महाराष्ट्र संस्कृती/मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब

विकिस्रोत कडून


२९.
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 


कर्तृत्व
 अखिल भारताचे, हिंदुस्थानचे साम्राज्य, प्रत्यक्ष सत्ता चालविणारे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे व ते चालविण्याचे कर्तृत्व मराठ्यांच्या ठायी नव्हते, असे वर मागे अनेक वेळा म्हटले आहे. त्याचा तपशिलवार अर्थ आपण नीट ध्यानात ठेविला पाहिजे. मुख्य: उणीव म्हणजे मराठ्यांच्या राज्यात एकमुखी, निर्णायक, सर्वांना जरबेत ठेवणारी, आज्ञापालन करून घेणारी, न केल्यास मृत्युदंडापर्यंत कडक शिक्षा देऊ शकेल अशी, सार्वभौम सत्ता, शिवछत्रपतींच्या नंतर केव्हाच नव्हती. त्यांच्या नंतरचे छत्रपती हे या दृष्टीने दुबळे, नाकर्ते असे होते. आणि पेशव्यांच्या जवळ ही सत्ता मुळातच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे अभेद्य अशी एकजूट. ती मराठ्यांच्यात केव्हाही नव्हती, हे इतिहासात पावलोपावली दिसून येते. यानंतरचा गुण म्हणजे आपल्या साम्राज्याला अनुकूल आणि विरोधी अशा शक्तींचा पूर्ण अभ्यास, पूर्ण माहिती. इंग्रज, फ्रेंच या शक्ती तर मराठ्यांनी कधी जाणल्या नाहीतच, पण अबदाली, नजीबखान यांनाही त्यांनी कधी पुरे ओळखले नाही. रजपूत, शीख, जाट या शक्ती अनुकूल होत्या. पण त्यांचे वैर मराठ्यांनी संपादून ठेवले. अखिल हिंदुस्थानावर साम्राज्य चालवावयाचे म्हणजे 'हिंदू तितुका मेळवावा' असे ध्येय सतत डोळ्यांपुढे असावयास हवे. पण 'मराठा तितुका मेळवावा' हे सुद्धा मराठ्यांना शक्य झाले नाही; तर त्यापेक्षा अतिशय व्यापक असे जे संघटनतत्त्व ते कसे आचरणात आणणार ? त्यांनी हे व्यापक तत्त्व जाणले होते असेसुद्धा त्यांच्या पत्रांतून कधी दिसत नाही. कर्तृत्वाचे याशिवाय अनेक पैलू असतात. कोणती तरी एक प्रबळ निष्ठा, भौतिक विद्या, शेती, व्यापार यांचे उत्कृष्ट ज्ञान, यांची चर्चा वर केलीच आहे. या सर्व कर्तृत्वाचा हिशेब केला तर मराठ्यांच्या ठायी ते अत्यंत अल्पांशाने होते. जवळ जवळ नव्हतेच, असे म्हटले तरी चालेल. रणांगणातला पराक्रम, वीरश्री, शौर्य, धैर्य हा गुण त्यांच्या ठायी होता. पण सावधता, मुत्सद्देगिरी, शत्रुमित्रांचे सम्यक् ज्ञान, यांच्या अभावी ती वीरश्री सर्व व्यर्थ होते.

निष्कारण
 दत्ताजी शिंदे याचा वध आणि पानपत प्रकरण यांचा विचार करता, ही संकटे मराठ्यांनी निष्कारण आपल्यावर ओढवून घेतली, असेच इतिहासकार सांगतील. नजीबखान हा हरामखोर आहे, घातकी आहे, कपटी आहे, धूर्त आहे, हे दत्ताजी शिंद्याला आधीपासूनच माहीत होते. पेशव्यांनी पत्रांतून हे त्याला लिहिले होते. जनकोजी, नारो शंकर, अंताजीपंत हे त्याला परोपरीने सांगत होते की नजिबाचे पारिपत्य प्रथम केले पाहिजे. पण तरीही दत्ताजी दीर्घ काळ त्याच्यावर विश्वासून राहिला. दुसरी एक विचित्र गोष्ट ! तिच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठीण वाटते; पण इतिहासातच ती नमूद केलेली आहे. २४ डिसेंबर १७५९ रोजी दिल्लीजवळ अबदालीवर चालून जाताना दत्ताजीने बुणगे, सामान यांबरोबरच तोफखानाही मागे ठेवला ! गिलच्यावर चालून जाताना तोफखाना मागे ठेवणे, ही काय कल्पना आहे ? पण याहीपेक्षा एक अजब गोष्ट आहे. १० जानेवारी १७६०- (या लढाईतच दत्ताजीचा वध झाला)- रोजी, साबाजीची फौज नजीबखानाच्या रोहिल्यांशी लढण्यास पुढे झाली तेव्हा, मराठ्यांजवळ बंदुकाही नव्हत्या. फक्त भाले व तलवारी यांनी हत्तीवरचे जंबुरे (फिरता, लहान तोफखाना) असलेल्या रोहिल्यांशी ते लढत होते. या लढाईतले दत्ताजीचे शौर्य हे अपूर्व आहे, अलौकिक आहे. 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे अमर उद्गार या वेळचेच आहेत. पण नजीबखानावर विश्वास ठेवला नसता, आणि तोफा, बंदुका यांनी फौज सुसज्ज ठेविली असती, तर पुन्हा लढण्याची पाळीच आली नसती. इब्राहिम खानाच्या तोफखान्याची पानपत प्रकरणी विशेष तारीफ केली जाते. पण अबदालीच्या हत्तीवरच्या जंबुऱ्यांनी जास्त चांगले काम केले, असे खुद्द सरदेसायांनीच लिहिले आहे. हे जंबुरे मराठ्यांजवळ का नव्हते ? पण बंदुकासुद्धा ठेवण्याचे अवधान ज्यांनी बाळगले नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणावे ?

सेनापती
 जी गोष्ट दत्ताजीची तीच सदाशिवराव भाऊची होती. त्याने एकदोन लढाया जिंकल्या होत्या. पण अबदालीसारखा तो काही खरा सेनापती नव्हता. अबदाली हा नादिरशहाच्या वेळेपासून रणांगणात वावरणारा आणि चौफेर दृष्टी फेकणारा कसलेला सेनापती होता. मराठ्यांच्याकडे तसा एकही माणूस नव्हता. पानपताच्या अपयशाला नैसर्गिक आपत्ती कारणीभूत झाल्या, असे म्हणतात. पण त्यांवर मात करणे मुळीच अवघड नव्हते. निघण्याच्या आधीपासून पुढे वकील पाठवून नाना आणि भाऊ यांनी पंजाबातील शीख आणि राजस्थानातील रजपूत यांच्याशी, मागल्या चुका निस्तरून, हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने, संधान बांधावयास हवे होते. म्हणजे रसदेची अडचण त्यांना भासली नसती आणि रजपुतांच्या आणि मराठ्यांच्या कात्रीत अबदाली सापडला असता. सुजाउद्दौला व इतर मुसलमान यांना वश करून ठेवणे, हे काम नजिबखान व अबदाली यांनी केले होते. मुस्लिम विरुद्ध हिंदू हा रंग पानपताला नजीबाने चढविला होता. या उलट रजपूत व जाट यांना मराठ्यांनी शत्रू करून ठेविले होते. तरी जाटाशी थोडा समझोता झाल्यामुळे, पानपतनंतर पळून जाणाऱ्या हजारो मराठ्यांना जाटांनी आश्रय देऊन, त्यांची दक्षिणेत जाण्याची, लाखो रुपये खर्चूनही, व्यवस्था केली. रजपूत व शीख आधीपासून अनुकूल असते तर अबदाली शिल्लकच राहिला नसता, हे यावरून सहज ध्यानात येईल.
 दुसरी गोष्ट म्हणजे, यमुनेला अकल्पित उतार झाला त्याचा फायदा घेऊन, अंतर्वेदीतून अबदाली दिल्लीजवळ येऊन बसला. त्याचा फायदा घेऊन कुंजपुऱ्याहून परत येऊन भाऊसाहेबांनी त्याच्यावर लगेच चाल केली असती तर त्याचा साफ धुव्वा उडाला असता. कुंजपुऱ्याला अबदालीने साठविलेले दोन लक्ष मण गहू व इतर धन मराठयांना मिळाले होते. ते ताजेतवाने झाले होते. पण तशी चाल न करता पानपतजवळ सव्वा दोन महिने भाऊसाहेब खंदक खणून स्वस्थ बसून राहिला. आणि दाणा नाही म्हणून घोडी मेली, खायला नाही म्हणून शिपाई हतबल झाले, अशा वेळी अबदालीवर चाल केली ! अबदालीला अंतर्वेदीतून रसद मिळत होती आणि अफगाणिस्तानातून त्याने नव्या दमाचे सहा हजार घोडेस्वार आणविले होते. हे बलावल ज्याला कळले नाही, केव्हा चाल करावी हे उमगले नाही, तो कसला सेनापती ! शेवटी विश्वासरावास गोळी लागली व तो मृत्यू पावला. तेव्हा शांत चित्ताने भाऊसाहेबाने माघार घेतली असती, सैन्य पांगू दिले नसते, धनी गेला तरी घाबरू नका, असा लष्कराला धीर दिला असता, तरी संहार झाला नसता. खालून नानासाहेब स्वतः येतच होता. तोपर्यंत लढाईच घ्यायची नाही, हुलकावण्या देत राहायचे, असे सदाशिवरावाने डावपेच लढविले असते तरी पानपतला जय मिळाला असता. पण 'आता नानासाहेबांना तोंड काय दाखवावयाचे !' असा सेनापतीस न शोभणारा विचार त्याने केला आणि महाअनर्थ ओढवून घेतला. लढाई न करता, सेनेचा गोल बांधून, केवळ अबदालीची फळी फोडून पलीकडे जावयाचे, असे आदल्या रात्री ठरले होते, असे म्हणतात ! पण हा डाव सर्व सेनेला समजण्यास अवधीच मिळाला नाही, असे कोणी सांगतात. याचा तरी अर्थ काय ? जे धोरण, जे डाव लढवावयाचे ते अत्यंत काळजीपूर्वक लढवावयास हवे. 'सेनापतीचे कर्तृत्व' यात हा सगळा अर्थ येतो. भाऊसाहेब हा तेजस्वी होता, पराक्रमी होता, स्वाभिमानी होता. पण एवढेच ! सेनापती या पदाला एवढे पुरत नाही. शत्रूच्या बातम्या, त्याची मर्मस्थाने, स्वपक्षाला लोक वळवून घेणे, अत्यंत मोठया आपत्तीतही शांत राहण्याची शक्ती, स्वपर बलाबल जाणण्याची शक्ती इ. अनेक गोष्टी या कर्तृत्वात येतात. मराठ्यांच्या बाजूला असा सेनापती कोणीच नव्हता. दत्ताजीचा बळी गेला, आणि पानपतचा अनर्थ ओढवला, या दोन्ही आपत्ती टाळणे शक्य होते. पण यासाठी फार निराळ्या दर्जाचे कर्तृत्व अवश्य होते.

वंशपरंपरा
 पानपतला मराठ्यांचा पराभव झाला, एक संबंध पिढी कापली गेली आणि मराठी सत्ता एकदम कमजोर झाली. त्याबरोबर चौथाई साम्राज्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हे साम्राज्य विरघळू लागले. दक्षिणेत हैदर आणि निजाम यांनी, मराठ्यांनी चौथाई बसविलेला, म्हणजेच त्यांच्या साम्राज्याचा सर्व भाग, गिळंकृत केला आणि उत्तरेत रजपूत, जाट व रोहिले यांनी पण तेच करण्याची वेळ आणली. या सर्वाना आवर घालावयाचा तर नवीन पेशवा माधवराव, हा एक तर वयाने लहान, सोळा सतरा वर्षाचा आणि त्याच्या घरात भाऊबंदकी माजलेली ! वंशपरंपरा सरंजाम, अधिकार, सत्ता जावयाची, अशी पद्धत असते तो देश उत्कर्षाला जाणे फार अवघड होऊन बसते. कारण बापासारखा मुलगा कर्ता निपजतोच असे नाही आणि भाऊबंदकीमुळे घराणे पार दुबळे होऊन बसते. छत्रपत्रींच्या घरात भाऊबंदकी, आंगऱ्याच्या घरात भाऊबंदकी, नागपूरकर भोसल्यांच्या घरात भाऊबंदकी, गायकवाड, जाधव, सर्वत्र भाऊबंदकी! आणि शेवटी पेशव्यांच्या घरात भाऊबंदकी! आणि ही भांडणे साधीसुधी नाहीत तर प्रत्यक्ष लढाया! यामुळेच शिवछत्रपतींनी वंशपरंपरा पद्धती नष्ट करण्याची योजना आखली होती. पण त्यांच्यानंतर तसा थोर पुरुष पुन्हा निर्माणच झाला नाही आणि वंशपरंपरा पद्धत चालू राहिली. आणि तिच्यामुळे मराठी साम्राज्य अशक्य होऊन बसले.
 पानपतच्या धक्क्याने नानासाहेब मृत्यू पावला, तेव्हा माधवराव पेशवा झाला; पण तो लहान असल्यामुळे सर्व अधिकार चुलता रघुनाथराव याने बळकावला आणि पुतण्याला जवळ जवळ कैदेतच ठेवले. पण माधवरावाच्या ठायी लहान वयातही असामान्य कर्तृत्व असल्यामुळे त्याने लवकरच हाती सत्ता घेतली आणि निजाम, हैदर यांची आक्रमणे मोडून काढून मराठ्यांची साम्राज्यसत्ता पुन्हा प्रस्थापित केली आणि पाचसहा वर्षांनी उत्तरेत फौजा धाडून, रोहिल्यांचा पराभव करून तेथेही पानपतपूर्वीचा सर्व प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. पण माधवराव अतिशय अल्पवयी निघाला, त्याला अठ्ठाविसाव्या वर्षीच मृत्यू आला, आणि नंतर भाऊबंदकी विकोपाला जाऊन नारायण. रावाचा खून झाला आणि पुन्हा मराठी साम्राज्य दक्षिणेत व उत्तरेत शून्यवत झाले.
 पेशवा माधवराव याच्या कर्तबगारीचा आराखडा वर दिला आहे. आता त्याच्या या दहाबारा वर्षांच्या कारकीर्दीतील काही प्रमुख घटना व त्या वेळी दिसून येणारे प्रमुख मराठा सरदारांचे शील व चारित्र्य पाहू, म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्यसत्तेचे व त्यांच्या सामर्थ्याचे स्वरूप काय होते ते ध्यानात येईल.

दादा- बापू
 पानपतच्या पराभवाची व नानासाहेबाच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच निजामाला नवीन हुरूप आला आणि त्याने मराठ्यांच्या मुलखावर चढाई केली. त्याचा प्रतिकार करण्यासाठी राघोबाने मोठी फौज जमविली. पटवर्धन, गायकवाड, विठ्ठल शिवदेव, विसाजी कृष्ण, नारो शंकर, जानोजी भोसले अशा सरदारांची मिळून सत्तर हजार फौज जमा झाली व या सरदारांनी दोनचार लढायांत निजामाला अगदी जेर केला. या वेळी निजामाला साफ बुडवावा, असा यातील बहुतेक सरदारांचा विचार आणि आग्रह होता. आणि ते सहज शक्य होते. पण एवढ्या अवधीत, माधवराव पेशव्याचे तेज, राघोबाच्या पक्षाचा प्रमुख जो सखाराम बापू त्याच्या ध्यानी आले होते. त्याने गुप्तपणे दादाला सल्ला दिला की निजामला साफ नाहीसा करू नये. त्याने पेशवा अगदी निरंकुश होईल. पुढे मागे आपल्यालाच निजामाचे साह्य लागेल. तेव्हा आता त्याशी सलूख करावा! दादाला हा सल्ला तत्काळ पटला. आणि त्याने, सर्व सरदारांचा विरोध असूनही, आपल्या अखत्यारीत, उभयपक्षी कोणी काही न देता आपापल्या स्थळी परत जावे, असा निजामाशी तह केला! पुढे घोडनदीच्या लढाईत (नोव्हेंबर १७६२) माधवरावाचा पराभव झाला. त्या वेळी निजाम दादाच्या साह्यास आला होता. या वेळी तर त्याने उद्गीरच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा जिंकलेला साठ लक्षांचा मुलूख निजामाला परत देऊन टाकला. दादा आणि बापू यांची अशी ही जोडी होती. त्या वेळच्या अनेक पत्रांत, 'सखाराम बापू सर्वनाश करावया निर्माण झाला आहे,' 'तो सर्व दौलत लयास नेईल' असे अनेकांचे उद्गार आढळतात. दादाला तर पेशवाईतील कलिपुरुषच म्हणत असत. हे मराठ्यांचे चारित्र्य!

केवळ जीवदान !
 पुढे राक्षसभुवनची लढाई झाली (ऑगस्ट १७६३) . त्या लढाईत माधवराव पेशव्याची लोकोत्तर कर्तबगारी प्रथम दिसून आली आणि निजामाच्या सैन्याचा संहार होऊन मराठ्यांना फार मोठा विजय मिळाला व गेलेला सर्व मुलूख त्यांना परत मिळाला. हे मराठ्यांचे यश अतिशय उज्ज्वल असे आहे, हे खरे. पण त्याच्या आधीच्या घडामोडी लक्षात घेतल्या म्हणजे माधवरावाच्या पराक्रमामुळे मराठेशाहीला काही काळ मिळालेले हे केवळ जीवदान आहे, हे लक्षात येते.

मराठा सरदार
 मराठे निमाजाच्या मुलखात शिरले होते. पण तसाच निजामही मराठ्यांच्या मुलखात शिरून सर्वत्र जाळपोळ, लूट, विध्वंस, संहार करीत होता. पुण्याच्या आसपासची अनेक गावे त्याने जाळली, पर्वतीच्या मूर्ती फोडल्या, आणि नुसता प्रलय उडवून दिला. या वेळी गोपाळराव पटवर्धन, जानोजी भोसले हे निजामास मिळाले होते ! माधवरावाने त्यांना प्रथम वळविले. मल्हारराव होळकर दक्षिणेत होता. त्याला मदतीला बोलाविले, तेव्हा दहा लक्षांची जहागीर दिली तर येऊ, असे त्याने सांगितले ! द्यावी लागली. चंद्रसेन जाधवाचा मुलगा रामचंद्र जाधव निजामाला फितूर झाला. त्यास वळवून परत आणले. तेव्हा स्वारीत रेंगाळत राहून त्याने मराठ्यांचाच मुलूख लुटला; आणि त्यातही पंढरपूर क्षेत्र लुटून फस्त केले. (त्यानंतर पुन्हा तो निजामाकडे गेला. तेथे फितुरीचा संशय येऊन निजामाने त्यास दगा करून ठार मारले.) माधवरावाचा पराक्रम पाहून रघुनाथरावाने पत्रात त्याची तोंड भरून स्तुती केली. आणि त्याच्यावर सर्व भार सोपवून, आपण क्षेत्री जाऊन स्नानसंध्या करीत राहणार, असे लिहिले. पण अंतरात त्याला अतिशय वैषम्य वाटत होते. सखाराम बापू आणि मंडळी त्यास चिथवीत होती. तेव्हा गृहकलहाच्या नाटकास खरा प्रारंभ येथूनच झाला, असे म्हटले पाहिजे.

हैदराबादचा सांभाळ
 हैदर अल्ली हा निजामासारखाच दक्षिणेतला मराठ्यांचा दुसरा शत्रू. तसाच किंवा त्याहूनही जास्त जबरदस्त. पानपतचे वृत्त ऐकून त्यानेही मराठ्यांच्या राज्यात उच्छाद मांडला आणि १७६३ च्या जूनपर्यंत कृष्णेपर्यंतचा मराठ्यांचा सर्व मुलूख बळकावला. कृष्णेपर्यंत हैदर स्वराज्य करणार, असे मोठे भय निर्माण झाले. पण, राक्षसभुवनवर निजामाचा पुरा बंदोवस्त होईपर्यंत, माधवरावास त्याच्याकडे लक्ष देण्यास फुरसदच झाली नाही. त्या साली तो मोकळा होताच त्याने १७६४ च्या जूनमध्ये हैदरावर पहिली स्वारी केली आणि सावनूर, धारवाड, हावेरी, अनवडी या ठिकाणी प्रचंड संग्राम करून तुंगभद्रेपर्यंतचा मुलूख त्याने सोडविला. आणि जून १७६५ मध्ये तो परत पुण्यास आला. नोव्हेंबर १७६६ ते जून १७६७ पर्यंत दुसरी मोहीम करून तुंगभद्रेच्या दक्षिणेस शिरे, होसकोट, बाळापूर, इ. जुनी स्वराज्यातील ठाणी त्याने काबीज केली. तिसरी स्वारी नोव्हेंबर १७६९ ते १७७० पर्यंत झाली आणि चवथी जून १७७० ते जून १७७२ अशी दोन वर्षे चालली. चौथ्या स्वारीत स्वतः माधवराव नव्हता. त्याची प्रकृती फार बिघडली होती. या शेवटच्या चौथ्या स्वारीत त्रिंबकराव पेठे याने मोमीतलावच्या लढाईत हैदराचा पार धुव्वा केला. त्याचे ४० हजार लोक कापून काढले व तोफा व सामान अगणित लुटले. या वेळी हैदराचा पुरा निःपात करावयाचा असे त्रिंबकराव मामांनी- पेठ्यांनी ठरविले होते. पण माधवराव फारच आजारी झाल्याचे वृत्त आले. हैदराच्या कानी हे वृत्त होतेच. म्हणून तोही घोळ घालीत होता. दादाकडेही त्याचा पेश होताच. (माधवरावाच्या पहिल्या स्वारीत तहाच्या वेळी दादानेच हैदराला संभाळून घेतले होते.) त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळचा सर्व मुलूख ताब्यात देण्याच्या अटीवर तह करून त्रिंबकराव मामा परत आले.

राष्ट्रभावना नाही
 हैदराच्या या स्वाऱ्यांच्या वर्णनाचा समारोप करताना, नानासाहेब सरदेसायांनी काय लिहिले आहे ते सांगतो. त्यावरून मराठ्यांच्या विषयीचे त्यांचे मत कळून येईल. 'पेशवा मरण पावला की मराठ्यांचा जोर खलास झाला हे हैदराने ताडले होते. त्याचे सर्व वकील आप्पाजीराम वगैरे दक्षिणी ब्राह्मणच होते. (निजामाचे प्रमुख कारभारी रामदासपंत आणि विठ्ठल सुंदर हे ब्राह्मणच होते हे आपल्याला माहीतच आहे.) त्याच्या (हैदराच्या) फौजेत सुद्धा ब्राम्हण व मराठे सरदार व लोक पुष्कळ होते. म्हणजे या वेळी सुद्धा, माधवराव पेशव्यासारख्या राष्ट्रासाठी झगडणाऱ्या पुरुषाच्या अमदानीतही अनेक मराठे लोक शत्रुपक्षास सामील होते व वेतने आणि बक्षिसे घेऊन स्वराष्ट्रघात करीत होते. म्हणजे औरंगजेबाने दक्षिणेत मराठ्यांशी युद्ध चालविले त्या वेळचा प्रकार व हा हल्लीचा हैदरच्या वेळचा प्रकार अगदी सारखा होता. मुंबईससुद्धा इंग्रज वगैरे जे प्रतिस्पर्धी कारस्थाने करीत होते त्यास मुख्य प्रोत्साहन ब्राम्हण वगैरे सर्व जातींकडून मिळत होते. म्हणजे मराठ्यांच्या अंगी राष्ट्रीय भावनेचा एवढा अभाव होता. ऐन भरभराटीच्या काळी सुद्धा उत्कृष्ट राष्ट्राभिमान मराठ्यांचे ठिकाणी कधीच व्यक्त झाला नाही.' (मराठी रियासत, मध्य विभाग ४, पृ. ९२)

दौलतीची वाटणी
 केवळ रघुनाथराव दादा याचे प्रकरण पाहिले तरी राष्ट्र, एकसमाज, एकता, संघटना या कल्पनेला मराठे किती पारखे होते ते दिसून येईल. निजाम व हैदर यांना संभाळून ठेवणे हे त्याचे पहिले राष्ट्रद्रोही कृत्य आणि हा सल्ला त्याला सखारामबापू- सारख्या मोठ्या सरदारांनी दिला होता आणि अशा या दादाच्या पक्षाला चिंतो विठ्ठल, आबाजी पुरंदरे, सखाराम हरी, गायकवाड, भोसले, अशी मातबर मंडळी होती. पुढे दादा माधवरावाजवळ दौलतीची वाटणीच मागू लागला. म्हणजे हे राज्य आहे, राष्ट्राची दौलत आहे असा भाव त्याच्या चित्तात मुळीच नव्हता. कुटुंबात ज्याप्रमाणे भावाभावांत जिंदगीच्या मिळकतीच्या वाटण्या होतात, तशीच वाटणी याही दौलतीची व्हावी, अशी दादाची मागणी होती. ती मान्य होईना, तेव्हा त्याने फौजेची जमवाजमव करून, माधवरावाशी लढाई करून वाटणी किंवा पेशवाई मिळवावयाची, असे ठरविले आणि तशी दोनदा लढाई केलीही. घोडपच्या युद्धात त्याचा पराभव झाला, तेव्हा माधवरावाने त्याला पकडून शनिवार- वाड्यातच कैदेत ठेविले. तेथूनही त्याचे फितुरीचे चाळे चालूच होते. पुढे काही समझोता होऊन त्याची कैद कमी झाली तरी त्याचे फितुरीचे व दुहीचे प्रयत्न चालूच होते. आणि माधवरावाच्या मृत्यूनंतर तर त्याने नारायणरावाचा खूनच केला. या प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक घडामोडीत, त्याला अनेक सरदारांचे साह्य होते. त्यावाचून त्याला यातले काही साधलेच नसते. दादाची कृत्ये राष्ट्रद्रोही आहेत, असे सर्व मराठ्यांना वाटत असते, तर त्याला एक पाऊलही टाकता आले नसते. पण त्याचे उपद्व्याप शेवटपर्यंत चालू राहिले. माधवराव पेशवा अत्यंत कर्तबगार होता. पण त्याचे नऊदशांश रक्त दादाच्या प्रकरणांची विल्हेवाट लावण्यात आटून गेले. मराठ्यांत एकजूट असती, दादा प्रारंभापासूनच एकटा पडला असता, तर हे झाले नसते. अशा या सतत दुभंगलेल्या, फितुरीने ग्रासलेल्या, स्थिर निष्ठा कोठेच निर्माण न करू शकणाऱ्या मराठा समाजाला अखिल भारतात साम्राज्यसत्ता स्थापिता आणि रक्षिता येणे कालत्रयी शक्य नव्हते. मराठ्यांच्या अंगी शौर्य धैर्य होते, वीरश्री होती, पराक्रम होता. म्हणूनच त्यांना शंभर वर्षे मोठे विजय मिळत गेले. पण इतकेच. विजयी फौजा त्या-त्या मुलखात असतील तोपर्यंत मराठ्यांची सत्ता तेथे असायची. आणि ती सत्ता चौथाई किंवा खंडण्या वसूल करण्यापुरतीच ! प्रदेशाचे, लोकांच्या जीवितवित्ताचे रक्षण, शांतता व सुव्यवस्था यांचा अम्मल, असले काही मराठ्यांच्या साम्राज्यात नव्हते. ते करण्याइतके कसलेच कर्तृत्व त्यांच्या ठायी नव्हते. १७६९ साली उत्तरेत माधवरावाने फौजा धाडल्या आणि इतिहासकारांनी म्हटल्याप्रमाणे, पानपतच्या कर्तव्याची पूर्तता केली. पूर्तता केली हे खरे आहे. पण या उत्तरहिंद प्रकरणी निराळे काही घडले, असे मात्र नाही. मराठा साम्राज्यसत्तेच्या स्वरूपात त्यामुळे कसलाही फरक पडला नाही किंवा मराठ्यांच्या काही निराळ्या राष्ट्रपोषक, ध्येयवादी वृत्तींचा परिपोष झाला होता, असेही दिसून आले नाही.

उत्तर विजय !
 पानिपतच्या धक्क्यातून मराठे दोनतीन महिन्यांत सावरले आणि आपल्या राज्याची घडी पूर्वीप्रमाणे बसविण्याचा उद्योगही त्यांनी आरंभिला. एकदोन वर्षे नारो शंकर, अंताजी माणकेश्वर, यशवंतराव पवार, शिंदे, होळकर यांची पथके उत्तरेत वावरत होती, म्हणून त्या प्रयत्नाला यशही येऊ लागले. पण दक्षिणेत चुलत्या-पुतण्यांचे द्वैत माजले, तेव्हा मराठी फौजा परत गेल्या आणि फौजा परत जाताच सुजा उद्दौला, जाट व रोहिले यांनी उचल केली व मराठ्यांची सत्ता निखळून टाकली. अंतर्वेदीत इराव्यापासून प्रयागपर्यंत सुजा उद्दौल्याने आपली ठाणी बसविली, सुरजमल जाटानेही बराच प्रदेश आक्रमिला. इराव्यापासून हरद्वारपर्यंत रोहिल्यांनी आपला अंमल बसविला आणि बुंदेलखंडात रजपूत राजांनीही बराच जोर केला. पण असे असूनही निजाम, हैदर आणि रघुनाथराव यांच्या बंदोबस्तात गुंतून पडल्यामुळे माधवरावाला उत्तरेकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही.

इंग्रज
 दिल्लीचा बादशहा अलाहाबादेस सुजा उद्दौल्याच्या आश्रयाने राहिला होता. आणि आपणास दिल्लीस नेऊन मसनदीवर कोण बसवितो या विवंचनेत तो होता. बंगालचा सुभेदार मीर कासीम याचा पाडाव करून इंग्रजांनी बंगाल व बिहार व्यापले होते. मीर कासीम, बादशहा व सुजा यांनी इंग्रजांवर स्वारी केली. पण १७६४ च्या ऑक्टोबरात इंग्रजांनी त्यांचा पूर्ण पराभव करून आणखी चार महिन्यांत, म्हणजे १७६५ च्या फेब्रुवारी महिन्यांत, अलाहाबादचा किल्ला घेतला आणि अलाहाबादपासून कलकत्त्यापर्यंतच्या भूप्रदेशाचे इंग्रज मालक झाले ! त्या सालच्या मे महिन्यात क्लाइव्ह इंग्लंडहून परत आला, तेव्हा एवढा मोठा घास आपणास पचणार नाही, हे ध्यानी घेऊन तो लगेच अलाहाबादेस जाऊन बादशहाला भेटला व नमते घेऊन, त्याने ऑगस्टमध्ये बंगालची दिवाणी त्याच्यापासून मिळविली. त्या वेळी आपणास दिल्लीस नेऊन मसनदीवर बसवावे असा बादशहाने इंग्रजांना आग्रह केला. पण त्यांनी ते मान्य केले नाही. कारण, दिल्लीपर्यंत जाऊन, बादशहाचे रक्षण करण्याइतकी ताकद अजून आपल्यात नाही, हे त्यांनी जाणले होते. पण निश्चित नकार दिला तर बादशहा दुसऱ्यांच्या- मराठ्यांच्या- कच्छपी जाईल ही भीती असल्यामुळे, ते दीर्घकाळपर्यंत गुळमुळीत बोलून टोलवाटोलवी करीत राहिले. केवळ एक लष्करी भरारी मारावी, असे इंग्रजांच्या मनात असते, तर ते कटकेपर्यंत सुद्धा या वेळी गेले असते. पण एवढा प्रदेश आपल्या सत्तेखाली टिकविण्याचे सामर्थ्य आणि कर्तृत्व अजून आपल्याठायी नाही, हे जाणून त्यानी सबुरी केली. आणि जे मिळविले तेथेच आपली सत्ता आणि आपला व्यापार दृढ करण्यावरच त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले.

सरदारांचा उद्योग
 १७६९ च्या उन्हाळ्यात माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर आणि रामचंद्र गणेश कानडे यांस उत्तर हिंदुस्थानात धाडले. बादशहाला दिल्लीला आणून मसनदीवर बसविणे हे त्यांचे पहिले कर्तव्य होते. कारण दिल्लीच्या पातशाहीचे संरक्षण हा बादशहाशी झालेल्या कराराचा मुख्य भाग होता. पण एकदम दिल्लीवर न जाता, जाट, रजपूत यांचा बंदोवस्त करून मग शेवटी ते कर्तव्य साधावे, असे या त्रिवर्गाने ठरविले आणि प्रथम उदेपूर, बुंदीकोटा या प्रदेशांत जाऊन, अनेक वर्षांच्या राहिलेल्या खंडण्या वसूल करून, त्यांनी खर्चाची तरतूद केली. आणि मग प्रथम जाटाचे पारिपत्य करावयाचे ठरविले.
 सुरजमल जाट व नजीबखान रोहिला यांचा दोघांचाही दिल्लीचा कबजा घेण्याचा प्रयत्न होता. पण १७६३ च्या डिसेंबरात सुरजमल्लावर अचानक हल्ला करून नजीबखानाने त्यास ठार मारिले. पण सुरजमल्लाच्या मुलांपैकी मोठा मुलगा जवाहीरसिंग मोठा पराक्रमी होता. त्याने नजीबखानावर स्वाऱ्या करून, अनेक लढायांत त्याचा धुव्वा उडविला आणि आपली सत्ता खूप वाढविली. नर्मदेपर्यंत राज्य करावे, अशी जाटांची महत्त्वाकांक्षा होती. मराठे १७६९ च्या अखेरीस जाटाच्या मुलखात शिरले. त्या वेळी जवाहीर मृत्यू पावला होता. आणि त्याचे भाऊ रणजितसिंग व नवलसिंग त्यांच्यात कलह चालू झाला होता. त्यांतील रणजितसिंगाने मराठ्यांची मदत मागितली. ती देऊन मराठ्यांनी नवलसिंगाचा मोड केला आणि त्या भागात आपली ठाणी वसविली.

मल्हाररावांचे व्रत !
 त्यानंतर रोहिल्यांचे पारिपत्य हे मराठ्यांचे दुसरे काम होते. तेही त्यांनी लगेच अंगावर घेतले असते. पण नजीबखान ! मराठ्यांनी हे नाव चांगले ध्यानात ठेवले पाहिजे. घरामध्ये राघोबा, तसाच शत्रुपक्षात नजीबखान होता. आणि त्याला जसे मराठे सरदार मिळत तसेच यालाही मिळत. जाटांचा पराभव झाल्यावर आता आपली धडगत नाही हे नजीबखानाने ओळखले आणि तुकोजी होळकराशी संधान बांधले; आणि बादशहाला दिल्लीस आणण्यास मी तुम्हांस मदत करतो, असे आश्वासन दिले. मल्हारराव होळकर १७६६ साली मृत्यू पावल्यावर तुकोजी हा होळकरांचा सेनापती झाला होता. त्याने मल्हाररावाचेच व्रत पुढे चालवून नजीबखानास पाठीशी घातले. महादजी शिंदे यास हे मुळीच रुचले नाही आणि मागल्या पिढीचे शिंदे होळकरांचे वैमनस्य पुढे चालू झाले. त्या वेळच्या एका पत्रात याविषयी लिहिलेले आढळते की 'अहंमदखान बंगष चाळीस हजार फौज घेऊन गंगे अलीकडे उतरला आहे. त्याचे व नजीबखानाचे सूत असून, रामचंद्र गणेश, शिंदे व होळकर त्याचे भरी पडले आहेत. नजीबखान महा खेळ्या आहे. या अहंमदखान बंगषाने मराठ्यांचे सोळा परगणे दडपले होते. तेव्हा त्याचा पाडाव करणे मराठ्यांना प्राप्तच होते. त्याच्यांशी झालेल्या लढाईच्या वेळी, दोन नद्यांमध्ये मराठे नजीबखानाच्या कारवाईनेच कोंडले गेले होते. पण तेवढ्यात यमुनेला उतार झाला, मराठे पलीकडे जाऊ शकले आणि बंगषाचा पराभव झाला आणि त्याने मराठ्यांचा सर्व प्रदेश परत दिला.

बादशहा
 यानंतर मराठे मुख्य उद्योगास लागले. बादशहाला परत दिल्लीला आणणे हा त्यांचा मुख्य कार्यक्रम होता. इंग्रज त्याला दिल्लीला पोचवीत नव्हते. पण मराठ्यांचा आश्रय तुम्ही करू नये, ते शेवटी तुमचे राज्य घेतील, अशा अर्थाची पत्रे मात्र ते बादशहाला पाठवीत होते. पण या भूलथपांना आता फसावयाचे नाही, असे ठरवून बादशहा मराठ्यांच्या साह्याने २५ डिसेंबर १७७१ रोजी दिल्लीत आला व त्याने सिंहासनारोहण केले आणि मराठ्यांचा दोन वर्षीचा उद्योग फलद्रूप झाला. माधवरावाने या वेळी पत्र पाठवून यासाठी या सरदारांचा खूप गौरव केला.

पानपतचा सूड
 बादशहाला दिल्लीस पोचविल्यावर लगेच मराठे रोहिलखंडावर चालून गेले. रोहिल्यांचे परिपत्य करणे हे बादशाहालाही अवश्य होते. त्यामुळे स्वारीत तोही बरोबर होता. मध्यंतरी १७७० च्या ऑक्टोबरात नजीबखान मृत्यू पावला होता. आणि त्याचा मुलगा झबेताखान हाच आता त्याच्या जागी आला होता. रोहिल्यांचे पूर्ण निर्दाळण करून पानपतचा सूड उगवावयाचा असा महादजीचा निर्धार होता. आणि या स्वारीत त्याने तो पूर्ण केला. सर्व प्रांत उद्ध्वस्त करून जाळपोळ, लूट, कत्तल, संहार असा मराठ्यांनी तेथे कहर उडवून दिला. पानपतला लुटलेली अपार संपत्ती त्यांना तेथे सापडली. तेव्हापासून कैद करून ठेवलेल्या काही बायकाही सापडल्या. झबेताखान पळून गेला. पण त्याची बायका-मुले मराठ्यांच्या हाती सापडली. नजीबखानाची कबर पलीकडे होती, ती त्यांनी फोडून टाकली आणि पुरेपूर सूड उगवला. त्यांची रोहिल्यांना इतकी दहशत बसली की मराठा स्वार दुरून दिसला तरी ते पळून लपून बसत. अशा रीतीने सर्वत्र पूर्ववत अंमल बसवून मराठी फौजा १७७२ च्या जूनमध्ये छावणी- साठी दिल्लीला आल्या. पानिपतच्या कर्तव्याची पूर्तता झाली !

दुहीचे प्रायश्चित्त
 मराठ्यांचा पराक्रम यात उत्तम दिसून आला. पण याच वेळी मराठ्यांच्यात दुही माजू लागली. नजीबाला पाठीशी घातल्यामुळे होळकर व शिंदे यांचे वाकडे आलेच होते. आता त्याच्या जागी त्याचा मुलगा झावेताखान आला. त्यालाही होळकराने पाठीशी घातले. दिल्लीची मीरबक्षीगिरी झावेताखानाला हवी होती; पण महादजीने ती बादशहाकडून नारायणराव पेशव्याच्या नावे करून घेतली. यामुळे पुन्हा शिंदे व होळकर यांच्यात वाकडे आले. रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांचे तर इतके वाकडे आले की माधवरावाला सांगून विसाजी कृष्णाने रामचंद्र गणेशला पुण्यात परत लावून दिले. झावेतखानाच्या बाबतीत विसाजी कृष्ण होळकराच्या बाजूचा होता. त्याने झावेताखानाला हाताशी धरले. याची महादजीला इतकी चीड आली की दिल्ली सोडून तो जयपुराकडे खंडण्या वसूल करण्यासाठी म्हणून निघून गेला. हे पाहून सुजा उद्दौला, हाफीज रहमत खान व खुद्द बादशहा यांनी उचल केली. बादशहाचा सरदार मिर्झा नजफ खान याने तर होळकर व बिनीवाले यांच्या छावणीवर हल्लाच केला. पण मराठ्यांनी त्याचा पराभव करून दिल्लीला वेढा घातला; तेव्हा घाबरून जाऊन बादशहा पुन्हा शरण आला. पण इतक्यात रोहिल्यांनी मराठ्यांची ठाणी उठवावयास सुरुवात केली. शिवाय सुजाने इंग्रजांचा तोफखाना मदतीस घेऊन रोहिलखंडावर चाल केली (एप्रिल १७७३). त्यावेळी विसाजी कृष्णावर कठीण प्रसंग आला होता. पण तो त्यातून निभावला. मध्यंतरी १७७२ च्या नोव्हेंबरात माधवराव मृत्यू पावला होता. त्यामुळे, दक्षिणेतून काही मदत होईल, ही आशा संपली होती. तेव्हा सर्व परिस्थिती ध्यानात घेता, आता उत्तरेत राहणे धोक्याचे आहे, हे मराठ्यांनी जाणले व होळकर आणि बिनीवाले उत्तरेतून परत आले.

गृहकलह
 त्यांच्यात दुही नसती तर असा प्रसंग आला नसता. किंवा पेशव्यांच्या घरात गृहकलह नसता तरी ही वेळ आली नसती. कारण मग तिकडून नव्या फौजा आल्या असत्या. पण तेथली दुही इतकी की नारायणरावाच्या खुनात तिचे पर्यवसान झाले व राघोबा इंग्रजांकडे गेला. पुढे त्यामुळेच इंग्रज मराठ्यांचे युद्ध जुंपले. त्यामुळे मराठे दक्षिणेत इतके गुंतून पडले की जवळ जवळ दहा वर्षे त्यांना उत्तरेत लक्ष देण्यास सवडच झाली नाही. त्यामुळे माळव्याच्या वर उत्तर हिंदमध्ये मराठ्यांचे एकही ठाणे शिल्लक राहिले नाही ! हे मराठ्यांचे साम्राज्य !
 माधवरावाने आपल्या असामान्य कर्तृत्वाने नवे कर्ते पुरुष निर्माण करून पानपतचे दुर्दैव नष्ट करीत आणले होते. मराठ्यांना पुन्हा पहिला उत्कर्ष, पहिले वैभव दिसू लागले होते. पण त्याच्या अकाली मृत्यूमुळे त्या आशा मावळल्या. आणि पुढे नारायणरावाच्या खुनानंतर, राघोबाने जो राष्ट्रद्रोह सुरू केला त्यामुळे, मराठ्यांना पूर्वस्थिती केव्हाच प्राप्त करून घेता आली नाही. नाना आणि महादजी हे दोन कर्ते पुरुष उदयाला आले, म्हणून पंचवीस वर्षे तरी मराठेशाही कशी तरी तगली. पुढे राघोबाच्या पुत्राने त्याचेच राष्ट्रद्रोहाचे व्रत पुढे चालवून मराठेशाही नष्ट करून टाकली !
 मनात विचार येतो की पेशवा हा काही राज्याचा खरा धनी नव्हे. खरे धनी छत्रपती. पण ते त्याच्याहीपेक्षा दुबळे, नाकर्ते होते. तरीही काय झाले ! शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, पटवर्धन, असे मोठे मोठे सरदार होते ना ? या दोघांनाही बाजूस सारून ते कोणी मराठी राज्याचे धनी का झाले नाहीत ? पण त्यांच्याही अंगी हे सामर्थ्य नव्हते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा हिशेब आहे.

साम्राज्याचे स्वरूप
 माधवराव पेशवा याच्या काळी मराठी साम्राज्याची स्थिती काय होती ते येथवर आपण पाहिले. पहिला बाजीराव पेशवा याच्या काळी साम्राज्य विस्तारास प्रारंभ झाला. तो विस्तार कसा व्हावयाचा आणि त्या साम्राज्याचे स्वरूप काय असावयाचे हे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीहून स्वराज्याच्या व चौथाईच्या सनदा आणल्यानंतर, शाहू छत्रपतींनी व त्यांनी जी सरंजामी व्यवस्था ठरवून दिली, तिच्यावरून आधीच ठरल्यासारखे झाले होते. निरनिराळ्या मराठा सरदारांना त्यांनी भिन्नभिन्न प्रदेश वाटून दिले आणि तेथे स्वतंत्र फौजा ठेवून त्या प्रांतांची चौथाई त्यांनी वसूल करावयाची आणि तेथे बंदोबस्त राखावयाचा, असे ठरवून दिले होते. त्यामुळे या राज्यात एकमुखी सत्ता अस्तित्वात येणे शक्य नाही, हे तेव्हाच ठरून गेले होते. त्यातून स्वतः शाहू छत्रपती स्वारीवर राहात असते, युद्धाचे नेतृत्व करीत असते, तर बरीच विघटना टळली असती. पण त्यांच्या ठायी ते कर्तृत्व नव्हते. अष्टप्रधानांनी आपल्याला वाटून दिलेल्या प्रांतात पेशव्यांप्रमाणे पराक्रम केला असता, तर विघटना टळली नसती, पण साम्राज्याला स्थैर्य जास्त आले असते. कारण त्यामुळे अनेक कर्ते पुरुष, सेनापती, प्रशासक, फडणीस राज्याला लाभले असते. पण तेही दुर्दैवाने झाले नाही. त्यामुळे एकट्या पेशव्यांवर सर्व भार पडला. तोही उचलण्याइतके कर्तृत्व त्यांजपाशी होते. पण इतर प्रधान व सरदार यांनी त्यांचा मत्सर व वैर करण्याचे व्रत पिढ्यान् पिढ्या चालविले. त्यामुळे त्यांच्याही कर्तृत्वाला मर्यादा पडल्या. परकीयांप्रमाणेच त्यांना स्वकीयांशीही लढावे लागले. त्यात त्यांची फार शक्ती खर्च झाली. अशा सर्व परिस्थितीमुळे मराठी साम्राज्याला वर अनेक ठिकाणी सांगितल्याप्रमाणे विचित्र रूप आले. जेथे मराठ्यांची फौज उभी असेल तेथे त्यांची सत्ता ! त्यांची पाठ वळताच पुन्हा पहिली स्थिती ! माधवरावाच्या कारकीर्दीत हेच झाले. निजाम, हैदर आणि उत्तरेकडचे नजीबखान, बंग, सुजाउद्दौला, जाट, रजपूत यांना मराठ्यांनी नमविले, जिंकले. पण तेथे तेथे मिळविलेले विजय अबाधित राखण्याचे सामर्थ्य मराठ्यांत नव्हतेच. कारण हा सर्व भार संभाळण्यासाठी याच्या दसपट शतपट तरी कर्ते पुरुष पाहिजे होते. कर्तृत्व याचा अर्थ वर अनेक ठिकाणी स्पष्ट केला आहे. केवळ रणातला पराक्रम, युद्धातली वीरश्री एवढेच कर्तृत्व नव्हे. साम्राज्य चालविण्यास इतर अनेक प्रकारचे कर्तृत्व आणि दुही, फितुरी, राष्ट्रद्रोह यांचा अभाव, शिस्तपालन हे सर्व अवश्य असते. पण हे गुण मराठ्यांना कधीच जोपासता आले नाहीत. म्हणून त्यांच्या साम्राज्याला स्थैर्य कसे ते आलेच नाही. त्यामुळेच मागल्या प्रकरणाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न मनात येतो. मराठे नर्मदेच्या वर गेलेच नसते तर ?

एक प्रश्न
 निजामाचा पुरा बंदोबस्त करावयाचा सोडून बाजीराव उत्तरेत प्रथम माळव्यात आणि मग दिल्लीवर गेला यासाठी त्याला अनेक इतिहासपंडितांनी दोष दिला आहे. पण मराठे नर्मदेच्या वर मुळीच गेले नसते तर काय झाले असते. याची सविस्तर चिकित्सा कोणी केलेली नाही. ती येथे थोडक्यात करावयाचा विचार आहे.

निर्वेध दक्षिण
 पालखेडला निजामाचा पराभव केल्यानंतर, त्याची पुरी विश्रांती करावी, असा पेशवा बाजीराव याचा विचार होता. पण छत्रपती शाहू याचा त्याला सक्त विरोध होता, हे मागे सांगितलेच आहे. पण मनात असा विचार येतो की भोपाळला १७३८ च्या जानेवारीत निजामाचा पुरा मोड केल्यानंतर, त्याची पूर्ण विश्रांती करण्याचा मनसुबा जर बाजीरावाने केला असता तर त्या वेळी शाहू महाराजांचा विरोध झाला नसता, आणि झाला असता तरी त्याची फारशी परवा करण्याचे त्या वेळी कारण नव्हते. कारण तसा त्यांचा विरोध उत्तरेच्या स्वाऱ्यासंबंधी सुद्धा होता. १७३८ पर्यंत बाजीरावाचे कर्तृत्व पूर्णपणे सिद्ध झाले होते. पण हाही विचार सोडून दिला तरी मागल्या प्रकरणाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे नानासाहेबांची पेशवेपदी १७४३ साली पुन्हा स्थापना झाल्यानंतर तसा उपक्रम करण्यास काहीच हरकत नव्हती. आणि तेव्हाही हरकत होती, असे धरले तरी, शाहूछत्रपतींच्या निधनानंतर १७४९ सालाच्या पुढे, पेशव्यांच्यावर कोणतेच बंधन नव्हते. तेथून पुढे अकरा वर्षे नानासाहेबाने सर्व- सामर्थ्य दक्षिणेतच खर्चून ती पूर्ण निर्वेध करून टाकली असती तर ? तर मराठा साम्राज्याचे रूप बदलले असते काय ?

स्थैर्य
 माझ्या मते सर्व इतिहासच बदलला असता. आणि मराठ्यांचा झाला यापेक्षा दसपट उत्कर्ष झाला असता. पहिली गोष्ट अशी की दरसाल दसऱ्यानंतर, फौज जमा करून चौथाई किंवा खंडण्या वसूल करणे हा उद्योग आणि त्यासाठी होणारा वारेमाप खर्च हा थांबला असता. पेशवे आणि सरदार स्वारीवर जात ते पैसा वसूल करण्यासाठी, पण परत येताना बहुतेक कर्ज करून येत. १७३८ सालानंतर आठदहा वर्षात निजाम आणि अर्काट, सावनूर, बेदनूर इ. ठिकाणचे नवाब यांच्या सत्ता समूळ नाहीशा करून मराठ्यांनी दक्षिण निर्वेध केली असती तर, विजयनगरच्या साम्राज्याप्रमाणे मराठी साम्राज्याला स्थैर्य आले असते आणि स्वारी, लढाई, युद्ध याखेरीज राज्यकारभारातील इतर उद्योगांकडे लक्ष देण्यास मराठ्यांना वेळ मिळाला असता. सर्व प्रदेश निर्वेध करणे हे केवळ महाराष्ट्रापुरते जरी आरंभी केले असते तरी मराठ्यांचा उत्कर्ष झाला असता.

प्रजा स्वास्थ्य
 दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण निर्वेध झाली असती तर प्रजेला काही स्वास्थ्य मिळाले असते. सध्याचा, इंग्रजांच्या आधीचा दोनशे वर्षांचा इतिहास वाचताना, असे ध्यानात येते की हिंदुस्थानभर दरसाल चालणाऱ्या युद्धामुळे प्रजेला, नागरिकांना स्वास्थ्य असे मिळतच नसे. फौजा निघाल्या की त्या वाटेतली गावेच्या गावे लुटून फस्त करीत आणि ज्यावर स्वारी करावयाची असेल तो प्रदेश तर जाळपोळ, विध्वंस, कत्तली यांनी उद्ध्वस्त करून टाकीत. ज्यावर स्वारी एखादे वर्षी झाली नाही असा प्रदेश हिंदुस्थानात एकही नव्हता, असे म्हटले तरी चालेल. पेशव्यांची राजधानी पुणे ही असताना त्या शहरावर सुद्धा अनेक वेळा असा प्रसंग येत असे. मग इतर शहरांची व गावांची आणि खेड्यांची कथा काय ? शत्रूचा प्रदेश फौजा उद्ध्वस्त करीत, एवढेच नव्हे तर स्वतःच्या मुलखात सुद्धा त्यांचा उपद्रव असे. थोरात, गायकवाड, जाधव, राघोबा यांनी आपलाच मुलूख लुटल्याच्या हकीकती इतिहास नित्य देतो. मराठ्यांनी निर्वेध साम्राज्यसत्ता दक्षिणेत स्थापिली असती तर या भयानक आपत्तीतून दक्षिणेतली प्रजा तरी सोडविण्याचे श्रेय त्यांना मिळाले असते, आणि मग त्यांचे साम्राज्य लोकांनी आनंदाने मान्य केले असते.

फक्त मुलूखगिरी
 सत्ताधाऱ्यांना व प्रजेला असे स्वास्थ्य मिळाले असते तर, युद्धाखेरीज राज्यकर्त्यांना काही निराळा उद्योग असतो, हे मराठ्यांच्या ध्यानात आले असते. शेती, व्यापार आणि कारागिरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा, म्हणूनच अंतिमतः सर्व जीवनाचा पाया होय. पण फौजांच्या धामधुमीत पहिला तडाखा बसतो तो यांना ! उभी शेते शिपाई कापून नेत, शेतात घोडे घालीत, गवताच्या गंजी त्यांच्या जनावरासाठी लुटून नेत, लमाणांचे तांडे दिसताच त्यांचे सर्वस्व हरण करीत आणि घरेदारे उद्ध्वस्त करून लाकूडफाटा, घरावरची गवते हे सर्व छावणीसाठी पळवून नेत. अशा स्थितीत कसली शेती आणि कसला व्यापार ! विजयनगरच्या सत्ताधीशांना स्वास्थ्य होते. त्यामुळे त्यांनी कालव्यांचे जाळे करून टाकले होते. मराठ्यांनी एक तरी नवा कालवा किंवा शेतीसाठी नवे धरण बांधले का ? आपल्या देशात अमुक माल नाही, तेव्हा तो पैदा करण्यासाठी कारागिरांना उत्तेजन दिले काय ? द्रव्यसाह्य केले काय ? त्यांना हे करण्याला वेळच नव्हता. कारण मुलुखगिरीवाचून त्यांचा राजकीय प्रपंच भागतच नसे. मग इतर उद्योगांकडे केव्हा लक्ष द्यावयाचे ?
 दक्षिण निर्वेध झाली असती तर इंग्रज आणि फ्रेंच यांचा उदय येथे झालाच नसता. ते व्यापारी म्हणून आले असते. आणि मराठ्यांना स्वास्थ्य असते तर त्यांच्यांशी येथल्या व्यापाऱ्यांची सांगड घालून त्यांना आपल्या सर्व व्यापाराला निराळेच वळण लावणे शक्य झाले असते. आणि मग इंग्रज, फ्रेंच सत्ताधारी म्हणून तर नाहीच, पण व्यापारी म्हणून सुद्धा वरचढ होऊ शकले नसते. मग येथल्या व्यापाऱ्यांना बहुत परदेशी जाण्याची आकांक्षा निर्माण झाली असती ! भारतात ही गोष्ट काही नवीन नव्हती. दहाव्या शतकापर्यंत सर्व जगभर येथले व्यापारी हिंडत असत. त्यानंतर सिंधुबंदी, रोटीबंदी ही बंधने धर्मशास्त्राने आणली आणि आचार्य व संत यांनी ऐहिक प्रपंचाचे विदारण करून टाकले. आणि सर्व लोक निवृत्त झाले ! दीर्घकाळ स्वास्थ्य मिळते, आणि इंग्रज- फ्रेंचांशी परिचय त्या दृष्टीने झाला असता, तर कदाचित ती बंधने तोडून लोक पुन्हा प्रवृत्त झाले असते. पण इतकी लांबची झेप सोडून दिली तरी, येथल्या मुलखात तरी शेती व व्यापार यांची भरभराट होऊन, थोडीशी समृद्धी लोकांना पहावयास मिळाली असती.

उत्तरेचे भय
 उत्तरेकडे लक्ष न देता, दिल्लीवर स्वाऱ्या न करता, मराठ्यांना दक्षिण निर्वेध करता आली असती काय ? असा एक प्रश्न येईल. दिल्लीवर स्वारी करताना, 'मूळच छेदल्यानंतर फांद्या आपोआप खाली येतील,' असे उद्गार थोरल्या बाजीरावाच्या तोंडी घातलेले आहेत. पण 'दिल्लीला मूळच शिल्लक नव्हते,' असे या प्रवादाचे निराकरण करताना, नानासाहेब सरदेसाई यांनी म्हटले आहे, ते अगदी यथार्थ आहे. औरंगजेबानंतर दिल्लीला कर्ता असा बादशहा झालाच नाही. आणि इतर जे कोणी बलाढ्य सरदार होते त्यांची दक्षिणेवर स्वारी करण्याइतकी हिंमत खास नव्हती. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की दक्षिण पूर्ण निर्वेध झाल्यावर मराठ्यांना उत्तरेकडे स्वाऱ्या करणेही फार सुलभ झाले असते. किंवा रजपूत, जाट आणि शीख यांना साह्य करून हिंदुपदपातशाहीचे स्वप्नही खरे करता आले असते. पानपतानंतर अबदाली पंजाबवर दोनतीनदा आला होता. पण १७६७ साली एकट्या शिखांनी त्याचा सडकून पराभव केल्यामुळे तो पुन्हा हिंदुस्थानात आला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, उत्तरेचे काही भय बाळगण्याचे मराठ्यांना कारण होते, असे इतिहासाच्या आधारे, म्हणता येत नाही. म्हणूनच पुनः पुन्हा विचार मनात येतो की आपले मर्यादित कर्तृत्व ध्यानी घेऊन, मराठयांनी आपल्या सर्व शक्ती - शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, यांसह–दक्षिणेवर केंद्रित केली असती, तर साम्राज्यसत्ता, खऱ्या अर्थाने म्हणण्याजोगे साम्राज्य, त्यांना निश्चित स्थापिता आले असते.
 पण तसे त्यांनी केले नाही, एवढेच नव्हे तर त्यांच्या मनात असा काही विचारही कधी आला नाही. खरे म्हणजे राजनीतीचा सर्वांगीण विचार करून मराठ्यांचा कारभार केव्हाच चालला नव्हता. त्यांच्या अंगी काही ऊर्मी होत्या. त्यांचा जोर झाला की ते पराक्रम करीत. पण मानवी भावना, ऊर्मी, मनोवृत्ती यावर समाज, राष्ट्र, देश, काही ध्येयवाद, यांचे संस्कार करून एक नवे संघटित समाजजीवन निर्माण करावयाचे असते, या कल्पना मराठ्यांना कधी स्फुरल्याच नाहीत. तत्कालीन इतर प्रदेश व तेथील भिन्न- भिन्न जमाती यांच्यापेक्षा ते उजवे होते हे खरे. त्यामुळेच त्यांना सर्व हिंदुस्थानभर घोडदौड करता आली. त्याचा एक निश्चित फायदा झाला. अखिल भारतातील मुस्लिम सत्तेची पाळेमुळे त्यांनी खणून काढली. त्यामुळे हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती जगली तरी ! मराठ्यांचे हे पराक्रम झाले नसते तर आणखी चारपाच पाकिस्ताने तरी हिंदुस्थानात झाली असती. एकट्या टिपूनेच लाखो हिंदूंना बाटविले होते. मग सर्व भारतभर मराठे मुस्लिम सत्ता निखळीत फिरत राहिले नसते तर काय झाले असते, हे सहज ध्यानात येईल. हिंदुसंस्कृती जगविणे हे काही लहान कार्य नाही. पण हिंदवी स्वराज्य, हिंदुपदपातशाही, धार्मिक, सामाजिक क्रांती हा शिवछत्रपतींचा ध्येयवाद साधण्याइतके बळ निर्माण करणे आणि अखिल भारत संघटित व स्वतंत्र ठेवणे यामुळे त्या संस्कृतीचे खरे आणि कायमचे रक्षण झाले असते. मग इंग्रजी राज्य येथे झाले नसते आणि पाकिस्तान या कल्पनेचा उदयही झाला नसता. पण राष्ट्रभावना नाही, भौतिकविद्या नाही, विश्वसंचार नाही, व्यापाराची नवी दृष्टी नाही, यामुळे दुही, फूट, फितुरी, यादवी, दारिद्र्य, दिवाळ खोरी, या रोगांनी मराठे कायमचे ग्रस्त होऊन राहिले होते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हा असा हिशेब आहे.
 नारायणरावाच्या खुनानंतर ते कर्तृत्व आणखीन मलिन झाले आणि सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर ते संपूर्णतया नष्ट झाले. या घडामोडीचीच तात्त्विक, राजकीय मीमांसा पुढील एक दोन प्रकरणांत करावयाची आहे.