माझे चिंतन/चौथ्या दशांशाची दक्षता

विकिस्रोत कडून



१०

चौथ्या दशांशाची दक्षता !





 १८७० साली सप्टेंबर महिन्यात फ्रान्सच्या उत्तरपूर्वेस असलेल्या सेडान या गावाजवळ जर्मनी व फ्रान्स या दोन देशांमध्ये अत्यंत घनघोर असा संग्राम झाला. या संग्रामात फ्रान्सच्या सर्व सेना धुळीस मिळून त्या राष्ट्राचा अगदी निःपात झाला. या प्रबळ अशा राष्ट्राची अशी अवस्था का झाली हे पाहणे फार उद्बोधक होईल असे वाटते.
 १४ जुलैला फ्रेंच सेना पॅरिसहून निघाल्या तेव्हा त्यांचा उत्साह काही अपूर्वच होता. सैनिकांच्या तोंडून निघणाऱ्या 'चलो बर्लिन, चलो बर्लिन' या घोषणांनी आकाश कोंदून गेले होते. सेनानींनाही आत्मविश्वास होता आणि आपण बर्लिनचा पाडाव करून जर्मनीला जमीनदोस्त करू याबद्दल कोणालाच शंका नव्हती. बादशहा तिसरा नेपोलियन मोठ्या दिमाखाने आघाडीकडे निघाला. 'आपण तेथे पोचण्याच्या आधीच मेट्झच्या छावणीवर आम्ही ४ लक्ष सैन्य जय्यत तयार ठेवतो,' असे त्याच्या सेनापतींनी त्याला आश्वासन दिले होते.
 पण बादशहा मेट्झला येऊन पोचला तेव्हा तळावर दोन लक्षच फौज आलेली त्याला दिसली. यामुळे तो संतापला. पण संताप तसाच गिळून आलेल्या सेनेची व्यवस्था तरी नीट आहे ना हे पाहण्यासाठी तो शामियान्यातून बाहेर पडला. सगळ्या छावणीभर फेरी झाली, तरी सैन्याच्या रोटीची व्यवस्था त्याला कोठेच दिसली नाही, म्हणून त्याने चौकशी केली. कोठीच्या अधिकाऱ्याने घाबरत घाबरत येऊन सांगितले की, दाणागोटा आहे पण तो वीस मैलांवर आहे. 'आताच्या आता दोन तासात 'शिदोरी' येथे आणवा,' असे बादशहाने वाहतूक अधिकाऱ्यास सांगितले. थोड्या वेळाने परत येऊन त्याने सांगितले की, 'सरकार, मालगाडीच्या वाघिणी आहेत, पण त्या येथून तीस मैलांवर आहेत. बादशहाचा संताप अनावर झाला. दोन लक्ष लोकांना उपाशी ठेवायचे की काय ? वाघिणी असलेल्या ठिकाणी तारा गेल्या. तेथील अधिकाऱ्याने कळविले की, वाघिणी आहेत, पण त्यांना चाके नाहीत! आता बादशहा हतबुद्धच झाला. शेवटी, तोफखान्याचे घोडे सोडून ते गाड्यांना जोडून दाणागोटा आणावा, असा त्याने हुकूम दिला.
 मग लढाईची व्यवस्था पाहावी असे त्याच्या मनात आले. या वेळी सैनिकांना 'ब्रीच लोडिंग' या नावाच्या अगदी नव्या तऱ्हेच्या बंदुका देण्यात आल्या होत्या. या त्या काळी प्रचलित असलेल्या इतर कोणत्याही बंदुकांपेक्षा जास्त मारक होत्या. त्या हाती देऊन संचलन करण्यास सांगा, असे त्याने फर्माविले. बंदुका घेऊन सैनिक उभे राहिले. बादशहा तपासणी करू लागला. सैनिकांनी बंदुका अशा अजागळासारख्या धरल्या होत्या की बादशहाला अनेक शंका येऊ लागल्या; म्हणून त्याने चारपाच सैनिकांना विचारले. ते म्हणाले 'या बंदुका आजच प्रथम आमच्या हाती दिलेल्या आहेत. आम्ही यापूर्वी त्या केव्हाच पाहिल्या नव्हत्या; त्या कशा धरावयाच्या व चालवावयाच्या याची आम्हांला काही कल्पना नाही.' बादशहा संतापाने लष्करी अधिकाऱ्यांकडे पाहू लागला. खाली मान घालून ते म्हणाले, 'सरकार, ते शिकवावयाचे राहून गेले आहे.'
 'मग सर्व उद्योग सोडून आज रात्रभर ते शिक्षण आधी द्या.' बादशहाने आज्ञा दिली.
 'होय सरकार.' माना जास्तच खाली घालून लष्कराधीश म्हणाले, 'पण... पण... या बंदुकांचे तज्ज्ञ शिक्षक छावणीवर नाहीत. त्यांना काही दुसऱ्या कामासाठी बोर्डोला (फ्रान्सच्या दुसऱ्या टोकाला) पाठविले आहे.'
 निराशा, भीती, संताप यांनी बादशहा पराकाष्ठेचा खवळून गेला. त्याचे मस्तक बधिर होऊन गेले. तो तसाच छावणीत गेला. विछान्यावर अंग टाकल्यावर आपली सध्याची भौगोलिक अवस्था तरी काय आहे हे पाहावे असे मनात येऊन त्याने फ्रान्सचे लष्करी नकाशे मागविले. त्या अधिकाऱ्याने येऊन सांगितले की, 'जर्मनीवर चढाई करावयाची, बर्लिनवर चालून जावयाचे, असा बेत निश्चित झाला असल्यामुळे आम्ही फक्त जर्मनीचे नकाशे बरोबर आणलेले आहेत. फ्रान्सचे नकाशे लष्कराबरोबर आणलेलेच नाहीत.'
 फ्रेंच लष्करात असा गोंधळ होता. उलट जर्मन सेना यंत्रासारख्या हलत होत्या. बिस्मार्क, रून व मोल्टके यांच्या योजना ठरलेल्या होत्या, मार्ग आखलेले होते व धोरणे निश्चित झालेली होती. कल्पनाशक्ती, निश्चय, साहस या गुणांनी त्यांचे अधिकारी संपन्न होते. फ्रान्स व जर्मनी यांच्या या संग्रामाचे पर्यवसान काय झाले ते जगाला माहीतच आहे. सेडानला लढाई झाली नाही, कत्तल झाली असे इतिहासकार म्हणतात.
 आपल्या देशातल्या कोणत्याही संस्थेच्या कारभाराकडे पाहिले म्हणजे मला सेडानच्या लढाईतल्या फ्रेंचांच्या मेट्झच्या छावणीची आठवण होते. येथल्या म्युनिसिपालिट्या, एस् एस्. सी. बोर्डासारखी परीक्षामंडळे, पोष्टासारखी खाती, नित्य नवीन निघणाऱ्या कंपन्या, कारखाने, बँका, निरनिराळे क्रीडासंघ यांचे कारभार पाहिले म्हणजे असे वाटते की, दुर्देवाने आपल्यावर एखाद्या युद्धाची आपत्ती ओढवली तर आपली स्थिती या फ्रेंच सेनेसारखी झाल्यावाचून राहणार नाही. कर्तृत्व, कार्यक्षमता, व्यवस्था यांचा आणि आपला सात जन्मांत कधी संबंध आला होता की नाही, अशी शंका यावी, अशीच आपली सध्या स्थिती झाली आहे. आपल्याठायी उत्साह भरपूर आहे, थोडा जास्तच आहे! आपल्या आकांक्षा फार मोठ्या आहेत. आपण लवकरच जगाला मार्गदर्शन करून त्याच्या गुरुस्थानी आरूढ होणार आहोत. आध्यात्मिक सामर्थ्याने तर आपण फारच संपन्न झालेले आहो आणि त्यामुळे युरोपच्या भौतिक सामर्थ्याला वाकुल्या दाखविण्याचा कार्यक्रम रोज आपण एकदा तरी करतोच. तेव्हा उत्साह, आकांक्षा दिव्यदृष्टी, आध्यात्मिक बल इत्यादी गुणांची श्रीमंती आपल्या ठायी आलेली आहे; पण असे ध्यानात ठेवले पाहिजे की, हे गुण फ्रान्सजवळही होते, तरी त्याची धूळधाण झाली. तेव्हा ऐहिक, व्यावहारिक यशाचा व या गुणांचा संबंध फार थोडा असावा असे वादापुरते तरी आपण मान्य केले पाहिजे.
 या कर्तृत्वहीनतेची, नालायकीची नादानीची चिकित्सा करताना एक गोष्ट ध्यानी धरली पाहिजे की, या बाबतीत केवळ नेते, अधिकारी किंवा त्या त्या स्थानावरचे सूत्रधार यांना दोष देऊन स्वस्थ बसणे हे युक्त नाही. अपयशाचा मोठा वाटा त्यांच्या माथी जाईल हे खरे; पण एवढेच म्हणून भागणार नाही. दर क्षणाला पन्नास घटना घडत असतात आणि त्यांची जबाबदारी व चिंता निरनिराळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविलेली असते. या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयापुरती कामाची वाटणी शेवटच्या कारकुनापर्यंत केलेली असते. धोरण आखणे, दिशा ठरविणे, योजना करून देणे हा कोणत्याही कार्याचा एक भाग असतो आणि योजनांप्रमाणे उठाव करणे हा त्याचा दुसरा भाग असतो. दुर्दैव असे की आपल्या देशात या दोन्ही भागांत कार्यक्षमतेचे दारिद्र्यच आहे. पण हे मान्य केले तर उत्तर भागांतील कार्यक्षमतेची जी उणीव, जे दारिद्र्य, त्याचे अपश्रेय बहुसंख्य जनतेकडेच जाईल. तेव्हा चिकित्सा करताना सर्वांनी अंतर्मुख दृष्टी ठेवली पाहिजे हे उघड आहे.
 चिकित्सा करू लागताच आपल्यातील पहिला मोठा दोष माझ्या ध्यानात येतो तो असा : माणसाच्या अंगचा प्रत्येक गुण हा कोणत्या तरी विशिष्ट वृत्तीतून निर्माण होत असतो आणि ही वृत्ती त्याच्या मनावर ज्या तत्त्वज्ञानाचा पगडा असतो त्यातून उद्भूत होत असते. साहस, अविरत संग्राम करण्याची चिकाटी इत्यादी गुण युरोपीय लोकांत दिसतात ते त्यांच्या भौतिकवादावरील निष्ठेमुळे व ऐहिकावरील प्रेमामुळे निर्माण झालेले आहेत. हे प्रेम नाही म्हणजे हे गुण नाहीत किंवा असलेच तर फार अल्प प्रमाणात, निजोर अवस्थेत असावयाचे. कार्यक्षमता या गुणाचे असेच आहे. त्याचे मूळ अशाच एका तत्त्वज्ञानात आहे आणि त्याच्या अभावाकडे मला वाचकांचे लक्ष वेधावयाचे आहे.
 कोणत्याही कार्याचे यश हे योजना, आखणी, त्याची अंमलबजावणी, शिस्त, नियमितपणा, सावधता, शास्त्रीय व तांत्रिकज्ञान, संघशक्ती यावर अवलंबून असण्यापेक्षा ते कार्य करणाऱ्याच्या मनाची शुद्धता, त्याचे उच्च संकल्प, त्याच्या हेतूची पवित्रता, त्याच्या मनातील भूतदया, त्याचे श्रद्धायुक्त अंतःकरण, त्याचे निरागस, निष्पाप, बालसदृश मन यांवर अवलंबून आहे असा एक समज, अशी एक श्रद्धा आपल्या मनात खोल मूळ धरून बसलेली आहे. मागल्या काळी सर्व काही परमेश्वरी कृपेवर, दैवाच्या अनुकूलतेवर आणि नशिबाच्या फाशावर अवलंबून आहे असा भाव होता. तो आता नष्ट झाला आहे हे खरे; पण त्याच्या जोडीचा हा दुसरा समज, हा दुसरा भाव अजून नष्ट झालेला नाही. मनाची शुद्धता, निरागसता, एवढेच नव्हे तर भोळेपणा, भाबडेपणा याची काही विशेष महती आहे अशी आपली समजूत आहे. अध्यात्मामध्ये व परमार्थक्षेत्रात केवळ भोळ्या भावाने सिद्धी प्राप्त होते हे तर अनेक संतमहंतांनी सांगितलेच आहे. सर्व भरिभार पांडुरंगावर, गुरुचरणांवर व संतांवर घालून आपण निश्चिंत व्हावे; त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे, त्यांचे दास होणे एवढेच आपले काम अशी त्या क्षेत्रात शिकवण आहे. तेथे भोळेपणा, भाबडेपणा, श्रद्धाळूपणा, व्यवहारशून्यता हीच भूषणे मानलेली आहेत. याच वृत्तीचे तेथे माहात्म्य आहे आणि दुर्दैव असे की, ऐहिक क्षेत्रातही असा एक समज अगदी उघडपणे नाही तरी आपल्या मनात खोलवर कोठे तरी वास करून आहे. या गुणांना भोळेपणा, भाबडेपणा, अजागळपणा असे नाव दिले तर आपण हे कबूल करणार नाही; पण निरागसपणा, बालभाव, श्रद्धाळूपणा ही नावे दिली तर आपल्या हे ध्यानात येईल की, या गुणांचा मोह आपल्याला फार आहे. आपण प्रामाणिकपणे आपल्या मनाच्या सर्व विभागांचा शोध घेतला तर हे गुण असण्यात आपण भूषण मानतो असे आपल्याला आढळून येईल. वास्तविक कार्यकर्त्या पुरुषाला, 'त्याचे मन बालसदृश आहे,' हे उद्गार प्रशंसापर न वाटता शिवीसारखे वाटणे अवश्य आहे; पण आपली दृष्टी तशी नाही.
 येथे एक गैरसमज होण्याचा संभव आहे म्हणून खुलासा करतो. सार्वजनिक कार्यकर्त्याच्या ठायी सचोटी, सत्प्रवृत्ती, संयम, निःस्वार्थबुद्धी, सेवावृत्ती, जनहित- परायणता हे गुण असले पाहिजेत याबदल वाद नाही. किंबहुना कार्यक्षमता, कुशाग्रता, सावधता, कारस्थानपटुता इत्यादी जे गुण वर सांगितले त्यांच्याही आधी निर्लोभवृत्ती, भूतदया, उदारदृष्टी हे गुण अवश्य आहेत; पण त्यांचा आणि आपण ज्यांवर आसक्त आहोत त्या बालभावादी गुणांचा, श्रद्धेचा, आस्तिक्यबुद्धीचा काही एक संबंध नाही. निर्लोभी, निःस्पृह सत्प्रवृत्त असा माणूसही दक्ष, कुशाग्र, कारस्थानी, कठोर असा असू शकतो आणि असा तो असला तरच तो यशस्वी होतो. आपले दुर्दैव असे की, आपल्याठायी कार्यक्षमतेस अवश्य असणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या गुणांचा अभाव आहे; पण त्याहून मोठे दुर्दैव असे की, पहिल्या प्रकारच्या गुणांची महती आपण जशी जाणली आहे तशी दुसऱ्या प्रकारच्या गुणांची जाणलेली नाही; किंबहुना त्यांचा काहीसा तिटकारा आपल्या मनात आहे आणि बालभाव, भोळेपणा, अजाण भाबडी वृत्ती यांचा मोह आपल्याला आहे. काहीजणांच्या मनात असा अगदी तिटकारा नसला तरी त्यांचा असा समज आहे, की, हृदय निर्मळ असले की निर्मळ बुद्धी ही प्राप्त होतेच होते. हे दोन्ही प्रकारचे गुण एकरूपच आहेत असे ते मानतात; पण ही भूमिका सुद्धा फार थोड्या लोकांची आहे. बहुसंख्य लोकांना भोळेभाबडेपणाचेच महत्त्व विशेष वाटते; बुद्धीच्या गुणांचे त्यांना वावडे आहे. असे जर नसेल तर पुढील उपदेशाची संगती तुम्ही कशी लावाल?
 एका फार मोठ्या संस्थेच्या प्रमुखांनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना असे उद्गार काढले : 'मला माणसे कशी हवी ते सांगतो. रामकृष्ण परमहंस यांच्या जवळ एक सेवक होता. त्याला कागदावर 'अ' हे अक्षरसुद्धा काढता येत नसे. कसलाही व्यवहार त्याला समजत नसे. फुले आण म्हटले फुले आणावी, पाणी आण म्हटले पाणी आणावे आणि एरवी रामकृष्णांच्या पायाशी बसून राहावे, अशी त्याची वृत्ती होती. आणि रामकृष्ण त्याच्यावरच खरे प्रसन्न असत. या रामकृष्णांच्या सेवकासारखे कार्यकर्ते मला पाहिजे आहेत.' अजागळपणाची याहून जास्त प्रशंसा अन्यत्र कोठे सापडेल का ?
 भोळेपणा, साधेपणा, भाबडेपणा यांच्या या प्रशंसेचे बीज वर सांगितल्याप्रमाणे आपल्या परमार्थवृत्तीत, अध्यात्मवृत्तीत आहे. देव भावाचा भुकेला आहे, त्याला दुसऱ्या कशाचीही गरज नाही आणि देवावाचून दुसरे काही प्राप्तव्य नाही, अशी आपली श्रद्धा असल्यामुळे कार्यक्षमतेला अवश्य असलेल्या गुणांची अवहेलना करण्यास आपण चटावलो आहो. केवळ श्रद्धा, पावित्र्य, हेतूची शुद्धता यांनी कार्य होते, यशप्राप्ती होते असा भ्रम आपण बाळगून आहो. दक्षता, तत्परता, कार्यकुशलता, व्यवस्था या गुणांचा आज अगदी प्रत्यक्ष तिटकारा आपण करीत नाही; पण सार्वजनिक जीवनात लाच घेणे, वशिला लावणे, खोटे हिशेब लिहिणे हे भयंकर गुन्हे आहेत अशी जी आपली बुद्धी आहे ती बेसावधपणा, अजागळपणा, अनियमितपणा, भोंगळ कारभार यांविषयी नाही. पहिल्या गुन्ह्यांना कायद्यात शिक्षा आहे; दुसऱ्यांना कायद्यात तर नाहीच, पण जनमनातही नाही. वास्तविक पहिल्यामुळे जनतेचे जेवढे नुकसान होते, तिला जो त्रास होतो, यातना सोसाव्या लागतात तितक्याच यातना कार्यकर्त्याच्या अंगच्या दुसऱ्या प्रकारच्या अवगुणांमुळे सोसाव्या लागतात.
 भोळेपणा, श्रद्धाळूपणा, बालवृत्ती याची महती परमार्थप्रवणतेमुळे आधीच या देशात फार होती. पाश्चात्त्यांच्या आगमनानंतर भौतिकवादाच्या प्रसारामुळे, विज्ञानाच्या अभ्यासामुळे, आणि ऐहिक आकांक्षांच्या वाढीमुळे ती वास्तविक कमी व्हावयाची. तशी ती होतही होती; पण इतक्यात आध्यात्मिकतेने पुन्हा जोर केला. महात्माजींचे अध्यात्मबलाचे राजकारण सुरू झाले आणि त्यामुळे पुन्हा निरागसपणा, बालभाव, श्रद्धा, अंतःकरणाची शुद्धता, आत्मनिष्ठा यांची महती वाढून कार्यक्षमतेच्या घटकगुणांची हेळसांड होऊ लागली. सुदैवाने महात्माजींचे अध्यात्म जुन्या काळच्यासारखे नव्हते. त्यांत ऐहिकाचा तिटकारा नव्हता. समाजाच्या उत्कर्षाविषयी उदासीनता नव्हती, राष्ट्रीय आकांक्षांबद्दल पराङ्मुखता नव्हती. महात्माजी स्वतः श्रेष्ठ कर्मयोगी असल्यामुळे निवृत्तीचा त्यांच्या राजकारणाला वासही नव्हता. त्याचप्रमाणे जुन्या काळची अप्रतिकार वृत्ती त्यात नव्हती. इतकेच नव्हे तर प्राणपणाने अन्यायाचा प्रतिकार हाच त्यांचा संदेश होता. आणि प्रतिकाराची ही रग एका मदांध सत्तेशी संग्राम करीत राहून त्यांनी या भरतभूमीतील हीनदीन जनतेत निर्माण केल्यामुळे आपले राष्ट्र आज नभोमंडळात उंचच उंच जाऊन बसले आहे. जुन्या अध्यात्माचा निवृत्ती, अप्रतिकार, उदासीनता हा एक भाग महात्माजींनी निखालस नष्ट केला. पण त्याचा दुसरा भाग म्हणजे बालभाव, श्रद्धा, नाममहिम्याचे श्रेष्ठत्व, प्रार्थनेची गुणावहता, बुद्धीच्या व तर्काच्या निर्णयाला कमी लेखून आत्म्याच्या हुंकाराच्या आज्ञा शिरसावंद्य मानण्याची वृत्ती- हा जो दुसरा घटक याचे महत्त्व त्यांनी कमी तर केले नाहीच तर उलट अनेक पटींनी वाढवून ठेविले. आणि यामुळे आमच्या अंगच्या कार्यक्षमतेच्या गुणाला मोठा धक्का पोचला असे माझे मत झाले आहे. आणि ते त्या महापुरुषाच्या चरणाशी निवेदन करण्याची मी अनुज्ञा मागतो.
 आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याचे श्रेय कोणत्या शक्तीला जाते याची अनेकांनी मीमांसा केली आहे. त्या मीमांसेचा विचार केला तर तो आपल्या विषयाच्या दृष्टीने उद्बोधक होईल. काँग्रेसच्या बहुतेक सूत्रधारांचे, प्रवक्त्यांचे व अनुयायांचे मत असे आहे की, आपण अध्यात्मबलाने, सत्य-अहिंसेच्या बलाने स्वातंत्र्य मिळविले आहे आणि म्हणून त्यांच्या मीमांसेत सुभाषचंद्रांच्या प्रयत्नांना स्थानच नाही. कारण त्यांचे प्रयत्न शुद्ध जडसामर्थ्यनिष्ठ होते. वास्तविक पाहता काँग्रेसने व महात्माजींनी या देशातील असंख्य जनतेत कायदेभंग, करबंदी, बहिष्कार यांच्या साह्याने जी अलौकिक व अभूतपूर्व अशी प्रतिकारशक्ती जागृत केली आणि एकराष्ट्रीयत्वाच्या व लोकशाहीच्या भावनेने त्यांच्यात जी संघटना निर्माण केली ती आपल्या स्वातंत्र्याचा मुख्य आधार आहे. पण हे अगदी शुद्ध भौतिक बल आहे आणि केवळ या बळामुळेच स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले तर हिंदुस्थानला जगाचे गुरुस्थान मिळणार नाही, आणि काँग्रेसच्या राजकारणाचे अलौकिकत्व सिद्ध होणार नाही, अशी लोकांना चिंता वाटते; आणि म्हणून आम्ही सोसलेल्या आत्मक्लेशामुळे आमच्या राज्यकर्त्यांच्या हृदयाचा पालट झाला, सत्याचा जय झाला, अहिंसा राजकारणात आली आणि अध्यात्मबलाने आम्हांला स्वातंत्र्य मिळाले असा उद्घोष ते करतात. आध्यात्मिक शक्तीच्या या वल्गना इतके दिवस जरी मधुर असल्या तरी आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन वर्षांतल्या घडामोडी पाहिल्यानंतर त्या एकदम बंद होणे अवश्य आहे हे जितक्या लवकर आपण जाणू तितका आपला उत्कर्ष जवळ येईल.
 आपण क्लेश सोसावे व दुसऱ्याचे मन जिंकावे, त्याचा हृदयपालट घडवावा, सत्याने असत्य जिंकावे, अध्यात्मबलाने भौतिक शक्तीला नामोहरम करावे असा महात्माजींचा प्रयत्न होता. गौतमबुद्ध, जीझस ख्राइस्ट यांचा असाच प्रयत्न होता आणि जगाच्या दुर्दैवाने गौतम- जीझसाप्रमाणेच महात्माजींचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे ही गोष्ट दुःखद खरी, पण ती झटकन आकलून आपण आपले धोरण आखले पाहिजे.
 येथले भांडवलदार, जमीनदार हे महात्माजींच्या सहवासात असत. महात्माजींचा त्यांच्यावर विश्वास असे. बिर्लासारख्यांच्या घरी ते उतरत. पण महात्माजींच्या दैवी, अध्यात्मबलाचा अणुमात्र तरी परिणाम त्यांच्यावर झाला आहे काय ? आपल्या निर्लोभवृत्तीने महात्माजींनी त्यांची लोभवृत्ती जिंकली आहे काय ? मुसलमानांचा हृदयपालट करण्यासाठी महात्माजींनी तीस वर्षे आत्मक्लेश सोसले, त्याचे फळ काय मिळाले हे सर्वश्रुतच आहे. हेही सोडून द्या. महात्माजींच्या सान्निध्यात त्यांचे भक्त म्हणून आजचे काँग्रेसमधील धुरीण गेली तीस वर्षे राहात होते. बहुतेक सर्व प्रांतांचा कारभार आज महात्माजींच्या या प्रमुख अनुयायांच्या हातीच आहे. या अनुयायांचा हृदयपालट किती झाला आहे, त्यांच्यावर महात्माजींच्या पवित्र सद्गुणांचा, सत्यअहिंसेचा किती संस्कार झाला आहे, त्यांच्या आध्यात्मिकतेची किती वाढ झाली आहे हे मद्रास, बिहार, पूर्व पंजाब, बंगाल, राजस्थान, विंध्य, मध्यभारत येथील मंत्रिमंडळांच्या चारित्र्यावरून स्पष्ट झाले आहे. एकनिष्ठ अनुयायांचा सत्तालोभसुद्धा महात्माजींच्या अध्यात्मबलाने जिंकला गेला नाही हे स्पष्ट दिसत असताना, ब्रिटिशांना आपण अध्यात्मबलाने जिंकले, महात्माजींची अहिंसा राजकारणात प्रभावी ठरली असा भ्रम आपण अजूनही कायम ठेवावयाचा काय ? सर्व हयात ज्यांनी महात्माजींच्या पुण्यमय सहवासात घालविली ते सत्ताधारी होताच पूर्वी नसलेला द्रव्यलोभ व सत्तेची अनिवार आसक्ती त्यांच्या ठायी निर्माण होते आणि जड सामर्थ्याचा, पाशवी बलाचा ते आश्रय करतात, हे दिसत असताना शतकानुशतके ज्यांनी स्वसामर्थ्याने सत्ता भोगली त्या ब्रिटिशांचा सत्ताभिलाष आपल्या अध्यात्मबलाने, आत्मक्लेशाने नष्ट झाला म्हणून त्यांनी आपणास स्वातंत्र्य दिले असे समजणे हे आपल्या बालभावाला शोभेसे असले तरी राष्ट्राला अत्यंत घातक आहे. सुभाषचंद्रांनी हिंदी सैन्यातूनच राष्ट्रीय सेना निर्माण केली आणि अशा रीतीने ब्रिटिश राज्याचा मुख्य आधार म्हणजे हिंदी सेनेची ब्रिटिशनिष्ठा तीच नष्ट केल्यामुळे, ब्रिटिशांचे कंबरडे मोडले हे ॲटली, क्रिप्स यांनीही बोलून दाखविले आहे. अर्थात यांच्यामागे काँग्रेसने निर्माण केलेली लोकजागृती, प्रतिकारशक्ती व राष्ट्रनिष्ठा नसती तर सुभाषचंद्रांना हे साधले नसते यात वादच नाही. म्हणून मुख्य श्रेय काँग्रेसला व महात्माजींनाच आहे. पण ते त्यांच्या आध्यात्मिक बलाला नाही, त्यांनी निर्माण केलेल्या शुद्ध भौतिक व बुद्धिगम्य सामर्थ्याला आहे.
 हे आग्रहाने सांगण्याचे कारण असे की, हे जर आपण एकदा नीट जाणले, आपण आध्यात्मिक बलाने, अहिंसेच्या सामर्थ्याने, आत्मिक प्रभावाने स्वातंत्र्य संपादिले नसून शुद्ध भौतिकबलाने ते संपादिले आहे आणि ब्रिटिशांच्या सारखे त्यातल्या त्यात विवेकी व शहाणा स्वार्थ जाणणारे राज्यकर्ते नसते तर यापुढले संग्राम इटली, रशिया, चीन यांच्याप्रमाणेच आपल्यालाही पाशवी बलानेच करावे लागले असते, हे जर आपण उमजलो तर भौतिक दृष्टीने विचार करून आपण राष्ट्रीय सामर्थ्याच्या सर्व अंगोपांगांची वाढ करण्याचा झटून प्रयत्न करू. पण तसे न करता अध्यात्मबलाच्या भ्रमातच आपण राहिलो तर आपल्या अंगी कार्यक्षमता येण्याची कधीच आशा नाही.
 कार्यक्षमता हे पाश्चात्त्य लोकांनी एक शास्त्र करून टाकले आहे आणि त्यांचे विजेचे शास्त्र, शेतीचे शास्त्र, अणूचे शास्त्र यांचे जर आपल्याला अनुकरण करता येते, तर या शास्त्राचे का येणार नाही ? पण सध्या आपले तिकडे लक्षच नाही. आपण कोठल्यातरी भ्रमात असल्यामुळे कर्तृत्वाची शास्त्रशुद्ध जोपासना करण्याचे प्रयत्नच आपण करीत नाही. इतकेच नव्हे तर आपण त्याचे महत्त्वही जाणलेले नाही.
 कर्तृत्वशास्त्राची रूपरेषा आपण अगदी वरवर जरी पाहिली तरी आपल्या त्या क्षेत्रातल्या दारिद्र्याची आपणास सहज कल्पना येईल. एखाद्या कार्याच्या सिद्धीसाठी आपण जी नवी व्यवस्था घडवीत आहो, ज्या आज्ञा देत आहो, जे कायदे करीत आहो, त्यांचा राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणता परिणाम होईल, त्याचे कल्पनाशक्तीने डोळ्यांपुढे पूर्ण चित्र उभे करणे व त्या सर्वांची आगाऊ पूर्ण व्यवस्था करणे हा कार्यक्षमतेचा पहिला गुण होय. पण आमच्या राज्यकारभारात त्याचा गंधही दृष्टीस पडत नाही. आज कायदा करावा आणि मग उद्या ध्यानात यावे की, अरे ! याला पाचशे अपवाद करणे आवश्यक आहे. कायदा करण्यापूर्वी अनुभवाने पुढील परिस्थिती आकळण्याची पात्रता आम्हांत नाही. कामगारांना वाटावयाच्या पैशाविषयी आज एक आज्ञा द्यावी व वाटण्याची वेळ आल्यावर त्यातल्या अनंत भानगडी ध्यानात येऊन आज्ञा फिरविण्याचा प्रसंग यावा ! या भानगडींची आम्हांला आगाऊ कल्पना येत नाही. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी वीसवीस वर्षे अनुभव घेतलेल्या अधिकाऱ्यांनी अगदी स्वतंत्र कमिट्या नेमून वेळापत्रके तयार करून कॉलेजवर लावून द्यावी आणि मग ध्यानी यावे की, अरे ! एका तासाला एकाच वर्गात दोन शिक्षक धाडणे युक्त नाही ! नियंत्रणे उठविण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होईल हे आम्हांला कळत नाही; उठविल्यानंतर कळते. फितुरी होऊन नाश झाल्यावर मग फितुरीची कल्पना येते आणि कत्तली झाल्यावर अशा प्रसंगी कत्तली होतात हा बोध आम्हांला होतो. फाळणीच्या पूर्वी कत्तलीची कल्पना असती तर दहापाच लक्ष लोकांचे जीव वाचले असते असे अधिकाऱ्यांनीच मागून उद्गार काढले आहेत. पण परक्यांच्याबद्दल असा संशय घेणे आमच्या निरागस बालवृत्तीला शोभले नाही.
 कार्यक्षमता अंगी येण्यास कल्पनाशक्तीचे बळ किती मोठे असावे लागते ते पाहा. शिवछत्रपतींनी आपल्या सैन्यासाठी काढलेली काही आज्ञापत्रे आता उपलब्ध झाली आहेत, त्यावरून हा गुण म्हणजे काय याची कल्पना येईल. सैन्य ज्या वाटेने जाणार त्या वाटेला दुतर्फा शेतांतून उभी पिके आहेत; त्यांचा आपले शिपाई एखादे वेळी नाश करतील हे आगाऊ ध्यानी येऊन याविषयी आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली आहे. घोड्यांची व्यवस्था काय, गवतांच्या गंजींची व्यवस्था कशी, हेही तपशीलवार सांगून ठेविलेले आहे. आणि रात्री छावणीत पणत्या लावतात, त्यातील वाती उंदीर नेतात व त्यामुळे पुष्कळ वेळा गवताच्या गंजी पेटून जनावरांना चारा राहात नाही म्हणून त्याविषयी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी हेही सांगण्यास छत्रपती विसरले नाहीत. राजांना कोणत्याच कार्यात अपयश आले नाही, त्यांचा कधी कोठे गोंधळ झाला नाही याचे कारण भवानीची कृपा किंवा राज्यात चालणारा रामनामसप्ताह हे नसून कल्पनेचा व्याप, सावधता, दक्षता, कार्यकुशलता या गुणांची उपासना हे आहे.
 पण हे सर्व सांगत असताना मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, सध्या आपल्या समाजातील भिन्नभिन्न संस्थांत जी नालायकी, नादानी व कर्तृत्वशून्यता दिसून येते ती त्या त्या संस्थांपुरती किंवा तेथल्या अधिकाऱ्यांपुरतीच आहे अशा भ्रमात आपण राहणे धोक्याचे आहे. या संस्था म्हणजे सर्व समाजापुढे ठेवलेले आरसे आहेत. त्यात आपलेच प्रतिबिंब आहे हे सर्व समाजाने व विशेषतः सुशिक्षित बुद्धिजीवी मध्यमवर्गाने ध्यानात घेतले पाहिजे. या वर्गाचे आम्ही लोक नावाला फक्त सुशिक्षित आहोत. मनाने, बुद्धीने व म्हणूनच कर्तृत्वाने आम्ही जुन्या, भोळसट, भाबड्या व भोंगळ युगातच असतो. शाळा कॉलेजात आम्हाला भूमिती, व्याकरण, विज्ञान इत्यादी अर्वाचीन विषय शिकवितात, पण त्यापैकी एकाचेही संस्कार आमच्या मनावर झालेले नसतात. आमच्या शाळा- कॉलेजांतील विद्यार्थी हे खेड्यातील मारुतीसारखे स्वयंभू, गोलसर व निराकार आहेत. नव्या युगाची छिन्नी त्यांच्यावर चाललेली नाही. नव्या युगाचे संस्कार होऊन त्यांना आकार आलेला नाही. नव्या शेंदराचे लेपाटे त्यांच्यावर बसतात, नाही असे नाही; पण आतले पहिले लेपाटे तसेच असतात. आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर एक जाड कवच येऊन बसलेले असते.
 १८९४ साली लॉर्ड रॅले व सर विल्यम स्मिथ हे दोन शास्त्रज्ञ हवेच्या घटकांची मोजमापे घेत होते. त्याच त्याच मापाच्या ऑक्सिजन व नैट्रोजन या वायूंची त्यांनी अनेक वेळा वजने घेतली. ती अर्थातच जवळजवळ सारखी आली पण दरवेळी चौथ्या दशांशात फरक पडू लागला. पण एवढ्या सूक्ष्म फरकानेही त्यांना बेचैन करून सोडले. कारण ते शास्त्रज्ञ होते. नव्या युगातले होते. शेंदरी मारुती नव्हते. जास्त अभ्यास करता त्यांना आठवले की, १७७५ साली कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने वातावरणाच्या घटकांचे पृथक्करण करून अशीच वजने घेतली होती व ती नमूद करून ठेवताना या प्रक्रियेत मध्येच एक लहानसा बुडबुडा दिसतो असे त्याने लिहून ठेविले होते. यांना या चौथ्या दशांशातील चुकीने जसे अस्वस्थ केले होते त्याचप्रमाणे त्याला या बुडबुड्याने केले होते आणि याच धोरणाने जास्त संशोधन करताना त्यांना 'ऑरगॉन' या वातावरणाच्या नव्या घटकाचा शोध लागला. चुका होत होत्या त्या त्यामुळे होत होत्या.
 ही जी शास्त्रज्ञांची काटेकोरी, सूक्षतम मोजमापे घेण्याची, पुनःपुन्हा तपासून पाहण्याची वृत्ती, चौथ्या दशांशाच्या चुकीचीही उपेक्षा न करण्याबद्दलची सावधता ती सध्याच्या युगात सर्व जीवनात येणे अवश्य आहे. त्यावाचून आमचे सार्वजनिक कारभार घड्याळाप्रमाणे सुयंत्र होणे अशक्य आहे. ही वृत्ती, ही सावधता आपल्या ठायी आहे का, हे आमच्या विद्यार्थ्यांनी तपासून पाहावे. एकदा पास म्हणून जाहीर केल्यावर एस. एस. सी. बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे मागून नापास म्हणून पत्र आले, किंवा ८५ ऐवजी ५५ गुण मांडले तर विद्यार्थ्यांना संताप येतो; पण ज्या कारकुनांनी या चुका केल्या ते दोनतीन वर्षांपूर्वी असेच विद्यार्थी होते. त्यांचे पेपर तपासताना आम्ही असेच संतापत होतो व सध्याही संतापतो. उत्तरे पुन्हा पुन्हा तपासून चुका राहू नयेत म्हणून दक्षता घेणारे, व्याकरण, भूमिती, विज्ञान यांचे केवळ सिद्धान्त न घोकता मूलज्ञानापर्यंत जाण्याची हौस बाळगणारे, पेपरात विचारलेले प्रश्न व लिहिलेली उत्तरे यांचा थोडासा तरी संबंध असावा असे मत असलेले, बारा वाजता यावयास सांगितले असता साडेबाराला येऊन पुन्हा मुळीच उशीर झाला नाही अशा भावाने न बसणारे असे शेकडा दोन सुद्धा विद्यार्थी सापडत नाहीत. एम्. ए. चे पन्नास पेपर तपासून पाहता असे आढळले की, शब्दांची काही जुळणी म्हणून असते, वाक्यांची घडण असते व परिच्छेदाची काही रचना म्हणून असते याचा कित्येक विद्यार्थ्यांना गंध सुद्धा नाही. 'ध्येयवादी पुरुषाच्या मार्गात स्त्री धोंड आहे असा प्रवाद वामनरावांच्या रागिणीमध्ये भय्यासाहेबांना थिऑसफीचे वेड असते.' 'त्याची तिसरी कादंबरी इंदु काळे व सरला भोळे ही तर विनायकराव, काशी ढवळे पाठक, सरल यांनी आपली जीवित हा आपल्या ध्येयाकरिता वेचली आहेत' अशा तऱ्हेची वाक्ये एम्. ए. च्या पेपरात सापडतात. वाक्यांची ही दशा ! मग विरामचिन्हे, अवतरणे, अनुस्वार यांची काय असेल ? हे पेपर वाचीत असताना दक्षता, सावधता, रेखीवपणा यांचा या विद्यार्थ्यांशी संबंध असावा अशी चुकूनसुद्धा शंका येत नाही. आणि हेच विद्यार्थी एम्. ए. होऊन आता निरनिराळ्या खात्यांत वरचे अधिकारी म्हणून जाणार. हाताखालचे मदतनीस असे असल्यावर पंडित नेहरू, वल्लभभाई किंवा करिअप्पा काय करू शकतील ?
 स्पेन्सरने म्हटले आहे की, शाळेत गणित सोडविताना एखादा आकडा चुकल्यामुळे मुलांचे उत्तर चुकते; पण त्याची विद्यार्थ्यांना लाज वाटत नाही. हा आपल्या बुद्धीचा दोष नसून हे केवळ दुर्लक्षामुळे झाले, असे समाधान ते करून घेतात. निबंध लिहिताना स्पेलिंग चुकले आणि शिक्षकांनी हटकले तर, स्पेलिंग माहीत होते पण चुकून तसे लिहिले गेले असे उत्तर ते देतात. म्हणजे या दुर्लक्षाच्या चुका खंत बाळगण्याजोग्या आहेत असे त्यांना वाटत नाही. आणि हीच वृत्ती घेऊन ते जीवनाच्या आखाड्यात उतरतात. (Boys carry these mistakes into life.) आणि तेथेही तशीच भोंगळ सृष्टी निर्माण करतात.
 विद्यार्थ्यांच्या पेपरातल्या सृष्टीच्याच प्रतिकृती सध्या आपल्याला प्रत्येक खात्याच्या कारभारात दृष्टीस पडत आहेत. सरकारी कचेरीच्या कोणत्याही खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत घ्या. त्यांची सारखी तक्रार असते की, चूक न करता मजकूर टाइप करणारा, गोंधळ न करता हिशेब करणारा, हवी ती माहिती बिनचूक काढून आणणारा एकसुद्धा कारकून सापडत नाही. बी. ए. झालेल्या दोन मुलींनी बेळगाव व कानपूर कोठेशी आहेत ही माहिती आपल्या वरिष्ठांकडे जाऊन अगदी 'बालभावाने' विचारलेली आहे !
 सध्याचे युग विमानाचे आहे; पण आपण बैलगाडीच्या युगात आहो. सूक्ष्मतम अणूंचेही पृथक्करण करण्याचे व त्यातून मारक हत्यारे निर्माण करण्याचे हे युग आहे, पण आपण अजून धोंडे, झाडे या हत्यारांच्या संगतीत राहून डार्विनचा सिद्धान्त खरा करण्याच्या नादात आहो.
 विद्यार्थ्यांच्या अंगी जे दोष आहेत म्हणून वर सांगितले त्याला ते स्वतःच सर्वस्वी जबाबदार आहेत असे मला मुळीच म्हणावयाचे नाही; पण मला विद्यार्थ्यांना असे सांगावयाचे आहे की, त्यांनी हा न्याय-अन्याय आता पाहात बसू नये. सध्याच्या शिक्षण-पद्धतीइतकी टाकाऊ, अधोगामी व शिक्षण- शास्त्राच्या नावाखाली रानटीपणाचे प्रदर्शन करणारी दुसरी कोणतीही शिक्षण पद्धती नसेल. पण ती आणखी एक शतकभर सुधारेल असे मला वाटत नाही. तेव्हा स्वतः विद्यार्थ्यांनीच कर्तृत्वाचा अभ्यास करून चौथ्या दशांशापर्यंतच्या चुकीचीही मोजदाद घेण्याची वृत्ती आपल्याठायी निर्माण करावी. समाजातील गोंधळाची जबाबदारी आपल्यावर नाही, असली अलिप्तवृत्ती ठेवू नये. कारण एस्. एस्. सी बोर्डात किंवा अन्यत्र जो गोंधळ होत आहे तो एका माणसाला निर्माण करता येणार नाही. एक माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी तो जसे एकट्याच्या बळाने सर्व राष्ट्र वर घेऊ शकत नाही; त्याचप्रमाणे एक माणूस कितीही नालायक असला तरी तो सर्व समाज अधोगामी करू शकत नाही. तेव्हा आजच्या गोंधळाल आपण जबाबदार नसलो तरी पाच वर्षांनी जो गोंधळ होणार आहे तो टाळण्याची जबाबदारी मात्र आपणांवर आहे, हे विद्यार्थ्यांनी विसरू नये.
 सध्याची महायुद्धे कशी होतात इकडे लक्ष देणे अवश्य आहे. वीस-वीस लक्षांची सेना हजार मैलांच्या आघाडीवर पसरून तिचे संचलन यंत्रासारखे घडवून आणणे या जातीच्या कर्तबगारीची तेथे आवश्यकता असते. एवढ्यांचे अन्न वेळेवर पुरविणे, एवढ्यांना कपडे, तंबू, शस्त्रास्त्रे इत्यादी अवजारे पुरविणे, बातम्या ठेवणे, रुग्णांची व्यवस्था करणे ही कामे इतकी अवाढव्य आहेत की, शाळा- कॉलेजातून चौथ्या दशांशाची दक्षता घेण्यास मुलामुलींना जेथे शिकवीत नाहीत तेथे ती पेलणे कधीच शक्य नाही. सध्याची आपली बोजड मुसळी वृत्ती पाहिली म्हणजे एवढ्यांच्या मलमूत्राची व्यवस्था सुद्धा आपल्याला जमेल असे वाटत नाही आणि औरंगजेबाच्या सैन्यांप्रमाणे आपली सैन्ये रोगराईनेच निम्म्याच्या वर मृत्युमुखी पडतील.
 युद्धाचे उदाहरण दिले, कारण नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला घनघोर युद्धे करावी लागतील यात शंकाच नाही. त्या वेळी अध्यात्मबलाने जय मिळेल असा भ्रम कोणी बाळगू नये. सुदैवाने आपल्या सध्याच्या सरकारचेही तेच मत आहे. पण बरेचसे अध्यात्मवादी सज्जन अजून तो भ्रम पसरविण्याचे बंद करीत नाहीत म्हणून धोका वाटतो. तेव्हा महात्माजींनी स्वातंत्र्य खरे कोणत्या शक्तीने मिळविले याची वर केलेली मीमांसा ध्यानी घेऊन नव्या पिढीने प्रथम स्वतःला अध्यात्माच्या आणि आत्मबलाच्या मायामोहांतून सोडवून घ्यावे आणि सावधता, दक्षता, कुशाग्रता, कार्यकुशलता, तंत्रज्ञान, कारस्थानी वृत्ती या गुणांची वाढ करून कर्तृत्वाची म्हणजेच सामर्थ्याची जोपासना करावी. नाहीतर जर्मनीसारख्या एखाद्या महासामर्थ्यसंपन्न राष्ट्राशी कधी काळी आपली गाठ पडली तर फ्रान्स- जर्मनीत झालेल्या सेडानच्या युद्धातल्याप्रमाणे आपल्याही रणांगणाला रणांगणाचे रूप न राहता कत्तलखान्याचे रूप येईल !

नोव्हेंबर १९४९