वाहत्या वाऱ्यासंगे/रेल्वेच्या डव्यातील आत्मा

विकिस्रोत कडून

रेल्वेच्या डब्यातील आत्मा



 मी जयपूरला निघालेली.
 आपल्याकडे एकटी दुकटी बाई प्रवासाला निघाली की अवघे घर बेचैन होते. त्यातून मी दोन प्रांत ...गुजरात, मध्यप्रदेश ओलांडून अगदी पंजाबच्या जवळ जाणार होते. मग काय विचारता सगळे घर हैराण . माझ्या मुलांना आईच्या हिंदी आणि इंग्रजीची चिंता . मुलगी शिकवू लागली , "अम्मा , तू त्या दिवशी गुरख्याशी कसलं भयाण हिंदी मारत होतीस ! वो भिंतीके पलीकडे डुकरीण और उसकी पिलावळ है. उसको हुसको ... मला एवढं हसू येत होतं."
 नवऱ्याला वेगळीच काळजी लागली होती . अलिकडे बायकोचे पाय दुखतात , गुडघा दुखतो म्हणते. त्यात शारीरिक समृद्धी वाढत चाललेली . तरं, त्यांचे तीनतीनदा बजावणे सुरू होते. ही डायरी, तिच्यात पूर्ण नाव , पत्ता, फोन नंबर सगळं लिहलंय. तुझा व्लडग्रुपही लिहून टाक आणि ही औषधं . ती नीट ठेव आठवणीने . वी कॉम्प्लेक्स घे.. आणि हे बघ ज्या क्षणी वाटेल की परत फिरावं त्या क्षणी परतीच्या प्रवासाला लाग.".
 आणि मी?
 स्त्री-स्वातंत्र्य झिंदाबाद ! स्त्रीपुरुष समानता झिंदावाद ! समानसंधी झिंदाबाद!!! वगैरेंच्या घोळक्यातं.
 ऐनवेळी मन जरा विरघळलेच ! पण जयपूरचा गुलावी रंग , आमेरचा किल्ला नि नक्षीदार हवामहल मनाला खुणावीत होते . मग नकाशा शोधून त्यावर जयपूर शोधणे सुरू झाले. ते बेटे निघाले थेट औरंगाबादच्या डोक्यावर . जयपूरच्या ठिपक्यावर हात ठेवताना वाटत होते , जणू मी जवपूरच्या हवामहलच्या शिखरावरच उभी आहे . पण औरंगाबाद आणि जयपूर यात सहाशे किलोमीटर्सचे अंतर होते.
 औरंगाबाद ते इंदूरच्या बसमध्ये बसले . बस सुरू झाली आणि एकाएकी खूप एकटेपणा आला . मनात कल्पनाही आली .अनोळखी माणसांनी गजबजलेल्या इंदूरच्या रेल्वे स्टेशनात मी उभी आहे आणि छातीत चक्क कळ येतेय. चेहरा घामाने डवरलाय... वगैरे. मग शवनम वॅगेतली डायरी चाचपून पहाणे, हे सारे एका क्षणात . दुसऱ्याच क्षणी मनाच्या मूर्खपणाची कीव येऊन हसूच आले. भरतीची लाट भरुन येते तशी उत्साहाची . धाडसाची एक लाट माझ्याही उरात तुडुंव भरून आली आणि मी दिमाखाने इंदूरचे तिकीट मागितले .
 ....आता मी सराईत इंदूरकरीण होते.
 माझा पेशा मास्तरकीचा . विद्यार्थी कसा , कुठे नि केव्हा भेटेल हे सांगता येणार नाही . पुढच्या वाकावर विराजमान झालेल्या तरुणाने मागे वळून पाहिले आणि तो ओळखीचे हसला. माझ्या मनात नेमके चित्र उमटेना.
 "कुठं निघालात मॅडम? धुळ्याला का?" त्याचा प्रश्र . मी धुळ्याची माहेरवाशीण आहे , हेही माहीत त्याला ! म्हणजे बऱ्यापैकी ओळखीचा दिसतोय. पण नेमकी ओळख पटेना . मी मनातल्या मनात उत्तर दिलं, "जपानला!"
 "जयपूरला निघालेय." मी म्हणाले. - "अरे व्वा! मीही तिकडेच निघालोय . जयपूरला नाथ सीडस् मध्ये असतो . मॅडम मी अमूकधमूक . तुमचा लाडका विद्यार्थी . शहात्तरच्या वॅचला होतो. आठवतं? जयपूरला पोस्टिंग आहे सध्या" त्याने सांगितले.
 माझ्या मनातल्या भित्र्या सशानं टुणकन उडी मारली. बरं झालं गं बाई . आता शेवटपर्यंत सोबत मिळाली . उगीच टेन्शन नको . या छोट्यामोठ्या टेन्शननीच नवे नवे आजार होतात.
 पण मनातल्या खोलात दडलेले मन मात्र हिरमुसले . एकट्याने प्रवास करण्यातलं थ्रिल , जिप्सी बनून मुशाफिरी करण्याची संधी हे लाडके लेकरू विरजून टाकणार की काय ? सारा मजा किरकिरा होणार तर !
 "पण मॅडम , मी इंदूरला दोन दिवस राहणारेय , मग जयपूरला जाणार आहे . तुम्हाला पत्ता देतो जरूर या. सकाळी नऊ वाजता दिल्ली पॅसेंजर आहे. तिला बसवून देतो."
 जयपूरपासून २०/२५ किलोमीटर्सवर असलेल्या लहानशा गावात महिलांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर होते. बारातेरा दिवसात राजस्थानची ओळख करून घ्यायची होती. सोवतही मिळाली होती. मी त्याच्याकडे येण्याचे आश्वासन दिले. मी खूश होते . चाळीशीचा उंवरठा पार केल्यावर , साहसाने येणाऱ्या तरुणाईचा अनुभवही मिळणार होता. तणतणत , फुणफुणत दिल्ली एक्सप्रेस - एक्सप्रेस नावालाच , हर ठेसनाला थांबणारी - स्टेशनात आली . अवतीभवती माणसांचा उफाळता समुद्र . जो तो दरवाजातून आत घुसायचा प्रयत्न करतोय . मी बायकांचा डबा शोधतेय. माझी बॅग शिष्यवराच्या हातात . लांबच लांब गाडी. अजमेर . चित्तोडगडचे डबे . काही डवे दिल्लीपर्यंत धावणारे . शेवटी बायांचा डबा सापडला. कशीतरी आत घुसले . डब्यात दहावीस महिला आणि पन्नाससाठ वाप्ये . माझा मराठी वाणा जागा झाला .
 अरे भाई, ये लेडीज़का डिब्बा है. यहाँ मन बैठना , क्यूँ बैटे यहाँ ? अगले स्टेशनपे नीचे उतरो " माझा वडवड सुरू झाली. पण माझ्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. नाही म्हणायला पोरांचे लेंढार नवऱ्यासह वसलेल्या एका तरुण बाईने कपाळाला आठ्या घालून , डोळे वाकडे करून माझ्याकडे पाहिले . मीही हट्टाला पटले . "देखि यह डिव्वा मर्दोंके लिए नहीं. यहाँ पुरुष लोग नहीं वैट सकते. पुलिस को बुलायेंगे हम" मी असं म्हणतेय तोच "हाँ बाईसाब में यहाँ हूं" असे म्हणत एक पोलिस समोर आला.
 आता काय बोलणार कप्पाळ !
 साब नई हो क्या यहाँ कहाँ की हो? हमारे मध्यप्रदेशकी नहीं दिखती !" पोलिसमामांनी विचारले . मी मराठी आहे म्हटल्यावर त्याने मनापासून मान डोलावली . "तुम्हारे महाराष्ट्र में वाईलोग मर्द को लेडीज डिब्बे मे बैठने नही देती. यहाँ तो वे खुद लेके आती है जाने दो हम आपको जगा देते हैं." असे म्हणत त्याने खिडकीजवळची जागा मला दिली
 डव्यात भिकाऱ्यांचा भरणा होता. भीक मागणारी लहान मुले फरशीच्या तालावर किनऱ्या आवाजात सिनेमातली भजनं गाणारी. डबाभर प्रचंड घाण , नाक शिंकरून तिथल्यातिथे भिंतीला वोटं पुसणारी माणसं. विडीचा धूर नि राख. आईला लुचणारी भुकेली पोरं . भिरभिऱ्या नजरेनं जगाकडे पहाणारी, डोक्याला तेल चोपडून भांग पाडलेली वेण्या घातलेली अंगापेक्षा मोठे असलेले कपड़े घातलेली लेकरं, आणि शेजारी बसलेले त्यांचे निर्विकार बाप. माझ्याशेजारी दोन म्हाताऱ्या होत्या. अंगावर बऱ्यापैकी पातळं. बरोबर वॉटरबॅग, टिफीनचा डबा, पण, डोळेमात्र विचारात डुंबलेले
 वीस बावीस तासांचा प्रवास, मुक्याने कसा होणार ? शब्दांची देवघेव सुरू झाली.
 दोघी म्हाताऱ्या इंदूरच्या. मध्यमवर्गीय विधवा. सून आणि मुलांच्या टुमदार संसारात म्हातारीची अडचण होई. मुलं विचारीत नसत. देवळात दोघींची गट्टी जमली. मनीचे गारुड उकलले गेले. दोघींनी एक विचार केला आणि यात्रेच्या मिशाने बाहेर पडल्या, त्या पुष्करतीर्थाला जाणार होत्या. तिथे सकाळी अन्नछत्रात कोरभर अन्न मिळते. दिवसभर देवाची सेवा करायची. परमेश्वराच्या दारात जाऊन घरादाराचे दोर तोडून मुकाटपणी मरणाची वाट पहात बसायचे.
 मला मराठीतील म्हण आठवली. वेशीत नाहीतर काशीत मरावे. पण या म्हणीतले अपार कारुण्य त्या डब्यात जाणवले. मन बेचैन झाले. मीही चाळीशी पार केलीय. आणखीन तीस वर्षांनी कुठे नि कशी असेन मी
 मी भानावर आले ती पोलिसभाऊच्या हाकेने. मंदसोर आले होते. इथे गाडी वराच वेळ थांवते. शिवाय शयनयान डव्यात जागा मिळण्याचीही शक्यता होती. महिला डब्यातल्या घाणीने मी वैतागले होतेच . रात्रभरचा प्रवास, झोपही हवी होती. मन्दसोरला उतरून थ्रीटायरयरमध्ये जागा शोधली. लेडीज डव्याला रामराम ठोकून मी वऱ्यापैकी सुरक्षित जागेत आले.
 समोरच्या बाकावर नवेले जोडपे वसले होते . वहुदा पहिल्या वाळंतपणानंतरची पाठवणी असावी. तरुण मुलीचे रडून लाल झालेले डोळे. मांडीवर नव्या कपड्यात गुंडाळलेला रेशमी गोळा. भलंमोठं सामान. जोडप्याच्या शेजारी एक वयस्कर मुस्लिम गृहस्थ . माझ्याशेजारी दिल्लीच्या विधिमहाविद्यालयात शिकणारा आर्यसमाजी तरुण. त्याच्या शेजारी मध्यप्रदेशातील एक बनिया आणि त्याची वयस्क आई .तिला पुष्करला जायचे होते.
 गाडीने वेग घेतला. एकमेकांजवळच्या वर्तमानपत्रांची देवघेव झाली. एवढ्यात बाळ किरकिरायला लागले. आवाज वाढू लागला. रडणे थांबेना. ती नवमाता हैराण झाली होती. 'वालपणही' नवेच . त्यालाही नेमके काय करावे हे कळत नव्हते. तिला मदत करावीशी वाटली. गेल्या चौदा वर्षात वाळ हातात घ्यायला मला तरी सराव कुठे होता? तो मऊ लुससुशीत गोळा निसटला तर? पण माझ्यातल्या आईने केव्हाच आपले हात पुढे केले होते. ते चिमुकले मुटकळे उराशी धरले. क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. जरासे आंदुळले ... जोजवले. तर काय? चक्क ते शांत झाले. आणि झुलता झुलता झोपी गेले. त्या पोरसवदा आईच्या डोळ्यात कृतज्ञता भरून आली. चाचांनी लगेच जागा करून दिली नि म्हटले, वेटा बच्चे को सुलादो यहाँ.
 तरुण मुलगा वोरं घेऊन आला . सर्वांसमोर धरली. नको म्हणत , सर्वांनी तोंडात टाकली.
 मग गप्पा सुरू झाल्या. कोण? कुठे? कशाला? वगैरे. आणि पाणी वळणाला वळावे तसा गप्पांचा ओघ पंजाबच्या दिशेने वळला. पंजावच्या प्रश्नाने प्रत्येकजण व्यथित झालेला. सरकारच्या धोरणावर टीकाटिप्पणी करताना शब्दांना धार चढत असली तरी देशाच्या एकसंधतेला पडणाऱ्या चिरांमुळे प्रत्येकाच्या मनात दुःख आणि चिंता होती.
 "देखो . मेरा वेटा दुबईमे था पाच साल. लेकिन विवीवच्चे यही थे . इंडियामें. कुछ भी कहो .. पूरा जग देखके आया ." ईरान .. इराक कुठेही. पण भारतात जे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळते ती कुठेच नाही.
 "आम्हां गरीब मुसलमानांना खरा धर्म पाळायचा असतो. त्याला कोण आणतंय आडकाठी? मी ऑटोरिक्षा चालवायची. चार पोरींची लग्नं केली. दोन मुलं आहेत .एक डॉक्टर झाला. दुसरा छोटामोठा व्यापार करतो. अगदी कालपरवापर्यंत झोपडीत रहात होतो . आता सुखाची रोटी खातो. आजकाल ये लीडरलोगां और गुंडा एक हो गये है. वोही लोगोंको उसकाते है . खून खराबा करते है. बीचमे गरीब मरता है उसके बिवीबच्चे बेसहारा होते है."
 "मरनेवाले मुसलमानभी गरीब होते है और मरनेवाले हिंदूभी गरीब होते है. " चाचा बोलत होते.
 इतका वेळ डोळे मिटून पदराखाली जपमाळ जपणाऱ्या माँजीही बोलू लागल्या, "लाखोमे एक बात कही भाईसाबने !"
 माँजी सध्या मध्यप्रदेशांत उज्जैनला मोठ्या मुलाजवळ असतात. पण त्या मूळच्या राजस्थानच्या सीमेवरचे एक लहान खेडे, त्यांचे माहेर, सासर जवळच. आजही त्यांचे मोठे दीर गावी शेती करतात. त्यांच्या घरात दोन पिढ्यांपूर्वी मोठ्या मुलाला सिख्ख करीत. देवघरात आजही गुरुनानक साहेबांचा फोटो असतो. ग्रंथसाहेबातली पदे अनेक मुखांतून गायली जातात.
 "सिख्ख लोग तो हमें अपने लगते है. अपने बिरादरीके लगते है. कभी नही सोचा था की ऐसा कुछ होगा" माँजींचा स्वर कातर झाला.
 एव्हाना रेल्वेच्या डब्यातला तो कोपरा, एक घर बनला होता.
 मागे मागे पळणारी झाडे, हरियाली शेते आता अंधारात बुडू लागली. बरोबरच्या शिदोऱ्या पिशवीतून बाहेर येऊ लागल्या. कुठलेसे स्टेशन आले आणि मी पुरीभाजीवाल्याला शोधू लागले. इतक्यात त्या तरुण आईने मला आत बोलवले. आग्रहाने विनवले. "दीदीजी, हमारे पास बहुत सारा खाना है. आप हमारे साथ खाना खाओगी. प्लीज." तिच्या नवऱ्यानेही आग्रह केला.
 "दीदीजी, संकोच मत करना. रास्ते मे मिल गये है. चंद घंटोके साथी है. मालूम नही आगे कब मुलाकात होगी !"
 उत्तरेकडचा लोभस आग्रह मानावा लागला. मी द्राक्षे घेतली आणि मधे ठेवली. मग लोणच्याची देवाणघेवाण झाली. चाचाजींनी चार बुंदीचे लाडू आणि शेव कागदावर काढून मध्यात ठेवली.
 "पक्की रसोई है बहेनजी. तीखी सेव और नुक्तीके लड्डू है. आप सब लीजिये."
 मग इकडून तिकडून तिखट पुऱ्या पास झाल्या. भरल्या बटाट्याची भाजी सगळीकडे फिरली.
 "भाईसाब, मै किसीके हाथ से बनाया नही खाती.. पुरं आयुष्य याच वाटेनं गेल. नवे विचार मनाला पटतात. पण वाटतं, उरलेल्या चार दिवसांसाठी कशाला नवा रस्ता धरू? मी चार द्राक्षं घेते. मी तुमची रसोई खाल्ली नाही तरी लौकीचा ...दुधी भोपळ्याचा हलवा मात्र तुम्ही खायला हवा !" असं म्हणत त्यांनी सर्वांना चवदार हलवा दिला. शेजारच्या तरुण मुलाने खाली उतरून सर्वांसाठी पाणी आणले. पहाटे पहाटे जाग आली त्या तरुण मुलाच्या आवाजाने. "दीदीजी, जयपूर आ गया. आप गहरे नींदमे थी. चाचाजी और माँजीने आपको याद दी है. वे अजमेर उतर गये है. " क्षणभर मनाला चुटपुट लागली, कधीही न भेटणाऱ्या सग्यासोयऱ्यांना किमान डोळ्यात साठवून घेतले असते. जयपूर आले. मी खाली उतरले. घड्याळ्यात पहाटेचे पाच वाजले होते.
 दहा दिवस, दहा प्रांतातल्या पन्नासजणींनी राष्ट्रीय एकात्मतेवर किसून किसून चर्चा पाडली.
 मग जयपूर दर्शन झाले. आमेरचा किल्ला पहाणे झाले. जयपूरच्या बाजारातून खरेदी झाली. अनेक मैत्रिणी मिळाल्या. एकमेकींचे पत्ते घेतले. एलीस गर्गच्या बालरश्मी संस्थेचे काम पाहिले.
 परतीची वाट धरताना डोळे ओले झाले. पुन्हा भेटण्याचे मनसुबे झाले.
 आणि हातीपायी धडधाकट, सुखरूपपणे, (त्या डायरीची गरज न लागता) होय, मी सुखरूपपणे घरी येऊन आता महिना लोटला आहे.
 गेल्या काही दिवसात रोज कानावर येणाऱ्या बातम्या, रोज रोज मारली जाणारी निरपराध माणसे, जातीजमातींचे राजकारण, त्यातून होणारे दंगेधोपे ... हे सारे ऐकून मग उद्विग्न होते. उदास होते.
 आणि आठवतो तो आगगाडीचा डबा. त्या डब्यातली आपली माणसे. कालवलेल्या दूधभातासारखे ते पंधरा सोळा तास.
 अशा वेळी मनात येते. धर्माच्या ठेकेदारांच्या आणि सत्तेसाठी देवघरातले देवही चौरस्त्यावर विकायला काढणाऱ्यांच्या कोलाहलात, माझ्या देशाचा हरवलेला आत्मा शोधण्यासाठी रेल्वेचा डबा नाहीतर एस. टी. ची धावती बसच गाठावी लागणार का ?

܀܀܀