महाराष्ट्र संस्कृती/खर्डा अखेरचा विजय
Appearance
३०.
खर्डा— अखेरचा विजय
नारायणरावाचे खुनानंतर पेशवाई ही संपल्यातच जमा होते. १७७४ साली सवाई माधवरावाचा जन्म झाला. आणि त्याला पेशवाईची वस्त्रेही मिळाली. पण आपल्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात त्याने स्वतंत्रपणे अधिकार असा केव्हाच चालविला नाही. सर्व सत्ता नाना फडणीसच चालवीत होता. तेव्हा तेथपर्यंत पेशवाई होती या म्हणण्यात काही अर्थ नाही.
तिय्यम सत्ताधारी
नाना फडणिसाच्या हाती सत्ता गेली तेव्हा, राज्यातील सार्वभौम सत्तेच्या दृष्टीने पाहता, तिसऱ्या दर्जाच्या पदी असलेला माणूस सत्ताधारी झाला. पहिला सत्ताधारी म्हणजे छत्रपती. तसा पुरुष शंभू छत्रपतींच्या नंतर मराठ्यांना केव्हाच मिळाला नाही. शाहू महाराजांच्या वेळी पेशवेच खरे सत्ताधारी होते. पण त्यांचे पद दुसऱ्या दर्जाचे होते. त्यामुळे खरी सार्वभौम सत्ता त्यांना कधीच मिळाली नाही. अष्टप्रधान व सरदार सरंजामदार यांना ते कधीच ताब्यात ठेवू शकले नाहीत. राज्याची जबाबदारी सगळी, पण त्यास अवश्य ती सत्ता मात्र हाती नाही, अशी पेशव्यांची स्थिती होती. आणि आता नाना तर त्या पेशव्यांचा एक फडणीस, म्हणजे कारकून ! सरदारही नव्हे. अर्थात त्याचे पद तिसऱ्या दर्जाचे होते. आणि राज्याची जबाबदारी मात्र सगळी त्याच्या शिरावर ! यामुळे मराठी राज्याची फार हानी झाली. एकमुखी निर्णायक सत्ता असणारा सत्ताधारी ज्या राज्याला नाही, त्यातल्या सर्व शक्ती एकसूत्रात कशा चालणार ? आणि त्या राज्याला बळ तरी कोठून यणार ? अशा स्थितीतही नाना फडणिसाने वीस वर्षे मराठी सत्ता टिकवून धरली, ही त्याची फार मोठी कर्तबगारी होय, यात शंका नाही. इंग्रजांशी लढताना, आणि पुढे १७९५ साली निजामाशी लढताना, सर्व मराठा मंडळ- राज्यातले सर्व सरदार- त्याने हुकमत, आर्जव, विनंती अशा निरनिराळ्या मार्गानी एक कार्यवाही केले, आणि दोन्ही लढायांत मराठ्यांना जय मिळवून दिला, हे त्याचे कर्तृत्व इतिहास कधी विसरणार नाही. पण मराठी राज्याचा तो खरा एकमुखी सत्ताधारी धनी असता तर या राज्याचा उत्कर्ष याच्या दसपटीने झाला असता. पण सत्ताश्रेणीत नानाचे स्थान तिय्यम असल्यामुळे, १९७४ च्या पुढे मराठी राज्यात सर्वत्र बजबजपुरी माजली होती, आणि ती नष्ट करण्याची सत्ता त्याच्या हाती नव्हती.
नवा शत्रू
एकीककडे सत्तापदाचा असा ऱ्हास झाला असता, दुसरीकडे मराठी राज्याला नवा शत्रू निर्माण झाला, तो पूर्वीच्या कोणत्याही शत्रूपेक्षा अनेक पटींनी भारी. तो म्हणजे इंग्रज. नवी शस्त्रास्त्रे, नवे सुसज्ज लष्कर, नवी विद्या, नवे विज्ञान आणि अविचल अशी राष्ट्रनिष्ठा या गुणांनी, इंग्रज हा मराठ्यांच्या तुलनेने केव्हाही भारी होता. मराठा सरदाराने एखादा मुलूख जिंकला की तोच त्याचा धनी होई आणि तोही वंशपरंपरेने ! असा प्रकार इंग्रजी राज्यात कधी झाला नाही. वॉरन हेस्टिंग्ज, क्लाइव्ह, कॉर्नवॉलिस यांनी हिंदुस्थानात मोठमोठे प्रदेश जिंकले. पण, त्यांचा मुलगा त्या पदावर आला, असे कधीही झाले नाही. आणि त्यांना स्वतःलासुद्धा त्या मुलखाचा धनीपणा कधी प्राप्त झाला नाही. मुदत संपली की ती सत्ता, ते ऐश्वर्य एका क्षणात सोडून ते स्वदेशी जात व एक सामान्य माणूस म्हणून जगत. याचा अर्थ असा की इंग्रजांचा राज्यकारभार हा संस्थात्मक होता. एक कर्ता माणूस गेला की सर्व संपले, असे इंग्लंडात कधी होत नाही. संस्था कायम असते व ती दुसरा कर्ता पुरुष त्या जागी नेमू शकते. ही व्यवस्था मराठ्यांना कधी निर्माण करता आली नाही. शिवछत्रपतींचा तसा प्रयत्न होता. पण ते जाताच सर्व कारभार पुन्हा पहिल्या चाकोरीतून चालू झाला. राजवंश तसा चालू झाला, इतकेच नव्हे, सर्व सरदारांचे मुलूखही वंशपरंपरेने त्यांच्याकडे राहू लागले. पेशव्यांच्या घराण्यात एकामागे एक चार पुरुष कर्ते निपजले हा दैवयोग होय. पण थोरले माधवराव जाताच मराठमंडळाने एकत्र विचार करून पेशवेपदी महादजी शिंदे किंवा नागपूरकर भोसले, गायकवाड, पवार यांच्यापैकी कोणा तरी कर्त्या पुरुषाला नेमावयास हवे होते. हा विचार या आधीच छत्रपतींच्या बाबतीतही करावयास हवा होता. शाहू महाराजांच्या नंतर, वारशासाठी भोसलेवंशीय माणसाची शोधाशोध चालू झाली. विजयनगरच्या राज्यात एकंदर चार राजवंश झाले. म्हणून तर दोनअडीचशे वर्षे वरचेवर कर्ते पुरुष सत्तापदी येऊ शकले. मराठ्यांनी हेच धोरण ठेवावयास हवे होते. नागपूरचे भोसले यांच्या मनात हा विचार होता. जानोजी भोसले याच्या मनात सातारची गादी घेण्याचा विचार होता. पण ते पद तो निजाम किंवा इंग्रज यांच्या साह्याने मिळविणार होता. याला वर मांडलेल्या विचाराच्या दृष्टीने काहीच अर्थ नव्हता. तात्पर्य असे की दुसरा राजवंश सत्तापदी आणावा इतकीसुद्धा कर्तबगारी मराठ्यांच्या ठायी नव्हती.
संस्था आणि अनुवंश
तेव्हा मराठे व इंग्रज हा सामना प्रारंभापासूनच विषम होता. नवा, गुणकर्तृत्वसंपन्न पुरुष सत्तापदी येण्याची सोयच मराठी राज्यात नव्हती. केवळ पेशव्यांचीच नव्हे, तर भोसले, गायकवाड, आंगरे, पवार, पटवर्धन, पेठे, रास्ते या सर्व सरदारांच्या घराण्यांची पद्धत हीच होती. माणूस गुणी असो वा नसो, तो सत्तापदी यावयाचाच. इंग्रजांच्या संस्थात्मक कारभारात हे कधी घडले नाही. त्यामुळे मराठे व इंग्रज या सामन्याचा निर्णय प्रथमपासूनच ठरलेला होता. नाना आणि महादजी हे दोन कर्ते पुरुष या वेळी मराठ्यांना लाभले, म्हणून वीसपंचवीस वर्षे कशी तरी मराठेशाही टिकली एवढेच !
आता पूर्वीप्रमाणेच या वीसपंचवीस वर्षाच्या काळाचे राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने निरीक्षण करू.
इंग्रजांचा प्रवेश
नारायणरावाच्या खुनानंतर अर्थातच रघुनाथराव दादा पेशवा झाला. सखाराम बापू, नाना व इतर अनेक सरदार यांना दादाविषयी वहीम होता. पण निश्चित पुरावा त्यांच्या हाती नव्हता तोपर्यंत त्यास उघड विरोध करणे शक्य नव्हते. नारायणरावाचे खुनानंतर निजाम, हैदर यांनी पुन्हा उचल केली. तेव्हा त्यांच्या बंदोबस्तासाठी, सप्टेंबर १७७३ रोजी, दादा बाहेर पडला. पण मागे रामशास्त्री यांनी, दादानेच हा खून करविला, असा निश्चित निर्णय दिला; तेव्हा जानेवारी १७७४ मध्ये सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी बारभाईचे कारस्थान रचले आणि उघडपणे गंगाबाईच्या नावाने पुरंदरावरून कारभार आरंभिला. पुढे एप्रिलमध्ये गंगाबाईस पुत्र झाला. त्यामुळे बारभाईला नैतिक पाठबळ मिळाले. आणि मराठे सरदारही त्यांच्या पक्षाचे होऊन, स्वारीतून दादाला सोडून परत येऊ लागले. परत आल्यानंतर नव्या पेशव्याच्या सत्तेच्या दृष्टीने दादाला पकडणे बाराभाईला अवश्यच होते. त्याप्रमाणे हरिपंत फडके, त्रिंबकराव मामा पेठे इ. सरदार त्यांनी दादावर पाठविले. त्यांची कासेगाव येथे लढाई झाली. पण त्यात मामा पेठे मारला गेला. आणि दादा निसटून, हरिपंत त्याच्यामागे असूनही, इंदुरास होळकरांकडे गेला. तेथे महादजी शिंदेही होते. त्या दोघांनीही, पेशव्याला पकडण्याचे अपेश नको म्हणून, त्याला पकडले नाही. आणि सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी कारभारी- नानाबापू- यांनाच बोलवले. पण तापीतीरावर ते पोचण्याच्या आधीच दादा निसटून गुजराथेत गेला आणि सुरतेला इंग्रजांच्या आश्रयास जाऊन राहिला. आणि अशा रीतीने मराठी राज्यात भाऊबंदकी, दुही, फितुरी यामुळे इंग्रजांचा प्रवेश झाला. शिंदे-होळकरांनी दादाला कैद करून त्याचा पक्का बंदोबस्त केला असता, तर हा प्रसंग आला नसता ! ते काही दादाच्या पक्षाचे नव्हते. सवाई माधवरावास त्यांची मान्यता होती. तेव्हा दादास कैद करून पेशव्याचा मार्ग निर्वेध करणे, हे त्यांचे कर्तव्यच होते. पण ते त्यांनी केले नाही. आणि इंग्रजांचा हात मराठेशाहीत शिरला.
सुरत- पुरंदर
दादा-राघोबा - इंग्रजांकडे गेल्यावर प्रथम त्यांनी सुरतेला त्याच्याशी तह केला (मार्च १७७५). इंग्रजांनी दादाच्या मदतीस अडीच हजार फौज द्यावी, त्याबद्दल दादाने इंग्रजांना साष्टी, वसई, त्यांजवळची बेटे कायमची द्यावी, सहा लाख रुपये रोख द्यावे व फौजेच्या खर्चासाठी दरमहा दीड लाख रु. द्यावे, अशा त्यात मुख्य अटी होत्या. कलकत्त्याचा गव्हर्नर हेस्टिंग्ज हा इंग्रजांच्या सर्व ठाण्यांचा प्रमुख होता. त्याने मुंबईकरांचा हा तह नामंजूर केला. मराठ्यांच्या कारभारात हात घालणे कंपनीला धोक्याचे आहे असे त्याचे मत होते. म्हणून सुरतेचा तह रद्द करून त्याने अष्ठन नामा वकील, दुसरा तह करण्यासाठी, पुण्याला पाठविला व त्याने बारभाईचे कारभारी बापू व नाना यांनी दुसरा तह ठरविला. हा पुरंदरचा तह होय (मार्च १७७६). साष्टी इंग्रजांनी घेतलीच आहे. ती त्यांकडेच राहावी, दादासाठी झालेल्या खर्चाबद्दल इंग्रजांना १२ लाख रु. द्यावे, गुजराथेत फत्तेसिंग गायकवाड याने भडोच व इतर पाच लक्षांचे परगणे इंग्रजांना दिले आहेत, ते त्यांच्याकडेच रहावे, आणि दादाने दंगाधोपा, अथवा फितूर न करता नक्त तीन लाखांची नेमणूक घेऊन गंगा- तीरी राहावे, असे या तहाअन्वये ठरले.
नामुष्की
हा तह मराठ्यांना अत्यंत नामुष्कीचा होता. पण याच वेळी हैदराने मराठ्यांचा कृष्णेपर्यंतचा मुलूख आक्रमिला होता. सातपुड्यात दादाने कोळी लोकांस चिथावल्यामुळे त्यांनी दंगा आरंभिला होता, पटवर्धनाच्या घरात फूट पडली होती, शिंदे-होळकर माळव्यात स्वस्थ बसून होते, प्रतिनिधी, कित्तूरचे देसाई यांनी दंगा सुरू केला होता; तोतयाचे बंडास पुन्हा सुरुवात झाली होती, आणि फौजेचे पगार थकले होते. या कारणांमुळे कारभाऱ्यांनी पडते घेऊन, पुरंदरचा तह मान्य केला. पण मौज अशी की मुंबईकरांनी, कलकत्त्याची आज्ञा न मानता, पुरंदरचा तह मान्य करण्याचे साफ नाकारले व दादांचा पक्ष घेण्याविषयी कंपनीकडे विलायतेस अर्ज केला. हा वाटाघाटीचा घोळ पडला असताना हेस्टिंग्जचे मतही बदलले आणि त्याने मराठ्यांशी युद्ध करावे व दादाला पेशवाईवर बसवावे, या विचाराला पाठिंबा दिला.
मोरोबा दादा
पण हे कारस्थान लगेच सिद्धीस गेले नाही. पुण्यावर आपण चालून गेल्यावर मराठा सरदार आपणास वश होतील की नाही, याची मुंबईकर इंग्रजास खात्री नव्हती. त्यामुळे घोळ पडला. मध्यंतरी मोरोबाचे कारस्थान झाले. तेव्हा हा योग येत होता. पण तेव्हाही हे जमले नाही. मोरोबा दादा हा नाना फडणीस याचा चुलत भाऊ. त्यास कारभारात अधिकार हवा होता. पण त्याच्या अंगी लायकी नव्हती. म्हणून नान बापू यांनी तो दिला नाही. तेव्हा त्याने मोठे कारस्थान रचले. हे एक प्रकरण पाहिले तरी, नारायणरावाचे वधानंतर मराठेशाहीला काय रूप आले होते, ते सहज कळते. मॉस्टिन हा पुण्याचा इंग्रजांचा वकील. तो या कटाचा सर्व सूत्रधार होता. त्याने मोरोबास चिथावणी दिली व नानास कैद करून राघोबाला मुंबईहून आणावयाचे, असे कारस्थान रचले. तुकोजी होळकर यास त्याने फितविले, इतकेच नव्हे, तर बापूसही वश करून घेतले. कारण त्यालाही नाना दुःसह होत होता. कोणतेही खूळ निघो, कारस्थान असो, सर्व मराठेशाहीला उभा चिरटा जावयाचा हे कायमचे ठरलेले होते. तसेच आता झाले. या वेळी कोल्हापूरकरांनी बंडाळी चालविली होती, म्हणून महादजी शिंदे तिकडे गुंतला होता. हरिपंत फडके व पटवर्धन कर्नाटकात होते. म्हणून मोरोबाला चांगली संधी मिळाली. नानाला तो कैदच करणार होता. पण बापूंनी मध्यस्थी केली. नानाने पड खाऊन कारभार सोडला व मोरोबा कारभारी झाला. नाना पुरंदरावर राहू लागला. तेथून सावधगिरीने त्याने महादजीस वश करून घेतले. हरिपंत, पटवर्धन यांस परत बोलाविले आणि डाव उलटविला. महादजीने इंदुरात दादा गेला असता त्याचा बंदोबस्त केला नाही हे खरे. पण त्यानंतर तोतयाचे बंड, कोल्हापूरचे प्रकरण व मोरोबाचे प्रकरण यांत त्याने सर्वस्वी नाना फडणिसाचा पक्ष घेतला, म्ह्णून तर पेशावाई वाचली. नाहीतर मॉस्टिनने याच वेळी दादाला पुण्यास आणून पेशवाईची इतिश्री केली असती.
कोल्हापूरहून परत येताच मोरोबास व त्याच्या पक्षाच्या लोकांस महादजीने कैद केले. नानाची कारभारीपदावर स्थापना केली आणि सर्व घडी नीट बसवून दिली. या वेळी त्याने तुकोजी होळकरास समजुतीच्या गोष्टी सांगून नानाच्या पक्षास वळविले, म्हणून रक्तपात टळला.
मराठी सत्तेचे स्वरूप
मोरोबा पदच्युत होऊन तुरुंगात गेला तरी, इंग्रजांचे राघोबाला पुण्यास आणण्याचे प्रयत्न थंडावले नाहीत. हेस्टिंग्ज याने आता उघड उघड पुरंदरचा तह मोडण्याचे ठरविले. त्याला दोन कारणे मुख्य होती. एक म्हणजे, मराठी राज्य समूळ नष्ट करून इंग्रजांना सर्व हिंदुस्थान जिंकता येईल, असे इंग्रजांना आता दिसू लागले. मोठे मोठे मराठे सरदार सहज फोडता येतात, हे त्यांच्या ध्यानी आले. या वेळी नागपूरकर भोसल्यांना हेस्टिंग्जने असेच फोडले होते. आणि दुसरे कारण म्हणजे, पुण्याला नानाने फ्रेंच वकिलास आश्रय दिला, हे होय. फ्रेंचांचा पाय हिंदुस्थानात स्थिर झाला, तर ते इंग्रजी सत्तेला भारी होतील, हैदर, निजाम, मराठे त्यास मिळतील, ही इंग्रजांस भीती होती. त्यामुळे त्वरा करून शिंदे, होळकर, पेशवे व भोसले यांच्या हद्दीतून युक्तियुक्तीने परवाने मिळवून, गॉडर्ड यास मोठी सेना देऊन, हेस्टिंग्ज याने मुंबईकडे पाठविले. मराठ्यांच्या कारभारात किती दुही, फितुरी व ढिलाई होती, हे यावरून ध्यानात येते. तात्यासाहेब केळकर यांनी 'मराठे व इंग्रज' या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात लिहिले आहे की मराठ्यांनी मनात आणले असते तर, इंग्रजांच्या फौजाच काय, पण त्यांचे टपालसुद्धा आपल्या हद्दीतून त्यांनी जाऊ दिले नसते. म्हणजे इंग्रजांचा सगळा व्यवहारच हिंदुस्थानात बंद पडला असता. कारण जलमार्गाने इतकी वाहतूक करणे, त्या वेळी त्यांना शक्य नव्हते. पण मराठे सरदारांनी तसे कधी मनात आणले नाही! आणि इंग्रजांच्या फौजा आपल्या मुलखांतून खुशाल जाऊ दिल्या. या वेळी तर नागपूरकर भोसल्याने गॉडर्डच्या फौजांचे सरहद्दीवर जाऊन स्वागत केले व त्याला सन्मानाने जाऊ दिले. पण ती येऊन मुंबईस पोचण्यापूर्वीच इंग्रज मराठ्यांचे पहिले युद्ध संपले होते.
वडगाव
दादाला घेऊन इंग्रजांची अडीच हजार फौज २५ डिसेंबर १७७८ रोजी खंडाळ्यास पोचली. पण या वेळी मराठ्यांत एकजुट बरी होती. तिने सर्व बाजूंनी इंग्रज फौजेला घेराव घातला व तिचा कोंडमारा केला. तिला अन्नपाणी मिळेना आणि मराठे हल्ल्यावर हल्ले करून त्या फौजेची कत्तल करू लागले. तेव्हा शरण येणे इंग्रजांस भाग पडले. आणि दादाला मराठ्यांच्या स्वाधीन करावयाचे, साष्टी वगैरे बेटे परत करायची आणि गुजराथेत जिंकलेला मुलखही परत करावयाचा, अशा अटी कबूल करून इंग्रजांनी आपली सुटका करून घेतली. या वेळी या सर्व कारभारात महादजी शिंदे प्रमुख होता. त्याच्याशी इंग्रजांनी स्वतंत्र निराळा करार करून, भडोच परगणा त्याला बहाल केला. हे करणे केव्हाही योग्य नव्हते. पण इंग्रजांचा तो डावच होता कारण यामुळे नाना आणि महादजी यांच्यात वितुष्ट येण्यास प्रारंभ झाला. इंग्रज प्रत्येक वेळी निरनिराळ्या मराठा सरदारांशी वेगळा तह करीत. त्यांचे ते बरोबरच होते. कारण त्यांना राज्य जिंकावयाचे होते. पण मराठा सरदार याला कबूल होत, हे मराठ्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने लक्षात घेतले पाहिजे.
तह मोडला
वडगावचा हा तह इंग्रजांना इतका नामुष्कीचा होता की त्यांनी तो कधीही पाळला नाही. इतकेच नव्हे, तर त्याला ते तहसुद्धा म्हणायला तयार झाले नाहीत. 'कन्व्हेन्शन' म्हणत. दादाला मात्र त्यांनी महादजीच्या हवाली केले. आणि त्याला महादजीने फौजफाटा बरोबर देऊन झाशीकडे रवाना केले. पण वाटेतच महादजीचा सरदार हरीबाबाजी यास ठार मारून, त्याची फौज उधळून देऊन, राघोबा इंग्रजांकडे पळाला व तेथे त्यांनी सुरतेस त्यास आश्रय दिला (जून १७७९).
वडगावचा तह मान्य नसल्यामुळे, हेस्टिंग्ज याने मुंबईकरांना, पुणे दरबारशी दुसरा तह करावा, आणि ते पुणेकरांना मान्य नसेल तर पुन्हा युद्ध सुरू करावे, असा हुकूम दिला. गॉडर्ड आपली फौज घेऊन या वेळी सुरतेस पोचला होताच. त्यामुळे मुंबईकरांनी लगेच हालचाली सुरू केल्या.
नानाचा प्रचंड व्यूह
यावेळी इंग्रजांची फसवेगिरी, कपटनीती हे सर्व पाहून, नाना फडणीस याने अखिल हिंदुस्थानभर पसरलेल्या इंग्रजांच्या सर्व ठाण्यांवर हल्ले करून, त्यांचा समूळ नाश करून टाकावा, या हेतूने एक प्रचंड व्यूह रचला. नागपूरकर भोसले यांनी बंगालवर, हैदर याने मद्रासवर, निजामाने पूर्व किनाऱ्यावर आणि मराठ्यांनी पश्चिम किनारा, गुजराथ या प्रदेशांवर एकदम हल्ले चढवून इंग्रजांना नामशेष करावयाचे, अशी ही योजना होती. या योजनेच्या विचारविनिमयास १७७९ च्या दसऱ्यास प्रारंभ झाला आणि १७८० च्या उत्तरार्धात, ती काही अंशी कार्यान्वित झाली. काही अंशी असे म्हणावयाचे कारण असे की या चौकडीपैकी भोसल्यास इंग्रजांनी १६ लाख रुपये लाच देऊन गप्प बसविले आणि निजामाने काहीच केले नाही. नागपूरकर भोसले यास कित्येक वर्षे इंग्रज चौथाई देत नव्हते. त्याने या वेळी चढाई केली असती तर १६ लक्षांपेक्षा किती तरी पट जास्त पैसा त्याला मिळाला असता. पण इंग्रज बहादुरांनी त्याला फितविण्यात यश मिळविले. हिंदुस्थान संपूर्णपणे इंग्रजांच्या हाती शेवटी गेला, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे.
निजाम व भोसले यांची ही स्थिती झाली. हैदरने मात्र आपली कामगिरी चोख बजावली. प्रथम त्याने अर्काटवर हल्ला करून ते घेतले व मग तो थेट मद्रासवर गेला आणि बेली, मनरो या इंग्रज सेनापतींचा पराभव करून त्याने मद्रासचे इंग्रजांचे ठाणे उखडून टाकण्याचा समय आणला. आता राहिले मराठे. त्यांनी काय केले ?
एकभाई
मराठ्यांचा सर्व कारभार या वेळी बारभाईच्या हाती होता. प्रथम सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके, त्रिंबकराव पेठे व परशुरामपंत पटवर्धन हे लोक या बारभाईत होते. आणि प्रारंभी बापूच मुखत्यारीने सर्व कारभार पाहात असे. पण बापू हा नेहमी शत्रूला फितूर असे. माधवराव पेशव्यांच्या अंतकाली त्याची फितुरीची चिठ्ठी पेशव्याने स्वतःच बापूला दाखविली होती. तळेगावच्या स्वारीनंतर, महादजीच्या हाती, इंग्रजांना लिहिलेल्या त्याच्या हातच्या फितुरीच्या चिठ्ठ्या लागल्या. त्यावरून त्यास कैद करून नानाने त्यास रायगडावर ठेवले. तेथे तो ऑगस्ट १७८१ मध्ये मृत्यू पावला. मराठ्यांच्या कारभाराचा प्रमुख पुरुष, म्हणजे एका अर्थी राजाच, शत्रूला फितूर होता ! फत्तेसिंग गायकवाड गॉडर्डास फितूर झाला, भोसले हेस्टिंग्जला! तुकोजी होळकरांचे अंग सगळ्या फितुरीत असेच. यावरून मराठयांच्या राजकीय संस्कृतीची कल्पना येईल.
हरिपंत, पेठे, पटवर्धन हे नानाच्या अगदी हातचे लोक होते. प्रत्यक्ष कारभारात लक्षही घालीत नसत. नाना करतील ते प्रमाण ! याचा अर्थ असा की बारभाईचे रूपांतर एकभाईत झाले. याविषयी आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की मराठ्यांच्या अमदानीत यावाचून दुसरे काही होणे शक्यच नव्हते. कारण व्यवस्था, पद्धत, नियम, कायद्याची शिस्त अशा काही कल्पनाच त्यांच्या मनात नव्हत्या. इंग्रजांचा मुख्य कारभारी वॉरन हेस्टिंग्ज. त्याच्या मदतीला एक कौन्सिल असे. पण त्याविषयी नियम ठरलेले होते. अनेक वेळा हेस्टिंग्ज याने जादा मताच्या अधिकारात निर्णय केलेले आहेत. म्हणजे कौन्सिलर विरुद्ध गेले तर काय करावयाचे, याविषयी नियम होते. शिवाय इंग्लंडमधील कंपनीचे डायरेक्टर हे सर्वाधिकारी होतेच. असे असूनही इंग्रजी कारभारात ढिलाई, अवज्ञा हे होत राही. पण पत्रे इकडची तिकडे पोहोचण्यासच त्या वेळी दोन ते सहा महिने लागत. अशा स्थितीत हा दोष अगदी क्षम्य होय. आणि हे ध्यानात घेतले तर इंग्रज म्हणजे मूर्तिमंत व्यवस्था व मराठे म्हणजे मूर्तिमंत गोंधळ असे दृश्य दिसते. आणि याच्या जोडीला मराठ्यांचा प्रमुख हा शत्रुला फितूर आणि इंग्रजांचा साधा शिपाई प्यादामुद्धा फितूर नाही- पूर्ण एकनिष्ठ; अशा या दोन संस्कृतींचा लढा येथे होता, त्याचा निर्णय काय होणार !
नाना - महादजी
बारभाईत एकटा नाना सर्वाधिकारी झाला. आणि त्याच्या साह्याला महादजी शिंदे होता. या दोघांनी शेवटची वीस पंचवीस वर्षे मराठेशाही जिवंत ठेवली, असे वर म्हटलेच आहे. पण या दोघांची मने कधीच साफ नव्हती. राघोबा हरिबाबाच्या हातून निसटला, तेव्हा नानाला महादजीचा संशय आला होता. वडगावच्या तहाच्या वेळी त्यांचे बिनसल्याचे मागे सांगितलेच आहे. झाशीला राघोबाला नेऊन ठेवण्यात महादजीचा एक हेतू होता. पुण्याच्या कारभाऱ्यांच्या विरुद्ध, आपल्या हाती एक कायम शस्त्र असावे, असा महादजीचा डाव होता, असे महादजीचे चरित्रकार नातू यांनी आणि सरदेसाई यांनी पण म्हटले आहे. महादजीला बारभाईत प्रमुख स्थान हवे होते. नानाला त्याच्या लष्कराची नेहमी भीती वाटे. एकदा तर या दोघांची प्रत्यक्ष लढाई होणार, अशी अफवा पुण्याला उठली होती. तीवरून पुण्याला नानाचे हस्तक हरिपंत आणि जांबगावी महादजीचे हस्तक बक्षी, यांनी फौजही सिद्ध केली होती. पण महादजी व नाना यांच्या स्वप्नातही तसे नव्हते, म्हणून ते प्रकरण शमले; गॉडर्ड याने जानेवारी १७८० च्या सुमारास गुजराथेत मोहीम सुरू केली आणि फत्तेसिंगास फोडून अहमदाबाद घेतले. त्या वेळी, वर सांगितलेल्या चौकडीच्या योजनेप्रमाणे, नानांनी शिंदे होळकरांना गुजराथेत जाण्यास सांगितले, पण दोन महिने ते जागचे हालले नाहीत. हरिपंत नानांच्या जवळ असता कामा नये, अशी महादजीची प्रमुख अट होती. पण कशी तरी दिलजमाई होऊन फेब्रुवारीत ते दोघे गुजराथेत गेले. पण तेथेही इंग्रजांच्या तोफांपुढे आपले काही चालणार नाही, हे पाहून महादजी गनिमी काव्याने लढू लागला. त्यामुळे दिरंगाई होऊ लागली. तेव्हा नानास पुन्हा संशय आला. पुढे महादजी उत्तरेत गेल्यावर तर नाना व महादजीचे अनेक वेळा अगदी पराकाष्ठेचे बिनसले होते. इतके की महादजी दक्षिणेत कवाइती कंपू घेऊन येत आहे अशी वार्ता आली, तेव्हा नानाने हरिपंताला फौज घेऊन पुण्याला बोलावून घेतले होते. इतकी दोघांची मने संशयग्रस्त होती. तरीही दोघांच्याही मनातला विवेक जागा होता. त्यामुळे मराठेशाही तगून राहिली. तोतयाचे प्रकरण, मोरोबाचे प्रकरण, तळेगावची लढाई या सर्व प्रकरणी महादजीने उत्तम कामगिरी बजावली होती. पण पुण्यास सर्व ब्राह्मणशाही आहे, तेथे आपला वरचष्मा असला पाहिजे, असे महादजीस नित्य वाटत असे. पण मराठी व्यवस्थेत ते शक्य नव्हते. शक्यता एकच होती. पेशवे घराणे बाजूला सारून, स्वतः महादजीने लष्करी बळावर, सर्वाधिकार हाती घ्यावयास हवे होते. तो स्वतः छत्रपती झाला असता तरीही डाव सावरला असता, पण त्याच्या मनातच पेशवे वंशाबद्दल अत्यंत निष्ठा होती. त्यामुळे ते शक्य नव्हते. तेव्हा त्या वेळच्या स्थितीत दोघांनी विवेक करून, कलह विकोपाला जाऊ न देता राष्ट्रकार्य केले, हेच कौतुकास्पद झाले, असे म्हटले पाहिजे.
गुजरात महादजीने गनिमी कावा करून गॉडर्डचा सर्व डाव उधळून लावला. तेथे आणखी राहून सर्व बंदोबस्त त्याने केला असता. पण इंग्रजांनी माळव्यात त्याच्याच मुलखावर स्वारी केली. तेव्हा तेथील मोहीम आटपून १७८० जूनमध्ये शिंदे, होळकर माळव्यात निघून गेले.
सालवाई
गुजराथप्रमाणेच पुण्यावर स्वारी करून, दादाला पुण्यास न्यावयाचे असे ठरवून, हाइले या सेनापतीला मुंबईकरांनी तिकडे पाठविले व मागोमाग त्याच्या मदतीला गॉडर्ड यासही पाठविले. पण फडके, पटवर्धन, कानडे यांनी या वेळी पराक्रमाची शर्थ करून इंग्रजी फौजांचा अगदी संहार केला. त्यामुळे गॉडर्डास रणातून पळून जावे लागले. तिकडे माळव्यात महादजीने कारमॅक, म्यूर या इंग्रज सेनापतींना चांगले तोंड दिले. मद्रासकडे हैदरने उच्छाद चालविला होताच. तेव्हा, हे सर्व प्रकरण अंगलट येणार असे पाहून, हेस्टिंग्ज याने तहाचे बोलणे महादजीशी सुरू केले. या तहालाच सालबाईचा तह म्हणतात (१७ मे १७८२). हा तह एकट्या महादजीशी झाला. कारण त्या वेळी तो माळव्यात होता. पण नानाने इंग्रजांविरुद्ध चौकडी उभी केली असल्यामुळे, त्याने तहावर लगेच सही केली नाही. पण १७८२ च्या अखेरीस हैदर मृत्यू पावल्यानंतर नानाने त्यावर सही केली. राघोबास मराठ्यांच्या ताब्यात द्यावे व फत्तेसिंग गायकवाडांचा इंग्रजांनी जिंकलेला मुलूख परत द्यावा, एवढ्या दोनच अटी या तहात मराठ्यांच्या फायद्याच्या होत्या. बाकी सर्व नुकसानच होते. साष्टी वगैरे बेटे इंग्रजांकडेच राहावयची होती. फत्तेसिंगाची मागली खंडणी मागावयाची नव्हती, इंग्रजांखेरीज इतर युरोपीय टोपीकरांस मराठ्यांनी आश्रय द्यावयाचा नाही असे कलम होते; असे सर्व नुकसानच होते. पण मराठ्यांतील दुही, फितुरी, नाना महादाजींचे वैमनस्य हे पाहता, झाले हेच पुष्कळ झाले, असे म्हणावे लागते. हेस्टिंजच्या भूलथापास न फसता बंगालवर चालून गेले असते तर त्यांनी सर्व बंगाल उद्ध्वस्त करून टाकला असता असे ग्रँट डफ यानेच म्हटले आहे. तसे झाले असते तर इंग्रजी राज्याचा पायाच निखळला असता. पण हे शक्य नव्हते. भोसले फितला नसता तर दुसरा कोणी फितला असता. पुढे हेच होत गेले, म्हणून तर राज्य बुडाले. 'हिंदुस्थान इंग्रजांनी घेतला नसता तर फ्रेंचांनी घेतला असता,' असे खरे शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यातील भावार्थ हाच आहे. राष्ट्रभावनेच्या अभावी, येथे नाही तेथे, तेथे नाही तर आणखी कोठे, फूट, फितुरी ही अटळच होती. आणि तीमुळे येणारा राज्यनाश हाही अटळ होता. सालबाईचा तह ही केवळ त्याची नांदी होती.
सालबाईचा तह १७८२ साली झाला. त्यानंतर १७९५ पर्यंतच्या तीन महत्त्वाच्या घटनांचे विवेचन करून हा लेख संपवायचा आहे. त्या तीन घटना म्हणजे महादजीचे उत्तरेतील कार्य, टिपूवरील स्वाऱ्या आणि निजामाशी झालेली खर्ड्याची लढाई या होत.
महादजी
प्रथम महादजीच्या कार्याचा विचार करू. महादजी शिंदे हा अत्यंत शूर, धैर्यशील, पराक्रमी, कर्तृत्ववान, मुत्सद्दी, धोरणी असा होता, याविषयी सर्व इतिहास पंडितांचे एकमत आहे. त्याची स्वामीनिष्ठा अटळ होती. आणि नाना फडणिसाशी त्याचे वैमनस्य होते तरी, त्याने ते विकोपाला नेऊन, राज्याचा घात कधी केला नाही. महादजी असा अनेक गुणांनी संपन्न होता यात वाद नाही. पण येथे मराठयांचा उत्कर्ष आणि हिंदुपदपातशाही या दृष्टीने आपल्याला त्याच्या कार्याचा विचार करावयाचा आहे.
दिल्लीचा बादशहा ताब्यात घेणे, त्याचे संरक्षण करणे हे मराठ्यांचे फार मोठे ध्येय होते. त्याचे मुखत्यार होऊन सर्व हिंदुस्थान ताब्यात आणावयाचा, असा त्यांचा मनोदय होता. त्यामुळेच महादजीने गोइद, ग्वाल्हेर ही प्रारंभीची प्रकरणे आटपताच प्रथम ते कार्य साधले आणि १७८४ च्या अखेरीस बादशहाकडून सर्वाधिकार प्राप्त करून घेतले. 'वकील इ मुतलकी' असे या अधिकारापदाचे नाव आहे.
दिल्लीचा बादशहा
'ज्याच्या ताब्यात दिल्लीचा बादशहा त्याच्या ताब्यात सर्व हिंदुस्थान' असा या विचारसरणीमागे सिद्धान्त होता. मराठयांना त्यावेळी तसे वाटत होते आणि आजही बहुतेक सर्व इतिहास पंडितांनी तसेच म्हणून थोरला माधवराव पेशवा आणि महादजी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पण प्रत्यक्ष इतिहास पाहिला म्हणजे याविषयी शंका येऊ लागतात. इ. स. १७७१ च्या अखेरीस मराठयांनी अलाहबादेहून बादशहास आणून दिल्लीच्या सिंहासनावर बसविले. त्यानंतर दीर्घकाळ तर राहोच, पण क्षणभर तरी सर्व हिंदुस्थान मराठ्यांच्या ताब्यात आला काय ? महादजीच्या कार्याबद्दल हाच प्रश्न आहे. १७८४ साली पुन्हा त्याने बादशहास ताब्यात घेतले. त्याला बादशहाने सर्वाधिकार दिले. पण मराठ्यांची सत्ता त्यामुळे तसूभर तरी वाढली काय ? पंजाब शिखांनी व्यापला होता. लढाई केल्याखेरीज रजपूत एक पैसा देत नसत. मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे इंग्रजी वर्चस्व अबाधित होते. बंगाल तर त्यांनी आधीच गिळला होता. चौथाई म्हणून ते भोसल्यांना एक पैही देत नसत. इंग्रज स्वतः तर प्रदेश व्यापून होतेच. पण त्यांच्या दोस्ताकडेही नजर वळविण्याची कोणाला हिम्मत नव्हती. लखनौचा नवाब असफउद्दौला याच्यावर स्वारी करण्याचा महादजीचा विचार होता, पण कॉर्नवॉलिसने महादजीस कळविले की तो आमचा दोस्त आहे. त्याच्या वाटेस तुम्ही गेला तर आम्हांला मध्ये पडावे लागेल. तेव्हा महादजीस गप्प बसावे लागले. दक्षिणेत म्हैसूरभोवतालचा प्रदेश टिपू बळकावून बसला होता. त्याला नरम करण्यासाठी मराठ्यांना इंग्रजांची मदत घ्यावी लागली. त्या वेळी महादजी दक्षिणेत असता तर ही वेळ आली नसती. सिंध वगैरे प्रांत मुस्लिमांचेच होते आणि ते बादशहाला मुळीच जुमानीत नसत. अशा स्थितीत, 'ज्याच्या हाती बादशहा त्याच्या ताब्यात हिंदुस्थान,' या म्हणण्याला काही अर्थ राहात नाही. आणि त्याला अर्थ नव्हताच. कारण बादशहाच्या ताब्यात काही नव्हते आणि तो किंवा त्याचे १५-२० मुलगे यांच्या अंगी कसलेही कर्तृत्व नव्हते.
हिंदुपदपातशाही
अशा स्थितीत बादशहाला ताब्यात घेण्याचा हव्यास महादजीने सर्वस्वी सोडून देणे हेच योग्य होते. तो सोडून रजपूत, जाट व शीख, यांच्याशी शक्य त्या मार्गानी संधान बांधणे, त्यांशी सख्य करणे हा मार्ग जर मराठ्यांनी अवलंबिला असता, तर हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने, चांगली प्रगती झाली असती आणि मग बादशहाही ताब्यात आला असता. पण प्रथम त्याला ताब्यात घेऊन त्याचा मुख्यत्यार म्हणून महादजी उभा राहिला; यामुळे रजपुतांशी मराठ्यांचे हाडवैर निर्माण झाले. कारण बादशहाच्या वतीने आणि मराठ्यांच्या वतीने अशी दुहेरी खंडणी महादजी मागू लागला !
महादजी १७८० साली उत्तरेत गेला. आणि १७९२ साली दक्षिणेत परत आला. या दहाबारा वर्षातली पाचसहा वर्षे त्याची रजपुतांशी लढण्यातच गेली ! हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत विपरीत दिसते. या रजपूत प्रकरणाचा प्रारंभ झाला तो तर अगदी अश्लाघ्य कारणाने मराठा सरदारांना पैसा कधी पुरत नसे. पैशाची ओढ, कर्ज हे त्यांचे कायमचे लक्षण होऊन बसले होते. महादजी त्याला अपवाद नव्हता. १७८४ साली जयपूरचा राजा अल्पवयी होता. त्याचा चुलता प्रतापसिंह कारभार पाहात असे. यात आक्षेपार्ह काही नव्हते. आणि असले तरी महादजीला त्यात लक्ष चालण्याचे कराण नव्हते. पण अलवारचा राजा त्याचा दोस्त. त्याला जयपूरवर वर्चस्व हवे होते. म्हणून त्या अल्पवयी मुलाच्या बाजूने भला मोठा पैका त्याने महादजीला देऊ केला. आणि महादजी त्यात उतरला. सरदेसाई म्हणतात हे जयपूर प्रकरण महादजीने केवळ द्रव्यलोभाने हाती घेतले आणि तेच अंती त्याच्या अंगावर आले.
रजपूत
यातच १७८६ साली राघवगड प्रकरण उपस्थित झाले. या भागास खेची वाडा म्हणतात. तेथे बलभद्रसिंग हा पृथ्वीराज चव्हाणांच्या वंशातला पुरुष राजा होता. हा बलभद्रसिंग एकदा इंग्रजांना मिळाला होता. म्हणून त्याचा पाडाव करण्याचे महादजीने ठरविले. आणि राघवगड किल्ला घेऊन राजास व राजपुत्रास कैदेत ठेवले. पण हे जुने घराणे. त्याचा हा अपमान ! त्यामुळे बाहेरचे रजपूत फार खवळले. त्यांचा बंडावा शमविण्यास महादजीस आपले सर्व सामर्थ्य एक वर्ष खर्ची बालावे लागले आणि प्राप्ती पैचीही झाली नाही.
लालसोट
पुढे जयपूरच्या खंडणीचा प्रश्न निघाला. महादजीने त्यावर साडेतीन कोटीची बाकी काढली. शिवाय त्या गादीवर मूळचा अल्पवयी राजा मानसिंग यास बसविण्याचा प्रश्न होताच. जयपूरच्या वकिलाने कळविले की साडेतीन कोटी दगडसुद्धा आमच्याजवळ नाहीत. तेव्हा युद्ध अटळ झाले. या वेळी जोधपूरचा वीजेसिंग व इतर रजपूत एकदम उठले. आणि लालसोट येथे पानपतसारखा घनघोर संग्राम होऊन महादजीस पळ काढावा लागला आणि पैची प्राप्ती न होता खर्च मात्र सगळा अंगावर आला.
फल काय ?
या वेळी रजपूत पुण्याला व महादजीला विनवीत होते की 'जयपूर व जोधपूर ही दोन्ही राज्ये हिंदूंची आहेत. तुम्ही हिंदू आहांत. आम्ही हेच इच्छितो की हिंदूचे राज्य व्हावे आणि आमचे रक्षण व्हावे. त्यास तुम्ही आम्हांस राज्यभ्रष्ट करता हे ठीक नाही.' पण महादजीने हे मानले नाही व खंडणीसाठी सर्व जयपूर प्रदेश लुटून फस्त केला. यानंतर १७९० साली पुन्हा त्याने रजपुतांवर शस्त्र उगारले आणि पाटण व भेडता येथील लढायांत रजपुतांचा निःपात केला. चितोड, उदेपूर ही त्याने अशीच जिंकली. या सर्व प्रकरणांतून रजपूत हे मराठ्यांचे हाडवैरी झाले. दक्षिणी दिसला की ते त्याचे नाककान कापून हाकलून देत. एकदा तर महादजी फार आजारी असताना त्याला बरे वाटू नये म्हणून त्यांने ब्राह्मण अनुष्ठाने बसवली होती. इतके करून या सर्वांचे फलित काय ? यामुळे मराठ्यांचा उत्कर्ष साधला काय ? हिंदुपदपातशाही हे शिवछत्रपतींचे ध्येय. ते अणुमात्र तरी साध्य झाले काय ?
सर्व हिंदुस्थान विरुद्ध
महादजी फार विवेकी, समंजस म्हणून सरदेसाई यांनी त्याचा गौरव केला आहे, तो अगदी खरा आहे. तुकोजी होळकर, फत्तेसिंग गायकवाड, भोसले, अलीबहाद्दर हे फितूर झाले, जागोजागी त्यांनी महादजीच्या वाटेत काटे पसरले. तरी, त्यावर विजय मिळविल्यावरही, महादजीने त्यांना सौम्यपणेच वागविले. हाच सौम्यपणा त्याने रजपूत, शीख व जाट यांशी दाखवून त्यांची उत्तरेत एक मोठी फळी उभारली असती, तर हिंदुपदपातशाहीचे ध्येय कितीतरी जवळ आले असते. पण ते धोरण न ठेवल्यामुळे झाले काय ? सर्व उत्तर हिंदुस्थान महादजी विरुद्ध उभा राहिला. स्वतः महादजीच्या अनेक पत्रांत असा उल्लेख आहे. एवढा मोठा विरोध सोसण्याचे, तो मारून काढण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते काय ? मराठ्यांच्या ठायी तरी होते काय ? टिपूवरची बदामीची स्वारी आटपल्यावर नानाने महादजीच्या मदतीसाठी मस्तानीचा नातू अलीबहादूर व तुकोजी होळकर यांना उत्तरेत पाठविले. महिना दीड महिन्यांत ते दिल्लीस पोचावयास हवे होते. पण ते रमतगमत गेले आणि सव्वा वर्षाने पोचले. आणि तेथे गेल्यावर महादजीच्याच विरुद्ध कारस्थाने करू लागले. स्वतः नानाचे मन महादजीविषयी शुद्ध होते असेही नाही. एकदा उत्तरेची जबाबदारी महादजीवर सोपविल्यावर ती सर्वस्वी त्याच्या ताब्यात त्याने द्यावयास हवी होती. पण तसे त्याने कधीच केले नाही. रजपूत राजांकडे त्याचे स्वतंत्र वकील असत. आणि तुकोजी व अलीबहाद्दर यांना तो अनेक वेळा महादजीविरुद्ध चिथावीत असे.
मुस्लिम नबाब
महादजीने बादशहाला आश्रय दिला, त्याला पुन्हा स्थानापन्न केले, म्हणून मुसलमानांना आनंद झाला, असे कोणास वाटेल. पण घडले ते अगदी उलट. बादशहा सर्वस्वी महादजीच्या तंत्राने चालतो, हे एकाही मुसलमान सरदारास पसंत नव्हते. ते सर्व महादजीला पाण्यात पाहात असत. कारण त्यांच्या हातातली सर्व सत्ता एका मराठ्याने घेतली होती ! मुस्लिम पातशाही बुडाली, सर्वत्र काफराचे राज्य झाले, अशी वैराची भावनाच त्यांच्या ठायी धुमसत होती. म्हणून हमदानी, इस्माइलबेग, नफजकुलीखान यांच्याशीही महादजीला सारखे लढावे लागले. स्वतः बादशहा तरी कोठे संतुष्ट होता ? तोही महादजीविरुद्ध कारस्थाने रचीत असे आणि शेवटी गुलाम कादर या नजीबखान रोहिल्याचे नातवाने, बादशहा शहा अलम याची जी विटंबना केली तीपासून महादजीला बादशहाला वाचविता आले नाहीच. गुलाम कादराने राजवाडा खणती लावून लुटला, जनानखान्यातील स्त्रियांची वाटेल ती विटंबना केली आणि बादशहाचे डोळे काढले. शेवटी महादजीने त्याला पकडून ठार मारले हे खरे. पण हे काही बादशहाचे संरक्षण नव्हे. त्याची विटंबना झाली ती झालीच.
सर्वाधिकारप्राप्ती झाल्यानंतर महादजीने आणखी एक उद्योग सुरू केला. मोगल बादशहाचेसुद्धा जुने ऐतखाऊ सरंजामदार होते. ते बादशाहीच्या संरक्षणाचा काही उद्योग करीत नसत. अशांचे सरंजाम जप्त करण्याचे महादजीने ठरविले त्याबरोबर एखादी भुतावळ उठावी तसे झाले. हा उद्योग खरे पाहता स्तुत्य होता. पण एवढे सामर्थ्य महादजीच्या ठायी होते काय ? रजपूत विरुद्ध, शीख, जाट विरुद्ध, हे मुसलमान सरदार उठले, आणि पूर्वेकडे इंग्रजांचा वचक, अशा रीतीने सर्व हिंदुस्थान महादजीच्या विरुद्ध होता. त्याच्याच अनेक पत्रांत तसा उल्लेख आहे. एवढ्यांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, केवळ महादजींच्याच नव्हे, तर सर्व मराठेशाहीच्या ठायी नव्हते.
याऐवजी
तेव्हा हा उद्योग करण्याऐवजी, रजपूत, शीख, जाट, यांची एक बलशाली फळी उभी करण्याचा उद्योग जर महादजीने केला असता, तर सर्व इतिहासच बदलला असता. बादशहा ताब्यात आलाच असता, पण पूर्वेकडे घुसून बंगाल, बिहार, ओरिसा हा इंग्रजांनी बळकावलेला मुलखही सोडविता आला असता. दक्षिणेत असा उद्योग करावा, असे नाना फडणिसाला स्वतः महादजीनेच लिहिले होते. टिपूवर इंग्रज, निजाम व मराठे यांनी स्वारी केली व त्याला नरम केले. इंग्रजांचे साह्य घेतले हे महादजीला आवडले नाही. टिपूचे साह्य घेऊन इंग्रजांविरुद्ध फळी उभारली पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. या टिपूने नरगुंदकर भावे, किमूरकर देसाई यांचा निःपात करून त्यांच्या स्त्रिया आपल्या जनानखान्यात घातल्या होत्या. जवळजवळ एक लक्ष हिंदूंना बाटविले होते. अशा टिपूशीही सख्य करावे, असा महादजीचा नानाला आग्रह होता. कारण इंग्रज हाच खरा शत्रू, असे त्याचे मत होते. याच न्यायाने रजपूत, शीख, जाट, यांशी त्याने सख्य करावयास हवे होते. म्हणजे इंग्रजांना त्याला सहज उखडून काढता आले असते. त्याऐवजी वरील जमातींशीच तो लढत बसला. मुस्लिम सरदार, रोहिले हे तर शत्रू होतेच. यामुळे झाले काय की मराठी साम्राज्यात नव्या मुलखाची, प्रदेशाची काहीच भर पडली नाही की मराठ्यांना धनाची प्राप्ती झाली नाही. पैसा पाठवा, पैसा पाठवा, अशी मागणी महादजीच्या प्रत्येक पत्रात आहे. कारण रजपूत, मुस्लिम हे कोणी खंडण्या देत नव्हते. महादजीचा सर्व उद्योग आतबट्ट्याचाच होता. रजपूत, शीख यांशी सख्य केले असते, मागले सर्व विसरून त्यांना संभाळून घेतले असते, तर पैसाही उपलब्ध झाला असता आणि अयोध्येच्या वजिराला व इंग्रजांना नमवून काशी, प्रयाग ही क्षेत्रे जिंकण्याचे मराठयांचे मनोरथही सिद्धीस गेले असते. कारण रजपूत, जाट, शीख हे सर्व हिंदूच होते.
दक्षिणेतच कार्य
मराठे नर्मदेच्यावर गेलेच नसते तर, त्यांचा झाला यापेक्षा दसपटीने उत्कर्ष झाला असता, असे मागे एकदोन वेळा म्हटले आहे. तोच विचार टिपूच्या बाबतीत मनात येतो. महादजी दक्षिणेत असता, उत्तरेत गेलाच नसता, दक्षिणेतच, किंवा फार तर माळव्यात, त्याने आपले कवायती कंपू तयार केले असते, तर टिपूला नमविण्यासाठी इंग्रजांची मदत घेण्याचे मराठ्यांना कारणच पडले नसते. किंबहुना मागे सांगितल्याप्रमाणे हैदरचा आणि मग टिपूचाही उदय म्हैसूर प्रांती झाला नसता. पण तसे काही न झाल्यामुळे हैदर व टिपू यांच्यामुळे मराठयांचे अतोनात नुकसान झाले. इंग्रजांविरुद्ध तह करताना, नानाने तुंगभद्रेपलीकडचा सगळा मुलूख हैदरला देऊन टाकला होता. पुढे सालबाईच्या तहाच्या वेळी, कसे नुकसान झाले, ते मागे सांगितलेच आहे. आणि इतके करून १७८४ साली इंग्रजांनी टिपूशी स्वतंत्र तह केलाच. आणि सालबाईच्या तहाला सर्वस्वी जबाबदार असलेल्या महादजीला तोंडघशी पाडले.
बलमहिमा
टिपूच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्याने हिंदूंचा व ब्राह्मणांचा अतोनात छळ केला. हजारो हिंदूंना बाटविले. थोरा-मोठ्यांच्या बायका जनानखान्यात घातल्या. पण मराठे, निजाम व इंग्रज यांनी त्याची कोंडी केली, व आता सर्वनाश होणार असे त्याला दिसू लागले, तेव्हा त्याने, जय मिळावा म्हणून ब्राह्मणांची अनुष्ठाने बसविली, अनेक पडकी देवळे बांधून दिली आणि शृंगेरीच्या शंकराचार्याच्या मठाला विपुल साह्य केले. शक्ती, बल, सामर्थ्य यांचा असा महिमा आहे. शीख, रजपूत व महादजी यांना उत्तरेत हेच साधले असते, याविषयी, यावरून, शंका राहात नाही.
महादजी छत्रपती ?
उत्तरेच्या कारभारात महादजीला फार मोठे वैभव प्राप्त झाले. पण तेथे तो कधीच संतुष्ट नव्हता. हे लवकर संपवून दक्षिणेत जावयाचे असे चारपाच वर्षे सारखे त्याच्या मनात होते. नानाशी वैमनस्य, तुकोजी, अलीबहाद्दर यांची तेढ, पैशाची ओढ, यामुळे तो अती त्रासून गेला होता. दक्षिणेत जाऊन तेथला कारभार हाती घ्यावा, असा त्याचा विचार होता. १७९२ साली तो दक्षिणेत आला, तेव्हा तेथली कामे अर्धवट टाकूनच आला होता. पेशवाईचा कारभार नानाऐवजी आपल्या हाती द्यावा अशी त्याने सवाई माधवरावाला विनंतीही केली होती. पण नानांनी मला पिल्लासारखे संभाळले आहे, त्यांना मला दुखविता येत नाही, असे पेशव्याने सांगितले. महादजीचा मोठेपणा हा की त्याने त्यामुळे चिडून जाऊन भलते उपद्व्यापक आरंभिले नाहीत. आपले सर्व कंपू घेऊन तो उत्तरेत जाऊन तेथली व्यवस्था हाती घेणार होता. पण दुर्दैवाने त्याला मृत्यूनेच गाठले. पण महादजीच्या संबंधात एक विचार पुनः पुन्हा मनात येतो. पेशव्यांचा कारभारी होण्याऐवजी तो स्वतःच पेशवा झाला असता, इतकेच नव्हे तर सर्वांना बाजूला सारून स्वतः छत्रपतीच झाला असता, तर मराठ्यांचा उत्कर्ष यापेक्षा अनेक पटींनी जास्त झाला असता. हे सर्व नारायणरावाच्या खुनानंतर लगेच व्हावयास हवे होते. म्हणजे सर्व व्यवस्थेसाठी दीर्घ अवधी मिळून मराठी राज्याची घडी त्याला बसविता आली असती.
मराठा वृत्ती
महादजीने, डी वॉयनेच्या हाताखाली, कवायती पलटणी तयार केल्या, हे त्याचे फार मोठे कार्य होय, यात शंका नाही. त्यांच्याच बळावर त्याला उत्तर हिंदुस्थानात मोठमोठे विजय संपादिता आले. पण कवायती कंपू ही अशी वरून चिकटवून देण्याची गोष्ट नाही. त्यासाठी समाजाची सर्व मनोवृत्तीच बदलावी लागते. मराठी लष्कराचा व शिस्तीचा केव्हाच संबंध नव्हता. उत्तर काळात तर, बेबंद अव्यवस्थेला सीमाच राहिली नव्हती. आपापले पथक उभारून लष्करात कोणीही, केव्हाही येत असे आणि केव्हाही, ऐन लढाईत मुद्धा, निघून जात असे. बहुतेकांचा मुख्य डोळा लुटीवर असे. पुणे, नागपूर, दिल्ली या राजधान्याकडे सरदारांची लष्करे आली की महागाई तर होईच, पण ही बहुतेक शहरे, लष्करे लुटून फस्त करीत. आणि हा नियम होता. अपवाद नव्हता. हे सर्व नष्ट झाल्यावाचून कवायती कंपूना काही अर्थ नव्हता. कारण तेथे सर्वत्र एक हुकमत, जागा सोडून कोणी हुकमावाचून हलावयाचे नाही ही शिस्त, आक्रमण करणे, माघार घेणे, हे सर्व सेनापतीच्या आज्ञेने व्हावयाचे. महादजी जर छत्रपती झाला असता तर त्याला हे सर्व करता आले असते. निदान याचा पाया तरी घालता आला असता. पण तसा विचार त्याच्या स्वप्नातही नव्हता.
निजाम
महादजीच्या दुःखद निधनानंतर एक वर्षाने खर्ड्याची लढाई झाली. लढाईचे मुख्य कारण म्हणजे अनेक वर्षात निजामाने चौथाई दिली नव्हती. बाकी जवळजवळ साडेतीन कोटींची निघत होती. दुसरे म्हणजे पेशवाईत आता जोम राहिला नाही, आपण स्वारी करून पुणे जाळून टाकू आणि पेशव्यांच्या हाती भिक्षापात्र देऊ, अशी मिजास निजामाला चढली होती. त्याचा दिवाण मशीर उल्मुल्क हा तर तमाशात नाना, पेशवे यांची सोंगे आणून, त्यांची विटंबना करीत असे. या दिवाणाचे व नानाचे फार वाकडे होते. त्याला काढून टाका, असा नानाने निजामाशी आग्रह धरला होता. पण निजामाने तो मुळीच मान्य केला नाही. लढाईचा प्रसंग आला तर इंग्रज आपल्यास साह्य करतील, अशी निजामाची अपेक्षा होती. नुकताच आपला गुंटूर हा पूर्व किनाऱ्यवरचा जिल्हा, इंग्रजांनी मागताच त्याने देऊन टाकला होता; व टिपूच्या वेळी त्यांना मदतही केली होती. पण इंग्रजांनी मदत करण्यास साफ नकार दिला. दोन शत्रू परस्परांशी लढून हतबल होतील, तर त्यांना हवेच होते. शिवाय महादजीचा वारस दौलतराव याने उत्तरेकडून कवायती कंपू आणविले होते. त्यामुळे पराभव झाला तर सर्वच नाचक्की होईल, अशी भीतीही इंग्रजांस होती.
एकजूट
मराठ्यांचे या वेळचे वैभव म्हणजे शिंदे, होळकर, भोसले, पटवर्धन असे सर्व सरदार एकत्र झाले होते. ही नानाची फार मोठी कर्तबगारी होती. त्याने परशुराम- भाऊस सेनापती नेमले हेही सर्वांनी मान्य केले. त्यामुळे ही लढाई मराठ्यांच्या इतिहासात चिरस्मरणीय झाली. मार्च १७९५ मध्ये खर्ड्यास झालेल्या लढाईत निजामाचा संपूर्ण मोड झाला आणि चौथाईची बाकी देणे, तीस लक्षांचा मुलूख तोडून देणे, मशीर उल्मुल्क याला मराठ्यांच्या स्वाधीन करणे, या सर्व अटी त्याला मान्य कराव्या लागल्या.
खर्ड्याचा विजय म्हणजे मराठेशाहीच्या वैभवाचा कळस, असे सर्वांना वाटले. आणि येथून पुढे हे वैभव सर्व हिंदुस्थानभर पसरणार, मोठमोठे विजय मिळणार, अशा आशा मराठ्यांच्या चित्तात पालवू लागल्या. पण या वेळी दैव त्यांना हसत असले पाहिजे. कारण हा क्षण वैभवाचा कळस न ठरता अधःपाताचा प्रारंभ ठरला.
सवाई माधवराव कर्ता होऊन पूर्वीच्या पेशव्यांप्रमाणे राज्यकारभार करू लागले असे सर्वांना वाटत होते. पण ऑक्टोबर १७९५ मध्ये त्याचा हृदयद्रावक अंत झाला. आजारी असताना वाताच्या लहरीत त्याने माडीवरून खाली उडी टाकली. या अपघातानेच त्याचा मृत्यू झाला; आणि सर्व मराठेशाही हादरून गेली. महादजी शिंदे, हरिपंत फडके हे १७९४ सालीच गेले होते. रामशास्त्री प्रभुने, अहल्यादेवी हे मराठेशाहीचे नैतिक आधार होते. तेही १७९५ साली गेले. आणि पुढल्याच वर्षी दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला. त्याने काय कर्तबगारी केली हे जगजाहीर आहे. नारायणरावाचे खुनानंतर पेशवाई संपली असे प्रारंभी म्हटले आहे. पण मधल्या काळात सवाई माधवरावामुळे लोकांना थोड्या आशा वाटू लागल्या होत्या. त्या संपूर्ण नाहीशा करून पेशवाई प्रत्यक्षात नष्ट करणे, हे काम राघोबाच्या या पुत्राने केले.
दिवा विझण्यापूर्वी
खर्ड्याचा विजय हा मराठ्यांच्या वैभवाचा कळस होय, असे वर म्हटले आहे. मराठ्यांना तसे वाटत होते यात शंका नाही. पण याचा अर्थ असा की त्यांना जगाचे ज्ञान नव्हते. स्वपर बलाबलाची कल्पना नव्हती. इतिहास, भूगोल, माहीत नव्हता. इंग्रज कोण आहेत हे त्यांना समजले नव्हते. एरवी गेल्या वीस पंचवीस वर्षांचा इतिहास डोळ्यापुढे असताना, त्यांना तसे वाटले नसते. दिवा विझण्यापूर्वीचा हा उजाळा आहे, असे फार तर वाटले असते.
■