Jump to content

वाहत्या वाऱ्यासंगे/हा भाद्रपदाचा महिना

विकिस्रोत कडून

हा भाद्रपदाचा महिना



 आणि एक दिवस भादवा अंगणात येऊन उभा राही . आषाढश्रावणातल्या पावसाने अवघ्या जगाचे रंग बहरुन येत. झाडाझाहांतुन रेशमी पंखाचे मोर पंव फलामन. अलायला लागत. आषाढश्रावणातल्या उदंड बरसातीने सखावलेली नदी लेकुरवाळ्या प्रौढेसारखी अंगभन्न वाहू लागे. श्रावणातल्या पंचमीसाठी मेंदीची पाने ओरवाइनाना , पाटयावर बारीक वाटताना ,माझं मन अगदी आनून वाट पाही भादव्याची . मनात कितीतरी गाण्यांची सुरीली फुलपाखरं भिरभिर लागत .

भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला
चला हो माझ्या माहेरा ... महेरा
गेल्या वरोबर पाट बसायला
विनंती करू यशोदेला
टिपऱ्या खेळू गाणी गाऊ
प्रसाद घेऊ नि घरी जाऊ ... घरी जाऊ ...

 आमच्या चौकांनी घरात व्रतवैकल्यांना फारसा थारा नव्हता . गणपती , गौरी वगैरे दैवतं शेजारीपाजारी येत . नवरात्रातल्या एखाद्या रात्री शेजारी मंत्रजागराचा घनगंभीर समूहनाद मनात भरून जाई. त्या सर्वांची घरे अशावेळी उधाणून जात . पण आमचे घर मात्र शांतच असे. नाही म्हणायला श्रावणातल्या एका शुक्रवारी आई पुरणावरणाचा सुपोत स्वयंपाक करी. भांडी घासणारी चंद्राबाई नाहीतर पोळ्या करणान्या सुमाताईंना रांगोळी काढून , थाट करून जेऊ घाली. मनोभावे सव्वारुपया किंवा खण पुढ्यात ठेवी. त्या दिवशी माझ्या हट्टाखातर, जिवतीचा रंगीत कागद घरात येई. तो समोरच्या दुकानातून आणताना पिवळा, निळा की लाल रंगाचा आणावा है कळत नसे . येताना एक आण्याचा हार , दोन पैशांचा कापूर आणायचा. तो कागद भिंतीवर चिटकवून मी त्याची साग्रसंगीत पूजा करी. आईच्या माहेरी व्रतवैकल्यांचा लळा होता. पण या घरात आल्यावर ती पपांच्या विचारांत पूर्णपणे मुरून गेली होती . मात्र मुलाबाळांच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तिच्यातली भाविक आई श्रावणातल्या शुक्रवारी जिवती पूजत असे. तर या अशा घरात माझी जरा घुसमटच व्हायची. ते वय तसं अधमुरं. असोशी हौशीनं मिरवायचे दिवस. पण घरात ना हळदी कुंकवाचा दणका ना नवरात्रीतले मंत्रजागर. बोडणासाठी नाहीतर नवरात्रात कुमारिका म्हणून मला आमंत्रण आले की माझ मन फुलून यायचं. कर्मकांडातलं वैय्यर्थ, आज-कळत असले तरी ते विधी करताना मनाला आगळा आनंद मिळे. मनगटावर केशरचंदनाच्या रेघा. कपाळावर ओले कुंकू नि वर तांदुळाचे दाणे. भुवयांत रेखलेली हळद. न्हालेल्या केसांवर फुलांचा गजरा. रेशमी परकरपोलका. या थाटामाटात आपण कोणीतरी खास आहोत असे वाटे.
 आमच्या निरामय घरात भुलावाई मात्र थाटामाटात माहेरपणाला येई . आमच्या घरात देव .सोवळेओवळ ,शिवाशिव असल्या भानगडी नसल्याने विविध जातीजमातींच्या मैत्रिणींचा घोळका अखंडपणे भवताली असे. आमच्या उंच चढणाऱ्या आवाजाला आणि धुसमुसळ्या पावलांना थोडाफार धाक असायचा आमच्या घरमालकांचा वाबांचा. पण हा धाक घरमालक म्हणून नसे तर आमच्या कन्याशाळेचे अत्यन्त शिस्तप्रिय मुख्याध्यापक , हेडसर म्हणून असे.
 घरासमोरच्या गजानन कंपनीच्या ओट्यावर श्रावणभर गर्दी असायची. आधी राख्यांचा चमचमाट. पाठोपाठ पोळ्याची धांदल. मोचीवाड्यातली मालणमावशी श्रावण पौर्णिमेनंतर एक दिवस आपला संसार ओट्यावर मांडीत असे. टोपल्या भरभरून रंगीबेरंगी बैलजोड्या येत. काही जोड्या साध्या मातीच्या लाल कावेने रंगवलेल्या . चार आण्याला खिल्लारभर मिळणाऱ्या. पण काही वैलजोड मात्र खूप देखणे आणि सुबक. अंगावर झळझळीत गोंडेदार झूल . कपाळावर विंदीपट्टा. सोनेरी शिंगे.
 पोळ्याची दंगल संपली की गणपतीवाप्पांची चलती सुरू होई. बैलांची जागा तहेतऱ्हेचे गणपती घेत. गणेशचतुर्थीच्या संध्याकाळपर्यंत गणपती ओट्यावर असत. रात्री उरलेसुरले गणपती थकलेल्या हातांनी ती भरून ठेवी .
 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खिडकीत येऊन पहावे तर रंगीवेरंगी भुलाबायांची उतरती आरास ओट्यावर दिमाखाने सजलेली असे. दुरूनही डोळे सुखावून जात. आंघोळ न करताच, कुरळ्या झिपऱ्या सावरीत. पेटीकोटवर फ्रॉकची झूल न चढवताच मी रस्ता ओलांडून मालनवाईकडे जात असे . मालनवाई प्रेमाने मला म्हणे , "बईन , तुले कोंची हवी? ही गुलाबी पातळवाली ठीऊ ? जा. तुज्या वापाले धा आने मांगून आन ."
 आता माझे मन सैरभर होई . कोणती निवडावी यातनं? माझा निश्चय होत नसे. एखाद्या जोडीतल्या भुलाबाईच्या पातळावरच्या बुट्या सुंदर असत . पण भुलोजीच्या शर्टाचा रंग पिवळाधोट ! जोडीतल्या भुलोजीचा फेटा जर्द जांभळा नि सोनेरी जरीचा . ऐटदार असे तर शर्टाचा रंग गुळमट विटकरी. एकूण काय , हरेक जोडी विजोडच. तेव्हा खूप राग येई . आता मात्र कळतं की मालणबाईच खरी शहाणी. मेड फॉर ईच अदर वगैरे पडद्यावर , नाहीतर पुस्तकातच!
 मला आवडलेली जोडी अखेर सापडे . उंच उभ्या तुऱ्याचा मुकुट ल्यालेला भुलोजी . त्याचा विटकरी शर्ट बेताचाच असला तरी लक्षात येत नसे . आणि भुलाबाई तर मोठी देखणी . कानात झुबे. माथ्यावर बिंदी बिजवरा . जामूनी रंगाची साडी. जर्द हिरवी चोळी. वर सोनेरी बुट्टे. मांडीवरच्या बाळाला आकाशी कुंची. पण ...
 पण म्हणजे आमचे पप्पा. पप्पांच्या जवळ आत्ताच्या आत्ता हा शब्द चालत नसे.
 "आज भुलाबाई पसंत कर. आणि दोन दिवस त्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही. हट्ट करायाचा नाही. मग तेरवा भुलाबाई आणू . बघ माझ्याजवळ फद्यादेखील नाही." असे म्हणत सायकलवर टांग मारून ते कोर्टात निघून जात . आईला माहीत असे की भाद्रपदी पौर्णिमआधी चार दिवस भुलाबाई आणली तर दाखवादाखवीत ती नक्कीच फुटणार . कारण माझी भुलाबाई तुझ्यापेक्षा छान - यातच खरा आनंद .
 शेवटी पौर्णिमेच्या आदल्या संध्याकाळी सर्वात सुंदर भुलाबाई , खणखणीत दहा आणे मोजून घेतली जाई. पाटावर बसून वाजतगाजत घरी येई. - आई,कोनाडा आधीच सजवून ठेवी. महिरपदार मखर, त्यावर रंगीत कागदाची फुलं चिटकवलेली. शिवाय झिरमिळ्या. पहिल्या दिवशी कोणती खिरापत करायची, यासाठी मी आईचा जीव खात असे . कुण्णाला ओळखता येणार नाही, असा खास पदार्थ हवा असायचा. तीही माझ्या उत्साहात सामील असायचीच. मग कधी लालभोपळा नि गूळ घालून केलेले घारगे नाहीतर ताज्या कोवळ्या मक्याच्या कणसांचा तिखट कणसारा ती करी.

.., आडावरच्या ताडावर
धोबी धुणं धुतो बाई , धोबी धुणं धुतो
भुलाबाईच्या पातळाला , जामूनी रंग देतो बाई
जामूनी रंग देतो.
भुलाबाईच्या पातळावर , सोनेरी बुट्टे काढतो बाई .
सोनेरी बुट्टे काढतो ...

 मुली फेरात गात . तेव्हा मन कृतकृत्य होऊन जाई . हे भुलाबाईचं वेड वयाच्या सहाव्या वर्षी मनात भरलं ते अगदी सोळा वर्षापर्यंत टिकलं. भाद्रपद पौर्णिमेपासून ते शरदपौर्णिमेपर्यन्तच्या संध्याकाळी मंतरलेल्या असत.
 शाळेतून यायचं, दप्तर दारातून फेकायचं, नि हातपाय धुवून टिपऱ्या हातात घेऊन जो फेरा निघायचा तो थेट रात्रीपर्यंत. प्रत्येकीच्या घरी किमान पाच गाणी म्हणायचीच.
 ' यादव राया राणी रुसून बैसली कैशी?' या गाण्यातली रुसलेली सून मला खूप आवडायची. तिला समजावायला मामंजी , सासूबाई , दीर सगळे जायचे. पण ही महा खट. तिला दागिने नको असायचे. आमच्या वर्गात उषी होती. तिचं डोकं नेहमी वेगळ्या दिशेने धावायचे. मंगळसूत्र किंवा लाल चाबूक घेऊन जाणाऱ्या आणि राणीला लाच देऊन किंवा धाक दाखवून आणणाऱ्या पतिराजांपेक्षा हिच्या गाण्यातला पती वेगळाच असे . ती म्हणे ." ... पती गेले समजावायला , चला चला राणीसरकार आपुल्या घराला , दौत नि लेखणी आणली तुम्हांला..."
 दौत आणि लेखणीच्या आहेरावर खूश होऊन आमची आधुनिक राणी तिच्या घरी परतत असे . खरं तर अधमुऱ्या गोड दह्यासारखं आमचं वय होतं. जाळीदार पडद्याआडून पल्याडचे भास जाणवावेत तसे सासरमाहेरचे वेगळेपण आम्हाला जाणवे. आणि म्हणूनच निगूतीने , खपून केलेल्या करंज्या, तवकात भरून पालखीतून माहेरी पाठवताना होणान्या आनंदापेक्षा ,

... माहेरीच्या वाटे , गुलालबुक्का दाटे
सासरीच्या वाटे, कुचूकुचू काटे ...

या ओळी दणक्यात गाण्याचा आनंद अधिक असे.
 टिपऱ्या, खिरापती , कोजागिरीची जाग्रणं, खेळ , नाटकं , नाच अशा शेकडो आठवणींचे जिवंत मोहोळ या व्रताभोवती गुंफलेले आहे . आज पस्तीस वर्षांनंतरही ते जागले की मन मोहरून येते.
 खानदेश, विदर्भ , बागलाण या परिसरात भाद्रपदपौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत ८ ते १५ वयाच्या मुली भुलाबाई मांडतात. भुलाबाईला व्रत म्हणण्याऐवजी लोकोत्सव असे म्हणणे अधिक योग्य होईल. कारण या उत्सवात- या व्रतात कोणतेही कठोर कर्मकांड नसते . जणू तो एक खेळाचाच प्रकार. आठ ते चौदा वयोगटातील कुमारिका, सर्व जातीतील मुली हा उत्सव साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर, पुणे, नगर भागात या लोकोत्सवाशी अगदी मिळताजुळता असा भोंडला मुली मांडतात . दोनही उत्सवातील नमनगीत आणि इतर एकदोन गाणी वगळल्यास बहुतेक गाणी सारखीच आहेत .
 वऱ्हाड, खानदेश , मालेगाव, बागलाण भागात भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेला माहेरपणाला येते . रोज सायंकाळी आळीतल्या मुली एकत्र येऊन , प्रत्येकीच्या घरी, भुलाबाईसमोर टिपऱ्यांवर गाणी म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजीची जोडमूर्ती असते . भुलाबाईच्या मांडीवर बाळ असते. भुलाबाई बाळंतपणासाठी माहेरी आलेली असते. पहिले अकरा दिवस बाळाची बाज असते . बाराव्या दिवशी बार बालोदी नाव रोज ठेवले जाते. तेही असे ...

आकाश वाई आकाश
अस्सं कस्सं आकाश
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा प्रकाश ... .

 शेवटी बाळाचे नाव गणपती वा गजाननच ठेवतात . भाद्रपद महिना वर्षाऋतूतल्या अखेरच्या चरणातला . पिके पोटऱ्यात आलेली असतात .अश्विनथंडी बरोवर रानातल्या तुरीवर पिवळा फुलोरा फुलायला लागतो. नवी साळ तयार होत आलेली असते. अशावेळी येणारा हा उत्सव जणू भूमीच्या उर्वराशक्तीच्या , तिच्यातील सर्जनशक्तीच्या सत्काराचे प्रतीकच ! कदाचित काळाच्या प्रवाहात मूळ उत्सवाचे स्वरूप बदलले असेल . कुमारिकांच्यात असुशक्ती ... म्हणजे एकप्रकारची जादुईशक्ती असते असा समज होता. वयात येणाऱ्या, ज्यांच्यातील उर्वराशक्ती, जननशक्ती जागृत होण्याच्या मार्गावर आहे, अशा कुमारिकांकडून शेताभाताची पूजा करण्याचा आणि त्याद्वारे धनधान्य समृद्धीची कामना करण्याचा संकेत तर या उत्सवामागे नसावा?
 भाद्रपद आश्विनात सायंकाळी उत्साहाने बहरलेल्या पोरीसोरींचा घोळका या घरातून त्या घरात जाताना दिसे . आज मात्र असे घोळके फारसे आढळत नाहीत. भुलाबाई मांडणाऱ्या मुलींच्या गटात जातीभेदाला मुळीच थारा नसे , ब्राह्मण , मराठा, सोनार , साळी, माळी सर्व जातींच्या पोरी एकत्र असत , माझी एक दलित मैत्रीण भुलाबाई मांडल्याचे सांगते . भुलाबाईची जागा बहुदा देवघरात नसे . आश्विन पौर्णिमेला एकत्र जमून जाग्रण करायचे. त्यादिवशी सर्व पारंपरिक गाणी म्हणायची. प्रत्येकीने मोठा डबा भरून घसघशीत खाऊ आणायचा . आणि जाग्रणाच्या निमित्ताने नाच, गाणी , नाट्यछटा , नाटके असा भरगच्च कार्यक्रम . रात्रभर धिंगाणा असे . सकाळी घरोघर परतायचे ते पुढच्या वर्षीच्या आश्विनभादव्याची स्वप्ने मनात गोंदवून .
 आता ते रुणझुणते भादवे हरवले आहेत. आता दरवर्षी श्रावण बरसतो आणि हरवलेल्या भादव्यांची स्वप्ने आठवीत कधी भाद्रपद उलटून जातो तो कळत नाही .

܀܀܀