युगान्त/'परधर्मो भयावहः'

विकिस्रोत कडून




सात



‘परधर्मो भयावहः'




 महाभारतात ब्राह्मणांचे स्थान एकंदर कथेच्या दृष्टीने अगदी मध्यवर्ती नसले, तरी गोष्टीच्या परिपोषाला महत्त्वाचे असे आहे. हे स्थान द्रोण व अश्वत्थामा ह्या पितापुत्रांना आहे. काही ब्राह्मण व त्यांचे उल्लेख मात्र निरर्थक म्हणून सोडून देता येतील. परशुरामाचा लेख ह्यापैकीच आहे. महाभारतात आलेला परशुराम भीष्माशी कित्येक आठवडे युद्ध करून पराभूत होतो व कर्णाला 'तुला आपल्या विद्येचे आयत्या वेळी विस्मरण होईल,' असा शाप देतो. परशुराम ही व्यक्ती रामावताराच्याही आधीची. आपले क्षत्रियसंहाराचे भयानक कृत्य आटोपून तो तपश्चर्येला निघून गेला, अशी परशुरामाची कथा आहे. एकदा रामावतारात त्याला त्याच्या तपश्चर्येतून परत आणले ते रामाचा मोठेपणा दाखवण्यासाठी! रामायणातील कथावस्तूशी त्याचा काहीही संबंध नाही. भीष्म किती शूर व किती सत्यप्रतिज्ञ होता, हे दाखवण्यासाठी परशुराम महाभारतकथेत घुसडला आहे. परशुरामाला भीष्माने पूर्णतया माघार घेण्यास लावली व परत एकदा क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कसा, हे दाखवून दिले.

 त्याचप्रमाणे कर्ण शूर म्हणून गाजलेला. त्याचा अर्जुनाकडून पराभव झाला, ह्याला काहीतरी कारण चिकटवायला परशुराम त्या कथेत आणला आहे. ह्याही कथेत कर्ण परशुरामापेक्षा सरस वाटतो. गुरूने दिलेली विद्या व ती विद्या फुकट घालवणारा शाप या दोहोंचाही स्वीकार बिचारा कर्ण मुकाट्याने करतो. ह्याही कथेचा विचार करण्याचे कारण नाही. अर्जुनाने शेवटच्या लढाईखेरीज विराटाच्या गोग्रहणाच्या वेळी कर्णाचा पराभव करून त्याला पिटाळून लावले होते. शेवटच्या लढाईत त्याने कर्णाचा पराभव केला, ह्यात लोकविलक्षण असे काहीच नव्हते. फक्त अर्जुनाकडूनच नव्हे, तर इतरांकडूनही कर्णाचा पूर्ण पराभव त्या पूर्वी झालेला होता. घोषयात्रेच्या वेळी गंधर्वांनी दुर्योधनाला पकडून नेले, त्या वेळी कर्णही मार खाऊन जीव बचावून कसाबसा निसटून पळून गेला होता. तो पुरता भिऊन गेला होता, असेही वर्णन आहे. पण कर्ण हा अतिशय मोठा योद्धा होता व परशुरामाचा शाप नसता, तर त्याचा पराभव झाला नसता, हे दाखवण्यासाठी ही कथा रचलेली आहे.
 व्यासाच्या निरनिराळ्या शिष्यांनी थोड्या निरनिराळ्या तऱ्हांनी महाभारताची कथा सांगितली आहे, अशी आख्यायिका आहे. सध्या आपल्यापुढे जे महाभारत आहे, ते मुख्यत्वे वैशंपायनाने सांगितलेले आहे, अशीच कथा जैमिनीने सांगितली असे म्हणतात. कौरव-पांडवांचे भांडण झाले, या गोष्टी जैमिनीलाही सांगाव्या लागल्या; पण त्याने कथेतील बराचसा भाग कौरवांच्या बाजूने लिहून पांडवांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. जैमिनीचे जे अश्वमेध-प्रकरण सापडतं, त्यात ठिकठिकाणी अर्जुनाचा पराभव होऊन त्याला श्रीकृष्ण व इतर सोडवतात असे दाखवले आहे. कर्णाचा पराभव होऊन तो अर्जुनाच्या हातून मारला गेला, ही गोष्ट उघड होती. पण ह्या पराभवामुळे कर्ण, अर्जुनापेक्षा कमी ठरेल, म्हणून परशुरामशापाचं प्रकरण घडल्यासारखे वाटते. येथेही मुख्य गोष्टीला पोषक असे कथेत काही नाही.
 सध्या आपल्यापुढे जे महाभारत आहे, त्याची सुरवात मोठी विचित्र आहे. जनमेजयाच्या सर्पसत्रापासून त्याचा आरंभ आहे, व सर्पसत्र थांबल्यावर व्यासशिष्य वैशंपायन पूर्वजांच्या युद्धाची कथा जनमेजयाला सांगतो आहे, असे वर्णन आहे. परीक्षिताचा तक्षकाकडून अंत व बापाचा सूड घेण्यासाठी जनमेजयाचे सर्पसत्र ह्या दोन प्रकरणांत भृगकुलातील ब्राह्मणांच्या कथांचे एक लांबलचक जाळे विणले आहे. त्या सर्व कथा संपेपर्यंत मुख्य कुरुवंश-कथनाला व महाभारतकथेला सुरुवातच होत नाही. परिक्षिताने एका ब्राह्मणाची चेष्टा केली व त्याने 'तुला तक्षक मारील,' असा शाप दिला, वगैरे कथा पाल्हाळाने सांगितल्या आहेत. वास्तविक पाहता परीक्षिताचा आजा जो अर्जुन त्याने कारण नसताना खांडववनदाहाच्या वेळेला तक्षकनागकुलाचा भयंकर नाश केला होता, ते वैर लक्षात ठेवून तक्षकाने परीक्षिताला मारले व परीक्षिताचा मुलगा जनमेजय ह्याने सर्पसत्र केले, अशी ही सरळ-सरळ तीन पिढ्यांच्या वैराची कथा आहे. तीत घुसडलेल्या सर्व ब्राह्मणकथा मागाहून घातलेल्या असाव्यात. भृगकुलाच्या हाती कधीतरी महाभारतकथा गेली असावी व त्यांनी ठिकठिकाणी आपल्या कुळातील पुरुषांच्या गोष्टी घुसडून दिल्या असाव्यात. हे कै. सुखटणकरांनी आपल्या लेखांतून फार उत्तम तऱ्हेने दाखवले आहे. आतापर्यंत उल्लेखलेल्या ब्राह्मणांच्या सर्व गोष्टी भृगुकुलातील पुरुषांच्या गोष्टींपैकीच आहेत. महाभारतकथेशी त्यांचा काही संबंध नाही. त्या सर्व काढून टाकल्या, तर मूळ कथेच्या सौंदर्यात, सुटसुटीतपणात व ओघात भरच पडते. म्हणून ह्यांपैकी कोठच्याही गोष्टीचा विचार करण्याचे कारण नाही.
 ज्या व्यासांनी महाभारत लिहिले वा शिष्यांना सांगितले, आणि कौरव व पांडव हे ज्यांचे वंशज, त्या व्यासांचाही महाभारतकथेशी संबंध वरवरचाच आहे. अधून-मधून ते प्रकट होतात, पांडवांना पांचालाला जावयास सांगतात, दुर्योधनाला उपदेश करतात, गांधारीचा संताप आवरतात, अश्वत्थाम्याची निर्भर्त्सना करतात, यादवक्षयानंतर अर्जुनाचे सांत्वन करतात, पण एकदा सत्यवतीच्या सुनांना पुत्रोत्पत्तीस कारणीभूत झाल्यावर व्यासांना महाभारतात महत्त्वाचे स्थान नाही.
 महाभारतकथेशी ज्यांचा संबंध आहे, ज्यांमुळे कथाभागाचा काही परिपोष झाला आहे, असे ब्राह्मण दोन. ते म्हणजे द्रोण व अश्वत्थामा हे पितापुत्र. पांडव व धार्तराष्ट्र हे लहान असताना द्रोणाचा महाभारतकथेत प्रवेश होतो. उत्तम अस्त्रविद्या माहीत असलेला हा ब्राह्मण कौरवांच्या कुलपरंपरागत गुरुचा म्हणजे कृपाचार्यांचा मेहुणा होता. हा कुठेही आश्रय न मिळालेला व त्यामुळे दारिद्याने गांजलेला असा होता. एवढेच नव्हे, तर अपमानाने तो जळत होता. पांचालांच्या राजाचा सहाध्यायी म्हणून मित्र ह्या नात्याने तो त्याच्या दरबारात गेला असताना द्रुपदाने त्याची हेटाळणी केली होती. द्रुपदाने आपल्या पदरी द्रोणाला ठेवूनही घेतले असते; पण लहानपणाचा शाळासोबती म्हणून बरोबरीच्या मित्राचे नाते द्रोण सांगू लागला, ते द्रुपदाला सहन होईना, आणि अशा अपमानाने जळत द्रोण पांचालांच्या दरबारातून कृपाकडे आला होता. आपल्या सावत्र भावाच्या नातवंडांना अस्त्रविद्या शिकवण्यासाठी भीष्माने त्याची नेमणूक केली. विद्या शिकवून झाल्यावर गुरुदक्षिणा म्हणून अर्जुनाकडून त्याने द्रुपदाचा पराभव करवला, व द्रुपदाशी बरोबरी होण्यासाठी अर्ध्या राज्याच्या मोबदल्यात द्रोणाने द्रुपदाला जिवंत सोडले. एखाद्याचा पराभव करून त्याचा प्रदेश हिसकावून त्या प्रदेशाचा राजा होणे ही गोष्ट त्या वेळच्या नीतीला धरून नव्हती. त्यातूनही हे एका ब्राह्मणाने करणे योग्य नव्हते. द्रुपदाचा पराभव झाला व अर्जुनाने त्याला बांधून आणले. जुन्या गोष्टीची ओळख देऊन द्रोणाने त्याला सोडून दिले असते. म्हणजे अपमानाची भरपाई करून घेतल्यासारखे झाले असते, व शांती आणि मनाचा मोठेपणा सिद्ध झाला असता. तसे न करता उत्तरपांचाल म्हणजेच अहिच्छत्र द्रोणाने आपल्याकडे ठेवला. दक्षिणपांचालात द्रुपद राजा राहिला. उत्तरपांचाल बळकावूनही द्रोण कौरवांच्या राजसभेतच राहिला होता. असे दिसते. कारण राजसभेत निरनिराळ्या वेळी भीष्माच्या मागोमाग त्याचीही भाषणे घातलेली आहेत. भीष्म जे म्हणेल, त्याला द्रोणाने दुजोरा द्यावा, अशा प्रकारची ती भाषणे होती. पण भीष्म ज्या कळवळ्याने भांडण मिटवून कुरुकुलाचे रक्षण करू बघत होता, तो कळवळा द्रोणाच्या मनात दिसत नाही. उलट युद्धाच्या वेळी तर तो सर्वस्वी कौरवांच्या बाजूचा होता, असेच दिसते.
 द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा. तोही शास्त्रांत पारंगत न होता शस्त्रांत पारंगत झाला. गुरुजी काही शस्त्रे आपल्यापासून चोरून ठेवून ती अश्वत्थाम्याला शिकवतात, अशी अर्जुनाच्या मनात शंका होती. ह्या शंकेमुळे की काय, अर्जुन आणि अश्वत्थामा ह्यांच्यामध्ये उघड नाही, पण प्रच्छन्न स्पर्धा होती. द्रोणाने अर्जुनाला परोपरीने सांगितले की, 'माझी विद्या मी तुला सर्वात अधिक दिलेली आहे.' अर्जुनाचे समाधान झाले किंवा नाही हे कळत नाही. एवढे मात्र खरे की, दोघेही पितापुत्र पांडवांच्या विरुद्ध लढले.
 लढाई करू नये, असे वाटण्याचे अर्जुनाचे मुख्य कारण म्हणजे भीष्म व द्रोण ह्यांच्याशी युद्धाचा प्रसंग येऊ नये हे. भीष्माचे वय लढाईच्या वेळी नव्वद ते शंभर वर्षांचे असावे. आणि द्रोणाचे वय द्रुपदाच्या बरोबरीचे म्हणजे अर्जुनाच्या स्वतःच्या वडिलांच्या इतके,असे म्हणावयास हरकत नाही. अर्जुनाचे वय लढाईत पस्तीस होते. त्याच्यापेक्षा त्याचे गुरु निदान वीस वर्षांनी तरी, म्हणजे बरेच वृद्ध होते. अर्जुनाने भीष्माचा व द्रोणाचा पराभव विराट गोग्रहणाच्या वेळी केलेला होता. हे दोन्ही योद्धे अर्जुनाला भारी नव्हते, पण अवध्य होते. एक आजोबा म्हणून, व दुसरा गुरू म्हणून.
 भीष्मपर्वात दहा दिवस युद्ध चालून कोणी विशेष मारले गेले नाहीत. ती लढाई लुटुपुटीची होती. वेळ काढून कौरव-पांडवांना लढाईपासून परावृत्त करावयाचे, असा भीष्माचा डाव होता. ह्याच्या उलट द्रोणाच्या सेनापतित्वाचे तीन दिवस अतिशय मोठ्या लढाईत गेले.
 द्रोणाला सेनापतिपद कसे मिळाले, ही हकीकत विचार करावयास लावण्याजोगीच आहे. भीष्म पडला हे कळल्यावर दुर्योधनाच्या सैन्यात हाहाकार उडाला व 'आम्हांला कर्ण पाहिजे,आम्हांला कर्ण पाहिजे.' अशा आरोळ्या सर्वत्र ऐकू येऊ लागल्या. इतके दिवस बाजूला पडलेला कर्णही मोठ्या समारंभाने आपल्या रथातून वेगाने आला. हे सर्व वर्णन वाचीत असताना आता कर्णच सेनापती होणार, ह्याबद्दल मनाला शंका राहत नाही. पण एकाएकी सर्व रंग पालटतो. कर्णाने आपण होऊनच दुर्योधनाला सांगितले की, "सगळ्यांना पटेल आणि कोणाचेही मन मोडणार नाही, अशा माणसाला सेनापती करणे योग्य आहे. तेव्हा तू द्रोणाला सेनापती कर." आणि दुर्योधनाने द्रोणाला सेनापती केले. द्रोणाला सेनापती करण्यासाठी कर्णाने दिलेले कारण तर फारच विचार करण्यासारखे आहे. कर्ण सेनापती होण्याला काही लोकांचा विरोध असला पाहिजे, असे ह्यावरून दिसून येते. लढाईच्या सुरवातीपासूनच दुर्योधनाला ह्या पेचाने भंडावून सोडले होते. पांडवांकडे लहान कोण, मोठा कोण, क्षत्रिय कोण, अक्षत्रिय कोण, अशा भानगडी झालेल्या दिसत नाहीत. पहिल्या दिवसापासून तो शेवटच्या दिवसापर्यंत पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न होता. दुर्योधनाला पहिले दहा दिवस भीष्माच्या सेनापतित्वाखाली फुकट घालवावे लागले. नंतरही कर्णाला सेनापतिपद न देता द्रोणाला द्यावे लागले. द्रोण पडल्यावर कर्णाला सेनापती केला; पण त्याही वेळी शल्य दुखावला गेला असावा, असे दिसते, म्हणजे दळभार मोठा, पण आपल्या तोडीचे राजेलोक आणि स्वत:च्या कुळातील वृद्ध माणसे ह्यांच्या मानापमानापायी दुर्योधन जेरीस आला एवढे खरे. भीष्मामागून द्रोण सेनापती झाला, तो अशा तऱ्हेने.
 भीष्माच्या जिवंतपणी सारखी भीष्माचीच री ओढणारा द्रोण लढाईच्या वेळी मात्र अगदी निराळाच दिसतो. भीष्माचे नाते अन्नदात्याचे होते. दुर्योधनाचे नाते शिष्याचे आणि अन्नदात्याचे होते. ह्या नव्या अन्नदात्याला आपली स्वामिभक्ती दाखविणे हे द्रोणाचे कर्तव्य ठरले. शिवाय, ज्या तऱ्हेने तो सेनापती झाला, त्याहीमुळे आपली निवड योग्य झाली, असे त्याला दुर्योधनाला दाखवावयाचे होते. “तू फक्त अर्जुनाला लांब ठेव, म्हणजे मी पांडवांचा फडशा पाडतो," असे द्रोणाने सांगितले आणि त्याप्रमाणे द्रोण लढलाही. तीन दिवसांच्या सेनापतिपदाच्या वेळी फार मोठे रणकंदन झाले व फार महत्त्वाची माणसे मेली. मुख्य म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु व धृतराष्ट्राचा जावई जयद्रथ हे मेले. तिन्ही दिवशी कर्ण लढत होता. मुख्य लढाईपासून अर्जुनाला दुसरीकडे गुंतवण्याच्या युक्तीमुळे कदाचित असेल, पण अर्जुनाची व द्रोणाची समोरासमोरी झाली नाही. अर्जुन नसल्यामुळे अभिमन्यूला मारणे शक्य झाले. द्रोणाने अभिमन्यूला मारताना काहीही गय दाखवली असे दिसत नाही. मनात येते की, भीष्माला आपल्या स्वतःच्या पणतवंडाला असे मारवले नसते.
 द्रोण ज्या तऱ्हेने मारला गेला. तीही हकीकत लक्षात घेण्याजोगी आहे. भीमाने अश्वत्थामा नावाचा एक मोठा हत्ती मारला व सर्वत्र 'अश्वत्थामा मारला गेला,' अशी हूल उठवली. द्रोणाला हे खरे वाटून तो धर्माला विचारायला गेला. तेव्हा धर्म तोंडातल्या तोंडात "कोण जाणे, माणूस का हत्ती ते?” असे पुटपुटला. ते द्रोणाला सर्व ऐकू गेले नाही, व स्वतःचा मुलगा अश्वत्थामाच मेला असावा, अशी शंका त्याला आली. पुढील हकीकतीवरून अश्वत्थामा नक्की मेलाच, अशी त्याची खात्री झाली असावीसे वाटत नाही. अवत्थामा मेला. ह्या बातमीवर विश्वास न बसायचे कारण असे देता येईल की, अशा तऱ्हेची कोणी तरी मित्र किंवा आवडता माणूस मेल्याची हूल उठवून शत्रूला हतबल करण्याचा डावपेच त्या वेळी चांगला माहीत होता. जरासंधाचे सेनापती हंस आणि डिंभक हे एकमेकांचे अतिशय मित्र होते, त्यांपैकी एक मेला, अशी हूल उठवल्यामुळे दुसऱ्याने जीव दिला. दुसऱ्याने जीव दिलेला पाहून पहिल्याने खरोखरीच आपल्याला मारून घेतले, असा वृत्तांत सभापर्वात आलेला आहे आणि त्या वेळच्या सर्व लोकांना तो माहीत होता, असे पुढे शिशुपालाच्या बोलण्यावरून दिसते.
 ह्यानंतर द्रोण त्वेषाने लढतच राहिला, असे वर्णन आहे. म्हणजे धर्माचे भाषण ऐकल्यावर द्रोण शस्त्रे टाकून खाली बसला, अशी वस्तुस्थिती दिसत नाही. धृष्टद्युम्न त्वेषाने द्रोणावर चाल करून गेला, व द्रोणाच्या बाणाने भयंकर घायाळ झाला. ह्या वेळी भीम धृष्टद्युम्नाच्या मदतीला धावला. त्याने द्रोणाचा रथ बाजूने धरला. (द्रोणस्याश्लिष्य तं रथम् ७.१६५.२७) तो द्रोणाला असे शब्द बोलला :
 "जातिधर्म टाकून तुम्ही ब्राह्मणांनी शस्त्रे हातांत धरली नसती, तर क्षत्रियांना नीटपणे जगण्याची काही आशा होती. सर्वांशी अहिंसाव्रताने वागण्याचा ब्राह्मणांचा धर्म व आपण तर ब्राह्मणश्रेष्ठ. एका मुलाच्यासाठी तू म्लेंच्छ वगैरे फार जणांना मारलेस. ते आपल्या धर्माने वागत होते. तू मात्र स्वधर्म सोडून संहार केलास. लाज वाटत नाही का? अरे, ज्या मुलासाठी एवढे केलेस, तो तर मेलाच. धर्मराजाच्या सांगण्यावर तुझा विश्वास बसत नाही का?"
 हे शब्द ऐकून द्रोण उद्विग्न झाला व त्याचे धैर्य गळाले. ह्या अवकाशात घायाळ झालेल्या धृष्टद्युम्नाला थोडी उसंत मिळाली. थोडा दम खाऊन पुन्हा नव्या जोमाने त्याने द्रोणाच्या रथाला आपला रथ भिडवला व द्रोणाच्या रथात उडी घालून त्याने द्रोणाचे केस धरले. हा सर्व प्रकार पांडवसैन्यातून दिसत होता. अर्जुन तेथूनच मोठ्याने ओरडला, "अरे गुरुजींना मारू नकोस. त्यांचा रथ हाकून त्यांना इकडेच घेऊन ये." अर्जुन बोलत असतानाच धृष्टद्युम्नाने द्रोणाला त्या वेळी मारले नसते तरी द्रोण भीमाच्या व त्याच्या हातात पुरता सापडला होता, व त्याला बंदिवान करून पांडवांकडे आणता आले असते, ह्यात काहीच शंका नाही. द्रोण असहाय असताना रागाच्या भरात मारला गेला. मरता मरता तो मोठ्याने ओरडला "कर्णा, कृपा, दुर्योधना, शर्थीने लढा. मी गेलो." हे त्याचे  हे त्याचे मरताक्षणीचे वर्तनही तो मुलाच्या मरणाचे वृत्त ऐकून दुःखाने स्वस्थ विषण्ण होऊन बसला, व त्यामुळे मारला गेला, ह्या रूढ समजुतीशी विसंगत आहे.
 द्रुपदाचे अर्धे राज्य गेले, त्यावेळी आपल्या पराभवाचा सूड घ्यावा म्हणून द्रुपदाने यज्ञ केला. वाडवडिलांपासून आलेले राज्य तिऱ्हाईता-कडून हिरावून घेणाऱ्या आपल्या शत्रूचा सूड धृष्टद्युम्नाने त्या यज्ञातून मिळालेल्या मुलाने उगवला.
 गीतेमध्ये ब्राह्मणांची क्षमा, शांती वगैरे जी लक्षणे दिलेली आहेत, त्यांपैकी कोठचेच लक्षण द्रोणाच्या ठिकाणी दिसून येत नाही. तरीही महाभारतात द्रोणाची भूमिका निंद्य किंवा गर्छ अशी झालेली नाही. ह्याउलट परिस्थिती त्याच्या मुलाची आहे. अश्वत्थाम्याने ब्राह्मणत्वाचे सर्व गुण पार झुगारून दिले होते; एवढेच नव्हे, तर त्याचा सर्वस्वी अधःपात झाला होता. आणि वैर-प्रतिवैर ह्या न संपणाऱ्या मालिकेतील त्याच्या कृत्याला भयंकरपणात व निर्दयपणात कुठे तोड नाही. अश्वत्थामा पहिल्यांदा महाभारताच्या गोष्टीत येतो, तो दारिद्र्याने गांजलेल्या एका ब्राह्मणाचा मुलगा म्हणून. द्रोणाला भीष्माने आश्रय दिल्यावर बाकीच्या मुलांबरोबर तो बापाजवळ अस्त्रविद्या शिकला. अस्त्रविद्येत त्याची आणि अर्जुनाची बरोबरी होती अशा तऱ्हेचे उल्लेख महाभारतात जागोजागी येतात. द्रोणाने दिलेल्या विद्येवरच संतुष्ट न राहता आणखी विद्या शिकायला धर्माने अर्जूनाला पाठवले होते. तसे अश्वत्थाम्याच्या बाबतीत झालेले नाही. शिवाय, त्या वेळेच्या तरुण योद्धयांना अर्जुन म्हणजे योद्धेपणाचे प्रतीक वाटत असे. तसा लौकिक अश्वत्थाम्याला कधीही प्राप्त झाला नव्हता. कौरवांच्या सभेत तो थोडासा उद्दामपणेच वागत असे. बाप भीष्माच्या बाजूने बोलत असे, तर तो दुर्योधनाच्या बाजूने बोलत असे. अश्वत्थामा म्हणजे मोठा योद्धा आहे, असे दुर्योधनाला वाटले नाही. अश्वत्थाम्याचे नाव सेनापतिपदाच्यासाठी कधी कोणी सुचवलेही नव्हते आणि ते कुणाला सुचलेही नसते.
 शल्य व शकुनी यांच्या मरणानंतर पांडवांनी कौरवसैन्याचा फडशा उडवण्यास सुरवात केली. भीतीने सैरावैरा पळणारे सैन्य आवरणे शक्य नाही, हे पाहून दुर्योधनही रणांगणातून निसटला. जाता-जाता त्याने संजयाबरोबर बापाला निरोप पाठवला "मी डोहात लपलो आहे. सर्व मारले गेले. फक्त मीच उरलो आहे." तो आपल्या लपायच्या जागी पोहोचला व डोहाखाली एका दगडाच्या कपारीत श्रांत व खिन्न असा पडून राहिला. हस्तिनापूरच्या वाटेवर संजयाला कृप, कृतवर्मा व अश्वत्थामा भेटले. तेही रणांगणातून पळून चालले होते. त्यांनी दुर्योधनाबद्दल विचारले व संजयाने त्यांना सर्व सांगितले.
 पळून चाललेल्या कौरव-सैन्याकडे दुर्लक्ष करून पांडव व पांचाल दुर्योधनाचा शोध काढून त्याला मारण्याच्या निश्चयाने निघाले. त्यांनी सर्वत्र शोधले, पण तो काही सापडला नाही. ते निराशेने शिबिराकडे परतले. आज नाही सापडला, तर उद्या तरी त्याला शोधून काढलेच पाहिजे, असा त्यांचा विचार होता. दुर्योधनाला मारल्याखेरीज लढाई संपली असे म्हणता येणार नाही, अशी त्यांची पुरेपूर खात्री होती.
 पांडवांचे रथ दुर्योधनाला शोधण्यासाठी संचार करीत असताना अश्वत्थामा व त्याचे दोघे सोबती लपून बसले होते. पांडव शिबिराकडे परतले. सर्व शांत झाले आहे, असे पाहून हे त्रिकूट बाहेर आले, व दुर्योधन लपला होता त्या डोहाकडे गेले. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला हाक मारली व दुर्योधन खाली डोहात व तिघे काठावर असे त्यांचे संभाषण झाले. कृप आणि कृतवर्मा फक्त ऐकण्याचेच काम करीत होते. अश्वत्थामा मात्र ‘बाहेर ये व पांडवांशी लढ,' असे वारंवार आग्रहाने सांगत होता. लढण्याची इच्छा दुर्योधनाला मुळीच नव्हती. अश्वत्थामा मात्र सारखे सांगत होता, "दोन्हीकडचे खूप लोक मारले गेले आहेत. थोडेच शिल्लक आहेत. आता लढाई सोपी आहे. शिवाय, आम्ही तुला मदतीला आहोच". ह्या आग्रहाला कंटाळून-बोलणे थांबवण्यासाठीच असावे, दुर्योधन शेवटी म्हणाला, "आज मला विश्रांती घेऊ दे. काय करायचे, ते उद्या ठरवू."
 लढाईच्या शेवटच्या दिवसाचा हा वृत्तान्त फारच महत्त्वाचा आहे. दुर्योधनाच्या कृतीवरून असे दिसते की, तो जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करीत होता. तो लांब रानात पाण्याखाली लपून बसला होता, व त्याने संजयाकरवी बापाला झाल्या गोष्टीबद्दल निरोप पाठवला होता. सर्व सैन्य उद्ध्वस्त झाले होते. धृतराष्ट्राने पांडवांना विशेषतः धर्माला- बोलावणे पाठवून ‘राज्य घे, पण मुलाला उरल्या-सुरल्या एका मुलाला जीवदान दे," असे म्हटले असते तर धर्माला ह्या विनंतीला मान द्यावाच लागला असता. कदाचित राज्याचा एखादा लहानसा तुकडासुद्धा द्यावा लागला असता. पण जोपर्यंत बापलेक असे दोघे जिवंत राहिले असते, तोपर्यंत पांडवांना निर्वेध राज्य कधीच करता आले नसते. दुर्योधन वेळ काढू पाहत होता, तर धृतराष्ट्राकडून काही बोलावणे येण्याच्या आत दुर्योधनाला काढून मारावयाचे, असा पांडवांचा बेत होता.
 अथत्थाम्याचे राजाशी मोठमोठ्याने बोलणे चालू असता रानात शिकारीच्या निमित्ताने काही व्याध आले. हे लोक भीमाच्या मर्जीतले होते. भीमाला मांस आवडे व तो चांगले पैसे देई, म्हणून ही माणसे शिकार मारून ती पांडवांच्या शिबिरात पोहोचवीत असत. थोड्या वेळापूर्वीच दुर्योधन सापडत नाही, म्हणून रथातून परतताना त्यांनी पांडवांना व पांचालांना पाहिले होते. 'कोठे बरे दुर्योधन लपला असेल?' म्हणून त्यांचे परस्पर संभाषणही त्यांनी ऐकले होते. डोहाकाठी मोठमोठ्याने चाललेले बोलणे त्यांनी ऐकले व त्यांना कळून चुकले की, दुर्योधन येथे लपून बसला आहे. 'अरे, शिकारीच्या मांसाच्या कितीतरी पट द्रव्य भीम आपल्याला देईल;चल ही बातमी आपण त्याला सांगू या,' असे म्हणून ते तसेच धावत गेले व त्यांनी दुर्योधन कोठे लपला आहे, ते पांडवांना सांगितले.  सर्व पांडव परत रथात बसून मोठा जयघोष करीत डोहाकडे यावयास निघाले. पांडवांचा जयघोष ऐकून व त्यांच्या रथाचा आवाज ऐकून दुर्योधन परत आत जाऊन लपला व हे तिघे वीर प्राणभयाने लांब रानात पळून गेले.
 थोड्या वेळापूर्वी पांडवांना मारून टाकण्याच्या वल्गना करणारा अश्वत्थामा नुसता त्यांच्या रथाचा आवाज ऐकल्याबरोबर पळून गेला. बाप मेल्यापासून तो सूडाच्या गोष्टी बोलत होता. संतापाने जळत होता. द्रोणानंतर तीन दिवस लढाई चालली होती. पण त्याला धुष्टद्युम्नाला मारता आले नाही. समोरासमोर लढाईत तो धृष्टद्युम्नापुढे टिकू शकत नव्हता हे उघड होते. ज्या दुर्योधनाबद्दल तो एवढा कळवळा दाखवत होता त्याच्या नाशाला तोच कारण झाला. आपल्या उतावळ्या अविवेकी घाईमुळे संजयाकडून बातमी कळताच तो राजाकडे आला, व काळवेळ न पाहता दिवसा-उजेडी मोठमोठ्याने बोलून त्यानेच दुर्योधनाची लपण्याची जागा पांडवाना दाखवली. पांडव आले, तेव्हा शेवटपर्यंत आपल्या राजाशेजारी उभे राहून त्याच्या वतीने लढण्याऐवजी तो भ्याडाप्रमाणे पळून गेला.
 इच्छा नसतानाही दुर्योधनाला डोहाबाहेर यावे लागले. पांडवांनी दुरुत्तरे बोलून-बोलून, डिवचून सापाला बिळाबाहेर काढावे, तसे दुर्योधनाला बाहेर काढले व गदायुद्धात मांडीवर वार करून भीमाने त्याला खाली पाडले. शिरावर लाथही मारली, पण धर्ममध्ये पडला व त्याने दुर्योधनाची आणखी विटंबना वाचवली. दुर्योधनाला मारल्यावर धर्माने घाईघाईने कृष्णाला धृतराष्ट्राकडे पाठवून ‘धृतराष्ट्राचे व गांधारीचे सांत्वन कर व ‘राग धरू नका, आम्ही तुमचेच आहोत' असे कळव' असे सांगितले. कृष्ण हस्तिनापुरात जाऊन दोघांशी बोलतो आहे, तो आणखी जासूद आले. त्या बोलण्यावरून काहीतरी दगाफटका आहे, असा संशय कृष्णाला आला, म्हणून चाललेले बोलणे अर्धवट टाकून तो घाईघाईने परत आला व पाच पांडव, द्रौपदी व सात्यकी ह्यांना घेऊन पांडवांचे गजबजलेले शिबिर सोडून कौरवांच्या ओस पडलेल्या शिबिरात त्यांना घेऊन गेला. एवढे होईपर्यंत सूर्य मावळला.
 दगा होणार हे कृष्णाने ताडले, पण नक्की कशातऱ्हेने, हे काही त्याला कळले नव्हते. तो दगा अश्वत्थाम्याचा होता. राजाला सोडून पळून गेलेले हे वीर कानोसा घेत होते. पांडव व पांचाल निघून गेले व त्यांच्या शिबिरात जयघोष चालला आहे, हे पाहून तिघेही परत दुर्योधन होता तेथे आले. डोहाच्या काठी मृतप्राय अवस्थेत मातीत दुर्योधन पडला होता. एवढा मोठा ऐश्वर्यसंपन्न राजा असा धुळीत पडलेला! भीमाने त्याला कपटाने मारले, हे ऐकून तिघेही फार हळहळले. अश्वत्थाम्याने ‘मी ह्याच्या व माझ्या बापाच्या मरणाचा सूड उगवीन,' अशी प्रतिज्ञा केली व तशाही अवस्थेत राजाकडून सेनापतिपदाचा अभिषेक करून घेतला ! बाकीचे सेनापती "ज्या वैभवाने व मानाने सेनापती झाले होते ते पाहिले, म्हणजे ह्या शेवटच्या प्रसंगाचा तिटकाराच येतो. अश्वत्थाम्याची मागणी इतकी आग्रहाची होती की, ‘नको ही कटकट', म्हणून राजाने त्याला अभिषेक केला, असेच वाटते. कौरवांचा हा शेवटचा सेना नसलेला सेनापती अभिषेक झाल्यावर राजाला तेथेच सोडून निघून गेला.
 दुर्योधनाजवळून निघून गेल्यावर तो, कृप व कृतवर्मा हे लांब जाऊन पांडवांच्या सैन्याच्या हातात सापडू नये, म्हणून रानात विश्रांतीला बसले. कृप आणि कृतवर्मा झोपी गेले, पण अश्वथाम्याला झोप येईना. द्रोणाच्या मृत्यूबरोबर अश्वत्थाम्याने बापच गमावला नव्हता, तर राज्यही गमावले होते. दुर्योधनाबद्दलच्या दुःखाने तो पिडला होता एवढेच नव्हे, तर स्वत:च्या वैयक्तिक दुःखाने व हानीने जळत होता. अशा वेळी त्याला एक दृश्य दिसले. त्या काळोख्या रात्री कावळे झोपले असताना एका घुबडाने त्यांच्यावर झडप घालून त्यांचा नाश केला. हे पाहिल्यावर अश्वत्थाम्याला 'पांडवांवर ते रात्री बेसावध असताना हल्ला करावा' ही कल्पना सुचली. त्याने ती कल्पना कृप व कृतवर्मा यांना जागे करून सांगितली. 'तू असे वाईट कृत्य करू नकोस,' म्हणून कृपाने त्याला परोपरीने सांगितले. ह्या अनुषंगात अश्वत्थाम्याचे एक वाक्य लक्षात घेण्यासारखे आहे. तो आपल्या मामाला सांगतो, “तुम्ही मला ब्राह्मणधर्माप्रमाणे वागायला सांगता, पण मी तो कधीच शिकलेलो नाही. लहानपणापासून माझा सगळा जन्म अस्त्रविद्या शिकण्यातच गेला. श्रेष्ठ ब्राह्मणाच्या कुळात जन्मून मी मंदभाग्य क्षात्रधर्मात वाढलो. आता मला तो अनुसरू द्या' (१०.३.२१-२२) कृपाचे न ऐकता त्याने घोडा जोडला व एकटाच रथात बसून तो पांडवाच्या शिबिराकडे भरधाव गेला, व हा भाचा करतो आहे तरी काय, अशा भीतीने कृप व कृपामागून कृतवर्मा त्याच्या पाठीमागे धावले. अश्वत्थामा शिबिरात शिरलेला त्यांनी पाहिला व ते शिबिराच्या बाहर उभे राहिले. अश्वत्थाम्याने आत जाऊन पहिल्याने निजलेल्या धृष्टद्युम्नाला मारले मग पाचही द्रौपदीपुत्रांना मारले. रात्रीच्या वेळेला किती लोक आले आहेत व कोण हल्ला करीत आहे, हे न उमजल्यामुळे लोक सैरावैरा धावत असताना कृप व कृतवर्मा यांनी शिबिराला आग लावून दिली. त्यामुळे गोंधळात भरच पडली.
 जेवढे मारता येतील तेवढे लोक मारून अश्वत्थामा बाहेर आला व झालेले वर्तमान मृतप्राय दुर्योधनाला सांगून त्याने त्याच्याकडून शाबासकी मिळवली. पण झालेल्या कृत्याचा सूड उगवण्यासाठी पांडव व कृष्ण आपल्या मागोमाग येतील, हे जाणून तो तेथून पळाला व गंगेच्या काठी व्यासापुढे जाऊन हजर झाला. पांडव त्याच्या मागोमाग आले. त्याने एक अमोघ अस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी टाकले व अर्जुनाने प्रति-अस्त्र टाकले. दोन्ही अस्त्रे भिडली. आता जगाचा संहार होणार, असे पाहून व्यासाने मध्ये पडून अर्जुनाला ‘आपले अस्त्र मागे घे,' अशी विनंती केली. अर्जुनाने अस्त्र मागे घेतले. पण अश्वत्थाम्याला आपले अस्त्र मागे घेता आले नाही. त्या अस्त्राने पांडवांचा नाश झाला नाही, पण उत्तरेच्या पोटातील गर्भावर ते अस्त्र पडले, असा वृत्तांत आहे. स्वतः पांडवांनी अश्वत्थाम्याला जिवंत सोडले. 'मी उत्तरेच्या मुलाला जिवंत करीन,' असे म्हणून कृष्णाने मागाहून अश्वत्थाम्याला जो शाप दिला, तो भयंकर होता. "कित्येक हजार वर्षे तू जगशील, पृथ्वीवर जंगलांतून आणि वाळवंटांतून तू वणवण भटकशील. पण कोणी जिवंत मनुष्य तुला थारा देणार नाही," हा तो शाप होता. बाकीचे सेनापती वीरमरणाने मेले. अश्वत्थामा हा मरणापेक्षाही भयंकर जिणे जगला.
 आपल्या तत्त्वज्ञानात स्मृती व मोह ह्यांना एक विशेष अर्थ व विशेष महत्त्व आहे. मनुष्याचा नाश कोणत्या टप्प्यांनी होतो, ह्याची एक कारणपरंपरा गीतेत दिली आहे. ती सर्वांना परिचित आहेच.

क्रोधाद् भवति संमोहः
संमोहात् स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो
बुद्धिनाशात् प्रणश्यति।।

 उपनिषदांतही स्मृतीवर भर दिलेला आहे. (क्रतो स्मर, कृतं स्मर। इशावास्यः१७). बौद्ध वाङ्मयातही स्मृतीवर असाच भर दिलेला आहे, लहानपणापासून मरेपर्यंतच्या नित्य बदलत्या आयुष्यातील एकत्वाचा धागा स्मृती हा आहे. 'मी कोण', ह्याची नित्य जाणीव किंवा ‘मी तोच, मी तोच,' हे ज्ञान देणारी शक्ती स्मृती आहे. मी कोण? माझी कर्तव्ये कोणती? मी कुठे चाललो आहे? ही जाणीव राहते, ती स्मृतीने ! ‘मी कोण?' ह्याचे उत्तर महाभारताच्या दृष्टीने ‘आयुष्यात माझे स्थान काय?' ह्या प्रश्नाशी निगडीत आहे; व कर्तव्ये काय, ती त्या स्थानावर अवलंबून आहेत. मनुष्य जन्माला येतो, तो पूर्वजन्मीच्या खुणा घेऊन. पण त्याला त्या खुणा काय आहेत, त्याची स्मृती नसते. असामान्य माणसे उदाहरणार्थ कृष्ण- ती स्मृती घेऊन येतात. (बहूनि मे व्यतीतानि जन्मानि।भगवदगीता) ती जातिस्मर असतात. पण इतरांनी निदान या एका जन्मात तरी स्मृती अखंड ठेवण्यास जपले पाहिजे. मृत्यूच्या क्षणापर्यंत पूर्ण शुद्धीत असण्याची जी इच्छा पूर्वी दिसे, तीही ह्याच निष्ठेवर आधारलेली होती. ‘उत्तरायणात, शुक्लपक्षात, दिवसाउजेडी, पूर्ण शुद्धीवर असताना मृत्यू येणे चांगले,' असे गीतेत जे आढळते, ते ह्याचसाठी. स्मृती नष्ट होता कामा नये, हा तो अट्टाहास होता. भीष्माचा स्मृतिभ्रंश कधीही झाला नाही. अर्जुनाला संमोह झाला होता. पण त्याचे स्वतःचे स्मरण त्याला कृष्णाने करून दिले, व अर्जुनही स्वकर्तव्याच्या निष्ठुर स्मरणाने पूर्ण जागा होऊन म्हणतो :
 ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा'
 तशा तऱ्हेची स्वधर्माची प्रखर जाणीव द्रोणाला नव्हती, व अश्वत्थाम्याला तर पूर्णपणे आत्मविस्मृती झाली होती, असे म्हणावे लागेल. स्वधर्म गेला. परधर्मही साध्य झाला नाही, अशी त्याची स्थिती होती. ब्राह्मण म्हणून तो जन्माला आला होता व बापाने मिळवलेल्या राज्यामुळे तोही राजा... अर्थात अंकित राजा झाला असता. तो शस्त्रास्त्रे शिकला. भयंकर शस्त्रे त्याने वापरली. पण ती दुर्योधनाला जय मिळवून देण्यासाठी नव्हे, तर सर्वनाश झाल्यावर केवळ स्वतःचा सूड व स्वतःचा बचाव करण्यासाठी. ब्राह्मण्य त्यान गमावलेच होते व क्षत्रियत्व त्याला कधीही साध्य झाले नाही. मरणापेक्षाही भयंकर असे चिरजीवन त्याला जगावे लागले. आत्मविस्मृतीचे इतके अविस्मरणीय उदाहरण दुसरे नाहीच.

 डिसेंबर, १९६५