Jump to content

वाहत्या वाऱ्यासंगे/आपाढातला एक दिवस

विकिस्रोत कडून

आषाढातला एक दिवस



 तिसऱ्या मजल्यावरच्या मोकळ्या गच्चीवर मी एकटीच उभी आहे.
 दक्षिणेकडून ढगांचे बलदंड थवेच्या थवे..हा शब्द चुकला ना? तू जवळ असतास तर ठसक्यात म्हणाला असतास. थवे नाही जथ्थे ! जथ्थे!
 थवे.. कधी पक्ष्यांचे . कधी हळच्या सुरांचे तर कधी तुझ्या हव्याशा शब्दांचे. तुझ्या वास्तवात मात्र नेहमीच जल्लोष असतो जथ्थ्यांचा. दुष्काळी मोर्चा : हजारो स्त्रीपुरुषांचे जथ्थे लाटांसारखे एका पाठोपाठ एक आवेगाने येणारे.
 सेवादल : नव्या जाणिवा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारा वेडया तरुणांचा जथ्था . आणि तुझा खेड्यातला दवाखाना? तिथेही रोग्यांचा करुण जथ्थाच ना?
 तर, आभाळाच्या बलदंड हत्तींचा जथ्या दक्षिणेकडून वर सरकतोय. हा हा म्हणता दाही दिशा गर्द कोनफळी रंगाच्या सुस्त आभाळाने झाकून गेल्या आहेत . क्षितिजाच्या कडांनी विजा लखलखताहेत . एक टप्पोरा थेंब माझ्या ओठांवर टपटपला बघ ! तू जर इथे असतास तर या गच्चीवर कशाला उभी राहिले असते अशी एकाकी ! आज आकड्यांचे भान आलेय. बारा आषाढ तुझ्या संगतीने साजरे झाले .
 सरता ज्येष्ठ असायचा . अचानक , एके दिवशी दक्षिणेचे दार मोकळे व्हायचे. भन्नाट वाऱ्याचे तुफान भर वेगाने दौडत यायचे. येताना काळाभोर खिल्लार वळवित आणायचे. अशावेळी माझे नकटे नाक खुलून जाई . दूरवर पडणाऱ्या पावसाचा खमंग ओलाकंच वास माझ्या श्वासात भरून जात असे. मग अंगातून एक आगळे उधाण ओसंडून येई . वाटत असे, नुस्ते धावत सुटावे. वारा प्यालेल्या वासरासारखे!
 असे ओले दिवस उगवले की माझ्या हाताने चहात साखर जास्त पडायची किंवा पोहयात मीठ घालायलाच विसरायची. तुला हे सारे कळे .मग तू म्हणायचास . फिरायला जाऊया . तुझी फटफटी मुकुंदराज दरीच्या दिशेने धावू लागायची. पावसाचे झुरुमुरू थेंव. वाऱ्याचा भन्नाट वेग . त्या वेगाला मागे सारीत पुढे धावणारी फटफटी. तुझा खांदा एका हाताने धरीत , दुसऱ्या हाताने भुरभुरत्या बटा सावरणारी मी. समोर उंचउंच जांभळे कडे. पावसाने भिजलेले काळे दगड, आपल्या काटकुळ्या हातांनी पावसाचे नवेपण गच्च धरून ठेवणारी , रस्त्याच्या कडेची झुडपे. मधूनच लखलखत , लवलवणारी अगदी समोर येऊन, वेडावून लुप्त होणारी वीज . मग प्रचंड गडगडाट. अशा वेळी खांद्यावरच्या हातांची पकड आणखीनच गच्च होई . दरवर्षी आषाढ येत असे . कधी मुकुंदराजाच्या समाधीखालची बुट्टेनाथाची दरी तर कधी तळ्याकाठचा महादेव तर कधी शेतावरची नांदती विहीर. आषाढाचं नवेपण दरवर्षी नव्या तऱ्हेने साजरे होई.
 आणि आज ?
 हा तेरावा आषाढ.
 यक्षपत्नीच्या वेदनांचे मुके वळ , आज माझ्या तनामनावर उमटले आहेत. माझ्या वेडांना पारिजातकाच्या फुलांसारखे अलगद ओंजळीत धरून जोजावलेस . मुक्तीचा नवा प्रत्यय प्रत्येक क्षणी देणारा तू ...आज दूऽर गजाआड बंदिस्त आहेस . हेच ढग तुझ्या दगडी खोलीच्या वीतभर खिडकीतून तुला दिसत असतील . खुणावत असतील. उंच उंच ,चिरेबंदी दगडांनी बांधलेला चौकोनी तुरुंग , भवताली विजेच्या काटेरी तारा. आणि त्या भिंतींच्या वरून , त्यांना न जुमानता धावणारे मुक्त आभाळ . ते भुरुभुरू धावणारे आभाळ पाहून तू नक्कीच खदखदून हसला असशील. हसता हसता तुझ्या डोळ्यात दाटून आल्या असतील. मी लिहून पाठवलेल्या गझलेच्या ओळी .

... गजाआड माती,
परि, मनमयूर मुक्त
दूरातून जडवितो
निखळता स्वरान्त
शब्द शब्द पेंगुळले
विझू विझू वाती
मनातूनी मोहळती
मग्न ... भग्न ... राती ....

 शब्द माझे . पण मनाची उलघाल तुझ्याच. तुझ्या पत्रातल्या ओळी गजाआड असलो तरी मनाने तुमच्यात आहे. सारे सूर संपून गेलेत असं का तुला वाटतं? अगं, आता कुठे सूर लागलाय माझा . माझं मुक्त मन ,सूर जुळवून तब्बेतीनं गातंय हे दिवसही संपणार आहेत. सन्मानाने संपणार आहेत. तोपर्यंत तुझे सूर हरवू नकोस .
 अरे राजा , माझ्या प्राणातला कोमल गंधार तू कोवळ्या शब्दांनी जपला आहेस . तीव्र मध्यमाचे कणखर स्वरही माझेच. प्राणांना शोष पडला तरी विझू देणार नाही मी ते!
 पूजेसाठी आणलेल्या कमलकळीत शृंग निघाला नि इंद्राने यक्षाला शिक्षा ठोठावली. एक वर्षाच्या सक्तीच्या विरहव्यथेची. यक्षाची रवानगी रामगिरी पर्वतावर. तर, बिचारी यक्षपत्नी अलकानरीतल्या घराच्या सौधावर उभी राहून वाट पहातेय ! हजारो वर्षांचा कालावधी वाहून गेला . पण सामान्यांना धारेवर धरून शिक्षा करणारे इंद्राचे सिंहासन आणि इंद्र आहेच. कधी शिक्षा ठोकणार इंद्र तर कधी सिंहासन-विराजमाना इंद्राणी ! सत्तरी ओलांडलेले माझे आजोबा . ऐन तिशीत विधुर झालेले . आपल्या कच्च्याबच्च्यांसाठी स्वतःच्या भावनांवर पालाण घालून एकाकी आयुष्य जगलेले. आषाढाचा पहिला दिवस आला की मला म्हणत . "शैला बयो, मेघदूत वाचलं आहेस? कोण होता कालिदास?"
 मग माझ्या निमित्ताने कापऱ्या आवाजात गुणगुणत ...
 ... काचित कान्ता विरह करुणा ...
 ... आषाढस्य प्रथम दिवसे ... मेघमाश्लिष्ट सानु .......
 त्या पावसाळी हवेत भिजलेले ते शब्द कळण्याची अक्कल तेव्हा नव्हती. पण आषाढातला पहिला दिवस आला की सारे आठवते . कालिदासाच्या यक्षाने कोसो दूर असलेल्या प्रिय पत्नीला मेघांबरोबर संदेश पाठवला . आज एक यक्षपत्नी-पुन्हा चुकले बघ- मी एकटीच का विरहिणी आहे ? माझ्यासारख्या हजारो विरहिणी हिमालयापासून ते कन्याकुमारीच्या पायथ्यापर्यंत विखुरल्या आहेत. पावसाच्या पहिल्या स्पर्शाने त्यांच्याही अंगातून लक्षतारा रुणझुणल्या असतील आणि विरहाच्या वेदनेचे कितीतरी निःश्वास हवेत मिसळले असतील. दिवाळीतल्या दिव्यांची ज्योत ,उन्मत्त वाऱ्याने जिथल्या तिथे लवलवते, तसे कितीतरी पंख आतल्याआत फडफडले असतील. अशा लक्षावधी यक्षपत्नींचे घायाळ मन घेऊन मी या मोकळ्या आभाळाखाली....उभी आहे. आभाळाचे थवे, हो थवेच ,माझ्या माथ्यावरून भरारा वाहताहेत. त्या सावळ्या थव्यांच्या कानांत मीही तुला निरोप धाडला आहे.

रेशमी पदरात या अग्निफुले मी वेचिली
धुंद होऊन चालताना वेदना ओलांडली
यात्रा तुझी होवो सुखी या इथूनी चिंतिते
स्वप्न गहिरे मिटवुनी अर्ध्यावरती मी थांबते.


܀܀܀