विज्ञान-प्रणीत समाजरचना/अपत्य संगोपन व इतर काही प्रश्न

विकिस्रोत कडून

अपत्यसंगोपन व इतर काही प्रश्न.


 पहिल्या लेखात विवाहाच्या मूल हेतूंची चर्चा करून अनन्यनिष्ठेची मानवी मनाला असलेली पिपासा तृप्त करणं हे तिचे अंतिम ध्येय असे आपण ठरविले. नंतर ते धोरण डोळ्यापुढे ठेवून गृहसंस्थेचे नवे स्वरूप कसे असावयास पाहिजे याबद्दल चर्चा केली. आता गृहाच्या अंतर्गत व्यवस्थेशी सबंध असलेल्या काही प्रश्नांची चर्चा करावयाची आहे. या प्रश्नांतील पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अपत्यसंगोपन हा होय.
 फार पुरातन काळापासून समाजातील, बुद्धिजीवी वर्ग आणि बुद्धिजीवी नाही, पण सुखवस्तु आहे असा जो वर्ग, त्या वर्गातील लोकांच्या स्त्रिया चूल व मूल या उद्योगातच गढून गेलेल्या असत. शेतकरी, कोष्टी व इतर मेहनतीची कामे करणारे जे लोक त्यांच्या स्त्रियांना चूल व मूल संभाळून शिवाय नवऱ्याच्या उद्योगातही साहाय्य करणे भाग पडत असे. पण असे असले तरी शेती, वीणकाम ही कामे घराच्या आसपास असल्यामुळे व विशेषतः स्त्री त्यात बांधली जात नसल्यामुळे ती कामे अपत्यसंगोपनाच्या आड येत नसत. आणि त्यामुळे स्त्रीचा इतर उद्योग व अपत्यसंगोपन यात तेढ कधीच येत नसे. पण अलिकडे सुशिक्षित स्त्रियांत स्वातंत्र्य, समता या भावनांचा उदय झाला आणि काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचे स्वरूप बदलून गेले, आणि त्यामुळे अपत्य संगोपनाच्या बाबतीत नवीनच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 नव्या युगात सुशिक्षित स्त्रीला आपल्या व्यक्तित्वाची जाणीव झाल्यामुळे तिला आर्थिक स्वातंत्र्य हवेसे वाटू लागले. पण अपत्यसंगोपनाची जबाबदारी दिवसातून चोवीस तास सारखी अंगावर असल्यामुळे स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य आणि तिच्यावर निसर्गाने लादलेले अपत्यसंगोपन यामध्ये विरोध निर्माण झाला. तेव्हा दळणकांडण, शिवणटिपण, आणि पश्चिमेकडे तर स्वयंपाकही, ही कामे पुष्कळशी बाजारात होऊ लागल्यामुळे त्या कामातून स्त्री जशी मोकळी झाली, तशीच ती अपत्य संगोपनाच्या जबाबदारीतूनही मोकळी होऊ शकेल की काय, विज्ञानाला तिला त्यातून सोडवून पुरुषाशी सर्व दृष्टीने समभूमीवर आणून सोडणे शक्य होईल किंवा असे या प्रश्नांचा विचार नवे लोक करू लागले.
 अंगमेहनत करणाऱ्या स्त्रियांच्या संसारावरही नव्या परिस्थितीचा परिणाम झालेला आहे. एवढे खरे की त्यांची पूर्वीची स्थितीही मोठीशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या जीवनातील फरक वरच्या वर्गातील स्त्रीच्या जीवनात पडू पाहणाऱ्या फरकाइतका जाणवत नाही. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे या वर्गाची संस्कृती अगदी हीन असल्यामुळे निसर्गनियमाने प्रजा होणे व ती वाढणे या पलिकडे अपत्यांना काही धोरणाने हेतुपुरस्पर वाढविणे ही संगोपनाची कल्पना त्यांच्यात मुळातच नव्हती. आईला पोटासाठी कष्ट करणे प्राप्त असल्यामुळे अपत्याकडे सारा वेळ लक्ष देणे तिला पूर्वीही शक्य नव्हते. पण असे असले तरी, म्हणजे त्यांची स्थिती पूर्वीही अगदी असमाधानकारक होती हे खरे असले तरी हल्ली ती त्यापेक्षाही वाईट झाली आहे हेही खरेच आहे. कारण बाळंतपणाची वेळ अगदी जवळ आली म्हणजे जुन्या काळी, काम घरचेच असल्यामुळे, स्त्रीला थोडीतरी विश्रांती घेणे शक्य होते. तसेच मूल आजारी असले म्हणजे तिला घरी बसणे शक्य होते. आणि कोष्टी, विणकरी यांची पुष्कळशी कामे घराच्या आसपास असल्यामुळे मुलाकडे वरचेवर लक्ष देणे हेही तिला शक्य होते. पण अलिकडे गिरण्या व इतर कारखाने यांमध्ये स्त्री ही कामाला बांधली जात असल्यामुळे वर सांगितलेल्या अल्प सोयीही नष्ट झाल्या आहेत. आणि त्यामुळे अपत्यांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होत आहे.
 अशा तऱ्हेच्या अनेक अडचणींमुळे अपत्य- उत्पादनाचे नाही तरी निदान अपत्य संगोपनाचे काम स्त्रीकडून काढून घरातील इतर कामांप्रमाणेचं सामुदायिक पद्धतीने केले तर बरे असे काही विचारी लोकांना वाटू लागले.
 यातच आणखी काही तात्त्विक विचार करणाऱ्या लोकांच्या अनुकुलतेची भर पडली. सामान्यतः स्त्री ही अशिक्षित असते त्यामुळे व ती कितीही शिकली तरी त्याच विषयाला वाहून घेतलेल्या परिचारिकेइतकी ती निपुण होणे शक्य नसल्यामुळे अपत्य संगोपनाला आई ही लायकच नाही असे काही पंडित सांगू लागले. याशिवाय सामुदायिक पद्धतीचे इतर जे फायदे तेही प्रत्येक घरी मुले निरनिराळी वाढविल्याने मिळत नाहीत असे दिसू लागले. मुले एकत्र ठेवली म्हणजे अनेकांना मिळून एक डॉक्टर मिळू शकतो, खेळण्याची नाना तऱ्हेची साधने घेणे परवडते व इतरही आरोग्यकारक परिस्थितीचे फायदे मिळू शकतात प्रत्येकाची मुले निरनिराळी ठेवली तर हे कधीच शक्य नाही. याही दृष्टीने घरामध्ये मुले वाढविण्यापेक्षा त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्था काढूनच त्यांना वाढविणे बरे असे लोकांना वाटू लागले.
 अशा तऱ्हेचे विचारप्रवाह सुरू झाल्यावर त्याअन्वये तशी व्यवस्थाही काही ठिकाणी सुरू झाली. मातेला व अपत्याला मुद्दाम कायमचे वियुक्त करून अपत्याचे संगोपन करणाऱ्या संस्था फारशा निघाल्या नाहीत हे खरे ! पण मातेचा मृत्यू किंवा इतर काही पापमय कारणे यानी आपोआप मातेपासून तुटलेली जी बालके त्यांच्यासाठी संस्था स्थापन करण्यात आल्या व तेथे आपल्या अपत्य संगोपनाच्या नव्या कल्पना कितपत यशस्वी ठरतात याचा अनुभव त्या विचाराचे समाजसुधारक पाहू लागले.
 या संस्थांतील बालकांची स्थिती पाहून शास्त्रज्ञांनी जे अनुभव नमूद करून ठेवले आहेत, त्यावरून पाहाता अपत्याला आईपासून वियुक्त करून त्याचे स्वतंत्रपणे संगोपन करण्याची कल्पना ही अत्यंत हानिकारक असून अपत्याचे आरोग्य व मानसिक वाढ या दोन्ही दृष्टींनी ती अतिशय घातुक आहे असे आढळून आले आहे.
 अगदी एकदोन वर्षाच्या आतील लहान बालकांच्या आरोग्यापासूनच या प्रश्नाचा विचार करण्यास आपण सुरुवात करू.
 मुलाचे संगोपन आईकडूनच होण्यात मुख्य मुद्दा आईच्या अंगावरच्या दुधाचा असतो. आणि अनुभवाअंती असे आढळले आहे की आईच्या अंगावर न पिणाऱ्या मुलामध्ये अंगावर पिणाऱ्या मुलापेक्षा मृत्यूचे प्रमाण तिप्पट असते. बर्थ कंट्रोल अँड युजेनिक्स या निबंधात हॅवलॉक एलिस याने हे मत सांगितले आहे. वरचे दूध पिणाऱ्या मुलात मृत्यूचे प्रमाण जास्त असतेच; पण आईखेरीज इतर स्त्रीच्या अंगावरचे दूध पिणाऱ्या मुलातही मृत्यू जास्त होतो असे तो म्हणतो. मात्र हे प्रमाण त्या बाबतीत तिपटीवरून दुपटीवर येते, एवढीच बरी गोष्ट आहे. लिऑनस् येथील संस्थेवरील अधिकारी व्हिट्रे याचाही अनुभव असाच आहे. अंगावरचे दूध पिणारी मुले शे. १२ मेली तर वरचे दूध पिणारी शे. ३३ मरतात असे त्याने म्हटले आहे. (अपत्य संगोपनासंबधाची ही व पुढील माहिती आणि काही अवतरणे डॉ. वेस्टरमार्क यांच्या फ्यूचर ऑफ मॅरेज इन् वेस्टर्न सिव्हिलिझेशन या पुस्तकांतून घेतली आहेत. पृ. १५९ ते १६४) हे झाले आरोग्यासंबंधी. मुलांच्या मनाच्या विकासाच्या बाबतीतही शास्त्रज्ञांचे मत संस्थांतील संगोपनाला प्रतिकूलच आहे. अमेरिकेत १९३१ साली व्हाइट हाऊस कॉन्फरन्स ऑन चाइल्ड हेल्थ अँड प्रोटेक्शन या नांवाची एक परिषद भरली होती. तिच्यांतील शास्त्रज्ञानी असा अभिप्राय दिला आहे की अपत्यांच्या मनोविकासाला गृहातील जीवन अत्यंत अवश्य आहे. संस्थेतील जीवनात मनोविकास होणे शक्य नाही. फ्लॉइड डेल याने तर थोडे पुढे जाऊन असे सांगितले आहे की, संस्थेतील मुले अगदी हीन, दुर्बल व तेजोहीन अशी होतात. असा अनुभव आल्यामुळे अमेरिकेतील डॉक्टरांनी एक नवीन पद्धत सुरू केली. अनेक कारणाने अपत्यहीन असलेल्या स्त्रियांची संख्या अमेरिकेत बरीच मोठी आहे. अशा स्त्रियांना अपत्याची हौस अनिवार असते. तेव्हा हे लक्षात घेऊन या डॉक्टरांनी अशा स्त्रियांना सस्थेतील मुले कायमची दत्तक देण्याची पद्धत सुरू केली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की संस्थेतील वैद्यकीय मदत, निष्णात दायाची शुश्रूषा, शास्त्रीय पद्धतीची उपकरणी व खेळ यापैकी कांहीही या दूधघरामध्ये (Foster Homes) नसूनही तेथे या बालकांची वाढ पुष्कळच चांगल्या प्रकारे होऊ लागली.
 या मुद्याला वरवर दिसते त्यापेक्षा फारच विलक्षण महत्त्व आहे. संस्थेपेक्षा आईजवळ मूल चांगले वाढावे हे सयुक्तिक दिसते. कारण तेथे अंगावरचे दूध आणि खरी ममता यांचा प्रश्न असतो. पण खरी आई सोडली तर इतर कोणाही व्यक्तीपेक्षां सर्व साधनांनी सिद्ध अशी संस्था श्रेष्ठ ठरेल असेच कोणालाही वाटेल. पण तसे न होता संस्थेपेक्षा दूधघर व दूधबाई (Foster Mother) हीच श्रेष्ठ ठरतात असे का हावे ?
 पती आणि पत्नी यांच्या बाबतीत अनन्यनिष्ठेचे जे तत्त्व सांगितले, तेच येथेही लागू पडते, असे थोड्या विचाराअंती ध्यानात येईल. युरोपातील इस्पितळांतील दाया अलीकडे पुष्कळच चांगल्या असतात. भाडोत्रीपणा त्यांच्यांत मुळीच नसतो. तरी पण अनेक मुले एकीच्या ताब्यात असल्यामुळे आणि तीही वरचेवर बदलत असल्यामुळे सर्वस्वी एकटीच्या स्वाधीन केलेल्या बालकावर स्त्री जसे वात्सल्य ओतू शकेल तसे दाईला कालत्रयीही शक्य नाही. हे मूल कायमचे आपले आहे व दुसऱ्या कोणाचे नाही व पुढेही होणार नाही ह्या कल्पनेत काही निराळाच रस आहे. आणि त्याच्या बळावरच अहोरात्र कष्ट करून या रोपट्याला वाढविण्याची शक्ती स्त्रीच्या अंगी येत असते. आणि सर्व साधनांनी युक्त अशा संस्थेपेक्षा सामान्य घरांत, मानलेल्या आईजवळही मुले चांगली वाढतात, या अनुभवावरून मोठ्या वयात जाणतेपणी जी अनन्य निष्ठेची भूक व्यक्तीला असते, तीच लहान वयात नेणतेपणी का होईना, पण बालकालाही असते असे म्हणावे लागते. आज, उद्या आणि पुढे अनंत काळपर्यंत हे बालक आपले आहे ही जाणीव, हे समाधान स्त्रीला असल्यामुळे ती त्याची अनन्यभावनेने जोपासना करते. आणि आरोग्याच्या साधनापेक्षा त्या बालकाला या अनन्य प्रेमाचीच अपेक्षा जास्त असल्यामुळे त्याच्या मनाची व त्याचमुळे शरीराचीही वाढ तेथेच चांगली होते.
 गृहसंस्थेत आमूलाग्र क्रान्ती करून टाकणाऱ्या रशियातही अपत्य संगोपनाच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. बालके व माता यांच्या संरक्षणासाठी रशियांत जे स्वतंत्र सरकारी खाते आहे त्यावरील मुख्य अधिकारी डॉ. लिबिदेवा यांनी अगदी निःसंदिग्ध भाषेत आपले मत दिले आहे. त्या म्हणतात, सध्या तरी आमच्या सरकारी संस्थापेक्षा गृहामध्येच अपत्ये चांगली वाढतात. मानसिक व शारीरिक अशा दोन्ही दृष्टीने आमच्या संस्थांतील बालके गृहांतील बालकांपेक्षा दुबळी असतात, असे प्रत्येक ठिकाणी आढळून आले आहे.
 याचा अर्थ हाच की भिन्नतेची व तज्जन्य उत्कट प्रेमाची मानवी मनाला फार आवश्यकता आहे. त्याच्या अभावी मानवाचे शरीरबळ, मानसिक बळ व कर्तृत्व सर्वस्वी नष्ट होईल; आणि हे ध्यानांत घेतले तर अपत्य संगोपनाच्या जबाबदारीतून स्त्री कधीही मोकळी होणे शक्य नाही, असे दिसेल.
 पण या बाबतीत असे बजावून लिहिण्याची जरूरच नाही. कारण अपत्यसंगोपन ही जशी जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे ते एक फार श्रेष्ठ प्रकारचे सुखही आहे, आणि ते स्त्रीला आहे एवढेच नसून पुरुषालाही आहे. तेव्हा या जबाबदारीतून स्त्री मोकळी होणार नाही असे म्हणण्यापेक्षा, राष्ट्रीय भावनांचे संस्कार, आरोग्य, मानसिक वाढ इत्यादी हेतुसाठीही अपत्ये आईपासून दूर करून शास्त्रज्ञ तिचे सुख हिरावून घेऊ शकणार नाहीत, असेच म्हणणे अनेक स्त्रियांना पसंत पडेल.
 पण मग स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न कसा सोडवावयाचा असा पेच येऊन पडतो. स्त्रीच्या किंवा कोणाच्याही व्यक्तित्वाच्या विकासाला आर्थिक स्वातंत्र्याची अत्यंत आवश्यकता आहे. चाळीसपन्नास रुपयेच का असेनात, पण ते माझे स्वतःचे आहेत व त्यांच्या जोरावर जगात मी स्वतंत्रपणे राहू शकेन, या जाणिवेची पुरुषी मनाच्या विकासाला जशी आवश्यकता असते अशीच स्त्रीच्या मनालाही असते. माझी मी स्वतंत्र आहे ही भावना कर्तृत्वाच्या उदयाला अत्यंत अवश्य आहे. मला तर असे वाटते की आजपर्यंत स्त्रीला मानवी संस्कृतीच्या कोणच्याही अंगात विशेष कर्तृत्व जे कधीच दाखविता आले नाही, त्याचे कारण हेच असावे. विज्ञान, वाङमय, कला, राजकारण, इत्यादी बाबतीत शरीरसामर्थ्याची अपेक्षा नसूनही स्त्रिया उच्च पदाला कधीच फारशा गेल्या नाहीत. चूल आणि मूल या उद्योगाने त्यांना इकडे लक्ष देण्यास वेळ होत नाही, हे एक कारण आहे. पण ते तितकेसे विचारांत घेण्याजोगे नाही. कारण दिवसांतून पंधरापधरा ताससुद्धा पोटासाठी काम करणाऱ्या वर्गातून अनेक थोर पुरुष उदयाला आले आहेत. शिवाय ज्याच्या स्त्रियांना चूल व मूल हे उद्योग पुष्कळ अशी नोकरांवर सोपविता येतील, असा वर्ग प्रत्येक समाजात असतोच. त्यांच्या स्त्रियांनीही म्हणण्यासारखे पुरुषी तोलाचे कर्तृत्व फारसे दाखविलेले नाही. तेव्हा वेळाचा अभाव हे तितकेसे निर्णायक कारण होऊ शकणार नाही. क्षणाक्षणाला प्रत्येक बाबतीत प्रत्यक्ष भासमान होणाऱ्या परीधीनपणामुळे स्त्रीच्या मनाची वाढच होणे शक्य झाले नाही. हे ते कारण असावे असे वाटते. नवनिर्मितीची प्रतिभा (Originality) स्त्रीच्या मनाला मुळीच नाही, असे अनफेअर सेक्स या पुस्तकांत व्हाइट हेडने म्हटले आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासावरून ते खरे आहे असे दिसते. पण आतापर्यंत तिच्यावर लादली गेलेली मानसिक गुलामगिरी हे त्यास कारण असावे असे वाटते. इंग्रजी अमदानीपूर्वीचा हिंदुस्थानचा एक हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर स्वतंत्रपणे अभिजात नवी कृती करणारे पुरुष किती सापडतील? ज्ञानेश्वर, भास्कराचार्य, एकनाथ, शिवाजी, रामदास ! संपली यादी, कला, विद्या, वाङ्मय, राजकारण, वैदिक संशोधन, शास्त्रीय संशोधन, नवीन सामाजिक विचार, या क्षेत्रात अत्यंत अल्प का होईना पण काही तरी नवीन कल्पना किंवा विचार काढणारे रीत दाखविणारे लोक तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही झाले नाहीत. याचे कारण हेच की वेदान्त, श्रुति, स्मृति यांच्या एका विशिष्ट पन्हळीतूनच त्यांचे मन वहात होते. आणि वाटेल त्या पन्हळीतून वहावयास मोकळीक असल्यावाचून नवीन कल्पना सुचणे अशक्य आहे. तीच गोष्ट स्त्रीच्या बाबतीत झाली असावी. पूर्ण स्वातंत्र्यावाचून मनाचा विकास नाही आणि तो नसेल तर नाविन्य, प्रतिभा ही अशक्य आहेत युरोपच्या इतिहासात असेच दिसते. खिस्ती धर्माची भयंकर शब्दनिष्ठा जसजशी कमी होऊ लागली, तसतसे शास्त्रज्ञ निर्माण होऊ लागले. हा नियम गणितांतील नियमाइतका जरी खरा नसला, आणि गुलामी परिस्थितीही स्वतंत्र विचाराचे लोक निर्माण झाल्याची काही उदाहरणे असली, तरी नवनिर्मितीला बुद्धि योग्य होण्यास मनाच्या स्वातंत्र्याची जरूर आहे. हे फारसे विवाद्य असे वाटत नाही.
 पण स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या आड चूल आणि मूल या दोन गोष्टी येतात त्यामुळे तो प्रश्न मोठा बिकट होऊन बसला आहे. पैकी चुलीचा प्रश्न सहज सोडविता येण्याजोगा आहे आणि युरोपातील राष्ट्रांनी तो बहुतेक व रशियाने तो पूर्णपणे सोडविलाही आहे. शिजलेले उत्तम अन्न बाजारात ठेवणे हे काही शक्यतेच्या पलीकडे नाही विज्ञानाच्या मदतीने वाटेल तितके अन्न अशा रीतीने बाजारात आणता येईल. आणि ते अन्न घरी आणून नेहमीप्रमाणेच जेवणे केली तर कुटुंबसुखांत कोणताही बिघाड होण्याचे मुळीच कारण नाही. सर्वानी मिळून एकत्र जेवणे याला किंमत आहे. याने सुख खास वाढते. पण अन्न स्वच्छ असल्यानंतर त्याचे शिजवणही घरात झाले असले पाहिजे या विचाराला तितकीशी किंमत नाही.
 पण अपत्याचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर अन्न खानावळीत शिजवावे या व्यवस्थेला स्त्री कबूल होईल. पण अपत्याचे तसे नाही. आपल्याला अपत्य असावे, ही जबर वासना स्त्रीला असते आणि त्याचे संगोपन करावे यांत तिला पराकष्ठेचे सुख असते. आणि अपदृष्टीनेही तेच इष्ट आहे. पण अपत्य आणि अर्थिक स्वातंत्र्य यांचा सध्याच्या समाजव्यवस्थेत तर फारच विरोध आहे. बाळंतपणाच्या आधी व मागून काही महिने स्त्रीला पूर्ण विश्रांतीची जरूर असते. आणि नोकरी किंवा दुसरे कोणचेही स्वतःच्या अंगावर घेतलेले काम करूनही विश्रांती घेणे तिला शक्य नाही. त्याचप्रमाणे अर्थार्जनासाठी दिवसातून ७|८ तास तरी तिला पूर्ण मोकळीक असली पाहिजे. अपत्यसंगोपन अंगावर घेतल्यावर स्त्रीला ती मिळणे शक्य नाही. आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विवाह झाल्यानंतर स्त्रीला अर्थार्जन केवळ अशक्य होऊन बसले आहे. युरोप अमेरिकेतही विवाहानंतर द्रव्यार्जन करणाऱ्या स्त्रिया फारच थोड्या असतात.
 स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य व अपत्यसंगोपन यातील ही तेढ सोडविण्यास अनेकांना अनेक उपाय सुचविले आहेत. कोणी म्हणतात की अपत्याचे उत्पादन व संगोपन हे एक सामाजिक कार्यच समजावे व इतर कामासाठी जसे व्यक्तीला आपण वेतन देतो, तसे या कामासाठी द्यावे. पतीच्या प्राप्तीपैकी काही भागावर स्त्रीचा कायद्याने हक्क ठेवावा असे काही म्हणतात. पण रशियाने या बाबतीत फार सुरेख व्यवस्था केली आहे. स्त्री कोणत्याही ठिकाणी कामावर असली तरी तिला बाळंतपणाच्या आधी व मागून दोन- दोन महिने भरपगारी रजा मिळावी, असा तेथे कायदा आहे. या कायद्याने त्या दिवसांतही काम केल्यामुळे गर्भावर होणारे वाईट परिणाम टळले. क्रेश या संस्था स्थापून सरकारने दुसरीही अडचण नाहीशी केली आहे. क्रेश या बालकांच्या संस्था असून तेथे दिवसांतून ७|८ तास मुले संभाळण्याची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक कारखान्याशेजारी अशा संस्था असून त्या मुलांना पाजण्यासाठी दर तीन तासांनी आयांना अर्धा तास सुट्टी मिळण्याची सोय असते. या व्यवस्थेमुळे स्त्रीच्या मार्गातल्या सर्व अडचणी नाहीशा झाल्या असून तिला आर्थिक स्वातंत्र्य व अपत्यवात्सल्य ही दोन्ही सुखे मिळविणे सुलभ झाले आहे शिवाय मातेपासून बालक कायमचे वियुक्त करण्यात जे तोटे असतात तेही येथे नाहीत. उलट पाचसहा तास मूल निराळे झाले तर बरेच असते. आणि मुलालाही आरोग्याची तपासणी, समवयस्क मुलाची संगत, खेळण्याचे अनेकविध प्रकार हे मिळून पुन्हा घरही मिळते. म्हणजे त्या दृष्टीनेही ही व्यवस्था उत्तम आहे.
 रशियांतील ही व्यवस्था उत्तम आहे हे खरे; पण त्याबरोबरच असे लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत ही व्यवस्था समाजाने केली नाही, तोपर्यंत विवाहित स्त्रीने द्रव्यार्जनाच्या फंदात पडणे सर्वस्वी घातुक ठरेल. दुर्दैवाने ज्या हजारो स्त्रियांना ही दुहेरी जबाबदारी संभाळणे भाग आहे, त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय झालेली आपण पाहातोच. तेव्हा ज्यांना द्रव्यार्जन न करूनही भागण्याजोगे आहे. त्यांनी ते करू नये, हेच त्यांच्या व अपत्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने युक्त आहे
 प्रत्येक दंपतीला किती अपत्ये असावी ह्या प्रश्नालाही कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. पंधरा ते पंचेचाळीस या वयात जितकी अपत्ये होणे शक्य आहेत तितकी होऊ द्यावी, हा 'नैसर्गिक निवड' या पक्षाचा आग्रह कसा घातुक आहे हे मागे लोकसंख्येचा वाढीचा व नियमनाचा विचार केला तेव्हा दाखविलेच आहे. आहे हीच लोकसंख्या टिकवून धरण्यासाठी (कित्येक देशात तीही जरूर नाही.) प्रत्येक दंपतीला दोन तरी अपत्ये असणे अवश्य आहे. ही दोन्ही तारुण्यात येऊन स्वतः दोन अपत्ये निर्माण करीपर्यंत जगतीलच अशी खात्री नसल्यामुळे आणखी अपत्ये होणे इष्ट आहे या सर्वांचा हिशेब करून प्रत्येक दंपतीला चार तरी अपत्ये असावीत असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. ग्रोटजेन या जर्मन अभ्यासकाने चालू लोकसंख्या टिकवून धरण्यास सरासरी ३.८ अपत्ये कुटुंबामागे असावीत असे म्हटले आहे. पण संख्या फार मोठी आहे, वास्तविक २.५ च्या वर सरासरी आकडा असण्याची जरूर नाही, असे हॅवलॉक एलिसने आपले मत दिले आहे. (व्हिदर मनकाइंड पृ. २२३)
 प्रत्येक दंपतीला सरासरी चार अपत्ये असावी असे लिओनार्ड डार्विनने मत आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करून चार ते पाच मुले असावीत असे मॅक्डुगलने मत दिले आहे. त्याच्या मताने अशी थोड्या थोड्या वयाच्या अंतराची मुले एकाच घरात असल्याने बालकांच्या मनाची वाढ होण्यास फार सुकर होते हे आणि मागे सांगितलेले विचार घ्यानांत घेतले तर चार-पाच मुलांपलीकडे जास्त मुले होणे इष्ट नाही, हे ध्यानात येईल. मुलांचे आरोग्य व आईचे सुख या दोन्ही दृष्टीने हीच मर्यादा चांगली आहे. आणि हे मान्य केल्यास संततिनियमनाचे व अपत्यसंगोपनाचे शिक्षण प्रत्येक स्त्रीला देणे अत्यंत अवश्य आहे हे मान्य करणे ओघानेच प्राप्त होते.
 विवाहसंस्थेच्या मूलतत्त्वांचा व वैवाहिक जीवनाचा इतक्या अनेक अंगांनी विचार केल्यानंतर सध्या आपल्या समाजांत विवाहाच्या बाबतीत प्रचलित असलेल्या एका महत्त्वाच्या रूढीचा विचार करणं अस्थानी होणार नाही. सगोत्रविवाहनिषेध ही ती रूढी होय.
 आज दोन हजार वर्षे दिदु समाजाने सगोत्रविवाह हा अत्यंत निषिद्ध मानलेला आहे. असा विवाह केला तर ती स्त्री चांडाळी व तिचा पुत्र हा चांडाळ होतो असा काही स्मृतिकारांचा अभिप्राय आहे. सगोत्र स्त्रीशी विवाह करणे हे गुरुतल्पंगमनाइतकं नीचपणाचे कृत्य आहे असे धर्मपंडितांचे सांगणे आहे. तेव्हा ते खरे आहे किंवा काय याचा आपणास विचार केला पाहिजे.
 सगोत्र विवाह करू नये असे म्हणणाराचे मत पुढीलप्रमाणे आहे. क ख ह्या दोन व्यक्तींचे गोत्र एकच (उदा. शांडिल्य) आहे असे समजू. आता शास्त्रकारांच्या मते याचा अर्थ असा आहे की या दोन व्यक्तींची कुले सध्या एकमेकांस कितीही अपरिचित व कितीही दूरची अशी असली तरी त्या दोन व्यक्तींचे लांबचे पूर्वज एकाच कुळात जन्मलेले असले पाहिजेत. गोत्र शांडिल्य आहे, याचा अर्थच हा की शांडिल्य हा त्या दोघांचा एकच पूर्वज होता. आणि ज्या दोन व्यक्तींचे पूर्वज एक आहेत त्यांनी आपापसांत रक्तसंबंध करणे, हे प्रजेच्या दृष्टीने अगदी घातुक आहे.
 सगोत्राप्रमाणेच आणखीही काही गोत्रांचे आपापसातले विवाह निषिद्ध मानलेले आहेत. जामदग्रंथ व वत्स, बाभ्रक आणि कौशिक, वासिष्ठ आणि कौंडिण्य इत्यादी जोड्या प्रसिद्धच आहेत. (कौशिक गोत्री यांनी कौशिक गोत्रियांशी लग्न नाहीच करावयाचे. पण बाभ्रक गोत्रियाशीही करावयाचे नाही. या दोन गोत्रांचे आपापसांत जमत नाही असे व्यवहारांत म्हणतात. सगोत्र विवाहाच्या निषेधाला जे कारण आहे तेच कारण येथे आहे.) ज्या दोन गोत्रांचे जमत नाही, असे सांगितलेले असते त्या दोन्ही गोत्रांचे प्रवर एक असतात. तीन प्रवरांपैकी निदान एक तरी प्रवर सारखा असतो. आणि प्रवर याचा रूढ अर्थ ह्या कुळांतील पूर्वज असा असल्यामुळे जी सगोत्राची अडचण तीच सप्रवरांना येते.
 सगोत्राप्रमाणेच सपिंडविवाहाचाही शास्त्रकार निषेध करतात. बापाकडून सात पिढया व आईकडून पाच पिढ्या जे सपिंड असतील, त्याचे आपापसात विवाह होऊ नयेत असे शास्त्र आहे. मेहेंदळे व मराठे ही दोन उदाहरणे घेऊ. मेहेंदळे यांचे गोत्र विष्णुवर्धन व मराठे यांचे कपि. यांनी आपापसात लग्न करण्यास मुळीच हरकत नाही. मराठे कुळांत आलेल्या मेहेंदळ्यांच्या मुलीला जो मुलगा होईल तो अर्थातच कपिगोत्री होणार. त्या मुलीच्या भावाला झालेल्या मुलीचे गात्र विष्णुवर्धनच राहणार. पण असे जरी निराळे असले तरी त मुलगी या मुलाला सपिंड होते, म्हणून तिच्याशी लग्न करणे शास्त्रकारांच्या मते युक्त नाही.
 सगोत्र, प्रवर व सपिंडविवाहनिषेधाच्या अशा मर्यादा आहेत. यांतील पहिले दोन निषेध कडकपणे पाळले जातात. तिसर ब्राह्मणांच्याही सर्व पोटजातीत पाळला जात नाही मामे बहिणीशी लग्न करणाऱ्या ब्राह्मणांतही पुष्कळ पोटजाती आहेत.
 मगोत्र, सप्रवर व सपिंड विवाहाचा हा जो निषेध सांगितला आहे, याच्या बुडाशी पुढील तीन कल्पना गृहीत धरलेल्या आहेत.
 (१) गोत्राचे नाव हे रक्तसंबंधामुळेच मिळालेले नाव आहे.
 (२) प्रत्येक कुलाचे जे प्रवर सांगितलेले आहेत, ते त्या कुळांतील पूर्वजच होत; आणि
 (३) कितीही पूर्वीच्या काळी दोन व्यक्तीचे पूर्वज एक होते, असे ठरले तर ह्यांचा विवाह होणे प्रजेच्या दृष्टीने घातुक आहे.
 ऐतिहासिक आणि शास्त्रीय पद्धतीने या गृहीत गोष्टींचा विचार केला तर असे दिसून येईल की या तीनही असिद्ध आहेत आणि त्यामुळे वरील निषेध मानण्याचे यापुढे मुळीच कारण नाही.
 हिंदू एक्झोगॅमी या आपल्या ग्रंथात रा. करंदीकर यांनी फार बारकाईने या प्रश्नांचा विचार केला आहे. व त्यांनी केलेले विवेचन इतके पूर्ण व निःसंदेह आहे की कोणाही विचारी माणसाला ते पटण्यासारखे आहे. म्हणून त्याचाच येथे थोडक्यांत अनुवाद करतो.
 वेदकाळी सगोत्र विवाहाचा निषेध मुळीच नव्हता. गोत्रे व प्रवर हीच त्या काळी निश्चित झाली नव्हती. ती प्रथम ब्राह्मणकाळी झाली. समाज लहान असतो. तेव्हा व्यक्तीचे एकच नाव उल्लेखास पुरेसे असते. पण समाज मोठा होऊन व्यवहार वाढला म्हणजे निश्चितीसाठी कुलनामे देण्याची चाल पडते. तेच ब्राह्मणकाळी होऊन गोत्रनामे निर्माण झाली. गोत्र ही आडनावाप्रमाणेच असून आडनावाप्रमाणेच तीही निवासस्थान धंदा अध्ययन पद्धत, शाखा, धार्मिक मते, काही विशेष कर्तबगारी यावरून प्राप्त झालेली आहेत. बौधायनाच्या मताप्रमाणे पहिल्याने लक्षवधि गोत्रे होती. त्यांचे निरनिराळे गट पुढे करण्यात आले, त्यांनाच गण म्हणतात. गांधार, खांडव, गोदायन, सैंधव, पांचाल इत्यादि नांवे ही देशावरून पडलेली आहेत हे स्पष्ट दिसतेच आहे. फडणीस, जोशी, कुळकर्णी, पुणेकर, मिरजकर ही नावे धंदा किंवा रहाण्याची जागा यांवरून पडलेली आहेत. आणि म्हणून फडणीस असेच गांव दोन्ही कुळांचे असले तरी त्यांचा रक्तसंबंध असेल असे आपण मानीत नाही. पुष्कळ ठिकाणी तर त्या व्यक्ती भिन्न जातीच्याही असतात. गोत्रांची स्थिती तीच आहे.
 प्रवर म्हणजे त्या कुलांतील पूर्वज ही कल्पना चूक आहे. जे प्रवर आपल्या पठणात असतात ते पिता, पुत्र व नातू यांची नामे दर्शवितात असा समज आहे. असे समजल्याने अनेक घोटाळे होतात. कुंडिण गोत्राचे प्रवर वसिष्ठ, मित्रावरुण, व कुंडिण असे आहेत. यातील मित्रावरुण हा जुन्या वाङ्मयाच्या आधारानेच वसिष्टाच्यां पूर्वकालचा आहे. तेव्हां तो त्याचा मुलगा होऊ शकणार नाही. भारद्वाज गोत्राचे प्रवर भारद्वाज, बृहस्पति व आंगिरस. यांतील बृहस्पति व आंगिरसहे पितापुत्र नसून भाऊ होते, असे ऐतरेय ब्राह्मणांत म्हटले आहे. एका गौतम गणांत उच्यव्य, वामदेव, राहुगण व बृहदुक्थ अशा चार शाखा आहेत. या चारही गोत्रांचा पहिला प्रवर आंगिरस आहे. दुसऱ्या प्रवराच्या ठायी ते गोत्रानामच आहे. म्हणजे एकाचा उच्यथ, दुसऱ्याचा वामदेव वगैरे. आणि मौजेची गोष्ट अशी की या सर्वांचा तिसरा प्रवर पुन्हा एकच म्हणजे गौतम आहे. चौघाचा पूर्वज किंवा पिता एकच असणे यांत कांही विचित्र नाही. पण चौघांचा मुलगाही एकच होता असे कोणी सागू लागल्यास ते नव्या विचाराच्या माणसाला तरी निदान मान्य होणार नाही.
 यावरून असे दिसेल की प्रवर आणि गोत्र यांनी रक्तसंबंध दर्शविला जातो हे खोटे आहे. प्रवर हे कुलातील पूर्वच नसून भिन्नभित्र वैदिक शाखांचे अध्वर्यू होते असे मानण्यास पुष्कळच पुरावा आहे. यज्ञाच्या वेळी यजमान जे प्रवर म्हणत असे ते त्याच्या विद्येच्या शास्त्रांतील गुरूचे दर्शक समजले पाहिजेत. त्याचे पूर्वज समजण्यामध्ये अनेक अडचणी येतात. शिवाय पूर्वी गोत्रे बदलता येत असत असाही पुरावा मिळतो. शुनःशेप हा आंगिरस गणातून विश्वामित्र गणांत गेला असा उल्लेख आहे. भारद्वाजाच्या वंशज शौनहोत्र हा भृगुकुळांत गेला व त्याने गृत्समदाने रचलेल्या ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात आणखी एक सूक्ताची भर घातली व आपले नावही बदलून शौनक हे नाव धारण केले अशी कथा आहे.
 मुलगा दत्तक गेला म्हणजे त्याच्या गोत्राबद्दल जे नियम पाळावयाचे असतात ते पाहिले तर प्रवर रक्तसंबंधाचे नसून विद्येसंबंधाचे होते असेच दिसते. चौल व्हायच्या आधी दत्तक दिल्यास मूळ कुळांतले गोत्र अजिबात जाते. चौल झाल्यावर दिला तर दत्तकाच्या स्वतःच्या बाबतीत संबंध करताना जुने व नवे गोत्र पहावे लागते. आणि मुंज झाल्यावर दिला तर मात्र पुढील पिढ्यांनाही दोन्ही गोत्राचा विचार करावा लागतो. यावरूनही प्रवरांच्या बुडाशी रक्ताचा विचार नसून वेदांतील पंथ, विद्येची शाखा यांचा विचार होता असे दिसते. कारण तीनही स्थितीत मुलाचे रक्त तेच आहे. मुंज झाल्यावर गुरु मात्र बदलतो.
 क्षत्रिय, वैश्य वगैरे जातीतील गोत्रे कुलगुरूची गोत्रे आहेत हे कित्येक ठिकाणी अगदीच स्पष्टपणे दिसून येते. तेव्हा तेथे गोत्र रक्तसंबंध दाखविते हे म्हणणेच शक्य नाही.
 सगोत्र विवाहासंबंधीची आरंभीच्या शास्त्रकारांची वृत्ती पाहिली तर त्यांना यात काही भयंकर वाटत होते असे दिसत नाही. सूत्रकाळी चांद्रायण किंवा कृच्छ् प्रायश्चित्त केले की सगोत्र विवाहाचा दोष जात असे. मनूने सगोत्र विवाह नसावा असे सांगितले असले तरी तो करणारास नुसते प्रायश्चित्तही त्याने सांगितलेले नाही. याज्ञवल्क्य, नारद, पराशर, बृहस्पति या स्मृतिकारांच्या मते सगोत्र विवाह फार वाईट आहे. पण तज्जन्य पुत्र ते त्याज्य मानीत नाहीत. यम, बृहद्यम, व्यास, हे उत्तरकालीन स्मृतिकार मात्र त्या स्त्रीला चांडाळी व पुत्राला चांडाळ समजतात. टीकाग्रंथ व निबंधग्रंथ हे तर या विवाहाला वाटेल त्या शिव्या देतात. पण मौजेची गोष्ट अशी की पूर्वीच्यांनी इतके कडक धोरण ठेवलेले नसताना आपण का ठेवतो, हे त्यांनी मुळीच सांगितलेले नाही. पण या वाढत चाललेल्या कडकपणावरून एवढे अनुमान करण्यास हरकत नाही, की गोत्रप्रवरांची वस्तुस्थिती पुसट का होईना, पण ज्यांच्या डोळ्यापुढे होती त्यांना सगोत्रविवाह इतक भयंकर वाटत नसे.
 पूर्वीच्या संस्कृत शास्त्रगंथांचा परामर्ष घेऊन हा विचार केला. यावरून एवढे स्पष्ट दिसते सगोत्र किंवा सप्रवर कुलांत पूर्वी कधी तरी समानपूर्वज असला पाहिजे ही कल्पनाच मुळात भ्रामक आहे. आणि मग ज्या कारणासाठी सगोत्र विवाह त्याज्य मानले होते, ते कारणच खरे नाही असे ठरल्याने ती त्याज्यताही नाहीशी झाली पाहिजे हे अगदी उघडच आहे.
 पण करंदीकरांचे हे संशोधन मान्य न करणारे काही पंडित असू शकतील. त्यांनी थोड्या नव्या दृष्टीने विचार केला तर त्यांनाही सगोत्र विवाह हा निषिद्ध मानण्यास मुळीच कारण नाही हे ध्यानात येईल.)
 गेल्या शंभर वर्षात जीवनशास्त्रांत या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे. त्या शास्त्रांचे या बाबतीत आजचे मत पुढीलप्रमाणे आहे.
 व्यक्तीमध्ये काही गुण असतात काही दोष असतात. अगदी जवळच्या रक्तांत जर विवाह झाला, तर अंगी जे गुण असतील ते जास्त उत्कटत्वाने प्रकट होतात. हा फायदाच आहे पण गुणांप्रमाणेच दोषही प्रबळ होतात हा तोटा आहे. आणि साधारणतः अगदी निर्दोष असे रक्त केव्हाच नसल्यामुळे अगदी लगतच्या रक्तांत म्हणजे भावा-बहिणीत विवाह होऊ देणे इष्ट नाही. सख्खे भाऊ-बहीण सोडून आते मामे नात्यांतले भाऊ-बहीण विचारात घेतले तर तेथेही या प्रकारच्या विवाहांचा परिणाम चांगला होत नाही असे शास्त्रज्ञाचे मत आहे. आते-मामे नात्यातील विवाहामुळे (Cousin Marriages) शुक्रबिंदूतील दोषच संततीत जास्त प्रगट होतात. तेच दोष या मर्यादेच्या बाहेर विवाह केल्यास नाहीसे होतात असे डेव्हनपोर्टचे मत आहे. (हेरिडीटी इन् रिलेशन टू युजेनिक्स् पृ. १८५) वेल्स व हक्स्ले यांच्या सायन्स ऑफ लाइफ या ग्रंथात साधारण असेच मत आहे. (पृ. ३००) साधारण म्हणण्याचे कारण असे की त्यानी पुरावा दिला आहे तो सर्व जवळच्या रक्तसंबंधास अनुकूल असा आहे. पण अर्थात त्यांचे मत त्यांनी दिले ते मान्य केलेच पाहिजे.
 शास्त्रज्ञांचा हा पुरावा पाहिला तर ते जवळच्या रक्तातील विवाहाला प्रतिकूल आहेत असे दिसते; पण हे जवळचे संबंध म्हणणे सख्खे भाऊबहीण किंवा आतेमामे नात्यांतले भाऊबहीण एवढेच त्याच्या मनात आहेत. या पलिकडच्या सगोत्र व सपिंड विवाहाला त्यांची मुळीच हरकत नाही. पण In breeding, Cousin Marriages, Marriages of near kin, यांचे विवेचन करता करता हातचलाखी करून तेथेच आपल्याकडचे सपिड व सगोत्र हे शब्द दडपून सगोत्र विवाहाला पाश्चात्य शास्त्रज्ञांचाही विरोध आहे असे दाखविण्याचा उद्योग काही विदूषकी समाजशास्त्रज्ञ करतात. त्यामुळे लोकांनी भ्रमून जाऊ नये इतकेच सांगायचे आहे.
 धर्मशास्त्र व जीवनशास्त्र या दोन्ही दृष्टीने सगोत्र विवाहाचा विचार केला. त्यावरून धर्मशास्त्राच्या निषेधाच्या बुडाशी असलेली कल्पनाच चुकीची आहे आणि जीवनशास्त्राचा याला मुळीच विरोध नाही व त्यामुळे सगोत्र विवाह निषिद्ध मानण्यास मुळीच आधार नाही, हे आपल्या ध्यानात आले. इतके पाठबळ मिळाल्यावर व्यवहाराकडे थोडी दृष्टी टाकण्यास हरकत नाही असे वाटते.
 सध्या ब्राह्मण, मराठे वगैरे जे वर्ग ही गोत्राची बंधने पाळतात त्यांची या बाबतीत अत्यंत कुचंबणा होत आहे, हे सर्वांच्या ध्यानात आलेलेच आहे. काही पोटजातीत आणखी दहा दहा पोटजाती आहेत. त्यात ही सगोत्र सपिंडाची भर. त्यामुळे विवाहात वधूवरांची निवड चांगली करण्यास पुरेसे क्षेत्रच मिळत नाही. काही काही ठिकाणी साठ-सत्तरपेक्षा जास्त घरेच नसतात. त्यामुळे जी मुलगी मिळेल ती पत्करावी लागते. त्यात शिवाय पत्रिकेच्या वेडगळ अडचणींची भर आहेच. यामुळे अनुरूप वधूवरांचा विवाह होण्यास अवकाशच नाही. वय, संस्कृती, शिक्षण यांतील सादृश्य, आरोग्य, या विवाहांतील मुख्य विचारांना या उपटसुंभ विचारांपुढे स्थानच मिळत नाही. आणि त्यामुळे असल्या विवाहाने पति-पत्नींना सुख तर होत नाहीच, पण संततीवरही वाईट परिणाम होतो. तेव्हा सगोत्र, सपिंड, समसंस्कृति असतानाही पाळले जाणारे जातिभेद, या प्रकारचे सर्व बंध नाहीसे करून वधूवरांच्या निवडीला शक्य तितके जास्त विस्तृत क्षेत्र करून देणे हे आजच्या समाजात अत्यंत अगत्याचे आहे.
 विवाहाचा आदि हेतु, एकनिष्ठा, शाश्वतता, संतती, अपत्य संगोपन, स्त्री-स्वातंत्र्य, विवाहाचे वय, पुनर्विवाह, प्रेमविवाह, घटस्फोट, स्त्रीचे द्रव्यार्जन, सगोत्र विवाह, इत्यादि या बाबतीतल्या बहुतेक सर्व महत्वाच्या प्रश्नांचा विचार आपण केला. या बाबतीत आणखीही काही कल्पना प्रचलित आहेत. गांधर्वपद्धतीने विवाह केल्यास एक प्रकारची संतती होते, ब्राह्मपद्धतीने केल्यास दुसऱ्या प्रकारची, क्षत्रियांना, विवाहाचा एक प्रकार हितकर तर ब्राह्मणांना दुसरा व वैश्यांना अगदीच निराळा हितकर, विवाहानंतर प्रथम होणारी संतती चांगली सुदृढ व बुद्धिमान असते, व पुढील दुबळी असते किंवा आरंभीची दुबळी असून पुढची सुदृढ असते इत्यादि अनेक समज आपल्याकडे रूढ आहेत. पण शास्त्र या पदवीच्या आसपासही येण्याची त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांचा विचार येथे केला नाही.
 गेल्या दोनतीन लेखात अर्वाचीन शास्त्राअन्वये विवाहसंस्थेचे जे स्वरूप असावयास हवे आहे त्याचे दिग्दर्शन केले. त्याअन्वये आपल्या समाजात सुधारणा झाल्या तर येथले बरेच सामाजिक प्रश्न सुटतील, आणि त्यामुळे येथील अनेक दुखे कमी होऊन समाजाच्या सुखात व सामर्थ्यात बरीच भर पडेल असे वाटते. समाज नव्या शास्त्रीय विचाराला व तदनुसारी कृतीला कितपत तयार आहे, यावर सर्व अवलंबून आहे.