वाहत्या वाऱ्यासंगे/मी युग विरहिणी

विकिस्रोत कडून

मी युग विरहिणी



 मी आदि, मी अनादि, भी अनंत, मी युगविरहिणी.
 प्रत्येक श्रावणात पाऊसधारात सचैल...चिंब भिजणारी, आणि आकंठ निथळताना प्राणातून जळणारी. आजही श्रावणगंध दहा दिशांतून घमघमतो आहे. आषाढ पर्जन्याचा असोशी धसमुसळेपणा मातीच्या अंगांगांतून रुजलाय.
 नको नको म्हणत सोसलेल्या त्या कळा आज , लेणं बनून अंगांगावर झिळमिळताहेत. गोरंगोमटं तान्हुलं कुशीत असावं . बाळाच्या रूपाकडे पहात सुखावताना, त्याच्या दुराव्याची नाजूक कळ सरसरून जावी , सुखाचेही शहारे उमटून जावेत , तशी धरणी.
 धरणी, ऐन श्रावणात ग्रीष्माच्या अंगारकी आठवणीत हरवून जाणारी... निष्पर्ण एकाकी रात्रींना , श्रावणस्वप्नांचा मिणमिणता दिवा पदराआड झाकून निरोप देणारी.
 धरणी, युगविरहिणी.
 शेकडो वादळं वाहून गेली . लाखो श्रावण बरसून गेले. पण माझ्या मोकळ्या केसांच्या बटा अजूनही सैरभैर उडताहेत . आशांचे दिवे होऊन तेवणाऱ्या डोळ्यातले काजळ गालांवर ओघळून सुकले आहे . हातापायांच्या फुलवातीतून गळून पडलेली काकणं चूर झाली आहेत. पैजणांचे घुंगरू मुके झाले आहेत. माझ्या हातातली ही वीणा , कधी या यक्षपत्नीच्या कृश बोटांनी तर कधी वासवदत्तेच्या स्पर्धांनी विरहाचे गर्भरेशमी गीत गुणगुणणारी , आजही तेच, अगदी तेच , आर्त तरीही उत्सुक सूर छेडतेय.
 आकुळ व्यागुळ रैण बिहावा, बिरह कलेजो खाय
 दिवस ना भूख न निदरा रैणा , मुख सूँ कह्या न जाय
 कोण सुणे ? कासुँ कहियारी, मिल पिव तपन बुझाय
 प्यारे दरसण दीजो आज , थे बिण रह्या ण जाय.
 तुझ्या मीलनासाठी माझ्या प्राणांनी मांडलेला आकान्त , तुझ्या घनगर्द मिठीत मिटून शून्य होण्यासाठी माझ्या रक्ताने घेतलेला ध्यास ,त्या सोळा वर्षांच्या ब्रह्मचाऱ्याला कळला. माझ्या डोळ्यातले पूर , त्याचे अंगण भिजवून गेले . माझ्या सनातन वेदनांचे वळ कुरवाळीत उन्मनी होऊन तो बडबडला ,

घनु वाजे घुणघणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकुहा कान्हा वेगी भेटवा का ...

 चांदण्याच्या शीतल चंदनरसात नहाताना उरातून जळणारी , जुईफुलांच्या कोमल शेजेवर तळमळणारी ती, मीच होते ना ?
 तुझ्या श्वासांची, पावलांची चाहूल लागताच कशीबशी उठून , केस सारखे करण्यासाठी दर्पणासमोर उभी राहिले मी .. तर काय? मी होते कुठे?
 दर्पणभर पसरला होतास तू. तू आणि तू ...
 आणि तुझ्यात विरून जाण्यातली तृप्ती निहारताना , अनुभवताना , माझ्यातली मी केव्हाच मुक्त झाले होते. सुसाट धावत सुटले होते, विरहाच्या कोवळ्या कळा कवटाळण्यासाठी!
 विरहवेदनेचे विखारी अमृत मी प्याले उर्मिलेच्या थरथरत्या हातांनी. ते पिताना ठसका लागला तेव्हा पाठीवरून हात फिरले वनवासी सीतामाईचे. सुरकतलेले शुष्क हात . भोवंडून उडू पहाणाऱ्या जीवाला घट्ट सावरून धरले मीरेच्या एकतारीने. पुराचे पाणी वाहून जावे तशी वाहून जाणारी वर्षे. पण मी मात्र तशीच. एकाकी . नुस्ती वाट पहाणारी.
 प्रत्येक श्रावणझडींना आठवत असेल एखादी उंच गढी. त्या गढीच्या टोकावरचा ऐन महाल .आणि त्यातली मीलनोत्सुका मी. महालातले खसाचे पडदे उतरून ठेवणाऱ्या सखीला मीच तर म्हणाले होते,
 "बाई गं, या तलखीनं जीव उडून चाललाय माझा. खसाच्या पडद्यावर चिंब पाणी शिंपडायचे सोडून हा उलटा उद्योग कुणी सांगितला तुला?"
 सखीने हातांचा आधार देऊन सौधावर आणलेन मला . आणि दाखवले दूरदूरवरचे फडकते निशाण . तिथल्या कनातीत मुहूर्ताची वाट पहाणारा तू नि तुझे शिलेदार . अजून आठवतेय ती सावनी सांज.
 कलत्या उन्हाच्या रेशमी बटा हिरव्या झाडापानांवर झुळझुळताहेत . तृप्त मातीच्या कुशीत पहुडलेली हिरवी बाळं टुळूटूळू नजरेनं आभाळ न्याहाळताहेत . पहाता पहाता आभाळाचं गर्द निळं भिंग बनून गेलय . त्या आरस्पानी भिंगातून निळ्याजांभळ्या केशरी लाटा कल्लोळत पुढे पुढे धावताहेत . त्या लाटांत बुडून जात आहेत झाडं, पानं , डोंगर आणि मीही.
 तिन्हीसांजेच्या अर्धुक्या उजेडात सखी माझ्या हातापायांवर मेंदीची नक्षी रेखतेय. उरातली वाढती तलखी ... आणि चढत जाणारी रात्र , चढत जाणारी मेंदी! पहाटे पहाटे तुझा पंचकल्याणी घोडा विजयाचे तोरण माथ्यावर बांधून अंगणात येतो. समईतल्या वाती विसावून शान्तावतात. तुझ्या असोशी घनगर्द मिठीत विरघळून जाताना मला मात्र आटवत राहतात विरहाच्या न कटणाऱ्या रात्री.
 प्रीतम विनि तिम जाइन सजनी , दीपक भवन न भावै हो
 फूलन सेज सूल होई लागी जागत रैणी बिहावै हो
 सइयाँ तुम विनी नींद न आवै हो ...
 त्या चिरेबंदी दगडी वाड्यात रुंद भिंतीत अडकेलेले ओले निःश्वासही माझेच होते की ! सत्तावीस मोत्यांची पंजेदार नथ नाकात घालताना डोळ्यात आलेले पाणी , उजाड श्रावणासाठी माझ्याच डोळ्यातून वाहून गेले होते. पहाटेच्या मिणमिण उजेडात, माळवदातून टपटपणाऱ्या थेंबाच्या धीम्या लयीत , मनीची व्यथा दगडी जात्याला सांगणारी ती मीच होते.
 सरावन राजा
 मुकामो आला.
 धरित्रीचा शेला
 कोन रंगवून गेला?
 कोन भिजवून गेला ?
 आणि अगदी कालपरवाची गोष्ट. तू गजाआड. माझ्यापासून शेकडो मैल दूर. बारा वर्षांनंतर माझ्या शब्दांना पुन्हा एकदा कोवळे पंख फुटले. कोसळणाऱ्या पावसातून , नदीनाले पार करीत, तुझी डोळाभेट घेण्यासाठी मी येत असे. दहा तासांच्या प्रवासात , तुझ्याशी काय काय बोलायचे त्याची रंगीत तालीम मनातल्या मनात चाललेली असे. पण मला माहीत होते की तुला पहाताच ऐन वेळी शब्द आटून जाणार ! परत निघताना तुझ्या बेटीला जवळ ओढून घेत असे. तू खूप जवळ .
 .... स्पर्शाचे सामर्थ्य बारा वर्षांनी जाणवलेय मला. पुराच्या पाण्यात स्वतःच्या रक्तामासाचे बाळ सोडून देताना , कुंतीच्या प्राणांना आलेल्या झिणझिण्या माझ्याही प्राणांना आल्या. तुझ्याकडे पाठ फिरवून येताना.
 आज ते दिवसही उडून दूर देशान्तराला गेले आहेत . भरल्या गाडग्या - मडक्यातून , जिवन्त विहीररहाटातून न रमलेली माझ्यातली युगविरहिणी. मी पुन्हा एकदा देशान्तराला निघाली आहे. तिचा कधीही न भेटणारा प्रिया शोधण्यासाठी.
 तिच्या ओठांतून ते स्वर उन्मुक्तपणे स्त्रवताहेत.
 कहो तो कसूमल साडी रँगवॉ, कहो तो भगवा भेस
 कहो तो मोतियन माँग भरावाँ, करो छिटकावाँ केस
 चाला वाही देस प्रीतम, चालाँ वाही देस...

܀܀܀