वाहत्या वाऱ्यासंगे/उमलतीचे रंग , गंध

विकिस्रोत कडून

उमलतीचे रंग, गंध



 गाभुळलेली.. गदरलेली चिंच . आकडा कसा भल्यापुऱ्या दिवसांचा . वरची टणक साल गरापासून सुटत सुटत आलेली आणि गच्च भरलेल्या आंबट गराचा थर आता गोडुला व्हायला लागलेली. हिरवट रंगावरची गुळचट गुलाबी सायीची चव ज्यांनी चाखलीय त्यांनाच गाभुळ्या चिंचेचे वेडे कवतिक समजून घेता येते . ही अशी चिंच पुण्याच्या बाजारातदेखील मिळत नाही. येता जाता चिंचेची झाडं हेरावी लागतात नि नेम धरून दगडही मारावे लागतात . अशी चिंच एकदा चाखलीत ना, तरी आयुष्यभर ती जिभेवर चांदणी गोंदवून जाते.
 या गाभुळ्या चिंचेची चव नि आपलं बालपण ! जणू काही देठाच्या जोडकैऱ्या. बालपण हे नेहमी आठवत बसावे असे . या वालपणाची गोडी भल्याभल्यांनी गायली आहे . कविराज भवभूतीसारखा कवी तर 'तेहि नो दिवसो गतः' अशी हळहळ व्यक्त करतो. तर आधुनिक कविश्रेष्ठ केशवसुतांना बालपणीचे सुख हरपल्या श्रेयासारखे वाटते.
 पण हे सतत झेलत रहावे वाटणारे बालपण किती जणांच्या आणि किती जणींच्या वाट्याला येते? कळायला लागतं तेव्हापासून शेणाच्या मागे टोपली घेऊन हिंडताना, भर उन्हात शेरडं चारताना , हात दुखेस्तो गोवऱ्या नि भाकरी थापताना, अंगणातल्या बाभळीवर हिरवे पोपट आणि गाणाऱ्या साळुऺक्या कधी येऊन जातात तेही कळत नाही! मग त्यांनी घातलेली साद कानावर कशी पडणार?
 बालिकावर्षाच्या निमित्ताने या पोरीसोरींशी गप्पा मारताना, त्यांच्यासोबत हिंडताना, आलेले अनुभव नि काही धागे माझ्या लहानपणीच्या अनुभवाचे. या अनुभवांच्या ठिपक्यातून एखादं अंधुक चित्र आकार घेईल कदाचित.

܀ ܀ ܀
एक
 जानेवारीतली सकाळ . जीपमध्ये पाचगावच्या नऊजणी , मी नि सुनीता. शाळा अर्ध्यातून सोडणाऱ्या बालिकांचे दोन दिवसांचे शिबिर आहे . त्यासाठी 'मानवलोक 'च्या वतीने काही मुलींना घेऊन आम्ही निघालो आहोत . जीप उदगीरच्या दिशेने धावतेय . आवाज फक्त धावणाऱ्या टायर्सचा. मागे वसलेल्या मुली दहा त चौदा या वयोगटातल्या पण आभाळ भरून आल्यावर कसे सारे विडीचूप असते तसे वातावरण मलाच कोंडल्यासारखे होते. आपणच प्रश्न विचारावेत असा विचार करून मी सुरुवात करते. वर्गातली शहाणी मुले कशी पटापटा उत्तर देतात तशी नावाची चळत माझ्यासमोर कोसळते. नर्मदा कवतिकराव भिसे, रहाणार कुंटेफळ. संगीता तुकाराम माळी, रहाणार पाटोदा, अलका रघुनाथ खरात, रहाणार भावठाणा : वगैरे वगैरे. साऱ्याजणी अर्ध्यात शिक्षण सोडून घरी बसलेल्या.
 मुलींनी भराभरा नाव सांगितली नि परत टायर्सचा आवाज कानात घोंगावू लागला. मग सुनीतानं गाण्याच्या भेऺड्या खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला सुनीतां नि माझीच जुगलबंदी सुरू होती. पण माझे गाडे ए या अक्षरावर अडले आणि एकीनं, किनऱ्या आवाजात सूर लावला -
 ए जी ओ जी लोजी सुनोजी
 वन टू का फोर फोर टू का वन्

 पोरींना सिनेमाची गाणी अ पासून ज्ञ पर्यंत पाठ होती. पन्नाशीतल्या भाभी 'मेरे सामनेवाली खिडकीमे एक चाँदका टुकड़ा रहता है.' ठेक्यात म्हणताना पाहून त्यांची भीड चेपली असावी. मग त्यांनीही सिनेसूर, लावला, उदगीरच्या अलीकडे हापशाचा पंप दिसला आम्ही गाडी थांबवला. आंव्याच्या सावलीत शिदोऱ्या सोडल्या. शिळी भाकर, कांद्याचा झुणका, तळलेल्या मिरच्या यांच्यासोबत गप्पा पण रंगल्या.
 हेमा सांगत होती, " मास्तर लई मारकुटा व्हता. पाटी न्हेली नाय की लई मारायचा नि मायला पाटी मागितली की ती पाठीत दणके घालायची. म्हनायची खायला भाकर न्हाई नि पाटी कुठून आनू ? आमच्या अण्णाले रोज दारू लागती. मग पैसा कुठून येनार? चौथीत गेलेच न्हाई साळला पन आता लई पस्तावा होतुया. रातच्या शाळत जावसं वाटतं. येईल का व मला आता शिकायला..वसल का डोसक्यात समदं ?"
 अलकाची आई कामाला जाते. तिचा बाप मुंबईला काम शोधायला गेला, तो माघारी आलाच न्हाई. चारपाच वर्स वाट पाहिली मग म्होतूर लावला . सावत्र बापाची तिला भीती वाटते. आईला झालेली लेकर कोण सांभाळणार? अलकाची तिसरीतूनच शाळा सुटली. आई म्हणते, तुझ्या लगनाचा भार या मानसान डोसक्यावर घेतलाय. तुजा बाप म्हनून जलमभर तुला सावली देनार हाय. मग त्याच्या लेकरांसाठी तू वी झीज सोसावा हवी, अलकाला पुस्तक वाचायची आवड आहे. पण पुस्तक कोण देणार तिला ?
 मंगू, ठकू नि कावेरी तिघीजणी सातवीतून घरी वसल्या. का तर शहाण्या झाल्या म्हणून. शहाण्या पोरी शाळेत गेल्या की विघडतात असं पालकांना वाटतं. पालकांना म्हणजे म्हाताऱ्या आजाआजींना. आईला मात्र शाळेत शिकवायची हौस आहे. पण सासूममोर कशी बोलणार? नि तिचे ऐकणार तरी कोण? तरीही तिने नवऱ्यामागे लागून आपल्या लेकीला शिवणक्लासात घातले. तिचे पाहून दुसऱ्या दोघी तयार झाल्या.
 कावेरी उत्साहान विचारते आहे. "ताई आम्हांला सातवीला बसवाल का ? आम्ही घरी अभ्यास करु. तुम्ही विंग्रजी शिकवाल ना आम्हाला ?
 गप्पांच्या ओघात आम्ही उदगीरला पोचतो. तिथे तर दोन अडीचशे चिमण्या मुक्तपणे चिवचिवताहेत. आमच्या चिमण्याही आमचे हात सोडून त्या थव्यात मिसळून जातात
 आम्ही परतीच्या वाटेने पोरीची अखंड बडबड. सगळ्यांना कंठ फुटलेले. बदामी डोळ्यांची रेखा विचारते, "भावी, मी बंगाली गाना गाऊ?
 आसामात वाढलेल्या या वंगाली-मुलीची भापा म्हणजे मराठी-हिंदी असमिया यांचे मजेदार मिश्रण आहे... ती गाणं सुरू करते. त्या गाण्याचे शब्द ओळखाचे नाहीत पण तो शांत, धीमा तरीही वाणासारखा वोचरा सूर नक्कीच वंगाली आहे
 "ताई, खूप वेस्ट वाटलं आम्हांला. लई मज्जा आली. पुना कवा शिविर भरवणार? आमची आठवण ठेवा हं." त्यांचे बोल ऐकताना माझ्या मनात दाटून येत वाटतं, दान दिवस मोकळ्या वाऱ्यात खुललल्या या पोरी गावी गेल्यावर आपल्या मनाच्या खिडक्या परत बंद करून घेतीला की मोकळ्या ठेवतील?
 आणि जरी माेकळ्या ठेवाव्याशा वाटल्या तरी या दोन दिवसांच्या मोहरणाऱ्या हवेन टवटवीत झालेली मनं . पूर्वी कधीही न अनुभवलेल्या दुःखानी पेटतील का?
܀ ܀ ܀
दोन
 टी. व्ही. च्या बावीस इंची पडद्यावर युनिसेफ इंडियाने तयार करवून घेतलेली नकुशा ही फिल्म सुरू आहे. समाेर माेना आणि तिची मैत्रीण दंवऻच्या कोवळ्या थेंबासारखी नकुशा विलक्षण गोड तरीही फिकुटलेला नितळ चेहरा आणि शिकेकाईच्या वियांसारखे काळेभोर चकमकीत डोळे. ती निरागसपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते आहेत. ती कधी हट्ट करीत नाही, कारण मग मार मिळतो आणि झोपल्यावर स्वप्नही पडत नाहीत, मनातून खूप शिकायचं आहे पण शिकणार कशी? घरातली कामं कोण करणार? एखाद्या चिमुकल्या यंत्रासारखे दिवसभर घरघरत रहावचे या अशा जगण्याबद्दल मनात खेद नाही. कारण खंत करून उपयोग काय? या नकुशाच्या निरागस भोळ्या दुःखाने मोना चक्रावून गेली आहे. नकुशाच्या निमित्ताने भारतातील वालिकांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीचं दर्शन घडवणारी आकडेवारी वाचून, सुस्थिर आयुष्याची सवय झालेल्या माेनाला आतून कंप सुटला आहे.
 पाच पोरांच्या पाठीवर जन्मली म्हणून घरादाराला नकोशी असणारी नकुशा आणि आईबापांना मुलीची हौस म्हणून जन्मल्यापासून फुलापरांत वाढलेली मोनिका किंवा राधा... अरुंधती- सायली... अमृता... वगैरजणी... खरं तर ही अशी फिल्म मोनिकाच्या पाहण्यात तरी कशाला आली असती? अत्यंत उच्चभ्रूंच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नकुशासारख्यांची चिंता कोण करणार ?
 मोना चौदापंधराची आहे. घरात आईवडील उच्चशिक्षित. चार जणांचे चौकोनी कुटुंव मोना आदवशीर आहे. खूप वाचते. तिच्या सर्व मैत्रिणी तिच्याच परिस्थितीच्या वर्तुळातल्या आहेत. तिने जर्मन भाषेचा अभ्यास सुरू केला आहे. आपण काय करायचे हे ठरविण्याची मोकळीक तिला मिळालेली आहे. तिची मैत्रीण राधा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्टेड आहे. तर मोना, ईशा, राधा अशांचे बालपण कॉमिक्स, व्हिडीओ गेम्स, आईपपांबरोबरचे आउटिंग, इत्यादींनी वेढलेले.
 मोनाची परीक्षा झाल्यानंतरच्या सुटीतली गोष्ट. एक दिवस मम्मीने फर्मान काढले. मोना, आज रसोई तू कर. डाळभाताचा कुकर लाव आणि कणिक भिजवून ठेव.
 मोनाने मन लावून तांदूळ निवडले. हरभऱ्याची वाटी भरून डाळ घेतली आणि कुकरच्या भांड्यात पाणी न घालताच कुकर गॅसवर चढवला. अर्ध्या तासाने घरभर जळाल्याचा वास. व्हॉल्व्ह उडून गेलेला. हा गोंधळ ! किता शिकलीस तरी स्वयंपाक सुटणार आहे ? तुझ्या दादीजी बघ. कॉलेजमध्ये शिकवतात. भाषणं देतात पण स्वयंपाकही करावा लागतो. सासूच्या हाताखाली नांदायचं तर स्वयंपाक हा यायलाच हवा. नाही तर उद्धार होईल मम्मीपपांचा !
 "हे वघ, मोनाला स्वयंपाक जरूर शिकव. पण मुलीच्या जातीला स्वयंपाक यायला हवा म्हणून नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला आपले अन्न शिजवता तयार करता यायला हवे, म्हणून शिकव" मी मोनाच्या आईला मध्येच आडवित सांगितले आणि दुपारी येताना नकुशा ही माहितीवजा फिल्म दाखवण्यासाठी घेऊन आले. मोनिकाबरोबर तिच्या आईनेही नकुशा पाहिली. संध्याकाळी मोनिकाचे पपा घरी आल्यावर झालेला संवाद असा.
 "पपा, शैला दादीजीनी टी. व्ही. फिल्म आणलीय. मी, मम्मी आणि राधाने पाहिली फिल्मचं नाव नकुशा आहे."
 "नकुशा ? हे काय बुवा ? - पपा.
 "ती मुलगी तिच्या मम्मीपपांना नकोशी होती. त्यांना मुलगा हवा होता. मुलगा म्हणजे फॅमिली लँप ना ! आपल्या देशात मुली नकोशाच असतात असं दाखवलंय. खरंय ते ?"
 "तुम्हाला तर मी खूप आवडते ना? पण या फिल्ममध्ये झोपडपट्ट्या, खेडी, वस्त्या यांतील मुलींच्या नि त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत , सर्वच म्हणतात की मुलीला शिकवून काय फायदा? त्या तर परक्याच्या घरी जाणार . शिवाय हुंडा द्यावा लागणार . मला पण हुंडा द्यावा लागेल पपा ? मोनाचा प्रश्न .
 "तू आधी शिक. आणि मग तूच ठरवायचंस, तूच म्हणालीस तर द्यावा लागेल !" पपा हसत म्हणतात . पण हसताना त्यांचेही डोळे पाणावतात .
 मोना पपांचा हात धरून म्हणते, "पपा, ती फिल्म पाहताना वाटलं की मी खूप खूप नशिबवान आहे . कारण मला असे प्रश्न कधी पडलेच नाहीत. बेकबेच्या पाढयासारखी मी पुढे पुढे सरकतेय . पण आज नकुशा पाहून मन खूप उदास झालेय. माझ्यासारख्या कितीजणी असणार? खूप थोड्या . मग वाकीच्यांना आमच्यासारखं सुखी आयुष्य कधी मिळणार? की कधीच नाही? पपा बोला ना!" पपांजवळ उत्तर कुठे आहे?
܀ ܀ ܀
तीन

 अवतीभवती बोडके डोंगर. वुरखुंडी झुडपेही दिसत नव्हती आणि शेती मातीऐवजी दगडगोट्यांनी भरलेली. अशा शेतात पिकावं तरी काय? नि किती? या गावात मतदारांची संख्या आठशे सत्तावन्न. म्हणजे दोनशे उंबऱ्याच गाव. पण सध्याला फक्त शेसव्वाशे माणूस गावात आहे. वाकी सगळे साखर कारखान्यावर कामाला गेले आहेत . या गावात संस्थेने बालवाडी वांधली आहे. विहीर वांधून दिली आहे . हापसा लावला आहे. डोंगरघळीतले पाणी अडविण्यासाठी वांध बांधले आहेत. इथेच कॉलेजच्या पोरांचे राष्ट्रीय सेवा शिविर घेतले. दोन दिवस मुलीही आल्या. शर्टपॅट , पंजावी ड्रेस, स्कर्ट अशा वेशातल्या मुलींभोवती गावातल्या वालगोपाळांचा वेढा पडला. डोईवर केसांना तेल नाही. भुरकटल्या झिपऱ्या सावरत टुकूटुकू नजरेने गावातल्या पोरी शहरातल्या मुलांना न्याहाळत होत्या.
 कुणाच्या अंगावर अंडरपॅटवजा चड्डी नि वर ढगळ पोलका , फाटका झगा , ठिगळांचं परकर पोलकं , शाळेत जाणाऱ्या दोघीचौघीच . चौथीत फक्त तीन मुली शिकतात . पटावरची संख्या दहा पण सातजणी आईबापाबरोबर कारखान्याला गेलेल्या . एकशिक्षकी शाळा . बालवाडी सुरू झाल्यापासून मुलं शाळेत जास्त येतात. मुलींची संख्या पण वाढली आहे, असं मास्तर सांगत होते .
 आम्ही गोल करून वसलो, गाणी सांगितली. मुलींशी दोस्ती केली. गप्पा केल्या, त्यांना विचारलं, "तुम्हाला शिकायला आवडतं का?" सगळ्यांचे चेहरे कोरे .
 "एकदोन शिकलं की खूप मोठं होता येतं . कॉलेजच्या मुलींसारखं शिकायचं ना मग?" एक विद्यार्थी त्यांना विचारतो .
  "मास्तर लई मारतात."
 "माय म्हंती शिकून चुलीम्होरच बसायचं . शिकून काय मिळणार आहे ? माय म्हंती की तू शाळेत गेल्यावर न्हानग्याला कोन पाहील ? तिला शेतकाम कराया जावं लागतं"
 दुसरी सांगतेः खेड्यातल्या सहासात वर्षांच्या मुलीला झाडझूड भाकरी करणे . धुणं धुणे ही कामे करावीच लागतात .
 आम्ही गप्पा मारीत असतानाच गावातल्या आजीवाई आल्या. त्या सांगू लागल्या . "ताई , या पोरी नसीबवान हाईत. आमच्या येळला चारपाच वरसाच्या पोरीचं लगीन होई . नि तिला सासूच्या घरी नांदावं लागे . चला मी तुमाला पाणवठा दावते . हा समुरचा डोंगर उतरून खाली निळामाईच्या डव्हाचं पाणी आनावं लागे. खडा डोंगर भरली घागर घेऊन चढताना तेराचवदा वर्पांच्या पोरीचा जीव , तिच्या कवळ्या छातीत मावत नसे . चार ठिकाणी घागर भुईला ठेवावी लागे. नव्यानं नांदाया आलेल्या पोरीला पाणी भरता भरता नाकी नवं येत. दरसाली निळाईचा ढव दोनतीन पोरींचा वळी घेई . गावची माणसं म्हणत तिथ आसरा हाईत . त्यांना कवा या पोरी खायला लागतात. उगा वोलायची रीत व्हती! खरं तर पान्यापायी पोरी ढवात जीव बुडवून गार होत!
 "आता बरं हाय हापसा आलाया. हीर झाली . साळा आली पन साळंत एकदोन शिकून पोरींना कामधंदा थोडाच येणार हाय? सडासारवण, भिंती हुव्या लिंपायच्या चूल कोरायची, निंदणं खुरपणं करायचं... ही असली कामं जलमभर करावी लागतात. तिथं असल्या एकदोनचा काय उपेग? ताई तुम्ही वायांना परपंचाचं शिक्षण देणारी साळा काढा, मग आमी वी येऊ शिकायला." आजीवाई दाईकाम करतात त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे. त्यांची नात शहरांत शिकायला ठेवली आहे:
 "आजी , तुम्ही वरी नातीला शाळेत धाडलीत? तीही शहरात शिकायला ठेवलीत?" मी विचारले.
 "शिक्षण वाया जात नाही हे मला वी कळत. शिकली तर नवराबी शिकलेला मिळंल . नवऱ्यानं पीठ आनलं तर वाईन त्यात चिमूटभर मीठ घालावं म्हंजी भाकर चवदार व्हती." आजीबाईंनी उत्तर दिले .

܀ ܀ ܀
चार
 आम्ही नववीत होतो तेव्हाची गोष्ट श्रावणातले हिरवेगार दिवस. गरुडबागेतल्या प्रचंड बकुळवृक्षाखालची फुले मधल्या सुट्टीत वेचून आणण्यासाठी आम्ही डव्यातली पोळी अक्षरशः तोंडात कोंबून फाटकावाहेर पळत असू. अजूनही त्या डव्याला वकुळीचा आर्त कोमल गंध येत असेल ! धाप लागेस्तो पळत पळत शाळेत पोचायचो. नेमकी घंटा होऊन जोशी बाई वर्गात आलेल्या असायच्या. बाई वरुन नारळासारख्या टणक खरवरीत पण आतून मावाळू. खोबऱ्याच्या सायीसारख्या प्रेमळ. त्या तोंडानं ओरडत, पण डोळ्यातून हसत. त्यांची शिक्षा करण्याची पद्धत मोठी गोड. शिक्षा म्हणून गाणे म्हणायला लावायच्या किंवा कविता पाठ करायला लावायच्या.
 तर अशाच एका श्रावणातल्या सोमवारी विमल उशिरा शाळेत आली. विमल खूप हुशार. गणितात पक्की, इंग्रजीत नेहमी पहिला नंबर. बहुधा जोशीसरांचा तास असावा. तिने नेहमी पहिले यावे ही त्यांची इच्छा. त्या मायेपोटी ते तिला अद्वातद्वा रागावले. पाच पट्ट्या हातावर खाऊ म्हणून दिल्या. विमल ओठ गच्च मिटून मारखी रडत होती. आम्ही मैत्रिणींनी खोदून खोदून विचारले पण ती गप्पच. शाळेतून परतताना तिने हळूच हाक घातली, शैला आपण बरोवर जाऊ या उषा मिनीला पुढे जाऊ दे. त्या निर्मनुष्य रस्त्यावरून आम्ही दोघीच चालत होतो. विमाने तिला उशीर होण्याचे कारण सांगितले . विमाची आई सकाळी बाळंत झाली , मोठी प्रभा अकरावीच्या अभ्यासासाठी मैत्रिणीकडे गेलेली. दाई वेळेवर आली नाही. आईचे बाळंतपण विमललाच करावे लागले. अभ्यास वुडू नये म्हणून प्रभा स्वयंपाक करून शाळेत आली. विमलला मात्र आई नि वाळाचे सगळं उरकून शाळेत यावे लागले. श्रावण सोमवारी सकाळची शाळा असे. विमाच्या आईचे ते आठवे बाळंतपण होते. विमा मॅट्रिकला पहिल्या वर्षात उत्तीर्ण झाली. पण ती पुढे शिकू शकली नाही.
 आम्ही तिला रोझी म्हणत असू खरं नाव सरोजा गुलाबी गोरी कातीव नाक फुगीर गाल, काळेभोर डोळे, उभट चेहरा, ती नक्कीच सुंदर होती. कारण मला आठवते तशी ती नाचात नेहमी पुढे असायची. नाटकात सीता, कृष्ण, राधा अशा खास भूमिका जणू तिच्याच असल्यासारख्या तिला मिळत. मी एकदा रडले होते तर वाई फिसकरल्या होत्या की राधा कधी नकटी असते का म्हणून तिचे कपडेही नेहमी तिला खुलावणारं असत. कापडांचा पोत साधाच असे. पण टोमॅटो कलर, फिराझा कलर असले रंग आम्हाला तिच्याकडून कळत. तिचे घर गावाबाहेर होते. ती सायकलवरून येई. तिच्याभोवती एक धुक्याचे गूढ... जादुई वलय अधिक दाट होऊ लागले. ती कुणाशी तरी नेहमी बोलते, कुणी तरी तिला सायकलवरून पोचवायला येते. ती मुद्दाम उशिरा घरी जाते, वगैरे वगैरे.. एकदा आम्ही डवा खात वसलो होतो शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीजवळच्या वुचाच्या झाडाखाली. इतक्यात एक वारीकसा दगड भिरभिरत आमच्या मध्यात येऊन पडला. त्या दगडांभोवती कागदाची घडी दोऱ्याने घट्ट बांधलेली होती. उषाने तो दौरा सोडून कागद उलगडला. आत चिठी होती आणि नाजुक गुलावी रंगांची सॅटिनची रिवन
 प्रिय सरू,
 काल तू माझ्याकडे पाहून हसली का नाहीस? मला रात्रभर झोप आली नाही. तुझं माझ्यावर प्रेम असलं तर परवाला ह्या गुलावी रिवनचा वो तुझ्या वेणीला वांध.
तू फार फार सुंदर दिसतेस.
 तुझ्या यादमध्ये तळमळणारा.

राजू

 मग त्या पत्राचे चोरटे वाचन.
 "हिलाच बरी पत्रं येतात?" उषा .
 "आपण तिच्याशी बोलणंच बंद करू वाई. आमच्या घरी नाही बाई असली मैत्रीण चालत. ब्राम्हण असली म्हणून काय झालं!" आशा म्हणाली. शेवटी रोझीवरचा बहिष्कार पक्का झाला. आता उमगतंय की त्यावेळी प्रत्येकीलाच मनातून वाटलं होतं की आपल्यालाही असे पत्र यावे , कुण्या तरी राजकुमाराचे !
܀ ܀ ܀
पाच
 त्या घरात कुठलेसे कार्य होते म्हणून मी गेले होते, घर माणसांनी भरलेले. गच्चीवर स्वैपाक सुरू होता. खाली चहापाणी, नाश्ता चालू होता. दोन चटपटीत मुली नवे फ्रॉक घालून चुटुचुटू काम करीत होत्या. झाडून काढ , फरशी पुसून घे, कपबशा विसळून दे. क्षणाची फुरसत नाही. थोडी उसंत मिळाली तर कुणाचे तरी वाळ कडेवर दिले जाई. त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटत होते आणि कीवही येत होती. कारण मला पक्की खात्री होती की त्या शाळेत जात नसणार. तिथे जमलेल्या सर्वच जणींना त्या पोरींचे खूप कौतुक वाटत होते. कार्य संपल्यावर एकजण परत जायला निघाली. तिने धाकटीला बोलावून पाचची नोट तिच्या हातात कोंबत म्हटले . "रेखा ,तू नि अलका बांगड्या भरा."
 रेखाने मूठ गच्च आवळून पैसे घेण्यास नकार दिला.
 " नको माशीजी. आम्हाला ताईंनी रोजावर ठरवलेले आहे. आमच्या दादांना असे पैसे घेतलेले आवडत नाहीत." मला तिच्या बोलण्याचे कौतुक नवल वाटले. मी दुपारी तिच्याशी गप्पा मारल्या तेव्हा त्या पोरीबद्दलचे कौतुक अधिकच वाढले.
 रेखा- अलकाचे वडील सिडकोमध्ये कारखान्यात काम करतात. एका अपघातात ते दोन वर्षापूर्वी सापडले. त्यामुळे ते बसून जमेल तेवढे काम करतात. रेखा सातवीत तर अलका पाचवीत आहे. रेखाची आई घरबसल्या साड्यांना फॉल लावणे वगैरे काम करते. सुट्टीत काय पुस्तके, वह्या, शाळेला गणवेश यासाठी त्या पैसे जमवीत आहेत. रेखाला नर्स व्हायचे आहे. तर अलकाला कॉलेजमध्ये जायचे आहे. रेखाचा धाकटा भाऊ नऊ वर्षाचा आहे. पण तो असे काही काम करीत नाही. आईच त्याला काम करू देत नाही. तो पैसे कमवायला लागला तर त्याला पानतंबाखूसारख्या वाईट सवयी लागतील आणि अभ्यासावरचे लक्ष उडेल अशी तिला भीती वाटते."
 "तुम्हाला वाईट सवयी लागतील अशी भीती नाही का वाटत आईला?" माझा प्रश्न.
 "अं हं. आम्ही आईला विचारल्याविगर कुठंच जात नाही. इथंसुद्धा आई सोबत येऊन ठराव करून गेलीय. अन आई म्हणते की दोनतीन वरसांनी आम्ही शान्या झाल्यावर ती दुसरीकडे कामाला धाडायची न्हाई. तवा आताच पैसे जमवून बँकेत ठिऊन द्यायचे."
 "तुमच्या घरात शिकलेले कोण कोण आहेत?" मी विचारते.
 "आमची आई सातवी पास हाये. धाकटी मावशी घाटीच्या दवाखान्यात शिष्टर आहे . आन मामा कंपाउंडर हाये.आमचे दादा नॉन मॅट्रिक हायेत. आमच्या मावशीला खूप पगार मिळतो." रेखाने उत्तर दिले.
 कधी कधी वाटते , अवतीभोवतीचा अंधार कधीच संपणार नाही. खेड्यापाड्यातल्या , झोपडपट्टीतल्या लेकीबाळींचे जिणे कधीच बदलणार नाही. परंतु असा एखादा जरी अनुभव आला तरी मनाला दिलासा मिळतो, की क्षितिजावर हालचाल सुरू झालीय . उजाडेल.. किमान परवा तेरवा तरी !
܀ ܀ ܀
सहा
 तीनसाडेतीनशे वालिका. त्यांचा चिवचिवाट.. कलकलाट सुरू आहे. त्यांना गप्प करण्यासाठी पाचसहा संयोजक जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. पण आज दावण सोडून मोकळेपणी उंडारणारी ही वासरं जाम ऐकायला तयार नव्हती. सोळा सतरा गावच्या मुली एकमेकींशी गप्पा मारण्यात दंग होत्या. त्यांच्यासमोर मला व्याख्यान होते. खरे तर या पोरींसमोर व्याख्यान देणे ही त्यांना नि मला शिक्षाच होती. मी त्यांच्यासमोर बडबडगीते सादर केली. पण तीही त्यांना भावली नाहीत. कारण गाण्यातल्या राणीची बाग, चॉकलेट, जिराफ इत्यादी गोष्टी त्यांना अपरिचित होत्या. मग मी ठरवले की चक्क गोष्ट सांगायची. गोष्ट सुरू झाली.
 " एक मुलगी होती, ती अगदी लहानशा खेडयात रहायची. तिचे वडील पाटलाच्या शेतात काम करायचे. आई पण लोकांच्या शेतात मजुरीला जायची. तिला एक भाऊ होता. ती शाळेत जाई. आणि मुलगी? ती काय बरं करीत असेल?"
 "न्हानग्याला सांभाळत असेल..."
 "कवाबवा साळत जात असेल..."
 "माई बरुबर कामाला जात असेल..."
 मुलींची सामूहिक उत्तरे.
 "ती मुलगी लहानपणी शाळेत जायची. पण तिच्या पाठीवर लहान बहीण जन्मली. तिला सांभाळण्यासाठी ती दुसरीतून घरी बसली. पण तिची वाचनाची आवड कमी झाली नाही. दिसेल तो कागदाचा तुकडा घेऊन ती वाचत बसे.
 "ती घरची कामं करी. कोणची वरं?" मी.
 "सकाळी उठून अंगण झाडायचं.
 भाकरी करायच्या.
 धुण-घेऊन नदीला न्यायाचं.
 माई बरुबर न्हानग्याला घिऊन रानाला जायचं ...
 सकाळी शेताला जायांच.
 सांजच्याला सरपन
 बाभळी साळून आनायच्या.... मुली
 "तर ही मुलगी. तिचं नाव आपण सरू ठेवू या, ती सगळी काम करायची सकाळी उठून माय चा करी. सरूला नि तिच्या वडिलांनी देई
 तिच्या भाऊला माझं वाक्य संपायच्या आत सामूहिक उत्तर
 दुदू मिळे
 "दुधात पानी घालू ना?" मी
 "व्हय." मुली.
 "दुधात पाणी घातलं नाय तर म्हशीला दीठ व्हती. तिचं दुदू आटतं." एक धिटुकली उभी राहात मला कारण सांगते.
 भाऊला दूध नि सरुला चहा. आईचा सरुला राग येत असेल का गं?" माझा प्रश्न.
 "न्हाई SS" सामूहिक उत्तर
 "का गं?" पुन्हा माझा प्रश्न.
 "पुरसांची गोष्ट वेगळी असती... बायांच काय! भाऊ वंसाचा दिवा लावतो. म्हातारपणी मायवापाला सांबाळतो. तेची ताकद आताच वाढायला हवी.... उत्तरे
 "सरूला पण तसंच वाटायचं? की बाई बिनकामाची आणि बिनमहत्त्वाची असते म्हणून" - मी
 "न्हाई" पुन्हा कोरस
 "मग तिला काय वाटायचा माझा प्रश्न"
 "बाई घरात नसल तर घरची कामं कोन करील ?
अन्न कोन शिजवील?
लेकराला जलम कोन देईल?
बाई बी महत्त्वाची असती, पन पुरसापरीस कमी!" मुली.
 "तर सरूला वाटायच आपण खूप शिकावं, चार पैसे कमवावे, चित्रांची पुस्तकं वाचावी, निळ्या रंगाची फ्रॉक घालून शाळेत जावं, गाणं म्हणावं, उड्या माराव्या, शिवणापाणी खेळाव, भाषणं द्यावीत, मोठं होऊन इंग्रजी शिकावं डॉक्टर व्हावं, रेडिओत भाषणं करावीत ....
 "वाटायचं ना?" मी.
 "होऽऽ" मोठा सामूहिक आवाज.
 "तर अशी ही आमचा सरू रात्रीच्या शाळेत जाऊ लागली. फाडफाड वाचू लागली. पाटी भरून लिहू लागली आणि चौथीच्या परीक्षेत चक्क पहिल्या वर्गात पास झाली. मग रात्रशाळेतल्या वाई घरी आल्या. आईवडिलांना समजावून गेल्या. सरूसाठी निळा झगा नि पांढराफेक पोलकं देऊन गेल्या.
 सरू शाळेत जाऊ लागली. ती सातवीत बोर्डाला पहिली आली. आई म्हणू लागली की आता पोर शाणी झाली तिचं शिक्षण बंद करा. बाबान घरी पावणा आणला. सरूला बघायला. मग सरून काय केलं?" माझा प्रश्न.
 एकीनं धागा पकडला
 "सरू लई रडली, जेवली न्हाई की खाल्ली न्हाई. दोन दीस उपाशी ऱ्हाईली."
 "मग?" माझा प्रश्न
 "आई म्हणाली मॅट्रिक काढून घरी बसवा. तवर शिकवा.” एकीचं उत्तर.
 नाय नाय उलट बापानं चांगलं झोडलं असलं. आईचं काय चालतंया घरात!" दुसरीची शंका
  सरू नाकासमूर चालनारी हाय. तिचा बाबाला इसवास हाय. तिला त्यांनी शिकू दिलं असतं. ताई तिचं शिक्षान मध्यात थाबवू नका. मला लई रडू येईल मंग." एक धिटुकली बसल्या जागेवरून सांगू लागली. मग आमची सरू मॅट्रिकला पण पहिल्या वर्गात पास झाली, मग ती कॉलेजात गेली. कुणाच्या मनातली सरू डॉक्टर झाली. तर कुणाच्या मनातील मास्तरीण. कुणाच्या मनातील नर्स तर, कुणाच्या मनातील रेडिओत बोलणारी !
 हे झाल मनातल्या आणि गोष्टीतल्या सरूच. पण खऱ्याखुऱ्या सरूचं काय झालं असेल ? खरंच, काय झाल असेल त्या सरूचं ?

܀ ܀ ܀