महाराष्ट्र संस्कृती/मराठेशाहीचा अंत
Appearance
३१.
मराठेशाहीचा अंत
राष्ट्रीय नीतिमत्ता
सवाई माधवराव १७९५ मध्ये मृत्यू पावला आणि १७९६ च्या डिसेंबरात दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला. तेथपासून १८१८ पर्यंतच्या बावीस वर्षांत त्याने व शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, पटवर्धन, प्रतिनिधी इ. मराठा सरदारांनी मराठेशाहीचा संपूर्ण नाश घडवून आणला. बाजीरावाइतकेच त्याचे सरदारही या विनाशाला जवाबदार आहेत. खर्ड्याला जशी निजामाविरुद्ध त्यांनी एकजूट केली, तशी केवळ लढाईपुरती जरी एकजूट त्यांनी केली असती, तरी इंग्रजांना त्यांचा पराभव करणे अशक्य झाले असते. बाजीरावाने केलेला वसईचा तह त्यांच्यापैकी कोणालाही मान्य नव्हता. तो नाकारून आपण एक होऊन मराठेशाहीचे रक्षण केले पाहिजे, इंग्रजांना हाकून लावले पाहिजे, असे प्रत्येक सरदार म्हणत होता आणि तसा प्रयत्नही करीत होता. पण त्यांना हे जमले नाही, प्रत्येकाने इंग्रजांशी वेगळी लढाई केली आणि प्रत्येक जण पराभूत झाला.
मागल्या प्रकरणाच्या अखेरीस म्हटल्याप्रमाणे मराठेशाहीचा विनाश अटळच होता. राजवाड्यांनी तेच म्हटले आहे. 'आधीच्या दोन तीन पिढ्या या राष्ट्राची राष्ट्रीय नीतिमत्ता बिघडत जाऊन बाजीरावाच्या वेळी ती पूर्ण नासून गेली होती. त्यामुळे या विनाशाचे आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही,' असे ते म्हणतात; आणि तेच खरे आहे.
वंश माहात्म्य
बाजीरावाला पेशवाई देऊ नये, असे नाना फडणिसाचे मत होते. तो मराठेशाहीचे संपूर्ण वाटोळे करील, अशी त्याला भीती होती. तेव्हा सवाई माधवरावांची बायको यशोदाबाई हिच्या मांडीवर कोणी दत्तक देऊन, त्याला पेशवा करावा असा त्याचा विचार होता. पण दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर यांना हे मान्य नव्हते. बाळाजी विश्वनाथाचा वंश हयात असताना, दुसऱ्या कोणास पेशवाई देणे युक्त नाही, असे त्यांस वाटत होते. आनुवंशाचे तत्त्व लोकांच्या किती हाडीमासी खिळले होते. हे यावरून ध्यानात येईल. छत्रपतींच्या नव्हे, तर त्याचा प्रधान पेशवा याच्या बाबतीतही लायक अशा सर्वस्वी नव्या माणसाला ते पद द्यावे, असे त्यांच्या मनातही आले नाही. बाजीरावाबद्दल त्यांना काही विशेष भक्ती होती, असेही नाही. त्याला दौलतराव शिंद्याने कैदही केले होते. पण त्या वेळी या सरदारांनी काय केले ? तर त्याचा धाकटा भाऊ चिमाजी याला पेशवा केले; इतकेच. म्हणजे वंशपरंपरेचा धागा राखायला पाहिजे ! लायकी असो नसो, बापाच्या जागी मुलगा आलाच पाहिजे. हे सर्व सरदार तसेच आपल्या पदावर आले होते. तेव्हा दुसरे काही तत्त्व त्यांच्या मनात कसे येणार !
नेता नाही
या काळातला मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब फारच वाईट आहे. मागल्या काळचा हिशेब निराशाजनकच होता. पण आधीच्या शंभर वर्षात रामचंद्रपंत अमात्य, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, नानासाहेब, माधवराव, नाना फडणीस, महादजी यांच्यासारखा सर्वांची एकजूट घडविणारा, निःस्वार्थी, काही थोडी ध्येयनिष्ठा असणारा, असा एखादा तरी पुरुष निर्माण झालेला दिसतो. पण या वीस बावीस वर्षांत तसा एकही पुरुष पुढे आला नाही. नाना फडणीस हा आधीच्या वीस वर्षांत त्या वृत्तीचा पुरुष होता. पण स्वतःच्या स्वार्थाला आणि जिवाला धोका आहे असे दिसताच इतके दिवस राष्ट्रीय संसार चालविणाऱ्या या पुरुषाने, निजाम व इंग्रज यांशी हातमिळवणी करून, त्यांची मदत मागितली ! राघोबाने तरी यापेक्षा निराळे काय केले होते ? सखाराम बापूला नानाने कशासाठी तुरुंगात घातले होते ? अधःपात याचा अर्थ असा आहे.
नियतीचे कोडे
राज्याचा संसार एकसूत्रात गोवील, लढाईपुरती का होईना, सर्व शक्ती एक कार्यवाही करील, असा १७९६ ते १८१८ या काळात एकही नेता महाराष्ट्राला मिळाला नाही, हे केवढे दुर्दैव होय ! राष्ट्राभिमानाचा आणि भौतिक विद्येचा अभाव हीच विनाशाची कारणे होत, हे खरे. पण आधीच्या काळात तसे असूनही एखादा तरी नेता, वर सांगितल्याप्रमाणे, मराठ्यांना लाभत असे, आणि तो हा संसार कसाबसा चालवीत असे. पण या काळात तसा एकही कर्ता पुरुष जन्मला नाही, हे खरोखरच दुर्दैव होय. राष्ट्राभिमान व भौतिक विद्या यांच्या अभावी मराठयांचा नाश अटळ होता. पण अशा कर्त्या पुरुषाने आणखी थोडे तरी जीवदान दिले असते. वास्तविक याच काळात मुंबईला अनेक मराठे इंग्रजांच्या सहवासात आलेले होते. जपानवर १८५४ साली परकीय संकट येताच, तेथील अनेक सरदार युरोपला गेले आणि येताना राष्ट्राभिमान आणि भौतिक विद्या आणून त्यांनी आपले राष्ट्र संघटित व बलशाली करून टाकले. तसे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथल्या कोणाही हिंदी माणसास वाटले नाही हे नियतीचे मोठे कोडे वाटते. तंजावरचा सरफोजी हा सवाई माधवरावाचा समकालीन व समवयस्क होता. इंग्रज शिक्षकांच्या हाताखाली त्याचे शिक्षण झाले होते. तो उत्तम इंग्रजी लिहीत असे. इतिहास, भूगोल, गणित या विषयांचा अभ्यास त्याने केला होता. यामुळे एक मोठे ग्रंथालय स्थापावे ही प्रेरणा त्यास झाली. कलकत्त्याला त्याच काळात राममोहन रॉय कार्य करीत होते. मुंबईला अशाच वृत्तीचे दहापाच जरी मराठे निघाले असते, आणि पुण्यास येऊन त्यांनी जपानप्रमाणे कार्य केले असते, तर त्याच वेळी लोकहितवादी, जोतिबा फुले यांसारखे पुरुष निर्माण झाले असते. लोकहितवादींनी लिहिलेच आहे की 'इंग्रजी जाणणारा एक जरी पंडित झाला असता, तरी राज्य न जाते.' त्याचा भावार्थ हाच आहे. पण सभोवार अवलोकन करून काही निष्कर्ष काढण्याचे सामर्थ्य या वेळी मराठ्यांच्या ठायी राहिले नव्हते. ही अधःपाताची अगदी परम सीमा होय !
प्रजेचीच लूट
दुसरा बाजीराव पेशवेपदावर आल्यानंतर मराठी राज्याचा विचार त्याने एक क्षणही कधी केला नाही. नाचरंग, विलास हाच त्याचा मुख्य उद्योग असे. त्यासाठी पैसा हवा. म्हणून त्याने पटवर्धन, रास्ते, प्रतिनिधी इ. सरदारांचा छळ सुरू केला. राघोबाच्या विरुद्ध असलेल्या लोकांवर त्याला सूड उगवावयाचाच होता. तेव्हा त्याने तो उद्योग आरंभिला. शिवाय सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, संतोषपट्टी, अशा अनेक पट्ट्या त्याने लोकांवर बसविल्या व पैसा उकळला. या वेळी दौलतराव शिंदे फौजेसह पुण्यालाच होता. त्याच्या फौजेचा खर्चच दरमहा २५ लक्ष होता. तो पैसा आणावयाचा कोठून ? म्हणून त्याने अनेक वेळा पुणे लुटले. सावकारांच्या घरी खणत्या लावल्या. तापल्या तव्यावर उभे करणे, अंगाला पलिते लावणे, हे त्याचे पैसे मिळविण्याचे उपाय होते. त्याचा सासरा सर्जेराव घाटगे हा तर महाभयंकर होता. पुण्याला त्याने यमपुरीच केली. नानाजवळून पैसा काढावा म्हणून त्याने त्यालाही कैद केले. दहापाच लाख दिले. पण त्याला दोन कोटी हवे होते.
वसई
याशिवाय, राजशासन असे सर्वस्वी नाहीसे झाल्यामुळे, त्या काळी, कोणीही बलदंड पुरुष हजार पाचशे लोक जमवी आणि गावेच्या गावे लुटी. पुढे पेंढारी जमात आली तिचीच ही पूर्वावृत्ती होय. यशवंतराव व विठोजी होळकर हे दोघे भाऊ तुकोजीचे दासीपुत्र. त्यातील एकाने उत्तरेस व दुसऱ्याने दक्षिणेत लूटमार, जाळपोळ सुरू केली. त्या वेळी बाजीरावाने बापू गोखले यास पाठवून विठोबा होळकरास पकडून आणले व त्याला हत्तीच्या पायी दिले. यामुळे यशवंतराव संतापून गेला आणि पुण्यावर चालून आला. त्यामुळे बावरून बाजीराव इंग्रजांकडे पळाला आणि ३१-१२-१८०२ रोजी त्याने वसई येथे इंग्रजांशी तह केला. त्या दिवशी पेशवाई संपली, तहात तैनाजी फौजेचे कलम होतेच. बाजीरावाला पेशवाईवर बसविले पाहिजे, हे कलम अर्थातच मुख्य होते. त्याप्रमार्गे आर्थर वेलस्ली- नेपोलियनचा पराभव करणारा ड्यूक ऑफ वेलिंग्टन तो हाच याने १८०३ च्या मे महिन्यात त्याला पुण्यास आणून शनिवार वाड्यात स्थानापन्न केले.
दौलतरावाचे पत्र
वर सांगितलेच आहे की बाजीरावाचे हे कृत्य त्याच्या सरदारांना मुळीच मान्य नव्हते. आर्थर वेलस्ली याने त्यांना सांगितले की बाजीराव तुमचा धनी. तेव्हा त्याने ज्या तहावर सही केली तो तुम्ही मान्य केलाच पाहिजे. पण तरीही शिंदे, भोसले, होळकर यांना ते पटले नाही आणि त्यांनी युद्धाची तयारी केली. या वेळी हे तिघेही सरदार एक झाले असते तर, इंग्रजांचा त्यांनी वडगावप्रमाणे निश्चित पराभव केला असता. पणे तसे घडले नाही. यशवंतराव होळकराने, शिंदे-भोसले यांस पत्रे लिहून, त्रिवर्ग एक झाल्यास इंग्रज भारी नाही, असे आवर्जून सांगितले. वरकरणी ते दोघे अनुकूल झाले. पण त्यांचा एकमेकांवर मुळीच विश्वास नव्हता. दौलतरावाने यावेळी बाजीरावास पत्र लिहिले की 'तूर्त होळकराचे म्हणण्यास रुकार देऊन त्यास खूष ठेवावे. इंग्रजांचे युद्ध आटोपल्यावर आपण यशवंतरावाचा चांगला समाचार घेऊ.' हे पत्र वाटेत राघोबाचा दत्तक पुत्र अमृतराव, बाजीरावाचा थोरला भाऊ, याने पकडले आणि ते जनरल वेलस्ली याजजवळ दिले. त्याने ते लगेच होळकरांकडे धाडले. ते पाहून यशवंतराव सर्द झाला आणि शिंद्यांकडे येण्यास निघाला असूनही, तसाच परत गेला. आणि पुढे शिंदे व भोसले यांचा पराभव होत असताना स्वस्थ बसून पाहात राहिला.
शिंदे-भोसले
प्रारंभी शिंदे व भोसले एक झाले होत. त्यांच्यातही वाद होतेच. गनिमी काव्याने लढावे, असे रघूजी भोसल्याला वाटत होते, तर कंपूंनी ठासून उभे युद्ध करावे, असे दौलतराव शिंद्यांचे मत होते. त्यामुळे बहुनायकी निर्माण झाली. तरी इतके खरे की असईच्या लढाईत त्यांच्या फौजा एकत्र होत्या. तरीही या अंतर्गत बेबनावामुळे, आणि मुख्य म्हणजे इंग्रजांनी दुसऱ्या सरदारास नरम केले तर चांगलेच झाले, असे सगळ्याच सरदारांना मनातून वाटत असल्यामुळे, असईला शिंदे- भोसल्यांचा पराभव झाला (२५-९-१८०३). तरीही त्यांनी दम सोडला नव्हता. म्हणून इंग्रजांनी आदगाव येथे भोसल्याचा पुन्हा पराभव केला (२९ - ११ - १८०३) आणि त्यांचा उत्तरेतील सेनापती लेक याने लासवाडी येथे शिंद्यांचा पराभव केला आणि देवगाव आणि सूरजी अंजनवाडी येथे दोघांशी स्वतंत्र तह केले.
होळकर
यानंतर मग यशवंतराव होळकर उठला. तो अतिशय पराक्रमी होता. कर्नल मॉन्सन याचा त्याने पराभव केला आणि इंग्रजांना हैराण करण्याची वेळ आणली. पण त्याजपाशी पैसा नव्हता. त्यामुळे अनेक लोक त्यास सोडून गेले. ७० हजार फौजेवरून त्याची फौज वीस हजारांवर आली आणि शंभरांपैकी वीसच तोफा शिल्लक राहिल्या. त्यामुळे तोही टेकीस आला आणि १८०५ च्या डिसेंबरात राजपूर घाट येथे इंग्रजांशी त्याने तह केला. मराठेशाही संपूर्णपणे इंग्रजांच्या कबजात गेली.
इंग्रजांचे कर्तृत्व
एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की याच वेळी इंग्रजांचे युरोपात नेपोलियनशी युद्ध चालू होते. इंग्लंडचे स्वातंत्र्य जाईल की काय, अशी भीतीही निर्माण झाली होती: पण राष्ट्रभावना, स्वातंत्र्यनिष्ठा, राजनीती या बळावर त्यांनी १८१५ साली ते युद्ध जिंकले. तेच त्यांचे गुण त्याच काळात भारतात उपयोगी पडले. एवढी दोन प्रचंड युद्धे ! हजारो मैलांच्या अंतरावर चाललेली. पण इंग्रजांना कर्त्या माणसांचा तुटवडा पडला नाही. हिंदुस्थानात आर्थर वेलस्ली, मरे, मॉन्सन, लेक, गव्हर्नर जनरल वेलस्ली सर्व एक होते. राष्ट्र हे सर्वाचे ध्येय होते. युद्धापायी त्यांनाही अफाट खर्च आला. कंपनीचा व्यापार बसण्याची वेळ आली. तेव्हा कोठे कोठे त्यांनी माघार घेतली. पण ती सर्व एका शिस्तीने, एका धोरणाने ! अशा इंग्रजांपुढे शतधा भंगलेल्या हिंदी समाजाचा निभाव लागणे शक्यच नव्हते.
बोलणी आणि करणी
१८०५ च्या सुमारास शिंदे, होळकर व भोसले यांचे पराभव झाले. त्यानंतर मराठेशाहीचा अंत १८१८ मध्ये होईपर्यंत मध्यंतरी तेरा वर्ष गेली. या काळात इंग्रजांचे राज्य कोणासही नको होते. स्वतः पेशवा आणि गायकवाड, भोसले, होळकर व शिंदे यांना इंग्रजांची बंधने- जवळ जवळ कैदच- अगदी दुःसह झाली होती. आणि प्रत्येक जण या कैदेतून सुटण्याचा प्रयत्न करीत होता. प्रत्येकाच्या राजधानीत व प्रदेशात अनेक कारस्थाने शिजत होती. इंग्रजांना हाकून काढावे, स्वतंत्र व्हावे आणि मराठेशाहीचे रक्षण करावे, असे सर्वांच्या मनात होते. पण त्यासाठी अवश्य असणारे कर्तृत्व कोणाच्याही ठायी नव्हते. त्यांच्यांत परस्परांविषयी हेवेदावे तर होतेच, पण त्या त्या घराण्यातून भावाबंदांत त्यापेक्षा जास्त तीव्र असे मत्सर, वितुष्टे आणि हेवेदावे चालू होते आणि एक दुसऱ्याचा काटा काढण्यास सदैव टपलेला असे. तोंडी भाषा मात्र इंग्रजांचा काटा काढण्याची होती. गायकवाड, भोसले, होळकर आणि शिंदे हे मराठा सरदार आणि स्वतः बाजीराव पेशवा हे मराठेशाहीचे आधारस्तंभ ! त्यांचे या दहाबारा वर्षांतले उद्योग पाहून मन उद्वेगून जाते. इंग्रजांना हाकलून देऊन स्वतंत्र होण्याची तोंडी भाषा आणि उद्योग मात्र पावलोपावली आत्मघाताचा ! असे हे या काळातले मराठेशाहीचे चित्र आहे.
दुबळे वारस
गोविंदराव गायकवाड हा गुजराथचा सेनाखासखेल. तो १८०० साली मृत्यू पावला. इतर सरदारांप्रमाणे त्याला औरस व अनौरस मुलगे पुष्कळ होते. सरदेसायांच्या मते यामुळेच मराठशाहीचा घात झाला. पण सर्व संतती औरस असती तरी काही निराळे झाले असते असे काही नाही. गोविंदरावाचा वारस आनंदराव हा दुबळा व निःसत्त्व असा होता. या वेळी नियतीने मोठी करामतच केली. नागपूरकर रघूजी भोसले याचा मुलगा परसोजी हा असाच दुबळा, नेभळा व शून्य होता. यशवंतराव होळकरांचा वारस अगदी अल्पवयी. दौलतराव शिंदे याच्या कर्तृत्वाचा उजेड आपण पाहिलाच आहे; आणि शेवटी दुसरा बाजीराव ! पाचही घराण्यांतील वारस हे याप्रमाणे शून्य व नादान होते. मराठेशाहीचा अंत घडवून आणणे त्यांना काय अवघड होते !
बडोदा-गुजरात
आनंदराव गायकवाड कारभार करू लागताच गोविंदरावाचे अनौरस पुत्र कान्होजी आणि मल्हारराव यांनी बंडावे सुरू केले. या वेळी बडोद्यास अरबांचे प्राबल्य फार माजले होते. या काळाच्या आधी जवळ जवळ वीस वर्षे प्रत्येक सरदाराचे जवळ अरब, पठाण, पुरभय्ये यांच्या फौजा बऱ्याच प्रमाणात असत. शरीररक्षक तर प्रत्येकाचे अरबच असत. मराठ्यांवर त्यांचा तसा विश्वासच नव्हता. खुद्द नाना फडणिसाचे शरीररक्षक अरब होते व त्याच्या वाड्याचे पहारेकरीही अरबच होते. गायकवाडीत याच्या दसपटीने हे झाले होते. त्यामुळे आनंदराव गायकवाडाला अरबांना हाकून लावण्यासाठी इंग्रजांची मदत घ्यावी लागली. इंग्रज यासाठी तयारच होते. निमंत्रणाप्रमाणे मुंबईहून वॉकर नावाचा सेनापती दोन हजार फौज घेऊन आला व त्याने अरब, कान्होजी इ. सर्वांच्या बंडखोरीचा बंदोबस्त करून आनंदरावाचा जम बसवून दिला आणि खर्चाच्या मोबदल्यात सुरत परगणा ताब्यात घेतला ! या वेळी (१८०२) आनंदराव गायकवाडने स्वदस्तूरचे पत्र लिहून दिले की 'मेजर वॉकर यांचा हुकुम यापुढे सर्वांनी मानावा. आम्ही स्वतः जरी त्यांच्या विरुद्ध काही लिहिले, तरी ते कोणी मानू नये, इतर कोणी काही केल्यास इंग्रजांनी त्याचा बंदोबस्त करावा,' असा हा सर्वग्रासी अधिकार इंग्रजांना मिळाला. आणि तो गायकवाडाने आपल्या सहीनेच दिला. यामुळे गायकवाडांवर इंग्रजांची भयंकर मगरमिठी बसली. ती त्यांना दुःसह झाली. आपण खरेखुरे पेशव्यांचे नोकर ही त्यांना आता आठवण झाली. तेव्हा, आपल्याला या जाचातून सोडावावे अशा विनवण्या करण्यासाठी, त्याने आपले वकील पेशव्याकडे पाठविले. गायकवाडांकडे पेशव्याने या वेळी तीन कोटींची बाकी दाखविली आणि तिचा आधी फडशा करा असे बजावले !
इंग्रजी सत्ता
याच वेळी गंगाधरशास्त्री पटवर्धन हा इंग्रजांचा हस्तक गायकवाडीत होता. तो वित्तंबातमी इंग्रजांस पोचवीत असे. त्यामुळे तो तेथे कोणालाच नको होता. म्हणून १८१४ साली त्याला हिशेबाची तडजोड करण्यासाठी गायकवाडाने, इंग्रजांच्या मार्फतीने, पुण्यास पाठविले. पण या वेळी पुण्यास पेशव्याच्या दरबारी त्रिंबकजी डेंगळे याचे फार मोठे प्रस्थ होते. त्याने कारस्थान करून पंढरपूरच्या देवळात गंगाधरशास्त्री याचा १८१५ साली खून करविला. अर्थात इंग्रज यामुळे अतिशय संतापून गेले आणि गायकवाड यांचा सर्व संबंध तोडून टाकून त्यांनी गायकवाडास सर्वस्वी आपल्या सत्तेखाली घेतले.
नागपूर - भोसले
आता नागपूरची कथा. रघूजी भोसले (दुसरा) १८०४ साली पराभूत झाल्यावर देवगावचा तहा आटपून नागपुरास परत आला. नंतर पैका हवा म्हणून त्याने स्वतःच्या रयतेसच लुटून पैका उभा केला ! येथे एक ध्यानात ठेवले पाहिजे की पेशव्यासकट वरील सर्व सरदार या काळात स्वतःच्या प्रजेस वाटेल तशी लुटीत असत. इंग्रजांनी त्यांस बांधून टाकल्यामुळे पैसा मिळविण्याचा त्यांचा मुलूखगिरी हा मार्ग बंद झाला होता. तेव्हा स्वतःच्या प्रजेस व सावकार, सधन शेतकरी यांना लुटणे हा मार्ग त्यांनी पत्करला होता. पेंढारी लोकांना लुटीत ते निराळे. येथे धनीच तिला लुटीत असत. रघूजी १८१६ मध्ये मृत्यू पावला. तोपर्यंत त्याने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली नव्हती. पण तो जाताच त्याचा पुतण्या अप्पासाहेब याने इंग्रजांकडे वशिला लावला आणि तैनाती फौजेची अट मान्य करून, स्वतः नागपूरचा कारभार मिळविला. त्या वेळी रघूजीचा मुलगा परसोजी अंथरुणास खिळला होता. त्याचा त्याने खून करविला आणि सरदारी मिळविली. त्यानंतर इंग्रजांची गरज नाही असे मानून, तो इंग्रजांविरुद्ध उठला. पण सीताबर्डीच्या लढाईत त्याचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांजवळ फक्त १४०० लष्कर होते. आणि आप्पासाहेबाजवळ २० हजार होते. पण पराभव त्याचाच झाला व पुन्हा तो इंग्रजांच्या स्वाधीन झाला. बंडखोरीची क्षमा करून रेसिडेंट जेंकिन्स याने पुन्हा त्यास सेना-साहेब-सुभा हे पद दिले. पण त्यानंतरही आप्पासाहेब स्वस्थ बसला नाही. गुप्तपणे त्याने बाजीरावाकडे वकील पाठवून, त्यास फौज घेऊन नागपुरास येण्याचे निमंत्रण दिले. या बातम्या रेसिडेंट जेंकिन्स यास कळत होत्या. त्याने लगेच अप्पासाहेबास कैद करून पदच्युत केले. पण कैदेतून निसटून जाऊन त्याने पुष्कळ दिवस दंगा चालविला होता. जोधपूरच्या राजाने त्यास साह्यही केले. पण अंती फलनिष्पत्ती काहीच झाली नाही आणि अशा वनवासातच आप्पासाहेबाचा अंत झाला. तो नागपुराहून जाताच रघुजीची स्त्री दुर्गाबाई हिच्या मांडीवर दत्तक देऊन तेथला सर्व कारभार इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. अशा रीतीने या दुसऱ्या सरदारीची वाट लागली. त्यांच्या कोणाच्या मनात खरोखरच मराठेशाहीची चिंता असती, तर मध्यंतरी पुष्कळ वेळ होता. पण तशी लायकी कोणातच नव्हती. सीताबर्डीच्या लढाईची वार्ता सर्वत्र पसरताच इंग्रज सेनापती कर्नल गहन नर्मदेवर होता, तो धावत नागपुरास आला. उमरावतीहून मेजर पिटमन आला. जाफराबादेहून डोव्हटन आला. पण आप्पासाहेबाने निमंत्रणे कर-करूनही त्याच्या मदतीस कोणी आले नाही ! इंग्रज हा एक समाज होता आणि मराठे हे सर्व एकाकी होते. ते म्हणजे एक समुदाय होता.
इंदोर - होळकर
यशवंतराव होळकराच्या मृत्यूनंतर त्याची रक्षा तुळसाबाई हिने आपल्या सवतीचा मुलगा मल्हारराव याची पदावर स्थापना करून कारभार चालविला. अमीरखान हा त्या वेळी लष्कराचा प्रमुख असून त्याच्याच शब्दाने कारभार चालत असे. गफूरखान, रामदीन, जालीम सिंग, कोटेकर हे इतर सरदार होते आणि धर्माकुवर, बाळाराम शेट व तात्या जोग हे कारभारी होते. या वेळी बाजीरावाशी संधान बांधून इंग्रजांवर उठण्याचा या होळकरी सरदारांचा विचार पक्का झाला होता. तात्या जोग याने त्याविरुद्ध सल्ला दिला, म्हणून त्याला तुळसाबाईने कैद केले. तुळसाबाई ही दुर्वर्तनी आणि अतिशय क्रूर होती. तिने १८११ मध्ये धर्माकुवरचा आणि १८१५ साली वाळाराम शेटचा खून करविला. हे दोघेही यशवंतरावाचे हाताखाली तयार होऊन चांगले कर्तबगार झाले होते. १८१७ च्या जूनमध्ये बाजीरावाचा इंग्रजांशी नवीन तह झाला आणि त्यानंतर त्याने इंग्रजांवर उठाव करण्याचे ठरविले व तसे होळकरांकडे गुप्तपणे कळवून, त्यास दक्षिणेत पाचारिले. या वेळी इंग्रजांनी पेंढाऱ्यावर मोहीम चालविली होती. त्यातील सीतू यास होळकराच्या गफूरखानादी सरदारांनी आपल्यात सामील करून घेतले आणि पुण्याहून उठाव झाला आहे, तर आपण पेशव्याला मिळालेच पाहिजे, असे ठरवून त्यांनी आपल्या फौजा बाहेर काढल्या. या वेळी मालकम या इंग्रज सरदाराने तुळसाबाईकडे वकील पाठवून, शिद्यांप्रमाणे तुम्ही आमच्याशी तह करा असे बोलणे चालविले व पेंढाऱ्यांस तुम्ही आश्रय देता कामा नये असे बजावले. या वेळी तुळसाबाईची खात्री झाली की इंग्रजांचा आश्रय केल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही. म्हणून तिने बोलणे चालू ठेवले. पण लष्करी प्रमुख गफूरखान, रामदीन यांना आताच सोक्षमोक्ष करावा, असे वाटत असल्यामुळे त्यांना हे पसंत पडले नाही व त्यांनी तुळसाबाईचा खून करून तिचे प्रेत नदीत फेकून दिले. तेव्हा इंग्रजांचा होळकरांवर चाल करण्याचा निश्चय झाला. प्रथम त्यांनी एक मोठी गोष्ट केली. ती म्हणजे होळकरांचा प्रमुख सरदार, त्यांचा आधारस्तंभ, अमीरखान यास फितविले व टोके ही जहागीर घेऊन तोही स्वस्थ बसला. मग मालकम आणि हिस्लॉप यांनी क्षिप्रेच्या काठी होळकरी फौजेवर हल्ला चढवून तिचा महीदपूर येथे पराभव केला. आणि नंतर मल्हाररावाची आई व तात्या जोग यांना पुढे करून मंदसोर येथे त्यांच्याशी तह केला. तहात तैनाती फौजेची अट होतीच. इंग्रजांचा ताबा मल्हाररावाने कबूल करावा, अमीरखानाशी स्वतंत्र तह केल्यामुळे त्यास काढून लावावे, अशा आणखी अटी होत्या. ६ जानेवारी १८१८ रोजी तहावर सह्या झाल्या आणि होळकरांचे राज्य संपुष्टात आले. या वेळी रजपूत राजांनीही स्वतंत्रपणे इंग्रजांशी तह करून आपापली व्यवस्था लावून घेतली. त्यामुळे शिंदे व होळकर यांचा त्यांच्यावरील हक्क साफ बुडाला.
या वेळी दौलतराव शिंदे याने होळकरास मदत केली असती तर ? १८१५ साली यशवंतराव होळकराची स्त्री मैनाबाई ही स्वतः होळकरांचा कारभार पाहात होती. तिने दौलतरावाशी चढावाचा व बचावाचा गुप्त तह केला होता. पेशव्याशी एकनिष्ठ राहून इंग्रजांविरुद्ध लढा करावयाचा, असा त्याचा आशय होता. पण दौलतरावास होळकरांची सर्व दौलत गिळकृत करावयाची होती. त्यामुळे त्याने त्या तहाप्रमाणे मुळीच वर्तन केले नाही !
विश्वास कोणावर ?
अमीरखान हा होळकरांचा अनेक वर्षांचा एकनिष्ठ सरदार. पण त्यानेही आयत्या वेळी दगा दिला. का ? त्याला वाटे, युद्धात पराभव झाल्यावर पुढे काय ? आपल्याला शाश्वती कशाची? ही चिंता मराठेशाहीच्या आरंभापासून प्रत्येक सरदाराला वाटे. छत्रपती शाहू यांनी अनेक सरदारांना वतनाच्या सनदा दिल्या होत्या. पण त्या सनदांवर ते सरदार निजामाचा महीशिक्का घेत. तो मिळाल्यावर त्यांना शाश्वती वाटे. निश्चितता येई. खुद्द मल्हारराव होळकर याने माळव्यातील पेशव्याकडून मिळालेल्या सनदांवर, दिल्लीच्या बादशहाचा सहीशिक्का घेतला होता. अनेक सरदारांची आरंभापासून शेवटपर्यंत हीच वृत्ती होती. निजाम, दिल्लीचा पातशहा–ते दुबळे झाल्यावरही-यांवर त्यांचा विश्वास जास्त, छत्रपती किंवा पेशवे यांवर कमी. त्यांच्या सनदांविषयी शाश्वती नाही, निजाम, बादशहा, यांच्याविषयी आहे. आता तोच भाव त्यांच्या मनात इंग्रजांविषयी दसपट जास्त बळकटीने निर्माण झाला होता. काय वाटेल ते होवो, मराठीशाहीचे रक्षण करावयाचे, असा भाव कोणाच्याच मनात नव्हता. प्रारंभी शिवछत्रपतींनी अशी थोडी निष्ठा निर्माण केली होती. पण पुढे ती टिकली नाही. प्राणार्पण करूनही रक्षण करण्याजोगे काही आहे, स्वातंत्र्य, धर्म ही अशी काही मूल्ये आहेत, हा भाव पुढे मराठेशाहीत राहिलाच नाही. स्वार्थ, दौलत, शाश्वती, सुरक्षितता यांकडे सर्वांचे लक्ष. अमीरखानही याला अपवाद नव्हता. त्याने टोक्याची जहागीर इंग्रजांकडून घेऊन पुढची तरतूद करून ठेवली आणि होळकरांना वाऱ्यावर सोडून दिले. दोलतरावाने हेच केले, मग अमीरखानाला कशाला नावे ठेवावयाची ?
एलफिन्स्टनचे मत
वरील महीदपूरच्या लढाईत इंग्रजांनी होळकरांचा पराभव केल्यावर इंग्रजांशी पुन्हा म्हणून युद्धप्रसंग आणावयाचा नाही असा दौलतराव शिंदे यांनी दृढ निश्चय केला ! त्या आधी त्याला मोठा हुरूप होता. १८१४-१८१५ हे वर्ष मराठ्यांना फार अनुकूल होते. इंग्रज युरोपात नेपोलियनकडे गुंतले होते. आणि हिंदुस्थानात त्यांचे नेपाळशी युद्ध चालू होते. तेथे त्यांचा सारखा पराभव होत होता. त्या वेळी शिंद्याने नेपाळच्या राजास पत्र पाठवून, 'दोघे मिळून इंग्रजांचा काटा काढू' असे बोलणे चालविले होते. हेच पत्र इंग्रजांनी पकडून, काही भाष्य न करता त्याच्याच हवाली केले. 'या वेळी मराठ्यांनी जोर केला असता तर आमचे काही चालले नसते,' असे एलफिन्स्टननेच लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, 'बाजीरावाच्या नेभळट स्वभावामुळे मराठे यशस्वी झाले नाहीत. फौजा, पैसा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इ. सिद्धता त्यांच्याकडे या वेळी होती. पण दक्षिणेत बाजीरावाने व उत्तरेत शिंद्याने हिंमत दाखवली नाही. उलट त्यांनी राष्ट्रद्रोह केला, असे म्हणावे लागते.' हा उतारा देऊन सरदेसायांनी म्हटले आहे, 'थोडीशी दूरदृष्टी किंवा स्फूर्ती दौलतरावाच्या अंगी असती तर, समान धर्माच्या रजपुतांस जोडून घेऊन, इंग्रजांशी सामना देण्याचे सामर्थ्य त्यास आले असते. पण त्याने काही केले नाही. तो अनुभवाने काही एक शिकला नाही आणि पूर्वीचे नाद त्याने सोडले नाहीत.' (मराठी रियासत, उत्तर विभाग ३, पृ. ४३३, ४३४). दौलतरावास पतंग उडविण्याचा नाद होता. सरदेसायांनी म्हटले आहे, पतंगाच्या अल्पांशाने जरी त्याने राज्यकारभाराकडे लक्ष दिले असते, तरी कार्य झाले असते. पण पतंग, शिकार, नाचरंग, विलास यांतच त्याचे सर्व लक्ष होते. आणि केलाच उद्योग तर होळकर, रजपूत यांना लुटणे हा करावयाचा, असा त्याचा निश्रय होता.
पेंढारी
तैनाती फौजेने रक्षण करावयाचे असे ठरल्यामुळे, सर्व मराठे सरदार हळूहळू नाच- रंग, विलास यांत मग्न होऊन गेले. पण यातूनच एक नवीन प्रकरण उद्भवले. ते म्हणजे पेंढारी. तसे पेंढार प्रारंभापासून मराठा लष्करावरोवर असे. पण आता शिंदे, गायकवाड, भोसले, होळकर यांना सैन्य कमी करावे लागले. त्यामुळे बेकार झालेले शिपाई पेंढारी बनले आणि पंजाबपासून आंध्र, तेलंगण येथपर्यंत ते सर्वत्र जाळपोळ विध्वंस, लूट करू लागले. सर्व मराठ्यांनी त्यांच्याशी जवळचे, आपुलकीचे नाते ठेवले होते. इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असे त्यांना वाटत होते. पण हा भ्रम होता. पैसा, लूट एवढेच पेंढारी जाणत होते. कसल्याही निष्ठा त्यांना नव्हत्या. त्यामुळे हिंदुस्थानावर ते एक संकट आले होते. १८१७ ते १८१८ या वर्ष तीन चार इंग्रज सेनापतींनी त्यांची काेंडी करून त्यांचा नाश केला. तेव्हा सर्वांना हायसे वाटले. कारण या वेळी आधीच हिंदुस्थानात सर्वत्र अराजक माजले होते. त्यात पेंढाऱ्यांची ची भर. त्यामुळे सर्वांना त्राही भगवान, असे झाले होते. इंग्रजांचे राज्य सर्व हिंदुस्थानातील प्रजाजनांनी सुखाने का स्वीकारले ते यावरून कळून येईल.
गायकवाड, भोसले, होळकर व शिंदे, यांच्या कर्तृत्वाचा, १८०५ ते १८१८ या काळातल्या मराठेशाहीच्या संरणाच्या दृष्टीने, आणि मराठ्यांच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने येथवर विचार केला. आता या सर्वांचा नायक जो बाजीराव त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.
मराठ्यांची नीती
इंग्रजांनी सर्वांचा आटोप केला असल्यामुळे मराठ्यांना आता मुलूखगिरी हा उद्योग करणे शक्य नव्हते. मग त्यांनी काय करावयाचे ? नाचरंग, विलास याला पैसा कोटून आणावयाचा ? स्वतःचे सरंजामदार आणि स्वतःचे प्रजानन यांना लुटावयाचे, एवढाच उद्योग त्यांना शक्य होता. तो त्यांनी आरंभिला. प्रतिनिधी हा बाजीरावाचा सरदार. तो अत्यंत दुर्वृत्त व नादान होता. आपल्याच मुलखात तो दंगे दरोडे करू लागला. रमा तेलीण ही त्याची रक्षा होती. तिच्या नादाने तो वागत असे. त्याच्या बायका भीतीने त्याच्यापासून पळून गेल्या. या प्रतिनीधीचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीरावाने बापू गोखले यास पाठविले. त्याने चालून जाऊन प्रतिनिधीस कैद केले. तेंव्हा बाजीरावाने त्याचा सरंजाम गोखले यास दिला. पण मग त्यानेही प्रजेस नागवून अपार द्रव्यसंचय केला ! प्रजासुखे सुखं राज्ञः । असा भारतीय प्राचीन राजनीतीचा दंडक होता. आता प्रजेला नागविणे हाच मराठ्यांचा धर्म झाला.
हस्तक्षेप
प्रतिनिधीचा बंदोवस्त झाल्यावर पटवर्धन, रास्ते, निमोणकर, पानसे यांचे सरंजाम बाजीराव लुटू लागला. त्रिंबकजी डेंगळे हा या वेळी बाजीरावाचा प्रमुख कारभारी होता. प्रथम तो हुजऱ्या होता. पण हळूहळू चढत जाऊन तो कारभारी झाला. त्याच्याच सल्ल्याने बाजीरावाने हा उद्योग सुरू केला होता. इंग्रजांची तैनाती फौज नसती तर, पटवर्धन, पानसे या सरदारांनी बाजीरावास पदच्युतच केले असते. पण ती असल्यामुळे त्यांचा काही इलाज चालेना. शेवटी पुण्याचा रेसिडेंट एल्फिन्स्टन याकडे त्यांनी तक्रारी केल्या. अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करावयाचा नाही अना इंग्रजांचा दण्डक होता. पण एल्फिन्स्टनने तो मानला नाही. कारण बाजीरावाच्या छळाचा अतिरेक झाला होता. तेव्हा पंढरपुरास सर्व सरदार व बाजीराव यास जमवून, त्याने १८१२ साली त्यांच्यांत नवा तह घडवून आणला आणि बाजीरावाचा सरंजामदारांवरचा सर्व हक्क साफ नाहीसा केला. पुढे १८१७ साली शिंदे, भोसले इ. मोठ्या सरदारांवरचा पेशव्याचा हक्क इंग्रजांनी असाच नाहीसा केला व त्यास एकाकी करून टाकले.
इंग्रजांचे निशाण
१८१४-१५ हे साल इंग्रजांस कठीण होते, हे वर सांगितलेच आहे. या वेळपर्यंत त्रिंबकजी डेंगळे हा बाजीरावाच्या कारभारात प्रमुख झाला होता. एलफिन्स्टनकडे जा ये तोच करीत असे. तेथे तो फार ताठ्याने वागे. आणि परत येऊन, इंग्रजांत काही अर्थ नाही, मी तुम्हांस पूर्वीचे वैभव प्राप्त करून देतो, असे बाजीरावास सांगे आणि त्याला ते खरे वाटे. या वेळेपासूनच त्याने सैन्याची जमवाजमव करण्यास प्रारंभ केला आणि पेंढाऱ्यांशीही संधान बांधले. त्यांच्या व बाजीरावाच्या भेटीही घडविल्या. आणि याच संधीत, त्याने १८१५ च्या जुलैमध्ये गायकवाडांचा वकील गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून करविला. त्रिंबकजीला उखडण्याची संधीच एल्फिन्स्टन पाहात होता. त्याने बाजीरावास दरडावले की त्रिंबकजीस आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आम्ही वाड्यावर चाल करू. बाजीरावाचा नाइलाज झाला. शेवटी त्याला त्रिंबकजीला इंग्रजांच्या स्वाधीन करावे लागले. त्यांनी त्याला तुरुंगात ठेवले. पण तेथून तो वर्षभराने निसटला आणि बाजीरावाला गुप्तपणे भेटून युद्धाची तयारी करू लागला. ५-११-१८१७ रोजी खडकीस लढाई झाली, बाजीराव लढाईस कधीच जात नसे. तो पर्वतीवर होता. तेथून तो पळाला. तेव्हा बारा दिवसांनी १७-११-१८१७ रोजी पुणे व शनिवारवाडा ताब्यात घेऊन इंग्रजांनी बाळाजीपंत नातू याच्या हस्ते शनिवार- वाडयावर इंग्रजांचे निशाण लावले !
पेशवाईचा अस्त
बाजीराव पळाला, त्याच्या पाठलागावर असताना कोरेगाव येथे त्याची इंग्रजांशी दुसरी लढाई झाली (१ जाने. १८१८) . तेथूनही तो पळाला. तेव्हा अष्टीला २०-२-१८१८ रोजी तिसरी लढाई झाली. तीत बापू गोखले पडला. शेवटी बाजीरावाला धूळकोट येथे इंग्रजांनी २-६-१८१८ रोजी पकडले. त्याने शरणागती पतकरली. तेव्हा त्याचे राज्य खालसा करून इंग्रजांनी त्याला ब्रह्मावर्तास नेऊन ठेवले. तेथे तो १८५१ साली मृत्यू पावला.
पेशवाईचा उदय कसा झाला ते आपण मागे पाहिले. आता तिच्या अस्ताचा इतिहास पाहिला. दुर्दैव असे की अस्त फारच शोचनीय असा आहे. बाळाजी विश्वनाथाचा वंश म्हणून बाजीरावास गादीवर आणण्याचा आग्रह सरदारांनी धरला. पण बाळाजी विश्वनाथाच्या शतांशही कर्तबगारी त्याच्या ठायी नव्हती. नानासाहेब सरदेसायांनी दोनतीन ठिकाणी लिहिले आहे की उत्तर काळात त्याला कधीही आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाला नाही. ती तेहतीस वर्षे त्याने अगदी ख्याली- खुशालीत घालविली.
राज्य खालसा
मराठेशाहीचे मुख्य धनी छत्रपती. पेशवाईच्या अस्तकाळी प्रतापसिंह गादीवर होते. ते जवळ जवळ बाजीरावाच्या कैदेत होते. खडकीच्या लढाईपासून पळत सुटलेल्या बाजीरावाने त्यास आपल्याबरोबर घेतले होते. छत्रपतींच्या ठायी कर्तृत्व नव्हते, पण ती एक पुण्याई होती, हे इंग्रज जाणीत होते. त्यामुळे त्यांना पेशव्यापासून अलग करण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता. अष्टीच्या लढाईनंतर प्रतापसिंह इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तेव्हा, आम्ही त्यांचे सरदार, असे म्हणविणारे अनेक लोक बाजीरावास सोडून गेले. हा इंग्रजांचा कावा ! छत्रपतींना दूर केल्यावर १८१८ च्या एप्रिलात इंग्रजांनी त्यांना सातारच्या गादीवर बसविले. त्या वेळी सर्व मराठी राज्य आपल्या ताब्यात बेईल, असे प्रतापसिंहाना वाटत होते. पण एका जिल्ह्याएवढेच राज्य इंग्रजांनी त्यांना दिले. ते १८३९ पर्यंत. त्या साली फितुरीचा आरोप ठेवून, त्यांना त्यांनी काशीस नेऊन ठेविले आणि त्यांचा भाऊ शहाजी यास गादी दिली. आणि दत्तकास परवानगी नाही, म्हणून १८४८ साली त्याचेही राज्य खालसा केले. आणि मराठेशाहीचा निखालस अंत झाला.
मराठेशाहीचा अंत अत्यंत शोचनीय प्रकारे झाला हे खरे. सर्व मराठ्यांनी शेवटी एक जबरदस्त लढा दिला असता, आणि त्यात पराभव पावून मराठेशाहीचा शेवट झाला असता, तर तो पराभवही मराठ्यांना भूषणावह ठरला असता. पण तसे झाले नाही. स्वार्थ, विलास, दुही यांनी सर्व सरदार ग्रासलेले होते. त्यामुळे पराक्रम असा शेवटी झालाच नाही. ही मोठी लाजिरवाणी गोष्ट घडली.
इतिहासातील कार्य
तरीही मराठे व मराठेशाही हे नाव भारताच्या इतिहासात अमर होऊन राहिले आहे, हेही खरेच आहे. आणि त्याचे कारण म्हणजे शिवछत्रपतींनी केलेली क्रांती हे होय. पूर्वी महाराष्ट्रभूमीत स्वतंत्र राज्ये होती. पण ती सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा घराण्यांची होती. त्यांतील अनेक राजे थोर होते, पराक्रमी होते, प्रजा- हितदक्ष होते. पण राज्य समाजाचे आहे असा भाव जनतेत त्या वेळी नव्हता. शिवछत्रपतींनी तो निर्माण केला. त्यांचे राज्य हे भोसल्यांचे नव्हते. ते महाराष्ट्र राज्य होते. आणि लोकही अभिमानाने तसे म्हणत असत. 'मराठा तितुका मेळवावा' हे तत्त्व समर्थांनी याच अर्थाने सांगितले होते. यामुळे सर्व महाराष्ट्रभर आपण मराठे आहो, ही एक नवीन अस्मिता निर्माण झाली आणि अल्पावधीत हे लोक पराक्रम करीत सर्व हिंदुस्थानभर पसरले. घराण्याच्या राज्याऐवजी लोकांचे राज्य व्हावे असा जो शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, त्यातून हे सर्व चैतन्य निर्माण झाले होते.
दुर्दैवाने ती मूळ भावना त्यांच्या मृत्यूनंतर ढिली झाली. आणि शेवटपर्यंत आपण सर्व मराठे आहो, अशी भाषा सर्वाच्या तोंडी असली तरी, तिच्याशी निगडित असलेला आशय कोणाच्याही मनात नव्हता. त्यामुळे ते चैतन्य नष्ट झाले व मराठेशाहीचा अंत झाला.
विनाशाचे कारण
मराठेशाही कशाने बुडाली याची चर्चा न. चिं. केळकर, सरदेसाई, राजवाडे, खरेशास्त्री इत्यादी थोर इतिहास पंडितांनी केली आहे. राष्ट्रभावना नाही, शिस्त नाही, एकजूट नाही, ध्येयनिष्ठा नाही, हीच कारणे बहुतेकांनी सांगितली आहेत. त्याविषयी येथे चर्चा करण्याचा विचार नाही. कारण प्रत्येक प्रकरणात ती जागोजागी केलेलीच आहे आणि साहित्य, कला, विद्या, धर्म, अर्थ इ. संस्कृतीच्या अंगांची आणखी एकदोन लेखांत जी चर्चा करावयाची आहे तीत ते विवेचन पुनः पुन्हा येईलच. येथे फक्त तिचा सारार्थ वर दिला आहे. 'आम्ही मराठे' ही जी नवी अस्मिता शिवसमर्थांनी निर्माण केली होती, तिची जपणूक व जोपासना पुढे कोणी केली नाही, हे मराठेशाहीच्या नाशाचे प्रधान कारण आहे.
■