शब्द सोन्याचा पिंपळ/झंप्री
झंप्रीतल्या इस्टेटीत सारं जग लुटून भरलेलं असायचं. गोट्यांशिवाय काचांचे तुकडे, रंगबिरंगी दगडे, शंख, शिंपले, गजगे, मोरपिस, बांगड्यांचे तुकडे, डुला-माळांचे ओघळलेले मणी, अंगठ्यांचे खडे, तुटक्या वस्तू, स्कू, बोल्ट, खिळे, सारा मायाबाजार, मीना बाजार भरलेला असायचा. कागद, कपटे, चित्रं आणि खरं सांगू का? विड्या-सिगारेटची थोटकंही असायची. चोरून प्यायची नक्कल करण्यासाठी जमवलेली असायची. मित्र जमले की आम्ही खोट्या काड्यापेटीने ती शिलगवतही असू. गॅगमध्ये एकादा मित्र पंटर असायचा. न भिता कश खेचायचा. घरात चिटपाखरू नसलं तरी आमच्या मनाभोवती सान्यांची भूतं भटकत, घिरट्या घालत राहायची. मी बुळा, भित्राच. काही गैर करायचं म्हटलं की लागले हात थरथरायला... पाय लटपटायला... घामाघूम... धामधूम!
पुढे मी मोठा झालो तशा झंप्रीतल्या वस्तू बदलल्या. वस्तूंची जागा पुस्तकांनी घेतली. खेळ बदलले. व्यापार, सापशिडी, लिडोचा पट मांडला जाऊ लागला. सापाची आशंका नि शिडीची आकांक्षा! तोच संशयाचा खेळ ऊन सावली बनून फेर धरत राहायचा. तिकडे तबकडीवर दुरून कुणाच्या तरी घरा-खोलीतून तान ऐकू येत राहायची... ‘संशय का मनी आलाऽऽ' मित्र-मैत्रिणी त्याच पण त्यांचा जीव नि जागा एव्हाना बदलल्या होत्या. मनी हुरहूर वाढलेली. मी शिकायला कोल्हापूरला गेलो तरी प्रत्येक दिवाळी, मेच्या सुट्टीत केव्हा पंढरपूरला जाईन असं व्हायचं. विठोबा काही माझा बॉयफ्रेंड नव्हता पण एव्हाना मीच बॉयफ्रेंड झालेला... कुणाचा तरी. जिगरी दोस्त आता खलनायकाची भूमिका वठवता झाला होता. गॅगमध्ये क्षणाक्षणाला अकारण, सकारण पक्षांतर होत राहायचं. कधी पत्त्याच्या डावात झब्बू मिळाला म्हणून, तरी कधी क्रिकेटमध्ये सिक्सर मारली म्हणून, कधी तो त्याच्याशी लगट करतो म्हणून, तर कधी 'ती' त्याच्याशी बोलते म्हणून. आता माझी झंप्री वस्तू ऐवजी काहुरांनी भरलेली होती. झंप्री एव्हाना व्हर्च्यअल होऊन गेली होती. या झंप्रीत आता भूतं नाचायची तशी स्वप्नंही धिंगाणा घालायची! बरं या झंप्रीचं रूप, स्वरूप आता बदललेलं. इथं चोरीचं भय नव्हतं. ही झंप्री मानसिक, भावनिक भिंतीनी घट्ट, टाइट होती. शेरलॉक, शर्विलकाची भीती नव्हती पण आभासी भय सारखं पिच्छा करत राहायचं. मीच भूत झालो होतो. मनात सारखा परी सिंड्रेला, रानी रूपमती, पदमिनी नाचत असायची. 'आतून कीर्तन वरून तमाशा' असा गंडीव-फशिवचा लपंडाव नित्याचा.
माझ्या झंप्रीत आता मीना कुमारी, सायरा बानो, कल्पनाची चित्रं जमू लागली. देवानंद, शम्मीकपूरही. प्रेम चोपरा, प्राणही असायचे. त्या चित्रांवर मी का कुणास ठाऊक फुल्या मारत असे. सिनेमाच्या गाण्यांची पुस्तके मनी-कानी गुणगुणत असायची. कधी मनातल्या मनात तर कधी दार लावून एकटाच नाचायचो. कधी उदास, एकटाच बसायचो. अभ्यासाच्या पुस्तकातली अक्षरं उडून जायची... रिकाम्या जागेवर फुलपाखरं येऊन बसायची. त्यांचे रंग, बेरंग माझ्याच मनाची प्रतिबिंब बनायचं. त्यांचं फडफडणं, चडफडणंही माझंच असायचं. ही झंप्री एव्हाना अलौकिक गुहा झालेली. ‘खुल जा सिमसिम' म्हटलं तरी दरवाजा नाही उघडायचा. पण त्या साच्या चडफडीत, झटापटीत गंमत असायची... ‘खाये तो पछताये न खाये तो भी' ... ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय'... काहीच कळायचं नाही. खरं कोणतं नि खोटं काय समजत नसे... सारा डोळे बांधून शिवणापाणीचा खेळ! तिकडे मित्रांचे आतंकी फुत्कार! यातही एक मित्र जिवाभावाचा असायचा. माझ्या मनातल्या झंप्रीतली गुपितं मी फक्त त्यालाच सांगत असे. तो होता म्हणून मी त्या तरंगातही तरून गेलो. तो निरोप द्यायचा नि आणायचा. तो माझ्यासाठी २४ x ७ हेरगिरी, पहारा, सारं करायचा. प्लॅनिंग त्याचं, कारवाई माझी... सारं कसं सर्जिकल स्ट्राईकसारखं बेमालूम फत्ते व्हायचं. कपाट, कोप-यांचे आडोसे म्हणजे नंदनवन बनून जायचे क्षणार्धात! बाहेर शिट्टी, ‘गोंद्या आला रेऽऽ' चा पुकारा झाला की झंप्री बंद.
मी कॉलेजला जाऊ लागलो तसं माझी झंप्री आता जाहीर झाली... होऊ लागली. मुलं-मुली चिडवू लागली की कॉलर ताठ व्हायची. पण एव्हाना एक नवंच भूत झंप्रीत शिरलं. कळपात लांडगा घुसावा तसं ते खूळ होतं अभ्यासाचं. शिकल्याशिवाय स्वप्नांना अर्थ नाही या जाणिवेने झपाटलं. प्रेमापेक्षा जगणं महत्त्वाचं वाटू लागलं. वसंत फुलण्यापूर्वीच ओसरू लागला तो परिस्थितीच्या प्रखर जाणिवेमुळे. आता सारं कसं टिप, टॉप, टाइटची फाइट! वह्या, पुस्तकांची झंप्री माझी वाटू लागली. वाटू लागलं सारी लायब्ररीची पुस्तकं, मासिकं आपल्या झंप्रीत असावी. मी आता घोस्ट रिडिंग करू लागलो. रंभा, अप्सरा, मेनका मासिकं एकीकडे आणि दुसरीकडे ‘लाइफ’, ‘सोविएत देश', 'नॅशनल जिऑग्राफिक'ही! 'ललित', 'मनोहर', ‘धर्मयुग', 'दिनमान', 'इलास्ट्रेडेट विकली’ सारं हवेहवेसे वाटायचे. एकाच वेळी मी बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर वाचायचो नि दुसरीकडे 'मृत्युंजय', 'ययाति' चं गारुडही असायचं. हां एक खरं की
रात्रीचं वाचन वेगळं नि दिवसाचं वेगळं. रात्री माया बाजार नि सकाळी मीना बाजार. झुंझार खिडकीतील किर्र रात्र अंधारात एच.जी. वेल्सच्या ‘इनव्हिजिबल मॅन' सारखा यायचा. कधी चार्ल्स डिकन्सच्या ‘टेल ऑफ टू सिटीस' मधील मिस्टर लॉरीप्रमाणे It was fogy night in London वाचताना रोमांच उभं राहायचं. आपण बॅस्टिलचा तुरुंग फोडायला निघालोय असं वाटत राहायचं. त्याच दिवसात सकाळी ‘कर्ण' माझा सखा होता नि ‘ययाति'चं अनाकलनीय आश्चर्य! ‘कामभावना' हा शब्द याच दिवसात मी मित्रांच्या (अनुभवी) मार्गदर्शनात शिकलो. आयुष्यातलं पहिलं शास्त्र ‘कोकशास्त्र' मी डोळे फोडफोडून मोठ्या ताणतणावाखाली नि उशीच्या अभ-याच्या झंप्रीत लपवून ठेवत वाचल्याचं आठवतं. पण लवकरच खलिल जिब्रानीनी माझा ताबा घेतला नि मी मायावी जगातून एकदम भवसागरात, भवतालात आलो तसं माझ्या झंप्रीला घोरांच्या घुशींनी भुसभुशीत करायचा नवा उच्छाद मांडला. मी गैराची संगत सोडून एकदम सभ्य जगातला कवटाळले. त्याचं कारण होतं... मी शिक्षक व्हायचं ठरवलं नि माझ्या पुढे डॉ. डी. व्ही. चककरमनेसारखा एक ऋषितुल्य शिक्षक खड्या, अभेद्य कड्याप्रमाणे उभा राहिला नि माझी झंप्री आता मुक्तांगण बनून गेली. त्या झंप्रीत गेल्या चाळीस पन्नास वर्षांत गैराचा उंदिर सोडा मुंगीपण जाऊ शकली नाही. मानसिक, भावनिक, वैचारिक, नैतिक, भौतिकाच्या भिंतीतील फटी, अंतर मला उमजत गेलं नि वैध, विधायक झंप्रीनं माझं लौकिक जीवन नंदनवन बनवून टाकलं.
सत्तरीला उंबरठ्यावर आज मी उभा आहे. माझी झंप्री चौपाल, चावडी बनून गेलीय. 'नो प्रायव्हेट बिझनेस' अशी न लावलेली पाटी वाचत माझं आयुष्य मी आक्रमतो आहे. लेखन, वाचन, व्याख्यान, समाजकार्य असा चतुर्दिक खेळ, फेर धरत मी भटकतोय. मागं वळून पाहताना माझ्या लक्षात येतं की मी माझी झंप्री कालौघात बदलत राहिलो म्हणून या मुक्कामावर आलो. माणसाची खरी झंप्री असते त्याचं मन. तेही अबोध, आतलं मन खरं! ते तुम्हाला नीतळ, निर्भेळ, निर्मळ ठेवता येतं का यावर तुमच्या आयुष्याचे रूळ ठरतात नि मग समाज मनात तुम्ही रुळू लागता, ते तुमच्या अंतरंगाचं बाह्यरूप, स्वरूप असतं.
झंप्री दुसरं तिसरं काही असत नाही. ती असते तुमच्या मर्मबंधाची ठेव. ती तुम्ही कशी जपता, जोपासता यावर तुमच्या जहाजाचं सुकाणू दिशा ठरवतं. युगांतर नि कायाकल्प घडून येत असतो. घडायचा, बिघडायच्या
क्षणी तुम्हाला तुमचा आतला आवाज आला पाहिजे. तो ऐकायची एक पूर्वअट असते. आवाज आत असावा लागतो. तो असतो सर्वांच्यात. त्याच्यावर तुम्हाला घट्ट मांड ठोकता आली पाहिजे. वारू भटकायचं नसेल तर सुकाणू इतकाच लगाम महत्त्वाचा. ऐन तारुण्यात किंकाळणारं घोडं तुम्हाला सावरता आलं पाहिजे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभादि षड्रिपू आयुष्याच्या प्रत्येक वळणावर लाल नि हिरवा झेंडा घेऊन उभे असतात. लाल झेंडा हाती घ्यायचं वय ठरलेलं आहे. ‘कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली तर लाल झेंडा काय कामाचा. हिरवं पान, लाल देठ, विवेकानीच चाखायचं, खुडायचं! धरायचं वय असतं, तसं सोडायचंही! सोडण्यात उदारता, निर्मोहीपणा हवा. कुणी आपल्या जाण्याची वाट पाहात असेल तर समजावं, आपण जरा जबरीचंच जगतो आहे. जरब कार्यात हवी. अधिकारात वापराल तर तुम्ही श्रद्धांजली दिवशीच इतिहासात दफन होता. निरपेक्ष वृक्षाला जन्मांतराने, कालांतराने फळे धरतात, लागतात. ती गोडच असतात, कारण ती निरपेक्ष घामावर पोसलेली असतात. सारे महात्मे महानतम ध्यायाने जमीन नांगरून ठेवतात. बी काळ पेरतो.
मग परत झंप्रीत बिलोरी स्वप्ने साकारू लागतात. ती लौकिक असत नाहीत. ती परहितार्थ जन्मतात. अहिंसक स्वप्नांना निस्वार्थतेचं वरदान असल्याने ती लौकिक स्वप्नांसारखी भगत कधीच नाहीत. त्यांना साताजन्माच्या सुफळ संपूर्णतेचं सात्त्विक वरदान लाभलेलं असतं. ती रस्त्यात खाच, खळगे, काटे-कुटे, वळणे नाही पेरीत. ती एका नव्या युगाची नांदी व पुराण्या दुःस्वासाचा युगान्त असतो. झंप्री आता कोंदट अंधाराने माखलेली न राहता चारी दिशा उजळणारी प्रभा घेऊन येते. त्या झंप्रीत टिकली एवढं स्वार्थाचं तळं असत नाही. झंप्रीच्या पलिकडे आरसे महाल, आकाशगंगा, सात समुद्र, सप्तशृंग, अलौकिक अपरा सृष्टी असते. तिथं एकच गीत घुमत असतं... कल्याणमस्तुऽऽ, मंगलम्ऽऽ▄ ▄