महाबळेश्वर/स्मशानें.

विकिस्रोत कडून



स्मशानें.
--------------

 अनित्यानि शरीराणि वैभवं नैव शाश्वतं ॥ "  नित्यः संनिहिते मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥ १ ॥

 येथें हिंदु, सुसलमान, पारशी व साहेब लोक यांची निरनिराळ्या ठिकाणीं स्मशानें आहेत, तेथें या जातींचे सर्व लोक जातिधर्माप्रमाणें प्रेतसंस्कार करितात. त्यास लागणारे सामानही येथें तयार मिळतें. तेव्हां या हवाशीर ठिकाणीं सुखाकरितां येऊन राहिलेल्या लोकांपासून प्रेत संस्काराचा, येथील व्यापारी लोक फायदा मिळविण्यास सोडीत नाहींत. यावरून इंग्रजीमध्यें मनुष्याच्या जीवित्वास समुद्रावरील *जहाजाची उपमा दिली आहे ती रास्त आहे असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. कारण जसे जहाज केव्हां बुडेल याचा नेम नाहीं, तसाच मनुष्याचा आत्मा केव्हां व कोठे कुडी सोडून जाईल याचा

--------------

 *Life is but a ship in the Ocean. '  भरंवसा नसतो. या कारणास्तव या आरोग्यवर्धक ठिकाणींही अनिष्ट व प्राणहारक घाले पडतात. त्याबरोबर टक्कर देण्यास आपण तयार असलें पाहिजे.

 वेण्णातलावाचे उगमाजवळ हिंदूंचें स्मशान आहे त्यांत दहनविधि किंवा भूमिगतविधि करण्याचे संस्कार जातिधर्माप्रमाणें करण्यांत येतात. मुसलमान लोकांची वस्तीच्या ठिकाणीं सोईप्रमाणें दोन ठिकाणीं स्मशानें आहेत. एक सातारा रोडकडील व्ह्यू व्हॅलीच्या लवणांत आहे व दुसरें सुमारें ६ मैलावर लिंगमळा बागेस लागून आहे. या ठिकाणीं जास्त भरणा धावड जातीच्या मुसलमान लोकांचा असल्यामुळे मूठमातीस जाण्याचा त्यांचा समारंभ पेठेतून नजरेस आल्यावांचून राहत नाहीं. प्रेत जमिनींत पुरण्याचा यांचा शिरस्ता आहे.

पारशी लोकांचें स्मशान.

 वेण्णा तलावानजिक पेटिट रोडला लागून आहे. तेथें साहेब लोकांप्रमाणेंच पेटींत घालून हे प्रेत पुरून टाकितात. जातिधर्माप्रमाणें वास्तविक हा यांचा संस्कारविधि नाहीं. यांचा विधि अगदींच निराळा आहे. ते करण्यास येथें टावर आफ सायलेन्स बांधिलेला नसलेमुळे व साताऱ्याखेरीज दुसरे ठिकाणीं पाठवून भागण्यासारखे साधनांचा अभाव असलेमुळे त्यांचा नाइलाज आहे.

साहेब लोकांचें स्मशान.

बाजारापासून महाडरस्त्याचे सडकेच्या डावे बाजूस पावमैलावर हें टायगर पाथ रस्त्याचे अलीकडे आहे. यांत मुसलमानांच्या थडग्याप्रमाणेंच थडगीं आहेत, परंतु हीं फार व्यवस्थितपणें एका मोठया दगडी कपौंडांचे मर्यादेंत आणून ठेविलीं आहेत. हें कपौंड काळ्या घडीव दगडांनीं कमानीवजा खण करून बांधलें आहे. त्यांत जाण्यास एक फाटक ठेविलें आहे. आंत गेल्यावर सर्व थडगीं संगमरवरी दगडांनीं व दुसऱ्या घोटीव आरशाप्रमाणें स्वच्छ काळ्या पाषाणांनीं नानाकृतींचीं बनविलेली आहेत. तीं पाहून प्रेक्षकांच्या मनांतील स्मशानाच्या वेदना विसरून जातात. या थडग्यावर पुष्कळ झाडाचा विस्तार पसरून जाऊन सावलीचें छतच होऊन  गेलें आहे. या लोकांमध्यें थडग्यावर लेख लिहून ठेवण्याची पद्धति प्रचुर असल्यामुळे त्या मृत मनुष्याचें नांव व त्याची बाहदुरकी जिज्ञासु लोकांस चिरकाल पाहण्यास मिळतात. तसा प्रकार इतर जातींमध्यें मुळींच नसल्यामुळे एकदा मेल्यावर त्याची आठवणसुद्धां होण्यास ज्ञातीला मार्ग नसतो. या स्मशानांत विशेष पाहण्यासारखे पराक्रमी पुरुषांचे नमुन्याकरितां थोडे लेख आहेत ते असे:-

 चवथे घोडेस्वाराच्या पलटणींतील एक शूर व तरुण शिपाई लेफ्टनेंट हिंद साहेब याचें थडगें आहे याच्या मरणाची अशी हकीकत आहे कीं, हा येथील रानांत शिकारी करितां गेला असतांना बैलाने शिंगावर घेऊन ता. १९ एप्रिल सन १८३४ मध्ये ठार मारिलें. हा बैल आपल्या गुराच्या कळपांतून त्याचा अगदीं पाटलाग करीत सुटला होता तेंव्हा यानें त्याच्या तडाक्यांतून निसटण्याची बरीच खटपट केली होती. परंतु अखेरीस तिचा उपयोग झाला नाहीं. दुसरें थडगें अमेरिकेतून आलेल्या पाद्री लोंकांपैकी ग्रेव्ह साहेबाच्या जोडप्याचें आहे. तिसरी  कबर मुंबईच्या टाकसाळेचा मास्तर व मुंबईच्या जिआग्राफिकल मंडळीचे उत्पादक जेमस् फ्रेझर हेडलसाहेब यांची आहे. चौथी कबर मद्रासच्या २३ वे पलटणीचा कपतान व हैद्राबाद येथील असिस्टंट रेसिडेंट थामस जान न्यूबोल्ड हा येथें २६ मे सन १८५० रोजीं मेला त्याची आहे. पांचवीं मुंबईच्या सैन्याचा आडव्होकेट जनरल मेजर वुलियम मिलर साहेब यांची कबर आहे. त्याचा आकार खांबासारखा असून वर चंबूवजा डेरा केलेला आहे. शिवाय ब्राथवेटबाईसाहेब बोरबाईसाहेब, फेनेल, कारनेजी, विसेल कॅरोल्सकुक, गोठ क्केन्स वगैरे साहेब लोकांचीं थडगी आहेत.

 या मालकमपेठेला लागूनच दक्षिण आंगास चिनी लोकांच्या स्मशान कपौंडाची लांबलचक एक भिंत आहे. त्यांची कांहीं कांहीं थडगीं आहेत. परंतु त्यावर लेख वगैरे कांहीं लिहिला नसल्यामुळे त्यांजबद्दल माहिती मिळत नाहीं. हल्लीं याठिकाणीं चिनी लोकांचा गंधसुद्धां नाहीं. यामुळे हें स्मशान रद्द झालें आहे.