युगान्त/कृष्ण वासुदेव

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

किंवा दुर्योधन तेथे असल्यामुळे कदाचित आपण दुर्योधनाचे प्रतिस्पर्धी होऊ नये, म्हणून त्याने जिंकण्याचा विचारही केला नसेल. काही का असेना, दुसऱ्या कोणालाही जे करता आले नाही ते अर्जुनाने केले, व लढाईतही त्याने कर्णाला हात दाखवला. ह्याप्रसंगी अर्जुन ब्राह्मणवेषात होता. अर्जुन ब्राह्मण म्हणून कर्ण त्याच्याशी फार लढला नाही असे म्हटले आहे. त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही. एका ब्राह्मणाने क्षत्रियकन्या जिंकली, म्हणून सर्व राजे रागावून लढाई करावयाला निघाले होते. कर्णानेही लढाई केली आणि मग अर्जुन ब्राह्मण आहे, म्हणून लढाई अध्र्यावर सोडून दिली, हे विचित्र दिसते. ह्या ब्राह्मणाला चोपून काढायला वेळ लागणार नाही, असे सर्वांना वाटले होते. पण जेव्हा अर्जुन व त्याच्या मदतीला भीम ह्यानी अचाट पराक्रम केला, तेव्हा मध्येच ‘तू ब्राह्मण आहेस का कोण आहेस?' हा प्रश्न विचारून लढाई सोडून देणे अप्रस्तुत वाटते.
 द्यूतपर्वात एका तऱ्हेने सर्वांचीच परीक्षा झाली. “आता काय झाले, आता काय झाले' असे विचारणाऱ्या,हावऱ्या, आंधळ्या धृतराष्ट्राची परीक्षा झाली. पांडवांनी सगळे घालवले, तेव्हा ‘गौ,गौ,गौ, गौ' म्हणून ओरडणाऱ्या दुःशासनाची परीक्षा झाली. द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळी होणाऱ्या हिडीस प्रकाराला आळा घालावा म्हणून धडपडणाऱ्या विदुराची परीक्षा झाली. त्याचबरोबर ह्या सर्व कशाशी ज्याचे काही नातेगोते नव्हते, त्या कर्णाचीही परीक्षा झाली व तो सर्वस्वी हीन ठरला. द्रौपदीला सभेत ओढून आणलेली होती. दासी आहे किंवा नाही, ह्या प्रश्नाचा ऊहापोह चालू होता. दुर्योधनाचा धाकटा भाऊ विकर्ण उठून म्हणाला होता की, 'अशा तऱ्हेने सतीला ओढून आणणे बरोबर नाही, ती दासी होत नाही.' यावेळी कर्ण रागारागाने उभा राहिला व त्याने विकर्णाची निर्भर्त्सना केली. “पाच पुरुषांची बायको, ही कसली पतिव्रता! ती तर स्वैरिणीच. तिला सभेत ओढून आणणे ह्यात गैर काहीच झाले नाही." ह्या सर्वांनी आपले सर्वस्व गमावले आहे. ते दास झाले आहेत. आपल्या वस्त्रावरसुद्धा त्यांचा हक्क नाही. काढा त्यांची वस्त्रे" हे शब्द ऐकल्याबरोबर पांडव आपली नेसती वस्त्रे सोडून सभेत बसले व दुःशासनाने कर्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीचे वस्त्र फेडावयास सुरवात केली. कर्ण उठून बोलेपर्यंत चर्चा चालली होती; पण त्याने उठून द्रौपदीची विटंबना करण्यास उघड प्रोत्साहन दिले. संपत्तीबद्दल, राज्याच्या वाटणीबद्दल पुरुषा-पुरुषांत भांडण होते ते युद्धाने सोडवावे, वाटल्यास फासे खेळून सोडवावे; पण या भांडणामध्ये पराभूतांच्या बायकोची भरसभेत विटंबना करावयाचे कारण नव्हते. कर्ण सूत आहे की क्षत्रिय आहे, हा प्रश्न येथे नव्हता. सामान्य मानवधर्माचा प्रश्न होता. प्रश्न कायद्याचाही नव्हता. एका कुलस्त्रीची अब्रू घ्यायची का नाही, इतका सोपा प्रश्न होता. ह्या भावा-भावांच्या भांडणात कर्णाने अशा तऱ्हेने भाग घ्यायला कारणही नव्हते. पण कर्ण त्यात पडला आणि सूडापायी तो सदसद्विवेक अजिबात विसरू शके, हे सिद्ध झाले. घोषयात्रेच्या प्रसंगाने परत एकदा कर्णाला मान खाली घालावी लागली. त्यावेळी प्रत्येक राजाचे मोठ-मोठे गुरांचे कळप असत. हे कळप राज्याच्या हद्दीला लागून असलेल्या रानाशेजारी असत. कळपांची देखरेख करणारे अधिकारी असत. अधून-मधून खुद्द राजा कळपांची देखभाल करण्यासाठी जात असे. मागच्या वेळी असलेल्या गुरांच्या कळपात ज्या नव्या वासरांची भर झाली असेल, त्यांच्या अंगावर राजाच्या मालकीचे चिन्ह उमटवीत असत. बहुतेक हे चिन्ह म्हणजे तापलेल्या मुद्रेचा डाग असावा. पांडव वनात गेल्यावर हस्तिनापूरच्या लगतच्याच अरण्यात राहत होते. घोषयात्रा म्हणजे गोठ्यांची तपासणी करण्यासाठी केलेला प्रवास होय. ह्या निमित्ताने बायका, मुले व मोठा लवाजमा घेऊन रानात जायचे व आपल्या वैभवाचे प्रदर्शन करून निर्वासित पांडवांना खिजवायचे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश होता. त्या यात्रेच्या वेळी एका गंधर्वाशी काहीतरी कुरापत निघून भांडण उद्भवले. त्या भांडणात गंधर्वांनी कौरवांना मारून काढले व दुर्योधनाला कैद करून नेले. ह्या हाणामारीत कर्ण पळून गेला व त्याने एका जवळच्या खेड्यात आश्रय केला. शेवटी पांडवांनी दुर्योधनादी कौरवांना सोडवले व त्यांची परत पाठवणी केली. पांडवांनी कौरवांना सोडवले हे कळायच्या आधीच राजा कैद झाला, ही बातमी हस्तिनापुराला पोहोचली होती व भीष्म सैन्य घेऊन राजाला सोडवायला निघाला होता. तेवढ्यात त्याला सुटकेचीही हकीकत कळली. वाटेत कर्ण भेटला. त्याने राजा कोठे आहे, कसा आहे वगैरे विचारपूस केली. भीष्माने ताबडतोब उत्तर केले, “राजा जिवंत आहे ना, हे विचारावयाला खरे स्वामिभक्त जिवंतच राहत नाहीत. राजाला संकटात टाकून तू पळून आलासच कसा? तुझे राजावरचे प्रेम हे थोतांड आहे." कर्णाने दुर्योधनाच्या मित्राची भूमिका स्वीकारली होती. 'मी कोण?' ह्याचे उत्तर त्याच्यामते ‘मी दुर्योधनाचा मित्र', असे होते, पण ह्या प्रसंगाने व भीष्माच्या धिक्काराने त्याची परत एकदा जीवघेणी परीक्षा झाली व ती तो उतरला नाही.
 ह्या पुढचा प्रसंग गोग्रहणाचा. त्या वेळी तर अर्जुन एकटा होता व कौरवांच्या बाजूने लहान-मोठे सर्व वीर होते. तेथेही कर्णाचे अर्जुनापुढे चालले नाही. अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला, एवढेच नव्हे, तर त्यांची सुंदर तलम वस्त्रे हिरावून घेऊन त्याने ती उत्तरेला बाहुलीसाठी म्हणून दिली. हा प्रसंग जरी वगळला, तरी त्याने कौरवांना पिटाळून लावले व विराटाच्या गाईही सोडवल्या यात शंका नाही. 'आता युद्ध नको. राजाला मध्ये घालून माघारी वळा' हा भीष्माचा इशारा सर्वांनी पाळला, अशी एक पळवाट कर्णाला ह्याही प्रसंगी आहे,पण तीत अर्थ दिसत नाही. कौरव विराटाच्या राज्यात शिरले होते. गाई पळवायच्या, हा त्यांचा उद्देश. तो सिद्धीस गेला नाही तर परक्या राज्यात, परक्या देशात त्यांच्यावर बाका प्रसंग आला असता.  अशा तऱ्हेची लूटमार त्वरेने करावी लागते; मोठ्या लढाईला वेळ नसतो; वेळ गमावला, तर शत्रूला आणखी सेना आणता आली असती, म्हणून निघून जाणेच योग्य होते, वगैरे सर्व मुद्दे लक्षात घेतले, तरी अर्जुनाने आपल्या कौशल्यामुळे सैन्याने वेढलेल्या गाईंना मोकळे केले; गाई उधळून लावल्यावर कौरवांनाही हात दाखवला; व त्यांना मागे परतण्यावाचून गत्यंतर नाही अशी स्थिती आणली, ह्यात शंकाच नाही. अर्जुनाला भेकड सारथी मिळूनही रथातून लढण्याचे महारथित्वाचे आपले कौशल्य त्याने प्रकट केले. कर्ण युद्धविद्येत अर्जुनापेक्षा कमी ठरला.
 कर्णकथेत सूर्याची निरर्थक लुडबूड जिथे-तिथे दिसते. 'इंद्र कवच-कुंडले मागायला येईल ती तू देऊ नकोस,' असे म्हणे सूर्याने कर्णाला सांगितले. तसेच, ‘तू माझा मुलगा,' असे कुंती म्हणाली, तेव्हाही “कुंती म्हणते ते खरे आहे. कर्णा, आईचे ऐक,"असे सूर्य बोलला. कर्णाने दोन्ही वेळा त्याचे ऐकले नाही. गोष्टीच्या परिपोषाच्या दृष्टीने सूर्याची ही भाषणे अगदी निरुपयोगी व अवास्तव आहेत. सूर्याला मुलाची एवढी काळजी होती, तर शस्त्ररंगाच्या वेळी ‘हा माझा मुलगा,' असे तो का बोलला नाही? ह्या आकाशवाणीने कर्णाचे क्षत्रियत्व सिद्ध झाले नसते, पण देवपुत्रत्व तरी त्याला मिळाले असते.
 कर्ण सूर्यपूजा का करीत असे, तेही समजत नाही. कुंडले ही वस्तू कान फाडून देण्यासारखी आहे. पण सहज-कवच अंगावरून सोलून रक्तबंबाळ होऊन दिले, म्हणजे काय? सहज-कवच गेल्यावर कर्ण काही लढाईत कवचहीन लढला नाही. अर्जुनाच्या बाणांनी त्याचे कवच फोडले, असे वर्णन आहे. जे इतरांना नाही, ते कर्णाजवळ होते. त्यामुळेच आपण वास्तविक सूतपूत्र नाही, ह्याची त्याला मनातून खात्री होती. कवच-कंडलांमळे तो अजिंक्य होता का? ती देण्याने त्याने मरण ओढवून आणले असे म्हणावे का?  कवच-कुंडले असतानाही द्रौपदी-स्वयंवरात, घोषयात्रेत व गोग्रहणाच्या वेळी तो पराभव पावला होताच. मग ही आत्यंतिक दानशूरता तरी का? 'मी कोण?' ह्याच्या शोधापायीच असे झाले का? आपली छाप इतरांवर पाडायची गरज त्याला वाटत होती. त्याच्या मनातील खळबळीचा, समाजातील स्थान पक्के नसल्यामुळे वाटणाऱ्या दैन्याचाच हा परिणाम असेल का? कर्णाच्या प्रत्येक कृत्यात अपेक्षित मर्यादांचे उल्लंघन दिसते. शस्त्ररंगात त्याने आपले नैपुण्य दाखवले, ते योग्य होते; पण अर्जुनाशी द्वंद्व करावयास मागणे म्हणजे अतिप्रसंगच होता. तीच गोष्ट द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळची. पांडवांची मानहानी होत होतीच. कर्णाने मध्ये पडण्याचे कारण नव्हते. पण त्याला राहवले नाही. दृष्कृत्यच नव्हे, तर सत्कृत्यातही तो पटदिशी साधारण माणसांच्या मर्यादा ओलांडून काहीतरी जास्त करण्याच्या मोहात पडे.
 कर्णाच्या आयुष्यात काही क्षण सोन्याचे ठरले. कुठच्या तरी वेळी मोठे सुख, मोठी ऋद्धी वा मोठा मान मिळाला म्हणून नव्हे. लौकिकाने तो होता, तोच राहिला, पण त्याच्या मनातल्या व्यथा नाहीतशा व्हाव्यात, असे ते क्षण होते. 'आपण कोण?' ह्याचे त्याला उत्तर मिळाले; पण त्याच क्षणी त्याने उत्तराने उद्भवणाऱ्या पेचातून मोठ्या उदात्तपणे आपली सुटका करून घेतली. कर्णाच्या पूर्वीच्या व पुढच्याही आयुष्यात मनाचा गोंधळ दिसून येतो. पण ह्या दोन प्रसंगांतील त्याचे बोलणे व त्याचे कृत्य ह्यांत विचारांचा विलक्षण स्पष्टपणा दिसतो. कोठेही शंका नाही, की गोंधळ नाही.सर्व गढूळपणा जाऊन मन आरशासारखे लख्ख झालेले दिसते. हे दोन्ही प्रसंग मानवी पातळीवरचे आहेत. ह्यात कर्णाची आणखी एकदा परीक्षा, अतिशय कठीण परीक्षा झाली आहे. कर्ण ह्या परीक्षेत उतरला. तो सर्वस्वी मानवी पातळीवरच. काहीही दैवी,अतिमानुष, अत्युदात्त असे न दाखवता. त्याही वेळी त्याची निराशा, संताप-सर्व काही व्यक्त होते. पण ते व्यक्त करताना त्याच्यात दीनपणा दिसत नाही.  दोहोपैकी एक प्रसंग कृष्णाने त्याला‘तू पांडवांच्या बाजूचा हो,' म्हणून गळ घातली तेव्हाचा; व दुसरा प्रसंग कुंतीने त्याला ओळख दिली तो. कृष्णाने कधी नव्हे, अशी आमिषे दाखवली. ज्यासाठी तो जन्मभर झगडला, ते सर्व व त्याने कल्पना केली असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याला देऊ केले. तो क्षत्रिय म्हणून सिद्ध होत होते; त्या वेळच्या उच्चतम कुळातला म्हणून त्याला मान मिळत होते; राज्य मिळत होते; ज्यांचा जन्मभर दुस्वास केला ते हात जोडून चाकर म्हणून उभे रहायची शक्यता होती. पण ह्या सर्वांवर कर्णाने पाणी सोडले. तेही सहज, विचार न करता, शिव्या न घालता, कृष्णाला काहीही दुरुत्तरे न बोलता. "कृष्णा, तू म्हणतोस ते अशक्य आहे. माझा जन्म सूतांमध्ये गेला. माझ्या व माझ्या मुलांच्या सर्व सोयरिकी सूतांमधल्या आहेत. मी आता त्यांच्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. राज्य मिळाले, तरी मी ते दुर्योधनाच्या पायाशीच वाहीन. जा, माझे मन वळवायच्या भानगडीत पडू नकोस"(ह्या भाषणानंतर कृष्णाची देव म्हणून स्तुती व पांडव कसे अजिंक्य आहेत, कौरवांचा वध होणार हे कसं नक्की ठरलेले आहे, अशा अर्थाचे एक लांबलचक वाक्य कर्णाच्या तोंडी घातलेले आहे ते अप्रस्तुत व मागाहून घुसडलेले असावे, असे वाटते.) 'नशीब तुझे' असे म्हणून कृष्ण निघून गेला. ह्या प्रसंगात कर्ण एक असामान्य व्यक्ती, खरा मित्र, दत्तक घराण्याला निष्ठेने, प्रेमाने बांधलेला पुरुष, कोणत्याही लाचेला बळी न पडणारा सेवक, अशा अनेक गुणांनी उठून दिसतो. इतर ठिकाणी दिसणारा उतावीळपणा, उखाळ्या-पाखाळ्या काढण्याची खुमखुमी ह्याचा या प्रसंगी मागमूससुद्धा नाही.
 दुसरा प्रसंग कुंतीशी जे संभाषण झाले तो. त्यात राग आहे. वैफल्याची धार आहे. पण त्यातही क्षुद्रपणा नाही. बोलणे कितीतरी लांबवता आले असते. कुंतीमुळे कर्णाला किती दु:खे भोगावी लागली, ह्याचे खूप वर्णन देता आले असते. पण सर्व प्रसंग अगदी थोडक्यात वर्णिला आहे. भाषण मुख्यतः कर्णाचेच आहे.  कुंती उत्तर देऊ शकतच नव्हती. कुंती त्याला गंगातीरी भेटली. त्याने आपली सूर्योपासना संपवून तिला नमस्कार करून येण्याचे कारण विचारले. तिने त्याच्या जन्माचा वृत्तान्त सांगितला, व “आता पांडवांच्या बाजूचा हो. तुझे ते भाऊ आहेत. कर्णार्जुनांचा प्रताप जगाला पाहू दे. तू सूतपुत्र नाहीस. प्रतापी हो" वगैरे त्याला सांगितले. (येथे मध्येच तीन श्लोक घुसडलेले आहेत. ते म्हणजे सूर्याने आकाशातून कर्णाला उद्देशून सांगितलेली वाक्ये.)
 कर्णाने उत्तर दिले, ते थोडक्यात व अगदी निर्वाणीचे असे आहे. त्या उत्तरातील एक ओळ मात्र नीट लागत नाही. ‘धर्मद्वारं ठिसूळ ममैतत्स्यान्नियोगकरणं तव' ही ती ओळ. नियोगाच्या हकीकतीमुळे मला धर्मद्वार मोकळे झाले, असा अर्थ होईल. 'नियोग' शब्दाचा अर्थ येथे नेहमीपेक्षा निराळा आहे. कर्ण म्हणाला,"बये, नियोगाची जी हकीगत सांगितलीस, त्यामुळे माझ्या धर्माचे द्वार मला मोकळे होईल, अशी तुझी कल्पना असली, तर चूक आहे. तुझ्या हकीकतीमुळे मला क्षत्रियत्व मिळाले, पण माझ्यावर कोणतेही क्षत्रियसंस्कार झालेले नसल्यामुळे हे क्षत्रियत्व कुचकामाचे आहे. जन्माच्या वेळी संस्कार व्हायचे, तेव्हा निर्दयपणे तू मला टाकून दिलेस. आज मात्र आप्पलपोटेपणाने माझ्याकडे आलीस. कृष्ण ज्याच्या पाठीशी आहे, त्या धनंजयाची भीती कोणास वाटणार नाही ? मी जर आज दुर्योधनाला सोडले, तर भीतीमुळे मी पांडवांना मिळालो, असे इतर क्षत्रिय म्हणतील. माझ्या जिवावर त्याने हे युद्ध मांडले आहे. जा, तू सांगतेस, ते कदापि होणे शक्य नाही. मात्र मी फक्त अर्जुनाला मारीन, इतर पांडवांना सोडून देईन. मला अर्जुनाने मारले. तर तुझे पाच आहेतच; मी अर्जुनाला मारले, तर मला धरून तुझे पाचच राहतील, जा." कुंती काय बोलणार? 'आपले वचन पाळ.' असे म्हणून ती निघून गेली. कृष्णाला दिले, तसेच हे उत्तर आहे. त्यात कुंतीचा धिक्कार आहे. तिच्या कृत्यामुळे आपल्या आयुष्याचे वाटोळे कसे झाले, तेही सांगितलेले आहे.  कोठल्याही मोहाला बळी न पडता दुर्योधनाला न सोडण्याचा निश्चय कर्णाचे मोठेपण दाखवतो. तरीही शेवटी एक गोष्ट खटकतेच. ती म्हणजे मारीन तर फक्त अर्जुनाला, इतरांना नाही, हे कुंतीला दिलेले वचन ! हे वचन म्हणजे औदार्याची परिसीमा ! मग त्यात खटकण्यासारखे काय?
 हे वेडे औदार्य म्हणता येईल; पण तरी औदार्य, मनाचा मोठेपणा, हा कसा नाकबूल करता येईल? नाकबूल करायला कारण दोन. कर्णाची कृती बऱ्याच वेळा अतिरेकी म्हणून वर जे म्हटले आहे, त्यापैकीच हा प्रकार वाटतो. कुंतीबद्दल त्याला प्रेम वाटले नाही, कणवही आली नाही. तथाकथित भावांबद्दलही त्याला काडीचे सोयरसुतक नव्हते. 'इतरांना सोडीन,' हे म्हणण्यात एक प्रकारची वल्गना होती. ज्यांना ‘सोडीन' म्हटले, त्यांच्याबद्दल तुच्छता होती. मला जो माझ्या तोडीचा वाटतो, त्याचा वध करीन, इतरांशी मला कर्तव्य नाही, असा ह्या म्हणण्याचा अर्थ आहे. अशी वल्गना व इतरांबद्दल तुच्छता हा गुण क्षत्रियाला शोभेसाही होता. पण ज्या प्रसंगी त्याने हे वचन दिले. त्या प्रसंगाला तो योग्य नव्हता. युद्ध खरेखुरे होते. ते काही शस्त्ररंग नव्हते. स्वतःची शेखी मिरवण्यापेक्षा दुर्योधनाला जय मिळवून द्यावयाचा, हे त्याचे कर्तव्य होते. इतर भावांना, विशेषतः धर्माला न मारण्यात दुर्योधनाचे अहित होते. धर्म मरता किंवा त्याहीपेक्षा कैद होता, तर युद्धाचा निकाल दुर्योधनाच्या बाजूने लागण्याचा फार संभव होता. स्वतःच्या मोठेपणात कर्ण दुर्योधनाचे हित विसरला, असे म्हणावे लागते. हे वचन औदार्याने दिलेले नसून उद्धटपणे दिलेले होते. ह्या प्रसंगाने कर्णाला 'मी कोण?' ते कळले. त्या 'मी'ला योग्य अशी भूमिका उघडपणे स्वीकारता येणे शक्य नव्हते, हे जाणून कर्णाने त्या 'मी'चा लौकिकात स्वीकार केला नाही.पण मनातून तरी त्याचे जन्मभराचे बंधन सुटून त्याला मोकळे झाल्यासारखे वाटायला पाहिजे होते.
 ज्यासाठी जिवाचे रान केले ते क्षत्रियत्व त्याला मिळाले व मित्रासाठी लीलेने त्याचा त्यागही केला. कर्ण असामान्यत्व पावला. ह्या एका क्षणाने कर्णाचे आयुष्य सफल झाले, असे म्हणता आले असते, पण ह्यानंतरच्या त्याच्या काही आठवड्यांच्या आयुष्यात त्याच्या जीवनाला नेहमीचे वळण परत मिळाले. कर्णाला इतरांनी खाली ओढले, व कर्ण स्वतःच्या कृत्यांनीही आपणहून खाली गेला.
 भीष्माने रथी कोण व अतिरथी कोण, ह्याची नोंद केली, त्यावेळी कर्णाला ‘अर्धरथी' म्हटले. कर्णाच्या उतावळेपणाचा उल्लेख करून त्यामुळे तो अर्धरथी आहे, असे भीष्म म्हणाला. भीष्माचे मत पात्रयत्व, सूतत्व अशा काही सामाजिक मूल्यांवर आधारलेले नव्हते. तो कर्णाचा स्वत:चा असा एक अवगुण दाखवत होता. कर्णाला राग आला, पण सर्व महाभारत विचारात घेता भीष्माचे मूल्यमापन बरोबर वाटते. रथी रथात उभा राहून युद्ध करणारा असे, त्याचप्रमाणे रथ हाकणाराही असे. कृष्णाला दोन्ही अवगत होते. तसेच अर्जुनाला व भीष्मालाही. कर्ण सूतांत वाढला, पण त्याने रथ हाकल्याचे वर्णन नाही. रथात बसून तो लढे, पण रथ चालवण्याची विद्या रथातून युद्ध करताना उपयोगी पडणारी असेल असे वाटते. चालत्या रथातून नेम धरावा लागे. त्यात कर्ण कच्चा होता, हे पुढील हकीकतीवरून दिसून येतेच.
 ह्या भांडणाची हकीकत सुसंबद्ध नाही. एके ठिकाणी म्हटले आहे की, 'मी सेनापती असेपर्यंत कर्णाने लढता कामा नये,' अशी अट भीष्माने घातली. भीष्माचे सेनापतिपद लढाई करण्यासाठी नसून लढाई थांबवायचा तो एक शेवटचा प्रयत्न होता, असे मी म्हटले आहे. तसे असेल तर भीष्माच्या दृष्टीने वरील अट सुसंगत वाटते. पण दुर्योधनाने ती बिनतक्रार कशी कबुल केली, ह्याचे नवल वाटते. दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, ‘भीष्म उभा असेपर्यंत मी लढणार नाही,' असे कर्ण रागावून म्हणाला. कर्णानेही असे म्हणणे त्याच्या स्वभावाला धरूनच आहे.  ह्या प्रसंगी भीष्माचे म्हणणे द्रोणानेही उचलून धरले आहे. तो म्हणतो, प्रत्येक लढाईत हेकेखोर,पळून जाणारा(?) दयाशील व चुका करणारा असा हा कर्ण असल्यामुळे माझ्या मतेही तो अर्धरथीच आहे. (रणे रणेऽतिमानी च विमुखश्चैव दृश्यते। घृणी कर्णः प्रमादी च तेन मेऽर्धरथो मतः।।) द्रोण शस्त्रास्त्रे शिकवणारा होता. भीष्माचे नाही, तर द्रोणाचे मत विचारात घेऊन आत्मशोधन करण्याची कर्णाला शक्यता होती. माझ्या बुद्धीचे व शरीराचे बळ असूनही परिस्थितीमुळे मला रथविद्या व शस्त्रविद्या संपादन करता आली नाही. ही जाणीव कर्णाला झाली असती; आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादा कबूल कराव्या लागल्या असत्या; पण कर्ण आत्मशोधन करणारा नव्हता. 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा खोल विचार करणारा नव्हता.
 भीष्म पडल्यावर कर्ण रणांगणात उतरला. आता तो सेनापती होणार, असे वाटू लागले. 'आम्हांला कर्ण सेनापती हवा. आम्हाला कर्ण सेनापती हवा,' म्हणून सैन्याचा घोष चालला होता. कर्णही मोठ्या रथात बसून वैभवाने रणभूमीवर आला. पण ‘सर्वांना पसंत पडेल, अशा माणसाला म्हणजे द्रोणाला सेनापती कर,' म्हणून त्यानेच दुर्योधनाला सल्ला दिला. द्रोणाच्या आधिपत्याखाली हमरीतुमरीचे युद्ध झाले व दोन्हीकडचे मोठे वीर कामास आले. ह्या तीन दिवसांत अर्जुनाला मारावयाची संधी कर्णाला मिळाली नाही,इतकेच नाही, तर इंद्राने दिलेली अमोघ शक्ती घटोत्कचावर चालवावी लागली. ह्या तीन दिवसांतच कौरववीरांनी पाचसहा जणांनी मिळून अभिमन्यूला, अर्जुनाच्या मुलाला विरथ करून मारले. द्रोण मेल्यावर युद्धाच्या सोळाव्या दिवशी कर्ण सेनापती झाला. दोन्हीकडची खूप हानी झाली होती; पण जयाचे पारडे पांडवांच्या बाजूला होते. ‘लढाई थांबव, संधी कर,' असे अश्वत्थामा दुर्योधनाला सांगत होता. दुर्योधन कर्णावर विसंबला होता. जे इतरांना साधले नाही ते कर्ण करील, अशी त्याला खात्री वाटत होती.  आता कर्णाच्या मनात असते, तरी त्याला माघार घेता आली नसती. माघार घेण्याचा विचारही कर्णाला सुचला नाही. कर्ण सेनापती असतानाच्या पहिल्या दिवसात काही घडले नाही. दुसऱ्या दिवशी सारथी म्हणून शल्याची मागणी करणे त्याला सुचले. ह्या मागणीपायी त्याला बराच अपमान सहन करावा लागला.
 कर्णपर्वात विचार करायला लावतील, अशा घटना पुष्कळ आहेत. त्यातलेच एक हे तेजोभंगाचे प्रकरण. शल्य हा माद्रीचा भाऊ, व नकुलसहदेवांचा म्हणजे पर्यायाने पांडवांचा मामा. दुर्योधन त्याला पहिल्याने भेटला, म्हणून त्याने त्याच्या बाजूला मिळण्याचे व लढण्याचे कबूल केले म्हणे. मागाहून धर्म आला. त्याला त्याने सांगितले, “काय करावे ? दुर्योधन पहिल्याने आला. मला ‘नाही' म्हणता येईना. पण कर्णाचे सारथ्य करून मी त्याचा तेजोभंग करीन व अशा तऱ्हेने आतून तुम्हांला मदत करीन.” हा सर्वच प्रसंग हे संभाषण अशक्य वाटते. कर्ण शल्याला सारथी म्हणून मागेल, ह्याचे काय शल्याला स्वप्न पडले होते? आतून शल्य पांडवांच्या बाजूचा होता. ह्याही देखाव्यात तथ्य नाही. कारण कर्णाच्या पाठोपाठ पांडवांनी त्यालाही मारलेच. मद्र देशालाच बाल्हिक, असे महाभारतात म्हटले आहे. हस्तिनापूरच्या घराण्याचा आणि बाल्हीकांचा संबंध खूपच जुना होता, शंतनूचा बाप जो प्रतीप त्याची एक राणी मद्रांची ऊर्फ बाल्हीकांची माहेरवाशीण होती. शंतनुचा एक भाऊ मामाघरी दत्तक गेला होता. त्याचा मुलगा वा नातू सौमदत्ती दुर्योधनाच्या बाजूने लढला व मेला. शल्याची सख्खी बहिण म्हणा, चुलतबहीण म्हणा, पांडुला दिली होती, म्हणजे वडील घराण्यांचा संबंध चालू राहिला होता. ज्याप्रमाणे इतर बाल्हीक दुर्योधनाच्या बाजूने म्हणजे वडील घराण्याच्या बाजूने लढले, तसा शल्यही लढला. कदाचित इतकी अटीतटीची लढाई होईल, अशी त्याला कल्पना नसेल. एवढे मात्र खरे की, तो पांडवांच्या विरुद्ध बाजूला होता व म्हणून जी घटना घडेल अशी त्याला कल्पना नव्हती, त्याबद्दल धर्माला तो काही वचन देऊ शकेल, हे अशक्यच वाटते.  तसेच तेजोभंगाचे प्रकरणही पटत नाही. एका बाजूला अर्जुन व एका बाजूला कर्ण अशा दोन मुख्य व्यक्ती ह्या पर्वात आहेत. अर्जुन दररोज (एक दोन दिवस वगळल्यास) संशप्तकांशी लढत होता. ह्याही दिवशी अर्धा दिवस लढल्यावर तो मुख्य सैन्यात परत आला. धर्म कुठे दिसेना, म्हणून त्याने भीमाला विचारले, “राजा कुठे आहे ?" भीम म्हणाला, “काय की, मला नक्की माहीत नाही. फार जखमी होऊन तो शिबिरात गेला आहे. मेला आहे की जिवंत आहे, मला सांगता येणार नाही” भीम महाभयंकर लढाईत गुंतला होता. त्याला राजाचे काय झाले हे खरोखर ठाऊक नव्हते, की तो अर्जुनाला चेव आणायला असे बोलला, ते कळत नाही. अर्जुन ताबडतोब शिबिरात गेला. “कर्णाला मारून आलास ना? शाबास!" ह्या शब्दांनी धर्माने त्याचे स्वागत केले. “तुझी विचारपूस करायला आलो.” हे अर्जुनाचे शब्द ऐकल्यावर धर्म भडकला व अर्जुनाला इतके टाकून बोलला की, अर्जुन संतापाने भावाला मारायला उठला: शेवटी कृष्णाने हा सर्व प्रकार हसण्यावारी नेऊन भावा-भावात दिलजमाई करून दिली व “आता चल. कर्णावर तुटून पडू," म्हणून त्याने रथ हाकला. हा प्रकार तेजोभंगाचा की चेव आणण्याचा ? शल्याचे कर्णाशी बोलणेही ह्या प्रकारचेच होते. शल्य मोठ्या मिनवतारीने कर्णाचा सारथी झाला. “मी मुर्धाभिषिक्त राजा कर्णाचा सारथी होणार की काय?" ह्या शल्याच्या वाक्याने कर्णाला अंगराजपदाचा अभिषेक झाला होता की नाही, अशी शंका मनात परत डोकावते. शल्य सारथी झाल्यावर अर्जुनाप्रमाणे रथाला पांढरे घोडे जोडून जयघोष करीत कर्ण निघाला. बरोबर शस्त्रांनी व बाणांनी भरलेला दुसरा रथ होता. “अर्जुन कोठे आहे ते मला दाखवा, आत्ता त्याला ठार करतो. कोठे दिसत नाही कसा? कोणा पाहिला आहे का त्याला? कुठे गेला आहे तो ?" अशा आरोळ्या देत कर्ण निघाला.  हे ऐकून शल्याने कर्णाला डिवचले की, “बाबा, व्यर्थ बडबड करू नकोस आतापर्यंत अर्जुनाने तुला हात दाखवला आहे. घोषयात्रेत काय केलेस? विराटाच्या गोग्रहणाच्या वेळी काय केलेस? अर्जुन दिसला की नांगी टाकशील" धर्म अर्जुनाला बोलला, त्यापेक्षा हे निराळे नव्हते. ह्याच पर्वात अश्वत्थाम्याशी लढाई करताना अर्जुन जेरीस आला होता, तेव्हा कृष्णही त्याला अतिशय तुच्छतेने टाकून बोलला होता व ते ऐकून अर्जुन चेव येऊन लढला होता. रथिसारथी ह्यांच्या परस्पर संबंधाचेच हे द्योतक असेल का? हे बोलणे तेजोभंग करणारे नसून लढवय्याला राग आणणारेच वाटते.
 ह्याच्यापुढचे शल्य-कर्णाचे संभाषण मात्र गैरलागू, भारतातील कथेला सर्वस्वी विसंगत, मागाहूनच्या पुराणांतील रूढ कल्पनांनी भरलेले व म्हणून प्रक्षिप्त व मागाहून घुसडलेले वाटते. कर्णाने शल्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्यायचे सोडून मद्र व बाल्हीक देशातील स्त्रिया कशा अनाचारी आहेत ह्याचेच वर्णन केले आहे. त्याने गांधारालाही नावे ठेवली. सर्व देश आचारभ्रष्ट आहे असे म्हटले आहे. शेवटी तर “शल्या, तू कुलीन नाहीस, तुझे डोके उडवीन.' असे तो म्हणाला. कर्ण कितीही उतावळा झाला, तरी तो असे बोलणे अशक्य होते. त्याचा जन्म कौरवांच्या दरबारात गेलेला होता. कुरूंचे व मद्रांचे संबंध त्याला चांगले माहीत होते. दुसरे असे की मद्र, बाल्हीक ही पश्चिमेकडची राष्ट्रे व अंग, वंग व कलिंग ही पूर्वकडची राष्ट्रे अनाचारी, अनार्य ही कल्पना पुराणांची आहे. पुराणकाळात कुरु-पांचालदेशाला काही विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. हाच प्रदेश पुढे ‘ब्रह्मावर्त' नाव पावला. पण अशा तऱ्हेचा समज महाभारतात काडीमात्र दिसत नाही. सर्व कुरूंनी पश्चिमेकडच्या मुली केल्या होत्या व आपल्या मुली पश्चिमेकडे दिलेल्या होत्या. हे संभाषण म्हणूनच अगदी विसंगत अतएव प्रक्षिप्त वाटते.  ह्या भांडणात कर्ण फारच संतापला, हे पाहून शल्यानेच संभाषण थांबविले व त्याला युद्धभूमीवर आणले. येथेही सारथी व रथी ह्यांचे संबंध कर्ण नीट जाणत नव्हता असेच म्हणावे लागते. नवे, पांढरे घोडे आणणे हाही भाग प्रक्षिप्त नसल्यास वेड्यासारखाच वाटतो. आपले घोडे, आपला रथ व आपला सारथी हे सर्वच ओळखीचे, नेहमीचे असावे लागतात. सर्वांनी मिळून लढावयाचे असते, ही गोष्ट कर्ण विसरला का? काहीही असो. कर्ण सेनापती म्हणून लढाईत पडला, तो पहिलेच पाऊल त्याने चुकीचे घातले, असे म्हणावे लागते. पुढच्या हकीकतीवरूनही शल्य कर्णाच्या विरुद्ध शत्रुत्वाने वागला, असे दिसत नाही.
 खूपसा आरडा-ओरडा करूनही कर्ण लागलीच अर्जुनाला सामोरा गेला नाही. भीम, धृष्टद्युम्न व अर्जुन हे रणात हाहाकार करीत होते. कर्णही लढाईत उतरला. थोड्या वेळाने शल्याने त्याला लांबून अर्जुनाचा रथ दाखविला. “दुर्योधनाने जन्मभर तुझ्यावर उपकार केले, ते फेडण्याची संधी आज आली आहे." असे म्हणून शल्याने रथ हाकला. ह्यावेळी कर्णाचा मुलगा वृषसेन अर्जुनावर चालून गेला व अर्जुनाने थोड्याच वेळात कर्णाच्या देखत कर्णाच्या पुढ्यात त्याला मारले. ह्या वेळेपर्यंत कर्णाचा घोष थांबला होता व अर्जुन घोष करू लागला होता. मुलगा मेलेला पाहून कर्णाच्या डोळ्यांत पाणी आले; पण ते पुसून तो अर्जुनापुढे उभा राहिला. दोघांचे युद्ध झाले, पण अर्जुनाची हळूहळू सरशी होत होती. कर्ण रक्ताने माखला होता. त्याचे कवच फुटले होते. त्याने अर्जुनाला ठार मारण्यासाठी एक अमोघ बाण काढला. त्या बाणाच्या अग्रावर नाग बसले होते. (नागविष लावलेले होते, म्हणून बाण थोडा जरी रुपला, तरी मनुष्य मरणार, अशा तऱ्हेचा हा बाण होता का?) कर्णाने नेम धरला. शल्याने सांगितले, “बाबा, नेम चुकला आहे. हा बाण अर्जुनाचा गळा वेधणार नाही." पण कर्णाने शल्याचे न ऐकता धनुष्य ओढले. चार अंगुळांनी नेम चुकून बाण अर्जुनाच्या किरीटाला लागला.  ह्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधी वर्णने आहेत. एकदा म्हटले आहे, नेम चार अंगुळांनी चुकला. शल्याचा इशारा बरोबर धरला, तर इतक्या थोडक्यात नेम चुकणार, ते शल्याला कळले असे होते, व कर्णाची नेमबाजी बरोबर नव्हती असे सिद्ध होते. उलट कर्णाचा अमोघ बाण येतो आहे, हे पाहून कृष्णाने रथ दाबला व घोड्यांनी गुडघे टेकले व बाण चोवीस अंगुळांनी चुकला, असेही वर्णन लगेच केले आहे. हे वर्णन केवळ कृष्णस्तुतीकरिता लिहिले आहे, असे ह्या पर्वाचे संपादक म्हणतात, ते बरोबर वाटते. कर्ण गळ्याचा वेध घेत होता. चोवीस अंगुळांनी वेध चुकला, तर किरीट पडलाच नसता; म्हणून अर्जुन वाचला तो कृष्णाच्या कौशल्याने नव्हे, तर कर्णाच्या चुकलेल्या नेमबाजीने, ही वस्तुस्थिती वाटते. मुलाच्या मरणाने कर्ण खचला असेल आणि आता नेम चुकला, त्यामुळे तो जास्तच गोंधळात पडला. एवढ्यात चाक फिरले, रथ घसरला व चाक जमिनीत रुतले.
 लढाईचा हा सतरावा दिवस होता. हत्ती, घोडे व योद्धे ह्यांची प्रेते व मोडके रथ रणभूमीवर पडलेले होते. एवढ्या रणकंदनाने जमीन मऊ झालेली होती. कुठे-कुठे ओली झालेली असणार. गंगायमुनांच्या खोऱ्यात दगड नाहीच, हजार फूट खोल मातीच आहे. पण पाण्याचा निचरा होत नाही. अशा परिस्थितीत चाक फिरले व रथ रुतला, तर नवल काहीच नाही. युद्धाचे दोन आठवडे ह्या ना त्या निमित्ताने रथ निकामी होत होते, व योद्धे एक रथ सोडून दुसऱ्यात बसत होते. कर्णाच्याही पाठीमागे रथ होते, पण कर्ण रथाबाहेर येऊन मातीत फसलेले चाक बाहेर काढू लागला. जड रथाचे फसलेले चाक बाहेर काढणे- विशेषतः एकट्या-दुकट्याला म्हणजे वेळ खाणारे व श्रमाचे काम होते. कर्ण दुसऱ्या रथावर का बसला नाही? संध्याकाळ होत आली होती. ह्या युक्तीने वेळ काढून एका रात्रीची उसंत मिळवण्याचा त्याचा बेत होता का? तो गोंधळला होता, हे खरेच.  त्याने अर्जुनाजवळ मागणे मागितले, “मी चाक काढीत भूमीवर उभा आहे. तू रथात आहेस. तू युद्धनीती जाणतोस. रथातून माझ्याशी लढू नकोस. मला चाक काढू दे. धर्माने युद्ध कर"
 पण कृष्ण त्याला उसंत द्यावयाला बिलकूल तयार नव्हता. ‘धर्माने युद्ध कर' ह्या आव्हानातच कर्णाला पुरते नेस्तनाबूद करून टाकावयाचे साधन त्याला मिळाले. 'मी कोण?' हा प्रश्न कर्ण आता विचारीत नव्हता; पण कृष्णाने विचारलेल्या प्रश्नांचा रोख ‘तू कोण?' हाच होता. “भर सभेत द्रौपदीचे वस्त्र फेडायला लावलेस, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? कर्णा, विरथ अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी मिळून मारला, तेव्हा कुठे होता तुझा धर्म ?"
 अर्जुनाचा मोह नाहीसा करून स्वत्वाची जाणीव देऊन त्याला कर्तव्य करायला उभे केले कृष्णाने. त्याच कृष्णाने मरणाच्या घटकेला कर्णाचे स्वत्व सर्वस्वी हरण केले. “द्रौपदीला साधी माणुसकी तू दाखवली नाहीस, मग तुला का दाखवावी? सौभद्राच्या बाबतीत तू कुठे क्षत्रियधर्म पाळलास? कसल्या धर्माची तुला अपेक्षा आहे ? ती अपेक्षा असावी, असे तू वागलास का?" हेच ते विदारक प्रश्न होते. कृष्णाने दोनच प्रश्न विचारले. इतर भाकड प्रश्न संशोधित आवृत्तीत गाळले आहेत. एका बाजूने कर्णाला धर्माची याचना करायचा अधिकार ह्या प्रश्नांनी नष्ट केला, तर दुसऱ्या बाजूने ज्या दोन कृत्यांनी अर्जुनाला खोल जखम झाली होती, त्यांचा उच्चार झाला. ह्याच माणसाने माझ्या बायकोची भर सभेत विटंबना केली; ह्याच माणसाने माझ्या मुलाला निर्दयपणे मारले, ह्याची अर्जुनाला आठवण झाली, तो त्वेषाने उठला. त्याने बाण जोडला व तो गर्जून म्हणाला, “जर खरा क्षत्रिय असेन, तर हा बाण कर्णाचे प्राण घेईल' अर्जुन अचूक नेम धरणारा म्हणून प्रसिद्ध होता. ह्याही वेळी त्याचा नेम चुकला नाही.
 कर्ण महाभारतात शस्त्ररंगाच्या वेळी आला. त्यावेळी झाले घटनांची एक प्रकारे ह्या शेवटच्या प्रसंगी पुनरावृत्ती झाली. शस्त्ररंगात कर्णाच्या द्वंद्वयुद्धाच्या मागणीमुळे ‘तू कोण?' हा प्रश्न कृपाने विचारला व कर्णाला मान खाली घालावी लागली. शेवटचा प्रसंग विद्येचे प्रदर्शन नसून खरेखुरे युद्ध होते. जे द्वंद्व त्याने अर्जुनाजवळ मागितले, ते त्याला आयते मिळाले होते. हा काही खेळ नव्हता. दयामाया न दाखवता लढलेल्या युद्धाचा हा एक भाग होता. शक्य तर मारायचे, नाहीतर वीरमरणाने मरायचे, ह्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. जन्मभर ज्याच्याशी हाडवैर केले, स्पर्धा केली, तो प्रतिस्पर्धी म्हणून समोर होता. त्याच्यासमोर कसलीही याचना करावयास नको होती. क्षात्रवृत्तीने मरणे हा एकच मार्ग होता. परत एकदा नको ते कर्णाने केले. त्याने धर्मयुद्धाची अपेक्षा केली व आता कृपाने नव्हे, पण कृष्णाने ‘तू कोण,' म्हणून धर्माची अपेक्षा करावीस, हे विचारले, 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा स्वतःशी उलगडा न करता कर्ण गेला.

ऑक्टोबर, १९६६
नऊ
कृष्ण वासुदेव


 कृष्ण महाभारतात येतो, तो आदिपर्व संपता-संपता, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. त्याच्या आधी कृष्णाचा पांडवांशी किंवा कौरवांशी कसलाच संबंध दाखवलेला नाही. वसुदेवाची बहीण कुंती (म्हणजे कृष्णाची आत्या) पांडूने करून घेतली, एवढा एक उल्लेख येतो. त्यापलीकडे यादवांशी काही संबंध दाखवलेला नाही. पांडू मरेपर्यंत पांडव हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रानात राहत असत. पांडू मेल्यावर व माद्री सती गेल्यावर विधवा कुंती पोरक्या मुलांना घेऊन हस्तिनापूरला आली व हस्तिनापूरला राहिली. भीष्माच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले. कुंतीच्या व विदुराच्या दक्षतेमुळे कौरव दरबारी त्यांचे संरक्षण झाले. पुढे त्यांना गंगेकाठच्या एका गावाला पाठवून मारायचा घाट कौरवांनी घातला. जळत्या घरातून मोठ्या युक्तीने बाहेर पडून कुंती व पाच पांडव एक वर्ष, द्रुपदाच्या राजधानीत येईपर्यंत, लपत-छपत राहिले. पांडवांनी द्रौपदीला मिळवली, तीसुद्धा आपण कोण, हा सुगावा लागू न देता. म्हणजे पांडवांच्या लहानपणी त्यांच्यावर नाना आपत्ती कोसळत असताना व अतिशय सावधगिरी बाळगावी लागत असताही कुंतीने माहेरच्या माणसांची मदत घेतली नाही असे दिसते.  ही वागणूक कुंतीने कदाचित जाणून-बुजून ठेवली असेल. गांधारीचा भाऊ तिच्या लग्नाच्या दिवसापासूनच कौरवांच्या दरबारात ठाण मांडून प्रतिष्ठित झाला होता. कुंती आणि माद्री ह्यांच्याबरोबर कुणी माहेरची माणसे आली नव्हती. जरी काही आली असली, तरी लौकिकाप्रमाणे लग्नसोहळा आटोपल्यावर परत गेली असणार. नवऱ्याच्या मागे माहेरच्या कोणाला हक्काने बोलावणे शक्य नव्हते. ती स्वतःच इतकी दीन होती की, तिच्या माहेरच्या माणसांना कौरवांच्या दरबारी स्थान मिळणे शक्यच नव्हते. फार तर तिला व तिच्या मुलांना तिच्या माहेरी आसरा मिळाला असता; पण त्यामुळे हस्तिनापुराच्या राज्यावरील तिच्या मुलांचा हक्क कदाचित कायमचा नाहीसा झाला असता. वडिलोपार्जित संपत्तीवरील मुलांचा हक्क नाहीसा होऊ नये, म्हणून ज्या शहाणपणाने व खालच्या मानेने विधवा भावजय थोरल्या दिराच्या कुटुंबात राहते,अगदी त्याचप्रमाणे कुंती राहिलेली होती. आणि ह्यामुळेच कदाचित यादवांचे नाव द्रौपदी स्वयंवरापर्यंत महाभारतात ऐकू येत नाही. पांडव लहान असल्यापासून द्रौपदी-स्वयंवरापर्यंतचा काळ यादवांना फार धकाधकीचा गेला असणार. कंसवध, जरासंधाशी युद्ध व त्याला भिऊन यमुनाकाठचा प्रदेश सोडून दक्षिणेकडे जाणे, द्वारका स्थापणे व तेथे स्थिरस्थावर होणे ह्या सर्व घटना याच काळातल्या असणार.
 स्वयंवर मंडपात यादवांची मंडळी आली होती, पण ती द्रौपदी मिळवायला नव्हे. एकंदर समारंभ बघून स्वयंवरात काय होते, हे बघण्यापुरतेच ते आलेले दिसतात. अर्जुनाने पण जिंकल्याबरोबर कृष्णाची नजर ब्राह्मणवेषाने बसलेल्या पाच पांडवांकडे गेली, व त्याने शेजारी बसलेल्या बलरामाला नाव घेऊन कुठचा कोण, हे सांगितले. सांगता-सांगता तो असेही म्हणतो, “माझ्या गुप्त हेराने अशी वार्ता आणली होती की, पांडव वारणावताला जळत्या घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले नाहीत, ते निसटून गेले असावेत, असा कयास आहे; तेच हे दिसताहेत."  त्याने व बलरामाने लवाजमा न घेता लपत-छपत धर्माच्या पाठीमागे जाऊन पांडवांच्या राहण्याचे ठिकाण हुडकून काढले. ते उभयता कुंतीला व पांडवांना भेटुन, त्यांचे ठिकाण कोणाला सापडू नये, ह्या बुद्धीने फार थोडा वेळ थांबून गुपचूप परत आले.
 ह्या भेटीनंतर मात्र महाप्रस्थानपर्व वगळून श्रीकृष्ण नाही, असे एकही पर्व महाभारतात नाही. श्रीकृष्ण नव्हता अशा वेळात धर्मराजाने द्यूत खेळून राज्य गमावले. बारा वर्षांच्या वनवासात पांडवाचा आणि कृष्णाचा संबंध फारसा आला नाही; पण कृष्ण त्यांच्या पाठीमागे उभा होता. विराटपर्वामध्ये गोग्रहणाच्या वेळी पांडवांनी कौरवांना पळवून लावले. ह्या अपवादाखेरीज ज्यात श्रीकृष्णाची मदत नाही, अशी मोठी कृत्ये पांडवांचे हातून झाली नाहीत. द्रौपदी-स्वयंवरात यादव मोठा आहेर घेऊन आपल्या लवाजम्यानिशी द्रुपदाच्या राजधानीला आले. द्रुपदाच्या व यादवांच्या बलशाली युतीमुळे पांडवांना राज्यार्ध देणे धृतराष्ट्राला भाग पडले. कृष्णाने उघडपणे हा पुरस्कार केला नसता, तर एकट्या द्रुपदाच्या बळावर सहजासहजी पांडवांना राज्य मिळते ना!
महाभारतात लिहिले आहे की, धृतराष्ट्राने युधिष्ठिराला खांडववन व त्यातले खांडवप्रस्थ गाव दिले आणि कृष्णाला पुढे करून पांडव खांडवांच्या अरण्यात शिरले. तेथे त्यांनी कृष्णाच्याच मदतीने खांडवप्रस्थ या लहान गावाचे मोठ्या राजधानीत रूपांतर केले.एवढेच नव्हे, तर खांडववन जाळून कृष्णाने व अर्जुनाने मोठा प्रदेश प्रजेसाठी मिळवून दिला. हे सर्व झाल्यावर मयाकडून मोठा राजवाडा बांधण्याची तजवीज करून कृष्ण द्वारकेला निघून गेला.
 कृष्ण गेल्यावर निरनिराळे लोक धर्मराजाला भेटायला आले. त्यांचे बोलणे ऐकून आपण राजसूय यज्ञ करवा, असे धर्माच्या मनात आले.त्या वेळी कृष्णाला बोलावणे पाठवून धर्माने आपला बेत कृष्णाला सांगितला आणि कृष्णाने त्यावेळी राज्य करीत असलेल्या निरनिराळ्या राजांची माहिती देऊन कोण अनुकूल,कोणी प्रतिकूल, कोण जिंकायला सोपे वगैरे सांगून मगधाधिपती जरासंधाचा वध केल्याशिवाय राजसूय यज्ञ करणे शक्य नाही, हे धर्माला पटवून दिले. जरासंधाबद्दल बोलत असताना कृष्णाच्या पूर्वायुष्याचा ओझरता उल्लेख व यादवांचे मथुरेहून द्वारकेला जाणे ह्या दोन गोष्टी कृष्णाने स्वतःच्या शब्दांनी सांगितलेल्या आहेत.
 महाभारतामध्ये ज्या कृष्णाचे दर्शन घडते, तो कृष्ण हरिवंशामधील कृष्णापेक्षा किंवा भागवतामधील कृष्णापेक्षा अगदी निराळा आहे. महाभारतामध्ये कृष्ण येतो तो मोठेपणी, द्वारकेत राहणारा असा येतो. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्या स्वत:च्या तोंडून कळतात. त्याने व बलरामाने कंसाला व सुनाम्याला मारले. कंसाच्या राण्या ह्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांनी आपल्या बापामागे कंसवधाचा सूड घेण्याचे टुमणे लावले व जरासंध यादवांवर चाल करून गेला. जरासंधापुढे यादवांचा टिकाव लागेना म्हणून यमुनाकाठचा प्रदेश सोडून यादव पश्चिमेकडे पळाले आणि रैवतक पर्वताच्या भोवती ‘कुशस्थली' नावाच्या ठिकाणी राहिले व तेथे द्वारका नावाची कोणाही शत्रूला घेता येणे शक्य नाही, अशी एक नगरी त्यांनी बांधली. ही नवी नगरी व तिच्या भोवतालचा प्रदेश येथे वृष्णी, अंधक, भोज वगैरे यादवांची निरनिराळी कुळे बलरामाच्या अधिपत्याखाली राहिली. कृष्णाचा बाप वसुदेव ह्याला बऱ्याच बायका होत्या. बलराम हा रोहिणीचा मुलगा. सुभद्रा व सारण ही सख्खी भावंडे वसुदेवाच्या आणखी एका राणीची मुले. म्हणजे बलराम, श्रीकृष्ण व सुभद्रा ही एकमेकांची सावत्र भावंडे होती. कृष्णाने आपल्या शौर्याने व शहाणपणाने यादवांचे स्वातंत्र्य कायम राखले होते. ह्या यादवांच्या निरनिराळ्या शाखांचे वर्णनही महाभारतात काही ठिकाणी येते. सभापर्वात मोठमोठ्या यादव-वीरांची नावेदेखील सांगितलेली आहेत. पण महाभारतात ठिकठिकाणी विखुरलेली माहिती गोळा करूनही यादव वंशाचा संगतवार इतिहास सांगता येत नाही.  महाभारतामधील वर्णनावरून यादव हे बलशाली, श्रीमंत, बरेच दांडगे, स्वभावाने तापट, चटकन शस्त्राला हात घालणारे, आपल्याच ऐटीत असणारे, रथविद्येत निपुण असे लोक होते, असे दिसते. त्यांच्या श्रीमंतीचे वर्णन बऱ्याच ठिकाणी येते. यादवांतल्या यादवांत पक्षोपपक्ष होते. एका पक्षाचे मत कृष्णाने राजा व्हावे, असे होतेसे दिसते. पण कृष्णाच्या विरुद्ध बाजूलाही पुष्कळ लोक हाते; आणि कुळातल्या कुळात भांडणे नकोत, म्हणून कृष्णाने वसुदेवाचा सगळ्यांत थोरला मुलगा व आपला सावत्र भाऊ बलराम ह्याला राजा केले. बलराम आणि कृष्ण यांच्यामध्ये प्रत्यक्ष स्पर्धा जरी नव्हती, तरी पुष्कळच मतभेद होते. कृष्णामुळे आपण राजे आहोत, ही गोष्ट बलराम बहुतेक करून जाणून असावा. पण काही बाबतीत इच्छा नसूनही त्याला कृष्णाच्या पुढे नमावे लागे. अर्जुनाने कृष्णाच्या मदतीने व सल्ल्याने सुभद्रेला पळवली. क्षत्रिय रूढीप्रमाणे सुभद्रचे स्वयंवर झाले असते, पण कृष्णानेच अर्जुनाला सांगितले की, "बाबा, या पोरी स्वयंवरात कोणाला माळ घालतील, याचा नेम नाही. तुला ती हवी आहे ना, मग मी तुला माझा रथ देतो, त्यात तिला घाल व पळवून घेऊन जा." ह्याप्रमाणे अर्जुन गेला, तेव्हा बलरामसुद्धा सर्व यादव-वीर अर्जुनाचा पाठलाग करून त्याला मारावयाला निघाले होते. पण कृष्णाने चार गोष्टी जागून त्यांना परावृत्त केले व पांडवांचा व आपला संबंध जमणे ही कशी फायद्याची गोष्ट आहे. हे त्यांना पटवून दिले. कृष्णाचा पांडवांकडे अतिशय ओढा होता. बलरामाला पांडवांबद्दल सदिच्छा होती, पण ओढ नव्हती. कौरव व पांडव या दोघांबाबत तो कोठच्याच एका बाजूचा नव्हता. युद्ध सुरू झाले, तेव्हा या भानगडीत पडायलाच नको, म्हणून तो अलिप्त राहिला होता. युद्धाच्या वेळी दुर्योधनाला भीमाने मांडीवर म्हणजे कमरेखाली गदा मारली, म्हणून तो भीमाला मारायला उठला होता. पण कृष्णाने त्याला आवरले.  यादवांमधले पक्षोपक्ष भारतीय लढाईच्या वेळी उघड होतात. कृष्ण जरी प्रत्यक्ष लढला नाही, तरी कृष्णाच्या बाजूचे यादव पांडवांच्या बाजूने लढत होते व दुसरे कित्येक यादव दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. वर सांगितल्याप्रमाणे बलराम आपल्यापुरता अलिप्त राहिला.
 कृष्णाच्या बायकांमध्ये सत्राजिताची मुलगी सत्यभामा ही महाभारतात प्रामुख्याने येते. कृष्ण ज्यावेळी सपत्नीक पांडवांना भेटावयास आला, त्यावेळी त्याने सत्यभामेला बरोबर आणले होते. वनपर्वामध्ये सत्यभामा त्याच्याबरोबर होती. उद्योगपर्वामध्ये युद्धाच्या छावण्या पडल्या होत्या, तेव्हाही अर्जुनाच्या शिबिरात कृष्णाबरोबर सत्यभामा होती.
 रुक्मिणीचे फक्त नाव मात्र एक-दोनदा येते. रुक्मिणी ही कृष्णाची विशेष आवडती राणी होती, असे पुढील वाङ्मयात येणारे उल्लेख महाभारतात कुठेही नाहीत. किंबहुना, अमकीचा नवरा म्हणून पुरुषाचे वर्णन करण्याची प्रथाच महाभारतात नाही. इंद्रप्रस्थाचे राज्य कृष्णाचा पणतू वज्र या रुक्मिणीच्या नातवाच्या मुलाला दिले. पण अर्जुनाने राज्य दिले, ते कृष्णाच्या आवडत्या राणीचा तो पणतू म्हणून नव्हे, तर कृष्णाचा उरला-सुरला वंश म्हणून. वज्राचा आजा प्रद्युम्न व सात्यकी हे अर्जुनाचे मित्र व अर्जुनाच्या शौर्याचे पूजक, म्हणजे जवळजवळ भक्तच होते, असा उल्लेख महाभारतात ठिकठिकाणी आलेला आहे. तेव्हा अर्जुनाने ह्या दोघांच्या वंशजांस राज्ये दिली असेही म्हणता येईल. ह्या घटना रुक्मिणी ही कृष्णाची लाडकी होती व त्यामुळे तिच्या वंशाला मिळाले, असा प्रकार काडीमात्र नाही.
 महाभारतात जो कृष्ण दाखवला आहे, त्यात गोपीवल्लभत्वाचा मागमूसही नाही. त्या वेळच्या सर्वच क्षत्रिय राजांच्या संपत्तीमध्ये गोधनाचा समावेश होई. राजाची स्वत:ची अशी खिल्लारे असत. राजाने नेमलेले गवळी असत. राज्याच्या सीमेलगत शेतीखाली जमीन संपून अरण्याला जेथे सुरवात होई. त्या प्रदेशामध्ये ही खिल्लारे ठेवलेली असत.  हस्तिनापूरच्या राजाची तशी खिल्लारे होती, हे घोषयात्रेवरून दिसून येते. विराटाच्या राजाची तशाच तऱ्हेची खिल्लारे होती, हे विराटपर्वात दिसून येते. वर्षा-दोन वर्षांनी राजाने स्वतः जाऊन आपली खिल्लारे मोजून पहावीत; नवीन जन्मलेल्या जनावरांवर आपल्या स्वामित्वाची मुद्रा ठोकावी, असा प्रघात होता. यादव हे त्यावेळचे अतिशय श्रीमंत क्षत्रिय घराणे होते. तेव्हा त्यांचेही गुरांचे कळप मोठे असणारच. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी किंवा सुभद्रेच्या लग्नाच्या वेळी त्यांनी पांडवांना रथ, दासदासी, घोडे ह्यांबरोबर खूप गोधनही दिले. सुभद्रेला इंद्रप्रस्थाला घेऊन येताना द्रौपदीच्या रागावर उपाय म्हणून अर्जुनाने एक युक्ती योजली. सुभद्रेला सुंदर ‘गोपालिका'-वेष देऊन ‘मी तुमची दासी आहे,' असे म्हणत द्रौपदीकडे पाठविले. ह्या एका ठिकाणी गोपाल कन्यकेचा उल्लेख आलेला आहे. पण त्यातही असे दिसते की, पांडवांच्या पट्टराणीला भेटायला जाताना तोऱ्याने न वागता नम्रता दाखवण्यासाठी एका खालच्या वर्गातील स्त्रीचा म्हणजे गौळवाड्यातील गौळणीचा वेष सुभद्रेला दिला.
 त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे कृष्णाने बऱ्याच बायकांना जिंकले होते. अर्जुनाशी गप्पा मारताना यमुनेच्या काठी दोघे मित्र जे बोलले, ते एकमेकांनी केलेल्या पराक्रमाबद्दल; आणि तो पराक्रम लढाईतला व प्रेमातला (विक्रान्तानि रतानि च।) असा होता. पण ज्याप्रमाणे अर्जुन पुष्कळ स्त्रिया जिंकूनही स्त्रीलंपट नव्हता,त्याचप्रमाणे कृष्णही स्त्रीलंपट नव्हता. किंबहुना, निरनिराळ्या स्त्रियांना जिंकणे हा प्रेमापेक्षा राजकारणाचाच एक भाग होता.
 कृष्णार्जुनांच्या मैत्रीचा आरंभ द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झालेला असावा. इथे परत एकदा निरनिराळ्या लोकांची वये काय असावीत, असा प्रश्न उपिस्थत होतो. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अर्जुनाचे वय कमीत कमी वीस वर्षांचे असावे, असे आपण म्हटले आहे. ते सहज पंचवीसापर्यंत नेणे शक्य आहे.  अर्जुनाचे वय जास्त न धरण्याचे मुख्य कारण भारतीय युद्धात भीष्माचे वय नव्वदच्या वर जाऊ नये, हे ! एरवी दुसरी काही हरकत नव्हती. महाभारतामध्ये दोन माणसे भेटली,म्हणजे एकमेकांशी कसे वागावे, याचे अगदी काटेकोर नियम आहेत. लहानाने वडिलांना नमस्कार करायचा. बरोबरीच्यांना उराउरी भेटायचे, व लहानांना आशीर्वाद द्यायचा, अशी पद्धत होती. काही गोष्टी बरोबरीची माणसे एकमेकांत करू शकत असत. वडील माणसांच्या बरोबर किंवा लहान माणसांबरोबर तशा गोष्टी करण्याची शक्यता नव्हती. कृष्ण पांडवांना भेटायला येई, तेव्हा दर वेळेला कुंतीला, धर्माला व भीमाला नमस्कार करीत असे, आणि नकुल व सहदेव त्याच्या पाया पडत असत. अर्जुनाला मात्र तो आलिंगन देत असे. तेव्हा तो अर्जुनाच्या बरोबरीचा होता. खांडववनात ते वनविहाराला गेले, तेव्हा कोणा वडील माणसांना न घेता हे दोघे आपल्या बायका व दासदासी घेऊन गेले होते. बायकांचे दारू पिणे, नाचणे, गाणे वगैरे गोष्टी वडील माणसांच्या देखत कदापि झाल्या नसत्या. उद्योगपर्वात लढाईच्या आधी अर्जुनाच्या शिबिरामध्ये कृष्ण आणि अर्जुन दोघेही दारू पिऊन अर्जुनाचे पाय सत्यभामेच्या मांडीवर व कृष्णाचे द्रौपदीच्या, अशा तऱ्हेने बसले होते, असे संजयाच्या तोंडी वर्णन आहे. ह्या शिबिरामध्ये अभिमन्यू वगैरे मुलांना जाण्याला मज्जाव होता, असेही संजय सांगतो. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे अगदी बरोबरीचे जीवश्च कंठश्च मित्र होते.
 द्रौपदी-स्वयंवराच्या सुमारास यादव द्वारकेला जाऊन स्थिर झाल्याला फार काळ लोटलेला नसावा. यादव एका दिव्यातून पार पडले होते. पांडव अशाच तऱ्हेच्या कठीण दिव्यातून बाहेर निघत होते. ह्या वेळेला एकमेकांच्या आधाराने दोघांचेही हित साधणार होते. कृष्णाच्या धोरणी मनाला हा विचार शिवला नसेल, असे म्हणवत नाही. पांडवांच्या संबंधात कृष्णाने बरेच मोठे धोरण ठेवले होते, हे दिसून येते. पण कृष्णार्जुनांच्या वैयक्तिक मैत्रीत धोरणापेक्षा निर्व्याज प्रेमच जास्त दिसते.  कृष्णाचा पांडवांशी जो संबंध होता, त्याचा विचार करताना कृष्णाच्या सबंध आयुष्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीतेत ‘न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन' असे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये पुष्कळच कार्ये व धोरणे होती. काही कुलाविषयीची, काही त्या वेळच्या सबंध क्षत्रियवर्गाविषयीची व काही सर्वस्वी स्वतःविषयीची अशी होती. कंसवध हे काही अंशी स्वतःचे खाजगी कर्तव्य होते, तर काही अंशी सबंध कुळाचीच ती सोडवणूक होती. कंसाच्या वधामुळे कंसाच्या सासऱ्याचे म्हणजे जरासंधाचे यादवांना जे भय उत्पन्न झाले, त्यातून यादवांची मुक्तता करणे, त्याचप्रमाणे क्षणोक्षणी जागरूक राहून ह्या भांडकुदळ व द्वाड वंशाला एकत्र ठेवणे हे आणखी एक कर्तव्य होते. त्या वेळच्या क्षत्रिय रूढीला हरताळ फासून शंभर क्षत्रियांना बळी द्यायला निघालेल्या जरासंधाचा काटा काढणे हेही त्याचे कार्य होते. हे कार्य जितके स्वतःच्या कुळासाठी हाते, तितकेच ते सर्व राजवंशांची एक विशिष्ट घडी बसवण्याच्या त्याच्या प्रयत्नांचेही निदर्शक होते.
 महाभारतात एक गोष्ट मनात भरते, ती म्हणजे क्षत्रियराण्यांचे एकमेकांशी संबंध व क्षत्रियांनी वागण्याचे नियम. निरनिराळ्या राजघराण्यांची वंशपरंपरागत राज्ये व राजधान्या होत्या. सिंधू, सौवीर, मद्र, गांधार, मत्स्य, पांचाल,हस्तिनापूर, खुद्द मगध, चेदी, विदर्भ या सर्व देशांचे राजे वंशपरंपरागत आलेल्या राज्यावर बसलेले होते. यादवांना मथुरेहून पळावे लागले. त्यांनी नवी राजधानी वसवली; ती दुसऱ्या कोणाचे राज्य हिसकावून घेऊन वसवली असे दिसत नाही. लढाईची वर्णने आहेत. दिग्विजयाची वर्णन आहेत, पण कोणी कोणाचे राज्य जिंकून घेतल्याचे उल्लेख नाहीत. जरासंधाला मारल्यावर जरासंधाच्या मुलाला अभय देऊन राज्यावर बसवले. जरासंधाने पकडलेल्या राजाची मुक्तता करून ज्याला-त्याला आपापल्या लहान-लहान राज्यात रहायची परवानगी दिली.  शिशुपालाला मारले तेव्हा शिशुपालाचा मुलगा गादीवर बसला, भारतीय युद्ध झाल्यावर धर्मराज हस्तिनापुराच्या गादीवर बसला. तेव्हा व्यासाने धर्माला जे पहिले कर्तव्य सांगितले ते असे... “जे-जे राजे युद्धात मारले गेले, त्या सर्वांच्या राजधानीमध्ये दूत पाठवून राण्यांचे सांत्वन कर, त्यांना अभय दे! मृत राजाचा जो कोणी मुलगा असेल, त्याला अभिषेक कर व त्याचे रक्षण करण्याची काळजी घे ! एखादी राणी गर्भवती असेल व दुसरा वंश नसेल, तर चांगले लोक नेमून तिचे रक्षण कर व तिला मूल झाले म्हणजे त्याच्या नावाने द्वाही फिरव." (शांतिपर्व : अध्याय ३४:श्लोक ३१-३३) ह्या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की, त्या वेळी युद्धाचे काही विशिष्ट नियम असत. क्षत्रियांनी एकमेकांची राज्ये हिसकावणे हे त्या वेळच्या रीतीला धरून नव्हते. धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाचा पांडवांशी जो विचारविनिमय झाला, त्यातही हीच गोष्ट दिसून येते. कोठचे राजे जिंकण्याला सोपे, आपले आप्त म्हणून कोणाकडून साहाय्य मिळेल, कोणाला मारले पाहिजे, हा तो विचार होता. प्रत्यक्ष चार भाऊ दिग्विजयाला गेले, तेव्हाही राजांचा पराभव करून, त्यांच्याकडून करभार घेऊन आणि त्यांना यज्ञाचे निमंत्रण देऊन ते आले.
 शिशुपाल धर्माला अग्रपूजेच्या वेळेला हेच बजावतो. “तू जो राजसूय यज्ञ करतो आहेस, तो आम्ही सर्वांनी तुला मान्य केले म्हणून." हा त्याच्या म्हणण्याचा मथितार्थ होता. कृष्णाने जरासंधाबद्दल व जरासंधाशी भाषण करताना हेच सांगितले, "राजे लोकांना पकडून आणून ठेवले आहेस व त्यांना बळी देणार आहेस हे कृत्य राजनीतीच्या विरुद्ध आहे. त्यांना सोडून दे, म्हणजे आमचे काही म्हणणे नाही.” ह्या म्हणण्याला जरासंध कबूल होईना म्हणून त्याला मारावे लागले. राजसूय ज्याने करावयाचा तो राजा नुसता वीर्यशालीच नव्हे, तर धर्मज्ञही असावा, अशी त्या वेळची कल्पना होती.  कृष्णाने धर्माला हेच सांगितले. “तू सम्राट म्हणून सगळ्यांना पसंत पडशील. जरासंध जिवंत असेपर्यंत मात्र ते पद तुला मिळणे शक्य नाही.” जो राजा राजसूय यज्ञ करील, त्याला जर दहा राजांना जिंकावे लागले, तर इतर दहा राजे बरोबरीचे मित्र म्हणून असावे लागत. राजसूय यज्ञ हे जसे दिग्विजयाचे प्रतीक होते, तसे मान्यतेचेही प्रतीक होते. जवळजवळ तुल्यबल राजे एकमेकांच्या शेजारी राज्य करीत असत. कोणी राजसूय यज्ञ केला किंवा अश्वमेध यज्ञ केला, म्हणून हा समतोलपणा नाहीसा होत नसे. भीतीचा दरारा बसवून जरासंधाने ही घडी पार विस्कटून टाकली होती. बरोबरीच्या राजांना तुरुंगात टाकणे किंवा आपल्या सैन्याच्या जोरावर त्यांच्यावर दरारा बसवून साम्राज्य मिळवणे हे कृष्णाच्या मते तरी त्या वेळच्या क्षत्रियनीतीला धरून नव्हते.
 महाभारत-कालानंतर आपल्याला बौद्धकालातील वाङ्मय सापडते. त्यात काशी-कोसलांच्या साम्राज्याचे वर्णन आहे. त्यावेळी राज्यस्पर्धेमध्ये राजे लोक एकमेकांचा निःपात करण्यासाठी झटत असत व साम्राज्ये स्थापीत असत असे दिसते. बुद्धानंतर चंद्रगुप्त मौर्याने अशा तऱ्हेचे साम्राज्य स्थापले. त्यानंतर अशोकानेही तोच प्रकार केला. मागाहून आलेले कुमारगुप्त व समुद्रगुप्त वगैरेही साम्राज्यस्थापकच होते. शेजारच्या राजांची भूमी बळकावून आपल्या राज्याचा विस्तार करणे हे साम्राज्यस्थापनेचे सर्वमान्य तत्त्व झाले होते. तरीही गुप्तकालात होऊन गेलेल्या कालिदासाने जुन्या मूल्यांचा उच्चार रघुवंशात केलाच. रघूच्या दिग्विजयाचे वर्णन करताना तो म्हणतो, “श्रियं कलिङ्गनाथस्य जहार न तु मेदिनीम्', अगदी बरोबर हीच कल्पना महाभारतकालीही रूढ होती. दिग्विजय म्हणजे काही विशिष्ट मर्यादेत खेळलेला एक डाव होता. स्पर्धा कीर्तीसाठी होती, भूमीसाठी नव्हती. करभार घ्यायचा आणि तो दान म्हणून देऊन टाकायचा, स्वत:जवळ साठवून ठेवायचा नाही, असाही दंडक होता.मोठा दिग्विजय करायचा. सर्व राजांकडून खूप धन, रत्ने वगैरे मिळवायची आणि एक मोठा यज्ञ करायचा, व इतरांकडून जे त्यात आपली स्वतःची भर घालून सर्व संपत्ती दान करायची.  ज्या राजांना जिंकले असेल, त्या सर्वांना बोलावून त्यांचा पाहुणचार करायचा, त्यांचा सन्मान करायचा व त्यांना घरोघर पोहोचवायचे, ह्या त्या वेळच्या रूढीचे वर्णन धर्माच्या राजसूय यज्ञात केलेले आहे. हीच कल्पना परत कालिदासाने रघुवंशात सांगितलेली आहे. सर्व संपत्ती वाटता-वाटता स्वतः दरिद्री होऊन जायचे- इतके की, कोणाला मोठे दान करायचे सामर्थ्यदेखील राहू नये अशी अवस्था यायची. हा क्षत्रियाचा मोठेपणा समजला जाई. रघूविषयी लिहिताना अगदी हेच चित्र कालिदासाने उभे केले आहे. ‘अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति'. रघुराजा यज्ञात दिलेल्या दानामुळे गरिबी भोगीत होता असे हे वर्णन आहे. निरनिराळ्या क्षत्रियकुलांचा वंशपरंपरागत आलेल्या आपल्या राज्यावरचा हक्क अबाधित असे. लढाईमध्ये त्यांची 'श्री' जाई; पराभव झाला की अपकिर्ती होई, व करभार द्यावा लागे. पराभवाचा अपमान व संपत्तीचा व्यय हे दोन्ही ‘श्री’ गेल्याचे लक्षण होते. भूमी मात्र कुणी कुणाची घेत नसे. समोरासमोर लढाई झाली की तीत एखादा राजा मारला जाई, पण पराभूत शत्रूला तुरुंगात टाकायचे किंवा मारायचे हा प्रघात नव्हता. ह्या जुन्या प्रघाताला जरासंधाने हरताळ फासला होता. जरासंधाच्या भयामुळे केवळ यादवच नव्हे, तर इतरही राजे राज्य सोडून गेल्याचे, किंवा दुसरीकडे त्यांनी राज्य स्थापन केल्याचे उल्लेख सभापर्वात येतात. जरासंध मगधाहून मथुरेपर्यंत आला होता. पण हस्तिनापूरच्या राजांना त्याचा उपद्रव झाल्याचे दिसत नाही. जरासंधाबद्दल धर्माला काहीच माहिती नाही. अशा तऱ्हेने कृष्णाला त्याला माहिती सांगावी लागते. ह्यावरून दुस-याही एका गोष्टीला पुष्टी मिळते,ती ही की कृष्णाचा व पांडवांचा संबंध द्रौपदीस्वयंवरापर्यंत आलेला नव्हता. तो आला असता, तर जरासंधाच्या भयाने आपण कसे पळून गेलो, ही कथा सांगण्याचे कारणच नव्हते.  कृष्णाच्या मनात क्षत्रियत्व व क्षत्रियांचे परस्पर संबंध यांबद्दल काही कल्पना होत्या. स्वतःच्या कुळाला दिलेल्या उपद्रवामुळे त्याचा जरासंधावर राग होता हे जितके खरे, तितकेच जरासंध वर वर्णन केलेल्या क्षत्रियनीतीला धरून वागत नव्हता, व त्याने शंभर राजे कैदेत टाकून त्यांना बळी देण्याचा घाट घातला होता, हेही कारण त्याच्या रागाला होते. महाभारतामध्ये निरनिराळ्या कुळांचे एकमेकांशी संबंध कसे गुंतागुंतीचे होते ते ह्या प्रकरणात दिसून येते. चंदीचा राजा शिशुपाल हा यादवांच्याच एका मुलीचा मुलगा. पांडवांशी कृष्णाचे जे नाते, तसेच शिशुपालाशीही होते. पण शिशुपाल इतर काही कारणांमुळे कृष्णाचा वैरी व जरासंधाचा हस्तक झालेला होता. कृष्णाने योजिलेल्या कार्यात शिशुपालाचा नाश करणे हे नव्हते. जरासंधाचा काटा काढून टाकायचा, हे मात्र त्याच्या मनात होते व तो त्या संधीची वाट पाहत होता. जरासंधाला मारून त्याने बंदीत टाकलेल्या राजांना मुक्त करणे व क्षत्रियांचे पूर्वापार-संबंध परत प्रस्थापित करणे हे तो एक महान कार्य समजत होता. क्षत्रिय-समाजाविषयीची ही त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाकांक्षा होती.
 ह्या सर्व भानगडीत कृष्णाचा काही वैयक्तिक लाभ झालेला दिसत नाही. हे सर्व राजकारण कुलासाठी आणि त्या वेळच्या एकंदर राजकीय संबंधांबद्दल होते. कृष्णाला केवळ स्वतःची अशी आकांक्षाच नव्हती का? शूर व पराक्रमी असूनही अर्जुनाप्रमाणेच धाकटा भाऊ असल्यामुळे तो राजा झाला नव्हता. एकदा का त्याने राज्य पत्करले असते. तर थोरल्या मुलाला गादीवर बसवायचे ही रूढी मोडली असती व मग यादवांयादवांत भांडणे लागली असती; म्हणून त्याने जाणून-बुजून कमीपणा पत्करला होता. पण जरी राजा होता आले नाही, तरी कृष्णाला एक मोठी महत्त्वाकांक्षा होती, हे महाभारतावरून स्पष्ट दिसते. ती महत्त्वाकांक्षा ‘वासुदेव' होण्याची !  ‘वासुदेव' होणे हे प्रकरण काय आहे, ह्याचा नीटसा उलगडा होत नाही. पुराणातून कृष्ण-वासुदेव हा विष्णूचा अवतार होता व अवतारकार्य करून तो गेला, अशी कथा येते. तीच कथा सर्वांना माहीत असते. कृष्ण वासुदेव आपल्या स्वतःच्या आयुष्यभर देव म्हणून वावरला. त्याने देव म्हणून चमत्कार केले व तो आपल्या काळी देव मानला गेला, हेच आपण धरून चालतो. मागाहूनचे संस्कृत लिखाण हेच सांगते. मराठीत तर पांडवप्रताप, भक्तिविजय हे ग्रंथ, रुक्मिणी-स्वयंवर, सुभद्राहरण ह्यांची रसभरित आख्याने, त्यांवर आधारलेली नाटके ही तर कृष्णाबद्दल हीच भावना दृढ रुजवतात. महाभारत वाचताना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. कृष्ण असामान्य मानव-पण मानवच असे महाभारतात चित्रण आले त्याचे काही नवल वाटत नाही; पण ‘वासुदेव' म्हणवून घेण्याचे त्याचे प्रयत्न, दुसऱ्या काही जणांचा तोच अट्टाहास, कृष्णाला आपले ‘वासुदेवत्व' टिकवण्यासाठी त्यांना मारावे लागणे, हे उल्लेख वाचून मन बुचकळ्यात पडते.
 महाभारतात ह्या प्रकरणाचा काही उलगडा होत नाही; जैन वाङ्मयात होतो. जैनांची ‘वासुदेव' कल्पना पुढीलप्रमाणे आहे : जैनांनी कालचक्राचे चोवीस भाग कल्पिले आहेत. त्यांतील बारा भाग ‘उत्सर्पिणी (वर जाणाऱ्या) अवस्थेचे व बारा भाग'अवसर्पिणी' (खाली येणाऱ्या) अवस्थेचे धरतात. खालून वर येणाऱ्या अवस्थेत सर्व जीवमात्र जास्त-जास्त चांगल्या मूल्यांकडे जात राहतात, तर अवसर्पिणीत त्यांची अधोगती होत राहते. 'कालचक्राच्या काही काही विभागात मिळून नऊ ‘वासुदेव', नऊ ‘बलदेव' व नऊ ‘प्रतिवासुदेव' असे निर्माण झाले. अवसर्पिणीतच राम व कृष्ण असे दोन ‘वासुदेव' झाले. सर्व नऊ वासुदेवांच्या आयांची व बापांची नावे दिलेली आहेत. रामाची आई केगमई व बाप दशरथ, कृष्णाची आई देवकी व बाप वसुदेव म्हणून कृष्ण (कण्ह) हा पैतृक अर्थाने ‘वासुदेव' होता.  'वासुदेव' अखिल त्रिखंडभरत चक्रवर्ती असत. रामाला बलदेव लक्ष्मण होता, प्रतिवासुदेव रावण होता. कृष्णाला बलदेव बलराम होता. प्रतिवासुदेव कंस होता. सात वासुदेव गौतमगोत्री, आठवा राम दाशरथी व नववा कृष्ण वासुदेव हे दोन्ही कच्छप गोत्री. सर्व वासुदेवांची स्वत:ची अशी सात रत्ने असत. ती म्हणजे चक्र, खङ्ग, धनू, मंणी, माला, गदा, शंख. कृष्णालाही चक्र, खङ्ग, कौमोदकी गदा, वैजयंती माला, स्यमंतक(?) मणी, शार्ङ्गधनू होतेच. 'अभावो नत्थि वासुदेवाणम्' (वासुदेवांना कशाची कमतरता नसते.) हिंदूच्या कल्पनेने वरील वाक्य घ्यावयाचे, म्हणजे वासुदेव हे पूर्ण सगुण-सर्वसंपन्न असे पुरुषोत्तम होते, असा अर्थ लावता येईल. आणखी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. ‘अवगुणं न गिण्हन्ति'. म्हणजे कितीही तुच्छ वा भयंकर गोष्ट असली, तरी तीत त्यांना काहीतरी चांगले सापडते. हा गुण ‘अभावो नत्थि' याला पूरक समजला पाहिजे. ‘नीएण जुज्झेण न जुज्झंति' (‘खाली उभे राहून लढत नाहीत.') हा त्यांच्या रथित्वाचा निदर्शक समजला पाहिजे.
 ह्या सर्व कल्पनेत काही सनातन कल्पना, काही बौद्ध संप्रदायाच्या कल्पना, काही ख्रिस्ती(?) कल्पना ओळखू येतात. सत्ययुगापासून कलीपर्यंत चतुष्पाद धर्माचा एक एक पाय तुटत होता, ही कल्पना अवसर्पिणी कालचक्रात येते. वासुदेव, प्रतिवासुदेव वगैरे एकेका कालखंडाचे प्रतिनिधी ही आपल्या मनूच्या कल्पनेप्रमाणे आहे. पूर्णपुरुष ही कल्पना-दशावतार (नऊ वासुदेव?) ही कल्पना आपल्याकडे आहेच. वासुदेव-प्रतिवासुदेव ही कल्पना ख़िस्त-प्रतिख्रिस्त (Christ-anti Christ) यांसारखी वाटते. 'अवगुण न गिण्हन्ति' ही कल्पना बौद्ध-वाङमयात वारंवार येते. ह्या कल्पना कोठून आल्या वगैरेत शिरले, तर कृष्ण-चरित्र बाजूलाच राहील. एवढे मात्र दिसते की, महाभारतात वासुदेवाचा व पुरुषोत्तमाचा उल्लेख अशा तऱ्हेने केला आहे की, ती एक कृष्णाची महत्त्वाकांक्षा होती असे समजते.  वासुदेवाची चिन्हे होती असे समजते. पण या कल्पनेचा उलगडा काही नीट होत नाही. भारताचे वैचारिक धन, कथा, कल्पना, मूल्ये, तत्त्वज्ञान, धर्म ही सर्वच इतक्या निरनिराळ्या तऱ्हेने, निरनिराळ्या उगमातून आलेली आहेत की, त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वशोधक दृष्टीने होणे जरूर आहे.
 महाभारतात जे काही अर्धवट उल्लेखिलेले व अतिशय कुतूहल जागृत करणारे विषय आहेत. त्यांमध्ये ‘वासुदेव' हा एक आहे. त्या काळात तीन लोक वासुदेव होण्याची मनीषा बाळगून होते असे दिसते. एक वसुदेवाचा मुलगा वासुदेव कृष्ण; दुसरा शिशुपाल. ह्याला जन्मतःच चार हात होते. ह्यांतील दोन कृष्णाच्या दृष्टीपातानेच गळून पडले व त्यानंतर त्याने वासुदेव होण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. पण त्याचे कृष्णाशी भयंकर वैर होते असे दिसते. पूर्वेकडे(?) पौंड्र देशाचा राजा स्वतःला ‘वासुदेव' म्हणवून घेई. कृष्ण स्वतः सांगतो की, 'हा पौंड्र माझी चिन्हें धारण करतो.' पौंड्रावर चाल करून कृष्णाने त्याला युद्धात मारले. त्याचे कारण तो स्वतःला ‘वासुदेव' म्हणवून घेई हे ! ‘वासुदेव' हे नाव प्राप्त करून घेणे म्हणजे काय होते, हे स्पष्ट कोठेही सांगितलेले नाही. पण वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड पाहिली, म्हणजे त्यात काहीतरी विशेष होते, ह्याबद्दल शंका राहत नाही. कोठच्याही राज्याचा राजा नाही; सम्राट तर नाहीच नाही; पण वासुदेव असलेला असा कृष्ण होता. भगवद्गीतेत कृष्ण स्वतः म्हणतो, ‘वृष्णीनां वासुदेवोऽहम्।'. वसुदेवाला पुष्कळ बायका होत्या व त्यांना बलराम, सारण वगैरे मुलगेही होते. पण फक्त कृष्णच आपल्याला वासुदेव म्हणवून घेई, हे कसे ? प्रत्येक मुलाला आपल्या आईवरून नाव पडे. जसे रौहिणेय, कौंतेय, माद्रेय वगैरे. पण जर निरनिराळ्या आयांचे मुलगे असले, तरी एका बापाचे असले म्हणजे सर्वाचे पैतृक नाव सारखे असावयाचे. उदाहरणार्थ, धर्म, भीम, अर्जुन हे कौंंतेय होते व नकुल, सहदेव माद्रेय होते, व पाचही जण पांडूचे म्हणून पांडव होते.  त्याप्रमाणे खरे पाहिले, तर वसुदेवाच्या सर्वच मुलांना वासुदेव ही संज्ञा असावयास पाहिजे होती. पण ती फक्त कृष्णालाच तेवढी दिसते. म्हणजे वासुदेव हे पैतृक नाव नसून काही विशेष अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीनेच फक्त घ्यावयाचे ते पद होते. ज्याप्रमाणे राजसूय यज्ञ केलेल्या माणसाला सम्राट पदवी प्राप्त होई, व एकाच वेळी राजसूय यज्ञ केलेले दोन राजे असू शकत नव्हते, तसेच काहीतरी वासुदेव ह्या पदवीत असावे. वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड काही राजे करीत. पण खरोखर ती पदवी एकच धारण करू शकत असे.
 कृष्णाच्या वर्णनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस येते. डोळे दिपतील अशा तऱ्हेचे दैवी तेज व असामान्य वैभव त्याच्याजवळ होते. त्याचा रथ, त्याचे घोडे, तो स्वतः कोठेही असला, तरी लोकांचे डोळे दिपत असत. तो रत्ने व संपत्ती ह्यांचा स्वामी होता. 'वासुदेव' ह्या शब्दातही तो अर्थ प्रतीत आहे. ‘वस' म्हणजे संपत्ती, समृद्धी असा अर्थ होतो. 'देव' हा शब्द तेजस्वीपणा व अतिमानुषता दाखवतो. कृष्णाने लोकांचे डोळे दिपवून टाकायचे प्रसंग महाभारतात ठिकठिकाणी आलेले आहेत. सर्व ऋद्धिसिद्धी ज्या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत, ती व्यक्ती म्हणजे वासुदेव, अशी कल्पना मनात येते. आपण अशी व्यक्ती आहोत, असा कृष्णाचा आग्रह होता; व तसे असल्याबद्दल आपल्याला सर्वांनी मान्यता द्यावी, असा त्याचा अट्टाहास होता असे वाटते.
 बौद्ध वाङ्मयामध्ये कृष्ण वासुदेव (कण्ह वासुदेव) हा देवागब्भा व अंधकवण्ही ह्यांचा मुलगा होता, असे म्हटले आहे. पण बापाचे नाव वसुदेव असे दिलेले नाही. ह्याहीवरून वासुदेव हे पैतृक नाव नसून तो काहीतरी अधिकार असावा असे वाटते. वर सांगितल्याप्रमाणे जैनांच्या संप्रदायामध्ये वासुदेव कल्पना काय आहे, हे कळते. जैन संप्रदाय हा बौद्ध धर्माच्याही आधीचा होता. भारतीय युद्धाच्या पूर्वीही जैन किंवा तत्सम पंथ असेल. त्यांच्या संप्रदायाप्रमाणे दैवी सामर्थ्य व कर्तबगारी असलेली ‘वासुदेव' पदवी मिळविणारी अशी व्यक्ती दर कालखंडात होऊन जाई असे दिसते.  वासुदेव-पदवीला योग्य कोण, कशामुळे वासुदेव-पदवी मिळविता येई, ह्या गोष्टी जैन वाङ्मयात काय, किंवा महाभारतात काय, कोठेही स्पष्ट केलेल्या नाहीत. ती पदवी मिळवण्याची श्रीकृष्णाने अतिशय खटपट केली व कृष्णाच्या आयुष्यात त्याची स्वतःबद्दल अशी जी आकांक्षा होती, ती ‘वासुदेव' होण्याची होती यात शंकाच नाही. म्हणजे ‘न में पार्थास्ति कर्तव्यम्' असे म्हणणाऱ्या कृष्णाला, स्वतःबद्दल, कुलाबद्दल व समाजाबद्दल काही आकांक्षा व ध्येय होते व ती पार पाडण्यासाठी त्याने धडपड केली, हे स्पष्ट होते.
 भीमाने जरासंधाचा वध केला. धर्माच्या राजसूय-यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा पहिला मान मिळाला. त्याच निमित्ताने शिशुपालाचाही वध झाला. ह्या सर्व प्रकारानंतर पांडवांचा पाहुणचार घेऊन, सर्वांचा निरोप घेऊन कृष्ण द्वारकेला परत गेला. जिवाच्या भयाने लपत-छपत रानोमाळ हिंडणारे पांडव इंद्रप्रस्थात दिग्विजयी सम्राट म्हणून मिरवले. पांडवांच्या आयुष्यातला हा विजयाचा क्षण कृष्णाच्याही आयुष्यातील परमोच्च बिंदू होता. सामाजिक, कौटुंंबिक व वैयक्तिक अशा सर्व महत्त्वाकांक्षा ह्या क्षणी कृष्णाच्याही बाबतीत पुऱ्या झाल्या होत्या. यादव द्वारकेमध्ये स्थिर झाले होते. इंद्रप्रस्थाला पांडव व हस्तिनापुराला कौरव ही दोन्ही घराणी यादवांच्या नात्यातील व स्नेहातील होती. शिशुपालाच्या गादीवर शिशुपालाचा मुलगा बसला होता. तो कृष्णाला अनुकूल होता. जरासंधाच्या मुलाला अभय देऊन जरासंधाच्या राज्यावर बसवले होते. एकमेकांशी तुल्यबळ असलेले राजे एकमेकांशेजारी नांदत होते. म्हणजे क्षत्रिय समाजाची घडी पूर्ववत झाली होती. एवढेच नव्हे, तर यादवांच्या दृष्टीने त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीतसे होऊन मित्रराज्ये त्यांच्या शेजारी स्थापन झालेली होती. हे सर्व होत असताना कृष्णाच्या शौर्याची व शहाणपणाची छाप सर्वांवर बसली होती. काही थोडे असंतुष्ट लोक वगळल्यास कृष्णाचे वैयक्तिक महत्त्व इतरांना मान्य होते.  सार्वजनिक दृष्टीने या मान्यतेला अग्रपूजेच्या वेळी शिक्कामोर्तब झाले. राजा नसूनही, वयाने सर्वांत वडील नसूनही, क्षत्रियांच्या सभेत कृष्णाला हा मान मिळाला होता. इतके करूनही अजून एक राजा स्वतःला वासुदेव म्हणवून घेणारा राहिला होता. पण त्याला मारणे कृष्णाला कठीण नव्हते. म्हणजे वासुदेवत्व सर्वस्वी प्राप्त झाले नसले, तरी हातात आल्यासारखे होते. कृष्णाचे सर्व हेतू साध्य होऊन तो कृतकृत्य झालेला होता. नंतरच्या कथाभागावरून आपल्याला समजते की, इंद्रप्रस्थाहून निघाल्यावर कृष्ण लगेच आपल्या काही उरलेल्या शत्रूंंचा समाचार घेण्यात गुंतला.
 सर्व आयुष्यभर जे मिळवायची धडपड केली, जे स्वप्न उराशी बाळगले, ते प्रत्यक्षात उतरले होते. पण ही सफलता क्षणजीवी ठरली. मोठ्या प्रयासाने बांधलेली ही इमारत अनपेक्षितपणे व धर्माच्या नादानपणामुळे एका क्षणात गडगडली. कृष्णाची साध्ये ही विशाल असली, तरी पांडवांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी निगडित चालली होती. पांडव सुप्रतिष्ठित असणे हे कृष्णाच्या साध्यांना आवश्यक होते. पांडव इंद्रप्रस्थात राहून त्यांची आणि धार्तराष्ट्रांची कुरबूर झाली असती, तरी कृष्णाच्या हेतूला तडा गेला नसता. पण धर्मराजाच्या कृत्यामळे सगळ्याच हेतूंचा एक प्रकारे नाश झाला. कृष्णाचे वासुदेवत्व राहिले. वैयक्तिक मोठेपणा राहिला, पण बाकी सर्व गेले.
 धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळेला सर्व क्षत्रिय घराण्यांचा म्हणून जो एक तोल साधलेला होता, तो इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांच्या हातून गेल्यामुळे कोलमडून पडला. ह्या प्रसंगी कृष्णाच्या मित्रप्रेमाची कसोटी लागली. पांडवांनी आपले राज्य नादानपणाने घालविले, ह्याचा अर्थ एवढाच झाला की, अर्धे तोडून दिलेले राज्य हस्तिनापूरच्या शाखेला परत मिळाले. पांडवांनी आपल्या हातांनी नाश करून घेतला.  झाले त्याला इलाज नाही, असे म्हणून कृष्णाला स्वस्थ बसता आले असते. कौरवही त्याचे मित्रच होते. द्यूताचे आमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नाही, असा धर्मराजाचा दावा होता. तो जरी खरा मानून चालले तरी बायकोसुद्धा सर्वस्व पणाला लावणे हे निश्चित योग्य नव्हते. चाललेल्या द्यूतात चुकून एकदासुद्धा फासे आपल्या बाजूला पडत नाही हे दिसूनही, हे द्यूत खरेपणाने खेळले जात नाही हे धर्माला न उमजावे, हेही आश्चर्यच. एक प्रकारच्या धुंदीत धर्मराज द्यूत खेळत होता, असे वाटते. अशा या नादान मित्रांना कृष्णाने सोडले असते, ‘नशीब तुमचे,' असे म्हणून तो गप्प बसला असता, तरी त्याचा राजकीय, सामाजिक कौटुंबिक डाव स्थिर झाला असता. 'आम्ही यादवांनी नाही का आमच्या जन्मभूमीवरून पळून जाऊन दुसरीकडे राज्य स्थापले? तुम्हीही लांब जाऊन तसेच करा; या कौरवांचा शेजारच नको; मी तुम्हांला मदत करतो,' असेही त्याला म्हणता आले असते. पांडव वनवासात गेल्यानंतर कृष्ण त्यांना भेटायला आला, तेव्हा झाल्या गोष्टींबद्दलची त्याची तीव्र निराशा व हळहळ व्यक्त झाली आहे.
"मी असतो, तर हे द्यूत मी कदापि खेळू दिले नसते," हे शब्द त्याने परत-परत उच्चारले, पण ह्या कठीण प्रसंगी त्याला मैत्रीचा विसर पडला नाही. तो पांडवांच्या बाजूने ठाम उभा राहिला. वनवास व अज्ञातवास चुकवता येणे शक्य नव्हते; पण पांडवांच्या मुलाबाळांची व्यवस्था त्याने पांचालांच्या मदतीने पार पाडली. पांडव वनवासातून आल्यावर लढाई न होता काहीतरी तडजोड करण्यासाठी त्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली, दुर्योधनाच्या सभेत शिष्टाईचा प्रयत्न फसल्यावर द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा त्याने प्रयत्न केला. शिष्टाईच्या वेळेला आपल्या मित्रांच्या वतीने अर्धे राज्य न मागता ‘काही थोडे तरी दे', असे म्हणण्याची लाचारी त्याने पत्करली. पण त्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले, “तुम्ही आपापसांत भांडा; मी आपला बाजूला राहतो', असे बलरामाप्रमाणे त्याला म्हणता आले असते.  पण तसे न करता परत तो मित्रांच्या बाजूने उभा राहिला. ह्या सर्व प्रकरणात कृष्णाच्या मैत्रीचा दृढपणा दिसून येतो. त्याच्या मित्रांनी काही इतरांच्या अन्यायाने, काही स्वतःच्या गुणांनी सर्वस्व गमावले होते. त्या अन्यायाचा प्रतिकार करायला कृष्ण सिद्ध होता. दूरवरचे परिणाम सर्व काही त्याला दिसले असतील, असे म्हणवत नाही. पण काही थोडे परिणाम तरी डोळ्यांपुढे दिसतच होते. वर म्हटल्याप्रमाणे त्याने मोठ्या प्रयत्नाने दूरदर्शीपणाने जमविलेली व्यवस्था ह्या त्याच्या उतावळ्या, शुर; पण नाकापलीकडे न दिसणाऱ्या मित्रांनी गमावली. त्यांच्याबद्दल कृष्णाने रागाचे शब्द काढले; पण गेलेले मिळवून देण्यासाठी त्याने मदतच केली.
 अर्जुनाला लढाईला उभे राहण्याचा उपदेश करताना कृष्णाची वाक्ये वरील संदर्भात वाचली म्हणजे त्याला एक निराळाच अर्थ प्राप्त होतो. कृष्णाच्या जीवनमूल्यांवर, जीवनविषयक दृष्टिकोणावर एक निराळाच प्रकाश पडतो, पांडवांना राज्य मिळाल्याबरोबर कृष्णाचे हेतू साध्य झाले होते. त्याचप्रमाणे पांडवांच्या राज्य गमावण्याबरोबर ते धुळीला मिळाले होते. तो विचार करून उघड्या डोळ्यांनी कर्म करीत होता. त्याचे स्वतःचे असे काही साध्य व्हायचे नव्हते. त्याच्या संपत्तीत, त्याच्या कीर्तीत नवी भर पडायची नव्हती. काही बाबतीत सर्वस्वहानी झाली होती, तरी कर्तव्य म्हणून तो लढाईला उभा राहिला. अर्जुनाला त्यातून काहीतरी मिळणार होते, पण कृष्णाला तरी काहीच मिळणार नव्हते. ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम', कृष्ण त्या लढाईत मरायचा तर नव्हताच, किंवा लढाई जिंकून राजाही व्हायचा नव्हता. त्याचा सर्वस्वी हेतुनिरपेक्ष, स्वार्थनिरपेक्ष लढा होता. तो मित्रकार्य करीत होता. त्याच्या दृष्टीने मित्रांची बाजू न्यायाची होती. दुर्बलही होती. प्रत्यक्ष पांडव व पांचाल शूर होते. स्वतःचे गमावलेले मिळवण्याच्या हिरिरीने ते लढत होते. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरी कौरवांचे सैन्य पांडवांच्यापेक्षा कितीतरी मोठे,दिढीपेक्षा अधिक होते. कृष्णाच्या कुशल धोरणाने पांडव वाचले.  एक फार वाईट गोष्ट ह्या युद्धामुळे झाली. कृष्णाच्या संभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे यादवांमधील आपापसांतील दुहीवर झाकण पडले होते. यादवांत निरनिराळे गट होते. पण कृष्णाने त्या गटांच्या स्पर्धेला व वैमनस्याला लगाम घातला होता. ह्या युद्धाच्या निमित्ताने ते गट उघडे झाले. कृष्ण व त्याच्याबरोबर सात्यकी वगैरे त्याचे मित्र पांडवांच्या बाजूला होते. कृतवर्मा व भोज दुर्योधनाच्या बाजूला होते आणि कोणाच्याच बाजूला लढणे नको म्हणून बलराम बाहेर निघून गेलेला होता. यादवांत उघड-उघड दोन तट पडले. बाहेरून दिसावयाला एकसंध असलेली यादवांची फळी या निमित्ताने भंगली. जुन्या कुरबुरीत नव्या हेव्या-दाव्यांची भर पडली आणि यादवांच्या अंताची बीजे महाभारत-युद्धात पेरली गेली. यादवांचा अंत कृष्णाला दिसला असे म्हणवत नाही, पण यादवांची दुफळी झाली, हे तर त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होते. याचे परिणाम काही चांगले होणार नाहीत, हे समजण्याची प्रज्ञा त्याच्याजवळ खासच होती. इतके असूनही तो लढाईला उभा राहिला, त्या वेळी गीतेमधील जो एकेक श्लोक अर्जुनाला उद्देशून म्हणत होता, तो त्याला स्वतःलाच लागू होता. तो लढाईला उभा राहिला, हा प्रसंग काही दृष्टींनी त्याच्या आयुष्यातील मोठ्या त्यागाचा क्षण ठरतो. आकांक्षा धुळीला मिळाल्या असतानाही तो मित्रांसाठी व न्यायासाठी उभा राहिला हा वेडपणा की मोठेपणा?
 महाभारतामध्ये निरनिराळ्या प्रसंगी कृष्णाने पांडवांना जो उपदेश केला, त्यात त्याची कपटनीती दिसून येते असे काहींचे म्हणणे आहे. कृष्ण हा अतिशय प्रज्ञासंपन्न आणि सदैव जागृत अशा व्यक्तींपैकी एक होता, त्या वेळच्या नीतीला धरून उघडया डोळ्यांनी तो वर्तन करीत होता. त्याला जे वर्तन अतिशय गर्छ वाटत होते, त्याचा बीमोड करण्यासाठी त्याने मोठे संकट पत्करले.  फक्त तिघांनी जाऊन भीमाच्या एकट्याच्या बळावर जरासंधाचा वध करावयाचा, ह्या गोष्टीत युक्ती तर होतीच, पण त्याहीपेक्षा मोठे धाडस होते. जरासंधाच्या सैन्याशी सामोरे उभे राहून युद्ध करणे शक्य नव्हते. त्या सैन्यापुढे पळताना यादवांना भुई थोडी झाली होती. जरासंध स्वतःही निष्णात आणि बलशाली योद्धा होता. पण त्याच्याशी एकट्याशी लढाई करणे शक्य होते. भीमाच्या शक्तीवर व मल्लयुद्धनिपुणतेवर कृष्णाचा विश्वास होता. तितकाच अर्जुनाच्या व स्वत:च्या शस्त्रविद्येवर होता; तरीही इतक्या लांब जाऊन समोरासमोर युद्ध करण्याची मागणी करणे हे मोठ्या धाडसाचे काम होते, यात शंकाच नाही. लढाई करताना 'जरासंध दमला आहे; आता त्याला उसंत मिळू देऊ नकोस,' असा त्याने भीमाला इशारा दिला, यातही काही खोटेपणा नव्हता. भीम निश्चितच जरासंधापेक्षा बलवान होता आणि त्याने सरळ लढाईत जरासंधाला मारले. लढाईला उभे राहण्याआधी ‘कैदेतील राजांना सोड.' म्हणून कृष्णाने जरासंधाजवळ मागणी केली होती. ‘ती झिडकारलीस तर जामच्यापैकी कोणाशीही युद्ध कर,' अशी दुसरी मागणी होती.झालेला व्यवहार सरळ होता.
 तसेच रुक्मिणीला पळवून नेले, हेही सर्वस्वी त्या वेळच्या राजनीतीला धरून होते. भीष्माने राजांच्या मुली स्वयंवर मंडपामधून पळवून आणल्या होत्या. रुक्मिणी काही शिशुपालाची वाग्दत्त वधू नव्हती. तिच्या भावाच्या मनात काहीही असले, तरी एकदा स्वयंवर मांडल्यावर मुलीला पळवून नेणे हे शक्य असल्यास तसे करणे हे क्षत्रियनीतीला धरून होते. शिशुपालाचा तिसरा आक्षेप होता. 'कृष्ण राजा नाही.' हा! तोही फोलच होता. अर्जुनाने द्रौपदीला जिंकले. तेव्हा तो काही राजा नव्हता, एवढेच नव्हे तर थोरला भाऊ जिवंत असल्यामुळे राजा होण्याची शक्यताही नव्हती. राजा नाही, म्हणून कृष्णाला हिणवणारा शिशुपाल याच तोंडाने 'भीष्माला अग्रपूजा द्या.' म्हणत होता.भीष्मही राजा नव्हता. शिशुपाल कृष्णाचा प्रतिस्पर्धी होता; जरासंधाच्या प्रमुख सेनापतींपैकी होता. प्रत्येक बाबतीत कृष्णाने आपल्यावर कडी केली म्हणून चिडलेला होता. त्याच्या आरोपामध्य काही खरे, काही खोटे असे होते. भीष्माबद्दल व कृष्णाबद्दल काही थोड्या लोकांना काय वाटत असे, हे त्याच्या तोंडून वदवले गेले आहे. कृष्णाच्या कृत्यांची छाननी केल्यास जी कृत्ये शिशुपालाने दोषास्पद ठरवली होती, ती तशी होती, असे म्हणता येत नाही. शिशुपालाचा वध हे मात्र काहीसे दोषास्पद वाटते. तो वधाला योग्यच होता. पण आवेशाने बोलत असताना भर सभेत कृष्णाने त्याच्यावर चक्र फेकून मारावे, हे कृत्य खटकल्याखेरीज राहत नाही. तसे करण्यावाचून गत्यंतर नव्हते, एवढे मात्र खरे ! सर्व राजसूय यज्ञ पार पडलेला होता. आलेल्या राजेलोकांचा सन्मान करून त्यांना परत पाठवणे एवढेच कृत्य उरले होते. पांडवानी भीष्माला पुढे करून कृष्णाला पहिले अर्घ्य देण्याचा घाट घातला. शिशुपाल उठून त्याने अर्घ्याला हरकत घेण्याचा अतिप्रसंग केला. बोलण्याने बोलणे वाढत चालले होते. राजे-लोकांच्यामध्ये चुळबूळ सुरू झाली होती. शिशुपाल युद्धाच्या गोष्टी बोलू लागला होता. अशा वेळी मंडपाबाहेर जाऊन युद्धाला सुरवात झाली असती तर मोठेच विघ्न झाले असते. एकटा शिशुपाल तडकाफडकी मारला गेल्यामुळे कोणाला काही करता येईना. हा प्रसंग झाल्यावर आश्चर्याने व भीतीने सर्व सभा स्तब्ध झाली. काही राजे चुळबुळत, हात चोळीत स्वस्थ बसले होते, असे महाभारतात वर्णन आहे. कृष्णाने शिशुपालाला असे मारले नसते, तर राजसूय यज्ञाचा शेवट मोठा वाईट झाला असता. शिशुपालाला मंडपातून रागारागाने बाहेर जाऊ देणे हे योग्य नव्हते.
 ह्या प्रसंगात ज्या एक दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात, त्या इतर वेळीही येतात.
१. मनुष्य जन्मला, म्हणजे त्याचे स्वतःचे वर्तन व सामाजिक संबंध त्याला एका कोंडीत पकडतात. त्याचा स्वतःचा ताबा नाही, अशा प्रसंगात तो सापडतो व त्याच्या हातून काही कार्ये होत राहतात. भीष्माच्याही बाबतीत आपण हेच पाहिले. धृतराष्ट्राच्या बाबतीत व महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हेच घडत गेले. ‘भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया' असे हे अनाकलनीय व अटळ चक्र आहे. एकदा त्याच्यात मनुष्य सापडला की, त्याच्या कृत्याला ठराविक दिशा लागत जाते. प्रत्येक कृत्याच्या बाबतीत करू की न करू हे स्वातंत्र्य राहत नाही. एका ठरलेल्या दिशेने आयुष्याचा मार्ग जाऊ लागेल, तसेतसे हे स्वातंत्र्य कमी कमी होत जाते.
२ आयुष्यामधील निवड खरे-खोटे, चांगले-वाईट अशा दोन टोकांमध्ये क्वचितच असते. थोडे वाईट, थोडे चांगले अशा मिश्र स्वरूपाच्या कृत्यांमधून माणसाला निवड करावी लागते. सर्व दृष्टींनी चांगले व सर्व दृष्टींनी वाईट, अशा तऱ्हेने निवड करायची संधी क्वचितच मिळते. त्यामुळे कोणचीही निवड केली, तरी थोडे वाईट येतेच. अगदी तोलून, मोजून-मापून पाहिले तर प्रत्येक व्यावहारिक कृत्यामध्ये काहीतरी दोषास्पद असतेच. त्यातूनही मोजून-मापून पाहणारा परीक्षक बहुतेककरून झाल्या-गेल्या गोष्टीबद्दल मते देत असतो. दोन किंवा तीन मार्गामधून कुठची निवड केली आणि त्याचे परिणाम काय झाले, हे त्याला दिसत असते. केलेल्या निवडीचे परिणाम काय झाले, हे ह्या मागाहून आलेल्या टीकाकाराला माहीत असतात. पण प्रत्यक्ष जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी दोन वाटांपैकी एक वाट टाकून दुसऱ्या वाटेने जाते, ती कितीही शहाणी व दूरदृष्टीची असली, तरी तिला संपूर्ण भविष्यज्ञान होत नाही. त्या व्यक्तीपुढे त्या प्रसंगाची, त्या क्षणाची आणीबाणी असते. त्यातच स्वतःचे क्रोध, मोह, एक प्रकारची कर्तव्यनिष्ठा, वगैरे विकार असतात. स्वतः कृष्णही ह्या दोन्ही नियमांना अपवाद नव्हता. तोही स्वतः केलेल्या कृत्यांच्या व स्वतः आखलेल्या ध्येयांच्या भोवऱ्यात सापडलेला होता. धीट प्रकृतीचा व विचारशील असूनही त्यालाही राग, मित्रप्रेम हे विकार होतेच. ज्या वेळी तो एखादे कृत्य करी, किंवा दुसऱ्याला एखादे कृत्य करण्याला प्रवृत्त करी, त्या वेळी त्याच्यापुढे जी निवड होती, ती उत्तम किंवा अधम यांच्यामधील नसून मिश्र अशा मध्यम प्रकारच्या कृत्यांमधील होती.
 सबंध महाभारतामध्ये त्याने केलेली मुख्य कृत्ये म्हणजे अर्जुनाच्या मदतीने खांडववनाचा दाह, जरासंध वध, शिशुपाल वध, पांडवांच्या वतीने कौरवांकडे शिष्टाई, द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा प्रयत्न, भीष्माला रथावरून खाली पाडण्यासाठी अर्जुनाचे मन वळवणे, द्रोणाचे धैर्य खचवण्यासाठी अश्वत्थाम्याला मारल्याचा बभ्रा करणे ही आहेत. खांडव दाहाबद्दल मागे लिहिलेच आहे. खांडवदाह-प्रकरणी नागांचा वंशच्छेद व एक मोठे अरण्य जाळणे ही दोन्ही कृत्ये आत्ता विचार केला तर गर्छ वाटतात. पण कृष्णाच्या वेळेला कोणीही हे कृत्य गर्छ मानले नाही. कृष्णाच्या प्रत्येक कृत्याबद्दल टीका करणाऱ्या शिशुपालालाही हे कृत्य गर्छ वाटले नाही. परवंशाबद्दल असहिष्णुता, शक्य तर त्यांचा उच्छेद ह्या गोष्टी पूर्वी सर्व जगातील लोक सरसकट करीत होते. कृष्णाने केले, ते त्याच्या काळाला व त्याच्या क्षत्रिय वर्णाला धरून होते. ते नसते केले, तर तो, आपल्याच युगातील असामान्य व्यक्ती न राहता देशकालातीत असामान्यत्व त्याला प्राप्त झाले असते. आपल्या जमातीतील नसलेल्या अशा सर्व मानव-जातीबद्दल करुणा हा गुणच महाभारतकालीन नव्हे! त्या वेळच्या इतर सुसंस्कृत देशांनासुद्धा तो गुण माहीत नव्हता. होमरचे इलियड वाचले, तरी हेच अनुभवास येते. सबंध मानव-जातीबद्दल कणव वाटली, ती पुढील युगांतील पुरुषांना बुद्धाला व ख्रिस्ताला !  भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, त्यातील पहिले जेमतेम तीन अध्याय मूळ भगवद्गीता असावी असे वाटते. भगवद्गीतेच्या पुढील-पुढील अध्यायांत सांगितलेल्या जगन्मित्रत्व व जगाबद्दल करुणा ह्या दोन गुणांचा वासही महाभारतात नाही.
 ‘दया भूतेषु' 'अहिंसा' हे शब्द महाभारतात येतात, पण अहिंसेचा अर्थ प्राण्यांना न मारणे असा नसून मित प्रमाणात व ठरलेल्या नियमांना धरून मारणे असा होता. गीतेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अध्यायात ‘कृपा' हा शब्द थोड्याशा हेटाळणीनेच वापरलेला आहे. ‘कृपयाविष्ट' अर्जुन किंवा अर्जुनाची ‘कृपयाविष्टता' हे एक क्षत्रियाला न शोभेसे वर्तन होते. ‘विषीदन्तम्' हेही विशेषण क्षत्रियाला न शोभेसे आहे, ह्या विषादामुळे व करुणेमुळे अर्जुनाच्या हातून शस्त्रे गळून पडली होती. डोळ्यांतून पाणी वाहत होते. तो रथात बसून राहिला होता आणि ह्या तिन्हीबद्दल कृष्ण जी विशेषणे लावतो ती विचार करण्यासारखी आहेत. त्याला तो ‘कश्मल' म्हणतो. ‘कश्मल' ह्या शब्दाचे काळेबेरे किंवा पाप ह्या शब्दांनी मराठीत भाषांतर करण्यासारखे आहे. ‘कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे सुपस्थितम्', ('अरे अर्जुना. ह्या आणीबाणीच्या वेळी हे रे काय तुझ्या मनात काळेबेरे आले आहे ?') असे हे वाक्य ! हे त्याचे कृत्य ‘अनार्यजुष्ट', ‘अस्वर्य', 'अकीर्तिकर' असे होते, असे कृष्ण म्हणतो. अर्जुनाच्या ह्या कृतीला तो पुढे ‘क्लैब्य' म्हणतो. त्याला वाटणाऱ्या करुणेला ‘क्षुद्र हृदयदौर्बल्य' म्हणतो. ही कृष्णाची मीमांसा महाभारतामध्ये सर्व क्षत्रियांच्या मनाला धरून होती. 'अवाच्यवादांश्च बहन वदिष्यन्ति तव' असे तो अर्जुनाला सांगतो. व "आज नाही, तर उद्या मरायचेच आहे. सरळ सामना देऊन मर. कर्म, जन्म व जातीप्रमाणे आलेले कर्तव्य करण्याचाच फक्त तुला अधिकार आहे. त्या कर्मातून मला काही चांगले मिळेल किंवा वाईट मिळेल, ही चिकित्सा करण्याचा तुला अधिकार नाही. फलाशा धरू नकोस. कर्तव्य म्हणून कर्म कर" असे सांगतो. अशी महाकठीण, स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल करुणेचा लवलेश नसलेली ही नीती.होती. त्याप्रमाणे क्षत्रिय पुरुषच नव्हे, तर गांधारी, कुंती व द्रौपदी या क्षत्रिय स्त्रियाही वागल्या.
 जरासंधवधाबद्दल वरती आलेच आहे. कृष्णाने तो उघड्या डोळ्यांनी कर्तव्य म्हणून करवला. ह्या कृत्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते. शिशुपालवध ही घटना अटळ होती. कृष्णाने रागाच्या भरात ती केली हे जितके खरे, तितकेच महाभारतकथेच्या दृष्टीने त्यावेळी ती व्हावयालाच पाहिजे होती अशी होती. पांडवांचा राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी कृष्णावर होती. त्यामुळे तो निरनिराळ्या कृत्यांत गोवला गेला होता. बोलाचाली वाढू देणे व यज्ञमंडपातच लढाई उभी करणे शक्य नव्हते. म्हणून शिशुपाल त्याच तऱ्हेने, तिथेच एकाकी, इतर राजे पुढे सरसावायच्या आत मारणे अत्यावश्यक होते. एक प्रकारे शिशुपाल गाफील होता, बोलावलेला पाहुणा होता. त्याला तशा तऱ्हेने मारणे योग्य नव्हते. पण त्यानेही पाहुणचाराच्या मर्यादा राखल्या नाहीत. आपल्या यजमानांचा, भीष्मासारख्या वृद्धाचा अपमान करून आपल्या शत्रूवर तोंडसुख घेण्याची संधी शिशुपालाने साधली. तेव्हा कृष्णाने असहाय किंवा निरपराध मनुष्याला मारले असेही होत नाही. एकदा आगळीक करण्यास सुरवात झाली, म्हणजे त्या आगळिकीस प्रत्युत्तर जितक्यास तितके, जेवढ्यास तेवढे देता येईल, असे होत नाही. शिशुपालाने शिव्या दिल्या, नाहक अपमान केला, याचा बदला परत शिव्या देऊन घेता आला असता. त्याऐवजी कृष्णाने त्याला मारून घेतला. आता हा बदला फार झाला असे वाटणे शक्य आहे. पण राजेलोकांत भांडण लागून मोठा रक्तपात झाला असता, तो एका शिशुपालाच्या वधामुळे टळला, असेही म्हणता येईल.
पांडव वनवासातून आल्यावर ज्या मसलती झाल्या, त्यांत कृष्णाचा वाटा मोठा होता व सर्वस्वी योग्य असाच होता. शिष्टाईच्या वेळीही त्याने भांडण मिटावे, म्हणून पराकाष्ठा केली.  ‘अर्धे राज्य नाही. पाच गावे नाहीत, एवढेच नव्हे, तर सुईच्या अग्राखाली मावेल एवढीदेखील जमीन मी देणार नाही,' या दुर्योधनाच्या उत्तरामुळे लढाईखेरीज उपाय उरला नाही. कौरवांच्या दरबारातून कृष्ण निसटला. त्याने जाता-जाता वाटेत कर्णाला आपल्या रथावर घेतले व पांडवांच्या बाजूने कर्णाला फितवण्याचा प्रयत्न केला. कृष्णाला पकडले की पांडवांना लढणे अशक्य होईल, असा ज्याप्रमाणे दुर्योधनाचा कयास, तसाच कर्ण बाजूला निघाला, तर दुर्योधनाला पांडवांचे मागणे झिडकारता येणार नाही, हा कृष्णाचा कयास. सबंध उद्योगपर्वभर शह, काटशह असे प्रकार चालले होते. दुर्योधनाचा प्रयत्न आडदांडपणाचा होता. कृष्ण त्यातून निसटला व दुर्योधनाचा प्रयत्न फसला. कृष्णाचा प्रयत्न अगदी याउलट, मोठ्या चतुराईचा; पण कर्णाच्या दुर्योधनभक्तीपुढे व दुखावल्या स्वाभिमानापुढे तोही फसला. कृष्णाने कर्णाला सांगितले, बाबा, तू कुंतीचा कुवारपणाचा मुलगा. शास्त्रार्थाने त्या कुवारणीचे ज्याच्याशी लग्न झाले, त्याचाच तू होतोस. म्हणजे बापाकडून तू पांडव व आईकडून वृष्णिकुलातला आहेस. माझ्याबरोबर ये, पांडवांना तू कुंतीचा मुलगा, युधिष्ठिराचा थोरला भाऊ, हे कळू दे. मी तुला राजा म्हणून अभिषेक करवतो. पांडवांतला सहावा म्हणून द्रौपदी तुझी होईल. (षष्ठे च त्वां तथा काले द्रौपद्युपगमिष्यति।) धर्म तुझा युवराज होईल, भीम तुझ्यावर चवरी धरील, अर्जुन तुझे सारथ्य करील. वृष्णी व पांचाल तुझे सेवक होतील. 'वसुषेण' म्हणून तुझ्या नावाची द्वाही फिरेल' कृष्णाने ह्या ठिकाणी कर्णाच्या पाळण्यात ठेवलेल्या 'वसुषेण' नावाचा उच्चार केला. सेन हा प्रत्यय क्षत्रियांच्या नावापुढे असे. त्या नावावरून त्याचे क्षत्रियत्व प्रतीत होते. कर्ण वैकर्तन (कानफाट्या) हे टोपणनाव उच्चारलेच नाही, हाही कृष्णाचा शहाणपणाच.
 ही लालूच तर फारच मोठी होती, पण कर्ण बधला नाही. राज्य, मोठेपणा व त्यामुळे द्रौपदी आणि बलाढ्य क्षत्रिय-घराण्यांशी संबंध व मैत्री एवढे सर्व सूतवंशातील कर्णाला मिळणार होते.