माझी डायरेक्ट मेथड ही ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> शंभरापैकीं पंचवीस मार्क ? - कांहीं जिवाला शरम ! जा ! आतांच्या आतां हें कार्ड घेऊन, दाखव तुझ्या त्या मास्तरला नेऊन ! बेशरम ! शिकवतात का हजामती करतात ? - या ! छान झालें ! ऐन वेळेवर आलांत ! पहा हे आमच्या चिरंजिवांचे प्रताप ! इंग्रजींत सारे पंचवीस मार्क ! - काय पोरखेळ आहे ? - मोठा अगदीं तुमच्या शिफारशीचा मास्तर ! कारण तुम्ही आमचे स्नेही - अन् शिक्षणपद्धतीचे अगदी गड्डे - म्हणून तुम्हाला आम्हीं विचारलें ! - तोंडांत मारायला नव्हते कुणी त्या वेळी माझ्या - दरमहा वीस रुपयेप्रमाणें आज अडीचशें रुपये त्या मास्तरड्यांच्या उरावर घातले त्याचें हें फळ होय ? म्हणे नवीन पद्धति ! विद्वान् कीं नाहीं मोठे ! - काल मॅट्रिक झाला नाहीं, तों आज मास्तरच्या खुर्चीवर जाऊन बसतां, काय येत असतं रे तुम्हांला ? - हीच रड तुमच्या त्या सुपरिटेंडटची ! - आज एम. ए. होतो काय, अन् शाळा चालवतो काय ! इकडे पालक तर विचारायलाच नको ! सगळेच अवलिया ! स्वतःला मुलें किती आहेत याची तरी त्यांना शुद्ध असते कीं नाहीं कुणास ठाऊक ! वर आणखी नवीन नवीन खुळें हीं ! आग लावा त्यांना ! यापेक्षां आमची जुनी पद्धति खरोखरच चांगली ! एवढा मोठा ' दाऊ ' चा धडा अवघड ना ! पण एकदां चांगली गालफडांत देऊन, मास्तरांनी इ - एस - टी लावायला सांगितली कीं काय विशाद आहे पोरटें विसरेल ! पक्की जन्माची आठवण ! तें राहिलें बाजूलाच ! आतां धड ए - एस - टी नाहीं, अन् आय - एन् - जी नाहीं ! कारट्यांना पाठ म्हणून करायला नको मुळीं ! - आज त्या मास्तरकडे पाठवून याला वर्ष होत आलें, अन् खरोखर सांगतों - चेष्टा नाहीं - या टोणग्याला सी - ए - टी कॅट करतां येत नाही ! - तेव्हां नांव काढूं नका तुम्ही अगदीं ! - ' नवीन - नवीन ' म्हणतां तुम्ही हें ! पण सगळें फुकट - ऑल बॉश - आहे ! - तें कांहीं नाहीं ! यापुढे माझी डायरेक्ट मेथड आतां ही - उठतांक्षणींच कांही अपराध न केल्याबद्दल पांच छड्या, अन् निजण्यापूर्वी अपराध केल्याबद्दल पांच छड्या ! रोजचा हा खुराक ! मग पहातों कसा पोरटीं अभ्यास करीत नाहींत !....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.