वाहत्या वाऱ्यासंगे/फुंकर

विकिस्रोत कडून

फुंकर



 रस्त्याच्या पलीकडे कुणाच्यातरी घराचे बांधकाम सुरू होते. वैशाखाचे ऊन अंगात टचाटचा लागेपर्यंत सारे मजूर काम करीत आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास भाकरतुकडा खायला माझ्या घरासमोर चिंचेखाली येत.
 जेवणखाण आटोपून, स्वैपाकघर नीटनेटके झाकूनपाकून जरा आडवी व्हायचा विचार करतेय तोच कोणीतरी हाक घाली. "ताई, चरवीभर पाणी या प्यायला."
 पुन्हा थोड्या वेळाने कोणीतरी हाक घाली .
 "ताई, चरवी ठिवा आत. अन् दार बी वढून घ्या . आमी चाललाव कामावर."
 त्या वैशाखी उन्हात डोळ्यांवर अशी छान झापड येई की मीही चरवी नेणारे आणणारे कोण , कुठले याची दखल घेत नसे. पण त्या आवाजातला आश्वासक ठाकर स्वर माझ्या खूप परिचयाचा झाला होता.
 एक दिवस बाळाच्या केकाटून रडण्याच्या आवाजाने मी दचकून जागी झाले नि बाहेर आले. तर झाडाच्या विरळ सावलीत एक चिमुकले बाळ अंगावरचे पटकूर हातापायाने झाडीत कळवळून रडत होते.
 बाळाची आई कुठेय म्हणून इकडेतिकडे नजरेनेच शोध घेतला. तर अवतीभोवती कोणीही नाही.
 आता बाळाला उचलणे भागच पडले. डोक्याला गोंड्याचे टोपडे नि, अंगावर गुंडाळलेली जुनीपानी कुंची. झिजून चिंधाटलेली.
 कुबट वास येणारी गोधडी अंगाखाली. तिचाच एक पदर अंगावर टाकलेला. त्या चिंधाटलेल्या गोधडीत रडून रडून लाल झालेला तो तांबडा गोळा. जेमतेम पंधरावीस दिवसांचा.
 मी ते बाळ हळूच उचलून घेतले. बांधकाम सुरू होते त्या घराकडे रस्ता ओलांडून गेले.
 मला नि माझ्या हातातल्या त्या बाळाला पाहून कामावरचा मुकादम क्षणभर गरून गेला. दुसऱ्याचा. क्षणी त्या लेकराच्या आईच्या नावाने ओरडू लागला.
 "शोभ्ये ये शोभ्ये ऽ कुठं उलथली की वाई , अरं बगा रं जरा त्या तरवड्याच्या पोरीला लेकराची काय सुदबुद हाय का नाय ? समूरच्या डागदरीनताई लेकरु घिऊन हितवर आल्या. आत्ता काय म्हनावं या बाईला ?"
 तो तणतणतोय इतक्यात, सिमेंटच्या काल्याने माखलेली शोभा कसनुशा चेहऱ्याने आली. आधी मळलेल्या लुगड्याला हात पुशीत तिने लेकरू माझ्या हातातून घेतलं जरा बाजूला आमच्याकडे पाठ करून ती बसली. क्षणभरात बाळाचे रडे थांवले.
 "ये भवाने, ते प्वार तुज्या म्हाताऱ्या बा जवळ ठिऊन येत जा. ते बारकं पोर घेऊन येतीस नि त्येच्या निमित्तानं कामचोरपना करतीस तुजी कीव केली तर तू लईच डोक्यावर बसाया लागलीस लेकरू तिथं कशाला निजिवलं ? एवढ्या मोठ्या घरच्या बाईनला उगाच तरास."
 "छे ! मला कुठला आलाय त्रास ?" मी मुकादमाचं बोलणं अडवीत बोलले.
 शोभाने माझ्याकडे पाहिले. त्यात आपलेपणाची चमक होती. कपाळावरचा घाम चुंबळीच्या फडक्यानं पुशीत ती बाळाला पाजीत होती. त्या दगडविटामातीच्या गोंगाटात, बाळाच्या दूध पितानाच्या तृप्त हुंकाराची आदिम लय माझ्या मनाला स्पर्शून गेली आणि मी नकळत म्हणाले, "अगं, झाडाखाली एकटं लेकरू कसं झोपवलंस ? घराच्या व्हरांड्यात झोपवायचंस. हाक तरी मारायचीस मला."
 खरे, मी असे म्हणाले पण खरोखर ती लेकरू ठेवायला आली असती तर, मनाच्या आतून भावले असते मला ? माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसलाय असे तिच्या संकोचलेल्या हसण्यातून मला मुळीच जाणवले नाही. तो नक्कीच वाटला नसणार.
 पण एक दिवस अचानक वळीवाचा पाऊस खुळ्यासारखा कोसळला. रस्त्यावर पाणीचपाणी. अंगण चिखलानं भरलं. त्या दिवशी दुपारी शोभा बाळाला व्हरांड्यात झोपवून गेली पुस्तके वाचतावाचता नि पेपर चाळता चाळता त्या बाळाकड़े नजर टाकणे अगदी सोपे होते. आपल्या मनाला कोणत्यातरी कोपऱ्यातून ते सुखावणारे आहे, हे मला उमजले.
 माझ्या अठरा वर्षाच्या मुलाचे लहानपणचे कपडे मी त्याच्या मुलाला हौशीने घालण्यासाठी जीवापाड जपून ठेवले होते. ते मी कधी खाली काढले कोण जाणे. ते बाळही मला आता छान ओळखू लागले. त्या नव्या जुन्या कपड्यांचे अप्रूप त्याच्या आईला वाटले. अठरा वर्षापूर्वीचे ते दुभते दिवस पुन्हा एकदा याद देऊन गेले !
 मग शोभाची नि माझी ओळख चांगली दाट होत गेली.
 शोभाचे वडील मोंढ्याजवळच्या झोपडपट्टीत रहातात. ते खूप म्हातारे आहेत. तिचा भाऊ किसन्या मुका आणि बहिरा आहे. शोभाची माय, शोभाच्या म्हाताऱ्या बापाजवळ रहात नाही. तिने दुसरा घरोबा केलाय. ती सिग्नलकँपात रहाते. ती दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली तेव्हा शोभा होती सात वर्षांची आणि किसन्या चार वर्षांचा.
 शोभाचा वाप साधा हमाल: शिवारात नाही शेत आणि गावात नाही घर. अशा भणंगाला वायको कोण देणार? वयाच्या पन्नाशीपर्यंत तो विनवायकोचा राहिला. मजुरी करून साठवलेले पैसे शोभाच्या मामाच्या खिशात पडले तेव्हा शोभाच्या वापाला तरणी बायको मिळाली. पण तिला हा म्हातारा नवरा कसा आवडणार? काही उमजेसमजेस्तवर दोन लेकर झाली. पण तिचे मन कधी घरात गुंतले नाही. तिला तरणावांड जोडीदार मिळताच या दोन पोरांना म्हाताऱ्याच्या दारात टाकून ती पळून गेली. बाप आडतीतली पोती पाठीवर वाहून वाहून पोक्या बनला होता. पोरांसाठी तो खूप कष्ट करी. पण शोभा जसजशी वाढू लागली तसा त्याच्या जीवान धसका घेतला. त्याला बाटे, घरात बाई माणूस नाही. उद्या पोर न्हातीधुती झाल्यावर तिच्यावर कोण नजर ठेवणार ? या भीतीने त्याने शोभाचे शहाणी होण्यापूर्वी, वयात येण्यापूर्वी लग्न लावून दिले आणि तो असा मोकळा झाला. खेड्यापाड्यातले बहुतेक वाप असेच मोकळे होत असतात.
 शोभाचे सासर गावातच आहे. नवरा रेल्वे लाईनीपलीकडच्या झोपडपट्टीत राही. तो मालमोटारीवर किन्नर म्हणजे क्लिनर होता. शोभा वयात आली आणि दीड वर्षात तिला लेकरू झाले. नवरा गाडीबरोबर गावोगाव हिंडायचा. एकदा गाडी लाईनीवर धावू लागली की पंधरापंधरा दिवस तो बाहेर राही. घरात अजाण वायको. जेमतेम चौदापंधरा वर्षाची. त्यातून गरवारशी. त्याने बाहेर कुणाशीतरी संधान बांधले. एक दिवस घरी परत येताना त्या वाईला घेऊनच आला. शोभाला त्याने वजावले, "हिला मोठी भन मानून घरात न्हाईलीस तर भाकरतुकड्याला कमी करणार न्हाई. अंगभर ल्यायालाबी मिळंल पन हिच्याम्होरं श्यानपना केलास तर याद राख."
 "ताई, ते दोघं गुलुगुलू वोलत, चावटपणा करीत. त्या येका झोपडीत मी डोक्यावर पदर घेऊन पडून न्हाई. पुढे लेकरू झालं ते रडाया लागलं की नवरा म्हणे बाहिर बेस. त्यानला रडण्याचा तरास होई. दारातल्या कुत्रीवाणी शिळेतुकडे खाताना जीव नकुसा वाटे. एक दिवस दहा दिवसांचं लेकरू घेतलं नि बापाच्या घरी आले. पन वाप असा म्हातारा. दुसऱ्या दिवशीपासून गवंड्याच्या हाताखाली कामाला जाऊ लागले. बसून कोन खाऊ घालणार गरीबाला ?"
 मी सोळाव्या वर्षी पुण्याला कॉलेजात गेले तेव्हा माझ्या आईला प्रश्न पडला होता की माझ्या कुरळ्या केसांच्या दोन वेण्या कोण घालणार त्या हॉस्टेलात ?
 हळूहळू शोभा आमच्या घरात नि माझ्या मनात रुळू लागली. ती कामावर येताना बाळ आमच्या ओट्यावर विनधास्त झोपवी. शिवाय मधल्या सुट्टीत भराभरा भाकर खाऊन माझ्याकडे येई. जुनी पाटी नि पेन्सिल घेऊन लिहायचा सराव करी. तशी ती तिसरी झालेली होती. पेपर हातात घेऊन अक्षर लावून वाचत बसे. ती चौथींची परीक्षा देणार होती. एका प्रौढसाक्षरता वर्गात मी तिचे नाव लावून आले होते. चौथी पास झाल्यावर काय करायचं यावर वोलण्यात तिला खूप रस वाटे. त्याबद्दल बोलताना लागली की तिचे डोळे चमचमायला लागत. चौथी पास झाल्यावर ती चहाचे छोटेसे दुकान घालणार होती. किंवा मी तिला एखादे चांगलेसे सावलीतले काम लावून देणार होते. शोभा आता खऱ्या अर्थाने वयात येऊ लागली होती. तिच्या डोळ्यातल्या कोवळेपणावर स्वप्नांची मऊ साय धरू लागली होती .
 तशातच एक दिवस -
 एक दिवस सकाळी तिचा मुका बहिरा भाऊ घरी आला. चित्रविचित्र आवाज आणि खुणा करून सांगू लागला. मला ते काही उमजेना. मी शेवटी पायात चप्पल सरकावून त्याच्या मागे गेले.
 पोलिस चौकीत जाण्याची माझी ही पहिलीच वेळ. क्षणभर वाटले होते की फिरावे मागे . पण मी आत गेले. चौकीच्या ओट्यावर शोभा वसलेली. चेहरा सुजून भोद झालेला. पुढचे दोन दात पडलेले. तोंड रक्ताने लडवडलेले. हातावर ओरखडे कपाळावर जखम कपडे फाटलेले. शेजारी दीनवाण्या चेहऱ्याचे म्हातारे वडील. मला पहाताच तिचा बांध फुटला. ती धाय धाय रडू लागली. धड वोलता येईना.
 शेवटी तिचे वडील सांगू लागले. "ताई, आठ दिवसापासून शोभाचा नवरा आमच्याकडे चकरा मारू लागलाय. ती भटकभवानी काय सौंसार करनार व्हती का लगनाच्या वायकूवानी? चारदीस रंगढंग केले नि गेली निघून. तवा या दादल्याला आठवण झाली हक्काच्या बायकूची शोभा काही तयार हुईना त्येच्याकडं जायला. मी म्हनलं तिला बाईमानसानं लई वढून नाई जा घरी, पण हिला ते नगं वाटतं. तिला काय की ती शाळंत परीक्षा द्यायची म्हनं. ती म्हटली की त्यानं टकुऱ्यात काठी हाणली. लई मारलंय माज्या पोरीला. ते न्हानगं पोर घेऊन मी पळालो म्हनून ते जितं राहिलं. जावाई कसला रेडा हाय रेडा, माजलेला !"
 शोभाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. रीतसर तक्रार नोंदवली, मार खूप लागला होता. कोर्टात केस सुरू झाली,
 अशात शोभा गप्प असे. कुठेतरी एकटक नजर लावत राही. पहिल्यासारखी मोकळेपणानी बोलत नसे. तिच्या मनात काहीतरी खळवळ असावी. तिला कोर्टाचे विलक्षण भय वाटे. खरे तर मलाही वाटायचे. पण मी तिला धीर देई. तिने धिटाईने, न घावरता साक्ष द्यावी म्हणून पटवत असे. अखेर साक्षीचा दिवस उजाडला.
 संध्याकाळी शोभा मला भेटायला येणार होती. ती आलीच नाही. ते दिवस होते संक्रांतीचे सणवार, हळदीकुंकू या गर्दीत मीही बुडून गेले.
 दिवस उलटले. महिने उलटले. शोभा आलीच नाही. मनातून तिची याद येई. पण शोधणार तरी कुठे ? आणि माझ्यासारख्या बाईने झोपडपट्टी धुंडाळत हिंडणे जरा अवघडच ना! मग मीही तिला मनाच्या मधल्या कप्प्यात बंद करून टाकले.
 एकदा सरकारी दवाखान्यात मैत्रिणीला भेटायला गेले तर अचानक शोभा दिसली. मीच हाक मारून तिला बोलावले. माझ्या मनातली उत्सुकता सुळकन बाहेर आली
 "झाली शिक्षा नवऱ्याला?" माझा प्रश्न.
 न्हाई ताई, नवऱ्यानं मला मारलं न्हाई, मीच पाय घसरून दगडाच्या दरडीवर पडले अन मार लागला असा सायवांसमूर खोटा जबाब दिला ! सायबांनी इचारले की पोलिसासमूर का खोटं बोलली ? तशी सांगितलं की आजूबाजूच्या बायांनी तसं बोलं म्हनून मला गळ घातली. मग काय दिलं सोडून त्याला." शोभा खाली मान घालून बोलली.
 ती बोलताना चेहरा खूप पडलेला असावा "त्या आया बाया कोण ? मी तर नव्हे ?" असा प्रश्न विचारावासा वाटला.
 माझ्या जरा जवळ येऊन ती हलक्या आवाजात सांगू लागली. "ताई, त्या पिंजऱ्यात हुबं हाईल्यावर माज्या लक्कन मनात आलं. तो जर का तुरुंगातून सुटून भाईर आला नि मगं माझ्या सोनीला त्यानं मारलं तर? नाहीतर मलाच मारून टाकलं तर ? त्या रेड्याचा काय भरवसा ? तुम्हाला वाईट वाटलं म्हनून मी तिकडे आले न्हाई. तिकडची कामं सोडून दिली."
 मी सुन्नपणे रस्ता कापत होते. अचानक मला आठवले. एक प्रश्न विचारायला विसरले होते मी. मला विचारायचे होते. “शोभा, पण सध्या तू कुठे राहतेस ? बापाकडे की नवऱ्याकडे ?"
 पण दुसऱ्याच क्षणी मनात आले. बरं झालं प्रश्न विचारला नाही ते. तेवढीच माझ्या मनावर फुंकर ! कुणी सांगावं ? की तिच्या.

܀܀܀