Jump to content

युगान्त/मी कोण?

विकिस्रोत कडून




आठ



मी कोण?




 माणसाने कोठची तरी गोष्ट सिद्धीस जावी म्हणून ध्यास घेतला व मोठ्या प्रयत्नाने ती सिद्धीस नेली, तरी त्या सिद्धीपायी त्याला फार गोष्टी गमवाव्या लागतात. मानवाचे यश शंभर टक्के तर असत नाहीच. पण पन्नास टक्केसुद्धा हातात पडायची मारामार होते. 'ज्याला जय म्हणतात, तो मला तर पराजयासारखाच वाटतो आहे' असे म्हणणारा धर्म हेच सांगतो. (जयोऽयमजयाकारो भगवन् प्रतिभाति मे। १२.१.१५) ह्या सत्याचीच दुसरी बाजू महाभारतात फार विदारक रीतीने दाखवली आहे; ती म्हणजे वैफल्य, हा मानवी जीविताचा स्थायी भाव होय, ही. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती पराजित व निराश आहे. पण पराजयाबरोबर काही वेळा तरी इतरांच्या वाट्याला जय आलेला आहे. एक व्यक्ती मात्र सर्वस्वी पराजित, असफल व अकृतार्थ आहे. भवभूतीने सीतेला 'मूर्तिमंत विरह' म्हटलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे कर्ण हा मानवी शरीर धारण केलेले वैफल्य म्हणता येईल. कर्णाशी समदुःखी, समदैवी असा विदुर होता. पण दोघांच्या बाबतीत जरी काही घटना समदैवी सारख्या असल्या, तरी काही इतक्या निराळ्या होत्या की, त्यामुळे दोघांच्या आयुष्याच्या वाटा फार-फार निराळ्या झाल्या.
 धृतराष्ट्र व पांडू यांचा बाप व्यास. विदुराचाही बाप तोच होता. पण पहिल्या दोघांच्या आया राजकन्या म्हणून त्यांना राज्यपद मिळाले. दोघांनाही व्यंगे होती, तरी राज्योपभोग घेता आला. पांडूमागून राज्याभिषेक न होता धृतराष्ट्राने पंधरा-वीस वर्षे राज्य भोगले. बिचारा विदुर अव्यंग व बुद्धिमान असूनही आईमुळे ‘सूत' ठरला. राज्याला पारखा झाला. विदुराच्या आयुष्यातील विफलता जागोजाग प्रत्ययास येते. पण त्याचबरोबर अध्ययनाने व चिंतनाने ह्या विफलतेवर मात करण्याचे त्याचे प्रयत्नही दिसून येतात. जन्मतःच समाजातील स्थान ठरल्यामुळे व आपण कोण ह्याची जाणीव झाल्यामुळे त्या 'आपण'च्या किंवा 'मी'च्या मर्यादा त्याला आखता आल्या; एवढेच नव्हे, तर महत्प्रयासाने लौकिक 'मी'च्या सीमा ओलांडता आल्या.
 कर्णाच्या आयुष्याला व अंतःकरणाला जी विफलता ग्रासून राहिली होती, ती हीच होती की, त्याला ‘मी कोण?' ह्याचे उत्तर पहिल्यांदा मिळाले नाही व जेव्हा मिळाले, तेव्हा ते निरुपयोगी ठरले.
 सर्वसाधारणपणे मानवी आयुष्यात ‘मी कोण?' ह्याचे उत्तर आयुष्याच्या सुरवातीपासून मिळत जाते. आयुष्यातील कुठच्याही क्षणी हे उत्तर पूर्ण नसते. 'मी'चे परिमाण सारखे वाढत असते, पण त्याचबरोबर ‘मी'च्या मर्यादा स्पष्ट होत जातात. जन्मल्यापासून काही वर्षे लहान मुलांना 'मी' या शब्दाची जाणीव नसते. ती स्वतःचा उल्लेख पुष्कळदा तृतीय पुरुषानेच करतात. मीपणाची जाणीव ‘माझे'पणात असते. ही माझी आई. हा माझा बाप. ही माझी खेळणी. हे माझे घर. ही माझी भावंडे. आणि ज्याच्याभोवती ह्या सर्व वस्तू गोळा झाल्या आहेत, ते केंद्र ते मी, ही जाणीव कौटुंबिक व नंतर सामाजिक संबंधांपासून दृढ होऊ लागते. 'ही माझी आई', ह्या भावनेबरोबरच 'मी हिचा मुलगा', ही भावना उत्पन्न होते. कुटुंबापलीकडे ‘मी'चा विस्तार होत राहतो. आणि ज्या-ज्या संबंधांत तो ‘मी' जाणवतो, त्या-त्या संबंधांमध्ये त्या 'मी'च्या विरुद्ध असलेला 'मी'हून दुसरा 'तू' किंवा 'तो' हा जाणवतो, व त्या दुसऱ्याच्या 'मी'बद्दलच्या अपेक्षाही जाणवतात. त्या अपेक्षा म्हणजे मनुष्याच्या मीपणाचे निरनिराळे आविष्कार असतात. 'मी' मुलगा असतो, बाप असतो, नवरा असतो, त्याचप्रमाणे एखाद्या शहराचा रहिवासी असतो, एखाद्या जातीचा, कुळाचा असतो. त्यात जसे अधिकार असतात, तशीच कर्तव्येही असतात. आणि एका तऱ्हेच्या 'मी'चा दुसऱ्या तऱ्हेच्या 'मी'पासूनचा फरक निरनिराळ्या सामाजिक प्रसंगांनी व बच्याचदा धार्मिक संस्कारांनी स्पष्ट होतो. विदुर सूत म्हणून त्याच्यावर सूताचे संस्कार झालेले होते. त्याचे सामाजिक स्थान अगदी घट्ट, पक्के झालेले होते. भाऊ म्हणून धृतराष्ट्राने त्याला प्रेमाने मांडीवर घेतले, त्याला मिठी घातली. (सोऽङ्कमादाय विदुरं मूध्न्रर्युपाघ्राय चैव । ह।क्षम्यतामिति चोवाच। ३.७२० ह्या प्रकरणात ३.७४ व ३.८४ हे दोन्ही अध्याय वाचावे.) पण त्याला काही कुणी राजकन्या लग्नात मिळाली नाही, किंवा क्षत्रिय म्हणून त्याचा सन्मानही झाला नाही. उपेक्षित जिणे जगुनही 'मी कोण?' हा प्रश्न विदुराला पडला नाही. कर्ण ह्या प्रश्नाच्या दुष्ट भोवऱ्यात सापडला होता. त्याला समाजात निश्चित स्थान नव्हते. त्याच्या मनाला त्याचे स्थान निश्चित करता येत नव्हते. जे स्थान माझे आहे असे त्याला वाटत होते. ते मिळवण्यासाठी त्याची सारी धडपड होती; आणि ते मिळत नाही, म्हणून तो जन्मभर जळत राहिला.

 अधिरथ नावाच्या सुताकडे कर्ण जवळ-जवळ जन्मल्यापासून वाढला. अधिरथाची बायको राधा हिने आपल्या मुलाप्रमाणे त्याला वाढवले. पण तो त्यांच्या पोटचा मुलगा नाही, ही गोष्ट लपवून ठवलेली नव्हती. जन्माबरोबरच कवच-कुंडले त्याच्याजवळ होती. पुष्कळ द्रव्य त्याच्याबरोबर आलेले होते. त्याला अधिरथाने नाव ठेवले, तेसुद्धा क्षत्रियाचे, ‘वसुषेण' असे. तो कसा सापडला, त्याच्याबरोबर काय होते, ह्या गोष्टी लहानपणापासून त्याला माहीत होत्या. आपण क्षत्रिय आहोत, आज नाही उद्या आपली क्षत्रिय आई किंवा बाप आपला स्वीकार करील, अशी त्याला आशा होती. अधिरथाबद्दल व राधेबद्दल त्याला प्रेम व कृतज्ञता असूनही त्यांच्यातलाच एक म्हणजे सूत म्हणून तो रहायला तयार नव्हता. राजपुत्र नाही, म्हणून त्याला विख्यात गुरुकडे उघड रीतीने शस्त्रविद्या शिकता आली नाही. तो चोरून-मारून, आपले नाव लपवून ती शिकला. तीत अतिशय निष्णात झाला. नंतर आपले असामान्य कौशल्य दाखवण्याची त्याने संधी साधली. पण त्याचे परिणाम मात्र भयंकर झाले.
 तो प्रसंग असा : धर्मादी पांडवांना व दुर्योधनादी धार्तराष्ट्रांना शस्त्रविद्या शिकवून झाली होती. आपले शिष्य शस्त्रविद्येत किती तरबेज झाले आहेत, हे कौरवप्रमुखांना दाखवण्यासाठी द्रोणाचार्यानी मोठा समारंभ केला. मोठे मैदान मध्ये ठेवून भोवती माणसे बसण्यासाठी मांडव घातले. धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, विदुर, कुंती व कौरवसभेतील इतर मोठी मंडळी जमली होती. सर्वजण मुलांचे कौतुक पाहत होती. सर्वात कमाल केली अर्जुनाने. धनुर्विद्येतील त्याचे असामान्य प्रभुत्व पाहून सर्वजण थक्क झाले. एवढ्यात रंगद्वाराशी गलबला झाला. एक महाकाय, तेजस्वी तरुण पुरुष आत शिरला व म्हणाला, “या अर्जुनाने करून दाखवले, ते सर्व मी करून दाखवतो. त्याचप्रमाणे त्याने अर्जुनाने दाखवलेली सर्व करामत करून दाखवली, व नंतर अर्जुनाला द्वंद्वयुद्धास पाचारण केले.
 रंगात शिरलेला पुरुष कर्ण होता. तोपर्यंत त्याला कोणी पाहिलेले नव्हते.
 महाभारतातील इतर महत्त्वाच्या प्रसंगांप्रमाणे हाही प्रसंग लहानसाच, अतिशय गतिमान व नाट्यपूर्ण आहे. काय घडते आहे, त्याची पूर्ण जाणीव होण्याच्या आतच तो संपतो. जे घडत जाते, ते तसे घडेल, असे त्या प्रसंगात सापडलेल्या व्यक्तींच्या स्वप्नीही नव्हते. जे घडले, ते मात्र महाभारताच्या कथावस्तूच्या दृष्टीने अती महत्त्वाचे, कथेची धार वाढवणारे, कथेत काही निराळाच अर्थ भरणारे असे होते.
 द्रोण आपल्या शिष्यांची करामत दाखवीत होता. बाहेरच्या राजपुत्रांना आमंत्रण नव्हते. अशावेळी कर्ण आगंतुकपणे आत का शिरला असावा? कर्ण आपले कौशल्य दाखवण्यासाठी रंगात जाणार, ही कल्पनाही अधिरथाला नव्हती. ह्या क्षत्रियसभेत जाऊन आपले कौशल्य दाखवावे, म्हणजे खूष होऊन कदाचित आपला क्षत्रिय बाप किंवा क्षत्रिय आई आपला स्वीकार करतील, अशी कर्णाची आशा असावी. आपले कौशल्य दाखवून आपण अर्जुनापेक्षाही वरचे आहोत, अशी वाहवा सर्वांकडून मिळवून त्याला थांबता आले असते. एवढ्याने त्याचा कार्यभाग साधला असता, पण काही कारण नसता त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धास पाचारण केले.
 ह्या अनुषंगाने परत एकदा वयाचा प्रश्न येतो. ह्या प्रसंगी धर्म सोळा-सतरा वर्षांचा असेल, तर अर्जुन जेमतेम चौदा-पंधरा वर्षांचा असणार. धर्म अठराचा धरला, तरी अर्जुन पंधरा-सोळाचा असणार. कर्ण कुंतीला कुवारपणी झालेला म्हणजे निदान वर्ष-दोन वर्ष तरी धर्मापेक्षा मोठा, म्हणजे अर्जुनापेक्षा कमीत-कमी चार वर्षे वडील , वीस बावीस वर्षांचा. ह्या वयात पंधरा व वीस हे अंतर शरीराच्या वाढीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे असे आहे. पंधरा वर्षाचा मुलगा कुमार, तर वीस वर्षांचा तरुण. उंची, रुंदी, बळ सर्वच शारीरिक दृष्टींनी वरचढ. आपली कला दाखवावी हे ठीक; पण पोराशी द्वंद्व मागणे हे वीराला शोभणारे असे वाटत नाही. शाच्या चरित्रात हाच स्वभावदोष दोन-तीनदा खटकतो
 आवेशाच्या भरात क्षणिक रागाला बळी पडून तो नको ते करून जायचा. उतावळेपणा हा एक प्रकारे क्षत्रियांचा धर्मच; पण त्या उतावळेपणातही क्षुद्रपणा दिसता कामा नये,अशा तऱ्हेचा अलिखित नियम होता. कर्णाला तो पाळता आला नाही. त्याला कारण कर्णाचे विफल आयुष्य. क्षत्रियांचे कसब काही प्रमाणात त्याला साध्य झाले. पण क्षत्रियांची आचार-विचारांची, उत्तम क्षत्रियांच्या अशा मानल्या गेलेल्या आचार-विचारांची भूमिका त्याला साधली नाही. क्षत्रियांची अनौरस अवलाद म्हणून मनात एक त्वेष भरून राहिला होता. वेळोवेळी तो राग उफाळून आलेला दिसतो. क्षत्रियांची अनौरस संतती असूनही काही परिस्थितीत क्षत्रियत्व मिळण्याची शक्यता होती. पण ते कर्णाला मिळत नव्हते. ‘सूत' या वर्गाला मान्यता मिळावी किंवा क्षत्रियत्व पौरुषावर ठरावे, अशा तऱ्हेची तात्त्विक भूमिका कर्णाने घेतली नव्हती. 'दैवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्' ह्या भूमिकेवरून कर्ण भांडत नव्हता. आधुनिक वर्गकलहाचे बीज ह्या झगड्यात नव्हते. कर्ण स्वतःच्या, एकट्याच्या स्थानासाठी झगडत होता. शस्त्ररंगातील त्याच्या ह्या वेळच्या धारिष्टाला फळ मिळाले नाही. त्याच्या जन्माचे रहस्य रहस्यच राहिले. आणि आपले क्षत्रियत्व सिद्ध करण्याची पराकाष्ठा करूनही ते मिळाले नाही, म्हणून त्याचा संताप अधिक झाला.
 अर्जुनाला त्याने द्वंद्वास बोलावल्यावर रंगाचे दोन भाग पडले. अर्जुनाच्या पाठीमागे धर्म-भीष्मादी उभे राहिले. कर्णाच्या पाठीमागे दुर्योधन व त्याचे भाऊ उभे राहिले. ज्याला अस्त्रे व युद्धनीती माहीत होती [द्वन्द्वयुद्धसमाचारे कुशलः सर्वधर्मवित्।] असा कृप मध्ये उभा राहिला. त्याने रीतीप्रमाणेच म्हटले, “हा अर्जुन पांडूचा मुलगा युद्धाला तयार आहे. वीरा, तुझेही नाव, कुल सांग" कर्णाला कूळ सांगता आले नाही. त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
 दुर्योधन ताबडतोब पुढे आला. लढवय्याला कुळाची अपेक्षा का, असा प्रश्न त्याने घातला. अर्जुन जर ‘अ-राजा'शी युद्ध करण्यास तयार नसला, तर कर्णाला मी अंगाचे राज्य देतो, असे म्हणून त्याने ताबडतोब तेथल्या-तेथे कर्णाला राज्याभिषेक केला. (हा सर्वच भाग प्रक्षिप्त वाटतो. दुर्योधन त्यावेळी राजकुमार होता. धृतराष्ट्र हा राज्यावर(?) होता. राज्य भीष्माच्या देखरेखीखाली चालले होते. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले होते. राज्य धर्माला मिळण्याची शक्यता उत्पन्न झाली होती, हे लगेच पुढच्या अध्यायावरून दिसून येते. अशा स्थितीत दुर्योधन कर्णाला कुठचेही राज्य देण्याला असमर्थच होता. त्याने राज्य द्यावे व लगेच तेथल्यातेथे अभिषेक करावा, ह्या गोष्टी अशक्य म्हणून प्रक्षिप्त वाटतात. हा भाग वगळून पुढे जे घडते, ते मात्र क्रमप्राप्त व अपरिहार्य वाटते.) कृपाने कर्णाला नाव व कुल विचारले, ते कर्णाला सांगता आले नाही. (मध्ये वर सांगितलेला प्रक्षिप्त भाग) तो गोरामोरा झाला. इतक्यात मांडवाच्या दरवाजाशी परत गडबड झाली. घाईघाईने, घाबऱ्याघाबऱ्या उपरणे (उत्तरीय) ज्याच्या पायांत लोळत आहे, असा अधिरथ आत शिरला. त्याला पाहून आदराने कर्ण पुढे झाला व 'बाबा' म्हणून त्याने नमस्कार केला, व पुत्रक' (पोरा) म्हणून अधिरथाने त्याला मिठी मारली. ‘तू कोणाचा?' ह्या कृपाच्या प्रश्नाला आपोआप, लगोलग उत्तर मिळाले. कर्णाला हवे असलले क्षत्रियत्व तर नाहीच मिळाले, पण सूतपुत्रत्व मात्र जाहीर झाले. भीमाने हृदयावर जखम केली. “अरे, तुझ्या धंद्याचे प्रतीक जो चाबूक तो हातात घे. शस्त्र कशाला धरतोस?" हे ते भयंकर शब्द होते. दुर्योधनाने कर्णाला मिठी मारली व आपली मैत्री देऊ केली व कर्णाने ती उपकृत बुद्धीने व आनंदाने स्वीकारली.
 सूर्य मावळला. बोलाचाली व भांडणे बंद झाली. शस्त्रविद्याप्रदर्शनाच्या रंगाचाही शेवट झाला.
 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा उलगडा तर बाजूलाच राहिला, पण नवीन गुंता मात्र उत्पन्न झाला. त्या वेळी नाही, पण नंतर कधीतरी कर्णाला अंगाचे राज्य मिळाले. राज्य मिळवूनही कर्ण कायम कौरवांच्या दरबारीच राहिला. दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र म्हटले; पण ती मैत्री अशा स्वरूपाची होती की, कर्णाचा ‘मी । कोण?' हा प्रश्न लोंबकळतच राहिला. दुर्योधनाच्या मैत्रीमुळे तो क्षत्रिय होऊ शकला नाही. दुर्योधनाने आपली बहीण किंवा कौरवकुळातील एखादी राजकन्या कर्णाला दिली नाही. याउलट कर्णाने स्वतःच उद्योगपर्वात सांगितल्याप्रमाणे त्याचे लग्न एका सूतकुळातील मुलीशी झाले व पुढे त्याच्या मुलामुलींचीही लग्ने सूतकुळातच झाली. ज्या घटकेला व प्रसंगात दुर्योधनाने कर्णाला जवळ केले, तो प्रसंगच अशा तऱ्हेचा होता की, दुर्योधनाचे व कर्णाचे नाते अगदी बरोबरीच्या मित्राचे झाल्यासारखे दिसत नाही. तो अगदी जवळचा पण स्वामिभक्त नोकरच राहिला. दुर्योधनाच्या प्रेमापेक्षा दुर्योधनाच्या उपकाराखाली कर्ण दबलेला होता. त्यामुळे लौकिकात कर्णाचे सूतत्व अढळ झाले. आपण खरे सूत नाही, ही भावना मात्र दृढच राहिली आणि वरून तर पूर्णपणे सूतत्व पदरी बांधले गेले. ह्या भयंकर परिस्थितीत त्याचे मन आतल्या-आत कुढत राहिले. पांडवांचे व आपले काही नाते आहे, हे त्याला माहीत नव्हते. असे असूनही त्याने पांडवांशीच वैर का धरले, ह्याला तीन कारणे असू शकतील. शस्त्ररंगात भीमाने त्याचा अपमान केला होता. अर्जुन त्या वेळचा मोठा योद्धा म्हणून अर्जुनाशी त्याची स्पर्धा होती. आणि पांडवांचा कट्टा वैरी जो दर्योधन त्याचा तो मित्र झाला होता. त्याच्या दुर्दैवाने स्पर्धेच्या प्रसंगी तो कमी ठरला व त्याची हृदयव्यथा वाढतच राहिली.
 पांडवांना लाक्षागृहात जाळायच्या कटात कर्ण नसावा. त्या कटात मुख्य मसलत धृतराष्ट्र व दुर्योधन या दोघा बाप-लेकाचीच होती, असे दिसते. हा कट फसल्यावर मात्र पुढील सर्व प्रसंगात कर्ण-दुर्योधनाच्या मसलतीत होता. एका आवृत्तीप्रमाणे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी स्वयंवराचा पण जिंकायचा प्रयत्न कर्णाने केला. हा प्रसंग प्रक्षिप्त म्हणून नव्या आवृत्तीत वगळलेला आहे. कदाचित कर्णाचे धनुर्विद्येचे कसब पण जिंकण्याइतके मोठे नव्हते, किंवा दुर्योधन तेथे असल्यामुळे कदाचित आपण दुर्योधनाचे प्रतिस्पर्धी होऊ नये, म्हणून त्याने जिंकण्याचा विचारही केला नसेल. काही का असेना, दुसऱ्या कोणालाही जे करता आले नाही ते अर्जुनाने केले, व लढाईतही त्याने कर्णाला हात दाखवला. ह्याप्रसंगी अर्जुन ब्राह्मणवेषात होता. अर्जुन ब्राह्मण म्हणून कर्ण त्याच्याशी फार लढला नाही असे म्हटले आहे. त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही. एका ब्राह्मणाने क्षत्रियकन्या जिंकली, म्हणून सर्व राजे रागावून लढाई करावयाला निघाले होते. कर्णानेही लढाई केली आणि मग अर्जुन ब्राह्मण आहे, म्हणून लढाई अध्र्यावर सोडून दिली, हे विचित्र दिसते. ह्या ब्राह्मणाला चोपून काढायला वेळ लागणार नाही, असे सर्वांना वाटले होते. पण जेव्हा अर्जुन व त्याच्या मदतीला भीम ह्यानी अचाट पराक्रम केला, तेव्हा मध्येच ‘तू ब्राह्मण आहेस का कोण आहेस?' हा प्रश्न विचारून लढाई सोडून देणे अप्रस्तुत वाटते.
 द्यूतपर्वात एका तऱ्हेने सर्वांचीच परीक्षा झाली. “आता काय झाले, आता काय झाले' असे विचारणाऱ्या,हावऱ्या, आंधळ्या धृतराष्ट्राची परीक्षा झाली. पांडवांनी सगळे घालवले, तेव्हा ‘गौ,गौ,गौ, गौ' म्हणून ओरडणाऱ्या दुःशासनाची परीक्षा झाली. द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळी होणाऱ्या हिडीस प्रकाराला आळा घालावा म्हणून धडपडणाऱ्या विदुराची परीक्षा झाली. त्याचबरोबर ह्या सर्व कशाशी ज्याचे काही नातेगोते नव्हते, त्या कर्णाचीही परीक्षा झाली व तो सर्वस्वी हीन ठरला. द्रौपदीला सभेत ओढून आणलेली होती. दासी आहे किंवा नाही, ह्या प्रश्नाचा ऊहापोह चालू होता. दुर्योधनाचा धाकटा भाऊ विकर्ण उठून म्हणाला होता की, 'अशा तऱ्हेने सतीला ओढून आणणे बरोबर नाही, ती दासी होत नाही.' यावेळी कर्ण रागारागाने उभा राहिला व त्याने विकर्णाची निर्भर्त्सना केली. “पाच पुरुषांची बायको, ही कसली पतिव्रता! ती तर स्वैरिणीच. तिला सभेत ओढून आणणे ह्यात गैर काहीच झाले नाही. ह्या सर्वांनी आपले सर्वस्व गमावले आहे. ते दास झाले आहेत. आपल्या वस्त्रावरसुद्धा त्यांचा हक्क नाही. काढा त्यांची वस्त्रे" हे शब्द ऐकल्याबरोबर पांडव आपली नेसती वस्त्रे सोडून सभेत बसले व दुःशासनाने कर्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीचे वस्त्र फेडावयास सुरवात केली. कर्ण उठून बोलेपर्यंत चर्चा चालली होती; पण त्याने उठून द्रौपदीची विटंबना करण्यास उघड प्रोत्साहन दिले. संपत्तीबद्दल, राज्याच्या वाटणीबद्दल पुरुषा-पुरुषांत भांडण होते ते युद्धाने सोडवावे, वाटल्यास फासे खेळून सोडवावे; पण या भांडणामध्ये पराभूतांच्या बायकोची भरसभेत विटंबना करावयाचे कारण नव्हते. कर्ण सूत आहे की क्षत्रिय आहे, हा प्रश्न येथे नव्हता. सामान्य मानवधर्माचा प्रश्न होता. प्रश्न कायद्याचाही नव्हता. एका कुलस्त्रीची अब्रू घ्यायची का नाही, इतका सोपा प्रश्न होता. ह्या भावा-भावांच्या भांडणात कर्णाने अशा तऱ्हेने भाग घ्यायला कारणही नव्हते. पण कर्ण त्यात पडला आणि सूडापायी तो सदसद्विवेक अजिबात विसरू शके, हे सिद्ध झाले. घोषयात्रेच्या प्रसंगाने परत एकदा कर्णाला मान खाली घालावी लागली. त्यावेळी प्रत्येक राजाचे मोठ-मोठे गुरांचे कळप असत. हे कळप राज्याच्या हद्दीला लागून असलेल्या रानाशेजारी असत. कळपांची देखरेख करणारे अधिकारी असत. अधून-मधून खुद्द राजा कळपांची देखभाल करण्यासाठी जात असे. मागच्या वेळी असलेल्या गुरांच्या कळपात ज्या नव्या वासरांची भर झाली असेल, त्यांच्या अंगावर राजाच्या मालकीचे चिन्ह उमटवीत असत. बहुतेक हे चिन्ह म्हणजे तापलेल्या मुद्रेचा डाग असावा. पांडव वनात गेल्यावर हस्तिनापूरच्या लगतच्याच अरण्यात राहत होते. घोषयात्रा म्हणजे गोठ्यांची तपासणी करण्यासाठी केलेला प्रवास होय. ह्या निमित्ताने बायका, मुले व मोठा लवाजमा घेऊन रानात जायचे व आपल्या वैभवाचे प्रदर्शन करून निर्वासित पांडवांना खिजवायचे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश होता. त्या यात्रेच्या वेळी एका गंधर्वाशी काहीतरी कुरापत निघून भांडण उद्भवले. त्या भांडणात गंधर्वांनी कौरवांना मारून काढले व दुर्योधनाला कैद करून नेले. ह्या हाणामारीत कर्ण पळून गेला व त्याने एका जवळच्या खेड्यात आश्रय केला. शेवटी पांडवांनी दुर्योधनादी कौरवांना सोडवले व त्यांची परत पाठवणी केली. पांडवांनी कौरवांना सोडवले हे कळायच्या आधीच राजा कैद झाला, ही बातमी हस्तिनापुराला पोहोचली होती व भीष्म सैन्य घेऊन राजाला सोडवायला निघाला होता. तेवढ्यात त्याला सुटकेचीही हकीकत कळली. वाटेत कर्ण भेटला. त्याने राजा कोठे आहे, कसा आहे वगैरे विचारपूस केली. भीष्माने ताबडतोब उत्तर केले, “राजा जिवंत आहे ना, हे विचारावयाला खरे स्वामिभक्त जिवंतच राहत नाहीत. राजाला संकटात टाकून तू पळून आलासच कसा? तुझे राजावरचे प्रेम हे थोतांड आहे." कर्णाने दुर्योधनाच्या मित्राची भूमिका स्वीकारली होती. 'मी कोण?' ह्याचे उत्तर त्याच्यामते ‘मी दुर्योधनाचा मित्र', असे होते, पण ह्या प्रसंगाने व भीष्माच्या धिक्काराने त्याची परत एकदा जीवघेणी परीक्षा झाली व ती तो उतरला नाही.
 ह्या पुढचा प्रसंग गोग्रहणाचा. त्या वेळी तर अर्जुन एकटा होता व कौरवांच्या बाजूने लहान-मोठे सर्व वीर होते. तेथेही कर्णाचे अर्जुनापुढे चालले नाही. अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला, एवढेच नव्हे, तर त्यांची सुंदर तलम वस्त्रे हिरावून घेऊन त्याने ती उत्तरेला बाहुलीसाठी म्हणून दिली. हा प्रसंग जरी वगळला, तरी त्याने कौरवांना पिटाळून लावले व विराटाच्या गाईही सोडवल्या यात शंका नाही. 'आता युद्ध नको. राजाला मध्ये घालून माघारी वळा' हा भीष्माचा इशारा सर्वांनी पाळला, अशी एक पळवाट कर्णाला ह्याही प्रसंगी आहे,पण तीत अर्थ दिसत नाही. कौरव विराटाच्या राज्यात शिरले होते. गाई पळवायच्या, हा त्यांचा उद्देश. तो सिद्धीस गेला नाही तर परक्या राज्यात, परक्या देशात त्यांच्यावर बाका प्रसंग आला असता. अशा तऱ्हेची लूटमार त्वरेने करावी लागते; मोठ्या लढाईला वेळ नसतो; वेळ गमावला, तर शत्रूला आणखी सेना आणता आली असती, म्हणून निघून जाणेच योग्य होते, वगैरे सर्व मुद्दे लक्षात घेतले, तरी अर्जुनाने आपल्या कौशल्यामुळे सैन्याने वेढलेल्या गाईंना मोकळे केले; गाई उधळून लावल्यावर कौरवांनाही हात दाखवला; व त्यांना मागे परतण्यावाचून गत्यंतर नाही अशी स्थिती आणली, ह्यात शंकाच नाही. अर्जुनाला भेकड सारथी मिळूनही रथातून लढण्याचे महारथित्वाचे आपले कौशल्य त्याने प्रकट केले. कर्ण युद्धविद्येत अर्जुनापेक्षा कमी ठरला.
 कर्णकथेत सूर्याची निरर्थक लुडबूड जिथे-तिथे दिसते. 'इंद्र कवच-कुंडले मागायला येईल ती तू देऊ नकोस,' असे म्हणे सूर्याने कर्णाला सांगितले. तसेच, ‘तू माझा मुलगा,' असे कुंती म्हणाली, तेव्हाही “कुंती म्हणते ते खरे आहे. कर्णा, आईचे ऐक,"असे सूर्य बोलला. कर्णाने दोन्ही वेळा त्याचे ऐकले नाही. गोष्टीच्या परिपोषाच्या दृष्टीने सूर्याची ही भाषणे अगदी निरुपयोगी व अवास्तव आहेत. सूर्याला मुलाची एवढी काळजी होती, तर शस्त्ररंगाच्या वेळी ‘हा माझा मुलगा,' असे तो का बोलला नाही? ह्या आकाशवाणीने कर्णाचे क्षत्रियत्व सिद्ध झाले नसते, पण देवपुत्रत्व तरी त्याला मिळाले असते.
 कर्ण सूर्यपूजा का करीत असे, तेही समजत नाही. कुंडले ही वस्तू कान फाडून देण्यासारखी आहे. पण सहज-कवच अंगावरून सोलून रक्तबंबाळ होऊन दिले, म्हणजे काय? सहज-कवच गेल्यावर कर्ण काही लढाईत कवचहीन लढला नाही. अर्जुनाच्या बाणांनी त्याचे कवच फोडले, असे वर्णन आहे. जे इतरांना नाही, ते कर्णाजवळ होते. त्यामुळेच आपण वास्तविक सूतपूत्र नाही, ह्याची त्याला मनातून खात्री होती. कवच-कुंडलांमळे तो अजिंक्य होता का? ती देण्याने त्याने मरण ओढवून आणले असे म्हणावे का? कवच-कुंडले असतानाही द्रौपदी-स्वयंवरात, घोषयात्रेत व गोग्रहणाच्या वेळी तो पराभव पावला होताच. मग ही आत्यंतिक दानशूरता तरी का? 'मी कोण?' ह्याच्या शोधापायीच असे झाले का? आपली छाप इतरांवर पाडायची गरज त्याला वाटत होती. त्याच्या मनातील खळबळीचा, समाजातील स्थान पक्के नसल्यामुळे वाटणाऱ्या दैन्याचाच हा परिणाम असेल का? कर्णाच्या प्रत्येक कृत्यात अपेक्षित मर्यादांचे उल्लंघन दिसते. शस्त्ररंगात त्याने आपले नैपुण्य दाखवले, ते योग्य होते; पण अर्जुनाशी द्वंद्व करावयास मागणे म्हणजे अतिप्रसंगच होता. तीच गोष्ट द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळची. पांडवांची मानहानी होत होतीच. कर्णाने मध्ये पडण्याचे कारण नव्हते. पण त्याला राहवले नाही. दृष्कृत्यच नव्हे, तर सत्कृत्यातही तो पटदिशी साधारण माणसांच्या मर्यादा ओलांडून काहीतरी जास्त करण्याच्या मोहात पडे.
 कर्णाच्या आयुष्यात काही क्षण सोन्याचे ठरले. कुठच्या तरी वेळी मोठे सुख, मोठी ऋद्धी वा मोठा मान मिळाला म्हणून नव्हे. लौकिकाने तो होता, तोच राहिला, पण त्याच्या मनातल्या व्यथा नाहीतशा व्हाव्यात, असे ते क्षण होते. 'आपण कोण?' ह्याचे त्याला उत्तर मिळाले; पण त्याच क्षणी त्याने उत्तराने उद्भवणाऱ्या पेचातून मोठ्या उदात्तपणे आपली सुटका करून घेतली. कर्णाच्या पूर्वीच्या व पुढच्याही आयुष्यात मनाचा गोंधळ दिसून येतो. पण ह्या दोन प्रसंगांतील त्याचे बोलणे व त्याचे कृत्य ह्यांत विचारांचा विलक्षण स्पष्टपणा दिसतो. कोठेही शंका नाही, की गोंधळ नाही.सर्व गढूळपणा जाऊन मन आरशासारखे लख्ख झालेले दिसते. हे दोन्ही प्रसंग मानवी पातळीवरचे आहेत. ह्यात कर्णाची आणखी एकदा परीक्षा, अतिशय कठीण परीक्षा झाली आहे. कर्ण ह्या परीक्षेत उतरला. तो सर्वस्वी मानवी पातळीवरच. काहीही दैवी,अतिमानुष, अत्युदात्त असे न दाखवता. त्याही वेळी त्याची निराशा, संताप-सर्व काही व्यक्त होते. पण ते व्यक्त करताना त्याच्यात दीनपणा दिसत नाही. दोहोपैकी एक प्रसंग कृष्णाने त्याला 'तू पांडवांच्या बाजूचा हो,' म्हणून गळ घातली तेव्हाचा; व दुसरा प्रसंग कुंतीने त्याला ओळख दिली तो. कृष्णाने कधी नव्हे, अशी आमिषे दाखवली. ज्यासाठी तो जन्मभर झगडला, ते सर्व व त्याने कल्पना केली असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याला देऊ केले. तो क्षत्रिय म्हणून सिद्ध होत होते; त्या वेळच्या उच्चतम कुळातला म्हणून त्याला मान मिळत होते; राज्य मिळत होते; ज्यांचा जन्मभर दुस्वास केला ते हात जोडून चाकर म्हणून उभे रहायची शक्यता होती. पण ह्या सर्वांवर कर्णाने पाणी सोडले. तेही सहज, विचार न करता, शिव्या न घालता, कृष्णाला काहीही दुरुत्तरे न बोलता. "कृष्णा, तू म्हणतोस ते अशक्य आहे. माझा जन्म सूतांमध्ये गेला. माझ्या व माझ्या मुलांच्या सर्व सोयरिकी सूतांमधल्या आहेत. मी आता त्यांच्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. राज्य मिळाले, तरी मी ते दुर्योधनाच्या पायाशीच वाहीन. जा, माझे मन वळवायच्या भानगडीत पडू नकोस"(ह्या भाषणानंतर कृष्णाची देव म्हणून स्तुती व पांडव कसे अजिंक्य आहेत, कौरवांचा वध होणार हे कसं नक्की ठरलेले आहे, अशा अर्थाचे एक लांबलचक वाक्य कर्णाच्या तोंडी घातलेले आहे ते अप्रस्तुत व मागाहून घुसडलेले असावे, असे वाटते.) 'नशीब तुझे' असे म्हणून कृष्ण निघून गेला. ह्या प्रसंगात कर्ण एक असामान्य व्यक्ती, खरा मित्र, दत्तक घराण्याला निष्ठेने, प्रेमाने बांधलेला पुरुष, कोणत्याही लाचेला बळी न पडणारा सेवक, अशा अनेक गुणांनी उठून दिसतो. इतर ठिकाणी दिसणारा उतावीळपणा, उखाळ्या-पाखाळ्या काढण्याची खुमखुमी ह्याचा या प्रसंगी मागमूससुद्धा नाही.
 दुसरा प्रसंग कुंतीशी जे संभाषण झाले तो. त्यात राग आहे. वैफल्याची धार आहे. पण त्यातही क्षुद्रपणा नाही. बोलणे कितीतरी लांबवता आले असते. कुंतीमुळे कर्णाला किती दु:खे भोगावी लागली, ह्याचे खूप वर्णन देता आले असते. पण सर्व प्रसंग अगदी थोडक्यात वर्णिला आहे. भाषण मुख्यतः कर्णाचेच आहे. कुंती उत्तर देऊ शकतच नव्हती. कुंती त्याला गंगातीरी भेटली. त्याने आपली सूर्योपासना संपवून तिला नमस्कार करून येण्याचे कारण विचारले. तिने त्याच्या जन्माचा वृत्तान्त सांगितला, व “आता पांडवांच्या बाजूचा हो. तुझे ते भाऊ आहेत. कर्णार्जुनांचा प्रताप जगाला पाहू दे. तू सूतपुत्र नाहीस. प्रतापी हो" वगैरे त्याला सांगितले. (येथे मध्येच तीन श्लोक घुसडलेले आहेत. ते म्हणजे सूर्याने आकाशातून कर्णाला उद्देशून सांगितलेली वाक्ये.)
 कर्णाने उत्तर दिले, ते थोडक्यात व अगदी निर्वाणीचे असे आहे. त्या उत्तरातील एक ओळ मात्र नीट लागत नाही. ‘धर्मद्वारं ठिसूळ ममैतत्स्यान्नियोगकरणं तव' ही ती ओळ. नियोगाच्या हकीकतीमुळे मला धर्मद्वार मोकळे झाले, असा अर्थ होईल. 'नियोग' शब्दाचा अर्थ येथे नेहमीपेक्षा निराळा आहे. कर्ण म्हणाला,"बये, नियोगाची जी हकीगत सांगितलीस, त्यामुळे माझ्या धर्माचे द्वार मला मोकळे होईल, अशी तुझी कल्पना असली, तर चूक आहे. तुझ्या हकीकतीमुळे मला क्षत्रियत्व मिळाले, पण माझ्यावर कोणतेही क्षत्रियसंस्कार झालेले नसल्यामुळे हे क्षत्रियत्व कुचकामाचे आहे. जन्माच्या वेळी संस्कार व्हायचे, तेव्हा निर्दयपणे तू मला टाकून दिलेस. आज मात्र आप्पलपोटेपणाने माझ्याकडे आलीस. कृष्ण ज्याच्या पाठीशी आहे, त्या धनंजयाची भीती कोणास वाटणार नाही ? मी जर आज दुर्योधनाला सोडले, तर भीतीमुळे मी पांडवांना मिळालो, असे इतर क्षत्रिय म्हणतील. माझ्या जिवावर त्याने हे युद्ध मांडले आहे. जा, तू सांगतेस, ते कदापि होणे शक्य नाही. मात्र मी फक्त अर्जुनाला मारीन, इतर पांडवांना सोडून देईन. मला अर्जुनाने मारले. तर तुझे पाच आहेतच; मी अर्जुनाला मारले, तर मला धरून तुझे पाचच राहतील, जा." कुंती काय बोलणार? 'आपले वचन पाळ.' असे म्हणून ती निघून गेली. कृष्णाला दिले, तसेच हे उत्तर आहे. त्यात कुंतीचा धिक्कार आहे. तिच्या कृत्यामुळे आपल्या आयुष्याचे वाटोळे कसे झाले, तेही सांगितलेले आहे. कोठल्याही मोहाला बळी न पडता दुर्योधनाला न सोडण्याचा निश्चय कर्णाचे मोठेपण दाखवतो. तरीही शेवटी एक गोष्ट खटकतेच. ती म्हणजे मारीन तर फक्त अर्जुनाला, इतरांना नाही, हे कुंतीला दिलेले वचन ! हे वचन म्हणजे औदार्याची परिसीमा ! मग त्यात खटकण्यासारखे काय?
 हे वेडे औदार्य म्हणता येईल; पण तरी औदार्य, मनाचा मोठेपणा, हा कसा नाकबूल करता येईल? नाकबूल करायला कारण दोन. कर्णाची कृती बऱ्याच वेळा अतिरेकी म्हणून वर जे म्हटले आहे, त्यापैकीच हा प्रकार वाटतो. कुंतीबद्दल त्याला प्रेम वाटले नाही, कणवही आली नाही. तथाकथित भावांबद्दलही त्याला काडीचे सोयरसुतक नव्हते. 'इतरांना सोडीन,' हे म्हणण्यात एक प्रकारची वल्गना होती. ज्यांना ‘सोडीन' म्हटले, त्यांच्याबद्दल तुच्छता होती. मला जो माझ्या तोडीचा वाटतो, त्याचा वध करीन, इतरांशी मला कर्तव्य नाही, असा ह्या म्हणण्याचा अर्थ आहे. अशी वल्गना व इतरांबद्दल तुच्छता हा गुण क्षत्रियाला शोभेसाही होता. पण ज्या प्रसंगी त्याने हे वचन दिले. त्या प्रसंगाला तो योग्य नव्हता. युद्ध खरेखुरे होते. ते काही शस्त्ररंग नव्हते. स्वतःची शेखी मिरवण्यापेक्षा दुर्योधनाला जय मिळवून द्यावयाचा, हे त्याचे कर्तव्य होते. इतर भावांना, विशेषतः धर्माला न मारण्यात दुर्योधनाचे अहित होते. धर्म मरता किंवा त्याहीपेक्षा कैद होता, तर युद्धाचा निकाल दुर्योधनाच्या बाजूने लागण्याचा फार संभव होता. स्वतःच्या मोठेपणात कर्ण दुर्योधनाचे हित विसरला, असे म्हणावे लागते. हे वचन औदार्याने दिलेले नसून उद्धटपणे दिलेले होते.
 ह्या प्रसंगाने कर्णाला 'मी कोण?' ते कळले. त्या 'मी'ला योग्य अशी भूमिका उघडपणे स्वीकारता येणे शक्य नव्हते, हे जाणून कर्णाने त्या 'मी'चा लौकिकात स्वीकार केला नाही.पण मनातून तरी त्याचे जन्मभराचे बंधन सुटून त्याला मोकळे झाल्यासारखे वाटायला पाहिजे होते. ज्यासाठी जिवाचे रान केले, ते क्षत्रियत्व त्याला मिळाले व मित्रासाठी लीलेने त्याचा त्यागही केला. कर्ण असामान्यत्व पावला. ह्या एका क्षणाने कर्णाचे आयुष्य सफल झाले, असे म्हणता आले असते, पण ह्यानंतरच्या त्याच्या काही आठवड्यांच्या आयुष्यात त्याच्या जीवनाला नेहमीचे वळण परत मिळाले. कर्णाला इतरांनी खाली ओढले, व कर्ण स्वतःच्या कृत्यांनीही आपणहून खाली गेला.
 भीष्माने रथी कोण व अतिरथी कोण, ह्याची नोंद केली, त्यावेळी कर्णाला ‘अर्धरथी' म्हटले. कर्णाच्या उतावळेपणाचा उल्लेख करून त्यामुळे तो अर्धरथी आहे, असे भीष्म म्हणाला. भीष्माचे मत पात्रयत्व, सूतत्व अशा काही सामाजिक मूल्यांवर आधारलेले नव्हते. तो कर्णाचा स्वत:चा असा एक अवगुण दाखवत होता. कर्णाला राग आला, पण सर्व महाभारत विचारात घेता भीष्माचे मूल्यमापन बरोबर वाटते. रथी रथात उभा राहून युद्ध करणारा असे, त्याचप्रमाणे रथ हाकणाराही असे. कृष्णाला दोन्ही अवगत होते. तसेच अर्जुनाला व भीष्मालाही. कर्ण सूतांत वाढला, पण त्याने रथ हाकल्याचे वर्णन नाही. रथात बसून तो लढे, पण रथ चालवण्याची विद्या रथातून युद्ध करताना उपयोगी पडणारी असेल असे वाटते. चालत्या रथातून नेम धरावा लागे. त्यात कर्ण कच्चा होता, हे पुढील हकीकतीवरून दिसून येतेच.
 ह्या भांडणाची हकीकत सुसंबद्ध नाही. एके ठिकाणी म्हटले आहे की, 'मी सेनापती असेपर्यंत कर्णाने लढता कामा नये,' अशी अट भीष्माने घातली. भीष्माचे सेनापतिपद लढाई करण्यासाठी नसून लढाई थांबवायचा तो एक शेवटचा प्रयत्न होता, असे मी म्हटले आहे. तसे असेल तर भीष्माच्या दृष्टीने वरील अट सुसंगत वाटते. पण दुर्योधनाने ती बिनतक्रार कशी कबुल केली, ह्याचे नवल वाटते. दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, ‘भीष्म उभा असेपर्यंत मी लढणार नाही,' असे कर्ण रागावून म्हणाला. कर्णानेही असे म्हणणे त्याच्या स्वभावाला धरूनच आहे.
 ह्या प्रसंगी भीष्माचे म्हणणे द्रोणानेही उचलून धरले आहे. तो म्हणतो, प्रत्येक लढाईत हेकेखोर,पळून जाणारा(?) दयाशील व चुका करणारा असा हा कर्ण असल्यामुळे माझ्या मतेही तो अर्धरथीच आहे. (रणे रणेऽतिमानी च विमुखश्चैव दृश्यते। घृणी कर्णः प्रमादी च तेन मेऽर्धरथो मतः।।) द्रोण शस्त्रास्त्रे शिकवणारा होता. भीष्माचे नाही, तर द्रोणाचे मत विचारात घेऊन आत्मशोधन करण्याची कर्णाला शक्यता होती. माझ्या बुद्धीचे व शरीराचे बळ असूनही परिस्थितीमुळे मला रथविद्या व शस्त्रविद्या संपादन करता आली नाही. ही जाणीव कर्णाला झाली असती; आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादा कबूल कराव्या लागल्या असत्या; पण कर्ण आत्मशोधन करणारा नव्हता. 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा खोल विचार करणारा नव्हता.
 भीष्म पडल्यावर कर्ण रणांगणात उतरला. आता तो सेनापती होणार, असे वाटू लागले. 'आम्हांला कर्ण सेनापती हवा. आम्हाला कर्ण सेनापती हवा,' म्हणून सैन्याचा घोष चालला होता. कर्णही मोठ्या रथात बसून वैभवाने रणभूमीवर आला. पण ‘सर्वांना पसंत पडेल, अशा माणसाला म्हणजे द्रोणाला सेनापती कर,' म्हणून त्यानेच दुर्योधनाला सल्ला दिला. द्रोणाच्या आधिपत्याखाली हमरीतुमरीचे युद्ध झाले व दोन्हीकडचे मोठे वीर कामास आले. ह्या तीन दिवसांत अर्जुनाला मारावयाची संधी कर्णाला मिळाली नाही,इतकेच नाही, तर इंद्राने दिलेली अमोघ शक्ती घटोत्कचावर चालवावी लागली. ह्या तीन दिवसांतच कौरववीरांनी पाचसहा जणांनी मिळून अभिमन्यूला, अर्जुनाच्या मुलाला विरथ करून मारले.
 द्रोण मेल्यावर युद्धाच्या सोळाव्या दिवशी कर्ण सेनापती झाला. दोन्हीकडची खूप हानी झाली होती; पण जयाचे पारडे पांडवांच्या बाजूला होते. ‘लढाई थांबव, संधी कर,' असे अश्वत्थामा दुर्योधनाला सांगत होता. दुर्योधन कर्णावर विसंबला होता. जे इतरांना साधले नाही ते कर्ण करील, अशी त्याला खात्री वाटत होती. आता कर्णाच्या मनात असते, तरी त्याला माघार घेता आली नसती. माघार घेण्याचा विचारही कर्णाला सुचला नाही. कर्ण सेनापती असतानाच्या पहिल्या दिवसात काही घडले नाही. दुसऱ्या दिवशी सारथी म्हणून शल्याची मागणी करणे त्याला सुचले. ह्या मागणीपायी त्याला बराच अपमान सहन करावा लागला.
 कर्णपर्वात विचार करायला लावतील, अशा घटना पुष्कळ आहेत. त्यातलेच एक हे तेजोभंगाचे प्रकरण. शल्य हा माद्रीचा भाऊ, व नकुलसहदेवांचा म्हणजे पर्यायाने पांडवांचा मामा. दुर्योधन त्याला पहिल्याने भेटला, म्हणून त्याने त्याच्या बाजूला मिळण्याचे व लढण्याचे कबूल केले म्हणे. मागाहून धर्म आला. त्याला त्याने सांगितले, “काय करावे ? दुर्योधन पहिल्याने आला. मला ‘नाही' म्हणता येईना. पण कर्णाचे सारथ्य करून मी त्याचा तेजोभंग करीन व अशा तऱ्हेने आतून तुम्हांला मदत करीन.” हा सर्वच प्रसंग हे संभाषण अशक्य वाटते. कर्ण शल्याला सारथी म्हणून मागेल, ह्याचे काय शल्याला स्वप्न पडले होते? आतून शल्य पांडवांच्या बाजूचा होता. ह्याही देखाव्यात तथ्य नाही. कारण कर्णाच्या पाठोपाठ पांडवांनी त्यालाही मारलेच. मद्र देशालाच बाल्हिक, असे महाभारतात म्हटले आहे. हस्तिनापूरच्या घराण्याचा आणि बाल्हीकांचा संबंध खूपच जुना होता, शंतनूचा बाप जो प्रतीप त्याची एक राणी मद्रांची ऊर्फ बाल्हीकांची माहेरवाशीण होती. शंतनुचा एक भाऊ मामाघरी दत्तक गेला होता. त्याचा मुलगा वा नातू सौमदत्ती दुर्योधनाच्या बाजूने लढला व मेला. शल्याची सख्खी बहिण म्हणा, चुलतबहीण म्हणा, पांडुला दिली होती, म्हणजे वडील घराण्यांचा संबंध चालू राहिला होता. ज्याप्रमाणे इतर बाल्हीक दुर्योधनाच्या बाजूने म्हणजे वडील घराण्याच्या बाजूने लढले, तसा शल्यही लढला. कदाचित इतकी अटीतटीची लढाई होईल, अशी त्याला कल्पना नसेल. एवढे मात्र खरे की, तो पांडवांच्या विरुद्ध बाजूला होता व म्हणून जी घटना घडेल अशी त्याला कल्पना नव्हती, त्याबद्दल धर्माला तो काही वचन देऊ शकेल, हे अशक्यच वाटते.
 तसेच तेजोभंगाचे प्रकरणही पटत नाही. एका बाजूला अर्जुन व एका बाजूला कर्ण अशा दोन मुख्य व्यक्ती ह्या पर्वात आहेत. अर्जुन दररोज (एक दोन दिवस वगळल्यास) संशप्तकांशी लढत होता. ह्याही दिवशी अर्धा दिवस लढल्यावर तो मुख्य सैन्यात परत आला. धर्म कुठे दिसेना, म्हणून त्याने भीमाला विचारले, “राजा कुठे आहे ?" भीम म्हणाला, “काय की, मला नक्की माहीत नाही. फार जखमी होऊन तो शिबिरात गेला आहे. मेला आहे की जिवंत आहे, मला सांगता येणार नाही” भीम महाभयंकर लढाईत गुंतला होता. त्याला राजाचे काय झाले हे खरोखर ठाऊक नव्हते, की तो अर्जुनाला चेव आणायला असे बोलला, ते कळत नाही. अर्जुन ताबडतोब शिबिरात गेला. “कर्णाला मारून आलास ना? शाबास!" ह्या शब्दांनी धर्माने त्याचे स्वागत केले. “तुझी विचारपूस करायला आलो.” हे अर्जुनाचे शब्द ऐकल्यावर धर्म भडकला व अर्जुनाला इतके टाकून बोलला की, अर्जुन संतापाने भावाला मारायला उठला: शेवटी कृष्णाने हा सर्व प्रकार हसण्यावारी नेऊन भावा-भावात दिलजमाई करून दिली व “आता चल. कर्णावर तुटून पडू," म्हणून त्याने रथ हाकला. हा प्रकार तेजोभंगाचा की चेव आणण्याचा ? शल्याचे कर्णाशी बोलणेही ह्या प्रकारचेच होते. शल्य मोठ्या मिनवतारीने कर्णाचा सारथी झाला. “मी मुर्धाभिषिक्त राजा कर्णाचा सारथी होणार की काय?" ह्या शल्याच्या वाक्याने कर्णाला अंगराजपदाचा अभिषेक झाला होता की नाही, अशी शंका मनात परत डोकावते. शल्य सारथी झाल्यावर अर्जुनाप्रमाणे रथाला पांढरे घोडे जोडून जयघोष करीत कर्ण निघाला. बरोबर शस्त्रांनी व बाणांनी भरलेला दुसरा रथ होता. “अर्जुन कोठे आहे ते मला दाखवा, आत्ता त्याला ठार करतो. कोठे दिसत नाही कसा? कोणा पाहिला आहे का त्याला? कुठे गेला आहे तो ?" अशा आरोळ्या देत कर्ण निघाला. हे ऐकून शल्याने कर्णाला डिवचले की, “बाबा, व्यर्थ बडबड करू नकोस आतापर्यंत अर्जुनाने तुला हात दाखवला आहे. घोषयात्रेत काय केलेस? विराटाच्या गोग्रहणाच्या वेळी काय केलेस? अर्जुन दिसला की नांगी टाकशील" धर्म अर्जुनाला बोलला, त्यापेक्षा हे निराळे नव्हते. ह्याच पर्वात अश्वत्थाम्याशी लढाई करताना अर्जुन जेरीस आला होता, तेव्हा कृष्णही त्याला अतिशय तुच्छतेने टाकून बोलला होता व ते ऐकून अर्जुन चेव येऊन लढला होता. रथिसारथी ह्यांच्या परस्पर संबंधाचेच हे द्योतक असेल का? हे बोलणे तेजोभंग करणारे नसून लढवय्याला राग आणणारेच वाटते.
 ह्याच्यापुढचे शल्य-कर्णाचे संभाषण मात्र गैरलागू, भारतातील कथेला सर्वस्वी विसंगत, मागाहूनच्या पुराणांतील रूढ कल्पनांनी भरलेले व म्हणून प्रक्षिप्त व मागाहून घुसडलेले वाटते. कर्णाने शल्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्यायचे सोडून मद्र व बाल्हीक देशातील स्त्रिया कशा अनाचारी आहेत ह्याचेच वर्णन केले आहे. त्याने गांधारालाही नावे ठेवली. सर्व देश आचारभ्रष्ट आहे असे म्हटले आहे. शेवटी तर “शल्या, तू कुलीन नाहीस, तुझे डोके उडवीन.' असे तो म्हणाला. कर्ण कितीही उतावळा झाला, तरी तो असे बोलणे अशक्य होते. त्याचा जन्म कौरवांच्या दरबारात गेलेला होता. कुरूंचे व मद्रांचे संबंध त्याला चांगले माहीत होते. दुसरे असे की मद्र, बाल्हीक ही पश्चिमेकडची राष्ट्रे व अंग, वंग व कलिंग ही पूर्वकडची राष्ट्रे अनाचारी, अनार्य ही कल्पना पुराणांची आहे. पुराणकाळात कुरु-पांचालदेशाला काही विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. हाच प्रदेश पुढे ‘ब्रह्मावर्त' नाव पावला. पण अशा तऱ्हेचा समज महाभारतात काडीमात्र दिसत नाही. सर्व कुरूंनी पश्चिमेकडच्या मुली केल्या होत्या व आपल्या मुली पश्चिमेकडे दिलेल्या होत्या. हे संभाषण म्हणूनच अगदी विसंगत अतएव प्रक्षिप्त वाटते. ह्या भांडणात कर्ण फारच संतापला, हे पाहून शल्यानेच संभाषण थांबविले व त्याला युद्धभूमीवर आणले. येथेही सारथी व रथी ह्यांचे संबंध कर्ण नीट जाणत नव्हता असेच म्हणावे लागते. नवे, पांढरे घोडे आणणे हाही भाग प्रक्षिप्त नसल्यास वेड्यासारखाच वाटतो. आपले घोडे, आपला रथ व आपला सारथी हे सर्वच ओळखीचे, नेहमीचे असावे लागतात. सर्वांनी मिळून लढावयाचे असते, ही गोष्ट कर्ण विसरला का? काहीही असो. कर्ण सेनापती म्हणून लढाईत पडला, तो पहिलेच पाऊल त्याने चुकीचे घातले, असे म्हणावे लागते. पुढच्या हकीकतीवरूनही शल्य कर्णाच्या विरुद्ध शत्रुत्वाने वागला, असे दिसत नाही.
 खूपसा आरडा-ओरडा करूनही कर्ण लागलीच अर्जुनाला सामोरा गेला नाही. भीम, धृष्टद्युम्न व अर्जुन हे रणात हाहाकार करीत होते. कर्णही लढाईत उतरला. थोड्या वेळाने शल्याने त्याला लांबून अर्जुनाचा रथ दाखविला. “दुर्योधनाने जन्मभर तुझ्यावर उपकार केले, ते फेडण्याची संधी आज आली आहे." असे म्हणून शल्याने रथ हाकला. ह्यावेळी कर्णाचा मुलगा वृषसेन अर्जुनावर चालून गेला व अर्जुनाने थोड्याच वेळात कर्णाच्या देखत कर्णाच्या पुढ्यात त्याला मारले. ह्या वेळेपर्यंत कर्णाचा घोष थांबला होता व अर्जुन घोष करू लागला होता. मुलगा मेलेला पाहून कर्णाच्या डोळ्यांत पाणी आले; पण ते पुसून तो अर्जुनापुढे उभा राहिला. दोघांचे युद्ध झाले, पण अर्जुनाची हळूहळू सरशी होत होती. कर्ण रक्ताने माखला होता. त्याचे कवच फुटले होते. त्याने अर्जुनाला ठार मारण्यासाठी एक अमोघ बाण काढला. त्या बाणाच्या अग्रावर नाग बसले होते. (नागविष लावलेले होते, म्हणून बाण थोडा जरी रुपला, तरी मनुष्य मरणार, अशा तऱ्हेचा हा बाण होता का?) कर्णाने नेम धरला. शल्याने सांगितले, “बाबा, नेम चुकला आहे. हा बाण अर्जुनाचा गळा वेधणार नाही." पण कर्णाने शल्याचे न ऐकता धनुष्य ओढले. चार अंगुळांनी नेम चुकून बाण अर्जुनाच्या किरीटाला लागला.
 ह्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधी वर्णने आहेत. एकदा म्हटले आहे, नेम चार अंगुळांनी चुकला. शल्याचा इशारा बरोबर धरला, तर इतक्या थोडक्यात नेम चुकणार, ते शल्याला कळले असे होते, व कर्णाची नेमबाजी बरोबर नव्हती असे सिद्ध होते. उलट कर्णाचा अमोघ बाण येतो आहे, हे पाहून कृष्णाने रथ दाबला व घोड्यांनी गुडघे टेकले व बाण चोवीस अंगुळांनी चुकला, असेही वर्णन लगेच केले आहे. हे वर्णन केवळ कृष्णस्तुतीकरिता लिहिले आहे, असे ह्या पर्वाचे संपादक म्हणतात, ते बरोबर वाटते. कर्ण गळ्याचा वेध घेत होता. चोवीस अंगुळांनी वेध चुकला, तर किरीट पडलाच नसता; म्हणून अर्जुन वाचला तो कृष्णाच्या कौशल्याने नव्हे, तर कर्णाच्या चुकलेल्या नेमबाजीने, ही वस्तुस्थिती वाटते. मुलाच्या मरणाने कर्ण खचला असेल आणि आता नेम चुकला, त्यामुळे तो जास्तच गोंधळात पडला. एवढ्यात चाक फिरले, रथ घसरला व चाक जमिनीत रुतले.
 लढाईचा हा सतरावा दिवस होता. हत्ती, घोडे व योद्धे ह्यांची प्रेते व मोडके रथ रणभूमीवर पडलेले होते. एवढ्या रणकंदनाने जमीन मऊ झालेली होती. कुठे-कुठे ओली झालेली असणार. गंगायमुनांच्या खोऱ्यात दगड नाहीच, हजार फूट खोल मातीच आहे. पण पाण्याचा निचरा होत नाही. अशा परिस्थितीत चाक फिरले व रथ रुतला, तर नवल काहीच नाही. युद्धाचे दोन आठवडे ह्या ना त्या निमित्ताने रथ निकामी होत होते, व योद्धे एक रथ सोडून दुसऱ्यात बसत होते. कर्णाच्याही पाठीमागे रथ होते, पण कर्ण रथाबाहेर येऊन मातीत फसलेले चाक बाहेर काढू लागला. जड रथाचे फसलेले चाक बाहेर काढणे- विशेषतः एकट्या-दुकट्याला म्हणजे वेळ खाणारे व श्रमाचे काम होते. कर्ण दुसऱ्या रथावर का बसला नाही? संध्याकाळ होत आली होती. ह्या युक्तीने वेळ काढून एका रात्रीची उसंत मिळवण्याचा त्याचा बेत होता का? तो गोंधळला होता, हे खरेच. त्याने अर्जुनाजवळ मागणे मागितले, “मी चाक काढीत भूमीवर उभा आहे. तू रथात आहेस. तू युद्धनीती जाणतोस. रथातून माझ्याशी लढू नकोस. मला चाक काढू दे. धर्माने युद्ध कर"
 पण कृष्ण त्याला उसंत द्यावयाला बिलकूल तयार नव्हता. ‘धर्माने युद्ध कर' ह्या आव्हानातच कर्णाला पुरते नेस्तनाबूद करून टाकावयाचे साधन त्याला मिळाले. 'मी कोण?' हा प्रश्न कर्ण आता विचारीत नव्हता; पण कृष्णाने विचारलेल्या प्रश्नांचा रोख ‘तू कोण?' हाच होता. “भर सभेत द्रौपदीचे वस्त्र फेडायला लावलेस, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? कर्णा, विरथ अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी मिळून मारला, तेव्हा कुठे होता तुझा धर्म ?"
 अर्जुनाचा मोह नाहीसा करून स्वत्वाची जाणीव देऊन त्याला कर्तव्य करायला उभे केले कृष्णाने. त्याच कृष्णाने मरणाच्या घटकेला कर्णाचे स्वत्व सर्वस्वी हरण केले. “द्रौपदीला साधी माणुसकी तू दाखवली नाहीस, मग तुला का दाखवावी? सौभद्राच्या बाबतीत तू कुठे क्षत्रियधर्म पाळलास? कसल्या धर्माची तुला अपेक्षा आहे ? ती अपेक्षा असावी, असे तू वागलास का?" हेच ते विदारक प्रश्न होते. कृष्णाने दोनच प्रश्न विचारले. इतर भाकड प्रश्न संशोधित आवृत्तीत गाळले आहेत. एका बाजूने कर्णाला धर्माची याचना करायचा अधिकार ह्या प्रश्नांनी नष्ट केला, तर दुसऱ्या बाजूने ज्या दोन कृत्यांनी अर्जुनाला खोल जखम झाली होती, त्यांचा उच्चार झाला. ह्याच माणसाने माझ्या बायकोची भर सभेत विटंबना केली; ह्याच माणसाने माझ्या मुलाला निर्दयपणे मारले, ह्याची अर्जुनाला आठवण झाली, तो त्वेषाने उठला. त्याने बाण जोडला व तो गर्जून म्हणाला, “जर खरा क्षत्रिय असेन, तर हा बाण कर्णाचे प्राण घेईल' अर्जुन अचूक नेम धरणारा म्हणून प्रसिद्ध होता. ह्याही वेळी त्याचा नेम चुकला नाही.
 कर्ण महाभारतात शस्त्ररंगाच्या वेळी आला. त्यावेळी झाले घटनांची एक प्रकारे ह्या शेवटच्या प्रसंगी पुनरावृत्ती झाली. शस्त्ररंगात कर्णाच्या द्वंद्वयुद्धाच्या मागणीमुळे ‘तू कोण?' हा प्रश्न कृपाने विचारला व कर्णाला मान खाली घालावी लागली. शेवटचा प्रसंग विद्येचे प्रदर्शन नसून खरेखुरे युद्ध होते. जे द्वंद्व त्याने अर्जुनाजवळ मागितले, ते त्याला आयते मिळाले होते. हा काही खेळ नव्हता. दयामाया न दाखवता लढलेल्या युद्धाचा हा एक भाग होता. शक्य तर मारायचे, नाहीतर वीरमरणाने मरायचे, ह्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. जन्मभर ज्याच्याशी हाडवैर केले, स्पर्धा केली, तो प्रतिस्पर्धी म्हणून समोर होता. त्याच्यासमोर कसलीही याचना करावयास नको होती. क्षात्रवृत्तीने मरणे हा एकच मार्ग होता. परत एकदा नको ते कर्णाने केले. त्याने धर्मयुद्धाची अपेक्षा केली व आता कृपाने नव्हे, पण कृष्णाने ‘तू कोण,' म्हणून धर्माची अपेक्षा करावीस, हे विचारले, 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा स्वतःशी उलगडा न करता कर्ण गेला.

 ऑक्टोबर, १९६६