महाराष्ट्र संस्कृती/साम्राज्याचा विस्तार
Appearance
२८.
साम्राज्याचा विस्तार
साम्राज्याचे स्वरूप
'स्वराज्याचे साम्राज्य' असा मागल्या लेखाचा मथळा होता आणि 'साम्राज्याचा विस्तार' असा याचा आहे. पण साम्राज्य या शब्दाचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. आज साम्राज्य शब्दाला जो रूढ अर्थ आहे त्या अर्थाने मराठ्यांचे साम्राज्य भारतात कोठेच नव्हते. प्रथम दक्षिणच्या सहा सुभ्यांत त्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क मिळविले. तसेच हक्क पुढे माळवा, बुंदेलखंड व राजस्थानचा काही प्रदेश येथे त्यांनी मिळविले. त्यानंतर नानासाहेबांच्या कारकीर्दीत आग्रा, मुलतान, प्रयाग, बंगाल, बिहार, ओढ्या, पंजाब या प्रदेशात अशाच प्रकारचे हक्क त्यांना मिळाले. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार तो हाच. पण राज्याचा बंदोबस्त, संरक्षण, व्यवस्थित सारावसुली, व्यापार, शेती यांचे संरक्षण आणि सर्व सार्वभौम सत्ता या अर्थी मराठ्यांचे साम्राज्य वरीलपैकी एकाही प्रांतात नव्हते. चौथाईबरोबर येणारी कर्तव्ये म्हणजे प्रदेशाचे संरक्षण, बंदोबस्त व लोकांचे संरक्षण हेही मराठयांना कोठे करता आले नाही. वरील प्रदेशात त्यांना चौथाईचे हक्क मिळाले हे खरे. पण लष्कर घेऊन गेल्याखेरीज कोठेही केव्हाही त्यांना पैसा वसूल करता आला नाही. शांतता व सुरक्षितता ही महाराष्ट्रात, जेथे त्यांचे स्वराज्य होते त्या भागातसुद्धा, निर्वेध चालली होती असे नाही. निजामादी त्यांचे शत्रू येथे येऊन लुटालूट, जाळपोळ करीत असेच नव्हे, तर दाभाडे, गायकवाड हे मराठे सरदारही हेच करीत असत. हे सर्व ध्यानी घेऊनच आपण 'मराठी साम्राज्य' हा शब्द वापरला पाहिजे.
हुकमत नाही
याची कारणे अनेक आहेत. त्यांचा विचार आपल्याला त्या त्या प्रकरणात करावयाचा आहेच. पण मुख्य कारण एकच की मराठे एका हुकमतीत कधीच वागत नसत. प्रत्येकाचा सुभा स्वतंत्र असे. तो त्यांना शाहू छत्रपतींनी दिलेला असला तरी त्यांच्या आज्ञाही ते कधी पाळत नसत. आणि एकमेकांच्या प्रांतातही, हवी तेव्हा, हवी तशी लुटालूट, जाळपोळ, करीत असत. ताराबाई ही नानासाहेब पेशव्याचा मुख्य शत्रू होती. प्रतिनिधी, सचिव, मंत्री, अमात्य, दाभाडे, रघुजी भोसले, गायकवाड, यमाजी शिवदेव, पिलाजीचा मुलगा जोत्याजी जाधव, गोविंदराव चिटणीस, कदमबांडे, हे सर्व सर्व नानासाहेब पेशव्यांचे शत्रू होते. ताराबाई यांना चिथावून देई. ते निजामाला जाऊन मिळत. आणि मराठी राज्याचे शक्य ते नुकसान करीत. यांपैकी अनेकांना, तुम्ही पेशवेपद घ्या, असा शाहू महाराजांनी आग्रह केला होता. एकदा तर नानासाहेबाला त्यांनी दोन महिने पेशवे पदावरून दूरही केला होता. त्यावेळी पेशवेपद स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. तरी शाहू छत्रपतींचे, पेशव्यांचे म्हणजेच मराठ्यांचे राज्य नीट चालू द्यावयाचे नाही, असा जणू काय त्या प्रत्येकाचा निर्धार होता. सर्व मराठे एक असते, त्या सर्वांना एका हुकमतीत वागविणारे छत्रपती त्यांना लाभले असते, तर हिंदुपद पादशाहीचे शिवछत्रपतींचे ध्येय निश्चित साध्य झाले असते. पण तसे झाले नाही. या सरदारांपैकी कोणालाही कसलीही निष्ठा नव्हती. धर्मनिष्ठा नाही, राष्ट्रनिष्ठा नाही, स्वामीनिष्ठा नाही. अशा स्थितीत नानासाहेब पेशव्याने साम्राज्याचा जो काही विस्तार केला तोच त्याचा विशेष पराक्रम होय, असे सरदेसाई म्हणतात, ते अगदी खरे आहे.
कर्नाटक
आता १७४० ते १७६१ या एकवीस वर्षांच्या काळात नानासाहेबांच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा कसा झाला ते इतिहासक्रमाने न पाहता एकेका प्रदेशाच्या हिशेबाने पाहू. तशानेच या साम्राज्याची सम्यक कल्पना येईल. १७४० साली तंजावरच्या गादीवर प्रतापसिंह भोसले हा आला. तो दुबळा होता. यावेळी अर्काटच्या नबाबाचा जावई चंदासाहेब फार प्रबळ होता. तो तंजावर आक्रमिणार, असा सुमार दिसू लागला. तेव्हा छत्रपती शाहू यांनी फत्तेसिंग भोसले आणि नागपूरचा सेनासाहेब सुभा रघूजी भोसले यांस त्यावर पाठविले. यावेळी रघूजीने मोठा पराक्रम केला. त्याने अर्काटचा नवाब दोस्त अल्ली यास ठार मारले, त्याच्या सैन्याची धूळधाण केली, नवाबाचा मुलगा सफ्दर अल्ली याच्याकडून एक कोट रुपये घेऊन त्यास अर्काटचा नवाब केले आणि चंदासाहेबास कैद करून साताऱ्यास आणून ठेविले. त्यामुळे संतुष्ट होऊन, शाहूमहाराजांनी वऱ्हाड, गाेंडवण, बंगाल इ. पूर्वकडच्या प्रांतांची कामगिरी त्याला सांगून त्याच्या सनदाही दिल्या.
सर्व व्यर्थ
हा पराक्रम मोठा झाला. पण त्याचे पुढे काय ? यावेळी प्रथम बाजीराव उत्तरेत होता. तिकडेच तो मृत्यू पावला. त्यानंतर नानासाहेब पेशवा झाला आणि तो माळव्यावर निघून गेला आणि रघूजी पण नागपुराकडे निघून गेला. हे पाहताच सर्व सैन्य घेऊन निजाम कर्नाटकात उतरला (१७४३ मार्च). त्याने अन्वरुद्दिन हा नवीन माणूस अर्काटचा नवाब म्हणून नेमला. एवढी सेना पाहून कडप्पा, बेदनूर, सावनूर येथले नवाबही भयभीत झाले आणि निजामापुढे वाकले आणि अशा रीतीने मराठ्यांचा दोन वर्षांचा उद्योग निजामाने दोन महिन्यात सर्व व्यर्थ करून टाकला.
महत्त्वाचे कारण
कर्नाटकाचा सुभा शाहू छत्रपतींनी फत्तेसिंग भोसले आणि त्याचा स्नेही बाबूजी नाईक यांच्याकडे सोपविला होता. पण ते दोघेही नाकर्ते, दुबळे होते. या बाबूजी नाईकाला पेशवेपदाची हाव होती आणि रघूजी भोसल्याचा त्याला पाठिंबा होता. पण ती त्याला न मिळाल्यामुळे त्या दोघांनी नानासाहेबांशी कायम वैर धरले. निजामाने कर्नाटकात सर्व विध्वंस केल्यावर बाबूजीला चांगली संधी होती. त्याला तशी घमेंडही होती. म्हणून तिकडील देसाई, नवाब यांच्याकडून वार्षिक खंडणी गोळा करण्यासाठी तो गेला. पण त्या देसायांनी व संस्थानिकांनी याचाच मोड करून त्यालाच लुटले आणि फौजेच्या निमित्ताने बाबूजीला कर्ज मात्र भरमसाट झाले. आणि मौज अशी की त्या कर्जाचे निवारण करावे, म्हणून तो छत्रपतींच्याच दाराशी धरणे धरून बसला ! अशा वेळी छत्रपतींनी त्याच्याकडून कर्नाटकचा सुभा काढून घेऊन त्याला वास्तविक हाकलून द्यावयाचे. पण तसा कडवेपणा त्यांच्या अंगी नव्हता. यशवंतराव दाभाडे गुजराथचा कारभार करीना. तो व्यसनाधीन होऊन पडून असे. तरी तो सुभा महाराजांनी त्याच्याकडून काढला नाही. बाबूजी नाइकाकडून कर्नाटक काढला नाही. मराठ्यांच्या राज्याला व साम्राज्याला सामर्थ्य असे कधीच प्राप्त झाले नाही, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे.
पुढे १७४८ साली निजाम मृत्यू पावला, तेव्हा त्याचे मुलगे आणि नातू मुजफर जंग यांच्यांत भांडणे लागली. तेव्हा मराठ्यांच्या व फ्रेंचांच्या मदतीने, चंदासाहेब आणि मुजफरजंग यांनी अन्वरुद्दिन यास ठार मारले. आणि मुजफरजंग निजाम झाला व चंदासाहेब अर्काटचा नवाब झाला. याच वेळी अन्वरुद्दिन याचा एक मुलगा महंमद अल्ली हा इंग्रजांकडे गेला. तेव्हा कर्नाटकात इंग्रज आणि फ्रेंच यांचे द्वंद्व उभे राहिले.
यावेळी स्वतः नानासाहेब दक्षिणेत गेला असता तर कदाचित काही कायमची व्यवस्था झाली असती. पण शाहूछत्रपती आसन्नमरण झाले होते. त्यामुळे तेथे मोठेच राजकारण निघाले होते. पुढे १७५१ साली त्याने निजामावर स्वारी केली आणि बुसी या फ्रेंच सेनापतीचा तोफखाना निजामाकडे असूनही पारनेरजवळ मराठ्यांनी त्याचा पराभव केला व निजामाकडचा चार लक्षांचा मुलूख मिळविला.
फक्त चौथाई
यानंतर पुढच्या नऊ वर्षांत, अनेक राजकारणे, अनेक घडामोडी झाल्या. निजाम सलाबतजंग याला रामदासपंत नावाचा एक मोठा कर्तबगार दिवाण मिळाला होता. जानोजी निंबाळकरांसारखे मराठे फितूर करून त्याने मराठ्यांना अनेक वेळा शह दिला. पण १७५२ साली त्याच्याच बिथरलेल्या फौजेने त्याचा खून केला. निजाम सलाबत जंगाचा एक भाऊ गाजीउद्दीन दिल्लीला होता. तो मराठ्यांना अनुकूल होता. त्याला निजामपदी बसवावा असा नानासाहेबांचा बेत होता. पण निजाम उल्मुल्काचा धाकटा भाऊ निजाम अल्ली याच्या आईने तो दक्षिणेत आल्यावर त्याला विष घालून मारले (१७५२). तेव्हा भालकी येथे सलाबतजंगाशी तह करून खानदेशपर्यंतचा सर्व मुलूख मराठ्यांनी मिळविला. यानंतर १७५३, १७५४ व १७५५ साली नानाने लागोपाठ कर्नाटकावर स्वाऱ्या केल्या व खंडण्याही गोळा केल्या. १७५७ च्या लढाईत पुन्हा त्यांनी निजामाचा मोड केला. पण मराठे इकडे गुंतलेले असताना श्रीरंगपट्टणच्या बंदिराजाने पेशव्याने १७५५ साली घेतलेले सर्व परगणे परत घेतले. याच वेळी श्रीरंगपट्टणला हैदरचा उदय झाला व त्याचा मोड करणे हेच पेशवा माधवराव याचे एक काम होऊन बसले. १७६० साली निजामाचा कायमचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी उद्गीर येथे त्याचा पुरा धुव्वा उडविला. पण त्यानंतर लगेच पानपतचे प्रककरण उद्भवून सदाशिवरावास तिकडे जावे लागले. दक्षिणचा बंदोबस्त त्यांच्या हाती आला. तसे कोणत्याही प्रांतात केव्हाही झाले नाही. दरसाल जाऊन चौथाई व इतर खंडणी वसूल करणे व तेवढ्या वेळापुरता बंदोबस्त ठेवणे एवढाच मराठ्यांच्या साम्राज्याचा अर्थ होता.
कर्तृत्व नाही
कर्नाटकाच्या या प्रकरणावरून एक गोष्ट पुन्हा ध्यानात येईल की मराठी राज्यात एक हुकमत अशी नव्हती. आणि मराठ्यांच्या जवळ सर्व हिंदुस्थानचा कारभार आटपता येईल अशी कर्ती माणसे नव्हती. अशी माणसे निष्ठेने व भौतिक विद्येमुळे निर्माण होत असतात. पण मराठ्यांत या दोन्ही गोष्टींचा संपूर्ण अभाव होता. मराठ्यांच्या साम्राज्याचे स्वरूप जे वर वर्णिले आहे त्याचे मुख्य कारण हे आहे.
रजपूत प्रकरण
शरीरात प्राणतत्त्व आहे तोपर्यंत त्याचे भिन्न अवयव एकमेकांशी दृढपणे संलग्न असे राहतात. ते तत्त्व क्षीण झाले की अवयव विलग होऊन शेवटी तुटून पडतात. तेच समाजाचे आहे. ध्येयवाद, उच्च निष्ठा, काही तत्त्वे म्हणजेच प्राणतत्त्व होय. ते क्षीण झाले की समाज फुटू लागतो व त्याचे बळ नाहीसे होते. बाजीरावाअखेर तो व त्याने नव्याने निर्माण केलेले शिंदे, होळकरादी सरदार यांच्यात स्वामिनिष्ठा होती आणि हिंदुपदपातशाहीचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते. रजपुतांना बाजीरावाने अतिशय मान दिला आणि त्यांशी सख्य राखले, याचे कारण हेच होय. पण त्याच्या नंतर हे ध्येय मनात कायम असले तरी प्रत्यक्षात राहिले नाही. आणि रजपूत हे मराठ्यांचे शत्रू बनले !
पैसा हे तत्त्व
१७४३ साली जयपूरचा राणा सवाई जयसिंग मरण पावला. त्याला ईश्वरीसिंग व माधवसिंग हे दोन पुत्र. जयसिंगामागे ईश्वरीसिंग हा राणा झाला. पण १७४६ साली माधवसिंगाचा आजा मेवाडचा राणा जगत् सिंह याने माधवसिंगाच्या बाजूने ईश्वरीसिंगाशी युद्ध सुरू केले. ईश्वरीसिंगाने मराठयांची मदत मागितली. त्यावेळी शिंदे-होळकर तेथे होते. त्यांनी ईश्वरीसिंगास मदत करण्याचे ठरविले. बादशहानेही ईश्वरीसिंगास मान्यता दिली. पण यावेळी जगत् सिंगाने पेशव्यांकडे वकील धाडले व मोठा नजराणा करून माधवसिंगाचा पक्ष घ्यावा अशी विनंती केली. त्यावेळी नानासाहेबांनी जगत्- सिंगास निक्षून सांगावयास हवे होते की आम्ही एकदा ईश्वरीसिंगाचा पक्ष घेतला आहे, त्यात बदल होणे शक्य नाही. पण त्याने तसे केले नाही. त्यास पैशाची फार निकड होती. पैसा ही मराठी राज्याची कायमची व्यथा होती. सर्व हिंदुस्थानचा व्याप संभाळावयाचा म्हणजे फार मोठी फौज पाहिजे. तिला पैसा कधीही पुरत नसे. पण याशिवाय मोठे कारण म्हणजे शाहू छत्रपतींचा खर्च. त्यांच्या खर्चाला सुमारच नसे. आणि सगुणाबाई व सकवारबाई या त्यांच्या राण्यांना कर्ज किती करावे याची काही मर्यादाच राहिली नव्हती ! त्यामुळे शाहूछत्रपती नेहमी पेशव्यांच्या मागे पैशाचा लकडा लावीत. पैशांची विवंचना नाही, असे या पेशव्यांचे एकही पत्र आढळणार नाही. अहोरात्र पैशाची चिंता ! त्यामुळे माधवसिंग बराच नजराणा करतो हे पाहून, त्याने त्याचा पक्ष घ्यावा असे ठरविले. येथे हिंदुपदपातशाहीही संपुष्टात आली. रजपुतांना मिळवून घ्यावयाचे आहे, हे धोरण संपले. जो पैसा जास्त देईल त्याकडे मराठे जाणार, त्यांना तत्त्व, ध्येय काही नाही, असा त्यांचा दुलौकिक झाला. होळकरानेही यावेळी मूळपक्ष सोडला आणि तो माधवसिंगाला मिळाला. यामुळे शिंदे- होळकरांचे कायमचे वाकडे येऊन पुढे पानपतावर आणि उत्तरेच्या राजकारणात कायमचा बिघाड झाला.
दुर्लौकिक
जे जयपुराच्या बाबतीत झाले तेच पुढे १७५४ साली जोधपूरच्या बाबतीत झाले. १७५२ साली विजयसिंग हा जोधपूरच्या गादीवर आला. त्याचा चुलत भाऊ रामसिंग यास ती गादी हवी होती. या वेळी जयाप्पा शिंदे व मल्हारराव उत्तरेत होते. तेव्हा रामसिंग जयाप्पास जाऊन भेटला. पण जोधपूरचे हे साहस आपण अंगावर घेऊ नये, अंतर्वेदीत आपल्याला पुष्कळ काम आहे, अयोध्या, काशी इ. तीर्थक्षेत्रे मुक्त करावयाची आहेत, असे मल्हाररावाने आणि इतर सरदारांनी जयाप्पास परोपरीने सांगून पाहिले. पण तो हट्टास पेटला होता. त्या वेळी सर्वांवर हुकमत चालविणारा मराठ्यांत कोणी नव्हता. सर्वच मुखत्यार. त्यामुळे जयाप्पाने जोधपूरचे काम अंगावर घेतले. त्यात त्याची दोन वर्षे वाया गेली. इतकेच नव्हे, तर विजयसिंगाने दग्याने त्याचा खून केला. शेवटी दत्ताजी शिंदे याने विजयसिंगाचा पराभव करून पन्नास लाख रुपये वसूल केले आणि रामसिंगास निम्मे राज्य मिळवून दिले. पण त्याचे आणखी सहा महिने यात वाया गेले. या वेळी मल्हाररावाची विजयसिंगास फूस होती, असा एक प्रवाद होता. त्यामुळे शिंदे व होळकर यांचे अगदी हाडवैर झाले. दत्ताजीने दुखवट्यासाठी आलेल्या मल्हाररावाची गाठही घेतली नाही. अशा रीतीने रजपूत कायमचे दुखावले गेले, शिंदे-होळकर यांच्यांत कायम बिघाड झाला आणि मराठ्यांचा सर्वत्र दुर्लोकिक झाला.
हिंदू जमाती
रजपूत, जाट व शीख यांच्या संबंधात मराठ्यांनी उत्तरेत जे राजकारण केले, त्याचा विचार उद्बोधक होईल, असे वाटते. बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मेवाडचा राणा जगत् सिंग याचा मान करून सर्व रजपुतांची मने जिंकून घेतली होती. पण पुढे हे धोरण राहिले नाही. किंबहुना हिंदुपदपातशाही असा घोष उच्चारण्यापलीकडे मराठ्यांनी, त्यांचे कवी, त्यांचे कीर्तनकार, त्यांच्यांतील सत्पुरुष यांनी या ध्येयासाठी काहीही केले नाही. मुस्लिम मुल्ला मौलवींचा असा प्रचार नेहमी चालू असे. नजीबखान रोहिला याचे राजकारण नेहमी असेच चालू असे. अंतर्वेदीत रोहिल्यांची एक वसाहतच झाली होती. हे सर्व अफगाण होते. आणि दिल्लीची मोगल बादशाही नष्ट करून अबदालीला बादशहा करावे, असा त्यांचा मनसुबा होता. मराठ्यांनी चौथाईच्या बदल्यात बादशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. तेव्हा रोहिले व अबदाली यांशी यांचा सामना होणार, हे तेव्हापासूनच ठरले होते. यामुळे शीख, जाट व रजपूत यांशी संघटन करण्याचा मराठ्यांनी कसून प्रयत्न केला असता तर पानपतला त्यांना अपयश आले नसते, किंबहुना पानपतचा प्रसंग उद्भवलाच नसता, असे इतिहासपंडितांचे मत आहे.
जाट
जाट हे शीख, रजपूत यांच्यासारखेच पराक्रमी लोक आहेत. दिल्ली, चंबळ, जयपूर व यमुना या चतुःसीमेच्या भागाला जाटवाडा म्हणतात. औरंगजेबाच्या काळापासून जाट हे मोंगलांशी लढा देत होते. गोपाळ जाट, भजासिंग, राजाराम, चूडामण आणि बदनसिंग असे पराक्रमी लोक त्यांच्यांत निर्माण झाले. बदनसिंगाचाच मुलगा सुरजमल्ल जाट. बादशहा व वजीर सफदरजंग यांचे वैर होते. तेव्हा बादशहाने मराठ्यांना मदतीस बोलविले आणि अजमीर व आग्रा हे दोन प्रांत त्यांना देऊ केले. वास्तविक हे सुभे मराठ्यांनी घ्यावयाचे नव्हते. अजमेर हा रजपुतांचा मानबिंदू आणि आग्रा हा जाटांचा. या वेळी मराठ्यांचा सेनापती राघोबा होता. त्याला हे कोठले कळायला ! तो आल्यावर सुरजमल्लाने चाळीस लक्ष रुपये देऊन समेट करण्याचे बोलणे लावले. हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने राघोबाने हे पतकरावयास हवे होते. पण त्याने एक कोटी रुपये मागितले व सुरजमल्लाचा प्रसिद्ध किल्ला कुंभेरी यास वेढा घातला. त्यात यश येईना. पाच महिने गेले. याच वेळी शिंदे-होळकरांचे पुन्हा वैर झाले. जाटाने जयाप्पास आपले बाजूस वळविले. त्यामुळे तो वेढा ढिला करून मारवाडात निघून गेला. मल्हाररावाचा मुलगा खंडेराव या वेढ्यात ठार झाला होता. म्हणून, कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. ती वाया गेली आणि शेवटी तीस लक्षांवर तडजोड करावी लागली ! या वेळी जाट किंवा रजपूत यांशी युद्ध न करता सर्व मराठे अयोध्या, प्रयाग या तीर्थक्षेत्रांकडे वळले असते तर मोठा विजय प्राप्त झाला असता, रजपूत व जाट यांनी त्यांना मदत केली असती आणि नजीबखानाचा याच वेळी नक्षा उतरला असता. पण काही ध्येयधोरण आखून, परिस्थितीचा अभ्यास करून, दूरदृष्टी ठेवून, मराठ्यांचा कारभार चाललाच नव्हता. रघुनाथरावाला कसलीच अक्कल नव्हती. मल्हारराव होळकराने नजीबखान रोहिल्यास धर्मपुत्र मानून अभय दिले होते. (त्यानेच पुढे पानपत घडवून आणले). आणि स्वतः नानासाहेब पेशवा या समयी उत्तरेत आलाच नाही. तो आला असता तरी काय झाले असते, ते सांगता येत नाही. कारण रजपुती राजकारणाच्या नाशाला तोच जबाबदार होता. पण जाटांच्या बाबतीत सलोखा करून त्याने शिंदे होळकरांचे सख्य पुन्हा जमविले असते, असे वाटते.
पंजाबचे शीख
शिखांच्या बाबतही मराठ्यांनी संघटनेचा प्रयत्न करावयास हवा होता. रजपुतांचे जसे राजस्थान, तसाच पंजाब हा आपला देश, असे शीख मानीत. दुर्दैवाने गुरु गोविंदसिंगानंतर त्यांची संघटना करणारा पुरुष शिखांत निर्माण झाला नाही. मीर- मन्नू, आदिना वेग, झकेरियाखान यांसारख्या पंजाबच्या मुस्लिम सुभेदारांशी ते प्राणपणाने लढत होते. मराठ्यांतील एखाद्या कर्तबगार पुरुषाने पंजाबात राहून त्यांची संघटना केली असती तर पंजाबात पाऊल टाकण्याचे धैर्य अबदालीस झाले नसते. पण मराठ्यांना स्वतःचीच संघटना दृढ टिकविता येत नव्हती. तसा कर्तबगार पुरुष त्यांना स्वतःसाठीच लाभला नाही, ते जाट, शीख, रजपूत यांच्यांत कशी संघटित शक्ती निर्माण करणार ? शिवसमर्थांच्या नंतर सर्वांगीण कर्तबगारी निर्माण करण्याची विद्याच येथून लोपली. रणांगणातील शौर्यधैर्य, एवढी परंपरा तरी मराठ्यांत टिकून राहिली हेच नशीब. तेवढ्यावर सर्व भारतातच काय, पण लहानशा महाराष्ट्राचासुद्धा कारभार यशस्वी करणे अशक्य आहे !
मराठा सरदार
निजाम, कर्नाटकाचे नवाब, जाट, रजपूत हे बाहेरचे लोक झाले. पण, पूर्वी अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे, मराठा सरदारांची हीच स्थिती होती. त्यांतील दमाजी गायकवाड, रघूजी भोसले आणि तुळाजी आंग्रे यांचा या दृष्टीने विचार करू. मराठा साम्राज्याचे स्वरूप त्यावरून जास्त यथार्थपणे स्पष्ट होईल.
दमाजी गायकवाड
गायकवाड हे सेनापती दाभाडे यांचे हस्तक. शाहू महाराजांनी गुजराथचा मोकासा पेशवा व दाभाडे यांस वाटून दिला. त्याबद्दल दाभाड्याची नेहमीच तक्रार चालत असे. वास्तविक सेनापती हा सर्व राज्याचा सेनापती, प्रतिनिधी हा सर्व मराठी राज्याचा प्रतिनिधी, असे असावयास हवे होते. पण छत्रपतींनी या अष्टप्रधानांना प्रदेश वाटून दिल्यामुळे एकराज्याची ही व्यवस्थाच राहिली नाही. एक फक्त पेशवाच काय तो सर्व राज्यकारभाराला जबाबदार, अशी स्थिती झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या मोकाशात आपल्याला हक्क असला पाहिजे अशी पेशव्याची अट होती. पण मुळातच, आपण खानदानी सरदार आणि पेशवा हा कालचा पोर, अशी सर्व प्रधानांची घमेंड असल्यामुळे, यातून नित्य तक्रारी उदभवू लागल्या. त्यात मराठी राज्यातील आणखी एका अव्यवस्थेची भर पडली. मोकासे, वतने ही राज्याची सेवा करण्यासाठी दिलेली असतात. पण ती छत्रपतींनी वंशपरंपरा दिल्यामुळे मराठी राज्याचे फार मोठे नुकसान झाले. बापासारखा मुलगा पराक्रमी निघतोच असे नाही. तरी त्याचा सरंजाम मात्र कायम ! ही व्यवस्था नव्हे. ही मूर्तिमंत अव्यवस्था होय. त्रिंबकराव दाभाड्याचा मुलगा यशवंतराव हा अत्यंत व्यसनी व कर्तृत्वशून्य होता. तरी गुजराथचा सरंजाम शाहू महाराजांनी त्याच्याकडेच ठेवला. त्याने गायकवाडास हस्तक नेमून कारभार चालविला. पण गायकवाडास पैसा पुरविणे त्याला अशक्य होऊ लागले. शाहू छत्रपतींच्या मरणानंतर नानासाहेब पेशवे यांनी निम्म्या गुजराथवरचा आपला हक्क पुन्हा सांगितला व वसुलीसाठी आपले कमाविसदार तिकडे पाठविले. तेव्हा तर युद्धाचाच प्रसंग आला. ताराबाईने दमाजी गायकवाडास चिथावून दिले, व त्याने पुण्यावर स्वारीच केली; पण त्यात त्याचा पराभव झाला आणि १७ लक्ष दंड भरून त्याने पेशव्याचा निम्मा हक्क मान्य केला. सुदैव एवढेच की पुढे त्याने गुजराथचा कारभार उत्तम सांभाळला. मराठ्यांनी चौथाई घेतली तरी सर्व राज्यकारभाराची जबाबदारी ते कधी घेत नसत. पण माळवा आणि गुजराथ येथे त्यांनी ती घेतली आणि त्यामुळे त्यांच्या सत्तेला सुखावह साम्राज्यसत्तेचे रूप आले.
रघूजी भोसले
दमाजीप्रमाणेच रघूजी भोसले हा शूर व पराक्रमी होता. कर्नाटकात त्याने पराक्रम केल्यामुळे शाहू छत्रपतींची त्याच्यावर मर्जी होती. पण तोही पेशव्यांशी इतर सरदारांप्रमाणेच फटकून वागत असे. पेशवेपद नानासाहेबाला मिळू नये, बाबूजी नाइकास मिळावे, म्हणून त्याने खटपट केल्याचे वर सांगितलेच आहे. वास्तविक नानासाहेब नको होता, तर त्याने स्वतःसाठी पेशवाई मागावयाची होती. पण सर्व भारताच्या कारभाराला आटोप घालण्याची कर्तबगारी त्याच्या ठायी नव्हती. म्हणून पेशव्याच्या विरुद्ध मसलतीत सामील होणे हा मार्ग त्याने पत्करला.
याच वेळी अलीवर्दीखान या सरदाराने बंगालच्या सुभेदारास मारून तो प्रांत बळकावला होता. बिहार व ओट्या हे प्रदेश त्या वेळी बंगालच्या सुभ्यातच येत. यातील ओट्यावर रघूजीने स्वारी केली. त्याचे पारिपत्य करण्यासाठी, बादशहाने, नानासाहेब त्या वेळी उत्तरेत होता, त्याची मदत मागितली. चौथाईच्या कराराप्रमाणे बादशाही प्रदेशाचे रक्षण करणे हे पेशव्याचे कामच होते. तेव्हा त्याला रघूजीला विरोध करावा लागला. भडाले मुक्कामी लढाई होऊन रघुजीचा पराभव झाला. पुन्हा नानासाहेब बंगालमध्ये शिरल्यावर दोघांची अशीच लढाई झाली. तीतही रघूजीचा पराभव झाला. तेव्हा त्या दोघांना साताऱ्यास बोलावून छत्रपतींनी बंगाल, बिहार आणि वऱ्हाड ते कटक हा सर्व प्रांत रघूजीला तोडून दिला. तेव्हापासून रघूजीचे व पेशव्याचे पुन्हा भांडण झाले नाही. पण त्याला दिलेले प्रदेश समस्त मराठी राज्याचा एक भाग आहे, असे त्याने कधी मानले नाही. शाहू छत्रपतींच्याकडे तो मुलखाचा ऐवज कधी पाठवीत नसे आणि त्यांच्या आज्ञाही पाळीत नसे. शिवाय शाहूची धाकटी राणी व रघूजीची बायको या चुलत बहिणी असून रघुजीचा मुलगा मुधोजी याला शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे अशी तिची खटपट होती. त्यामुळे हे प्रकरण डोईजड झाले. रघूजीने बंगालमध्ये मोठा पराक्रम केला हे खरे ! पण तेथे राज्य स्थापन केले नाही. त्यामुळे मराठे लुटीपुरते येतात असेच सर्वत्र ठरले आणि हे लुटारू आहेत असाच भाव बंगाली लोकांच्या मनात रूढ झाला. एका हुकमतीत मराठे सरदार कधीच वागले नाहीत. शाहू छत्रपतींच्या हुकमतीतही ते राहिले नाहीत. त्यामुळे मराठी साम्राज्याला व्यवस्थित प्रस्थापित सत्तेचे रूप कधीच आले नाही. आणि एकाच मराठा छत्रपतीचे दोन सरदार प्रत्यक्ष रणांगणात आपसात लढतात, ही दृश्ये पाहून एकंदर हिंदी जनतेच्या मनावर फारच विपरीत परिणाम झाला !
तुळाजी आंग्रे
तुळाजी आंग्रे याची कथा जास्त चमत्कारिक आहे. सर्व पश्चिम किनारा संभाळण्यासाठी आणि युरोपीय आक्रमण थोपविण्यासाठी शिवछत्रपतींनी मराठी आरमार निर्माण केले. त्यांचा हेतू कान्होजी आंग्रे याने पूर्ण सफल केला होता. इंग्रज, फेंच, पोर्तुगीज, शिद्दी यांवर त्याचा वचक असे. तो असेपर्यंत त्याने कोणाची मात्रा चालू दिली नाही. तो १७३१ साली मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मुलगा संभाजी याने काही दिवस तीच परंपरा चालविली. तोही १८४८ साली मरण पावला. तेव्हा त्याच्या मागून तुळाजी आंग्रे हा दर्यासारंग- सरखेल झाला. तोही असाच पराक्रमी व शूर असून इंग्रजांचा कट्टा वैरी होता. पण त्याबरोबर त्याने पेशव्यांशीही वैर धरले. इतकेच नव्हे, तर प्रतिनिधीचे रत्नागिरी व विशाळगड हे किल्ले त्याने बळकावले. शिवाय पोर्तुगीजांशी सख्य करून तो वाडीकर सावंताला व इतर मराठी मुलखाला अतिशय उपद्रव देऊ लागला. तेव्हा त्याचा बंदोबस्त करणे नानासाहेब पेशव्यास भाग पडले. बंडखोर सरदाराचा बंदोबस्त करणे यात विपरीत किंवा चमत्कारिक असे काही नाही. पण नानासाहेबाने इंग्रजांची मदत घेतली. त्यासाठी पश्चिम किनान्यावरची बाणकोट, हिंमतगड इ. पाच गावे इंग्रजांना कायमची द्यावी लागली. आणि पश्चिम किनाऱ्यावरचा एक प्रबळ सरदार नाहीसा झाल्यामुळे इंग्रजांना रान मोकळे झाले. शिवाय तुळाजीशी लढाया झाल्या त्या सर्व आपणच केल्या, मराठ्यांनी काहीच साह्य केले नाही, अशी इंग्रज अधिकाऱ्यांनी तक्रार सुरू करून किल्ल्यांतून सापडलेली लक्षावधी रुपयांची मालमत्ता दडपली. इंग्रज हा कसा आहे, त्याचे डाव काय आहेत, आपल्या कृत्याचे दूरवर परिणाम काय होणार आहेत, याची थोडीशी सुद्धा कल्पना मराठ्यांना किंवा नानासाहेबाला येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. पण हे आश्चर्य नाहीच. इंग्रजांचे राज्य येथे स्थापन झाल्यावरही मराठे इंग्रजांना समजावून घेऊ शकले नाहीत, आणि कलियुगाच्या व रामरावणाच्या गोष्टी ते बोलत बसले.
या संबंधात, नानासाहेबाने मराठ्यांचे सर्व आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले, असे वारंवार सांगण्यात येते, हे मात्र खरे नाही. आनंदराव धुळपाची नेमणूक करून नानाने मराठी आरमार चांगले सुसज्ज ठेविले होते. पण सर्व पश्चिम बाजू येथून पुढे कमकुवत झाली, यात मात्र शंका नाही. इंग्रज प्रबळ होण्याला ते एक निश्चित कारण झाले.
मराठी साम्राज्याच्या दृष्टीने या तीन सरदारांच्या तीन कथा पाहण्याजोग्या आहेत. रघूजी भोसले हा या सर्वोत जास्त पराक्रमी. १७४५ पासून १७५५ पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत त्याने बंगाल, बिहार व ओरिसा येथे चौथाई बसविली होती. मोठमोठ्या मोगल सरदारांना त्याने वेळोवेळी नामोहरम केले होते. उणीव हीच भासते की मूळ मराठी राज्याशी म्हणजे शाहू छत्रपती आणि पेशवे यांशी सलोखा करून त्याने हा पराक्रम केला असता तर मराठी साम्राज्याला निराळे रूप आले असते. पण प्रतिनिधी, सचिव इ. प्रधानांप्रमाणे नुसतीच पेशव्याविरुद्ध गाऱ्हाणी करीत बसण्यापेक्षा रघूजीने बंगाल प्रांत कबजात आणला. हा पराक्रम अभिनंदनीय आहे यात शंका नाही. तुळाजी आंग्रे याने हेच केले असते, मूळ मराठी राज्याशी बखेडा माजविला नसता, तर कोकणात मराठी साम्राज्य दसपट दृढ झाले असते. पण मानवी स्वभाव ! किंवा नियती ! सर्वात खरी गोष्ट म्हणजे विद्या. ती येथे कोणातही नव्हती. त्यामुळे या अत्यंत प्रबळ, पराक्रमी सरदाराची शेवटची वीस वर्षे तुरुंगात वाया गेली. दमाजी गायकवाडाने आरंभीची काही वर्षे अशीच वाया घालविली. मराठी राज्यावरच त्याने स्वारी केली. पण मागून तरी त्याला सुबुद्धी सुचली. त्यामुळे गुजराथेत मराठी साम्राज्याला साम्राज्यसत्तेचे रूप तरी आले.
उत्तर हिंद
कर्नाटक, राजस्थान, कोकण आणि बंगाल या प्रदेशांचा विचार झाला. आता उत्तर हिंदच्या राजकारणाचा विचार करावयाचा. याच राजकारणाचे पर्यवसान पानपतात झाले. म्हणून मराठ्यांच्या इतिहासात याचे फार महत्त्व आहे.
दुबळे बादशहा
सय्यदबंधूंनी महमंदशहाला दिल्लीच्या गादीवर बसविले. तेव्हापासून दिल्लीचे बादशहा हे सतत दुबळे, नाकर्ते, कर्तृत्वशून्य असेच निघाले. अहंमदशहा, अलीगोहर, शहा अलम हे सर्व असेच होते. या काळात त्यांचे वजीर सफदरजंग, इंतज सुद्दौला, गाजीउद्दीन (धाकटा) यांची स्थिती अशीच होती. कर्ता, समर्थ, मुत्सद्दी असा यांच्यापैकी एकही नव्हता. तशातही कोणी कर्तृत्व दाखविलेच तर, हा आपल्याला गुंडाळून ठेवील, किंवा आपला घात करील, अशी बादशहाला भीती वाटत असे. त्यामुळे बादशहा आणि वजीर यांच्यात सलोखा असा कधीच नसे. एकमेकांचा घातपात करण्यास ते सदैव टपलेले असत. गाजीउद्दीनाने तर अहंमदशहा आणि त्याची आई यांना ठार मारले. या वजिरांना पैशाची नेहमी टंचाई असे. त्यामुळे व इतर कारणांमुळे त्यांचे लष्कर त्यांची वाटेल ती बेअब्रू करीत असे. त्यांना व त्यांच्या बायकांनासुद्धा रस्त्यात फरफटत शिपाई नेत. कधी कधी बादशहावरही अशी पाळी येई. अशी ही या काळात दिल्लीच्या पातशाहीची स्थिती होती.
रोहिले
याच काळात रोहिल्यांचा उदय झाला हे मागे सांगितलेच आहे. नजीबखान हा दक्षिणेतील निजामासारखाच धूर्त व पातळयंत्री नेता त्यांना मिळाला होता. त्यांना मोगल सत्ता नष्ट करून अफगाण सत्ता- रोहिले अफगाणच होते- प्रस्थापित करावयाची होती. म्हणून नादिरशहानंतर त्याच्या जागी आलेल्या अहंमदशहा अबदालीला ते नित्य बोलवीत असत. अबदालीला दिल्लीच्या तख्ताची आकांक्षा नव्हती. पण पंजाब- प्रांत कायम आपल्या ताब्यात ठेवावयाचा असा त्याचा निर्धार होता. आणि तो प्रांत दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यात होता. म्हणून संधी मिळेल तेव्हा तो दिल्लीवर स्वारी करीत असे.
मराठे - संरक्षक
साम्राज्याच्या दृष्टीने पाहता, आता दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यात दिल्ली ते अटक एवढाच प्रदेश राहिला होता. नर्मदेच्या खालचा प्रदेश मराठे व निजाम यांनी व्यापला होता. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड हे मराठ्यांनी जिंकले होते. बंगाल, बिहार व ओरिसा यांवर रघूजीने चौथाई बसविली होती. अशा स्थितीत बादशहाला स्वसंरक्षणाचीच चिंता होती. म्हणून, उत्तरेकडच्या प्रदेशांचे चौथाईचे हक्क देऊन, मराठ्यांनी आपले संरक्षण करावे, असा त्याने करार केला होता.
राघोबा
दिल्लीचे बलाबल पाहिले. आता तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या मराठ्यांचे बलाबल पाहू. उत्तरेत दीर्घकाळ राहणारे त्यांचे प्रमुख सरदार जे शिंदे, होळकर त्यांचे वैमनस्य होते. अंताजी माणकेश्वर हा दिल्लीला फौज घेऊन नेहमी असे. आणि हिंगणे हा वकील म्हणून असे. त्यांचेही परस्परांशी पटत नसे. नानासाहेब पेशवा हा मराठी राज्याचा सूत्रधार. पण शिंदे, होळकर, आणि विशेषतः मल्हारराव होळकर त्याचे हुकूम मुळीच मानीत नसत. शाहू छत्रपतींचे इतर प्रधान त्याला जुमानीत नसत. शाहू छत्रपतींनी मृत्युसमयी त्याला मराठी राज्याचे सर्वाधिकार दिले. पण ताराबाई व इतर प्रधान निजामाशी संगनमत करून त्याला उखडून टाकण्यात सदैव तत्पर असत. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात जाण्यास तो धजावत नसे. छत्रपतींच्या मृत्यूनंतर तो एकदाही उत्तरेत गेला नाही, म्हणून नानासाहेब सरदेसाई यांनी त्याला सारखा दोष दिला आहे. ही त्याची फार मोठी चूक होय, असे त्यांनी म्हटले आहे. उत्तरेतील माणकेश्वर, बुंदेले यांच्या पत्रांत, स्वामींनी स्वतः उत्तरेत यावे, असे वारंवार पेशव्यांना लिहिलेले आढळते. पण दक्षिणेतून आपण वर गेलो, तर मागे अनर्थ होईल, अशी भीती वाटत असल्यामुळेच तो तिकडे गेला नसावा. म्हणून त्याने राघोबाला दोनदा तिकडे पाठविले. पण त्याच्याइतका नालायक माणूस दुसरा कोणी नव्हता. त्यामुळे उत्तरेच्या राजकारणाचा कायमचा विचका फक्त त्याने केला.
दोन पक्षांचे बलाबल पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष ऐतिहासिक घडामोडींची थोडी मीमांसा करणे सुलभ होईल.
दुटप्पी धोरण
वजीर सफ्दरजंग आणि रोहिले यांचे कायमचे वैर होते. कारण अबदालीच्या साह्याने मोगल बादशाही नष्ट करावयाची व बादशहाचे सरदारही धुळीस मिळवावयाचे असा रोहिलेपठाणांचा डाव होता. वजीर आणि रोहिले यांचा पहिला संग्राम १७५० च्या सप्टेंबरात कासगंज येथे होऊन वजिराचा पूर्ण पराभव झाला. याच सुमुमारास शाहू छत्रपतींच्या निधनानंतरच्या भानगडी मिटवून शिंदे, होळकर राजस्थानात आले होते. तेव्हा त्यांना आपल्या मदतीस बोलावून १७५१ च्या एप्रिलात वजिराने पुन्हा पठाणांवर स्वारी केली. या वेळी सिंधीरामपूर येथे लढाई होऊन रोहिल्यांचा अगदी निःपात झाला. यानंतर रोहिल्यांच्यावर सूड उगवण्यासाठी वजिराने पुन्हा स्वारी केली. पण त्या वेळी त्याचाच पराभव झाला. आणि पुन्हा मराठे आपल्यावर चालून येऊ नयेत म्हणून रोहिल्यांनी त्यांशी संधान बांधून, व त्यांस पैशाची निकड आहे हे जाणून, त्यास पन्नास लाख रुपये दिले. तेव्हा त्यांची बाजू मराठ्यांनी संभाळून घेतली. रजपुतांशी वैर निर्माण करणे हे जसे मराठ्यांचे अपकृत्य, तसेच पठाणांना पैशाच्या लोभाने वश होणे हे त्यांचे राजनीतीच्या दृष्टीने दुसरे अपकृत्य होय. बादशहाचे संरक्षण करण्याची जवाबदारी त्यांनी शिरावर घेतली होती. असे असताना रोहिल्यांशी संधान करणे हे केवळ नीतीच्याच नव्हे, तर राजनीतीच्या दृष्टीनेही आक्षेपार्ह होय. येथून पुढे रोहिल्यांना थोडे संभाळून घेणे हा पायंडाच पडला. पानपतावर मराठ्यांना तोच जाचक झाला.
अबदाली
रोहिल्यांचा पराभव होताच त्यांनी अबदालीला पुन्हा निमंत्रण दिले. त्याप्रमाणे तो काबूलाहून निघून पंजाबपर्यंत आला सुद्धा. त्यामुळे घाबरून जाऊन बादशहाने शिंदे, होळकरांना दिल्लीस बोलाविले. याच वेळी त्याने अबदालीकडेही वकील रवाना केले. आणि त्याची मागणी मंजूर करून त्यास परत पाठविले. यात बादशहाचा आणखी एक हेतू होता. वजिराने अबदालीवर चाल करून पराभव केला तर वजीर फार प्रबळ होईल आणि आपणासही शह देईल अशी भीती वाटल्यामुळेच त्याने परस्पर अबदालीकडे वकील पाठवून त्याची समजूत घातली. अबदालीही तेवढ्यावर संतुष्ट होऊन परत गेला. त्याचे एक कारण हे की शिंदे, होळकर सध्या दिल्लीत आहेत ही वार्ता त्याला पंजाबातच समजली होती. राजकारणाची गुंतागुंत अशी असते.
याच वेळी मराठ्यांना घेऊन पंजाबात घुसावे व पुढे काबूलवरही चाल करून जाऊन अबदालीचा नक्षा उतरवून तो बादशहाचा सुभा परत मिळवावा असा वजिराचा उद्देश होता. पण बादशहाने परस्पर अबदालीचे प्रकरण मिटवल्यामुळे त्याचा नाइलाज झाला. पण या कारणामुळे मराठ्यांना आता काम काय सांगावयाचे असा प्रश्न निर्माण झाला. ते दिल्लीच्या भोवतालचा प्रदेश लुटून फस्त करू लागले ! इतक्यात निजामाशी लढा होणार हे जाणून नानासाहेब पेशव्याने त्यास दक्षिणेत बोलविले. गाजीउद्दीन (थोरला) यास निजामाच्या गादीवर बसवावे असा त्याचा विचार असल्याचे मागे सांगितलेच आहे. या बोलावण्याप्रमाणे शिंदे, होळकर दक्षिणेत गेले. पण जाण्यापूर्वी त्यांनी बादशहाच्या संरक्षणाचा करार पुरा करून त्यावर सह्या केल्या. या कराराअन्वये अबदाली व पठाण रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशहाचे रक्षण करावयाचे आणि त्याच्या बदल्यात पंजाब, सिंध व अंतर्वेद येथील चौथाई मराठ्यांनी वसूल करावी, अजमीर व आग्रा याची सुभेदारी पेशव्यांना देण्यात यावी, आणि खर्चासाठी बादशहाने ५० लाख रुपये द्यावे, असे ठरले.
बादशहा व वझीर
असा करार करून शिंदे होळकर दक्षिणेत गेले. आणि इकडे बादशहा व वजीर सफ्दरजंग यांचा लढा सुरू झाला. कारण अबदालीशी परस्पर बादशहाने वाटाघाटी केल्या. यामुळे वजीर फार संतापला होता. त्यामुळे त्याने फौजा जमवून बादशहाशी प्रत्यक्ष लढाईच आरंभिली. आणि या बादशहाला काढून गादीवर कोणातरी शहाजाद्यास आणावयाचे असा मनसुबा रचला. यामुळे घाबरून जाऊन बादशहाने मराठ्यांनी दक्षिणेतून त्वरित दिल्लीला यावे, असा निरोप धाडला (सप्टेंबर १७५३). त्याअन्वये नानासाहेबाने रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांना उत्तरेत पाठविले. सखारामबापू, पेठे, कानडे, नारो शंकर, विठ्ठल शिवदेव हे सरदार होते. वाटेत जयाप्पा शिंदे, दत्ताजी शिंदे, खंडेराव होळकर हे त्यांना मिळाले. मराठ्यांची अशी मातबर फौज उत्तरेत आली. पण ती येण्यापूर्वीच बादशहा व वजीर यांचा कलह मिटून तह झाला होता. त्यामुळे मराठ्यांना काम काय असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. तेव्हा आग्रा व अजमीर हे कराराअन्वये मिळालेले सुभे ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरविले. यातून सुरजमल्ल जाट आणि विजयसिंग यांशी लढाया होऊन रजपूत व जाट यांना मराठ्यांनी कायमचे वैरी करून ठेविले. हे वर मागे सांगितलेच आहे.
कर्तव्यच्युत
३० ऑगस्ट १७५३ ला दक्षिणेतून रघुनाथराव निघाला आणि ऑगस्ट १७५५ मध्ये पुण्यास परत आला. ही दोन वर्षे उत्तरेत राहून रघुनाथरावाने व मराठ्यांनी केले काय ? जाट व रजपूत यांशी बिघाड करण्याखेरीज त्यांनी काही केले नाही ! वजीर सफ्दरजंग याच्याशी वाकडे आले, म्हणून धाकटा गाजीउद्दीन यास बादशहाने मीरबक्षी म्हणजे सेनापती नेमले आणि वजिराची जागा इंतजमुद्दौला यास दिली. पण लवकरच गाजीउद्दीन याने सर्व कारभार हाती घेऊन बादशहावर अतिशय जुलूम चालविला. एकदा फौज घेऊन त्याने राजवाड्यास गराडाच घातला. त्या वेळी नव्या वजिराने बादशहाला वाचविण्यासाठी जनानखान्यासह त्याला सिकंदराबाद येथे नेऊन ठेविले. या वेळी वास्तविक मराठ्यांनी बादशहाचे रक्षण करणे अवश्य होते. पण ते तर त्यांनी केले नाहीच, उलट बादशहाच्या छावणीवर हल्ला करून मल्हाररावाने लूटमार केली; आणि जनानखान्यातील स्त्रिया भीतीने पळून जाऊ लागल्या, त्यांनाही लुटून त्यांचे जडजवाहीर लुबाडले. यानंतर गाजीउद्दीनाने बादशहास पदच्युत केले, तो व त्याची आई उधमबाई यांस कैद केले आणि दुसरा आलमगीर यास तख्तावर बसवून पहिल्याचा म्हणजे अहंमदशहाचा काही दिवसांनी वध केला. या सर्व प्रसंगी मराठे दिल्लीच्या आसपासच होते, पण त्यांनी बादशहाच्या रक्षणाची कसलीच काळजी वाहिली नाही !
कर्तृत्वाचा उगम ?
दुसरे एक महत्त्वाचे कार्य त्यांना करता आले असते. पंजाबात शिरून अटकेपर्यंत जाऊन त्या प्रांताचा कायमचा बंदोबस्त करणे अवश्य होते. कारण दिल्ली ते काबूल यांमध्ये अबदालीला सरळ फौजा घेऊन येण्यास वाटेत कसलाच अडथळा नव्हता. पंजाब व सिंध या प्रांतांच्या रक्षणाची कायमची सोय केल्यावाचून दिल्लीचे रक्षण होणे कदापि शक्य नव्हते. पण रघुनाथरावाने यातले काहीच केले नाही. त्याने बऱ्याचशा तीर्थयात्रा करून पुण्य मात्र जोडले ! या वेळी नानासाहेब स्वतः स्वारीवर असते तर आग्रा व अजमीरचे राजकारण जाणून त्यांनी जाट व रजपूत यांशी वैर येऊ दिले नसते, शिंदे व होळकर यांचे वितुष्ट येऊ दिले नसते, आणि पंजाबचा प्रश्नही सोडविला असता. अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत बुंदेले यांनी अनेक पत्रांतून, 'स्वामींनी स्वतः इकडे येणे अवश्य आहे' असे विनविले होते. पण नानासाहेब उत्तरेत आलाच नाही. तो आल्यावर वरील प्रकरणे सुटली असती, असे वर म्हटले आहे, त्यालाही कितपत अर्थ आहे ते सांगता येत नाही. कारण एवढी सर्व हिंदुस्थानची, दक्षिणेची, उत्तरेची, पश्चिमेची म्हणजे कोकणची आणि पूर्वेकडील बंगाल, बिहार येथली सर्व राजकारणे त्याला उमगली असती तरी त्या सर्वांना आवर घालण्याइतके कर्ते पुरुष त्याचेजवळ नव्हते. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड या सरदारांची वर्णने वर आलीच आहेत. अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत बुंदेले, हिंगणे यांच्या ठायी हा वकूबच नव्हता. शिवाय या सर्वांचे आपसांत वैमनस्य होते. हिंदुपदपातशाहीची जी जबाबदारी मराठ्यांनी शिरावर घेतली होती ती पार पाडण्याइतके कर्तृत्व त्यांच्या ठायी मुळीच नव्हते. आणि ते निर्माण होणेही शक्य नव्हते. जगाचा इतिहास, भूगोल, विज्ञानाची जगातील प्रगती, व्यापार, व्यापारी संघटना, बुद्धिवादाने जगातील घडामोडींचा अभ्यास करण्याची शक्ती यावाचून हे कर्तृत्व निर्माण होत नाही.
आसुरी संहार
दादासाहेब आणि मराठे दक्षिणेत गेल्यावर गाजीउद्दीन पंजाबवर चालून गेला व तो प्रांत अबदालीच्या सुभेदाराकडून त्याने जिंकून घेतला. ही वार्ता ऐकून अबदाली चिडून गेला. आणि १७५६ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तो पंजाबात शिरला. त्याने दिल्लीस वकील पाठवून दोन कोटी रुपयांची मागणी केली. पण बादशहा आणि वजीर यांच्याजवळ दोन लाख सुद्धा नव्हते. त्यामुळे अबदालीने दिल्लीवर धाड घातली. आणि फेब्रुवारी १७५७ पासून पुढील दोन महिन्यांत दिल्ली, आग्रा व मथुरा या शहरांत त्याने कत्तलखानाच उघडला. हजारो लोकांची मुंडकी कापून त्याने त्यांच्या राशी केल्या. २५ कोट रुपये वसूल केले आणि हजारो स्त्रियांची बेअब्रू केली. जनानखान्यातील स्त्रियांनाही त्याने वगळले नाही. या सर्व प्रकाराने त्याने नादिरशहासही लाजविले. असा भयानक आसुरी संहार करून मार्चअखेर तो स्वदेशी परत गेला.
शत्रूचे रक्षण
अबदाली काबूलहून निघाल्याच्या वार्ता दक्षिणेत कळतच होत्या. त्याचा प्रतिकार करून पातशाहीचे रक्षण करण्यासाठी नानासाहेबाने पुन्हा रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनाच पाठविले. ते १९५६ च्या नोव्हेंबरात निघाले होते. त्यांच्या मनात असते तर १७५७ च्या जानेवारीत ते दिल्लीला सहज पोचू शकले असते. या वेळी पंजाबचे शीख व सुरजमल जाट त्यांना अनुकूल होते. महामारीच्या रोगाने अबदालीची फौज हैराण झाली होती. अशा स्थितीत त्यांनी १७५७ च्या फेब्रुवारीत दिल्लीस जाऊन धडक मारली असती तर अबदालीचा त्यांना धुव्वा उडवता आला असता. पण १६ फेब्रुवारीपर्यंत सावकाश मजला करीत राघोबा व मल्हारराव इंदुरास पोचले ! मग काही काळ राजस्थानात काढून मे महिन्यात ते आग्र्याला आणि ऑगस्टमध्ये दिल्लीला पोचले आणि तेथे गेल्यावर तरी त्यांनी काय केले ? नजीबखान हा सर्व अबदालीच्या कारभाराचा सूत्रधार होता. त्याचा प्रथम निकाल करणे अवश्य होते. पण त्याने मल्हाररावाचे पाय धरले व मल्हाररावाने त्याला धर्मपुत्र मानले. अंताजी माणकेश्वर, हिंगणे, बुंदेले या सर्वांनी सांगितले की नजिबाचा आधी निकाल करा. पण राघोबा व मल्हारराव यांनी ते मानले नाही. बखरकार सांगतात की पुढल्या वर्षी दत्ताजी शिंदे उत्तरेत आल्यावर मल्हाररावाने त्यास सांगितले की नजीब नाहीसा झाला तर पेशव्यांना शत्रू राहणार नाही. मग आपले काम काय ? पेशवे आपल्याला धोतरे बडवावयास लावतील ! दत्ताजीला हा प्रत्यक्ष विचार मानवला की नाही, हे सांगता येणार नाही. पण नजीबखानावर विश्वास ठेवून शेवटी त्याच्यामुळे तो बळी गेला, असा इतिहासच आहे. तेव्हा शत्रूला सांभाळून ठेवणे हे मराठ्यांतील एका पक्षाने कायमचे व्रत स्वीकारले होते. पुढे निजामाचा व हैदरचा पूर्ण पाडाव झाल्यावर दोघांनाही सांभाळण्याचे काम राघोबाने केले. हिंदुपदपातशाहीची खरी निष्ठा सर्व मराठ्यांच्या ठायी असती, तर ते कार्य खरोखरच अवघड नव्हते. पण दुही, फितुरी, बेशिस्त आणि केवळ स्वार्थ !
अटकेपार
दिल्लीचे राजकारण उरकून रघुनाथराव पंजाबात शिरला. मोगल सरदार आदिना बेग आणि शीख यांनी त्याला बोलावलेच होते. मराठे पंजाबात शिरताच अबदालीचे सुभेदार पळून गेले. तेव्हा मराठे तशीच दौड करीत अटकेपावेतो गेले. आणि तेथे त्यांनी झेंडे लावले. यासंबंधी लिहिताना नानासाहेब सरदेसाई लिहितात की 'अबदाली गेल्यावर उगाच मागाहून अटकेपावेतो गेल्याचे दाखवून अबदालीला जास्त डिवचण्याचे श्रेय मात्र त्यांनी संपादन केले.' (पेशवा बाळाजी बाजीराव २, पृ. २९५) आणि हे अगदी खरे आहे. कारण मराठे तेथून परत आल्यावर अबदालीने पंजाबातील मराठ्यांचा अंमल साफ उडवून लावला.
कर्नाटकाप्रमाणेच
अटकेपर्यंत मराठे गेल्यानंतर नानासाहेब पेशव्याने पंजाबच्या कामाचा सर्व अखत्यार मल्हाररावाकडे द्यावा आणि त्याला तेथेच राहण्यास सांगावे असा स्पष्ट हुकूम पाठविला होता. पण तो मल्हाररावाने मानला नाही. रघुनाथरावालाही वजीर, हिंगणे व इतर दरबारी लोक विनवीत होते की आपण या वेळी आता दक्षिणेत जाऊ नये, येथेच ठासून राहावे, म्हणजे अबदाली फिरून इकडे येणार नाही. खर्चाची सर्व तरतूद करण्याची कबुलायतही वजिराने लिहून दिली. पण दादाने ते मानले नाही. मल्हारराव आणि तो दक्षिणेत निघून गेले. आणि कर्नाटकचाच खेळ पंजाबात सुरू झाला. मराठ्यांनी फौजा घेऊन जावे, चौथाई वसूल करावी, काही व्यवस्था लावावी, अन् त्यांची पाठ फिरताच मुस्लिमांनी ती सर्व व्यवस्था उधळून लावावी. याविषयी लिहिताना शेजवलकर लिहितात, 'एवंच जेथे मराठ्यांचे सैन्य असेल तेथे तेवढे त्यांचे राज्य असे.' (नानासाहेब पेशवे- चरित्र, सरदेसाई, प्रकाशक- भारत गौरव ग्रंथ- माला, याची प्रस्तावना, पृ. १८) सर्व भारतात मराठयांच्या साम्राज्याची अशी स्थिती होती. मल्हारराव आणि रघुनाथराव पंजाबातच राहते तर अबदाली फिरून आलाच नसता आणि पानपत घडलेच नसते. पुढे सात आठ वर्षांनी शिखांनी अफगाणांशी लढून पंजाब स्वतंत्र केलाच. रघुनाथराव व मल्हारराव राहते तर ते या वेळीच घडून येते आणि हिंदुपदपातशाहीला काही अर्थ निर्माण झाला असता. पण त्या दोघांनाही हे आकलन करण्याची पात्रताच नव्हती !
पानपतचे कारण
रघुनाथरावाने अर्धवट टाकलेली कामे पुरी करण्यासाठी नानासाहेबाने १७५८ साली दत्ताजी शिंदे यास उत्तरेत पाठविले. जनकोजी शिंदे आधी पुढे गेलाच होता. पण दत्ताजीला नजीबखानाने अनेक महिने भूलथापा देऊन बेसावध ठेवले आणि आतून कारस्थाने करून अबदाली पुन्हा दिल्लीवर येईल अशी व्यवस्था केली. त्या वेळी झालेल्या संग्रामात दत्ताजीचा वध झाला. आणि त्यामुळेच पानपत प्रकरण उद्भवले. या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. आणि हिंदी राजकारणाला निराळेच वळण लागले. पानपतच्या अपयशातून मराठे पुढील ५-६ महिन्यांत सावरले हे खरे. पण त्यामुळे फक्त चौथाई वसूल करणे हे जे मराठी साम्राज्याचे स्वरूप ते कोणत्याही अर्थाने बदलले नाही. त्यामुळे मनात एक विचार येतो. मराठे नर्मदा ओलांडून पलीकडे कधी गेलेच नसते तर ? झाले यापेक्षा मराठी साम्राज्याचे रूप निराळे झाले असते काय ? नानासाहेब पेशव्याला शाहू महाराजांनी दोन महिने पेशवेपदावरून दूर केले होते. पण ते जबाबदारीचे पद घेण्यास दुसरा कोणीच पुढे आला नाही. त्यामुळे त्याची स्थापना त्यांनी पेशवेपदी पुन्हा केली. त्यानंतर त्याचे आसन बळकट झाले होते. तेव्हा शिंदे, होळकरादी सरदारांना उत्तरेत केव्हाही न पाठवता, सर्व दक्षिण निर्वेध करून, खरेखुरे मराठी साम्राज्य नर्मदेपासून कन्याकुमारीपर्यंत त्याने स्थापन केले असते, तर काय झाले असते ? त्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर पुढे मागे मराठ्यांना उत्तरही निर्वेध करता आली असती. पण याची बरीच चिकित्सा केली पाहिजे. पुढील लेखात, प्रथम थोडक्यात माधवरावांच्या वेळच्या मराठी साम्राज्याचे वर्णन करू, आणि मग ही चिकित्सा करू.
■