महाराष्ट्र संस्कृती/राजसत्ता
पहिल्या दोन प्रकरणांत महाराष्ट्राच्या अस्मितेचा निश्रय केल्यानंतर पुढील तीन प्रकरणांत इ. पू. २३५ ते इ. स. १३१९ या पहिल्या कालखंडाच्या राजकीय इतिहासाची स्थूल रूपरेषा आपण पाहिली. त्यांतल्याच एका प्रकरणात सातवाहन ते यादव या सहा राजघराण्यांच्या महाराष्ट्रीयत्वाची छाननी करून ती सर्व घराणी निःसंदेह महाराष्ट्रीय होती हे सिद्ध केले. आता या पायावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मंदिर कसे उभारले गेले ते पाहावयाचे आहे. संस्कृती या शब्दाची विवक्षा आपण प्रारंभीच निश्चित केली आहे. संस्कृतीची व्याख्या करणे अवघड असले आणि त्या शब्दाच्या अर्थाविषयी खूप मतभेद असले तरी संस्कृतीच्या स्थूल रूपाविषयी मतभेद नाहीत. धर्म, तत्त्वज्ञान, राजशासन, समाजरचना, अर्थव्यवस्था, विद्या, शस्त्रे, साहित्य, कला हीच संस्कृतीची प्रमुख अंगे होत याविषयी वाद नाही. या विविध अंगांचा विकास कसकसा होत गेला हे पाहणे हाच संस्कृतीचा अभ्यास होय. हाच अभ्यास आता आपल्याला करावयाचा आहे. राजशासनाच्या विवेचनापासून या अभ्यासाला आपण प्रारंभ करू.
दण्डनीती
राजशासनापासून प्रारंभ करण्याचे कारण उघड आहे. समर्थ व कार्यक्षम राजशासन हा सर्व संस्कृतीचा पाया आहे. त्यावाचून कोणत्याही समाजात संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. 'शस्त्ररक्षित राज्यातच शास्त्रचिंता होऊ शकते', 'राजधर्मात सर्व धर्मांचा समावेश होतो' ही महाभारतातील वचने मागे दिलीच आहेत. समाजाच्या शासनाचे जे शास्त्र त्याला प्राचीन काळी राजशास्त्र, अर्थशास्त्र, दण्डनीती, राजधर्म अशी नावे होती. यांतील दण्डनीती हा शब्द लक्षणीय आहे. प्रजांचे नियंत्रण, शासन करण्याची शक्ती या अधी दण्ड शब्द येथे वापरलेला आहे. आणि या दण्डावाचून समाजाचा कोणताही व्यवहार शक्य होणार नाही, हे प्राचीन शास्त्रज्ञांनी पुनः पुन्हा सांगितले आहे. 'विद्वान लोक दण्ड हाच धर्म असे मानतात', असे मनूने म्हटले आहे. तत्त्वज्ञान, वेदविद्या व वार्ता ( अर्थव्यवहार ) या शास्त्रांना कौटिल्याच्या मते फार महत्त्व आहे. पण या शास्त्रांना दण्डानेच स्थैर्य लाभते व त्यांचा विकास होतो, असे तो म्हणतो. दण्डनीती हाच जगाचा आधार असून तिच्या अभावी समाज उद्ध्वस्त होईल, असे महाभारतकार म्हणतात. मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, मत्स्यपुराण, कामंदकीय नीतिसार इ. सर्व प्राचीन ग्रंथांत दण्डनीतीची अशीच महती गायिली आहे. दण्ड हाच धर्म हे मनुवचन वर दिले आहे भगवद्गीतेत तर दण्ड हा परमेश्वरच होय, असे म्हटले आहे. ' दण्डो दमयतां अस्मि ।' शासकांचा दण्ड मीच होय, असे भगवान म्हणतात. यावरून सर्व संस्कृतीचा पाया राजशासन हा आहे याविषयी प्राचीन शास्त्रवेत्यांच्या मनात कसलाही संदेह नव्हता असे दिसून येईल.
प्राचीन ग्रंथ
राजशासनाचे हे अनन्यसाधारण महत्त्व भारतात मान्य झाले होते म्हणूनच प्राचीन काळी येथे या विषयावर विपुल ग्रंथरचना केली गेली. महाभारतात प्राचीन काळच्या राजनीतिशास्त्राचा थोडक्यात इतिहास दिला आहे. बृहस्पती, विशालाक्ष, शुक्र, देवेंद्र, मनू, भारद्वाज, गौरशिरा इ. या क्षेत्रातील ग्रंथकारांची नावे सांगून त्यांना तेथे राजधर्मप्रणेते असे म्हटले आहे. कौटिल्याने आपल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात वातव्याधी, कौणपदंत, पिशुन, भारद्वाज, पराशर, विशालाक्ष, उशना, बहुदंती अशा अनेक राजनीतिशास्त्रज्ञांचा उल्लेख करून त्यांची वचने देऊन त्यांची चर्चाही केली आहे. शिवाय आपल्या गुरूचा आचार्य म्हणून वारंवार उल्लेख करून त्यांच्याही मतांची चर्चा तो करतो. यावरून त्या काळी हा विषय पंडितांना व समाजालाही अत्यंत महत्त्वाचा वाटत होता यात शंका नाही.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रानंतरही पुढील काळात कामंदकीय नीतिसार, नीतिवाक्यामृत, शुक्रनीती इ. ग्रंथ रचले गेले. मनू, याज्ञवल्क्य, बृहस्पती, नारद, पराशर इ. स्मृतिकार व विश्वरूप, मेधातिथी, विज्ञानेश्वर इ. टीकाकार दण्डनीतीची चर्चा करतात. या सर्वांच्या आधारे अर्वाचीन काळात म. म. काणे, म. म. मिराशी, डॉ. जयस्वाल, डॉ. आळतेकर, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. भांडारकर, चिंतामणराव वैद्य, नीलकंठ शास्त्री, डॉ. मुनशी यांनी प्राचीन काळच्या राजशास्त्राची चर्चा केली आहे. तिच्याच आधारे आता महाराष्ट्रातील या कालखंडातील राजशासनाचे स्वरूप काय होते ते पाहू.
आर्यीकरणाचा इतिहास
या कालखंडाचा महाराष्ट्राचा इतिहास पाहताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवली पाहिजे की तात्विक दृष्टीने पाहता या काळात अखिल भारताच्या संस्कृतीहून महाराष्ट्राची संस्कृती निराळी नव्हती. तत्त्वज्ञान, धर्म, राजनीती, अर्थशास्त्र या विषयांवर जी ग्रंथरचना या काळात झाली, ती बव्हंशी उत्तरेतच झाली. पण त्या ग्रंथांच्या रचनेच्या काळापासूनच अखिल भारतावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. आणि कमीअधिक प्रमाणात ते आजही अबाधित असेच आहे. अखिल भारताच्या संस्कृतीला एकरूपता प्राप्त झाली ती या ग्रंथांच्यामुळेच झाली. महाराष्ट्र अर्थातच याला अपवाद नाही. किंबहुना दख्खनचा या काळचा सांस्कृतिक इतिहास म्हणजे दक्षिणेच्या आर्यीकरणाचाच इतिहास होय असे पंडितांचे मत आहे. आंध्र विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक गुटी वेंकटराव म्हणतात, राज्यकारभार, सामाजिक व अर्थिक जीवन, धर्म, तत्त्वज्ञान, कला, साहित्य ही दक्षिणेच्या जीवनाची सर्व अंगोपांगे या काळात आर्य संस्कृतीच्या मुशीत ओतली गेली. वैदिक ऋषी, मौर्य शासनाचे अधिकारी व बौद्ध भिक्षू यांनी आर्य धर्म, तत्त्वज्ञान व संस्था यांची बीजे आधीच येथे पेरली व रुजविली होती. सातवाहनांनी सहजगत्याच त्यांचा स्वीकार करून विकास घडविला (अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, संपादक, डॉ. यजदानी, पृ. १३१ ). पुढील राजवंशासंबंधी तर पंडितांनी निःसंदेहपणे अशी विधाने केली आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील राजशासनाचे पुढील विवेचन त्या अखिल भारतीय कीर्तीच्या ग्रंथांच्या आधारेच केले पाहिजे. प्रत्यक्ष इतिहास पाहताना मात्र महाराष्ट्रातील राजवंशांच्या चरित्रांतील घटनांच्या आधारेच विवेचन केले जाईल.
राजसत्ता
महाराष्ट्रातील राजशासनाचे रूप पाहू लागताच त्याचे पहिले लक्षण आपल्या ध्यानात येते ते हे की हा हजार दीडहजार वर्षांचा काळ प्रारंभापासून अखेरपर्यंत केवळ राजसत्तेचा काळ होता. अलीकडच्या संशोधनाअन्वये भारतात प्राचीन काळी ग्रीसप्रमाणे अनेक गणराज्ये वा प्राजके प्रस्थापित झालेली असून त्यांनी आपला राजकीय प्रपंच अत्यंत यशस्वीपणे चालविला होता. डॉ. जयस्वाल यांच्या मते इ. पू. १००० च्या सुमारास गंगायमुनांची अंतर्वेदी सोडली तर आर्यावर्तात सर्वत्र गणराज्ये होती. मौर्य सम्राटांनी यांतली अनेक गणराज्ये आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकली. तरी मौर्यांच्या नंतरही इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत भारतात अनेक गणराज्ये चालत होती. गुप्त साम्राज्यात मात्र त्यांचा पूर्ण ऱ्हास झाला. या गणराज्यांविषयी व भारतातील राजसत्तांवरील लोकनियंत्रणाविषयी पुष्कळच वाद आहेत. पण त्या वादांत शिरण्याचे आपल्याला कारण नाही. कारण ज्या कालखंडाचा आपण विचार करीत आहो त्या कालखंडात महाराष्ट्रात प्रजासत्ताक राजपद्धती होती असे कोणीही म्हटलेले नाही. येथे अखंडपणे केवळ राजसत्ताच प्रभावीपणे शासन करीत होती. त्या काळात राष्ट्र, आहार, विषय, ग्राम असे राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाचे विभाग केलेले असत. या विभागांच्या कारभारावर राजसत्तेचे नियंत्रण असले तरी त्यांना अंतर्गत स्वायत्तता होती, तेथे स्थानिक स्वराज्य होते, असे डॉ. आळतेकर, डॉ. रमेशचंद्र मुजुमदार या पंडितांचे मत आहे. या स्थानिक स्वराज्यांचे स्वरूप काय होते, त्यांचा प्रभाव किती होता याविषयी पुढे विवेचन येईलच. येथे ध्यानात घ्यावयाचे ते एवढेच की राजाची निवड करणे, त्याला पदच्युत करणे, वारशाचा निर्णय करणे यासंबंधीचा कसलाही अधिकार या स्वराज्यसंस्थांना नव्हता. आनुवंशाच्या रूढीने व प्रभावी राजपुरुषांच्या शस्त्रानेच त्याचा निर्णय होत असे.
वंशपरंपरा
सातवाहनांचा पहिला राजा सिमुक हा मृत्यू पावला तेव्हा त्याचा पुत्र सातकर्णी हा लहान होता. तेव्हा आनुवंशाच्या रूढ नियमाअन्वये सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. राजा सातकर्णी दुसरा हा मृत्यू पावला तेव्हा त्याचे पुत्र वेदिश्री व सतिश्री है अल्पवयी होते. त्या वेळी त्यांची आई राणी नायनिका हिनेच ते वयात येईपर्यंत राज्यकारभार चालविला होता. वरील प्रकारच्या स्वायत्त संस्थांनी दुसरी कसलीही व्यवस्था त्याच वेळी केल्याचे इतिहास सांगत नाही. पुढे सातवाहन राज्यावर शकांचे आक्रमण आले. त्यांचे साम्राज्य नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा त्या आक्रमणाचा निःपात केला तो दोन दुबळ्या राजांनंतर उदयास आलेल्या गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने आणि तोही शस्त्रबलाने. त्यानंतरही शकांचे पुन्हा एकदा आक्रमण आले होते. तेही सम्राट यज्ञश्री यानेच मोडून काढले. या सर्व घडामोडींत महाराष्ट्राची जनता जरी सातवाहन साम्राटांच्या पाठीशी होती तरी तिला काही प्रभावी मत होते, काही निर्णय करून त्याचा अंमल करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी होते, असे केहाही दिसून आले नाही.
सातवाहनांच्या नंतर इ. स. २५० ते ५५० वाकाटकांचे साम्राज्य महाराष्ट्रावर होते. त्यांच्या इतिहासावरूनही हेच दिसते. ग्राम, विषय, राष्ट्र या विभागांत त्यांच्या काळीही स्वराज्य होते. श्रेणी, पूग, अशा व्यापारी वर्गाच्या स्वायत्त संस्थाही असल्याचा पुरावा मिळतो. पण राजपदाचा किंवा वारसाचा निर्णय करण्याचा अधिकार त्यांना होता असे दिसत नाही. त्यांनी केव्हाही कोठेही हस्तक्षेप केल्याचे उल्लेख नाहीत. आनुवंशिक राजसत्तेचे तत्त्व विनातक्रार त्यांनी मान्य केलेले होते, असेच दिसून येते. विंध्यशक्ती हा वाकाटकांच्या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा पुत्र प्रवरसेन हा वाकाटक वंशातला अत्यंत बलाढ्य राजा. त्याला चार पुत्र होते. आणि प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर या चार पुत्रांनी पित्याच्या साम्राज्याची वाटणी करून चार स्वतंत्र राज्ये स्थापन केली. सर्व चारही शाखांचे इतिहास आज उपलब्ध नाहीत. पण नंदिवर्धन व वत्सगुल्म या शाखांची माहिती मिळते. तीवरून असे निश्चित दिसते की राज्य, साम्राज्य ही वाटणी करण्याजोगी वडिलार्जित मिळकत आहे, असेच मत तेव्हा रूढ होते व ते लोकांनाही मान्य होते. साम्राज्याची अशी चार भावांत वाटणी झाल्यामुळे ते फार कमजोर झाले. पण वरीलपैकी कोणतीही संस्था तो अनर्थ टाळू शकली नाही.
खाजगी जिंदगी
वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रात चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यातील एक राजा कीर्तिवर्मा हा मृत्यू पावला. त्या वेळी त्याचा पुत्र सत्याश्रय पुलकेशी हा लहान होता. त्यामुळे कीर्तिवर्म्याचा भाऊ मंगलीश हा गादीवर आला. त्याने आपल्यामागून खरा वारस जो पुलकेशी त्याला डावलून आपल्या पुत्राला गादी देण्याची खटपट चालविली. या वेळी लोकमत जर प्रभावी असते तर त्याने मध्ये पडून काही निर्णय केला असता. पण तसे काही झाले नाही. पुलकेशीला चुलत्याशी लढाई करून, त्याचा रणांगणात निःपात करूनच राज्य मिळवावे लागले. पुलकेशी हा महापराक्रमी सम्राट होता. त्याने पूर्वकिनाऱ्यापर्यंत आंध्रप्रांतात आणि पश्चिमेस व उत्तरेस लाट, गुर्जर व मालव या प्रांतांतही आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. आणि सत्ताप्रस्थापनेनंतर हे प्रांत खाजगी जिंदगी दान द्यावी त्याप्रमाणे आपला भाऊ विष्णुवर्धन व इतर आत यांना देऊन टाकले. आंध्र प्रांतात व गुजराथेत या दोन भावांच्या घराण्याची सत्ता अनेक शतके चालू होती. तेथील लोकमताने त्याला कधीही विरोध केल्याचे इतिहासात नमूद नाही. दक्षिणेत तर स्वायत्त संस्था विशेष प्रभावी होत्या असे म्हणतात !
वारशाची युद्धे
सुमारे ७५३ साली चालुक्यांच्या सत्तेचा अंत झाला व दंतिदुर्ग या महापराक्रमी राजाने राष्ट्रकूट घराण्याच्या राज्याची महाराष्ट्रात स्थापना केली. हे घराणे पराक्रम, साम्राज्यवैभव, राजपुरुषांचे कर्तृत्व यासाठी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासातही फार प्रसिद्ध आहे. पण या घराण्यात दर पिढीला वारसाविषयीचे कलह अटळ झाले होते. दंतिदुर्गाला पुत्र नव्हता आणि भाऊही नव्हता. तेव्हा त्याचा चुलता कृष्ण हा सत्तारूढ झाला. त्याच्यामागून त्याचा पुत्र गोविंद हा गादीवर आला. पण लवकरच तो विलासमग्न झाला व त्यामुळे राज्यकारभारात गोंधळ निर्माण होऊ लागला. तरीही राज्यव्यवस्थेत लोकांनी किंवा सरदारांनी, किंवा महाजनांनी हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही. तशी पद्धतच नव्हती. त्यांना ते सामर्थ्य नव्हते आणि रूढीचे पाठबळही नव्हते. गोविंदाचा भाऊ ध्रुव यालाच शस्त्रबळाने त्याला पदच्युत करून राष्ट्रकूट घराण्यावरील आपत्ती टाळावी लागली. ध्रुवाने आपला ज्येष्ठ पुत्र स्तंभ याला बाजूस सारून दुसरा पुत्र गोविंद यास राजपद दिले. गोविंद सत्तारूढ झालाही. पण नंतर स्तंभाने अनेक सामंत व अधिकारी यांच्या साह्याने उठाव केला. पण त्याचा पराभव झाला. राजपद गोविंदाकडेच राहिले. पण यादवी टळली नाही. काही घटनात्मक व्यवस्था असती किंवा लोकमत प्रभावी असते तर दर पिढीला यादवी झाली नसती. महाराष्ट्रात वा अन्य प्रांतांत या काळी लोकसत्ता होती असे कोणी म्हणत नाही. पण ग्राम, विषय, राष्ट्र, भुक्ती, आहार हे जे राज्याचे कारभारासाठी केलेले विभाग तेथे लोकायत्त कारभार होता असे सांगितले जाते. ग्रामीण लोकायत्ततेचा तर फारच गौरव केला जातो. त्याचप्रमाणे व्यापारी, ब्राह्मण व नगरजन यांचेही संघ असून ते बलशाली व प्रभावी होते असे इतिहासवेत्ते म्हणतात. त्यांचा प्रभाव किती होता, राजसत्तेवर ते कितपत नियंत्रण घालू शकत होते याचा विचार पुढे करू. पण राजपदी कोण यावे, वारस म्हणून कोणाला मान्यता द्यावी, आपल्या प्रदेशावर कोणती सत्ता चालू द्यावी यासंबंधी निर्णय करण्याचा कसलाही अधिकार लोकांना नव्हता आणि या विषयात हस्तक्षेप करण्याचा ते प्रयत्नही कधी करीत नसत हे अगदी स्पष्ट आहे. अपवादालासुद्धा लोकमतप्रभाव कधी दिसला नाही.
गोविंदाचा मुलगा अमोघवर्ष राज्यावर आला तेव्हा अवघा सहा वर्षांचा होता. त्यामुळे मुखत्यार म्हणून गुजराथेतील राष्ट्रकूट शाखेचा राजा व आपला भाऊ इंद्र याचा मुलगा कर्कसुवर्णवर्ष याची गोविंदाने आधीच नेमणूक केली होती. पण तरीही यादवी व कलह टळले नाहीत. सामंत, सेनाधिकारी, शेजारचे सत्ताधीश सर्वांनीच उठावणी केली आणि त्यांनी अमोघवर्षाला काही काळ पदच्युत केले. पुढे त्यांच्या- त्यांच्यातच कलह सुरू झाले. तीनचार वर्षे ही बंडाळी चालू होती. पण लवकरच कर्काने सर्व बंडखोरांचे पारिपत्य करून अमोघवर्षाला राज्यारूढ केले. राष्ट्रकूटांच्या कारकीर्दीत शेवटपर्यंत या तऱ्हेचे कलह चालूच होते. लोकांच्या स्वायत्त संस्था त्यांना आळा घालू शकल्या नाहीत.
राष्ट्रकूटानंतर कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव या दोन घराण्यांनी मिळून महाराष्ट्रावर सुमारे तीन साडेतीनशे वर्षे राज्य केले. या दोन घराण्यांच्या सत्ताकाळात राष्ट्रकूटांप्रमाणे वारसाची युद्धे सतत झाली नाहीत. पण तसे प्रसंग आले तेव्हा ती टळलीही नाहीत. चालुक्यराज आहवमल्ल सोमेश्वर याला सोमेश्वर २ रा, विक्रमादित्य व जयसिंह असे तीन पुत्र. आहवमल्लाच्या मृत्यूनंतर गादी सोमेश्वरला मिळाली. पण लवकरच विक्रमादित्याशी त्याचा कलह सुरू झाला व तो पदच्युत होऊन विक्रमादित्य सत्तारूढ झाला. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस जयसिंहही बंडाळी करून उठला होता. पण त्याचा पराभव झाला. यादवांचा पराक्रमी राजा कृष्ण याने स्वतःला मुलगा असूनही गादी आपल्या भावाला-महादेवाला दिली व त्याने आपल्या नंतर कृष्णाचा मुलगा रामदेव याला राज्य न देता आपला मुलगा आमणदेव याला दिले. साहजिकच संघर्ष अटळ झाला. रामदेवरावाने कपटाने आमणदेवाचा खून केला आणि राज्य ताब्यात घेतले.
शस्त्रबलाने निर्णय
वारशाच्या युद्धाप्रमाणेच दोन घराण्यांत राजसत्तेसाठी झालेल्या युद्धापासून लोक अलिप्तच होते. सामन्य जन तर अलिप्त होतेच, पण वर सांगितलेल्या व्यापारी, ब्राह्मण, नगरजन व ग्रामीण जन यांच्या ज्या लोकायत्त संस्था त्या काळात होत्या त्याही राजत्तेविषयीच्या संघर्षापासून अलिप्त होत्या. सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव इतक्या घराण्यांनी क्रमाने या कालखंडात महाराष्ट्रावर राज्य केले. पण यातील प्रत्येक घराण्याने शस्त्र, सेना, रणनीती, राजनीती, थोर पराक्रमी राजपुरुष या बळावरच राजसत्ता जिंकलेली आहे. वरील संस्थांची अनुमती, संमती, पाठिंबा यांचा त्यात कोठेही केव्हाही संबंध आल्याचे दिसत नाही. त्या संस्था आपापल्या क्षेत्रात या काळात कार्य करीत होत्या; महाराष्ट्रीय जीवनात त्यांना महत्त्वाचे स्थानही प्राप्त झाले होते, याविषयी वाद नाही. पण राजकीय क्षेत्रात राजसत्तेविषयीच्या निर्णयात किंवा राजसत्तेने केलेल्या संधिविग्रहादी निर्णयांत त्यांना काही मत होते, महत्त्वाचे स्थान होते असे म्हणता येत नाही.
राजसत्तेवरील नियंत्रणे
पण लोकमताला किंवा लोकमतानुवर्ती असलेल्या संस्थांना राजकीय क्षेत्रात स्थान नसले तरी त्या काळी राजसत्ता सर्वस्वी अनियंत्रित होती असे मात्र नाही. घटनात्मक अशी कसलीही बंधने नव्हती हे खरे; पण इतर अनेक प्रकारची बंधने तिच्यावर होती. आणि राजसत्ता नियंत्रित आहे याला राजकीय संस्कृतीच्या आणि एकंदर जीवनाच्या दृष्टीने फार महत्त्व असल्यामुळे या नियंत्रणाचा विचार करणे अगत्याचे आहे.
राजा हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असतो, त्याच्या ठायी अनेक देवता वास करीत असतात, त्याला राजपद प्राप्त होते ते पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे व ईश्वरी कृपेने प्राप्त होते, असा एक समज भारतीय जनतेत अनेक शतके रूढ झालेला होता. ब्राह्मण- ग्रंथ, धर्मसूत्रे, मनुयाज्ञवल्क्यादिकांच्या स्मृती व राजशास्त्रावरचे इतर अनेक ग्रंथ यांत राजाच्या ठायी असलेल्या दैवी गुणसंपदेचे वर्णन केलेले आहे हे खरे; पण त्यावरून राजसत्ता ही प्राचीन शास्त्रज्ञांच्या मते ईश्वरदत्त होती असे मुळीच ठरत नाही. युरोपच्या व इंग्लंडच्याही इतिहासात ईश्वरदत्त सत्तेचे तत्त्व काही काळ रूढावले होते. गेली शेदीडशे वर्षे आपण भारतीय त्या इतिहासाचा अभ्यास करीत आहोत. त्यामुळे तेच तत्त्व प्राचीन काळी आपल्याकडेही शास्त्रज्ञांनी सांगितले असावे असा समज ब्रिटिश सत्तेनंतरच्या काळातही दृढ होऊन बसला. पण हा समज अगदी निराधार आहे हे म. म. काणे, डॉ. अ. स. अळतेकर, चिंतामणराव वैद्य, डॉ. जयस्वाल, रमेशचंद्र मुजुमदार या पंडितांनी आपल्या ग्रंथांतून स्पष्टपणे दाखवून दिले आहे. भारतात प्रातिनिधिक राजकीय संस्था नव्हत्या व राजसत्तेवर कोणतीही घटनात्मक बंधने नव्हती हे या पंडितांना मान्य आहे; पण म्हणजे राजसत्ता सर्वस्वी अनियंत्रित होती असे मात्र नव्हे.
धर्मशास्त्र
राजसत्तेवर त्या काळी पहिले नियंत्रण होते ते धर्मशास्त्राचे होय. सर्व प्राचीन धर्मशास्त्रज्ञांच्या मते राजा हा केवळ कार्यकारी सत्ताधीश होता. कायदे करण्याचा अधिकार त्याला मुळीच नव्हता. वर्णाश्रमधर्माचे, न्यायदानाचे, करवसुलीचे व एकंदर सर्व सामाजिक व्यवहारांचे कायदे स्मृतिकारांनी रचलेले असत. राजाने फक्त त्यांचा अंमल करावयाचा असे. इतकाच त्याचा अधिकार. कायदे करण्याचा अधिकार नाही म्हणजे राजसत्तेवर फार मोठे नियंत्रण पडले हे उघडच आहे. आता हे बंधन राजाने पाळले नाही तर काय करावयाचे, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण धर्मशास्त्राचे बंधन हे अखेरीस विवेकाचे बंधन होय. आणि जो राजा विवेकहीन आहे, मदांध, उन्मत्त आहे, त्याच्या बाबतीत खरा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा या धर्मशास्त्रप्रणीत नियंत्रणाचा उपयोग काय, असे वाटण्याचा संभव आहे. पण आपण हे ध्यानात ठेविले पाहिजे की समाजात जे तत्त्वज्ञान रूढ झालेले असते आणि जे लोकांना वंद्य झालेले असते त्याचा प्रभाव फार मोठा असतो. प्राचीन काळी काय किंवा अर्वाचीन काळी काय, अंतिम निर्णय हा लोकसामर्थ्यानेच व्हावयाचा. लोक उदासीन असले, असंघटित असले व दुबळे असले तर घटनात्मक बंधनेही कागदावरच राहतात हे अर्वाचीन इतिहासातही आपण पाहात आहो. आणि लोक जागृत असले, समर्थ असले तर घटना दूर सारूनही किंवा बदलून घेऊन सत्ताधीशांना नमवू शकतात हेही आपल्याला दिसत आहे. तेव्हा लोकमतात कोणते तत्त्वज्ञान रूढ आहे याला, सर्वस्वी नव्हे तरी महत्त्व आहे. यासाठी प्रथम राजसत्तेविषयी धर्मशास्त्रज्ञांनी लोकांत कोणते तत्वज्ञान दृढमूल करून टाकले होते हे आपण पाहू. आणि मग प्रत्यक्षात त्याचा कितपत उपयोग होत असे याचा विचार करू.
स्वामिरूप दास
यासाठी धर्मशास्त्र पाहू लागताच, राजाला कायदे करण्याचा अधिकार नाही, हे त्यातील पहिले तत्त्व आपल्या दृष्टीस पडते. दुसरे तत्त्व असे की राजाला सत्ता प्राप्त होते ती त्याने प्रजेशी काही करार केल्यानंतरच प्राप्त होते. 'मी प्रजेचे रक्षण करीन, योग्य न्याय देईन, अन्याय्य कर लादणार नाही, जुलूम करणार नाही,' अशी प्रतिज्ञा राजाला राज्याभिषेकाच्या वेळी करावी लागते. आणि काही शास्त्रज्ञांनी तर असे मत मांडले आहे की राजा हा प्रजेचा सेवक असून प्रजा त्याला कर देते ते त्याचे वेतन असते. 'स्वामिरूपस्तु प्रजानां दास्यत्वे नृपः कृतः ।' ब्रह्मदेवाने स्वामिरूपाने राजा हा प्रजेचा दास–सेवकच निर्माण केला आहे, असे शुक्रनीती म्हणते; तर, 'बलिः स तस्य विहितः प्रजापालन वेतनम् ।' कर म्हणजे राजाला प्रजापालनासाठी दिलेले वेतनच होय असे नारदस्मृतीचे मत आहे. महाभारतातील शांतिपर्वात वेतन हाच शब्द वापरून हा विचार मांडला आहे.
अशा धर्मशास्त्राला अनुसरून जो राज्य करणार नाही, जो प्रजेचे रक्षण करणार नाही, न्यायदानात पक्षपात करील, असह्य कर लावील त्या राजाचा कुलक्षय होईल, तो नरकास जाईल अशी भीतीही धर्मशास्त्रज्ञांनी घालून ठेवलेली आहे. असल्या भीतीला आज फारसे महत्त्व नसले तरी आजच्यापेक्षा परलोकश्रद्धा अनेक पटींनी जास्त प्रभावी असल्यामुळे त्या काळी तिला बराच अर्थ होता. तरीही धर्मशास्त्रकारांनी तेवढ्यावरच सर्व अवलंबून ठेविले नाही. त्यांनी यापेक्षाही जास्त प्रभावी असे नियंत्रण राजसत्तेवर घालून ठेविले होते.
प्रजेचे अधिकार
जो राजा प्रजेचे रक्षण करणार नाही, न्याय देणार नाही, पण कर मात्र चोपून वसूल करील अशा राजाला प्रजेने, नागरिकांनी संघटित होऊन पदच्युत करावे, किंवा ठारही मारावे, असा स्वच्छ आदेश त्यांनी देऊन ठेविला आहे. ' तं वै राजकलिं हन्युः प्रजाः सन्नह्य!' 'स संहत्या निहंतव्यः!' 'वध्यो लोकस्य धर्मः !' अशी वचने महाभारतात आहेत. शुक्रनीतिसारामध्ये इतकी कडक उपाययोजना सांगितलेली नाही; पण 'अधार्मिक, राष्ट्रविनाशक राजाला पुरोहिताने राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या साह्याने पदच्युत करावे व त्याच्याच कुळातल्या दुसऱ्या योग्य पुरुषाला गादी द्यावी,' असे सांगितले आहे. मनू, याज्ञवल्क्य यांनीही अशा राजाला पदच्युत करण्याचा अधिकार प्रजेला दिलेला आहे ( म. म. काणे, हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र, खंड ३ रा, पृ. २५-२७ ).
शक्याशक्यता
हा उपाय अगदी निर्णायक आहे व हे नियंत्रण अत्यंत प्रभावी आहे यात शंका नाही. पण ते कितपत व्यवहार्य आहे असा प्रश्न उद्भवतो. मदांध, जुलमी, अनन्वित अत्याचार करणाऱ्या व सर्व लष्करी बळ ज्याच्या हाती आहे अशा राजाविरुद्ध संघटित होणे व त्याला पदच्युत करणे हे मागल्या काळी प्रजेला कितपत शक्य होते अशी शंका येणे साहजिक आहे. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'स्टेट अँड गव्हर्मेन्ट इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथात याचा विचार करून आज वाटते तितके ते त्या काळी अशक्य नव्हते असे आपले मत दिले आहे. प्रथम त्यांनी नहुप, सुदास, सुमुख, निमी अशा राजांना देहान्त शिक्षा दिल्याची प्राचीन काळची उदाहरणे दिली आहेत, नंतर सच्चंकिर व पदकुसलमानव या जातकात, प्रजेने दुष्ट राजांना ठार मारल्याची अनेक उदाहरणे असल्याचे सांगितले आहे; आणि नंतर त्या काळी हे कसे व्यवहार्य होते याचे विवरण केले आहे. ते म्हणतात, त्या काळी सर्व राजांपाशी हल्लीप्रमाणे खडी फौज नसे. आणि दुसरे असे की सामन्त, मांडलिक, ग्रामे, नगरे यांना या कामासाठी सेना उभारणे सहज शक्य असे. मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सेनापती यांना अशा सेनांचे साह्य घेऊन राजाला पदच्युत करणे आज वाटते तितके अवघड नव्हते. मागील उदाहरणे पुराणातील आहेत. पण ऐतिहासिक काळातही अशी उदाहरणे घडलेली आहेत. मौर्य- वंशातील शेवटचा राजा बृहद्रथ, शुंगांचा शेवटचा राजा देवभूमी आणि राष्ट्रकूटांचा गोविंद ४ था याला सामन्त व सेनापती यांनी अशाच तऱ्हेने पदच्युत केल्याचे इतिहास सांगतो (पृ. ६८-६९ ) तेव्हा हे शेवटचे नियंत्रण बरेच प्रभावी असले पाहिजे, निदान राजांना कर्तव्यच्युत होताना, उन्मार्गगामी होताना, दहशत वाटावी इतपत त्यात अर्थ असला पाहिजे यात शंका नाही. अर्थात काही घटनात्मक नियंत्रणे असती तर फार चांगले झाले असते, हे आळतेकरांनाही मान्य आहे. पण ग्रीस व रोम या प्राचीन देशांचा इतिहास वाचणारांना त्या मागल्या काळी घटनात्मक नियंत्रणाचा कितपत उपयोग झाला असता, याबद्दल शंका येणे स्वाभाविक आहे. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रकारांनी तसली बंधने निर्माण केली नव्हती हे खरे आहे. पण त्याबरोबर त्यांनी राजसत्तेवर नियंत्रणे ठेवून ती अन्यायी, जुलमी, मदांध न होऊ देण्याची यावत शक्य व्यवस्था राजशास्त्रात करून ठेविली होती हेही खरे आहे.
प्रजेचा पिता
आणि भारताचा इतिहास पाहताना, हे राजशास्त्र केवळ कागदावरच राहिले होते किंवा स्मृतिग्रंथांच्या ताडपत्रातच पडून राहिले होते, असे दिसत नाही. राजसत्तेवर घातलेल्या नियंत्रणांचा प्रत्यक्षात उपयोग झालेला आढळतो. इ. स. पू. ६ व्या शतकात शैशुनागवंशाचे मगध साम्राज्य स्थापन झाले. तेव्हापासून इ. सनाच्या तेराव्या शतकापर्यंत भारताच्या भिन्न भिन्न प्रांतांत अनेक राज्ये, साम्राज्ये होऊन गेली. ती साम्राज्ये अनेक वंशांची, अनेक वर्गीय राजांची, अनेक धर्मपंथीयांची होती आणि काही वंशांची साम्राज्ये दोन, तीन, चार शतकांइतकी दीर्घकालपर्यंत चालू होती. असे असूनही एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात, इतक्या विस्तीर्ण कालखंडात अत्यंत जुलमी, अनाचारी, उन्मत्त, अनन्वित अत्याचार करणारे, प्रजेला पिळून काढणारे, नराधम, नरराक्षस असे राजे अपवादरूपानेच सापडतात. शैशुनागवंशातील एकदोन राजे आणि नंदवंशातील धनानंदासारखे एकदोन राजे हे काहीसे असे होते. काश्मिरात मात्र असे नरराक्षस बरेच निघाले. पण एवढ्या राजनामावळीत हे अपवादच होत. चिंतामणराव वैद्य आपल्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा समारोप करताना म्हणतात की 'राजा म्हणजे प्रजेचा पिता होय, असे हिंदु धर्मशास्त्राने सांगितले असून हिंदू राजांचा इतिहास पाहता, ते राजे ही पितृकल्पना प्रत्यक्षात आणीत असे दिसते. ते आपल्या प्रजेवर सहसा जुलूम करीत नसत. मध्ययुगीन लेखांत जुलमी राजांचा उल्लेख- काश्मीर वजा जाता - फारच थोडा होतो. यामुळे अनियंत्रित राजसत्तेची मध्ययुगीन हिंदू राज्येसुद्धा व्यवस्थित चालून सुखी असत' (भाग ३ रा, प्र. ६५५ ).
या काळात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या भिन्न राजघराण्यांचा इतिहास पाहता, याच सिद्धान्ताला पुष्टी मिळते. यातील बहुतेक राजघराण्यांचे इतिहास आता शिलालेख, ताम्रपट, तत्कालीन साहित्य व परकी प्रवाशांचे वृत्तांत यांच्या आधारे बऱ्याच तपशिलासह उपलब्ध झाले आहेत. त्यावरून पाहता असे हे स्पष्ट दिसते की त्या राजघराण्यांत उन्मत्त, मदांध जुलमी असे राजे जवळ जवळ झालेच नाहीत.
सातवाहन
या कालखंडात वर सांगितल्याप्रमाणे सहा राजवंशांनी राज्य केले. अगदी ढोबळ हिशेबाने पाहता एवढ्या काळात ५०-६० राज्यकर्ते पुरुष सत्तारूढ झाले होते. आणि उपलब्ध पुराव्यांवरून पाहता असे दिसते की यांतील बहुसंख्य राजे सुविद्य, सुसंस्कृत व सदभिरुचिसंपन्न असे होते. राजा कालस्य कारणम् । हे वचन परमार्थाने ज्या काळात सत्य होते त्या काळात असे सुसंस्कृत राजपुरूष सिंहासनारूढ झाले होते, एवढ्या एका गोष्टीवरूनसुद्धा त्या काळच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रूप किती उज्ज्वल होते हे लक्षात येईल. सातवाहनांच्या राज्याविषयी लिहिताना डॉ. के. गोपालाचारी म्हणतात, " गौतमीपुत्र श्री सातकर्णी व पुलुमायी यांच्या व तत्कालीन बौद्धांच्या लेखांवरून सातवाहन साम्राज्याच्या इतिहासावर जो प्रकाश पडतो त्याचे रूप मोठे उज्ज्वल दिसते. सातवाहनांचा कारभार अगदी साधा असून धर्मशास्त्रांच्या नियमाप्रमाणे तंतोतंत चालत असे. त्या काळी बहुपत्नीत्व रूढ होते. त्याअन्वये सातवाहन सम्राटांना अनेक राण्या असत. पण वारसाची युद्धे त्यांच्या दीर्घ इतिहासात केव्हाच झाली नाहीत, आणि साम्राज्याच्या वाटण्याही कधी झाल्या नाहीत. आश्चर्याची गोष्ट अशी की तत्त्वतः हे सम्राट सर्वस्वी अनियंत्रित असून त्यांनी, आमची सत्ता ईश्वरदत्त आहे, असा दावा कधीच सांगितला नाही. शास्त्र व रूढी यांचा ते नेहमीच मान राखीत असत. "
गौतमीपुत्र श्री सातकर्णी याविषयी लिहिताना ते म्हणतात, हा सम्राट सेनापती म्हणून एकपट थोर असला तर प्रशासक म्हणून दसपट थोर होता. तो जसा शूर सेनापती होता तसाच चतुर मुत्सद्दीही होता, आणि त्याची सामाजिक कर्तव्याची जणीव तशीच प्रखर होती. राजपुरुषाला योग्य व अवश्य त्या सर्व विद्यांमध्ये तो पारंगत होता. धर्मशास्त्राच्या आज्ञा, सर्वभूतहित या दोन चक्षूंनी त्याचा राज्यकारभार चाले. अनाथ, गरीब, रंजले गांजले यांचे पालन तो विशेष दक्षतेने, जातीने करी. शास्त्राज्ञेच्या बाहेर जाऊन अन्याय्य कर त्याने कधीही लादले नाहीत. " ( कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, पृ. ३१६-३१६ ).
कार्याचा व्याप
प्राचीन काळच्या राजसत्तांविषयी अलीकडे एक मोठा गैरसमज लोकांत रूढ झालेला आढळतो. तो हा की त्या काळचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करणे, चोरा- चिलटांचा बंदोबस्त करणे, आणि करवसुली करणे एवढेच आपले कर्तव्य मानीत असत. गेल्या शतकात युरोपात सर्वत्र भांडवलशाही सत्तारूढ होती. तिच्या अर्थशास्त्रात वरील कर्तव्यावाचून राजाने कोणत्याच व्यवहारात हस्तक्षेप करता कामा नये, असा महत्त्वाचा सिद्धान्त होता आणि तो मानलाही जात असे. त्या काळातच भारताचा युरोपीय राज्यशास्त्राशी परिचय झाला. त्यामुळे वरील गैरसमज रूढ झाला असावा. शिवाय अनेक युरोपीय इतिहासकारांनी प्राचीन पौर्वात्य व भारतीय राजसत्तांविषयी, 'साम्राज्ये म्हणजे केवळ करवसुलीच्या संस्था होत्या,' अशी विधाने केलेली आहेत. पण ही विधाने अगदी भ्रांत आहेत हे म. म. काणे ( धर्मशास्त्राचा इतिहास, ३ रा खंड, पृ. १५ ), डॉ. अ. स. आळतेकर ( स्टेट अँड गव्हर्मेन्ट इन् एन्शंट इंडिया, पृ. ३६ ) यांसारख्या थोर पंडितांनी दाखवून दिले आहे. डॉ. आळतेकर म्हणतात, कौटिल्याचे अर्थशास्त्र व महाभारत या ग्रंथांनी राजाची जी कर्तव्ये म्हणून सांगितली आहेत ती पाहता, मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगांच्या विकासाची जबाबदारी त्या काळी शासनावर होती, असे दिसते. गेल्या शतकातील युरोपातील 'लेसेफेअरचे' म्हणजे अलिप्ततेचे तत्त्वज्ञान भारतात मुळीच मान्य झालेले नव्हते. प्रजेच्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्वच अंगांचा उत्कर्ष साधणे हे शासनाचे धर्मशास्त्रप्रणीत कार्य होते. विद्यापीठे, गुरुकुले स्थापून, विद्वानांचा परामर्श घेऊन विद्येला उत्तेजन देणे, विश्रामशाळा, अनाथालये, रुग्णालये बांधून दीनदुःखितांना आश्रय देणे, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता धरणे, पाटबंधारे, कालवे बांधून कृषिधन व गोधन यांची जोपासना करणे, दुष्काळ, टोळधाड, महापूर या आपत्तींचे निवारण करणे, व्यापार, उद्योग यांना उत्तेजन देणे, भाववाढ, शोषण, पिळणूक होणार नाही अशी दक्षता घेणे, नव्या वसाहती वसवून नवीन जमिनी लागवडीस आणणे, अरण्ये, खाणी यांची जपणूक करणे, धर्माचे व नीतीचे नियम प्रजाजन यथायोग्य रीतीने पाळतील अशी व्यवस्था करणे, रस्ते, धर्मशाळा बांधून प्रवासाची व वाहतुकीची उत्तम सोय करणे ही सर्व राजशासनाचीच कामे होती असे त्या काळचे धर्मशास्त्र सांगते (पृ. ३५, ३६ ). आणि सातवाहनांपासून यादवापर्यंतचे सर्व राजवंश ही कर्तव्ये पार पाडण्याची अत्यंत कसोशी करीत असत हे आता सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. त्या राजवंशांच्या या क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्याचे विवेचन त्या त्या प्रकरणात येणारच आहे. त्यामुळे येथे तो तपशील देत नाही. त्या राजवंशांची राजकीय संस्कृती अतिशय उच्च दर्जाची होती एवढेच सामान्यपणे पाहात सध्या आपण पुढे जाऊ. अनियंत्रित राजसत्ता हाती असूनही या राज्यकर्त्यांनी विवेकाने, न्यायाने, धर्माने राज्य करून प्रजेला सुखी ठेविले, प्रजामुखे सुखं राज्ञः । हा दण्डक आपण होऊन पाळला, हे राजकीय क्षेत्रातले मोठे वैभव आहे. त्याचेच दर्शन सध्या आपण घेत आहो.
डॉ. काशीप्रसाद जयस्वाल आपल्या 'मनू आणि याज्ञवल्क्य' या ग्रंथात म्हणतात, सातवाहनांच्या साम्राज्या-समृद्धीचे व त्यांच्या उदार धोरणाचे पडसाद याज्ञवल्क्य स्मृतीत स्पष्ट ऐकू येतात. त्या काळी पश्चिमेबरोबरचा व्यापार कळसाला पोचला होता. व्यापारी, कर्मचारी यांचे सहकारी संघ हे राज्याचे मोठे भूषण होते. ब्राह्मणांचे अधिक हक्क या साम्राज्यात बरेच कमी केले होते. आणि स्त्रीला मोठी प्रतिष्ठा तेथे असे. ' ( प्रस्तावना, पृ. २१ ).
वाकाटक
सातवाहनांच्या नंतरचे राजघराणे म्हणजे वाकाटकांचे होय. त्यांच्या विषयी म. म. मिराशी म्हणतात, 'वाकाटकांचे राज्यशासन कार्यक्षम असून त्यायोगे प्रजाजनांस समृद्धी, शांतता व सुव्यवस्था याचा लाभ झाला होता, असे दिसते. अजंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेखात म्हटल्याप्रमाणे वाकाटकांचे सचिव हे आपल्या उत्कृष्ट शासनाच्या योगे प्रजाजनांना त्यांचे माता-पिता व मित्र यांसारखे वाटू लागले. त्यांनी देशाचा राज्यकारभार न्यायाने चालविला व आपल्या गुणांनी, पुण्योपार्जनाने आणि कीर्तीने स्वतःस उज्ज्वल केले. रघुवंशात, विदर्भ देशाचे 'सौराज्यरम्य' व 'समृद्ध' असे वर्णन करताना, कविकुलगुरू कालिदास स्वकालीन वाकाटकनृपतींच्या उत्कृष्ट राज्यशासनाची प्रशंसा करीत होता, असे वाटल्याशिवाय राहात नाही. ' ( वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, पृ. ७९ ). याच ग्रंथात अन्यत्र मिराशी म्हणतात, 'त्या काळी सर्व सत्ता राजाच्याच हाती असे. पण त्या सत्तेला स्मृतींचे नियंत्रण असे. तत्कालीन राज्यकारभार केवळ स्वेच्छेनुसार किंवा जुलमी होता असे नाही. धर्मशास्त्रांनी भारतीय राजांना लोककल्याणकारी राज्याचे ध्येय सदैव उपदेशिले होते. कालिदासादी संस्कृत कवींनी आपल्या काव्यनाटकात त्याचाच पुरस्कार केला आहे. वाकाटकांनी हे ध्येय कृतीत आणण्याचा प्रयत्न केला होता, असे दिसते. पृथ्वीषेण पहिला, हरिषेण, देवसेनाचा सचिव हस्तिभोज यांच्या शिलालेखांवरून ही गोष्ट स्पष्ट होते.' ( पृ. ७१ ). सातवाहनांप्रमाणेच वाकाटकांनीही आपली सत्ता ईश्वरदत्त असल्याचा दावा कधी केला नाही. ही गोष्ट अकरणात्मक असली तरी तिला फार अर्थ आहे. जुलमी राजांना आपण कोणालाही जबाबदार नाही, कारण आपली सत्ता ईश्वरदत्त आहे हे तत्त्वज्ञान फार प्रिय असते व त्याची त्यांना फार जरूर असते. सातवाहन व वाकाटक या दोन्ही वंशांनी त्याचा अवलंब केला नाही हे त्यांना फारच भूषणावह आहे.
चालुक्य
वाकाटकांनी इ. स. २५० ते ५५० असे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांच्या नंतर या भूमीत चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. हे चालुक्य राजे पूर्वीच्या राजांप्रमाणे तत्त्वतः पूर्ण अनियंत्रित असूनही, प्रजासुखे सुखं राज्ञः । याच उदात्त तत्त्वाने चालत असत, असा त्या वेळी भारतात येऊन गेलेला सुप्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यूएनत्संग यानेच त्यांचा गैरव करून ठेवलेला सापडतो. ताम्रपट, शिलालेख यापेक्षा अशा बाबतीत हा पुरावा अर्थातच ग्राह्य होय. कारण ताम्रपट, शिलालेख हे त्या त्या राजांनी किंवा त्यांच्या वंशजांनी किंवा त्यांच्या सचिवांनी वा आश्रितांनी कोरविले असल्यामुळे त्यांत राजपुरुषांची प्रशस्तीच फक्त गायिलेली असण्याचा संभव फार. काही ताम्रपटांत हीन, अधोगामी अशा राजांचा तसा निर्देश केलेलाही आढळतो. राष्ट्रकूट राजा गोविंद दुसरा याचा ' तो विलासप्रिय व भोगासक्त होता व प्रजेच्या कल्याणाची चिंता मुळीच वहात नसे' असा उल्लेख राष्ट्रकूट राजा कृष्ण ३ रा याच्या कऱ्हाडच्या ताम्रपटात आढळतो ( भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, पृ. २८७ ). राष्ट्रकूट राजा कर्क पहिला याच्याही कऱ्हाडच्या ताम्रपटात तसे वर्णन आहे ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ५० ). यामुळे लेखांचा पुरावा अगदी अविश्वसनीय मानणे युक्त नाही. तरी परकी प्रवाशांनी केलेले वर्णन हा जास्त सबळ पुरावा होय हे मान्य केलेच पाहिजे.
अखंड चिंता
ह्युएनत्संग हा सर्व भारतात व महाराष्ट्रातही हिंडला होता. त्याने स्वतः सत्याश्रय पुलकेशी याची भेट घेतली होती. या आधारे तो लिहितो, ' हा राजा क्षत्रिय असून तो मोठा उदार व दयाळू आहे. तो दानशूर व परोपकारी असून प्रजेची अखंड चिंता वाहतो, त्यामुळे त्याची प्रजा त्याच्यावर अनुरक्त असून प्रजाजन त्याची मनोभावे सेवा करतात. आपल्या प्रजेच्या शौर्यधैर्याचा राजालाही मोठा अभिमान आहे ' (भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, पृ. ७१, ७२ ). ह्यूएनत्संग याने भारतातल्या अनेक राजांविषयी व त्यांच्या प्रजाजनांविषयी अशाच प्रकारचे उद्गार काढलेले आहेत. माळव्याच्या राज्याविषयी लिहिताना तो म्हणतो, ' येथील लोक बुद्धिमान, शुद्ध भाषा बोलणारे आणि सुशिक्षित असे आहेत. ईशान्येकडे मगधात व नैर्ऋत्येकडे माळव्यात सद्गुणांची चहा आहे व तेथे भूतदयेला अग्रमान मिळत असतो. येथला ६० वर्षापूर्वी होऊन गेलेला राजा शिलादित्य हा तर आपल्या राज्यात माशीचीही हिंसा न होईल अशी खबरदारी घेई. हत्तीघोड्यांनाही तो पाणी गाळून पाजीत असे. कोणीही प्राणिहत्या करू नये असा तो कळकळीचा उपदेश करी.' दुसऱ्या एका ठिकाणी त्याने म्हटले आहे की ' भारतातील क्षत्रिय व ब्राहाण यांचे वर्तन निष्कलंक आणि अगदी साधे असून त्यांच्यांत डामडौल नसतो. त्यांची राहणी काटकसरीची असते. ' सम्राट श्रीहर्षाच्या औदार्याचे, प्रकृतिरंजनाचे व धर्मनिष्ठेचे ह्यूएनत्संगाने जे वर्णन केले आहे त्यावरून त्याचे राज्य म्हणजे खरेखुरे रामराज्य होते असे म्हणावयास हरकत नाही. तो म्हणतो, 'साम्राज्य प्रस्थापित केल्यानंतर हर्षाने तीस वर्षे शांततेने राज्य केले. त्याचा कारभार चोख व न्यायाचा असे. सत्कृत्ये करताना झोप व अन्न यांचाही त्याला विसर पडे. आपल्या राज्यात त्याने सर्वत्र पांथस्थांसाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. राज्यकारभार तो इतक्या दक्षतेने करी की त्याला सर्व दिवस अपुरा पडे. दर पाच वर्षांनी तो मोठा समारंभ करून आपले सर्व धन बौद्ध, ब्राह्मण, जैन व सर्वपंथीयांना अर्पण करी. आणि अशा रीतीने निर्धन झाल्यानंतर तो आपल्या अन्न-वस्त्रासाठी आपली बहीण राज्यश्री हिच्याजवळ भिक्षा मागे.' ( मध्ययुगीन भारत, भाग १ ला, प्र. ३६, ३७, ५०, ७४ ). ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनावरून, त्याने भारतातील अनेक राजे व त्यांचा राज्यकारभार याविषयी जी मते मांडली आहेत त्यांवरून, या कालखंडात भारतात राजसत्ता अनियंत्रित असली तरी येथल्या राजपुरुषांच्या मनावर विवेकाचे नियंत्रण फार मोठे होते आणि त्यामुळे 'राजा प्रकृतिरंजनात' हे वचन ते सार्थ करीत असत, हा ताम्रपट शिलालेखांवरून निघणारा निष्कर्ष बव्हंशी सत्य आहे, असे म्हणण्यास चिंता नाही.
सुखी प्रजा
राष्ट्रकूट घराण्यात एकंदर १४ राजे होऊन गेले. त्यांपैकी नऊ राजे थोर आणि महापराक्रमी असे होते. हे वैभव अगदी असामान्य असे आहे. या घराण्यातील पहिला सम्राट दंतिदुर्ग याला तर कन्हय्यालाल मुनशी यांनी नेपोलियन म्हटले आहे. त्यानंतरचे कृष्ण, ध्रुवधारावर्ष, गोविंद ३रा, अमोघवर्ष १ ला, इंद्र ३ रा, कृष्ण ३ रा हे नृपती या वंशाला भूषणभूत झालेले आहेत. आपल्या वंशाचे साम्राज्य रामेश्वरापासून यमुनेपर्यंत स्थापिण्याचे कर्तृत्व तर यांच्या ठायी होतेच, पण विद्या, कृषी, व्यापार यांकडेही लक्ष पुरवून आपल्या राज्यात सुखसमृद्धी निर्माण करण्याविषयीही ते दक्ष असत. विहिरी, तळी, उद्याने, रुग्णालये, अनाथालये यांना त्यांचा उदार आश्रय होता. पाठशाळांचा योगक्षेम चालवून विद्येची उपासना करण्यास उत्तेजन देणे हे आपले कर्तव्य आहे, असे राष्ट्रकूट राजे मानीत असत. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स' या आपल्या ग्रंथात, राष्ट्रकूटांच्या काळच्या आर्थिक स्थितीचे फार तपशिलाने वर्णन केले आहे. त्या काळचे बाजारभाव, व्याजाचे दर, कामगारांचे वेतन यांचा अनेक शिलालेखांच्या व ताम्रपटांच्या आधारे अभ्यास करून, सुतार, लोहार, पाणक्ये, पहारेकरी यांनासुद्धा सुखाने अन्नवस्त्र मिळेल अशी वेतनश्रेणी त्या काळी होती, हे त्यांनी दाखवून दिले आहे. वरच्या वर्गांचे जीवनमान यापेक्षा जास्त संपन्न होते यात शंकाच नाही. राष्ट्रकूट राजांच्या साम्राज्यविस्तारासाठी सतत लढाया चालू असत. या लढायांचा प्रचंड खर्च भागवूनही त्यांनी प्रजेचे जीवनमान उंच ठेवण्यात यश मिळविले, त्या अथी धर्मशास्त्राची नियंत्रणे ते घटनाप्रधान व्यवस्थेतील नियंत्रणांपेक्षा जास्त मानीत असत, असे स्पष्ट दिसते. समारोप करताना डॉ. आळतेकर म्हणतात, 'राष्ट्रकूटांचा राज्यकारभार अतिशय कार्यक्षम होता आणि त्यांच्या राजवटीत महाराष्ट्राचा नैतिक, सांस्कृतिक व भौतिक अशा सर्व दृष्टींनी उत्कर्ष होत गेला.' (पृ. ३९७-९८, ४१६-१७).
साम्राज्यातील प्रजा
स्वराज्यातील प्रजेविषयी जे धोरण या राजपुरुषांचे होते तेच साम्राज्यातील प्रजेविषयी आणि जित राजांविषयी होते. याही बाबतीत धर्मशास्त्राच्या आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानल्या होत्या. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात असा दण्डकच घालून दिला आहे की ' विजेत्या सम्राटाने जित राजाचा प्रदेश, धन, स्त्रिया यांचा लोभ धरू नये. आणि त्याने मृत राजाच्या मुलाला त्याची गादी द्यावी. ' कौटिल्य म्हणतो की 'असा लोभ धरला तर त्या मृत राजाच्या भोवतालची राज्ये व तेथले राजे प्रक्षुब्ध होऊन जेत्याविरुद्ध उठतात.' याज्ञवल्क्य म्हणतो की ' जित प्रदेशातील प्रजेचे स्वराज्यातील प्रजेप्रमाणेच सम्राटाने पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे सम्राटाने त्या देशातील धर्म, रूढी, कायदे, रीती, परंपरा यांचा उच्छेद न करता त्यांचे यथायोग्य पालन करावे.' विष्णुधर्मसूत्र, अग्निपुराण, महाभारत, कात्यायनस्मृती यांत अशाच प्रकारच्या आज्ञा विजेत्या सम्राटाला केलेल्या आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भारतातील बहुतेक विजेत्या सम्राटांनी त्यांचे निष्ठेने पालन केले, आहे. सम्राट समुद्रगुप्ताने अनेक जित राजांना पुन्हा त्यांच्या राजपदावर प्रस्थापित केले, म्हणून त्याची सर्वत्र कीर्ती झाली असे प्रयाग येथील विजयस्तंभावरील त्याच्या लेखात म्हटले आहे. ( काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खंड ३ रा, पृ. ७१ ). भारतातील प्राचीन काळच्या साम्राज्यांची यावरून कल्पना येईल. राज्य किंवा प्रदेश खालसा करणे, तेथील प्रजाजनांची कत्तल करणे, स्त्रिया व मुले यांना गुलाम म्हणून विकणे, धन- वित्तधान्य यांची लूट करणे किंवा त्यांचा विध्वंस करणे ही मुस्लिम सुलतानांची वा अर्वाचीन काळच्या फॅसिस्ट, नाझी, कम्युनिस्ट दण्डशहांची राजनीती त्या काळच्या चक्रवर्ती पुरुषांच्या स्वप्नातही नव्हती.
मात्र जित राज्यातील प्रजेविषयीचे धर्मशास्त्राचे दण्डक महाराष्ट्रीय राजघराण्यांनी जरी काटेकोर पाळले असले तरी चक्रवर्तित्वाची आकांक्षा धरणाऱ्या सम्राटाने इतर राज्यांना जिंकावयाचे ते केवळ दिग्विजयासाठी, त्यांच्या राज्याचा अपहार करण्यासाठी नव्हे, हा दण्डक त्यांना तितक्या प्रमाणात पाळता आलेला नाही असे दिसते. सामान्यतः ती शास्त्राज्ञा ते पाळीत हे खरे. सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेत मगधापासून दक्षिणेत कावेरीपर्यंत पसरलेले होते. पण त्यांनी कोणताही प्रदेश, तेथील राजवंश नष्ट करून, आपल्या राज्यास जोडला नव्हता. वाकाटक, चालुक्य यांनीही हे धोरण सांभाळले होते. चालुक्यसम्राट विक्रमादित्य २ रा याने कांचीचा पल्लवराजा नंदिपोत वर्मा यास रणात जिंकले. पण तरीही त्याच्या राजधानीचा त्याने विध्वंस केला नाही. उलट, ब्राह्मण, अनाथ, अपंग, यांना दाने दिली आणि तेथील राजसिंहेश्वराच्या देवळातील धन कोणी राजाने लुटले होते ते परत देवालयाच्या भांडारात भरून टाकले.
पण सामान्यतः चक्रवर्तिपदाचा हा अर्थ असला तरी अनेक वेळा तो प्रत्यक्षात अगदी बदलून जात असे. आणि तसे होणे अपरिहार्यच होते. चालुक्य व राष्ट्रकूट सम्राट यांनी आंध्र व गुजराथ प्रांतांत आपले भाऊ, पुतणे यांना राजपदी बसविले याचा अर्थच असा की त्या प्रदेशातील मूळ राज्ये त्यांनी नष्ट केली आणि ते प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या या शाखांनी त्या प्रदेशात तीनचार शतके राज्य केले. तेव्हा तेथला मूळ राजवंश समूळ नष्ट झाला हे उघडच आहे. यादव सम्राट सिंघण व महादेव यांनी कोल्हापूरचे व उत्तर कोकणचे शिलाहार यांची राज्ये जिंकली तेव्हा येथील राजांना पदच्युत करून प्रदेश खालसा करून टाकले. तेव्हा या बाबतीत हे राजपुरुष शास्त्राज्ञा श्रद्धेने पाळीत असतच असे नाही.
हे साम्राज्यविस्ताराविषयी झाले. पण स्वतंत्र राज्यस्थापना ते करीत तेव्हा तर मूळ राजवंश कायम ठेवण्याचा प्रश्न उद्भवणेच शक्य नव्हते. कारण तो नष्ट केल्यावाचून नवा राजवंश प्रस्थापित होणे शक्यच नसते. राष्ट्रकूटवंश संस्थापक दंतिदुर्ग, उत्तर चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप, यादवांचा भिल्लम या राजांनी महाराष्ट्रात राज्ये स्थापन केली त्या वेळी बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कलचूरी यांची घराणी नष्ट करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. प्रत्येक नव्या राजवंशाने आधीच्या घराण्याचा उच्छेद करूनच सत्ता मिळविलेली आहे. तेव्हा स्वतंत्र राज्य स्थापिताना किंवा साम्राज्यविस्तार करताना प्राचीन काळी धर्मशास्त्र काटेकोरपणे पाळले जात असेच असे म्हणता येणार नाही.
थोर संस्कृती
पण एवढे मात्र खरे की अशा रीतीने शस्त्रबळाने त्यांनी राज्ये जिंकली तरी त्या प्रदेशातील प्रजेचा कधीही छळ केला नाही. त्यांच्याही बाबतीत 'राजा प्रकृतिरंजनात् ।' 'प्रजासुखे सुखं राज्ञः, सुपालितप्रजो यः स्यात् सर्वधर्मविद् एव सः । हे परमोदार ध्येयच प्रत्यक्षात आणण्याचा या महाराष्ट्रीय राजपुरुषांनी कसोशीने प्रयत्न केला असे इतिहास सांगतो. आणि हे सर्व घटनात्मक बंधने नसताना ! लोकसत्ता झाली तरी तिचे यश नागरिकांच्या व राज्यकर्त्यांच्या विवेकनिष्ठेवरच, चारित्र्यावरच अवलंबून असते. त्याअभावी देशाचे काय होते ते आज आपण पाहातच आहो. तेव्हा ही विवेकनिष्ठा त्या प्राचीन राजपुरुषांनी सांभाळली हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीला निस्तुळ असे भूषण आहे.
'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन '- संपादक डॉ. यजदानी - या ग्रंथात सातवाहन ते यादव या घराण्यांचे इतिहास प्रा . गुर्टी वेंकटराव, डॉ. आळतेकर व प्रा. नीळकंठशास्त्री यांनी लिहिले आहेत. त्यांनी त्या घराण्यातील राजपुरुषांविषयी हेच मत व्यक्त केले आहे. तेव्हा त्यांच्या शब्दातच या लेखाचा समारोप करणे उचित होईल. प्रा. वेंकटराव म्हणतात, 'प्रजासुखे सुखं राज्ञः । हेच सातवाहनांचे ब्रीद होते, असे सर्व उपलब्ध कोरीव लेखांच्या आधारे दिसते.' (पृ. १३१ ). वाकाटकांविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, 'त्यांचा कारभार अतिशय दक्ष व कार्यक्षम होता. या राजांनी सर्व शासन व्यवस्थित चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्यवेक्षक नेमले होते. वाकाटकांचे हे मोठे वैशिष्टय होय.' (पृ. १९४, १९६ ) . 'चालुक्य राज्ये सतत सर्व राज्यभर स्वतः फिरत असत. ते एकतर मंत्रिपरिषदेत असतील किंवा रणांगणात सैन्याच्या अग्रभागी सापडतील, अशी त्यांची कीतीं होती.' असा नीळकंठशास्त्री यांनी बदामीच्या चालुक्यांचा गौरव केला आहे. कल्याणीचे चालुक्य व यादव या घराण्यांविषयी असेच धन्यतेचे उद्गार या ग्रंथात आढळतात.
या सहा घराण्यांची सत्ता सध्याच्या शास्त्राप्रमाणे पाहता सर्वस्वी अनियंत्रित अशी होती. 'धर्मशास्त्राची बंधने त्यांच्यावर होती हे खरे. पण ती विवेकबंधने होत. ती बहुधा ग्रंथांतच राहतात. हाती सत्ता आल्यानंतर त्यांना कोणी जुमानीत नाही. बहुतेक सत्ताधीश ती पायदळी तुडवितात. सत्तेमुळे मनुष्य भ्रष्ट होतो आणि ती सत्ता अमर्याद असली म्हणजे तर भ्रष्टतेला मर्यादाच राहात नाही. हे वचन जगात सर्वत्र सत्य ठरते. मानवी स्वभावच तसा आहे. तेव्हा तसे घडले तर नवल नाही. न घडले तर मात्र नवल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रस्तुत कालखंडात हे नवल घडले हे सत्य आहे. प्रथमारंभी सातवाहन नृपतींनी या भूमीच्या राजकीय संस्कृतीला जी श्रेष्ठ प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती पुढील वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव या राजवंशांतील पुरुषांनी तशीच, त्याच पातळीवर टिकवून धरण्याचा आटोकाट प्रयत्न केला व त्यात बव्हंशी यशही मिळविले. या भूमीच्या कोणत्याही सुपुत्राला त्या संस्कृतीचे हे रूप पाहून धन्यताच वाटेल.