Jump to content

वाहत्या वाऱ्यासंगे/मोहसिनाची सल

विकिस्रोत कडून

मोहसिनाची सल


 दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी एक विद्यार्थिनी भेटली. अतिशय अस्वस्थ होती. मन कोमेजून गेलं होतं. पण तिचं दुःख कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. किंबहुना, इतक्या क्षुल्लक नि साध्या वाबीसाठी मोहसिनानं इतकं हळुवार होण्याची काहीच गरज नाही असंच इतरांचं म्हणणं.
 कोणतं होतं ते क्षुल्लक कारण ?
 मोहसिना एम एस्सी झाली. नंतर बी एड झाली. घरातील वातावरण चांगलं मोकळं सुधारक पद्धतीचं. घरी धार्मिक रीतिरिवाज व्यवस्थित पार पाडले जात. पण मुलींच्या शिक्षणाआड धर्म आला नाही. मोहसिना, तिच्या दोघी वहिणी भरपूर - शिकल्या. हुशारीचं चीज झालं.
 मोहसिना वी एड् झाली. तिचा विवाह झाला.
 तिचा पती रज्जाक, दुबईत इंजिनिअर आहे. तो दोन वर्षे तिकडेच राहणार होता. मोहसिना मात्र इकडे राहणार होती. अर्थात सासरच्या घरी.
 करमत नाही या सबबीखातर मोहसिनाने नोकरी करायचे ठरवले. त्या छोट्याशा गावात लगेच प्राध्यापिकेची नोकरीही मिळाली. सासू-सासऱ्यांनाही कौतुक वाटले. नव्याचे नऊ दिवस छान गेले. मोहसिना इतर प्राध्यापिकांशी छान मिसळून गेली.
 एक दिवस अचानक सायंकाळच्या जेवणाचे वेळी सासरेबुवांनी फर्मान काढले. "बहू कॉलेजमें बुर्का पहनके जाएगी."
 सासूने थोडा विरोध केला . म्हणाली, "इतके दिवस बुर्का घातला नाही. लग्नातही बहू बेटा जोडीने समारंभात बसली आणि आता कसा बरा दिसेल बुर्का ?"
 पण सासरेबुवांनी निक्षून सांगितले, “आपल्या धर्मात स्त्रियांनी बुर्का घातला पाहिजे हा रिवाज सांगितला आहे. आमच्या घरची बहू रस्त्याने बुर्का न ओढता जाणे म्हणजे घराण्याची बेइज्जत आहे. बहूने नोकरी जरूर करावी. कॉलेजात गेल्यावर शिकवताना बुर्का काढून ठेवला तरी चालेल; पण रस्त्याने घातलाच पाहिजे."
 मोहसिनच्या मनाची तडफड झाली. तिने तिच्या वडिलांना भावुक पत्र लिहिले. त्यांचे उत्तर आले. "तुझं मन मला कळतं. तुझ्या भाभीला मी अशी सक्ती करणार नाही, असं आज तरी वाटतंय. पण एवढ्याशा गोष्टीवरून अब्बांचं मन दुखवू नकोस. हजारो वर्षापासून स्त्रिया अशाच बुर्का घालीत आल्या आहेत. वुर्का पहनल्याने तुझी बुद्धी थोडीच कमी होणार आहे? त्यातून रज्जाकमियाँ इथे नाहीत. ते आल्यावर यातूनही मार्ग निघेल . पण या क्षुल्लक गोष्टीचा वृाऊ करून स्वतःचं मन जखमी करून घेऊ नकोस आणि घरच्यांनाही समजून घे."
 तिच्या मनाच्या जखमा वडिलांना दिसत होत्या. पण ते तरी काय करणार होते ? मोहसिनाने बुका शिवून घेतला. तो घालून ती कॉलेजात जाई. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तिने रिक्षा ठरवली. रिक्षावाला तिचा दुरून भावसभाऊच.
 "आपा ये अच्छा किया आपने," त्यानेही खुशी व्यक्त केली.
 आपल्या सहकारी प्राध्यापिकांच्या समोर यायलाही तिला संकोच वाटू लागला. आपण पराभूत झालो आहोत, अशी तिच्या मनाला टोचू लागली. ती मैत्रिणींना टाळू लागली.
 सुटीला चार दिवस माहेरी येताच माझ्याकडे धाक्तपळत आली. खांद्यावर डोके ठेवून रडली. तिला बुर्का घालावा लागतोय यामुळे ती दुःखी नव्हती. तिचं दुःख दुसरंच होते.
 "मॅडम, माझ्या माणसांचं मन राखण्यासाठी मी जरूर हा बुर्का घालीन. पण मर्यादा आपल्या वागण्यात, नजरेत नसते का? इतर मुली नाटकात भाग घेतात. गाणी म्हणतात, खेळतात, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होतात. भरपूर बक्षिसं मिळवून पुढील जीवनात सुंदर स्वप्नं रेखाटतात. पण आम्हाला मात्र या मुलींकडे ..... त्यांच्या धडपडीकडे नुसते पाहावे लागते. हे जग, हे जीवन स्त्री आणि पुरुष दोघांचे आहे. आयुष्याच्या पहिल्या वळणावर भेटणारा पुरुष बापाच्या रूपात असतो. वडील समजदार असतील तर मुलगी शिकू शकते. माझे वडील शिकलेले विचार करणारे आहेत. त्यामुळे मी शिकू शकले. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवली. त्यांचं प्रोत्साहन मिळालं. पण आज ?
 "मॅडम, माझं बुर्का पहेनणं पाहून माझ्याच कॉलेजातल्या माझ्या जमातीच्या मुलीही आता बुर्का पहेनू लागल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रश्न उभे आहेत असा भास मला होतो. त्याचंच दुःख मला खूप बोचतं.. खूप बोचतं."
 मोहसिनाच्या आयुष्यात जे प्रश्न उभे राहिले ते अनेक जणींच्या आयुष्यात निर्माण होत नसतील कशावरून? पण हे प्रश्न सोडवायचे तर ते समाजात राहून संवेदनशील व्यक्तींची संख्या अधिकाधिक वाढवूनच सोडवावे लागतील. एकाची वेदनामय संवेदना असहाय हुंदका बनते. तर अनेकांची वेदनामय संवेदना प्रकाशाची वाट शोधते. माझं समजावणं मोहसिनाला आज नाही तरी केव्हा तरी पटेल.
 पण खरंच पटेल ना ?

   
लेकीची बाट माईला !

 माझ्या सासूबाई वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी आमच्या घरी रहायला आल्या.
 मी कॉलेजातून घरी आले तर दादाजींच्या खोलीत दादीजींचाही पलंग टाकलेला.
 मला जवळ बोलावून त्यांनी सांगितलं, "चटण्याफिटण्या करून इथे माझ्या जवळच्या देवळीत ठेव. सकाळी कालिजात जाण्याअगुदर दोन दुधातल्या दसम्या टाकून माझ्या उशाशी ठिवत जा. दसम्या, दही-दूध, चटणी मला चालतं आणि भावतंही ! म्हाताऱ्याला तुझ्या नि तुझ्या बाईच्या हातचा वरणभात, स्वयंपाक चालेल. पुरुषांचं बरं असतंया. त्यांनी देवधर्म नाही केला तरी देव रागावत नाही. पण बायांचं तसे नसते गं. त्यांना समदं पाळावं लागतं. सोताचं नि नवऱ्याचं पन."
 हा दशमी, चटणी, दह्याचा रोजचा वरवा नेमका कधी बंद झाला आठवत नाही.
 एकदा पुरण केलं होतं. नानीनं दादीजींना पोळी खाण्याचा आग्रह केला. पोळी खाण्याचा. मग पुरणात दुधाचा थेंब टाकून ते जेवण चाललं. असं करता करता दादीजी घरात छान रमल्या. आमची शेवंतामावशी दोघा म्हाताऱ्यांची सेवा मनोभावे करी. हौशीने म्हाताऱ्या केसांची जुडी बांधून देई. पायाला तेल लावून वाटीनं घाशी. दोघींची घट्टमिट्ट गट्टी जमली. दादाजींची सेवा सून - लेक काय करतील अशी सेवा करी.
 एक दिवस एक म्हाताऱ्या बाई दादीजींना भेटायला आल्या. बोलताना तेढा सवाल विचारून गेल्या. "तुमची सून तर जातपात पाळत न्हाई. करमतं का इथं ? बरं निभतं का ? आणि इथेच राम म्हटलात तर आम्ही रडायला कुठं यावं ? इथं की मोठ्या घरी ?"
 दादीजींचे आंधळे डोळे भरून आले. त्याही तितक्याच तेढेपणाने उत्तरल्या. "जलमताना जात कपाळावर लिहून तर देव पाठवत नाही. आणि माझ्या लेकराच्या घरी एवढी सत्ता असताना मला न करमाया काय झालं ? आता रडायचं म्हणाल तर, आप मेलं नि जग बुडालं. मी थोडीच पहायला येणारेय की तुम्ही रडता आहात की नाही ते! आणि खरंखुरं रडता की नाही ते!"
 त्यानंतर काही दिवसांची गोष्ट. दुपारचा चहा मी केला नि पितळीत घालून दादीजींच्या जवळ चटईवर ठेवला. दादीजींच्या हाताला ती पितळी दाखवून दिली. दादीजींचे डोळे पूर्ण विझले होते. पितळी अधरपणे हातात पकडताना त्यांनी नेहमीचा प्रश्न केला. "शेवंताबाई, तुबी चा घेतला जणू ?"
 "व्हय बाई. मी बी चा घेतेय. पन तुमच्या चटईवर मी बसल्याली न्हाई बरंका. तुमी बिनघोर चा प्या. " शेवंताबाईनी उत्तर देताच दादीजींनी चहा चटईवर टेकला

नि हातांनी शेवंताबाईला चाचपडू लागल्या.
 "शेवंताबाई, तसं नगं म्हणूस हितं माझ्या शेजारी ये आनि चा पी. पोटची लेक आज दूर ऱ्हायली तू पोटची होऊन सेवा करतीस. लेकीचा बाट माईला कसा गं व्हईल ? आपन मानसासारखी मानसं हातापायांनी सारखी, उगा देवानं काहीतरी मागं लावलंया म्हणून जातपात पाळायची. आता देवाच्या दारात बसलेली मानसं आम्ही आम्हाला कसला आलाय विटाळ नि चांडाळ ?"
 शेवंतामावशीला जवळ बसवून एका चटईवर दोघी चहा प्यायल्या.
 वयाच्या पंच्याहत्तरीनंतर मनाला पटलेला हा विचार त्यापूर्वी कधी सुचलाच नसेल का त्यांना? आणि सुचणार तरी कसा? त्यांनी आयुष्याच्या अखेरीला शोधलेली ही उत्तरं त्यांना तरुणपणात सुचली नसतील का ? आणि सुचणार तरी कशी? हातभर घुंगटा आडून बाहेरचं आभाळ पहाण्याची संधी मिळाली असेल का त्यांना ? आपल्याच प्रश्नांना आपणच दिलेली उत्तरं, मुखावाटे बाहेर पडायला सत्तरी ओलांडावी लागते .
 असेच घडणार असेल तर मग आपल्या तरुणाईचे संदर्भ वर्तमानाशी कधी जोडणार आपण ? आणि कसे ?
 आज धर्मांधता विरोधी परिषदेची धावपळ करताना, रोजची वर्तमानपत्रे वाचताना या नि अशा अनेक आठवणी आठवतच राहतात.
 पण आठवणी नुसत्या आठवत बसून कसे चालेल? मोहसिना आणि दादीजींच्या मनातले, जीवनातले प्रश्न माझेही आहेतच की !
 ते सोडवायचे तर त्यांचे हातही हाती हवेत.
 हे जग आपल्या दोघांचे आहे. स्त्री पुरुषांचे आहे !
 हे प्रश्नही आपल्या दोघांचे आहेत !

܀܀܀