महाराष्ट्र संस्कृती/राजकीय कर्तृत्व

विकिस्रोत कडून


५.
राजकीय कर्तृत्व
 

( वाकाटक ते यादव )


 वाकाटक ते यादव-अखेर या हजार-अकराशे वर्षांच्या कालखंडातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची अत्यंत स्थूल रूपरेखा आपण प्रथम पाहिली आणि नंतर या पाचही राजघराण्यांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित केले. आता या प्रत्येक घराण्याच्या राजकीय कर्तृत्वाचा इतिहास आपणांस थोड्या तपशिलाने पहावयाचा आहे.

वाकाटक
 सातवाहन सत्तेचा ऱ्हास झाल्यावर त्यांच्या साम्राज्याच्या निरनिराळ्या विभागांत त्यांच्याच सेनापति- सरदारांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली. तामिळनाडमध्ये पल्लव घराणे उदयास आले, आंध्र देशात इक्ष्वाकूंनी सत्ता स्थापन केली. विदर्भात आणि दक्षिणेकडील वनवासी प्रांतात सातवाहनांच्याच शाखांचे राज्य झाले. पश्चिम महाराष्ट्रात याच वेळी आभीर या शककुशाणांसारख्याच एका परकी जमातीचे राज्य स्थापन झाले. ईश्वरसेन हा या राजवंशाचा मूळपुरुष होय. या वंशात एकंदर दहा राजे झाले व त्यांनी एकंदर सदुसष्ट वर्षे राज्य केले. नंतरच्या शंभरदोनशे वर्षांत महाराष्ट्राच्या भिन्न प्रदेशांत नल, भोज, त्रैकूटक व राष्ट्रकूट असे भिन्न वंश उदयास आले. कधी त्यांची राज्ये स्वतंत्र असत तर कधी गुप्त, वाकाटक यांचे ते मांडलिक म्हणून राज्य करीत. यांतील राष्ट्रकूट हेच पुढे चालुक्यानंतर आठव्या शतकाच्या मध्याला साम्राज्य संस्थापक झाले. पण तो इतिहास पुढचा आहे. इ. सनाच्या तिसऱ्या शतकात वरीलपैकी सर्व वंश क्षुद्रावस्थेतच होते. याचवेळी वाकाटकांचा उदय झाला. यांचा मूळपुरुष विंध्यशक्ती हा एक ब्राह्मण होता हे वर सांगितलेच आहे. त्याचा मुलगा प्रवरसेन हा या घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता नृपती होय.
 इतिहासाविषयी भारतात प्राचीन काळापासून अगदी अक्षम्य अनास्था होती हे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीपर्यंत वाकाटक या वंशाचे नावही कोणाला माहीत नव्हते. १८३६ साली सिवनी येथे या घराण्यातील राजा द्वितीय प्रवरसेन याचा एक ताम्रपट सापडला, तेव्हा वाकाटक हे नाव प्रथम ज्ञात झाले. परंतु त्यानंतरही तीस- चाळीस वर्षे, हे कोणी परकी यवन ग्रीक घराणे असावे, असाच पंडितांचा समज होता. यांच्या काळाबद्दलही असेच गैरसमज होते. बुल्हर, फ्लीट कीलहॉर्न यांच्या मते वाकाटक हे पाचव्या किंवा आठव्या शतकात होऊन गेले. पण १९१२ साली पुण्याला एका तांबटाच्या घरी वाकाटकनृपती द्वितीय रुद्रसेन याची पट्टराणी, प्रसिद्ध सम्राट महाराजाधिराज द्वितीय चंद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा एक ताम्रपट सापडला. त्यानंतर हळूहळू त्यांचे अनेक ताम्रपट सापडले. अजंठा येथील क्र. १६, १७ व १९ या लेण्यांतील त्यांचा इतिहास देणाऱ्या कोरीव लेखांचे वाचन नीट झाले. द्वितीय प्रवरसेन व सर्वसेन या वाकाटक राजांनी लिहिलेली 'सेतुबंध' व 'हरिविजय' ही महाराष्ट्री प्राकृतातील काव्ये उपलब्ध होऊन त्यांचे कर्तृत्वही निश्चित झाले आणि मग हे सर्व साहित्य घेऊन संशोधक पंडित त्यांचा इतिहास लिहू लागले. डॉ. कृष्णस्वामी आय्यंगार, डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांनी या राजघराण्याविषयी आपल्या ग्रंथांत बरेच विवेचन केले आहे. अगदी अलीकडे म. म. मिराशी यांनी 'वाकाटकनृपती आणि त्यांचा काल' हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. पुढील माहिती प्रामुख्याने त्याच्याच आधारे दिली आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल', भारतीय विद्याभवन, खंड २ व ३ आणि 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन', संपादक डॉ. राजदानी- या ग्रंथांचाही आधार घेतला आहे.
 विंध्यशक्ती (इ. स. १५५ - २७५ ) हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होय. अजंठ्याच्या लेखात त्याची अत्युक्तीने स्तुती केली आहे. पण तीवरून ऐतिहासिक अशी कसलीच माहिती मिळत नाही. तो वाकाटक वंशकेतू होता एवढेच तीवरून समजते. विदर्भाचा बराच भाग त्याच्या राज्यात असावा असे मिराशींचे अनुमान आहे. विंध्यशक्तीचा पुत्र प्रवरसेन हा फार पराक्रमी होता. त्यानेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र हे प्रदेश जिंकून वाकाटक घराण्याच्या साम्राज्याची स्थापना केली. त्याने चार वेळा अश्वमेध यज्ञ केले असे त्यांच्या वंशजांच्या बहुतेक ताम्रपटात वर्णिलेले आहे. त्यावरून त्याच्या पराक्रमाची कल्पना येते. इतरही अनेक श्रौतयाग याने केल्याचे उल्लेख सापडतात. वाजपेय यज्ञाच्या अनुष्ठानानंतर त्याने सम्राट ही पदवी धारण केली.

सम्राट प्रवरसेन
 विदिशेचे भारशिव हे राजघराणे वाकाटकांचे समकालीन होय. हे घराणे नागवंशी असून पौनीभंडारा येथे सापडलेल्या त्यांच्या शिलालेखावरून ते मूळचे विदर्भातले असावे असे मिराशी म्हणतात. भारशिव हे वाकाटकांप्रमाणेच पराक्रमी असून त्यांनी दहा अश्वमेध केले होते. आपल्या सत्तेला बळकटी आणण्याकरिता प्रवरसेनाने भारशिव नृपती भवनाग याच्या कन्येला आपला पुत्र गौतमीपुत्र यासाठी मागणी घालून सून करून घेतली. प्रवरसेनाने साठ वर्षे राज्य केले ( इ. स. २७५ - ३३५ ). या प्रवरसेनाचा डॉ. जयस्वाल यांनी फार गौरव केला आहे. अखिल भारतावर हिंदूचे साम्राज्य असावे व त्यांत धर्मशास्त्रांना अग्रमान दिला जावा, ही कल्पना त्याने निश्चयाने प्रसृत केली, असे ते म्हणतात. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा, वर्णाश्रम धर्म व हिंदूंच्या विद्याकला यांच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय त्यांच्या मते वाकाटकांना आहे. बरेच इतिहास पंडित ते श्रेय गुप्तसम्राटांना देतात; गुप्तसम्राटांचा उदय चौथ्या शतकाच्या मध्याच्या सुमारास झाला. सातवाहनानंतर म्हणजे इ. स. २२५ नंतर पुढच्या १५० वर्षांच्या काळात भारतात सर्व परकी जमातींचे राज्य होते असा समज पंडितांत प्रचलित होता. 'नाग - वाकाटकांच्या साम्राज्याचा काल' या आपल्या ग्रंथात डॉ. जयस्वाल यांनी या मताचे खंडन करून या दोन घराण्यांना भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे व पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले आहे. म. म. मिराशी यांना डॉ. जयस्वालांची पुष्कळ मते मान्य नाहीत. पण नाग- वाकाटकांचे हे कार्य त्यांना मान्य आहे.
 प्रवरसेनाला चार पुत्र होते. त्यांच्यामध्ये वाकाटकांच्या विस्तीर्ण साम्राज्याची प्रवरसेनानंतर वाटणी झाली असे मिराशी म्हणतात. ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र हा पित्याच्या आधीच मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा रुद्रसेन हा विदर्भातील नंदिवर्धन या शाखेचा मुख्य झाला. प्रवरसेनाचा दुसरा मुलगा सर्वसेन याने वाशीम ( वत्सगुल्म ) ही आपली राजधानी केली. दुसऱ्या दोन मुलांविषयी कसलीच माहिती उपलब्ध नाही.

गुप्त व वाकाटक
 प्रवरसेनाचा नातू रुद्रसेन ( इ. स. ३३५ ते ३६० ) हा भवनागाचा दौहित्र- मुलीचा मुलगा होता. भारशिव नाग हे कट्टे शिवोपासक होते. रुद्रसेन हा शंकराने दक्षयज्ञ-विध्वंसासाठी निर्माण केलेल्या महाभैरवाचा भक्त होता. चांदा जिल्ह्यात देवटेक गावी 'प्राण्यांची हिंसा कोणी करू नये' अशी आज्ञा असलेला अशोकाचा एक शिलालेख होता. रुद्रसेनाने हा लेख छिलून टाकून त्या शिळेवर आपला लेख कोरविला. अशोकाचा अहिंसाधर्म त्याला मान्य नव्हता हेच त्याचे कारण असले पाहिजे. या रुद्रसेनाच्या कारकीर्दीतच गुप्तवंशातील प्रसिद्ध सम्राट समुद्रगुप्त याचा साम्राज्य- स्थापनेचा महा उद्योग सुरू झाला. त्यामुळे वाकाटकांचे साम्राज्य खूपच संकोच पावले. त्यातील लक्षणीय गोष्ट एवढीच की वाकाटक हे गुप्तांचे कधी मांडलिक झाले नाहीत. उत्तर व दक्षिण भारतातील बहुतेक सर्व राज्ये समुद्रगुप्ताने जिंकली. पण रुद्रसेनाने आपले स्वातंत्र्य अबाधित राखले होते. पश्चिमेचे शकक्षत्रप त्यावेळी प्रबळ होते. समुद्रगुप्ताला त्यांना जिंकावयाचे होते. त्या कामी वाकाटकांचे साह्य होईल या अपेक्षेने त्याने रुद्रसेनाला दुखविले नसावे असे वाटते. ते कसेही असले तरी समुद्र- गुप्ताने वाकाटकांना जिंकल्याचा यत्किंचितही पुरावा आढळत नाही. रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा इ. स. ३६० च्या सुमारास गादीवर आला. त्याने सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. इ. स. ३७६ च्या सुमारास मावळा व सौराष्ट्र या प्रदेशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांवर सम्राट चंद्रगुप्ताने युद्ध पुकारले. त्यावेळी त्याला वाकाटकांनी विपुल साह्य केले. या युतीमुळे क्षत्रपांचे सहज निर्मूलन झाले. याच प्रसंगी पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती गुप्ता ही देऊन दोन घराण्यांच्या मैत्रीला चिरस्थायी रूप दिले. प्रभावती गुप्ता ही मोठी कर्तबगार राणी होती. तिला संसारसौख्य फार लाभले नाही. लग्नानंतर ७-८ वर्षांतच द्वितीय रुद्रसेन मृत्यू पावला. त्या वेळी दिवाकरसेन व दुसरा प्रवरसेन हे तिचे दोन्ही मुलगे लहान होते. त्यामुळे राज्यभार या राणीच्या शिरी आला. पण तरी न डगमगता मोठ्या धैर्याने तिने इ. स. ३९० ते ४१० अशी वीस वर्षे उत्तम कारभार केला. त्या कामी अर्थातच तिला तिच्या पित्याचे सम्राट चंद्रगुप्ताचे मोठेच साह्य झाले.

कृतयुग
 राणी प्रभावती हिचा मोठा मुलगा दिवाकरसेन हाही अल्पायुषी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर इ. स. ४१० च्या सुमारास तिचा दुसरा मुलगा दामोदरसेन हा प्रवरसेन हे नाव धारण करून गादीवर बसला. या द्वितीय प्रवरसेनाने सुमारे ३० वर्षे राज्य केले. पहिल्या ८-१० वर्षांनंतर त्याने नंदिवर्धन येथून आपली राजधानी हलविली व प्रवरपूर ही नवी नगरी उभारून तेथे ती नेली. हल्लीचे पवनार ते हेच. 'सेतुबंध' या काव्याचा कर्ता हाच प्रवरसेन होय हे मागे सांगितलेच आहे. याच्या काही गाथा गाथासप्तशतीत समाविष्ट झालेल्या आहेत. हा द्वितीय प्रवरसेन शिवोपासक होता. 'भगवान शंकराच्या कृपेने आपल्याला आपल्या राज्यात कृतयुग निर्माण करता आले', असे याने आपल्या वेलोरा येथील ताम्रपटात म्हटले आहे. हा उल्लेख महत्त्वाचा आहे. सध्याची कलियुगाची घातक कल्पना तेव्हा नव्हती असे दिसते. राजा आपल्या कर्तृत्वाने कृत, त्रेता इ. युगे निर्माण करतो असे महाभारतात म्हटले आहे. हा विचार मानवी कर्तृत्वाला पोषक असा आहे. कालाच्या ओघात ही युगे निर्माण होतात, ते मानवाच्या हातात नाही हा विचार दहाव्या शतकाच्या सुमारास रूढ झाला. भारताचा तेथून पुढे विनाशकाल ओढवला. त्याच्या अनेक प्रधान कारणांपैकी 'कलियुग कल्पना ' हे एक कारण आहे. वाकाटक सम्राट द्वितीय प्रवरसेन याला ती मान्य नव्हती असे दिसते.
 द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेन्द्रसेन हा इ. स. ४४० च्या सुमारास गादीवर आला. कुंतल राजकन्या अज्झित भट्टारिका ही याची राणी होती. ही बहुधा कुंतलेश राष्ट्रकूट नृपती देवराज याची कन्या असवी. माळवा व अमरकंटक या प्रदेशांवर स्वारी करून गुप्तसाम्राज्यातील हे आपले जुने प्रदेश नरेन्द्रसेनाने पुन्हा जिंकून घेतले. वीस वर्षे राज्य करून नरेन्द्रसेन मृत्यू पावला व त्याचा पुत्र द्वितीय पृथ्वीषेण हा गादीवर आला (इ. स. ४६० ते ४८० ) याने प्रवरापुराहून आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. सुप्रसिद्ध संस्कृत कवी भवभूती याचे हेच जन्मस्थान होते, असे पंडितांचे मत आहे. नरेन्द्रसेन व पृथ्वीषेण यांच्या राजवटीत वाकाटकांच्या नंदिवर्धन शाळेला हळूहळू ऱ्हासकाळ येऊ लागला. इ. स. ४९० च्या सुमारास या घराण्याची सत्ता संपुष्टात आली. पण या घराण्याची वत्सगुल्म येथे राज्य करीत असलेली दुसरी शाखा अजून सत्तारूढ होती. तिच्या राज्यात हे राज्य विलीन झाले असे संशोधकांचे अनुमान आहे.

हरिषेण
 वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशीम. प्राचीन काळी हे एक पुण्यक्षेत्र होते. प्रथम प्रवरसेनाचा पुत्र सर्वसेन हा या शाखेचा संस्थापक. महाराष्ट्री प्राकृतातील 'हरिविजय' या काव्याचा कर्ता सर्वसेन तो हाच होय. याच्या नंतर विंध्यसेन, द्वितीय प्रवरसेन, हरिषेण असे पराक्रमी राजे या घराण्यात होऊन गेले. पण त्यांच्याविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. शेवटचा हरिषेण (इ. स. ४७४ - ५१० ) हा तर विशेष पराक्रमी असावा असे वाटते. अजंठा येथील लेखावरून, माळव्यापासून कुंतलपर्यंत व सिंधु- सागरापासून गंगासागरापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते असे दिसते. त्यानंतर या घराण्यातील राजे नाकर्ते झाल्यामुळे त्यांचे राज्य लयास गेले व इ. स. ५५० च्या सुमारास वाकाटकांच्या साम्राज्याची कर्नाटकचे कदंब, महिष्मतीचे कलचूरी व पुष्करीचे ( मध्य प्रदेश ) नल यांनी आपसात विभागणी केली.
 वाकाटक सम्राट हे विद्याकलांचे भोक्ते व आश्रयदाते होते. त्यांच्यापैकी दोघांनी स्वतःच काव्यरचना केल्याचे वर सांगितलेच आहे. संस्कृत साहित्यशास्त्रातील सुप्रसिद्ध वैदर्भी रीती ही त्यांच्याच राज्यसभेत उदयास येऊन विकसित झाली. अजंठ्याची काही लेणी त्यांच्याच कारकीर्दीत खोदली गेली होती. आणि त्यांच्या घराण्याची प्रशस्ती त्यातील काही शिलालेखांत आहे, यावरून या शिल्पकलेचे ते आश्रयदाते होते यात शंका नाही. पण त्यांचे खरे महत्त्वाचे कार्य म्हणजे हिंदुधर्म व संस्कृती यांचे रक्षण हे होय. इ. स. २२५ नंतरच्या पुढच्या १५० वर्षांच्या काळात म्हणजे गुप्त- घराण्याच्या उदयापर्यंत अन्य कोणीच हिंदुनृपती तसा बलाढ्य नव्हता. त्यामुळे हे धर्मरक्षणाचे कार्य भारशिव आणि वाकाटक यांच्याच शिरी आले. आणि डॉ. जयस्वाल यांच्या मते ते कार्य यांनी उत्तम रीतीने पार पाडले. डॉ. जयस्वाल याचे विशेष श्रेय वाकाटकनृपती प्रथम प्रवरसेन याला देतात. भारतात हिंदुसम्राटांचेच राज्य असले पाहिजे आणि ते राज्य हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे चालले पाहिजे हा विचार त्याने दृढनिश्रयाने प्रसृत केला व प्रत्यक्षात आणला असे त्यांचे मत आहे.
 वर निर्देशिलेली कदंब, कलचूरी व नल ही जी तीन घराणी त्यांपैकी कोणामध्येच साम्राज्य उभारण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यामुळे वाकाटकांनंतर थोड्याच काळात महाराष्ट्रात चालुक्यांचे राज्य प्रस्थापित झाले. त्यांचा परक्रमी राजा म्हणजे सत्याश्रय पुलकेशी हा होय. हा इ. स. ५३५ साली सिंहासनावर आला. त्याचा पिता रणराग व पितामह जयसिंह वल्लभ यांची नावे प्रारंभीचे राजे म्हणून चालुक्य वंशावळीत दिलेली आहेत. पण ते पराक्रमी असले तरी स्वतंत्र नव्हते. सत्याश्रय श्री पृथ्वीवल्लभ पुलकेशी हाच पहिला राजा व या घराण्याचा संस्थापक होय.

बदामीचे चालुक्य
 दंतकथेप्रमाणे चालुक्य वंशाचा मूळ पुरुष मनू हा असून हे क्षत्रिय घराणे मूळचे अयोध्येचे होते अयोध्येला या घराण्याच्या एकुणसाठ राजांनी राज्य केले. त्यानंतर दक्षिणापथात सोळा चालुक्यांनी राज्य केले. ब्रह्मदेवाच्या अंजलीतील पाण्याच्या चुळक्यातून या वंशाचा मूळपुरुष निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यावरून चालुक्य हे नाव पडले, असे पुराणे सांगतात. शिलालेखावरून पाहता चालुक्य हे स्वतःला मानव्यगोत्री हारितीपुत्र म्हणवितात, असे दिसते. त्यांच्या ध्वजावर वराहाचे चित्र असून हा ध्वज भगवान विष्णूने आपल्याला दिला, असे चालुक्य सांगतात. हे घराणे बदामी - विजापूर या प्रांतात असून ते मूळचे कानडी असावे एवढेच इतिहासपंडित काहीशा निश्रयाने सांगू शकतात. त्यापलीकडची सर्व माहिती पुराणे, दंतकथा व घराणे वैभवाला चढल्यानंतर रचलेल्या कल्पितकथा यांवरच अवलंबून असल्यामुळे इतिहासात तिला फारसे महत्त्व देता येत नाही.

अश्वमेध
 वर सांगितल्याप्रमाणे सत्याश्रय पुलकेशी ( १ ला ) हा या घराण्याचा संस्थापक होय. याने अश्वमेध यज्ञ केला आणि शिवाय अग्निष्टोम, अग्निचयन, वाजपेय, पौंडरीक हेही यज्ञ केले. वातापी-बदामी हा किल्ला बांधून तेथे त्याने आपली राजधानी नेली. याच्या राज्याच्या विस्ताराची निश्चित अशी माहिती मिळत नाही. पण याने अश्वमेघ यज्ञ केला त्या अर्थी तो विस्तार बराच मोठा असावा असे वाटते. शिलालेखात याची ययाती, दिलीप या प्राचीन राजांशी तुलना केलेली असून या राजाने मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत व इतर इतिहास यांचा अभ्यास केला होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. एकतीस वर्षे राज्य करून हा इ. स. ५६६ साली मृत्यू पावला.
 त्याच्यामागून त्याचा मुलगा कीर्तिवर्मा (५६७ - ५९८ ) हा राजपदी आला. सेंद्रक कुलातील राजा श्रीवल्लभ सेनानंद याची कन्या ही त्याची राणी होती. कीर्तिवर्म्याने नल, मौर्य व कदंब यांना जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. नलांचे राज्य पूर्वेला नळदुर्गाच्या बाजूस होते. मौर्य हे कोकणात राज्य करीत होते, आणि म्हैसूर, उत्तर कानडा, बेळगाव, धारवाड या प्रदेशावर कदंबांची सत्ता होती. या विजयामुळे चालुक्यसत्ता पुष्कळच विस्तारली. कीर्तिवर्म्यामागून त्याचा भाऊ मंगलीश हा राजा झाला (५९८-६११). कारण त्याची मुले अजून अज्ञान होती. मंगलीशाने कलचूरींना जिंकून मध्य व उत्तर महाराष्ट्रावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. वेंगुर्ल्याजवळचे सिंधुसागरातील रेवाद्वीप हेही मंगलीशाने जिंकून इन्द्रवर्मा नामक सामंताला तेथे राजप्रतिनिधी म्हणून नेमले. याच्या कारकीर्दीच्या अखेरीस कीर्तिवर्म्याचा मुलगा सत्याश्रय पुलकेशी ( २ रा ) याशी त्याची लढाई होऊन मंगलीश मारला गेला. हा पुलकेशी हाच खरा गादीचा वारस होता. तो लहान असल्यामुळे मंगलीशाला राज्य मिळाले होते. पण पुढे मंगलीशाने पुलकेशीला बाजूस सारून आपल्या मुलालाच राज्य देण्याचा विचार केला. त्यामुळे चुलता-पुतण्या यांचे युद्ध होऊन चुलता मृत्यू पावला व राज्य- लक्ष्मी पुतण्याकडे गेली.

मराठ्यांचा राजा
 हा सत्याश्रय पुलकेशी चालुक्य घराण्यातील सर्वांत मोठा सम्राट होय. दक्षिणेच्या आणि एकंदर भारताच्या इतिहासातही याला फार मोठे स्थान आहे. चालुक्यांच्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप यानेच दिले. स्वतःचा वारसा प्रस्थापित करताना त्याला चुलत्याशी लढावे लागल्यामुळे त्या वेळी प्रारंभी सर्व राज्यात अराजकच निर्माण झाले होते. आणि पहिला सत्याश्रय पुलकेशी व कीर्तिवर्मा यांनी जिंकलेले राजे ही संधी साधून धुमाकूळ घालू लागले होते. पण हा दुसरा सत्याश्रय आपल्या पित्याप्रमाणे व पितामहाप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्तच पराक्रमी होता. त्याने लवकरच राज्य विस्ताराची मोहीम सुरू करून थोडक्याच काळात वनवासीचे कदंब, दक्षिण म्हैसूरचे गंग, शिमोग्याचे अलूप यांना जिंकले. त्यानंतर कोकणावर स्वारी करून पित्याने जिंकलेल्या मौर्यांना त्याने पुन्हा पराभूत केले व सागरी लढाई करून त्याने त्यांची राजधानी पुरी ( घारापुरी किंवा राजापुरी ) ही जिंकून घेतली. नंतर तो उत्तर दिग्विजयासाठी निघाला व लाट, मालव व गुर्जर यांना त्याने शरण आणले.
 इ. स. ६३०च्या सुमारास सत्याश्रय पुलकेशीचा, कनोजचा सम्राट हर्षवर्धन तथा शिलादित्य याच्याशी सामना होऊन उत्तरेच्या त्या थोर सम्राटाला पराभव पत्करावा लागला. त्याने बहुतेक सर्व उत्तर जिंकली होती. आता मौर्य, गुप्त या घराण्यांतील सम्राटांप्रमाणे कन्याकुमारीपर्यंत साम्राज्यविस्तार करण्याची आकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. पण त्याचा उद्देश जाणून पुलकेशी आपण होऊनच नर्मदापार झाला व हर्षाच्या सेनेला भिडून त्याने तिचा पराभव केला. पुलकेशीय अखिल भारतीय कीर्ती प्राप्त झाली ती यामुळेच. या सर्व विजयामुळे पुलकेशी त्रिमहाराष्ट्रकांचा स्वामी झाला असे रविकीर्ती कवीने ऐहोळे येथील शिलालेखात म्हटले आहे. हे तीन महाराष्ट्र कोणते याविषयी पंडितांत वाद आहे. मुख्य महाराष्ट्र कोकण व कर्नाटक असे हे महाराष्ट्र असावे असे डॉ. डी. सी. सरकार म्हणतात. कर्नाटकाचा समावेश त्या वेळी महाराष्ट्रातच होत होता असे यावरून कोणी अनुमान करतात. कोणाच्या मते विदर्भ, कुंतल व कोकण हे ते तीन महाराष्ट्रक होत. पण याची चर्चा मार्ग केलेली असल्यामुळे येथे पुनरुक्ती करीत नाही.
 हर्षवर्धनाचा पराभव केल्यानंतर पुलकेशी दक्षिणेत परत आला व मग त्याने कोसल व कलिंग हे देश जिंकले. नंतर पूर्व समुद्रकाठाने दक्षिणेस जाऊन त्याने पिष्टापूरचा किल्ला जिंकला व तेथे त्याने आपला धाकटा भाऊ विष्णुवर्धन यास राज्यपाल म्हणून नेमिले. हे पूर्वेकडचे राज्य लवकरच स्वतंत्र झाले व हे घराणे तेथे इ. स. १०७० पर्यंत राज्य करीत होते. आणखी खाली उतरून पुलकेशीने कांचीचा पल्लव राजा पहिला महेन्द्रवर्मा याचा पराभव केला. या संघर्षामुळे शतकानुशतकांच्या दीर्घकालीन वैरास व अखंड संग्रामासच प्रारंभ झाला. बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व कल्याणीचे चालुक्य यांचा दरपिढीस कांचीच्या पल्लवाशी एकदा तरी संग्राम व्हावयाचा हे आता ठरून गेले. पल्लवांना पराभूत केल्यावर पुलकेशीने कावेरी ओलांडली व चोल, पांड्य व केरळ यांच्या राजांशी स्नेहसंबंध जोडून तो परत बदामीला आला. असे दिग्विजय केल्यामुळे हा चालुक्यराज पूर्वपश्चिम सागराधीश झाला. त्रिसमुद्रतोयपीतवाहन ही पदवी त्याला शोभू लागली.
 या पुलकेशीच्या कारकीर्दीतच ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. मराठे लोक व मराठ्यांचा हा राजा यांचा त्याने मुक्तकंठाने गौरव केला आहे. पुलकेशीच्या राज्याचा परीघ ८३६ मैल असून त्याची राजधानी पाच मैल परिघाची आहे व तिच्या पश्चिमेस एक मोठी नदी आहे असे तो म्हणतो. हे वर्णन बदामीशी जुळत नाही, म्हणून ते नाशिकचे किंवा वेरूळचे असावे व तेथे पुलकेशीची दुसरी राजधानी असावी असा पंडितांचा तर्क आहे. मराठे लोक हे कणखर, साधे, मजबूत, प्रामाणिक असून अपमानाचा बदला घेतल्याखेरीज ते राहात नसत, असे ह्युएनत्संग म्हणतो. हे उदारवृत्तीचे असून शरणागताच्या रक्षणार्थ जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पहात नसत. युद्धापूर्वी ते मद्यप्राशन करीत आणि मग त्यांच्यांतला एक भालाईत हजारांवर निर्भयपणे तुटून पडे. आपल्या गजदळालाही ते मद्यपान करवीत. आणि अशा त्या गजदलासह ही मराठासेना निघाली की तिच्यापुढे उभे राहण्यास कोणी धजत नसे. यामुळेच त्यांच्या राजाला शेजारच्या राज्यांची गणतीच नसे.
 पुलकेशीची कीर्ती त्याच्या या पराक्रमामुळे भारताबाहेरही पोचली होती. त्याने आपले वकील व इराणचा शहा खुश्रूपूर्वीज याच्याकडे धाडले होते. तेथे त्यांचा मोठा सन्मान झाला. अजिंठ्याच्या लेण्यांत या खुश्रूपूर्वीजचे वकील पुलकेशीकडे आले तेव्हाचे चित्र रंगविलेले आहे.
 पल्लवांवर पुलकेशीने मिळविलेला विजय अल्पकालीन ठरला. महेन्द्रवर्म्याचा पुत्र नरसिंहवर्मा याने आपल्या पित्याच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी बदामीवर स्वारी केली. त्या लढाईत पुलकेशीचा पराभव झाला आणि बहुधा तो तीत मारला गेला, असे पल्लवांच्या लेखावरून दिसते. चालुक्य राजाला पराभूत केल्यानंतर नरसिंहवर्म्याने बदामी या राजधानीचाही विध्वंस केला आणि अशा रीतीने पुलकेशीच्या वैभवशाली कारकीर्दीचा दुःखद असा शेवट झाला.

चालुक्य साम्राज्य
 सत्याश्रय पुलकेशी ( २ रा ) याच्या मृत्यूनंतर १०-१५ वर्षे चालुक्यांचे राज्य अस्तित्वात नसल्यासारखेच होते. पल्लवराजांनी बदामीचा किल्ला बळकावला होता. आणि पुलकेशीला अनेक पुत्र होते तरी पल्लवांचे आक्रमण निपटून काढण्यात ६५५ सालापर्यंत कोणालाही यश आले नाही. या सर्व राजपुत्रांचे आपसात कलह चालू असतील व त्यामुळे कोणीच समर्थ होऊ शकला नसेल असा एक तर्क आहे. शेवटी पुलकेशीचा धाकटा पुत्र विक्रमादित्य १ ला हा पल्लवांना पराभूत करून आपले राज्य परत मिळविण्यात यशस्वी झाला. स्वराज्य अधिगत झाल्यावर त्याने पल्लवांवर आक्रमण करून कांचीही जिंकली. विक्रमादित्य इ. स. ६८१ मध्ये मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा विनयादित्य ( ६८१ - ९६ ), त्याच्या नंतर विजयादित्य ( ६९६-७३३) आणि नंतर विक्रमादित्य २ रा ( ७३३ - ४५ ) असे चालुक्य राजे क्रमाने गादीवर आले. हे बहुतेक सर्व पराक्रमी होते. पल्लवांवर स्वारी करून त्यांचा पराभव करणे व नंतर कावेरी उतरून पांड्य, चोल, चेर (केरल) यांना जिंकून सर्व दक्षिण आपल्या साम्राज्यात आणणे ही धडपड प्रत्येकाची होती. त्याचप्रमाणे गंग, अलूप, कदंब, यांच्यावर स्वारी करून त्यांना नमविणे हेही त्यांच्या पराक्रमाचे कायमचे लक्षण होते. या दोन्ही प्रयत्नांत बहुधा हे सर्व चालुक्य राजे यशस्वी झाले. कधी कधी त्यांच्यावर बाजू उलटून त्यांना रणातून पळ काढावा लागे हे खरे. पण ते अपवादात्मक. सामान्यतः यशःश्री त्यांचीच होती.

आरबांचे निर्दाळण
 चालुक्यांची आंध्र प्रांतात वेंगी येथे एक जशी शाखा होती तशीच लाट म्हणजेच दक्षिण गुजराथेतही होती. आंध्रशाखा प्रारंभापासूनच वेगळी व स्वतंत्र झाली होती. तशी लाटशाखा झाली नव्हती. लाट-चालुक्य शेवटपर्यंत महाराष्ट्रात चालुक्यांचे सामंतच होते. विक्रमादित्य २ रा याच्या कारकीर्दीत त्यांनी एक मोठा पराक्रम केला. इ. स. ७११ पासून आरबांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या. सिंध तर त्यांनी जिंकलाच होता. तेथून ते हळूहळू पूर्वेस व दक्षिणेस पाय पसरू पाहात होते. पण अवंतीच्या नागभट्ट राजाने त्यांचे आक्रमण मोडून काढून त्यांना परतवून लावले. इ. स. ७३६ साली आरब गुजराथेत उतरले होते. त्याआधी त्यांनी कोकण, कच्छ व सौराष्ट्र जिंकलेच होते आणि आता लाट म्हणजे दक्षिण गुजराथेत ते उतरले होते. पण चालुक्य सामंत पुलकेशी याने त्यांशी मुकाबला करून त्यांचे निर्दाळण केलं. विक्रमादित्य २ रा याने या पराक्रमाबद्दल दक्षिणापथस्वाधार, पृथ्वीवल्लभ अशा पदव्या देऊन पुलकेशीचा मोठा गौरव केला.
 विक्रमादित्यामागून त्याचा पुत्र कीर्तिवर्मा २ रा हा गादीवर आला. पण या सुमारास चालुक्यांचे सामंत राष्ट्रकूट उदयास येत होते. पल्लव, पांड्य, चोल, गंग, अलूप यांशी सतत दोनशे वर्षे चालुक्यांनी लढाया चालू ठेविल्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली होती. राष्ट्रकूटांचा जोम नवीन होता. त्यात दंतिदुर्गासारखा समर्थ नेता त्यांना लाभला. त्यामुळे त्यांनी उठाव करून चालुक्यराजांचा पराभव केला आणि त्यांची राजश्री हिरावून घेतली. त्यामुळे इ. स. ७५३ च्या सुमारास या घराण्याचा अस्त झाला.

एकसत्ताक दक्षिणापथ
 सम्राट हर्षवर्धनानंतर भारतात साम्राज्यकर्ता पुरुष झाला नाही, असे पाश्चात्य इतिहास पंडितांनी लिहून ठेविले आहे. व्हिन्सेंट स्मिथ याने हे मत मांडून, ब्रिटिशांनी भारत संघटित केला, त्यांच्या अभावी हर्षानंतरचे अराजक पुन्हा माजले असते, असे विधान केले आहे. हे विधान किती भ्रामक व दुराग्रही आहे हे डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी दाखवून दिले आहे आणि तसे करताना बदामीच्या चालुक्यांचा मोठा गौरव केला आहे. त्यांच्या मते उत्तर हिंदुस्थान, दक्षिणापथ ( नर्मदा ते तुंगभद्रा ) व दक्षिण ( तुंगभद्रा ते कन्याकुमारी ) असे भारताचे तीन स्पष्ट विभाग त्या काळी पडले होते. आणि हर्षवर्धन, चालुक्य व पल्लव यांनी या तीन विभागांत साम्राज्ये स्थापून लोक संघटित ठेविले होते व देशाला अराजकापासून वाचविले होते. उत्तरेकडील साम्राज्यांच्या तुलनेने दक्षिणेतील ही साम्राज्ये लहान असली तरी सर्व दक्षिणापथ एकसत्ताक करून दोनशे वर्षे एवढा प्रदेश संघटित ठेवणे ही कामगिरी लहान नाही. या अवधीत चालुक्य राज्ये कधी मांडलिक झाले नाहीत. उलट गुजराथ, माळवा, आंध्र, कोसल या प्रदेशांवर त्यांनी साम्राज्य प्रस्थापित केले आणि ते दिलीप, ययाती या प्राचीन पौराणिक आदर्शप्रमाणे चालवले हे त्यांस व महाराष्ट्रास भूषणावह आहे.

राष्ट्रकूट
 चालुक्यांच्या मागून सत्तारूढ झालेले राष्ट्रकूट घराणे त्याचे राज्य इ. स. ७५० ते ९७३ असे सुमारे सवादोनशे वर्षे चालले. यापूर्वी निरनिराळी राष्ट्रकूट घराणी महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक व चालुक्य यांची सामंत म्हणून राज्य करीत होती. मधून मधून काहीकाळ ती स्वतंत्रही होत असावीत. पण मराठवाड्यातील वेरूळ- जवळचे राष्ट्रकूट घराणे सम्राटपदाला चढले, तसे यश त्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रकूट घराण्याला आले नव्हते. म. म. मिराशी यांच्या मते राष्ट्रकूटांचे एक घराणे चौथ्या शतकात मानपूर म्हणजे सातारा जिह्यातील माण या ठिकाणी राज्य करीत होते. दुसरे घराणे विदर्भात नंदिवर्धन, अचलपूर या प्रदेशात सहाव्या शतकात राज्य करीत होते. आणि तिसरे म्हणजे मराठवाड्यातील वर उल्लेखिलेले घराणे होय.
 या राष्ट्रकूट घराण्यांचा परस्परांशी नात्याचा संबंध होता यास काही प्रमाण नाही. आणि तसा संबंध असेलच असे नाही. कारण राष्ट्रकूट ही प्राचीन काळापासून अधिकारपदवी होती. अर्वाचीन काळातील देसाई, देशमुख, सरदेशमुख, तसे त्या काळी राष्ट्रकूट होते. राष्ट्र हा त्या काळी तालुका, जिल्हा यासारखा राज्याचा एक विभाग होता. त्याचा मुख्य तो राष्ट्रकूट. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट तसाच हा राष्ट्रकूट. त्यामुळे ही घराणी परस्परसंबंध असतीलच असे नाही. डॉ. आळतेकर यांच्या मते अशोकाच्या काळी रथिक नामक अनेक घराणी महाराष्ट्रात व दक्षिणेतही होती. रिस्टिक, रास्टिक हे त्याचेच अपभ्रंश होत. रट्ट हे त्याच लोकांचे नाव होय. इ. सनाच्या चवथ्या शतकात संस्कृतचे जेव्हा पुनरुज्जीवन झाले तेव्हा राष्ट्रिक, राष्ट्रकूट अशी त्या मूळ शब्दाचीच रूपांतरे झाली. भावार्थ असा की राष्ट्रकूट महाराष्ट्रात कोठून बाहेरून आलेले लोक नव्हत किंवा आकस्मिकपणे आठव्या शतकाच्या मध्याला त्यांचा उदय झाला असेही नव्हे या सम्राटांच्या वैभवाच्या काळात जे शिलालेख कोरले गेले त्यात मात्र राष्ट्रकूटांचा मूळपुरुष श्रीकृष्ण होय असे सांगितलेले आढळते. कोठे कोठे श्रीकृष्णाचा सेनापती सात्यकी यालाही तो मान दिला जातो. पण याला ऐतिहासिक पुरावा असा काही नसल्यामुळे ते मत स्वीकारता येत नाही.

स्वराज्यस्थापना
 या घराण्याचा मूळ संस्थापक जो दंतिदुर्ग तो गुजराथेतील चालुक्यांची जी सामंत शाखा होती तिच्या राज्यात एक मोठा अधिकारी होता. त्याचा पिता इन्द्र याने अरबांचा पराभव करणारा जो पुलकेशी त्याची कन्या भवनागा हिचे लग्नमंडपातून हरण करून तिच्याशी विवाह केला होता. दंतिदुर्ग हा तिचाच मुलगा होय. चालुक्य- सत्ता कमजोर झालेली पाहताच त्याने ती संधी साधली व आपले स्वतंत्र राज्य स्थापिले. तो अल्प वयातच तिसाव्या वर्षी मृत्यू पावला. त्या वेळी गुजराथ व खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वऱ्हाड हे महाराष्ट्राचे विभाग यांवर त्याचे राज्य होते. पण याच काळात त्याने कोसल, कलिंग, मालव येथील राजांना जिंकले होते व कांचीच्या पल्लवांवर स्वारी करून त्यांनाही नमविले होते. दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग अजून शेवटचा चालुक्य राजा कीर्तिवर्मा २ रा याच्या ताब्यात होता. दंतिदुर्गाच्या मागून गादीवर आलेला त्याचा चुलता कृष्णराज याने चालुक्यांना जिंकण्याचे काम पुरे करून तोही भाग जिंकला व राष्ट्रकूटांचे आसन दृढ करून टाकले.
 कृष्णराजाने अठरा वर्षे राज्य केले. तेवढ्या अवधीत कर्नाटक, पूर्व चालुक्यांचे वेंगी- आंध्रप्रदेश येथील राज्य व कोकणप्रांत जिंकून मूळच्या साम्राज्याचा त्याने तिपटीने विस्तार केला. राष्ट्रकूट साम्राज्याचा अखिल भारतभर पुढे जो विस्तार झाला त्याचा पाया कृष्णराजाने अशा रीतीने दृढ करून ठेवला होता.
 कृष्णराजामागून त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा हा गादीवर आला. पण तो विषयासक्त व विलासी असल्यामुळे त्याचा भाऊ ध्रुवधारावर्ष याने त्याला पदच्युत करून स्वतः सत्ता हाती घेतली. इ. स. ७८० साली तो सत्तारूढ झाला. तेव्हा ५० वर्षांचा होता. राजपदावर येताच प्रथम त्याने गोविंदाचा पक्ष घेणाऱ्या सर्व राजांविरुद्ध मोहीम सुरू केली. प्रथम त्याने गंगवाडी जिंकली व आपला पुत्र स्तंभ यास तेथे सामंत म्हणून नेमले. नंतर कांचीकडे वळून त्याने पल्लवराज दंतिवर्मा यास नमविले. तेथून उत्तरेकडे जाऊन गुर्जरवंशीय प्रतीहार राजा वत्सराज यास त्याने जिंकले. माळव्यातून ध्रुवधारावर्ष हा बंगालचा राजा धर्मपाल यावर चालून गेला व त्याला रणात पराभूत करून तो परत राजधानीस आला. इ. स. ७९३ साली तो मरण पावला. या तेरा वर्षांच्या अवधीत दक्षिण व उत्तर दिग्विजय करून ध्रुवाने राष्ट्रकूट घराण्याला भारतात अग्रपूजेचा मान मिळवून दिला. सातवाहनानंतर विंध्यपर्वत ओलांडून उत्तरेवर चाल करून जाणारा ध्रुव हा दक्षिणेकडील पहिलाच सम्राट होय.

आसेतुहिमाचल
 ध्रुवाचा मुलगा गोविंद ३ रा हा सर्वात मोठा राष्ट्रकूट सम्राट होय. ज्येष्ठपुत्र स्तंभ याचा हक्क बाजूस सारून ध्रुवाने यालाच युवराजपद दिले होते. अर्थातच तो राजपदी येताच भावाभावात यादवी सुरू झाली. पण गोविंदाने सामदंडाने प्रतिपक्षीयांचा मोड करून आपले आसन स्थिर केले. त्यानंतर नित्यक्रमाप्रमाणे कांचीचे पल्लव व वेंगीचे चालुक्य यांवर चालून जाऊन त्यांना नमविले आणि तेथून तो उत्तरेच्या मोहिमेवर निघाला. कनोजच्या सिंहासनावर या वेळी प्रतीहारनृपती नागभट्ट हा आरूढ झाला होता. त्याने सिंधचे मुस्लिम, वेंगीचे चालुक्य आणि मध्यप्रदेशातील काही लहान राजे यांचा मित्रसंघ करून हे राज्य मिळविले होते. आणि सम्राट झाल्यावर माळवा व गुजराथ हेही प्रदेश जिंकले होते. अर्थातच राष्ट्रकूटांच्या सत्तेला हे उघड आव्हान होते. ते स्वीकारण्यास गोविंद ३ रा हा समर्थ होता. म्हणूनच इ. स. ८०६-७ साली कनोजवर स्वारी करून त्याने नागभट्टाचा पराभव केला आणि तेथून तो थेट हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन भिडला. एवढा विजय गोविंदाने मिळविला. पण तो केवळ दिग्विजय या स्वरूपाचा होता. त्याने कोणाचेही राज्य खालसा केले नाही. नागभट्ट, धर्मपाल यांकडून आपले सार्वभौमत्व मान्य करून घेऊन व विपुल खंडणी वसूल करून गोविंद महाराष्ट्रात परत आला. पण लगेच त्याला दक्षिणेत जावे लागले. गंगवाडी, केरळ, पांड्य, चोल व कांची या राजांनी त्याच्याविरुद्ध मित्रसंघ केला होता. त्यांना कसलाही अवधी न देता गोविंदाने त्यांच्यावर स्वारी करून त्यांची धूळधाण करून टाकली. या वार्तने घाबरून जाऊन सीलोनच्या राजाने आपण होऊन गोविंदाकडे नजराणा व करभार पाठविला. अशा रीतीने हिमालय ते कन्याकुमारी सर्व भारतवर्ष जिंकून गोविंदाने राष्ट्रकूट यशोमंदिरावर कळस चढविला. मौर्य, सातवाहन, गुप्त या घराण्यांच्या तोडीचे हे यश होते. आणि ते एका दक्षिणेतल्या सम्राट घराण्याने मिळविले होते. हे यश संपादल्यानंतर थोड्याच दिवसांत सुमारे ८१३ साली गोविंद मृत्यू पावला.
 गोविंदाचा मुलगा अमोघवर्ष या वेळी अवघा सहा वर्षांचा होता. त्यामुळे सामंत, मांडलिक व पिढ्यानपिढ्यांचे वैरी यांनी एकदम त्याच्या विरुद्ध उठाव केला. पण ही आपत्ती येणार हे ओळखून गोविंदाने गुजरात - राष्ट्रकूट शाखेचा आपला पुतण्या कर्क सुवर्णवर्ष याकडे राज्यकारभार सोपविला होता. कर्काला प्रारंभी यश आले नाही तरी अंती सर्व शत्रूंवर विजय मिळवून त्याने अमोघवर्षाची गादी अबाधित राखली. हा अमोघवर्ष साहित्याच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आहे. 'कविराजमार्ग' हा त्याचा कानडी भाषेत रचलेला ग्रंथ सुविख्यात आहे. अमोघवर्षाने दीर्घ काळ राज्य केले. पण तो पराक्रमी नसल्यामुळे साम्राज्यविस्तार त्याला करता आला नाही. उत्तर काळात जैनमताकडे त्याचा कल होऊन जिनसेन नामक जैन साधूकडून त्याने उपदेश घेतला होता. पण त्याने सनातनधर्म सोडला होता असे मात्र नव्हे. महालक्ष्मी, सूर्य, महादेव यांवरही त्याची भक्ती होती. मरणसमयी त्याचे वय ८० च्या घरात होते.
 अमोघवर्षानंतर कृष्ण २ रा इन्द्रनित्यवर्ष ३ रा, अमोघवर्ष २ रा, गोविंद ४ था, अमोघवर्ष ३ रा, कृष्ण ३ रा व खोट्टिग अमोघवर्ष ४ था असे राजे राष्ट्रकूट घराण्यात होऊन गेले. बहुतेकांच्या राजवटी गंग नोळंबवाडी, वेंगीचे चालुक्य, कनोजचे गुर्जर प्रतीहार, कलचूरी (चेदी ), पांड्य, केरळ, चोल यांशी झालेल्या लढायांनी भरलेल्या आहेत. या लढायांत इन्द्र ३ रा, कृष्ण ३ रा यांनी घराण्याच्या नावाला साजेसे पराक्रम केले. पण एकंदर घडामोडीत नित्याच्या साच्याहून निराळे असे काही झाले नाही. शेवटचा राजा खोट्टिग अमोघवर्ष याच्या कारकीर्दीत तैल नावाच्या सामंताने उठाव करून राष्ट्रकूट घराण्याचे राज्य बुडविले (इ. स. ९७३ ) व पुन्हा चालुक्य घराण्याचे राज्य स्थापिले तैल हा बदामीच्या चालुक्यांपैकीच असावा असा पंडितांचा तर्क आहे.

राजपुरुष-परंपरा
 राष्ट्रकूट घराणे हे पराक्रमी पुरुषांचे घराणे होते. पंजाब व सिंधू हे दोन प्रांत सोडून सारा भारतवर्ष त्यांनी पादाक्रांत केला होता. हिमालयापर्यंत त्यांनी आपल्या सेना नेऊन भिडविल्या होत्या. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, माळवा, आंध्र हे प्रांत त्यांच्या प्रत्यक्ष सत्तेखाली होते. त्यांच्या प्रत्येक पिढीला वारशासाठी यादवी झाली तरीही त्यांचे साम्राज्य सवादोनशे वर्षे टिकले हे विशेष होय. कर्तृत्वशाली राजपुरुषांची परंपरा ते निर्माण करू शकले म्हणूनच हे घडू शकले. प्राचीन काळी सर्व जगातच आणि विशेषतः भारतात राजसत्ता या राजांच्या वैयक्तिक कर्तृत्वावरच अवलंबून असत. राजे विषयलोलुप, व्यसनासक्त झाले की राज्ये बुडत असत. म्हणूनच सत्ययुग वा कलीयुग हे राजाच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, राजा हाच कालकारण आहे, असे तत्त्ववेत्ते म्हणत. अनियंत्रित सत्ता व अमित धन हाती असताना राजे विलासमग्न, भ्रष्ट न होणे ही गोष्ट आपल्याला दुर्मिळ वाटते. ती तशी आहेही; पण अशाही स्थितीत १४/१५ राजपुरुषांत ९।१० राजे समर्थ व पराक्रमी निघावे हे कोणत्याही घराण्याला भूषणभूतच ठरेल. गोविंद २ रा, गोविंद ४ था हे राजे विषयासक्त व नादान निघाले, पण त्यांना पदच्युत करून स्वतःच्या हाती सत्ता येणारे ध्रुव, अमोघवर्ष व कृष्ण ३ रा यांसारखे राजे त्या घराण्यातच उदयास आले म्हणून राष्ट्रकूट राज्य टिकले. शेवटचा राजा खोट्टिग याच्या कारकीर्दीत त्याच्या पराक्रमशून्यतेमुळे त्याला उतरती कळा लागली. त्याच्या मागोमाग पुन्हा एकदा पराक्रमी पुरुष निपजला असता तर राजसत्ता पुन्हा सावरली असती. पण त्याच्या नंतर राजपदी आलेला कर्क हा अत्यंत नादान होता. त्याचे दोन मंत्री तर इतके अधम होते की ते म्हणजे दोन कलीचे पायच होत असे लोक म्हणत. अशा स्थितीत राज्य टिकणे अशक्य होते. तैलाने जेव्हा उठाव केला तेव्हा खानदेशचे यादव, मध्यप्रदेशातील चेदी व राष्ट्रकूटांचे इतर अनेक सामंत व मित्र त्याला मिळाले. कारण ते सर्वच कर्काच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळले होते. अशा रीतीने कर्तृत्वशाली राजपुरुषांमुळे वैभवास चढलेले हे घराणे त्यांच्या अभावी ४/५ वर्षात एकदम कोसळून अस्तंगत झाले.

कल्याणीचे चालुक्य
 तैल किंवा तैलप याने ज्या चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्थापित केली ते घराणे बदामीच्या चालुक्य घराण्याशी वारशाच्या नात्याने संबंधित होते असे त्यांच्या लेखावरून दिसते. पण याविषयी संशोधकांना शंका आहे. वैभवाच्या काळी आपल्या घराण्याचे संबंध सूर्यचंद्रांशी आणि मागील काळच्या थोर राजकुलांशी जोडून तथा वंशावळी आपल्या राजकवींकडून तयार करून घेण्याची प्रवृत्ती त्या काळात आणि विशेषतः दहाव्या-अकराव्या शतकात फार होती. या प्रवृत्तीमुळे प्राचीन राजघराण्याच्या वंशावळी शंकास्पद झाल्या आहेत. तैलपाच्या घराण्याची वंशावळही त्याला अपवाद नाही. ते कसेही असले तरी हे कल्याणीचे चालुक्य आपल्याला बदामीच्या चालुक्यांचे वंशज म्हणवीत, एवढे खरे. इ. स. ९७३ ते इ. स. ११५० पर्यंत त्यांचे राज्य टिकले. प्रारंभी राष्ट्रकूटांची मान्यखेट हीच त्यांची राजधानी होती. पुढे ती त्यानी कल्याणीस नेली.
 आता या घराण्याच्या कर्तृत्वाचा इतिहास पाहावयाचा. आतापर्यंत वाकाटक, बदामीचे चालुक्य व राष्ट्रकूट यांचे इतिहास आपण पाहिले. त्यावरून असे ध्यानात येईल की या प्राचीन राजघराण्यांच्या इतिहासांचा एक साचा तयार झाल्यासारखे झाले आहे. पूर्वीचे राजघराणे ऱ्हास पावू लागले म्हणजे त्याच्या सामंतांपैकीच कोणी पराक्रमी पुरुष ती संधी साधून उठाव करतो, इतर सामंतांत भेद करून आपला पक्ष प्रबळ करतो व स्वतंत्र राज्य स्थापतो. त्यानंतर त्या घराण्यात कर्ते पराक्रमी पुरुष निर्माण झाले की माळवा, गुजराथ, आंध्र, कांची, चोल, पांड्य, चेर यांवर अधिसत्ता स्थापावी अशी प्रबळ महत्त्वाकांक्षा त्यांच्या चित्तांत निर्माण होते. आणि मग या प्रदेशातील राजघराण्यांशी त्यांच्या अखंड लढाया चालू होतात. त्यात कधी हार, कधी जीत होऊन ही प्रस्थापित सत्ता, कर्ते पुरुष निपजत राहतात तोपर्यंत टिकून राहते. ती मालिका तुटली की तिचा अस्त होतो.

साचेबंद इतिहास
 हा इतिहास असा साचेबंद झाला याचे कारण मुळात तो तसा होता हे नव्हे. तसा तो केव्हाही असणे शक्य नाही. प्रत्येक राजपुरुषाचे कर्तृत्व सारखे किंवा समरूप असणे केव्हाही संभवत नाही. पण त्या काळचा इतिहास तपशिलाने लिहिला गेला नसल्यामुळे सगळ्या घराण्यांचे आजचे इतिहास असे एकसुरी झाले आहेत. आज नाणी, ताम्रपट, शिलालेख आणि क्वचित समकालीन पंडितांनी लिहिलेल्या राजप्रशस्ती यांच्या साह्याने त्या प्राचीन इतिहासाची संशोधक रचना करीत आहेत, आणि ही साधने सर्व एक ठशाची आहेत. दरबारी कवी व इतर आश्रित यांनी रचलेली ही सर्व काव्ये आहेत. ती यापेक्षा निराळी कशी होणार ? पुष्कळ वेळा चालुक्यांच्या कवीने एक लिहावे, तर त्यांचे शत्रू जे पल्लव त्यांच्या कवीने त्याच घटनेचे वर्णन बरोबर उलट लिहावे, असे झालेले आहे. असे आजही घडते. पण आज त्याचा पडताळा घेण्यास अन्य साधने उपलब्ध आहेत. तशी त्या काळच्या इतिहासाची साधने नाहीत. त्यामुळे सर्व घराण्यांचे इतिहास साचेबंद होऊन बसले आहेत. चिनी, आरबी, किंवा युरोपीय प्रवासी त्या काळी येथे मधून मधून येऊन जात. त्यांनी केलेली वर्णने उपलब्ध झाली तर लगेच या साच्याच्या बाहेरचे काहीतरी दिसू लागते आणि इतिहास जरा जिवंत होतो. एरवी या स्वरूपाचा का होईना इतिहास उपलब्ध झाला यावरच समाधान मानून घ्यावे लागते.
 पूर्वीच्या तीन घराण्यांच्या इतिहासासारखाच कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव ही जी या कालखंडातील राहिलेली दोन घराणी त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यातील विशेष कर्त्या पुरुषांची माहिती देऊन इतर माहितीचा बराच संक्षेप येथे केला आहे.
 तैलप राज्यावर येताच त्याने साम्राज्यविस्तारास प्रारंभ करून चोल, चेदी, गुजराथचे चालुक्य, परमार राजा वाक्पती तथापुंज, यांवर स्वाऱ्या केल्या व त्यांना नमविले. त्याचा मुलगा सत्याश्रय याने पित्याचेच विस्ताराचे धोरण पुढे चालविले. आता दक्षिणेतील कांची येथील पल्लवांची सत्ता नष्ट होऊन तेथे चोल घराणे आरूढ झाले होते. त्यामुळे चालुक्यांच्या चोलांशी पिढ्यान् पिढया लढाया सुरू झाल्या. चालुक्यराज पहिला सोमेश्वर ( इ. स. १०४९-१०६८) हा विशेष पराक्रमी होता. त्याने चोलांचा पराभव करून कांची ही त्यांची राजधानी घेतली (इ. स. १०५२ ). पण पुढे १०६२ साली चोलराजा वीरेंद्रराज यांच्याशी वेंगीच्या चालुक्यांच्या वारशाच्या प्रकरणावरून सोमेश्वरचा पुत्र विक्रमादित्य याची लढाई झाली. तीत विक्रमादित्याचा पराभव झाला.

विक्रमादित्य
 हा विक्रमादित्य विशेष पराक्रमी होता. त्याच्या पित्याने त्याचा वडील भाऊ सोमेश्वर २ रा यास बाजूस सारून त्यालाच युवराज नेमण्याचा विचार केला होता. पण त्याने बंधुप्रेमामुळे ते मान्य केले नाही. पुढे १०६८ साली पिता सोमेश्वर १ ला याने काही रोगाने जर्जर होऊन जलसमाधी घेतली. तेव्हा प्रथम सोमेश्वर २ रा हाच गादीवर आला. पण काही काळानंतर दोघा बंधूंचे सख्य राहिले नाही. त्यामुळे सोमेश्वराने विक्रमाचा काटा काढण्याचे ठरविले; पण विक्रम फार पराक्रमी असल्यामुळे बाजू त्याच्यावरच उलटली. विक्रमाने त्याचा पराभव करून विक्रमादित्य ही पदवी घेऊन राज्यारोहण केले. हा विक्रमादित्य ६ वा हा या चालुक्य कुळातील सर्वश्रेष्ठ नृपती होय. त्याने इ. स. १०७६ ते इ. स. ११२३ पर्यंत म्हणजे पन्नासएकावन्न वर्षे राज्य केले. त्याचा दरबारकवी बिल्हण याने 'विक्रमांकदेवचरित' या आपल्या काव्यात त्याच्या पराक्रमाचे उत्तम वर्णन केले आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील 'मिताक्षरा' ही विख्यात टीका लिहिणारा विज्ञानेश्वर विक्रमाच्या काळी कल्याणीसच रहात होता. त्यानेही विक्रमासारखा राजा कधी झाला नाही, असा त्याचा गौरव केला आहे. याच्या कारकीर्दीत द्वारसमुद्र तथा हळेबीड येथील होयसळ यादव हे वैभवास येत होते. पूर्वीचे शत्रू कांचीचे चोल व हे नये होयसळ यांशी झालेल्या लढायांत विक्रमादित्याचा बराच काळ गेला. पण त्यास दीर्घायुष्य लाभल्यामुळे प्रजारंजनाचीही पुष्कळ कार्ये त्यास करता आली.
 त्याचा पुत्र सोमेश्वर ३ रा ( इ. स. ११२६-३८ ) याच्या कारकीर्दीत युद्धे फारशी झाली नाहीत. स्वस्थता बरीच होती. 'मानसोल्लास ' तथा ' अभिलपितार्थ चिंतामणी' हा राजनीति शास्त्रावरचा जो प्रसिद्ध ग्रंथ तो याच सोमेश्वराचा होय. त्याच्या मागून त्याचा पुत्र जगदेकमल्ल हा गादीवर आला व त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ तैलप ३ रा हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत चालुक्यसत्तेस उतरती कळा लागून इ. स. ११५० च्या सुमारास तिचा अस्त झाला. तैलपाचा सेनापती विज्जल याने त्याला कैद करून स्वतः गादी बळकाविली. विज्जल हा चेदी देशाच्या कलचूरी घराण्यातील होय. हे घराणे चालुक्यांचे मांडलिक होते. विज्जलाच्या या कलचूरी घराण्याचे राज्य जेमतेम २५|३० वर्षे टिकले. इ. स. १९६७ साली विज्जलाचा वध झाला. त्याच्या मागून आलेले सोमेश्वर, मल्लगी हे राजे दुबळे होते. त्यामुळे राज्यात सर्वत्र अस्वस्थता माजू लागली. कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील वारसांनी या वेळी पुन्हा उठाव केला होता. पण त्यांच्यांत कर्तृत्व नव्हते. तेव्हा याच वेळी उदयास येत असलेल्या यादव घराण्यातील भिल्लम या पराक्रमी पुरुषाने कलचूरीचा मुलूख जिंकून इ. स. ११८७ साली देवगिरी येथे आपले स्वतंत्र राज्य स्थापिले.

देवगिरी
 यादवांच्या स्वतःच्या निवेदनाप्रमाणे त्यांचे घराणे मूळचे मथुरेचे. यदू हा त्यांचा मूळपुरुष. श्रीकृष्ण मथुरा सोडून द्वारकेस गेले तेव्हा यांचे पूर्वजही तेथे गेले व तेथून पुढच्या काळात केव्हा तरी ते महाराष्ट्रात आले. अर्थात ऐतिहासिक प्रमाण असे याला काही नाही. आणि इतर घराण्यांप्रमाणेच सम्राटपद प्राप्त झाल्यावर यादवांनी आपली नवी वंशावळ तयार करून घेतली असण्याचा पूर्ण संभव आहे. यादवांची एक शाखा जशी महाराष्ट्रात नाशिकच्या परिसरात आली तशीच एक शाखा कर्नाटकात गेली व तेथे तिने द्वारसमुद्र तथा हळेबीड येथे राज्यस्थापना केली. त्या घराण्यातील राजेही आपल्याला यदूचे वंशज मानीत आणि यादवकुलतिलक, द्वारावती- पुरवराधीश या पदव्या लावीत. होयसळ यादव ते हेच. त्यांचा निर्देश वर आलाच आहे.
 देवगिरीच्या यादवांचा इतिहासाला ज्ञात असा मूळ पुरुष म्हणजे दृढप्रहार हा होय. राष्ट्रकुट अमोघवर्ष १ ला याच्या कारकीर्दीत जी अस्वस्थता माजली होती तिचा फायदा घेऊन याने इ. स. ८६० च्या सुमारास नाशिकजवळ चंद्रादित्यपूर नावाची नगरी बसवून तेथे आपले लहानसे राज्य मांडले. अर्वाचीन चांदोर ते हेच होय. त्याचा मुलगा सेऊणचंद्र याच्यावरूनच त्या परिसराला सेऊणदेश हे नाव पडले. याने राष्ट्रकूटांची सेवा करून त्यांच्याकडून सामंतपद प्राप्त करून घेतले. यानंतर या यादवकुळात धडियप्पा, भिल्लम, राजिग, धाडियश, भिल्लम २ रा, ३रा, ४ था, सेऊणचंद्र २ रा, मल्लुगी असे अनेक सामंत झाले. प्रथम ते राष्ट्रकूटांचे व त्यांचा उच्छेद झाल्यावर कल्याणीच्या चालुक्यांचे सामंत होते. या दोन सम्राट घराण्यांशी तीनचार वेळा त्यांच्या सोयरिकीही झाल्या. त्यांनी साम्राज्यविस्तारासाठी केलेल्या बहुतेक स्वाऱ्यांत यादव सामंत आपल्या सैन्यानिशी उपस्थित असत. बहुतेक वेळी मोठा पराक्रम करून 'विजयभरण'सारख्या पदव्या व 'महामंडलेश्वर' पदासारखी अधिकारपदे त्यांनी मिळविल्याचे शिलालेखात उल्लेख आहेत. यातूनच त्यांच्या आकांक्षा वाढत जाऊन चालुक्यराज्य मोडकळीस येताच त्यांनी आपले स्वतंत्र राज्य ११८७ च्या सुमारास देवगिरी येथे स्थापन केले. होयसळ यादव बल्लाळ याने याच सुमारास द्वारसमुद्र येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. देवगिरी यादवांच्या इतिहासात या होयसळ यादवांशी झालेल्या लढाया हा एक महत्त्वाचा भाग आहे.

सम्राट सिंघण
 भिल्लम पाचवा हा देवगिरी यादवांचा पहिला सम्राट ( ११४७-९१). या घराण्यातील सर्वांत श्रेष्ठ सम्राट सिंघण हा होय (इ. स. १२१०-१२४७ ). त्याच्या आधी भिल्लम व त्याचा पुत्र जैत्रपाल यांनी गुजराथ, माळवा, आणि कोकण हे प्रांत जिंकले होते. होयसळ यादव आणि वरंगळचे काकतीय राजे यांशीही त्यांच्या अनेक झटापटी झाल्या. पण त्यांतून फलनिष्पत्ती काही झाली नाही. जैत्रपालाच्या कारकीर्दीतच मुकुंदराज हा प्रसिद्ध संतकवी होऊन गेला. त्याने आपला 'विवेकसिंधु' हा ग्रंथ जैत्रपालासाठीच लिहिला, असे म्हणतात. या जैत्रपाल तथा जेतुगी याचा मुलगा सिंघण त्याच्या मागून देवगिरीच्या सिंहासनावर इ. स. १२१० साली बसला. यानेच यादवांच्या साम्राज्याचा विस्तार चारी दिशांना केला. प्रारंभीच त्याने होयसळ यादवांवर मोहीम सुरू केली व ती पाच वर्षे चालवून कर्नाटकावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. नंतरच्या दोन वर्षांत त्याने कोल्हापूरच्या शिलाहारांना जिंकून त्यांचे राज्य साम्राज्यात सामील करून टाकले. या वेळचा शिलाहार राजा भोज याचीही होयसळ, काकतीय व यादव यांच्याप्रमाणेच स्वतंत्र राज्याची स्थापना करण्याची आकांक्षा होती. पण सिंघणाच्या पराक्रमामुळे ती सिद्धीस गेली नाही. सिंघणाने नंतर आपला मोर्चा माळवा, गुजराथ आणि लाट (दक्षिण गुजराथ) यांकडे वळविला. सर्वत्र त्याला यशच येत गेले, आणि त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले. काकतीय, होयसळ, चालुक्य (गुजराथ) व परमार (माळवा) हे सर्व त्याच्यापुढे हतप्रभ झाले व त्याला त्यांनी सम्राट म्हणून मान्यता दिली.

दूरदृष्टीचा अभाव
 सिंघणाचे हे विजय भूषणास्पद असले तरी त्यासंबंधी विचार करताना मनात एक शल्य राहते. या वेळी दिल्लीला मुस्लिम सत्ता स्थापन झाली होती व माळवा आणि गुजराथ या प्रदेशांवर मुस्लिमांच्या धाडी सारख्या येत होत्या. त्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य चालुक्य व परमार यांना नव्हते. अशा वेळी सिंघणाने त्यांशी सख्य जोडून एक बलिष्ठ संघ सिद्ध केला असता तर दिल्लीची मुस्लिम सत्ता उखडून टाकणे त्यांना अशक्य नव्हते. पण असा सुविचार, ही दूरदृष्टी भारतीय सत्तांना त्या वेळी तर नाहीच, पण पुढील अनेक शतकांतही प्राप्त झाली नाही. सिंघणाच्या घराण्याला त्याचे परिणाम भोगावे लागलेच. पुढील पाऊणशे वर्षांतच यादव घराणे दिल्लीच्या मुस्लिम सत्तेने नष्ट करून टाकले.

कृष्णछाया
 सिंघणानंतर त्याचा नातू कृष्ण, त्याचा भाऊ महादेव व नंतर कृष्णाचा पुत्र रामचंद्र हे यादवराजे क्रमाने गादीवर आले. त्यांनी अर्थातच गुजराथ, माळवा, होयसळ व काकतीय यांच्याविषयीचे पूर्वापार धोरणच पुढे चालू ठेवले. या सत्तांशी झालेल्या संघर्षात कधी कधी त्यांचा पराजय होई. पण बव्हंशी ते यशस्वीच होत. पण वर सांगितल्याप्रमाणे हिंदुसत्तांचा समग्र ग्रास घेणारी दिल्लीची मुस्लिम सत्ता डोळ्यांसमोर दिसत असताना या यशाचे कौतुक वाटत नाही. माळव्याचा राजा जगत्तुंग यावर कृष्णाने प्रचंड विजय मिळविला हे खरे. पण त्यामुळे जगत्तुंग कमजोर झाला व दिल्लीचा सेनापती बल्बन याने लगोलग स्वारी करून माळव्याची धूळधाण करून टाकली. चहू दिशांना सतत आक्रमण करून साम्राज्यविस्तार करण्याची आकांक्षा मनात बाळगणाऱ्या या यादवराजांच्या, त्या मुस्लिम सत्तेशी मुकाबला करावा, असे कधी मनातही आले नाही. असो. कृष्णानंतर गादीवर आलेला महादेव याने ठाण्याच्या शिलाहारांचा पराभव करून त्यांचे राज्य खालसा केले. कोल्हापूर राज्य सिंघणाने पूर्वीच केले होते. याच वेळी हनगळच्या कदंब राजाने उठाव केला होता. तोही यादव सेनेने मोडून काढला. महादेवाच्या कारकीर्दीत देवगिरीचे वैभव वाढले यात शंका नाही. 'देवगिरी हे त्रिभुवनसौंदर्याचे सारसर्वस्व आहे. तेथील घरे मेरुपर्वताच्या शिखराशी स्पर्धा करतात' असे या नगरीचे वर्णन केलेले आढळते. पण याच वेळी तिच्यावर दिल्लीच्या कृष्णछाया पडू लागल्या होत्या याची कोणाला कल्पनाही नव्हती. ही गोष्ट तत्कालीन राजनीतीला मोठी लांच्छनास्पद अशी वाटते.

खग्रास ग्रहण
 महादेवानंतर त्याचा मुलगा अमणदेव गादीवर आला. वास्तविक कृष्णाचा पुत्र रामदेवराव याचा गादीवर खरा हक्क होता. अमणदेवाचा हक्कही नव्हता आणि त्याच्या अंगी सामर्थ्यही नव्हते. त्यामुळे रामचंद्राने कपटव्यूह रचून त्याचा पाडाव केला व त्याचे डोळे काढून त्यास कैदेत टाकले आणि आपले स्वामित्व प्रस्थापित केले. हा रामचंद्र यादव मोठा कर्ता पुरुष होता. पण वरंगळ व होयसळ यांना पुन्हा पुन्हा नमविण्यातच त्याने आपली सर्व शक्ती खर्च केली. दक्षिणेत अधिराज्य स्थापन केल्यावर तो मोठ्या धाडसाने उत्तरेकडे वळला व भंडारा, जबलपूर हे प्रदेश जिंकून थेट बनारसवर चालून जाऊन त्याने ती पुण्यनगरी जिंकली. हा बनारसचा आघात म्हणजे दिल्लीवरच आघात होता. पण तेथे या वेळी सर्वत्र अंदाधुंदी माजली असल्यामुळे मुस्लिमसत्तेशी रामदेवरावाचा प्रत्यक्ष मुकाबला झाला नाही. हे सर्व विजय रामदेवरावाने १२९२ पर्यंत मिळविले. या वेळी यादवसत्ता खरोखरीच वैभवाच्या शिखरावर होती. पण लवकरच तिला ग्रहण लागले. १२९६ साली अल्लाउद्दिनाने देवगिरीचा पाडाव केला व रामदेवरावाला दिल्लीचा मांडलिक करून टाकले. याआधी पन्नास वर्षे सूफी पंथाचे अनेक अवलिये दक्षिणेत इस्लामचा प्रसार करून हिंदुसत्ता पोखरून टाकण्याचा उद्योग करीत होते. पण त्याची दखल कोणी घेतली नव्हती. हेमाडीसारखे पंडित, राजकारणी, मुत्सद्दी हे देवगिरीची इन्द्राच्या अमरावतीशी तुलना करण्यात व व्रतवैकल्यांच्या याद्या तयार करण्यात गुंतले होते. संतमहंतांना तर याचे कसलेच सोयरसुतक नव्हते, त्यांना फक्त मोक्ष दिसत होता व संसाराची असारता जाणवत होती. सत्तारूढ राजांनाही वर सांगितल्याप्रमाणे कसलीच दृष्टी नव्हती. त्यामुळे १२९६ साली यादवसत्तेला लागलेले हे ग्रहण हळूहळू खग्रास होत गेले व १३१८ साली ती पूर्ण नामशेष झाली. या वीसबावीस वर्षांच्या काळात घसरलेला डाव सावरण्याची, रामदेवराव, त्याचा पुत्र शंकरदेव, जावई हरपाळदेव यांना अनेक वेळा भरपूर संधी मिळाली होती, अवसर मिळाला होता. पण त्यांच्या ठायी ती कुवत नव्हती. आणि दक्षिणेकडच्या इतर सत्ताही अशाच मूढ, अंध व दुबळ्या होत्या.
 डॉ आळतेकर म्हणतात, अल्लाउद्दिनाची दुसरी स्वारी नऊ वर्षांनी झाली. तेवढ्या अवधीत देवगिरी, वरंगळ, द्वारसमुद्र व मदुरा या दक्षिणच्या हिंदुसत्तांनी सावध होऊ नये, याचे आश्रर्य वाटते. त्या सावध तर झाल्या नाहीतच, तर उलट अल्लाउद्दिन उत्तरेकडे वळताच, यादव कमजोर झाले असे पाहून, त्यांनी जुनी वैरे स्मरून त्यांच्या प्रदेशांवर हल्ले चढविले व घेता येईल तितका त्यांचा मुलुख घेतला. गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या बाबतीत यादवांनी हेच केले होते. शमसुद्दिन अल्तमश, बल्वन यांच्या स्वाऱ्यांनी जर्जर झालेल्या त्या प्रदेशावर त्यांनी अशीच धाड घातली होती. तेव्हा इतरांना दोष देण्याचा त्यांना काहीच अधिकार नव्हता (अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, संपादक डॉ. यजदानी, प्र. ५५३ ).

शक्तिक्षय
 याचा अर्थ असा की या काळात हिंदूंची जीवशक्ती क्षीण झाली होती. समाज जगवावयाचा, धर्माचे रक्षण करावयाचे म्हणजे प्रथम त्याचे स्वातंत्र्य टिकविणे अवश्य असते. पण त्यासाठी लागणारे तत्त्वज्ञान, संघटनविद्या, विजिगीषा, राजनीतिनिपुणता, भौतिकविद्या, रणविद्या, यांचा या वेळच्या हिंदुसमाजात संपूर्ण अभाव होता. त्याचा धर्म, त्याची समाजरचना, त्याची राजनीती ही सर्व अंग अधोगामी झाली होती. त्यामुळे त्या समाजाच्या राजसत्तांना मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य मुळीच नव्हते. हा प्रश्न केवळ रणातले शौर्य व लष्कर यांचा नसून सर्व संस्कृतीचा आहे. तत्त्वज्ञान, धर्म, समाजरचना, अर्थशास्त्र, विद्या, कला या संस्कृतीच्या सर्वच अंगांचा स्वातंत्र्याशी घन संबंध असतो. ती अंगे लुळी झाली की स्वातंत्र्य टिकणे अशक्य होते. म्हणून आता आपल्याला त्या अंगांचा, संस्कृतीच्या त्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करावयाचा आहे. सातवाहनांपासून यादवअखेरपर्यंत त्यांच्या स्वरूपात फार मोठे परिवर्तन होत गेले आहे. या दीड हजार वर्षांच्या कालखंडात पहिली जवळजवळ हजार वर्षे जे जीवनाचे तत्त्वज्ञान महाराष्ट्राने स्वीकारले होते ते समाजाच्या जीवशक्तीला पोषक होते. पुढे त्यात अत्यंत अनिष्ट असे सिद्धान्त घुसले आणि येथल्या धर्मशास्त्रज्ञांनी, तत्त्ववेत्त्यांनी, राजनीतिज्ञांनी, राजपुरुषांनी तेच शिरसावंद्य मानले. त्यांचीच अखेर परिणती होऊन महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा नाश कसा झाला हे पाहणे उद्बोधक ठरेल. महाराष्ट्र संस्कृतीचे त्या दृष्टीने आता आपणांस अवलोकन करावयाचे आहे. वैभव, समृद्धी, उत्कर्ष हा कशामुळे होतो आणि ऱ्हास व लोप यांची कारणे कोणती हे शोधण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. सांस्कृतिक इतिहासाचे तेच उद्दिष्ट असते.