावांनी लिहायचे, हे मराठी वाचकांना इथे पहिल्यांदा लक्षात येतं. खांडेकरांची साहित्यातली पहिली पावलं पाहाणं रांगणारं बाळ चालताना, एक एक पाऊल पुढे टाकताना अनुभवणं असतं.

 नंतर तर चक्क आपण त्यांची जीवनातील खरी सप्तपदीच पाहतो. १९२९ साली वि. स. खांडेकरांचा विवाह मनुताई मणेरीकर यांच्याशी झाला. त्याचं आमंत्रण देणारं मोडीतील पत्र आजही निमंत्रण पत्राइतकं हार्दिक! वि. स. खांडेकरांचं बि-हाड शिरोडा, आरवलीतील अनेक घरांत होतं. तिथं त्यांचं प्रारंभीचं साहित्य आकारलं. 'कवी असतो कसा आननि' ही जशी जिज्ञासा असते तशी लेखकाचं घर कसं होतं?' याचंही विलक्षण कुतूहल असतं वाचकांत. मराठीतील सुविख्यात कथाकार जयवंत दळवी यांनी ‘परममित्र' या आपल्या आठवणींच्या साठवणीत ‘भाऊसाहेब व भाऊराव' लेखात खांडेकरांच्या आरवलीतील रेग्यांच्या पडवीचं मनोरम असं वर्णन केलंय - ‘दर्शनी पडवी स्वच्छ सारवलेली असे. त्यावर पसरलेली एक गादी. दोन तक्के भिंतीला टेकवलेले. शेजारी एक कापडाची आरामखुर्ची. खुटीला एक कंदील, कोप-यात पाच-सहा फूट लांबीची बांबूची काठी. गादीच्या बाजूला वीतभर उंचीची तिवई, तिच्यावर कायम एक चिमणी.

 शेजारी दोन वीत लांबी-रुंदीचे उतरते बैठे मेज. ते मेज मांडीवर ओढून भाऊ गादीवर बसून काहीतरी लिहीत किंवा वाचीन बसलेले दिसत." हे सारं मूर्त करणारी संग्रहालयातील पडवी प्रेक्षकांचे सर्वांत मोठं आकर्षण ठरतं. बघताना वाटतं, खांडेकर आत्ताच उठून घरात गेले असावेत... पडवीचा जिवंतपणा ठाव घेणारा!

 वि. स. खांडेकर मराठी कथाकार म्हणून मराठी वाचकांच्या मनात घर करू लागले तो काळ होता गांधीयुगाचा. सारा देश आदर्शवादाने भारावलेला होता. दिग्दर्शक मास्टर विनायक व नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांना सामाजिक जाणिवांचे चित्रपट काढायचे होते. त्यांनी वि. स. खांडेकरांना साद घातली. ते हंस पिक्चर्सचे कथाकार झाले. १९३६ ते १९६० या कालखंडात वि. स. खांडेकरांनी चोवीस पटकथा लिहिल्या. मराठीत शंभरावर, हिंदीत दहा, तमिळ, तेलगूतही खांडेकरांचे चित्रपट होते, हे संग्रहालय पाहाताना लक्षात येतं नि लोक साश्चर्य पटकथांची छायाचित्रे पाहू लागतात. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात सिनेमाचं तिकीट काढलं की त्याबरोबर पटकथा, संवाद, गाणी यांची स्मरणपत्रिका पुस्तिका मिळायची. खांडेकरांच्या चित्रपटांच्या सर्व रंगीत स्मरणपुस्तिका हे या संग्रहालयाचे अढळपद. सिने संग्राहक शशिकांत किणीकरांनी या पुस्तिका मोठ्या मनाने संग्रहालयास दिल्या.

 वि. स. खांडेकर हे विसाव्या शतकाच्या मध्यास महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक जीवनाचे अनभिषिक्त सम्राट होते. साहित्य संमेलने, चर्चासत्रे, सत्कार, मानपत्र अशा कोणत्याही समारंभाचं पान खांडेकरांशिवाय हलायचं नाही, हे संग्रहालयातील अनेक दुर्मीळ छायाचित्रांवरून प्रत्ययास येतं. यापैकी अनेक छायाचित्रे खांडेकर संग्रहक व संशोधक जया दडकरांच्या सौजन्यानं उपलब्ध झालीत. या संग्रहालयातील ही छायाचित्रे म्हणजे मराठी साहित्यसृष्टीचा अमोल ठेवाच

 संग्रहालयात वि. स. खांडेकरांच्या समग्र साहित्यकृतींचा पहायला मिळणारा संग्रह म्हणजे साहित्यप्रेमींना लाभणारी अपूर्व पर्वणीच. त्यात अनुवाद कृतींची भर म्हणजे दुधात साखर. खांडेकरांनी सुमारे १५० साहित्यकृतींची निर्मिती केली होती, हे येथील सूचीवरून पहिल्यांदाच लक्षात येतं. अन् ‘खांडेकर हे बहप्रसव लेखक होते' हे पटतं. खांडेकर केवळ मराठीचे नाही तर भारतीय भाषांचे अग्रणी साहित्यकार होते, हे येथील हिंदी, तमिळ, गुजराथी, कन्नड, मल्याळम, सिंधी भाषातील सुमारे शंभर अनुवादांमुळे पटतं. वि. स. खांडेकरांच्या साहित्यांचे इंग्रजी,

 रशियनमधील अनुवाद त्यांना आंतरराष्ट्रीय लेखक सिद्ध करतात.

 संग्रहालयात त्यांना लाभलेल्या सन्मान, पुरस्कार, मानपत्रे यांच्या सुबक नि हुबेहूब प्रतिकृती पाहाताना त्या मूळ स्वरूपात पाहायला मिळाल्या असत्या तर... अशी प्रेक्षकांची चुटपूट जिव्हारी लागते. इथे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, मानपत्रे, डी. लिट्. च्या प्रतिकृती रिझवतात ख-या. वि. स. खांडेकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित स्मृती तिकीट ‘प्रथम दिवस आवरण', 'पहिले स्वाक्षरीत तिकीट' माहिती पुस्तिका, प्रतिकृती इत्यादी रूपात मांडून संग्रहालयानं मोठं औचित्य साधलंय. शेवटी संग्रहालय काळजाचा ठाव घेतं. ठोकाही चुकवतं ते मृत्यू दर्शनाने! काय दैवदुर्विलास पहा... खांडेकरांची शेवटची रूपककथाही होती ‘मृत्यू'. ती प्रदर्शित करून संग्रहालयानं मोठं औचित्य साधलंय!

 वि. स. खांडेकरांचं वाचन, चिंतन नि लेखन समजाविणारे अभिलेख, कागदपत्रे, पुरावे, कात्रणे, टिपण, वह्या, पत्रे इ. दस्तऐवज म्हणजे मराठी सारस्वताचा अनमोल नजराणा! मराठी लेखक सर्वांगाने जिवंत करण्याचा या संग्रहालयाचा प्रयत्न आहे. इथे खांडेकरांची भाषणे त्यांच्याच आवाजात ऐकण्यास मिळतील. पुणे आकाशवाणीनं त्यांच्या एतिहासिक व दुर्मीळ भाषणांच्या ध्वनिफिती संग्रहालयास उपलब्ध करून दिल्यात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय खांडेकरांचे चित्रपट, पोस्टर्स, स्लाइडस् उपलब्ध करून देणार आहे. होम थिएटरवर ते सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अशा प्रकारे दृक्श्राव्य माध्यमातून लेखक वाचकांपर्यंत जिवंत पोहोचवण्याचा शिवाजी विद्यापीठाचा हा उपक्रम देशातील पहिलाच ठरेल.

▄ ▄

साने गुरुजींच्या दैनंदिनी : चाळता चाळता...



 दोन-चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. मी कॉम्रेड गोविंद पानसरेंचा गौरव ग्रंथ संपादत होतो. त्याचे मुद्रण न्यू एज प्रिंटिंग प्रेस मुंबईत चाललं होतं. त्यासाठी मुंबईच्या वाच्या सुरू होत्या. एका भेटीत तिथले प्रकाश विश्वासराव साने गुरुजींचं वस्तुसंग्रहालय करत असल्याचे ओघाने कळलं. मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकरांचं स्मृती संग्रहालय उभारल्याचं सांगितल्यावर त्यांनी साने गुरुजी वस्तुसंग्रहालयाचा आराखडा, संग्रहित छायाचित्रं दाखवली. आम्ही चर्चा करत राहिलो अन् मी त्या उभारणीत केव्हा कसा सामील झालो ते कळलंच नाही.

 मी, प्रकाश विश्वासराव, गजानन खातू या वस्तुसंग्रहालयाच्या साधन संग्रहासाठी धुळे, जळगाव, फैजपूर, अंमळनेर असा दौरा करून आलो. तिथं अनेक दुर्मीळ हस्तलिखितं, छायाचित्रं हाती लागली. अन् संग्रहालय उभारता येईल असा विश्वासही निर्माण झाला. वडघरच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प. त्याचे अध्यक्ष सुधीर देसाई प्रभृती मंडळी मोठ्या उत्साहाने संग्रहालयातील स्वतंत्र इमारत उभी करत आहेत. प्रा. चंद्रकांत पाटगावकरांकडून या प्रकल्पाबद्दल ऐकून होतो. त्यांची भेट घेतली. त्यांनी आपल्याकडील सर्व साहित्य (साधना, जुने अंक, छायाचित्रे, पंढरपूर उपोषण इ.) देण्याची तयारी दर्शविली.

 ‘साने गुरुजी जीवनगाथा' लिहिताना जमवलेली सारी कागदपत्रे, दैनंदिनी, हस्तलिखिते, जुने अंक, पत्रे इत्यादी साहित्य राजाभाऊ मंगळवेढेकर यांनी जमवले होते. ते त्यांच्या पश्चात 'साधना'मध्ये जमा झाल्याचं कळल्यावरून साधनेशी संपर्क साधला. पुणे विद्यार्थी गृह, राष्ट्रसेवा दल, मध्यवर्ती कचेरी इत्यादी ठिकाणी ही प्रयत्न केले, चाचपणी केली. सगळीकडे आशेची

किरणं दिसून आली. पंढरपूरला तनपुरे महाराजांच्या मठात उपोषण कालावधीतील छायाचित्र असल्याचं कळल्यावरून संपर्क केला. शक्यतांचं क्षितिज विस्तारतं आहे. प्रकाश विश्वासराव, गजानन खातू, जनसंपर्क, मुलाखती, व्हिडिओ शूटिंग कितीतरी प्रकारे जीवाचं रान करत आहेत.

 या प्रयत्नात ‘साधना' मधून हाती आलेल्या साने गुरुजींच्या डायच्या सहज चाळल्या. त्या डायच्या, वह्या साधारणपणे १९३९ ते १९५0 च्या दरम्यानच्या आहेत. त्या पाहताना लक्षात येतं की 'साधना' साप्ताहिक सुरू करण्यापूर्वी साने गुरुजींनी लेखनाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली होती. चळवळ, प्रबोधन, व्याख्यान इत्यादी माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, आंध्र, तमिळनाडू पाहिला, अनुभवला होता. तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्याचा ध्यास होता. त्यासाठी काँग्रेस साप्ताहिक', 'सेवा', 'प्रदीप', ‘कर्तव्य' इत्यादी नियतकालिकांचे संपादन केले होते. या सर्व अनुभवांच्या पाश्र्वभूमीवर साधना साप्ताहिकास स्थैर्य लाभावे म्हणून कोण तळमळ होती. साने गुरुजींच्या मनात जसा भारत स्वतंत्र झाला तसा स्वतंत्र भारताचे सुराज्य व्हावे म्हणून साधना साप्ताहिकास ते त्यांचे साधन बनवू इच्छित होते. काँग्रेस, कर्तव्य, प्रदीपसारखी नियतकालिकं चालवताना त्यांना मोठी आर्थिक तोशीस सोसावी लागली होती. 'साधना' चालेल तर कर्तव्य'चे कर्ज भागवू शकू, असा भाबडा आशावादही त्यांच्या धडपडीत होता. यासाठी अर्थसहाय्य ते ठेवी व वर्गणीतून जमा करत. त्यांचे एक निवेदन यापैकी एका डायरीत आहे. ते ‘जीवनगाथा' मध्येही पृ. ३६५वर आहे. ते वाचलं की साने गुरुजींची 'साधना' जीवनसाधना होती हे लक्षात येतं. आशावाद इतका की, साधना प्रेस कर्जमुक्त झाली की राष्ट्र सेवादलाला नि समाजवादी पक्षाला मदत देण्याची योजना. हे सारं साने गुरुजींमध्ये अनंत ध्येयासक्तीमुळेच निर्माण व्हायचं.

 साने गुरुजीं डाय-यांचा वापर नोंदी, नियोजन, योजना इत्यादींसाठी करत. डायरी नित्य वा रोज ते लिहीत नसत. त्यामुळे दिवस व वर्षाचा... काळाचा मेळ घालणे कठीण. जुनी डायरीपण ते नोंदीसाठी वापरत. यात काटकसरीचा गांधी संस्कार असावा. सन १९३९ ची सर्वांत जुनी डायरी आहे. ती आहे Burroughs Wellcome & co., Londonची. ती आहे डॉक्टरांसाठीची Medical Diary. डॉक्टरांना आपल्या visits लिहिता याव्यात म्हणून तयार करण्यात आलेली ही इंग्रजी डायरी. साने गुरुजींनी चक्क तिचा वापर बालकविता लिहिण्यासाठी केलेला दिसतो. त्या अर्थाने

ती त्यांची कवितेचीच वही. पंचवीस पानं भरलेली. उर्वरित कोरी. या कविता प्रकाशित झाल्यात का ते पाहायला हव्यात. नसल्यास त्या प्रकाशित करायला हव्यात. साधनेने याबाबत पुढाकार घ्यायला हवा. संपादन, श्रमदान कोणीही करेल. गरज आहे संशोधनाची!

 अशीच या वर्षाची आणखी एक डायरी आहे. ती आहे गुजराथी. डेली अकाऊंट बुक असं तिचं स्वरूप. श्री भारत विजय प्रिंटिंग प्रेस, मोदीखाना, बडोद्याची ही डायरी. साने गुरुजींनी त्यात वेगवेगळ्या नोंदी केल्यात. इंग्रजी, हिंदी, गुजराथी नोंद असलेली ही डायरी. हिंदी माणसाला हिंदीत लिहावं, गुजराथी माणसास गुजराथी - असा साने गुरुजींचा ‘आंतरभारती' ध्यास यातून स्पष्ट होतो. साने गुरुजी स्वास्थ्यानं लिहीत तेव्हा त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखं, जेव्हा ते गडबडीत उतरून घेतात (विशेषतः भाषण ऐकताना) तेव्हा तेच अक्षर ‘खुद लिखे खुदा पढे होऊन जाते. ते वाचायला एकतर पोस्टमन हवा किंवा मेडिकल स्टोअरमधला सेल्समन... दिव्य अक्षरांचा शोध लावणारे किमयागार ते! यातही कविता भरलेल्या आहेत. या डाय-यांमधील लेखन असंबद्ध असलं तरी त्यांची संगती लावता येते, हा माझा वि. स. खांडेकर शोधातला अनुभव. यातली प्रत्येक पानं साने गुरुजींच्या जीवन, साहित्य, विचार, कार्य इत्यादीवर नवा प्रकाश पाडू शकतील.

 अशीच एक डायरी आहे सन १९४७ ची. श्री रामदास रोजनिशी तिचे नाव. केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची ही डायरी. यात अनेक लेखन संकल्प, कविता, नोंद, औषधोपचार तर आहेच, पण काही महत्त्वाची निवेदनेही स्वाक्षरीसह आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर या डायरीत २/३ जूनच्या पानावर साने गुरुजींची स्वाक्षरी असलेले निवेदन आहे. १० मे १९४७ ला त्यांचे उपोषण यशस्वी होऊन पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जाती-धर्माच्या लोकांना खुले झाले. ते झाल्या झाल्या तर नांदगावचे काही मातंग बांधव विठ्ठलाचे दर्शन घेऊन साने गुरुजींना भेटले. त्यांनी विठ्ठल दर्शनाचा अनुभव साने गुरुजींना कथन केला. ते आनंदात होते. ते ऐकून साने गुरुजींनी आपल्या मनाच्या झालेल्या स्थितीचे वर्णन करतान म्हटले आहे, ‘सुखावले मन! प्रेमे पाझरती लोचन!!' या पत्राचा, निवेदनाचा अभ्यास कशासाठी आवश्यक आहे की, ते जातिअंताच्या लढ्याचा मोठा पुरावा आहे.

 सन १९४७ ची आणखी एक डायरी आहे. ती आहे अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे, ही. साने गुरुजी या प्रकाशनाचे लेखक. 'पत्री' हा कविता संग्रह व 'श्यामची आई' याच प्रकाशनाची. त्या नात्याने या प्रकाशनाचे व्यवस्थापक शं. दा. चितळे यांनी ती भेट म्हणून साने गुरुजींना पाठवल्याची पहिल्या पानावर नोंद आहे. यातही कविता, नोंदी, नियतकालिक, प्रकाशनांचे आराखडे आहेत. 'प्रदीप’, ‘कर्तव्य', 'साधना'चे यातील आराखडे वाचनीय. १६ मे १९४७ च्या पानावर ‘साधना योजना' शीर्षकाखाली दहा पानांच्या साधनेचा आराखडा आहे तो असा - एक पान -अग्रलेख स्फुटे, दोन पान - सेवादल, मुले, आनंद, कविता, तीन पान - कामगार चळवळी, चार पान - विधायक कामे, किसान चळवळी, पाच पान - प्रभाकर, सहा पान - हिंदी, गुजराथी, कन्नड, तमिळ, उर्दू कवी (म्हणजे आंतरभारती), सात पान - गोष्ट, आठ पान - संकलित वार्ता (परराष्ट्रीय राजकारण), नऊ पान, दहा पान - कादंबरी, सुंदर पत्रे. याशिवाय स्त्रियांचे पान देण्याचा त्यांचा मानस होता. त्यात आहार, आरोग्य, क्रीडा, बोलपट यांचा अंतर्भाव करण्याची योजना होती. साधनेतून विनोबा वाणी, जावडेकरांची व्याख्यानमाला प्रकाशित करण्याचा मानस स्पष्ट होतो. हे पान साधनेचा ‘आरसा' म्हणून महत्त्वाचे अशासाठी की, गेल्या सहा दशकात साधनेत झालेले बदल या पानाच्या कसोटीवर अभ्यासता येऊ शकतील. या डायरीतील अन्य नोंदीही महत्त्वाच्या असून त्यांची तार्किक संगत सप्रमाण लागल्यास साने गुरुजींच्या जीवन, कार्य, साहित्याचे पुनर्मूल्यांकन नवी मांडणी शक्य वाटते. यातील संभाव्य वर्गणीदार यादी, महात्मा गांधी चरित्र रूपरेषा, साधनेचा खर्चाचा ताळमेळ, त्यांची अनेक पानांवर केलेली आकडेमोड पाहिली की, साने गुरुजी त्या काळात कसे साधनामय होऊन गेले होते याचे प्रत्ययकारी दर्शन होते.

 सन १९४८ ची दैनंदिनी आहे हनुमान प्रेस, पुणेची डायरी. साधनेची छपाई, बांधणी या प्रेसमध्ये होत असे. नारायण लक्ष्मणराव कोकाटे ती करत. त्यांचा हनुमान छापखाना ३00, सदाशिव पेठ, पुणे येथे होता. त्यांची काही बिले दफ्तरात आढळतात. या डायरीत महात्मा गांधी उपवास, महात्मा गांधींना अभिप्रेत उपवासाचा अर्थ आदी महत्त्वाच्या नोंदी लक्ष वेधून घेतात. यातही साधनेची आकडेमोड आहेच. महात्माजींच्या पहिल्या स्मृतीदिनाची हृद्य आठवण केवळ काव्य! यात साधनेचे बातमीदार होणेविषयी अनेकांना पत्रे लिहिल्याची महत्त्वाची नोंद आहे. कळवण, वरणगाव, पाचोरा,

निफाड, शिरपूर, श्रीगोंदे, ठाणे, डहाणू, पालघर, वसई अशी बातमीदारांची नावे वाचली की साधनेत संपूर्ण महाराष्ट्राचे (संयुक्त प्रांत) प्रतिबिंब असावे अशी योजना लक्षात येते. यात साधनेच्या एका अंकाचा खर्च (पृ. ३५ ऑगस्ट) आहे. तो पहिल्या अंकाचा खर्च म्हणून महत्त्वाची नोंद ठरते. तो खर्च असा - कंपोझिटर्स २00, कागद - ८0, भाडे - ७0, शाई - ५५, ब्लॉक्स - २0, गाडी, चहा इ. - (प्रवास) १0, किरकोळ - २० असा रुपये ४१५ चा खर्च नोंद आहे. याच डायरीत साने गुरुजींनी मार्च महिन्यात व्यक्तिगत खर्च नोंदला आहे. तो असा - इलेक्ट्रिक/गॅस - १, भाडे- ४, दुधवाला - ४, चहा- २, तेल, साबण वगैरे - १ असा मासिक खर्च १२ रुपये करणारे साने गुरुजी व्यक्तिगत जीवनातही सामाजिक व्यवहाराप्रमाणे काटकसरी होते हे सिद्ध होते.

 या दैनंदिनीच्या शेवटच्या आवरणाच्या आतील बाजूस साधनेची संभावित बोधवाक्ये नोंदली आहेत. आज साधनेत नोंदले जाते ते बोधवाक्य/ ध्येयवाक्य अंतिम खरे. पण त्यापूर्वी त्यांच्या मनात घोळत असलेली बोधवाक्य अशी होती -

 स्वतंत्र भारती आता,

 कुणा काही नसो कमी।

 साधू विकास सर्वांचा,

 करून शुभ साधना।।

 अथवा प्राप्त स्वातंत्र्य राखू या,

 करू या शुभंकर/समुज्वल।

 करू/व्हावा विकास सर्वांचा,

 साधना मंगल करू।।

 या सर्वांमधून साधना ही स्वातंत्र्यरक्षणासाठी व सर्वांच्या विकासासाठी स्थापिली हे स्पष्ट होते.

 सन १९४९ ची शेवटची डायरी - तीत फारसे लिहिलेले नसले तरी एक पान (७ जानेवारी) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात साधनेचा चार महिन्यांचा एकत्रित खर्च आहे. जमेकडे ८९,६१४ रुपये तर खर्च ८९,१५१ रुपये. ४६३ रुपये फायद्यात आणण्यासाठी. साने गुरुजी सव्वा वर्ष रात्रंदिवस झटत होते, एक करत होते पण साधना फायद्यात आणण्यासाठी साने गुरुजींना आपल्या पुस्तक लेखन, विक्रीचे मानधन ८00 रुपये जमा करावे
लागले होते. त्यांना आनंद एकाच गोष्टीचा होता, ‘कर्तव्य'चे कर्ज ते फेडू शकले. उसनवार आणलेले ६५०० रु. ते परत करू शकले. यात कामगारांचा पगार २०,००० नोंदला असला तरी संपादकांचे मानधन नाही. ते बिनपगारी फुल्ल (फूल!) अधिकारी होते हे वेगळे सांगायला नको.

■ ■

साप्ताहिक साधना : पहिली जावक बारनिशी : काही निरीक्षणे



 साने गुरुजी वस्तुसंग्रहालयाच्या साधन शोध मोहिमेत साधना साप्ताहिकाची पहिली जावक बारनिशी (Outward Register) हाती आली. ती अभ्यासली असता अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. ही जावक बारनिशी म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती आहे ऐंशी पानी साधी वही. तिला कव्हर नाही. ती आहे आखीव रेघांची वही. माझी पिढी चाळीस पानी, ऐंशी पानी कागदी कव्हर असलेल्या बिनपुठ्ठ्यांच्या वह्या वापरायची. गरीब कागदी कव्हरच्या तर श्रीमंत पुठ्ठ्याच्या कव्हरच्या वह्या वापरत. अशी ती वही. यातून साने गुरुजी साधनेचा संसार कसे काटकसरीने करायचे ते स्पष्ट होते.

 या वहीवर डाव्या कोप-यात साधनेचा पत्ता असलेला शिक्का आहे. तो असा - ‘साधना', आर्थर रोड हॉस्पिटलसमोर, ऑर्थर रोड, मुंबई - ११. साधनेचा पहिला शिक्का व पत्ता म्हणून त्याचे महत्त्व आहे. साधनेची सुरुवात तिथं झाली. तिथं त्या स्मृत्यर्थ एखादे स्मृतिचिन्ह, फलक लावायला हवा. ते स्थान शोधायला हवं. तत्कालीन छायाचित्र हवं.

 आतील पहिल्या पानावर पोस्टेज खरेदीची नोंद आहे. खर्च १ रुपया - कार्ड बत्तीस - १२ आणे, पाकिटे - ८ यावरून त्या वेळच्या टपाल दरांवर प्रकाश पडतो. त्या वेळी १ कार्ड दोन पैशाला, तर पाकीट दीड आण्याला मिळत असे. या बारनिशीत ६ सप्टेंबर १९४८ ते २८ मार्च १९४८ अखेर प्रत्येक टपालाचा खर्च ६ पैसे म्हणजे दीड आणा पडलेला आहे. या दीड आण्याची दोन तत्कालीन तिकिटे हाती लागली आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधींचे प्रकाशित ते पहिले तिकीट होय. त्याचे नाणेशास्त्र व विश्व तिकीट संग्रहात असाधारण महत्त्व आहे. कार्डासाठी

२ पैसे (अर्धा आणा) किमतीचे तिकीट वापरत. भारत स्वतंत्र झाल्यावरही ब्रिटिशकालीन तिकिटे, नाणी काही काळ वापरली जात असत. त्याचा हा पुरावा!

 साधनेचे पहिले दोन अंक प्रकाशित झाल्यानंतर जावक बारनिशी नोंद ६ सप्टेंबर, १९४८ रोजी सुरू झाली. पहिल्या दिवशी १२ टपाले पाठविण्यात आली. ती पाकिटातून धाडली गेली. पहिले पत्र संजीवनी मराटेंना पाठविण्यात आले. त्या वेळी त्या ठळकवाडी, बेळगाव येथे राहात. त्या कवयित्री. त्यांना कविता पाठविण्याविषयी लिहिले होते. त्या वेळी साधनेत कथा, गोष्टी, पत्रे, आठवणी, कीर्तन इत्यादी छापले जात असे. ते पत्रांपुढे नमूद विषयांवरून स्पष्ट होते. अभिनंदन, कृतज्ञता (आभार) पत्रेही जात. त्या वेळी साधनेत राजा नावाचा एक भंगी काम करायचा. त्याची माहिती हरिजन सेवक संघास पाठवल्याची नोंद आढळते. धुळ्याचे काकासाहेब बर्वे त्या वेळी हरिजन सेवक संघाचे कार्य पाहात असत. पहिल्या दिवशी पाठविलेल्या १२ पत्रांपैकी एक, आचार्य विनोबांना पाठविण्यात आले होते. त्यांचा पत्ता असा - भंगी बस्ती, न्यू दिल्ली. तो पुरेसा बोलका आहे. सप्टेंबर १९४८ ते जून १९५0 या बावीस महिन्यांच्या काळात साने गुरुजींनी विनोबांना अनेकदा पत्रे लिहिली. प्रत्येक वेळी विनोबांच्या अगोदर पू. (पूज्य) लिहिल्याचे आढळते. यावरून आचार्य विनोबांविषयीचा त्यांच्या मनातील आदरभाव स्पष्ट होतो. असाच आदरभाव आचार्य जावडेकर, आचार्य भागवत इत्यादींविषयी दिसतो. प्रारंभीच्या पत्रात साधना सुरू केल्याबद्दल ज्यांनी अभिनंदन केले अशांना साने गुरुजींनी कृतज्ञता पत्रे धाडल्याचे दिसते. यावरून सामान्यांची पण सन्मानजनक नोंद घेण्याची गुरुजींची उदारता स्पष्ट होते आणि साधनेची परंपराही!

 सर्व पत्रांना जावक क्रमांक, तारीख, नाव, पत्ता, विषय, टपाल खर्च नोंदण्याचा प्रघात साने गुरुजींनी ठेवलेला दिसतो. या बावीस महिन्यांच्या काळात ११८0 पत्रे पाठविण्यात आली. पैकी फक्त एकापुढे टपाल खर्च टाकण्यात आलेला नाही ते म्हणजे वसंत कुंभोजकर. त्यांच्या पत्त्यात लिहिले आहे - C/o. भाऊसाहेब खांडेकर, शाहपुरी, कोल्हापूर, वसंत कुंभोजकर म्हणजे किर्लोस्कर, तरुण भारतचे उपसंपादक नाना कुंभोजकर. भाऊसाहेब खांडेकर म्हणजे वि. स. खांडेकर, वसंत कुंभोजकर भाऊंचे पहिले लेखनिक. त्यांच्यापुढे टपाल खर्च नाही. त्याचे कारण पुढे दिले आहे - ‘टपाल होते.' याचा अर्थ उलट टपाली उत्तर पाठविण्यासाठी नाना कुंभोजकरांनी आगाऊ

टपाल तिकीट/पाकीट पाठवले असावे. त्या वेळी तशी पद्धत होती. यातून साने गुरुजींची सार्वजनिक जीवनातील आर्थिक सचोटी व पारदर्शकता स्पष्ट होते. त्यातून आज आपणा सर्वांना भरपूर शिकता येण्यासारखे आहे. या ११८0 वाचकांत नाना कुंभोजकर एकटे काय ते साधनेस तोशीस न देणारे निघाले. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे. ते आज हयात आहेत. सध्या मुक्काम सांगली.

 ही सारी जावक बारनिशी साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील आहे. त्यावरून साधनेत त्या वेळी लिपिक नसावा हे स्पष्ट होते. संपादक काय करीत नसत? लिहिणे, पत्रव्यवहार करणे, नोंदी ठेवणे, प्रुफे तपासणे, पत्ते लिहिणे, अंकाच्या घड्या घालणे, तिकिटे चिकटवणे, पोस्टात अंक टाकणे, अंक विकणे आदी सारी कामे साने गुरुजी करीत असल्याच्या नोंदी वेगवेगळ्या संदर्भात आढळतात. यातून आजच्या पत्रकार संपादकांना बोध घेता येईल. (अनुकरण अवघड खरे!) या सर्व नोंदी काळ्या शाईत आहेत. अपवाद निळी शाई. यावरून काळ्या शाईची साने गुरुजींची पसंती स्पष्ट होते. दैनंदिनी, हस्तलिखिते, पत्रव्यवहारातून यास दुजोरा मिळतो. प्रारंभिक हस्तलिखिते निळ्या शाईतील आढळतात. साने गुरुजींच्या लेखनात खाडाखोड अपवादाने आढळते. बावीस महिन्यातील ११८0 नोंदींपैकी फक्त एकावर खाट आहे, खाडाखोड मात्र नाही. प्रत्येक काम समरसून करण्याची साने गुरुजींची मनस्विता यात दिसून येते. कोणतेही काम एकात्मतेने करायचे. ते छोटे-मोठे नसते. ते काम ‘कार्य' असते हे आपण समजून घेतले तर साने गुरुजींची ‘कार्य संस्कृती' उमजेल.

 मागील लेखात मी साने गुरुजींचा संपर्क सर्व जाती, धर्मातील लोकांशी व सर्वदूर भारताशी होता हे स्पष्ट केले आहे. या जावक बारनिशीतील पत्त्यांवरून त्यास बळकटी मिळते. या सूचीवरील पत्त्यातील व्यक्तींचे सध्याचे उत्तराधिकारी शोधल्यास ‘साधना' नि साने गुरुजींसंबंधी पत्रव्यवहार, कागदपत्रे, जुने अंक शोधणे शक्य आहे. (अर्थात त्यांनी ते जपून ठेवले असतील तर!) आपणाकडे जुनं ते सोनं' फक्त म्हणीत आहे. सांस्कृतिक संचित जपण्यातील आपल्या अनास्थेने आपला इतिहास, संस्कृती कबाड्यास कवडीमोलात, रद्दीच्या भावात आपण विकून टाकून आपली सांस्कृतिक दिवाळखोरी पुरेशी सिद्ध केली आहे. हे थांबायला हवं. जुनं जपायला हवं.

 टपाल खर्च एप्रिल १९४९ पासून ६ पैशावरून ९ पैशावर गेलेला आढळतो. याचा अर्थ त्या वेळी टपाल खर्च - पोस्टाचे दर वाढले, हे स्पष्ट होते.

 पत्रव्यवहारात स्त्रियांची नावे अपवाद आहेत. यावरून सन १९४८ ते ५0 दरम्यान स्त्रिया अशिक्षित होत्या, त्यांचे लेखन, वाचन अपवाद होते, हे स्पष्ट होते. या नोंदीत संजीवनी मराठे, दुर्गा भागवत, इंदुमती जगताप, विद्या पाटील, सखुबाई आपटे, सोनुताई मरगुडकर, कमलाबाई होस्पेट, पुष्पलता अमीन, सुधा माने (सुंदर पत्रे!), शरयू गांधी, अनुसया घुर्ये नावे आढळतात. दुर्गा भागवतांचे पहिले लेखन साधनेत प्रकाशित झाले होते. साने गुरुजींच्या आग्रहावरून (त्याची नोंद प्रतिभा रानडे यांनी ‘बापलेकी'मध्ये केली आहे. पाहा पृ. १७). ते लेखन ('वाळूची पावले' हा लेख) मागवणारे पत्र साने गुरुजींची याच दरम्यान लिहिले असावे. सन १९५० मध्ये दुर्गाबाई भागवतांना दोनदा पत्र लिहिल्याची नोंद आढळते.

 साने गुरुजी साधनेसंबंधाने विद्यार्थ्यांशीही पत्रव्यवहार करीत. अगदी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांशी पण. दि. ०१.१२.१९४९ रोजी जळगावच्या इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकणाच्या कमलाकर नारायण टेंबे या विद्यार्थ्यास लिहिलेल्या पत्राची नोंद या संदर्भात पाहता येते. अशा अनेक नोंदी आहेत. शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, संपादक सा-यांशी साधनेचा संपर्क असावा, अशी साने गुरुजींची धडपड असे. आचार्य शांताराम गरुड, साहित्यिक शंकर सारडा, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, जयानंद मठकर प्रभृतींना साने गुरुजींनी लिहिल्याची नोंद आहे. अन्य मान्यवरांत महाकवी प्रा. द. रा. बेंद्रे (ज्ञानपीठ पुरस्कृत कन्नड साहित्यिक), पु. ग. मावळंकर (पहिले लोकसभा सभापती), कवी वा. रा. कांत, सोपानदेव चौधरी, प्रा. कृ. ब. निकुंब, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, प्रा. वसंत बापट, यदुनाथ थत्ते, एस. एम. जोशी, मधु दंडवते, ताराबाई मोडक, भाऊसाहेब रानडे, बा. य. परीट, वसंत पळशीकर, बगाराम तुळपुळे, राजा मंगळवेढेकर प्रभृतींचा उल्लेख करता येईल.

 साधनेच्या खपासाठीही साने गुरुजी अनेकांना पत्रे लिहीत. राजा गवांदेंना दि. २८.०९.१९४८ ला लिहिलेले पत्र या संदर्भात नोंद घेण्यासारखे आहे. काही लोक ‘साधना प्रचारक म्हणून कार्य करत. उदा. वसंत पाटील, नंदुरबार त्यांच्याशीही गुरुजी पत्रव्यवहार करत असत, असे या जावक बारनिशीवरून लक्षात येते. साधना अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय विभागांना जात असे. त्या वेळचे शिक्षण खाते हे ‘पब्लिक इन्स्ट्रक्शन' नावाने ओळखले जाई. साधना लेबर डिपार्टमेंटमध्येही जात असे.



 पुराभिलेख विद्याच्या दृष्टीने व साधना साप्ताहिकाच्या इतिहासाचे जतन म्हणून या जावक बारनिशीचे असाधारण महत्त्व आहे. हा सामाजिक व ऐतिहासिक ऐवज होय. अशी इतिहास साधने कालौघात मनुष्य विकासाची पावले असतात. ती जपली तर आपणास कुठे होतो नि कुठे आलो याचा आढावा घेता येतो. साधना व साने गुरुजी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे साधन म्हणून या जावक बारनिशीकडे पाहता येईल.

▄ ▄

सुर्वे काव्य : वंचितांचा टाहो



 कवी नारायण सुर्वे यांचा परिचय महाराष्ट्रास करून देताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणाले होते की, 'सुर्वे हे कामगार जीवनाशी समरस झालेले नव्हे, तर कामगारांचे जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत. त्यांचं बालपण हलाखीचं, तरुणपण संघर्षाचं, प्रौढपण प्रतिकूलतेवर मात करणारं तर आयुष्याचं उत्तरायण अस्तित्वाच्या लढाईनंच ठरलं.' सुर्वे एकदा मला म्हणाले होते की, 'मीही आत्मकथन लिहिणार आहे.' 'बाळगलेला पोर' असं नाव घोळवतो आहे. सुर्वे यांनी अस्तित्वाच्या लढाईत मिळेल ती नोकरी केली. गोदी, मिल, ऑफिस, पार्टी, शाळा तसंच मिळेल ते काम केलं नि शिक्षक झाले. त्यांच्या अनुभवाचं आकाश जीवनाचा सारा अवकाश घेऊन आशयघन झालं. त्यांच्या कवितेनं त्यांना समाजशिक्षक केलं. त्या कवितेनं मराठी जाणिवा विस्तारल्या. पोस्टरवाला, खळवाला, शिगवाला, शेतमजूर, गिरणी कामगार, वेश्या, देवदासी, पार्टी वर्कर, लेथवाला, इंजिनात नि बॉयलरमध्ये कोळसा भरणारा फोरमन, गोदी कामगार, सैनिक, नालबंद, ड्रायव्हर, पोर्टर, खाटीक, हातगाडीवाला, क्रेनवाला, हमाल, सोजीर, बावटेवाला, ‘नायकीण' थोडक्यात सर्व वंचितांच्या वेदनांचा टाहो त्यांच्या कवितेत ऐकू येतो. कामगार वस्ती, झोपडपट्टी, चाळ, खोलीत आयुष्य संपल्यावर फ्लॅट, घर त्यांना लाभलं. त्यामुळे त्यांची कविता, पांढरपेशा, मध्यमवर्गीय जाणिवांना मागं सारत अशा अलक्षित, वंचित मार्गाने जात जगणं घेऊन येते. ज्याला जात, धर्माची संकुचित लेबलं असत नाहीत. ती कविता माणसास माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराची मागणी करते. जर शक्य झालं तर हृदयपरिवर्तनाने, प्रबोधनाने व तसं झालं नाही तर क्रांतीनेही तो अधिकार मिळवण्याशी ती प्रतिबद्ध आहे.

 ‘ऐसा गा मी ब्रह्म'च्या प्रस्तावनेत कविवर्य कुसुमाग्रज यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, आजवरचे आमचे साहित्य हे बव्हंशी पांढरपेशा वर्गातील लेखकांनी निर्माण केलेले आहे. सदाशिव पेठी साहित्य ही डॉ. केतकरांनी वापरलेली संज्ञा अद्यापही सार्थ आहे. ही सदाशिव पेठ अर्थात पुणे शहरापुरती मर्यादित नाही. ती सर्व महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ती विशिष्ट जातीपोटजातींपुरती संकुचित आहे, असेही मानायचे कारण नाही. ती एक प्रवृत्ती आहे आणि ती सामाजिक जीवनाच्या प्रचलित व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. जातिभेदाच्या तटबंदीने एकूण समाजजीवनाचे विविध स्वायत्त प्रांत निर्माण करून या प्रवृत्तीला फार मोठा हातभार लावला आहे. अनेक मर्यादांनी ग्रासलेल्या अशा वाङ्मयाला तोचतोपणा यावा, त्याच्या चतुःसीमांचा संकोच व्हावा यात नवल नाही. वाङ्मय निर्मितीच्या मीमांसा कोणत्याही आणि कशाही असोत, त्याचा विस्तार व्हावा, जीवनाच्या साच्या सरहद्दीपर्यंत त्यांचा संचार व्हावा. कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यासंबंधीच्या अपेक्षांची परिपूर्ती म्हणजे सुर्वे यांची कविता. ती भेदातीत कविता आहे. ती जाणिवांच्या परंपरागत सरहद्दी ओलांडते. ती नवं मनुष्य जीवन चित्रित करते.

 सुर्वे यांची कविता क्रांतीची खरी. विद्रोह ही तिची पूर्वअट आहे. पण हिंसा ती अनिवार्य मानत नाही. 'थांब' या कवितेमध्ये ते म्हणतात-

 नच जुमानलेस तर खड्ग हाती घेईन

 सज्जना! असा प्रसंग मजवर आणू नको.

 ती मूलतः शांतीची उपासक आहे. नेहरूंबद्दलच्या प्रेमाचं ती प्रतीक! ती नवसंस्कृतीची समर्थक आहे. जुलुमाला सामोरे जात पणतीनं वीज पेटवायची ताकद असलेली सुर्वेची कविता समाज परिवर्तनाचे एक जाहीर आवाहन म्हणून पुढे येते.

 नव संस्कृतीचे व्हा भाट

 गीत गर्जत या मुक्तीचे

 फुलवीत पंख मेघांचे

 दूत होऊ या शांतीचे

 नारायण सुर्वे यांची कविता केवळ भावाकुल नाही. ती कलात्मकही आहे. तिच्या कलात्मकतेचं स्वतःचं असं सौंदर्यशास्त्र आहे. त्या कवितेत चंद्र, सूर्य, तारे येतात. पानं, फुलं येतात. पण त्यांची कविता जगण्यातून येत असल्यानं त्यात उपमा म्हणून बॉयलर, लेथ, पेट्रोल, गोचीड अशी सारी

जीवनलक्ष्यी प्रतिमानं येतात अन् त्यांची कविता जगण्याचं अभिन्न अंग बनते. प्रारंभीच्या काळातली ‘बालचंद्र' कविता पाहाल तर तिचं सौंदर्य पारंपरिक चंद्र, आभाळ, तलाव, मेघ यात आढळतं. पोर्टर, शीगवाला, पोस्टरमध्ये तेच सौंदर्य नवं रूप घेऊन माणसाचं जगणं लेवून येतं. त्यातील करुणा आणि क्रौर्याचं द्वंद्व नारायण सुर्वे ज्या सहजतेनं चित्रित करतात, त्यामुळे त्यांची कविता एकाच वेळी कलात्मक होते नि हृदयस्पर्शीही! त्यांची कविता मराठी वाचकांना काही नव्या शब्दकळाही देते. उदा. - झाडझाडोरा, शिटाक, आत्रंग, दुराकणे इत्यादी अशांमुळे त्यांच्या कविता जीवनाचं पोट्रेट होऊन जातात.

 सुर्वे यांचे काव्य एकाच वेळी लोकल असतं नि ग्लोबलही. त्या कवितेत लालबाग, परळ, कोकण असतो. तसं आशिया, आफ्रिका, रशियाही. त्यात नेहरू असतात तसे मार्क्स, केनेडी, नासेर, लेनिनही. तिच्यात खेडे, शेत, पीक असतं तसं रणगाडे, गलबतं, रेल्वेही. ती अन्याय-अत्याचाराचा विरोध करते तसा लुंबासाच्या हत्येचाही. यामुळे एक वैश्विकता घेऊन येणारी ही कविता जाणिवांचा परीघ रुंदावत आकांक्षांचं न संपणारं क्षितिज चित्रित करते आणि म्हणून तिची व्यापकता सिद्ध होते. विश्वाचं गोकूळ, विश्वाचा आधार असं सुर्त्यांच्या कवितेचं स्वरूप आहे.

 शब्दांच्या हाती फुलांऐवजी खड्ग सोपवणारा हा कवी केवळ कामगार नाही तर तो त्यांच्या जीवनाचा किमयागारही आहे. वंचितांच्या जीवनाचा कायाकल्प हे त्यांच्या कवितेचं ध्येय आहे. कवी नारायण सुर्वे यांची कविता ‘रोटी, कपडा, मकान' या मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन आणखी काही हवे आहे म्हणते तेव्हा तिला भौतिकापलीकडचं मध्यप्रवाहात आणणारं सांस्कृतिक जग हवं असतं. वंचितांना समाजमान्यतेची राजमुद्रा देणं तिचा अजेंडा आहे. त्यासाठी ब्रह्मांडास पाठी घालण्यास, सूर्याची लगोरी टिचविण्यासही हा कवी तयार असतो. वंचितांच्या उत्थानाच्या सुवर्ण काळात आपण असू, नसू ती गोष्ट ते गौण मानतात. पण तो उत्कर्ष काल आलाच पाहिजे याबद्दल ते आग्रही असतात.

 - आवडीने रांधलेला भात,

 खावयास मी नसेल घरात

 - हात उंचावून माझी फुले स्वागतास जातील,

 त्या क्षणी मी असेन की नसेल कुणास ठाऊक?

 हा कवी मोठा आशावादी. कितीतरी कवितांत त्याचा जीवनविचार,

परिवर्तनावरचा विश्वास, आशावाद उफाळून येतो. त्यातून जीवनाविषयीची सकारात्मकताही व्यक्त होत असते.

 - घडीभर अंधार राहील, नंतर पहाटच आहे...

 याच वस्तीतून आपला सूर्य येईल...

 -थोर भल्या भल्या, क्षणात जिंकीन...

 - ज्या हातांनी डागली तोफ त्या पवित्र हातांचे आशिष घेईन...

 - तान्यांच्या पुढची दुनिया माझ्या नजरेत आहे...

 या कवीचं जग खुराड्यातलं असलं तरी त्याचं तत्त्वज्ञान मानवाधिकारांची पखरण करतं. 'माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटला नाही', असं निक्षून सांगणारे कवी नारायण सुर्वे म्हणजे माणसांचं मोहोळ होतं. तो जनवादी कवी होता. त्याला व्यक्तिगत काही आकांक्षा नव्हती. ‘होता सकळ विश्व बदलण्याचा ध्यास आणि मग तो शब्दांनाच शस्त्र करतो, ग्रंथ हेच त्याचे विश्व बनतं आणि त्यासह मग तो जीवनास सामोरा जातो. ज्यांना शब्द जागवताही आला नाही त्याला जगताही आलं नाही. त्यांची कीव अशासाठी करतात की ते जीवनभर शब्दसाधक राहिले, शब्दास जागले. साय पांघरलेले शब्द त्यांना रोज भेटायचे ग्रंथाग्रंथातून. पण केवळ ग्रंथ हे त्यांचे जीवन नव्हतं. त्यातून ते चेहरे वाचायचे, माणसं समजून घ्यायचे. शब्दात खराब झालेला हा कवी. मात्र त्याने अनेक शब्दांना अमर केलं. शब्दांतून भविष्य निर्मिणारा हा कवी त्यानं माणुसकीचा मळा कवितेतून फुलवला.

 'ऐसा गा मी ब्रह्म’, ‘सनद', 'जाहीरनामा', 'माझे विद्यापीठ' ही त्यांच्या कवितांची नुसती शीर्षकं न्याहाळली तरी सुर्वे यांच्या कवितेची समूह मानसिकता, जनवादिता स्पष्ट होते. या कवितेत सामान्य माणसावर होणाच्या हर त-हेच्या अन्याय-अत्याचाराचे वळ उठलेले आहेत. ती अत्याचारी माणसांचे पीळ नोंदवते. अत्याचार सहन करून मुक्ती मिळत नाही म्हणून ती बंड, क्रांतीची भाषा करते. तिला जगाच्या उफराट्या अन्यायाबद्दल त्वेष आहे नि चीडही, नफरत मात्र नाही. तीत दुस्वास नाही. असेलच तर एक उजळ मार्ग निर्मिण्याची मनीषा. त्यासाठी उभी हयात जाळण्यास तो तत्पर दिसतो. सात जन्माच्या दारिद्रयाची झीट त्यांच्या सर्व कवितांतून व्यक्त होते, कारण ती त्याला समूळ नष्ट करायची आहे. त्यासाठी तो सर्वच समर्पण करू इच्छितो. तो एक दृढसंकल्प कवी आहे. सुर्वे आपल्या सर्व कवितांतून एका समाज जागल्याची भूमिका उठवताना दिसतात

 ‘अजून जिवंत आहे मी तुमचा कवी, खाली होत राहीन कथा ऐकवित...' माझ्या मुठीत मेघझरा आहे, म्हणणारा हा कवी मोठा आत्मविश्वासी परिवर्तक आहे. त्याला वर्तमानाचं भान आहे आणि जाणही-

 साला आपण लोगच पांडू है

 इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है...

 म्हणणारा कवी लेचापेचा, येरागबाळा नाही. त्याची नाळ मातीशी अन् इथल्या मतांशी थेट नि ठोक जोडलेली आहे.

 आम्ही पेरीत नसतो युद्ध

 आम्ही निर्मित असतो बुद्ध

 असे ठणकावून सांगणारे सुर्वे विरोधकांची बोलती बंद करण्यात तितकेच वाकबगार दिसतात. नफ्याचे सरेना लष्कर असा इशारा देणारा कवी जागतिकीकरणाची एका अर्थाने भविष्यवाणीच करतो.

 हक्कांनी उठविले वेद

 शूद्र झाला इथे स्वेद

 हे या कवीचं शल्य आहे. त्याचा राम घामात निथळतो अन् त्याचा घाम कामातच दंग असतो, असे न्यारं जग दाखविणारा हा कवी आपल्याला सोडून गेला तेव्हा योगायोगाने मी त्यांच्याजवळच होतो. ते आणि मी बाळगलेला पोर असल्याच्या नात्याने कवी नारायण सुर्वे माझे वडील बंधू होते. स्थिती, संघर्ष, विचार, व्यवहार सा-या अर्थांनी त्यांचं शव अंत्ययात्रेसाठी लोकवाङ्मयगृहात आणलं तेव्हा कडा पाणावणं एक उपचार होता, पण वारंवार आठवत होत्या काही ओळी...

 माझीही अंत्ययात्रा राजपथावरून सरकेल

 कुणीतरी अजान देईन, कुणातरी हुंदका फुटेल...

 कवी सुर्वे यांना वाचासिद्धी होती म्हणायची... त्यांची अंत्ययात्रा राजपथावरून जावी अशा शासकीय इतमामानेच निघाली होती. फौजफाटा होताच पण कामगारांची फौजही होती.

 कॉम्रेड नारायण सुर्वे,

 लाल सलामलाल सलाम!

 कॉम्रेड सुर्वे, अमर रहे।

 असा घोष करणारा जनसमुदाय त्यांनी घराघरात ठेवलेल्या मुठी घेऊन आला होता. त्या मुठी उंचावत त्यांना पोलिसांना एकवीस फैरी झाडून

दादरच्या चैत्यभूमीत जेव्हा अखेरचा निरोप दिला, तेव्हा खरंच अजानही ऐकू येत होता अन् हुंदकेही!

 तेच केले त्यांनी संचित

 तुम्हा ठेविले वंचित

 समजावणारा हा कवी समाजभान देणारा समाजशिक्षक होता खरा! त्याला माझाही प्रणाम! लाल सलाम!

▄ ▄


मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास



 पार्श्वभूमी-

 जगातील सर्व भाषा व साहित्याचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की, त्या-त्या भाषा व साहित्यात प्रथम तत्कालीन पुढारलेल्या वर्गाचे लोक लिहितात. हे लेखन ज्या वर्ग व व्यवस्थेमध्ये लेखन, वाचनाचे संस्कार विकसित होत असतात, त्यांच्याकडून प्रथमतः होते. लेखन-वाचनाचा पाझर विकासांच्या कालखंडात उच्चवर्गीयांकडून पाझरत पाझरत तो समाजातील तळागाळाच्या वर्गापर्यंत पोहोचत राहतो. त्यामुळे सर्व भाषांतील लेखन व्यवहारात प्रारंभीच्या काळात शोषक, सत्ताधारी, सामंत, सरंजामदार, दरबारी, आश्रित आदी कलाकार लिहितात. पुढे हा प्रवास जनसामान्यांपर्यंत पोहोचतो.

 भारतासारख्या खंडप्राय देशातील भाषा व साहित्याचा व्यवहार हा धर्म, जात, वर्ग, व्यवस्थेने मोठ्या प्रमाणात नियंत्रित केलेला आढळतो. भारतीय साहित्याचा मूलाधार संस्कृत भाषेचे साहित्य असल्याने आपोआपच प्राचीन साहित्याचा धांडोळा घेतल्याशिवाय आधुनिक साहित्याची मांडणी करता येत नाही. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत अशा सर्व साहित्याचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, प्रत्येक काळात समाजाच्या सर्व वर्ग व वर्णाचे प्रातिनिधिक असे चित्रण असते. आपल्या साहित्याचा प्रारंभ देवादिकांच्या कथांनी झाला. त्यात अवतार आणि चमत्कारांचे आश्चर्य जसे होते तसे त्या व्यवस्थेतील उपेक्षिताचे अश्रूपण!

 महाभारता राजा, राजकुमार यांच्या कथा जशा आढळतात तशा दासदासीच्या शापित जीवनाचे उद्गारही! इथे समाजमान्य विवाह संबंधाची चर्चा आढळते तशी विवाहपूर्ण संबंधातील संततीची पण. तिथं निपुत्रिक

राजाने एखादं बाळ दत्तक घेतल्याची जशी कथा आढळते तशी कर्णाच्या रूपाने सांभाळलेल्या सूतपुत्राची पण... इथे कुमारीमाता कुती आढळते. इतर धांडोळ्यात शकुंतला, मेनका आणि विश्वामित्रही दिसून येतात. राजाच्या गादीला वारस मिळावा म्हणून कुमारसंभवाद्वारे पुत्रप्राप्तीच्या कथांनी भारताचा प्राचीन इतिहास भरलेला आढळतो. दुसरीकडे वंश सातत्यासाठी नियोगाची परंपरा आढळते. हे सारं जात, धर्म, वंश, परंपरा यांच्या सातत्याच्या आग्रहातून घडत राहतं.

 या सगळ्या व्यवहारात नैतिक-अनैतिकतेचे प्रश्न सर्रास सोईस्करपणे वापरल्याचे दिसून येते. ब-याचदा खोट्या प्रतिष्ठेचा बाऊ करून पापावर पांघरूण घालण्याच्या कथा पुराण व इतिहासात काही कमी नाहीत.

 प्रारंभी देव लोकांच्या कथात सूर-असूर अशा विभाजनाने तत्कालीन व्यवस्था विभाजित दिसते. नंतरच्या काळात हे विभाजन राजा आणि प्रजेच्या रूपात येतं. धर्माचे प्राबल्य असलेल्या काळात हे विभाजन धर्मार्थी व धर्माश्रित अशा रूपात आढळते. मध्यकाळानंतरच्या आधुनिक काळात विशेषतः एकोणिसाव्या शतकात ही व्यवस्था जात केंद्रित बनलेली दिसून येते व समाज सवर्ण व अवर्णाच्या श्रेणीत विभागलेला दिसून येतो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात सर्वत्र जाती, धर्माच्या कुंपणापलीकडील वंचित व उपेक्षितांच्या व्यथा वेदनांचा स्वर सर्वभाषिक साहित्यात चढ्या आवाजात वेशीवर टांगू पाहतो. एके काळी समाजव्यवस्थेने कायम रकान्यात ठेवलेल्या दलित व वंचितांच्या वर्गापर्यंत अक्षराची पहाट पोहोचल्यावर अंधार गुहेत ठिणगी पडावी तसे समाजातील नवे अनुभवविश्व उदयाला येत जागतिक साहित्यपटलावर निग्रोंच्या साहित्याने जशी सरंजामी व्यवस्थेविरुद्ध तुतारी फुकली त्यातून ‘ब्लू साँग्ज' उदयाला आली. मराठी साहित्याच्या संदर्भात हाच उद्गार दलित साहित्याच्या स्वरूपात विकसित झाला. पुढे दलितेतर वर्गातील उपेक्षित समाज समुदाय लिहिते झाले आणि त्यातून वंचित साहित्याचा विकास झाला. ग्रामीण साहित्य चळवळ, आदिवासी साहित्य, स्त्रीमुक्तीवादी, जनवादी, पुरोगामी साहित्य अशा अनेक नवसाहित्याप्रमाणेच मराठी साहित्यात वंचितांच्या व्यथा-वेदनांना स्वर देणार एक सशक्त साहित्य प्रवाह आपली वेगळी मुद्रा मराठी साहित्यावर प्रभावीपणे उठवत आहेत. ही आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट झाली आहे.

 वैश्विक इतिहास

 समाजामध्ये दलितेतर वंचितांचा असा एक मोठा प्रवाह मनुष्य विकासाच्या प्रारंभापासून दिसून येतो. जो प्रारंभापासून आज अखेर अल्पसंख्य,

समाज मान्यतेपासून दूर, उपेक्षित जात व धर्म वास्तवाच्या परिघाबाहेर सतत जागण्याचा संघर्ष करणारा व अस्तित्वाची निकराची लढाई लढताना दिसून येतो. त्यात अनाथ, निराधार, पोरके, परित्यक्ता, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, विधवा, वेश्या, कुमारीमाता, हुंडाबळी, बलात्कारी, दुभंगलेली कुटुंबे, विस्थापित अशा अनेक प्रकारे उपेक्षेचं जीवन जगणारी मंडळी वेद, उपनिषदांपासूनच्या काळात जशी दिसतात तशी आजही. दया, करुणा, कणव, सहाय, भूतदया इत्यादीसारख्या वृत्तीमुळे हा मनुष्य समुदाय सामान्य मनुष्य समुदायापासून सतत वेगळा व उपेक्षित राहिलेला आहे. समाजाने दाखविलेल्या दया व धीरावर जगत हा समाजवर्ग धैर्याने संघर्ष करत आज स्वाभिमान व स्वत्वाची लढाई खेळत अधिकार आणि हक्काच्या जाणिवेने जागृत व प्रगल्भ होत समाजविकासात आपला वाटा मागू पाहात आहे. वेळोवेळी लिहिलेल्या साहित्यातून त्यांचा हा उद्गार दिवसेंदिवस आग्रह, आक्रोश यापुढे जाऊन अधिकाराची भाषा बोलताना दिसतो.

 भारताचा सारा सामाजिक विकास हा येथील राजकीय वास्तवामुळे नेहमीच ब्रिटिशांच्या इतिहासावर आधारित विकसित होत राहिला आहे. येथील समाज वास्तव, समाज परिवर्तन, सामाजिक कायदे, राजकीय व आर्थिक परिवर्तन या सर्वांमागे ब्रिटिश राजसत्ता व समाजसत्ता पायाभूत राहिली आहे. भारतीय राज्यघटनेने स्वतःला कल्याणकारी राज्य (Welfare State) म्हणून घोषित केले. त्यामागेही ब्रिटिश राज्यघटना कारणीभूत आहे, हे विसरता येणार नाही. ब्रिटनमध्ये चौदाव्या शतकात झालेल्या प्लेगच्या प्रादुर्भावात हजारो लोक मृत्युमुखी पडले व त्यातून निर्माण झालेल्या अनाथ, वृद्ध व विधवांच्या प्रश्नातून वंचितांच्या संगोपन, संरक्षण, पुनर्वसन इत्यादी यक्षप्रश्न सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यातून इ. स. १३५१ मध्ये इंग्लंडमध्ये गरिबांचा कायदा (Poor law) अस्तित्वात आला. पुढे १४९५ मध्ये भिक्षेकरी व भटक्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी 'Tuber Act' अस्तित्वात आला. सोळाव्या शतकात प्रबळ धर्मव्यवस्थेने चर्चसारख्या संस्थांच्या माध्यमातून गरिबांना अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण देण्याच्या उद्देशाने कल्याणकारी संस्थेचे जाळे विणले. पुढे सन १७८२ मध्ये बेरोजगारांचा प्रश्न मिटविण्यासाठी ‘गिल्बर्ट अॅक्ट' आला. मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी इंग्लंडच्या धर्तीवर भारतात १८५७ मध्ये ‘डेव्हिड रिफॉरमेटरी स्कूल'ची स्थापना झाली. म. फुले, पंडिता रमाबाई, महर्षि कर्वे, महर्षि विठ्ठल रामजी

शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्वांनी केलेल्या वंचितांच्या संगोपन शिक्षण व पुनर्वसन कार्यामागे ब्रिटिश मिशनरीचे कार्य प्रेरणा म्हणून कार्य करत होते, हे नाकारून चालणार नाही.

 समाज संक्रमणाचा हा आलेख पाहता असे लक्षात येते की, प्रत्येक काळात ‘सबाल्टर्न' व्यवस्था कार्यरत असते. ही व्यवस्था वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यामधील उतरंड अधोरेखित करीत असते. अभिजन वर्ग वर्चस्वाने सुरू झालेल्या समाज विकासाची परिणती बहुजनवर्ग विकासाकडे अग्रेसर होत, ती सर्वजनकेंद्री होते, हा या देशाचा इतिहास आहे. सर्वजनांचे अधिनायकत्व ज्या समाजव्यवस्थेत येते तो समाज प्रगल्भ खरा. सर्वजनांचे वर्चस्व म्हणजेच वंचित विकासाचा अंत्योदय होय.

 ‘वंचित' : व्युत्पत्ती व व्याप्ती

 वंचित शब्दाचा अर्थ फसलेला, अंतरलेला, उपेक्षित, समाज परीघाबाहेरील अशा अर्थाने सर्वसाधारणपणे वापरला जातो. संस्कृतमध्ये त्याची व्युत्पत्ती वंच्+निय्+कत् अशा प्रकारे सांगितली जाते. त्याचा अर्थ अपेक्षित न मिळालेला, कमतरता असलेला, संकटात सापडलेला, फसवलेला असा होतो. इंग्रजीत याला Deprive हा पर्यायवाची शब्द आढळतो. त्यांचे अनेक अर्थ शब्दकोशात आढळतात. त्यानुसार उपेक्षित समाजवर्ग, गरीब, निराधार, गरजू, तणावग्रस्त, अधिकार वंचित, मूलभूत गरजांपासून उपेक्षित असा घेतला जातो. या सर्व अंगांनी विचार केला तर समाजातील अनाथ, निराधार, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, वृद्ध, कुष्ठरोगी, देवदासी, हंडाबळी, विधवा, परित्यक्ता, कुमारीमाता, बालविवाहिता, भिक्षेकरी, बालगुन्हेगार, वेश्या, दुभंगलेल्या कुटुंबातील मुले, विस्थापित, रोगजर्जर असे सर्व दुःखी पीडित बळी या सर्वांचा समावेश वंचित संज्ञेत होतो. हे पाहता वंचित हा समाजातील संख्येने मोठा परंतु उपेक्षेमुळे दुर्लक्षित राहिलेला असंघटित, अल्पसंख्य वर्गात विखुरलेला विकास अपेक्षी व विकासलक्ष्यी समाजगट होय. या वर्गाने व या वर्गासाठी वेळोवेळी मराठी साहित्याच्या वेगवेगळ्या इतिहास पर्वात सर्व प्रकारचे लेखन आढळते. ते पाहता वंचितांचे साहित्य आजही मराठी साहित्याच्या प्रांतात मध्यप्रवाह बनू पाहात असले, तरी गंगोत्रीच्या रूपाने ते गेले शतकभर विकसित होत राहिले आहे.

 अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेत असताना वंचित साहित्याच्या पाऊलखुणा नाटक, कथा, कादंबरी, आत्मकथा, आठवणी, पत्र, दैनंदिनी

इत्यादी अनेक रूपात आढळतात. वंचित वर्गाचे गद्य साहित्य प्रारंभी समाजहितैषी कार्यकर्त्यांनी कल्याणाच्या भावनेने केलेल्या कार्याची नोंद म्हणून केले. पुढे अशा वर्गातून विकसित झालेल्या लाभार्थी व आश्रितांनी आपल्या अनुभव कथनाद्वारे याला आधुनिक बनवले. त्यामुळे वंचित साहित्याचे वर्गीकरण करत असताना स्थूलरूपाने ते नाटक, कथा, कादंबरी, अनुभवकथन, आत्मकथन, वैचारिक व समीक्षात्मक अशा स्वरूपाचे आढळून येते. सांगितल्याप्रमाणे आधुनिक वंचित साहित्य इतिहासाच्या वर्गवारीच्या दृष्टीने पाहाता तीन कालखंडात ते विभगता येईल.

 १. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य

 २. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य

 ३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य

 १. स्वातंत्र्यपूर्व वंचित साहित्य

 त्र्यंबक नारायण अत्रे यांचे 'गावगाडा' (१९४१) हे पुस्तक स्थूलरूपाने ग्रामीण समाजशास्त्र समजाविते, तसेच ते खेड्यातील समस्या अधोरेखित करते. हे पुस्तक ग्रामीण व दलित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहिले जाते. तसे ते वंचित साहित्याचा मूलाधार म्हणून पाहता येईल. पण खच्या अर्थाने वंचित साहित्याचा प्रारंभ हा महात्मा फुले समग्र साहित्य, महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मवृत्ताने सुरू होतो. त्यात ते स्वतःचे जीवन चरित्र जसे विस्ताराने सांगतात तसेच ते अनाथ मुले-मुली, विधवा स्त्रिया, परित्यक्ता, कुमारी माता यांच्यासाठी केलेल्या समाजकार्याचे वृत्तही सादर करतात. त्यांच्या सहकारी पार्वतीबाई आठवले या 'माझी कहाणी' (१९२८) मध्ये अनाथ बालिकाश्रमासाठी केलेल्या निधी संकलनाचा इतिहास नोंदवत आपली अमेरिकेची वारी सांगत विसाव्या शतकाच्या प्रारंभी या कार्याच्या पार्श्वभूमीवरील समाजमन समजावितात. त्यांच्यानंतर १९३४ ते १९३६ मध्ये ‘लक्ष्मीबाई टिळक' आपल्या स्मृतीचित्राद्वारे स्त्रियांच्या व्यथा-वेदना प्रकर्षाने मांडतात. तद्नंतर १९४३ मध्ये पार्वतीबाई आठवलेंप्रमाणेच हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्य करणा-या कमलाबाई देशपांडे आपले अनुभव कथन ‘स्मरणसाखळी' (१९४३) मधून ओवताना दिसतात. एका अर्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातील वंचितांचे साहित्य हे वंचितांविषयी समाजात भाव साक्षरता निर्माण करताना दिसते. या साहित्यातून वंचित वर्गाची दुरवस्था जशी स्पष्ट होते, तसे समाजाचे सनातनी व पारंपरिक रूपही त्यातून स्पष्ट होते. म. फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महर्षि विठ्ठल

रामजी शिंदे प्रभृतींच्या सामाजिक कार्याच्या पायावरच स्वातंत्र्योत्तर काळातील वंचितांचा विकास झाला व त्यातून कल्याणकारी कार्याचे जाळे विकसित झाले. अशा वर्गातून उभारलेल्या स्त्री-पुरुषांच्या पुरुषार्थाची कथा म्हणजेच स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य होय.

 २. स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्य

 स्वातंत्र्योत्तर वंचित साहित्याचे विहंगमावलोकन करत असताना असे दिसून येते की, स्वातंत्र्यामुळे शिक्षण प्रसार झाला. समाजसुधारणा घडून आल्या. विकास योजनांचा लाभ समाजातील सर्व उपेक्षित वर्गापर्यंत पोहोचला. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ अनाथ, परित्यक्ता, विधवा, कुमारीमाता यांच्या प्रश्नांचा परीघ ओलांडून स्वातंत्र्योत्तर काळात हे वर्तुळ इतके रुंदावते की, यांचा मोठा अचंबा वाटत राहतो की, कुणाचे स्वातंत्र्य? कुणाला स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य? स्वातंत्र्यानंतर वीस-पंचवीस वर्षांचा कालखंड असा आढळतो की, त्या कालखंडात सरळ अंगाने वंचितांबद्दल फारसे लिहिले गेले नाही. याला गती येते ती १९६० नंतर. सन १९६४ ला सत्यभामा सुखात्मे ‘गेले ते दिवस' सारख्या आत्मकथनेतून विवाहबाह्य पुरुष मैत्री सांगण्याचे धाडस करतात. याच काळात एकीकडे हंसा वाडकर ‘सांगत्ये ऐका' (१९७०) च्या माध्यमातून चंदेरी पडद्यामागचं स्त्री जीवनाचं वास्तव किती दारूण असतं ते शब्दबद्ध करतात. तर दुसरीकडे याचवेळी गोदावरी परुळेकर ‘माणूस जेव्हा जागा होतो' (१९७0) सारखी अनुभव कथा लिहून आदिवासी अस्मिता जागराची संघर्षकथा समजावितात. पुढे हीच वाट तुडवत अनुताई वाघ ‘दाभोळच्या जंगलातून' (१९९०) या पुस्तकातून आदिवासी स्त्री व बालकाच्या विकासासाठी वेचलेले श्रम शब्दबद्ध करतात. १९७५ च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं होतं आणि मराठीत स्त्रियांच्या आत्मकथेचा पूर वाह लागतो.

 ३. उत्तर आधुनिक काळातील वंचित साहित्य

 'वेगळ्या वाटेने जाताना' - कुमुद रेगे, ‘बिल्वदल' - अनुताई भागवत, ‘स्नेहांकित' - स्नेहलता प्रधान, ‘मी वनवासी' - सिंधुताई सपकाळ, ‘आठवणीतल्या गोष्टी' - विजया लवाटे, ‘बिनपटाची चौकट' - इंदुमती जोंधळे, ‘चाकाची खुर्ची' - नसीमा हुरजूक अशी एकामागून एक आत्मकथने प्रकाशित होत राहतात आणि मग वंचितांच्या प्रश्नांची नवनवी अंगे, स्त्रियांचे नवे प्रश्न समाजास समजणे शक्य होते. या सर्वांच्या मुळाशी लक्ष्मीबाई टिळक, विभावरी शिरूरकर, काशीबाई नवरंगे यांच्यासारख्यांचं लेखन

असतं, हे विसरून चालणार नाही. ही असते उत्तर आधुनिक वंचित साहित्याची नांदी.
 वंचित साहित्याचा खरा अंक सुरू होतो तो वंचित वर्गातून उभारलेली मुलं-मुली जेव्हा स्वतःस आपली कहाणी समाजास सांगू लागतात तेव्हा. समाजातील तथाकथित उच्चभ्रू, प्रतिष्ठित मानला जाणारा वर्ग हा कसा अनैतिक व भ्रष्ट असतो हे दिसायला लागतं. याची सुरुवात अरुण खोरे यांच्या 'पोरके दिवस'नी सुरू होते. त्यात ते पोरक्या मुलाचे अनुभव विश्व समजावतात. ते उंच भिंती आणि गजाआडचं, रिमांड होमचं जग सताड उघडे करतात. इंदुमती जोंधळे आपल्या ‘बिनपटाची चौकट'मध्ये याच पोरक्या आयुष्याची री ओढताना दिसतात.

 स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या अनुभव कथनांनी समाजजाणिवा प्रगल्भ केल्या, तसंच कार्य नसीमा हुरजूकांची ‘चाकाची खुर्ची', रेणू गावस्करांचं ‘आमचा काय गुन्हा', विजया लवाटेंचं ‘आठवणीतल्या गोष्टी', कुमुद रेगेंचं वेगळ्या वाटेनं जाताना', 'मी वनवासी' सिंधुताई सपकाळ सारखी आत्मकथन करताना दिसतात. यातून वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, अपंग यांच्या व्यथावेदना, प्रातिनिधिक रूपात समाजापुढे येतात. ‘फिटे अंधाराचे जाळे' सारखं भालचंद्र करमरकरांचं पुस्तक त्यांची बहुविकलांग कन्या वल्लरीची संघर्षमय विकास कहाणी बनून पुढे येतं. अशाच प्रकारे मतिमंद अपत्याच्या संगोपनाची झुंजार कथा नीला सत्यनारायण यांचं 'एक पूर्ण-अपूर्ण' (२००६) पण सांगतं. वेश्यांच्या मुलांच्या संगोपनातील अनुभव विजया लवाटे यांचे अलीकडे प्रकाशित झालेलं. ‘स्पर्श मानव्याचा (२००६) सारखं आत्मचरित्र अधिक प्रभावीपणे सांगत राहतं.

 या पार्श्वभूमीवर डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी लिहिलेले ‘खाली जमीन वर आकाश' हे आत्मचरित्र सर्वथा अनाथ असलेल्या मुलाचा नेम नॉट नोन' पासून 'वेल नोन' पर्यंतचा प्रवास समजावतं. इथवरचा सारा प्रवास म्हणजेच वंचित साहित्याच्या विकासाचा प्रवास होय.

 या सर्व साहित्यातून हे स्पष्ट होतं की, आधुनिक मराठी साहित्यात वंचितांच्या व्यथा-वेदनांचं असं एक साहित्यविश्व आहे की जे, मराठी साहित्यातील अन्य माक्र्सवादी, आंबेडकरवादी, देशीवादी, जनवादी, स्त्रीवादी, अस्तित्ववादी, सौंदर्यवादी, गांधीवादी, मानवतावादी, कृषीवादी (ग्रामीण) साहित्य प्रवाहांप्रमाणेच एक स्वतंत्र व स्वायत्त साहित्य प्रवाह असून तो रोज नुसता पसरतो आणि वाहतो असा नसून तो प्रतिदिन समाजमनात

खोल-खोल रुजो आहे. जणू काही हा नवा साहित्य प्रवाह मराठी सारस्वतास असं समजावण्याचा प्रयत्न करतोय की, प्रत्येक फुलाप्रमाणे प्रत्येक माणसास विकसित होण्याचा स्वतःचा असा स्वायत्त अधिकार आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांचे पाझर नव्या भावजागरामुळे समाजाच्या सर्व वर्गात जाति-धर्माच्या ओळखीपलीकडे जाऊन माणूसपणाच्या अंगाने समाजमनी नव्या खुणा रुजविते. त्यातून एक नवं सामाजिक स्वास्थ्य व सौंदर्य विकसित होतंय. बागेत गुलाबास जसा मिरविण्याचा अधिकार असतो तसाच तो लिलीच्या छोट्या फुलासही असतो. हेच वंचित साहित्य समाजास समजावतं.

 जात-धर्माच्या पलीकडे हे साहित्य ज्या माणूसधर्माची पखरण करतं त्यातून जातिअंताचा लढा पुढे जातो आहे. महात्मा फुल्यांनी कधी काळी ‘आपल्या आश्रमात आंतरजातीय लग्ने लावली जातील' असे निक्षून सांगत, जातिधर्म निरपेक्ष केवळ माणूस नामक समाजनिर्मितीचा संकल्प सोडला होता. तो ‘खाली जमीन वर आकाश'सारख्या आत्मकथनातून अधिक ठळकपणे पुढे येतो, हे नाकारून चालणार नाही. एकविसाव्या शतकातील मराठी साहित्य हे जातिधर्म निरपेक्ष वंचित धर्माचं साहित्य असेल, हे ‘खाली जमीन वर आकाश'मुळे स्पष्टपणे लक्षात येते.

▄ ▄

राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य



 भारतीय साहित्याचे प्रांगण हे मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बंगालीसारख्या विविध भाषासाहित्याने फुललेले आहे. या साहित्यात एका भाषेत विविधभाषी लेखकांनी केलेल्या योगदानाचा जर विचार करायचा झाला, तर हिंदी ही एक अशी समृद्ध भाषा आहे की जिच्यात विविध भाषांच्या साहित्य विधांचे प्रवाह येऊन मिसळलेले आहेत. त्यामुळेच आजमितीस तरी भारतीय साहित्य प्रतिनिधित्व हिंदीकडे देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्याचे प्रतीक म्हणूनच आज विदेशात हिंदी भाषेतील साहित्य भारतीय म्हणून ओळखले जाते. भारतात दूरदर्शनसारख्या प्रचार माध्यमाने तर अलीकडे हिंदीस व्यवहाराने राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी प्रादेशिक साहित्याचे हिंदी रूपांतर आवश्यक झाले आहे. हिंदी भाषेत विविध प्रादेशिक भाषा साहित्यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होतात. शिवाय हिंदी साहित्यास राष्ट्रीय साहित्याचा दर्जा प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. ज्या विविध हिंदी भाषी प्रदेशांनी हिंदीस समृद्ध केले आहे त्यात राजस्थानचे योगदान महत्त्वपूर्ण मानावे लागेल. हिंदी भाषा व साहित्याच्या प्रारंभिक कालापासूनच राजस्थानचा दृढ संबंध आहे. हिंदीची बोली म्हणून राजस्थानी हिंदीचे आगळे महत्त्व होते व आहे. परंतु राजस्थानची साहित्यिक भाषा हिंदीच आहे. आज राजस्थानी साहित्य हे हिंदी साहित्याचे अविभाज्य अंग बनले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर राजस्थानने साहित्य सृजन क्षेत्रात कमालीची आघाडी मिळविली आहे.

 १. कविता

 स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे इतिहासाच्या चश्म्यातून पाहावयाचे झाले, तर त्यास उत्तर छायावादी काव्य म्हणून संबोधायला लागेल. हिंदी समीक्षकांनी

या काव्यास प्रयोगवादी काव्य अशी संज्ञा देऊ केली आहे. पुढे नवकाव्य म्हणूनही ते ओळखण्यात येऊ लागले. हिंदी कवितेतील स्वातंत्र्योत्तर युगाचा प्रारंभ हा दुस-या ‘तारसप्तका' (१९५१) पासून मानायला हवा. निसर्गात रमलेल्या व आत्मा परमात्म्याच्या संघर्षात गुंतून राहिलेल्या हिंदी कवितेत व्यक्तिवादी चिंतनाची झळाळी आली. सर्वश्री मुक्तिबोध, अज्ञेय, गिरिजाकुमार माथुर, केदारनाथ, अग्रवाल, नागार्जुन, शमशेर बहाद्दर सिंह, केदारनाथ सिंह, भवानी प्रसाद मिश्र, धर्मवीर भारती, नरेश मेहता, सर्वेश्वर दयाल सक्सेना, कुंवरनारायण सारख्या कवींच्या काव्य प्रतिभेने हे युग प्रभावित झाल्याचे दिसून येते. राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात जे काव्य लिहिले गेले त्यावर उपरोक्त कवींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या काळात राजस्थानमध्ये अनेक कवितासंग्रह जसे प्रकाशित झाले, तसेच अनेक नियतकालिके उदयाला आली ती याच काळात. मणि मधुकर लिखित ‘खंड खंड पाखंड पर्व' यासारख्या दीर्घ कवितेपासून ते ओमकार पारीखच्या लघुतम काव्यापर्यंत अनेक आकार, प्रकारच्या कवितांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कविता बहरलेली व भारलेली दिसून येते.
 रामगोपाल (‘आयाम' १९६१), जुगमन्दिर तायल (‘धूप भरी सुबह १९६४), डॉ. रणजीत ('ये सपने ये प्रेत' १९६४), हरीश भदाणी (‘सुलगते पिंड' १९६६), कन्हैयालाल सेठिया (‘खुली खिडकी, चौडे रास्ते' १९६७), त्रिभुवन चतुर्वेदी (हथेलियों में ब्रह्मांड' १९७0), ओमकार पारीख (‘एक पंख आकाश') सारखे कवी या काळात उदयाला आले. त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये निसर्गवर्णनाची नवी दृष्टी आढळते. प्रेमानुभूतीतील नवनवे संदर्भ मानवाच्या समग्र जीवनास स्पर्शणारे आहेत. समाजातील द्वंद्वात्मक संबंधाचे मार्मिक चित्रण हे या कवितांचे ठळक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. राजस्थानी मातीचा मोहक गंध या कवितेत आपसूकच दिसून येतो.

 राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात नवकवितेस आंदोलनाचे स्वरूप आले असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. केवळ कवितेस समर्पित असलेली नियतकालिके प्रकाशित करणे हे धाडसाचेच काम असते. पण राजस्थानात मात्र तसे धाडस लीलया घडले आहे. 'लहर', ‘वातायन', 'बिंदू’, ‘अकथ', ‘कविता' ही नियतकालिके या संदर्भात लक्षात घेता येतील.

 राजस्थानातील स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे संख्या आणि गुण दोन्ही कसोट्यांवर सफल दिसून येते. राजस्थानातील कवींनी आधुनिक जीवनबोधाचे सुंदर चित्र उभे केले आहे. त्यात अनुभूती वैचित्र्याबरोबर शैलीची विविधताही

आहे. प्रतीकपद्धतीपासून ते सर्वसाधारण वर्णन पद्धतीपर्यंत शैलीचे सर्व मार्ग या कवितेने चोखाळले आहेत. या कवितेत सामाजिक प्रबोधनाची शक्ती जशी आहे तशीच व्यक्तिगत भावभावनांचे प्रत्ययकारी चित्रण करण्याची आकांक्षाही आहे. समग्रतः स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्यात राजस्थानी कवितेने मोलाची भर घातली आहे, हे मान्य करायला हवे. प्रादेशिक भाषेचा ठसा व संस्कार घेऊन विकसित झालेल्या या कवितेने हिंदी साहित्येतिहासात राजस्थानी हिंदी कविता असा ठसा जरी उमटविला नसला, तरी या काव्याच्या मूल्यांकनाशिवाय हिंदी काव्याचा इतिहास पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.

 २. कथा

 आधुनिक हिंदी कथा-साहित्याची जन्मभूमी म्हणून राजस्थानचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक हिंदी साहित्यात मानाचे स्थान मिळविलेल्या कथा ‘उसने कहा' (चंद्रधर शर्मा गुलेरी'), ‘गदल' (रांगेय राघव) निर्माण झाल्या त्या राजस्थानातच. हिंदी कथेच्या प्रारंभापासूनच राजस्थानने मोलाची भर घातली आहे. ओमकारनाथ 'दिनकर' शंभूदयाल सक्सेना, विष्णू अंबालाल जोशी इत्यादी कथाकारांनी आदर्शवादी कथांची परंपरा विकसित केली, तर मोहनसिंग सेंगर, रांगेय राघव, यादवेंद्र शर्मा ‘चन्द्र' सारख्या कथाकारांनी प्रेमचंद, यशपाल परंपरेच्या यथार्थवादी कथा लिहिल्या. राजस्थानत अज्ञेय, जैनेंद्रांच्या कथांचा वारसा मूळ धरू शकला नाही. पण नवकथेच्या प्रांगणात मात्र मन्नू भंडारी, मणि मधुकर यांसारखे कथाकार चमकल्याचे दिसून येते. राजस्थानातील स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा साहित्याच्या विकासात दैनिके व नियतकालिकांचा फार मोठा वाटा आहे.

 ओमकारनाथ 'दिनकर' लिखित ‘समस्या और समाधान', ‘अपने अपने दायरे', 'सांझ का संगीत’, ‘और बारात लौट गयी' या कथा वाचकास मोहून टाकतात. या कथातील भावुकता खचितच भुरळ घालणारी आहे. विष्णू अंबालाल जोशींच्या ‘कवि का स्वप्न', 'करणी', 'गणेश' या कथा उल्लेखनीय आहेत. सांप्रदायिक संघर्षावर बेतलेली त्यांची कथा ‘गुमटीवाला' ज्यांनी वाचली असेल त्यांना कथाकाराच्या लेखनशैलीचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. रांगेय राघव व मोहनसिंग सेगर हे अलीकडील उल्लेखनीय कथाकार होत. रांगेय राघवांनी सुमारे तीनशे कथा लिहिल्या आहेत. ‘गदल' शिवाय ‘प्रवासी’, ‘नई जिन्दगी के लिए', 'कुत्ते की दुम', 'पंच परमेश्वर या त्यांच्या उल्लेखनीय कथा होत. उत्तर व दक्षिणेतील सांस्कृतिक सामंजस्य

निर्माण करणाच्या त्यांच्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात. ग्रामीण संस्कृतीचे सुंदर चित्रण त्यांच्या अनेक कथांतून दिसून येते. यशपालांच्या साम्यवादी चिंतनाचा वसा घेऊन रांगेय राघवांनी हिंदी कथेत यथार्थवादी चित्रण परंपरेचा विकास केला. याच काळातील श्री. विजयदान देथा यांनी राजस्थानी कथा साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी पारंपरिक लोककथांना वेगळे वळण देऊन त्यांच्या माध्यमातून आधुनिकतेचा आविष्कार केला आहे. यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' यांनी ‘राम की हत्या', 'एक देवता की कथा', 'एक इन्सान की मौत’, ‘एक इन्सान का जन्म' इत्यादी कथांतून मानवी संबंधांचे सुंदर चित्रण केले आहे. अशाच प्रकारच्या कथा सुमेरसिंह दईया, विशन सिन्हा यांनी लिहिल्या आहेत. मन्नू भंडारींच्या ‘ऊँचाई’, ‘चश्मे', ‘अकेली', ‘क्षय', 'यही सच है', 'नशा' या कथांनी हिंदी कथेत नवे वळण निर्माण केले आहे.

 नव्या पिढीतील कथाकार रामकिशोर जेमिनी यांनी ‘देवालय की ओर', ‘कुहरा छंट गया', 'बीस मील का पत्थर' या आपल्या कथांतून नकारात्मक भूमिका मांडली आहे. या त्यांच्या नकारात्मक विचारांवर प्रेमवंद, यशपालांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. 'एक वृत्त और' , 'जर्सी’ , ‘यादें' या कथांतून प्रेमचंद गोस्वामींनी समस्याप्रधान कथा लेखनांची परंपरा दृढमूल केली. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणा-यात दयाकृष्ण विजय एक महत्त्वपूर्ण नाव. ‘उलझन' हा त्यांचा कथसंग्रह या संदर्भात लक्षात राहतो. हरिशंकर परसाईंच्या हिंदी कथांतील नरम विनोदी सीताराम महर्षीच्या ‘माफ कीजिएगा'मध्ये दिसून येतो. ‘शाली साहबा की शादी' मनोहर वर्माचा कथासंग्रह श्रीलाल शुक्लांच्या कथांची आठवण करून देतो. सर्वश्री ईश्वरचन्दर, शरद देवडा, रमेश उपाध्याय, मणि मधुकर, स्वयंप्रकाश, राम जैसवाल, अशोक आत्रेय, शचीन्द्र उपाध्याय, परेश, राजानंद, पानू खोलिया, नफिस आफरिदी, आलमशहा खान अशा कितीतरी कथाकारांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कथेस पुढे नेऊन राजस्थानी योगदान स्पष्ट केले आहे. मानवी संबंधांच्या विविध दृश्यसंबंधांनी राजस्थानची स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा समृद्ध झाली आहे.

 ३. कादंबरी

 हिंदी कादंबरीच्या विकासास गेल्या शंभर एक वर्षांची सुदीर्घ परंपरा कारणीभूत आहे. या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे विहंगमावलोकन केल्यास असे दिसून येते की, हिंदी कादंबरीच्या प्रारंभापासूनच तिचा राजस्थानच्या मती व मातीशी घनिष्ठ संबंध जडलेला आहे. हिंदीतील

पहिली कादंबरी १८८२च्या सुमारास प्रकाशित झाली. हिंदी कादंबरी समीक्षेतील मान्यवर विज्ञान डॉक्टर गोपाल राय यांनी राजस्थानची पहिली हिंदी कादंबरी ‘आश्चर्य वृत्तांत' (पं. अम्बिकादत्त न्यास) ही सन १८६२ मध्ये लिहिली गेल्याचा दावा केला आहे. हिंदी कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात ज्या मेहता लज्जाराम शर्माच्या 'स्वतंत्र रमा और परतंत्र लक्ष्मी', ‘हिन्दू गृहस्थ', ‘आदर्श दम्पत्ति' या कादंब-या गाजल्या ते मेहता हे राजस्थानचेच. स्वातंत्र्यपूर्ण काळापर्यंत हिंदी कादंबरीच्या क्षेत्रात सातत्याने लेखन करायची परंपरा राजस्थानी कादंबरीकारांनी टिकवली आहे. तीच गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळाची. स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानी कादंबरीकारांनी सुमारे चारशे कादंब-यांची हिंदीत भर घातली आहे. संख्यात्मक वृद्धीबरोबर गुणात्मक योगदानातही राजस्थानी कादंबरीकार आघाडीवर राहिले आहेत.

 स्वातंत्र्योत्तर काळात रांगेय राघव, मणि मधुकर, डॉ. पुरुषोत्तम आसोपा, यादवेन्द्र शर्मा चन्द्र', श्री. गोपाल आचार्य यांसारख्या कादंबरीकारांच्या रचना उल्लेखनीय म्हणून सांगता येतील. 'हजुर', 'मुर्दोका टीला, ‘दायरे', ‘कब तक पुकारू' या आपल्या कादंब-यांतून रांगेय राघवांनी शोषण, साम्राज्यवाद, हुकूमशाही, विषमता इत्यादीबद्दलचा असंतोष व्यक्त केला आहे. मणि मधुकर लिखित ‘पत्तों की बिरादरी’, ‘सफेद मेमने' या कादंब-या राजस्थानी जनजीवन अभिव्यक्त करताना दिसून येतात. ‘पाँव मे आँखवाले' ही यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' ची कादंबरी महानगरी जीवनातील मूल्य संभ्रमण चित्रित करते. ‘साक्षी है क्षिप्रा’, ‘शाह और शिल्पी', 'अमृतपुत्र' सारख्या ज्ञान भरिल्लंच्या कादंब-यांनी ऐतिहासिक कथाविश्व निर्माण केलं आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळात कवितेनंतरची गतिशील साहित्य विधा म्हणून कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. राजस्थानी कादंबच्यांनी हिंदी कादंब-यांत अनुभव, शैली, जीवन संस्कृती इत्यादींची विविधता आणली. कादंबरीस जीवनाभिमुख करण्यात या कादंब-यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रांगेय राघवसारखा सशक्त कादंबरीकार हे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यास लाभलेले वरदानच म्हणावे लागेल. राजस्थानातील गोष्टींचे सूक्ष्म चित्रण झाले आहे. ते वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. साहित्याच्या अन्य प्रांगणांप्रमाणे राजस्थानी कादंबरीनेही हिंदी कादंबरी साहित्यास समृद्ध केले आहे. ही समृद्धी परिमाण व परिणाम या दोन्ही कसोट्यांवर पारखून घेता येईल इतकी स्पष्ट आहे. प्रारंभापासून ते आजपावेतो राजस्थानी कादंबरीने हिंदी साहित्यात मोलाची भर घातली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

 ४. नाटक

 राजस्थान हा लोकनाट्याची समृद्ध परंपरा असलेला प्रांत म्हणून ओळखला जातो. राजस्थानात राजस्थानी लोकनाट्य परंपरेशिवाय हिंदी समकालीन नाटक परंपरेतील नाटके पण लिहिली गेली आहेत. हिंदी नाटकं शहरी मध्यमवर्गीय प्रेक्षकांपर्यंतच मर्यादित राहिली. याउलट राजस्थानी परंपरेतील नाटकांना मात्र जनमानसात, विशेषतः ग्रामीण प्रेक्षकवर्गात फार मोठी लोकप्रियता मिळाली. कमजोर संहिता व सुमार अभिनय क्षमता या दोन बाबींमुळे हिंदी परंपरेतील नाटके संहिता प्रकाशनापलीकडे फार यश मिळवू शकली नाही असे दिसून येते. एकट्या हमीदुल्लांचा अपवाद सोडला तर रंगमंचाच्या अनिवार्य कसोटीवर फारच थोडी नाटके हाती लागतात. तथापि, सर्वसाधारणपणे सर्वश्री मणि मधुकर, नंदकिशोर आचार्य, रिजवान जहीर उस्मान, राघव प्रकाश, अर्जुनदेवाचारण या नाटककारांनी राजस्थानी हिंदी नाटक परंपरा समृद्ध केली असे दिसून येते.

 राजस्थानी लोकनाट्य परंपरेचा प्रभाव घेऊन रचलेल्या नाटकांत मणि मधुकरांची ‘खेला पोलमपुर' व 'दुलारीबाई' उल्लेखनीय होत. ‘खेला पोलमपुर'मध्ये मणि मधुकरांनी राजस्थानातील सामंती परंपरा व प्रथांचे चित्रण केले आहे. या नाटकात अनेक ठिकाणी हे कसं काय शक्य आहे, यासारखे प्रश्न प्रेक्षक व वाचकांच्या मनात निर्माण होतात; पण या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे लोकनाट्यावर बेतलेले नाटक आहे. लोकनाट्यात का, कसे, सारखे प्रश्न गैरलागू ठरत असताना समरू जाट व विधवा जडिया यांच्या जीवनसंबंधांवर हे नाटक रचलेले आहे. सामंती कालात विलासी जीवन, राजमहाल, वाडे इत्यादींमधील प्रथा, संकेत यांचे हुबेहूब चित्रण हे या नाटकाचे वैशिष्ट्य होय. त्यांचे दुसरे नाटक ‘दुलारीबाई'मध्ये पारसी शैली व कुचामणी ख्याल यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. मणि मधुकरांनी संत कबीरदासांच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहिलंय ‘इकतारे की आँख'. याच विषयावर हिंदीतील सुप्रसिद्ध कथाकार श्री. भीष्म सहानींनी ‘कबीर खड़ा बाजार में लिहिलंय. मणि मधुकरांच्या तुलनेत भीष्म सहानींचं नाटक उजवं वाटतं. नाटकात शब्दांपेक्षा मूकभाषेस (नाट्यभाषा) महत्त्व असते. अभिनय क्षमता हे नाटकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या कसोटीवरच नाटकाची तुलना करायला हवी.

 हमीदुल्लांना राजस्थानचे लक्ष्मीनारायण लाल मानलं जातं. हिंदीत लक्ष्मीनारायण लाल यांनी विविध प्रयोग केले तसेच राजस्थानी नाट्यसाहित्यात

हमीदुल्लांनीही केले. 'जैमती भोजा', 'एक और युद्ध’, ‘समय संदर्भ', ‘ख्याल भारमली', 'हर बार’, ‘उलझी आकृतियाँ' ही त्यांची नाटके खूप गाजली. ‘जमैती भोजा' हे अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं नाटक राजस्थानातील बगडावत देव नारायण महागाथेवर आधारित आहे. वृत्तपत्रातील कात्रणांप्रमाणे तुटक प्रसंगांवर ‘एक और युद्ध' रचलं गेलं आहे. प्रयोगाच्या दृष्टीने या नाटकाचे आगळे महत्त्व आहे. चेक नाटककार कारेल चापेक यांच्या ‘आर. यू. आर.' चा प्रभाव ‘समय संदर्भ'वर स्पष्टपणे दिसून येतो. ‘हर बार' व ‘उलझी आकृतियाँ' ही दोन्ही नाटकं भ्रष्टाचाराचे चित्रण करतात. हिंदीतील प्रख्यात विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांनी आपल्या ‘सदाचार का तावीज' कथेत भ्रष्टाचारास देव मानले आहे. ईश्वराप्रमाणे तो सर्वव्यापी, आकारहीन असून न दिसणारा, प्रचिती देणारा आहे म्हणून त्यांनी भ्रष्टाचारास ‘मायक्रोस्कोपिक एलिमेंट' मानले आहे. हमीदुल्लांनी कार्यालयापासून घरापर्यंत पसरलेल्या भ्रष्टाचाराचे चित्रण उपरोक्त नाटकांत केले आहे.

 रिजवान जहीर उस्मानांची ‘लोमडियाँ', 'सुन लडकी दबे पाँव आते है। मौसम' ही नाटके रंगमंचावर आली व गाजलीही. डॉ. राजानंद यांची ‘गुंफा', 'बोल मेरी मछली कितना पानी', 'बाढके बाद', 'ग्राण्ड फादर उर्फ दादाजी' ही नाटकेही याच परंपरेतील म्हणून सांगता येतील. मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद हिंदी नाट्यसृष्टीचे एक आकर्षणकेंद्र बनली आहे. राजस्थानी हिंदी रंगमंचावर जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर यांनी अनेक नाटके हिंदी रूपांतरात सादर झाली आहेत.

 कविता, कथा, कादंबरी, नाटक या प्रमुख साहित्या विधानांप्रमाणेच निबंध, एकांकिका, शब्दचित्र, समीक्षा, पत्रकारिता, प्रवासवर्णन इत्यादी प्रांतात राजस्थानी लेखकांनी मोलाची भर घातली आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य हे हिंदीच्या राष्ट्रीय प्रवाहानुरूप लिहिले गेले आहे. वर सांगितल्याप्रमाणे राजस्थानी मातीचा स्पर्श असलेले हे साहित्य सांस्कृतिक संदर्भात वेगळे वाटत असले, तरी ते हिंदी साहित्य प्रवाहाचे अभिन्न अंग म्हणूनच पुढे येते. या साहित्यास स्वतंत्रपणे ‘राजस्थानी साहित्य अशी उपाधी देता येणार नाही. लोकजीवन व लोकसंस्कृतीचा विलक्षण प्रभाव राजस्थानच्या स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यावर आढळतो. सामंती प्रथेपासून मुक्त होऊन आधुनिक भारतीय जनजीवनाच्या प्रवाहात येऊन मिसळण्याची तीव्र इच्छा या साहित्यात व्यक्त होते. राजस्थानी लेखक हा प्रांतवादात

गुरफटत राहिला नाही. या साहित्यात दिसून येणारी उदारमतवादी वृत्ती अनुकरणीय व अभिनंदनीय आहे. भारतीय लोकजीवनाचे प्रत्यंतर देणारे राजस्थानी हिंदी साहित्य हे स्वातंत्र्योत्तर काळास लाभलेले वरदान आहे. शेजारच्या पंजाबसारख्या प्रांतास राजस्थानी साहित्यातून बरेच घेण्यासारखे आहे.

▄ ▄

सार्वजनिक ग्रंथालये : काल, आज आणि उद्या



 मनुष्य विकासाचे प्रतीक : ग्रंथालय-

 माणूस मूलतः पशू असला तरी त्याच्यात अनेक वृत्ती, खुणा, लकबी, शक्ती, कौशल्ये अशी आहेत की त्यास त्या गोष्टी त्याच्या प्राणीपणापासून वेगळ्या करतात. ते त्याच्यातलं दुस-या परीनं प्राणीश्रेष्ठत्वही ठरतं. माणसाचा शारीरिक विकास जसा हजारो वर्षांचं उत्क्रांत भौतिक रूप तसंच त्याचं बौद्धिक, मानस नि भावनिक स्थित्यंतरही! त्याचं टोळीत राहणं, गुहेत विसावणं, शेकोटी पेटवणं, शिकारीनंतर शेती करणं या गोष्टींनीही तो विकसित होत गेला. मौन अभिव्यक्ती जाऊन, ओरडणं सोडून त्याचं बोलू लागणं हा त्याच्या नागर होण्याचाच एक आविष्कार होता. घर बांधणं, सजवणं यातून तो स्थिर झाला. प्रारंभीच्या काळी शिकार, युद्ध इत्यादी नंतरचं त्याचं रोमांचक ओरडणं, आरोळी ठोकणं, प्रतिपक्षाला आवाहन देणं या त्यांच्यातील शक्तिप्राबल्याच्या आविष्काराच्या गोष्टी होत्या. विजयानंतरचा त्याचा उन्माद ही त्याचीअभिव्यक्तीच होती. यातून मग गीत, नृत्य उदयास आलं. युद्धगीतं म्हणजे सामूहिक आविष्करणच! जी गोष्ट तो मुठी आवळून, दात घट्ट आवळून, स्नायू ताणून व्यक्त करायचा त्याला लय, संगीतानं थंड नसलं तरी ढिलं जरूर केलं. ते त्याचं एका परीनं मानवीकरणच होतं.

 जंगलात असताना अणकुचीदार दगडांनी झाडांच्या बुंध्यांवर कोरणं, गुहेत राहताना दगडावर रेघोट्या मारणं असं आरेखन, रेखांकन नि पुढे चित्र काढणं एकीकडे त्याचं व्यस्त होणं होतं. तर दुसरीकडे ती त्यांच्या स्मृती, घात-आघातांची नोंदही होती. ते त्याचं असणं (being) अस्तित्व नोंदणं, खोदणं होतं. यातून तो 'स्व' शोधू पाहत होता. त्याच्यातील स्वामित्वाच्या

खुणा पशू, वस्तूवरील त्याच्या खुणा, चिन्हांतून होऊ लागल्या. हे त्याचं लिहिणं प्रारंभी त्याची व्यकितगत नोंद होती. त्या नोंदींचं संप्रेषण निकटस्थ, टोळी, गट, कुटुंबात विस्तारित होऊन नोंदीच्या वाचनास प्रारंभ झाला. गूढ चित्रे, कूट संकेत यातून अभिव्यक्ती विकास झाला. त्याचे ठसे घेणं, त्याच्या एकापेक्षा अनेक आवृत्त्या करणं ही माणसाच्या मुद्रणकलेचा प्रारंभ होता. भूर्जपत्र, चामडे, चिखलांचे ठोकळे यावर उठवण्याच्या कलेनं लेखन, मुद्रण, वाचन विकास घडवून आणला. अशा साधन संग्रहातून ग्रंथ उदयास आले. त्यांची संग्रहालये झाली. ती म्हणजे आमची ग्रंथालये होत.

 ग्रंथालय विकास -

 लेखन विकासामधुन लिपी निर्माण झाली. लिपी म्हणजे लेखन व वाचनाचं सार्वत्रिक रूप. जगातील प्राचीन लिपी इजिप्तमधील मेसेपोटेमियातील क्युनिफॉर्म ही मानली जाते. ती चित्रलिपीच होती. तिचा काळ इ. स. पूर्व ३००० मानला जातो. पण लेखनास ग्रंथरूप येऊन त्यांचे संग्रहण होण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा काळ जावा लागला. सर्वांत प्राचीन ग्रंथालय म्हणून अशिरियन राजा अशुरव निपालचा राजप्रासाद मानला जातो. त्यांच्या ग्रंथालयात क्यूनिफॉर्म लिपीतील विटांवर कोरलेले विविध ग्रंथ होते. ते प्रेमकाव्य, महाकाव्य, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी विषयांना वाहिलेले होते. त्याच्य संग्रहात २०,००० अशा विटा होत्या. त्या आज ब्रिटिश म्युझियममध्ये संग्रहित आहेत.

 पुढे लेखनकलेचा विकास होऊन पॅपिरस वनस्पतीपासून तयार केलेल्या रिळांवर लिहिले जाऊ लागले. याच काळात शाई, रंग, लेखणी इत्यादी लेखन साधनांचा विकास झाला. काही काळानंतर पॅपिरस रिळांची जागा चमड्याच्या पानांनी घेतली. प्रारंभी चमड्यांची रिळेच असत. नंतर चमड्यांच्या सुट्या पानांवर लिहन त्यांची बांधणी करण्याची पद्धत रूढ़ झाली. अशा ग्रंथांना कोडेक्स म्हणत. त्या वेळी लेखन जिकिरीचे व जोखमीचे काम मानले जाई. लेखक म्हणत, 'लेखन जरी दोन बोटाने होत असले तरी सारे अंग ते मोडते.' हा काळ इ. स. पूर्व ६०० ते ७०० चा मानला जातो. यापूर्वी चीनमध्ये इ. स. पूर्व १३०० च्या दरम्यान लाकूड, बांबूवर लिहिले जाई. इ. स. ४०० पासून पॅपिरसचा प्रयोग बंद झाला.

 रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर पाचव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत ग्रंथांची जोपासना व विकासाचे कार्य प्रमुखतः ख्रिश्चन चर्चेसनी केले. तत्पूर्वी बाराव्या शतकात जगातील विविध विद्यापीठांनी ग्रंथ विकासास

चालना दिली. पंधराव्या शतकात सन १४३९ मध्ये गटेन्बर्गने लावलेल्या मुद्रणकलेच्या शोधामुळे ग्रंथ व्यवहारात खरी क्रांतीच आली. त्या शतकात चाळीस हजार ग्रंथांची निर्मिती झाली. गेल्या पाच हजार वर्षांत लक्षावधी ग्रंथ निर्माण झाले. आज प्रतिवर्षी कोटीच्या घरात ग्रंथ निर्मिती होते. जगात असा देश नाही, जिथे ग्रंथ नाही वा निर्मिती नाही. यावरून ग्रंथालय विकासाची व्याप्ती व महत्त्व अधोरेखित होते. सारं जग साक्षर करण्याचा ध्यास म्हणजे सारं जग ग्रंथमय करण्याचंच अभियान होय.

 जगातील श्रेष्ठ ग्रंथालये-

 सार्वजनिक ग्रंथालयांचा उदय हा राज्ये स्थापन होण्यापूर्वीपासूनचा मानला जातो. राजेशाही, धर्म साम्राज्ये यांच्या काळातही ग्रंथालये होती. पण तिचे स्वामीत्व राजा व संस्थेचे असायचे. तिचा वापर राजा, दरबारी, अमीर-उमराव करत. सार्वजनिक व्यवस्थेचा उदय हा प्रजाकें द्री राज्यनिर्मितीबरोबर झाला. सर्वाधिक जुने सार्वजनिक ग्रंथालय म्हणून इजिप्तच्या अलेक्झांड्रिया ग्रंथालयाचा उल्लेख केला जातो.

 कल्याणकारी राज्य कल्पनेचा उदय झाल्यानंतर सार्वजनिक पैशातून कर गोळा केला जाऊ लागला. करातून कल्याणकारी योजनांची सुरुवात झाली. त्यापैकी सार्वजनिक ग्रंथालय एक होते. जगातली जी जुनी व मोठी ग्रंथालये आहेत, ती शासन निधीतून उभारली. आजही ती शासकीय अनुदानातून चालवली जातात. जगात ग्रंथव्यवहारास चालना देण्यासाठी युनेस्कोसारखी संघटना कार्य करते. शिवाय वर्ल्ड लायब्ररी काँग्रेससारख्या संस्थाही याबाबत वरचेवर पुढाकार घेऊन ग्रंथ वर्ष, ग्रंथ सनद, ग्रंथ करार, ग्रंथ देवघेव इत्यादी संबंधाने जागतिक धोरण, नीतिनियम ठरवत असते. आज ग्रंथालयशास्त्र विकसित झाले असून त्याद्वारे ग्रंथ नियमन, वर्गीकरण, संग्रहण, प्रशिक्षण इत्यादी बाबतीत जागतिक, सार्वत्रिक अशी प्रतिमाने निश्चित केली जातात. जगातील खालील श्रेष्ठ ग्रंथालये या संदर्भात आदर्श मानली जातात.

 भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांचा विकास-

 भारतातील सार्वजनिक ग्रंथालय विकासास गती मिळाली ती मे १८0८ मध्ये. त्या वर्षी रजिस्ट्रेशन ऑफ पब्लिकेशन अॅक्ट बाँबे अंमलात आला. त्यामुळे एतद्देशीय ग्रंथ व्यवहार ब्रिटिश नियंत्रणाखाली आला. त्यामुळे इंग्लंडच्या धर्तीवर इथे ग्रंथ प्रकाशन व विक्रीस प्रोत्साहन मिळाले. त्यातून सन १८८१ मध्ये कलकत्ता लायब्ररीची स्थापना झाली. लॉर्ड कर्झनच्या

कार्यकालात ३१ जानेवारी १९०२ मध्ये इंपिरियल लायब्ररी अँक्ट मंजूर करण्यात येऊन राष्ट्रीय पातळीवरचे ग्रंथालय उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यानुसार कलकत्ता लायब्ररीस 'इंपिरियल लायब्ररी'चा दर्जा देण्यात येऊन तिच्या विकासाची योजना आखण्यात आली. ही घटना १९०६ ची. यामुळे देशातत सर्वत्र सार्वजनिक ग्रंथालये अशाच धर्तीवर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी जी वेगवेगळी संस्थाने होती, त्या संस्थानांनी आपापल्या राज्यक्षेत्रात ग्रंथालये सुरू केली होती. तत्कालीन संयुक्त महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मराठी ग्रंथालये बडोदे, कोल्हापूर, सावंतवाडी, सांगली, जमखंडी इत्यादी ठिकाणी सुरू होती. अशा ग्रंथालयांना आधुनिक करण्याच्या योजनेअंतर्गत राजे सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याची आपली लायब्ररी विकसित करून मुक्तद्वार बनवली. (Open Access System) शिवाय ग्रंथ वर्गीकरण व परिगणन पद्धतींचा अवलंब करण्यात आला. त्याची चर्चा भारतभर होऊन ग्रंथालय क्षेत्रात आधुनिकीकरणाची लाट आली. त्यामुळे नव्या वातावरणात आंध्र प्रदेशातील बेसवाडा इथे ग्रंथालय कर्मचारी संघाचे अधिवेशन पार पडले. सन १९१८ मध्ये लाहोरमध्ये अखिल भारतीय ग्रंथालय परिषद संपन्न झाली. सन १९३४ मध्ये अखिल भारतीय सार्वजनिक ग्रंथालय अधिवेशन मद्रासमध्ये भरले. त्यात सार्वजनिक ग्रंथालय विकासावर भर देण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यावर सन १९४८ मध्ये 'इंपिरियल लायब्ररीचे रूपांतर 'नॅशनल लायब्ररी'मध्ये करण्यात येऊन ग्रंथ प्रकाशन, नोंद, संग्रहण, संशोधन, सुधारणा इत्यादी जबाबदारी त्या ग्रंथालयांवर सोपविण्यात आली. सदरचे ग्रंथालय राजाराम मोहन रॉय ग्रंथालयाच्या रूपाने आज राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक ग्रंथालय विकासाचे कार्य करत आहे.

 जागतिकीकरणाची आव्हाने व संगणक क्रांती-

 आज भारतातील सार्वजनिक ग्रंथालये संगणक क्रांतीमुळे आणि जागतिकीकरणाने ज्ञानासक्त समाजापुढे ठेवलेल्या नव्या आव्हानांमुळे कात टाकत आहे, हे खरे असले तरी माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक प्रगती पाहता आपल्या बदलाची गती कासवाचीच ठरते. हे पाहून भारत सरकारने नेमलेल्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने (National Knowledge Commission) ग्रंथालयांवर स्वतंत्र अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार ग्रंथालये बदलत्या काळात ग्रंथ संग्रह व देवघेवीचे केंद्र न

राहता समाजातील नागरिकांचे आजन्म शिक्षण केंद्र (Life long Learning) वा जीवनलक्ष्यी निरंतर शिक्षण संस्था म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे आजवरचे कार्य स्थानिक वाचकांच्या गरजा पुरविण्यापुरते मर्यादित होते. नव्या संकल्पनेनुसार भारतातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये इंटरनेटद्वारे जगातील सर्व विद्यापीठे व ग्रंथालये यांना जोडण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याने आपल्या ग्रंथालयांनी ग्रंथसंग्रहण, संरक्षण, देवघेव, विकास इत्यादी बाबत जागतिक प्रगती लक्षात घेऊन आपल्या सेवांचा दर्जा उंचावून कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण, महाजालीय जोडणी (Net connectivity), ई-बुक्स, ई-जर्नल, दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन या गोष्टी अनिवार्य मानण्यात आल्या आहेत. ग्रंथालये वाचकांसाठी मर्यादित न राहता प्रत्येक जिज्ञासूच्या ज्ञान, संदर्भ, अध्ययन, अध्यापन, अनुवाद, संशोधन इत्यादी दृष्टीने साहाय्य व मार्गदर्शन करणारे केंद्र होणे आवश्यक मानण्यात आले आहे. केवळ माहिती देणे आता पुरेसे न मानता अद्ययावत माहिती पुरवण्यावर भर राहणार आहे. सार्वजनिक ग्रंथालयाची ही नवी उद्दिष्टे म्हणजे विकास व प्रगतीची नवी क्षितिजे असून जी ग्रंथालये संगणक क्रांतीमुळे आलेल्या जागतिक आव्हानांना स्वीकारणार नाहीत. त्यांच्याकडे युवा वाचक फिरकणारसुद्धा नाहीत. ग्रंथालयात सायबर कॅफे, कॉफी हाउस, ई कंटेंट अँड कलेक्शन, वैचारिक देवघेवीचे केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, किंडलस् इत्यादी सुविधा आता काळाची गरज होय.

 सार्वजनिक ग्रंथालये : सुविधा विकासासंबंधी शिफारशी -

 राष्ट्रीय ज्ञान आयोगाने भारतातील शालेय, विद्यापीठीय तसेच सार्वजनिक ग्रंथालयांचा विकास व्हावा म्हणून काही शिफारशी आपल्या ग्रंथालयासंबंधी अहवालात केल्या असून भारत सरकारने त्या स्वीकारल्या आहेत. त्यानुसार आर्थिक तरतूदही केली जात आहे. सदर शिफारशींत ग्रंथालय हा विषय समवर्ती सूचीत अंतर्भूत करण्याची क्रांतिकारी शिफारस केली आहे. पूर्वी ग्रंथालय विकास ही केवळ राज्याची जबाबदारी होती. नव्या धोरणानुसार ती केंद्र व राज्याची संयुक्त जबाबदारी असल्याने ग्रंथालय विकासाचा राष्ट्रीय आराखडा ठरून सर्व ग्रंथालये एकमेकांस बँकेसारखी जोडली जातील व सामान्य वाचकास सर्व ग्रंथालयांचा लाभ घेता येईल. यासाठी स्थायी ग्रंथालय आयोगाची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली

आहे. असा आयोग स्थापन केल्यानंतर सार्वजनिक ग्रंथालयांचे राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण होऊन विद्यमान सेवा, सुविधा, कर्मचारी, संग्रहण आणि वर्गीकरण पद्धती नि सुविधांचा अभ्यास होऊन निष्कर्षांनुसार सुधारणा घडवून आणल्या जातील. आजवर ज्या गोष्टींचा सार्वजनिक ग्रंथालयांनी प्राथमिक विचारही केला नाही अशी बाब म्हणजे वाचक अभिरूचीची नोंद घेणे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने वाचक अभिरूचीचे राष्ट्रीय सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला असून तसे झाल्यास आपण भारत महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने ज्ञानसमाज (Knowledge Society) निर्मितीची प्रक्रिया गतिमान होईल. यामुळे आदिवासी पाड्यावरही लॅपटॉपवर ई-रिडिंग करणारे लोक, नवी पिढी पाहणे शक्य होईल. (आज ते स्वप्न वाटले तरी!) या सर्वांसाठी राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उत्पन्नातील विशिष्ट टक्के रक्कम ग्रंथालय विकासासाठी राखून ठेवणे अनिवार्य मानले आहे. तसे झाले तर प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय निश्चित काळात आपल्या विकासाची योजना आखून ती टप्प्याटप्याने पूर्ण करेल. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय किमान सुविधांनी (Minimum Standard) युक्त असेल.

 सार्वजनिक ग्रंथालये : भविष्य चित्र -

 वरील शिफारशींचा अंमल झाल्यास सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्गीरण, दर्जा, निश्चिती, त्यानुसार अनुदान देण्याची योजना आहे. ग्रंथसंख्या, सुविधा, सभासद संख्येच्या आधारे कर्मचारीसंख्या राहील. त्यांना राष्ट्रीय वेतनमान निश्चित केले जाईल. ते जागतिक ग्रंथालयांच्या दर्जाचा विचार करून ठरवले जाईल. प्रत्येक सार्वजनिक ग्रंथालय मुक्तद्वार केले जाऊन ते वाचककेंद्री विकसित केले जाईल. सार्वजनिक ग्रंथालयात फर्निचर, संगणक, संग्रहण, संरक्षणइ. बाबींवर अनुदान दिले जाऊन सर्व क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर असेल. सर्व सार्वजनिक ग्रंथालये (खासगी/शासकीय/ नोंदणीकृत) संगणीकृत असतील व ती परस्परांस महाजालाने (इंटरनेट) जोडलेली असतील. नव्या ग्रंथ नीतीनुसार ई ग्रंथ खरेदीवर भर राहील. त्यामुळे ग्रंथालयात सभासदास यावे लागणार नाही. तो असेल तेथून ई ग्रंथांची देवाणघेवाण शक्य होईल. ग्रंथालये ज्ञान, संदर्भ, संशोधन विकासाची केंद्रे होऊन वाचकांना सुविधा मिळण्याचा हक्क राहील. नव्या व्यवस्थेत संचालकांपेक्षा वाचकांच्या मतास किंमत व महत्त्व असेल. सार्वजनिक वाचनालये त्या त्या गावाचे सांस्कृतिक केंद्र बनून विचारविनिमय करणे, एकमेकांस भेटणे, प्रेस कॉन्फरन्स, सेमिनार, मेळावे यांचे स्थळ म्हणून

विकसित केले जाईल. ग्रंथालयात संगणक, इंटरनेट, झेरॉक्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पुस्तक बांधणी, मुद्रण, वितरण, विक्री सुविधा असतील. ग्रंथालयात अभ्यासिका, उपाहारगृह, प्रसाधनगृह, लिफ्ट, वातानुकूलन इत्यादी आधुनिक सुविधा देण्यावर भर राहील. ग्रंथालये भविष्यकाळात भौतिक साधनसुविधांनी समृद्ध केली जातील. ग्रंथालय व परिसर विकासात सौंदर्यावर भर दिला जाऊन चित्र, शिल्प, बाग, कारंजी, दिवाबत्ती, पेयजल इत्यादी सुविधा विकास अनविार्य होईल. थोडक्यात, भविष्यकाळात सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथांची गोदामे न राहता ज्ञान-विज्ञान विकास, वितरण, देवघेवीचे केंद्र होईल. सार्वजनिक ग्रंथालय दर्जावरून शहर वा गावचा दर्जा ठरवता येईल. असे झाले तरच भारत महासत्तेची स्वप्ने पाहू शकेल. अन्यथा, ते केवळ स्वप्नरंजनच ठरेल.

▄ ▄

सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार



 गांधी विचार, गांधी दर्शन, गांधी तत्त्वज्ञान अशा अनेक पद्धतीने महात्मा गांधींच्या आचार व विचारांचा धांडोळा घेत असताना एक गोष्ट व्यवच्छेदकपणे लक्षात येते की महात्मा गांधींनी आपले जीवन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञानावर उभारले असले तरी त्याचा पाया समाजरचना हाच आहे. या विचारात आचार व तत्त्वज्ञानाचं अद्वैत आहे. ज्याला आपण स्थूलमानाने ‘गांधी विचार' म्हणून संबोधतो. खरा तर तो एक ‘आचारधर्म' आहे. गांधी विचारात आचाराचे, अनुसरणाचे असाधारण महत्त्व आहे. गांधी विचार भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहू लागल्यास, तो वरकरणी अध्यात्माकडे जाणारा वाटला तरी त्याचं कर्मकांड धार्मिक न राहता ते सामाजिकतेकडे अधिक झुकताना दिसतो. म्हणून गांधी विचार ही एक ‘समाज जीवन धारणा पद्धती' आहे आणि ती सामाजिक धर्मबुद्धीवर उभी आहे.

 महात्मा गांधींचा जगातील सर्व धर्मांचा अभ्यास होता. असे असल्यामुळे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान म्हणून जे घटक पुढे येतात ते दुसरे तिसरे काही नसून सर्व धर्मातील ती अनुकरणीय तत्त्वे होत. बुद्धाची करुणा, ख्रिस्ताची दया, इस्लामचा निर्गुण ईश्वर, महावीराचा अपरिग्रह व निग्रंथ आचार, शिखांची कारसेवा अशांतून त्यांची एकादशव्रते सिद्ध झाली आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, अभय, सर्वधर्मसमभाव, स्वदेश भावना, अस्पृश्यता, नम्रतासारखी तत्त्वे माणसात सामाजिक धर्मबुद्धीच जागवतात.

 म. गांधी हिंदू धर्म पायाभूत मानून अन्य धर्मांचा विचार करतात. त्यांच्या सामाजिक धर्मात पूजा-अर्चा नसली तरी प्रार्थना आहे. व्रत नसले



तरी उपवास आहे. शिक्षा नाही पण प्रायश्चित्त आहे. विषमतेच्या जागी ते समानता स्वीकारतात. गुलामीऐवजी स्वातंत्र्य ते पसंत करतात. भारत गरिबांचा देश असल्याने ते खादी, स्वदेश, साधेपणाचे मूल्य मानतात. श्रमप्रतिष्ठा हे प्रतीक नसून तो दैनिक व्यवहाराचा भाग आहे. शेती, सूत कताई, स्वावलंबन, सेवा इत्यादीतून तो स्पष्ट होतो.

 महात्मा गांधींच्या सामाजिक धर्मबुद्धीचे ध्येय माणुसकी व मानवतावाद आहे. म्हणून ते अस्पृश्यता निवारण, दारूबंदी, कुष्ठसेवा, ग्रामसफाई यांचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांचा मानवतावाद नीती, राजकारण, अर्थकारण यांचा साकल्याने विचार करून साकारतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही या पंचशीलाचा त्यांचा आग्रह मानवाचे जिणे अधिक उंचावावे, या ध्यासातून आलेला आहे. सत्य हा त्यांचा ईश्वर आहे. गरीबदास त्यांचा राम आहे. गुलामीचं निर्दालन मग ते सामाजिक असो वा राजकीय याचा ते निकराने आग्रह धरतात. सविनय अवज्ञा आंदोलन, उपोषण, सत्याग्रह इत्यादी उपायांनी ते सामाजिक जागृती करतात. त्यामागे लोक सहभागाचा होरा असतो. सत्याच्या वेगवेगळ्या प्रयोग, उपक्रमातून त्यांची समाजशास्त्रीय बैठक स्पष्ट होते.

 महात्मा गांधींच्या विचारात व्यक्ती व्यवहारात व्यक्तिगत आचरणास अधिक महत्त्व आहे. ते स्वातंत्र्याचे भोक्ते असल्याने विचारात कोणतीही गोष्ट अनिवार्य मानत नाहीत. स्वत्त्व, सत्त्व, स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वदेश भाव या साच्यामागे 'स्व' प्रज्ञतेचा आग्रह आहे. लादलेली कोणतीही गोष्ट अनिच्छेने होते. उलटपक्षी ‘स्व' स्वीकृत बाब परिणामकारकपणे कार्य करते. महात्मा गांधींचा विचार व व्यवहार अशा दोन्ही पातळ्यांवर बुद्धीपेक्षा भावनेस महत्त्व देतो. त्यामुळे त्या विचारात आत्मशुद्धी, निग्रह, स्वीकार, आत्मक्लेश, आत्मनिर्भरता यांचे अतूट नाते आहे. हृदय परिवर्तनावर त्यांची निष्ठा असण्यातून त्यांच्या विचारातील आतल्या आवाजाचं महत्त्व स्पष्ट होतं. विवेकास ते विकाराचा उतारा मानतात. विखार त्यांना अमान्य आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभदी षड्रिपूंना ते थारा देत नाहीत. कारण ते ईश्वराप्रमाणे माणसास ‘पूर्ण' पाहू इच्छितात. गांधी विचार हा स्वप्नरंजन नाही, समाजधारणेचा तो एक ध्यास आहे. गांधी विचारात अहिंसा तत्त्वास असाधारण महत्त्व आहे. त्यांच्या दृष्टीने अहिंसा हा मानववंशाचा जीवन धर्म आहे. हिंसा मग ती शारीरिक असो वा मानसिक, महात्मा गांधी ती वर्त्य मानतात. हिंसेमुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनात

ताणतणाव निर्माण होतात. सामाजिक धर्मबुद्धीत हिंसेस थारा नसण्याचं ते महत्त्वाचं कारण आहे.

 महात्मा गांधींनी अहिंसा ही आपल्या विचारधारेत अनेक अंगांनी अंगिकारली आहे. सत्याग्रह, आत्मशुद्धी, आत्मसंयम ही अहिंसापूरक उपकरणे होत. त्यातला आत्मक्लेशासारखा भाग स्वहिंसा असली तरी ती व्यापक समाजहिताची असल्याने गांधीजी ती स्वीकार्य ठरवतात. त्यांच्या जीवन व्यवहारातील निःशस्त्र प्रतिकाराचा पवित्रा हा अहिंसेच्या विचारातून आलेला आहे, हे सहज लक्षात आल्यावाचून राहात नाही.

 मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानण्याचे ख्रिस्ती धर्म तत्त्व गांधीजी शिरोधार्य मानतात. माणसास ते ईश्वराचे अर्थात सर्व गुणग्राही रूप मानतात. यातही समाज अधिक प्रगत करण्याचीच धडपड दिसून येते. युद्धाचा विरोध अहिंसा व मानव विकासाच्या संकल्पनेतून अवतरला आहे. ते सबलांची हिंसा अधिक अमानवी समजतात.

 गांधी विचारातील ‘एकादशव्रते' ही सामाजिक धर्मबुद्धीचा आचारधर्म स्पष्ट करतात. सत्य, अहिंसा याबद्दल आपण वर विचार केला आहे. उर्वरितात ब्रह्मचर्यासारख्या तत्त्वाकडे पाहू लागलो तर लक्षात येते की, तो आत्मसंयमी जीवन व्यवहार होय. ही अत्यंत कठीण गोष्ट मानवाने एकदा स्वीकारली की मग तो ईश्वरपदास पोहोचला असेच समजायला हवे. अस्तेय, अपरिग्रह, अभयादी तत्त्वामागे सामाजिक सदाचार सार्वजनिक करण्याचा महात्मा गांधींचा ध्यास आहे. अस्पृश्यता निवारणामागेही एकसंध समाजनिर्मितीचं स्वप्न आहे. श्रमास्वाद माणसास स्वावलंबी बनवतो. सर्वधर्मसमभावही एकसंध समाज रचनेचा गांधी उपाय मानतात. नम्रता सुसंस्कृत माणसाचे लक्षण होय. नम्रतेने हिंसेस बगल मिळते, हे गांधीजींनी आपल्या जीवन व्यवहारातून आधी केले नि मग सांगितले. स्वदेशी स्पर्श भावना हा गांधीजींनी स्वतःच्या पायावर उभारण्याचा दाखवलेला मार्ग आज जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर लाखमोलाचा वाटतो.

 महात्मा गांधी यांनी आपल्या विचारांतून ज्या वरील सामाजिक धर्मबुद्धीस आवाहन केले आहे ते पाहून वि. स. खांडेकरांनी त्यांना ‘दुसरे प्रॉमिथिअस' म्हटले आहे. ग्रीक दंतकथेत प्रॉमिथिअस एक मिथक आहे. प्रॉमिथिअस एक दिव्य पुरुष होता. त्यानं देवांचा विरोध झुगारून स्वर्गातील अग्नी मानव कल्याणार्थ पृथ्वीतलावर आणला. परिणामी त्याला जेरबंद करण्यात आलं. साखळदंडांनी बांधलेल्या प्रॉमिथिअसचे गरुड दिवसभर लचके तोडत. पण

रात्री त्याचे पुनरुज्जीवन व्हायचं. या कथेतून कल्याण भावनेचं व ते करण्याचं मृत्युंजयत्व खांडेकरांनी स्पष्ट केलं त्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

 'खेड्याकडे चला' म्हणणाच्या त्यांच्या विचारातील सामाजिक दूरदृष्टी आजच्या जीवघेण्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत प्रकर्षाने लक्षात येते. महात्मा गांधी खरेच मानवी मांगल्याचे भाष्यकार होते. आज जेव्हा आपण त्याग, ध्येयवाद, क्षमाशीलतेसारखी वृत्ती लोप होताना पाहतो, तेव्हा गांधीजींच्या सामाजिक धर्मबुद्धीची अनिवार्यता अधोरेखित होते. हरणाच्या गतीने विकासाची स्वप्ने पाहणारे आपण, आपला मूल्यव्यवहार मात्र गोगलगाईच्या गतीचा. ही विसंगती गांधी विचार समजून घेताना लक्षात येते. आज विवेकाचं लोक शिक्षण इतिहासजमा झालंय, याची खंत कोणाही समाजहितकारी व्यक्तीस अंतर्मुख होण्यास भाग पाडते. मला वाटतं, यातच गांधी विाराची प्रसंगोचितता सामावलेली आहे. 'बुडती हे जन। पाहवेना डोळा।।'ची सद्यःस्थिती आपणास अस्वस्थ करते ती त्यामुळेच.

 हे सारं रोखायचं तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या वर्तमान जीवन व्यवहारास छेद देऊन ‘पावलापुरता प्रकाश' अशा छोट्या सामाजिक न्याय भावनेतून व्यक्तिगत जीवनात काही पथ्ये पाळायला हवीत. मी एकादशव्रताचे पालन करीन. मी जातिभेद मानणार नाही, करणार नाही. इतकेच नव्हे, तर जातिअंताचा लढा जात नाकारल्याशिवाय, जाती त्यागाशिवाय सुरू होणार नाही याचं भान मला आल्यानं मी तिच्या निरासास पूरकच जीवन व्यवहार करीन. 'जात नसते ती जात' ही जातीच्या व्याख्या जातीस खतपाणी घालणारी आहे. तिच्यावर अधिक आघात करण्याची गरज आहे. जातिधर्मास छेद देणारे रोटी-बेटी व्यवहार, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचं मागासलेपण आधारित सामाजिक न्याय व समावेशनाचं धोरण अंगिकारणं हाच सद्यःस्थितीतील जात-धर्म व्यवहारास दिला जाणारा समर्थ पर्याय आहे, अशी धारणा जोवर समाजात दृढमूल होणार नाही तोवर ख-या अर्थाने आपल्यात सामाजिक धर्मबुद्धी जागली असे म्हणता येणार नाही. दलित, पीडित, वंचित मानवसमुदायाचं कल्याण जपानी समुराईंच्या अधिकार, हक्क, सवलती नाकारण्याच्या अनुकरणानेच होऊ शकतं. अन्यथा,

आरक्षणार्थ आज लागलेली अहमहमिका थांबणार नाही. आरक्षण ही त्रिकालाबाधित गोष्ट नसून सामाजिक, न्यायाचा तो तात्पुरता विचार व व्यवहार आहे. वंचित वर्गास समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचा तो

सामाजिक खुश्कीचा मार्ग होय. स्त्रीविकासाच्या संदर्भात हे लक्षात ठेवायला हवं.

 गांधी विचाराच्या सदाचारांची सदाफुली आपल्या समाज व्यवहाराची प्रमाणभाषा होणे ही आता काळाची गरज आहे. आपलं वर्तमान सामाजिक व राजकीय नेतृत्व हे पूर्वीसारखं आदर्श, अनुकरणीय राहिलं नाही याची खंत करत राहण्यापेक्षा समाज आदर्शाची पूजा बांधणं हाच त्यावरील उपाय आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवून आपणास चरखा चालवत राहता येणार नाही, पण काटकसर करणं शक्य आहे. पादत्राणे १०० रुपयांची घ्यायची की १०,००० रुपयांची यातला साधेपणाचा जितक्या जवळचा विवेक तुम्ही स्वीकाराल तितक्या गतीने सदाचाराची सामाजिक सदाफुली फुलेल, हे सांगायला भविष्यवेत्ता कशाला हवा? लग्न समारंभ साधेपणानं करता येणं, प्राप्त साधनांची विनियोग उत्पादक व्यवहारावर करणं योग्य की भपकेबाज विवाह करून लग्न पत्रिकेवर ‘कृपया अहेर आणू नये' छापणं? जिथे स्कूटर पुरेशी तिथं चारचाकीचा वापर टाळणं हाही गांधीविचारच ना?

 आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यातही गांधी विचार आचरता येतो. प्रश्न आहे तो तुम्हाला किती समजला? तो आचरण्याचा तुमचा संयम किती? तुम्ही समाजभय, समाज प्रतिष्ठा प्रमाण मानणार की स्वनिर्धारित मोजपट्ट्या लावून जगणार? सारा व्यभिचार हा अनुकरणाची घाई, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना, विसंगत व्यवहार, आपपरभेद, विषम अर्थकारणाचे अनुसरण यातून येतो याचं पक्कं भान हवं. इच्छांचं किमानीकरण विरुद्ध त्याग, समर्पणाची कमाल धारणा अशा द्वंद्वात्मक भौतिक वादाची आजची लढाई आहे. तिला मार्क्सवाद उतारा नाही. असेलच तर गांधीवाद, समाजवाद. हिंसा, आक्रमणास छेद देत जाणारे सारे विचार मग ते तत्त्वज्ञान, धर्म राजकीय विचारप्रणाली कोणतेही असोत, त्याची फळे उशिरा येत असली, तरी उशिरापर्यंत टिकतात. जे झटपट येतं ते झटपट जातं. फुलं झटपट येतात, झटपट कोमेजतात. फळे उशिरा येतात, उशिरापर्यंत टिकतात. सामाजिक विचारांच्या फलधारणेचंही तसंच आहे. ओबामांचा उदय व्हायला तीन मार्टिन ल्यूथरची वाट पाहावी लागली हे जरी खरे असले तरी 'Change is needed' हे सूत्र प्रत्येक द्वंद्वात्मक स्थितीत अधिक स्थैर्याकडे जाणाच्या पर्यायातून निवडले पाहिजे. त्यातच सामाजिक शहाणपण असतं नि ही सामाजिक धर्मबुद्धी गांधी विचार शिकवते.

▄ ▄

मराठी साहित्याची लोभस इंग्रजी प्रतिबिंबे



 मानवाच्या विकासात भाषेचे असाधारण महत्त्व असते. माणसास भाषा घरातून मिळते व ती समाजात विकसित होत असते. समाज भिन्न भाषा आणि बोली बोलणा-यांचा समूह असतो. म्हणून तो भिन्न भाषी असतो. प्रत्येक जन समुदायाची स्वतःची अशी पारंपरिक बोली अथवा भाषा असते. त्याद्वारे तो संपर्क, संवाद, देवघेव करत असतात. पण भिन्नभाषी समाज संपर्कासाठी माणसास बहुभाशी व्हावं लागतं. जी भाषा येत नाही ती मौखिक वा लिखित भाषांतराने त्यास समजून घ्यावी लागते. अशा समजण्यातूनच भाषा प्रचार, प्रसार होतो तसा ज्ञानप्रसार, विकासही. एकविसाव्या शतकातील सूचना, माहिती, संपर्क, संवाद, तंत्रज्ञान क्रांतीच्या काळात विश्व एक ज्ञान समाज होऊ पाहतो आहे. आज इंग्रजी ही जगभर प्रचलित भाषा असल्याने व तीमध्ये विविध ज्ञान-विज्ञान साधने व संदर्भ उपलब्ध असल्याने जगभराची ज्ञानभाषा झाली आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात छोट्या भाषांपुढे एकीकडे अस्तित्व संरक्षणाची जीवघेणी स्पर्धा आहे तर दुसरीकडे स्वभाषा समृद्धीचे आव्हान. त्यामुळे जगातील सर्व भाषा आपल्या भाषिक समृद्धीसाठी इंग्रजीतून वा विश्वभाषांतून शब्द, व्याकरण, शैली, आशय, विषय यांचे अनुकरण, अनुसरण करत स्वभाषा समृद्धीचा प्रयत्न करतात, तद्वतच आपल्या भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, मूल्य, तत्त्वज्ञानातील जे श्रेष्ठ ते परभाषेत जावं म्हणून भाषांतराचे निकराचे प्रयत्न करत असतात.

 मराठी भाषेबाबत बोलायचं झालं तर मराठीत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपली भाषा व साहित्य परंपरा इंग्रजांना पर्यायाने जगाला कळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. हे प्रयत्न प्रारंभीच्या काळात प्राचीन काव्यानुवादाने

झाल्याचे दिसून येते. जनार्दन बाळाजी मोडक (१८४५ ते १८९०) हे डेक्कन कॉलेज, पुणेमध्ये बी. ए. करत असतानाच त्यांना मेजर कैंडीच्या कचेरीत ट्रान्सलेटर एक्झिबिशनर म्हणून नियुक्ती मिळाली. मेजर कैंडी (१८०६ ते १८७७) हे कोशकार, क्रमिक पुस्तकांचे आद्य लेखक शिवाय भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी कॅप्टन मोल्सवर्थच्या ‘अ डिक्शनरी : इंग्लिश अँड मराठी' साठी मोठे सहाय्य केले होते. त्यांच्या हाताखाली काम करत झालेल्या इंग्रजी सरावामुळे जनार्दन बाळाजी मोडकांनी प्राचीन काव्यावर आधारित 'मराठी पोएम्स' (१८८९) ची रचना करून मराठी काव्याच्या इंग्रजी अनुवादास प्रारंभ केला. त्याचे अनुकरण करम वामन दाजी ओक यांनी सन १८९५ मध्ये ‘ए कलेक्शन ऑफ मराठी पोएम्स'ची रचना करून प्राचीन मराठी काव्य इंग्रजीत प्रसारित केलं. ते वाचून तत्कालीन मिशनरी, इंग्रज अधिकारी, भाषांतरकार यांनी प्रेरणा घेऊन मराठी भाषा व साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्यातून ब्रिटिश, अमेरिकन मिशनरींच्या भाषांतराची मोठी परंपरा सुरू झाली.

 विसाव्या शतकाच्या पूर्वीच्या स्पर्शकाळात (१८९१) हॅरी अर्बथनॉट अँक्वर्थ यांनी बॅलड्स ऑफ मराठा' तर ऑर्थर ली नाइट यांनी ‘टोल्ड इन इंडियन विलाइट' या मराठी लोककथांचे इंग्रजीत भाषांतर केले. अॅकवर्थ यांनी मराठी पोवाड्यांचे. त्यामुळे मराठी लोकसाहित्य जगभर कळण्यास मदत झाली. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात रेव्हरंड जस्टिन एडवर्ड अंबट यांनी (१८५३ ते १९३२) मराठी संत काव्याचे इंग्रजी भाषांतरकार म्हणून मिळवलेला लौकिक त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम सिद्ध करतो. त्यांचे वडील अहमदनगर येथे अमेरिकन मिशनचे प्रचारक असताना त्यांना मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची माहिती मिळत होती. १८८१ ला जस्टिन अॅबट रेव्हरंड म्हणून रुजू झाल्यावर मिशनच्या ‘ज्ञानोदय' मासिकाचे संपादन कार्य केले. त्यातून मराठी साहित्याचा परिचय झाला. २५ वर्ष संपादन कार्य करून अमेरिकेत परतल्यावर ते खास मराठी साहित्य अभ्यासासाठी म्हणून सन १९२० ला ते भारतात सपत्निक राहिले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या ग्रंथालयात उपलब्ध पोथ्या व वाङ्मयाचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘पोएट सेंटस् ऑफ महाराष्ट्र' अशी अकराा पुस्तिकांची मालिका लिहिली व प्रसिद्ध केली. त्यात ‘भानुदास' (१९२७), ‘एकनाथ' (१९२७), ‘भीक्षुगीत' (१९२७), 'दासोपंत दिगंबर' (१९२७), ‘बहिणाबाई' (१९२९), ‘स्तोत्रमाला' (१९२९), 'तुकाराम'

(१९३०), ‘रामदास' (१९३२) यांचा समावेश आहे. यात संतांचे अल्प चरित्र जसे आहे तशा त्यांच्या अभंग, पदांचा इंग्रजी गद्यानुवादही आहे. याशिवाय जस्टिन अँबट यांनी ‘स्टोरीज ऑफ इंडियन सेंटस्' (भाग २ - १९३३, १९३४) 'नेक्टर फ्रॉम इंडियन सेंटस् ची रचना करून मराठी संतांचे जीवन, विचार, साहित्य इंग्रजीत भाषांतरित करून त्याचे प्राचीन महत्त्व विशद केले. यांपासून प्रेरणा घेऊन मॅकनिकॉल, निकोल यांनी साम (Psalms) ऑफ मराठा सेंटस्' (१९५२) प्रकाशित केले. रेव्हरंड ना. वा. टिळकांच्या साहित्यावर पी. एस्. जेकब यांनी ‘एक्सप्रिएंशियल रिस्पॉन्स ऑफ एन. व्ही. टिळक' चं लेखन करून त्यांच्या साहित्याची महती अधोरेखित केली.

 स्वातंत्र्योत्तर काळात मराठी आधुनिक कवितेच्या इंग्रजी भाषांतराचे युग सुरू झाले तरी तुकारामांच्या अभंगांची इंग्रजी भाषांतरे वेळोवेळी होत राहिली. नेल्सन फ्रेझर (१९८८), डॉ. प्रभाकर माचवे (१९७७) यांच्या नंतर अगदी अलिकडे १९९१ मध्ये कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे ‘सेज तुकाराम' हे भाषांतर उल्लेखनीय म्हणून सांगता येईल. आपल्या ‘टीकास्वयंवर मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी चित्रे यांच्या भाषांतरातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर मराठी-इंग्रजीवर समान अधिकार असलेल्या अनेक मान्यवरांनी आधुनिक मराठी कवींच्या रचना इंग्रजीत भाषांतरित करून भारतीय काव्याचा भाग म्हणून त्यांना जागतिक स्थान मिळवून दिलं. बा. सी. मर्लेकर, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव टिळक, विंदा करंदीकर, वसंत आबाजी डहाके इत्यादी कवींचे संग्रह इंग्रजीत भाषांतरित झाले आहेत. त्यात नारायण सुर्वे यांच्या काव्याचा कृष्णा चौधरी व पी. एस्. नेरूरकर यांनी केलेला ‘ऑन दि पेव्हमेंटस् ऑफ लाइफ', विंदांच्या कवितांचा वृंदा नाबर व निस्सीम इझिकेलनी केलेला ‘स्नेक स्कीन अँड अदर पोएम्स', डहाकेंच्या 'योगभ्रष्ट' काव्य संग्रहाचा रणजित होसकोटे व मंगेश कुलकर्णीनी केलेला 'द टेररिस्ट ऑफ स्पिरिट' हे अनुवाद त्यातील आशय समर्थपणे इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचवतात पण नामदेव ढसाळ यांची कविता त्यातील पूर्ण गर्भित अर्थासह इंग्रजीत भाषांतरित करणे कठीण होते खरे! म्हणून तर ‘नामदेव ढसाळ : पोएट ऑफ अंडरवर्ल्ड' चा अनुवाद करताना चित्रे यांना कबूली देत म्हणावं लागलं होतं की, I can't achive the musical excellence of original.' डॉ. गणेश देवी, अदिल जस्सावालांसारखे इंग्रजी अनुवादक, समीक्षक, संशोधक या

भाषांतरांची जेव्हा समीक्षा करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मराठी कवितांची इंग्रजी भाषांतरे अधिक सरस होणे (अन्य भारतीय भाषांतील काव्यांच्या भाषांतराच्या पाश्र्वभूमीवर) आवश्यकच नाही तर अनिवार्यही आहे. 'व्हायरस अँलर्ट' शीर्षकांतर्गत दि. पु. चित्रेनी केलेला हेमंत दिवटेंच्या कवितांचा अनुवादही वाचनीय आहे.

 याशिवाय मल्लिका अमर शेख, रजनी परुळेकर, प्रभा गणोरकर या कवयित्रींच्या कवितांची स्फूट इंग्रजी भाषांतरे आढळतात. अलीकडच्या काळात ‘अॅटलांटिक क्वार्टरली’, ‘लिटररी ऑलिंपिक्स' सारख्या साहित्यिक नियतकालिकातून अधून-मधून मराठी कवितांची भाषांतरे वाचावयास मिळतात. शिवाय आजकाल विविध वेबसाईट्सही मराठी कवितांची इंग्रजी भाषांतरे प्रकाशित करताना दिसतात. 'www.sawarkar.org' वर सावरकरांच्या पंधरा-सोळा कवितांचे अनुवाद मूळ मराठी कवितांसह उपलब्ध झाल्याने वाचकांची एक प्रकारे सोय झाली आहे. ते अनुवाद मूळ रचनेशी ताडून पाहात भाषांतराचे मूल्यमापन, दर्जा, समीक्षा वाचनच करायला लागतात, 'पोएट्री इंटरनॅशनल'च्या वेबसाईटवरही वेळोवेळी समकालीन मराठी कवितेची भाषांतरे जिज्ञासू वाचकास वाचावयास मिळतात. काही ई-कविता संग्रहही इंटरनेटवर इंग्रजी भाषांतरे देतात. ती मोबाईल्सवर डाऊनलोड करून साहित्य रसिक त्यांचा आस्वाद घेत चर्चा, रसग्रहण करताना दिसतात.

 मराठी पद्याबरोबर गद्य साहित्यातील विविध प्रकारच्या रचनांचे इंग्रजी अनुवाद स्वातंत्र्योत्तर कालखंडात मोठ्या प्रमाणात झाले. कथा, कादंबरी, चरित्रे, आत्मचरित्रे, नाटक यांबरोबर निबंध आणि वैचारिक लेखसंग्रह यांची भाषांतरे इंग्रजीत झाल्याने मराठी गद्य साहित्याची महती जगास कळणे सुकर झाले. याचा प्रारंभ नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, साहित्य अकादमी, भारतीय ज्ञानपीठासारख्या संस्थांनी आपल्या विविध योजनांतून मराठी साहित्याची भाषांतरे इंग्रजी व सर्व भारतीय भाषात करून मराठी साहित्यास एकाच वेळी भारतीय व वैश्विक बनविले. 'मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या आपल्या ‘मोनोग्राफ' मालिकेत साहित्य अकादमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. ए. कुलकर्णी, ह. ना. आपटे, संत ज्ञानदेव, केशवसुत, कुसुमाग्रज, श्रीधर व्यंकटेश केतकर, साने गुरुजी, वि. दा. सावरकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, स्वामी रामानंद तीर्थ, तुकाराम, उद्धव शेळके, वि. स. खांडेकर प्रभृती मान्यवरांच्या जीवन, कार्य, कर्तृत्व, काव्य, साहित्य, विचार इत्यादींचा मागोवा चरित्र ग्रंथातून इंग्रजीत प्रकाशित करून

या साहित्यिकांना 'भारतीय साहित्यिक' बनवले. याशिवायही अन्य अनेक मान्यवरांची चरित्रे मराठी इंग्रजीत भाषांतरित झाली आहेत.

 कादंबरी, आत्मचरित्रे, नाटके यांच्या तुलनेने मराठी कथांचे अत्यल्प अनुवाद इंग्रजीत आढळतात. 'दि वुमन इन द केजिस' हे मराठी कथांचे इंग्रजी भाषांतर उल्लेखनीय म्हणून सांगता येईल. ईआन रॅइसाइड यांनी 'रफ अँड दि स्मूथ' शीर्षकाने केलेल्या कथांच्या भाषांतरात सर्वश्री गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, दि. बा. मोकाशी, द. मा. मिरासदार, मालतीबाई बेडेकर यांच्या श्रेष्ठ व निवडक कथांचा अंतर्भाव आहे. विलास सारंगांच्या कथांचा इंग्रजी अनुवाद 'दि फेअर ट्री ऑफ व्हाइड' शीर्षकाने प्रकाशित आहे. तो इंग्रजी शिवाय अमेरिकन (इंग्लिश) व कॅनेडियनमध्येही उपलब्ध आहे. 'दि बाँबे लिटररी रिव्ह्यू', 'दि न्यू क्वेस्ट', 'इंडियन लिटरेचर' सारख्या नियतकालिकांतून समकालीन व नवप्रकाशित कथांची इंग्रजी भाषांतरे प्रकाशित होत असतात. याशिवाय विविध भारतीय भाषांत ही मराठी कथांची भाषांतरे नियमितपणे होत राहतात. वि. स. खांडेकरांच्या कथा, कादंबच्या इंग्रजीशिवाय गुजराथी, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड, सिंधी, पंजाबी, बंगाली इत्यादी भाषांत अनुवादित झालेल्या असून काही भाषांत तर खांडेकर (तमिळ, गुजराथी) त्या भाषेतील लेखक म्हणूनच ओळखले जातात हे विशेष.

 मराठी कथांच्या तुलनेत कादंब-यांची अधिक भाषांतरे इंग्रजीत झालेली आहेत. विभावरी शिरूरकरांच्या 'बळी' कादंबरीचा यशोधरा देशपांडे यांनी 'दि विक्टिम' नावाने अनुवाद केला आहे. लॅन रिसाइड यांनी श्री. ना. पेंडसे यांच्या 'गारंबीचा बापू' कादंबरीचया 'वाइल्ड बापू ऑफ गारंबी' शीर्षकाने केलेल्या भाषांतरात कोकणचे लोकजीवन, संस्कृती, भाषा, परंपरांचे सक्षम प्रतिबिंब उमटले असे म्हणणे अतिशयोक्ते होईल. तीच गोष्ट किरण नगरकरांच्या 'सात सक्कम त्रेचाळीस' कादंबरीच्या शुबा स्ली यांनी केलेल्या 'सेव्हन सिक्सेस आर फोर्टी थ्री' भाषांतराची, विशेषतः इंग्रजी भाषी विदेशी भाषांतरकार जेव्हा मराठी साहित्याचा अनुवाद करतात तेव्हा त्यांच्या सांस्कृतिक आकलन व भाषिक आशय शब्दात पकडायच्या मर्यादा सीमित राहातात. त्यामुळे बरीच भाषांतरे शाब्दिक पर्यायात अडकलेली आढळतात. पण मराठी, इंग्रजी भाषांवर पकड असलेला भाषांतरकार तो विशेषतः महाराष्ट्र निवासी वा मराठी भाषी असेल तर मात्र ते अनुवाद सार्थक,

समर्पक होतात. या संदर्भात डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' कादंबरीचा

सुधाकर मराठेचा ‘ककून' (Cacoon) अनुवाद पाहता येईल. मराठी शब्द प्रमाणला इंग्रजीत आणताना सर्वांनाच कसरत करावी लागते. त्याचे कारण दोन्ही भाषांची मूळे वेगवेगळ्या भाषा कुलात असणे हे जसे आहे तसे शब्दछटांची नजाकत भाषांतरात मर्यादेतच प्रतिबिंबित होत राहाणे हेही त्याचे आणखी एक खरे कारण असते.

 मराठी साहित्यातील नाटके व आत्मकथा हे असे साहित्य प्रकार होत की जे अन्य भाषांना प्रयोग, शैली, समस्या, विषय अशा अनेक अंगांनी देणगी, योगदान देताना डॉ. गो. पु. देशपांडे हे इंग्रजी भाषांतराच्या दृष्टीने आघाडीवर आहेत. १८८९ ला कुमुद मेहतांनी केला तेव्हा तेंडुलकर नाटककार म्हणून बहुचर्चित झालेले होते. विजय तेंडूलकरांच्या नाटकांची सर्वाधिक इंग्रजी भाषांतरे केली ती प्रिया आडारकरांनी. 'शांतता कोर्ट चालू आहे' चा ‘दि कोर्ट इज इन सेशन' अनुवाद आणि ‘फाइव्ह प्लेज ऑफ तेंडूलकर' या त्यांनी केलेले अन्य अनुवाद एकत्र वाचताना लक्षात येते की प्रिया आडारकरांच्या भाषांतरात नाटक संहितेतील समस्या, व्यग्र (विसंगती) पकडण्याचं, त्याचं लोभस प्रतिबिंब इंग्रजीत उतरवण्याचं विलक्षण कौशल्य आहे. त्यांना नाटकातील नेपथ्य, अभिनय, संवादातील आरोह-अवरोहाची जाण, चांगली व चपखल असल्याचा अनुभव येतो. तेंडूलकरांच्या ‘कन्यादान'चे भाषांतर गौरी रामनारायण यांनी केले असून ते ऑक्सफर्ड प्रेसने प्रकाशित केले आहे. तेंडूलकरांच्या गाजलेल्या 'घाशीराम कोतवाल'ची इंग्रजी भाषांतरे तर दोन झाली असून पैकी एक समिक बंदोपाध्याय यांनी केले असून दुसरे भाषांतर जयंत कर्वे आणि एलिनॉर झेलिऑट यांनी संयुक्तरित्या केले आहे. इंग्रजी रंगभूमीवर ते सादरही झाले होते. तेंडूलकरांच्या नंतर महेश एलकुंचवार असे नाटककार होत की ज्यांच्याकडे भाषांतरकार गंभीरपणे पाहातात. शांता गोखले आणि मंजुळा पद्मनाभन यांनी मिळून केलेले भाषांतर ‘सिटी प्लेज' आणि शांता गोखलेंनीच स्वतंत्ररित्या केलेले ‘कलेक्टेड प्लेज ऑफ महेश एलकुंचवार' (२००९) अशी दोन्ही भाषांतरे वस्तुनिष्ठ व प्रमाण कसोट्यांवर यशस्वी दिसून येतात. ‘मराठी ड्रामा फ्रॉम १९४३ टू प्रेझेंट' (१९९९) हे शांता गोखलेंचे अन्य पुस्तक म्हणजे त्यांच्या इंग्रजी प्रभुत्वाचा व नाटकावरील हुकमतीचा पुरावा होय. शांता गोखलेंनी कलेले डॉ. गो. पु. देशपांडे आणि सतीश आळेकरांच्या नाटकांचे अनुवाद याच पठडीतले म्हणून सांगता येतील. गो. पुं. च्या ‘उध्वस्त धर्मशाळा'च्या ‘ए मॅन इन डार्क टाइम्स'चं चांगलं स्वागत झालं.

 मराठी आत्मकथा आणि त्यातही दलित आत्मकथांनी आपल्या व्यवच्छेदक व भेदक अनुभवांमुळे भारतीय भाषांना मोहिनी तर घातलीच, शिवाय विश्व साहित्यातही त्यांनी आपल्या जगावेगळ्या जगण्याने, जगण्याच्या संघर्षाने आपला वेगळा रस्ता उमटवला. लक्ष्मण मानेची आत्मकथा 'उपरा'ची नोंद फोर्ड फाऊंडेशन, अमेरिकेने घेतली. ती ए. के. कामतांनी केलेल्या सरस भाषांतरामुळे. लक्ष्मण गायकवाड यांच्या ‘उचल्या' चा पी. ए. कोल्हटकरांनी 'दि बँडेड' शीर्षकाने केलेला अनुवाद मर्यादांसह वाचकांनी पसंत केला. ग्रोइंग अप अनटचेबल्स इन इंडिया' हा वसंत मून यांच्या 'वस्ती'चा अनुवाद, ‘आऊटकास्ट' हा डॉ. शरणकुमार लिंबाळेच्या ‘अक्करमाशी' चा अनुवाद असो किंवा डॉ. नरेंद्र जाधवांनी स्वतःच केलेला ‘आमचा बाप आणि आम्ही'चा 'आऊटकास्ट : ए मेमॉयर' अनुवाद असो प्रत्येक आत्मकथन एक हादरवून सोडणारं भावविश्व जगापुढे ठेवतं व अंतर्मुख करतं. बेबी कांबळेच्या ‘जीणं आमचं' चा ‘द प्रिझन वुई ब्रोक' आणि उर्मिला पवार यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘आयदान'चं भाषांतर ‘दि विव्ह ऑफ माय लाइफ' म्हणजे स्त्री वेदनांचं महाभारत नि शोकात्म महाकाव्यच! असाच प्रभाव लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रे'चा ‘आय फॉलो आफ्टर' मधून झरत राहतो. डॉ. प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशयात्रा'चे सुमेधा रायकरांनी केलेले ‘पाथवेज टू लाईट' आणि 'मुक्तांगणची गोष्ट' या डॉ. अनिल अवचटांच्या आत्मकथनात्मक कृतीचा चंद्रकांत म्हात्रेकृत अनुवाद ‘लर्निग टू लिव्ह' केवळ हृदयस्पर्शी!

 याशिवाय नोंदवली पाहिजेत अशी भाषांतरे उरतातच. ही भाषांतरे वाचनीय, लक्ष्यवेधी तशीच मराठी साहित्याचा खरा आरसा दाखवणारी म्हणून उल्लेखनीय ठरतात. वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति' कादंबरीचा वाय. पी. कुलकर्णीकृत अनुवाद वस्तुनिष्ठ भाषांतराचा नमुना होय. युगांत' या आपल्याच कादंबरीचा डॉ. इरावती कर्वे यांनी केलेला ‘दि एंड ऑफ ए पॉक' वरील प्रमाणेच वाचकांना पर्वणी ठरतो. मराठी साहित्यातील काही अपवाद चीजा इंग्रजीत भाषांतरित झाल्यात. त्यात डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘डॉ. आंबेडकर : इकॉनॉमिक थॉट अँड फिलॉसॉफी' वैचारिक साहित्य अनुवाद म्हणून उल्लेखनीय ठरतो. यात डॉ. जाधव यांचे स्वतः अर्थतज्ज्ञ असणं ... त्यामुळे अर्थशास्त्रीय संकल्पनांचे चपखल प्रतिबिंब भाषांतरात पडते. मराठी बाल साहित्याचे इंग्रजी भाषांतर म्हणजे कपिला षष्ठीचाच योग म्हणावा लागेल. पण तो मान मिळाला लीलावती भागवत यांच्या

‘रानातली रात्र’ला. डी. आर. भागवत यांनी 'ए नाईट इन दि वुड' नावाने तो करून एक विक्रमच नोंदवला म्हणायचा. सर्वात महत्त्वाचे भाषांतर... कठीण कर्म असाच त्याचा उल्लेख व्हायला हवा, ते म्हणजे मराठी व्याकरणाचे इंग्रजी भाषांतर. हा पराक्रम केला आहे रमेश धोंगडे व काशीवाली या दुकलीने. ‘मराठी ग्रामर बुक इन इंग्लिश' (२००९) अशा शीर्षकाचा हा अनुवाद क्लिष्ट असला तरी शास्त्रीय अनुवाद म्हणून त्याचे असाधारण महत्त्व आहे.

 या नि अशा अनेक मराठी साहित्य कृतींचा लोभस इंग्रजी प्रतिबिंबामुळे ही भाषा प्रादेशिक असली तरी तिचे भाषिक सामर्थ्य ज्ञानभाषा इंग्रजी व राष्ट्रभाषा हिंदीशी स्पर्धा करणारे आहे. कोणत्याही भाषेची क्षमता ग्रंथ संख्येवर अवलंबून नसतेच मुळी! ती भाषा आपल्या ग्रंथांचे किती भाषांत अनुवाद पोहोचविते यावर तिचे योगदान, मूल्य ठरत असते. आज मराठी साहित्य मुद्रित रूपात इंग्रजीत भाषांतरित होते तसेच ते इंटरनेटवर ईरूपांतही प्रकाशित होत असते. मराठी भाषिकांचा विश्वसंचार व वैश्विक निवास या दोन्हीमुळे मराठी साहित्याच्या इंग्रजी भाषांतरात गती आली आहे आणि गुणवृद्धीही होते आहे. अन्य भारतीय भाषिकांच्या तुलनेत मराठी भाषिक समुदायाचे इंग्रजीकरण ही अस्मितेच्या पातळीवर चिंतेची बाब ठरतअसली तरी ‘अमृताची पैज' जिंकण्याच्या तिच्या उपजत वृत्तीमुळे ती अटकेपार झेंडा फडकविण्यात भूतकाळापासूनच अग्रेसर आहे. मराठी भाषा दिन म्हणून आज आपण तिचे स्मरण व नियोजन करत असताना हे विसरता कामा नये की ती विकसित झाली तरच आपली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख राहाणार.

▄ ▄

इंटरनेटवरील समृद्ध मराठी



 मराठी संस्कृत भाषेतून विकसित झाली. तिला सुमारे १000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेची सर्वात प्राचीन लिखित रूपं आपणास जुन्या मूर्ती, शिलालेख व प्राचीन साहित्यातून आढळते. इ. स. १११६ श्रवणबेळगोळ येथील भगवान महावीराच्या मूर्तीच्या पायथ्यावर कोरलेली दोन वाक्ये

 ‘श्रीचामुण्डराजे करविले.

 श्री गंगराजे सुत्ताले करविले.'

 ही मराठी भाषेची पहिली लिखित अक्षरे मानली जातात. संस्कृतीच्या इतिहासातून असे दिसते की भाषेचं पहिलं रूप तोंडी, मौखिक असतं. तिला बोली म्हणतात. ती लिहायला लागलो, सर्वत्र एकसारखी बोलू लागलो की बोलीचं रूपांतर भाषेत होतं. भाषा विकसित झाली की तिचं व्याकरण, नियम, परंपरा इत्यादीतून सार्वत्रिक रूप तयार होतं. हे सारं घडायला शेकडो वर्षे जावी लागतात. त्या संस्कृतीतील अनेक पिढ्यांच्या सततच्या प्रयत्नातून भाषा विकसित होत असते. मग पूर्वी राजे लोक धर्मास जसा आश्रय देत, तसाच ते भाषेसही द्यायचे. त्यातून मग त्या भाषेस दरबारी भाषा मानलं जायचे. दरबारचे हकूमफर्माने, खलिते, सनदा त्या भाषेतून लिहिल्या, प्रकाशित केल्या जात असत. त्यातून ‘राजभाषा' ही कल्पना उदयास आली. आज आपण पाहतो की महाराष्ट्र राज्य सन १९६० मध्ये अस्तित्वात आले. ते केवळ मराठी भाषा व साहित्य विकासाच्या ध्यासातून. हे मराठी राज्य उदयाला यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रयत्न सुरू होते. गेल्या सुमारे ५४ वर्षांत महाराष्ट्र शासनाने राजभाषा मराठीच्या भाषा आणि साहित्य विकासासाठी मराठी भाषा

संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एम्. के. सी. एल्.), विविध विद्यापीठांची स्थापना व विकास, कोश निर्मिती, वैश्विक साहित्याची मराठी भाषांतरे असे विपुल कार्य केले असून प्रत्येक जिल्ह्यात माहिती केंद्र, ग्रंथ विक्री केंद्र, ग्रंथालये उभारली आहेत. भाषा व साहित्य विकासार्थ पुरस्कार, प्रकाशने, अनुदान सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. तरी आज आपण ज्या एकविसाव्या शतकात मराठी भाषेस ‘ज्ञानभाषा' (Knowledge Language) बनवू पाहतो तिचे भवितव्य संगणकीय महाजालवर (Internet) तिचे आजचे स्वरूप काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इंग्रजी जगाची ज्ञानभाषा झाली कारण तिनं सतत भाषा, साहित्य, ज्ञानविज्ञानात आघाडी मिळवून सर्व प्रकारचं ज्ञान, माहिती इंग्रजीत मिळेल अशी व्यवस्था व प्रयत्न केले. आपणापुढे मराठी ज्ञानभाषा करण्याचे आव्हान आहे. ते अवघड असले तरी प्रयत्न केले तर अशक्य नक्कीच नाही.

 मराठी पोर्टल्स

 आज संगणकीय महाजालावर म्हणजे इंटरनेटवर अनेक मराठी भाषा व साहित्यसंबंधी संकेतस्थळे (Websites) आहेत. त्यातील काही महासंकेत स्थळे (Portals) आहेत. तिथून अनेक संकेत स्थळांचा संग्रह, व्यवस्थापन, नियंत्रण होत असते. संगणकावरचं हे ठिकाण रेल्वे जंक्शनसारखं किंवा बस स्थानकासारखं असतं. जंक्शन किंवा स्टॅडवरून आपण कोणत्याही दिशेच्या कोणत्याही गावास जाऊ शकतो. तसं अशा मराठी पोर्टलवरून आपणास हव्या त्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेता येते. मराठीची संकेतस्थळे अनेक आहेत. त्यांची माहिती देणारी मराठी पोर्टल्स खालीलप्रमाणे आहेत.

 १. मराठी माती (www.marathimati.com)

 २. मायबोली (http://mayboli.com)

 ३. मराठी मित्र (http://marathimitra.com)

 ४. स्पंदन (http://spandan maharashtra.gov.in)

 ५. मराठी वर्ल्ड (http://www.marathiworld.com)

 ६. वेब दुनिया मराठी (http://marathiwebdunia.com)

 ७. मराठी पोर्टल (http://www.marathiportal.com)

 मराठी वेबसाईटस्

 इंटरेनटवर मराठी भाषी माणसांच्या सर्व गरजा, शंका, जिज्ञासा पुरविणाच्या अनेक प्रकारच्या, अनेक विषयांच्या वेबसाईट्स आहेत. तुमच्या

घरी बाळाचा जन्म झालाय. मुलाचं नाव ठेवायचंय. मराठी बेबी बॉय नेम, मराठी बेबी गर्ल नेम अशा लिंक्स आहेत. त्यावर गेलो की अक्षरशः हजारो नावं मिळतात. त्यातही अक्षरावरून, राशीवरून, आद्याक्षरावरून, ज्योतिषशास्त्रावरून नावं मिळायची सोय आहे. शिवाय जुळे, तिळां झालं असलं तरी काळजी नको. त्यांचीही एक साथ नावं (उदा. अनू-मनू, शुभम-शिवम, रोहन-मोहन-सोहन) मुलींसाठी पण सोय आहे. (उदा. कांता-शांता, निशा-ईशा, मीरा-नीरा-वीरा) साहित्य, भाषा, गाणी, चित्रपट, पाककला, बातम्या, कवी, साहित्यिक, संत, वास्तुशास्त्र, आयुर्वेदिक औषधे, आजार, उपचार, शिक्षण, संगोपन, इसापनीती, रंग, अंक, पक्षी, प्राणी, नाटक, आईस्क्रिम, विनोद, चुटके, म्हणी, रूखवत, आजीचा बटवा (घरगुती उपचार), पूजा, रांगोळी, शहरे, नद्या, पर्वत कशाचीही माहिती हवी तर त्याच्या वेबसाईटस् उपलब्ध आहेत. टिचकी मारायचा, स्पर्श करायचा अवकाश की अल्लाउद्दिनच्या दिव्यातून राक्षस यावा अन मागेल ते त्यानं द्यावं तशी अलिबाबाची गुहा ज्ञानाचा खजिना, खाण, विहीर काही म्हणा. काही समृद्ध वेबसाइटस् अशा -

  १. मराठी माती (www.marathimati.com) संस्कृती

  २. मायबोली (www.mayboli.com) साहित्य

  ३. मराडीजगत (www.marathijagat.com) इतिहास

  ४. उपक्रम (mr.upkram.org) लेखन प्रकाशन

  ५. आम्ही मराठी (www.amhimarathi.com) संकीर्ण

  ६. मराठी मुव्ही वर्ड (WWW.marathimovieworld.com)

  चित्रपट

  ७. ई पेपर गॅलरी (www.epapergallery.com) वृत्तपत्रे

  ८. फ्रेंडस् लायब्ररी (www.friendslibrary.com) मासिके

  ९. विकिपीडिया (en.wikipedia.org) साहित्यिक

  १०. विकिपीडिया (en.wikipedia.org) - भाषा

  मराठी भाषा

 लेखन, टंकन, शब्दशोध, भाषांतर, संपादन, लिप्यंतरण, (एका लिपीतून दुस-या लिपीत रूपांतर) अक्षरांतर (अक्षर वळण बदल), बोललेले लिहिणे किंवा लिहिलेले उच्चारणे (From Text to speech and vice-varsa), शुद्धलेखन/दुरुस्ती (Spell Checker), विविध मुद्राक्षरे, शब्दकोश, असे अनेक भाषिक व्यवहार करत आपण भाषा वापरत असतो. त्यातून तिचा

विकास होतो. भाषेच्या दैनंदिन वापर विषयक गरजातून इंटरनेटवर स्थिर वा अस्थिर (ऑफलाईन/ऑनलाईन) भाषिक संसाधने (Language Resources) उपलब्ध आहेत. आपल्याला मराठी मुळाक्षरे लिहायला, वाचायला शिकायचे तर ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाद्वारे (कॉम्प्युटर) शिकू शकतो. 'You Tube' या वेबसाईटरवर दृक-श्राव्य ध्वनिफिती (व्हिडिओ क्लिप्स) उपलब्ध आहेत. आपल्याला मराठी टंकलेखन

 (टायपिंग) शिकायचे आहेत. त्यासाठी टायपिंग क्लासला जायची गरज नाही. आपल्या संगणकावर इंटरनेटवरील सॉफ्टवेअर वापरून (डाऊनलोड करून) आपलं आपल्याला टायपिंग करता येतं. तपासता येतं, अक्षरांची गती मोजता येते, धडे गिरवता येतात, परीक्षा देता येते इतकेच काय प्रमाणपत्र (सर्टिफिकेट, डिग्री) ही लगेच मिळते. आहे की नाही गंमत? एखादा इंग्रजी शब्द अडला. मराठी शब्दार्थ हवाय. इंटरेटवर ऑनलाईन इंग्रजी, हिंदी, बंगाली अनेक भाषात शब्द, भाषांतरांची संसाधने (सॉफ्टवेअर) उपलब्ध आहेत. मराठी अनेक वळणांची मुद्राक्षरे इंटरेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आपण हव्या त्या वळणाने (सरळ, तिरके, जाड, छोटे, मोठे) लिहू शकतो. अशा अनेक सोयी-सुविधा पुरविणारी संसाधने खालील वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत-

 १. मराठी टंकलेखन (टायपिंग) -

 www.quilipad.in, www.google.com

 २. मराठी मुद्राक्षरे (फाँट्स) -

 marathi.indiatyping.com

 (शिवाजी, युनिकोड, कृतिदेव, किरण, लेखणी, रिचा इ.)

 ३. मराठी शब्दकोश -

 www.shabdakosh.com, www.alphadictionary.com

 ४. मराठी लिप्यंतरण -

 translate.google.co.in., www.changathi.com

 ५. मराठी भाषांतर

 www.onehourtranslation.com

 (हिंदी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, तेलुगू, फ्रेंच, जर्मन)

 ६. मराठी ई-मेल

 ई-पत्र.कॉम (www.E-patra.com)

 ७. मराठी भाषा शिकणे

 enwww.marathimitra.com, www.mylanguages.org



 मराठी साहित्य


 या शिवाय मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसंबंधी विपुल माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. मराठीतील संत तुकाराम, रामदास, साहित्यिक वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे प्रभृतींच्या जीवन व साहित्याची संपूर्ण माहिती देणाच्या प्रत्येकांच्या स्वतंत्र वेबसाईट्स आहेत. ‘यूट्यूबवर वि. स. खांडेकर संग्रहालय घरी बसून आणि विदेशातून प्रत्यक्ष पाहिल्यासारखे पाहाता येते. इंटरनेटवर मराठीतील प्रख्यात ग्रंथ, दिवाळी अंक, चरित्रे, वाचता येतात. बोलकी पुस्तके (Talking Books) उपलब्ध 311€T. www.marathipustak.org, www.bookganga.com, www.netbhet, m4marathi.in अशा संकेतस्थळांना भेटी दिल्या की सारं ग्रंथभांडार उभं राहतं. पुस्तकं खरेदी करायला आता दुकानात जायची गरज नाही. इंटरनेटवरून तुम्ही पुस्तकंच काय कपडे, फर्निचर, मोटर, घर, मोबाईल, कॉम्प्युटर काहीही खरेदी करू शकता. घरातील जुन्या वस्तू विकू पण शकता. साहित्यिकांशी संवाद करू शकता. त्यांना पत्र, संदेश पाठवू शकता. इंटरनेटवर तुम्ही तुमचे विचार, लेख, कविता, चुटके, विनोद लिहून क्षणात जगभर प्रकाशित करू शकता. त्यासाठी इंटरनेटवर ‘अंतराळ', ‘नेटभेट’, ‘माझी सहेली' सारखी ऑनलाइन मासिकेही उपलब्ध आहेत. इंटरनेटवरून मराठी ई-साहित्य संमेलनेही पार पडतात व पार पडलेली इंटरनेटवर पाहाता येतात.

 अन्य भाषा व ई-मराठी

 इंटरनेटवरील सर्वाधिक समृद्ध भाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. भारतीय भाषांत हिंदी इंटरनेटवरील समृद्ध भाषा होय. ज्ञानभाषा म्हणून मराठीचा आपणास विकास करावयाचा असेल तर सर्व भाषिक व्यवहार मराठीतून करण्याची मानसिकता जोपासायला हवी. त्याचा प्रारंभ बोलण्यातून व्हायला हवा. अकारण इंग्रजी शब्दांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात जितका कमी होईल, तितकी मराठी भाषा विकसित होईल. लिहिण्यातीलही ते भान हवे. या लेखात मूळ मराठी शब्द वापरून ते इंग्रजी शब्द दिले आहेत. पण भाषेत शब्द प्रचलित होतात ते वापराच्या वारंवारितेतून (Frequency). आपण इंग्रजी शब्द वापरू लागलो तर पर्यायी शब्दच निर्माण होणार नाहीत. उदाहरणार्थ पोर्टल' शब्दाला शब्दकोशात पर्यायी शब्द मिळत नाही. महासंकेतस्थळ, सहसंकेतस्थळ, प्रसंकेतस्थळ, ससंकेतस्थळ

असे शब्द निर्माण करून वापरायला हवेत. तरच मराठी भाषा सर्वोपयोगी, सर्ववाही होणार.

 हे काम उच्चशिक्षण देणाच्या विद्यापीठांचे आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठातील मराठी विभागांच्या वेबसाईट्स इंग्रजीतील आहेत पण विदेशी विद्यापीठातील मराठी विभागांच्या, हिंदी विभागाच्या मात्र त्या त्या भाषेत आहेत. महाराष्ट्र शासनाची (प्रकाशक) संकेतस्थळे मात्र मराठीत आहेत. महाराष्ट्र शासनाची अधिकृत संकेतस्थळे मराठीतून असणे ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. अलीकडे मराठी वृत्तपत्रे इंग्रजी शब्दांचा भडीमार करत मराठीची कबर खोदत कंबर मोडत आहेत. तीच गोष्ट वृत्तवाहिन्यांवरील मराठी भाषेची. शिवाय आपले शिक्षण इंग्रजीमय होते आहे. नव्या पिढीस मराठी लिहिता, वाचता येत नाही. ती फक्त मराठी बोलते, ऐकते. उद्याच्या काळातली मराठी अशाने ज्ञानभाषा कशी होणार? नव्या पिढीची सर्व भाषांतील कौशल्ये दिवसेंदिवस कमजोर होत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, शिक्षण, संवाद एकाच भाषेतून होणं म्हणजे भाषा ‘ज्ञानभाषा' होणं.

 त्या दृष्टीने आपण मराठीकडे विचारपूर्वक पाहून तशी कृती करायला हवी. केवळ मराठी अस्मितेची भाषणे ठोकून, मराठी अभिमान गीत गाऊन मराठी ज्ञानभाषा होणार नाही. इस्रायल, जपान, जर्मनी, रशिया, चीन इत्यादी देशांची उदाहरणे भाषा समृद्धीचे आदर्श म्हणून आपण गिरवली तरच हे शक्य आहे. या तर मराठीच लिह, बोलू, वाचू, विचार करू. स्वप्नातही मराठीचाच विचार, व्यवहार करू. मराठी ज्ञानभाषा करू.

▄ ▄

इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेतील मराठी



 मी मराठी वृत्तपत्रे वाचतो आहे. त्यातील बातम्यांचे काही मथळे मी पुढे देत आहे. ते एकाच मराठी वृत्तपत्रातले नाहीत. अलीकडच्या माझ्या निरीक्षणात असे लक्षात येते आहे की आपला भाषिक व्यवहार इंग्रजीप्रचुर होतो आहे. त्याचे हे निदर्शक होय

 'कॅशलेस व्यवहारावरच सरकारचा भर’, ‘एटीएम सेवा ठप्पच', ‘मोहातील टीम इंडियाची दादागिरी', 'पाकने सर्जिकल स्ट्राईक केल्यास भारत चोख उत्तर देईल', 'रोटी, ब्रेड आणि पाव महागले’, ‘इन्कम टॅक्सचे ‘लक्ष्य' इत्यादी.

 मराठी जाहिराती सर्वत्र प्रकाशित होत असतात. त्या वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिकात प्रकाशित होतात. तशाच त्या रस्त्या, चौकातील जाहिराती फलकांवर पण होत असतात अशा काही जाहिरात मजकुरांतील या काही ओळी वानगीदाखल - ‘कराडेपती बिझनस मॅनची आता नाही सुटका’, ‘या विकेंडला अनुभवा पुण्याची थंड हवा', 'एलआयसी प्रिमियम देय असेल तेव्हा नेट बँकिंग, डेबिट कार्डस, ई वॅलेटस द्वारा भरणा करा', 'कार इन्शुरन्सचे स्मार्ट पर्याय' इत्यादी.

 रस्त्यावरून येता-जाता दुतर्फा दुकाने असतात. त्यांच्या पाट्या माझे लक्ष वेधत असतात - ‘रिलायन्स मॉल', ‘बारटक्के अँड सन्स', ‘श्री मेडिकल्स', 'चैतन्य हॉस्पिटल', 'डिलक्स हॉटेल', ‘सदासुख लॉजिंग अँड. बोर्डिंग', 'प्रभाकर सायकल कंपनी', 'सोनगे क्लॉथ मर्चट’, ‘भगिरथी ग्राइंडिंग मिल', 'सातेरी न्यूजपेपर्स स्टॉल', ‘महालक्ष्मी अॅपरल्स'

 नवी पिढी त्यांच्या भ्रमणध्वनी वा चलभाषेद्वारे एकमेकांशी संदेश देवाण घेवाण, संवाद, आदानप्रदान करीत असते. त्यांच्या त्या संवादी

यंत्रात सर्व भाषांची सोय असते. मराठी भाषी आपले सारे संपर्क क्रमांक, सूत्र, पत्ते इत्यादी इंग्रजीतच नोंदवतात व संग्रहित करून वापरतात. त्यांचे मराठी संदेशन रोमन लिपीत सुरू असते - mi aaj kamawar gelo nahi tuzi wat pahat hoto, udya tu yenar aahes ka? "mi kiti wait karat thambalo hoto" aaj dudywar lete ka re?

 या वर्षीचे दिवाळी अंक वाचत होतो. अनुक्रमणिकेतील लेख शीर्षक माझे लक्ष वेधत होती - ‘कबड्डीनेच बनविले सेलिब्रिटी', ‘ब्रूसचा अंत व्हाया डेव्हिड’ ‘देअर आर नो फुल स्टॉप' या अंकातील कवितांच्या काही ओळींकडे माझं लक्ष जातं - ‘लिफ्ट, एक्सलेटरने ती चढली वरवर’, ‘नित्य लॅपटॉप, नको आहे बाप'

 अलिकडे मराठीत प्रकाशित झालेली पुस्तक शीर्षक अशीच लक्षवेधी - ‘एक डॉक्टर असलेला इंजिनिअर', 'गॅसवॉर', ‘एका स्टूडिओचे आत्मकथन', 'कॉमनमॅन', ‘भारतीय जीनियस', 'फुटपाथ ते नोटरी', ‘इन्वेस्टमेंट' इत्यादी.

 वृत्तपत्रांच्या पुरवण्यांकडे माझे लक्ष जाते. ‘ऑक्सिजन, ‘हॅलो', 'फॅमिली डॉक्टर’, ‘विवा' इत्यादी उपहार गृहे, निवास गृहे, शीतपेय गृहे, चित्रपट गृहे कुठेही जा तिथले पदार्थ, पेय, दालने यांची नावे सर्रास इंग्रजी आढळतात.

 मला इंग्रजीच्या संकर व संसर्गाचे भय वा वर्जता नाही. प्रश्न आहे तो भाषेच्या अस्तित्व आणि अस्मितेचा. मराठी भाषा आणि संस्कृतीचाच हा प्रश्न नाही. प्रश्न आहे समग्र भाषिक व्यवहाराचा. कोणतीही भाषा टिकते, वाढते, समृद्ध होते तिचा एक सामान्य निकष वा कसोटी असते - तिचा वापर. भाषा वापर वा व्यवहार जितका अधिक तितका तिचा विकास, प्रचार, प्रसार अधिक, आज सर्वत्र असे ऐकू येते की इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, जागतिक भाषा आहे, संपर्क भाषा आहे. जागतिक क्रमवारीत इंग्रजी तिस-या क्रमांकाची भाषा आहे. मँडरिन (चिनी) भाषा बोलणारे १ अब्ज ३0 कोटी लोक जगात आहेत. ही संख्या सध्याच्या भारतीय लोकसंख्येइतकी आहे. त्यानंतरचा क्रम येतो स्पॅनीश भाषेचा. ४२ कोटी ७0 लाख लोक ती बोलतात. तर इंग्रजी भाषिक ३३ कोटी ९० लक्ष आहेत. भारतातील प्रथम क्रमांकाची भाषा हिंदी आहे. २६ कोटी लोकांची ती मातृभाषा आहे तर हिंदी जाणणारे, समजणारे ४१ टक्के लोक भारतात आहेत. मराठी भाषिकांची संख्या ७ कोटी २० लक्ष आहे. म्हणजे भारतात ६ टक्के मराठी भाषिक आहेत.

 मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संबंधीचा वर्तमानातील आपला व्यवहार तिच्या विकास, प्रचार आणि प्रसारास मारक आहे. तो अशा अर्थाने की आपली मराठी बोलण्या,लिहिण्याची टक्केवारी कमी होत आहे. माणसाचा भाषिक वापर ही एक सहज प्रक्रिया असते. तुम्ही घरी, दारी, बाजारी, दरबारी ती बोलता का हे महत्त्वाचे असते. अनेक भाषांना बोलींचे वरदान असते मराठीस पण ते आहे. कोकणी, व-हाडी, खानदेशी, अशी तिची रूपे आढळतात. कोकणी माणूस घरी कोकणी बोलतो पण बाजारात मराठी चालते. शाळेत तो मराठी शिकतो तो कोकणी बोलतो पण लिहितो मराठी. माणसाच्या समग्र भाषिक व्यवहारात तिचे प्रतिबिंब असणे म्हणजे त्या भाषेबद्दलची तुमची बांधिलकी असणे. अशा बांधिलकीच्या कसोटीवर आपण एक एक पायरी खाली येत आहोत. वर्तमान महाराष्ट्रातील सध्याची सत्तरीतील व त्यावरील वयोगटाची पिढी आपण पाहू लागू तर तिचे बोलणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे या चारही क्रियांची मराठी भाषिक वापराची टक्केवारी समग्रतेकडे जाते. नंतर आपण पन्नाशीची पिढी पाहू लागलो तर ती निममराठी दिसते. तिशीतील पिढी इंग्रजी प्रचुर आहे. तर एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीचा भाषिक व्यवहार हा एकभाषी न राहता, तो बहुभाषी होताना दिसतो. ते घरी बोलतात मराठी, ऐकतात, पाहतात (दूरदर्शन, वाहिन्या, चित्रपट, भ्रमणध्वनी इ.) हिंदी तर शाळा शिकतात इंग्रजीत. त्यांना धड एक भाषा येत नाही. सा-या भाषांतील लिंग, वचन, पुरुष एकमेकांत इतके मिसळलेत की विचारू नका. खेळ, गेम, शब्द मराठी, इंग्रजीत पुल्लिंगी खरा. पण नवी पिढी गेम शब्द स्त्रीलिंगी वापरताना दिसते. भाषिक व्यवहार अंतिमतः प्रयोग वा वापर अधिक्यावर ठरतो, हे जरी खरे असले तरी भाषा म्हणून तिची एक सर्वसामान्य रचना असते. तिला आपण स्थूलमानाने व्याकरण म्हणतो. व्याकरण भाषेचे सार्वत्रिक रूप नियंत्रित करणारी व्यवस्था होय. तिचा अतिरेक नको हे खरे. पण ती व्यवस्था अधिक कडक वा शिथिील होता नये. कडक झाली की तिची स्थिती संस्कृतसारखी होते. नियमाच्या काळात भाषा बांधली की तिचा प्रथमपक्षी विकास खुटतो. नंतर ती जनमानसात कमी वापरली जाते. मूठभर लोकांच्या वापराची भाषा ग्रांथिक बनून राहते. अंतिमतः ती कालबाह्य होत नामशेष होते. या उलट भाषिक शिथिलताही तिच्या नाशास कारणीभूत असते. सध्या मराठी भाषेचा वर्तमान संघर्ष हा अस्मिता आणि अस्तित्वाच्या रस्सीखेचतेचा आहे. भारतातील भाषांना राजकीय झालर आहे. भारत स्वतंत्र

झाला तेव्हा हिंदी बहुसंख्येच्या जोरावर राष्ट्रभाषा व्हायला हवी होती. ती झाली नाही. त्यावेळी उत्तरभारती भाषा विरुद्ध दाक्षिणात्य भाषा असा संघर्ष झाला. परिणामी हिंदी देशाची संपर्क भाषा झाली. पण तिला इंग्रजीची जोड देण्यात आली. सन १९६५ मध्ये (घटना मंजूरीनंतर १५ वर्षे) इंग्रजी जाऊन हिंदी एकटीच संपर्क भाषा वा राजभाषा व्हायची ते न होता, इंग्रजी तशीच राहिली. जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजीचा वापर, वापर, व्यवहार सर्वत्र अव्वल झाला. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, केरळ हे भाषिक आग्रही प्रांत म्हणून ओळखले जातात. या प्रांतात भाषिक अस्मितेवर उभारलेले पक्ष आढळतात. शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम, तेलगू देसम अशी काही उदाहरणे सांगता येतील. या पक्षांनी भाषिक राजकारणाइतके लक्ष भाषा विकास, वापर, प्रचार, प्रसाराकडे दिले नाही. परिणामी भाषेची लढाई अस्तित्वापेक्ष अस्मितेच्या परिघात होत राहिली. मराठी भाषिक व्यवहार आपण पाहू लागलो तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. मराठी भाषा विकासासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा भाषिक अस्मितेवरच उभा होता. स्वतंत्र महाराष्ट्रानंतर भाषा विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसंदर्भात गंभीर व भरीव कार्य केले. मराठी विश्वकोशाचे नियोजित २० खंड आपल्या हाती आहेत. असे काम अन्य भारतीय भाषांत अपवादाने झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अनेक भाषांतील अभिजात ग्रंथांची मराठी भाषांतरे करवून घेऊन प्रकाशित केली. अनेक कोश तयार केले. महाराष्ट्र राज्य वस्त्रकोश, स्वाद्यकोश सांगता येतील. भाषा विकास संस्थेने असेच कार्य केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी स्थापन झालेल्या या संस्था. त्याचे श्रेय संस्थापक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचे. नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात विविध भाषिक अकादमी स्थापन झाल्या पण त्यात परस्पर समन्वय झाला नाही व त्या मराठी भाषा साहित्य, संस्कृतीशी जोडल्या गेल्या नाहीत. हिंदी, उर्द, सिंधी, गुजराती भाषिक अकादमींनी मिळून मराठी केंद्रीकार्य केले असते तरी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विकसित होती. भाषिक विकासाचे महत्त्वाचे दुसरे साधन असते शिक्षण माध्यम. सन १९९० पर्यंत महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळांचे वर्चस्व होते. महाराष्ट्र शासनाने मधल्या काळात मराठी माध्यमांच्या शाळांना परवानगी न देणे, अनुदान कपात,विना अनुदान शिक्षण संस्थांची स्थापना

यातून मराठी भाषा माध्यम म्हणून मागे पडली. भाषा विकासाचे प्रचार, प्रसाराचे दुसरे साधन ग्रंथालये. महाराष्ट्राच्या अनेक गावांत मराठी सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यांना ग्रंथ खरेदी, कर्मचारी वेतन, इमारत बांधकाम, देखभाल, आधुनिकीकरण यावर अनुदान दिले तर ग्रंथालये वाढणार व वाचक निर्माण होणार. सन १९९० नंतर सार्वजनिक मराठी ग्रंथालयांना लागलेली उतरती कळा हे मराठी मारक शासन धोरणाचे अपत्य होय. इंग्रजी माध्यम शाळांना झुकते माप व परवानगीचे उदार धोरण यातूनही मराठी मारक वातावरण फोफावले हे नाकारता येणार नाही. शिवाय समाज मनाचा इंग्रजी कल हेही त्याचे एक कारण आहेच. सध्याचे युग हे माध्यमांच्या अधिराज्याचे मानले जाते. मराठी भाषिक माणूस वृत्तपत्रे मराठी वाचतो. आज घरोघरी मराठी वृत्तपत्रे येतात. माझ्या लहानपणी सार्वजनिक ठिकाणीच वर्तमानपत्र असायचे. आज वृत्तपत्र स्पर्धेमुळे घरोघरी एकच नाही तर अनेक वृत्तपत्रे नियमित येतात व वाचली जातात. वृत्तपत्र वाचनावर मराठी भाषिक अधिक वेळ खर्च करतात. लेख, संपादकीय, सदरे, स्फूट वगळता त्याच त्या बातम्या ते अनेक शैली व शब्दात वाचतात. त्यातून ज्ञानवृद्धी होत नाही, होतो केवळ माहिती विस्तार, माहिती विस्तार म्हणजे एकाच गोष्टीची बहुपेडी माहिती. मराठी वाचक गंभीर, प्रगल्भ वाचन कमी करतो. मराठी नियतकालिकांचा वाचक निर्देशांक व वर्गणीदार संख्या कमी होत जाणे हा त्याचा पुरावा. माध्यमांचे दुसरे रूप चित्रपट, दूरदर्शन वाहिन्या, महाराष्ट्रात अलिकडचा मराठी चित्रपट निर्मिती निर्देशांक व दर्जा सुखावह, आश्वासक खरा. पण तरीही हिंदी भाषी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग ओसरलेला नाही. दूरदर्शन, वाहिन्यावर बातम्या, मालिका, चित्रपट, विषय समर्पित वाहिन्या (इतिहास, मनोरंजन, पर्यटन इ.) पाहाता मराठीच्या तुलनेत हिंदी वरचढ दिसते. लहान मुलांची पिढी वक्रचित्रे, व्यंगचित्रे, मालिका पाहण्यात दंग असते. त्या वाहिन्या मराठीपेक्षा हिंदी, इंग्रजी अधिक पाहिल्या व पसंत केल्या जातात. संगणकाची व महाजालाची भाषा इंग्रजी आहे. तित मराठी भाषांतराची सोय आहे. पण भाषांतराच्या भाषेचा दर्जा सुमार असल्याने मराठी वाचक संगणकावर रुळत नाही. तो इंग्रजीकडे वळतो. मराठी संकेत स्थळे सुमार आहेत. मराठीतून संगणकावर माहिती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. अनुप्रयुक्त मराठी साधने अद्याप विकसित न झाल्याने मराठी भाषिक इंग्रजी, हिंदी संगणकीय स्त्रोतांचा वापर करतात. त्यांना दुसरा पर्याय राहात नाही. मराठी वर्तमान साहित्यही जीवनोपयोगी माहिती देणारे. भाषांतरित

झालेआहे. मूलभूत ललित मराठी साहित्याला ओहोटी लागलेली आहे. मराठी भाषा, साहित्य, लिपी, संस्कृती इंग्रजी प्रचुरतेच्या गर्तेत सापडली आहे असे महाराष्ट्राचे का व्हावे हा विचार करण्याचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधू लागलो की आपल्या लक्षात येते की दैनंदिन व्यवहार आपण इंग्रजीस प्रतिष्ठा देत राहिलो. कुसुमाग्रजांनी मराठी फटक्यामध्ये जे वर्णन केले तो फटका महाराष्ट्र शासनाने तसबीरी करून भिंतीवर टांगला, शोभायमान केला खरा पण तो आपला आचार धर्म बनवला नाही. आपण सुरेश भटांचे अभिमान गीत गातो हे खरे पण त्या गीतातले कोणते क्रियापद मराठी राहिले याचा धांडोळा घेता लक्षात येते की, बोलणे, ऐकणे, जाणणे, मानणे, दंगणे, रंगणे, नाचणे, खेळणे, हिंडणे, डोलणे, राहणे यात मराठी कुठे आहे? भाषिक समग्र व्यवहार म्हणजे या सर्व क्रियात नित्यव्यवहारात मराठी भाषा, साहित्य, लिपी, संस्कृतीचा वापर.

 स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी मराठी अस्मितेच्या पोटी सीमाभागातील बंधू-भगिनींनी तिच्या अस्तित्व रक्षणासाठी जी लढाई लढली, संघर्ष केला, तो महाराष्ट्रात राहणा-या मराठी भाषिकांना मराठीची जी अस्मिता व अस्तित्व जाण असते, ती महाराष्ट्रात कमी. परिणामी मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होणे व सीमाभागात होणे यात फरक आहे नि असतो. मी तर सांबरा, बेळगुंदी, कारदगा, आरग, बेडग आदि साहित्य संमेलनात अध्यक्ष होऊन अनुभवले आहे. चिंचवाड, राधानगरी, मिरज इत्यादी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने शासन अनुदानावर न होता ती लोकवर्गणी, देणगीतून उभी राहतात ती साच्या गावाची साहित्य जत्रा असते. माहेरवाशिणी गावी संमेलनासाठी येतात. घरोघरी रांगोळी, गुळ्या, तोरणे केवळ सीमाभागातच पाहायला मिळतात. गावचे जेवण फक्त तिथेच असते. उचगाव, कडोली, सांबरा, कारदगा, बेळगुंदी, साहित्य संमेलने पंढरपूरच्या आषाढ, कार्तिकी वारीप्रमाणे लोकोत्सव असतात. हे मी अनेकदा अनुभवले आहे.

 मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, लिपीचे भवितव्य साहित्य संमेलनाच्या उत्सवी आयोजनांपेक्षा दैनंदिन वापर, व्यवहारावर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन आपण शिक्षण, माध्यम, संपर्क साधने, जीवन व्यवहारांच्या सर्व पैलू आणि पातळ्यांवर मराठी वापरावर दक्ष असायला हवे. या लेखात आरंभिक इंग्रजी उदाहरणे वगळता कुठेही इंग्रजी शब्दांचा वापर नाही. ती उदाहरणे आपल्या विकृत मराठी वापराचे पुरावेच होत. त्याचे आधिक्य भाषिक

प्रदूषण व विद्रुपीकरणाचे निदर्शक होय. मूळ मराठी भाषा समृद्ध आहे. नर ज्ञानरचनेत जी उपकरणे, साधने, पदे, वस्तू, पदार्थ, क्रिया तयार होतात, त्यालाच प्रतिशब्द देत आपण आपली भाषा समृद्ध करू शकतो. प्रतिशब्द, भाषांतरे, संज्ञा निर्मिती ही भाषिक व्यवहार समृद्ध करणारी निरंतर प्रक्रिया आहे. ही क्रिया आपला जीवन व्यवहार व्हायला हवी. कोणत्याही भाषेची समृद्धी ही शब्दसंग्रह भाषांतर, संशापनादी त्रिविध वापर निरंतरतेवर अवलंबून असते. त्यासाठी मात्र विविध भाषी संपर्काची नितांत गरज असते. इंग्रजी समृद्ध का तर तिच्यात पडणारी नित्य भर हेच त्याचे कारण होय. बहुभाषी नागरिक स्वभाषा विकासात मोलाची भर घालू शकतात. सध्या मी इंग्रजी अधिक वाचतो. हिंदी अधिक लिहितो. मराठी सर्वांधिक बोलतो, वाचतो, लिहितो, विचार करतो. स्वप्न माझी मराठी असतात. ती तुमच्या भाषिक मातृत्वाची निशाणी असते. माझं त्रैभाषिक असणं व नव्या उगवती पिढीचं त्रैभाषिक असणं यात फरक आहे. मी अगोदर मातृभाषा शिकलो. नंतर राष्ट्रभाषा अंगिकारली. तद्नंतर मी आंतरराष्ट्रीय भाषेचा स्वीकार केला. भाषिक सहजता क्रम पाहू लागलो तर अगोदर मराठी नंतर हिंदी व शेवटी इंग्रजी असा क्रम खरा. पण तिन्ही भाषांच्या समान आकलनामुळे माझी मराठी अधिक समृद्धी झाली व होत आहे, हे मुद्दाम आपणास सांगायला हवे. महाराष्ट्राने आपले भाषिक धोरण ठरवताना कन्नड, तेलुगु, गुजराती, हिंदी या शेजारच्या भाषांच्या विकासाचा अभ्यास केला पाहिजे. संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम, ओडिसा भाषा अभिजात होतात, मराठी का नाही या प्रश्नाचे उत्तर केवळ इतिहास, परंपरेत न शोधता ते वर्तमानात पाळले, जगले, आचरले, तरच मराठी कालजयी आणि मृत्यूंजय होईल.

▄ ▄

मराठी भाषाकौशल्याची किमया


 विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, स्पर्धा परीक्षा याशिवाय बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए., बी. सी. ए., अशा पदव्या धारण करणारे तरुण म्हणजे बेकारीत भर असा समाजात एक गैरसमज पसरला आहे. कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, विधी, पत्रकारिता, चित्रकला, चित्रपट, भाषा, साहित्य, संगीत, क्रीडा इ. क्षेत्रात पदवी संपादून जगता येतं. चांगलं वेतन कमावता येतं. करिअर या क्षेत्रातही करता येतं हे आपण समजून घेतलं पाहिजे.

 साहित्य, कला, संगीत, जाहिरात क्षेत्रात शब्द मोजून मोल ठरते. त्यामुळे बी. ए., एम. ए., बी. कॉम., एम. कॉम., बी. बी. ए., एम. बी. ए., बी. जे. सी., एम. जे. सी., बी. सी. ए., एम. सी. ए., बी. पी. एड., एम. पीएड., बी. एड, एम. एड, ए. टी. डी., जी. डी. आर्ट या पदव्या संपादन करणा-यांना आता भाषेच्या अधिकार, सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, उपाययोजना इ. च्या आधारावर जीवनातील नवनवी क्षितिजे खुणावत आहेत व या क्षेत्रात डॉक्टर, इंजिनिअरपेक्षा अधिक प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसे मिळतात हे आपण रोज पाहात आहेत.

 शिक्षक/प्राध्यापक

 आज मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, गुजराथी इ. भाषांतून आपणास पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यासोबत शिक्षणशास्त्रातील पदविका अथवा पदवी संपादून शिक्षक, प्राध्यापक झालात की रु. २५,000 ते रु. १ लाख इतकं मासिक वेतन शासनमान्य श्रेणीनुसार मिळवू शकाल. समाजमानसात पेशापेक्षा शिक्षकाची प्रतिष्ठा मोठी आहे. मी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठीय शिक्षक, संशोधक, मार्गदर्शक, प्राचार्य अशी सतत नवनवी पदे संपादत माझं जीवन

यशस्वी व समृद्ध करू शकलो. माझं निवृत्ती वेतनच रु. ४0,000 आहे. यावरून शिक्षण क्षेत्रातील संधी आपलं जीवन यशस्वी करू शकतात यावर तुमचा विश्वास बसावा. समाजमनात या पदाची प्रतिष्ठा इतकी मोठी की विद्यार्थी कुठेही भेटोत लवून नमस्कार करतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचे विद्यार्थी तुम्हास आदराने साहाय्य करण्यास तत्पर असतात. मला बसमध्ये कधी उभे राहून प्रवास करण्याची पाळी येत नाही. कोणीतरी पालक, विद्यार्थी दत्त असतात. स्वतः उभे राहतात. मला बसवतात. यापेक्षा या क्षितिजाचं कवेत न येणारं टोक कोणतं?

 साहित्यिक/समीक्षक

 ललित लेखन हे भाषाप्रभुत्वाशिवाय करता येत नाही. तुम्ही भाषेतील उच्च शिक्षण संपादन केलं असेल तर अधिक प्रतिभा संपन्न लेखन करू शकता. मराठीत जे लेखक झाले त्यांना नि त्यांच्या वारसांना आज लाखो रुपयांच्या घरात मानधन मिळते. हे भाषेचे वाढते मूल्य स्पष्ट करणारे आहे. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य, व्यवसाय, नोकरी करत भाषेच्या बळावर कवी, नाटककार, कादंबरीकार, टीकाकार, वक्ता होऊन अधिक पद, प्रतिष्ठा, धन कमावून समाजापुढे ‘सेलेब्रिटी', 'रोल मॉडेल' होऊ शकता. वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, सुरेश भट, आचार्य अत्रे ही नावं जुनी झाली म्हटली तर आज द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या साहित्याचं मोल सदाबहार ठरतं आहे. साहित्यकृतींवर मालिका, चित्रपट बनून ते घरोघरी पोहोचत आहे. 'श्यामची आई' हे त्याचं सार्वत्रिक चित्र म्हणून सांगता येईल. 'ययाती' माहीत नाही, असा मराठी माणूस मिळणं दुर्मीळ! तुमच्या साहित्याचे अनुवाद अन्य देशी, परदेशी भाषात होऊन तुम्ही जगप्रसिद्ध होणं आजच्या संगणक, इंटरनेट व जागतिकीकरणाच्या युगात नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. समीक्षेशिवाय दैनिकाची पुरवणी वा नियतकालिक नसते हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे.

 अनुवादक/दुभाषी

 माहिती व संपर्क क्रांतीच्या या युगात दळणवळण व संपर्क माध्यमात इतकी गती आली आहे की जगाचे अंतरच संपून गेले आहे. जग World Wide Web (www) मुळे खेडं बनून एक झालंय. त्यामुळे माणसाचं बहुभाषी होणं आवश्यकच नाही तर अनिवार्य झालं आहे. भारतीय माणूस एका दिवसात देशाच्या या टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत जाऊन परत

येणं शक्य झालं आहे. तीच गोष्ट विदेशाची. विदेशी जाण्याचं, फॉरेन रिटर्न म्हणून घ्यायचा काळ केव्हाच मागे पडलाय. या बदलत्या स्थितीमुळे प्रत्येक भारतीयास सर्व भारतीय प्रांतभाषांची ओळख आवश्यक वाटू लागली आहे. भारतीयांचं ‘आंतरभारती' असणं व त्याचवेळी तो ‘आंतरराष्ट्रीय असणं काळाची गरज होते आहे. माणसात शेकडो भाषांच्या संपादनांची बौद्धिक क्षमता असली तरी व्यवहारात ते अन्य व्यवधानांमुळे उतरणे अशक्यप्राय होते. अशा वेळी अनुवादक व दुभाषा असणं वरदान ठरतं. अनुवाद व दुभाषी होण्यासाठी पदवीशिक्षणानंतर अनेक विद्यापीठात प्रमाणपत्र पदविका व पदवी पाठ्यक्रम आहेत. तुम्ही अनुवादक व दुभाषी म्हणून प्रावीण्य संपादन केल्यानंतर तुम्हास विदेशी सेवा विभाग, पत्रकारिता, पर्यटन, प्रकाशन, भाषा संपर्क इ. क्षेत्रात तर गलेलठ्ठ पगार मिळतोच पण आज विधी व वैद्यक क्षेत्रात लिप्यंतरण (ट्रान्स्क्रीप्शन), लिपिसर्जन/अनुवाद (ट्रान्सक्रियेशन), रूपांतरण, भाषांतर, द्विभाषिक संवाद इ. क्षेत्रे म्हणजे शब्द व मिनिटावर पैसे मोजणारी क्षेत्रे बनली आहेत. अनुवादकास आज पानावर दर ठरवून पैसे दिले जातात. दुभाषी मिनिटावर आपलं मूल्य वसून करतो. स्त्रियांना घर, मुलं-बाळं सांभाळून इंटरनेट, संगणक, ई-मेलद्वारे अनुवाद, लेखन कार्य करून हजारो रुपये मिळतात. पत्रकारिता, वाहिन्या, वृत्तसंस्था, आकाशवाणी, दूरदर्शन या विभागातही मोठी मागणी आहे. युवकांपेक्षा या क्षेत्रात युवती, महिला आघाडीवर असल्याचे सार्वत्रिक चित्र बनले आहे. त्यामुळे नर्स'सारखे हे क्षेत्र महिलांचे एकाधिकार क्षेत्र बनले आहे. जागतिक पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे भाषेच्या जोरावर चालतो. संपर्क, प्रचार, समुपदेशन, मार्गदर्शन, सहल संयोजक सर्व ठिकाणी अनुवाद व दुभाषी अशी जोड भूमिका वठवणाच्या व्यक्तींना प्राधान्याने घेऊन अधिक वेतन दिले जाते. सिनेमा, दूरदर्शनमध्ये ध्वनिमुद्रणात अनुवाद (डबिंग) चे महत्त्व वाढते आहे. चित्रपट अनेक भाषांत एकाच वेळी प्रकाशित करणे केवळ अनुवादामुळे शक्य झाले आहे. हिस्ट्री, नॅशनल जिऑग्राफी, कार्टून्स इ. चॅनल्स केवळ अनुवादाने बहुभाषिक, बहुदेशी झालीत.

 पत्रकारिता/माध्यम विकास

 विधी पालिका (विधिमंडळ/संसद), न्यायपालिका (न्यायालये), कार्यपालिका (प्रशासन) या देशाच्या तीन आधारभूत स्तंभानंतर चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारितेस. यात मुद्रित पत्रकारितेबरोबर महाजालीय पत्रकारिता (आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या) ही अंतर्भूत असते. हे

क्षेत्र आज जीवनातील सर्वाधिक प्रभावी माध्यम मानले जाते. याची सारी मदार असते ती भाषेवर. वृत्त लिहिणे, वृत्त संपादणे, वृत्त चित्रीकरण, वृत्त प्रक्षेपण, वृत्त निवेदन, वृत्त विश्लेषण, वृत्त संवाद, मुलाखती सर्वासाठी लागते ती भाषा. मुद्रित माध्यमात पत्रकार व संपादकांचा भाव रोज वधारतो आहे. एका वृत्तसंस्थेतून दुस-या संस्थेत गेले की किमान दहा हजार रुपयांची वाढ होते. इथले वेतनही शिक्षक, प्राध्यापकांशी स्पर्धा करणारे ठरले आहे. शिवाय समाजात मान्यता, आदर मिळतो तो वेगळा. इथे वार्षिक वेतन लाखांच्या घरात बोलले जाते. ही क्षेत्रे कार्पोरेट वा बहुराष्ट्रीय बनत चालल्याने ही भाषा प्रभुत्वावर इथलं मोल व मूल्य ठरतं.

 छायाचित्रण/छायांकन/ध्वनिमुद्रण

 ही कौशल्य व तांत्रिकदृष्ट्या नाजूक क्षेत्रे व पत्रकारिता व माध्यमांची अंग असली तरी भाषिक प्रतिभा व प्रभुत्वाच्या बळावर इथे तुम्ही राज्य करू शकता. इथेही राज्य, राष्ट्र, जग अशी विस्तारणारी साम्राज्य तुम्ही भाषेच्या जोरावर पादाक्रांत करू शकता. चांगले प्रश्न विचारता येणं, मुलाखत खुलवता येणं, वृत्ताचं कमी वेळात प्रभावकारी विश्लेषण करता येणं, प्रतिस्पध्र्यावर मात ही सारी राजकीय कौशल्ये आता छायाचित्रकार, मुलाखतकार, ध्वनिमुद्रणकार, छायांकनकार (व्हिडिओशूटर) यांच्यात केंद्रित झाली ती भाषिक साधन व सामथ्र्यावर. भाषा फिरवणे, वळवणे, वापरणे ज्याना लीलया जमते तो चांगला अँकर, डी. जे., आर. जे. होऊ शकतो तीच गोष्ट छायाचित्रण व ध्वनिमुद्रणास लागू पडते. कार्यक्रम होत असताना पाहणे, युद्धाचा प्रत्यक्ष थरार अनुभवणे या गोष्टी छायाचित्रकारांमुळे शक्य होतात. गौतम राजाध्यक्ष हे या क्षेत्रातलं उदाहरण. सत्यजित रे हा आदर्श. यामुळे या क्षेत्रास आज सोनेरी दुनिया म्हटले जाते ते उगीच नाही. आवाजाची अमीन सयानी जाद कोण नाकारेल?

 जाहिरात क्षेत्र

 पूर्वी जाहिरात केवळ मुद्रित असायची. तीत चित्र नसायची. असायचे ते फक्त शब्द आणि शब्द. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने' असं ते रूप होतं. मग जाहिरात सचित्र झाली. बोलकी व दृष्य झाली. ध्वनिमुद्रण किमयेमुळे रेडिओ जाहिरातीचं प्रभावी माध्यम बनलं. श्रव्य जाहिरात (जिंगल्स) आज कोट्यवधीची उलाढाल करत आहे. दूरदर्शन, चित्रपट, वाहिन्या (चॅनल्स) मुळे जाहिरात दृक्-श्राव्य बनली तशी जाहिरातीतील भाषेचं सामर्थ्य वाढलं. 'हूँढते रह जाओगे', ‘कर लो दुनिया मुट्ठी में’, ‘श्री

इन फ्री' यांसारख्या जाहिराती आबाल-वृद्धांच्या तोंडी एकाच वेळी घोळतात. ते भाषिक बळावरच, जाहिरात विश्वात एका शब्दाला एक कोटी रुपये मिळतात. या क्षेत्रात कल्पना, प्रतिभा, दृष्टी, भाषा, संगीत, वादन, गायन, भाषण, लेखन सान्याला सारखं महत्त्व असतं. जाहिरातींची उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. वृत्तपत्रे व वाहिन्या चालतात त्या जाहिरातीवरच. इथं भाषा सर्वस्व असते. सत्ता जाहिरातीवर चालते व जाहिरातीमुळे कोसळते म्हणतात, त्यात भाषाई जादूच असते.

 या प्रमुख क्षेत्रांशिवाय कार्यक्रमांचे सूत्र संचालन, कार्यक्रम संयोजन (इव्हेंट मॅनेजमेंट), ध्वनी अभिनय (व्हाइस ओव्हर), सजावट, फॅशन, आकाशवाण, दूरदर्शन, संगणक, गायन या क्षेत्रातही भाषेचं असाधारण महत्त्व असतं. तिथंही तुम्हास कीर्ती, प्रसिद्धी, मान्यता, प्रतिष्ठा, संपत्ती मिळते तिचा आधार भाषाच असतो. व्यापार, उद्योगात, प्रवास, पर्यटनात ही भाषेचं संवाद कौशल्याचं महत्त्व वाढतं आहे. शब्द ‘शस्त्र आहे. त्याचा जपून वापर करा' असं शाळेच्या तुळईवर लिहिलेलं सुभाषित आज जगण्यात ब्रह्मवाक्य होतं.

 यावरून भाषेचं महत्त्व अधोरेखित होतं. भाषा हृदयाचा ठाव घेणारी असते. ती मधुर हवी. ती संवादी हवी. असं जे आज वारंवार सांगितलं जातं ते वक्तृत्वास जगण्यात आलेल्या महत्त्वामुळे. आज आपलं जीवन राजकारण केंद्रित झालं आहे. राजकारणाची सारी मदार, उतार-चढ़ाव सारं भाषिक प्रयोगांवर बेतलेलं असतं म्हणून नव्या पिढीने उच्च शिक्षणात प्राधान्याने भाषिक अभ्यासक्रम निवडले पाहिजे. भाषेतील पदवी म्हणजे जगण्याचा सुखी जीवनाचा परवाना मानून नवी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भाषिक अभ्यासक्रमांना जगण्याचं सशक्त साधन म्हणून स्वीकारावं तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल!

▄ ▄

जागर वाचनाचा


 वाचन ही मोठी गुंतागुंतीची गोष्ट खरी! माणूस वाचतो म्हणजे नक्की काय करतो? तर तो अक्षर, शब्दात दडलेला आशय, अर्थ, अनुभव, ज्ञान, भाव ग्रहण करतो, त्याचे आकलन करतो, रसग्रहण करतो, वाचलेल्यावर विचारमंथन करतो. वाचन म्हणजे लेखक आणि वाचकातला मूक संवाद आणि देवाण-घेवाणही! अलीकडच्या काळात वाचनास संस्कृती मानलं जातं. संस्कृती परंपरेतून विकसित होत जाते. वाचन संस्कारातून विकसित होते. या संस्कारात कधी पालक, कधी शिक्षकांचा वाटा असतो तर कधी व्यक्तित आंतरिक प्रेरणेने वाचन ऊर्जा, वृत्ती, सवय निर्माण होते.

 आधी लेखन जन्मले मग वाचन, साहित्य, भाषेच्या लोक परंपरेत, वाङ्मय (मौखिक) रूपात वाचन अस्तित्वात नव्हतं. त्या काळात ऐकणं, लक्षात ठेवणं व लक्षात राहिलेलं सांगणं म्हणजे ज्ञान, शिक्षण मानलं जायचं. ज्याची स्मरणशक्ती तीव्र तो विद्वान गणला जायचा. म्हणजे दुसच्या अर्थाने पोपटपंची म्हणजे विद्वत्ता होती. जसं लेखन आलं तसं वाचन, स्पष्टीकरण, आकलन जन्माला आलं. पुढे मुद्रणकला माणसानं विकसित केली. त्यापूर्वी तो खोदायचा रचायचा. लिहिणं... शाई, बोरू, टाक इ. साधनं नंतर आली. मुद्रितात ठसे आले. ठशांचे खिळे (Font) झाले. आज संगणकाच्या युगात शाई, पेनची सुट्टी झाली. टंकन हेच लेखन बनलं. आज संगणकीय संसाधन (सॉफ्टवेअर) विकासामुळे बोललेलं ध्वनिमुद्रित होतं. ध्वनिमुद्रिताची लिखित प्रत मिळते. लिखित (Text) वाचलं (Speech)जातं. पाहाणे हेच आज वाचन होऊ बसलंय हेच आपल्या लक्षात येत नाही.

आज आपण उगीच हाकाटी पेटवत आहोत की वाचन संस्कृती संपली. नवी पिढी अनेक प्रकारे वाचते आहे. त्याचं ऐकणं, पाहाणं, विचार करणं, वाचनच आहे. अभ्यासच आहे. घरोघरी मुलं टी.व्ही. पाहातात. त्यांना न शिकवता मराठी शिवाय हिंदी, इंग्रजी ऐकता, बोलता, लिहिता येतं ते ऐकण्या, पाहण्यामुळेच. तुम्ही पूर्वी जे गिरवून, घोकून करायचा ते ही मुलं विनासायास करतात. आपण उगीच त्यांना नावं ठेवतो, त्यांची काळजी करतो. नवी पिढी स्वयंशिक्षित आहे. जन्मतःच ती तंत्रकुशल, बहुभाषी बनते आहे ती संसाधन विकासामुळे ई रीडर पिढी पूर्व पिढीपेक्षा अधिक वाचते, विचार करते.

 वाचन हे बाळकडूसारखं असतं. ते बालपणीच पाजावं लागतं. म्हणून वाचन व्यासंग व छंद ज्या शिक्षक-पालकांत असतो, त्यांची मुलं, विद्यार्थी वाचन वेडी होण्याची शक्यता असते. बालवयात वाचन भूक व तहान सतत वाढवत, विकसित करत ठेवली तर जीवनभर ती मग पाठलाग करते व आयुष्य समृद्ध होतं. त्यासाठी शिक्षकांत बाल वाङ्मय वाचनाची जाण व सवय असेल तर वाचनाचं बाळकडू चांगलं पाजू, रुजवू शकतो.

 चांगलं वाचन असलेला शिक्षक चांगलं शिकवू शकतो. वाचू आनंदे' अशी वृत्ती शिक्षकात असेल तर शिकवण्यात एक प्रकारचा त्यात आत्मविश्वास येतो. तो आपल्या विद्याथ्र्यांना उच्च प्रतीचं ज्ञान देऊ शकतो. तो वर्गात आश्वस्त मनाने शिकवू शकेल तर त्याचं शिकवणं प्रभावी झालंच समजा. वाचनात खोट असेल, ते कमकुवत असेल तर तो शिक्षक स्वास्थ्याने शिकवू शकत नाही. वर्गात शिकवताना त्याच्या मनावर सतत ताण, दडपण राहणार हे उघड आहे. आपल्या व्यवसायाची गरज व गुंतवणुकीचं भान असेल तर वाचन नित्य राहातं, शिवाय चतुरस्रही! मग शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा मेरूमणी, दीपस्तंभ ठरतो. म्हणून शिक्षक घडत असताना, शिक्षकाच्या प्रशिक्षणात वाचन वेडवाढीची योजना हवी. वेगवेगळ्या उपक्रम, कार्यक्रम, प्रकल्प यातून तो तावून, सुलाखून निघेल तर त्याचं वाचन वैविध्यपूर्ण आणि मन अष्टावधानी झाल्याशिवाय राहणार नाही.

 वाचन हे समाधी असतं. तुम्ही मनापासून वाचाल तर जग विसरून पुस्तकात आकंठ बुडता. जग विसरायला लावणारी पुस्तकं श्रेष्ठ, शिक्षकानी वाचलीच पाहिजेत अशी कितीतरी पुस्तके आहेत. 'वाचू आनंदे', 'लिह नेटके', 'प्रिय बाई’, ‘जलद आणि प्रभावी वाचन’, ‘शिक्षक आहे पण शिक्षण नाही', 'गुजरातेतील उपक्रमशील शाळा', 'शाळाभेट’, ‘माझी

काटेमुंढरीची शाळा', ‘प्रज्वलित मने' सारखी पुस्तके शिक्षकांनी मग तो कोणत्याही इयत्तेचा, स्तराचा (माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय) असू दे. त्यानं ही पुस्तकं वाचायलाच हवीत. कारण ती एकतर शिक्षकांनीच लिहिली आहेत, शिवाय ते सारे शिक्षक प्रयोगशील, उपक्रमशील होत. शिक्षक आणि शिक्षण हाच त्यांचा ध्यास असे आणि आहे. शिक्षकाचं आपल्या घरी स्वतंत्र व समृद्ध ग्रंथालय हवं.

 शिक्षकाचं वाचन व्यासंगी असेल तर तो गावाचा वाटाड्या, मार्गदर्शक होईल. वर्तमानकाळात त्याच्या डोक्यात ग्रंथसूची हवी तशी वेब सूची ही हवी. तो संगणक साक्षर हवा. वेदापासून वेबपर्यंत असा विशाल वाचन पट लाभलेला शिक्षक एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलू शकेल व तसे विद्यार्थी घडवू शकेल.

 तरुण वाचक आज जीवनोपयोगी पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचतात. त्यांच्या स्पर्धा परीक्षांचं वारू भारलेलं आणि भरलेलं आढळतं. देशसेवेच्या ध्यासाने स्पर्धा परीक्षेत उतरणारे विद्यार्थी हवेत. स्पर्धा हवी पण विधायक व परहितवर्धक सिंगापूरसारख्या छोटा देश. त्याच्या पहिल्या पंतप्रधानाचं नाव आहे ली क्वान यू. त्यांचे चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. ते वाचायला हवं. मी तो देश चांगला चार-पाच वेळा पाहिलाय. देश घडवणं काय असतं ते तिथे गेल्यावर उमजतं. सध्या त्यांचा मुलगा तिथं पंतप्रधान आहे. भारतासारखाच बहुभाषी, बहुविध जात, धर्म, वंशांचे लोक तिथं राहतात. पण सर्वांप्रती समभाव. पंतप्रधानास सतत देशाचाच ध्यास. ली क्वान यू यांना असं वाटलं की देश घडणीचं शिक्षण म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा विधिवत अभ्यास. ते चक्क सुट्टी घेऊन हार्वर्ड विद्यापीठात गेले व विद्यार्थी झाले. देश घडणीसाठी विद्यार्थी झालेले ते जगातले पहिले पंतप्रधान. देशात काही पिकत नाही. पिण्याचे पाणीही शेजारच्या मलेशिया देशातून थेट पाईप लाइनने आणून जगणारा देश. देश तर कसला. एक गावच आहे. पण जगात शिक्षण, श्रीमंती, उद्योग, भ्रष्टाचार मुक्त, शिस्तप्रिय देश म्हणून जगातल्या पहिल्या पाच देशात गणला जातो. वाचनाने जग बदलते याची ही खूण. त्या देशाचे प्रमुख सल्लागार शिक्षक आहेत. ते चोखंदळ वाचक आहेत. रे व्हर्नार त्यांचं नाव, ते व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत. शिक्षक पण व्यवस्थापन कुशल असेल तर विद्यार्थीही तसे घडणार.

 अलीकडच्या काळात ‘वाचन संस्कृती', ‘कार्य संस्कृती' सारखे शब्द परवलीचे झाले आहेत. आजच्या माध्यम प्रभावी काळात वृत्तपत्र वाचन व

माध्यम दर्शन (पाहणं) वाढलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणून वृत्तपत्र व माध्यमे सध्या मत मार्गदर्शक झाली आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे. लंडनसारख्या शहरातून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रं आहेत. - ‘द गार्डियन', 'ऑब्झर्व्हर' ती आपल्या वर्तमानपत्रातून 'टीचर नेटवर्क' चालवतात. शिक्षकांना मार्गदर्शक होईल अशा बातम्या, चर्चा, सल्ला, सूचना ही वर्तमानपत्रे रोज देत असतात. हे मी लंडनला असताना पाहिलं, वाचलं आहे.

 आयुष्यभर वाचन व्यासंग जपणारी माणसं खरे देशप्रेमी. स्वतःच्या मिळकतीतल्या काही वाटा जे सतत वृत्तपत्र, नियतकालिक, ग्रंथ, ई-बुक्स, सीडीज्, खरेदीवर खर्च करतात, ते वाचतात, पाहतात, ऐकतात ते एकपरीने आयुष्यात ज्ञान, अनुभवाची शिदोरी पेरत आपलं जीवन समृद्ध करत असतात. पाहणं हे वचन जसं, तसं तो एक प्रकारचा आश्वासक अनुभवच असतो. वाचनापेक्षा पाहणं प्रभावी पण त्यासाठी दृष्टी हवी. काय पाहायचं याचं भान, आकलन, जाण महत्त्वाची. देशाटन, पर्यटन पण समृद्ध वाचन अनुभवच. पण तुम्ही नुसती तीर्थयात्रा, तीर्थाटन कराल तर तीर्थच हाती येणार हाती आलं पाहिजे ज्ञान. ते दृष्टीने येतं. मंदिराचा इतिहास, शिल्पकला, त्याचं समाजकार्य पहाल तर मंदिरात जाणं गैर नाही. पण ते होत नाही. निसर्ग पर्यटनाचंही तसंच आहे. पर्यावरण पाहायचं नाही, जपायचा संस्कार महत्त्वाचा. किती नद्या, पर्वत, दया, किल्ले, घाट, किनारे, जंगले आपण विद्रुप, विकृत करून टाकलीत. वाचनाने जग बदलते' म्हणतात. आपल्या वाचनाने ‘भारत निर्माण झाला असे म्हणणे धाडसाचे ठरावे. असे का व्हावे? तर आपल्या शिक्षण, शिक्षकात खोट राहिली आहे. आपल्या अभ्यासक्रमात वाचन संस्कार, स्पर्धा, पुरस्कार नाही.

 वाचन शास्त्र आहे. वाचनाचा पट असतो. म्हणजे वाचकाच्या दृष्टिक्षेपात किती शब्द, ओळी येतात ते महत्त्वाचे. हा पट विस्तारता येतो. शिवाय वाचनाची गती असते. ती मोजता येते, वाढवता येते हे किती। शिक्षक जाणतात. ‘जलद व प्रभावी वाचन' या विषयावर प्रशिक्षण महत्त्वाचं. वाचन हे भाषिक कौशल्य आहे. ते विकसित करता येतं. माध्यमं त्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. जलद वाचनाचे फायदे असतात तसे तोटेही ते जाणून घ्यायला हवेत. वाचन वेग व गती महत्त्वाची. वाचलेलं रिचवणं, रूजवणं सर्वाधिक महत्त्वाचं. त्याचं भान जाण महत्त्वाची. वाचनाचे दोषपण असतात. ते माहीत हवेत. मग ते दूरही करता येतात हे लक्षात येतं.

वाचनाचे अनेक प्रकार असतात. मूक वाचन, प्रकट वाचन, आकलन, चिंतन, मनन ही सारी वाचनाचीच अंगे, उपांगे होत. वाचनात डोळे व डोके ठिकाणावर हवे. 'देह देवळात, चित्त खेटरात' राहील तर काहीच हाती येणार नाही. डोळ्यांच्या हालचालीवर व डोक्याच्या (चित्त) थाच्यावर असण्यावरच वाचन प्रभावी होतं. स्मरणात राहातं. ते चिरस्थायी, चिरंतन होतं, जर चित्त निरंतर शुद्ध व शुद्धीवर असेल तर म्हणून वाचन संस्कार, संस्कृती, समाधी होय. वाचन मनस्वी, मनःपूत होईल तर वाया नाही जाणार. वाचन सराव हा बौद्धिक व्यायामच. संदर्भ हा खुराक हो सकस हवा. ज्ञान म्हणजे शक्तीवर्धक ते बहविध हवे. सर्व जीवनसत्त्वाचं आपलं असं महत्त्व, प्रमाण तसं ज्ञानाचंही. तर्क म्हणजे अनुभव संपन्नता ती चिंतन, मनन, व्यासंगाची परिणामी, वाचनाचं आकलन होणं व आकलनाचा वापर, उपयोजन महत्त्वाचं. प्रगतीचा मार्ग त्यातूनच विकसित होतो. वाचनानं माणसाचं व्यक्तिमत्त्व समतोल होतं.

 शिक्षक अजेय योद्धा बनून शिकवेल तरच शिक्षण समृद्ध होणार. ते संशोधनाधारित व्हायचं तर वाचन हाच त्याचा एकमेव आधार. प्रज्ज्वलित मनाचे विद्यार्थी घडवायचे तर शिक्षक ऊर्जावान व वाचन समृद्ध, वाचन संस्कारी हवा. मुलांशी संवाद व सहवास साधणारे शिक्षक आयुष्यभर हृदयस्थ राहातात. शिक्षकांचे संवाद कौशल्य हे हृदयीचे, ते हृदयी' हवे. मग तो विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा अवकाश जाणून ती पोकळी कशाने भरायची हे ठरवू शकतो. शिक्षकाचं शिकवणं परंपरेस छेद देणारं, नवध्यासी असेल तर विद्यार्थी महत्त्वाकांक्षी निपजणार. विद्यार्थ्यांना सतत चेतवणारा, जागवणारा शिक्षक वाचनातूनच साकारतो. शिक्षकाच्या प्रेरणा विधायकच हव्यात. त्यात विखार असता कामा नये. शिक्षक संयमी, दूरदर्शी, सर्व समावेशक हवा. असं संतुलन बहुमुखी वाचनातूनच शक्य आहे. शाळेच्या शिक्षणाच्या व शिकवायच्या परिवर्तनाचा ध्यास लागलेला शिक्षक सतत अस्वस्थ असतो. कारण त्याची वाचनाची तहान, भूक हरवलेली असते. अशा वाचनाची तहान, भूक हरवलेली असते. अशा वाचकाची झोपही मग हरवते. जागे वाचक, शिक्षक, नागरिकच देश जागा करतात, ठेवतात.

▄ ▄

संगणकीय तंत्रज्ञान व बदलता वाचन व्यवहार

 आज वाचकांचा वाचन व्यवहार माहिती व तंत्रज्ञानाच्या विकसित विविध साधनांमुळे झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे ज्ञानव्यवहाराची पूर्वीची चौकट बदलून तिची जागा नवी व्यवस्था घेते आहे. पूर्वी ग्रंथ, मासिके, नियतकालिके, वृत्तपत्रे, कोश हीच ज्ञानसाधने होती. संगणकीय व्यवस्थेवर आधारित नवे ज्ञानतंत्र विकसित झाल्याने वाचनाची साधने व पद्धती यात आमूलाग्र बदल झाला आहे. संगणकाच्या विकसित रूपामुळे एकट्या संगणकात भंडारणक्षमतेत अनपेक्षित विकास झाला. इंटरनेटमुळे जगातले सारे संगणक उपग्रहीय दळणवळणामुळे एकमेकास जोडले गेले. त्यामुळे सारी ग्रंथालये एकमेकांस जोडली गेली क्षणात व बिनखर्चात पोहोचवणे शक्य झाले. घरी बसून ग्रंथ वाचणे आता नवे राहिले नाही. किंडल, मोबाइल्स, यू-ट्यूब, पोजेक्टर्समुळे ग्रंथालय खिशात ठेवणे शक्य झाले. लिखिताचे वाचन व स्थानांतरण गतिशील झाल्याने व ज्ञानसाधनांच्या ईआवृत्तींचे पेव फुटल्याने ग्रंथालये एखाद्या टेलिफोन एक्सचेंज सारखी ‘नॉलेज एक्सचेंज' बनली. विशेष म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्तिगत वाचकांच्या अद्यतन विकासाच्या मानाने सार्वजनिक ग्रंथालये कात टाकताना दिसत नाहीत. ग्रंथालयांनी डिजिटाइज नॉलेज सिस्टिम अंगिकारली नाही तर त्यांचे मरण अटळ आहे.

 नवा वाचक ई-लर्नर आहे. तो लिहिणारा राहिला नाही. तो टंकित साक्षर आहे. त्याला वही, पेनची गरज नाही. स्क्रीन व माऊसद्वारे तो कीबोर्डच्या साहाय्याने वाचन, प्रेषण, लेखन, संपादन, भाषांतर सारे करू लागला आहे. त्यामुळे ई-सामग्री त्याचे जीवन साधन आहे. हा बदलता वाचक प्रवाह व त्यांच्या सवयींचा विचार केला तर ग्रंथालयांची जागा

लँग्वेज लॅब, कॉम्प्युटर लॅब, इंटरनेट कॅफे, कम्युनिकेशन सेंटर्स घेऊ लागली आहेत. मुद्रित ज्ञानसामग्रीची जागा पेनड्राइव्ह, सी.डी. डि.व्ही.डी. मोबाईल अॅप्स, किंडल्स, रेकॉर्डर, कॅमेरे, मोबाईल्सनी घेतली आहे. मुद्रित वाचन मागे पडून दृक-श्राव्य वाचन त्याची जागा घेत आहे. त्यामुळे ग्रंथालय साधने, कार्यपद्धती, संग्रहण, प्रेषण व्यवहारही मूलतः बदलून गेले आहे. पण या बदलांची दखल जितक्या गती व तत्परतेने सार्वजनिक ग्रंथालयांनी घेणे गरजेचे होते, तितकी गतीशीलता व परिवर्तनाच्या पाऊलखुणा आढळून येत नाहीत.
 गुगल, याहू, मायक्रोसॉफ्ट सारखी सर्च इंजिन्स, ई-कोश, विकिपीडिया, क्लिप्स, लिंक्स, वेबसाईटस्, इमेजिस, ऑडिओज, व्हिडिओज, नकाशे, आलेख, ऑनलाईन, ऑफलाईन सॉफ्टवेअर्स, उपग्रहीय चल परिवर्तित चित्रण (२४x७) यामुळे एका अर्थाने मुद्रित सार्वजनिक ग्रंथालयाचे जुने रूप इतिहासजमा झाल्यासारखे आहे. आता गरज कायाकल्पाची आहे. हे खरे आहे की वेब साहित्य व संदर्भ शैक्षणिक संशोधनासंदर्भात शुद्धता व अधिकृततेच्या पातळीवर विश्वासार्ह नाहीत. परंतु त्यांची अद्यतनता वाचकास भुरळ पाडणारी खचितच आहे. शिवाय ती एकाच वेळी विविध ज्ञानविज्ञान शाखांचे संदर्भ जितक्या गती व तत्परतेने देते, ती वेळ, श्रम वाचवणारी आहे. लिहिण्यापेक्षा तायर मुद्रित संदर्भ व हवे तेवढेच घेण्याची सोयही वाचकास मुद्रिताकडून अंकीय (Digities) ज्ञानस्त्रोतांकडे झपाट्याने नेत आहे. नवे आभासी (Vertual) तंत्ररूप तर आणखीनच विलोभनीय बनत आहे. विद्यार्थी वेब साहित्य व साधनांचा वापर ज्ञानाच्या उपयोगाच्या प्राथमिक पातळीवरच करू लागल्याने (व्हिडिओ गेम्स, वॉइस रेकॉर्डिंग, वाईस सर्च इ.) उपजत टंकन साक्षर पिढी (Digital Native) हे वर्तमान ग्रंथालयांपुढील आव्हान आहे. कारण त्यांच्या विश्वांच्या व तंत्रांच्या गरजा भागविण्याची साधने व सुविधा वर्तमान ग्रंथालयांकडे नाहीत. विद्यापीठे, संशोधन केंद्रे, महाविद्यालय यांची ग्रंथालये अद्यतन होत यास अपवाद बनत चालली आहेत.

 एक साधी गोष्ट आहे की पूर्वी जिज्ञासू वाचकाच्या तुलनेने वर्तमान वाचक कमी जिज्ञासू आहे. कारण इच्छा असो, नसो त्याला किती तरी गोष्टींचे ज्ञान माहितीच्या विस्फोटीय पर्यावरणात आपसूकच होते आहे. शिवाय वर्तमान वाचकास ग्रंथालय नावाची व्यवस्था सातही दिवस चोवीस तास सक्रीय हवी आहे. त्याचे घड्याळ व परिपाठ आठ तासाचा न राहता

तो चोवीस तासांचा झाला आहे. हेच ज्ञानाचे जागतिकीकरण, सार्वत्रिकरण होय. आज उच्च शिक्षण स्तरावर (१२+) १00 % विद्यार्थी मोबाईल धारक होणे म्हणजे संगणक साक्षर होणेच होय. मोबाईल्स मधील वेगवेगळी अॅपस् अन्य काही नसून नवी अद्यतन ज्ञानस्त्रोत व साधनेच होत. याचे भान ग्रंथालयांना येईल, तेव्हाच ती नव वाचकांची सहाय केंद्रे होतील. अन्यथा नव वाचन संस्कृतीतील ‘समृद्ध अडगळ' या पलीकडे त्यांचे स्थान राहणार नाही.

▄ ▄


चला मुलांसाठी नवा डाव मांडू या



 रूढ अर्थाने मी बालसाहित्यिक नाही. मात्र मी बालसेवक खचितच आहे. मुले मला आवडतात. मुलांसाठी सर्व काही करायला मला आवडते. विशेषतः ज्या मुलांना काही नाही, त्यांना सर्व काही देण्यात मला अधिक रस आहे. खेड्यात शाळा पोहोचली, पण साहित्य पोहोचले असे म्हणणे अतिशयोक्त ठरेल. अशा संमेलनांमुळे बालकुमार वयातील मुलामुलींत साहित्याची आवड व गोडी निर्माण होते. साहित्यिक भेटतात, बोलतात. त्यांना ऐकणे, पाहणे हा देखील एक मोठा अविस्मरणीय ठेवा आहे. ती बालपणातील आनंद पर्वणी असते. मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा शाळेत येणा-या साहित्यिक, कलाकार, वक्ते यांची सही घ्यायचो. एकदा आमच्या शाळेत बालसाहित्यिक यदुनाथ थत्ते आले होते. त्यांनी माझ्या वहीवर सही करण्यापूर्वी संदेश लिहिला होता, 'वेडे व्हा'. आज मी बालकवेडा म्हणून तुमच्या पुढे उभा आहे. अशा संमेलन समारंभाचे हे योगदान असते.

 तुमचं हे दुसरं बालकुमार संमेलन आहे. वर्ष आहे सन २०१४. म्हणजे एकविसाव्या शतकातलं हे संमेलन या शतकातली मुलं पाहतात अधिक, वाचतात कमी. शिक्षक, पालक हल्ली तक्रार करतात. मुलं वाचत नाहीत हे मला मान्य नाही. मी मलांचा वकील आहे. माझं म्हणणं आहे. आजच्या युगात वाचन, लेखनाची पद्धत बदलली आहे. मुलांचं पाहणं वाचनच आहे. हे नवं वाचन आहे, माझ्या बालपणी रेडिओ होता. आम्ही ऐकायचो. ऐकणं आमच्या काळात वाचनच होतं. त्याला ‘बहुश्रुत' होणं म्हणायचे. आज मुलंमुली टीव्ही., सिनेमा पाहतात, मोबाईल्सवर गेम खेळतात. व्हिडिओ पाहतात. त्यांचं पाहणं हे नव्या युगाचं नवं वाचन आहे. मुलांना मनसोक्त पाहू द्या जे आणि जेवढं, जितका वेळ पाहायचं ते पाहू द्या. seeing is



believing हे नवं शिक्षण सूत्र आहे. माझ्या लहानपणी घोकमपट्टी म्हणजे शिक्षण होतं. पोपटपंची म्हणजे शिक्षण, मला शिक्षक, पालकांना विचारायचं आहे; तुम्हाला पोपट हवेत की गरुड? पोपट हवे असतील तर पिंज-यातलं शिक्षण द्या. आज जागतिकीकरणाचा काळ आहे. या मुलांना जग जिंकायचं आहे. त्यांना मुक्त शिकू द्या. ज्ञानरचनावाद आला आहे. म्हणजे काय? स्वतः शिकणं त्यांना चुकू द्या, त्यांचं ते शिकतील.

 पूर्वीचे लेखक पेन, पेन्सिलनी लिहायचे. चित्रकार कुंचला वापरायचे. आज संगणक युग अवतरलं आहे. पेनची जागा पेन ड्राइव्हने घेतली आहे. तुमच्या खिशात शिक्षक, पालक, लेखकांच्या खिशात पेन असेल तर ते मुलांशी नातं जोडू शकणार नाहीत. पेनड्राइव्ह असेल तर तुम्ही क्लिप, व्हिडिओ, कार्टून, सिनेमाचं गाणं, बडबडगीत दाखवू शकाल. दाखवाल तर मुलं शिकतील. बोलत राहाल तर झोपी जातील. मुलांना तुम्हाला झोपवायचं आहे की जागं ठेवायचं आहे. ते तुम्ही ठरवा. 'श्यामची आई', ‘चांदोबा'तून बाहेर या. नोबिता, डोरेमॉन, शिजुका, मिकी माऊसची कथा त्यांचं नवं कल्पनाविश्व आहे. अल्लाउद्दीनची दिवा, उडती चटई गेली. गॅझेटसूची भाषा त्यांना कळते. पाढे येत नाहीत म्हणून चिडू नका कॅल्सी वापरता येते ना? मोबाईलशी खेळतो ना? रिमोट वापरता येतो ना? तेच त्यांचं नवं जीवन कौशल्य आहे.

 मुलांना अंक आणि अक्षरं गिरवायला शिकवू नका. टंकलेखन शिकवा. त्यांना लिहायचं नाही आहे पुढे. टायपिंग करायचं आहे, याचं भान ठेवा. स्क्रीनच नवी वही, पुस्तकं आहेत. नव्या जगाचं बदलतं चित्र मनी कोरा. जुनी पाटी पुसा. नवा विचार बाळगा.

 मुलांशी मैत्री करा. मुलांचे मालक, पालक, लेखक, शिक्षक नका बनू. बाल सवंगडी बना. त्यांचं नवं जग समजून घ्या. जग संगणक, इंटरनेटनी छोटं खेडं होऊ पाहात आहे. ‘ग्लोबल व्हिलेज' येतं आहे. करंबळीतही फोन, केबल, टीव्ही, मोबाईलसुद्धा आहेत. खेडं म्हणून ते मागं नाही. पुढेच गेलं आहे. आणखी पुढे जाणार आहे. गावचा विकास रोजच होत राहाणार आहे. मात्र लक्षात असू द्या. रस्ते, मोटार, मोबाईल म्हणजे खरा विकास नाही.

 माणूस मोठा झाला का? मुलं घरोघरी अनाथ नाही ना होत? ते पहा. माझं निरीक्षण आहे. घरोघरी मुलं मुली एकटी पडत आहेत. तुटत आहेत. मायेला ती पारखी होत आहेत. त्यांना सर्व मिळतं. टिफिन, दप्तर, पेन,

टाय, बूट सर्व मिळतं. मिळत नाहीत आई बाबा. शिक्षक शिकवतात. त्यांना भेटत नाहीत. त्यांच्याशी बोलत नाहीत. या मुलांना मित्र मैत्रिणी राहिल्या नाहीत. खेळता येत नाही. असंवाद, अलिप्तता एकटेपण त्यांचं जीवन होत आहे. भौतिक समृद्धी वाढते आहे. भावनेचा दुष्काळ पसरतो आहे.

 बालसाहित्यिकांपुढील खरा प्रश्न मुलांचं वर्तमान वंचित जीवन आहे. मुलांचं जग समजून लिहा. लिहिण्यापेक्षा त्यांच्याशी जीवाभावाचं बोला. ती प्रेमाला पारखी पाखरं बनत आहेत. तुम्ही बालपारखी व्हा. त्यांना हसवा. फिरवा, नाचवा. ती त्यांची खरी गरज आहे. साने गुरुजींचा पाझर परत एकदा फुटला पाहिजे. मुलांचं दुःख पाहून दुःखी होणारे शिक्षक, पालक, लेखक हवेत. मुलांचं मन गुंतेल असं साहित्य हवं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सारंच नवं आहे. पृथ्वी तापली आहे, आग वणवा होतो आहे. तेज लोपले आहे. वायू गळती सुरू आहे. आकाश फाटलं आहे. माणूस जूळेल तर सारं भरून येईल. मुलांसाठी आपण आपल्या मनात जागा करू या. जागे राहू या. मुलांना जागे ठेवू या.

 जय जगत्! बाल जगत्!!

▄ ▄

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान




 मराठी भाषा आणि संस्कृती विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करून महाराष्ट्राच्या जनतेने त्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्यानंतर १ मे, १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र राज्याची मुहर्तमेढ रोवली गेली. नामदार यशवंतराव चव्हाण मराठी भाषिक स्वतंत्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे स्वप्न स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, ‘‘महाराष्ट्र ही भूमी अनेक संत, पराक्रमी वीर, त्यागी समाज सुधारक व विद्वान, देशभक्त यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व लोकमान्य टिळक ही आमची प्रातिनिधिक प्रतीके आहेत. त्यांनीच महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना केली व तिचा वारसा आपल्या हाती दिला. हा अमोल ठेवा आपल्या हृदयात जपून ठेवणे व त्याचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य ठरते. आज आपले मराठी भाषी राज्य स्थान होत असताना आपल्या देशाची भरभराट करण्यास व त्याची कीर्ती दिगंत पसरविण्यास आपले शक्तिसर्वस्व देऊ अशी आपल्यापैकी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे." या प्रतिज्ञेनुसार महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' स्थापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यात सर्वश्री महामहोपाध्याय वि. वि. मिराशी, डॉ. ए. एम. घाटगे, प्राचार्य

दिनकर कर्वे, प्रा. गोवर्धन परीख, डॉ. पी. एम्. जोशी, प्रा. न. र. पाठक, प्रा. वा. ल. कुलकर्णी प्रभृती मान्यवरांचा समावेश होता.

 हे मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी प्रसृत अध्यादेशात मंडळाची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली होती. त्यानुसार मराठी भाषा, संस्कृती व इतिहासाच्या संशोधनार्थ प्रकल्प हाती घेणे, या संदर्भातील ग्रंथ प्रकाशित करणे, मराठी ग्रंथ, चरित्रे, नियतकालिके प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देणे, मराठी ग्रंथसूची, विश्वकोश, शब्दकोश इ. संदर्भ ग्रंथ प्रकाशित करणे, विश्वभाषांमधील श्रेष्ठ ग्रंथांची मराठी भाषांतरे प्रकाशित करणे, मराठी साहित्य विकासाच्या नवनवीन ज्ञान-विज्ञान शाखांचा शोध घेणे, महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीचा इतिहास लिहिणे इ. चा त्यात अंतर्भाव करण्यात आला होता. या मंडळाने गेल्या ५० वर्षात या अनुषंगाने मोठे कार्य केले आहे.

१. ग्रंथ प्रकाशन

 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या गेल्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत मंडळाने अनेक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करून महाराष्ट्राच्या साहित्य विकासात मोठे योगदान दिले आहे. प्रा. अशोक रानडे लिखित ‘स्टॅविन्स्कीचे सांगितिक सौंदर्यशास्त्र', डॉ. वा. वि. मिराशी लिखित ‘कालिदास', 'शेक्सपिअर परिचय ग्रंथ', 'महात्मा फुले समग्र वाङ्मय', ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ', डॉ. सं. ग. मालशे लिखित ‘साहित्य सिद्धांत', 'कौटिलीय अर्थशास्त्र', स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘भाषाशुद्धी', 'संपूर्ण गडकरी (भाग १, २), आगरकर वाङ्मय खंड', ‘महात्मा गांधी-रवींद्रनाथ ठाकूर’, ‘भारतीय लिपीचे मौलिक एकरूप', ‘सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय', 'ग्रीक शोकनाट्ये, ‘कलेची मूलतत्त्वे', ‘बुद्धलीला सारसंग्रह', ‘फार्सी-मराठी अनुबंध', 'केशवसुतांची कविता (यथामूल आवृत्ती) सारखे ग्रंथ मराठी सारस्वतातील दीपस्तंभ म्हणून ओळखले जातात.

२. कोश प्रकाशन

 एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाच्या विस्फोटाचे शतक म्हणून ओळखले जाते. ज्या भाषेतील संदर्भ वाङ्मय श्रेष्ठ ती समृद्ध ज्ञानभाषा. या दृष्टीने मंडळाने स्थापनेपासूनच विविध प्रकारच्या कोश निर्मितीवर भर दिला आहे. स्वतंत्र मराठी विश्वकोश मंडळ स्थापन करून महाराष्ट्र शासनाने मराठी विश्व कोशाचे १९ खंड प्रसिद्ध करून हिंदीनंतर विश्वकोश असलेली

राज्यभाषा म्हणून गौरव प्राप्त केला आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाने आयुर्वेद, मराठी वाङ्मय, शब्द इ. कोशांची निर्मिती करून कोशवाङ्मय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अनुवाद साहित्य कोशासारखे अनेक कोश सध्या अप्राप्त आहेत. त्यांचे पुनर्मुद्रण त्वरित होणे गरजेचे आहे.

३. भाषांतरांचे प्रकाशन

 देवाणघेवाणीतून संस्कृती विकसित होत असते तशी भाषाही. स्वभाषेत परभाषी वाङ्मय अनुवादित होऊन आले की अनुभव, शैली वैचित्र्य, भाषा प्रयोग इत्यादीच्या कक्षा रुंदावतात. जगभर इंग्रजी भाषेतून स्वभाषेत भाषांतरांची मोठी परंपरा आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाने इतिहास, साहित्य, नाटक, कादंबरी, काव्य इ. विविध प्रकारचे अभिजात साहित्य मराठीत भाषांतरित करून घेऊन प्रकाशित केले आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या Rise of Maratha for power, आनंद मिश्रा यांच्या Nanasaheb Peshwa and Right for freedom, FAT371 Storia Do Mogar ची मराठी भाषांतरे प्रकाशित केली आहे. संस्कृतमधून ‘भरतमुनीचे नाट्यशास्त्र', 'मुद्राराक्षस', रशियनमधून तुर्गनेवच्या कादंबरीचा अनुवाद, उर्दूमधून जाफर शरीफच्या ‘कानून-इ-इस्लाम'चे भाषांतर अशी मोठी परंपरा आहे. मराठी साहित्यात आज इंग्रजी ललित साहित्यकृतींच्या अनुवादाची मोठी लाट आली असून मराठी प्रकाशक तीवर अहमहिकेने स्वार होत असताना आपणास हे विसरून चालणार नाही की या भाषांतरयुगाचा पाया साहित्य आणि संस्कृती मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी घातला होता. आज केवळ इंग्रजी भाषांतरे होतात. या पाश्र्वभूमीवर मंडळाचे भाषावैभव व वैविध्य लक्षात घेण्यासारखे आहे.

४. ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन

 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हे मंडळ स्थापन करण्याच्या अनेक उद्देश्यांपैकी एक उद्देश संस्कृती व इतिहासाचे संशोधन व प्रकाशन होता. त्यानुसार मंडळाने दुर्मीळ इंग्रजी, उर्द इतिहास ग्रंथांची भाषांतरे जशी प्रकाशित केली तसेच मौलिक ग्रंथही प्रकाशित केलेत. ‘धर्मशास्त्राचा इतिहास, ‘औरंगजेबाचा इतिहास', ‘दुसरे महायुद्ध', ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव लेख', ‘सम्राट अकबर' सारखे ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय म्हणून सांगता येतील.

५. वैज्ञानिक ग्रंथ प्रकाशन

  मूलभूत वैज्ञानिक ग्रंथ प्रकाशनाची मराठीतील क्षीण परंपरा लक्षात

घेता ५० वर्षांपूर्वी साहित्य आणि संस्कृती मंडळाने या संदर्भात घेतलेला पुढाकार व केलेले प्रयत्न अनुकरणीयच म्हटले पाहिजेत. 'वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय' सारख्या ग्रंथापासून ते 'वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा', ‘स्थापत्यशास्त्र, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान' सारखे ग्रंथ पाहाता या विषयाचा मंडळाचा पैस डोळ्यात भरतो.

 ६. नवलेखन प्रोत्साहन

 ग्रंथ प्रकाशनाबरोबर हे मंडळ सतत नवलेखक शिबिरे, नवलेखक प्रकाशन, नवलेखन पुरस्कार अशा त्रिविध पद्धतीने मराठी साहित्याची मशागत करीत आले आहे. मंडळाच्या या शिबिरातून मार्गदर्शन घेतलेली, अनुदान व पुरस्कार मिळवणारे कितीतरी साहित्यिक आज प्रथितयश झाले आहेत. भारतातल्या फार कमी राज्यात अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने व जाणीवपूर्वक होताना दिसतात. मान. यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची यातून दूरदृष्टी दिसून येते. आजवर मंडळाने नवलकांची २००० पुस्तके प्रकाशित केली आहेत. या मंडळ नवलेखक तयार करून, त्यांच्या ग्रंथांना अनुदान देऊन थांबत नाही तर नवलेखकांच्या ग्रंथांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत असते.

 ७. साहित्य संस्थांना अर्थसहाय्य

 महाराष्ट्रात आठ महसूल विभाग असले तरी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र हे त्यांचे पारंपरिक सांस्कृतिक विभाग होत. या विभागांचे प्रतिनिधित्व करणाच्या साहित्यिक संस्था आहेत. या संस्थांमार्फत साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक गौरव, मुखपत्र प्रकाशन, ग्रंथालय संचालन, वाचक मेळावे, चर्चासत्रे इ. उपक्रम केले जात असतात. अशा उपक्रमांना प्रोत्साहन व आर्थिक बळ मिळावे म्हणून महाराष्ट्र शासन या मंडळामार्फत प्रतिवर्षी प्रत्येक संस्थांना रु. ५ लक्ष इतके भरघोस अनुदान देत असते. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, विदर्भ मराठी साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई, मराठी साहित्य संघ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी या संस्थाचा यात अंतर्भाव आहे.

 ८. साहित्यिक पुरस्कार व गौरववृत्ती

 मराठीतील उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती, श्रेष्ठ प्रकाशक, श्रेष्ठ लेखक व कलावंत गौरववृत्ती अशातून साहित्य व साहित्यिक सन्मानाची परंपरा मंडळाने



स्थापनेपासून जपली आहे. प्रतिवर्षी रु. १०,000/- रोख व सन्मानचिन्ह स्वरूपात दिल्या जाणाच्या या पुरस्कारात महाराष्ट्र शासनाचे घसघशीत वाढ जाहीर करून अवघ्या महाराष्ट्राचे साहित्य प्रेम सिद्ध केले आहे. साहित्यिक जीवन गौरवाच्या रूपात दिला जाणारा रु. ५0,000/- रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह अशा स्वरूपात दिला जाणारा साहित्यिक व लोक कलावंतांचा गौरव म्हणजे महाराष्ट्र सन्मानच होय! आजवर गौरविल्या गेलेल्या या सन्मान सूचीत भाई माधवराव बागल, कवी नारायण सुर्वे, आनंदीबाई शिर्के, कुसुमाग्रज, शाहीर वामनदादा कर्डक, भाऊ पाध्ये, इंदिरा संत, शंकरराव खरात, शांता शेळके, राम नगरकर, कवी ग्रेस, प्रा. म. द. हातकणंगलेकर, यमुनाबाई वाईकर, डॉ. भालचंद्र नेमाडे प्रभृती मान्यवरांचा समावेश आहे.

 ९. नियतकालिक अनुदान

 महाराष्ट्रातील मराठी नियतकालिकांची परंपरा गेल्या शंभर ते दीडशे वर्षांची आहे. दिवाळी अंक हा महाराष्ट्र संस्कृतीचा व्यवच्छेदक भाग होय. ही नियतकालिके काळाच्या प्रवाहात बंद पडू नये. त्यांचे सत्त्व व स्वत्व सुरक्षित रहावे म्हणून विशेष ज्ञानशाखा, विषय इत्यादीची जपणूक करणाच्या नियतकालिकांना मंडळाकडून प्रतिवर्षी १५0 00 ते ३५000 रुपयांचे अनुदान दिले जाते. आजमितीस सुमारे ५० नियतकालिकांना या योजनेतून अर्थसहाय्य दिले जाते. 'नवभारत', 'अर्थसंवाद', 'नव-अनुष्टुभ’, ‘पंचधारा', 'ब्रेन टॉनिक', ‘मराठी विज्ञान पत्रिका', 'मिळून साच्या जणी', ‘हाकारा', 'ब्रेल जागृती', ‘भाषा आणि जीवन’, ‘संशोधक', 'केल्याने भाषांतर' ही नियतकालिकांची नावे वाचली तरी मंडळ केवढे मोठे सांस्कृतिक संचित जोपासते आहे याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही.

 या उपक्रमांशिवाय मंडळाने सुवर्ण महोत्सवी उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक महोत्सव, जिल्हा ग्रंथ महोत्सव, सीमा भागातील साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य, जागतिक मराठी संमेलनास अर्थसहाय्य, ई बुक्स, संकेत स्थळ निर्मिती अशा बहुविध उपक्रमातून कार्यविस्तार केला आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण, मराठी भाषा संचालनालय, मराठी भाषा मंत्रालय इ. माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विकासाचा समन्वित प्रयत्न सुरू केला असून विविध योजना व उपक्रमांचे एकीकरण आरंभिले आहे. त्यातून मराठी राजभाशा वापरात वाढ, शासकीय व न्यायालयीन कामकाजात मराठीचा उपयोग, बृहन्महाराष्ट्रातील मराठी

संस्थांना सहाय्य असे धोरण अंगिकारल्याने लवकरच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

 मंडळाचे वर्तमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली विविध शब्दकोशांच्या सीडी तयार करणे, सांस्कृतिक पत्रिका प्रकाशन, बोलीभाषा प्रकल्प, मराठी प्रमाण भाषा कोश, ग्रामीण जीवन कोश, दुर्मीळ ग्रंथ संकेत स्थळांवर प्रकाशित करणे, रंगभूमी, वेशभूषा, हस्तकला, इतिहास लेखन, युवक अभ्यासवृत्ती अशा कालसंगत नव्या योजना, उपक्रम, प्रकाशनांचा संकल्प सोडला असून लवकरच या योजना अंमलात येऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृती विकासास गती येईल अशी आशा आहे. दुर्मीळ ग्रंथांचे पुनर्मुद्रण, महाराष्ट्र शिल्पकार मालिका प्रकाशन इत्यादीतून ही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र समाज विकास व उत्थानाचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. या मंडळाचे आजवरचे अध्यक्ष व सदस्य यांनी या कार्यात वेळोवेळी केलेल्या सहाय्य व मार्गदर्शनातून हे मंडळ राज्यातील कार्यक्षम व गतिमान मंडळ म्हणून लोकादरास निरंतर पात्र राहिले आहे.

झंप्री



 इस्टेटीत सर्व अलौकिक खजिना भरलेला असायचा. म्हणजे असं की गोट्या खेळायचो. गोट्या दगडाच्या असायच्या तशा काचेच्यापण! दगडी गोट्यांनी काच गोट्या फोडायला मोठी गंमत यायची. मित्राची गोटी फुटली की आसुरी आनंद मिळायचा. त्यातून पुरुषार्थ सिद्ध व्हायचा. मित्र हेन्नी ठरायचा म्हणजे हरलेला शत्रू. मी गंड ठरायचो. म्हणजे अजिंक्य... जगज्जेता सिंकदर झक मारायचा. त्यातही खेळ बघायला मैत्रिणी असल्या की चेव यायचा. त्या काच गोट्या बिलोरी असायच्या. पाणीदार, नक्षीदार, गोलगोल, चमकदार, डोळे भरभरून पाहात राहायचो त्या गोट्यांना. गोट्या किती वेळा मोजाव्यात, परत उठल्यावर, अभ्यास करताना मध्येच, शाळेत जाताना, परत आल्यावर मित्र जमले की हमखास! वाटायचं की मोजल्यावर वाढतातसंख्येने, आकाराने, रंगाने, प्रकारांनी. त्या गोट्या लपवून ठेवायची जागा म्हणजे झंप्री. झंप्री वारंवार बदलायची. कुणी डाका घातला तर... मनात सारखा संशय. मित्रांचा, भावांचा, आईचा. स्वतः सोडून सर्वांवर संशय. जग सारं जोर वाटायचं. आपला तो अलिबाबाचा गुहेतला अलौकिक खजिना लुटायला टपलंय असं सतत वाटत राहायचं. त्या काळजी, चिंतेतून झंप्री सारखी बदलत राहायची. मांजरी आपली पिलं या जागेवरून त्या जागेवर नेती तशी. नित्य सुरक्षित, गुप्त जागेचा शोध सुरू असायचा. ही जागा प्रत्येक वेळी मात्र कुणी नसताना ठरायची. कधी वर, कधी खाली, कधी अंधारात, कधी आडाला, कधी बिछान्यात कोंबलेली, कधी फडताळ्यावर, कधी डब्यात, पेटीत, दफ्तरात. विशेष म्हणजे प्रत्येक निवडलेली सुरक्षित झंप्री वस्तू लपवून ठेवली की असुरक्षित वाटायला लागायची. हुरहूर लागून राहायची. कोणी चोरेल का? पळवेल का? लुटेल का?

 झंप्रीतल्या इस्टेटीत सारं जग लुटून भरलेलं असायचं. गोट्यांशिवाय काचांचे तुकडे, रंगबिरंगी दगडे, शंख, शिंपले, गजगे, मोरपिस, बांगड्यांचे तुकडे, डुला-माळांचे ओघळलेले मणी, अंगठ्यांचे खडे, तुटक्या वस्तू, स्कू, बोल्ट, खिळे, सारा मायाबाजार, मीना बाजार भरलेला असायचा. कागद, कपटे, चित्रं आणि खरं सांगू का? विड्या-सिगारेटची थोटकंही असायची. चोरून प्यायची नक्कल करण्यासाठी जमवलेली असायची. मित्र जमले की आम्ही खोट्या काड्यापेटीने ती शिलगवतही असू. गॅगमध्ये एकादा मित्र पंटर असायचा. न भिता कश खेचायचा. घरात चिटपाखरू नसलं तरी आमच्या मनाभोवती सान्यांची भूतं भटकत, घिरट्या घालत राहायची. मी बुळा, भित्राच. काही गैर करायचं म्हटलं की लागले हात थरथरायला... पाय लटपटायला... घामाघूम... धामधूम!

 पुढे मी मोठा झालो तशा झंप्रीतल्या वस्तू बदलल्या. वस्तूंची जागा पुस्तकांनी घेतली. खेळ बदलले. व्यापार, सापशिडी, लिडोचा पट मांडला जाऊ लागला. सापाची आशंका नि शिडीची आकांक्षा! तोच संशयाचा खेळ ऊन सावली बनून फेर धरत राहायचा. तिकडे तबकडीवर दुरून कुणाच्या तरी घरा-खोलीतून तान ऐकू येत राहायची... ‘संशय का मनी आलाऽऽ' मित्र-मैत्रिणी त्याच पण त्यांचा जीव नि जागा एव्हाना बदलल्या होत्या. मनी हुरहूर वाढलेली. मी शिकायला कोल्हापूरला गेलो तरी प्रत्येक दिवाळी, मेच्या सुट्टीत केव्हा पंढरपूरला जाईन असं व्हायचं. विठोबा काही माझा बॉयफ्रेंड नव्हता पण एव्हाना मीच बॉयफ्रेंड झालेला... कुणाचा तरी. जिगरी दोस्त आता खलनायकाची भूमिका वठवता झाला होता. गॅगमध्ये क्षणाक्षणाला अकारण, सकारण पक्षांतर होत राहायचं. कधी पत्त्याच्या डावात झब्बू मिळाला म्हणून, तरी कधी क्रिकेटमध्ये सिक्सर मारली म्हणून, कधी तो त्याच्याशी लगट करतो म्हणून, तर कधी 'ती' त्याच्याशी बोलते म्हणून. आता माझी झंप्री वस्तू ऐवजी काहुरांनी भरलेली होती. झंप्री एव्हाना व्हर्च्यअल होऊन गेली होती. या झंप्रीत आता भूतं नाचायची तशी स्वप्नंही धिंगाणा घालायची! बरं या झंप्रीचं रूप, स्वरूप आता बदललेलं. इथं चोरीचं भय नव्हतं. ही झंप्री मानसिक, भावनिक भिंतीनी घट्ट, टाइट होती. शेरलॉक, शर्विलकाची भीती नव्हती पण आभासी भय सारखं पिच्छा करत राहायचं. मीच भूत झालो होतो. मनात सारखा परी सिंड्रेला, रानी रूपमती, पदमिनी नाचत असायची. 'आतून कीर्तन वरून तमाशा' असा गंडीव-फशिवचा लपंडाव नित्याचा.

 माझ्या झंप्रीत आता मीना कुमारी, सायरा बानो, कल्पनाची चित्रं जमू लागली. देवानंद, शम्मीकपूरही. प्रेम चोपरा, प्राणही असायचे. त्या चित्रांवर मी का कुणास ठाऊक फुल्या मारत असे. सिनेमाच्या गाण्यांची पुस्तके मनी-कानी गुणगुणत असायची. कधी मनातल्या मनात तर कधी दार लावून एकटाच नाचायचो. कधी उदास, एकटाच बसायचो. अभ्यासाच्या पुस्तकातली अक्षरं उडून जायची... रिकाम्या जागेवर फुलपाखरं येऊन बसायची. त्यांचे रंग, बेरंग माझ्याच मनाची प्रतिबिंब बनायचं. त्यांचं फडफडणं, चडफडणंही माझंच असायचं. ही झंप्री एव्हाना अलौकिक गुहा झालेली. ‘खुल जा सिमसिम' म्हटलं तरी दरवाजा नाही उघडायचा. पण त्या साच्या चडफडीत, झटापटीत गंमत असायची... ‘खाये तो पछताये न खाये तो भी' ... ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय'... काहीच कळायचं नाही. खरं कोणतं नि खोटं काय समजत नसे... सारा डोळे बांधून शिवणापाणीचा खेळ! तिकडे मित्रांचे आतंकी फुत्कार! यातही एक मित्र जिवाभावाचा असायचा. माझ्या मनातल्या झंप्रीतली गुपितं मी फक्त त्यालाच सांगत असे. तो होता म्हणून मी त्या तरंगातही तरून गेलो. तो निरोप द्यायचा नि आणायचा. तो माझ्यासाठी २४ x ७ हेरगिरी, पहारा, सारं करायचा. प्लॅनिंग त्याचं, कारवाई माझी... सारं कसं सर्जिकल स्ट्राईकसारखं बेमालूम फत्ते व्हायचं. कपाट, कोप-यांचे आडोसे म्हणजे नंदनवन बनून जायचे क्षणार्धात! बाहेर शिट्टी, ‘गोंद्या आला रेऽऽ' चा पुकारा झाला की झंप्री बंद.

 मी कॉलेजला जाऊ लागलो तसं माझी झंप्री आता जाहीर झाली... होऊ लागली. मुलं-मुली चिडवू लागली की कॉलर ताठ व्हायची. पण एव्हाना एक नवंच भूत झंप्रीत शिरलं. कळपात लांडगा घुसावा तसं ते खूळ होतं अभ्यासाचं. शिकल्याशिवाय स्वप्नांना अर्थ नाही या जाणिवेने झपाटलं. प्रेमापेक्षा जगणं महत्त्वाचं वाटू लागलं. वसंत फुलण्यापूर्वीच ओसरू लागला तो परिस्थितीच्या प्रखर जाणिवेमुळे. आता सारं कसं टिप, टॉप, टाइटची फाइट! वह्या, पुस्तकांची झंप्री माझी वाटू लागली. वाटू लागलं सारी लायब्ररीची पुस्तकं, मासिकं आपल्या झंप्रीत असावी. मी आता घोस्ट रिडिंग करू लागलो. रंभा, अप्सरा, मेनका मासिकं एकीकडे आणि दुसरीकडे ‘लाइफ’, ‘सोविएत देश', 'नॅशनल जिऑग्राफिक'ही! 'ललित', 'मनोहर', ‘धर्मयुग', 'दिनमान', 'इलास्ट्रेडेट विकली’ सारं हवेहवेसे वाटायचे. एकाच वेळी मी बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर वाचायचो नि दुसरीकडे 'मृत्युंजय', 'ययाति' चं गारुडही असायचं. हां एक खरं की

रात्रीचं वाचन वेगळं नि दिवसाचं वेगळं. रात्री माया बाजार नि सकाळी मीना बाजार. झुंझार खिडकीतील किर्र रात्र अंधारात एच.जी. वेल्सच्या ‘इनव्हिजिबल मॅन' सारखा यायचा. कधी चार्ल्स डिकन्सच्या ‘टेल ऑफ टू सिटीस' मधील मिस्टर लॉरीप्रमाणे It was fogy night in London वाचताना रोमांच उभं राहायचं. आपण बॅस्टिलचा तुरुंग फोडायला निघालोय असं वाटत राहायचं. त्याच दिवसात सकाळी ‘कर्ण' माझा सखा होता नि ‘ययाति'चं अनाकलनीय आश्चर्य! ‘कामभावना' हा शब्द याच दिवसात मी मित्रांच्या (अनुभवी) मार्गदर्शनात शिकलो. आयुष्यातलं पहिलं शास्त्र ‘कोकशास्त्र' मी डोळे फोडफोडून मोठ्या ताणतणावाखाली नि उशीच्या अभ-याच्या झंप्रीत लपवून ठेवत वाचल्याचं आठवतं. पण लवकरच खलिल जिब्रानीनी माझा ताबा घेतला नि मी मायावी जगातून एकदम भवसागरात, भवतालात आलो तसं माझ्या झंप्रीला घोरांच्या घुशींनी भुसभुशीत करायचा नवा उच्छाद मांडला. मी गैराची संगत सोडून एकदम सभ्य जगातला कवटाळले. त्याचं कारण होतं... मी शिक्षक व्हायचं ठरवलं नि माझ्या पुढे डॉ. डी. व्ही. चककरमनेसारखा एक ऋषितुल्य शिक्षक खड्या, अभेद्य कड्याप्रमाणे उभा राहिला नि माझी झंप्री आता मुक्तांगण बनून गेली. त्या झंप्रीत गेल्या चाळीस पन्नास वर्षांत गैराचा उंदिर सोडा मुंगीपण जाऊ शकली नाही. मानसिक, भावनिक, वैचारिक, नैतिक, भौतिकाच्या भिंतीतील फटी, अंतर मला उमजत गेलं नि वैध, विधायक झंप्रीनं माझं लौकिक जीवन नंदनवन बनवून टाकलं.

 सत्तरीला उंबरठ्यावर आज मी उभा आहे. माझी झंप्री चौपाल, चावडी बनून गेलीय. 'नो प्रायव्हेट बिझनेस' अशी न लावलेली पाटी वाचत माझं आयुष्य मी आक्रमतो आहे. लेखन, वाचन, व्याख्यान, समाजकार्य असा चतुर्दिक खेळ, फेर धरत मी भटकतोय. मागं वळून पाहताना माझ्या लक्षात येतं की मी माझी झंप्री कालौघात बदलत राहिलो म्हणून या मुक्कामावर आलो. माणसाची खरी झंप्री असते त्याचं मन. तेही अबोध, आतलं मन खरं! ते तुम्हाला नीतळ, निर्भेळ, निर्मळ ठेवता येतं का यावर तुमच्या आयुष्याचे रूळ ठरतात नि मग समाज मनात तुम्ही रुळू लागता, ते तुमच्या अंतरंगाचं बाह्यरूप, स्वरूप असतं.

 झंप्री दुसरं तिसरं काही असत नाही. ती असते तुमच्या मर्मबंधाची ठेव. ती तुम्ही कशी जपता, जोपासता यावर तुमच्या जहाजाचं सुकाणू दिशा ठरवतं. युगांतर नि कायाकल्प घडून येत असतो. घडायचा, बिघडायच्या

क्षणी तुम्हाला तुमचा आतला आवाज आला पाहिजे. तो ऐकायची एक पूर्वअट असते. आवाज आत असावा लागतो. तो असतो सर्वांच्यात. त्याच्यावर तुम्हाला घट्ट मांड ठोकता आली पाहिजे. वारू भटकायचं नसेल तर सुकाणू इतकाच लगाम महत्त्वाचा. ऐन तारुण्यात किंकाळणारं घोडं तुम्हाला सावरता आलं पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभादि षड्रिपू आयुष्याच्या प्रत्येक वळणावर लाल नि हिरवा झेंडा घेऊन उभे असतात. लाल झेंडा हाती घ्यायचं वय ठरलेलं आहे. ‘कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली तर लाल झेंडा काय कामाचा. हिरवं पान, लाल देठ, विवेकानीच चाखायचं, खुडायचं! धरायचं वय असतं, तसं सोडायचंही! सोडण्यात उदारता, निर्मोहीपणा हवा. कुणी आपल्या जाण्याची वाट पाहात असेल तर समजावं, आपण जरा जबरीचंच जगतो आहे. जरब कार्यात हवी. अधिकारात वापराल तर तुम्ही श्रद्धांजली दिवशीच इतिहासात दफन होता. निरपेक्ष वृक्षाला जन्मांतराने, कालांतराने फळे धरतात, लागतात. ती गोडच असतात, कारण ती निरपेक्ष घामावर पोसलेली असतात. सारे महात्मे महानतम ध्यायाने जमीन नांगरून ठेवतात. बी काळ पेरतो.

 मग परत झंप्रीत बिलोरी स्वप्ने साकारू लागतात. ती लौकिक असत नाहीत. ती परहितार्थ जन्मतात. अहिंसक स्वप्नांना निस्वार्थतेचं वरदान असल्याने ती लौकिक स्वप्नांसारखी भगत कधीच नाहीत. त्यांना साताजन्माच्या सुफळ संपूर्णतेचं सात्त्विक वरदान लाभलेलं असतं. ती रस्त्यात खाच, खळगे, काटे-कुटे, वळणे नाही पेरीत. ती एका नव्या युगाची नांदी व पुराण्या दुःस्वासाचा युगान्त असतो. झंप्री आता कोंदट अंधाराने माखलेली न राहता चारी दिशा उजळणारी प्रभा घेऊन येते. त्या झंप्रीत टिकली एवढं स्वार्थाचं तळं असत नाही. झंप्रीच्या पलिकडे आरसे महाल, आकाशगंगा, सात समुद्र, सप्तशृंग, अलौकिक अपरा सृष्टी असते. तिथं एकच गीत घुमत असतं... कल्याणमस्तुऽऽ, मंगलम्ऽऽ

▄ ▄

जगणं : ... अगोदर असोशी... नंतर नकोशी


 काय असतं माणसाचं जगणं? ऊनपावसाचा खेळ? आशानिराशेचा लपंडाव? विजयपराजयाचा संघर्ष ? संधिसवलतींचा खोखो? जगणं असतं तरी काय? खरं तर ती एक स्वप्नांची अनिवार ओढ असलेली सोनसाखळी असते! जन्मापासून मरणापर्यंत माणूस रोज नव्या आशा, आकांक्षा, स्वप्नांना उराशी कवटाळून जगत असतो. लहानपणी न कळण्याच्या काळात जगणं हा खेळ असतो. या खेळाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. बालपणी लहानपणी स्वतःशी खेळतं नि माणूस शेवटच्या क्षणीही स्वतःशी खेळत असतो. लहानपणाचा काळ सुखाचा तसा खेळही! मोठेपणाचे सारे खेळ विविध रंग, छटा, भावभावनांचे! बालपण सुखद एकांत, तर वृद्धपण विषादयुक्त एकांत! एकूण सारा खेळच खेळ. जगणं खेळच.

 लहानपणी बाळ रोज नव्या आनंदाचा शोध घेत असते. हाती आलेल्या खुळखुळ्याने बाळ नादावतो. काळ कळत न कळत खळखुळ्याच्या नादांचा आनंद घेत असते, समजून घेत असते. आदळलं आपटलं की फुटतं, हे। माहीत नसल्यामुळे बाळ खुळखुळा अजून मोठा आवाज व्हावा म्हणून हालवतो, डोलावतो, आपटतो, फेकतो अन् मग एके दिवशी चक्क फुटतो तो खुळखुळा, फुगा अचानक फुटतो तसा. बाळाचा फुगा लगेच नाही फुटत. मस्ती असह्य झाली की मग फुटतो. क्षणभर विस्फोटाचं भय नि दुस-याच क्षणी आपण काही तरी केल्याचा, लढाई जिंकल्याचा, किल्ला सर केल्याचा आनंद. मग गालभर हसणं, किलकिलणं, आनंदाच्या उकळ्या फुटणं, गुदगुल्या होणं हे सारं आत्मरत होऊन, आत्मस्वरानं, आत्मभानानं आपसूक घडतं.

 मग हाती येतात नवनवी खेळणी. चोखायची, खायची, खेळायची. बालकांच्या खेळण्यांचे आकार, प्रकार, रंग असतात मोठे आकर्षक! चोखावे, खावे, चघळावे, गिळावे वाटणारे सारे भाव म्हणजे त्या बाळाचे जीवन समजून घेणंच असतं. आवाज करणारे रबरी खेळ, बाहुले, पक्षी, प्राणी सा-यांचा मेळ. खेळ म्हणजे पाळण्या, बिछान्यावरची सर्कसच ना? ड्रम वाजवणारं माकड, अस्वल असो वा डोळे मिळणारी बाहुली असो. कृतीतून नवं कळतं नि बाळ हरकतं.

 बाळाचं स्वतःशीच खेळणं म्हणजे त्याचा आत्मशोधच असतो. रडूनही आई नाही आली, तर रडून रडून झोपायचं, हे एक प्रकारचं शिक्षणच असतं. झोपेत हसायचं म्हणजे स्वप्नांचा प्रारंभच असतो. कुशीवर वळणं, पालथे पडणं, पोटावर सरकणं नि कॉट, पाळण्यातून पडणं, टण्णू उठणं, खोक पडणं सारी धडपड असते, ती स्वतःच्या पायावर उभा राहायची नि मग एक एक पाऊल उचलत पडत, झडत स्वतःचं स्वतः उभं राहायची. हा सारा खेळच असतो एकीकडे नि दुसरीकडे जगणं समजावून घेणंच असतं. गुडघ्याला घट्टे पडणे नि माती खाणे, हा सारा जगण्याचा सोसच असतो.

 बाळाला पाय फुटण्यातून त्यानं समाजीकरण सुरू होणं असतं. मग मित्रमैत्रिणींशी झोंबाझोंबी, ओढाओढी, चावणे, चिमटे घेणे, प्रसंगी झिंज्या ओढणे, ओरबाडणे सारं अस्तित्वाचं प्रदर्शन नि ओव्हर टेकचाच खेळ असतो. सारं करून स्वतः रडायचं म्हणजे कज्जा न करता, कोर्ट केस जिंकायचं कसब, हा ज्याचा त्याचा वकूब. मुलामुलींना भीती, मार, आक्रमण शिकवावं नाही लागत. उपजत काही गोष्टी घेऊनच माणूस जन्मतो. कोण खट्याळ, कोण नाठाळ, कोण लाजरी, कोण साजरी, कोण बुजरी; हे सारं उपजतच असतं. ते सारं अनुवंश, डीएनएचा नकाशा नि शरीरातील जैविक घड्याळ यावर अवलंबून असतं.

 मुलामुलींचं बालवाडीत, शाळेत जाणं केवळ घराचा उंबरठा ओलांडणं असत नाही, तर ते एक मोठे समाजशिक्षण असतं. संबंधांचा फेर रुंदावणं, समाजदर्शन नि त्याचं क्षितिज उंचावणं, घराचा परीघ विस्तारणं नि जगरहाटी हळूहळू उमजणं, त्यातून माणूस मिळणं, रोजचं गुरुजींचं शिकवणं, शाळेला जातायेता दुकान, बाजार, मंडई, वाहतूक साच्यातून मिळणारे नवे अनुभव त्याला जगण्याझगडण्याचे शिक्षण, तंत्र, मंत्र औपचारिकपणे, अनौपचारिकपणे देत राहतात नि येताजाता तो जे टक्के, टोणपे, टोमणे खातो, सहन करतो,

त्यातून त्याला जगण्याच्या खाचाखोचा, खाचखळगे समजत, उमजत राहतात आणि तो रोज अनुभवसंपन्न, शहाणा होत राहतो.

 मुलामुलींचं कुमार, किशोरी होणं म्हणजे स्वतःचं विश्व तयार होणं. 'मी', 'माझे' असं भान येणं. हक्क, कर्तव्याची जाणीव, जबाबदारीची जोखीम यातून तो स्वतःला आजमावत आत्मशोध घेत असतो. चांगलं काय नि वाईट काय हे कळत नसलं, तरी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्याच्या एव्हाना पचनी पडलेलं असतं. मग गुरुजींच्या सांगण्यातून संगतीचे, संगतिदोषांचे भान येतं. आईबाबांच्या दटावणीतून अभ्यासाचं वळण लागतं. त्याच वेळी ताई, दादा, मोठे मित्र यांच्या ‘धरि शस्त्र मी न हाती, सांगेन युक्तीच्या गोष्टी दोन-चार' अशा स्वरूपाच्या अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व मोठ्ठ झाल्यावर उमजतं. तोवरचं जीवन म्हणजे 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे' असंच असतं. ‘मोही रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले अशी ती अवस्था म्हणजे जगण्याचं गारूड नि सुंदर स्वप्न असतं.

 मनात हुरहूर नि काळजाची झुरझुर म्हणजे आयुष्याचा अनमोल ठेवा. किंकर्तव्यविमूढ ही अवस्था म्हणजे ‘खाये तो पछताये, न खाये तो भी!' कळतं पण वळत नाही, असे ते दिवस. घरापेक्षा बाहेरचं जग अधिक मोहक वाटू लागतं ते प्रलोभनाचा बाजार तेज होऊ लागल्यानं. आजूबाजूचे जे चांगलं सांगतात ते वैरी, दुश्मन वाटू लागतात. वाईट ते आकर्षक असतं, हे न कळण्याच्या त्या दिवसांत चकाकतं ते सोनं वाटत असतं. मित्रमैत्रिणींचा सहवास, संगत, संवाद म्हणजे सर्वस्व वाटण्याचे ते दिवस वसंतापेक्षा मनोहारी असतात खरे! समलिंगी सहवास नि भिन्नलिंगी आकर्षण, असं दुहेरी गारूड! नक्की काहीच कळत नसतं. काय खरं, काय खोटं? चाचपडणं, चाचपणं असं फुकत फुकत जीवनाचा आस्वाद घेणं, मिटक्या मारण्यापेक्षा कमी रंगतदार नक्कीच नसतं. एकाच वेळी भीती नि जिज्ञासेचं द्वंद्व. प्रत्येक अनुभव नवाकोरा, हवाहवासा वाटणारा. कुतूहल म्हणजेच तर जीवन नाही ना, असा संभ्रम पडण्याचा हा काळ, जगण्याची अनिवार असोशी देऊन जातो नि मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा. मिशा केव्हा फुटतील, पाळी म्हणजे शिसारी; असं एकीकडे नि दुसरीकडे गुफ्तगूचा माहौल! सिक्रेट सेव्हनचा हा काळ म्हणजे रोज काहीतरी नवं कळणं, मिळवणं नि गमावणं पण!

 ‘आहे मनोहर तरी, गमते उदास', असं वाटणाच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरचा काळ म्हणजे सांगता येत नाही आणि सोसवतही नाही, असं काहीतरी. ‘धरलं तर चावतं, नि सोडलं तर पळतं.' सारं जग कवेत घ्यायच्या

उमंगीनं, उमेदीनं काही पाऊल टाकावं, तर यशापेक्षा पाय घसरण्याचीच भीती. 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन', असं लाख वाटलं, तरी कपाळमोक्षाचं भय कानात वारा शिरलेल्या वासरासारखं भ्रमित करून टाकतं. एका कोळियाने' ऐकायला बरे वाटते. 'झटे निश्चयाचे बळ। अंती त्याला यश मिळे।।' याची खात्री असली, तरी आत्मविश्वासाभावी साहस घडत नाही. पंखात बळ असतं; पण झेपावण्याचा अनुभव, अंदाज नसल्याने दरी वास्तवापेक्षा अधिक खोल भासू लागते. काळोखाच्या भयाण लाटा। उठती, फुटतील बारा वाटा' अशा मनःस्थितीत नक्की काय करावं, याचा निश्चय होत नाही. जगणं आता अनिवार्य, हे कळून चुकलेलं. पण, हमरस्त्यावर यायचं म्हणजे १००० व्होल्टचा शॉक! त्यातही भर चौकात मध्ये आपण एकटे नि सारे रस्ते खुणावणारे, अशा स्थितीत कसोटी असते ती आपलीच. हिय्या करायचा नि पुढे जायचं, असं एखाद्या निर्णयाच्या क्षणी ठरवावंच लागतं. तो क्षण निर्वाणाचाही ठरू शकतो, हे माहीत असूनही जो जोखीम पत्करेल, त्यालाच लॉटरी लागणार. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही। नाही मानियेले बहुमता', असं जाणून जो विवेकाचा कौल मानतो, तोच जगण्यावर मांड ठोकून जगज्जेता होतो. ‘सोन्याचे घर, दिसते माती', असं असताना जो मुशाफिरीला निघतो, त्यालाच प्रवास घडतो. बाकी सारे घाण्याचे बैल होत असताना तो आपण 'मुकद्दर का सिंकदर' व्हायचं ठरवतो. तो क्षण आत्मस्वर सापडल्याची खूणगाठ असते. ती सुरगाठ होईल की निरगाठ, याचा विचार न करता जे प्रयत्नशील राहतात, त्यांच्याच मुठीत काहीतरी येतं. झाकली मूठ सव्वालाखाची' याचा अर्थ जे मुठी वळतात, तेच कमावतात. तरुणपणी मूठ नाही वळायची, तर मग ती केव्हा वळायची? Thus, no far, no further' म्हणतात, तरुण दिग्विजयी ठरतात.

 लग्न, घर, कुटुंब, मुलंबाळं अशा गोतावळ्यात अडकणं, जीवनाची ओढ, जीवनाची सार्थकता हे कळण्याचा आनंद काही आगळाच. बालपण, कुँवारपण, तारुण्य असे आयुष्याचे एक एक उंबरठे पार करत, लग्नाच्या बोहल्यावर चढणे म्हणजे ‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास', अशी कृतार्थता नि कृतकृत्यता! चांगला जीवनसाथी अथवा अर्धांगिनी मिळणं म्हणजे जीवनाचं एक भव्य स्वप्न साकारणं असतं. संसार थाटणं, मांडणं म्हणजे चिमणीनं काडी काडी जमवून, जुळवून विणलेला खोपाच असतो ना? मग पहिल्या बाळाची चाहूल म्हणजे स्वर्गसुख! पत्नीच्या चेह-यावर खुलणारं मातृत्व पाहणं म्हणजे शरदाचं चांदणं न्याहाळणं असतं. पत्नीला

हवं नको पाहणं, खावंसं वाटते ते आणून देणं (प्रसंगी चोरून!) तिचे लाडकोड करणं या सा-यांत अलोट प्रेम वाहत राहतं. मग बाळाचे ठोके ऐकणं, बाळ आईच्या पोटात लाथा मारू लागल्याचा सुगावा म्हणजे बाळाची चाहूल! अन् प्रत्यक्षात बाळाचं आगमन म्हणजे आईचा, पत्नीचा पुनर्जन्मच. ते म्हणजे नुसतं पेढे, बर्फी वाटणं नसतं, तर जीवन सफळ झाल्याची ग्वाही, द्वाही, दवंडीच. बाळासाठी झबली, टोपडी जमवणे, नवी खरेदी करणे म्हणजे दिवाळीआधीची दिवाळीच ना? बारसं होऊन पहिला वाढदिवस केव्हा येतो कळतसुद्धा नाही. कधी कधी एव्हाना दुस-या बाळाची खबर म्हणजे जीवन संपल्याचा, आनंद विरल्याचा विषाद. मग बाळांच्या वाढीत आपलं तारुण्य सरून आपण प्रौढ झाल्याच्या खुणा, पहिला पांढरा केस देऊन जातात. चाळिशीनंतरच्या मोनोपॉजच्या व्यथा, वेदना, नवनवी लक्षणं म्हणजे एकाच क्षणी भोग सरल्याचा संतोष नि प्रौढत्वाचे घोर. मुलामुलींची वये एरंडासारखी असतात. कधी ती कानाखांद्याला लागतात, कळतसुद्धा नाही. मग त्यांचे शिक्षण, लग्न, नोकरी, संसार रोज नवे प्रश्न, नवी लढाई, नवी जुळवाजुळव. जीव कसा मेटाकुटीला येऊन जातो. अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना' असं होऊन थकून जातो माणूस; पण तरीही त्याची जगण्याची जिद्द मात्र न हारता, न थांबता, शिकते ते त्या कष्टातही, ते कष्ट उपसण्यातही कोण आनंद असतो. आपल्याला जे मिळालं नाही, ते मुलांना भरभरून, भरपाईने देण्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे कर्तव्यपूर्तीचा सोहळा!

 मुलाबाळांतून मोकळे झाले की मात्र ‘दिन गेले मास, तसे वत्सरेही गेली। निकट वाटते जीवनसंध्या ही आली।।', अशी जाणीव होऊ लागते. पाठ धरू लागते, गुडघे धरू लागले की हेही जीवनाचं एक अटळ पर्व असतं व त्याला तुमची इच्छा असो वा नसो, सामोरे जावेच लागते. सून, जावयांचं असं उगवणं म्हणजे आपला सूर्य कलत चालल्याच्या खाणाखुणा! मग चारधामचे वेध. पूर्वी काशीचे खेटे मनी यायचे. हल्ली युरोप, अमेरिका, पटायाची ‘सेकंड इनिंग ट्रीप म्हणजे जिवंतपणी मोक्षप्राप्तीचा आनंद नि स्वर्गसुखाची अनुभूती. आता कधी नव्हे ते पतिपत्नीमधील एकमेकांबद्दलचा दुरावा झडून, त्याची जागा जिव्हाळ्याचा झरा घेऊ लागते. शेवटी दोघांचे मिळून सरण सजावे, अशी इच्छा केवळ शहाजहाँ-नूरजहाँचीच नसते, आपलीपण असते. बरं झालं, तेव्हा विमा उतरला होता म्हणून, नाहीतर आज कुत्रं हाल खाल्लं नसतं, असा दिलासा म्हणजे आपण दूरदृष्टीनं जगलो, या आपल्या शहाणपणाची सेल्फ प्रशंसा, आपणच आपल्या पाठीवर

थाप मारून घेणं. मुलंमुली, सूनजावई ज्यांना त्यांना आपले संसार असतात. ते त्यांच्यात रममाण. आपण आता पानांवर नाही, तर मार्जिनमध्ये गेल्याची अनुभूती म्हणजे विषादच नसतो, तर ऊर्मी, ऊर्जा हरवण्याची हताशा विशद करणारी असते. ‘ने रे एकदा वर’, ‘लागले नेत्र पैलतीरी’, ‘गोव-या पोहोचल्या स्मशानात, आता फक्त तिरडी पोहोचवायची वाट' अशी निरवानिरवीची, निर्वाणीची भाषा म्हणजे संध्याछाया भिवविती हृदया' अशीच अभिव्यक्ती. ‘कुठे दडून बसलास रे, ने लवकर' म्हणणं म्हणजे भवसागराचा वीट नि जगणं असह्य झाल्याची साक्ष! 'देह जळो नि फुली उजळो' म्हणत दिवस काढणंही कठीण होतं. असं वाट बघत जगण्यापेक्षा मरणच बरं, असं कितीही वाटलं, तरी ते कुणाच्या हातात नसतं? ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट' म्हणत पतिपत्नीतील स्पर्धा म्हणजे विधुर, विधवा म्हणून जगणं नाकारणं! पण, तेही काळाच्या मुठीत बंद असतं. हाती असतं फक्त मरण येईपर्यंत जगणं!

▄ ▄

पूर्व प्रसिद्धी

१. शब्द सोन्याचा पिंपळ
 (दै. सकाळ, कोल्हापूर - ६ मार्च, २00७)
२. शब्द माहात्म्य
 (चिंतन/आकाशवाणी, सांगली - २८ मे, १९८६)
३. वाचनाने जग बदलते
 (दै. सकाळ, कोल्हापूर - १४ जानेवारी, २०१२)
४. दिसामाजी काहीतरी लिहावे
 (दै. सकाळ, कोल्हापूर - १६ जानेवारी, २०१२)
५. पुस्तकाचे महत्त्व
 (चिंतन/आकाशवाणी, सांगली - २० ऑगस्ट, १९८७)
६. एकतरी पुस्तक प्रत्येक घरी
 (दै. सकाळ, कोल्हापूर - १३ जानेवारी, २०१२)
७. लेखक माझ्या मनी, अंगणी
 (दै. सकाळ, कोल्हापूर - १५ जानेवारी, २०१२)
८. अजून मोहविते 'मधुशाला'
 (दै. रविवार सकाळ, कोल्हापूर - २६ मे, १९८५)
९. कार्यमग्नता श्वास बनवणारे : ‘प्रोफेट'
 (दै. सकाळ, कोल्हापूर - ४ मे, २०१२)
१०. सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी : 'गोदान'
 (विचारशलाका-एप्रिल-सप्टेंबर, २00२)
११. जहाल वेदनेची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'
 (मेहता ग्रंथजगत - दिवाळी, २०१२)
१२. अस्वस्थ करणारं स्त्री जीवन : ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'
 (मिळून सा-याजणी - डिसेंबर २०१७)
१३. संत कबीर आणि अंधश्रद्धा निर्मूलन
 (संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन-संपादक डॉ. रा. तु. भगत - १५ ऑगस्ट २00२)
१४. कारंथीय नाट्यमीमांसा
 (अभिरूची रंगसंवाद - २४ डिसेंबर २०00)
१५. वि. स. खोडेकरांच्या रूपक कथा
 (वाचू आनंदे/आकाशवाणी, कोल्हापूर-२७ मार्च, २00१)
१६. वि. स. खांडेकरांचा पत्रसंवाद
 (मेहता ग्रंथजगत - दिवाळी २०१०)
१७. वि. स. खांडेकर : समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत
 (दै. सकाळ, कोल्हापूर-३१ ऑगस्ट, २00१)
१८. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : एक दृष्टिक्षेप
 (किर्लोस्कर सांस्कृतिक पर्यटन विशेषांक-मार्च, २00५)
१९. साने गुरुजींच्या दैनंदिनी चाळताना...
 (दै. प्रहार (कोलाज) ५ जून २०११)
२०. साप्ताहिक साधना पहिली जावक बारनिशी : काही निरीक्षणे
 (अप्रकाशित)
२१. सुर्वे काव्य : वंचितांचा टाहो
 (नवी सनद (नारायण सुर्वे श्रद्धांजली विशेषांक) जुलै - ऑगस्ट २०१0)
२२. मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास
 (परिवर्तनाचा वाटसरू-१६, ३० सप्टेंबर,२००७)
२३. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य
 (संबंध (राजस्थानी अंक)-मे १९८७)
२४. सार्वजनिक ग्रंथालये : काल, आज आणि उद्या
 (अप्रकाशित)
२५. सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार
 (गांधीजी आणि सामाजिक समता - संपादक - डॉ. श्रीराम जाधव - २00९)
२६. मराठी साहित्याची लोभस इंग्रजी प्रतिबिंबे
 (महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर - २३ एप्रिल, २०१५)
२७. इंटरनेटवरील समृद्ध मराठी
 (लोकराज्य, फेब्रुवारी, २०१४)
२८. इंग्रजीच्या गर्तेतील मराठी
 (पूर्वरंग, सांबरा, बेळगाव - १८ डिसेंबर, २०१६)
२९. मराठी भाषाकौशल्याची किमया
 (लोकराज्य, जून, २०१३)
३०. जागर वाचनाचा
 (निर्झर वार्षिक/२०१४)
३१. संगणकीय तंत्रज्ञान व बदलता वाचन व्यवहार
 (महात्मा गांधी ग्रंथालय शताब्दी - २०१६)
 ३२. चला मुलांसाठी नवा डाव मांडूया (भाषण)
 (मासिक, ऋग्वेद बालकुमार साहित्य संमेलन विशेषांक - मार्च, २०१६)
३३. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान
 (लोकराज्य, फेब्रुवारी, २०१३)
३४. झंप्री
 (त्रैमासिक इंद्रधनुष्य/मार्च, एप्रिल, मे, २०१७)
३५. जगणं... अगोदर असोशी... नंतर नकोशी
 (प्रबोधन प्रकाशन ज्योती-डिसेंबर, २०१७)

▄ ▄



डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00६/पृ. २१०/रु. १८0 सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१00/रु.१00/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५0/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/.२00/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२0१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक
 लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१७६/रु.२00/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२00/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
 साधना प्रकाशन पुणे २0१७/पृ. १८६/रु. २00/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३00 /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१५५/रु.२00/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती

आगामी

  • भारतीय भाषा (समीक्षा)
  • भारतीय साहित्य (समीक्षा)
  • भारतीय लिपी (समीक्षा)
  • वाचन (सैद्धान्तिक)

(*) वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

▄ ▄