यांतही नाहीं निदान - ? (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> यंदा नाहीं म्हणजे मग कायमचेंच नाहीं ! कारण कांहीं जमण्यासारखें असलें, तर तें याच वर्षी. नाहीं तर .... हो, तें खरें ! नाहीं म्हणतों आहे कुठें मी ! मार्क कमी पडले आहेत, दोन तीन विषयांत नापास झालों आहें, सर्व कांही कबूल आहे. पण .... मी तरी काय बरं करणार ? गेल्या सबंध वर्षात कोण माझी ओढाताण आणि दुर्दुशा झाली म्हणून सांगूं ! - वडलांचा तर पत्ताच नाहीं ! - कोणास ठाऊक कुठें गेले आहेत ते ! रात्री एक दिवस घरांतून नाहींसे झाले - अहो छे ! कांही भांडण नाहीं अन् कांही नाहीं ! दैव ओढवलें इतकेंच ! - झालें ! वडलांच्या शोधांत कुठें आहोंत, न आहोंत तों एक दिवस सकाळी आपळी मेहुणा गेल्याची बातमी ! भोराहून इकडे पुण्याला येत होते, तों गाडीवानाला म्हणतात रस्ता नीट दिसला नाहीं, अन जी गाडी भलतीकडे उताराला लागली, ती उपडी होऊन, पार कोणीकडच्या कोणीकडे फेकली गेली ! गाडीवाला काय तो कसाबसा जिवंत निघाला, बाकी सगळीं माणसें.... माझा मेव्हणा, त्याचा एकुलता एक बरोबरीचा मुलगा, सर्व कांहीं निकाल ! बहीण इकडे आजारी म्हणून हवा पालटायला आलेली, कळतांच जी तिची वाचा बसली, तों अद्यापपर्यंत एक शब्द नाहीं ! विचारलेंच कोणी कांहीं, तर तोंडाकडे पहाते, आणि रडूं लागते धळधळां ! - आहे ! आई आहे घरांत ! पण ती तरी काय करते बिचारी ! धीर तरी तिनें कोठवर द्यायचा ? - बरं, वडलांच्या आणि मेव्हण्यांच्या या प्रसंगांतून आम्ही कुठें हातापाय हालवतों आहोंत तों .... महिना पंधरा दिवसांचीच गोष्ट ! काय बाबाला बुद्धि झाली कुणास ठाऊक ! बंधुराज आमचे सहज कोणाबरोबर तरी पोहायला म्हणून गेले, तेही.... तिकडे कायमचेच ! - घरांत मिळवता.... आधार असा तोच काय तो उरलेला ! पण तोही असा .... तेव्हां कशाची प्रिलिमिनरी, अन् कसला अभ्यास होतो नीट ! त्यांतूनही करायची तेवढी धडपड केली मी ! आणि याहीपुढें .... येवढें सांगतों मी आपल्याला कीं, जर मिळाला फॉर्म, तर तो .... वाया नाहीं जायचा ! कारण.... काय असेल तें असो ! सारखें मला आपलें वाटतें आहे येवढें खरें ! कीं सगळीकडून असें .... इथें नाहीं, तिथें नाहीं, चोहोंकडूनच जर असें अपयश, तर .... मी म्हणतों .... देव यांतही नाहीं निदान मला ? ....

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg