वाहत्या वाऱ्यासंगे/हा वसंत रंग भरित

विकिस्रोत कडून

हा बसंत रंग भरित ...



 एक नुकतीच उमलू पहाणारी ताजीतवानी पहाट. अंधाराचे मावळते ठसे घरादारांच्या , कोवळ्या चैत्रपालवीच्या पापण्यांवर रेंगाळत आहेत . घरट्यांना अजून जाग यायची आहे. कळीचे सुगंधी टप्पोर अजून फुटायचेत. चार भिंतीच्या आड , पुस्तकांवरून निर्जीवपणे फिरणारी माझी नजर थकून , मरगळून गेलीय. जागल्याच्या घुंगुरकाठीचा लयदार ठेका जवळजवळ येत जातो. त्या ठेक्याच्या नादावर उमटलेली एक सहज सुरावट, मावळत्या अंधाराला कोरून जाते. अशा वेळी पुस्तकाचे जाड गठ्ठे आपोआप मिटले जातात . जाळीदार गवाक्षाबाहेर बहरणाऱ्या बसंती पहाटेच्या गुलबासी पाऊलखुणा निरखताना , डोळ्यापुढची ठोकळेवाज , डोके उठाड लिपी दूरदूर विरघळून जाते.
 घड्याळाचा काटा आत्ताशी चाराच्या पुढे रेंगाळतोय. पण रुख्याफिक्या कोनफळी रंगाची छटा चौफेर शिंपली आहे. नव्या दिवसाच्या उजेडाची हलकी चाहूल झाडांच्या, छपरांच्या पेंगुळल्या डोळ्यांना जाग आणते आहे. कालची सारी रात्र उकाड्याने घामेजून गेली होती. वडापिंपळाची वाभरी पानं सुद्धा रात्रभर चिडीचिप्प होती. पहाटेचं सोनेरी पाखरू शिरीषाच्या फांदीवर कधी येऊन बसलं ते रात्रीलाही उमगलं नाही. पण उकाड्यानं पेंगलेल्या देहावरून सुगंधी लहर भिरभिरून गेली नि त्या स्पर्शानं रात्रीचा अवघा देह मोहरुन झुलला. तिनं कौतुकानं शिरीषाकडे नजर टाकली . शिरीषाचा माथा सुगंधी रेशीमचौऱ्यांनी झिळमिळला होता.
 यावर्षी पाऊस नको तितका रेंगाळला . थंडीनेही साईसुट्यो उशिरानेच दिली. अगदी कालपरवापर्यंत थंडीचे कडक कडाके सारा आसमंत गोठवून टाकीत होते. झाडाझुडुपांवर वार्धक्याचे ठसे उमटवून शिशिर केव्हाच दूर गेला होता.
 एरवी, या दिवसात , पिंपळ हिरव्यापोपटी लक्ष लक्ष मोरपिसांनी झुळझुळत असायचा. पण शिशिराचे थरथरते हात पिंपळाच्या फांद्याफांद्यातून फिरले नि सारा वृक्ष रिकामा झाला. वावटळी यायच्या, पिकल्या पानांची विमानं पळवत निघून जायच्या . विस्कटलेल्या वैभवाची विकल साक्ष देणारं ते प्रचंड रिकामं झाड ! मनात रुतायचं. एक टवका खवळून दुखवायचं. सोनेरी सुगी संपलेली. खळीदळी झालेली. नजर जावी तिथे सुनासुनाट , ओकीबोकी धरती . निंबोणीच्या जाळीतून डोकावणारा चांदोबा , उजाड फांद्यांच्या आडून दीनवाणा वाटायचा.
 माझ्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर तीन चार शिरीष वृक्ष आहेत. विरळ पानांचे रेशमी जावळ आणि पिवळ्यधमक रंगाचे खुळखुळेच जणू , अशा रुंद फताड्या शेंगा वागवीत ही झाडं मुकाट उभी असतात . जातायेता माझी नजर या झाडांकडे आपोआप वळत असे , माझे श्वास अधीरतेने शोध घेत. निराश होऊन पाय रस्त्यावरून पुढे सरकत . होळी पुनव होऊन गेली होती. गच्चीवर बिछाने पडायला लागले होते. आणि उत्तररात्री अचानक जाग आली. एका विलक्षण गंधाची अत्तरी लाट, श्वासाश्वासातून अंगभर पसरत होती. दूरदूरवरून, वाऱ्याच्या पंखावरून येणारा विलक्षण मधुर गंध. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत रहातात...थेंबाच्या कारंज्यात भिजवत रहातात तशाच या सुगंधी लाटा. तनामनाला गच्च वेढून टाकणाऱ्या.
 आणि माझ्या शरीरातून वीज लकाकून गेली . गेले कित्येक दिवस ज्याची मनोमन , क्षणोक्षणी वाट पहात होते , तो वसंत आला होता.
 या रंगराजाच्या आगमनाची पहिली चाहूल लागते ती शिरीषालाच! एरव्ही डोळ्यात भरायचा नाही हा वृक्ष, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या अबोल पोराप्रमाणे हे झाड वर्षभर एकटेएकटे असते. वाऱ्याने गदगदा हिंदकळले तरी चारदोन पाने झडायची. लांबरुंद शेंगाचे खुळखुळे तेवढे वाजायचे. दुपारच्या चढत्या उन्हात या खुळखुळ्यांचा आवाज उरात उदासी निर्माण करतो. इतकीच काय ती याची चाहूल. आता मात्र ही झाडं फिक्कट हिरव्यापोपटी लाड्यागोंड्यांनी रसरसली आहेत. शिरीषाचं फूल तर अतीव कोमल . फुंकरीनेही मलूल होईल असं . लांबलांब चवरपाकळ्यांचे किंवा केसरांचे झुबके डोळ्यावरून अलगद फिरवावेत अन् स्वप्नांच्या महालाचे चंदेरी मिनार नजरेत रेखावेत. फांद्याफांद्यावर जणू सुगंधी स्वप्नांचे बहार, ऋतुराज बसंताच्या स्वागतासाठी आले आहेत.
 शिरीषाचे रंग दोन. अगदी फिक्कट हिरव्या रंगाचे शिरीषफूल उमलत्या पहाटेसारखे सौम्य आणि मुग्ध . तर हलक्या बसंती रंगाचे फूल क्षितिजावर रेंगाळणाऱ्या संध्येसारखे मोहक आणि रंगकिमयेने नजर मोहवणारे . मात्र या वसंती ...शरावी रंगाच्या फुलात सुगंधाची कुपी ठेवायला विधाता विसरला असावा. शिरीषाच्या रंगरूपापेक्षाही त्याच्या गंधाची उधळण अधिक प्यारी, श्वासांना भुलवणारी. या फुलांना स्वप्नांचा गंध आहे . श्वासांतून तरळत रहाणारा गंध . पापणीचे तीर भारावून टाकणारा. शिरीषाचे कौतुक करावं तर लगेच गुलमोहर पलीकडून खुणावू लागतो.
 थंडीने नाकाचा शेंडा लाल व्हावा तशी एखादी लालम परी हिरव्या पानपंख्यातून डोकावते तेव्हा मार्चची चाहूल येत असते. पहाता पहाता लालमपऱ्यांची जर्द विमाने हिरव्या पानांवर दाटीवाटीने उतरू लागतात . पहात पहाता सारा वृक्ष लालपिवळ्या फुलांनी भरभरून जातो. एरवी सतत सळसळणाऱ्या हिरव्या पानांचे तुरे पार नाहीसे हातात. इथून तिथून हळदकुंकवाचा गच्च सडा . पायतळी आणि फांद्यावरही . ऋतुराज वसंताच्या चाहुलीने गुलमोहर वहरतो तो थेट आषाढमेघांचे पहिले थैव अंगावर उडेपर्यंत ! मदनमंजिरीच्या लत्ताप्रहाराने आणि त्यांच्या मुखातून उधळलेल्या मद्याच्या स्पर्शाने अशोकवृक्ष मोहरतो असे कालिदासादी संस्कृत कवींनी वर्णिले आहे. पण फुलांनी डवरलेला अशोक मी तरी अजून पाहिलेला नाही .
 मात्र ऐन वसंत आणि ग्रीष्मात गुलमोहर वृक्षांवर उधाणलेली लाल नवती वघितली की वाटतं . वसन्तोत्सव साजरा करीत हिंडणाऱ्या अप्सरांच्या ओठांतून उधळणाऱ्या लालबसंती मद्याच्या चुळा या झाडांनी वरच्या वर तर झेलल्या नाहीत ना? नाहीतर असेही असेल. रंगोत्सवातील रंगभऱ्या पिचकाऱ्या चुकवीत धावणाऱ्या परीकन्या फांद्याफांद्यातून लपून तरं वसल्या नसतील ? फांद्याची ओंजळ रंगानं काठोकाट भरून घेताना गंधाचं भान मात्र गुलमोहराला राहिलंच नाही . सपोत निळ्या निळाईवर उठून दिसणारे लालशेंदरी भरगच्च तुरे, डोळाभर पहाताना गंधाची सय येतच नाही . नकळतं , सहजपणे फूल नाकाशी नेले तर काहीसा उग्रट दर्प जाणवतो.
 चैत्रगौरीची आरास मांडताना गुलमोहरच्या डहाळ्या का मांडत नाही कुणी? असा प्रश्न मला नेहमीच पडत असे. त्या फुलांचा चटपटीत रंग मला एवढा आवडे की छोटेपणी मी हट्ट धरून बसायची की याच फुलांचा गजरा करून दे म्हणून ! आईचा डोळा चुकवून गुलमोहराच्या डिक्षा अपऱ्या केसांत खोवून आरशासमोर उभे रहाण्यात मस्त वेळ जाई . शिवाय गुलमोहराच्या फुलांतली पाचवी फिक्कट पाकळी चवीला छान लागायची. किंचित तुरट...आंवट.
 माझी ही गुलमोहरी हौस अचानकपणे तृप्त झाली . उन्हाळ्याचे दिवस . आमची वस पुसदच्या रस्त्याने चाललेली. कलत्या संध्याकाळी कुठल्याशा तांड्यावरच्या वंजारा तरुणींचा घोळका गुलमोहराच्या रंगीत फांद्या नाचवीत , गाणी म्हणत , फेर धरून झुलत होता. होळीचे दिवस होते ते. भवताली लालभडक दिवल्यांचे पेटते झाड असावे तसा गुलमोहर . दरवर्षी वसन्त येतो, आणि मनात बहारून येते ते दीपकळ्यांचे केशरी झाड आणि रंगवाँवरा झुलता थवा. वंजारा तरुणींचा .
 कॉलेजच्या रस्त्यावर दोनही कडांनी निंबोणीची डेरेदार झाडं आहेत . पाडव्याच्या आधीच ही झाडं जोंधळी तंवराच्या नाजूक मंजिऱ्यांनी लखडून जातात . रस्ताभर त्या फुलांचा किंचित कडवट तरीही मधुर गंध सतावीत रहातो. निंबोणीची सावली थंड गारवा देणारी . कोवळ्या अंजिरी पानांच्या कडवट चवीतही आरोग्याचे अमृतघट भरलेले! निंबोणीची कोवळी पानं खाल्ल्याशिवाय पाडवा साजराच होत नाही आपल्याकडे. राजस्थानांत या लिमडीमाचे महत्त्व फार. राजस्थानी रमणींचा लाडका सण बडी तीज . तोही साजरा केला जातो लिमडीच्या पूजेने . घरात पाडव्याचा कितीही पसारा असो , त्यातल्या त्यात वेळ काढून लिंबाच्या कात्रेदार पानांच्या आणि इवल्याशा फुलांच्या डिक्षांच्या माळांची झिळमळती तोरणं दारादारांवर माळली जातातच . निंबोणीची कवळी पानं, गूळ घालून तयार केलेला घोळाणा घरातल्या दादाजींनी हातावर ठेवल्यावर, तोंड वाकडं न करता खायचा. हो, कारण त्याशिवाय पुरणपोळी ताटात नाही पडायची!
 कॉलेजमागच्या तळ्याच्या काठचं ते एकाकी झाड नेहमीच उदास वाटायचं. उंच वांधा . मातकट हिरवी पानं. डोळ्यात भरण्यासारखे काही नाही. परवा सहज नजर वळली . त्या झाडावर जर्दकेशरी रंगाचे पोपट जणू दाटीवाटीने बसले होते. नकळत पावलं तिकडे वळली . त्या केशरियाला अगदी जवळून निरखण्याचा मोह आवरला नाही. फांद्याफांद्यांवर वाकदार केशरीफुलांचे नखरेल झुबके पसरलेले. त्या झाडाजवळ जाऊन पाय उंचावून... उड्या मारून एक झुवका घरी आणला. त्या झाडाचं नाव मनोमनी केशरिया ठेवलं. घरी हा येताच माझा नवा शोध-दाखवला. तो खो खो खिजवीत म्हणाला , अगं हा पळस . डोंगरात , जाशील तिथे ही झाडं आहेत. या फुलांच्या रंगानं होळी खेळतात, संस्कृत साहित्यातला पलाश होता तर तो! एकच एक दुपदरी बाकदार कळी. त्यातून झिळमिळणाऱ्या रेशमी पाकळ्या . दरवर्षी बसंत येतो. डोंगरातली झाडं केशरिया वनून भरदिवसा झगमगायला लागतात. वाटतं, सूर्याचा ताप सहन न झाल्याने सावलीसाठी वणवण फिरणाऱ्या सूर्यकन्या धरतीवर तर आल्या नाहीत ना!
 ऐन फेब्रुवारीत वसंत पंचमीच्या आधीच आंब्याचे डेरेदार वृक्ष मधुमंजिऱ्यांचे गजरे माळून नटलं . रेखीव नाकाच्या आणि पाणीदार डोळ्यांच्या सावळ्या कोळिणीच्या भरदार अंबाड्यावर सुरंगीचा भरगच्च गजरा माळावा तशी ही सावळी घेरदार झाडं. मोहरल्यावर देखणी दिसणार . हे देखणं रूप नजरेत ठरेस्तोवर बालकैऱ्यांचे झुमके पानांच्या आडून डुलायला लागतात.जशी जशी कैरी टपोरायला लागते तशी तकतकीत होते नि जिभेला सुटतं पाणी. त्यातून ते झाड असतं शेजीबाईच्या अंगणात. दुपारी आई लवंडली की अंगणात जमायचं नि कैऱ्यांवर नेम धरायचे. एखादी टपकन पडली की काळजात धस्स् ! त्या कैऱ्या दगडाने फोडायच्या. हलक्या पावलांनी आणलेले तिखटमीठाचे पुडे. आणि पाठच्या दारी वळचणीला वसून ओरपलेली ही आंबट मिठाई ! आज ते दिवस आठवले तरी तोंडाला पाणी येतं.
 उन्हाळ्यात आंब्याची सायसावली किती शीतल असते. महाबळेश्वरचा थंडाई तुकडा जणू काढून इथे आणलाय ! कैऱ्या, चैत्रगौर , कैरीचं पन्हं , कैरीची डाळ, कैरीची मसाला फोड... या नुसत्या आठवणींनीही कलिजा खल्लास!
 वसन्ताची चाहूल रानातल्या झाडाझुडपांना लागते आणि शिशिरस्पर्शाने गारठलेल्या काटक्यांमधून अमृताचे जीवट रस सळसळायला लागतात . हिरव्या पानड्यांचे कोवळे हात जोडून , नवी नवलाई फांद्याफांद्यातून फुटायला लागते. जणू त्यांना या इवल्याशा जीवनातील अपूर्व आनंदोल्हासाचा सत्कार करायचा असतो , मृत्यूतून फुलणाऱ्या वसंताची साक्ष द्यायची असते.
 बसंताच्या जादुई स्पर्शाने अंगणातल्या जुईमोगरीही लाजून चूर होतात . मोगरीचे किती म्हणून प्रकार . वेली-मोगरीवरचे लांबट टपोरे मदन बाणकळे रात्रीच्या वेळी निरखावेत . जणू सुगंधी आकाशगंगेचा प्रवाह भूमीवर उतरून आला आहे ! मोगरीच्या झुडुपांवर कबुतरी कळ्यांचे टप्पोर पानापनांतून डोकावतात . राजहंसी रंगाच्या या फुलांचे प्राण त्यांच्या मधुर गंधात साठलेले आहेत. एखादीच कळी केसात अडकवा किंवा पाण्याच्या माठात टाका. अवघा आसमंत गंधाने झुलू लागतो.
 तर, असा हा वसंत! कोकिळेच्या स्वरांतून झेपावणारा, गुलाबी वाऱ्यातून अंगांगाला सुखावणारा, फुलापानांच्या रंगगंधातून मातीला खुणावणारा, तरुणाईच्या हृदयातील स्पंदनाना चैतन्य देणारा. घरदार...स्थळकाळ ...नातीगोती यांच्या पल्याड जाऊन आयुष्यात एकदातरी याचं स्वागत गच्च मिठी मारून करावं. मग येत्याजात्या वाऱ्यासोबत वयाचे हिशेब वाढत गेले, डोक्यावर सोनेरी कृतान्तकटकामलध्वजा फडकू लागल्या तरी, नजरेत , हृदयात साठवलेले बसंतीगाणे उतत नाही की मातत नाही, भेटला बसन्त टाकत नाही !

܀܀܀