विज्ञान-प्रणीत समाजरचना/पूर्वेचे पश्चिमीकरण

विकिस्रोत कडून

पूर्वेचे पश्चिमीकरण.

 तुर्कस्थान व जपान यांचा अर्वाचीन इतिहास फार उद्बोधक आहे. जगामध्ये जेथे कोठे म्हणून वस्तिक्षम प्रांत असेल तेथे तो युरोपियांच्या अमलाखाली असलाच पाहिजे असा जणू काही नियमच ठरून गेला असावा असे वाटण्याजोगी परिस्थिती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाली होती. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका हे विरळ व रानटी वस्तीचे देशच फक्त युरोपियांनी जिंकले असे नसून हिंदी, चिनी, आरबी हे जे एकाकाळी अत्यंत सुधारलेले लोक यांच्याही भूमी त्यांनी जिंकून घेतल्या आणि युरोपीय संस्कृतीला तोंड देण्यास जगावर एकही प्रांत समर्थ नाही हे निरपवाद सिद्ध करून टाकले.
 युरोपच्या वर्चस्वाखाली नसलेले इराण, अफगाणिस्थान वगैरे आणखीही काही देश आहेत. पण त्यांना अजून मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही; हे एक, आणि युरोपीय लोकांशी त्यांचा प्राणांतिक झगडा होण्याचा अजून कधी प्रसंगच आलेला नाही, हे दुसरेही कारण आहे. तुर्कस्थान व जपान यांची गोष्ट तशी नाही. या दोनही राष्ट्रांनी युरोपियांशी झगडून आपल्या तोफांचा धूर त्यांना पाजून आपले स्वातंत्र्य टिकविले आहे आणि जपानने तर आता युरोपियांनाच उलट शह देण्यास सुरुवात केली आहे; आणि वरच्या पदावर गेल्याबरोबर आम्ही श्रेष्ठ, आमचा वंश श्रेष्ठ, इत्यादि जी भाषा राष्ट्र बोलू लागतात तशी भाषा या दोनही राष्ट्रांनी सुरू केली आहे; आर्यवंश सर्व जगात श्रेष्ठ असे मध्यंतरी काही दिवस ठरले होते. गेली काही वर्षे नॉर्डिक वंशाला ऊर्जितावस्था आलेली आहे. आर्यवंश म्हणजे त्याचीच एक शाखा असे पंडित म्हणत आहेत. पण यूसफ झिया या तुर्की पंडिताने व्युत्पत्ती, जुने गाडून गेलेले अवशेष वगैरे अर्वाचीन साधनांच्या साह्यानेच आपल्या आर्यर व तुर्कर नावाच्या पुस्तकात आर्य व नॉर्डिक हे दोघेही तुर्कांचेच वंशज असून खरे कर्तृत्व तुर्की रक्तातच असते असे सांगितले आहे.
 इतरांना जे साधले नाही ते तुर्कस्थान व जपान या दोनच राष्ट्रांना का साधले याचा अगदी थोडा जरी विचार केला तरी असे दिसेल की, या राष्ट्रांचे आमूलाग्र पश्चिमीकरण झाले आहे. राजकारण, व्यापार, शिक्षणसंस्था, युद्धशास्त्र, विज्ञानाचा अभ्यास इत्यादि राष्ट्रीय जीवनाच्या बहुतेक सर्व शाखांत या लोकांनी युरोपी धोरण अंगीकारले आहे. केमालपाशाने तर सामान्य आचारविचारात सुद्धा कायद्याच्या सक्तीने युरोपीयता आणून सोडली आहे. याचा अर्थ असा की युरोपी मनुष्याशी यांनी टक्कर दिली हे जरी खरे असले तरी युरोपी संस्कृतींशी मात्र त्यांना झगडता आले नाही. वेळीच सावध होऊन तिचा अगदी बिनतक्रार अंगीकार त्यांनी केला. आणि तसे त्यांनी केले म्हणूनच त्यांना मान वर ठेवून जगता आले.
 पश्चिमेने पूर्वेवर हा जो अलौकिक विजय मिळविला आहे त्याच्या बुडाशी पश्चिमेजवळ असलेल्या तोफा, विषारी धूर किंवा विमाने हीच आहेत असे वरवर पाहाता वाटते. पण खोल विचार केला तर असे ध्यानात येईल की तोफा व विमाने ही केवळ बाह्य चिन्हे आहेत. तेवढीच निराळी काढून पूर्वेच्या हातात दिली तर पूर्वेला जय मिळेल हे खरे नाही. या तोफा व ही विमाने यांची पाळेमुळे फार फार खोलवर गेलेली आहेत. काही विशिष्ट प्रकारची समाजरचना, विशिष्ट प्रकारची विचारपद्धती, जगाबद्दलची अगदी निराळी दृष्टी, इतकेच नव्हे तर धर्म, नीती, सौंदर्य, संपत्ती, यांहीबद्दलचा निराळा दृष्टिकोन, येथपर्यंत त्या तोफांचा व विमानांचा संबंध जाऊन पोचतो. म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांच्यात तोफांचा अभाव व अस्तित्व एवढाच फरक नसून या दोघींच्या जीवनाच्या धाग्याधाग्यांत आढळून येईल असा तो फरक आहे. हा फरक काय आहे. कोणच्या मूलतत्त्वावर हा फरक झालेला आहे, आपल्याकडची सनातन म्हणून ठरलेली तत्त्वे टाकून देऊन त्यांचा अंगीकार करणे कितपत इष्ट आहे, तुर्कस्थान व जपान यांच्या यशाचे बीज त्यातच आहे असे म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे. आणि त्यात खरोखरीच काही तथ्य असल्यास आपण त्यामुळे कोणचे धोरण आखले पाहिजे इत्यादि प्रश्नांचा या लेखात विचार करावयाचा आहे.
 'प्रयोगनिष्ठा' हे अर्वाचीन युरोपी जीवनाचे मुख्य लक्षण आहे. रसायन पदार्थविज्ञान, इत्यादि विज्ञानाच्या शास्त्रांतच तेथे प्रयोग चालू आहेत असे नाही. तर समाजव्यवस्था, धर्म, नीति, राजकारण, वाङम्, कला इत्यादि मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगातही ते चालू आहेत. आणि त्यांचे बरेवाईट परिणाम पाहून त्याप्रमाणे निर्णय करण्याची पद्धत तेथे रूढ होऊन गेली आहे.
 या एका प्रयोगनिष्ठेच्या मागे समाजधारणेस अवश्य अशा किती तरी गुणांची मालिका लागलेली दिसते. जुन्या ग्रंथात जे ज्ञान सांगितलेले आहे. जे नीती किंवा धर्म यांचे नियम सांगितलेले आहेत, ते सर्व काळी, सर्व स्थळी, सारखेच लागू पडतील, ही वेडगळ श्रद्धा नाहीशी होणे हे प्रयोगनिष्ठेचे पहिले प्राणतत्त्व होय. त्यावाचून नवीन प्रयोग करून पाहणे याला अर्थच उरत नाही. पृथ्वीचा गोलपणा, तिचे भ्रमण, जीवाची उत्पत्ती इत्यादिबद्दल बायबलात सांगितलेले ज्ञान चूक आहे असे वाटल्यामुळेच गॅलिलिओ, कोपर्निकस, डार्विन इत्यादि शास्त्रज्ञांना नवीन ज्ञान मिळविण्याची बुद्धी झाली. रोगांच्या कारणांची जुनी मीमांसा चूक आहे असे वाटल्यानेच डॉ. पाश्चर याने रोगजंतूंचा तलास लावण्याचा प्रयत्न केला व जंतू हे रोग होण्यास मुख्य कारण होतात. हे नवीन ज्ञान जगाला सांगितले. विज्ञानाप्रमाणे इतर प्रत्येक बाबतीत घडामोडी चालू आहेत. राजशाही, लोकशाही, पक्षशाही, हुकूमशाही इत्यादि नवे प्रकार राज्यव्यवस्थेसाठी लोक चोखाळून पाहत आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेल्या व वेदवत् मानल्या गेलेल्या तत्वांची हीच स्थिती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे काही दिवस प्रभावी ठरली होती. मध्यंतरी वंशशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन या तत्त्वांना बराच बायबंद बसला. काही ठिकाणी आनुवंशावर सर्व समाज हालत आहे असे वाटल्यामुळे त्यावर भर दिला गेला. तेथूनही काही पंडित आता लोकांना ढासळवीत आहेत. अर्थामध्ये सर्व सुखदुःखाचे मूळ आहे असे वाटून त्याअन्वये काही देशात समाजरचना चालू आहे. शिक्षणशास्त्रातही अशाच घडामोडी नित्य चालू आहेत. डाल्टनप्लॅन विनेटकाप्लॅन, प्रॉजेक्टमेथड, हॉवर्डप्लॅन, रोज नित्य नवी पद्धत- जास्त सुलभ, जास्त कार्यक्षम पद्धत- विचारी लोक हुडकून काढीत आहेत आणि जुनी त्याज्य म्हणून टाकून देत आहेत. हे मोठे विषय सोडून देऊन अगदी सामान्य विषयाकडे जरी लक्ष दिले, तरी तेच दिसेल. घर बांधण्याच्या पद्धती, पोषाखाच्या पद्धती यांहीमध्ये आमूलाग्र फरक पडत चालला आहे. अलिकडे तर प्रयोगाने नित्य पालटणे हेच जीवनाचे मुख्य लक्षण तेथे होऊ पहात आहे. कालची मोटार आज चालत नाही, कालची बंदूक आज रद्द ठरते व कालचे सिनेमाचे यंत्रही आज मागे पडलेले दिसते; आणि कालची बंदूक, मोटार, किंवा शिक्षणपद्धती आज नकोशी वाटते त्याचे कारण, केवळ नवीनतेची होस हे नसून ती बंदूक, मोटार किंवा शिक्षणपद्धती कमी कार्यक्षम आहे व नवीन पद्धत ही जास्त कार्यक्षम होईल असा भरंवसा वाटतो, हे आहे.
 जुने ग्रंथ किंवा पंडित हे सर्वज्ञ होते ही समजूत जाणे हे प्रयोगनिष्ठेला जितके आवश्यक आहे. तितकेच नवीन ज्ञान सांगण्याची व स्वीकारण्याची तयारी असणे हेही आवश्यक आहे. या बाबतीत असे दिसते की बहुजन समाजाची प्रवृत्ती सगळीकडे सारखीच असते. नव्या गोष्टीला पूर्वेकडे जितका तीव्र विरोध होतो तितकाच पश्चिमेकडे होते. पंधरासोळाव्या शतकापर्यंत पूर्वपश्चिमेची स्थिती या बाबतीत जवळजवळ सारखीच होती. किंबहुना पश्चिमेकडे ती जास्त भयंकर होती. कारण बायबलविरुद्ध ब्र काढल्याबरोबर तिकडे जाळून टाकीत असत. पण पूर्वेकडे मुख्य उणीव पडली ती नवी संशोधन करून आलेले निर्णय लोकांपुढे निर्भयपणे ठासून मांडणाऱ्या शूर पुरुषांची कोपर्निकस, गॅलिलिओपासून न्यूटन- डार्विनपर्यंत शेकडोशवीरांनी आपल्या रक्ताचे व प्राणाचेही मोल देऊन नवीन ज्ञानाचा नंदादीप पाजळत ठेवला. ती परंपरा पूर्वेकडे निर्माणच झाली नाही इतकेच नव्हे तर संतवाङमयात भौतिक ज्ञानाची, तर्कशास्त्राची, पांडित्याची, टवाळीच करण्याची प्रथा पडली होती. आता यावरून समाज जुन्या श्रुतिस्मृतींना सर्वस्वी चिकटून राहिला होता असे वाटण्याचा संभव आहे. पण तेही खरे नाही. आपापल्या सुखसोयीस व क्वचित् समाजाच्या सुखसोयीसही अनुकूल असे बदल येथल्या काही समाजधुरीणांना केलेले दिसतात; पण तसे करताना जुन्या ग्रंथांची गुलामगिरी तोडून टाकण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला नाहीच; पण आपल्या म्हणण्यास ते अनुकूलच आहेत असे दाखविण्याचा अश्लाघ्य व विघातक प्रयत्न मात्र त्यांनी केला. बुद्धीला पिरगळून टाकून शब्दनिष्ठ होण्याचा प्रयत्न केला की हा अनिष्ट परिणाम टाळताच येणार नाही. रेननने म्हटलेच आहे की माणसाचा स्वभाव बदलणे शक्य नाही. त्याला ग्रंथाला जखडून टाकलेत तर त्या ग्रंथावर आपल्याला अनुकूल असे भाष्य लिहून तो त्यांतून सुटून जाणार हे ठरलेच आहे तीच स्थिती पूर्वेकडच्या पंडितांची झाली. आणि त्यातूनच 'समन्वया'चा जन्म झाला. या समन्वयपद्धतीने हिंदुस्थानची किती बौद्धिक हानी झाली असेल याची कल्पनाच करणे शक्य नाही. कोणचेही मत सांगावे आणि गीतेतला आधार द्यावा, कोणचाही आचार करावा आणि मनूचा आधार दाखवावा. असला मिथ्याचार या पद्धतीमुळेच सुरू होतो. गेली हजार वर्षे हिंदुस्थानात हेच चालले आहे. पण यामुळे मानसिक गुलामगिरीच्या शृंखला तुटणे लांबच राहून त्या दृढतर मात्र झाल्या. व व्यक्तीच्या मनाला स्वातंत्र्य मिळून त्याचा जो विकास व्हावयाचा तो मुळीच झाला नाही. जुने शास्त्र मला मान्य नाही, माझ्या काळचे शास्त्र मी ठरवीन असे निर्भयपणे सांगणारा महाराष्ट्रातला पहिला महापुरुष म्हणजे आगरकरच होय. तोपर्यंत आचरावे एक, बडबडावे दुसरे, मुळात असावे तिसरेच, अशी स्थिती होती. आणि ही तिन्ही परस्परविरुद्ध मुळीच नाहीत, असा समज उराशी धरून बहुजनसमाज शांतपणे चालला होता.
 प्रयोगनिष्ठेला तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. मला नवीन संशोधन करण्याचा व माझी मते समाजात पसरविण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तो दुसऱ्याला आहे हे प्रत्येकाला मान्य असले पाहिजे. रसायन, वैद्यक, आनुवंश इत्यादी शास्त्रातीलच फक्त प्रयोग येथे अभिप्रेत नसून धर्म, राजकारण, समाजकारण, याही क्षेत्रांतले प्रयोग विचारात घेतले आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे तेथे व्यक्तिस्वातंत्र्य किती जरूर आहे हे ध्यानात येईल.
 व्यक्तिस्वातंत्र्य हा युरोपच्या अर्वाचीन वैभवाचा केवळ आत्माच होय. व्यक्तीच्या सुखाच्या दृष्टीने याचे किती महत्त्व आहे हे मागे संस्कृती व प्रगती या प्रकरणात सांगितलेच आहे. समाजाच्या दृष्टीनेही व्यक्तिस्वातंत्र्य अत्यंत अवश्य आहे. धर्मकारण, राजकारण, समाजकारण यात एकाच्याच नेतृत्वाने चालावे अशी जुनी पद्धत होती. पण तो एक कोण हे ठरविण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या अगदी अयशस्वी व विघातक आहेत असे अनुभवास आले आहे. बापासारखा तंतोतंत पुत्र निर्माण व्हावा अशी निसर्ग योजना असली तर कोणाचे नेतृत्व पत्करावे हे ठरविणे फारसे अवघड गेले नसते. एकदा एक मनुष्य निवडला की काम झाले. याच कल्पनेने वंशपरंपरा राजपद किंवा गुरुपद मागे दिले जात असे. पण बापासारखा मुलगा होत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपले सामर्थ्य, गुण, कर्तृत्व ही प्रगट करण्यास अवसर देऊन त्यांतून जो सर्व समाजाला योग्य दिसेल तो निवडावा ही पद्धत प्रचारात आली. ही सर्वथा निर्दोष आहे असे मुळीच नाही. पण युरोपचा अर्वाचीन इतिहास पाहिला तर ही पद्धत जुन्या पद्धतीपेक्षा किती तरी पटीने जास्त कार्यक्षम आहे असे दिसून येईल. केवळ राजकारणी व मुत्सद्दीच याने वर येतात असे नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिस्वातंत्र्याच्या पद्धतीने मोठमोठे पुरुष निर्माण होतात. इसवीसनापूर्वीचा हिंदुस्थानचा इतिहास पाहिला तर तेथेही हाच प्रकार आढळून येतो. समाजातल्या कोणच्याही थरातल्या कोणच्याही पुरुषाला वाटेल त्या क्षेत्रांतला वाटेल तितका उच्च विचार सुचू शकतो किंवा कोणचीही व्यक्ती कोणचाही पराक्रम करू शकते. आणि असा स्फुरलेला विचार त्या पुरुषाला सांगू दिला नाही, किंवा व्यक्तीच्या पराक्रमाला अवसर मिळाला नाही तर, जग अनेक महापुरुषांना मुकते. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजव्यवस्थेचे मूलतत्त्व असावयास पाहिजे.
 प्रयोगनिष्ठेला अवश्य म्हणून जे गुण येथपर्यंत सांगितले त्यांच्या व विशेषतः व्यक्ति- स्वातंत्र्याच्या वाढीला लोकशाही ही फार पोषक असते. लोकशाहीत सर्व समाज खालपासून वरपर्यंत डहुळला जातो. समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जाणीव तरी निदान लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला जितकी चांगली असते तितकी राजशाहीत नसते. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाही यांचे संबंध अविभाज्य आहेत असे म्हणावे लागते. म्हणूनच पूर्वेच्या पश्चिमीकरणात राजशाही जाऊन लोकशाही येणे याला फार महत्त्व आहे. पण गेल्या दहापांच वर्षांत युरोपात मुसोलिनी, हिटलर, स्टॅलिन वगैरे पुरुषांनी हुकूमशाही चालवून व्यक्तिस्वातंत्र्य, आणि त्या स्वातंत्र्याची जननी जी लोकशाही तिचा अगदी नायनाट करून टाकला आहे, आणि त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा व लोकशाहीचा प्रयोग युरोपात फसला आहे असे वाटून पूर्वेकडची पूर्ण निर्बंधाची व राजशाहीची तत्त्वेच समाजधारणेस हितकर आहेत असे लोकांचे मत होऊ लागले आहे. तेव्हा त्याचा थोडासा विचार केला पाहिजे.
 'मॉडर्न सिव्हिलिझेशन ऑन ट्रायल' या ग्रंथांत बर्नस् ने या प्रश्नाची चांगली चर्चा केली आहे. तो म्हणतो की ज्या देशांत सध्या हुकूमशाही स्थापन झाली आहे, त्या देशात पूर्ण लोकशाही अशी कधी स्थापनच झालेली नव्हती. जर्मनी, रशिया, इटली या देशात राजेच राज्य करीत होते. म्हणून लोकशाही पूर्णतेला गेली आणि तो प्रयोग फसला असे या देशाची उदाहरणे दाखवून म्हणताच येणार नाही. या बाबतीत मला आणखी असे सुचवावेसे वाटते की या वरील देशांतही लोकशाहीच्या अनेक तत्त्वापैकी व्यक्तिस्वातंत्र्य हे प्राणतत्त्व जरी मुरगळले जात असले तरी सरकार हे लोकांच्यासाठी असले पाहिजे, राज्य ही राजाची दौलत नाही, हे जे लोकशाहीचे दुसरे मुख्य तत्त्व ते अजूनपर्यंत तरी पाळले जात आहे.
 दुसरे असे की हुकूमशाही जेथे चालली आहे अशा देशांपैकी प्रमुख जो रशिया त्याने आता नुकतीच लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. जुन्या रानटी अवस्थेतून लोकांना नवीन वातावरणात आणण्यापुरतीच तेथली लोकशाही होती हे यावरून स्पष्ट आहे. तुर्कस्थानात केमालपाशाचे हेच धोरण आहे. तेथली लोकशाही अगदी थेट रशियासारखी होणार नाही हे खरे; पण इंग्लंड- फ्रान्ससारखी खास होईल. इटाली व जर्मनीमध्ये पडत्या भांडवलशाहीला सावरण्याच्या प्रयत्नांतून दोन हुकूमशहा निर्माण झाले आहेत पण तेथेही बाह्यणत: तरी देशांतील बहुसंख्य लोकांच्या मतानेच हे हुकूमशहा निवडून आलेले आहेत. तेव्हा लोकशाहीचा प्रयोग फसला असे तर नाहीच म्हणता येत, पण उलट अगदी पूर्ण राजशाही असलेले देशही हुकूमशाही या पायरीवरून संपूर्ण लोकशाहीकडेच येत आहेत असे म्हणावे लागते.
 इंग्लंड व अमेरिका या देशांत लोकशाही वगैरे काही नसून काही भांडवलवाल्यांचे हाती सर्व सत्ता आहे असे विधान अलीकडे पुष्कळ ऐकू येते. हे विधान जरी काही अशी खरे असले तरी त्यावरून जे अनुमान काढण्यात येते ते मात्र सर्वस्वी चूक आहे. समता, व्यक्तिस्वातंत्र्य यांचे हे परिणाम आहेत अशी सध्या हाकाटी चालू आहे; पण थोडा विचार केला तर समता व व्यक्तिस्वातंत्र्य यांचे हे परिणाम नसून समता व व्यक्तिस्वातंत्र्य हे काही कारणाने कमी झाल्यामुळेच ही आपत्ती ओढवली आहे असे दिसून येईल. 'प्रोग्रेस अँड् प्रॉव्हर्टी' या आपल्या पुस्तकात हेन्री जॉर्ज याने या प्रश्नाचे विवेचन केले आहे. हिंदी, मिसरी, चिनी, बाबिलोनी या संस्कृती उदयास आल्या व नाहीशा झाल्या; तशीच सध्याची युरोपची संस्कृती एक दिवशी नाहीशी होईल की काय, या प्रश्नाचा युरोपमधील बरेच पंडित सध्या विचार करीत आहेत. हेन्री जॉर्ज हा त्यांपैकीच एक आहे. त्याच्या मते संघटना, समता व स्वातंत्र्य ही प्रगतीची मूलतत्त्वे होत हे सांगून त्याने पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे. जेव्हा संकृती उदयास येते तेव्हा या तत्त्वानुसार समाजरचना झालेली असते पण पुढे समाजाचा उत्कर्ष होऊ लागला की विशिष्ट कार्य विशिष्ट लोकांकडे जाऊन त्यांचा एक वर्ग तयार होतो. आणि मग समाजाचे लवचिक स्वरूप जाऊन तेथल्या व्यवस्थेला कडकपणा येतो. आपल्या हातातले ठावके जाऊ नये म्हणून कोणच्याही सुधारणेला समाजांतले हे स्थिर झालेले वर्ग विरोध करू लागतात. व हा विरोध यशस्वी व्हावा म्हणून त्यांना दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घ्यावे लागते. येथूनच संस्कृतीच्या अधःपातास प्रारंभ होतो. म्हणजे समता व स्वातंत्र्य यांनी समाजाचा नाश होत नसून त्यांची गळचेपी झाल्याबरोबर नाश सुरू होतो.
 हिंदुस्थानांत कडक वर्गवारी प्रथम मनूने सुरू केली आणि तेथूनच हिंदुस्थानच्या अधःपातास सुरुवात झाली असे मला वाटते. पण मनूने घातलेले निर्बंध हे अगदी कडक नव्हते. इसवी सनाच्या सातच्या आठव्या शतकांत मनूने सुरू केलेले कार्य पूर्ण झाले आणि तेथून मग प्रगती आणि स्वातंत्र्य यांना हा देश बव्हंशी मुकलेलाच आहे. इ. स. १००० पासून गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. त्यांचा प्रतिकार कोणीच करू शकला नाही ! महंमदाचा एकदाही पराभव झाला नाही ! पुढे साम्राज्याच्या रूपानेच मुसलमानी आक्रमण सुरू झाले. त्याला प्रतिकार करून ते जवळ- जवळ नाहीसे करण्यात यश आले ते फक्त मराठ्यांनाच. आणि ते का तर मनूचे वर्गबंध त्यांनी सर्वस्वी झुगारून दिले म्हणून. म्हणजे समतेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वानेच येथे उत्कर्ष झाला असे दिसते. एरवी मुसलमानी लाटेखाली सर्व देश बुडून गेला असता.
 प्रयोगनिष्ठा, समता, व्यक्तिस्वातंत्र्य व लोकसत्ता या अर्वाचीन पश्चिमेच्या चार ठळक लक्षणांचा येथवर विचार झाला. पश्चिमेच्या जीवनात खोल रुजलेली म्हणून जी तत्त्वे मागे उल्लेखिली होती ती हीच. या तत्त्वामुळे सर्व समाज अंतर्बाह्य बदलून जाऊन त्याचे जे दृश्य परिणाम आज सर्व जगाला दिसत आहेत त्यांचा विचार आता करावयाचा आहे.
 पश्चिमेकडे अगदी सहज नजर फेकली तरी यंत्र हा तिचा सर्वात तेजस्वी अलंकार आहे हे कोणासही दिसून येईल. वाहतुकीची, डोंगरफोडण्याची, समुद्र किंवा आकाश तरण्याची मोठमोठी कामेच यंत्रे करतात असे नसून झाडणे, सारवणे, धुणे, पुसणे हीही कामे आता पश्चिमेकडे यंत्रे करू लागली आहेत. हाताने किंवा काठीने जमीन उकरणाऱ्या मानवाला नांगराचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याच्या स्थितीत जो फरक पडला तोच वास्तविक त्या पुढच्या प्रत्येक शोधाने पडत गेलेला आहे. तो पहिला शोध जितका निषिद्ध किंवा ग्राह्य तितकाच शेवटचा असावयास पाहिजे. पहिल्याने मानवाला पशुकोटीतून उचलून मनुष्यतेप्रत आणण्यास जर मदत केली असेल तर शेवटचाही खास करील आणि तो करीत नसला तर त्याच्या वापरात काही तरी चूक होत असली पाहिजे हे उघड आहे. पण हे ध्यानात न घेता काही लोक यंत्राला सैतानी, राक्षसी इत्यादी शिव्या देताना आढळतात व ते पाहून आपणाला मोठा विस्मय वाटतो.
 अलीकडील यंत्राने हजारो मानवांच्या तोंडचा घास काढून घेतला असा यंत्रावर पहिला आरोप आहे. पूर्वी जे काम दहा लोक करीत असत तेच आता यंत्रांच्या साह्याने एकटा मनुष्य करतो आणि त्यामुळे नऊ माणसे उपाशी मरतात असा हा मुद्दा आहे. या मुद्यात अनेक प्रकारच्या चुका आहेत. दहा माणसांपैकी एकाने काम करून नवांना उपाशी ठेवावे असे काही यंत्राने सांगितलेले नाही. काम सोपे व कमी झाल्यास प्रत्येकाने एक दशांश काम करून जास्त सुखी होणे हेही शक्य आहे. आणि या दृष्टीने पाहिल्यास यत्राने घास तर काढून नाहीच घेतला पण एकदशांश श्रमात तितकाच घास मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे असे दिसून येईल. आणि असे असूनही मानवाला हे सुख मिळत नसेल तर तो दोष यंत्रांचा नसून यंत्र वापरणाऱ्या समाजाचा आहे असे म्हणणे प्राप्त आहे.
 अलीकडच्या यंत्रांची संहारशक्ती फार प्रचंड आहे व त्यामुळे शेवटी मानवी संस्कृतीचा व मानवाचाही पृथ्वीच्या पाठीवरून नायनाट होऊन जाईल असे काही पंडितांचे मत आहे. ही भीती अगदीच निरर्थक आहे असे म्हणता येणार नाही. पण याचाही बारकाईने विचार केला तर हा दोष यंत्राकडे नसून मानवाच्या मनाच्या दुसऱ्या काही स्वाभाविक दुर्गुणाकडे आहे असे दिसून येईल.
 पूर्वीच्या व अलिकडच्या मानव समाजाकडे पाहिले तर असे दिसून येते की हल्ली मानवाचे मोठमोठाले गट राष्ट्र या नावाने रहात आहेत. एकाच इंग्लंडमध्ये पाचशे निरनिराळ्या टोळ्या असण्याऐवजी आता इंग्लंड व स्कॉटलंड मिळून एकच टोळी म्हणजे राष्ट्र आहे आणि मानवाची दुष्ट प्रवृत्ती किंवा मारामारीची हौस हल्ली कमी झाली आहे असे जरी म्हणता येत नसले तरी एवढे खास म्हणता येईल की इंग्लंडमधल्या पाचशे टोळ्यांमध्ये रोज ज्या मारामाऱ्या व रक्तपात पुरातन काळी होत असत त्या आता खास टळल्या असून मानव तितका सुखी झाला आहे. स्टोरी ऑफ सिव्हिलिझेशन- मध्ये विल डुरंट याने म्हटले आहे की समाजात माणसाला आपल्याला रोज अन्नवस्त्र नक्की मिळेल अशी खात्री असेल व कोणच्याही क्षणाला मरण येऊ शकेल, किंवा कोणी तरी जबरदस्त येऊन खंडणी उपटू शकेल हा धसका नाहीसा झाला असेल तरच संस्कृती जन्मास येऊन वाढू शकते. म्हणजे अन्न व स्वास्थ्य हे संस्कृतीचे मुख्य घटक होत आणि आज या दोहोंबद्दल सुधारलेल्या समाजात जी मागल्यापेक्षा जास्त खात्री निर्माण झाली आहे तिचे सर्व श्रेय राष्ट्र या कल्पनेला आहे. यापुढे थोडा विचार केला तर असे दिसून येईल की सध्याची राष्ट्र ही कल्पना केवळ यंत्रामुळेच शक्य झालेली आहे. टेम्स नदीच्या काठी राहणारे सरकार स्कॉटलंडमध्ये वचक बसवू शकते ते केवळ यंत्रे आहेत म्हणून. त्याला तेथे पोचावयासच दहा दिवस लागणार, आणि तेथला किल्ला घ्यायला आणखी दोन महिने लागणार अशी स्थिती असती तर सर्व राष्ट्र एका मध्यवर्ती सत्तेखाली ठेवणे महामुष्कील झाले असते. पण सध्याचे सरकार दोन तासात स्कॉटलंडमध्ये जाऊन एकाच तासात किल्ल्यात प्रवेश मिळवू शकते, म्हणून किल्लेदार हा बंड करूच शकत नाही. बंदुकीच्या दारूमुळे सरदारवर्ग नाहीसा होऊन सर्व इंग्लंडची सत्ता केन्द्रित झाली ही गोष्ट प्रसिद्धच आहे. यंत्रसामर्थ्य असूनही दुसऱ्या काही दोषांमुळे सत्तेचे केन्द्रीकरण करना येत नाही अशी स्थिती असणे शक्य आहे. पण यंत्र नसताना सतत लढाई न करता दीर्घकाल सत्तेचे केन्द्रीकरण करणे म्हणजे तो चमत्कारच होय. ती अशक्य कल्पना आहे. हे जर खरे असले तर इंग्लंडमधल्या पाचशे टोळ्या व फ्रान्समधल्या पाचशे टोळया यांच्यातला नित्याचा रक्तपात टाळून संबंध इंग्लंड व संबंध फ्रान्स यांच्यामध्येच तो होईल व तोही पाचपंचवीस वर्षांनी एकाद वेळी होईल अशी जी स्थिति आज प्राप्त झाली आहे तिला यंत्रच कारण आहे असे म्हटले तर ते अमान्य होणार नाही असे वाटते. यंत्राने माणसांची आयुर्मर्यादा वाढविली आहे; पूर्वीच्यापेक्षा दसपट धान्य निर्माण करून जगाची लोकसंख्या तिप्पट किंवा चौपटही वाढली तरी पोसणे शक्य करून ठेवले आहे; चार वर्षांच्या महायुद्धात जेवढे लोक मेले त्याच्या दसपट लोक एक वर्षात प्लेग नेत असे. त्याला युरोपातून कायमचा हाकून लावणे यंत्रानेच शक्य केले आहे. या व अशाच प्रकारच्या आणखी गोष्टी ध्यानात घेतल्या व राष्ट्र कल्पना यंत्रानेच शक्य आहे, ही वर सांगितलेली गोष्ट त्यात भरीला घातली तर मानवाचा यंत्राने जो संहार केला आहे तो त्याने केलेल्या उपकारापुढे काहीच नव्हे हे ध्यानात येईल. सिव्हिलिझेशन ऑफ दि ईस्ट ॲण्ड वेस्ट या आपल्या निबंधात हू-शी या चिनी लेखकाने यंत्रनिदकांना चांगले उत्तर दिले आहे. त्याचे म्हणणे थोडक्यात असे आहे. रिक्षा ओढणाऱ्या माणसांना पशूंपेक्षा जास्त काही संस्कृति नसते. त्या रिक्षापासून त्या मानवांना सोडविण्याचे काम यंत्राने केले आहे. कोणच्याही धर्मोपदेशाला किंवा उच्च तात्त्विक सिद्धान्ताला हे शक्य झाले नव्हते. याचा अर्थ असा की, यंत्र हा कोणाच्याही मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. पूर्वेत संस्कृती उभारली ती यंत्रसामर्थ्याने. मध्यंतरीच्या काळात तिने यंत्र सोडून देऊन अध्यात्मचिंतन केले त्यामुळे तिचा ऱ्हास झाला. त्याच वेळी पश्चिम ही यंत्रोपासना करीत होती. आणि त्या सामर्थ्याने तिने पूर्वेला गुलाम करून ठेवून तिच्या अध्यात्मिक व ऐहिक अशा दोही संस्कृतोचा नाश करून टाकला आहे.
 यंत्राचे सामर्थ्य व महत्त्व हे असे स्पष्ट असतानाही काही लोक त्याकडे मुद्दाम डोळेझाक करून त्याचा निषेध करतात. आणि चरख्यासारख्या साधनांचा जीर्णोद्धार करू पहातात. काही एका काळापुरता उपाय म्हणून जर चरखा आला असेल, तर त्याला थोडासा अर्थ आहे असे म्हणता येईल. तलवार, बंदूक हातात नाही म्हणून काठीचा उपयोग करणं जसे बरोबर ठरेल तसेच गिरण्या उभारता येत नाहीत म्हणून, किंवा शेतकऱ्यांना दुसरा काहीच उद्योग नाही म्हणून, चरखा सांगणे काही लोकांच्या मते बरोबर ठरेल. पण तसे काही नसून यंत्रांशी विरोध म्हणून जर चरखा येणार असेल तर, आणि प्रत्येक माणसाने आपले अन्नवस्त्र आपण करावे. अशी कल्पना असेल तर, ती कल्पना बरोबर नाही. कारण श्रमविभाग करून माणसांना अन्नवस्त्राच्या रोजच्या जिकिरीतून सोडविणे हे तर सुधारणेचे पहिले लक्षण आहे.
 पण सध्या यंत्रालाच लोक शिव्या देतात असे नसून त्या यंत्राने निर्माण केलेल्या समृद्धीलाही शिव्या देतात असे दिसते. समृद्धीला शिव्या देणाऱ्या या लोकांचा मुद्दा अगदी निराळा आहे. यंत्राने अन्नाचा घास काढून घेतला, किंवा संहार केला हा त्यांचा मुद्दाच नाही. त्यांचा मुद्दा आध्यात्मिक आहे. भोग हे मानवाचे ध्येय नसून त्याग हे आहे; गरजा वाढविणे हे ध्येय नसून त्या कमी करीत आणणे हे आहे असे त्यांना वाटते. भोग ही जड तामसी संस्कृती असून त्याग ही उच्च सात्विक संस्कृती आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची मुख्य कल्पना अशी आहे की भोगाने भोगेच्छा वाढत जाते आणि तृप्ती अशी कधीच होत नाही, अग्नीत तूप घातल्याने तो जसा वाढतो तशा वासना या विषयांच्या उपभोगाने कमी न होता वाढतच जातात हे गीतावचन प्रसिद्धच आहे. पण या गीतेला असे विचारावेसे वाटते की भोगाने भोगेच्छा वाढत जाते, हे जरी क्षणभर खरे असले तरी त्यागाने ती कमी होते हे खरे आहे काय ? आज हजारो वर्षे शेतकरी व मजूर हे साहेब भोगीत असलेल्या सुखाचा त्यागच करीत आले आहेत. पण त्यांची भोगेच्छा कमी झालेली नसून नुसत्या तुकडयासाठी ते वाण्याबामणाच्या दाराशी लोळत असतात. यावर गीता म्हणेल की शेतकऱ्यांचा त्याग सक्तीचा आहे. त्याग मनाने करावयास हवा. पण मनाने केलेला त्याग हा जर श्रेष्ठ तर तेथे श्रीमंती- गरिबीचा प्रश्न येतोच कोठे ? मनःसंयम ज्याला करता येतो, तो श्रीमंतीत किंवा गरिबीत सारखाच वागेल. भोवतालच्या श्रीमंती- गरिबीवर मनःसंयम अवलंबून आहे हे खरे, पण तेथेही असे दिसेल की संतुष्ट झालेला म्हणजे श्रीमंत आत्माच जास्त संयम करू शकेल. गरजा मारून त्याग करता आलाच तर तो एखाद्यालाच येईल. बहुजन समाजाला गरजा मारण्याचे तत्त्व शिकविणे म्हणजे भिकाऱ्याला जिलबी खाऊ नकोस असा उपदेश करण्यासारखेच आहे. अनेक पक्वान्नांच्या राशी भरून ठेवाव्या, मनमुराद खाऊ द्यावे आणि मग त्या खाणाऱ्याला बजावावे की बाबा तुला संयम अवश्य आहे. नाश होईल इतका भोग घेऊ नकोस. यात खरा शहाणपणा आहे. आणि पाश्चात्यभोगवादी समाज नेमक हेच करीत आहे. भांडवलवाले हे स्वार्थी आहेत. त्यांचा पक्ष कोणीच घेत नाही. पण पश्चिमेकडचे जे समाजवादी लोक आहेत, जे कामकऱ्याचे कैवारी आहेत त्यांचे हेच प्रतिपादन आहे. रशियांतल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा जास्तीत जास्त वाढल्या पाहिजेत व त्या पुरविण्यासाठी तेथे जास्तीत, जास्त माल निर्माण झाला पाहिजे, असेच सध्याच्या तेथल्या धुरीणांचे मत आहे. 'भोगवादी' या नावाने हिंदूंच्या मनात संस्थानिक, इनामदार असा जो अजागळ वर्ग येतो तसला पंथ युरोपात मुळीच नाही. अगदी भांडवलवाले लोक घेतले तरी तेही असे नाहीत. काही कारखानदार तर मजूर करणार नाही इतके काम करीत असतात. मालाचा खप, बाजार यावर त्यांना सदैव लक्ष ठेवावे लागते. मजुरात व त्याच्यांत फरक इतकाच की काम संपले की ते तितक्याच वेगाने सुखोपभोगांत निमग्न होतात. आणि मजुराला ते मिळत नाही. यातील अन्यायाचा व अनीतीचा भाग काढून टाकून जो भोग शिल्लक राहील त्याची तपासणी केली तर असे दिसेल, की प्रत्येक समाजाने हेच ध्येय आपल्यापुढे ठेवले पाहिजे. गरजा वाढवून त्या पुरविणे यातच खरे मनुष्यत्व आहे. संयम हवा याबद्दल वादच नाही. पण संयमहीन भोग हा पश्चिमेकडे कोणीच कधी मान्य केलेला नाही. तसा तेथे चालू असलाच तर तो पूर्वेपेक्षा जास्त खास नाही. गरजा वाढवाव्या, भोगेच्छा वाढवाव्या व त्या पुऱ्या कराव्या हे गरजा मारण्यापेक्षा जास्त चांगले हे मात्र पश्चिमेने नवीन धोरण आखले आहे यात शंकाच नाही. पण ही उन्नती असून परागती मुळीच नाही. त्याग हे निराश वेदान्ताचे तत्त्व आहे. वर्धिष्णु, जयिष्णु राष्ट्राला किंवा व्यक्तीला ते सर्वथैव हानिकारक होय. आणि प्रत्येक राष्ट्राने वर्धिष्णु व्हावे असे आपले तत्त्वज्ञान असल्यामुळे त्याग ही कल्पना केव्हाच ग्राह्य नाही.
 असंतोषः श्रियो मूलम् । हे व्यासमहामुनीचे वचनच प्रत्येकाने ध्यानात धरणे अवश्य आहे. (येथे वापरलेल्या त्याग शब्दाचा स्वार्थत्यागाशी काही संबंध नाही. स्वार्थत्याग हा दुसऱ्यासाठी असतो. तो महासद्गुण आहे. त्याग म्हणजे स्वतःच्या गरजा उगीचच मारणे. तो महा दुर्गुण आहे) पाश्चात्यांच्या भोगवादाची टर करण्याची अलीकडे चाल पडू लागली आहे. त्यात, ते स्वार्थी असतात, विषयांध असतात, नीच असतात इत्यादी कल्पना उगीचच घुसडल्या जातात. त्या खोट्या आहेत. वेश्यामदिरा लांबच राहिल्या, पण सिगारेटही न ओढणारा हेन्री फोर्ड हा भोगवादी आहे. सर्व जगातील कामकऱ्यांच्या हितासाठी झटणारे लेनिन, स्टॉलिन हे पुरुष भोगवादी आहेत. हे ध्यानात घेतले तर भोगवाद म्हणजे काय हे ध्यानात येऊन पश्चिमेप्रमाणे पूर्वेलाही भोगवादाकडेच वळले पाहिजे हे ध्यानात येईल. पूर्वेला यात फारसे कष्टप्रद वाटण्याचे काही कारण नाही. कारण उपनिषदापूर्वीच्या वेदकाळी ती तशीच होती असे काही पंडितांचे म्हणणे आहे.
 यंत्रामुळे समृद्धी वाढली व समृद्धीमुळे भोगवाद निर्माण झाला हे तर खरेच आहे. पण तो बळावण्यास आणखीही एक कारण झालेले आहे. ज्या प्रयोग निष्ठेतून यंत्र निर्माण झाले तीतूनच जडवाद निर्माण झाला या जीवितापलीकडे काही नाही आणि असले तरी त्यामुळे येथील आचारविचारावर परिणाम व्हावा इतके त्याचे ज्ञान मानवास मुळीच नाही, हा सुविचार विज्ञानाच्या अभ्यासामुळे व प्रसारामुळे देशात रुजत गेला आणि त्यामुळेच त्यागवाद जाऊन तेथे भोगवाद आलेला आहे. गरजा मारणे, वासना खंडणे यांनी परमार्थ साधावयाचा असतो. तो परमार्थच नाहीसा झाल्यामुळे त्यागवाद अर्थातच लंगडा पडला. या संबंधाचे आणखी विवेचन 'राइट टु बी हॅपी' या सी. डोरा रसेल यांच्या पुस्तकांत सापडेल. एकोणिसाव्या शतकांत प्रबल असलेला जडवाद आता लोपत चालला आहे असे अनेक शास्त्रज्ञ सांगत आहेत. ३१ जुलैच्या 'केसरीत' ईश्वराबद्दल सात शास्त्रज्ञांची मते दिली आहेत. ते सर्वजण जडवादाच्या विरुद्ध आहेत. आणि जगाला हेतू असून त्याच्यामागे ईश्वर आहे असे ते सांगतात. पण त्यांचे मूळ लिखाण पाहिले तर असे दिसेल की पदार्थविज्ञान व रसायन यांनी सृष्टीचे संपूर्ण पृथक्करण करता येत नाही एवढेच त्यांनी सिद्ध केले आहे. काही एका मर्यादेपर्यंत मानव जाऊ शकतो. त्यापलीकडच्या सृष्टीत व्यक्त होणाऱ्या शक्ती त्याला अद्याप जाणता आलेल्या नाहीत व कदाचित् कधीच जाणता येणार नाहीत. शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे ते एवढेच. पण यावरून त्यागवाद किंवा भोगवाद यावर किंवा मानवाच्या कोणच्याही आचारविचारावर परिणाम होण्याइतके अजून काही सिद्ध झाले आहे असे मुळीच नाही. जडसृष्टीपलीकडे चेतनसृष्टी आहे असे ते म्हणतात. असेलही ! पण त्यावरून जगाला हेतू आहे किंवा त्याच्यामागे ईश्वर आहे असे म्हणता येणार नाही. मोठेमोठे शास्त्रज्ञ तसे म्हणत असल्यास तशी त्यांची श्रद्धा आहे इतकेच फार तर सिद्ध होईल. प्रयोग करून त्यांनी तसे मुळीच दाखविलेले नाही.
 जडसृष्टीपलीकडे काही तरी असले पाहिजे या शास्त्रज्ञांच्या तर्काच्या पुराव्यापेक्षाही एक जास्त प्रबळ व प्रत्यक्ष असा पुरावा अध्यात्मवादाला अलीकडे मिळू पहात आहे. त्याचाही थोडा विचार आपणास केला पाहिजे. पण अध्यात्मिक व आधिभौतिक या मोठ्या सदरातच त्याला घेऊन त्याचा विचार करणे जास्त युक्त आहे. तेव्हा पश्चिमेची व पूर्वेची भिन्न म्हणून जी संस्कृती सांगितली जाते तिचाच आता विचार करू.
 पूर्व व पश्चिम या दोन जगद्विभागांचा विचार करणाऱ्या लेखकांच्या बोलण्यात अध्यात्मिक व आधिभौतिक संस्कृती किंवा त्याहीपेक्षा जास्त स्पष्ट म्हणजे देवी आणि आसुरी संपत्ती हे शब्द नेहमी येत असतात. पूर्वेची संस्कृती अध्यात्मिक असून पश्चिमेची आधिभौतिक आहे व देवी आणि आसुरी अशी विशेषणे देण्याइतक्या त्या भिन्न आहेत असा या बोलण्याचा भावार्थ आहे. आणि पूर्व व पश्चिम यामधील हाच महत्वाचा फरक आहे असे सांगण्यात येते. तेव्हा या देवासुर संपत्तीचा प्रथम विचार केला पाहिजे.
 अध्यात्मिक संस्कृतीची मुख्य खूण म्हणजे मृत्यूनंतरचे अस्तित्व मानणे ही होय. अध्यात्मिक हे नांव आहे तेव्हा आत्मा मानणे या संस्कृतीत अवश्य आहे हे खरे. पण बौद्ध संस्कृतीत तो मुळीच मानीत नाहीत तरी अध्यात्मिक या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे त्यात ती येऊ शकते. मृत्यूनंतर, देहपातानंतर व्यक्तीचे जीवन तसेच पुढे सुसंगत रहाते की नाही हा प्रश्न केवळ बौद्धिक क्षेत्रातच असता तर त्यावर इतकी रणे कदाचित माजली नसती. पण मृत्यूनंतरचे अस्तित्व गृहीत धरून तेच मुख्य जीवन मानून त्या अन्वये येथले आचारविचार ठरविले पाहिजेत, असे नेहमी सांगितले जाते म्हणूनच या प्रश्नाला महत्त्व आले आहे.
 या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार 'आधिभौतिक शास्त्रांचे अधिकार' आणि 'संस्कृती व प्रगती' या दोन प्रकरणात आपण केला आहे. अध्यात्मिक जगताचे अस्तित्व जिच्या साह्याने आपण ठरवितो ती अंतर्दृष्टी किती पंगू आहे आणि मनुष्याची बुद्धी ही, तिला कितीही मर्यादा पडत असल्या तरी आहे या साधनांत कशी श्रेष्ठ आहे. ते तेथे दाखविलेच आहे. त्याचप्रमाणे कर्मवाद आणि मोक्ष या भ्रामक कल्पनांचीही चर्चा तेथे केली आहे. आता येथे त्याच बाबतीतल्या आणखी काही प्रमाणांचा व अध्यात्मिक संस्कृतीशी संबंध असलेल्या इतर काही गोष्टींचा विचार करावयाचा आहे.
 अलिकडे युरोपमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाचा बराच अभ्यास सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक संस्था स्थापन झाल्या आहेत. आणि सर ऑलिव्हर लॉज, कॉनन् डॉइल्, मायरस्; डॉ. व्हेरॉल यासारख्या थोर लोकांचा त्यावर पूर्णपणे विश्वास बसला असून इतरही अनेक पंडित त्या बाबतीत संशोधन करीत आहेत. मृतात्म्यांचे सदेश काही ठराविक व्यक्तींच्या मार्फत या जगात येऊ शकतात, कोणच्याही बाह्य साधनांवाचून व्यक्तीच्या मनातले विचार ओळखले जातात, इतकेच नव्हे तर मृत आत्म्यांचे आचारविचार समजणे शक्य झाले असून त्याचे फोटोही काढता येतात असे सध्या सांगितले जाते. या बाबतीत उलटसुलट अनेक ग्रंथ आहेत. आणि असे का व्हावे याच्या अनेक शास्त्रीय किंवा काल्पनिक उपपत्ती सांगितल्या जातात. जोसेफ मॅककेब् याने या सर्व कल्पनांची अगदीच टर केली आहे व या सर्वांच्या बुडाशी लुच्चेगिरीवाचून दुसरे काही नाही असे सांगितले आहे. पण इतका एकांतिक पक्ष टाकून देऊन सी. ई. एम्. जोड याने त्यांचा जरा सहानुभूतीने विचार केला आहे. व त्याने शेवटी असे म्हटले आहे की हे सर्व फसवेगिरीचे प्रकार आहेत असे जरी म्हणता येणार नाही तरी या क्षेत्रात येणाऱ्या सर्व अनुभवांचे स्पष्टीकरण करील अशी समाधानकारक एकही उपपत्ती अजून बसविता येत नाही. (गाइड टु मॉडर्न थॉट पृ. १७९) जोडचे हे म्हणणे सर्वांना मान्य येत नाही व मृत्यूनंतरचे जीवन, कोणच्याही स्वरूपात का होईना, आहे असे जरी त्यांनी मानले तरी एक गोष्ट अगदी निश्चित आहे की त्या जीवनाचे खरे स्वरूप, येथील पापपुण्याचा त्या जीवनावर होणारा परिणाम, किंवा त्या अव्यक्त जीवनानंतर पुन्हा प्राप्त होणारे व्यक्त जीवन याबद्दल अजून काहीही निश्चित झालेले नाही. आणि धर्मशास्त्र तर या कल्पना निश्चित धरूनच उभारलेले असते. तेव्हा आत्मा, परलोक, पुनर्जन्म इत्यादि आध्यात्मिक संस्कृतीचे जे मुख्य खांब त्यांना अजून शास्त्राचा यत्किंचितही आधार मिळाला आहे असे समजण्याचे मुळीच कारण नाही.
 पण हे तात्त्विक क्षेत्र सोडून दिले तरी या दोन संस्कृतीमध्ये आणखी काही महत्त्वाचे फरक आहेत असे मानण्यात येते. पाश्चात्य हे जडवादी व म्हणूनच अगदी राक्षसी व क्रूर आहेत, जेथे जातील तेथे मूळच्या लोकांचा सहार करतील व ते नच साधले तर अत्यंत अन्यायाने दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा, राज्याचा व वित्ताचा अपहार करून आपला तळिराम गार करतील असे आपल्याकडे त्यांने वर्णन करण्यात येते. अबिसिनिया इटालीने घेतला तरी इंग्लंड वगैरे युरोपी राष्ट्रे अबिसिनियाच्या मदतीस धावली नाहीत, याची कारणमीमांसा सांगताना पुण्याच्या एका म्हाताऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे की उदारता, दया ही बुद्धीच या जडवादी राष्ट्रात नाही. दुसऱ्याचा संहार झालेला पाहाण्यातच यांना आनंद होतो. आफ्रिकेची लूटमार करून मूळच्या मालकांना युरोपी लोकांनी नागविले व अडाणी निग्रोंना सुसंस्कृत केले नाही हे सांगून दुसऱ्या एकाने त्याच वर्तमानपत्रात युरोपी संस्कृती कशी राक्षसी आहे ते दाखविले आहे. डार्विनचे वगैरे उतारे देऊन कांही समाजशास्त्रज्ञही तसा प्रयत्न करीत आहेत.
 या न्यायदयावादी मंडळीनी युरोपवर हे आरोप करताना आर्यांचा जुना इतिहास विसरण्याची सोयीची पद्धत पाडली आहे. नाही तर स्वतःचा वेडगळपणा ध्यानात येण्यास त्यांना मुळीच उशीर लागला नसता. आफ्रिकेत शिरण्याचा इटलीला जर हक्क नाही तर हिंदुस्थानात येण्याचा आर्यांना काय हक्क होता ? येथे एक ठराविक पोपटी उत्तर देण्यात येते, की आर्यांनी हिंदुस्थान जिंकला हे खरे; पण मूळच्या लोकांना स्वधर्मात शूद्र म्हणून का होईना, त्यांनी जागा दिलीच आहे ! हे उत्तर मोठे मासलेवाईक आहे. दुसऱ्याच्या घरात शिरून त्यालाच चोर ठरवून वर घर झाडण्याचे हक्क त्याला दिल्याबद्दल टेंभा मिरवावयाचा अशापैकीच हे आहे. मालकाला मारून टाकला तर अगदी आसुरी कृत्य. मालकाला झाडू करून टाकला तर मात्र ते अगदी दैवीपणाचे लक्षण ! पण दैवीपणाचे लक्षण हेच असेल तर युरोपातले बहुतेक लोक दैवी संपत्तीनेच युक्त आहेत असे दिसेल. आर्यांनी अस्पृश्यांना ज्या सुखात ठेवले आहे, तितक्या सुखात अमेरिकेत सध्या निग्रो आहेतच. आफ्रिकेतल्या अनेक जातींचा संहार झाला असला तरी अस्पृश्यांइतक्या सुखात असलेल्या काही जाती अफ्रिकेतही सापडतील. आणि मुसोलिनी हबशी लोकांचा संहार न करता त्यांना झाडू इतपत मानाचे पद देऊन आर्यपणा करील याबद्दल मला तर शंकाच नाही. साम्राज्यविस्तार हे आसुरीपणाचे लक्षण धरले तरी तेथेही आर्यांची पंचाइतच आहे. कारण पूर्वी हिंदुस्थान सोडूनही ब्रह्मदेश, सयाम, अनाम, अफगाणिस्थान या देशात हिंदूंचे साम्राज्य होते असा पुरावा अलिकडे उपलब्ध होत आहे. पण अगदी संहार केला तरच आसुरी, त्याच्या अलिकडे काहीही केले तरी दैवी, अशी सोईची व्याख्या मान्य केली तरीही फारसे निभत नाही. कारण आपल्या पुराणांतील अतिशयोक्ती काढून टाकून अगदी अल्प हाती लागणारे सत्य जरी पाहिले तरी आर्यांनी येथील रानटांचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे संहार केला आहे, असेच दिसून येईल. आज मितीला अमेरिकेत रेड इंडियन लोकांची जी स्थिती आहे तीच येथे वन्य जातींची आहे. आफ्रिकेत जसा निग्रो, किंवा अमेरिकेत जसा रेड इंडियन तसाच येथील कातकरी किंवा संताळ हा मालक होता. पण आर्यानी त्याला आज गिरिकंदरात धाडले आहे. येथील लोकांचा पूर्ण संहार झाला नसेल तर तो आर्यांच्या शस्त्रास्त्रांचा दोष आहे. दयाशीलता, विश्वबंधुत्व वगैरे गुणांची ती महती नव्हे. माझ्या मते आर्यांनी केले हेच फार चांगले केले. आजचे दैवी आर्य विश्वबंधुत्व करून स्वतःच्याच घरात उपरे होऊन बसले आणि आम्ही पारशांना, मुसलमानांना जो कोणी येईल त्याला पोटात घेतले आहे म्हणून, त्यातच दळभद्री ऐट करीत आहोत. त्यापेक्षा साम्राज्य वाढविणारे, अक्षरशः पराक्रम करणारे ते आसुरी आर्य फार बरे असे वाटते. युरोपियांनी आफ्रिकेच्या मूळ रहिवाशांना सुसंस्कृत केले नाही म्हणून ते राक्षसी हाही मुद्दा उलटल्यास वरच्या इतक्याच गैरसोयीचा आहे. कारण, कृण्वन्तो विश्रमार्यम् । ही घोषणा करणाऱ्या आर्यांनी अस्पृश्यांना व येथल्या गोंडसंताळांना किती सुसंस्कृत केले, किंवा तेही सोडून चातुर्वण्यात घेतलेल्या शूद्रवर्गाला काय संस्कृती दिली हे प्रसिद्धच आहे.
 यावरून असे दिसेल की पूर्वेची संस्कृती दैवी आहे व पश्चिमेची आसुरी आहे या म्हणण्यांत काही अर्थ नाही. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या चारित्र्यात उदात्तता, स्वार्थत्याग, भूतदया, इत्यादि थोर सद्गुणांच्या ज्या परासीमा पूर्वेकडे दिसतात, त्या पश्चिमेकडेही तितक्याच उज्ज्वलपणे दिसतात. व लालसा, स्वार्थ, क्रूरता हे दुर्गुणही दोन्हीकडे सारखेच दिसतात. शस्त्रास्त्रांच्या प्रचंड शक्तीच्या शोधानंतर पूर्वेकडच्या लोकांच्या नशिबी जगद्विजय करण्याची पाळीच आली नाही म्हणून हा पोक्त उपदेश त्यांना सुचतो आहे इतकेच.
 प्रयोगनिष्ठा, बुद्धिवाद, समता, व्यक्तिस्वातंत्र्य ही पाश्वात्य संस्कृतीची आदिमहातत्त्वे आहेत यंत्र, जडवाद भोगवाद हा त्या तत्त्वांचा केवळ फुलोरा आहे. या तत्वांच्या आचरणाने पश्चिम आज दिग्विजयी झालेली दिसत आहे. पूर्वेकडचे जे देश तिला जिंकता आले नाहीत त्यांनी सर्वस्वी जरी नाही तरी अंशतः यांतील काही तत्त्वांचा आश्रय केला आहे आणि म्हणूनच त्यांना यश आले आहे हे आपणास स्पष्ट दिसत आहे. या वरील गोष्टी एकापुढे एक मांडल्या की यातून निर्णय काय निघतो, ते सांगावयास पाहिजे असे नाही. आपल्या प्राचीन वैभवाने पुन्हा जगात तळपावे ही पूर्वेला इच्छा असेल तर, तिचे सर्वस्वी पश्चिमीकरण होणे अवश्य आहे. मागल्या काळाकडे थोडी दृष्टी टाकली तर असे दिसेल की हे पश्चिमीकरण तिला अगदी जड जाईल असे नाही. कारण जडवाद व लोकशाही ही तत्त्वे, वगळली तर बाकीची तत्त्वे, अगदी बोजड, व प्राथमिक स्वरूपाने का होईना, नकळत का होईना, प्राचीन काळी हिंदुस्थानात माणसांनी आकलन करून थोडीबहुत आचरणातही आणली होती. त्याच तत्त्वांचा आता पश्चिमेकडे पूर्ण विकास झालेला आहे. तेव्हा नव्या व शास्त्रशुद्ध स्वरूपात पूर्वेने त्या तत्त्वांचा फिरून अधिकार करून आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करून घेण्याची ईर्षा बाळगली तर त्यात काही अश्लाघ्य किंवा अवमानाचे आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही.