वाहत्या वाऱ्यासंगे/आंब्याच्या कोयीवरून घसरताना

विकिस्रोत कडून

आंब्याच्या कोयीवरून घसरताना



 उन्हाचे वाभूळवन आता चांगलेच फोफावलेय. अशी लखलखीत उन्हे की, पहाता क्षणी नजर भाजून निघावी. अशा या उन्हात दारासमोरच्या गुलमोहराचे लालचुटुक छप्पर नजरेला थोडा थंडावा देते. छतावरचे पंखे पांचावर ठेवले नि कलरच्या जाळीतून वाळ्याचे गंधगार वारे खोलीत खेळवले तरी अंगाची काहिली होतंच रहावी, असा सरता मे महिना. माथ्यावरचे छप्पर नि खिडक्यांची दारे वितळवून टाकणारा अंगार शिगेला पोचला असतानाच , एक दिवस वर्तमान पत्रातून बातमी येते. मान्सून केरळात लवकरच दाखल होणार . त्या कल्पनेनेही मनाला गारवा येतो आणि काय? एक दिवस चक्क एक थंडगार , गंधदार झुळूक घामेजल्या अंगावर कुंकर घालून गेली. दुसऱ्या दिवशी मी मान्सूनची बातमी शोधू लागले . तर मान्सून ढगाचे गडद सावळे छायाचित्रच समोर दिसले . आणि माझ्या नाकाला मातीचा खमंगगंध ...,आकाश आणि मातीचा पहिल्या भेटीचा मादक गंध हुळहुळून गेला . आता जून नक्कीच जवळ आलाय. एकतर रोज न रोज कोणत्या ना कोणत्या परीक्षांचे निकाल लागत आहेत . आणि या मान्सून स्वागताच्या बातम्या. म्हणजे उन्हाळा नक्कीच संपत आला तर!
 गेल्या वर्षी केवढी वाट पहिली या जूनची! घरात एक परदेशी पाहुणी उतरलेली . ती स्कॉटलंडची . भर बर्फाच्या प्रदेशातून २५ मे रोजी निघालेली ती २७ मे रोजी थेट अंबाजोगाईला येऊन थडकली . अगदी मराठवाड्याच्या फुफाट्यात , खिडकीतून येणाऱ्या गरम वाऱ्याच्या स्पर्शाने ही गोरी पोर पार लालेलाल होऊन जाई! आणि तरीही तिचा हट्ट दुपारी खेड्यात जाण्याचा. शेवटी मी तिला विनवले, बाई ग ऽऽ मृगाची बरसात होऊ दे. मग खुशाल खेड्यापाड्यातून भटकंती कर.
 जून उजाडला की मनावरची मरगळ झडून जाते. पोरांना वेध लागतात शाळेच्या पहिल्या दिवसाचे. वह्या पुस्तके , त्यावरची खाकी कव्हर्स , गणवेशाची खरेदी यांची धांदल . खरे तर या वेळेपर्यंत सुट्टीसुद्धा अजीर्ण व्हायला लागलेली असते. घरादारातून लोणच्याचा पसारा पडलेला असतो. हळद , मीठ, तिखट, फोडी यांच्या पसाऱ्यात अडकलेली आई . हिंगमेथीची खमंग फोडणी , मसाल्यात घोळलेल्या फोडी. या फोडी आजी नि आईची नजर चुकवून , बचक भरून, लपवून आणण्याने त्याची चव आणखीनच खमंग व्हायची.. मग कुणाला कळणार नाही अशा अडगळीच्या खोलीत किंवा घरामागच्या पायऱ्यांवर बसून निवान्तपणा तो आंवटतिखट चव जिभेवर घोळवीत शाळेला आठवायचे . यंदा गणितात बढती मिळालेली. इंग्रजीत पोटापाण्यापुरन गुण मिळालेले . एकीकडे मनातल्या मनात लाज वाटत असे . पण दुसरीकडे नव्या वर्षात खूप अभ्यास करण्याचा निश्चय मनातल्या मनात होत असे . तर असे निश्चय करण्याचा, शाळकरी मुलांचा लाडका महिना... जून!
 पण मनाला रुखरुखही लागत असे . जून आला म्हणजे आंब्याचे दिवस संपत आल्याची जाणीव मनाला होई . ज्याला खरे आंवे म्हटले जात ते हापूस लहानपणी क्वचित खायला मिळत . एरवी रायवळ आंव्याचे तऱ्हेतऱ्हेचे नमुने बाजारात येत. हापूसची, आंब्याच्या राजाची चव चाखली उंवरगावात . हे समुद्रतटावर वसलेले चिमुकले गाव आमच्या आत्यावाईचे .तिच्या घरी आंव्याची प्रचंड वाडी होती. सकाळी उठल्यावर आम्ही तोंड खंगाळून थेट आढीत जात असू. तिथे आत्यावाई आणि काकांनी निरनिराळ्या तऱ्हेचे आंवे काढून ठेवलेले असत . आंवा जरा आंवट निघाला तरी आम्ही तो खुशाल फेकून देत असू. दिवसभर आम्ही आंब्याच्या खुराकावर असायचो. तरीही शेजारच्या वाडीतून , दगड मारून पाडलेल्या पाडाची गुळमट . आंबट चव जिभेवर चांदण्या गोंदवून जाई. आणि आज ? आंवे मिळतात किलोवर , शेकड्याचे युगही संपलेय. पूर्वी छकडी मापाने शेकडा एकशे वीसचा असे . आम्हाला आजी म्हणायची , "दळभद्री पोरं गं तुम्ही . आमचे काळी मुठीमुठीने काजूखिसमिसचा खाऊ मिळायचा. तुम्ही खा लिमलेट्या नि चाकलेट्या . आंवे , केळी , पेरवांनी लादन्या , काठ्या भरून जात. पण विकण्याचं शहाणपण नव्हतं हो . लोकांना वाटता वाटता दम लागत असे."
 आता आम्ही आमच्या नातवंडांना काय म्हणावयाचं? वंट्या एकच चमचा रस घे हं. पुन्हा रस मागायचा नाही ! उद्या पुन्हा चमचाभर देईन !
 आंव्यावरोवर आठवते वटसावित्रीची पूजा . माझ्या आजोळीच आम्ही असायचो. ज्येष्ठी पौर्णिमेला समोरच्या पार्लेश्वर मंदिरात सकाळपासून रीघ लागत असे. रेशीमसाडींचा लफ्फेदार पदर सावरीत , नाकातली नथ डाव्या हाताने नेटकी करती उजव्या हातातले जाळीदार झेल्याने झाकलेले तवक सावरीत सवाष्णी येत. त्या आमच्या आजोळच्या नांदत्या घरात , सवाष्ण या शब्दाचा अर्थ , नकळत्या वयात कळला. घरातल्या काही स्त्रिया लगवगणाऱ्या. वहारून कामे करणाऱ्या . तर काही नेहमीच पांढऱ्या साड्या नेसणाऱ्या , माझी मोठी मामी नि आजी कसनुसल्या सारख्या असत. इकडेतिकडे तोंड लपवित डोळे गाळणाऱ्या बायका. वटसावित्रीच्या दिवशी मीही रेशमी परकर नेसून आईवरोवर पूजेला जाई . वरोवर मावशी असे . माझ्या अप्पामामाला हापूसच्या पेट्या आणायचा भारी शौक. भाचरांना भरभरून आंबे खाऊ घालण्यात त्याला आनंद असे . आई नि मावशीला पाहून गुरुजींचे डोळे , चकाकत . त्यांच्या ताटातले रत्नागिरी हापुसचे आंवे त्यांच्या डोळ्यांना , नाकाला अगदी भिडून जात . त्यांना माहीत असे की इथले आंबे चोखे रायवळ असणार नाहीत . पूजा सांगून झाली की ताटातले रसरशीत पिवळे आंवे अगदी हळुवार हातांनी ते उपरण्यात बांधत.
 वय वाढत गेले तसे सत्यवानाची सावित्री अधिक उमजू लागली . यमाला प्रश्न विचारणारी . त्याच्याशी वादप्रतिवाद करणारी, शब्दांच्या जाळ्यात गुंगवून त्याच्याकडून पतीचे प्राण आणणारी सावित्री.. पण या सावित्रीच्या चातुर्याकडे लक्ष न देता , वडाला दोरा गुंडाळणाऱ्या नि हळदीकुंकवाच्या पूजेत धन्यता मानणाऱ्या स्त्रिया पाहून मन वैतागत असे . याच सुमारास ओळख झाली नव्या सावित्रीशी. शेणकचऱ्याचा मारा फुलासारखा झेलून पोरीवाळीसाठी शाळा चालवणारी, ज्योतीवाची सावित्री ! पतिपत्नींच्या सहजीवनाचा इतका सुंदर आविष्कार मनाला मोहवून गेला. ज्योतीवाच्या हृदयातील प्रत्येक नवा विचार या सावित्रीने आत्मसात केला. पोकळ पातिव्रत्याचा नव्हे तर पतिपत्नीमधील सुजाण वांधिलकीचा नवा ऋजू आदर्श सहजपणे मनावर खोल खोल कोरला गेला. या सावित्रीने महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची ज्योत चेतवली. अंधारयात्री स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखवली. आज महाराष्ट्रात स्त्रिया विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. या सावित्रीची आठवण किती जणींना येते? आठवण जाऊ द्या, पण किती जणींना या सावित्रीच्या कर्तृत्त्वाची खरीखुरी ओळख असते?
 आपला जोडीदार दीर्घायुषी व्हावा , त्याची साथसंगत आयुष्यभर लाभावी असे कोणाला वाटत नाही आणि वाटणार नहीं ? पण तो साथी असायला हवा. आश्वासक श्वासांनी फुलवणारा जोडीदार हवा. कितीजणांना असा साथीदार मिळतो? माहेरातून सोनेनाणे वा भेटवस्तू आणण्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या ,तिला मारणाऱ्या, नरपशूबद्दल तो केवळ नवरा आहे . म्हणून कितीजणींना अंतरात्म्यातून प्रेम ...ओढ वाटत असेल? आणि वडाची पूजा करून का कुणाचे आयुष्य वाढवता येते? हे का कळत नसेल त्यांना? पण हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा कुणी नि कशा तोडायच्या? जग काय म्हणेल? हे सारे कळूनही वडाला दोरा वांधण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रिया कमी का आहेत?
 अलीकडे वडाच्या पारावर जायला लाज तर वाटते. पण व्रत न केल्यास काय घडेल याचे भयही वाटते . मग कुंडीतल्या वडाच्या फांदीची पूजा करायची ! हे असं का ? कधी संपणार ही अज्ञानयात्रा? या व्रताला नवे रूप का देऊ नये? व्रताच्या भोवती एक गोडवा असतो. मानसिक निर्धार असतो . त्या निमित्ताने अनेकजणीचे एकत्र येणे , मनाची झटकून जाणारी मरगळ , गाणी, जगण्याच्या आनंदाचा प्रत्यय  नव्या सावित्रीत आणि जुन्या सावित्रीत एक साम्य आहे. ते म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेने जाण्याची जिद्द . . 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा ध्यास . माझ्या खेड्यापाड्यातल्या भूमिकन्यांना हा नवा विचार नक्कीच सांगता येईल. पण डोळे असून ते मिटून घेतलेल्या शिक्षित भगिनींच्या मनावर चढलेली बुरशी कशी दूर होईल?
 आंब्याच्या कोयीवरून घसरून किती दूर आले मी! तर आता जून उजाडलाय. दर वर्षी तो ठरल्याप्रमाणे येतच राहील. उद्या एखादी नाचरी सर झिमझिमून जाईल . उन्हाचे धुळकट राप गळून पडतील , वाहून जातील. मन पुन्हा एकदा ताजेतवान होऊन. नव्या ऋतुचे, नव्या विचाराचे, नव्या ज्ञानाचे स्वागत करण्यासाठी उत्साहाने भरून जाईल. अशा वेळी माझ्याही ओठावर येतील स्वरगंधात न्हालेले ओलेचिंब शब्द .
 लाख धारांचा ... धारांचा
 कसा सोसावा बहर ?
 काळ्या रेशमी पोतात
 जडवीले निळे मोर ऽऽ
 चहु अंगांनी ... चहु अंगांनी
 रान मोरांचे ... मोरांचे
 लाख डोळ्यांचे शहार
 अंग रंगात ... संगात
 सहा ऋतूंचे वहर
 चहु अंगानी ... चहु अंगांनी ...

܀܀܀