महाबळेश्वर/पोष्ट ( आफिस ) व तार

विकिस्रोत कडून


पोस्ट (आफेिस) व तार (आफिस)

-------------------------

 पश्चिम दिशेस एकमेकाला लागूनच तार अफिस व पोस्ट ( टपाल ) आफिस हीं दोन आफिसें आहेत. बारा महिने येथें पोस्टाचें सर्व काम चालतें. पत्रे टाकण्याकरितां या शिवाय आणखी ३ खांब पुरलेले आहेत. पहिला खांब सातारा रस्त्यावर हीथ व्ह्यू नांवाचे बंगल्यापुढें आहे, दुसरा खांब भाजी मंडईनजिक दीक्षित यांचे घरापुढें आहे. तिसरा मुंबई पाइंटाकडे जाण्याच्या रस्त्यावर हिलस्टोन बंगल्याचे बाजूस आहे. याशिवाय महाबळेश्वराला जाण्याच्या वाटेवर मुल्लरचे बंगल्यानजिक एक पेटी लाविलेली आहे; तसेंच क्लब, रेसव्ह्यू हाटेल वगैरे प्रसिद्ध इमारतींतही एक एक पेटी लाविलेली असते.

 आक्टोबरच्या महिन्यापासून जून महिन्यापर्यंत वाठारकडील टपाल सकाळीं ८ आणि ९ चे दर म्यान येथें येऊन लागलींच १० चे सुमारास पोस्टमन पत्र वगैरे जिकडचीं तिकडे वांटून जातो. कोंकण व महाड बाजूची डांक दुपारीं दोन वाजतां येते व त्याची डिलिव्हरी तेव्हांच करितात. जेव्हां नामदार गव्हरनर साहेब यांची स्वारी येथें असते तेव्हां दररोज दोनवेळां टपाल येऊन दोनवेळां पत्रवांटणी होते. साहेब लोकांचे नोकर टपाल घेण्याकरितां पोस्टांत येतात, त्यांना लगेच टपाल मिळतें. रात्रीं आठ वाजतां आलेल्या पत्रांची वांटणी सकाळीं बरोबर सहा वाजतां होते; व सकाळीं आठ वाजतां आलेलीं पत्र नऊ वाजतां वाटून शिपाई मोकळे होतात. टपाल जाण्याची नेहमींची वेळ सायंकाळीं बरोबर सहा वाजतां असते. तसेंच गव्हर्नर साहेबांचा येथें मुकाम असल्यास सकाळीं बरोबर सहाला येथून आणखी एक स्पेशल डांक वाठाराकडे जाते. महाडाकडे सकाळीं ११ वाजतां डाक बंद करून रवाना होते.

 पावसाळ्यांंत (जूनपासून सपटेंबरपर्यंत) वाठार कडील टपाल रनरकडून वांईपासून येथें ११ वा  जतां येतें, व रनरबरोवर वांईपर्यत जाणेसाठीं दुपारीं २ वाजतां रवाना होतें. या वेळीं कोणीही परगांवचा इसम येथें राहत नाहीं व गांवांतही ज्यांना पोटाच्या खळीसाठीं हें ठिकाण सोडतां येत नाहीं, अशी साहेब लोकांच्या नोकरांचाकरांची, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानच्या ब्राम्हणांची, दहा पांच वाण्याउदम्यांची, एक दोन दारू विकणा-या पारशांची, व धावड, धनगर कुणबी वगैरे आणखी कांहीं लोकांची, मिळून सुमारें एक हजाराची येथली कायमची वस्ती असते. उन्हाळ्यांत ती पांचसात हजारापर्यंत होते. तेव्हां पावसाळ्यांत पोष्टाला उन्हाळ्याप्रमाणे काम नसल्यामुळे उन्हाळ्यांत पोष्टमास्तर एक व क्लार्क तीन असले तर पावसाळ्यांत एकच इसम राहून काम पाहतो.

 रविवार व सणाच्या सुटयाखेरीज करून बाकीच्या दिवसांत सीझनमध्यें रोजच्या देवघेवीची वेळ सकाळीं ७ पासून ८ पर्यंत व दुपारीं १२ पासून ३ वाजेपर्यंत असते. यूरोपांत जाणाच्या डांकेचीं पत्रे टाकणें तीं शुक्रवारीं टाकणे; व बंग्या,  मनी आरडरी पाठविणें त्या गुरुवारीं पाठविणें हा उत्तम पक्ष. ह्मणजे डाक चुकण्याची व खोटी होण्याची धास्ती राहत नाहीँ. मेल कंत्राटदार मि. फ्रामजी आरदेसर यांनीं टपाल नेणें आणणेचें काम आज ३०|३५ वर्षे महाबळेश्वर सदर स्टेशनवर राहून फार चांगलें केलें आहे, व हल्लींही करीत आहेत. याकरितां यांचे मेलटांग्यांत बसून वाठाराहून येथें व येथून वाठारास येण्याजाण्यास पासेंजर लोकांनाही जागा मिळते ती निर्धास्तपणें स्वीकारावी. त्याबद्दल पासेंजराला निदान ५ रू० भाडे पडतें.

तार आफेिस.

सुपरिंटेंडंट साहेबांचें बिऱ्हाड वुडहौस नांवाच्या बंगल्यांत असतें, त्याच्याच पुढल्या अंगास सरकारी तार आफिस म्हणून पाटी लाविलेली आहे, तेथें हें आफिस आहे. दरसाल हें आक्टोबरला खुलें होऊन तारीख १५ माहे जूनला बंद होतें, थंडया ऋतूमध्यें येथें गव्हरनर साहेबांची स्वारी असते तोंपर्यंत पहिल्या प्रतीचें असल्यामुळे रात्रंदिवस उघडे राहून काम चालतें. व उन्हाळ्यांत तर  अखेरपर्यत हें पहिलें प्रतीचेंच असतें. हें पहिलें प्रतीचें नसतें, त्या वेळीं सकाळचे ११ पासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत तारा करण्याचें काम घेतात. आदित्यवार वगैरे सुटीच्या दिवशीं सकाळीं ७ पासून ९ पावेतों, आणि दुपारी ४ ते ६ पर्यंत आफिस खुलें असतें.

घरें पाहणारे एजंट.

 पाॅॅले माइटसाहेब सन १८४८ मध्यें येथें येऊन राहिला, आणि त्यानें हा हौसएजंटचा धंदा प्रथम घातला. त्यांत याला इतकी गोडी लागली होती कीं, त्यानें हें काम ह्मातारपणापर्यत सोडिलें नाहीं.

 पुढे माइट साहेबांच्या गादीचें काम प्रॉन्क आर साहेबांनीं २०|२५ वर्षेपर्यंत चालवून आपलें बरेंच साधन करून घेतलें, व येथें ते आपलें कायमचें ठिकाण करून राहिले. यांस देवाज्ञा होऊन २|३ वर्षे झाली. यांचे मागें नांव घेण्यासारखा असा निव्वळ हौसएजंटचा धंदा करणारा कोणी नसल्यामुळे कोणाचेंही नांव येथें देतां येत नाहीं.

 या ऑर साहेबांच्या पश्चात् त्यांच्या देखरेखी  खालीं असलेले सर्व बंगले निरनिराळ्या जात्यभिमानी लोकांनीं आपल्या आपल्या जातिबंधुकडे सोंपवून दिल्यामुळे जो तो हौस एजंटच झाला आहे. व यापासून एकास मिळत असलेला कमिशनचा फायदा पुष्कळांत विभागला जाऊन या धंद्याची कवडीमोल किंमत झाली आहे. असा प्रकार झाल्यामुळे एका मनुष्यास पुष्कळ कामें पडून त्या सर्वांत त्यांचें लक्ष विभागले गेलें आहे. याचा परिणाम असा झाला कीं, बंगल्याच्या दुरस्तीकडे किंवा त्यांत आलेले भाडेकऱ्याच्या सोईगैरसोईकडे लक्ष्य कमी पोहोचून मालकाचें नुकसान व भाडेकऱ्याची गैरसोय होण्याचा संभव फार.

 आमचा स्वतांचाही हैोसएजंटचाच धंदा आज १५|१६ वर्षे चालला आहे. परंतु वर्षांतून आठ महिने आम्ही या धंद्यास काया-वाचा-मनें-करून झटून व यत्न करून लोकसेवा करीत आले आहों. त्यांत केवळ पैसा कमाविण्यावरच दृष्टी दिली नाहीं. आह्मी केलेल्या सेवेबद्दल सद्गृहस्थांनीं अभिप्राय दिले ते पुस्तकाचे अखेरीस जोडले आहेत;  त्यांजवरून विदित होणार आहे. इकडील कोणत्याही प्रकारची माहिती आमचेकडे मिळेल.

लष्कर उतरण्याचीं ठिकाणें.

 चांगलीं पैस असून अगदीं सपाटीची व देखावे व पाणी संनिध असलेली अशी सर्वोत्कृष्ठ जागा येथें सासून पाइंटजवळ आहे. ही जागा सासून घराण्याच्या मालकीची असल्यानें त्या जमिनीवर तळ देणे असल्यास त्यांच्या वंशजांची परवानगी घेऊन मग छावणी द्यावी लागते. तीन लष्करी छावण्या यत्किंचितही संकोचीत्पणा न होता येथें खुशाल देतां येतात, इतकी ही विपुल जागा आहे.

 दुसरी जागा हिरडा डेपोजवळ आहे. ती सर्व जंगलखात्याच्या देखरेखीखालीं आहे. या ठिकाणीं पूर्वी सातारच्या राजाच्या सैन्याचा तळ पडून मोठा गांव वसल्यासारखे होऊन जात असे; म्हणजे लष्करकरितां बाजार वगैरे सोई अवश्य असल्यामुळें जवळपासच्या खेडगळे लोकांनीं या जागेला बाजार हेंच नांव दिलें होतें. परंतु पुढें मालकमपेठ बाजार बनल्यानंतर वर सांगितलेल्या बाजारास जुना बाजार  हें नांव पडलें, हल्लीं या जागीं बाजाराचीं दुकानें वगैरे नाहींत तरी येथील रहिवासी लोक यास जुना बाजार असेंच म्हणतात. येथील वेण्णा सरोवर बांधून काढून पाण्याचा सांठा केला आहे ते सातारच्या महाराजांनीं आपले लष्करकरितांच केला होता.

 तिसरी जागा व्हिक्टेरिया काटेज नांवाच्या बंगल्यालगत आहे. ती महाबळेश्वर म्युनिसिपालिटीची असल्यामुळे सुपरिंटेंडेंट साहेबांच्या ताब्यांत आहे.

 येथें तंबू ठोकण्याकरितां किंवा छपरें करण्याकरितां ज्या सार्वजनिक म्युनिसिपालिटीच्या जमीनी घेण्यांत येतात त्यांजबद्दलचें भाड़े म्युनिसिपालिटीत भरण्याची रुळी आहे. मग तें अर्धवट महिन्याचें असलें तरी भरपूर महिन्याचें भाडे घेतात. तें प्रत १ ली ५ रु; प्रत २ री ३ रु.; प्रत ३ री २ रुपये प्रमाणे असतें.

 धर्मसंबंधी सभा किवा वनभोजने करण्यास लागलेल्या जागेस भाडे ४४ रोजप्रमाणें द्यावें लागतें. मात्र या सर्व कमेटीच्या जाग्याबद्दल आगाऊ सुपरिंटेंडंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते.

----------------------