वाहत्या वाऱ्यासंगे/आई : साधीसुधी तरीही असामान्य

विकिस्रोत कडून

आई : साधीसुधी तरीही असामान्य



 आज ती या जगात नाही. पण तरीही ती मनभरून , घरभरून उरली आहे. परवा पपांना धुळ्याला नेऊन पोचवले तेव्हा पायरीवर अडखळले. मनात आले, आई नसलेल्या घरात जाण्याची ही पहिलीच वेळ . ती नसलेल्या घरात वावरण्याची सवय करायला हवी. हे मनात येईस्तो मी घरात प्रवेश केला होता नि लक्षात आले, घर आजही प्रसन्न आहे .सुस्नात आहे. तिच्या असंख्य आठवणी भोवताली भिरभिरताहेत. पूर्वी बांगडी फुटली असे म्हणत नसत किंवा दिवा विझला म्हणत नसत. तर बांगडी वाढवली, दिवा वाढवला असेच म्हणत. तशीच आई वाढवली आहे.
 गरुडबागेतले ते घमघमते बकुळीचे झाड चक्क वठले आहे. परवा गरुड बागेत जायचे झाले आणि पहाते तर काय आतून खंक वाळलेले, खंडलेले खोड उभे. फांद्याचा भार एवढा जड झाला की तो उतरावा लागला. पण माझ्या मनातले फुलांनी रिमझिमणारे बकुळीचे झाड मात्र ताजेपणाने उभे आहे . पायतळी किनारदार फुलांचा सडा गच्च सांडला आहे . झग्यांचे ...पदरांचे ओटे भरभरून गेले तरी ती फुले संपणार नाहीत नि झाडही अक्षयपणे घमघमत राहणार आहे. आमच्या घरातले ते बकुळीचे झाड नजरेआड गेले तरी अनेकांच्या मनात गंध पेरीत रहाणारच आहे.
 शब्द वापरीत रहाणे ही आपली अंगभूत सवयच. आई आणि तिचे मूल यांचे जोडलेपण किती तऱ्हांनी व्यक्त करतो आपण ! पण या शब्दांच्या अंतरातले गाभे लक्षात यायला, स्वतःला खर्ची घालावे लागते. आईच्या शेवटच्या आजारपणाचे निदान कळल्यानंतरची गोष्ट.
 "तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" ग्रेसच्या कवितेतील या ओळींनी काळीज अक्षरशः तळमळून गेले.
 आज तिच्या आठवणी आठवायला निघाले तर एकही आठवण सलगपणे येत नाही. पण एकात एक मिसळलेल्या लक्षावधी क्षणांची-स्मृतींची गर्दी होते. किती रंग...किती रूपे! खसाखसा केस चोळून मला न्हाऊ घालणारी आई . डोळ्यात जाणारे शिकेकाईचे पाणी. डोळे चुरचुरल्यामुळे मिटलेले . नागरमोथ्याचा उष्ण गंध . मी डोळे किलकिले करून पाहिले तर आई तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी मला अंगभर न्याहळत होती. मग खूप विचित्र दुरावा तिच्या नि माझ्यात आला. तो दुरावा माझी जुया मोठी झाली तेव्हा अचानक संपला नि मनाला खंत लागून राहिली की मी अगदी आतून , किंचितशी का होईना आईपासून दुरावले होते. पण तेव्हा पासून मात्र मागचे अंतर जोडून घेण्यासाठी मनोमन धडपडत , तडफडत राहिले.
 आमच्या पपांनी व्यवसाय म्हणून वकिली केलीच नाही. जणू तो फावल्या वेळातला उद्योग. समाजवादी पक्ष , विविध चळवळी, स्थानिक प्रश्ना, राष्ट्र सेवा दल, महिला सदन इत्यादी अनेक व्यापांनी त्या दोघांचे कुटुंबजीवन रसरसलेले होते. मला आठवते तेव्हापासून ती राष्ट्र सेवा दल परिवाराशी पूर्णपणे जोडलेली होती. आमचे घर या सामाजिक पाहुण्यांनी नेहमीच बहरलेले असे आणि आई या सर्वांचे स्वागत उत्साहाने करी. कुणाला काय आवडते हे तिला नेमके माहीत असे. एक निर्लेप साधेपणा आमच्या घराला होता . फणीकरंड्याच्या आरशापुढे ऐसपैस बसून दाढी करणारे मधु दंडवते, नाना. मस्तपैकी खुर्चीवर बसलेले नि चाकवताची ताक घालून केलेली पातळ भाजी नि भात चवीने खाणारे नाथ पै. पत्ते खेळताना, पान लक्षात न ठेवता टाकले म्हणून आईलाही धपाटा घालणारे भाऊ रानडे. संजूच्या लग्नात सेवा दल बहिणींना खादीची साडी आहेरात देण्याचे स्वप्न रंगवणारे डॉ. अंबिके. शकुंतलाबाई तुम्ही स्वयंपाकघरातून थोड्या जास्त बाहेर या असे रोखठोक सांगणाऱ्या नि डॉ. राम मनोहर लोहियांवर अपार प्रेम करणाया, सातपुड्यात हिंडता हिंडता अचानक धुळ्याला येऊन डॉ. अष्टपुत्रेबाईना कडकडून भेटणाऱ्या इंदूताई केळकर. अनुताई लिमये तर आमच्या मावशीच वाटत, आईसारख्याच निग्रही पण अतीव कोमल हृदयाच्या . त्याही अधूनमधून येत. सिंधूताई मसूरकर, आताची डॉ. सिंधू पार्थ चौधरी. तिच्या लग्नाचा काळ मला स्पष्ट आठवतो . कुसुमताई लेले, सिंधुताई, रेशमाताई ,या सगळ्या जणींना आई जणू मैत्रीण वाटे. आंतरजातीय वा प्रेमविवाह करणाऱ्यांना आईने नेहमीच दिलासा दिला. सुमनताई भालडे, कमलताई दलाल, श्यामलताई पाटील या माझ्या आईच्या माहेरवाशिणीच. आणि हा स्रोत कालपरवापर्यंत अव्याहत सुरू होता. आपल्या या लेकींचे कौतुक ती मनापासून करी. दशरथतात्या पाटील नि कमलताई जणू आमच्या घरातच उगवलेले . तात्या वा कमलताई आठ दिवस आले नाहीत तर तिला करमत नसे.
 शिवदासभाऊ चौधरी माझी पहिली पाठवणी करायला अंबाजोगाईला आला होता. फुले आणताना आईचे पाय फक्त तापीराम माळीच्या दुकानाकडे वळत , तर जगूभाऊ आजळकर , शिवराम बगदे, रामभाऊ मोरे हे समाजवादी पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते. कोणी कामगार तर कोणी कारागीर . पण यांचीही आईकडे फेरी असे . असे हे माझ्या आईचे विशाल कुटुंब.
 कुटुंबनियोजन हा तिच्या जगण्याचा गाभा होता. मी , प्रकाश . पपा आणि आई असे चौकोनी कुटुंब. पण त्या चौकोनाच्या सीमा क्षितिजापर्यंत मिडल्या होत्या. या कुटुंवाला तिचा धाक होता. एखाद्याचा संसार नको तितका वाढतोय हे लक्षात येताच ती आपल्या मुलांना छानपैकी झापत असे. तिच्या सहवासात आलेल्या सर्वांपर्यंत तिने कुंटुंबनियोजनाचा विचार तळमळीने पोहचवला . खेड्यातून येणाऱ्या पक्षकारांपर्यंतही . दुपारच्या वेळी तिच्याकडे स्त्रिया आपले मन मोकळे करायला येत. कुटुंवातील, पतीपत्नींमधील कलह सोडविण्याचे काम ती जीव ओतून करी. तिच्या एका मुलाची पत्नी असाध्य रोगाने आजारी झाली. धुळ्यात उपचार होऊ शकत नव्हते. त्याच्या घरात कोणी शिकलेले नाही. आईने त्याला बोलावून वजावले," तुला दुसरी वायको मिळेल. पण मुलांना आई मिळणार नाही. तिला मुंबईला घेऊन चल . मी बरोवर येते." ही वाई आम्हांला घरी ठेवून मुंबईला गेली. तिथे त्या सुनेवर मोठी शस्त्रक्रिया झाली . एकीकडचे हाड काढून दुसरीकडे वसवले. मुलांची आई वाचली. आज ती सून नातवंडांच्या मेळ्यात सुखेनैव नांदते आहे.
 सध्या कॅनडात स्थायिक झालेले डॉ. जगन्नाथ वाणी, तिचा लाडका लेक. जगन्नाथबद्दल , त्याच्या हुशारीबद्दल , तिला अपार अभिमान होता . जगन्नाथच्या पत्नीला कॅनडात पाठवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले . सातवी आठवी पास झालेल्या मुलीने कॅनडात संसार थाटायला जाणे ही गोष्ट ३० वर्षापूर्वी सोपी नव्हती . पण तिची मानसिक तयारी आईने केली . इतर तयारीही केली आणि ही सून तीस वर्षांपूर्वी कॅनडात जाऊन संसार करू लागली. जगन्नाथने १९७२ मध्ये तिच्यासाठी तिकीट पाठवले. कॅनडा, अमेरिकेची वारी तिने एकटीने केली . खूप हिंडायचा नाद होता तिला. भारतातही खूप भटकली. हिमालय तिला खूप प्यारा. गंगोत्रीजम्नोत्रीपर्यंत धडक देऊन आली . माणसे जोडण्याचा तिचा धर्म होता . जिभाऊ, पपांचे पक्षकार . त्यांची मोठी सून निर्मला लग्न झाले तेव्हा मॅट्रिकला होती. तिची शिकण्याची खूप इच्छा . पण रहाणार कुठे? आईने सहजपणे सांगितले, हे घर आहे . शैलावरोवर तीही राहील . निर्मलाने आज डॉक्टरेट मिळवली आहे. मुंबईला असते . सून , जावई आले आहेत. माझ्या अभिजितच्याही आधी, निर्मलाच्या सलीलने तिला आजी होण्याचे कौतुक दिले.
 विजयाताई चौकयांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व घडवण्यात आईचा सहभाग होता . स्त्रीला सोसाव्या लागणाऱ्या वेदना सहन करण्यासाठी लागणारे नैतिक बळ तिने अनेक जणींना दिले. आई जायच्या आदल्या दिवशी तिने मलाच विजया म्हणून हाक मारली. शैला इतक्याच विजया , सुलभा , ज्योत्स्ना , शामल , कमल आणि अनेक तिला प्रिय होत्या.
 आई ऑनररी मॅजिस्ट्रेट होती . एकही पैसा खर्च न करता , केव्हाही गेलं तरी काम होणारच याची खात्री असल्याने आईकडे सतत गर्दी असे. इतकी की , इतरांना त्रास होऊ नये म्हणून तिने आपले टेवल खालच्या ओसरीवर मांडले. आजारी वा वृद्ध स्त्रियांचे जवाब नोंदवून घेण्यासाठी वा समक्ष सही घेण्यासाठी ती स्वखर्चानेत्यांच्या घरी जात असे . एक श्रीमंत मुस्लिम दुकानदाराच्या आईची सही घेण्याचा प्रसंग होता. त्यांच्या मोटारीतून त्यांच्या घरी जावं असा आग्रह दुकानदाराने धरला. पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि नम्रपणे सांगितले. हे काम माझ्या कर्तव्याचा एक भाग आहे , तुमचे घर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. मी चालतच येईन.
 आई नगरपरिषदेत निवडून गेली होती. तिच्या निर्मळ तरीही करारी व्यक्तिमत्त्वाचा दरारा होता. एका निर्व्यसनी , सुशिक्षित आणि ज्याचा भूतकाळ स्वच्छ होता अशा तरुणास नगराध्यक्ष करण्यासाठी तिने इतर स्त्रीसभासदांना पटविले आणि क्याच्या पंचविशीत तो तरुण नगराध्यक्ष झाला. आज महाराष्ट्र सरकारच्या न्यायखात्यात फार मोठे पद तो भूषवित आहे.
 मी वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत एकटी होते. अगदी लाडोवा . अर्थात लाडांनाही कठोर शिस्त होती. ती उपजतंच कलावानं होती. पेटीवर बोटे फिरू लागली की फुलपाखरे नाचत. 'सूरसुखखनि तू विमला' किंवा 'वद जाऊ कुणाला शरण गं' यासारखी नाट्यगीते ती सुरेख वाजवीत असे. तिचे माहेर पार्ल्याच्या गानूंकडचे. सांस्कृतिक समृद्धीचा वारसा तिथूनच तिला मिळाला. पु.ल.देशपांडे पेटीच्या वर्गातले तिचे वर्गवंधू . हा तिचा संदर्भ मला थेट पु.लं.च्या घरात पायरीपाशी नेऊन ठेवीत असे . वालगंधर्व अगदी वयस्कर झाल्यावर त्यांच्या मदतीसाठी पार्ल्याला संगीत रजनी साजरी झाली होती. तिथे पु.ल. आणि सुनीताताई भेटले होते. पार्ल्यात म्हणजे तेव्हाच्या घरगुती पार्ल्यात ती बेबी गानू म्हणून ओळखली जाई . नववी पास झाल्यावर घरगुती कामात तरबेज होण्यासाठी तिचे शिक्षण थांववले गेले पण पेटीचा क्लास चालू राहिला. १९३६ साली वेबी गानूची शकुंतला परांजपे होऊन ती धुळ्याला आली. पपांनी हुंडा घेतला नाही म्हणून त्यांच्या वडिलांची नाराजी होती. सासुरवास करायला सासू नव्हती पण कडक स्वभावाचे सासरे होते. नवरा आधुनिक विचारांचा. प्रत्यक्ष चळवळीतला. वकिलापेक्षा इतर गोष्टीत अधिक रस . पैसा घरात न आणणारा . अशावेळी आईवरच टोमण्यांची खैरात होई . पण ते सारे तिने ताठ राहून नम्रपणे सोसले . पपा नि आईचे सहजीवन जणू दुर्मिळ रसायनच . दोघेही एकमेकांत पूर्णपणे वुडून गेलेले . पपा आईच्या पाठीशी नेहमीच उभे रहात. आपल्या पत्नीला होणारा त्रास ओळखून त्यांनी वेगळे रहाण्याचे ठरवले. मी साडेतीन वर्षांची असताना आम्ही आग्रा रोडवरच्या टकले सरांच्या वाड्यात रहावला आलो आणि तिथे ३६ वर्षे राहिलो. शेजारधर्माचे सर्व आदर्श पाठ या वाड्यात गिरवले जात . आई नि कुसुमताई यांचा मंगळवारचा बाजार, महिन्याचे वाणसामान आणण्याचा वार टरलेला असे . बाजारातली माणसे त्यांना वहिणीच मानत. घरात पाहुणा आला नि पोळ्या कमी असल्या. तर स्वयंपाकघराच्या खिडकीतून पोळीभाजीची देवघेव होई. दोन्ही घरचे पाहुणे उपाशी रहात नसत . टकले बावांचे कुटुंब आपोआप सेवादलाशी जोडले गेले . टकल्यांचे घर परांजप्यांचे घर समजले जाई. मग वाबा गमतीने म्हणत, शंकरराव, तुमचे सर्व सामान एक दिवस तरी रस्त्यावर ठेवायला हवे. त्याशिवाय हे घर तुमचे नाही हे लोकांना कळणार नाही.
 डॉक्टर कमलाबाई अष्टपुत्रे म्हणजे माझी वाई. आईची सख्खी मैत्रीण कम् गुरू वगैरे. आईचे लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी पपांनी आईला तिच्याकडे नेले होते. तिच्या सहवासामुळे आई राजकारण , समाजकारण यांत ओढली गेली. तरीही या दोन्ही बायका तऱ्हेतऱ्हेचे कपडे मला नि वसूला (डॉ.वसुंधरा भागवत) शिवीत. आई करारी असली तरी स्वप्निलही असावी .
 मी सहा महिन्यांची असेन. १९४१चा सुमार. महात्माजींचे दर्शन घडवण्यासाठी, सहा महिन्यांच्या पिल्लाला तिने भर पहाटे पार्ल्याहून जुहूला नेले होते. माझ्या डोळ्यांनी महात्माजींना प्रत्यक्ष पाहिले आहे याची काल्पनिक अनुभूती आजही माझ्या अंगावर रोमांच फुलवते आणि रस्त्यावरून घाईघाईने जाणारी , नऊवारी लुगड्यातली माझी तरुण नवमाताही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी रहाते. चलेजावच्या चळवळीत तिने खादीचे व्रत घेतले. आमच्या घरात वुलेटिन छापले जाई . त्या कामात ती मदत करी आणि माझी चुलत भावंडे भाजीच्या पिशवीतून ते कागद घरोघर वाटीत . अनेक भूमिगत कार्यकर्ते आमच्या घरी येत. अहमदनगरचे हिरवे वकील आमच्या घरी माझे मामा म्हणून राहिले. एस.एम.जोशी मुस्लिम काझीच्या वेषात वावरत . अच्युतराव पटवर्धनांना भेटण्यासाठी पपाही जात. भूमिगत कार्यकत्यांचे निरोप पोचविण्याचे काम आमच्या घरातून चाले.
 आई पपांच्या या अनोख्या संसारातून मला खूप समृद्धी मिळाली . जयप्रकाशजी , राम-मनोहर लोहिया, साने गुरुजी, एस. एम. जोशी नाहीतर नानासाहेब गोरे ही मंडळी आमच्या घरात पाहुणी म्हणून येत नसत तर कुटुंबीय येत असत.
 समाजवादी पक्षाची प्रसोपा आणि संसोपा अशी दोन शकले झाली तेव्हाची गोष्ट. एसेमअण्णा धुळ्याला आले होते. पपा प्रसोपात गेलेले . त्यामुळे संसोपाच्या पुढाऱ्यांनी अण्णांना डाक बंगल्यात उतरवले, अण्णांना तिथे चैन पडेना . ते चक्क उठले नि दुपारी घरी आले . आई गच्चीत तांदूळ निवडत वसलेली होती. अण्णा जिन्यावरूनच शंकरराव अशी आरोळी देत आले ."अरे, काय ही मंडळी ! एसेम धुळ्यात आल्यावर शकुंतलावाई नि शंकररावांच्या घराशिवाय कुठे उतरू शकतो का? हे तर भाऊबंदकीच्या वर झाले. पार्ट्या वेगळ्या झाल्या म्हणून काय माणसं बदलतात?" बोलताना अण्णांनाही मोकळं वाटत होतं आणि आईही अण्णांची आत्मीयता पाहून भरून पावली होती.
 प्रकाश जेमतेम पाचसहा वर्षाचा होता तेव्हाची गोष्ट . त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले नि पाय सहा महिने प्लास्टरमध्ये होता. मग तो सतत खिडकीत वसलेला असे. तेव्हा रिक्षा नव्हत्या. घोड्यांचे टांगे असत . आग्रा रोडवर रहदारीपण खूप असे. सततच्या निरीक्षणामुळे आणि मनाच्या एकाग्रतेमुळे तो घोड्यांच्या टापांवरूनं टांग्याचा नंवर अगदी अचूकपणे सांगत असे. कोणी पाहुणे आले की त्याला टांग्याचा नंवर ओळखायला सांगत , तो छंदच जडला होता. त्याच सुमारास नानासाहेब गोऱ्यांचा, साधनेत वहुधा , चुरचुरीत लेख आला होता. 'नाच रे मोरा' या नावाचा त्यात आईवडील आपल्या मुलांच्या साध्या साध्या गुणांचे पाहुण्यासमोर कसे प्रदर्शन करतात यावर शालजोडीतले झपके मारले होते. त्यानंतर केव्हा तरी नानासाहेब घरी आले. आमचे पपा म्हणजे कठीणच . बोलता बोलता हसत आईला म्हणाले, "अग तू कौतुकाने प्रकाशला टांग्याचे नंबर्स ओळखून दाखवायला सांगशील. पण तसं करू नको हं. नाहीतर नानासाहेब दुसरा लेख लिहायचे!"
 "अरे काय हे शंकरराव! एवढी क्रूर चेष्टा नका करू. " नानासाहेबांचे ते "उद्गार अजून आठवतात . वरच्या कापडांचे आकार वेगवेगळे असले तरी या मंडळींचे आंतरिक अस्तर अतिशय निर्मळ आणि तलम होते . त्यांच्या सामाजिक वा राजकीय जीवनात एकांडेपणा नव्हता .
 वसूचा आवाज विलक्षण सुंदर . गोड . तरीही खुल्या आभाळासारखा मोकळा . तिच्यामागे तंबोऱ्यावर वसण्यातही मला सन्मान वाटे. जयप्रकाशजींसमोर वसू गायली होती. डॉक्टरवाईच्या माडीतली ती मैफिल .त्यात वसूने गायलेला मालकंस. कौतुकलेली आई नि वाई. आज वसू नाही. जयप्रकाशजी नाहीत.पण त्या सहवासाचे अमोल क्षण विसरणं अशक्य आहे. आमच्या आयुष्याला केवढी श्रीमंती दिली आईपपांनी !
 मधु लिमये त्या वेळी खूप तरुण होते . लग्न झालेले नसावे . ते धुळ्याला आले होते. मला चॉकलेट नि टॉफी खाताना त्यांची आठवण होते. आरामखुर्चीवर बसून ते सतत वाचीत असत. खूप एकाग्रतेने.
 एकदा साने गुरुजींचे भाषण चौथ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर होणार होते. भाषणापूर्वी, घरीच हॉलमध्ये गुरुजी विश्रांती घेत होते. शेजारीच प्रकाशचा पाळणा . आत नऊदहा महिन्यांचा प्रकाश . आई भाषणाच्या पूर्वतयारीसाठी गेलेली. घरात दहा वर्षांची मी. वाळाने दुपट्यात शी केली . घाण वास आला . नि पाळण्याजवळ गेले. नाक वाकडे करून दूर पळाले पण मन खायला लागले . परत पाळण्यापाशी आले. वाळाच्या अंगावरची दुलई दूर केली नि भपकारा नाकात शिरला. तशीच दुलई अंगावर टाकून मी पार गच्चीत गेले. थोड्या वेळाने येऊन पहाते तो गुरुजींनी वाळाला साफ करून पलंगावर टाकले होते . घाणेरडे कपडे नीट गुंडाळून कोपऱ्यात ठेवलेले आणि वाळ चांगले खेळतेय. मी शरमेने चूर झाले. वर पहाण्याचे धैर्य होईना.
 "वघ, बाळ ताईला बोलवतंय." गुरुजींचे शब्द .तेव्हापासून मला त्याची घाण वाटली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भंगीमुक्ती मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रसेवादलाचे सैनिक संडास सफाई करण्यास जात . आईपपांबरोबर मीही गेले आहे.
 मी गावे, नाटकात काम करावे असे आईला वाटे. गाण्यावर तर तिचे खूप प्रेम. मला वयाच्या दहाव्या वर्षी तिने श्रीपादशास्त्रींकडे गाणे शिकायला पाठवले. त्यांनीही भरभरून दिले. पण मीच नादान . त्या वयात संध्याकाळी चार भिंतीच्या आत आऊ करण्यात माझे मन लागत नसे. काही ना काही वहाणे मी करी. माझा आवाज वरा असावा. अप्पा म्हणत , तुझ्या गळ्यात ठुमरी कशी वसवतो बघ , कोंदणात हिरकणी वसवावी तशी . पण कोंदण हाती येईल तर ना? मी संगीत विशारद झाले तरी गाणे आत्मसात केले नाही म्हणून आईला नेहमी खंत वाटे. अगदी शेवटपर्यंत .मी तिच्यासाठी गात राहिले. ती जायच्या आदल्या दिवशीही मी कितीतरी गाणी म्हटली. माझिया माहेरा जा हे गाणे म्हणताना माझा आवाज जड झाला . भरून आला. तिच्या क्षीण हातांनी तिने माझा हात थोपटला. ते थोपटणे खूप काही सांगणारे होते.
 माझ्या मित्रमैत्रिणींची ती मावशी होती. कोणत्याही मुलाला मानलेला भाऊ म्हणण्याची पाळी माझ्यावर आली नाही. गिरीधर , एम.बी., सुरेश , शरद , अरु, अशोक , कितीतरी जण. . मी लग्नानंतर अंबाजोगाईला आले तरी त्यांचे आणि तिचे बंध घट्टच होत गेलेले. आजही आम्ही मित्र म्हणून नितळपणाने गप्पा मारू शकतो . अपार स्नेह आजही ताजा आहे . ही सारी तिने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची किमया आहे .
 माझा आंतरजातीय प्रेमविवाह . तिला माझी चिंताच असे. तिचे सारे लक्ष माझ्या घरट्याच्या सुरक्षिततेवर असे . मी लाडाकोडात वाढलेली . कामाची वा जबाबदारीची सवय नाही आणि डॉक्टर लोहिया काहीसे तापट . करारीही. सुरुवातीची काही वर्षे ती धास्तावलेलीच असावी . सामाजिक कार्यकर्त्यांचा संसार करताना किती ठिकाणी गाठी माराव्या लागतात हे ती जाणत होती आणि म्हणूनच मी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे रहावे असे तिला वाटे. मी एम.ए.होऊन महाविद्यालयात नोकरीला लागले . १९७२ साली नोकरीत कायम झाले आणि १९७४ मध्ये डॉक्टरांनी व्यवसाय सोडला , माझ्या एम.ए.मागची प्रेरणा पूर्णत्वाने तीच आणि पुढे 'मानवलोक'चे काम स्वतंत्रपणे सुरू झाल्यावर तिला माझा खूप अभिमान वाटे. पैशाची प्रतिष्ठा तिच्या लेखी कधीच नव्हती.
 महिला सदनच्या उभारणीत तिचा उत्साहाचा वाटा. वनिता समाजात ती जात असे . सुरेखपैकी बॅडमिंटन खेळे . आमच्या घरातच खालच्या मजल्यावर तिचे पार्टनर मधुभाऊ जोशी रहात , चाळीसपंचेचाळीस वर्षापूर्वी बॅडमिंटन खेळणे , मिश्र दुहेरी सामन्यात सहभागी होणे , आशीर्वाद सारखी नाटके वसवून त्यात सहभागी होणे, निर्वासितांसाठी कपडे गोळा करणे , सैनिकांसाठी स्वेटर्स विणून पाठवणे या गोष्टी ती सहज करी , यात पपांचाही वाटा होता.
 मला आठवते तशी ती राष्ट्रसेवादल प्रमुख होती. इंटकचे पुढारी असलेल्या श्री. वि. वा. नेने यांचा सहपरिवार मुक्काम आमच्या घरी होता. रेशनिंगचे दिवस होते. पण कधीही आईने कुरकुर केली नाही . मध्यंतरी त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक पाहण्यात आले. त्यात या राहण्याचा कुठे उल्लेख आला नाही. आईपपांच्या सहवासात असंख्य माणसे आली . पहाता पहाता दूर वा व्यावहारिकदृष्ट्या पुढे निघून गेली . आई मात्र नेहमीच आत्मतुष्ट होती. आर्थिक व राजकीय आकांक्षा नव्हत्याच आणि म्हणून खंतही नव्हती.
 सेवादलाचे ऋण मानणाऱ्यांनी मात्र आईवर खूप प्रेम केले, तिला आदर दिला. कलापथकाचे दिवस आले की ती मनोमन खुष असे. बापटकाका, सुधाताई, सदानंद वर्दे, प्रमिलाताई दंडवते, लीलाधर, यदुनाथ नि जान्हवीताई थत्ते, आवाबेन, नाना नि सुधाताई डेंगळे , सारी सेवादलाची मंडळी . ते तिचे श्रीमंत माहेरच होते जणू या मंडळींनाही आमचे घर कधी परके वाटले नाही. डॉ. वसुधा धागमवार , गीताबाई सान्यांची मुलगी, धडगावला काम करण्यासाठी आली . ती आईची भाची वनून गेली. ३२/३३ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध कथाकार प्रा. कमल देसाई धुळ्याला मराठीच्या प्राध्यापिका म्हणून आल्या प्रधान मास्तरांनी आईचाच पत्ता दिला होता. त्याही आमच्याच बनून गेल्या . अशा त्या प्रचंड संसाराची सहजपणे उठाठेव करणारी माय पाटावरून उठून गेली आहे. गेली चार पाच वर्षे थोडीफार आजारीच असे . पण तिने आजाराचा बाऊ केला नाही. प्रकाशची पत्नी, माधुरी तिची माहेरवाशीणच होती. तिने अत्यंत प्रेमाने आईची सेवा केली. आपल्या सुनेला आपले करावे लागते , तिला माहेरीही निवांतपणे जाता येत नाही याचे तिला वाईट वाटे. तिच्या चिमण्या नाती , जणू तिचा प्राण . छोटी अमृता रोज रात्री तिची गादी घालून देई . आजीची पापी घेऊन तिला गुड नाईट , सी यू वगैरेचा उपचार करी. अभिजितच्या वायकोचेही तिला अप्रूप होते . नातसून आपण पाहिली यातच ती तृप्त होती .
 "शैला येऊन भेटून जाते. पण माहेरवाशीण कितीही वेळा आली तरी पोट भरत नाही." ती म्हणे.
 आदल्या दिवशी रात्री खूप गप्पा मारल्या. मी जुनी जुनी गाणी म्हणून दाखवली. बोलताना माझा हात धरुन म्हणाली,
 "का उशीर होतोय कळत नाही."
 "कशाला ग?" माझा प्रश्न.
 "हेच ते मन कशात अडकलंय?"
 "छे गं! मी मजेत आहे. पण आता उशीर नको. माझ्यासाठी प्रार्थना करा. लवकर आटोप म्हणावं." ती म्हणाली.
 "आई , प्रार्थना कशासाठी करायची!" मी ."
 "ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्यांसाठी करायची." आई .
 आणि दुसऱ्या दिवशी सूर्याच्या शेवटच्या किरणांचा हात धरून ती निघून गेली.
 थोडी कण्हली म्हणून माधुरीने विचारले, आई , त्रास होतोय का? आता अगदी! जावेसे वाटतेय ... तिचे उत्तर.
 आम्ही पपांना तिच्याजवळ आणून बसवले. तिचा हात पपांनी हातात घेतला. ती मला म्हणाली , त्यांना कशाला इथे बसवलेस? ते हळवे आहेत. त्यांना सोसणार ! नाही.
 आणि हेच शेवटचे. शब्द.
 पपांनी मला विचारले ,हॅजशी पास्ड् अवे? इंग्लिश भाषेचा आधार त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी ते मला सांगत होते. "आधी तिने माझा हात घट्ट धरला . मग माझ्या लक्षात आले की तिचा हात सैल पडलाय आणि गारही."
 आईपपांची पिढी स्वप्नांना मातीचे पाय देण्यासाठी झटली. शब्दांना संदर्भ होते. वचनांना अर्थ होता.
 तीन्ही सांजा सखे, मिळाल्या देई वचन तुला
 आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला ...
हे वचन त्यांनी उणीपुरी छपन्न वर्षे पाळले . ते वचन मागणारी हाती हात देऊन तिन्ही सांजेचा मुहूर्त साधून निघून गेली. परंतु सभोवतालच्या परिसरात स्वतःला पेरून गेली. आज ती नाही . पण जिथे जिथे राष्ट्रसेवादल विचार आहे, तिथे तिथे ती भरून उरली आहे.

܀܀܀