माझे चिंतन/विश्वाविरुद्ध

विकिस्रोत कडून





विश्वाविरुद्ध





एक नवी शक्ती
 इ. स. पूर्व ३९९ या सालच्या एका दिवशी अथेन्स नगरीच्या लोकसभेत जगाचा इतिहास घडविला जात होता. मानवी संस्कृतीची तोपर्यंत प्रगती चालू होतीच; पण त्या दिवशी त्या लोकसभेत ही प्रगती अत्यंत वेगाने चालविणारी शक्ती निर्माण होत होती. विवेकनिष्ठा हे त्या शक्तीचे नाव. सर्व विश्व आपल्या विरुद्ध असले तरी आपल्या विवेकाच्या बळावर त्या विश्वाचा मुळीच मुलाहिजा न करता, आपले मत आग्रहाने प्रतिपादन करण्याचे व त्यासाठी देहदंड सोसण्याचे मनः सामर्थ्य जगाच्या संसाराच्या इतिहासात मानव त्या दिवशी प्रथमच प्रगट करीत होता. अथेन्समधील लोकसभेच्या नेत्यांनी सॉक्रेटिसावर अभियोग चालविला होता. अखिल राष्ट्राला मान्य असलेल्या देवता हा मानीत नाही व रूढ नीतीपासून तरुणांना च्युत करतो, वाममार्गाला नेतो असे त्याच्यावर आरोप होते. वास्तविक सॉक्रेटिस ग्रीक देवता मानीत नव्हता असे नाही; पण प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीच्या निकषावर कोणतेही तत्त्व- देवाचे अस्तित्वसुद्धा- पारखून पाहावे असे तो सांगत असे. एखादी गोष्ट देवांना प्रिय आहे म्हणून ती शुभ व आदरणीय ठरत नसून ती गोष्ट शुभ व आदरणीय आहे म्हणून ती देवांना प्रिय होते असे काहीसे उपयुक्ततावादासारखे प्रतिपादन तो करीत असे. ज्ञान हा अत्यंत मोठा सद्गुण व अज्ञान हा अत्यंत घातक दुर्गुण होय हा विचार तो आपल्या शिष्यांना शिकवी. नीतीच्याही बाबतीत हेच होते. रूढ नीतिनियम पाळू नयेत असे तो कधीच म्हणाला नाही; पण नीतिकल्पनांना अतीन्द्रिय, गूढ, दैवी शक्तींचा म्हणजे देवाच्या वचनांचा आधार अवश्य नाही, ऐतिहासिक व सामाजिक अनुभवांवरून नीतिनियम ठरवावे असा त्याचा आग्रह होता. अर्थातच व्यक्तीचा विवेक हे नीतीचे अधिष्ठान ठरले. आता या प्रतिपादनात नीती व देव यांविषयीच्या रूढ कल्पनांवर प्रत्यक्ष हल्ला केला नसला तरी त्याचा परिणाम तोच झाला. कारण बुद्धीचा निकष लावल्याबरोबर प्रस्थापित नीतितत्त्वांवरील तरुणांची श्रद्धा ढळणे अपरिहार्य होते. त्याचप्रमाणे विवेकाचा नेत्र उघडताच ग्रीक देवतांविषयीची भाविक, भोळी श्रद्धा जशीच्या तशी टिकून राहणे शक्य नव्हते. सनातनी लोकांच्या मते याचाच अर्थ तरुणांना बिघडविणे व पाखंड माजविणे असा होत होता, व यासाठीच त्यांनी सॉक्रेटिसला न्यायासनापुढे खेचले होते. अनिटस, मेनिटस, लिकॉम प्रभृती लोकसभेच्या नेत्यांनी यात पुढाकार घेतला होता. त्यांना व इतर सभासदांना उद्देशून विवेकवादाचा, बुद्धिनिष्ठेचा हा आद्यप्रणेता म्हणाला-
 "माझ्या अथेन्सकर मित्रांनो ! मागे अँफिपोलिसच्या व डेलियमच्या रणांगणांवर मी सैनिक म्हणून लढत असताना आपल्या सेनापतींनी मला एका जागी ठासून उभे राहण्यास सांगितले होते. त्या वेळी मृत्यू समोर दिसत असूनही ती आज्ञा मी धैर्याने पाळली; जागचा हाललो नाही. आज तर माझ्या विवेकाला परमेश्वराची आज्ञा झालेली आहे. 'स्वतःच्या व इतरांच्या अंतरात्म्यांचे संशोधन करण्याचे तत्त्ववेत्त्याचे कार्य तू कर,' अशी ती आज्ञा आहे. ही आज्ञा मी त्याच निष्ठेने पाळली नाही तर ते फारच विचित्र होईल. आज तुम्ही एखादे वेळी म्हणाल की, 'सॉक्रेटिस, एक वेळ आम्ही तुझी गय करतो, पण तू पुन्हा मात्र असली बौद्धिक चिकित्सा व संशोधन करता कामा नये.' असे तुम्ही म्हणालात तर यावर माझे उत्तर असे आहे: अथीनी मित्रांनो, माझा तुमच्यावर लोभ आहे, प्रेम आहे; पण तुमच्यापेक्षा मी माझ्या चित्तात स्फुरणारी परमेश्वराची आज्ञाच जास्त मानीन. आणि जोपर्यंत जिवात जीव आहे व वाचेत बळ आहे तोपर्यंत लोकांना माझे तत्त्वज्ञान शिकविण्यापासून कधीही परावृत्त होणार नाही. तेव्हा मला मुक्त करा वा न करा; पण एवढे ध्यानात ठेवा की, तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी मी माझा मार्ग सोडणार नाही. मग शंभर वेळा मृत्यू पत्करावा लागला तरी चिंता नाही."
 सॉक्रेटिसाने विवेकनिष्ठेसाठी, स्वतःच्या मतासाठी मृत्यू पत्करला या गोष्टीमुळे जगाच्या इतिहासाचा प्रवाह बदलून गेला.

तिचे वैशिष्ट्य

 सॉक्रेटिसाच्या या आत्मबलिदानाचा विशिष्ट अर्थ आपण समजून घेणे अवश्य आहे. धर्मासाठी, स्वजनांसाठी, स्वामीसाठी उदात्त भावनेने आत्मबलिदान करणारे लोक, सॉक्रेटिसाच्या आधीही अनेक होऊन गेले असतील; पुढच्या इतिहासात तर निश्चित होऊन गेले आहेत. पण त्या सर्वोहून हे बलिदान निराळे आहे. सॉक्रेटिसाने निर्माण केलेली व रॉजर वेकन, जॉन हस, लूथर, ब्रूनो यांनी पुढे चालविलेली परंपरा त्या परंपरांहून अगदी निराळी आहे. धर्मासाठी किंवा स्वामीसाठी ज्यांनी ज्यांनी प्राण दिले त्यांच्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षच रीतीने- प्रत्यक्ष देहाने नसतील तर मनाने व सहानुभूतीने,– हजारो लोक उभे होते. त्या त्या व्यक्तींचा समाज किंवा त्यांच्या पक्षाचे लोक यांचा त्यांना बहुधा नेहमीच पाठिंबा असतो. त्यांचे त्यांना धन्यवाद मिळतात. तेथे शत्रूकडून जो आघात होतो तो या सर्व समाजावर होत असतो. त्याचा प्रतिकार सर्वांनाच करावयाचा असतो आणि कृतीने नव्हे तरी निदान मनाने त्या व्यक्तींचे स्वजन त्यांच्या कृत्यात सहभागी असतात. सॉक्रेटिस हा सर्व समाजाविरुद्ध एकटा उभा होता. स्वजनांच्या विरुद्धच त्याचा लढा होता. त्याच्या बाजूला फक्त त्याची विवेकशक्ती होती. त्याला पाठिंबा असलाच तर तो फक्त चार दोन मित्रांचा. त्याच्या समाजाचा नव्हे. श्रीबंदा वीर किंवा श्रीछत्रपती संभाजी यांनी धर्मासाठी मृत्यू पत्करला त्या वेळी अखिल शीख समाज व मराठा समाज या पुरुषांच्या मागे मनाने उभा होता. मुरारबाजी, बाजी प्रभु, तानाजी यांनी आत्मबलिदान केले तेव्हा तर समाज त्यांच्यामागे प्रत्यक्षच उभा होता. म्हणजे ते लढे एक समाज विरुद्ध दुसरा समाज असे होते. सॉक्रेटिसाचा लढा एक व्यक्ती विरुद्ध सर्व समाज असा होता. ते लढे प्रस्थापित झालेल्या, मान्यता पावलेल्या तत्त्वांसाठी होते; हा लढा कोणाला मान्य नसलेल्या सर्वस्वी नवीन व म्हणूनच पाखंडी गणलेल्या अशा तत्त्वासाठी होता. त्या लढ्यांत आत्मबलिदान करणाऱ्या वीरांच्या मागे स्वसमाजाची शक्ती होती. या लढ्यात या व्यक्तीच्या साह्याला फक्त तिच्या विवेकनिष्ठेची शक्ती होती. एक व्यक्ती विरुद्ध विश्व असा हा लढा होता. त्याची अपूर्वता ही आहे.
 टिळक आणि आगरकर यांची तुलना केली म्हणजे ही अपूर्वता नीट ध्यानात येईल. टिळकांनी सर्व जन्म ब्रिटिश साम्राज्याशी लढा करण्यात वेचला. त्य लढ्याचे स्वरूप अत्यंत उग्र व भयावह असेच होते. टिळकांना त्यात यातनाही अपरिमित सोसाव्या लागल्या. पण हा संग्राम चालू असताना आरंभापासूनच टिळकांचे स्वजन- महाराष्ट्रीय जनता- त्यांच्या पाठीशी उभे होते. पुढे पुढे तर अखिल भरतभूमी त्यांना आशीर्वाद देत होती. आगरकरांचा लढा याहून अगदी निराळा होता. त्यांना स्वजनांशीच संग्राम करावयाचा होता. त्यांच्यामागे कोणीही उभे नव्हते. त्यांना साह्य फक्त त्यांच्या विवेकदेवतेचे होते. व्यक्ती विरुद्ध अखिल समाज असा तो लढा होता. ब्रिटिश साम्राज्य नष्ट व्हावे अशी इच्छा करणारे हजारो, लाखो लोक टिळकांच्या मागे उभे होते; मनूचे साम्राज्य नष्ट व्हावे या गोष्टीला कोणाचाच पाठिंबा नव्हता. ती कल्पनाच लोकांना असह्य होती. तिला आगरकरांचा, त्यांच्या विवेकाचा पाठिंबा होता. त्यांच्या संग्रामातील अपूर्वता ती हीच होय.

मार्टिन लूथर

 या लढ्यातला एकाकीपणा फार भयानक असतो. मनुष्य त्यानेच हैराण होऊन जातो. मार्टिन लूथरवर पोपने बहिष्कार घातला त्या वेळी त्याच्या मनाची अवस्था कशी झाली त्याचे वर्णन त्याच्या चरित्रकाराने केले आहे. सर्व जगात आपण एकटेच आहोत या विचाराने क्षणभर तो हादरून गेला. सर्वत्र अंधार, भयाण शून्यता ! लूथरने स्वतःच आपल्या मनाच्या दारुण व्यग्रतेचे वर्णन केले आहे : प्रत्यक्ष परमेश्वराची वाणी, बायबल माझ्या बाजूस होते तरी पोपच्या विरुद्ध उभे राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या! किती वेळा तरी तो भयंकर प्रश्न मी माझ्या मनाला विचारला ! जगात तूच एकटा शहाणा आहेस काय ? बाकी सर्व लोक इतके मूढ असतील ? शतकानुशतकांची ही परंपरा- ही सर्व चुकलेली असणे शक्य आहे ? आणि शेवटी तुझेच मत चुकीचे होते असे ठरले तर ? पोपच्या बाजूला कोणती सेना आहे ? विद्वत्ता, प्रतिभा, प्रतिष्ठा, सत्ता, पावित्र्य, चमत्कारसामर्थ्य, राजवैभव, बहुसंख्य जनता, शतकांची पुण्याई, थोर हुतात्म्यांचा आशीर्वाद, सर्व धर्ममहामंडळे, सर्व धर्मगुरु आणि रोमचे पीठ!- आणि माझ्या बाजूला? वायक्लिफ, लोरेंझव्हॅला यांची पुस्तके आणि चारदोन मित्र. असा हा संग्राम आहे."
 असे असूनही लूथरने ते बहिष्कारपत्र अग्नीत फेकून दिले. लूथरचा चरित्रकार म्हणतो, 'आपण एकाकी आहोत हे जाणूनही ज्याचे धैर्य खचत नाही, अशा स्थितीतही जो स्वतःला समर्थ मानतो तो खरा धैर्यशील पुरुष होय.'
 आपल्या मतासाठी मृत्यू पतकरावयाचा ही संस्कृती सॉक्रेटिसाने प्रथम जगात आणली. त्याने ही गोष्ट जाणूनबुजून, बुद्धिपुरःसर केली होती. शिक्षा झाल्यावर त्याला काही दिवस तुरुंगात ठेविले होते. तेथून त्याला सहज पळून जाता आले असते. प्लेटोने त्याची सर्व व्यवस्था केली होती. अधिकाऱ्यांचीही त्याने पळून जावे अशीच इच्छा होती. कारण त्यांना त्याच्या देहान्तशासनाची अंमलबजावणी करण्याची जरा भीतीच वाटत होती. म्हणून अप्रत्यक्ष रीतीने मदत करण्यास तेही तयार होते; पण सॉक्रेटिसाने ते साफ नाकारले. तो म्हणाला, आता मी येथून जाईन तो अशाच प्रदेशात की जेथे मतासाठी देहदंड सोसावा लागत नाही.'

स्वतंत्र चिंतन

 सॉक्रेटिसाची ही परंपरा मध्यंतरी काही शतके लुप्त झाली होती. आणि ही विवेकनिष्ठा लुप्त होती तोपर्यंय युरोपची सर्व प्रगतीही कुंठित होऊन बसली होती. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाच्या इतिहासावरून हे स्पष्ट दाखविता येईल की, स्वतंत्र चिंतनाला, अवलोकनाला, अनुभूतीला व अनुभूतीतून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या प्रसाराला जितका, ज्या प्रमाणात व ज्या क्षेत्रात अवसर मिळतो तितका, त्या प्रमाणात व त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन व संशोधन जेथे कोणत्याही कारणाने का होईना, मुळीच होत नाही तो समाज रानटी, पाशवी स्थितीला गेलेला असतो. चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपची हीच स्थिती होती. अशा स्थितीत ज्या देशांत कोणी सॉक्रेटिस निर्माण झाला नाही ते देश परवापरवापर्यंत दास्य, विघटना, दारिद्र्य या कर्दमात लोळत पडले होते. इंग्लंडचे भाग्य असे की, तमोयुगानंतरचा पहिला सॉक्रेटिस- बुद्धिनिष्ठेपायी आत्मबलिदान करणारा पुरुष- त्या भूमीत निर्माण झाला. त्याचे नाव रॉजर वेकन (१२९४- १२९४). ऑक्सफर्ड येथे विद्यार्थी असतानाच आपल्या गुरुजींची अंधश्रद्धा त्याला पटेना. त्या लहान वयातच ॲरिस्टाटलचे वचन, त्याचे सिद्धान्त स्वतः प्रयोग करून पाहिल्याशिवाय मी मानणार नाही, असा पीळ त्याच्या मनात निर्माण झाला. पुढे पॅरिसच्या विद्यापीठात प्राध्यापक झाल्यावर तो आपले विचार उघडपणे बोलून दाखवू लागला तेव्हा धर्मपीठाचे अधिकारी त्याच्याकडे रोखून बघू लागले. स्वतः प्रयोग करणे, आपल्या बुद्धीचा वापर करणे हे त्यांना महापातक वाटत असे, आणि त्या कार्यासाठीच रॉजर बेकनचा अवतार होता. आता त्याचे जे ग्रंथ उपलब्ध झाले आहेत, त्यांवरून बंदुकीची दारू, दुर्बीण, वाफेचे यंत्र यांचा त्याने त्याच वेळी शोध लावला होता असे दिसते; पण त्या काळी त्याचे ग्रंथ कोणी वाचण्यासही तयार नसल्यामुळे आणि पुढे चारपाचशे वर्षे ते रोमच्या धर्ममंदिरातील कपाटात धूळ खात पडल्यामुळे त्याच्या या प्रचंड संशोधनाची लोकांना कल्पनाही आली नाही. त्याच्या समकालीनांनी एवढेच जाणले की, हा पाखंडी आहे; इतकेच नव्हे तर चेटक्याही आहे. विज्ञानसंशोधनाला प्रारंभीच्या काळी धर्मपीठाचा व सामान्य जनांचाही कडवा विरोध असण्याचे कारण असे की, विज्ञानातून काहीशी अतिमानुष शक्ती निर्माण होत असे, आणि अतिमानुष शक्ती ही परमेश्वर किंवा भूत, सैतान या दोषांच्या ठायीच असते अशी त्या काळी श्रद्धा होती. त्यामुळे प्रारंभीच्या शास्त्रज्ञांकडे लोक 'सैतानाचे दूत' अशा दृष्टीने पाहात आणि त्यांना चेटके ठरवून जिवंत जाळीत. रॉजर बेकन स्वतः फ्रान्सिस्कन पंथाचा धर्मगुरूच असल्यामुळे तो अग्निमुखातून सुटला इतकेच; पण आजन्म तुरुंगवास मात्र त्याच्या कपाळीचा टळला नाही. 'सत्यज्ञान' हे वेदवचनावरून मिळत नाही व अंधश्रद्धेनेही ते प्राप्त होत नाही; ते फक्त बुद्धी, स्वानुभव, चिंतन, प्रयोग यांनीच प्राप्त होते.' असे तो सांगत राहिल्यामुळे त्याच्या पंथाच्या आचार्यांनीच त्याला तुरुंगात डांबून टाकले. जगाला ज्ञानकिरणांनी उजळून टाकणाऱ्या या महाभागाच्या आयुष्याची चोवीस वर्षे अंधारकोठडीत गेली; तेथेच शेवटी त्याचा अंत झाला. मरताना त्याने आपल्या शिष्यांना पुढील संदेश दिला; 'स्वतंत्र संशोधनाच्या मानवाच्या हक्कासाठी मी आत्मबलिदान करीत आहे. येथून पुढे मानवजाती याच तत्त्वान्वये आपले वर्तन ठेवील अशी मला आशा आहे. प्रयोग करून पाहणे, ते करीत असताना प्रमाद करण्यासही अवसर असणे, पुन्हा प्रयोग करणे, पडताळा पाहणे याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, हे शास्त्रज्ञांचे ब्रीदवाक्य आहे. आपण शतकानुशतके याच मार्गाने जाऊ या. अर्थव्यवस्था, राज्यपद्धती, समाजरचना, दण्डनीती या सर्व बाबतींत आपण सारखे प्रयोग, पुन्हा प्रयोग याच धोरणाचा अवलंब करू. म्हणजे शेवटी यातूनच मानवाला उत्कर्षाचा मार्ग सापडेल.'
 'मानवजाती याच तत्त्वान्वये आपले वर्तन ठेवील', हा रॉजर बेकन याचा आशावाद जगातील इतर देशांच्या बाबतीत जरी फारसा खरा ठरला नाही तरी त्याच्या मायदेशातील मानवजातीने तो पुरेपूर प्रत्यक्षात आणला. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षांनी जॉन वायक्लिफ (१३२४ - १३८४) याचा जन्म झाला व त्याने बेकनचे असिधाराव्रत पुढे चालविले. ख्रिस्ती धर्मातील कर्मकांडावर त्याने चरचरीत टीका केली, बायबलचे इंग्रजीत भाषांतर करून ते सर्वांना सुलभ करून दिले आणि विशेष म्हणजे पोपच्या अंतिम सत्तेवर आक्षेप घेतला. धर्मपीठाने संपत्तीपासून अलिप्त राहावे, मिळकती करू नयेत असे सांगून राष्ट्रीय धनाचा वाटा सर्वांना सारखा मिळावा अशी काहीशी समाजवादी मते त्याने प्रतिपादिली. अर्थात धर्माचार्यांना हे मानवण्याजोगे नव्हते. त्या काळात धर्माचार्यांच्यापुढे राजे लोकही चळचळा कापत असत. अशा त्या आचार्यांनी वायक्लिफला धर्मपीठापुढे खेचले. त्या वेळी त्याला अग्निप्रवेशाचीच शिक्षा व्हावयाची; पण जॉन ऑफ गाँट हा राजघराण्यातील पुरुष त्याच्याच मताचा होता व वायक्लिफला त्याचा पाठिंबा होता म्हणून तो वाचला; पण त्या दोघांच्या मागून, वायक्लिफचा जो लोलर्ड पंथ त्या पंथाच्या अनुयायांचे धर्माधिकाऱ्यांनी सत्र सुरू केले आणि शेकडो लोक चितेवर ठेवून जाळून मारले. या सर्वांनी आपली विवेकनिष्ठा न सोडता आनंदाने चितारोहण केले. जॉन बॅडबी याला याच प्रकारे देहान्तशासन झाले. देह जळू लागताच यातना असह्य होऊन तो ओरडू लागला तेव्हा याला पश्चात्ताप झाला आहे, असे समजून आचार्यांनी त्याला बाहेर काढले; पण तशाही स्थितीत त्या बहाद्दराने आपल्या मताचा आग्रह सोडला नाही, व तसाच तो पुन्हा चितेत शिरला. इंग्लंडला पुढे जे वैभव प्राप्त झाले त्याच्या मागे व्यक्तिस्वातंत्र्याची ही पुण्याई सतत उभी होती.

तिच्या अभावी

 चौदा पंधरा व सोळा ही शतके म्हणजे पश्चिम यूरोपच्या इतिहासातील ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाचा काळ होय. त्या काळाचे व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा हे मुख्य लक्षण होते. इंग्लंडने त्या निष्ठेची जेवढ्या अनन्यभावाने उपासना केली तेवढ्या अनन्यतेने इतर कोणत्याही देशाने केली नाही. फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, इटली, स्पेन, पोलंड या प्रत्येक देशात उज्जीवनाची लाट उसळली होती हे खरे; पण या प्रत्येक देशात काही ना काही कारणामुळे- आणि मुख्य म्हणजे लोकांनी अनन्यभक्ती न दर्शविल्यामुळे, या लाटा मंदावल्या आणि इटली, स्पेन व पोलंड या देशांत तर त्या अगदी विरून नाहीशा झाल्या. त्यामुळे ते देश पुढे तीन-चारशे वर्षे कर्दमातच रुतून बसले असे इतिहास सांगतो. सर्बिया, बोन्सिया इ. आजचे युगोस्लाव्हियातील देश, आणि बल्गेरिया, रुमानिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, ग्रीस आणि रशिया येथे उज्जीवनाच्या लाटा पोचल्याच नव्हत्या. अर्थात त्यांचे डोके अल्पकाळही कर्दमातून वर निघाले नाही. विवेकनिष्ठा- विवेकासाठी आत्मबलिदान करण्याइतकी उत्कट निष्ठा- ही समाजाच्या उन्नतीस अत्यंत अवश्य असलेली अशी प्रेरक शक्ती आहे. ती निष्ठा जेथे नाही, सर्व विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे सामर्थ्य ज्या समाजातील व्यक्तीच्या ठायी नाही, तो समाज पशुतेच्या वर येत नाही आणि एकदा आला असला तरी पुढे ही निष्ठा जर मंदावली तर तो पुन्हा अधोगामी होऊ लागतो.

पश्चिम व पूर्व युरोप

 'अनॅलस् ऑफ युरोपियन सिव्हिलिझेशन' या नावाचा एक ग्रंथ अल्फ्रेड मेयर या पंडिताने तयार केला आहे. त्यात त्याने १५०१ ते १९०० या चार शतकांतील संस्कृतीच्या प्रगतीची सनावली दिली आहे. १५०१ हे साल घ्यावयाचे व युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, बेल्जम, हॉलंड, स्वीडन, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया, रुमानिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, रशिया या देशांत त्या साली काव्य, नाटक, कादंबरी, चित्रकला, शिल्पकला, संगीत, रसायन, पदार्थविज्ञान, ज्योतिष, गणित, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान या मानवी संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात कोणता ग्रंथ वा कलाकृती निर्माण झाली हे क्रमाने सांगावयाचे, अशी त्याची पद्धत आहे. असा चारशे वर्षांचा प्रत्येक देशातील संस्कृतीचा इतिहास त्याने दिला आहे. साहित्य, कला, विज्ञान व तत्त्वज्ञान हीच मानवाची संस्कृती आणि ही संस्कृती हेच मानवत्वाचे लक्षण हे ज्यांना मान्य आहे त्यांना विवेकनिष्ठा व ही संस्कृती यांचा अविभाज्य संबंध कसा आहे, हे वरील इतिहासावरून अगदी सहज समजून येईल. साधारणपणे पहिल्या तीनशे वर्षांत पूर्व-युरोपातील देशांत म्हणजे ऑस्ट्रिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, रशिया या देशांत संस्कृतीच्या एकाही क्षेत्रात एकही ग्रंथ वा कलाकृती निर्माण झालेली नाही. या तीन शतकांत या देशांची नावे या इतिहासात येतच नाहीत. पोलंड, स्पेन, इटली हे देश आरंभी अग्रमालिकेत दिसतात व ते योग्यच आहे. कारण बुद्धिस्वातंत्र्याचा आग्रह धरणारी उज्जीवनाची चळवळ प्रथम इटलीतच सुरू झाली होती. पोलंडमध्येही विद्येचे पुनरुज्जीवन वेगाने होत होते आणि स्पेनमध्येही आरंभी हे वारे पोचले होते; पण पुढे तेथील मदांध सत्ताधीशांनी अंध धर्मश्रद्धेचे वातावरण अट्टाहासाने निर्माण केल्यामुळे आणि ते भेदून टाकण्यासाठी आत्मबलिदान करणारे पुरुष त्या भूमीत निर्माण न झाल्यामुळे हे देश संस्कृतीच्या इतिहासात दिसेनासे होतात. १८५० नंतर पुन्हा त्यांचे ओझरते दर्शन होऊ लागते. या वेळी पूर्व युरोपातील देशही संस्कृतीच्या क्षितिजावर थोडे येऊ लागतात. आणि याचे कारण हेच की, तेथेही आता स्वतंत्र चिंतन, व्यक्तिस्वातंत्र्य व त्यासाठी आत्मार्पण ही वृत्ती प्रभावी होऊ लागली होती. पश्चिम युरोपातील देश मात्र आरंभापासून सारखे आपल्या डोळ्यांपुढे उभे आहेत.

सत्य जळत नाही

 पश्चिम-युरोपातील इंग्लंडखेरीज इतर देशांत विवेकाची उपासना इंग्लंडइतक्या निष्ठेने झाली नाही तरी, तेथे सॉक्रेटिस, रॉजर बेकन, वायक्लिफ यांची परंपरा चालविणारे थोर पुरुष मुळीच निर्माण झाले नाहीत असे नाही. मधूनमधून अशा महाभागांचे अवतार तेथे होत होते म्हणूनच त्यांची काही मर्यादेपर्यंत तरी प्रगती झाली. जॉन हस हा असाच एक अवतारी पुरुष होता. बोहेमियांतील हसिनेट्झ् या खेड्यात जॉन हसचा (१३६९-१४१५) जन्म झाला. आपल्या कर्तृत्वाने चढत जाऊन प्राग विद्यापीठात तो प्राध्यापक झाला. तेथेच त्याने धर्मचिंतन सुरू केले. याच सुमारास जॉन वायक्लिफचे ग्रंथ त्याच्या वाचनात आले आणि त्याच्या मनात क्रांतिकारक विचार उद्भवले. प्रस्थापित धर्म- त्यातील कर्मकांड, धर्माचार्यांचे विलासी जीवन, त्यांचा धनलोभ व त्यांची पापकृत्ये यांवर तो कडक टीका करू लागला. अर्थातच रोमच्या धर्मपीठाची त्याच्यावर वक्र दृष्टी झाली. पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट सिसिग्मंड हा रोमच्या पोपच्या हातचे बाहुले होता. त्याने जॉन हसला कॉन्स्टनस येथील न्यायासनापुढे उपस्थित राहण्यास फर्मावले. प्रथम सम्राटाने त्याला अभय दिले होते; पण हस कॉन्स्टनसला येताच धर्मगुरूनी त्याला अंधारकोठडीत रवाना करून त्याचे अनन्वित हाल केले. त्याच्यावर नास्तिकपणा, पाखंडीपणा व त्या विचारांचा प्रसार करणे हे आरोप होते व 'आपले सर्व प्रतिपादन चुकीचे असून आपल्याला त्याबद्दल पश्चात्ताप होत आहे,' असे त्याने लिहून द्यावे अशी धर्माचार्यांनी त्याला आज्ञा दिली. 'पोप, सम्राट, राजे, सरदार यांच्या आज्ञा काहीही असल्या तरी आपल्या विवेकबुद्धीला पटल्यावाचून त्या कोणीही मानू नयेत,' असे सांगणारा हा पुरुष धर्माचायची ही आज्ञा कशी मानणार ?
 परमेश्वराच्या मंदिरात राहून पापपुण्याच्या मालाची अडतेगिरी करणाऱ्या या वणिग्-जनांना तेथून हाकलून लावण्याची वायक्लिफच्या ग्रंथावर हात ठेवून जॉन हसने प्रतिज्ञा केली होती. आज प्रागच्या धर्माचार्यांनी वायक्लिफचे ग्रंथ जाळून टाकण्याचा हुकुम दिला. उद्या कदाचित...!
 जॉन हस लहान असतानाच त्याने एक प्रयोग केला होता. एकदा तो आईच्या मांडीवर डोके ठेवून निजला होता. पलीकडे शेकोटी होती. विस्तवाने भाजल्यावर कसे वाटते हे पाहण्यासाठी त्याने आपला हात सहज त्या शेकोटीत खुपसला ! त्याची आज त्याला आठवण झाली. त्या वेळी अग्निज्वाळा या अगदी असह्य झाल्या होत्या असे नाही !
 'तू पोपचा अधिकार मानीत नाहीस, मग कोणाच्या अधिकाराने तुझे प्रतिपादन तू करतोस ?' न्यायासनावरील धर्माचार्यांनी त्याला विचारले.
 'मला आधार फक्त माझ्या विवेकबुद्धीचा आहे !' हसने उत्तर दिले.
 'पण शेकडो पंडित प्रतिज्ञेवर सांगत आहेत की, तुझी मते असत्य आहेत. हे सर्व धर्मगुरू, शास्त्री, दशग्रंथी विद्वान लोक यांच्यापेक्षा आपण जास्त शहाणे आहोत असे तुझे म्हणणे आहे काय ?'
 'माझी निष्ठा परमेश्वरावर व माझ्या सदसद्विवेकबुद्धीवर आहे. शेकडो नव्हे, लक्षावधी शास्त्री व धर्माचार्य जरी विरुद्ध निर्णय देऊ लागले तरी माझ्या विवेकाची साक्ष त्यापेक्षा मला जास्त वंदनीय वाटते.'
 या विवेकबळाच्या आधारानेच जॉन हस शांतपणे चितेवर चढला. अग्नीच्या ज्वाळा वरवर चढू लागल्या तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणाला, 'शोक करू नका. त्या ज्वाळा जड शरीराला जाळतील. सत्याला जाळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नाही.'
 जॉन हसची ही परंपरा पश्चिम-युयोपच्या थोर पुरुषांनी अखंड पुढे चालवून आपल्या बलिदानाने विवेकस्वातंत्र्याची जपणूक केली. म्हणूनच त्या भूमीत धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, स्वातंत्र्य, धन व लोकसत्ता यांची प्रगती झाली. पुढे हळूहळू धर्माचार्यांचा विरोध कमी झाला. प्रत्यक्ष आत्मबलिदान करण्याचे प्रसंग कमी येऊ लागले; पण आपली नवी मते, नवे तत्त्वज्ञान, नवा धर्म, नवे शास्त्रीय सत्य यांच्या रक्षणासाठी, प्रसारासाठी, अखिल विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे जे मनोधैर्य,- त्याची आवश्यकता मात्र प्रत्येक शतकात तितकीच होती. त्यासाठी होणाऱ्या शिक्षा सौम्य होत गेल्या इतकेच. लूथर, रूसो, व्हाल्टेअर यांना असाच लढा लढावा लागला. इतकेच नव्हे, तर गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाची दोनतीनशे वर्षे प्रगती झाल्यानंतरही आपला उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त जगाला पटवून देण्यासाठी डार्विनला याच तऱ्हेचा संग्राम याच विवेकनिष्ठेच्या बळावर करावा लागला.
 विवेकनिष्ठेसाठी आत्मबलिदान करणे ही मानवी संस्कृतीच्या प्रगतीसाठी एक अत्यंत अवश्य असलेली गोष्ट आहे असे दिसते. कारण नुसत्या सत्याचे, नवतत्त्वाचे, नवविचाराचे आवाहन माणसाच्या मनाला पोचत नाही. त्या सत्याच्या मागे अग्निज्वाळाचा प्रकाश जेव्हा दिसतो तेव्हाच माणसाची दृष्टी तिकडे वळते, एरवी नाही. माणसाच्या बुद्धीचे हे फार मोठे वैगुण्य आहे; पण ते आहे खरे. केवळ तर्कशुद्धता, ऐतिहासिक प्रमाणे, स्वानुभव, इतकेच काय, पण दृक्प्रत्यय हासुद्धा मानवी मनाला नवसत्याकडे वळविण्यास असमर्थ आहे. सनातनधर्मशास्त्र, वेदवचने, प्रस्थापित रूढी यांच्याकडून मानवाची दृष्टी काढून ती नव्या तत्त्वांकडे वळवावयाची असेल तर 'आत्मार्पण' हा एकच उपाय आहे; आणि हे जाणूनच सॉक्रेटिसाने बुद्धिपुरस्सर आत्मबलिदान केले. सॉक्रेटिसाचे नवे तत्त्वज्ञान अमर झाले ते त्यामुळेच. त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याचा खटला चालू असता, त्याचे तत्त्वज्ञान केवळ सत्यतेच्या दृष्टीने पाहता नंतरच्या इतकेच शुद्ध होते; पण त्या सत्याच्या ठायी सामर्थ्य निर्माण झाले नव्हते. लोकांच्या मनात घुसून तेथे दृढ बैठक धरून बसण्याची शक्ती त्या सत्याच्या ठायी नव्हती. देहदंड आनंदाने सोसण्यात सॉक्रेटिसाने जे व्यक्तित्वाचे तेज प्रगट केले त्या तेजामुळे त्या सत्याच्या ठायी ती शक्ती निर्माण झाली. त्याने लोकमताची एकदम पकड घेतली; आणि ज्यांनी त्याला शिक्षा केली होती तेच लोक आता त्याचे शत्रू जे अनिटस व मेलिटस त्यांच्याविरुद्ध खवळून उठले, त्यांना त्यांनी देशोधडीला लावले व अथेन्समध्ये सॉक्रेटिसाचा पुतळा उभारला. याचा अर्थच असा की, सामर्थ्य आहे ते विवेकाने निर्माण केलेल्या सत्यात नसून त्या विवेकनिष्ठेसाठी केलेल्या आत्मबलिदानात आहे.

भारताचे वैगुण्य

 दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपल्या अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत उज्ज्वल अशा भारतीय संस्कृतीत या सामर्थ्याचा अभाव हे फार मोठे वैगुण्य आहे; ही अत्यंत मोठी उणीव आहे. वेदकाळापासून तो इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराने येथे पाश्चात्त्य विद्येचा प्रभाव निर्माण होईपर्यंत या भूमीत सॉक्रेटिस झालाच नाही. आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा मात्र प्रारंभच सॉक्रेटिसापासून झाला. येथे भारतीय संस्कृतीच्या बाजूने एक गोष्ट सांगणे अवश्य आहे. ख्रिस्ती धर्माने पाश्चात्त्य देशांत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे मानवी मनावर व बुद्धीवर अत्यंत कडक असे नियंत्रण ठेविले होते तसे धर्माचे हेकट व आततायी नियंत्रण या भूमीत कधीही कोणत्याही धर्माचार्यांनी प्रस्थापित केले नव्हते. धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रांत येथे माणसांच्या मनाला, त्यांच्या विवेकाला, बुद्धीला पूर्ण स्वातंत्र्य होते. तत्त्वज्ञानातील नव्या मतासाठी किंवा विज्ञानातील नव्या संशोधनासाठी येथे कधीही कोणाचाही छळ झाला नाही, आणि या विवेकस्वातंत्र्यामुळेच येथे त्या त्या क्षेत्रात प्राचीन काळी भारताने असामान्य प्रगती केलेली होती. पण याचा अर्थ असा नव्हे की भारतात कोणत्याच प्रकारचा जुलूम व अन्याय नव्हता. वर्णसंस्था, जातिसंस्था, अस्पृश्यतेची रूढी, बालविवाह, सक्तीचे वैधव्य, सक्तीचे सहगमन इ. स्त्रियांवरील अन्याय, परदेशगमनबंदी, मनुष्य जुलमाने धर्मभ्रष्ट झाल्यास त्याच्या परावर्तनाची बंदी, अनेक प्रकारचे जाचक कर, राजसंस्थेचा व मदांध राजांचा जुलूम यांमुळे होणारा छळ मुळीच उपेक्षणीय नव्हता. आणि या सर्वाला धर्मशास्त्राचा- धर्मवचनांचा म्हणा किंवा रूढ धर्मशास्त्राचा म्हणा- पाठिंबा होता. पण या विरुद्ध तत्त्वज्ञान निर्माण करून त्याच्या प्रतिकारार्थ पाय रोवून संग्राम करण्यासाठी या भूमीत कधीही, कोणीही उभाच राहिला नाही.

विवेक X वेद

 जुन्या धर्मशास्त्राला किंवा रूढ धर्माला कोणी विरोधच केला नाही असे नव्हे तत्त्वज्ञानपूर्वक विरोध केला नाही, जुन्या धर्मशास्त्राला आव्हान देऊन त्याच्या जागी नवे धर्मशास्त्र स्वतःच्या विवेकाच्या आधारे प्रस्थापित करण्याची रंग कोणी दाखविली नाही, असा वरील म्हणण्याचा भावार्थ आहे. राजकारणशास्त्रात बंडाळी आणि क्रान्ती यांत भेद दर्शविला जातो. बंडाळी म्हणजे क्रान्ती नव्हे. शासनाचे, समाजरचनेचे, जे जुने तत्त्व असेल ते उच्छिन्न करण्याच्या हेतूने व नवे तत्त्व सांगून त्याअन्वये समाजरचना करण्यासाठी जी उठावणी केली असेल ती क्रान्ती होय; एरवी सर्व बंडाळ्या किंवा दंगेधोपे होत. त्याचप्रमाणे प्रस्थापित सनातन धर्माविरुद्ध या देशांत बंडाळ्या झाल्या, पण क्रान्ती झाली नाही. काही समाजधुरीणांनी देशकाल पाहून धर्मसुधारणा केल्या, पण त्या विवेबळाने बुद्धीला पटेल ते ग्राह्य मानू अशा तत्त्वाने, अशा आग्रहाने केल्या नाहीत. जुन्या स्मृतीऐवजी नव्या स्मृती आणणाऱ्यांनी पुन्हा वेदवचनाचे प्रामाण्य चालूच ठेविले. आठव्या शतकापासून तर नव्या स्मृती रचणेही बंद झाले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही लोकांनी विवेकबुद्धीच्या आधाराने नवे सिद्धांत सांगण्याची जोखीम पत्करली नाही. शंकराचार्य, रामानुजाचार्य यांनी गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांवर भाष्ये लिहून त्या आधाराने स्वतःचे विचार मांडले. काही थोर विभूतींनी एक पाऊल आणखी पुढे टाकले. भगवान् गौतमबुद्ध, भगवान महावीर यांनी सनातन धर्माला विरोध केला तो स्वतःच्या विवेकबळाने केला हे खरे आहे; पण त्यांनी विवेकनिष्ठेचे तत्त्वज्ञान, म्हणजे बुद्धिप्रामाण्याचे तत्त्व प्रस्थापित केले नाही. वेदाधारे चालणाऱ्या शब्दप्रामाणाच्या अंध परंपरेऐवजी त्यांनी दुसऱ्या, पण शब्दप्रामाण्यपरंपराच निर्माण केल्या. यूरोपातील जीजस, सेंट पॉल, पीटर यांचे कार्य याच प्रकारचे होते. तेथील रूढ धर्माला त्यांनी विरोध केला, त्यावेळी अखिल समाजाविरुद्ध ते एकटेच उभे होते; पण असा समाजाविरुद्ध उभे राहण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे हे मात्र त्यांना मान्य नव्हते. सॉक्रेटीस, रॉजर बेकन यांचे ते वैशिष्टय होते. स्वतःच्या विवेकाने, बुद्धीने, विचार करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, हे तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आत्मबलिदान केले. जॉन हसने यासाठीच मृत्यूला कवटाळले. "प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. बायबलाचा, परमेश्वराच्या वचनांचा आपल्या मताप्रमाणे अर्थ लावण्याची प्रत्येकास मोकळीक मिळाली पाहिजे, इतकेच नव्हे, तर पाखंडी लोकांचे ग्रंथ वाचण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असले पाहिजे, कारण त्यावाचून सत्यज्ञान होणार नाही." असे जॉन हसचे प्रतिपादन असे. त्याला देहान्त शासन झाले ते त्यासाठीच. उज्जीवन- युगातले ब्रूनो, गॅलिलिओ हे जे विज्ञान-संशोधक, त्यांचे संग्राम तर केवळ यासाठीच होते. स्वतःची बुद्धी, अनुभव, तर्क, विवेक यांना अवसर मिळाला पाहिजे; सत्य ज्ञान याच साधनानी करून घेतले पाहिजे आणि ते प्राप्त करून घेण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीस मिळाला पाहिजे हे सत्य प्रस्थापित करण्यासाठीच त्यांनी देहदंड सोसला.

संग्राम नाही

 मानवाच्या विवेकबुद्धीवरची ही जी अनन्यनिष्ठा तिचा आग्रह धरणारा, तिच्यासाठी संग्राम करणारा, एकही पुरुष ब्रिटिशपूर्व भारतीय इतिहासात झाला नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. स्त्रिया, शूद्र, अंत्यज यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव अनेकांना होत होती. कष्टकरी जनता, शेतकरीवर्ग पिळून निघत आहे हेही अनेकांना दिसत होते; पण ज्यांच्यावर अन्याय्य होत होता ते लोक किंवा त्यांच्या वतीने समाजातल्या इतर वर्गातले लोक यांतून, ही समाजरचनाच आमूलाग्र बदलली पाहिजे, आणि समाजरचनेची नवी तत्त्वे ठरविण्याचा आम्हांला अधिकार असला पाहिजे, अशा बैठकीवरून प्रस्थापित धर्मशास्त्राशी संग्राम करण्यास कोणीही उभा राहिला नाही. ही विषमता अन्याय आहे असे पारमार्थिक क्षेत्रापुरते प्रतिपादन संत-साधू करीत होते; पण तेथेही ते संग्रामास सिद्ध झाले नाहीत. काहींनी रूढ धर्मशास्त्राविरुद्ध आचरण केले; पण तसे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एकनाथ महाराच्या घरी जेवावयास गेले. चातुर्वर्ण्य तर अनेकांनी उधळून दिले होते. रूढ धर्माप्रमाणे नामदेव, तुकाराम यांना वास्तविक धर्मप्रवचनाचा अधिकार नव्हता, तरी त्यांनी धर्मप्रवचने केली. मल्हारराव धनगर असल्यामुळे राजा होण्याचा अधिकार त्याला नव्हता, तरी तो राजा झाला; पण इतके करूनही चातुर्वर्ण्य हे समाज- रचनेचे तत्त्व चूक आहे, समाजविघातक आहे, नव्या तत्त्वाअन्वये समाजरचना झाली पाहिजे असे मात्र कोणी सांगितले नाही; तसा कोणी आग्रह धरला नाही. इतकेच नव्हे, तर लिहिण्याची जेव्हा वेळ येई तेव्हा ते सर्व सनातन धर्माचेच समर्थन करीत असत. चातुर्वर्ण्याचे समर्थन एकनाथांनी केले, एवढेच नव्हे तर तुकारामांनीही ते ठायी ठायी केले आहे. वर्णधर्म न पाळणारे लोक नरकात जातील असे ते म्हणतात.ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांना जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता यांविरुद्ध पुष्कळ विचार सांगावयाचे होते आणि मधूनमधून त्यांनी ते सांगितलेही आहेत; पण सनातन धर्मशास्त्राच्या विरुद्ध आम्ही हे स्वतःच्या विवेकाच्या आधाराने, त्या बळावर सांगतो, आणि तसे सांगण्याचा प्रत्येकस हक्क आहे, आमच्या बुद्धीला पटले, विवेकाला मानवले तरच आम्ही सनातन धर्मशास्त्र मानू, अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. ती त्यांच्या स्वप्नातही नव्हती. जे काही थोडे त्यांना नवीन सांगावयाचे होते ते त्यांनी जुन्याच्या प्रवाहातच मिसळून दिले. त्याशी जमते घेत घेत, त्याच्यापुढे नमत, त्याला वंदन करीत त्यांनी ते सांगितले. याचासुद्धा थोडाबहुत उपयोग होतो, नाही असे नाही; पण यातून विवेकनिष्ठेची महाशक्ती कधीही निर्माण होत नाही, आणि ती नाही म्हणजे प्रगती नाही. 'अनॅलस् ऑफ युरोपियन सिव्हिलेझन' या अल्फ्रेड मेयरच्या ग्रंथाचा वर उल्लेख केला आहे. त्याप्रमाणे इ. स. १००० ते १८०० या काळाची भारताच्या संस्कृतीचा हिशेब घेणारी सनावळी तयार केली तर एवढ्या आठशे वर्षाच्या काळात काव्य, कादंबरी, नाटक, राजनीती, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म, पदार्थविज्ञान, रसायन, गणित, नृत्य, चित्र, शिल्प या क्षेत्रांत किती ग्रंथ व किती कलाकृती त्या सनावळीत आपल्याला नोंदता येतील याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला आणि या आठशे वर्षांतील बहुतेक सनांपुढे आपल्याला जागा मोकळीच ठेवावी लागेल हे त्याच्या ध्यानात आले तर विवेकनिष्ठा ही केवढी उज्जीवक शक्ती आहे, मानवी संस्कृतीच्या प्रगतीला तिची किती आवश्यकता आहे, तिच्या अभावी समाजचे समाज कसे मृतवत् होतात, हे त्याला सहज कळून येईल. आणि अशा या विवेकनिष्ठेच्या भक्तीने संग्राम करण्यासाठी, आत्मबलिदान करण्यासाठी पूर्वकाळी भारतात कोणीच उभा राहिला नाही ही आपल्या संस्कृतीतली फार मोठी उणीव आहे, हे आपले फार मोठे दुर्दैव आहे, हा विचारही त्याला पटेल.

बंडखोरीचे तत्त्वज्ञान :

 विवेकनिष्ठेसाठी संग्राम करण्याचे धैर्य, विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे हे मनःसामर्थ्य भरतभूमीत आगरकरांनी प्रथम प्रकट केले. पाश्चात्त्य विद्येचा प्रसार येथे होऊ लागल्यापासूनच या सामर्थ्याच्या जोपासनेची तयारी येथे होऊ लागली होती. राजा राममोहन रॉय, ईश्वरचन्द्र विद्यासागर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, भांडारकर या सर्व थोर पुरुषांनी सनातन धर्मशास्त्रावर टीकास्त्र चालविले होते. पण तसे करताना त्यांनी आपल्या बाजूला पुरातन काळच्या अन्य ऋषींचे साह्य घेतले होते. त्यातल्या त्यात लोकहितवादी व महात्मा ज्योतिराव फुले यांचा हल्ला जास्त मूलगामी स्वरूपाचा होता. त्यांची बैठक बरीचशी विवेकनिष्ठेची होती; पण जुन्या शास्त्रांना जळजळीत आव्हान देऊन, 'आमच्या स्मृती आम्हीच रचणार,' अशी घोषणा करून, बुद्धीला पटत नसेल तर परमेश्वराचे वचनही आम्ही मानणार नाही, असे जाहीरपणे सांगून अनुभव, इतिहास, तर्क, यांच्याच केवळ आधाराने नव्या समाजरचनेचे संपूर्ण तत्त्वज्ञान सांगण्याचे कार्य, आणि या रीतीने विवेकनिष्ठा ही अद्भुत शक्ती या भूमीत निर्माण करण्याचे कार्य आगरकरांनी केले. लोकहितवादींनी सूत्ररूपाने नवे विचार आपल्या पत्रांतून मांडले होते. ज्योतिबांनी आपल्या कवनांतून, पोवाड्यांतून व संवादातून आपले विचार सूत्ररूपाने मांडले होते; पण एवढ्याने नव्या विचारांना तत्त्वज्ञानाची उंच प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. नव्या तत्त्वांचा सर्व बाजूंनी विचार करणे, आधार प्रमाणांनी त्यांचे मंडन करणे, तुलतेने त्यांचे तारतम्य दाखविणे, इतिहासाच्या साह्याने जगाच्या पसाऱ्यात त्यांचे स्थान दाखवून देणे, त्यांवर आलेल्या व येणाऱ्या आक्षेपांचे निरसन करणे, त्यांमुळे होणाऱ्या समाजरचनेचे स्वरूप दाखवून देणे, अशा पद्धतीने जेव्हा सूत्रमय विचारांचा प्रपंच केला जातो तेव्हा त्यांना नवतत्त्वज्ञानाचा दर्जा प्राप्त होतो. आणि हे सर्व करीत असताना त्या तत्त्वांचा प्रणेता समाजाकडून होणाऱ्या यातना सोसताना जे अग्निदिव्य करतो, अखिल विश्वाविरुद्ध केवळ आपल्या विवेकाने जेव्हा तो संग्राम करू लागतो तेव्हा त्यातून विवेकनिष्ठेची शक्ती निर्माण होते. ती शक्ती येथे आगरकरांनी निर्माण केलेली आहे.

मानवत्वाचे लक्षण

 आगरकरांचा संग्राम चालू होता त्या वेळी विवेकनिष्ठेचे माहात्म्य सर्वत्र मान्य झालेले होते. युरोपात इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्वीडन या देशांत ती शक्ती निर्माण होऊन वाढीस लागली होती. जर्मनी, इटली या देशांतही विचारांचे वळण बदलून विचारवंत लोक या मार्गाकडे वळले होते. पूर्व-युरोपात अजून प्रत्यक्ष व्यक्तिस्वातंत्र्य आले नव्हते, तरी आपल्याला त्याच मार्गाने जावयाचे आहे हा विचार तेथील लोकांना मान्य झाला होता. पूर्वेकडच्या देशांतही व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांचाच उद्घोष चालू झाला होता. सारांश, विवेकनिष्ठा ही एक महाशक्ती आहे व तिच्याच साह्याने आपल्या समाजाची भावी काळात प्रगती करून घ्यावयाची आहे, हा विचार त्या काळी जगन्मान्य होत आला होता. या वाटचालीत कोणी पुढे होते, कोणी अजून मागे होते, इतकाच फरक होता; पण जगाच्या वाटचालीची दिशा ठरून गेली होती. तिच्याबद्दल कोठे वाद नव्हता. यापुढे कालचक्र एकाएकी उलटे फिरू लागेल व सॉक्रेटिसाच्या काळाच्याही मागे आपण जाऊ, असे त्या वेळी कोणाच्या स्वप्नातही आले नसेल; पण आज जगात तसे दुर्दैवाने घडले आहे, घडत आहे. पूर्वीच्या काळी धर्माचार्यांनी मानवी जीवन एकपट नियंत्रित केले असेल तर आज त्याच्या शतपट नियंत्रित करावे असे धोरण हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांनी विसाव्या शतकात आखले. मानवाच्या विवेकाला अवसर तर द्यावयाचा नाहीच, उलट ती शक्ती अजिबात नष्ट करून टाकावयाची अशी या पुरुषांची महत्त्वाकांक्षा होती, आणि या ध्येयसिद्धीसाठी त्यांनी उपाययोजनाही तशीच केली. पूर्वी सॉक्रेटीस किंवा रॉजर बेकन हे धर्मद्रोही आहेत असे वाटले तर त्यांनाच फक्त देहान्तशासन द्यावे, त्यांनाच फक्त तुरुंगात ठेवावे असे सत्ताधीशांचे मर्यादित धोरण असे. आता तसे नाही; सॉक्रेटिस, बेकन, हस यांच्या बायकामुलांचा, आप्तांचा, मित्रांचा आता बळी घेतला जाईल. हेमलॉक् चा पेला सॉक्रेटिसाबरोबरच किंवा त्याच्या आधी त्याच्या बायकोला, मुलीला, मुलाला घ्यावा लागेल, आणि त्यांचे मृत्यू पाहूनही सॉक्रेटिसाचे धैर्य गळले नाही तर शेवटी त्यालाही विष घ्यावे लागेल. त्यामुळे विवेकनिष्ठेचा संग्राम पूर्वीपेक्षा शतपट अवघड होऊन बसला आहे. जॉन हस हा स्वतःचा देह चितेवर ठेवण्याचे धैर्य प्रकट करू शकेल पण त्याच्यादेखत त्याच्या लाडक्या लेकीला चितेवर उभी केली किंवा आपल्यामागून तिची हत्या होईल असे त्याला वाटले तर त्याचे धैर्य कितपत टिकेल याची शंका आहे. जर्मनीत अशा हत्या नित्य होत असत; रशियात आज होत आहेत. यामुळे जगाच्या भावी स्वरूपाविषयी विचारी लोकांच्या मनाला दारुण चिंता वाटू लागली आहे. मागल्या काळी मदांध राजे किंवा सुलतान लोकांच्या घरादाराचा असा विध्वंस करीत; पण ते त्यांच्या लहरीवर असे. आता मानवाला पद्धतशीर यमयातना भोगविण्याची यंत्रणा सिद्ध झाली आहे; आणि ज्या विज्ञान संशोधनामुळे मानवाची आतापर्यंत प्रगती झाली त्याचे बळ सत्ताधीशांनी हाती घेतल्यामुळे राज्ययंत्राला प्रतिकार करणे हे व्यक्तीला हळूहळू जास्त कठीण होत जाणार आहे. या व असल्या अनेक कारणांमुळे विवेकनिष्ठेची उपासना पुढील काळात किती अनन्यतेने होईल याविषयी मन साशंक होते. तरी पण नवीन पिढीच्या तरुणांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की मानवाच्या प्रगतीचे ते एकमेव साधन आहे. या उपासनेवाचून मानवाला मानवत्वच लाभणार नाही. त्याचा पशु होऊन जाईल. म्हणून सत्ताधीशांनी मानवाच्या हातची ही महाशक्ती नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक नव्या युक्त्या शोधून काढल्या आहेत, कल्पना लढविल्या आहेत, योजना आखल्या आहेत त्याचप्रमाणे त्या निष्फळ करून टाकण्यासाठी मानवानेही आपली बुद्धी लढविली पाहिजे व या महाशक्तीची जपणूक केली पाहिजे. असे केले तरच त्याला मानव ही पदवी सार्थतेने लावता येईल.

(ऑक्टोबर १९५२)