माझे चिंतन/आमची फौजदारनिष्ठा

विकिस्रोत कडून





आमची फौजदारनिष्ठा





 आत्मा हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे हे दाखवून देण्यासाठी वेदान्तात नेहमी एक उदाहरण देतात. एका गुरूने शिष्याच्या हाती एक पक्षी दिला व 'जेथे तुला कोणी पाहात नाही अशा ठिकाणी जाऊन याला मारून टाक !' असे त्याला सांगितले. हे काम फारच सोपे आहे असे वाटून शिष्य त्या पक्ष्याला घेऊन अरण्यात गेला. शेतकरी, शिकारी, भिल्ल, कातकरी यांनीही पाहू नये म्हणून तेथून अगदी गर्द झाडीच्या मध्ये जाऊन तो उभा राहिला. घनदाट राईमुळे तेथे सूर्यकिरणही येत नव्हते. तेव्हा कोणी पाहात नाही अशी खात्री वाटून त्याने पक्ष्याला समोर धरले नि आता त्याची मान मुरगळणार तोच शिष्याच्या ध्यानी आले, की 'अरे ! इथे माझे हे कृत्य कुणी पाहात नाही असं कसं म्हणता येईल ? मी स्वतः ते पाहात आहेच की !' हे ध्यानात येताच तो गोंधळून गेला. कारण आपण कोठेही गेलो तरी आपण हे कृत्य पाहणारच; आणि त्यामुळे या पक्ष्याला 'कोणाच्याही नकळत' मारून टाकणे शक्य होणार नाही असे त्याला दिसू लागले. त्यामुळे तो तसाच परत गेला व "हे अशक्य आहे" असे त्याने गुरुजींना सांगितले. आपला आत्मा प्रत्येक ठिकाणी आपल्या कृत्याचा साक्षी आहे, हा विचार शिष्याच्या ध्यानी आलेला पाहून गुरुजींना आनंद झाला.

दंडसत्ता की लोकसत्ता ?

 आपल्या आत्म्याच्या सर्वसाक्षित्वाविषयी आपल्याला झालेली ही जाणीव आपण वेदान्तापुरती, परलोकापुरती मर्यादित न ठेवता, ऐहिक जीवनाच्या व्यवहारात पदोपदी जागृत ठेवावी अशी सध्याच्या समाजरचनेची अपेक्षा आहे आणि ही जाणीव आपण ठेवीत नाही हेच आपल्या सर्व दुःखांचे मूळ आहे. आपण स्वतःला मोठे धर्मनिष्ठ, संस्कृतिनिष्ठ, ध्येयनिष्ठ असे समजतो, पण प्रामाणिकपणे आपण आपल्या अंतर्यामी शोध केला तर आपण सर्व पोलीसनिष्ठ, फौजदारनिष्ठ लोक आहोत हे आपल्या सहज ध्यानात येईल.

समाजाचे, सरकारचे किंवा धर्माचे कायदे आपण केव्हा पाळणार ? चौका- चौकांत पोलिस उभा असेल तरच ! एरव्ही उजव्या बाजूने सायकल किंवा मोटार दडपून नेण्यास आपण मुळीच कचरत नाही ! काळा बाजार करण्याची खंत आपल्याला वाटत नाही. वकील असलो तर खोटा पुरावा देऊन खटले जिंकण्यास, डॉक्टर असलो तर वाईट औषधे देऊन रोग लांबविण्यास, शिक्षक असलो तर प्रश्नपत्रिका फोडण्यास, सरकारी अधिकारी असलो तर मुद्दाम प्रकरणे लांबणीवर टाकून पैसे दिले तरच ती आधी उरकावी या धोरणाचा अवलंब करण्यास आपल्याला कशाचीही क्षिती वाटत नाही. आपण काळजी फक्त एकच घेत असतो : " -- आपणास कुणी पाहात नाही ना? पोलीस शेजारी नाही ना? फौजदार आपल्याला पकडणार नाही ना?" तो पाहात नाही अशी खात्री असली की दुष्काळात अनाथांना वाटण्यास दिलेले पैसे स्वतः घेणे, खोटे मतदार दाखवून निवडणूक जिंकणे, आपल्या सग्यासोयऱ्यांना सरकारी कंत्राटे देणे, कॉर्पोरेशनच्या मालकीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात लोटणे, लोकल बोर्डात रस्त्याची आखणी करताना आपल्या घरावरून, शेतावरून रस्ता तयार करून घेण्याची कोशीस करणे यांत आक्षेपार्ह असे काही आपण मानीत नाही.
 आपण संस्कृतिनिष्ठ किंवा धर्मनिष्ठ असतो तर ही कृत्ये पापमय आहेत असे आपणास निश्चित वाटले असते; पण आपण फौजदारनिष्ठ असल्यामुळे तो जे पाहात नाही ते पापच नव्हे, अशी आपली श्रद्धा आहे. आपली श्रद्धा देवावर किंवा आत्म्यावर नसून पोलिसावर आहे! समाजाची वरील प्रकारे मान मुरगळताना, आपण स्वतः आपल्याला पाहात आहोत, ही भीती आपल्याला पुरेशी नाही. पुण्ये करावयाची ती फौजदाराच्या साक्षीने व पापे करावयाची ती देवाच्या किंवा आत्म्याच्या साक्षीने असे आपले धोरण आहे.
 जगात दंडसत्ता, लष्करी सत्ता, हुकूमशाही हा प्रकार जो निर्माण होतो तो आपल्या या फौजदारनिष्ठेमुळेच होत असतो. ज्या क्षणी चौकातल्या पोलिसापेक्षा आपण स्वतः श्रेष्ठ आहो असे आपणांस वाटू लागेल त्या क्षणी दंडसत्तेचे लोकसत्तेत रूपांतर होईल. पोलीस साक्षी असला तरच भ्यावयाचे, आपण स्वतः साक्षी असलो तर भ्यावयाचे नाही, ही वृत्ती आपण पोलिसाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजत असल्याची निदर्शक आहे. आपल्या नीतीचा, पुण्याचा रक्षणकर्ता पोलीस आहे, आपण स्वतः नाही, असे आपण ठरवून टाकले आहे. आणि आपणच असे ठरविल्यानंतर पोलिसी राज्य किंवा दंडसत्ता प्रस्थापित व्हावी यात नवल ते काय ? आपण स्वतः साक्षी असताना आपण समाजहिताचे, संस्कृतीचे, धर्माचे दंडक मोडणार नाही, समाजविघातक कृत्ये करणार नाही असे ज्या वेळी आपले ठरेल त्या वेळी आपले राज्य, म्हणजेच लोकराज्य प्रस्थापित होईल व ते यशस्वी होईल. आपण देवाला, आत्म्याला, विवेकाला पोलिसापेक्षा श्रेष्ठ मानण्याचे धोरण केव्हा अवलंबिणार एवढाच प्रश्न आहे.

'आता श्रम कशाला ?'

 परक्याच्या धनाचा अपहार करू नये, दुसऱ्याच्या हितसंबंधाचा नाश करू नये या नियमांचे पालन आपल्या हातून व्हावे एवढ्यासाठी आपल्याला पोलिसाची जरूर असते असे नाही. आश्चर्याची गोष्ट पुढेच आहे. स्वहितसुद्धा आपण पोलिसाच्या धाकावाचून करीत नाही! सरकारने कुळ कायदा केला आणि जमिनीविषयीची शेतकऱ्यांच्या मनातील अनिश्चितता कमी केली. 'आपल्या कष्टाचे फळ आपल्यालाच मिळेल' अशी ग्वाही त्याच्या मनाला सरकारने मिळवून दिली. यामुळे सर्वत्र अन्नधान्यांचे उत्पादन वाढेल, पिके जास्त येतील, अशी अपेक्षा करण्यात काहीच वावगे नव्हते; पण तसे घडले नाही. शेतकरी या आश्वासनाने उत्साही होण्याऐवजी ढिला झाला. जास्त उत्पादन करून आपण जास्त भोगावे ही वृत्ती त्याच्या ठायी निर्माण न होता, 'थोडा जास्त आळस करायला हरकत नाही' ही त्याची वृत्ती झाली. जपानी शेतकरी व येथला शेतकरी यांची तुलना सध्या नेहमी करण्यात येते. त्यात जपानी शेतकऱ्याच्या शेती करण्याच्या पद्धतीवर भर दिला जातो. त्या पद्धतीला महत्त्व आहे यात शंकाच नाही; पण त्यापेक्षा जास्त या शेतकऱ्याच्या वृत्तीला आहे.
 'सिक्युरिटी व लिबर्टी' म्हणजे निर्वाहाची शाश्वती आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा समन्वय कसा करावा हा लोकशाहीपुढचा फार गहन प्रश्न आहे. निर्वाहाची शाश्वती मिळताच मनुष्य जास्त उत्साहाने कामास लागेल अशी अपेक्षा असते. आणि त्यामुळे त्याने काम किती करावे, उत्पन्न धनाचा वापर कसा करावा, धनाची, जमिनीची, हत्यारांची खरेदीविक्री कशी केव्हा करावी इत्यादी बंधने त्याच्यावर घालण्याची जरूर नाही असे वाटते. पण शाश्वती मिळताच मनुष्य उत्साही न होता, 'आता इतके श्रम करून काय करायचे आहे' असे म्हणू लागला तर? फ्रान्समध्ये खाणी, कारखाने यांचे राष्ट्रीयीकरण झाले- म्हणजे ही सर्व उत्पादनसाधने जनतेच्या ताब्यात आली तेव्हा त्यांचे उत्पादन वाढण्याच्या ऐवजी भराभर घटू लागले. 'आपण श्रम करून उत्पादन करतो ते एकटा भांडवलवाला खाऊन टाकतो' ही कामगारांची पूर्वीची तक्रार होती; आता आपल्या श्रमाचे फळ जनतेला म्हणजे आपल्यालाच मिळावयाचे आहे, असे निश्चित होताच वास्तविक कामगारांनी पूर्वीच्या पेक्षा जास्त कष्ट करावे, उत्पादन वाढवावे; पण त्यांनी तसे केले नाही. स्वार्थी, क्रूर अशा भांडवलवाल्याच्या मुकादमाच्या नजरेखाली असला तरच तो काम करणार! म्हणजे स्वतःच्या बायकामुलांना भाकरी जास्त मिळेल हे विलोभन त्याला प्रेरक होऊ शकत नाही; तर मुकादमाचा आसूड प्रेरक होतो! मुकादमनिष्ठा हा पोलिसनिष्ठेचाच एक प्रकार होय. येथे लोकांनी असे दाखवून दिले, की स्वतःचे हित साधण्यासाठीसुद्धा आपल्यांवर सक्ती करावी लागते! आत्म्याची, विवेकाची, देवाची प्रेरणा पुरत नाही. फौजदाराची जड प्रेरणा अवश्य असते.

एक कोटीची उधळपट्टी

 आमच्या पुणे विद्यापीठाने बी. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी सध्या गृहपाठाची (ट्युटोरिअलची) पद्धत सुरू केली आहे. विद्यार्थ्याना दरसाल पाच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावयाचा असतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासविषयातील सहा प्रश्न म्हणजे एकंदर तीस प्रश्न वर्षभरात विद्यार्थ्यांनी घरी अभ्यासून लिहून आणले पाहिजेत असा नियम आहे. वास्तविक विद्यार्थ्यांना अत्यंत उपकारक असा हा नियम आहे. घरी इतके विषय वाचले जातात, लिहिण्याची सवय होते, आपल्याला लिहिता कसे येत नाही ते कळते, परीक्षेच्या वेळी एकदम भार पडत नाही, असे या पद्धतीचे अनेक फायदे असूनही हे गृहपाठ शक्य तो टाळण्याकडे बहुसंख्य विद्यार्थ्याची प्रवृत्ती असते! गृहपाठ न आले तर वर्ष बुडविण्याची धमकी देऊन विद्यापीठाने ती प्रत्यक्षात आणण्यास प्रारंभ केला तेव्हा कोठे विद्यार्थी नरम आले. तरीही वर्षातून अनेक वेळा धमकीच्या सूचना लावाव्या लागतातच. कडक सूचना फळ्यावर लागल्यावर भराभर गृहपाठ आणून देणाऱ्या, दीन चेहरे करून घरी भेटावयास येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून अडाणी शेतकऱ्यांच्यांत आणि या विद्वान विद्यार्थ्यांच्यांत काय फरक आहे असा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो. आपले यात हित आहे, हे गृहपाठ आपल्या फायद्याचे आहेत हे सर्वांना मान्य आहे. असे असूनही सक्ती केल्यावाचून, कोठला तरी दंड उगारल्यावाचून हे स्वहिताचे काम त्यांच्याकडून होत नाही; हाही फौजदारनिष्ठेचाच नमुना नव्हे काय ?
 परवा विद्यार्थ्यांना मी एक गमतीचा हिशेब सांगितला. पोलीस उभा नसेल तर हे विद्यार्थी दडपून वाटेल त्या बाजूने सायकली नेतात. ही गोष्ट अगदी क्षुद्र वाटते; पण हिशेब काय होतो तो पाहा. अतिशय गर्दी असेल तेथे पोलीस काही झाले तरी अवश्य आहेत; पण काही चौक असे आहेत, की नागरिकांनी आपण होऊन वाहनांचा कायदा पाळावयाचे ठरविले तर तेथे पोलिसाची गरज राहणार नाही. पण दडपून दुसऱ्या बाजूने जाण्यात आपल्याला गंमत वाटते; कायदा आपण होऊन पाळण्यात मेंगळटपणा वाटतो. हिंदुस्थानातल्या सर्व शहरांतील अशा चौकांचा हिशेब केला तर या अनावश्यक पोलिसांसाठी आपला एक कोटी रुपये दरसाल खर्च, असा हिशेब होतो ! हा हिशेब गमतीचा आहे असे मी वर म्हटले. वास्तविक तो प्राणघेणा हिशेब आहे; पण विद्यार्थ्यांना ती गंमत वाटते. म्हणून त्याला गमतीचा हिशेब असे म्हटले आहे.

आत्म्यास साक्ष ठेवून

 सध्या सरकारने देशात समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत; पग एकही योजना यशस्वी होत नाही! याच्या कारणांचा आपण विचार केला पाहिजे. कुळकायदा, ग्रामपंचायतींची स्थापना, अनेक प्रकारच्या सरकारी संस्थांची स्थापना, साक्षरताप्रसाराची मोहीम, अन्नधान्याची मोहीम, ग्रामविकास- योजना, पाटबंधाऱ्यांच्या योजना, आरोग्य केंद्रे- अनंत प्रकारच्या योजना आहेत; पण बहुतेक सर्व अयशस्वी होत आहेत. हे अपयश पाहून त्याचे खापर सर्वस्वी सरकारच्या माथी फोडण्याची चाल सर्वत्र रूढ आहे. या टीकेत मुळीच अर्थ नाही असे मला म्हणावयाचे नाही. सत्तारूढ पक्षावर जनतेने टीकेचे शस्त्र कायम धरणे लोकशाहीत अवश्य आहे, यात शंकाच नाही; पण तितक्याच कठोरपणे ते शस्त्र स्वतःवर धरण्याची लोकशाहीत जास्त आवश्यकता असते हे मात्र आपण सोयीस्कर रीतीने निरागस, निष्पाप चेहरे करून विसरून जातो!
 यापुढे सरकारने प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र. आरोग्य, शिक्षण व घर दिलेच पाहिजे, ही अपेक्षा आपल्या चित्तात जागरूकपणे वास करीत असते, आणि तिचा आविष्कारही आपण वेळी अवेळी करीत असतो; पण लोकांच्या या राज्यात प्रत्येक व्यक्तीने निरलसपणे, प्रामाणिक बुद्धीने, जनहितबुद्धी जागृत ठेवून, सामाजिक प्रबुद्धतेने, पोलिसाच्या दंड्याची अपेक्षा न ठेवता केवळ आत्म्याच्या साक्षीच्या प्रेरणेने, अहोरात्र कष्ट केले पाहिजेत, ही जाणीव त्या अपेक्षेबरोबर तितक्याच जागरूकपणे आपण बाळगीत नाही! कोणत्याही देशात गेलात तरी सरकार या संस्थेला काहीसे जड यंत्राचे स्वरूप येणे अपरिहार्य आहे. त्यात निरंतर चैतन्य खेळत ठेवण्याची जबाबदारी लोकनिष्ठ, स्वावलंबी संस्थांची आहे. 'स्टेट' व 'सोसायटी' या शब्दांत एका पंडिताने असा फरक केला आहे : सरकारच्या सक्तीच्या नियंत्रणाखाली कारभार करणारा समाज म्हणजे 'स्टेट' आणि स्वतःच्या जबाबदारीने, स्वावलंबनाने चालणारा समाज म्हणजे 'सोसायटी' असा फरक सांगून तो पंडित म्हणाला की, "ब्रिटन हे नऊदशांश सोसायटी आहे व एक- दशांश स्टेट आहे." ब्रिटनमध्ये लोकशाही यशस्वी होते यांतील रहस्य हे आहे.

हे भावी पिढीचे शिल्पकार

 ब्रिटनमधील सत्य युगातील गोष्टी ऐकून तसे प्रयोग येथे करावे असे कधी कधी कोणाच्या मनात येते. ब्रिटनमध्ये वर्तमानपत्रे विकणारे लोक पत्रांचा गठ्ठा रस्त्याच्या कडेला ठेवून शेजारी पैशासाठी एक पेटी ठेवतात; स्वतः विकण्यासाठी बसत नाहीत. पण लोक हवे ते वृत्तपत्र घेऊन प्रामाणिकपणे पेटीत त्याचे पैसे टाकतात, अशी आख्यायिका आहे. मुंबईला असा प्रयोग परवा करण्यात आला, तेव्हा वृत्तपत्रांचा गठ्ठा व पेटी दोन्ही चोरीस गेली! परवाच केंब्रिजला गेलेल्या एका विद्यार्थ्याचे पत्र आले. त्यात त्याने लिहिले आहे की, येथे ग्रंथशाळेत पुस्तके देण्याघेण्यास, नोंदण्यास कारकून ठेवलेला नसतो; विद्यार्थ्यांना पूर्ण मोकळीक असते. पुस्तक घ्यावे, स्वतः नोंद करावी, घेऊन जावे, काम झाल्यावर परत करावे, सही करावी. तसे येथे केले तर आमचे विद्यार्थी 'सरस्वती' वर सध्याच्या दसपट प्रेम करू लागतील! आणि दुसऱ्या दिवशी सरस्वतीचे रूपांतर लक्ष्मीत करून ग्रंथशाळेत कारकुनाची गरज नाही हे कलम केंब्रिजच्या बरोबरीने सिद्ध करून दाखवितील!
 सरकारवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने हे आत्मचरित्र वाचले तर सरकारवर टीका करण्याची गरज फारशी राहणार नाही. येथला अमुक एक वर्ग या वृत्तीचा नाही असे नाही. 'मी स्वतः पाहात आहे, तेव्हा अपकृत्य करू नये' इतकी स्वतःविषयी उच्च भावना येथे निर्माणच झालेली नाही. विद्यार्थ्यांच्याच गोष्टींची जरूर नाही. परवा दिल्लीला राष्ट्राध्यक्षांनी शिक्षकांविषयी आपुलकी वाटून, ते भावी पिढीचे मार्गदर्शक आहेत, शिल्पकार आहेत हे जाणून चार हजार प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रपति भवनात निमंत्रण दिले. त्यावेळी या 'शिल्पकारां' नी तेथल्या मूळच्या शिल्पकलेवर पानतंबाखूच्या पिचकाऱ्या टाकल्या, सामानाची खराबी केली आणि बऱ्याच कपबश्या फोडल्या! ते परत गेल्यावर शिक्षणखात्याच्या अधिकाऱ्यामार्फत या मार्गदर्शकांना तंबी देऊन अध्यक्षांना मार्गदर्शन करावे लागले! आगरकरांनी म्हटले आहे, की "नियमन आणि संवर्धन ही सरकारची दोन कामे; ज्या देशात नियमनातच सर्व शक्ती खर्च होते- म्हणजे जेथे लोक फौजदारनिष्ठ आहेत तेथे संवर्धनाला शक्ती शिल्लक राहात नाही व देशाची प्रगती होत नाही."

मनोभूमीची नवी मशागत

 वर्षानुवर्षे आपण आपल्या शेतात एक पीक काढीत राहिल्यानंतर पुढे त्याच जमिनीत निराळे पीक काढण्याचा जर आपण विचार केला तर आपली जमीन कसण्याची व मशागतीची पद्धत सर्वस्वी बदलणे अवश्य आहे हे कोणालाही पटण्याजोगे आहे. खत बदलावे लागेल, पाणी कमीजास्त करावे लागेल, बांध उंच किंवा खालपट कर।वे लागतील, नांगरट जास्त खोल करावी लागेल, पिकांचा हंगाम बदलणे भाग पडेल असे अनेक प्रकारचे बदल करावे लागतील. त्याचप्रमाणे शतकानुशतके ज्या भूमीत आपण राजसत्तेची प्रस्थापना केली होती त्याच भूमीत आता लोकसत्तेची उभारणी करताना या नव्या रोपाची मशागत व त्याची जपणूक करण्याची पद्धत सर्वस्वी निराळी असली पाहिजे हे अगदी सहज ध्यानात येण्याजोगे आहे. येथे आपणांस लोकशाहीच नव्हे तर समाजवादी लोकशाही स्थापावयाची आहे!
 सोव्हिएट रशियात समाजवाद आणावयाचे ठरले व त्याची पहिली पायरी म्हणून उत्पादन- साधनांवरील धनिकांचे स्वामित्व नष्ट करण्यात आले; पण ही फक्त बाह्य घडामोड झाली. आंतरिक घडामोड कोणती करावी लागली ? कारखाना काढावा, माल खपवावा, भांडवल गुंतवावे, बाजारपेठ शोधावी, स्पर्धेला तोंड द्यावे, जगभर हिंडावे हा व्याप फार प्रचंड आहे; हा करावयाचा तर त्याला पैशाचे, फायद्याचे तसेच जबरदस्त विलोभन हवे; ते नसेल व उत्पादनसाधने घेतल्यावर मी नुसता पगारी नोकरच राहणार असेन, तर मी इतका प्रचंड व्याप काय म्हणून करावा, असा प्रश्न येतो. त्याला उत्तर दिले नाही, म्हणजे दुसरे तसेच विलोभन निर्माण केले नाही तर मनुष्य काम करण्यास, जीव पणाला लावून कष्ट करण्यास तयार होत नाही! रशियातील मनुष्य याला अपवाद नव्हता. यामुळे तेथे भयानक अशी जुलमी राजवट निर्माण झाली. सध्या भारतापुढे तशीच बिकट समस्या येऊन पडली आहे. येथे लोकशाहीसाठी अवश्य अशी जी वृत्ती समाजात निर्माण होणे अगत्याचे आहे, ती वृत्ती आपण स्वत: होऊन निर्माण करणार आहोत की येथेही या दंडाची, हुकूमशाही दंडुक्याची अपरिहार्यता भासणार आहे ही ती समस्या आहे. आपण आपला सर्वस्वी कायाकल्प करून घेतला तरच आपल्याला भेडसावणारी यमदंडाची आपत्ती टळण्याचा संभव आहे. आपल्या मनाची मशागत अगदी निराळ्या पद्धतीने आपण केली तरच हे नवे पीक भरघोसपणे आपणास काढता येईल.
 फार पुरातन काळापासून आपण स्वतःला समाज असे म्हणवीत आहो. भारतीय समाज, हिंदुसमाज, आर्यसमाज असा आपण इतिहासात स्वत:चा निर्देश केला आहे, आणि भाषेच्या सोयीच्या दृष्टीने ते योग्यच आहे. मला सांगावयाचे आहे ते हे, की असा 'समाज' म्हणून जरी आपण स्वतःचा निर्देश करीत असलो तरी सामुदायिक जीवनाची कसलीही जाणीव निर्माण करण्याची आपण खटपट केलेली नाही. आपण एकमेकांच्या शेजारी राहात होतो, एका भूमीवर वाढत होतो इतकेच. सर्व समाजाच्या अन्नवस्त्राची, विद्येची, संस्कृतीची नीतिअनीतीची चिंता वाहण्याची पद्धतच येथे कधी निर्माण झाली नव्हती. सार्वजनिक कार्ये सर्व राजाने करावयाची अशी रूढी होती. हे येथेच होते असे नाही, सर्व जगभरच तसे होते. युद्धाच्या काळीच फक्त सामुदायिक जीवनाची जाणीव आपणास होत असे आणि तीही फार मर्यादित. कारण आपण लढाया करीत होतो ते राजाचे पगारी नोकर म्हणून. पूर्वी सर्व सैन्ये भाडोत्रीच असत. अशा या जीवनाच्या पातळीतून पूर्ण सामुदायिक जीवनाच्या पातळीवर आपणांस आता चढावयाचे आहे. लोकशाही, समाजवादी लोकशाही याचा हाच अर्थ आहे. आणि सहकारी तत्त्वावर सामाजिक जीवन निर्माण करणे हे यापुढे आपले ध्येय असले पाहिजे.

सहकारी वृत्तीची जोपासना

 ब्रिटनमध्ये पाचशे वर्षे प्रयत्न करून ठेचा खात, प्रयोग करीत, तत्त्वे ठरवीत, सिद्धान्त बांधीत या प्रयत्नांत लोकांनी पुष्कळच यश मिळविले आहे; पण त्याला पाचशे वर्षे लागली. रशियात ते कार्य दंडसत्तेने अल्प कालात सिद्ध झाले आहे, असे म्हणतात. ब्रिटन इतका कालावधी न लावता आणि दंडसत्तेचा आश्रय न करता आपल्याला ते साधेल का, हा प्रश्न आहे. सरकारने खेडेगावच्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकऱ्यांना कर्जे, तगाई सुलभपणे मिळावी म्हणून अनेक ठिकाणी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या; पण लोकांनी त्या सर्व विफल करून टाकल्या आहेत! आणि आपले उद्दिष्ट तर असे आहे, की केवळ आर्थिकच नव्हे, तर आपले सर्वच व्यवहार सहकारी पद्धतीने व्हावे. शेती, उत्पादित मालाची खरेदी- विक्री, गावातील घरे, रस्ते, पाटबंधारे यांची बांधणी- सर्व, सर्व व्यवहार सहकारी पद्धतीने झाले तरच लोकशाहीला अवश्य ते विपुल धन निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येईल. सध्या विपुल धन निर्माण झाल्यानंतर समाजाने ज्या आकांक्षा धरावयाच्या तेवढ्या मनात बाळगून त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर संग्राम करावा अशी वृत्ती तेवढी तयार झाली आहे ! विपुल धन निर्माण करण्यास अवश्य ते सहकारी जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र आपण करीत नाही.
 सहकारी पद्धतीच्या जीवनाची काही उदाहरणे प्रत्यक्ष पाहिल्यावाचून त्याची कल्पना येणार नाही. सुदैवाने आपल्या देशात ही कल्पना रुजत जाऊन कोठे कोठे तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. इतर ठिकाणी ही उदाहरणे उद्बोधक ठरतील म्हणून त्यांचा निर्देश करीत आहे.
 खानदेशात धुळ्याजवळ मोरणे या गावी दशरथ पाटील यांनी या तऱ्हेचा एक उत्कृष्ट प्रयोग केला आहे. दुष्काळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांनी गावाजवळचा नकाण्याचा कोरडा पडत चाललेला तलाव सहकारी शेतीसाठी घेतला व त्यातील पन्नास एकरांची सहकारी पद्धतीने मशागत करून आता त्यात पिके उभी केली आहेत. जमिनीची साफसफाई, नांगरट, पेरणी वगैरे सर्व कामे सर्व गावाने केली आहेत. पाच रुपयांचा एक असे २०० भाग काढून जमलेल्या भांडवलाच्या रूपाने प्रारंभीचा खर्च करण्यात आला आहे. पिकांची रखवाली सगळा गाव अशाच सहकारी पद्धतीने करीत आहे. त्यामुळे चोरामारीचा, पिके कापली जाण्याचा संभव नाही.
 सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर गावी डॉ. मोडक यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आज दहाबारा वर्षे सहकारी पद्धतीने श्रम करून रस्ते, देवालये, शाळा अशी जवळजवळ पन्नास हजार रुपयांची कामे केली आहेत.
 पुण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार गोंधळेकर यांनी काही मित्रांच्या साह्याने 'नवा गाव' नावाची संस्था स्थापन केली आहे. वाल्हे या गावी नुकतेच त्यांनी तेथील वस्तूंचे एक प्रदर्शन भरविले. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकारी वृत्तीला चालना मिळून आता सहकारी पद्धतीने गावाजवळ बंधारा बांधण्याची योजना ते आखीत आहेत.
 उत्तर प्रदेशातील बातमी वर्तमानपत्रात आली आहे. ती फारच आशादायक आहे. लोकसत्ताक- सप्ताहात त्या राज्यातील २० लक्ष लोक सामील झाले होते. त्यांनी या पद्धतीने ७८०० मैल लांबीचे रस्ते बांधले, २४३ तळी बांधली, अनेक विहिरी खणल्या, कालवे खोदले आणि शाळा, देवालये यांसाठी अनेक इमारती बांधल्या.

मानवतेचा साक्षात्कार

 ही वृत्ती प्रसृत झाली तर आज सरकारी साहाय्यावाचून अडून पडलेली अनंत कामे भराभर सिद्धीस जाऊन आपल्या देशात विपुल धन निर्माण होईल. पण या पद्धतीने कामे झाल्यास सर्वांत मोठा फायदा होईल तो हा, की लोकशाहीला अवश्य तो नवा माणूस, नवा नागरिक यातून निर्माण होईल. आपल्या जीवनाचे कायदे दुसऱ्या कोणी करून ते आपल्याकडून सक्तीने पाळून घेणे याचे नाव पारतंत्र्य आणि आपले कायदे आपणच करून स्वखुषीने पाळणे याचे नाव स्वातंत्र्य. प्रत्येक गावी पाटबंधारे, शेती, शाळा आणि गावचा सर्व कारभार सहकारी पद्धतीने होऊ लागला तर स्वतंत्र्याचा खरा अर्थ लोकांना कळेल, एवढेच नव्हे तर तो त्यांच्या आचरणात येईल आणि या प्रयत्नांतच जातिभेद, वर्गभेद, गावात विनाकारण माजलेल्या फळ्या यांचा लोप होईल. रिकामपणामुळे, दारिद्र्यामुळे, गटबाजीमुळे निर्माण होणारे अनेक दुर्गुण नाहीसे होतील, आणि माणसाचा पुनर्जन्म होईल. सहकारी पद्धतीचे सर्वात जास्त महत्त्व असेल तर ते यासाठी आहे.
 जबाबदारीची जाणीव, अहोरात्र केलेले कष्ट आणि समोर दिसणारी सुबत्ता यामुळे मनुष्याच्या वृत्तीतील हीन गुण जळून जाऊन त्याचे सत्त्वगुण वाढीस लागतात. आणि सहकारी पद्धतीत हे सर्व गुण एकवटलेले असल्यामुळे तिच्या आश्रयाने आपली लोकसत्ता अगदी अल्पावकाशात सार्थ होण्याची शक्यता आहे. दंडसत्तेचा आश्रय न करता आणि प्रदीर्घ कालावधी न लावता या देशात समृद्धी व स्वास्थ्य निर्माण करून येथील लोकसत्ता सार्थ व समर्थ कशी करावी ही भारतापुढे येऊन पडलेली समस्या या एकाच मार्गाने सोडविता येईल.
 पण त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या वृत्तीत पालट झाला पाहिजे. आपण स्वतः आपल्याला पाहात आहो ही भीती पुरेशी असली पाहिजे. आपल्या नीतीचे, कर्तव्यबुद्धीचे, समाजहिततत्परतेचे आपले आपणच संरक्षक आहो, त्यासाठी पोलिसाची आवश्यकता नाही अशी भावना आपल्या मनात उदित झाली पाहिजे. सध्या पोलिसशिपायाला आपण स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतो; त्याला भितो. त्याऐवजी स्वतःला श्रेष्ठ मानून आपण आपल्याला भिऊ लागलो तर लोकशाहीच्या नवयुगास भारतात प्रारंभ होईल यात कसलाही संदेह नाही.

(एप्रिल १९५३)