युगान्त/युगान्त

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

 ही सर्व वचने पाहिली म्हणजे भावा-भावांतील युद्ध थांबवण्याचा कृष्णाने किती निकराने प्रयत्न केला हे दिसते. कर्ण कोणत्याही मोठेपणाला बळी पडणार नाही हे माहीत होते, म्हणून कृष्णाने अशी भरमसाट प्रलोभने दाखवली, हे म्हणणे योग्य वाटत नाही. पांडव-कृष्णाचे एवढे ऋणी होते की, मी सांगेन ते ते ऐकतील, अशी कृष्णाची खात्री होती, म्हणून त्याने ही विलक्षण प्रलोभने कर्णाला दाखवली. ही दाखवीत असता राज्य मिळेल, ह्या आशेवर बसलेल्या धर्माचा त्याने गळा कापला, किंवा बिचाऱ्या द्रौपदीचा सौदा केला, असे दोन्ही आक्षेप त्याच्यावर येतील पण त्याने शिष्टाई दांभिकपणे केली, हा आरोप खासच येणार नाही. परत एकदा कृष्णाची मूल्ये ही त्या काळाची मूल्ये होती, हे निदर्शनाला येते. धर्म मोठा भाऊ म्हणून राज्याचा वारस होता. एखादा मनुष्य धर्मापेक्षा वडील, त्याच्या आईचा मुलगा म्हणून राज्याचा वाटेकरी असा पुढे आला असता व इतर भावांनी त्याला मान्यता दिली असती, तर त्याला राज्य मिळण्याचा चांगलाच संभव होता. राज्याचा वाटा कुंतीच्या मुलांना मिळावा व युद्ध टाळावे, अशा दोन गोष्टी कृष्ण साधू पाहत होता. आपण मित्राचा विश्वासघात करतो आहे असे त्याला वाटले नाही. द्रौपदीचे अर्जुनावर प्रेम असूनही तिला सर्व पाच जणांची बायको व्हायला लागले होते. त्यात एकाची भर पडली म्हणून काही वावगे झाले, असे त्याला वाटले नाही. बायकांना मन असते, ही गोष्ट त्या वेळचे कोणतेच पुरुष- भीष्म, वसुदेव, पांडव, कृष्ण-कोणीच मानीत नसत. जे इतर क्षत्रिय करीत असत, तेच ह्या बाबतीत कृष्णानेही केले. द्रौपदीला चीड आली असती किंवा नसती, हा विचार त्याच्या मते गौण होता.
 भीष्माचा पराभव व द्रोणाचा वध ह्या दोन्ही वेळी त्याचे कृत्य असेच सर्वस्वी समर्थनीय होते. आजोबांना मारू नये, गुरुंना मारू नये हे जितके खरे, तितकेच आजोबाने किंवा गुरूने नातवाविरुद्ध व शिष्याविरुद्ध लढाईला उभे राहू नये, हेही खरे !  एक आगळीक झाली की, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी आगळीक करणे प्राप्तच होते. एकदा लढाईला उभे राहिले, म्हणजे ती शेवटपर्यंत नेणे हे कर्तव्यच होते. भीष्माला मार, किंवा द्रोणाला मार, असे त्याने सांगितले नव्हतेच. भीष्माला घायाळ करून लढाईतून बाजूला सारणे एवढाच त्याचा उद्देश होता. त्याचप्रमाणे भीमाने व धृष्टद्युम्नाने द्रोणाचा रथ पकडल्यावर तो तसाच हाकून गुरुजींना पकडून आणले असते, तरी कृष्णाला पुरले असते. द्रोणाला मारून धृष्टद्युम्नाने वडिलार्जित वैराचा सूड उगवला, हा काही कृष्णाचा अपराध नाही. अश्वत्थामा मेला, ही खोटी हूल उठवायची हाही प्रकार अपरिचित नव्हता. अगदी ह्याच उपायाने हंस व डिम्भक हे जरासंधाचे दोन सेनानी मारले गेले होते. कृष्णाने शिष्टाईच्या वेळेला युद्ध टळावे, म्हणून जशी पराकाष्ठा केली, तसाच युद्धाला एकदा उभे राहिल्यावर ते जिंकावे, म्हणून जिवाचा आटापिटा केला. हीच गोष्ट कर्णाच्याही बाबतीत लागू पडते. जे लढाईला उभे राहिले होते, त्या सर्वांनी आगळीक केलेलीच होती, त्यांतील कोणीही निर्व्याज किंवा निरपराधी नव्हता. त्यांना कृष्णाने मारवले, ते काही गाफील अवस्थेत नाही. एवढे म्हणता येईल की, एकदा युद्धात उभे राहिल्यावर कृष्णाने कोणत्याही तऱ्हेची दयामाया दाखवली नाही. आपल्याला कोणी दयामाया दाखवील, अशी त्याची आशा नव्हती. सर्व लोक मारले गेले, केवळ दुर्योधन उरलेला होता. प्राणभयाने तो लपून राहिलेला होता. तो प्रत्यक्ष दयेची याचना करणारा नव्हता. पण बापाकडून दडपण आणून प्राण वाचवावा, असा त्याचा प्रयत्न असावा, असे वाटते. अगदी निष्ठुरपणे कृष्णाने तोही प्रयत्न हाणून पाडला. दुर्योधन जिवंत राहता, तर त्याने पांडवांना सुखाने राज्य करू दिले नसते, अशी कृष्णाची मनोमन खात्री होती.  दुर्योधन मेल्यानंतर पांडवांना धृतराष्ट्र व गांधारी यांच्यापुढे जाण्याचा धीर झाला नाही. परत कृष्णालाच दुर्योधन मेल्याचा निरोप घेऊन त्यांच्याकडे जावे लागले. गांधारी व धृतराष्ट्र यांच्याशी बोलत असतानाच दूत येऊन दुर्योधनाच्या व अश्वत्थाम्याच्या शेवटच्या संभाषणाची बातमी सांगत असताना काहीतरी दगाफटका आहे, हे हेरून, आपले भाषण अर्धवट टाकून, घाईघाईने निरोप घेऊन कृष्ण पांडवांच्या शिबिराकडे परत आला. पांडव आणि द्रौपदी यांना घेऊन तो कौरवांच्या ओसाड शिबिरात येऊन राहिला. कृष्णार्जुन जातील, तिथे सात्यकी असायचाच, या न्यायाने सात्यकीही बरोबर होता. रात्रीच्या छाप्यात व निर्घृण कत्तलीत द्रौपदीची मुले व भावंडे मारली गेली पण पांडव वाचले.
 ह्याही घटनेत कृष्णाला दोष देण्यासारखे काहीही नाही. जासुदाच्या बोलण्यावरून काहीतरी घातपात होणार, असे कृष्णाला वाटले. पण तो घातपात नक्की काय होणार, हे काही त्याला कळले नव्हते. मुख्य युद्ध दुर्योधन-पांडवांचे होते. सूडाचे उद्देश्य पांडवच असणार, असे त्याला वाटले असले पाहिजे. लढाई जिंकल्याच्या उन्मादात लढाईच्या वेळची शिस्त व जागरूकपणा पार नाहीसा झाला होता. जे ते नाच-रंगात व दारू पिण्यात दंग होते. प्रत्यक्ष सेनापती धृष्टद्युम्नाची व इतर मोठमोठ्या लोकांची परिस्थिती ही होती. सैन्याची काय होती, हे सांगायलाच नको. कृष्ण हस्तिनापुराहून परत आला, तो रात्र पडली होती. अशा वेळी ह्या अस्ताव्यस्त शिबिराला परत सुस्थित करणे हे दुष्कर काम होते. त्यातूनही ज्यांच्यासाठी सबंध लढाई व वैर उत्पन्न झाले होते, त्या पांडवांनाच बाजूला काढले म्हणजे झाले, असे कृष्णाला वाटले असले पाहिजे. कृष्णाला देवत्वाच्या कोटीला पोहोचवून त्याला सर्व किंवा त्रिकालज्ञ करायचे आणि मग त्याने न केलेल्या गोष्टींचेही कर्तृत्व त्याच्याकडे चिकटवायचे, किंवा त्याच्या हातून काही गोष्टी घडल्या नाहीत, म्हणून त्याला दोष द्यायचा, हे दोन्ही चुकीचे आहे.  अर्जुनाने सुभद्रेशी लग्न करावे, म्हणून त्याला वनवास घडवायचा; त्रिदंडी संन्यास घ्यायला लावायचा, आणि यती म्हणून त्याला अंतःपुरात आणून बसवायचा; बलरामदादाला फसवायचे, वगैरे ज्याप्रमाणे कृष्णाने केले नाही, त्याचप्रमाणे पुढे काय होणार हे कळून सर्वांना वाचवण्याची शक्यता असताही पृथ्वीला भार झाला आहे, म्हणून सर्व योद्ध्यांना अश्वत्थाम्याच्या हातून मारवले, हेही कृष्णाने केले नाही.
 अभिमन्यूचा मुलगा परीक्षित म्हणजे सुभद्रेचा, कृष्णाच्या बहिणीचा नातू पुढे हस्तिनापूरच्या राज्यावर बसला. ह्यातही कृष्णाचे काही कर्तृत्व वा कारस्थान नव्हते. अज्ञातवासाच्या शेवटापर्यंत पांडवांच्या कुठल्याच मुलाचे लग्न झालेले नव्हते. निदान महाभारतात तसा उल्लेख नाही. सत्यभामेस घेऊन कृष्ण वनवास सरता-सरता पांडवांना भेटण्यास आला होता. मुलांची खुशाली व अस्त्रविद्येतील त्यांची प्रगती ह्याबद्दल त्याने द्रौपदीस सांगितले. मुलांची लग्ने झाली असती, तर तसा उल्लेख ह्या वेळी यावयास पाहिजे होता. अर्जुन बृहन्नडारूपाने मुलीला नृत्य शिकवीत होता, हे कळल्यानंतर, 'तूच उत्तरेशी लग्न कर, म्हणजे योग्य होईल.' असे विराटाने सांगितले. चार दिवस अंबा हस्तिनापुरात राहिली, तर शाल्व तिच्याशी लग्न करीना, तर वर्षभर अर्जुनाबरोबर नृत्य शिकणाऱ्या उत्तरेला दुसरा नवरा मिळणे जडच गेले असते. 'मी तिच्याकडे पितृभावनेने पाहतो. माझ्या मुलाशी तिचे लग्न होऊ दे', हे अर्जुनाचे उत्तर मिळाल्यावर द्वारकेहून अभिमन्यूला बोलावले; अर्जुनाला द्रौपदीच्या पोटी झालेला मुलगा होता, त्याला का नाही बोलावले ? उत्तर सरळ आहे. द्रौपदीला पाच मुले होती. त्यांपैकी धर्माचा मुलगा वडील होता. द्रौपदीने द्युताच्या वेळी त्याचा उल्लेख 'युवराज' म्हणून केला होता. द्रौपदीच्या मुलांची लग्ने एक तर एकामागून एक ओळीने झाली असती, किंवा सर्वांची एकदम झाली असती. त्यातल्या मधल्याचे सर्वांआधी होणे शक्यच नव्हते. अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा, पण पांडवांच्या पट्टराणीचा नसल्यामुळे राज्याचा वारस नव्हता. तो वारसांपैकी दुय्यम होता, नव्हताच म्हणावयास हरकत नाही.
 त्याच्या लग्नाने एक मोठी सोयरीक जडत होती. अर्जुनाचा मुलगा हा मोठेपणा होताच व दुसरा काही वांधा येत नव्हता. द्रौपदीची मुले मारली जातील, असे कोणाच्या स्वप्नीही नव्हते. अभिमन्यूने, घटोत्कचाने व इरावताने लढाईच्या खाईत उड्या घेतल्या पण द्रौपदीच्या मुलांच्या बाबतीत तसे दिसून येत नाही. ती मुले राज्याची वारस होती. ती सर्व लढाई झाल्यावर जिवंत होती. अश्वत्थाम्याने कपटाने व क्रूरपणाने त्यांची हत्या केली नसती, तर ते युवराज म्हणून वावरले असते; त्यांची लग्ने झाली असती, पण ते मारले गेले. शेवटी अभिमन्यूचा मुलगा पोटात होता, तो मरतामरता वाचला व राजा झाला. ह्यात कृष्णाचे काही कारस्थान नव्हते. कृष्ण शहाणा होता, दूरदर्शी होता, पण त्रिकालज्ञ व सर्वशक्तिमान नव्हता. त्याने आपल्यापुरती काही उद्दिष्टे ठेविली होती, पण ती पुरी करताना त्याने स्वतःला काही मूल्यांची मर्यादाही घातली होती. आपल्या मुलांना राज्य मिळवण्याची ज्याने खटपट केली नाही, तो आपल्या भावांच्यासाठी काही हीन कारस्थान करील असे संभवत नाही.
 कृष्ण-पांडवांच्या मैत्रीमुळे पांडवांचा सर्व तऱ्हेने लाभ झाला. स्वकुळाच्या दृष्टीने व अगदी स्वतःच्या दृष्टीने कृष्णाचाही लाभ झाला. जरासंध मारला गेला व सर्वोत्तम क्षत्रियाग्रणी म्हणून क्षत्रियसभेत पहिला मानाचा अर्घ्य मिळाला; पण कृष्णाची अर्जुनाशी जी मैत्री होती; ती निरपेक्ष होती. कृष्णाला अर्जुनाची गाढ मैत्री मिळाली, पण दुसरा व्यावहारिक लाभ झाला नाही. कृष्णाने तितक्याच उत्कटतेने अर्जुनाला जीव लावला व आपली सर्व प्रज्ञा, साहस अर्जुनाचे शरीर, यश व आत्मा ह्यांचे धारण व संरक्षण करण्यात घालवली.  भीष्मपर्वात, द्रोणपर्वात व कर्णपर्वात अर्जुनाने निरनिराळ्या तऱ्हेने कृष्णापुढे मोठे कठीण पेच टाकले. जे करायला पाहिजे त्यात माघार घेतली, जे करायला महाकठीण त्यात उताविळीने उडी घेतली, जे क्रमप्राप्त ते त्यावेळी थांबवण्याचा घाट घातला. अर्जुनाच्या कीर्तीला कायमचा काळिमा लागण्याचा संभव होता, अर्जुनाच्या शरीराला अपाय होण्याचा संभव होता, अर्जुनाचे मन खचले होते. ह्या सर्वांतून कृष्णाने त्याला वाचवले. आपल्या स्वतःला कृष्णाने जपले नाही, इतके अर्जुनाला जपले. गीतेत म्हटल्याप्रमाणे अगदी अक्षरशः कृष्णाने अर्जुनाचा ‘योगक्षेम' वाहिला.
 ह्या सर्व वृत्तान्तात कृष्ण अर्जुनाशी बरोबरीच्या... गाढ मैत्रीच्या नात्यानेच वागत होता, असे दिसते. गीतेच्या पुढच्या पुढच्या अध्यायांत म्हटल्याप्रमाणे अर्जुनाला कृष्ण जर “त्वमादिदेवः पुरुषः प्रमाणम्” असे वाटते, तर कृष्णाला भीष्मावर चालून जाण्याचे, किंवा ‘नुसते पाड, मारू नकोस,' अशी विनवणी करण्याचे कारणच पडले नसते.
 द्रोणपर्वात कृष्णार्जुनाचे नाते जास्ती बरोबरीचे व जिव्हाळ्याचे दाखवले आहे. “अर्जुन समोर असेपर्यंत मला पांडवांवर मात करणे शक्य नाही. तू त्याला दुसरीकडे अडकव, म्हणजे मी धर्माला बांधून जिवंत तुझ्याकडे आणतो," असे द्रोणाने सांगितल्यावरून अर्जुनाला संशप्तकांशी युद्धात अडकवण्याची युक्ती दुर्योधनाने योजिली. पहिल्या दिवशी धर्मास पकडता आले नाही. दुसऱ्या दिवशी द्रोणाने अभेद्य असा चक्रव्यूह रचला, अर्जुन संशप्तकांकडे गुंतला होता. एकट्या अभिमन्यूला व्यूह फोडणे माहीत होते. तो आत जाऊन शत्रूच्या तावडीत सापडून मारला गेला. अर्जुन संध्याकाळी परत येतो, तो मुलगा गेल्याचे त्याला कळले. “अभिमन्यू पुढे गेला, तेव्हा तुम्ही एवढे मोठे लढवय्ये काय करीत होता?" असे त्याने रागाने विचारले. तेव्हा धर्माने उत्तर दिले, “आम्ही त्याच्या मागोमाग होतो. पण सिंधुराज जयद्रथाने आम्हांला थोपविले. आम्ही शिकस्त केली, पण आम्हांला फळी फोडता आली नाही."  हे उत्तर ऐकल्यावर अर्जुनाने रागाच्या व दुःखाच्या भरात प्रतिज्ञा केली, “उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन” सर्वच दृष्टीने ही प्रतिज्ञा विलक्षण होती. जयद्रथ व्यूहाच्या तोंडाशी होता; पांडवसैन्य अडवण्याचे त्याचे कामच होते. तो ज्या स्थानावर नेमला होता, त्या स्थानामुळे ही जबाबदारी त्याच्यावर पडली होती. अभिमन्यूशी लढून त्याला मारणारे निराळेच होते; त्यांना बाजूला सारून जयद्रथवधाची प्रतिज्ञा त्याने रागाच्या भरात केली ! जयद्रथ ही महाभारत-युद्धातली एक क्षुद्र व्यक्ती होती. धर्मराज त्याला ‘क्षुद्र'च म्हणतो. अर्जुनाच्या प्रतिज्ञेने सगळेच मोठ्या चिंतेत पडले. कृष्णाने आश्चर्याने विचारले, "अरे, अशी काय प्रतिज्ञा करून बसलास? मला विचारले नाहीस, भावांना विचारले नाहीस, आणि रागाच्या भरात बोलून गेलास? आता कसे हे साहस पार पाडणार?" अर्जुनाचे उत्तरही अनपेक्षितच वाटते. अर्जुन आपल्या धुंदीतच होता. तो म्हणतो, “कृष्णा, मला काय हे अवघड का आहे? अरे, मी अमक्याला जिंकले, तमक्याला जिंकले. देव आले, तरी त्यांना जिंकीन. माझे धनुष्य, माझे बाहु व मला माहीत असलेली अस्त्रे ह्यांना कमी लेखू नकोस. बघशील उद्या. अगदी पहाटे रथ तयार ठेव मात्र ".
 कृष्णाने उत्तर दिले नाही. तो त्याच्या शिबिरात गेला. तेथे सुभद्रा रडत बसली होती. थोड्याच वेळाने द्रौपदी व उत्तराही आल्या. कृष्णाने त्यांचे सांत्वन केले, म्हणण्यापेक्षा शक्य तितक्या थोड्या वेळात, थोड्याशा कठोरपणानेच त्यांना वाटेला लावले. "सुभद्रे, अशी रडू नकोस. तुझा मुलगा वीरमरणाने मेला. आम्ही सर्वच त्या दिशेने चाललो आहोत. क्षत्रिय युद्धात मरायचे नाहीत तर कुठे मरायचे? त्याला स्वर्गप्राप्ती झाली आहे." हे काय सांत्वन? पुढे तो काय म्हणतो, “आता जा, उद्या तुला आनंदाची बातमी कळेल." आनंदाची बातमी कसली? तर तुझ्या शत्रूचे... जयद्रथाचे मरण ! ही काय आनंदाची बातमी? ह्या अशा प्रसंगांनी सबंध महाभारताची कठोर, कर्तव्यदक्ष भूमिका विशद होते.  'मानवी भावनांना स्थान नव्हतेच का? कारुण्य, व्याकुळता ह्यांना वाव नव्हताच का?' असे वाटून मन घाबरे होते. द्रौपदीला, "सुभद्रेला व उत्तरेला चार गोष्टी सांग,” असे म्हणून त्याने दुःखाने वेड्या झालेल्या त्या बायांना निरोप दिला व तो अर्जुनाच्या शिबिरात शिरला. त्याने हातपाय धुऊन, नवे दर्भ पसरून अर्जुनाची तृणशय्या केली. भोवती आयुधे ठेवली. अर्जुनाचे उपचार केले. ह्या कृत्यांनी अर्जुन ताळ्यावर आला. त्यानेही हातपाय धुवून कृष्णाचा सत्कार केला. कृष्णाने ‘स्वस्थ नीज', असे म्हणून त्याचा निरोप घेतला. त्याच्या शिबिराभोवती रक्षणासाठी उत्तम योद्धे ठेवले व तो स्वतःच्या शिबिरात जाऊन उद्याची जबाबदारी कशी पार पाडावी, ह्याची चिंता करीत बसला. त्याने दारुकाला बोलावले व स्वत:चा रथ जोडून उत्तम शस्त्रांनी भरून ठेवावयास सांगितला. “अर्जुन नाही, तर मी जयद्रथाला मारीन. सर्व कौरवांना मारीन. मुलंबाळं, नातेवाईक कोणीही मला अर्जुनापेक्षा आवडते नाहीत. अर्जुनापाठीमागे मुहूर्तमात्रसुद्धा मी जगणे शक्य नाही. त्याचे शत्रू ते माझे शत्रू, त्याचे मित्र ते माझे मित्र. तो माझा शरीरार्ध आहे. हे उद्या सर्वांना समजेल. रथ तयार ठेव, कवच घालून तयार रहा. मी पांचजन्य वाजवला की असशील तसा रथ घेऊन ये." अशी त्याने दारुकाला आज्ञा केली.
 महाभारतातील कृष्णाने दुसऱ्या कोणाहीबद्दल हा जिव्हाळा, ही तळमळ दाखवलेली नाही. अर्जुनाला रात्री साक्षात श्रीशंकराचे दर्शन झाले वगैरे भाग सोडला, तर पुढचा भाग युद्धातील डावपेच व कृष्णार्जुनांचे विलक्षण युद्धकौशल्य ह्या दृष्टीने अतिशय वाचनीय आहे. 'लढाईत मोठा कोण, सारथी की रथी?' हा प्रश्न पडतो. सारथ्याचे कौशल्य अजबच होते. सारथ्य जाणणाऱ्याला नलोपाख्यानात ‘अश्वहृदय' शब्द आहे. तो घोड्यांचे अंतरंग जाणणारा असावा लागे. आपले घोडे काय करू शकतील, हे त्याला कळत असे. त्यांना दाबावे केव्हा, दौडवावे केव्हा, हे त्याला समजत असे. ते दमलेले, भ्यालेले असले, तर त्याला ताबडतोब उमगावे लागे. दुसऱ्या बाजूने तो नुसता ‘अश्वहृदय'च नाही, तर ‘रथीहृदय'ही असावा लागे. योद्धा आता कोणता डावपेच लढवणार आहे, कोणते बाण वापरणार आहे, कोणते अस्त्र योजणार आहे हेही त्याला कळणे आवश्यक होते. कृष्ण व अर्जुन ही दोन शरीरे व एक आत्मा होते. एकमेकांना न बोलता एकमेकांचे हृदय कळत होते. रथी व सारथी ह्यांचे हे ऐकात्म्य ह्या पर्वात फारच उत्तम दिसते. ह्याशिवाय प्रतियोद्धे... ज्यांना तोंड द्यावयाचे ते काय करीत आहेत, काय योजीत आहेत, हेही सारथ्याला निमिषमात्रात कळणे अवश्य असे. सारथी स्वतः उत्तम रथी असेल, उत्तम योद्धा व अस्त्रविद्य असेल, तरच हे सर्व शक्य होते आणि कृष्ण हे सर्व होता. शिवाय अर्जुनाला प्रेमाने बांधला गेला होता.
 अर्जुनाला लांब गुंतवून धर्माला पक़डणे हे साध्य ह्या दिवसापुरते तरी दूर ठेवणे कौरवांना प्राप्त होते. जयद्रथाला सर्वांत पाठीमागे ठेवून अर्जुनाला तेथपर्यंत पोहोचणे अशक्य करणे एवढाच ह्या दिवसाचा दुर्योधनादींचा प्रयत्न होता. एकेका योद्धयाच्या हाताखाली एकेक सैन्यविभाग होता. प्रत्येक आपल्या सैन्यानिशी अर्जुनावर तुटून पडत होता. पहिली सलामी खुद्द द्रोणाशीच झाली. द्रोणाच्या सैन्याला पळवून लावल्यावर वाट सापडताच कृष्णाने रथ पुढे काढला. द्रोणाने अर्जुनाला आव्हान केले, 'असा निसटून काय जातोस? ये ना माझ्याशी दोन हात करायला' तेव्हा ‘नमस्कार गुरुजी, आज नाही', म्हणून अर्जुन पुढे सरकला. दु:शासन आडवा आला, त्याला घायाळ करून रथ पुढे निघाला. भोजाच्या सैन्याची अशीच दाणादाण झाली. पक्ष्यांच्या भरारीने जाणारे घोडे छिद्र सापडेल तेथून वाट काढीत होते. अर्धा दिवस कंदन झाले. घोडे थकले होते. अर्जुन म्हणाला, “मी शत्रूला संभाळतो, तू घोड्यांची चाकरी कर" त्याने रथातून उडी टाकली व तो रथापुढे जमिनीवर उभा राहून युद्ध करू लागला. मागच्या बाजूने कृष्णाने घोडे सोडले, त्यांच्या पाठीवर रुतलेले शर काढले, त्यांना पाणी पाजले जमिनीवर लोळू दिले, त्यांच्या अंगावरून हात फिरविला. हे सर्व शांतपणे, न घाबरता चालले होते.  घोडे ताजेतवाने झाले. अर्जुनाने आपल्या बाणवर्षावाने सर्वांना थोपवून धरले होते. त्याने रथावर परत उडी घातली व रथ चालू लागला. घोडे, सारथी व रथी सर्वच एकमेकांचे हृदय जाणणारे होते.
 इकडे धर्मराजाचा जीव थोडथोडा होत होता. त्याने दारुकाच्या रथातून शैनेय सात्यकीला अर्जुनाकडे पाठवले. भीमही थोड्या वेळाने आला, व अर्जुनाच्या प्रवासाला गती मिळाली. शेवटी तो जयद्रथाजवळ पोहोचला. जयद्रथाचा रथ व पताका त्याने मोडून टाकली, व शेवटी जयद्रथाचे शीर उडवले. दोघा मित्रांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
 एका दिव्यातून अर्जुन पार पडला होता. पण अजून त्याला सांभाळायचे होते. त्या दिवशी दोन्ही बाजूंना इतका त्वेष चढला होता की, पलिते लावून रात्री लढाई पुढे चालू झाली. योद्धयांना मध्ये थोडी विश्रांती मिळाली. सूर्य उगवल्यावर परत युद्धाला तोंड लागले. ह्या रात्रीच्या युद्धात कृष्णाने घटोत्कचाला इरेला घातले. शेवटी त्याच्यापुढे ठिकाव लागेना, तेव्हा दुर्योधनाच्या विनंतीवरून कर्णाने अमोघ अशी वासवी शक्ती त्यावर सोडली व घटोत्कच मेला. घटोत्कचाच्या मृत्यूमुळे पांडव दुःखात बुडाले, तर कृष्ण आनंदाने नाचतच सुटला. शेवटी अर्जुनाला कृष्णाला दाबणे भाग पडले. “अरे, एवढा वीर पडला, तर तू आनंदाने नाचतोस का?" “बाबा रे, कर्ण जी शक्ती तुला मारण्यासाठी जपून ठेवीत होता, ती फुकट गेली" म्हणून कृष्णाने उत्तर दिले. इकडे धर्म संतापला होता. "अभिमन्यू मेला, तेव्हा अर्जुन नव्हता. अर्जुन असताना घटोत्कचासारखा गुणी मुलगा मारला गेला. किती त्याने आमची सेवा केली होती. त्याच्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही. मुख्य शत्रूना मारायचे सोडून त्या क्षुद्र जयद्रथापायी एक दिवस फुकट गला. आता मीच जातो द्रोणाला व कर्णाला मारायला' असे म्हणून तो निघाला होता.  कृष्णाने चार युक्तीच्या गोष्टी सांगून त्याला थोपवले. दोन्ही बाजू रात्रंदिवस लढून दमल्या होत्या, तो दिवस युद्ध झाले.मग रात्रीची झोप झाल्यावर पुढल्या दिवशी द्रोण मारला गेला. अर्जुनाकडून कर्णाला मारवायचे होते. द्रोणाच्या वधामुळे अर्जुन खिन्न झाला होता. पांडवांमध्ये आपापसातच चांगली मोठी भांडणे लागली होती. सात्यकीचे व धृष्टद्युम्नाचे हमरीतुमरीवरून युद्धच जुंपायचे, पण कृष्ण मध्ये पडला.
 कर्णाच्या रथाचे चाक खाली गेले, तेव्हा अर्जुनाने त्याला मारले. तो अर्जुनाला थांबण्याची विनंती करीत होता. धर्माच्या गोष्टी बोलत होता. पण कृष्णाने त्याला उसंत मिळू दिली नाही.मागची सर्व वर्मे काढून, "कोठे गेला होता धर्म तुझा तेधवा वृषा सांग,” [कर्ण क्व ते धर्मस्तदा गतः] ह्या पालुपदाने अर्जुनाची सर्व अपमानाची आठवण कृष्णाने धगधगत जिवंत ठेविली. कर्ण मारला गेला.
 लढाई संपली; पण कृष्णाचे काम संपले नव्हते. केवळ अर्जुनाला नाही पण इतरांनाही त्याने परत वाचवले. गांधारीचा राग व शाप स्वतःवर घेतला. कृष्णाचे पाठीराखेपण नसते, तर पांडवांना कौरवांचा निःशेष नाश करणे शक्य नव्हते, हे गांधारीने जाणले होते. माझा एकही मुलगा तू जिवंत ठेविला नाहीस, असा ती कृष्णाला बोल लावते. ज्या भीमाने तिची मुले मारली, त्याला ती दोष देत नाही. “आमच्या कुलाचा जसा सर्वनाश झाला, तसा तुझ्याही कुलाचा होईल. आम्ही जसे मेलो, तसे तुम्हीही आपापसांत भांडून मराल.” असा तिने कृष्णाला शाप दिला. कृष्णाने तो शापही हसत झेलला. "बये! अपराध केलास; मुलाला वेळीच आवर घातला नाहीस, आता कशाला उगीच तळतळाट करतेस ?"असे त्याने गांधारीला बजाविले. “आम्ही यादव इतके बलाढ्य आहोत की, आमचा नाश करील, असा बाहेरचा शत्रु नाही. आमचा नाश झाला, तर आमच्याच मूर्खपणाने," असे त्याने सांगितले.  यादवांच्या विनाशाला एक पर्व खर्च पडले आहे; पण ते अगदी लहान आहे. एवढेच नव्हे तर पंधरा वीस श्लोकांच्या एका अध्यायात जे सांगितले आहे, त्याचा दुसऱ्याशी मेळ नाही. एका अध्यायात सांगितले आहे की, ऋषीच्या शापाने सांबाला मुसळ झाले. त्याचे चूर्ण करून समुद्रात फेकून दिले व राज्यात द्वाही फिरवली की, जो कोणी दारू पिईल, राजा त्याला कडक शिक्षा करील. त्याच्याच पुढच्या अध्यायात सांगितले आहे की, सर्व यादव समुद्रतीरी जत्रेला गेले व रामकृष्णांसह सर्वच यथेच्छ दारू प्याले व त्या धुंदीत एकमेकांची उणीदुणी काढू लागले.समुद्रतीरी म्हणजे कुठे ? काय द्वारका समुद्रतीरी नव्हती? द्वारकेच्या सर्व बाजूला भरभक्कम तटबंदी होती. म्हणून किनाऱ्याला लागायचे तर द्वारकेतून बाहेर पडावे लागे, असे दिसते. दारू पिऊ नये, अशी द्वाही राजाने फेिरवली असता सर्वजण दारू प्याले कसे ? का मद्यपान निषेधाचे प्रकरण जैन कथेतून महाभारतात घुसले? पहिली कुरापत शैनेय सात्यकीने हार्दिक्य कृतवर्म्याची काढली. "बिचाऱ्या द्रौपदीची निजलेली मुले अश्वत्थाम्याच्या मदतीने तू मारलीस हे कृत्य फारच वाईट"
“असे होय ! मग भूरिश्रव्याचे हात तुटले असता तू त्याचे शिर कापलेस, हे काय चांगले केलेस?’ असे हार्दिक्याने विचारले.  त्यातच सात्यकीने स्यमंतकमण्याच्या चोरीचे जुने प्रकरण उकरून काढल्यामुळे सत्यभामा रडायला लागली. सात्यकीचे व कृतवर्म्याचे युद्ध जुंपले. त्यात कृतवर्मा मारला गेला. सात्यकी इतरांनाही मारीत सुटला तेव्हा भोज व अन्धक एक होऊन त्याच्या भोवती जमले, व जेवणातील उष्टी भांडी त्याच्यावर फेकू लागले. हे पाहून प्रद्युम्न सात्यकीच्या मदतीला धावला, पण ते दोघेही त्यात मारले गेले. एका बाजूने वृष्णि-शैनेय व दुसच्या बाजूने अन्धक-भोज अशी लढत जुंपली. पाहता -पाहता सांब, प्रद्युम्न, चारुदेष्ण, अनिरुद्ध हे असे मारले गेले.हा संहार पाहून कृष्ण रागावला, व एक मूठ लव्हाळे उपटून मारणाऱ्यांना त्याने ते मारले. तो ते लव्हाळे लोखंडाचे झाले व ज्याच्यावर मारले तो मेला. हे पाहून जो-तो लव्हाळे उपटून एकमेकांना मारू लागला. मोठा संहार झाला. हे पाहून राम व त्याच्या मागोमाग कृष्ण ह्या दंगलीतून बाहेर पडले. कृष्णाने बभ्रूला सांगितले, “मी बाहेरच राहतो; तू बायका-मुलांना नीट संभाळून आत ने” ते करीत असता बभ्रूच मारला गेला, तेव्हा बलरामाला थांबावयास सांगून कृष्ण सर्वांना घेऊन द्वारकेत गेला व वसुदेवाकडे जाऊन म्हणाला, “तुम्ही सर्वांना संभाळा. अर्जुन येईल व सर्वांची व्यवस्था करील. मी बलरामाला थांबायला सांगितले आहे, तिकडे जातो.” तो त्वरेने बाहेर पडला. दारुकाला त्याने अर्जुनाकडे पाठविले. तो रामाकडे जातो, तो रामाचे प्राणोत्क्रमण होत होते. रामाचा अंत पाहून तो झाडाखाली योगस्थ बसला, एवढ्यात एका पारध्याचा बाण लागून तोही मेला.
 दारूच्या धुंदीत एकमेकांना मारून सर्व कुल मरणे जरा कठीणच वाटते. बभ्रू, बलराम व कृष्ण हे तरी यादवांच्या हातून मेले नाहीत. म्हणजे यादवांच्या धुंदीचा व मारामारीचा फायदा घेणारा शत्रू निर्माण झाला होता, असे दिसते. त्यामुळेच द्वारकेभोवतालचा प्रदेश निर्धास्त नव्हता. तो शत्रू जुन्या क्षत्रिय घराण्यातील नसून भारतात नवीनच आलेल्या आभीरांच्या टोळ्या होत्या. त्यांनीच अर्जुनालाही जेरीस आणले.* कृष्णाच्या मृत्यूची बातमी ऐकून म्हाताऱ्या वसुदेवाने हाय खाल्ली व अंथरूण धरले.


*ह्याच ‘आभीर' लोकांनी काठेवाड, गुजरात व उत्तर महाराष्ट्रात ऐतिहासिक काळात राज्य केले, असे दाखले आहेत. ज्यांना ‘अहीर' म्हणतात, खानदेशातील अहिराणी बोली ह्या आभीरांच्या वंशजांची असावी. ह्याच लोकांनी पुढे यादवांशी आपला संबंध जोडला. बहुतेक आपण क्षत्रिय आहो, हे दाखवण्याचा तो प्रयत्न असावा. यादवांबरोबर कृष्णालाही त्यांनी आपल्यातला देव बनवला असला पाहिजे. त्यामुळेच महाभारतातील राजकारणी योद्धा 'गोपाल-कृष्ण" झाला असावा. गोपालकृष्णाचा गोपीकृष्ण कोणी व कधी केला, हे मात्र महाभारतकथेवरून कळत नाही.  अर्जुन आल्यावर मरणोन्मुख वसुदेव त्याला म्हणाला, “बाबा, ज्या प्रद्युम्न-सात्यकीचे तू गुणगान करीत होतास, ते तुझे दोघे भक्त व शिष्यवर ह्या सगळ्या अनर्थाला कारण आहेत” अर्जुनाने वसुदेवाला राजाच्या इतमामाने जाळले, मग रामकृष्णांसह सर्व मृत यादववीराना जाळले. वसुदेव सर्वांत वडील, म्हणजे तोच यादवांचा राजा होता का? का बलराम राजा व वसुदेवाचा मान? दुर्योधन राजा, पण धृतराष्ट्र जिवंत होता म्हणून त्याला ‘महाराज' म्हणत, तसाच प्रकार होता की काय?
 बलराम, कृष्ण वृद्ध होऊन गेले. वसुदेव तर कुंतीचा भाऊ व राम-कृष्णांचा बाप म्हणजे खूपच म्हातारा. कृष्णाची मुले अभिमन्यूपेक्षा थोडी वडील असतील, म्हणजे पन्नाशीच्या आतबाहेर. ह्या संहारात तिसरी पिढी जिवंत राहिली. ती परीक्षिताच्या वयाची, म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षांची होती. ते कसे जिवंत राहिले ? का अतिवृद्ध वसुदेव व ही नातवंडे ह्यांना ठेवून फक्त मधल्या दोन पिढ्यांची माणसेच यात्रेला गेली होती? ही पासष्ट ते पंचाहत्तर वयाची माणसे व त्यांचे मुलगे दारू पिऊन शुद्ध विसरून एकमेकांशी भांडून मेली, असे समजायचे का? महाभारत व सर्व पुराणे असेच सांगतात. काही दिवसांतच द्वारका पाण्यात बुडाली. धरणीकंपाने का? ह्या संबंध किनाऱ्यावर वारंवार धरणीकंप होत असत, अजूनही होतात. तसाच प्रकार झाला असावा का? ‘एरका' नावाचे गवत लोहाचे झाले, ह्याचा अर्थ काय? एरका नावाच्या सरळ टणक गवताच्या कांड्यांचे बाण करून त्यांना लोखंडाची पाती लावणारे काही लोक होते व त्यांनी यादव धुंदीत आहेत, असे पाहून त्यांचा नाश केला काय? किती तरी प्रश्न मनात उद्भवतात. द्वारकेच्या उत्खननात असे दिसते की, द्वारका कधीतरी पाण्याखाली बुडाली व परत वसवली गेली. एकदा का अनेकदा? ह्याचे उत्तर देण्याइतका पुरावा अजून सापडलेला नाही.
 अंताच्या क्षणापर्यंत कृष्ण शांत राहिला. ह्या अवस्थेत जेवढी निरवानिरव करणे शक्य होते, तेवढी त्याने केली. तो रडला नाही.  सर्व मुले डोळ्यांदेखत मेली होती, तरी रडला नाही. द्वारकेत त्याने पाऊल घातले, ते वसुदेवाला निरोप सांगण्यापुरते. सर्व स्त्रिया आकान्त करीत होत्या. पण हा थांबला नाही. बलराम तर कुठच्याच कृत्यात पुढाकार घेत नसे. तो आधीच निघून गेला होता. कृष्णाने उरलेल्या यादवांचा भार शिरावर का घेतला नाही? व्याधाने मारले नसते, तरी तो प्रायोपवेशनाने मरणाच्याच तयारीत होता, असे का ? वृद्ध वसुदेवाला त्याने सर्वांना संभाळण्यास का सांगितले? ह्या भयंकर क्षणीही कृष्णाने विचार केला असेल का? तरुण पोरे दुसऱ्याच्या आश्रयाला गेली, तरी हरकत नव्हती. यदुवंशाची रोपटी जिवंत होती. ती वाढवणे पांडवांना शक्य व जरूरच होते. पण आपण कसे परघरी दैन्यात राहणार? ज्यांना आयुष्यभर मोठ्या शौर्याने, मोठ्या दिमाखाने सांभाळले, त्यांच्या घरी सर्वस्व नष्ट झाले अशा परिस्थितीत राहणेच शक्य नव्हते. वैभवशाली वासुदेवाला तर मुळीच नव्हते. मृत्यूखेरीज दुसरी वाटच नव्हती. कृष्णाला मरणाखेरीज मार्गच नव्हता. अंगावर आलेल्या सर्व कर्तव्यांना त्याने जसे तोंड दिले, त्याच कठोरतेने नातवांत, बायकांत मन न गुंतवता त्याने ह्याही वेळी तोंड दिले. अर्जुनावर सर्व भार सोपवला व आपण चालता झाला.
 जन्मभर लौकिक अर्थाने अर्जुनाला व पांडवांना कृष्णाच्या अगणित उपकारांची फेड करता आली नाही. त्याच्या मृत्यूनंतर ही फेड व्हावयाची होती. कृष्ण अर्जुनाशिवाय मुहूर्तभरही जगू शकत नव्हता. अर्जुनाचेही तसेच होते, असे समजायला हरकत नाही. शेवटी कृष्णाचा निरोप पोहोचल्यावर अर्जुन द्वारकेला आला तेव्हा, कृष्ण जिवंत नव्हता; पण एरवी एवढ्या तेवढ्यावरून प्रतिज्ञा करणाऱ्या व आगीत उडी घेऊन जीव देण्यास निघणाऱ्या अर्जुनाला त्या वेळी ही मोकळीक नव्हती. वसुदेवाचा शोक ऐकून त्याचा प्राण गेल्यावर इतमामाने त्याला अग्नी द्यायचा होता. कृष्णाचे शरीर शोधून त्याला अग्नी द्यायचा होता. उरला-सुरला परिवार घेऊन हस्तिनापुराला जायचे होते, स्वतःची व यादव स्त्रियांची विटंबना पहायची होती. राज्याला मुकलेल्या यादवांपैकी कृष्णाच्या नातवाला एक राज्य पांडवांनी दिले, सात्यकीच्या मुलाला एक दिले; एवढेच नव्हे, तर मार्तिकावताचे राज्य अश्वत्थाम्याला मदत करणाऱ्या कृतवर्मा हार्दिक्याच्या वंशाला दिले. सर्व यादव जिवंत राहते, तर त्यांपैकी कोणाचाच कुठल्याच राज्यावर अधिकार नव्हता. नवी राज्ये मिळाली, ती पांडवांमुळे. यादवांची व्यवस्था लावल्यावर कृष्णाच्या देण्याची अशी विलक्षण निरानंद फेड करून,मग अर्जुन व इतर पांडव मरणास तयार झाले.
 कृष्णाने एवढे प्रेम करण्यासारखे अर्जुनात होते तरी काय? अर्जुन त्या वेळच्या वीरांत अप्रतिम योद्धा म्हणून गाजलेला होता; सर्व तरुण पिढीचा, उत्तराचा, धृष्टद्युम्नाचा, सात्यकीचा, प्रद्युम्नाचा आदर्श होता. नावाप्रमाणे तो ऋजू होता. अर्जुनाच्या बाहुबलाने धर्म राजा झाला. कृष्णाने इतरांनाही राज्य मिळवून दिले. दोघेही शत्रूंना व स्त्रियांना जिंकणारे होते. कृष्णाने आयुष्यभर जे व जितके दिले, तितके अर्जुनाने देणे शक्यच नव्हते. पण अर्जुनाच्या प्रेमात त्याला सर्व मिळाले होते, व कृष्णाच्या जिवंतपणी नाही, पण मागाहून सर्व फेड अर्जुनाने केली.
 कृष्णाने असामान्य कर्तृत्वाने इतरांना राज्ये मिळवून दिली. भीष्माने तेच केले. भीष्म उपभोगशून्य राहिला. कृष्णाने श्री व संपत्ती याचा उपभोग घेतला. भीष्माने अधिकार भोगला, तर कृष्णाचा भोग अधिकारशून्य होता. एक लौकिकदृष्ट्या सर्वस्वाचा होम करून काहीतरी उपभोगीत होता, तर दुसरा सर्व भोगून खरोखरीने अलिप्तच राहिला. इतर सर्व कधीतरी रडले. भीष्म स्वतःसाठी रडला नाही. कृष्णही कधी रडला नाही. निष्कामच राहिला. इतका की, कधीकधी तो कठोरच भासतो. ह्यामुळेच महाभारतातील कृष्ण हातीच लागत नाही. अंत:करणाला भिडत नाही.  त्याने प्रेम केले, सूड उगवला, तो आनंदाने नाचला, पांडवांनी राज्य घालविले तेव्हा दुःखाने हळहळला; पण हे सर्व करूनही तो गुंतला नाही. महाभारतात राधेचा कृष्ण नाही, कुंजवनात गोपाळांमध्ये वेणू बाजविणारा कृष्ण नाही, द्रौपदीच्या धाव्याला धावणारा कृष्ण नाही, रक्मिणीवल्लभ कृष्ण नाही. तो स्वतः सांगतो की, आपण अर्जुनावर प्रेम केले, पण वेळोवेळी कृतीने ते प्रेम व्यक्त होऊनही हृदयाचा ठाव घेण्यासारखे त्यात काही नाही. ‘सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै’ अशा तऱ्हेचा तो संबंध होता; पण त्यातही तो कुठे गुंतून पडला नाही. सर्व मानवी कष्ट, मानवी सुखे, मानवी विकार त्याच्या चरित्रात होते, तरीही ह्या विलक्षण अलिप्ततेमुळे त्याला साकार करता येत नाही. त्याने गीता नुसती सांगितली नाही, तो गीता जगला.

फेब्रुवारी, १९६६
दहा
युगान्त


 अमक्या एका क्षणाला, दिवसाला वा वर्षाला एक युग संपले व दुसरे जन्मले, असे काही सांगता येत नाही. एक युग संपले, म्हणजे त्या युगात जे काय म्हणून होते, ते सर्व संपून नव्या युगाबरोबर नवी माणसे, समाजाची नवी घडी येते, असेही नाही. सोयीप्रमाणे कालप्रवाह अखंड चाललेला आहे. आपल्या,अभ्यासाचा,दृष्टिकोण असेल त्याप्रमाणे तुकडे पाडायचे व त्यांना दशके,सहस्त्रके, वा युगे अशी नावे द्यायची. महाभारताबरोबर एक युग संपले, ही कल्पना फार जुनी आहे. तीच मी उचलून धरलेली आहे.दुसऱ्या कोणालाही तितक्याच अधिकाराने ही कल्पना नाकारून दुसऱ्या तऱ्हेने कालाचे विभाग पाडता येतील. युग म्हणजे काय व त्याचा अंत झाला असे आपण का म्हणतो, हा दृष्टिकोण स्पष्ट केला म्हणजे झाले. काही गोष्टी महाभारताबरोबर नष्ट झाल्या,तर काही महाभारतापासून पुढे कित्येक शतके अगदी आजपर्यंत आपल्यांत चालू आहेत, असे दाखवता येईल. एका कालविभागाला 'युग’ म्हटले, ते केवळ काही गोष्टी त्यात होत्या, पुढे नव्हत्या, एवढ्याचसाठी नव्हे.  पूर्वी नसलेल्या, पुढे जास्त प्रमाणात आढळणाऱ्या समजुती, रीतीभाती ह्यांची सुरवात (म्हणजे- पुढच्या युगाची चाहूल) येथे जाणवते, म्हणूनही मी ह्या कालविभागाला ‘युग’ म्हणते. एका दृष्टीने एखाद्या युगाचा शेवटचा भाग त्या युगाचा प्रातिनिधिक नसून ती खरोखरीने संध्या- एका युगाची रात्र व दुसऱ्या युगाची पहाट असते. महाभारत अशाच तऱ्हेचे आहे. पण त्याच्या स्वरूपामुळे त्याला एक असामान्य वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. महाभारत म्हणजे त्या कालातले एका विशिष्ट वर्गातील लोक कसे राहत असत, ह्याची जंत्रीवजा माहिती नसून एक विशिष्ट कुटुंब घेऊन त्याच्या अनुषंगाने त्या काळाचे जीवन व विचार ह्यांचे खोल व व्यापक चित्रण ज्यात आहे, अशी एक दीर्घ कथा आहे. सर्व कथा छंदात सांगितलेली आहे आणि बऱ्याच प्रसंगी त्या छंदाला व त्यामुळे एकंदर कथेला खऱ्याखुऱ्या काव्याचे अविस्मरणीय रूप आले आहे.
 जुन्या पुराणकालीन समजुतीप्रमाणे पांडवांच्या राज्याची शेवटची वर्षे ही कलियुगाची सुरुवात आहे. द्वापरयुगाचा अंत आहे.पण भारतीय योद्धयांना तसे वाटत नव्हते, असे वाटते.* युग संपले, ही जाणीव युग संपून बराच काळ लोटल्यावर आलेल्या पिढीची... त्याचप्रमाणे पूर्वीचे क्षत्रिय-खरे(?) क्षत्रिय- महाभारत युद्धात नष्ट पावले, असा पुराणांचा दावा आहे. हीही समजूत मागाहूनची आलेली दिसते. युद्ध संपल्यावर निरनिराळ्या राजांचे वंश आपापल्या गादीवर बसले. खुद्द हस्तिनापूरला पांडवांचा नातू परीक्षित बसला, इन्द्रप्रस्थाला कृष्णाचा पणतू वज्र हा राजा झाला.इतर मुख्य यादवांचे वंशज दुसऱ्या राज्यांवर बसले, विदर्भाचा रुक्मी आपल्या राज्यावर होता, वगैरे वृत्तान्त लक्षात घेतला, म्हणजे क्षत्रियवर्ग नष्ट झाला, हा उत्तरकालीन दावा पटत नाही.पण जुन्या क्षत्रियवर्गाची रचना व घडी विस्कटली, ही गोष्ट मात्र ऐतिहासिकदृष्ट्या पटण्यासारखी आहे.


* ते त्यांना दाखवून दिले, हा भाग प्रक्षिप्त, मागाहून घुसडलेला वाटतो.  महाभारतकाली काय होते, नंतर काय आले, महाभारतकालात कोणत्या सामाजिक घटनांचा पाया घट्ट रोवला गेला, वगैरेंचे ऊहापोह करण्याआधी महाभारतकाल म्हणजे काय हे स्पष्ट,सांगितले पाहिजे.
 महाभारताचा काल म्हणजे भारतीय युद्ध झाले, त्याच्या अलीकडचा व काही पलीकडचा शतकांचा काळ धरावा लागेल. निदान तसा तो ह्या विवेचनात धरलेला आहे. महाभारतकालाला 'युगान्त' म्हटले आहे. म्हणजे भारतीय युद्धानंतरचा फार-तर एक दोन काळ शतकांचाच अभिप्रेत आहे. पुराणकारांच्या मते तर पांडवांच्या मरणाआधीच कलियुगाची सुरवात झाली होती. महाभारताच्या आधी किती शतके जावे, हा एक कठीण प्रश्न आहे. वेदात दाशराज्ञ युद्धाचा शेवट ते भारतीय युद्धाचा शेवट, असा एक काळ धरावा लागेल, व युगान्त म्हणजे या काळाचा शेवट मानावा लागेल. वेद जरी नाहीत,तरी काही ब्राह्मणे व काही उपनिषदे ह्या काळातली मानावी लागतील.याज्ञवल्क्याचे आपला गुरू व मामा जो वैशंपायन त्याच्याशी झालेले भांडण कधीतरी भारतकथेकाळी झालेले सांगितले आहे. प्रत्यक्ष कथेशी ज्याचा संबंध नाही, असा हा भाग आहे. पण कालदृष्ट्या ते विधान खरे मानले, तर सबंध शुक्ल यजुर्वेद, त्यांची महत्त्वाची ब्राह्मणे (उदा.शतपथ) व ईशावास्यादी उपनिषदे ही भारतीय युद्धानंतरची, बुद्धकाळाला जवळची असे मानावे लागेल. भारतीय युद्धाचा काळ ख्रिस्तपूर्व १००० ते १२०० वर्षे, असे मी मानते.
 भारतीय युद्धाची कथा ही क्षत्रियकुळातील दोन भावांच्या मुलांच्या भांडणांची कथा आहे. क्षत्रियांखेरीज इतर माणसांच्या कथा व उल्लेख दुय्यम आहेत; पण जे काही आहेत, त्यांवरून समाजरचनेची काही अंगे स्पष्ट दिसतात. वर्ण होते; क्षत्रिय व ब्राह्मण वर्ण मुख्य होते; एकमेकांचे प्रतिस्पर्धा, एकमेकांचे पूरक व आधारस्तंभ म्हणून ते राहत होते.  क्षत्रियांचा यज्ञयागांवर व ब्राह्मणांच्या मंत्रविद्येवर विश्वास असल्यामुळे व संस्कार त्यांच्या हातून होत असल्यामुळे त्यांना ब्राह्मणांची गरज होती व ब्राह्मणांना क्षत्रियांकडून संरक्षणाची, पुरस्काराची व पोषणाची अपेक्षा होती. हे दोघे ठामपणे एका समाजाचे घटक होते. त्या समाजाच्या दैवतकल्पना एकच होत्या. ‘विश्’ वर्गाचे नाव काही वेळेला येते, पण त्या वर्गातील व्यक्तींचे चित्रण नाही. शूद्र वर्गाबद्दलही असेच म्हणता येईल. शूद्र कोण होते? राजकुले दासदासींनी भरलेली होती. सर्व दास व सर्व दासी शूद्र होत्या, असे म्हणायचे का? सुभद्रा गोपालिका- वेष घेऊन ‘मी तुमची दासी,' म्हणून द्रौपदीला भेटायला आली. म्हणजे तिने विनयाने शूद्रत्व धारण केले, असा अर्थ होतो का?
 भगवद्गीता आज ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपात ती पूर्वी (युद्धकाली?) नव्हती, म्हणून पुढच्या पुढच्या अध्यायांत जेथे कृष्णाचे देवपण उघड गृहीत धरले आहे तेथे- जे आले आहे, त्याचा दाखला देणे बरोबर होणार नाही. पण पुढच्या कालातला म्हणून धरला, तरी गीतेतील पुढील श्लोक विचार करण्यासारखा आहे. कारण तो पांडवांच्या वेळच्या समाजस्थितीचा निदर्शक आहे; स्मृतीतील समाजस्थितीचा नव्हे. कृषी, गोरक्ष, वाणिज्य अशी कर्म वैश्यांची व परिचर्यात्मक कर्म शूद्राचे (गीताः१८.४४) म्हणून सांगितले आहे. अशाच अर्थाचे दोन श्लोक पुढे कर्णपर्वात शल्याच्या तोंडी आहेत. (८.२३.३५-३६) कृषिवल म्हणजे शेतकरी, गोरक्ष म्हणजे गवळी व वाणिज्य म्हणजे सर्व प्रकारचा व्यापार करणारे, वस्तू तयार करून विकणारे लोक. शेतकरी राजाला कर देत होता. गवळी किंवा गोवारी गोधन बाळगीत. राजधानी स्थापायची म्हणजे निरनिराळ्या दुकानदारांना आणून त्यांना जागा देऊन, करांत सवलती देऊन नव्या राजधानीत त्यांना वसवायची प्रथा होतीसे दिसते. ते वसले, म्हणजे अर्थात करही देत असत. हे लोक परिचर्या म्हणजे एखाद्याची चाकरी करीत असे दिसत नाही.  क्षत्रियांचे गोधन संभाळणाऱ्यांंत खूपसे चाकर व गोपाध्यक्ष म्हणजे राजपुरुष असत असे दिसते. ह्या वेळचे सामाजिक चित्र राजन्य, ब्राह्मण व सर्वसाधारण प्रजा म्हणजे ‘विश्' व दास असे होते. ह्या काळानंतर वणिज धनवान व बलशाली झाले व त्यांनीच फक्त वैश्य वर्ण (तिसरा वर्ण) व्यापला; शेतकरी व गोपाल चौथ्या वर्गात गेले. ह्याचा अर्थ असाही करता येईल की, वैश्य-वर्गात असलेल्या धनवान लोकांच्या मालकीची जी जमीन होती, ती ते स्वतः (जुन्या ‘विश्’- प्रमाणे) न करता गरीब शेतकऱ्यांंना किंवा भूमिहीन मजुरांना कसायला देत. भूमिहीन कामकरी स्थायिक नसून ते ह्या गावाहून त्या गावाला जाणारे लोक होते. ह्याशिवाय ह्या कामकरी वर्गात स्वतःचे असे दास होतेच. म्हणजे पुढील काळात वैश्य व शूद्र या वर्णाची व्यवस्था बदलली. वैश्य वा ‘विश्' म्हणजे 'सर्वसाधारण प्रजा' न राहता ‘वैश्य' नावाचा विशिष्ट कार्य करणारा वर्ण बनला; आणि मग सर्व तऱ्हेचे कारागीर, शेतकरी, गोपाल, परिचर्या करणारे व दास मिळून शुद्र वर्ण बनला काय?
 त्याचप्रमाणे सैन्यातही दोन प्रकार दिसतात. एक क्षत्रिय वर्ग व त्यांच्या जवळचे क्षत्रियांचेच आप्त व दुसरे पगारी(?) सैनिक. कृष्णाजवळ 'नारायणीय' नावाचे असे सैनिक होते. 'संशप्तक' हे अशाच तऱ्हेचे युद्धजीवी लोक होतेसे दिसते. ह्या लोकांचा दर्जा काय होता; तेही शूद्रच होते का? बाकीच्यांना (क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य-कृषक इत्यादीना) लढाईत वाटल्यास जाता येई, वाटल्यास अलिप्त राहता येई. पण हे लोक सैन्यात भरती झालेले व सैनिक म्हणून पोसलेले होते. त्यांना धनी सांगेल, त्याप्रमाणे लढाई करणे प्राप्त होते. म्हणजे ते ‘क्रीतदास' होते. कृष्ण पांडवांच्या बाजूचा होता, पण 'नारायणीय' नावाचे योद्धे दुर्योधनाच्या बाजूने लढत होतेसे दिसते. वर्णसंस्थेत ह्या लोकांना स्थान काय होते, ते कळत नाही. भारतीय युद्धात भाग घेणारा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक होता.
म्हणजे राजा, धार्मिक विधी करणारे ब्राह्मण व वैश्य ही मुख्य प्रजा, अशी समाजरचना होती; व ज्यांना कोणतेही हक्क नाहीत, ज्यांचे संस्कार वरील तिघांचे नव्हेत, व जे फक्त नोकर, ते शूद्र होते. कृषि व गोरक्षण वैश्यांकडे असल्यामुळे शूद्रांची संख्याही पुढील काळापेक्षा फारच कमी असली पाहिजे. हा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक असला, तरी चौथा वर्ण प्रस्थापित झालेला होता व त्याला नावही होते. म्हणून चातुर्वर्ण्यात्मक समाजव्यवस्थेची सुरवात व्हावयाला लागली होती. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे करणारा वैश्यवर्ग जाऊन त्याऐवजी व्यापार करणारा धनाढ्य व बलशाली वर्ग स्थापन झाला व कृषिगोरक्ष करणारे हे परिचर्या करणाऱ्या शूद्र पायरीला पोहोचले, हे दृश्य महाभारताच्या काळानंतर उदय पावलेल्या बौद्धयुगामध्ये स्पष्ट दिसते. बौद्ध व नंतरच्या जैन वाङ्मयात वैश्यवर्गाला प्राधान्य आहे. गोष्टींचा नायक हा वीरपुरुष व क्षत्रिय असावा, हा भारतकालीन प्रघात जाऊन तो श्रेष्ठी वा श्रेष्ठीपुत्र होऊ लागला. म्हणूनच बुद्धकथांमध्ये किसा गोतमी व विशाखा अशा वैश्य स्त्रियांची वर्णने आलेली आहेत. श्रीमंत वैश्य गृहस्थाश्रमात असण्याची आवश्यकता सांघिक प्रव्रज्याप्रधान धर्माला असते, असे म्हणता येईल का? प्रव्रज्याप्रधान धर्म पहिल्यापासूनच व्यक्तिपूजेवर आधारलेले असतात. ते सांघिक असतात व म्हणून की काय, धर्मसंस्थेची बांधणीही घट्ट आखीव होते. धर्माचा मुख्य, उपमुख्य, संघमुख्य, संघाचे व व्यक्तीचे जीवन सर्वच बांधले जाते. बौद्ध, ख्रिस्ती, व महंमदीय धर्म असेच होते. घरच्या वाणिज्यावर भागेनासे झाले, तेव्हा ह्या धर्माचे लोक साम्राज्य संस्थापक बनले व धर्माची तत्त्वे जगभर पसरली. बौद्ध धर्म घरच्या-घरी साम्राज्यवादी होता व त्याच्या हजारो भिक्षूच्या पोषणासाठी त्या वेळी श्रीमंत वणिक् वर्गही होता. भारतीय युद्धाचे युग त्या मानाने आकुंचित संबंधित गटांनी व्यापलेले असे दिसते. धर्माला सार्वजनिक स्वरूप नव्हते. जो बांधीवपणा होता, तो समाजाच्या एकसंधपणामुळे; धर्माच्या स्वरूपामुळे नव्हे.धर्म हा शब्द फारच व्यापक व खऱ्या अर्थाने व्यक्तिगतच राहिला.  पुढचा प्रश्न : जाती होत्या का? वर्ण होते, पण जाती नव्हत्या, असे म्हणण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. जातींची नावे फारशी वाचण्यात येत नाहीत. पण ज्यांना जाती म्हणता येईल, असे समूह होते, सूतांचे स्थान ‘विश्’ व शूद्र ह्यांच्या वरचे होते की काय, अशी शंका शल्याच्या पुढील वाक्यावरून येते. कर्णाचा सारथी होण्याची विनंती दुर्योधनाने केली, तेव्हा रागावून शल्य म्हणाला, “शूद्र ब्रह्मक्षत्रविश ह्यांचे परिचारक ठरलेले आहेत. सूत ब्रह्मक्षत्रांचे परिचारक आहेत. विश व शूद्र ह्यांचे नाहीत. मूर्धाभिषेक झालेला मी कर्णाची नोकरी करावी, असे कसे होईल?"

ब्रह्मक्षत्रविशां शूद्रा विहिताः परिचारकाः। ८.२३-३५.
ब्रह्मक्षत्रस्य विहिताः सूता वैपरिचारकाः।।
न विशूद्रस्य.....८.२३.३८.

 ज्यांची लग्ने आपसातच बहुतांशी होतात, अशा माणसांचा मिळून झालेला समाज म्हणजे जात. जातीचा एक गुण असा असतो की, तीतील एखादा मनुष्य अमक्या वर्णाचा अशी सार्वत्रिक कबुली मिळाली, म्हणजे इतर जातभाई त्या वर्णाचे होऊ शकतात. कर्णाची धडपड वैयक्तिक होती. तो सर्व सुतांना क्षत्रियत्वाचे दार मोकळे करू इच्छित नव्हता. जन्माने क्षत्रिय आहोत, हे सिद्ध करण्याची त्याची धडपड होती. मेल्यावर क्षत्रियांच्या विधीने अग्निसंकार झाल्यामुळे क्षत्रियत्व त्याला एकट्याला मिळाले; त्याच्या मुलाला मिळाले नाही. कारण तो सूत स्त्रीपासून जन्माला आला होता. ही एकच गोष्ट जात ह्या सामाजिक समुहाचे अस्तित्व दाखवण्यास पुरेशी आहे. भारतातील जातिसंस्थेचा एक विशेष असा आहे की, वरच्या जातींतील लोकांना खालच्या जातींतील स्त्रियांशी प्रसंगी लग्नही करता येत असे, पण त्यामुळे त्या स्त्रियांच्या माहेरच्या मंडळींची जात बदलत नसे. उदा. सुदेष्णा व कालीसत्यवती.  जाती व वर्णसंस्था ह्यांचा एक विशेष महाभारत कथेतही दिसतो. खालच्या जाती बहुधा वरच्या वर्गात जाऊ इच्छितात, फक्त एका जातीतून दुसरीत जायचा प्रयत्न नसे. सर्व जाती वा वंश ह्यांचे स्थान नक्की झालेले दिसत नाही. नागकुलांना- विशेषतः त्यांतील राजघराण्यांना बराच मान असे, पण त्यांना कोठच्या वर्गात स्थान होते, ते कळत नाही. बरीच राजघराणी क्षत्रिय नसूनही पुढच्या कालात स्वतःला 'क्षत्रिय’ म्हणवून घेऊ लागली; पण बौद्ध-कालातही अशा प्रयत्नांना यश मिळत नसे व राजा असूनही क्षत्रिय नसलेल्या बलशाली राजालासुद्धा क्षत्रियकन्या मिळत नसे, हे पसेनदी कोसल व वासभखत्तिया ह्यांच्या गोष्टीवरून दिसून येते. पुढील काळात दिसून येणारी वर्ण व जाती ह्यांची व्यवस्था व खालच्या जातींची वरच्या वर्णात जाण्याची धडपड व बऱ्याचदा यशस्वी झालेले प्रयत्न हे भारतीय समाजाचे आजपर्यंत दिसणारे अंग भारतीय युद्धाच्या काळात दृढमूल होऊ लागले होते. भारतीय युद्धाच्या वेळी क्षत्रिय म्हणवणारी घराणी बऱ्याच पूर्वीपासून अस्तित्वात होती. भारतीय कथेवरून पाहता क्षत्रिय घराणी आपल्या क्षत्रियत्वाला फार जपत होती, व त्याच-बरोबर एकमेकांच्या परंपरागत आलेल्या राज्यांना व क्षत्रिय समाजाच्या अशा विशिष्ट बांधणीला जपत असत. क्षत्रिय लहानशा का होईना, पण एकेका प्रदेशाला चिकटून होते. ह्याच्या उलट ब्राह्मण इतरांच्या आश्रयावर अवलंबून असल्यामुळे ह्या राज्यातून त्या राज्यात जात असत. नाना प्रदेशांशी, राजसभाशी त्यांचा संबंध येईच, पण नागांशी व अरण्यातून राहणाऱ्या इतर लोकांशीही त्यांचा संबंध येई व शरीरसंबंधही घडे. त्यापासून निर्माण झालेली ही प्रजा बऱ्याचदा ब्राह्मण गणली जाई. क्षत्रियांतही संकर होत होता, पण तो ब्राह्मणांइतका नव्हता असे कथेवरून दिसते. राजा असूनही क्षत्रिय नाही, असे कर्णाचे उदाहरण. लगेच पुढील काळातील पसेनदीचे उदाहरण.  ह्यांवरून असे अनुमान काढता येईल की निरनिराळ्या व्यक्तींना किंवा समूहांना आपल्या जातीतून क्षत्रियवर्णात जाणे जरी यशस्वीपणे करता आले, तरी प्रत्येक वर्णात १) जुनी प्रतिष्ठित घराणी, २) जुनी प्रतिष्ठित पण मांडलिक व मातब्बर नसलेली घराणी व ३) नव्याने आत शिरू पाहणारी वा शिरलेली मातब्बर नसलेली घराणी असत. घराण्यांचा समूह आपापले वैशिष्ट्य टिकवी. फक्त नव्या आलेल्या घराण्यांना जुन्यांशी शरीरसंबंध जोडून आपण मुळापासून क्षत्रिय आहोत, वा ब्राह्मण , आहोत असा दावा करायचा असे. वर्णांतर्गत उच्च-नीच, नवे-जुने असे गट असत. व्यक्ती किंवा जाती वरच्या वर्गात जायची धडपड करीत, त्यावेळी त्या वर्गातील जुन्या सर्वांनी प्रमाणित मानलेल्या कुटुंबात लग्नसंबंध करण्याचे त्यांचे प्रयत्न असत असे दिसते. जाती व वर्ण ह्यांच्यामधील अशा तऱ्हेचे संबंध भारताच्या सगळ्या इतिहासात दिसतात. सर्व जगभर सर्वच समाजात सर्वकाळ चाललेल्या एका सामाजिक प्रक्रियेचेच हे भारतीय उदाहरण समजता येईल. एका वर्गात पुष्कळ जाती का असतात, त्याचे हे एक कारण देता येईल.वर्णसंकराबद्दल ओरडा जसा सनातन, तशीच वर्णसंकर ही क्रियाही सनातनच.
 वर्ण व जाती असलेल्या समाजाचे महाभारतातील चित्र फार उठावदार नाही. वर्ण दृढ होते, जाती अस्तित्वात होत्या, वैश्यांची कृत्ये पुढच्या काळातील शूद्रांची होती, इतक्याच गोष्टी सांगता येतात. ह्याउलट महाभारतातील कौटुंबिक चित्र फारच उठावदार, बारकाव्यांनी भरलेले व आजतागायत रूढ असलेल्या पितृप्रधान कुटुंबाचे प्रातिनिधिक आहे. हे चित्र इतके तपशीलवार आहे की, यामुळे त्यात पुढे पडलेले लहान-मोठे फेरफारही लवकर समजू शकतात.आजतागायत बहुतेक हिंदुस्थानभर रूढ असलेले पितृप्रधान सामायिक कुटुंब महाभारतात वर्णिलेले आहे. हस्तिनापूरच्या कुरुंचे ,पांचालातील द्रुपदांचे व द्वारकेतील यादवांचे असेच कुटुंब होते.एका वेळी कुटुंबात चार-चार पिढ्यांचे लोक असत. ह्या कुटुंबातील पुरुष त्यात जन्मलेले असत. (दत्तक गेलेल्यांचा, घेतलेल्यांचा अपवाद.) कुटुंबात जन्मलेल्या मुली परघरी जात व परघरच्या मुली सासवा, बायका व सुना म्हणून कुटुंबात येत. कुटुंबात जन्मलेल्या मुली कन्या व पुत्री असत. त्यांचे निराळे असे अंतःपुर होतेसे दिसते. परघरच्या मुलींना ‘वधू’ हे सामान्य नाव. त्यांचे अंतःपुर निराळे असे. ह्या काळचा विशेष असा की, नातेवाचक शब्द फारच कमी होते. ‘पिता, ‘तात’ ह्या शब्दांनी बाप, बापाचे भाऊ ह्यांचा बोध होई. बापाची बायको व बापाच्या भावाची बायको ही ‘माता किंवा ‘अम्बा’ होती. स्वतःच्या बापाची व बापाच्या भावाची मुले, पुत्र व कन्या असत. महाभारत ही भावा-भावांच्या मुलांच्या भांडणाची गोष्ट आहे. पण बाप व चुलता, सख्खा भाऊ, चुलतभाऊ, मुलगे व पुतण्ये असे निरनिराळे शब्द नाहीत. ही गोष्ट परत-परत लक्षात येते. वारणावताला जाताना धर्म धृतराष्ट्राचा व गांधारीचा ‘तात’ व ‘अम्ब’ म्हणून निरोप घेतो. ही माणसे आपला घात करणार आहेत, हे माहीत असूनही त्यांना नमस्कार करून दीनपणे उभा राहतो. त्यावेळची 'तात' व ‘अम्ब' ही संबोधने आजच्या वाचकाला तरी जास्तच करुण वाटतात.‘पुत्र’ म्हणून पांडवांना त्यांनी दिलेला आशीर्वाद जास्तच दांभिक वाटतो. पांडवांना वनात पाठविले, तेव्हा विदुर त्यांच्या वतीने धृतराष्ट्राशी भांडला, तेव्हाही धृतराष्ट्राने विदुराला म्हटले, "अरे ! एवढा कळवळा आला असला, तर जा त्यांच्यामागून. माझ्यामागे भुणभूण लावू नकोस."


कथं हि पुत्रं पाण्डवार्थे त्यजेयम् ३.५.१ ७.
('पांडवांसाठी मी मुलाचा त्याग करणे कसे शक्य आहे'?
असंशयं तेऽपि ममैव पुत्रा दुर्योधनस्तु मम देहात् प्रसूतः।
स्वं वै देहं परहेतोस्त्यजेति को नु ब्रूयात् समतामन्ववेक्षन् ।३.६.१ ७.

तो पुढे म्हणतो, “तेही निःसंशय माझेच मुलगे आहेत; पण दुर्योधन माझ्या शरीरापासूनचा आहे. दुसऱ्यासाठी स्वतःचा देह सोड, असे समानता शोधू पाहणारा कोणता शहाणा म्हणेल ?” म्हाताऱ्याच्या सर्व मुलांना मारून धर्म परत त्यांना ‘तात’ व ‘अम्ब’ म्हणत राहिलाच. हे शब्द म्हणताना कित्येक वेळी त्याची जीभ अडखळली असेल, असे काही प्रसंगी तरी वाटतेच. आजही कुटुंब पिंतृप्रधान व सामायिक आहे पण सख्खे व चुलत हा भेद सर्व उत्तर-भारतीय भाषांत स्पष्ट केलेला आहे.
 महाभारतकाळी ‘पतिव्रता’ ह्या शब्दाचा अर्थ काही दृष्टींनी पुढच्या काळापेक्षा निराळा होता. त्या वेळी औरस संतती नसली, तर नियोगाने पुत्रोत्पत्ती हा मार्ग दत्तक घेण्यापेक्षा जास्त चांगला समजत. नंतरच्या काळात नियोग मागे पडला, व दत्तक घेण्याचा प्रघात सर्रास सुरू झाला. ह्यामुळे स्त्रीला जास्त मान मिळाला असे मात्र होत नाही. पूर्वी स्त्री ही ’क्षेत्र' होती. तिला नवरा सांगेल त्याच्यापासून पुत्रोत्पत्ती करून घ्यावी लागे. पुढच्या काळी ही सक्ती नाहीशी झाली, पण त्याचबरोबर स्त्रीच्या हातून कुवारपणी वा लग्न झाल्यावर काही चूक झाली, तर तिला क्षमा करायची, ही वृत्तीही पार नाहीशी झाली. स्त्रीवर बलात्कार झाला, तर पूर्वीचे क्षत्रिय तिला टाकून देत नसत. त्यानंतरचा हिंदू समाज मात्र पावित्र्याच्या , फक्त स्त्रियांच्याच पावित्र्याच्या- बाबतीत इतका हट्टी व संकुचित, बनला की, तो आपल्या स्त्रियांना रक्षूही शकला नाही, वा परत आपल्यात घेऊही शकला नाही. आजतागायत ही भयंकर वृत्ती कायमच आहे, हे फाळणीच्या प्रसंगी प्रत्ययास आलेच!
 ज्यात आपला जन्म झाला, ते कुटुंब व ज्यांच्याशी सोयरीक झाली, ती इतर कुटुंबे अशा दोन विश्वांत आयुष्य सामावलेले होते. बापाचे कुटुंब ते मुख्य. पण त्यातच भांडणे निघाली, म्हणजे भांडणात सोयरे मदत करीत. स्वकुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची भांडण टाळण्याकडे प्रवृत्ती असे.  अन्याय झाला तरी चालेल, पण उघड भांडण नको. जो वाटा मागेल त्याला बऱ्या बोलाने वाटा मिळाला नाही तरी चालेल. त्याने गप्प बसावे, पण वाट्यासाठी तटून बसू नये, असाच सूर. पण सोयरे मात्र आपल्या जावयासाठी, मेहुण्यासाठी धडपडत. पांडवांचे सर्व मदतनीस सोयरेच होते. यादव आईच्या माहेरचे, द्रुपद बायकोच्या माहेरचे व विराट सुनेच्या माहेरचे. आपल्या बहिणीच्या आंधळ्या नवऱ्यासाठी व भाच्यांसाठी जीव टाकणारा गांधारराज शकुनी कौरवांकडे होता, तोही सोयराच !
 हे पितृप्रधान कुटुंब त्या वेळच्या समाजाचा आधारस्तंभ होते. सामाजिक मूल्ये समाजधारणेसाठी असतात. अशा कटुंबांचा परिपोष व्हावा, अशाच तऱ्हेची मूल्ये त्या समाजाचीही होती. पुरुषांचे मुख्य गुण पितृभक्ती व सौभ्रात्र हे होते. पितृप्रधान कुटुंब सुस्थिर रहायला, भांडणे टाळण्यास ह्या गुणांची आवश्यकता होती. ह्या कुटुंबात कायम राहायला येणाऱ्या स्त्रिया परघरच्या असत. त्यांच्यामध्ये पितृभक्ती किंवा सौभ्रात्र ह्या दोन्ही गुणांची अपेक्षा नव्हती. त्यांची पितृभक्ती लग्न झाले नाही तोवरची, पितृकुलाचे मोठेपण साधण्यासाठी. पण एकदा का लग्न झाले, म्हणजे माहेर तोडून सर्वस्व पतीसाठी वेचणे, व त्याच्या कुळाच्या मोठेपणासाठी जपणे ही तिची कर्तव्ये होती. आई म्हणून मुलांना संभाळणे, पत्नी म्हणून पती नेईल तिकडे जाणे व सून म्हणून सासू-सासऱ्यांची सेवा करणे ही तिची मुख्य कर्तव्ये होती. सामाजिक मूल्ये ही त्या-त्या समाजाच्या गरजेवर बहुतांशी आधारलेली असतात. देशकाल-निरपेक्ष मूल्ये असू शकतात का, असा एक प्रश्न ह्या लेखाच्या अनुषंगाने (कृष्ण वासुदेवाबद्दल) निघाला होता. सर्वस्वी देशकाल-निरपेक्ष मूल्ये असूच शकत नाहीत, अशी आपल्या तत्त्वज्ञानाची भूमिका आहे. ती तर्ककर्कश असली तरी रास्त वाटते. ह्याबद्दल पुढे उल्लेख येईल. सध्या एवढेच सांगता येईल की, एका विशिष्ट वर्गाची, विशिष्ट कुटुंबपद्धतीला पोषक अशी मूल्ये जशी असतात, तशीच सर्व-साधारणपणे मानवजातीला लागू पडतील,अशीही मूल्ये असतात.  पण तीही एका काळाची मूल्ये दुसऱ्या काळाला तोकडी वाटू लागतात. द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळी अशाच तऱ्हेच्या व्यापक मूल्यांचा प्रश्न होता. यक्षप्रश्न-प्रकरणात ह्या व्यापकतेचा पडताळा येतो. सर्व मनुष्यांना लागू म्हणून एक धर्म होताच. पण तो खांडवदाहप्रसंगी कृष्णार्जुन विसरले, असे आज आपण म्हणतो. त्यांना त्यावेळी तसे वाटले नाही. “दया करी जे पुत्रासी तेचि दासा आणि दासी" असे परमवैष्णव, तुकारामबुवा म्हणतात. पण आजचा मनुष्य म्हणेल, ‘दास आणि दासी ह्या शब्दांनी व्यक्त झालेले दास्य समाजात असावे हाच अन्याय नाही का?' हा न संपणारा वाद आहे. अजूनपर्यंत तरी सर्व व्यक्तींना ज्या समाजात, न्याय व समता मिळाली, असा समाज उत्पन्न झाला नाही, हे कोणाही विचारी व्यक्तीला पटेल. असा समाज स्थापणे शक्य आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर येथे देण्याची गरज नाही.
 ह्या संदर्भात महाभारतातील काही घटनांचा विचार करणे रास्त होईल. धृतराष्ट्र आणि पांडू हे विचित्रवीर्याच्या विधवा राण्यांचे मुलगे नियोगाने झालेले असे म्हटले आहे. स्मृतींमध्ये 'नियोग' म्हणजे थोरल्या भावाच्या विधवेच्या ठायी धाकट्या भावाने पुत्रोत्पत्ती करणे असा आहे. व्यास सत्यवतीचा थोरला मुलगा, म्हणजे विचित्रवीर्याचा थोरला सावत्रभाऊ होतो. म्हणजे स्मृतींप्रमाणे संतती निर्माण करण्याचा हा प्रयोग 'नियोग' ह्या क्रियेत बसत नाही. त्याला दीर म्हणून नव्हे, पण एक ब्राम्हण म्हणून ‘नियुक्त केला, म्हणून नियोग' असे म्हणावे, तर

"कौसल्ये देवरस्तेऽस्ति सोऽद्य त्वानुप्रवेक्ष्यति।
अप्रमत्ता प्रतीक्षेनं निशीथे आगमिष्यति॥”

हे सासूचे बोलणे केवळ सुनेची फसवणूक करण्यासाठी होते का? उद्योगपर्वात कर्णकुंती-संवादाच्या वेळी कुंतीला कुवारपणी मूल होण्याच्या प्रकारालाही 'नियोग' हा शब्द योजिला आहे.  ह्या अर्थाने ‘नियोग’ हा शब्द दुसरीकडे येत नाही. ह्याची उत्तरे दोन संभवतात... १) जरा अपप्रकार होत होता, त्याला एक रूढ शब्द वापरून झाले ते योग्यच,तो आपद्धर्मच होता, असे दर्शवायचे होते, किंवा २) ‘नियोग’ ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ प्राप्त झाला नव्हता. स्त्रीच्या ठायी अमक्यानेच संतती निर्माण करावी, असा दंडकही रूढ झाला नव्हता.
 ह्यांपैकी कोठचा पर्याय स्वीकारायचा, हे सध्याच्या आवृत्तीवरून कळणे शक्य नाही. सध्याची आवृत्ती ज्या हस्तलिखितांची तपासणी करून सिद्ध केली आहे, त्यांतले जुन्यात जुने इ.स. ९०० किंवा १०००च्या पाठीमागचे नाही. आता सिद्ध झालेल्या आवृत्तीची आतून मजकुराची तपासणी होऊन जेव्हा नवी आवृत्ती सिद्ध होईल, तेव्हा असल्या प्रश्नांचा निकाल लागेल, एरवी नाही.
 दुसरी घटना म्हणजे शल्य आपल्या भाच्यांच्या बाजूला न लढता कौरवांना मिळाला ही. ह्या बाबतीत पहिली अडचण आहे ती शब्दांच्या अर्थाबद्दल. महाभारतात भाऊ, बहीण, बाप, आई वगैरे नातेवाचक शब्द सबंध एका तऱ्हेच्या नातेवाईकांना लावले आहेत, असे वरती दाखवलेच आहे.म्हणजे भाऊ सख्खा, की सावत्र, की चुलत, हे संदर्भाशिवाय काहीच कळत नाही. शल्य हा माद्रीचा सख्खा भाऊ होता की खूप लांबचा चुलतातला होता, हे समजत नाही. बहिणीच्या दुर्दैवी मरणाबद्दल शल्याचा पांडवांवर राग होता म्हणावे, तर तसेही काही दिसत नाही. तशा तऱ्हेचा एकही उल्लेख महाभारतात नाही व दुसरे म्हणजे जी घटना आपल्याला दुर्दैवी व विशेष म्हणजे संताप आणणारी वाटते, तशी ती शल्याला त्यावेळी वाटली असेल असे संभवत नाही. मद्रांनी आपली मुलगी खूपसे धन घेऊन एका अभिषिक्त राजाला धाकटी राणी म्हणून जाणून-बुजून सवतीवर दिली होती, तिला मुलेही झाली होती. ती नवऱ्यामागून सती गेली, ही तिने आपणहून केलेली इतर कित्येक क्षत्रिय स्त्रिया करीत त्याप्रमाणे केलेली गोष्ट होती.  माद्रीमागून माद्रीच्या मुलांना सावत्रआईने व भावांनी विलक्षण आपलेपणाने वागवले होते. तेव्हा झाल्या गोष्टीवरून राग करण्यासारखे काहीच नव्हते. ह्या बाबतीत आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मद्र- बाल्हीकांचेच हस्तिनापूरच्या घराण्याशी असलेले पिढीजाद संबंध. प्रतीपाची एक राणी मद्रांची राजकन्या होती. तिचा मुलगा मामाघरी दत्तक गेला होता. तो शंतनूचा सावत्रभाऊ. त्याचा नातू वा पणतू, सौमदत्ती कौरवांच्या दरबारात असे व तो कौरवांच्या बाजूने लढला. हा सौमदत्ती शल्याचा काका असावा. जिकडे वडील माणसे तिकडे आपण, अशी शल्याची वृत्ती असावी. म्हणजे शल्य पांडवांवर रागावला, किंवा भाच्यांना बेइमान झाला असे म्हणता येणार नाही. ही लढाईच अशी विचित्र होती की, न्याय कोणता, अन्याय कोणता, ह्यापेक्षा जवळचे कोण,लांबचे कोण, ह्यावरच कोण कुठून लढले, हे ठरवावे लागेल. वास्तविक हीच लढाई नाही, जगातील सर्वच लहानमोठ्या लढाया अशाच असतात. सर्व न्याय एका बाजूस सर्व अन्याय दुसऱ्या बाजूस, असे नसतेच.
 महाभारतात तिसरा एक प्रसंग असा आहे की, मूल्यांचा प्रश्न परत एका तीव्रतेने पुढे येतो. पितृभक्ती हा सर्वात मोठा गुण व पितृकुल सावरायचे, संभाळायचे, हे मोठे कर्तव्य, अशी त्या वेळच्या समाजांची मूल्ये होती. पण मूल्यांची मर्यादा काही दृष्टींनी फारच व्यापक, म्हणजे कुटुंबापलीकडे वा एखाद्या विशेष समाजापलीकडे असते, तर दुसऱ्या दृष्टीने ती सर्वस्वी व्यक्तिगत असते. भीष्माच्या चरित्रात न्याय, अन्याय वगैरेंना फारसे महत्त्व नाही. कुलरक्षण ही त्याला जबाबदारी वाटत होती. पांडवांची बाजू न्यायाची, का कौरवांची बाजू न्यायाची, ह्या वादात तो विदुराइतका खोल शिरला नाही. थोरल्या घराचे त्याने रक्षण केले. तिथे तो वाढला, लढताना उघड-उघड तरी तो त्या बाजूने लढला, लढायला उभे राहण्याचे नाटक केले. बापासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यात पितृभक्ती दाखवली. विचित्रवीर्याच्या मरणानंतर त्याला राज्यावर बसण्याची गळ घालण्यात आली, भावांच्या विधवांच्या ठिकाणी संतती निर्माण करावी, म्हणून त्याला विनंती केली गेली, पण त्याने दाद दिली नाही. कुळधारणेसाठी त्याने गौण मार्ग पत्करला, पण स्वतःची प्रतिज्ञा मोडली नाही. कुटुंब व कुलरक्षण करण्याच्या कर्तव्यापेक्षा- लोकदृष्टीने ते एक कर्तव्यच होते,- त्याला स्वतःच्या वचनाचे बंधन अधिक वाटले. अंतिम मूल्य तात्कालिक वा चिरकालिक, उपयोगी आहे वा नाही, हा विचार त्याने केला नाही. ते मूल्य हा त्याच्या स्वत्वाचा भाग झाला होता व ते त्याने टिकवले. मूल्यांची एक अंतिम मर्यादा भीष्माने दाखवली.
 समाजव्यवस्थेचाच एक भाग म्हणून त्या वेळच्या राजकीय स्थितीचे वर्णन देता येईल. 'कृष्ण वासुदेव' ह्या लेखात त्याचा उल्लेख आलाच आहे. राज्ये लहान-लहान व रानांनी वेढलेली अशी होती. प्रत्येक राज्यावर वंशपरंपरा आलेल्या घराण्यातील पुरुष बसलेला होता. बरीच राज्ये जिंकून, त्यांचा प्रदेश काबीज करून साम्राज्य स्थापण्याची प्रथा नव्हती. जरासंध सम्राट होता. त्याने उत्तरेकडची व पश्चिमेकडची राज्ये काबीज केल्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. कर्ण अंगाचा राजा होता.त्यावरून जरासंधाने मगधाशेजारचीही राज्ये जिंकली नाहीत, असे स्पष्ट होते. पण तो सारखा लढाईत गुंतलेला होता. त्याने बऱ्याच राजांना कैद केले होते असे दिसते. तो अतिशय बलाढ्य व भारी होता. यादव, मत्स्य वगैरे लोकांना त्याच्या भीतीने आपला मुलूख सोडावा लागला, त्यावरून त्यांचा प्रदेश त्याने जिंकला असला पाहिजे असे अनुमान निघते. त्याला मारल्याशिवाय धर्माला राजसूय करणे शक्य नव्हते. राजसूय यज्ञ म्हणजे सम्राटपदाचे* द्योतकच होते. पण ते मिळवताना धर्माने कोणाचे राज्य घेतले नव्हते. बरोबरीच्या राजांत शौर्याने, औदार्याने व गुणांनी जो पहिला, तो राजसूय यज्ञ करी. काही राजे जिंकून, काही वश करून, काही मित्रत्वाने व काही सोयरे-संबंधी म्हणून सर्वांकडून मान्यता मिळाल्यावर राजसूय होई.


* 'सम्राट' ह्या शब्दाचा मूळचा अर्थ 'चांगला राजा' असा आहे.  हे मोठेपण मिळवण्यासाठी शौर्य लागे,तसेच दातृत्वही लागे. राजेरजवाड्यांना पाहुणचारासाठी बोलावून त्यांचा योग्य सत्कार करावा लागे. हजारो ब्राह्मणांंना व इतरांना दक्षिणा द्यावी लागे. अशा तऱ्हेने पहिलेपणाचा मान मिळवण्याची धडपड इतरही मानव समाजात दिसते व त्यासाठी राजसूयासारखे सामाजिक संकेतही रूढ झालेले दिसतात ! ‘अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति’ ही नुसती कविकल्पनाच नाही. अशा तऱ्हेचे अकिंचनत्व हा एक मोठा सामाजिक दर्जा होता. ही कल्पना सर्व मानवसमाजांत रूढ आहे. श्रीहर्ष दर सहा वर्षांनी सर्वस्वाचे दान करी, असे वर्णन आहे.* एका कुळात, राजसूययज्ञ एका पिढीत एकदाच होई, म्हणून दुर्योधनाला तो करता आला नाही. असेच अश्वमेधाचे होते. यादवांमध्ये वसुदेवाने अश्वमेध केला. कुरुकुलात धर्माने केला. ‘बरोबरीच्यांत पहिला’ हे सूत्र ह्या संबंधाचे द्योतक आहे. महाभारतीय युगानंतर उत्तर-भारतात मोठमोठी साम्राज्ये स्थापली गेली. बुद्धाच्या वेळी ‘पसेनदी कोसल’ नावाचा सम्राट होता. नंतर मगधातच एकामागून एक प्रथम मौर्याचे, नंतर गुप्तांचे अशी साम्राज्ये झाली. ह्या सम्राटपदात या सम्राटाचे इतरांवर बिनतोड वर्चस्व होते.
 बरोबरीच्यांत पहिला हा नियम अगदी मध्ययुगापर्यंत होता. जर्मनीमध्ये बिस्मार्कपर्यंत अस्तित्वात असलेली लहान-लहान राज्ये ह्या धर्तीवरचीच होती. भारतात साम्राज्यांमागून साम्राज्ये होत जरा राहिली, तरी कित्येक लहानलहान जातिसमूहांतून वर दिलेला नियम व त्याबरोबर आढळणारी मूल्ये व विचारसरणी दिसून येते. रजपुतांच्या निरनिराळ्या घराण्यांचे परस्पर नाते काहीसे असेच होते, मराठ्यांचेही असेच होते. शिवाजीला औरंगजेबासारख्या परकीयांशी लढणे जितके जड होते, त्याहीपेक्षा बरोबरीच्या स्वकीय मराठा- कुळाकडून राजा-सर्वांचा मुख्य- म्हणवून घेणे जड गेले.


*अमेरिकन इंडियन लोकांत "पोटलॅच" म्हणून अशाच तऱ्हेचे एक कार्य असते.  जुनी घडण व जुनी मूल्ये सर्वस्वी टाकाऊ कधीच होत नाहीत. मानवांना जशा तऱ्हेचे अनुभव एकदा आले, तशाच तऱ्हेचे अनुभव जेव्हा परतपरत येतात, तेव्हा ह्या जुन्या मूल्यांची वा घडणींची आठवण ठेवणे उपयुक्त ठरते. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत मोठी साम्राज्ये लयास गेलेली असल्यामुळे बरोबरीच्या अनेक घटकांनी एकत्र नांदावयास कसे शिकावे, हाच प्राचीन भारतीयांचा पेच आपल्यापुढे आलेला दिसत आहे.
 महाभारतातील दैवतकल्पना जास्त प्रमाणात वेद-ब्राह्मणकालीन आहे; पुराणकालीन नाही. महाभारतात मूर्ती व देवळे ह्यांचे उल्लेख नाहीत.* शिवस्तोत्र व विष्णुसहस्त्रनाम वा सूर्याची नावे ही मागाहून घुसडलेली व प्रक्षिप्त वाटतात.ही भांडारकर आवृत्तीत असली, तरी मागाहूनचीच आहेत, ह्यात शंका नाही. सूर्यपूजा (प्रातःकाली वा सायंकाळी) ही वर दिलेल्या तीन दैवतांच्या पूजांपैकी जुनी असण्याचा संभव आहे. त्र्यंबक वा शिव नंतरचा, व शांतिपर्वात आलेले विष्णुसहस्त्रनाम सर्वात शेवटचे असावे. महाभारतातील धर्म यज्ञप्रधान दिसतो. राजाचा पुरोहित अग्नी प्रज्वलित ठेवून रोजच्या आहुती देत असे. यज्ञामध्ये पशूची आहुती होतीच.अश्वमेधात नक्कीच,इतरांतही बहुतकरून असावी. तरीही पुढच्या काळात यज्ञक्रिया ज्या महत्त्वाला पोहोचली, तितक्या महत्त्वाला ती गेली नसावी.


  • ‘देवायतन' हा शब्द चार वेळा आलेला आहे. आदिपर्व ६४.४०, अनुशासन १०.१८, आश्वमेधिक ६९.१५ व भीष्मपर्व १०८.११. त्याचप्रमाणे भीष्मपर्व अध्याय १०८ यामध्ये निरनिराळे अशुभ शकुन कसे झाले, त्यांचे वर्णन आहे.त्यात देवायतनातील देवता कंप पावल्या, हसल्या, रडल्या,नाचल्या असे वर्णन आहे.ही सर्व वर्णने पुढील काळात येणाया साचेबंद वर्णनासारखी आहेत, म्हणून ती मागाहून घातल्यासारखी वाटतात. भीष्मपर्वातला श्लोक तर फारच पुढच्या काळातील वाटतो. त्यातील 'कुलदैवत' किंवा एखाद्या माणसाचे खास असे ‘दैवत' ह्या कल्पना उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयात वारंवार येतात. महाभारतात एकदाच आलेली ही कल्पना इतर गोष्टींशी संबंध नसलेली अशी आहे.
देवतायतनस्थाश्च कौरवेन्द्रस्य देवताः। कम्पन्ते च हसन्ते च नृत्यन्ति च रुदन्ति च।

 इंद्र, सूर्य, रुद्र ह्या देवता मानल्या होत्या व त्यांना हविर्भाग पोहोचवणारा अग्नी होता. स्वर्गाची वा इंद्रलोकाची कल्पना होती. नरकाची कल्पना इतकी स्पष्टपणे आलेली नाही पण ती असावी. पितृश्राद्ध होते. पुनर्जन्मावर व कर्मावरही विश्वास होता. त्याचबरोबर आत्मानात्मविचार व धर्म काय, अधर्म काय हाही विचार वारंवार येतो.
 धर्माचा पदोपदी एवढा ऊहापोह होऊनही धर्माच्या व्याख्या, कृती, खप व अंतरंग स्पष्ट झालेलेच नाही. महाभारतात आढळणारा तात्त्विक ऊहापोहातील हा कणखरपणा पुढे राहिला नाही. भक्तिमार्गाने सगळेच विचार बोथट झाले. काही दृष्टींनी मात्र धर्माचे साधारण स्वरूप तसेच राहिले. त्या धर्मातून निघणारे संप्रदाय बौद्ध, जैन, शैव, वैष्णव हे वगळले, तर हिंदूंचा धर्म अनामिक, लवचिक व व्यक्तिगतच राहिला.त्याला नाव दिले ते परकीयांनी, तोपर्यंत त्याला नावही नव्हते. आजही प्रत्येक विचारी हिंदूला धर्माचे पूर्ण स्वरूप सांगणे शक्य नाही. ‘मला काय वाटते, ते सांगतो', असेच तो म्हणेल. आपली ही अगतिकता अनुभवली म्हणजे ठामपणे हिंदू धर्माचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या पाश्चात्यांच्या प्रज्ञेचे व धार्ष्ट्याचे कौतुक वाटते.
 प्रत्येक प्रसंगी धर्म काय,अधर्म काय, ह्याची संवादात्मक चर्चा महाभारतात जितकी झाली आहे तितकी दुसऱ्या कोठच्याही पुस्तकात झालेली नाही. इतर पुस्तकांतून उदा. बायबल व कुराण.. धर्म काय ते ठाम सांगितले आहे. त्यावर संशय उत्पन्न होऊ दिलेला नाही. पण तशा तऱ्हेचे विवरण महाभारतात येत नाही. महाभारताची गोष्ट मनाचा ठाव घेते, ही ह्यामुळेच. मानवजीवित क्षणभंगुर आहे, असार आहे,त्याला काही अर्थ नाही, व्यक्ती एकटी आली, ती एकटी जाणार, अशा तऱ्हेची विचारसरणी व तीवर आधारलेले वैफल्यमय विदारक वाङ्मय फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका येथे गेल्या २५-३० वर्षांत विशेष झाले आहे.  मनात येते की, पश्चिमी साम्राज्याच्या अस्तानंतरचे हे वैराग्य आहे. अंतकाळच्या ह्या वेदना आहेत. जयाच्या क्षणाला ‘जयोऽयमजयाकारो भगवन् प्रतिभाति मे' म्हणून दुःखाने रडणारा धर्म किंवा आपण सगळ्यांना मारू शकू, ही खात्री असताही ‘एतान् न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन। अपि त्र्यैलोक्यराज्यस्य हेतोः। किं नु महीकृते॥' असे म्हणणारा अर्जुन ह्यांची धर्माची वा मानवी यशाच्या वैफल्याची जाणीव अधिक तीव्र व अधिक आतली वाटते.

न ही प्रपश्यमि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥

ही माणसे मरणार व आपण शोकाने झुरत राहणार, हे अर्जुनाला स्पष्ट, ठाम दिसत होते. अशावेळी ह्यांना मारूच नये; जे मिळणार, त्याची किंमत जबर आहे, असे वाटणे हे स्वजनाबद्दल प्रेम व दया दाखवते. श्रीकृष्णाचे उत्तर एका अर्थाने उत्तरच नव्हते. हे अन्यायी आहेत ह्यांना मारले पाहिजे, अशा तऱ्हेच्या न्यायावर आधारलेला एक भाग आहे; पण अर्जुनाचे उद्गार न्याय की अन्याय, ह्यावर आधारलेले नाहीत. मुख्य रोख आहे, तो न्यायान्यायावर नसून प्राप्त परिस्थिती व समाजातील स्थान ह्यांवर आहे. त्याचबरोबर मनुष्याचे जीवित क्षणभंगुर आहे, परत-परत येणारे आहे ह्यावरही रोख आहे. एकदा मनुष्याच्या विश्वातील स्थानाबद्दल विचार करावयास लागले, म्हणजे सर्वच क्षुद्र वाटू लागते. पण कृष्णाचे म्हणणे तसे नव्हते. ब्रह्मसत्यापर्यंत पोहोचले, म्हणजे इतर सर्वच मिथ्या. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी हे मिथ्यात्व गृहीत करून प्राप्त कर्तव्यापासून स्वतःला वाचवता येणे शक्य नाही, अशी त्याची भूमिका होती. एका दृष्टीने सर्वच मानवी मूल्ये सापेक्ष दिक्कालसापेक्ष म्हणून पूर्ण सत्य- नव्हेत. दुसऱ्या दृष्टीने अपरिपूर्ण अशा मानवयोनीत तीच दिशा दाखवतात व आयुष्यात अर्थ भरतात, असे कृष्णाचे सांगणे होते. अलिप्त रहावयाचे, पण नवीन वाङ्मयात आढळणारा 'Stranger' ‘(उपरा) किंवा केवळ 'Witness'(साक्षी) म्हणून नव्हे. तसे राहणे शक्यच नाही, ‘अर्जुना, किती नाही म्हटलेस, तरी तुला युद्ध केल्याशिवाय रहायचे नाही. (प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति।) मग अशा बलात्काराने, अनिच्छेने करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून, परिणाम लक्षात घेऊन युद्ध कर, आत्मविस्मृती होऊ न देता कर,' असे ते सांगणे आहे.
 भारतीय युद्धाच्या काळात भक्तिमार्ग प्रसृत झाला नव्हता. अर्जुन हा कृष्णाचा ‘भक्त' म्हणजे प्रियसखा होता. कृष्णाने कितीही जीव तोडून सांगितले, तरी ज्या दोघांना मारायचे नाही, असे अर्जुन म्हणाला, त्यांना त्याने मारले नाही. ‘कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि' असे तो म्हणाला. भीष्माला,- शिखंडीच्या शरांनी जर्जर झालेल्या भीष्माला मोठ्या नाईलाजाने त्याने खाली पाडले. भीष्म भूमीवर पडला, पडलेलाच राहिला. लढाईला वाट मोकळी झाली. द्रोणाला अर्जुनाने मारलेच नाही. पण त्या दोघांचे व इतरांचेही मरण त्याने पाहिले. आपला दुसरा प्राणच अशा कृष्णाचेही मरण पाहिले. जगातील सुखाचा व दुःखाचा, मानाचा व मानहानीचा पेला तो पुरेपूर भरलेल्या मापाने प्याला व आपल्या पायांनी चालत जाता येईल तितके जाऊन पडेल तेथे मरायचे, असे मरण त्याने पत्करले. अर्जुनच नव्हे तर इतरही सर्व... कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी असेच जगले व असेच मेले. धडपड करायची ती त्यांनी केली, प्रसंगी त्याग केला, पण काहीतरी लोकोत्तर मिळणार ह्या हावेने नाही. हा जो आयुष्याचा मार्ग त्याला साजेसाच कठोर धारदार असा महाभारताचा कथावृत्तान्तही आहे.
 ह्यापुढच्या काळातल्या मूल्यांच्या कल्पना, देवादिकांच्या कल्पना व वाङ्मय ह्यांचे सबंध वळणच निराळे आहे. एका दृष्टीने भावविश्व रुंदावले. सबंध मानवजातीबद्दल कणव उत्पन्न झाली. एका दृष्टीने विचारात शिथिलता आली. इतरांबद्दल करुणा वाटते, तिचा उगम स्वतःबद्दल वाटणाऱ्या करुणेमध्ये आहे. हायडेगरने ह्या भावनेचे पृथक्करण फार उत्तम तऱ्हेने केले आहे. असणे हा भाव(म्हणजेच जीव) हा नाशवंत असतो. जन्ममरण बरोबर घेऊनच तो येतो.

जेथ उदो होये अस्तवावेया चि लागि
मृत्यु उदयाचां परिवरी।गर्भ गिंवसी
ज्ञानदेवी : ९.४९७,४९८.

 जे असते, त्याला न असण्याची भीती कायम असते. आपल्या मनातली ही भीती दुसऱ्याबद्दलची कल्पून जीव (being) हा सर्व जगाच्या काळजीत गुंतून पडतो. म्हणजे विश्वाची चिंता, काळजी, भीती ही सर्व स्वतःविषयी वाटणाऱ्या काळजीचा इतरांवर केलेला अध्यारोप आहे. आजार, वार्धक्य व मृत्यू ही पाहून बुद्धाला उपरती झाली. ‘जितके जगात गुंतून पडू, तितकी भयस्थाने जास्त, म्हणून जगात गुंतून पडू नका,' हा बुद्धाचा उपदेश. अगदी ह्याउलट महाभारताची व ब्राह्मणांची शिकवण. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यूः' हा सगळ्यांच्याच तत्त्वज्ञानाचा पाया. 'ध्रुवं जन्म मृतस्य च' हा बुद्धाचा व कृष्णाचाही सिद्धान्त; हायडेगरचा नाही. पण एक जन्म असो वा अनेक असोत, सर्व मृत्यूतच नाश पावतात. म्हणून फलाशा न धरता उघड्या डोळ्यांनी कर्म कर, कर्मसंन्यास कठीण, जवळजवळ अशक्य, ही कृष्णाची शिकवण. शक्य तर संन्याय घ्या व गृहस्थाश्रमीच्या भिक्षेवर जगा, ही बुद्धाची शिकवण. आणि ‘जे आहे, ते हे. पुढे काही नाही. मागे काही नव्हते. ह्या परिस्थितीत फक्त येथचाच विचार करा. उगीच मूल्यांच्या नादी लागूच नका,' ही हायडेगरच्या सिद्धान्तावर आधारलेली सध्याच्या लेखकांची तिसरी भूमिका. पहिली भूमिका कणखर, दुसरी पलायनवादीच नव्हे, तर विरोधाने भरलेली. मोठ्या संख्येने संन्यास घेणाच्या भिक्षुना संपन्न, दानशूर, गृहस्थाश्रमी कुटुंबांच्या भिक्षेवरच जगावे लागते. म्हणून संन्यासधर्म टिकावयास गृहस्थाश्रमी आवश्यक, असा हा अंतर्गत विरोध अशा धर्मातून दिसून येतो. तिसरी भूमिका सर्वस्वी अगतिक आणि निराशावादी. दुसऱ्या व तिसऱ्या भूमिकेत असामान्य करुणा भरून राहिलेली आहे. पुष्कळदा existentialist लिखाण अती कठोर व विदारकही असते, पण त्याचा उगम ‘मानवी जीवन विफल आहे,' ह्या ठाम समजुतीत आहे.
 जे महाभारतकाली नव्हते, जे बुद्धकाली होते व हल्लीही आहे, ते म्हणजे विभूतिपूजन व संघपूजन. 'बुद्ध सरणं गच्छामि’ ‘संघ सरणं गच्छामि' हेच सूत्र हल्लीही फार प्रमाणात दिसून येते. ‘विभूती' ह्या ऐतिहासिक वा धार्मिक विभूती असतात, व ‘संघ' म्हणजे ह्या विभूतींनी स्थापलेले ख्रिस्ती, कम्युनिस्ट वगैरे संघ असतात. विभूतिपूजेपोटीच भक्तिमार्गाचा जन्म झाला. विभूती वा दैवत विफलतेपासून आपली सुटका करील, अशी एक आशा उत्पन्न झाली. तिच्या पोटी काही अतिएकतर्फी संहारास उद्युक्त करणारे, त्याचप्रमाणे अतिरम्य हृद्य लिखाणाबरोबरच स्वप्नाळू अवास्तव लिखाणही उत्पन्न झाले. दैवकल्पना, भक्तिभाव, एकेश्वरी पंथ, कठीण वास्तव विसरण्याचा प्रयत्न हे सर्व मागाहून आलेले-महाभारतात नाही असे. त्यादृष्टीने महाभारत युगान्तच. एकतर्फी संहारास उद्युक्त करणारे लिखाण भारतात झाले नाही. कारण भारत अनेक दैवतवादाला चिकटून राहिला, पण भारतातील लिखाण स्वप्नाळू झाले. महाभारतातील सर्वव्यापी निराशेची वा वैफल्याची भावना, कठोरपणा व वास्तवता पुन्हा भारतीय लिखाणात आलीच नाही. मनोभूमिकेतील व वाङ्मयातील फरक काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल.
 भरताने आपल्या नाट्यशास्त्रात स्पष्टच सांगितले आहे की, नाटक शोकान्त होता कामा नये. हा नियम पुढील नाटककारांनी या इमानाने पाळला की, मूळ शोकात्म कथासुद्धा ‘उत्तररामचरित'सारख्या नाटकात सुखान्त होऊ लागल्या. नायक, नायिका व त्यांची मुले ह्यांचे एका सुंदर कौटुंबिक मेळाव्यात शेवटी मीलन होऊ लागले.